।। #गजाननप्रातःस्मरणस्तोत्रम् ।।

 

।। गजानन प्रातःस्मरणस्तोत्रम् ।।

 

प्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं

सिन्दूरपूरपरिशोभितगण्डयुग्मम् ।

उद्दण्डविघ्नपरखण्डनचण्डदण्ड्-

 माखण्डलादिसुरनायकवृन्दवन्द्यम् ।। ।।

(खण्डल – तुकडा, आखण्डल -सर्व तुकडे/ सर्वजण.  आखण्डलादि सुर-नायक-वृन्द वन्द्यम् – समस्त देवश्रेष्ठांचा गट )

 

शेंदूर माखुन पुरा, अति रम्य झाली

गंडस्थळे सुखद दोन गजाननाची ।

जे जे अनाथ असहाय तयांस पोटी

प्रेमे धरून करि सत्वर रक्षणासी ।।१.१।।

 

जी संकटेच छळती शिरजोर भारी

त्या नामशेष करि सोंड प्रचंड ह्याची

श्रेष्ठातिश्रेष्ठ सुरनायक-वृंद ह्यासी

श्रद्धेय मानून तया पदि नम्र होती ।।१.२ ।।

 

देवांमधे दबदबा असतो जयाचा

दीनांस वाटत असे जणु बंधु त्यांचा

ऐसी असे महति ज्याच गजाननाची

तोची गजानन हृदी स्मरतो प्रभाती ।।१.३।।  

 

 

प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानम्

इच्छानुकूलमखिलं च वरं ददानम् ।

तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं

पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय ।। ।।

 

जो जेचि वांछिल तया वर देइ तैसा

ज्याच्यापुढे नमतसे अति थोर ब्रह्मा

स्कधावरीच मिरवे बहु सर्पमाळा

यज्ञोपवीत म्हणुनी जणु कांचनी त्या ।। २.१ ।।  

 

हा गोजिरा गबगुबीत मनोज्ञ मोठा

आहे सुपुत्र परमेश्वर-पार्वतीचा

लावी लळा जननिसी जनकास मोठा

भक्तांस हा रिझवितो करुनीच लीला ।। २.३ ।।

 

कल्याण थोर करण्यातचि मग्न राही

पुत्रावतार शिव-पार्वतीचा प्रभावी

ऐसा प्रसन्नमुख जो गणराज त्यासी

भावे सदा नमन मी करतो प्रभाती ।। २. ४ ।।

 

प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक-

दावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम् ।

अज्ञानकाननविनाशनहव्यवाह-

मुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य ।। ।।

 

जाळी वनास वणवा करि राख जैसी

तैसेच भक्तजनदुःख क्षणात नाशी

अज्ञान-रानहि धडाडुन पेटण्यासी

साक्षात अग्नि गणनायक हा असेची ।।३.१।।

 

जैसा दिसे तरुण तो गज देखणा गे

तैसा गजेंद्रसम मंगलमूर्ति शोभे ।

उत्साह स्फूर्ति सुख मोद सदैव देई

भक्तांस नित्य शिव-पार्वति-पुत्र हाची ।।३.२ ।।

 

श्लोकत्रयमिदं पुण्यं । सदा साम्राज्यदायकम् ।

प्रातरुत्थाय सततं । यः पठेत्प्रयतः पुमान् ।। ।।

 

हे श्लोक तीन दररोजचि पुण्यदायी

जो आळवे निजमुखी नित सुप्रभाती ।

त्यासी गजानन कृपे बहु सौख्यदायी

साम्राज्य ब्रह्मपदिचे मिळुनीच जाई ।।

------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad

#लेखणीअरुंधतीची-
#प्रातःस्मरणम्