**।। सौन्दर्यलहरी ।।**( विश्लेषण – श्लोक 81 –100 )

      **।। सौन्दर्यरी ।।**

( विश्लेषण – श्लोक 81 –100 )


श्लोक ८१ –

हे जगज्जननी त्रिपुरसुंदरी,

              तू सर्व पर्वतांमधे  जो सर्वात उंच आहे; ज्याच्या रांगांनी ही पृथ्वी कित्येक योजने व्यापली आहे अशा साक्षात नगाधिराज हिमालयाची मुलगी आहेस. सहाजिकच त्याच्याकडून तुला वजनदार, भारीपणा आणि प्रचंड विस्तार हे गुण विवाहप्रसंगी वधूला जे स्त्रीधन माहेरहून मिळतं त्या स्त्रीधनस्वरूपात (नितम्बप्राग्भारः ‘‘हरण- रूपेण’’) लाभले आहेत. ह्या क्षितिधरपति हिमालयाने आपल्या नितंबांपासून म्हणजे त्याच्या पायथ्याच्या पर्वतांपासून आणि दर्‍याखोर्‍यांच्या भागातून गुरुत्व आणि विस्तार म्हणजेच मोठेपणा आणि वैपुल्य हे दोन गुण  तोडून (नितम्बात् आच्छिद्य) किंवा गोळा करून तुझ्या लग्नाच्या वेळी आंदण द्रव्य अथवा हुंडा (हरण) अथवा स्त्रीधन महणून दिले. पर्वतराज हिमालयाने दिलेल्या ह्या देणगीमुळे तुझा  ‘‘ नितम्बप्राग्भारः’’ म्हणजे नितंबांचा विस्तार आणि गुरुत्व  ह्या पृथ्वीलाही झाकून टाकत आहे. आणि एक प्रकारे ह्या वसुंधरेला लघुत्व आणि न्यूनताही आणत आहे. विशाल विस्तार आणि गुरुता हे खरे तर एकत्रितपणे पृथ्वीचे गुण आहेत पण हिमालय हा ‘‘क्षितिधरपति’’ म्हणजे पर्वतांचाही राजा असल्याने हे दोन्ही गुण त्याच्यात आहेतच. पार्वती ही ह्या हिमाद्रिची कन्या असल्याने तिच्याकडे हे गुण स्वभावतःच आहेतच.

गुरुत्वं विस्तारं क्षितिधरपतिः पार्वति निजा-

न्नितम्बादाच्छिद्य त्वयिहरणरूपेण निदधे ।

अतस्ते विस्तीर्णो गुरुरयमशेषां वसुमतीं

नितम्बप्राग्भारः स्थगयति लघुत्वं नयति च ।। ८१

(गुरुत्त्वं-  जड, वजनदारपणा, क्षिति – पृथ्वी. क्षितिधर – पर्वत. क्षितिधरपति – पर्वतांचा राजा हिमालय. नितम्बात् आच्छिद्य – पर्वताचे नितम्ब म्हणजे पर्वताचा पायथा वा पायथ्याचे पर्वत आच्छिद्य म्हणजे तोडून देणे. )

 

असे शैलेन्द्राचा किति अमित विस्तारचि भला

दर्‍या खोर्‍या त्याच्या बहु असति समृद्ध सकला

तुला शैलेंद्राने परिणयप्रसंगीच तुझिया

दिला तोडूनी गे जणु अमित विस्तार तयिचा ।। ।। ८१.१

 

दिले समृद्धीचे अनल समिपे स्त्रीधन तुला

तुला देई मोठेपण जनक वैपुल्य गुरुता

नितंबांना माते बघुन तव ह्या वाटत असे

अगे ठेवीयेले तुजजवळि हे स्त्रीधन तुझे ।। ८१.२

 

गुरुत्वा,विस्तारा बघुन गमते गे हृदि असे

तयांनी झाकीले सकल अवनिसीच पुरते 

गुरुत्वाने येई सकलचि धरेसीच लघुता

तुझ्या सौंदर्याने अवनिसचि ये न्यूनपण का ।। ८१.३


तुला मोहूनी गे तुजवरचि आकृष्ट जन हे

धरेच्या भाराचे तुजपुढती आकर्षण फिके

गुरुत्वा विस्तारा तव घनपणासी नमन गा

अगे आलो माते शरण तव पायी सुत तुझा ।। ८१. ४

----------------------------------


श्लोक ८२ –

हे जगज्जननी, हे त्रिपुरसुंदरीमाते!

 तुझ्या अत्यंत सुंदर पायांबद्दल काय बोलू?  हत्तींमधेही जो श्रेष्ठ आहे अशा गजेंद्रांची/ ऐरावताची सरळ सोंड असो वा सोनकेळींचा सरळसोट नितळ गाभा असो दोघांच्याही देखणेपणाला, मोहकतेला तुझ्या मांड्यांच्या अभिजात सौंदर्यानी जिंकून ऐरावताच्या सरळ सोंडेला वा सोनकेळीच्या गाभ्याला सौंदर्याच्या स्पर्धेतून हद्दपार केलं आहे.

माते तू स्वतः विधिज्ञ आहेस. सर्व वेद व कर्मकांडाची जाणकार आहेस. नीती नियम तज्ज्ञ आहेस. ललितासहस्रनामात तुला ``स्वाहा स्वधा मतिर्मेधा श्रुतिस्मृतिरनुत्तमा ।'' असे म्हटले आहे. तू वेदस्वरूपच आहेस. वेद हे तुझे रूप आहे. असे असूही तू अत्यंत नियमाने वागतेस. नियमांचे कठोर पालन करतेस. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ह्या न्यायाने लोकांचे वर्तन सुधारावे म्हणून तू कायम वेदवचनांचेच पालन करतेस,

खरे पाहता तुझ्यामुळे श्रीशिवशंभूला मोठेपणा प्राप्त झाला आहे. असे असूनही वेदनियमांप्रमाणे तू तुझा पति शिवशंभूला गुडघे टेकवून नमस्कार करतेस. पण रोज रोज असा जमिनीवर गुडघे टेकवून नमस्कार करण्याने तुझ्या गुडघ्यांना काठिण्य आले आहे. ऐरावताच्या गंडस्थळासारखे ते कठिण, सुदृढ, गोलाकार असून ऐरावताच्या गंडस्थळापेक्षाही कठिण आहेत. तुझ्या ह्या नम्रमूर्तीचे मी स्मरण करत आहे. तुझे हे मोहक रूप माझ्या नयनांसमोर सतत स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. माते तुला नमन!

करीन्द्राणां शुण्डान्कनक-कदली-काण्ड-पटलीम्-

उभाभ्यामूरुभ्यामुभयमपि निर्जित्य भवति ।

सुवृत्ताभ्यां पत्युः प्रणति-कठिनाभ्यां गिरिसुते

विधिज्ञे जानुभ्यां विबुध-करिकुम्भ-द्वयमसि ।। ८२

(करिन् – हत्ती. करिन्द्र – गजेंद्र. करिकुम्भ – हत्तीच्या मस्तकाचा अग्रभाग, गंडस्थळ. कनक कदली – सोन्याची केळी. वा सोनकेळ. काण्ड – वृक्षाचा एका गाठी पासून दुसर्‍या गाठी पर्यंतचा भाग, पेर,  पटलः/पटली – वृक्ष अथवा त्याचे खोड, गाभा.  शुण्ड – सोंड. सुवृत्ताभ्याम् – चांगले गोल आकाराचे. जानु – गुडघा. विधिज्ञा – वेदांचे /नीतिनियमांचे उत्तम ज्ञान असलेली. निर्जित्य – जिंकले आहे. विबुध – बुद्धिमान.  )

सुवर्णी केळीचा कनकमय गाभा नितळसा

गजेंद्रांच्या शुंडा सरळ कमनीया असुनिया

तुझ्या पायांजैसे नच दिसत घोटीवपण त्या

तुझ्या पायांचे हे सुबकपण दे मातचि तया ।। ८२.१

 

विधिज्ञा गे तूची तुज उमगले वेद अवघे

असे माते तूची श्रुतिस्वरुप तू ज्ञानस्वरुपे

तरीही वेदांसी जननि नित तू गे अनुसरे

जनासी सार्‍या तू सतत पथदर्शी म्हणुन गे ।। ८२.२

 

अगे माते देसी अतुल बळ मोठेपण शिवा

तुझ्या सामर्थ्याने शिव मिरवि विश्वेश्वर पदा

परी वेदांचे हे नियमचि शिरोधार्य तुजला

करे नेमाने तू नमन गुडघे टेकुन शिवा ।। ८२.३

 

तुझ्या टेकूनीया जननि गुडघ्यांसी नित असे

सुवृत्ताकारी हे कठिण तव होतीच गुडघे

गजाचेही गंडस्थल न इतुके गे कठिण ते

विनम्रा मूर्ती ही जननि मम राहो हृदि उमे ।। ८२.४

 ---------------------------------------------


श्लोक ८३ –

               हे जगज्जननी श्रीशिवशंभू-महादेवांना पराभूत करणे हे  कधी कोणाला शक्य आहे काय? परंतु ह्या पंचबाण म्हणजे उन्मादन, तापन, शोषण, स्तंभन आणि संमोहन हे जे मदनाचे पाच बाण आहेत, किंवा अंग नसलेल्या अनंगाचे शरीर आहे; त्या म्हणजेच विषम बाणरूपी ‘‘विषमविशिख’’ ने तुझ्या पिंढर्‍यांनाच बाण ठेवायचे भाते/ तिरकस बनविलेले दिसत आहेत. पण येथे मात्र त्या पंचबाणाचे  भाते आणि त्यातील बाण दुप्पट झाल्याचे कसे बरे दिसत आहेत? तुझ्या दोन पिंढर्‍यांचे दोन भाते असून प्रत्येकात तुझ्या पायांच्या सुंदर बोटांचे  पाच पाच बाण दिसत आहेत. तुझ्या पायांच्या नखांना पाहून ती बाणांची अत्यंत तेजस्वी पाती चमकत असल्याप्रमाणे वाटते.

हे माते हे इंद्रादि सर्व देव तुझ्या पायावर वंदन करण्यासाठी तुझ्या पायावर मस्तके ठेवतांना, त्यांचे घासणारे मुकुट हे मला ‘‘शाण’’ म्हणजे शस्त्र पाजळण्याचे/ धार लावण्याचे जणु पाषाण वाटत आहेत. त्यांचे मुकुट वारंवार तुझ्या पावलांवर घासून तुझी अत्यंत सुंदर नखे तेजस्वी, निर्मल झाली आहेत. तुझी अपूर्व नखे आमचे कल्याण करोत. माते तुला नमन

पराजेतुं रुद्रं द्विगुणशरगर्भौ गिरिसुते

निषङ्गौ जङ्घे ते विषमविशिखो बाढमकृत ।

यदग्रे दृश्यन्ते दश-शर-फलाः पादयुगली-

नखाग्रच्छद्मानः सुर-मुकुट-शाणैक-निशिताः ।। ८३

 ( विशिखः - बाण. विषमविशिखः – पाच बाण रूपी मदन. निषङ्ग -  बाण ठेवायचा भाता.तिरकस. शाण – धार लावायचा दगड. फल – बाणाचे पाते. दश शर फलाः – दहा बाणांची दहा पाती.)

‘शिवाला जिंकाया शर विफल माझेच सकला’

मनी जाणूनी हे स्मर रचितसे व्यूहचि नवा

तुझ्या दो पायांचे मदन करि भाते सुबकसे

तुझ्या पायांची ही निमुळतिच बोटे शर असे ।। ८३.१

 

जरी कंदर्पाचे विषम शर ते पाच अतुला

शिवाला जिंकाया स्मर करितसे दुप्पट तया ।

अगे दो भाते हे; शर दशचि घे वेध सहजी

चुके ना कामाचा लवभरहि तो नेम कधीही ।। ८३.२

 

(भल्यासीही वेडे करि; बहुत दे तापचि तया

अती क्लांतासी त्या कृश करित शोषूनचि तया  ।

अगे स्तंभाजैसा अचल बनतो  कुंठित मती

प्रमोदोन्मादे त्या शर करितसे मूर्छित अति ) ।। ८३.३

( उन्मादन, तापन, शोषण, स्तंभन आणि संमोहन हे मदनाचे पाच बाण आहेत. )

तुझ्या बोटांची ही तळपति नखे पाहुन गमे

दहा बाणांची ही तळपतिच पाती धवल गे ।

शिवासी जिंकाया सहजचि पराभूत करण्या

अगे माते आली सहज मदनाच्या मदतिला ।। ८३. ४

 

तुझ्या पायी येती शरण सगळे देव गण ही

किरीटांसी त्यांच्या जननि तव पायी नमविती

तयांचे रत्नांचे मकुट मज `शाणा’सम दिसे

शराच्या पात्यांना करिति बहु ते धार सगळे ।।८३.५

 

स्मराचे दो भाते बघ दश शरांनीच सजले

असे अस्त्रा-शस्त्रांहुन कितिक पट तेजस्विच भले

नखांना ऐशा ह्या नमन करितो मी जननि गे

कृपा व्हावी दासावर जननि गे नित्य तव हे ।। ८३.६

----------------------------------------


श्लोक ८४ –

हे जगज्जननी! हे त्रिपुरसुंदरी!

 तुझ्या चरणकमलांचे लावण्य, तुझ्या पादपद्मांचे ऐश्वर्य, तुझ्या पावलांचे पावित्र्य मी कसे वर्णन करु? माय! वेदांचे मस्तक/मूर्धभाग ज्यांना मानले जाते अशी उपनिषदे, असा वेदान्त तुझ्या चरणकमलांना शिरोभूषण मानतो; इतकी ती श्रेष्ठ आहेत. असा दिव्य महिमा असलेली तुझी ही कोमल पावले माझ्या मस्तकावर कृपया तू ठेव. माझ्यावर कृपा कर.

माय! ह्या शिवशंभूच्या जटाजूटातून अविरत वाहणारी ही पवित्र गंगा हे धवल, निर्मल जल, हे दुसरे तिसरे काही नसून तुझ्या पवित्र अशा पावलांना प्रक्षाळून अत्यंत निर्मल, पवित्र झालेले जल आहे. शिवशंभूनी मोठ्या आदरानी त्याला आपल्या मस्तकी धारण केले आहे. किंवा स्वतः गंगा तुझे पाय धुण्याचे पाणी (पाद्यं पाथः) झाली आहे. अशा ह्या तुझ्या पावलांचा महिमा मी कसा वर्णन करु? माझ्याकडे त्यासाठी शब्दच नाहीत.

 हे जगज्जननी! तुझ्या पायाला लावलेला हा आळता /लाक्षारस ह्याला तर मी ‘‘लाक्षालक्ष्मी’’च म्हणेन. त्याचे ऐश्वर्य अपूर्व आहे. त्या लाक्षारसाची लाल प्रभा ही श्रीहरीच्या गळ्यातील कौस्तुभाच्या प्रभेला किंवा मुकुंदाच्या मुकुटातील प्रकर्षानी उठून दिसणारा, जो मधे असलेला लालबुंद मुकुटमणी आहे त्या रत्नप्रभेला लाजवणारी आहे.

 माय गे! मला तर वाटते, हे सर्व देव तुला वारंवार नमन करत असतात. श्रीहरीने तुझ्या पावलांवर त्याचे मस्तक टेकवले असता, तुझ्या पायाचा लाक्षारस/आळिता त्याच्या मुकुटाच्या रत्नांना लागून ती रत्ने अजूनच तेजस्वी झाली असावीत. त्या लाक्षारसाचा सूर्योदयाच्या सूर्यासारखा लाल रंग त्याच्या मुकुटातील रत्नाला लागून ती रत्ने (चुडामणी) लाल प्रभेने, सूर्यासमान तेजाने तळपत असावीत.

 माते! धन्य तुझी पावले! तुझ्या पावलांवर माझे नमन. तुझी ही लावण्याचे मापदंड सांगणारी पावले, ऐश्वर्याचे ऐश्वर्य असलेली पावले, ज्ञानाचा दिव्य प्रकाश देणारी पावले, भागीरथीच्या निर्मल जलालाही पवित्र करणारी पावले तू कृपा करून माझ्या मस्तकावर क्षणभर तरी ठेव. त्यांचा कणभर तरी स्पर्श माझ्या शिराला होऊ दे. माते त्याने मी धन्य धन्य होईन. नमन माते! 

श्रुतीनां मूर्धानो दधति तव यौ शेखरतया

ममाप्येतौ मातः शिरसि दयया धेहि चरणौ ।

ययोः पाद्यं पाथः पशुपति-जटाजूट-तटिनी

ययोर्लाक्षा-लक्ष्मीररुणहरिचूडामणिरुचिः ।। ८४

( शेखरतया – मुकुटाप्रमाणे धारण केले आहे. ययोः - ज्या (पायांचे). पाद्यम् – पाय धुण्यासाठी दिलेले पाणी. पाथस् – जल. तटिनी – नदी. चूडामणि – मुकुटातील मणि / रत्न. किंवा आभूषण. येथे गळ्यातील कौस्तुभमणी असाही अर्थ होऊ शकतो. लाक्षालक्ष्मी – आळत्याचे सौंदर्य, ऐश्वर्य. रुचि – प्रकाश, कांति, आभा, किरण. )

जया वेदांचे ह्या शिरकमल ऐसे समजती

असे सायी जैसे उपनिषद हे श्रेष्ठतरची

तयासीही वाटे तव पद शिरोधार्य जननि

शिरी सन्मानाने मिरविति शिरोभूषण तयी ।। ८४.१

 

असे माते हेची तव चरण सिद्धान्तमयची

असे वेदांताचे प्रतिक जणु हे पाय जननी

जया वेदांनीही नित नमन केले लवुन गे

अगे माते ऐशा चरणकमला वंदन असे ।। ८४.२

 

तुझे प्रक्षाळीता चरण, जल जे निर्मल घडे

जटाजूटी वाहे अविरत शिवाच्या सलिल ते

असे साक्षात् गंगा शिवशिरिच जी वाहत असे

तुझ्या पायांचा हा जननि महिमा उज्ज्वल असे ।।८४.३

 

तुझ्या पायांचा हा बहु अरुण लाक्षारस उमे

गमे ‘‘लाक्षालक्ष्मी’’ अनुपम प्रभेनेचि झळके ।

हरीच्या कंठी जो तळपत असे कौस्तुभमणी

प्रभा तैसी त्याची हरिमुकुटरत्नासम जशी ।।८४.४

 

मला वाटे माते नमन करतांना तुज हरी

पदीचा लागोनी लव अरुण तो रंग किरिटी

प्रभा रत्नांची त्या उठुन दिसते लाल जणु ही

अगे माते ठेवी चरणकमला त्या मम शिरी ।।८४.५ 

------------------------------------------


श्लोक ८५ –

हे जगज्जननी!

तुझ्या ह्या निर्मल अशा पदकमलांना अभिवादन करणारी किती स्तुतीस्तोत्रे गायली तरी कमीच आहे. तुझी पावले अत्यंत मनोहर, कोणाचेही चित्त वेधून घेतील इतकी सुंदर आहेत माते! तुझ्या तळपायांना लावलेल्या ओलसर अशा लाक्षारसाने/आळत्याने तर ती अजूनच मनमोहक विलोभनीय दिसत आहेत. लाल माणिकाच्या कांतीवर नजर ठरत नाही त्याप्रमाणे ओलसर आळत्याच्या नयनमनोहर तजेलदार लाल रंगावरून कोणाचीही दृष्टी हलणार नाही इतका तो तुझ्या पावलांवर उठू दिसत आहे. त्या आाळत्याची अरुणप्रभा दिशादिशात सर्वत्र पसरली आहे.

हे माते! असे म्हणतात की, जर एखाद्या लावण्यवतीने अशोकवृक्षाला तिच्या पदाघाताने ताडित केले तर अशोकवृक्ष वसंतऋतू नसतांनाही बहरून येतो.  तू जेव्हा स्वर्गात इंद्राच्या नंदनवनात क्रिडा करण्यासाठी जातेस तेव्हा, लालचुटुक आळता लावलेल्या तुझ्या पायांनी तू अशोकावर पदाघात करावास म्हणून हा अशोकवृक्ष आसुसलेला असतो. तुझ्या पायाच्या स्पर्शासाठी झुरत असतो. तुझ्या कोमल पदस्पर्शासाठी उत्सुक असलेल्या ह्या अशोकाची ही मनोकामना लक्षात येऊन त्याच्या आसूयेने श्री शिवशंभूंना मात्र त्यांचा क्रोध आवरत नाही. त्यांचा हा मत्सर, अशोकावरचा परम क्रोध ह्या सर्व गोष्टी तुझ्या ह्या कमलकोमल पावलांचा महिमा गाणार्‍याच आहेत. माते अशा ह्या तुझ्या पावलांची आस आमच्या मनात कशी बरं उत्पन्न होणार नाही? तुझ्या पावलांना अभिवादन करणारी स्तुतीस्तोत्रे आमच्या मुखातून कशी बरं बाहेर पडणार नाहीत? माते आमच्या मुखातून तुझ्या ह्या पावलांची स्तुतीस्तोत्रे कायमच गायली जाऊ देत. नमन माते!

   नमोवाकं ब्रूमो नयन-रमणीयाय पदयो-

स्तवास्मै द्वन्द्वाय स्फुट-रुचि-रसालक्तकवते ।

असूयत्यत्यन्तं यदभिहननाय स्पृहयते

पशूनामीशानः प्रमदवनकङ्केलितरवे ।। ८५

( अभिहननाय स्पृहयते –पदाघातासाठी उत्सुक असतात. कामना करतात. इच्छा करतात. कंकेलितरु – अशोकतरु. प्रमदवन – इंद्राचे नंदनवन जे स्वर्गात असते. स्फुट – प्रकट होणे , दिसणे. रुचि – आभा, प्रभा.   कवते – स्तुति करणे. पशूनाम् ईशानः – सर्व भूतमात्रांचा स्वामी , शिव.)

अहाहा कैसी ही चरण-युगुले नाजुक तुझी

तयासी शोभे हा नव अरुण लाक्षारस किती

तुझ्या गोर्‍या गोर्‍या नितळपदि हा लालचुटुका

जरा ओला ओला रस दिसत तेजस्वि बहु हा ।। ८५.१

 

अहो स्वर्गामध्ये बघुन तुजसी नंदनवनी

तुझी पाहुनीया चरणकमळे मोहक अती

अशोकासी वाटे मम तनु घडो ही पुलकिता

पदांच्या आघाते मम बहरु दे देह सगळा ।। ८५.२

 

तुझ्या स्पर्शाची ही तरुवर मनी आस बघुनी

असूया मात्सर्ये शिव करितसे क्रोध हृदयी

शिवाची ईर्षा ती फुणफुण अशोकाविषयिची

जना सांगे माते चरण महिमा हा तव किती ।। ८५.३

 

तुझे ऐसे दोन्ही पदकमल हे वंद्य असती

तयांची गातो गे नमनस्तवने हर्षितमनी ।। ८५. ४

------------------------------------


श्लोक ८६ –

हे जगज्जननी! तुझी आळता लावलेली पावले कोमल, मनोहर आहेत हे खरे. तुझ्या पदाघातासाठी इंद्राच्या नंदनवनातील अशोकही आसुसलेला असतो हे ही खरे पण तुझ्या चरणकमलांचा अचानक होणारा आघातही मोठा स्पृहणीय आहे.

पतीपत्नीमध्ये गप्पा गोष्टी करतांना पतिदेवांना हमखास काही खोचक बोलायची हुक्की येते. तशीच तुझी थट्टा करायची लहर शंभूदेवांना आली खरी पण चुकून त्यांच्या जिभेवरून ‘‘प्रिय उमे’’ ह्या संबोधनाऐवजी ‘‘प्रिये गंगे’’ असे शब्द निसटले मात्र!  आणि पुढच्या घडणार्‍या प्रसंगांची त्यांना कल्पना आली. आता सपशेल शरणागती! त्याशिवाय उपायच नाही. पण माते ही थट्टा जरा जास्तच झाली. तुझ्यासारख्या तेजस्वी, लावण्यवती, मानिनीला आपल्या पतिमुखातून सवतीचा इतक्या प्रेमळपणे झालेला उल्लेख कसा बरं सहन होईल? सर्व विश्वाचा कारभार चालवणार्‍या, तुझ्यासारख्या मोठा अधिकार असलेल्या पत्नीला तर हे कधीच रुचणार नाहीत. ते शब्द एखाद्या शल्यासारखे तुझ्या हृदयात घुसले.

थट्टा करता करता चुकून जिभेवरून निसटलेले शब्द शंभूमहादेवांना महागात पडले. महा भयांकर क्रोधाने तुझी तनुलता थरथरतांना पाहून शिवाला आपल्यावर होणार्‍या अंगार-वर्षावाचा अंदाज आला आणि त्यानी तात्काळ तुझ्या पायांवर त्याचे मस्तक झुकवून क्षमायाचना केली. पण हाय रे हाय! तुझ्या पायांची जोरदार लाथ त्याच्या कपाळावर बसली.

पती-पत्नीच्यामधल्या ह्या भांडणप्रसंगाला कोणी शेजारी प्रेक्षक लाभला तर तो  त्याचा चांगलाच आस्वाद आणि आनंद घेतो. त्यातल्या त्यात तो जर कोणी शत्रुपक्षातला असेल तर मग काय विचारता! त्याला हास्याच्या उकळ्या नाही फुटल्या तरच नवल! येथेही ‘‘ईशानरिपु’’ म्हणजे शिवाचा कट्टर शत्रू हजर आहे. बोलून चालून त्याला शरीर नसल्याने तो गिरिजेच्या लोभस चेहर्‍याचा तर कधी सुंदर अवयवांचा आश्रय घेऊन राहतो.  शिवाच्या कपाळावरील अग्निनेत्राने त्याला जाळून अनंग /अंगहीन केले हे शल्य त्याच्या मनात खूप काळापासून होते. त्या अग्निनेत्रावर असा सणसणित लत्ताप्रहार होताना पाहून, आपल्या शत्रूची अशी फटफजिती होताना पाहून, अनंगाला खुदुखुदु हसू येऊ लागले.  शिवमस्तकावरील प्रहारावेळी तुझ्या पायातील पैंजणांमधून त्यावेळी जो किलकिल आवाज झाला तो पैजणांचा नसून आनंदाच्या उकळ्या फुटणार्‍या मदनाच्या उपहास गर्भ खुदुखुद हसण्याचा असावा असे मला वाटते. माते अशा तुझ्या चरणारविंदाना नमन!

मृषा कृत्वा गोत्रस्खलनमथ वैलक्ष्यनमितं

ललाटे भर्तारं चरणकमले ताडयति ते ।

चिरादन्तःशल्यं दहनकृतमुन्मूलितवता

तुलाकोटिक्वाणैः किलकिलितमीशानरिपुणा ।।८६

(मृषा – चुकून, चुकीने. गोत्रस्खलन -चुकून तोंडातून अभावितपणे नको ते निघून जाणे. वैलक्ष्य – कृत्रिम, खोटं हसू, वैपरित्य. ईशानरिपु – अनंग, मदन. तुलाकोटि  – पैंजण, नुपूर. चिरात् अन्तः शल्यम् - खूप दिवस मनात ठुसठुसणारं शल्य, शरीरात घुसून पीडा देणारे बाणाचे टोक, वा मोठा काटा इ. उन्मूलितवता  – मूळापासून निघून गेलं, मूळापासून जणु उपटून टाकलं गेलं.)

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत वदता खोचकपणे

मुखी शंभूच्या ये चुकुन ‘‘प्रिय भागीरथि’’ असे

रुचावे कैसे ते वचन अपमानीत करि जे ।। ८६.१

 

ढळे जिह्वा ऐसी दुखवि गिरिशाची तव हृदी

तनु कापे त्याने, विपुल उसळे क्रोध हृदयी

कळाले शंभूसी धडगत न त्याची लव मुळी

इलाजासी त्याच्या शरण तुज जाणे उचितची ।। ८६.२

  

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिवही

कपाळी शंभूच्या त्वरितचि पदाघात करिसी

अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य भलते

म्हणे तो आहाहा! मम विजय हा थोरचि असे ।। ८६. ३

------------------------------------------------


श्लोक ८७

हे जगज्जननी! तुझी कोमल पावले कमळाप्रमाणे नाजुक, सुंदर आहेत. हे जरी खरं असलं तरी, कमळांची आणि तुझ्या पावलांची  कुठे तुलनाच होऊ शकत नाही. तू त्या उत्तुंग पर्वतराज हिमालयाची मुलगी आहेस. त्या अत्यंत थंड प्रदेशात हिमाच्या विशाल राशींमधे तुझी चरणकमळे नैसर्गिकरीत्या सहज वावरू शकतात. राहू शकतात. सर्वत्र विनासायास, सहजगत्या भ्रमण करू शकतात. बर्फाळ प्रदेशात राहण्यात तुझी पावले निपुण आहेत. पण --- !! कमळांचे तसे नाही. कमळे हिमालयाच्या पाणी गोठवणार्‍या थंड हवेत कायम तग धरून राहू शकत नाहीत.

प्रभातीला उमलले कमळ सूर्य मावळताच मिटून जाते. तुझ्या पादपद्मांचे तसे नाही ती सदोदित प्रफुल्लित, प्रसन्न असतात. सदैव विकसित असून कधीही कोमेजत नाहीत. उत्फुल्ल कमळात कमला म्हणजे लक्ष्मी राहते असे म्हणतात. तुझ्या चरणकमलात तर लक्ष्मी कायमच निवास करत आहे. तुझे चरणकमळ ह्या कमलेचे अधिष्ठानच आहेत.

माझी ही स्तुतीदेखील थोडी कमीच आहे. कारण तुझे चरणारविंद जे सतत आठवतात, तुझी मनापासून भक्ती करतात. तुझ्याच स्तुतिस्तोत्रांमधे तल्लीन होऊन जातात, तुझ्याच  उपासनेमधे स्वतःला विसरून जातात अशा तुझ्या भक्तांना तुझी कमलकोमल पावले अत्यंत स्पृहणीय असे निजानंदरूपी ऐश्वर्य बहाल करतात. हे सामर्थ्य कमळांमधे नाही. तुझे चरणकमल ह्याही बाबतीत कमलांना मागे टाकतात. त्यांना पराभूत करतात.

सुहृत्हो! ह्या श्लोकातील ‘‘समयिनां’’ हे पद एका विशेष प्रयोजनाने येथे वापरले आहे. शाक्त सांप्रदायात ‘‘समयाचार’’ आणि ‘‘कौलाचार’’ असे दोन उपासना मार्ग आहेत. कौलाचारमधे बाह्यपूजेला प्राधान्य असते तर समयाचारमधे मानसपूजेवर जास्त भर असतो. मानसपूजा ही बाह्यपूजेहून श्रेष्ठ आहे. ती अंतःकरणापासून  केलेली असावी. त्या निरतिशय आनंदरूप श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपाचे  आणि चरणारविंदांचे चिंतन करता  करता अष्टसात्त्विक भाव जागे  व्हावेत. जे समयाचार रीतीने जगज्जनची मानसपूजा करणारे `समयिना' असतात ते त्रिभुवनात धन्य होत! नमन माते!

हिमानीहन्तव्यं हिमगिरिनिवासैकचतुरौ

निशायां निद्राणं निशि चरमभागे च विशदौ ।

वरं लक्ष्मीपात्रं श्रियमतिसृजन्तौ समयिनां

सरोजं त्वत्पादौ जननि जयतश्चित्रमिह किम् ।। ८७

( हिमानी – बर्फाच्या राशी, ढीग. समयिनाम् - तन्मयतेने उपासना करणार्‍याांना )

सरोजाच्यासंगे चरणकमलांचीच तुलना

कशी व्हावी माते; तव चरण विश्वात अतुला

हिमाद्रिमध्ये गे कमल कलिका ना उगवती

जिथे गोठे सृष्टी कमलकलिका तेथ कसली ।। ८७.१

 

परी बर्फामध्ये चरण सहजी चालति तुझे

हिमाने त्यांना हो क्षति नचचि पोचे लवहि गे

सरोजे जाती गे मिटुन बघता सूर्य क्षितिजी

परी राहे रात्रंदिनि चरण उत्फुल्ल तवची ।। ८७.२

 

सरोजी राहे जी कमलनयना जीच कमला

वसे ती आनंदे चरणकमली नित्य तुझिया

करे जो भक्तीने स्तवन तव एकाग्रचि मने

तयांना देसी तू सकलचि ऐश्वर्य विभवे ।। ८७.३

 

निजानंदाचे ते भरभरुन दे दान सकला

सरोजासी नाही जननि क्षमता ही तुजसमा

तया कैसी यावी चरणकमलांची सर तुझ्या

तुझ्या ह्या तेजस्वी चरणकमला वंदन पुन्हा ।। ८७.४

---------------------------------------

 

श्लोक ८८ –

हे जगज्जननी!

तुझ्या पावलाचा अग्रभाग (प्रपद - चवडा) हा तेजस्वी, निर्मळ अत्यंत प्रसन्न वाटेल असं यशाचं स्थान/पद आहे. धवल कीर्तीचे अढळ पद आहे.  संसारात अनेक दुःख, संकटं, सतत येतच राहतात. कधि अस्मानी तर कधि सुल्तानी. नैसर्गिक आपत्ती हातातच नसतात. राजकीय आपत्तींनाही निमूटपणे तोंड द्यावेच लागते. आधी, व्याधीतूनही सुटका नाही. जरा / वृद्धत्व देह जर्जर केल्याशिवाय रहात नाही. हा संसार जरी दुःखमय असला तरी तेथे आशेचा एक जोमदार किरण मला दिसत आहे. माय! तुझ्या पावलांचा हा अग्रभाग/प्रपद म्हणजेच चवडा ह्या संकटांचे ‘‘अपद’’ आहे. पद म्हणजे स्थान. जिथे संकटांना/ विपत्तीना स्थान मिळत नाही असे ‘‘विपदां अपदं’’ असे तुझ्या पावलांचे नुसते चवडेही सर्व संकटातून भूतमात्रांना मुक्त करतात. 

माय! कोणी महाथोर पंडित, कवी तुझ्या चवड्यांना कासवाच्या पाठीवरील कवचाची उपमा देतात. छे छे! मी त्यांच्याशी मुळीच सहमत नाही. कुठे कमलकलिकेसम तुझे कोमल चवडे अन कुठे ती कासवाची निबरट खडकासारखी पाठ! काही तरी साम्य आहे का?

हे त्रिपुरसुंदरी!

तुझ्या आणि शिवाच्या विवाहप्रसंगी लाजाहोमानंतर (लाजा म्हणजे लाह्या) शिवशंभूने तुझे कोमल पाऊल स्वतःच्या हाताने उचलून कठीण खडकावर ठेवले. ‘‘प्रिये! माझ्या संसारात डळमळीत राहू नकोस. माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे. ह्या कठीण खडकासारखी पाय रोवून खंबीर उभी रहा. येणार्‍या प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना धैर्याने कर. माझा परिवार फार मोठा आहे. मी स्वतः भूतपति असल्याने येथील सर्व जीवसृष्टीची जबाबादारी माझ्यावर आहे. आजपासून ह्या जीवसृष्टीचे भरण-पोषण करण्याची जबाबदारी मोठ्या कुशलतेने, जराही खंड न पडू देता अखंडपणे सांभाळ.’’ माय! तुझ्या सामर्थ्यावर, तुझ्या कर्तबगारपणावर शंभूचा पूर्ण विश्वास आहे. त्याचप्रमाणे सर्व भूतमात्रांविषयी तुझ्या मनात असलेला जिव्हाळा, आत्मीयता, कणव, मुलाप्रमाणे असलेली ममता, वात्सल्य श्री शिव शंभूला पूर्ण माहीत आहे. तुझ्या बद्दल त्याला सार्थ विश्वास, अभिमान असल्यामुळेच त्याने सर्व विश्वाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. तुझ्या ह्या यशोरूपी चरणकमलांवर मी सर्वस्वी शरण आलो आहे. माते तुला नमन!

( आता नवरीला सहाणेवर पाय ठेवून उभे रहायला सांगितले जाते. ह्या विधीसाठी  ‘‘अश्मा इव स्थिरा भव ।’’ म्हणजे ‘‘दगडासारखी स्थिर/खंबीर रहा.’’ हा मंत्र वापरला जातो. नवीन कुटुंबात ही कन्या स्थिरावणे , भक्कमपणे उभी राहणे हे महत्त्वाचे आहे म्हणून  हा विधी केला जातो. कदाचित सहाण घरात मिळणारी, वाहून न्यायला सहज सोपी दगडाची जरा सुबक वस्तु असावी म्हणून वापरली जात असावी. तसेच सहाणेचा दगड हा अत्यंत कठीण `कोरंडम’ अशा प्रकारात मोडतो. म्हणून त्याच्यावर चंदन उगाळले जाते. अन्य दगडावर घासून उगाळले जात नाही. )

पदं ते कीर्तीनां प्रपदमपदं देवि विपदां

कथं नीतं सद्भिः कठिन-कमठी-कर्परतुलाम् ।

कथं वा बाहुभ्यामुपयमन-काले पुरभिदा

यदादाय न्यस्तं दृषदि दयमानेन मनसा ।। ८८

(प्रपद – पायाचा अग्रभाग/पाऊल.चवडा  कीर्तीनां पदं – कीर्तीचे अग्रस्थान, शिखर. विपदां – संसारात भोगाव्या लागणार्‍या विपत्ती, संकटे अधिदैविक, अधिभौतिक, अध्यात्मिक. अपद- कधीही स्थानहोऊ शकत नाही. कमठी-कर्पर – कासवाच्या पाठीचे कवच. दृषदी - दगडावर )

तुझ्या पायांचे हे अमल चवडे पाहुन गमे

यशचे कीर्तीचे अढळ जणु ते स्थान बरवे

जगीच्या दुःखांना पद न मिळते गे तव पदी

पदी जे जे येती जननि विपदांतून सुटती ।। ८८.१

 

अनर्था दुर्भाग्या मुळि न बघती ते नर कधी

तुझ्या कीर्तीरूपी अमल चवड्यांसीच भजति ।

परी ‘‘कूर्मपृष्ठा समचि चवडे हे तवचि गे ”

 कवी कोणी कोणी म्हणति मजला ते न रुचते ।। ८८.२

 

कुठे कूर्माची ती निबरट असे पाठ कठिणा

कुठे पद्मा-जैसे अमल चवडे हेचि मृदुला

नसे दोघामध्ये लवभर कुठे साम्य जननी

कशी विद्वानांना तरिहि तुलना ही करवली ।। ८८.३

 

अगे लाजाहोमा समयिच विवाहात तुमच्या

स्वतःच्या हाताने उचलुन तुझ्या कोमल पदा

तयासी पाषाणावर शिव पहा ठेवित असे

जरी तो आहे गे मृदुल कनवाळू तरि कसे ।। ८८.४

 

 ‘‘सदा अश्माऐसे कणखरचि खंबीर असणे

प्रिये विश्वाच्या ह्या सकल परिवारात मम गे

कुटुंबाचे माझ्या करि भरण तू पोषण उमे

सदा हया कर्तव्या कधि न चुकणे’’ शंकर वदे ।। ८८.

 

तुझ्या सामर्थ्याचा मनि धरुन विश्वास जननी

दिली कल्याणाची तुजसि गिरिजे कामगिरि ही

दया त्रैलोक्याची शिवमनी सदा राहत असे

यशस्वी पायांसी तव करितसे वंदन उमे ।। ८८.

----------------------------------------


श्लोक ८९ –

हे जगज्जननी!

तू लोकांना अत्यंत त्रास देणार्‍या शुंभ, निशुंभ, महिषासुर चंड, मुंड ह्या महा भयंकर राक्षसांना ठार मारलस. ह्या राक्षसांना मारतांना तू  अत्यंत क्रोधाने जे भयंकर रूप धारण केलं होतस त्यामुळे लोक तुला चंडी म्हणू लागले.

प्रत्यक्षात मात्र तुझी पावले अत्यंत कोमल आहेत. बोटांची नखे चंद्राप्रमाणे निर्मल, धवल, शितल, प्रकाशमान आहेत. जणु काही तुझ्या नखांवर चंद्रच येऊन बसले आहेत. शुभ्र निरोगी नखे हे सर्व शरीर निरोगी, निकोप असल्याचं प्रतिक आहे. माय! सूर्यविकासी कमळे चंद्राच्या प्रकाशाने मिटून जातात.  मला वााटते तुझ्या नखांच्या प्रभेच्या स्पर्शाने ह्या देवांगनांची करकमळे मिटून त्यांच्या परत सुंदर कळ्या झाल्या आहेत. आचार्यांच्या प्रतिभेला वंदन करावे असेच हे उदाहरण आहे.  स्वर्गातील सर्व  ललना हात जोडून ह्या त्रिपुराम्बिकेच्या चरणांवर नमस्कार करत आहेत. त्यावेळेस त्यांचे जोडलेले कोमल हात  कमळाच्या कळ्याप्रमाणे दिसत आहेत. इतका ह्या अम्बिकेच्या चरणकमलांचा नव्हे तर चरण नखांचा महिमा आहे.

हे माय! तुझे हे निर्मल, कोमल चरणकमल स्वर्गातल्या कल्पवृक्षांना हसत असावेत असे मला वाटते. स्वर्गातील कल्पवृक्ष आपल्या नवपल्लवरूपी कराग्रांनी फक्त देवांनाच  अभीष्ट फळे देतात. तुझी ही चंद्राप्रमाणे दिसणारी आणि हवीहवीशी वाटणारी नखाग्रे भूलोकावरील अत्यंत दीन, दरिद्री अशा भक्त जनांचेही मनोरथ पूर्ण करतात. कल्पवृक्षाप्रमाणे त्यांच्याकडे अपपरभाव नाही. माय! जशी तुझी नखे तुझ्या  सर्व भक्तजनाचे कल्याण करतात त्याप्रमाणे तू आमचेही कल्याण कर माते! तुला नमन माते!

 

नखैर्नाकस्त्रीणां करकमलसंकोचशशिभि-

स्तरूणां दिव्यानां हसत इव ते चण्डि चरणौ ।

फलानि स्वस्थेभ्यः किसलय-कराग्रेण ददतां

दरिद्रेभ्यो भद्रां श्रियमनिशमह्नाय ददतौ ।। ८९

( नाक – स्वर्ग. नाकस्त्री- स्वर्गातील देवपत्नी, देवांगना वा अप्सरा. किसलय – पल्लव, कोमल अंकुर. भद्रां श्रियं – मंगलमय विपुल ऐश्वर्य.)

 

कसे वर्णू सारे तव चरणसौंदर्य जननी

घडे लावण्याचे अनुपमचि हे दर्शन पदी

असे वाटे माते जणु उगवला अंबरमणी

नखांच्या रूपाने जननि बहु आह्लादक अती ।। ८९.१

 

प्रभा का चंद्राची जणु पसरलीसे दशदिशी

नखातूनी ऐसी धवल किरणे ही सुखविती

जसे चंद्रस्पर्शे कमलदल जाती मिटुन ते

कळी होऊनी ते नमन करि चंद्रासचि जसे ।। ८९.२

 

घडे माते तैसे नखकिरण-स्पर्शेच तुझिया

मिटोनी घेती गे करकमल ह्या गे सुरस्त्रिया

अगे ह्या देवांच्या सकल ललना गे तव पदी

करांसी जोडूनी नमन अति भावेच करती ।। ८९.३

 

तुझे माते कैसे चरण उपहासेच हसति

अगे स्वर्गीच्या ह्या सुखकर अशा कल्पतरुसी

तरू देती सौख्या सुरवरपुरीच्या सुरगणा

परी भूलोकीची करितिच उपेक्षा म्हणुनिया ।। ८९.४

 

दरिद्री दीनांना सुख वितरती मंगलमयी

तयांच्या सेवेसी चरणकमले तत्पर अती

नखांची कांती ही सकल जन इच्छाच पुरवी

पदांसी ऐशा गे शरण नित आलोच जननी ।। ८९.५

-----------------------------------------

श्लोक ९० –

हे जगज्जननी!

तुझ्या पावलांचे अथक वर्णन करून सुद्धा मला त्यांचा पूर्ण महिमा सांगता येणार नाही. तुझ्या भक्तांचे चित्त जाणून तू तुझ्या दीन, आर्त भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार, अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मनात असेल ते भरभरून देत असतेस. निरंतर देतेस. तुझ्या दान देण्यात कधीही खंड पडत नाही. तुझे हे चरणकमल  भक्तांना तुझ्या सौंदर्यरूपी मकरंदाचे, मधुचे सतत वितरण करत असतात. तुझ्या ह्या अमित अशा सौंदर्याचे प्रक्षेपण दाही दिशात होत असते.

हे सुभगे! हे शंभुप्रिये! मला तर तुझे हे पदारविंद कल्पवृक्षावर लगडलेल्या फुलांच्या घोसांसारखे किंवा ताटव्यांसारखे वाटत आहेत. त्यात मध ओथंबून गळत आहे. माते माझ्या ह्या जीवाला षट्पद म्हणजे भृगांप्रमाणे तुझ्या ह्या चरणकमलांवर रममाण होऊ दे. माते मनासह माझी पाचही इंद्रिये जेव्हा तुझ्या चिंतनात लागतील तेव्हाच त्यांना भुंग्याप्रमाणे षट्पदत्व प्राप्त होईल. माते काया, वाचा मनाने मला तुझ्या चरणी रमून जाऊ दे बाकी मला काही काही नको. ही पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे असलेली संसारसुखे मला नकोत. तुझे चरणकमल हेच माझ्या मनाचे निरंतर वसतिस्थान असो. नमन माते! 

ददाने दीनेभ्यः श्रियमनिशमाशानुसदृशीं

अमन्दं सौन्दर्यप्रकरमकरन्दं विकरति ।

तवास्मिन्मन्दारस्तबकसुभगे यातु चरणे

निमज्जन्मज्जीवः करण-चरणः षट्चरणताम् ।। ९०

( अनिशम् – निरंतर. आशानुसदृशी – अपेक्षेप्रमाणे. प्रकर – रास,ढीग, विपुल, समृद्ध, पुष्कळ  अमन्द -तेजस्वी, प्रचंड. विकरति – वितरण करतात. प्रक्षेपण करतात. स्तबक – फुलांचा ताटवा. मंदारस्तबक – कल्पवृक्षाच्या फुलांचे घोस, ताटवे. सुभगा – पतिप्रिया. )

(अन्वय - हे मातः ! दीनेभ्यः आशानुसदृशी श्रियं अनिशं ददाने, अमन्दं सौन्दर्य-प्रकर मकरन्दं विकिरति, मन्दारस्बकसुभगे, अस्मिन् तव चरणे करचरणः मज्जीवः निमज्जन् षट्चरणतां यातु।)

जगी दुःखी दीना चरण तव हेची सुखविती

यांना सौख्याची भरभरुन दानेच लुटती

तुझी माते दोन्ही चरणकमळे सुंदर अशी

प्रभा सौंदर्याचे दिशि-दिशिच प्रक्षेपण करी ।। ९०.१

 

अगे कल्पवृक्षा बहर सुमनांचा लगडला

सुधा ओथंबूनी, सुमनकलिका गच्च फुलल्या

दिसे तैसे माते तव चरण पुष्पासम मला

सदा दीना देती विपुल मकरांदास मधुरा ।। ९०.२

 

अगे माते माझे धरुन मन पंचेंद्रियहि ती 

सहा होती माझे पद म्हणुन मी षट्पद धरी

मला मातेच्या ह्या चरण कमली भृंग बनुनी

सदा राहू द्यावे पुरवि मनिची आस जननी ।। ९०.३ 

-----------------------------------------------------------


श्लोक ९१ –

हे जगज्जननी!

तुझी जीवनाची मार्गक्रमणा वर्णनातीत आहे. तुझ्या जीवनकहाणी मोठी रसाळ, रमणीय आहे(चारुचरिते).  प्रत्यक्षात तू चालतेस तेव्हा तुझा पदन्यास इतका लोभस असतो की तो कोणाचेही मन मोहून घेईल. तुझी चालण्याची धाटणीच अशी आहे की, पावले कशी आबदारपणे डौलात टाकावीत, हे प्रेक्षकांनी पहातच रहावे. तुझ्या देखण्या चालीने पहाणार्‍यालाही आहाऽऽहा!! व्हावे. अशा तुझ्या चालीचा अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा सराव करावा असे तुझ्या भवनातील राजहंसांनाही वाटले. ते तुझ्याकडे पाहून चालावं कसं ह्याचा अभ्यास करू लागले.  अभ्यास हया संस्कृत शब्दाची व्याख्या ``पुनः पुनः प्रवृत्तिः अभ्यासः ।'' अशी आहे. म्हणजे परत परत सराव करण्याच्या कृती हाच अभ्यास असतो. पण इतका सरााव करूनही, त्यांना तुझ्याप्रमाणे लयबद्ध पदन्यास जमेना. ते सारखे चुकू लागले. (स्खलन्तः) पण त्यांची चिकाटी अशी की, ते काही तुझं अनुकरण करायचं  सोडेनात. तेव्हा त्यांची चिकाटी पाहून तूही त्यांना कसे कमनीयपणे चालावे हे शिकवायचं ठरवलं असावं आणि तुझ्या रत्नजडित सुवर्ण नुपूरांच्या  घुंगरांचे विशिष्ट मंजुळ आवाजाच्या मिषाने  तू त्यांना कसे चालावे ह्याचे धडे देऊ लागलीस. माय तुझी प्रत्येक कृतीच मोठी लोभस, मनाला आनंद देणारी आहे. तुझ्या पैजणांचा नाद आमचंही कल्याण करो. तुझे हे कोमल चरणकमल  आमचेही भले करोत! नमन माते!

पदन्यासक्रीडापरिचयमिवारब्धुमनसः

स्खलन्तस्ते खेलं भवन-कलहंसा न जहति ।

अतस्तेषां शिक्षां सुभगमणिमञ्जीररणित-

च्छलादाचक्षाणं चरणकमलं चारुचरिते ।। ९१

 

करिसी डौलाने सहजिच पदन्यास जननी

पदांची जादू ही बघुन सहजी नेत्र खिळती

तुझ्या हया चालीसी अनुसरति हे हंस जननी

तुझ्या ह्या ऐटीचा अविरतचि अभ्यास करती ।। ९१.१

 

किती वेळा त्यांनी करुनहि सरावा तरि कसे

 जमेना आणाया तव लकब प्रत्यक्षि पदि गे

अरेरे ! त्यांचेही बघुनचि चुके पाउल कधी

तरी ना सोडी ते तुजस पदाभ्यास तरिही ।। ९१.२

 

चिकाटी त्यांची ती तव चरणखेळास करण्या

अगे माते त्यांचा बघुन मनिचा निश्चय खरा

पदन्यासासी या सहज शिकवावे कृतितुनी

म्हणोनी वाळ्यांची किणकिण करी तू मधुरशी ।। ९१.३

 

मिषाने नादाच्या जणु शिकविसी चाल तव गे

अगे त्या हंसांसी; म्हणुन फिरती ऐटित कसे ।

छुनुन् छुन् छुन् वाजे; हरत हृदये पैजण तुझे

तुझ्या ह्या पायांशी विनित मम गे मस्तक असे ।। ९१.४

------------------------------------


श्लोक ९२ –

हे जगज्जननी!

ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि ईश्वर ह्या महेश्वर तत्त्वामध्ये अंतर्भूत असलेल्या चार देवता आहेत. त्या पृथ्वी, जल, तेज आणि वायु ह्यांच्या अधिष्ठात्री देवता आहेत. त्या सर्व देवतांनी तुझे दास्य पत्करले आहे. भृत् म्हणजे भृत्य, सेवक. हे सर्व आपले इच्छित रूप धारण करू शकत असल्याने तुझी सेवा करण्यासाठी तुझ्या पलंगाचे पाय होणे त्यानी स्वीकारले आहे. तुझ्या मंचाचे/पर्यंकाचे पाय होऊन राहिले आहेत. तर आकाशाची अदिष्ठात्री देवता असलेले महेश्वरतत्त्व म्हणजे शिव त्यांच्या स्वच्छ कांतीच्या मिषाने पर्यंकावरील आच्छादन वस्त्र (येथे आपण गादी व गादीवरील स्वच्छ चादर ) झाले आहेत. पर्यंकावर शिवाभिन्नशक्तिरूपाने (शिव आणि शक्ति अभिन्न रूपाने म्हणजे एकरूपतेने) परिपूर्ण आनंदरूप असे विराजमान आहेत.

स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेल्या परमशिवस्वरूप आच्छादनामधे तुझा रक्तवर्ण प्रतिबिंबित झाल्याने दाही दिशी गुलाबीसर अरुण कांति पसरलेली दिसत आहे. जणु शृंगाररसच देह धारण करून आला आहे (शरीरी शृङ्गारो रस इव दृशां) आणि ज्या प्रमाणे वत्साला पहाताच गाईच्या आचळातून दुधाच्या धारा उडतात त्याप्रमाणे त्या शरीर धारण केलेल्या शृंगार रसाच्या नेत्रातून/ दृष्टीतून (म्हणजेच जननी, तुझ्या नेरातून) सर्वत्र कौतुकाच्या धारा ओसंडत आहेत. तुझ्या दष्टीतून ओथंबणारी ही आरक्त प्रभा दिशादिशात फाकून दाही दिशा त्या गुलाबी आरक्तवर्णात रंगून गेल्या आहेत.  

गतास्ते मञ्चत्वं द्रुहिण-हरि-रुद्रेश्वरभृतः

शिवः स्वच्छ-च्छाया-घटित-कपट-प्रच्छद-पटः ।

त्वदीयानां भासां प्रतिफलन-रागारुणतया

शरीरी शृङ्गारो रस इव दृशां दोग्धि कुतुकम् ।। ९२

( गताः ते मञ्चत्वं – तुझा पलंग झाले आहेत. द्रुहिण – ब्रह्मदेव. हरी – विष्णु. प्रच्छद – आवरण, आच्छादन. कुतुकं दोग्धि – आनंदाचा आविष्कार करत आहेत, दृष्टीतून कौतुकाच्या धारा ओसंडत आहेत.)

 

विधी विष्णू रुद्रासहचि चवथा ईश्वर असे

शिवाच्या तत्त्वाते मिसळुन रहाती नितचि हे

महाभूतांमध्ये अवनि जल तेजात पवनी

असे ह्या चौघांचे सहजचि अधिष्ठान जननी ।। ९२.१

 

परी पायी आले सकल तव हे दास बनुनी

रूपे घेता नाना नवनविन त्यांना हवि तशी

तुझ्या सेवेसाठी, जननि तुज विश्राम करण्या

तुझ्या पर्यंकाचे बनति दृढ ते पाय सबला।। ९२.२

 

असे आकाशी ह्या अमलचि अधिष्ठान शिव हे

अहो त्यांची कांती अमल स्फटिकाच्यासम दिसे

स्वये झाला गादी अन विमल आच्छादन सुखे

अशा ह्या पर्यंकी सुखमय तुझा देह विलसे ।। ९२.३

 

शिवाच्या तेजस्वी स्फटिकसम तेजात मिसळे

तुझी तेजोकांती सुखमय आरक्तचि उमे

घडे अद्वैताचे अनुपमचि हे दर्शन जना

धरे कायेसी का अनुपमचि शृंगार रस हा ।। ९२.४

 

जसे त्या गायीला बघुन अपुले वत्स पुढती

फुटे पान्हा प्रेमे उडति शतधारा दुधमयी

तसे दृष्टीतूनी विखुरति गुलाबी किरणही़

दिशातूनी दाही अमित भरले कौतुकमयी ।। ९२.५

-------------------------------


श्लोक ९३ –

हे जगज्जननी तुझ्या कुरळ्या कुरळ्या मऊ मऊ  केसांच्या लडी तुझ्या चेहर्‍याभोवती रुळत आहेत. तुझ्या चेहर्‍याची शोभा वाढवत आहेत. पण तुझ्या स्वभावात मात्र अशी वळणे, वाकडेपणा जरासाही नाही. तू स्वभावतःच अत्यंत सरळ आहेस. नितळ स्वच्छ स्फटिकासमान निर्झराप्रमाणे तुझा स्वभाव मुळातच आत एक बाहेर एक असा नाही. माणसाचा चेहरा स्व्छ बोलका असतो. त्याने किती जरी भाव लपवले तरी त्याच्या डोळ्यातून व्यक्त होतात. चेहर्‍यावर दिसतात. तुझ्या चेहर्‍यावरील निर्मळ मंद स्मित तुझ्या मनातील कोमल वात्सल्यभावच प्रकट करत असतात. तुझ्या कोमल मनाला उपमाच द्यायची झाली तर शिरिषाच्या कोमल फुलाचीच द्यायला लागेल.

आम्ही सर्व भूतमात्रे तुझ्या स्तन्यावर पोसले जात आहोत. ज्याप्रमाणे नदी ही अत्यंत घन अशा पर्वतराजीतून उगम पावते त्याप्रमाणे सर्वांचे पालन पोषणकरणारे हे तुझे स्तन अत्यंत घन, अत्यंत मूल्यवान दगडाच्या म्हणजे रत्नांच्या पर्वताप्रमाणे शोभत आहेत. ( रत्न हे दगड असले तरी त्यांचा कठीणपणा हा बाकी दगडांच्या तुलनेत सर्वात जास्त असतो. ) कटिभाग अत्यंत कृश असलेली तुझी चवळीच्या शेंगेप्रमाणे दिसणारी तनुलता तुझ्या वक्ष आणि नितंबांच्या ठिकाणी मात्र पृथु म्हणजे स्थुल आहे. तुझी ही कमनिय तनुलता अत्यंत मनोहारी दिसत आहे.

 माय तुझं नावच अरुणा आहे. तुझ्या गुलाबीसर कांतीमुळे, अरुणवर्णामुळे तुला अरुणा म्हणतात. परंतु सार्‍या जगताचं संरक्षण करणारी , सार्‍या जगाचं भरण, पोषण करणारी, सार्‍या विश्वाचं कल्याण करणारी  अरुणा म्हणजे तू साक्षात ह्या श्री शंभूमहादेवाची करुणाच आहेस. तुझा विजय असो. माते तुला नमन! 

 

अराला केशेषु प्रकृतिसरला मन्दहसिते

शिरीषाभा चित्ते दृशदुपलशोभा कुचतटे ।

भृशं तन्वी मध्ये पृथुरुरसिजारोहविषये

जगत्त्रातुं शम्भोर्जयति करुणा काचिदरुणा ।। ९३

( अराला – कुरळे. दृशद् – पत्थर. उपल- मूल्यवान दगड. भृशं – अत्याधिक, खूप. तन्वी – सुकुमार कोमलांगी. पृथु – स्थुल. )

तुझ्या केसांच्या ह्या मृदुल कुरळ्या रेशिम लडी

वळूनी डौलने रुळति तव चंद्रासम मुखी

स्वभावी ऐसे ना परि तव असे वक्रपणची

असे माते तूची सहज सरला अमृतमयी ।। ९३.१

 

स्वभावाचे साक्षी नितळ स्मित हे मोहक तुझे

मनाच्या माधुर्या प्रकट करते हे जननि गे ।

 तुझ्या चित्तासी ह्या शिरिष-सुमनाचीच उपमा

दिसे शोभूनी गे तव सरल ह्या कोमल मना ।। ९३.२

 

पहाडांमध्ये गे उगम सरिता पावत असे

जगाच्या कल्याणा वितरतचि जाई जल जसे

तशी पुष्टी तुष्टी मिळत नवचैतन्य अवघे

तुझ्या ह्या स्तन्याने सकलचि भूतांस सुभगे ।। ९३.३

 

असे माते तूची कृशकटि सुडौला समुचिता

तुझ्या ह्या गात्रांचा अनुपम असे मोहकपणा

जगाला रक्षाया शुभ अरुणवर्णी तनु तुझी

असे का शंभूची सकल करुणा ही प्रकटली ।। ९३.४

 

मनाने होवो मी समरस तुझ्या दिव्य स्वरुपी

खर्‍या आनंदाचा अनुभव मला देइ जननी

कृपा होवो माते मजवर अपूर्वाच तव ही

तुझ्यापायी माते नमन करतो मी प्रतिदिनी ।। ९३.५ 


--------------------------------------------------


श्लोक ९४ -

हे जगज्जननी !

तुझं  रूप विश्वात्मक असल्याने विश्वातल्या सर्व गोष्टी ह्या  तुझ्या उपभोगाचं साधन आहेत. हा सर्व चांदण्यांचा अधिपती, सुंदर, तेजस्वी पण तितकाच सौम्य चंद्रमा (रजनिकर) जणु काही तुझी सर्व प्रसाधन सामग्री ठेवण्याचा पाचूचा करंडा किंवा फणेरपेटी (मरकत-करण्डं) आहे. त्यात तू वापरतेस ती कस्तूरी, कापूर, गुलाबजल, केवडा जल ही प्रसाधने गच्च भरून ठेवली आहेत. ह्या चंद्रम्यावर जो काळा डाग दिसतो तो डाग नसून तू अंगाला जी कस्तुरी उटी लावतेस ती कस्तूरी ठेवलेला कप्पा आहे. (कस्तूरी काळी असते.)  चंद्रबिंबावर जे पाणी आहे असं भासतं  ते पाणी नसून तुझ्या वापरासाठी गुलाबजल वा केवड्याचे सुगंधी जल आहे. ह्या करंड्यातील प्रसाधने तू रोज वापरतेस, उपयोगात आणतेस त्यामुळे त्यातील कप्पे रिकामे होत जातात (रिक्तकुहरम्).  हा रोज थोडा थोडा रिक्त होत जाणारा करंडा म्हणजे चंद्राचा कला कलांनी होणारा क्षय आहे.  पण तुझा रिक्त झालेला करंडा किंवा करंड्यातील/फणेरपेटीतील कप्पे (रिक्तकुहरम्) ब्रह्मदेव रोज भरत जातो. अगदी ठासून भरतो. येथे ठासून भरतो ह्यासाठी  `निबिडयति' हा फार सुंदर शब्द वापरला आहे. ज्या आरण्यात घनदाट वृक्षांच्या पर्णराजीला सूर्यप्रकाशही भेदून जाऊ शकत नाही अशा  घनदाट आरण्याला आपण निबिड आरण्य म्हणतो. येथे करंडा घनदाट भरणे, ठासून भरणे ही कृती निबिडयति ह्या शब्दाने सूचित केली आहे. असा ठासून भरलेला करंडा म्हणजे कलाकलांनी चंद्रम्याची होत जाणारी वृद्धी आहे असे वाटते. प्रसाधनांनी पुरेपूर भरलेल्या करंड्यामुळे  जणु पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात सुंदरशा प्रभेत निथळत असतो. हे  विश्वरूप माते, त्रिपुराम्बिके! तुला नमन

कलङ्कः कस्तूरी रजनिकर-बिम्बं जलमयं

कलाभिः कर्पूरैर्मरकत-करण्डं निबिडितम् ।

अतस्त्वद्भोगेन प्रतिदिनमिदं रिक्तकुहरं

विधिर्भूयो भूयो निबिडयति नूनं तव कृते ।। ९४

( निबिड – सघन; निबिडित – गच्च भरून ठेवलेला. मरकत – पाचू. कुहरम् – खड्डा. भूयः – अपेक्षेपेक्षा अधिकतर. सम्पन्न, बहुल.)

तुझ्या सौंदर्यासी नित खुलविण्या वस्तु सगळ्या

भरोनी ठेवाया अनुपम करंडा शशिच हा

अगे माते साक्षात् हिमकरचि नक्षत्रपति तो

करंडा पाचूचा अनुपम तुझा गे विलसतो ।। ९४.१

 

गुलाबाचे पाणी, परिमलचि नानाविध अहा

सुगंधी कस्तूरी अमुप भरलेली तयि पहा

शशीबिंबामध्ये जल दिसतसे जे दुरुनिया

गुलाबाचे पाणी जननि विधि ठेवी भरुनिया ।। ९४.२

 

सुधांशूच्या बिंबावर दिसतसे डाग नयना

असे कस्तूरीचा अनुपमचि कप्पा परिमला

सुगंधी वस्तूंचा प्रतिदिन करी वापर सखे

तयाने चंद्राचा क्षय घडतसे रोज सखये ।। ९४.३

 

परी सामग्री ह्या विधि भरतसे ठासुन पुन्हा

तयाने पूर्णत्वा पुनरपि ये सोम सुखदा

कला चंद्राच्या ह्या प्रतिदिनिच येती अनुभवा

तयाचे हे वाटे मजसिच खरे कारण मना ।। ९४.४

---------------------------------------------


श्लोक ९५ –

हे जगज्जननी!

 ज्या  शिवशंभूने महा पराक्रम गाजवून त्या बेताल त्रिपुरासुराचा वध केला; त्या साक्षात देवांचेही देव असलेल्या महादेवांचे, शिवशंभूचे तू अंतःपुर आहेस म्हणजे पट्टराणी आहेस. तुझ्या ह्या सर्वोच्च पदी आरूढ होण्यामुळे  तुझ्या चरणकमलांची पूजा कोणी करावी ह्यास सुद्धा काही मर्यादा आहेत. कोणीही उठून तुझ्या पावलांपर्यंत पोचू शकत नाही. तुझ्या चरणकमळांची पूजा तोच करू शकतो ज्याचा त्याच्या सर्व इंद्रियांवर पूर्ण ताबा आहे. ज्यांची इंद्रिये चंचल आहेत अशा ( तरलकरणानाम् ) इंद्रादि देवांना सुद्धा तुझ्या पाद्यपूजेचा मान मिळत नाही.  त्यांनाही तुझे दर्शन सुलभ नाही. हे माते  हे प्रसिद्धच आहे  (तथाहि) की, इंद्र ज्यांच्यामध्ये प्रमुख आहे अशा मोठ्या मोठ्या अधिकारी देवांनाही तुझ्या मंदिराच्या म्हणजे श्रीचक्राच्या प्रवेशद्वारापर्यंतच पोचता येते. त्यांच्या चंचलपणामुळे त्यांना आत प्रवेश करण्यास मज्जाव असतो. पण श्री चक्राच्या प्रवेशद्वारापाशीच  द्वारपाल म्हणून काम करणार्‍या अणिमा, गरिमा, लघिमा सारख्या सिद्धि ह्या देवांना अपरिमित सिद्धि देऊन कृतार्थ करतात.

हे जगज्जननी तुझ्या मंदिराबाहेर उभ्या असणार्‍या द्वारपालांजवळच जर एवढे अधिकार असतील, त्यांचा महिमा जर एवढा मोठा असेल तर तुझ्या महिम्याचे अजून काय वर्णन करु? तुझा महिमा अपार आहे. तू तुझ्या भक्तांना अपरिमित दान नेहमीच देत असतेस. माते तुला नमन!

पुरारातेरन्तःपुरमसि ततस्त्वच्चरणयोः

सपर्यामर्यादा तरल-करणानामसुलभा ।

तथा ह्येते नीताः-शतमख-मुखाः सिद्धिमतुलां

तव द्वारोपान्त-स्थितिभिरणिमाद्याभिरमराः ।। ९५

(पुराराति – त्रिपुरासुराचा वध करणारे भगवान शंकर. तरलकरणानां - ज्यांची इंद्रये चंचल आहेत. असुलभा – अवघड आहे.  तथाहि - ही गोष्ट प्रसिद्धच आहे. शतमख – शंभर यंज्ञ करणारा इंद्र. अमराः - देव)

 महा शक्तीशाली त्रिपुर त्रिपुरारी वधतसे

महाराणी त्याची असशि शिव-अंतःपुर उमे

दरारा ऐसा हा त्रिभुवनि तुझा गाजत असे

तुझ्या पूजेचे गे सहजि न कुणा भाग्य मिळते ।। ९५.१

 

तुझ्या राऊळी ना सुरवर नि इंद्रा अनुमती

जरी केले त्याने शत शतचि ते यज्ञ तरिही

तया श्रीचक्राच्या अडवितिच दारातच मुळी

म्हणे त्याच्या चित्ता लव न स्थिरता येचि कधिही ।। ९५.२

 

परी द्वारापाशी असति दशसिद्धी नित उभ्या

तिथे पोचे त्याला अपरिमित देतीच विभवा

मिळे देवेंद्रासी विभव सगळे स्वर्गसुखही

मिळे देवांसीही अमुप सुखसंपत्ती बरवी ।। ९५.३

 

तुझ्या द्वारीच्या ह्या सकलचि गणांचाच महिमा

जरी ऐसा मोठा तरिच महिमा गे तव कसा?

म्हणोनी आलो गे शरण तुजला मीच जननी

कृपेने होऊ दे जननि तुझिया धन्य मजसी ।। ९५.४ 

--------------------------------------------------

श्लोक ९६ -

मित्रांनो,

अत्यंत गहन असा वेदांत उलगडून दाखवणारी, अद्वैताचं तत्त्व समजाऊन सांगतांना काळोखाला भेदणार्‍या सूर्यकिरणाप्रमाणे भेदक असलेली श्री आद्य शंकराचार्यांची अत्यंत गहन वाणी एखाद्या देवाचं वर्णन, स्तुती करतांना कधीकधी अत्यंत चतुर, मिश्किल, मुलायम होते. अंधाराला भेदणारा सूर्यकिरण मऊ ढगातून, ओल्या दवातून जातांना सप्तरंग पसरवतो अगदी तशी.

माता पार्वतीचं वर्णन करतांना तर त्यांच्या वाणीला असे काही धुमारे फुटतात की जणु रत्नमाणकांनांच  कोवळे तेजस्वी कोंब यावेत. आता एखाद्याची स्तुती करायची म्हणजे ती व्यक्ती इतरांहून किती श्रेष्ठ आहे हेही दाखवलेच पाहिजे. हे दाखवतांना मोठे चातुर्य अंगी लागते.

धनाच्या अभिलाषेने तर कधी विद्वत्ता लाभावी म्हणून किती किती जण देवी लक्ष्मीची वा देवी सरस्वतीची उपासना करत असतात त्यांना तर गणतीच नाही. लक्ष्मी प्रसन्न झाली तर हा भक्तवर जिथे जाईल तिथे ती त्याच्यामागे त्याच्या सेवेसी हजर असते.  वा देवी सरस्वती प्रसन्न झालीच तर सतत अशा भक्ताच्या मुखात वास करते. सतत त्याच्या जिह्वेवर राहते. लक्ष्मी आणि सरस्वती जणु काही दासी होऊन अशा भक्तवरासोबत कायम असतात. त्याला कधीही वार्‍यावर सोडत नाहीत. आणि म्हणून अशा पंडिताला बृहस्पती, वाचस्पती, सरस्वतीवल्लभ म्हणतात तर धनाढ्याला लक्ष्मीपती म्हणतात.

धनाढ्याला लाभणार्‍या लक्ष्मीपति आणि विद्वानाला लाभणार्‍या वाचस्पती, बृहस्पती ह्या पदव्यांमुळे  लक्ष्मीचा पती विष्णू आणि सरस्वती म्हणजे ब्रह्माणीचा पती  ब्रह्मा हे सतत इतरांसोबत निवास करणार्‍या, पतिकडे सर्व ऐश्वर्य असूनही दुसर्‍यांची दासी म्हणून सेवा करणार्‍या आपल्या पत्नींवर कायम नाराज असणे स्वाभाविकच आहे.

असं म्हणतात की,  अशोक आणि अशोकाप्रमाणे पुल्लिंगी नाव असलेले कुरबक वा तत्सम  वृक्ष एखाद्या तरुण स्त्रीच्या आलिंगन देण्याने, त्यांच्या वक्षस्पर्शाने फुलतात. (ह्या विधीला दोहद विधी असे म्हणतात.) त्याप्रमाणे सरस्वती आणि लक्ष्मी ह्याच्या नित्य सहवासाने अनेक वाचस्पती आणि लक्ष्मीपतींचे भाग्य फळफळते.  हे जगज्जननी! तुला नंदनवनात विहार करतांना पाहून सुंदर स्त्रियांच्या पदाघाताने वा आलिंगनाने (स्तनांच्या स्पर्शाने) फुलणार्‍या तेथील कुरबक किंवा अशोकासम वृक्षांना तुझ्या आलिंगनाची, तुझ्या वक्षस्पर्शाची आस मनात निर्माण नाही झाली तरच नवल. पण त्यांच्या मनात किीही प्रखर इच्छा उत्पन्न झाली तरीही , जेथे तू त्या वृक्षांनाही आलिंगन देत नाहीस; तुझ्या स्तनांचा स्पर्शमात्र त्या तरुवरांनाही संभवत नाही तेथे तू अजून कोणाकडे जाऊन राहण्याचा, त्यांचे दास्यत्व पत्करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

माता पार्वती म्हणजे देवी भवानी! ह्या भवसागरात जे जे आहे त्या सर्वांची माय. ही माय इतकी स्वामिनिष्ठ आहे की, तिचा सहवास ऐका शंभूशिवाय अन्य कोणाला मिळत नाही. ही सती पार्वती काही आपल्या भक्तांच्या मागे मागे दासी होऊन फिरत नाही किंवा त्यांच्या जिभेच्या टोकावर वगैरे रहात नाही. तिने कोणाला जवळ केलं तर ती लहान बाळाप्रमाणे त्याला मांडीवर घेईल; त्यामुळे तिच्या भक्ताला पार्वतीपती, भवानीपती अशी पदवी द्यायचं धाडस कधी कुणी करत नाही.

 (शिवशंभू अत्यंत विरक्त असल्याने कुठलेही ऐश्वर्य तो स्वतःजवळ बाळगत नाही. अंगावर चिताभस्म  लावून नरमुंडमाळा गळ्यात घालून, हातात कवटीचं भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागायला कुठल्या माणसाला आवडेल? अर्थातच कोणालाही नाही. कारण प्रत्येकालाच दिमाखदार, दुसर्‍याच्या डोळ्यात भरेल असं ऐश्वर्य, सर्वांना भुलवेल अशी बुद्धिमत्ता हवी असते. ब्रह्मज्ञान आणि विरक्ती कोणालाच सहजासहजी रुचत नाही. शिवशंभूप्रमाणे विरक्त जीवन व्यतीत करायला कोणालाच आवडणार नाही. त्यासाठी मनावर कठोर नियंत्रण, पराकोटीचं वैराग्य आवश्यक आहे. त्यामुळे उमापती, पार्वतीपती संबोधले जाऊ असा त्याग कोणालाच नको वाटतो. अर्थात पार्वतीपती होणे  तर सोडाच पण संबोधले जाणेही नको. )

    

कलत्रं वैधात्रं कति कति भजन्ते न कवयः

श्रियो देव्याः को वा न भवति पतिः कैरपि धनैः ।

महादेवं हित्वा तव सति सतीनामचरमे

कुचाभ्यामासङ्गः कुरबकतरोरप्यसुलभः ।। ९६

( कलत्रम् – कश्मलात् त्रायते इति कलत्रम् । म्हणजे  पापापासून, मळ वा डागापासून जी संरक्षण करते. अर्थातच पत्नी. आचरमा – अत्यंत श्रेष्ठ. सतीनाम् आचरमा – पतिव्रता स्त्रियांमध्ये एकमेव श्रेष्ठ. कति कति – किति किती, कित्येक. कवि – विद्वान लोक. कुच – स्तन )

 

अहो वाग्देवीची मजवर घडावी नित कृपा

सदा ह्या लक्ष्मीचा शिरि वरदहस्तास असण्या

व्रते पूजा कैसी जन किति किती नित्य करती

कृपा संपादोनी धन, विभव , विद्या मिळविती ।।९६.१

 

तपश्चर्या मोठी करुन नर संपादिति कृपा

अहो वाग्देवीची तपुन कमलेचीच अथवा

सुविद्या, लक्ष्मीही सततचि तया सोबत असे

म्हणोनी त्यां ``वाचस्पति’’ म्हणति ``लक्ष्मीपति’’ असे ।। ९६.२

 

अशोकासी वा त्या कुरबक तरूसीच ललना

जरा देता आलिंगन कुणिच लावण्यवतिका

स्तनांच्या स्पर्शाने फुलति तरु आनंदुन जसे

रमा लक्ष्मीसंगे नर-नशिब तैसे फळफळे ।।९६.३

 

जिथे ना आलिंगे कधि तरुवरासीहि जननि

तिथे कोणाच्याही सह कशि रहाशील क्षणही

मिळे एका शंभू-सुरवर-शिवा भाग्य असले

तुझ्या स्पर्शाचा तो अनुभव शिवासी मिळतसे ।।९६.४

 

असो वाग्देवी वा कमलनयना श्रेष्ठ कमला

तुझा त्यांच्याहूनी कितिक पटिने श्रेष्ठ महिमा

असे साध्वींमध्ये जननि महिमा श्रेष्ठतम हा

तुझ्या पातिव्रत्या पुढति कुणि कैशा टिकति ह्या ।। ९६.५

 

पहाता निष्ठा ही प्रखर तव शंभुप्रति दृढा

धजे ना बोलाया कधि कुणिच गौरीपति कुणा

रमा वाग्देवीच्या सहचि तुलना ना तव उमे

असे विश्वाची तू जननि तुजला वंदन असे ।। ९६.६   

-----------------------------------------


श्लोक ९७ -

ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली असावी ह्या संबंधी अनेक तर्कवितर्क केले जातात. कोणी बिगबँग थेअरी सांगतो. कोणी अजून काही. देव हा प्रकार (दाखवता येऊ न शकल्याने) शास्त्राला अमान्य असल्याने वेगवेगळे नियम लावून पाश्चिमात्य त्याला शास्त्रीय आधार देत समजाऊ पहातात. पण शेवटी अनुमानापलिकडे, तर्कापलिकडे कोणी जाऊ शकत नाही. आपण त्याला नेति नेति म्हणतो.  

आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानही पायर्‍या पायर्‍यांनी ह्या ब्रह्मांडाच्या उत्पत्ती पर्यंत जायचा प्रयत्न करतं. एक मोठी शक्ती हे ब्रह्मांड बनवायला आणि परत त्याचा लय करायला कारणीभूत आहे. ह्या महाशक्तीलाच तीन पुरांची माता म्हणून त्रिपुरसुंदरी, महाशक्ती, महामाया म्हटलं आहे शक्ती हा शब्द जरी स्त्रीलिंगी असला तरी शक्ती ना स्त्रीलिंगी आहे ना पुल्लिंगी. पण ती कल्याणकारी आहे म्हणून तिला शिवा म्हणा वा शिव म्हणा दोन्ही एकच! ज्या शक्तीने हे ब्रह्मांड जन्माला आलं तीच शक्ती त्याचं नियमन करते.

कोणी म्हणेल की छे छे पदार्थविज्ञानाचे , रसायन शास्त्राचे वा इतर शास्त्रांचे नियम असतात त्यानुसार जग चालतं. पण ते नियम कोणी तयार केले? हा प्रश्न राहतोच. आणि नियम असले तरी ते वापरून कार्य करणारा कर्ता ही लागतोच. एखाद्या बरड माळरानावर गुलाबाची बाग फुललेली पाहून नक्कीच ती कोणीतरी लावली आहे. कोणी तरी तिची काळजी घेतो आहे हे सांगायला लागत नाही. भले तो माळी त्यावेळेला त्याच्या घरी बसला असेल.

 हया ब्रह्मांडाची रचना असो वा आपल्या शरीराची! किती गुंतागुंतीची, किती गहन, किती जटिल, किती क्लिष्ट आहे. अत्यंत जटिल असूनही अत्यंत प्रभावीपणे युगानुयुग चालणारी ही कार्य प्रणाली काय आपोआप तयार होईल? कोणी तरी शक्ती, कोणी तरी ताकद ही रचना करत असणारच; भले मला ती ताकद दिसत नसली तरी मी अनुमान तर लावू शकतो ना! ( पुष्पदंत- महिम्न) विद्युत शक्ती कुठे दिसते? पण परिणाम तर दिसतो ना. कुठलीच ताकद/शक्ती दिसत नाही परिणाम दिसतो.  ही प्रचंड ताकद अंश रूपात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकात दिसून येते. त्यामुळे कामे होत राहतात. ती अंशरूप ताकद माझ्यात आहे, मी त्या भगवंतरूप, महाप्रचंड शक्तीसागराचा तरंग आहे म्हणून त्या शक्तीला तारंग तर कोणी म्हणू शकत नाहीत. असं सुंदर उदाहरण श्री आद्य शंकराचार्य त्यांच्या षट्पदी स्तोत्रात देतात.

 शिवानंदलहरीत ह्या नियमन करणार्‍या शक्तीला शिवरूपात पाहून त्याला उद्दशून शंकराचार्य म्हणतात हे देवा मी तुझा क्रीडामृग (पाळीव प्राणी) आहे. मी जसं वागावं असं तुला वाटतं तसं तू माझ्याडून वागवून घेतोस हे ठीकच आहे. त्यानी तुला आनंद मिळत असेल तर मला तेही मान्य आहे.

हे जगज्जननी, महाशक्तिमाते, हे महात्रिपुरसुंदरी!

जे वेदांचे द्रष्टे, साक्षात्कारी ऋषिमुनि आहेत, ते कुणी तुला मतिदात्री सरस्वती म्हणजेच विधात्याची पत्नी ब्रह्माणी समजतात. कुणी वेदज्ञ विष्णुपत्नी कमला म्हणजेच  धन देणारी लक्ष्मी म्हणून तुझी पूजा करतात. कोणी हिमगिरीची मुलगी गिरीजा, त्या रुद्राची अर्धागिनीही मानतात. त्याही शक्तिरूपात अस्तित्त्वात आहेत.  कोणी विवेकरूपानी विद्या देण्याचं काम करते. कोणी धन मिळविण्याची कला देते. तुझी अंशरूप ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे त्या ही कामं करत असतात. पण त्यांनाही ताकद देण्याचं काम तुझचं!---- अथवा तुझ्यारूपातच त्या लीन आहेत.

हे जगज्जननी तू ह्या तीनही देवतांच्या पलिकडे  असलेली तुरीया  ही चौथी अवस्था आहेस. ते तुझे रूप आकळण्यासही अत्यंत अवघड आहे. तुझ्या ह्या रूपाला अंत वा पार नाही. अशा ह्या तुझ्या निःसीम रूपाचा महिमा अगाध आहे. तो शब्दात सांगता येत नाही म्हणून अनिर्वचनीय आहे. बुद्धीला कळत नाही म्हणून दुरधिगम आहे.

तुला महाशक्ति, महामाया म्हणतात.  तू आपल्या सामर्थ्याने सर्व विश्वाचे संचलन करीत आहेस.

ब्रह्मांडी ते पिंडी हेही खरं आहे. त्यामुळे ही ताकद प्रत्येकात विवेकरूपाने रहातेच. हा विवेकदीप मला माझ्या जीवनाच्या पथावर योग्य वाट दाखवत राहतो. हे जगज्जननी तो विवेकदीप तू आहेस. मी तुला वंदन करतो.  

गिरामाहुर्देवीं द्रुहिण-गृहिणीमागमविदो

हरेः पत्नीं पद्मां हरसहचरीमद्रितनयाम्।

तुरीया काऽपि त्वं दुरधिगम-निःसीम-महिमा

महामाया विश्वं भ्रमयसि परब्रहममहिषि ।। ९७

(गिरा – वाणी. द्रुहिण-गृहिणी – ब्रह्मदेवाची पत्नी, ब्रह्माणी, सरस्वती. आगमविद- वेदांचे रहस्य जाणणारे लोक. हरेः पत्नी – विष्णुपत्नी, लक्ष्मी. पद्मा – लक्ष्मी. हरसहचरी – शिवपत्नी पार्वती. अद्रि – पर्वत. अद्रितनया – पर्वताची मुलगी पार्वती. दुरधिगम – आकलन होण्यास कठीण. तुरीया – चौथी अवस्था. काऽपि – अनिर्वचनीय. निःसीम – ज्याला अंत नाही पार नाही)


कुणी साक्षात्कारी कुणि निगम-द्रष्टे ऋषि-मुनी

तुला माते वाणी म्हणति विधिपत्नी कधि कुणी

हरी पत्नी लक्ष्मी म्हणति गिरिजा अद्रितनये

कुणी वेदज्ञानी शिवसहचरी पार्वति वदे।। ९७.१

 

खरे पाहू जाता सकल असती ही तव रुपे

महामाया तूची असशिच महाशक्ति स्वरुपे

असे ह्या रूपांच्या अति पलिकडे स्थान तव गे

चिदानंदामध्ये अविरतचि तू मग्न सुभगे ।। ९७.२

 

अहो विश्वाचे जी अविरतचि संचालन करे

महाशक्ती ती गे अजुन कळली ना कधिच गे!

तुझ्या सामर्थ्याने अति सुगम ब्रह्मांड फिरते

परी माते तूची दुरधिगम ना आकळतसे ।। ९७.३

 

तुरीया तू माते जनन-मरणाच्या पलिकडे

तुझ्या विस्ताराचा मज न दिसतो अंतचि शिवे

तुझ्या ह्या तत्त्वाचे स्मरण मजला नित्य घडु दे

तुझ्या पायी माझे नमन  मम हे शक्तिस्वरुपे ।। ९७.४ 

----------------------------------------------------------




श्लोक ९८ –

हे जगज्जननी मी विद्यार्थी आहे. तुझी पावले प्रक्षाळतांना त्यात तुझ्या पावलांचा आळता मिसळला गेल्याने, आरक्त झालेले ते सलील, माता सरस्वतीच्या मुखातील ताम्बुल-रसाप्राणे दिसत आहे. नुसते दिसण्यास नाही तर त्या तीर्थोदकाचा परिणाम ही माता सरस्वतीच्या मुखातील ताम्बुल-रसाप्राणे आहे. तुझे हे तीर्थोदक घेतल्याशिवाय मला संपूर्ण  विद्या कशी काय मिळेल? तुझ्या पायाला लावलेला हा लालचुटुक लाक्षारस (अलक्तकरस) मिसळलेलं तीर्थोदक प्राशन केल्याने जे मुके बहिरे असतात,(जन्मजात बहिरा मुकाही असतो.) तेही उत्तम काव्य करू शकतात. जे अडाणी असतात त्यांनाही आळता मिसळलेलं तुझं चरणतीर्थ प्रतिभेचं उत्तम वरदान देऊ करतं.  माते मला ह्या जन्मात तुझ्या पावलांचे प्रक्षालन केलेले आळता मिश्रित हे सलील कधी मिळेल? कधी मी प्रतिभासम्पन्न होईन? कधी मला ते कवित्वशक्ति आणि विद्वत्ता प्राप्त करून देईल? तुझं हे चरणजल माझ्याही मुखात देवी सरस्वतीच्या मुखातील ताम्बूलरसाचे रूप केव्हा बरं धारण करेल? जणु आचार्य सांगत आहेत की, माय! तुझ्या पायांच्या तीर्थात सरस्वतीच्या तांबुलरसाचा प्रभाव भरला आहे. त्या तीर्थाने तुझा भक्त स्वतःच सरस्वतीस्वरूप होतो.  सर्व विद्या त्याच्या पायी नतमस्तक असतात. 

कदा काले मातः कथय कलितालक्तक-रसे

पिबेयं विद्यार्थी तव चरण-निर्णेजन-जलम् ।

प्रकृत्या मूकानामपि च कविताकारणतया

कदा धत्ते वाणी-मुखकमल-ताम्बूलरसताम् ।। ९८

 

तुझ्या आरक्ता ह्या चरणकमला कोमल अशा

किती शोभे लाक्षारसयुतचि गे लाल अळिता

कधी केंव्हा कैसे मज चरण तीर्थोदक तुझे

मिळे ह्या जन्मी गे; पुरव मनिची आस दृढ गे ।। ९८.१

 

असे मी विद्यार्थी तव चरण तीर्थोदक विना

कशी विद्याप्राप्ती सकलचि घडावी मजसि गा

असो कोणीही तो अकुशल कलाहीन नर गे

करे काव्यासी तो मधुरचि अलंकारयुत गे ।। ९८.२

 

असे ह्या तीर्थाचा जननि महिमा उज्ज्वल असा

मिळे वाणी विद्या चतुरपण ते मूक-बधिरा

जणू वाग्देवीचा रुचिर मुख-तांबूल-रस हा

नरा देई विद्या बहु करतसे काव्यकुशला।। ९८.३

 

कधी तीर्थाने त्या जननि मतिदात्री मम मुखी

रहायासी येई परत कधि ना जाय फिरुनी

अशा ह्या तीर्थाचा मजसि घडु दे लाभ सुखदा

अगे माते माझे चरणकमली वंदन तुला ।। ९८. ४

------------------------------

श्लोक ९९ –

हे जगज्जननी!

तुझी अनन्यभावाने भक्ती करणारा तुझा भक्त निरतिशय अशा आनंदाचा सतत आस्वाद घेत असतो. तुझ्या कृपेमुळे त्याला सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हींचा लाभ होतो. सरस्वती आणि लक्ष्मी त्याच्या दासी बनून त्याच्या मागे पुढे फिरत असतात. ही गोष्ट सरस्वती आणि लक्ष्मी देवीच्या पतिदेवांना कशी बरे रुचावी?  तुझा भक्त सरस्वतीचा प्रिय झाल्याने सरस्वतीचे पति ब्रह्मदेव तर; तो लक्ष्मीचा प्रिय झाल्याने लक्ष्मीपति विष्णू मात्र त्याचा मत्सर करत असतात. तुझ्या भक्ताला त्याच्या विद्वत्तेमुळे समाजात इतका लौकिक मिळतो की जणु काही तो सरस्वती आणि लक्ष्मीसोबत सतत आनंदाने विहार करत असतो. त्यामुळे ब्रह्मदेव आणि विष्णूही त्याला आपला प्रतिद्वंद्वी समजतात. शत्रू मानतात.

हे माय इतकेच नाही तर तुझ्या उपासनेमुळे तुझ्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त झाल्याने तो इतका सुडौल व देखणा दिसू लागतो की मदनाची पत्नी सुद्धा फसून अनेकवेळा ह्यालाच मदन समजून तिचं पातिव्रत्यही क्षणभर विसरून जाते. मनात त्याचीच आकांक्षा धरल्याने तिचं पातिव्रत्यही क्षणभर का होईना शिथिल होतं. माय असा हा तुझ्या भक्तवराचा महिमा तुझी अनन्य भक्ती केल्यानेच त्याला प्राप्त होतो.

हे श्रीविद्ये,

 तुझ्या उपासनेने जे पारमार्थिक  फळ मिळते त्याचे मी काय वर्णन करू? तुझा भक्त हा मार्कंडेय वा कपिलमुनींप्रमाणे चिरंजीव होतो. तो  ``क्षपित-पशुपाशः व्यतिकरः'' होतो. ``इंद्रियैः प्रपञ्चं पश्यति'' म्हणजे जो इंद्रियांच्या द्वारा शब्द, स्पर्श, रूप रस आणि गंध ह्या विषयांचा प्रपंच नेहमी पहात असतो, अनुभवत असतो म्हणून त्याला पशु म्हणतात. पाश म्हणजे अविद्या. अविद्येमुळेच जीव संसारात बांधला जातो. म्हणून अविद्येला पाश असे म्हणतात. `पशु आणि पाश' म्हणजेच `जीवभाव आणि अज्ञान'  ह्यांचा संबंध (व्यतिकर) पूर्णपणे `क्षपित' म्हणजे नाहिसा झालेला असतो. त्याचे सर्व अज्ञान जाऊन त्यास ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याने हे जगज्जननी तुझा भक्त जीवनमुक्त होऊन चिरकाळ निजानंदाचा आस्वाद घेत राहतो.

 माय! हा सारा तुला अनन्य शरण येण्याचा, तुझी उपासना करण्याचा अलौकिक प्रभाव आहे. माते! मलाही त्याप्रमाणे जीवनमुक्ततेचा आनंद प्राप्त होऊ दे. ह्या संसाराच्या पाशातून मला मुक्त कर. माय मी तुझ्या चरणकमलांवर शरण आलो आहे.

 

सरस्वत्या लक्ष्म्या विधिहरिसपत्नो विहरते

रतेः पातिव्रत्यं शिथिलयति रम्येण वपुषा ।

चिरंजीवन्नेव क्षपित-पशु-पाश-व्यतिकरः

परानन्दाभिख्यं रसयति रसं त्वद्भजनवान ।। ९९

( वपु – शरीर. वपुषा - शरीराने. त्वत् भजनवान- तुझे भजन करणारा. अभिख्य – ख्याती, यश, शोभा, प्रसिद्धी. सपत्न – शत्रू, विरोधी, प्रतिद्वंद्वी. विधिहरीसपत्न – ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्याकडे प्रतिद्वंद्वी  वा शत्रू म्हणून पाहतात. व्यतिकर - संबंध. )

 

मनोभावे येतो शरण तुजला भक्तवर जो

तुझ्या भक्तासी त्या निरतिशय आनंद मिळतो

तया संगे राहे सतत मतिदात्री व कमला

घडे वाग्देवीचा नरवर रमेचाहि प्रिय हा।। ९९.१

 

पहाता दोघींना सतत सहवासात तयिच्या

हरि ब्रहमा त्याचा हृदि करति गे मत्सर महा

दिसे तेजस्वी तो प्रचुर धन विद्या मिळविता

फिरे डौलाने तो मिरवितचि ऐश्वर्य सकला ।। ९९.२

 

तुझ्या भक्ताच्या गे शिरि वरदहस्तास बघता

तयामध्ये भासे मदन अति सर्वांगसुरुपा

तयाच्या सौंदर्ये सहज फसते ही कशि रती

तिच्या पातिव्रत्या कशि शिथिलता ये क्षणभरी ।। ९९.३

 

करे श्री विद्येचे हृदि निरत आराधनचि जो

सुदीर्घायुष्याचे फळ मिळवितो भक्तवर तो

घडे अज्ञानाचा लय सकल माते तव कृपे

तयाने जीवाचे गळुन पडती पाश अवघे ।। ९९.४

 

सुदैवी मुक्तात्मा अविरत निजानंद मिळवे

मला तैसी मुक्ती जननि पशुपाशातुनचि दे ।। ९९. ५

---------------------------------------

श्लोक १०० -

मूल वडिलांच्या पानातील घास घेऊन वडिलांनाच भरवते. आई कडूनच भातुकलीसाठी घेतलेल्या गुळदाण्यामधल्या एका दाण्यात गूळ भरून छकुली आईला लाडू म्हणून खायला लावते. माय, मी केलेली ही तुझी स्तुती अगदी तशीच आहे.

तूच हे विस्तृत शब्द भांडार आहेस त्याचा अर्थही तूच आहेस आणि ह्या विशाल पदार्थसृष्टीचे शब्द आणि अर्थाच्या सहाय्याने माझ्या देहात त्यांच्या आकलनाच्या रूपाने स्फुरण पावणारे ज्ञानही तूच आहेस.

हे माय तुझ्याच शब्द भांडारातील दोन शब्द घेऊन मी तुझी स्तुती करत आहे. सूर्याला काडवातीने ओवाळावे, गंगेला तिच्याच पाण्याचे अर्घ्य द्यावे, समुद्रातील ओंजळभर पाणी पुन्हा समुद्रात अर्पण करून ‘समुद्राः तृप्यन्तु।’ म्हणत तर्पण करावे, चंद्राच्या चांदण्याने विरघळलेल्या चंद्रकांत मण्याच्या रसाने चंद्राची पूजा करावी तशी माझी ही वाङ्मयीन पूजा आहे.

कुठे तो इंद्राचा ऐरावत आणि कुठे ती श्यामभटाची तट्टाणी! त्याप्रमाणेच माय कुठे तुझे सम्राटांच्या सम्राटाचेही डोळे दिपतील असे असीम ऐश्वर्य आणि कठे माझे दोन शब्द! कुठे तुझे अतुलनीय ज्ञान भांडार आणि कुठे माझे चिमुटभर स्तुतिशब्द! कुठे काही तुलना तरी होऊ शकेल का? तुलना होण्यासाठी दोन गोष्टी तुल्यबल लागतात.

पण हे माय गे!  आपल्या मुलानी आपल्याच पानातून सांडत सांडत भरवलेल्या घासातील दोन शिते जरी पित्याच्या मुखात गेली तरी त्याला धन्य वाटतं. मातीत खेळून आलेला बाळ धावत येऊन आईच्या गळ्यात पडला तर कपडे खराब झाल्याचे जराही दुःख न वाटता जननी धन्य होते त्याप्रमाणे स्तुती म्हणून रचलेले हे माझे दोन वेडेवाकडे शब्द गोड मानून घे माय! तुझ्या पुत्रावर तुझी वात्सल्याने भरलेली कृपादृष्टी ठेव.

 

प्रदीपज्वालाभिर्दिवसकर-नीराजनविधिः

सुधासूतेश्चन्द्रोपल-जल-लवैरर्घ्यरचना ।

स्वकीयैरम्भोभिः सलिल-निधि-सौहत्य-करणं

त्वदीयाभिर्वाग्भिस्तव ननि वाचां स्तुतिरियम् ।। १०० ।।

 

जसे ओवाळावे उजळुनि दिवा त्या दिनकरा

मनोभावे पूजा कुणिच अनलाचीच करण्या

दिवा दावी त्या हो, अति प्रखर अग्नीस नमुनी

करे श्रीगंगेसी जळ लव तिचे अर्पण जळी ।।१००.१

 

समुद्रा पूजाया जलनिधितुनी ओंजळभरी

जलासी घेऊनी पुनरपि जसे तर्पण करी

सुधाकुंभा जैसा शशि बरसवी अमृतसरी

प्रकाशाने त्याच्या विरघळतसे चंद्रमणिही ।।१००.२

 

रसाने रत्नाच्या रजनिपतिचे पूजन जसे

करावे; तैसे गे मम कृति असे हे जननि गे

करे दो शब्दांनी स्तुति तवचि शब्दांकित तशी

असे मी केलेली लव उचलुनी शब्द-धन ची ।। १००.३

 

जिच्या विस्तारासी नच जगति सीमाच कुठली

अशा वाणीची तू जननि असशी अमृतमयी

उभ्या ऐश्वर्याचा अमित तव विस्तारचि कुठे

कुठे माझे बाळासम चिमखडे बोलचि थिटे ।।१००. ४

( उभ्या ऐश्वर्याचा म्हणजे संपूर्ण ऐश्वर्याचा. काळानुरूप हा शब्द दुर्बोध झाला असला तर महा ऐश्वर्याचा असा पाठ घ्यावा. )

नसे दोन्हीची गे जननि तुलना ती लवभरी

परी घे मानुनी मधुर तव पुत्राचिच कृती

अनन्या भावाने जननि तव आलोच चरणी

अगे जाणोनी घे मम हृदयिचा भाव जननी ।। १००.५

--------------------------------------------------

कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी हयांच्या ‘सुबोध स्तोत्र संग्रहा’तील सौंदर्यलहरी हया स्तोत्राला आधार मानून हे सर्व विवेचन व भावार्थ केले आहेत. संस्कृततज्ज्ञ व प्राध्यापिका आदरणीय श्री माणिकताई ठकार ह्यांनी त्यातील कमतरता दूर करण्यास व पुन्हा संस्करण होण्यास मला मोलाची मदत केली आहे. माझी शाळामैत्रिण व अत्यंत गोड गळ्याची गायिका मेधा जोशी ह्यांनी हे स्तोत्र उत्तम उच्चार व अत्यंत सुरेल गायले आहे. सर्वांना धन्यवाद! सौन्दर्यलहरी मूळ संस्कृत PDF वाचण्यासाठी खाली लिंक देत आहे.

https://sanskritdocuments.org/doc_devii/saundaryalahari.pdf

6 जानेवारी 2023, पौष, शाकंभरी पौर्णिमा शके 1944


देती आनंद सर्वांसी । सौंदर्यलहरीच ह्या

उठती हृदयी  त्याने । आनंदाचे तरंग गा

त्या आनंद तरंगांनी । मराठीसहि स्पर्शावे

म्हणोनि ते मराठीते । अरुंधतिच आणते


#लेखणीअरुंधतीची-

#सौन्दर्यलहरी -

मोदाच्या लहरी सहर्ष उठती सौन्दर्यसिंधूत हया

मेधा आणि अरुंधती रसिक हो! प्रक्षेपिती त्या तुम्हा ।

होते श्लोक कठीण संस्कृतमुळे केले मराठीमधे

ते सुस्पष्ट सुरेल गाउन पुन्हा मेधा तुम्हा ऐकवे ।।

ह्याची स्तोत्र महोत्सवा रसिक हो शोभा तुम्ही आणिली

देऊनी प्रतिसाद थोर सहजी ! आभार मानू किती

केले कौतुक गोड श्राव्य म्हणुनी; वाखाणली लेखणी

स्वीकारी अभिवादना रसिक हो! ही सांगता जाहली

-------------------------

श्लोक    1 -  20

श्लोक  21 – 40

श्लोक  41 - 60

श्लोक  61 – 80