जो अज्ञान दूर करतो आणि ज्ञान देतो तो गुरू. जो चिंता, चित्त, सुख, दुःख, अज्ञान, ज्ञान सर्वांचच हरण करतो; ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ह्या त्रिपुटीला एक करतो आणि त्याच्याच परमानंदस्वरूपात विलीन करतो तो भगवान श्रीहरी. ज्याचे मन त्या सद्गुरूच्या म्हणजेच भगवान श्रीहरीच्या पदी तन्मय झाले नाही त्याच्या जन्माचा, वैभव, विद्या, कीर्ति ह्या सर्व गोष्टींचा काय उपयोग? गुरूचरणी मन एकाग्र करा. त्या भगवान श्रीहरीच्या पायावर आपलं मन-सुमन अपर्ण करा असा उपदेश शंकराचार्य आपल्याला करत आहेत.
गुर्वष्टकम्
शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं
यशश्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम्।
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।1
मिळालीच काया जरी सुस्वरूपी
असे रम्य भार्या च लावण्यखाणी।
उभ्या भव्य याच्या यशाच्या कमानी
असे रास मेरूपरी दौलतीची।।
गुरूपादपद्मी परी चित्त नाही । तरी साधले साधले काय त्यानी।।1
कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं
गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातम्।
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।2
असे कामिनी संतती संपदा ही
मुले नात नातू सुना सर्व काही।
जरी भव्य प्रासाद आरामदायी
पुढे मागुती घालिती आप्त रुंजी
गुरूपादपद्मी परी चित्त नाही। तरी साधले साधले काय त्यानी।।2
षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या
कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।3
जिभेच्याच टोकावरी वेदविद्या
जरी राहती सर्व शास्त्रे समग्रा
अलंकार युक्ता करी काव्यमाला
दिसे गद्य-शैलीमधेही महत्ता
गुरूपादपद्मी परी चित्त नाही । तरी साधले साधले काय त्यानी।।3
विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्य:
सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।4
मिळे मान-सन्मान त्यासी विदेशी
सदा वाजतो कीर्ति-डंका स्वदेशी।
सदाचारमूर्ती मला मानताती
अहंता सुखावे अशी ज्या मनासी
गुरूपादपद्मी परी चित्त नाही । तरी साधले साधले काय त्यानी।।4
क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः
सदासेवितं यस्य पादारविन्दम्।
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।5
जगा जिंकुनी सर्व पृथ्वीतळाचा
जरी जाहला थोर सम्राट मोठा
जरी होऊनी दास राजेच सारे
सदा सेवती पाउले वंद्य भावे
गुरूपादपद्मी परी चित्त नाही । तरी साधले साधले काय त्यानी।।5
यशो मे गतं दिक्षु दानप्रतापा-
ज्जगद्वस्तु सर्वं करे मत्प्रसादात्
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।6
असे मी जगी थोर औदार्यमूर्ती
दिशा दाहि गाती अशी कीर्ति माझी
कृपा ज्यावरी होय माझी तयासी
जगातील वस्तू मिळे कोणतीही।।
अहंकार ऐसा सुखावे जयासी
नरासीच त्या लाभले काय हाती
गुरूपादपद्मी जरा चित्त नाही। तरी साधले साधले काय त्यानी।।6
न भोगे न योगे न वा वाजिराजौ
न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम्।
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।7
नको भोग वा योग ऐश्वर्य काही
नसे कामना या विरक्तास काही
नसे गुंतले चित्त हे कामिनीशी
न वार्यासमा वाहना इच्छितो मी
गुरूपादपद्मी परी चित्त नाही। तरी साधले साधले काय त्यानी।।7
अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये
न देहे मनो वर्तते मे त्वनर्घ्ये।
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।8
मना वाटते ना अरण्यात गोडी
मला वाटते ना घराचीच ओढी
निरोगी बहूमूल्य देहावरीही
म्हणे प्रेम नाही मला थोडकेही
गुरूपादपद्मी परी चित्त नाही । तरी साधले साधले काय त्यानी।।8
अनर्घ्याणि रत्नानि मुक्तानि सम्यक्
समालिङ्गिता कामिनी यामिनीषु।
मनश्चेन्न लग्नं हरेरङ्घ्रिपद्मे
ततः किं तत: किं ततः किं ततः किम्।।9
अलंकार ल्याला मनासारखे ते
हिरे माणके पाचु रत्नावलींचे ।
म्हणे कामिनी बाहुपाशात रात्री
सुखाच्या किती रंगल्या त्या न मोजी
हरीपादपद्मी परी चित्त नाही। मिळाले न काही न काही तयासी।।9
गुरोरष्टकं यः पठेत्पुण्यदेही
यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही।
लभेद्वाञ्छितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं
गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम्।।10
करोनी महापुण्य लाभे जयासी
नराचाच हा देह तो पुण्यदायी
करे तो जरी पाठ गुर्वष्टकासी
सदा साठवी ते गुरूवाक्य कानी।।
‘असे ब्रह्म निर्लेप ते मी अनादि’
मनी जाणुनी घेतसे बोध हाची
असो तो कुणी भूपती वा यतीही
असो ब्रह्मचारी गृहस्थी कुणीही।।
तयासी मिळे ते मनी इच्छिलेले । परब्रह्म आनंददायीच मोठे।।10
( वृत्त - वसंततिलका )
गुर्वाष्टका बसविले मराठमोळी-
पाटावरी बहु यथोचित आदरे मी
अरुंधती नमितसे गुरुपादपद्मी
सांभाळुनी मजसि घ्या गुरुराज तुम्ही।।
-----------------------------
विक्रम संवत्सर आषाढ पौर्णिमा (गुरूपौर्णिमा)12 जुलै 2014
No comments:
Post a Comment