।। ब्रह्मज्ञानावलीमाला ।।




मी कोण आहे ह्या वारंवार पडणार्‍या प्रश्नाचे उत्तर मी ते सर्वव्यापी अव्यय ब्रह्म आहे. असे सांगणारे तसेच आपल्या आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून देणारे हे स्तोत्र आहे.

सकृच्छ्रवणमात्रेण ब्रह्मज्ञानं यतो भवेत्
 ब्रह्मज्ञानावलीमाला सर्वेषां मोक्षसिद्धये ।। 1
(सकृत् - एकदा) 
ब्रह्मज्ञानावलीमाला । मनोभावेचि एकदा   
एकाग्रचित्त जो ऐके । आणे आचरणी सदा ।। 1.1

बोले चाले करे तैसा । आत्मसात करे तया
ब्रह्मज्ञानावलीमाला । मोक्षदायी असे तया ।।1.2

असङ्गोहमसङ्गोहमसङ्गोहं पुनःपुनः।
सच्चिदानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥2 

असे निःसंग निःसंग । असे निःसंग मी सदा
त्रिवार सांगतो मी हे । असे निःसंग मी सदा ।। 2.1

कुणाशीही नसे माझा । काही संबंध तत्त्वता
पद्मिनीपान पाण्यात । तैसा निर्लेप मी सदा ।। 2.2

नाश मृत्यू मला नाही । रोग व्याधी नसे मला
विश्व सारे भरूनी मी । सर्वत्र राहतो सदा।। 2.3

आनंद विश्वव्यापी मी । कधी ना संपतो असा
 सच्चिदानंदरूपी मी । अविनाशीच तत्त्वता ।। 2.4

नित्यशुद्धविमुक्तोऽहं निराकारोऽहमव्ययम्।
भूमानन्दस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययम् ।।3
 ( भूमन् -  मोठं परिमाण, प्राचुर्य, यथेष्टता, मोठी संख्या . भूमानन्द - प्रचंड आनंद, भूमानन्दस्वरूप - परमानंदस्वरूप )
असे निर्मळ मी शुद्ध । नित्य मुक्त असे सदा
अंतराळी जसा वायू । तसा राहेच मी सदा ।। 3.1

जलाशयास भेदूनी । किरणे पोचती तळा
ओलावतीच कैसी ती । तैसा मीची असे सदा ।। 3.2

निराकारास ह्या कैचा । आकार संभवे कधी
अविनाशी असे मीची । नाश ना पावतो कधी ।। 3.3

आनंद विश्वव्यापी मी । सौख्य आनंद कंद मी
ग्रासतो ना मला मृत्यू ।  अविनाशीच तत्त्व मी ।। 3.4

नित्योऽहं निरवद्योहं निराकारोऽहमच्युतः
परमानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥4
 ( निरवद्य – निष्कलंक, निर्दोष, अकलंकनीय)
                                                                        चिरस्थायी असे मीची । नित्य शाश्वत निश्चित        
निष्कलंक निराकारी । सर्वव्यापीच अच्युत ।। 4.1

परमानंद रूपाने । ओतःप्रोत भरे जगी
माझ्याच सारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 4.2

शुद्ध चैतन्यरूपोऽहमात्मारामोऽहमेव च
                अखण्डानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 5 
  
रंगलो अत्मरूपी हा । शुद्ध चैतन्यरुप मी
आत्माराम असे मीची । राहे सर्वत्र व्यापुनी ।। 5.1

मी तो अखंड आनंद । अबाधित असे जगी
व्यय ना होतसे माझा । अविनाशीच तत्त्व मी ।। 5.2


प्रत्यक्चैतन्यरूपोऽहं शान्तोऽहं प्रकृतेः परः।
शाश्वतानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 6

( प्रत्यक् - सर्वांन्तर्यामी, सर्वांमध्ये निवास करणारा )
सर्वांच्या हृदयी राहे । तेचि चैतन्य मी असे
प्रसन्न शांत निःस्तब्ध । स्थिर मी सर्वदा असे ।। 6.1

नित्यानंदस्वरूपी मी । मायातीत असेच मी
माझ्याचसारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 6.2

तत्त्वातीतः परात्माहं मध्यातीतःपरः शिवः।
मायातीतः परं ज्योतिरहमेवाहमव्ययः ।। 7

अस्तित्त्वाचेच विश्वाच्या । असे कारण तत्त्व जे
पलीकडे असे त्याच्या । तत्त्वातीतच मी असे ।। 7.1

उपाधी ना मला काही । नित्य चैतन्य मी असे
नसे आदि मध्यान्त । सर्वश्रेष्ठचि मी असे ।। 7.2

कल्याणरूप मी राहे । मायेच्याही पलीकडे
प्रकाशवी प्रकाशाला । प्रकाश श्रेष्ठ मी असे ।। 7.3

विराजमान सर्वत्र । व्यापितो सकलांस मी
झीज ना होतसे माझी । अविनाशीच तत्त्व मी ।। 7.4


नानारूपव्यतीतोऽहं चिदाकारोऽहमच्युतः ।
सुखरूपस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 8

व्यापुनी सर्व रूपांसी । नाना रूपी असून मी
सर्व रूपांचिया आहे । पलीकडे सदैव मी ।। 8.1

झाकती सागरा लाटा । लाटा सिंधू नसे परी
तरंगातूनही सार्‍या। असे सागर एकची ।। 8.2

शुद्ध चैतन्य रूपी मी । स्वस्वरूपी विराजित
स्वरूपापासुनी भ्रष्ट । होतो ना मीच अच्युत ।। 8.3

सुख आनंद रूपी मी । सदानंद स्वरूप मी
व्यापुनी सर्व राहे मी । अविनाशीच तत्त्व मी ।। 8.4


मायातत्कार्यदेहादि मम नास्त्येव सर्वदा ।
स्वप्रकाशैकरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 9

माया आणि तिची कार्ये । देह वा सर्व इंद्रिये
पुत्र मित्र कलत्रादि । माझे कोणी कधी नसे ।। 9.1

असे स्वयंप्रकाशी मी । सर्वकाळ सदैव मी
एकरूप असे नित्य । अविनाशीच तत्त्व मी ।। 9.2

गुणत्रयव्यतीतोऽहं ब्रह्मादीनांच साक्ष्यहम् ।
अनन्तानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 10

सत्त्व, रज, तमाच्याही । पलीकडे असेच मी
ब्रह्मा, विष्णु, महेशाचा । साक्षी एक असेच मी ।। 10.1

घडे उत्पत्ती त्यांचीही । माझ्यापासून ती खरी
माझ्याच प्रेरणेने ते । आपुले कार्य आचरी ।। 10.2

पलीकडेच त्यांच्या मी । अनंत मी अनादि मी
अपार मोद तो मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 10.3
  
अन्तर्यामिस्वरूपोऽहं कूटस्थः सर्वगोऽस्म्यहम् ।
परमात्मस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 11

देही सर्वांचिया  राहे । जीवरूपात मी सदा
निर्विकार असे मीची । कूटस्थ म्हणती मला ।। 11.1

विद्यमानचि सर्वत्र । सर्वत्र विलसे सदा
परमात्मा स्वरूपी मी । अविनाशीच तत्त्वता ।। 11.2

निष्कलोऽहं निष्क्रियोऽहं सर्वात्माऽऽद्यः सनातनः ।
अपरोक्षस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 12

आकारहीन सर्वस्वी । हात पाय मला नसे
मला अवयवांचा ना । पत्ता काहीच तो असे ।। 12.1

कला वा भाग वा अंश । माझे ना होत ते कधी
क्रिया ना करतो काही । असे निष्क्रीय  नित्य मी ।। 12.2

 आत्मा मी भूतमात्रांचा । सर्वांहूनी पुरातन
नटलो विश्वरूपाने । अविकारी सनातन ।। 12.3

मला ना आदि वा अंत । अपरोक्ष स्वरूप मी
सर्वकाही असे मीची। अविनाशीच तत्त्व मी ।। 12.4


द्वन्द्वादिसाक्षिरूपोऽहमचलोऽहं सनातनः ।
सर्वसाक्षिस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 13

शीतोष्ण लाभ हानी वा । जय वा तो पराजय
सुखदःखादि द्वन्द्वे ती । मान वा अपमान तो ।। 13.1

साक्षी मी सर्व द्वंद्वांचा । द्रष्टा अचल केवळ
निर्विकार असे मीची । अव्याहत सनातन ।।13.2

 सर्वसाक्षीच सर्वत्र । कालातीत असेच मी
नसे क्षय अबाधीत । अविनाशीच तत्त्व मी ।। 13.3

प्रज्ञानघन एवाहं विज्ञानघन एव च
अकर्ताहमभोक्ताहमहमेवाहमव्ययः ।। 14

ज्ञानरूप असे मीची । ज्ञानाकार असेचि मी
भोक्ता कर्ता नसूनीही । सर्वकर्ता असेच मी ।।14.1

सर्वजीवस्वरूपी मी । सर्व भोक्ता असेचि मी
कर्तृत्त्व विरहीता मी । नसे भोक्तृत्व अल्पही ।।14.2

सर्वकाही असे मीची । असे अव्यय नित्य मी
शुद्ध सत्य असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 14.3

निराधारस्वरूपोऽहं सर्वाधारोऽहमेव च ।
आप्तकामस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 15

आधार न लगे काही । निराधार असेच मी
परी आधार सर्वांचा । एकमेव असेचि मी ।। 15.1

माझ्यापासून उत्पत्ती । जगताचीच होतसे
लय माझ्यामधे होई । विश्वपालन  मी करे ।। 15.2

कामना पूर्ण होओनी । पूर्णकामा असेचि मी
कामना पुरवीतो मी । ज्या ज्या भक्तहृदी परी ।। 15.3

मीच भोक्ता, फलाशा मी । फळही ते असेच मी
सर्व काही असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 15.4

तापत्रयविनिर्मुक्तो देहत्रयविलक्षणः ।
अवस्थात्रयसाक्ष्यस्मि ह्यहमेवाहमव्ययः ।। 16

दुःख कष्ट नसे व्याधी । शारीरिक मला कदा
दुःखे निसर्ग कोपाची । छळिती ना मला कदा ।। 16.1

दुर्दैवाचेच वा फेरे । घेरती ना मला कधी
तापत्रय छळी देहा । माझा संबंध ना तयी ।। 16.2

देहत्रयचि जे जाणी । स्थूल, सूक्ष्म नि कारण
तयाहूनी असे मीची । निराळाच विलक्षण ।। 16.3

सुषुप्ती जागृती स्वप्न । बाल्य तारुण्य वा जरा
अवस्था ह्या नसे मीची । असे त्याहून वेगळा ।। 16.4

सर्वावस्थांस मी साक्षी । दीप तेवे जसा गृही
निरंतर असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 16.5

दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्परविलक्षणौ
दृग्ब्रह्म दृश्यं मायेति सर्ववेदान्तडिण्डिमः ।। 17

दृग् दृश्य दोनची राहे । विश्वामध्ये पदार्थची
विलक्षण परी राहे । दोन्हीत भिन्नता पुरी ।। 17.1

दृग् हे ब्रह्म असे सत्य । दृश्य माया प्रपंच हा
दवंडी देतसे ऐसी । नित्य वेदान्त श्रेष्ठ हा ।। 17.2
  
अहं साक्षीति यो विद्याद्विविच्यैवं पुनः पुनः ।
स एव मुक्तः सन् विद्वानितिवेदान्तडिण्डिमः ।। 18

जसा राहे दिवा साक्षी । घडणार्‍या क्रियांसची
घडणार्‍या क्रियांमध्ये । भाग घेई न तो परी ।।18.1

तैसा असेच मी साक्षी । क्रिया होतीच हातुनी
 घेतले जाणुनी वेदा । शंका ना उरली मनी ।। 18.2

जाण ज्याला अशी येई । तोच विद्वान ह्या जगी
तोच मुक्त असे ज्ञानी । दवंडी वेद दे अशी ।।18.3

घटकुण्ड्यादिकं सर्वं मृत्तिकामात्रमेव च ।
तद्वद् ब्रह्म जगत्सर्वमिति वेदान्तडिण्डिमः ।। 19

गाडगी मडकी कुंडया । नाम, आकार वेगळे
सर्वात एक ती माती । मातीवीण दुजे नसे ।।19.1

नाना रूपात तैसेची । विश्व ये प्रत्यया जसे
परी ब्रह्ममयी सारे । दवंडी वेद देतसे ।। 19

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ।
अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः ।। 20

ब्रह्म हेचि असे सत्य । भासमान जगत् असे
नसे विकल्प ब्रह्म्यात । स्थित्यंतर जगी दिसे ।। 20.1

जीव ब्रह्माहुनी नाही । काहिही वेगळा मुळी
जीव तोची असे ब्रह्म । श्रेष्ठ सिद्धांत दाखवी ।। 20.2

वेदान्त शास्र हे राहे । अत्युत्तम सदा जगी
दवंडी पिटतो ऐसी । जगी वेदांत ही अशी ।। 20.3

अन्तर्ज्योतिर्बहिर्ज्योति: प्रत्यग्ज्योतिः परात्परः।
ज्योतिर्ज्योतिः स्वयंज्योतिरात्मज्योतिः शिवोस्म्यहम् ।। 21

 ( प्रत्यक् – विरुद्ध दिशांना , आतल्याबाजूला; परात्पर – सर्वश्रेष्ठ परमात्मा)

हृदयातचि तेवे तो । ज्ञानाचाच प्रकाश  मी
आकळे विश्व ज्यायोगे । तोही बाह्यप्रकाश मी ।। 21.1

अंतर्बाह्यचि सर्वत्र । ज्ञानरूप प्रकाश मी
सर्वत्र दाटुनी राहे । दीप्ती तीच असेच मी ।। 21.2

तेजोनिधी असे मीची । प्रकाशासी प्रकाशवी
चैतन्य मंगलाकारी । ज्ञानाकार प्रकाश मी ।। 21.3

सर्वश्रेष्ठ असे मीची । परमात्मा असेच मी
कल्याण मोद रूपी मी । शिवरूप असेच मी ।। 21.4

ब्रह्मज्ञानवलीमाला । आत्मज्ञानचि देतसे
ज्ञान अध्यात्मविद्येचे । दावे उकलुनी कसे
जीव ब्रह्म असे याची । ग्वाही देतेच निश्चिती
भावार्थ सांगते त्याचा । मराठीत अरुन्धती

----------------------------------------------------------------------------------
आषाढ शुद्ध एकादशी (आषाढी एकादशी) 1 जुलै 2020


।। अगा पंढरीच्या राया ।।



                  
अगा पंढरीच्या राया

                 

 

HERBSCART SHYAMA TULSI (HOLY BASIL) Seed Price in India - Buy ...       10 health benefits of tulsi or holy basil | TheHealthSite.com        Tulsi Plant at Rs 5/piece | Tulsi | ID: 19763377588
                  हे विठ्ठला,  हे पांडुरंगा, तू आमच्या कष्टकर्यांचा देव. आम्ही खळ्यात मळ्यात करता करता चिखलात बरबटलेली माणसं. तूही मेघश्यामल सावळा होतास, तो गायी चरायला नेऊन गायीच्या खुरांनी उधळलेल्या गोधूलीने पांढुरका झालास. तुझं हे पांढुरक पांडुरंग रूप  आम्हाला म्हणूनच भावतं. अरे, गिरणीत सकाळासून रात्रीपर्यंत दळणं दळणार्या भिकू, पांडु, दत्तुला पंढरीची वारी कशी जमावी? सार्या गावच्या जनाईंची दळण दळता दळता आणि त्यांच्या लेकराबाळांना खाऊ घालता घालता दिवसभरात नखशिखांत तयार झालेलं त्यांचं पांडुरंग रूपच आम्हाला गोड वाटतं. त्यांच्या डोक्यावरच्या आडव्या टोप्या, माथी धरलेल्या अमरनाथच्या शिवलिंगासारख्या पवित्र वाटतात. कुठल्या आड घडीला रस्त्यात शर्टप्यांटीत भेटले तरच अनोळखी आणि परके होऊन जातात. तसच तुझं.
                     आम्ही भोळेभाबडे कष्टकरी लोक, ज्ञान, तपस्या काय जाणणार? पण तू आमच्या कष्टांनाच `योगः कर्मसु कौशलम् ।म्हणत कर्मयोग करून टाकलस. आमच्या ह्या कष्टात `ग्यानबा तुकारामआणि  `पांडुरंग हरीह्या नामाचं विकर्म ओतलस आणि ----आणि आमच्या ढोरासारख्या कष्टदायक कामाला कसला परीसस्पर्श झाला कळलच नाही. तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखे दुःख, कष्ट जणु आकाशाच्या पोकळीने शोषून घेतले. भक्ती आणि कर्मयोगाच्या रसरशीत मुशीत पार पार जळून गेले. मुशीत खाली राहिलं ते फक्त लखलखित रामनाम. आणि काम? काम काम राहिलच नाही. काम, नाम आणि परमधाम राम ही त्रिपुटी एक झाली. कर्म अकर्म झाले. आता कुठलंही काम आम्ही हाती घेतलं की त्यात आम्हाला `राजस सुकुमार मदनाचा पुतळाअसा तूच दिसायला लागलास. कर्मफळाची अपेक्षा कसली? लौकीक दृष्ट्या हाती आलेल्या कर्मफळात कांदा, मुळा भाजीतच अवघी विठाबाई दिसायला लागली आणि आम्ही आनंदाने नाचू लागलो. अवघा रंग एक जाला `पांडुरंग! जे जे काम करू ते ते विठ्ठल. काम हाच एक पवित्र यज्ञ झाला. मीपणाची आहुती त्यात कधी पडली कळलच नाही. मीच नाही तर काम कोण करणार? आता कर्त्यातील `मीच गळून पडल्यावर कर्ता म्हणून कोणाला तरी बसवायलाच पाहिजे. शेवटी तुलाच कंबर कसायला लागली. बघणारे आश्चर्याने म्हणु लागले, ``कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम!’’  जनी? जनी कुठे आता? आता ती दळतच नाही. `दळिता कांडिता तुज गाईन अनंताअसं न विसंबता जनी म्हणायला लागली आणि तिचं दळणं सुटलं.  जनीचं दळणही तूच दळतोस. जनीच्या अंगावर तुझ्या नामाचा भरजरी शेला पांघरून तिची दुःखाची ठिगळंवाली वाकळ खांद्यावर घेऊन उभा राहिलास. एकनाथांकडे श्रीखंड्या निवांत भिंतीवर बसलेला आणि तू पाणी भरत राहिलास. तुझ्या नामाचं विकर्म देहात ओतलं की कितीही काम असो अकर्माचं परम सुखदायी रसायन तयार होतं. ``सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारीत़’’ असा तुझ्यावर आमचा भार घालून जो तो तुझं नाव घेत निवांत होतो.
                    तुझ्या शोधात ज्ञानी तपस्वी रानावनात भटकत राहिले. डोंगर, कडे, कपारी पालथी घातली. तू मात्र `मुको कहाँ ढूँढे रे बंदेमैं तो तेरे पास ---रे !’ म्हणत कर्माचा कर्मयोग करणार्या पुंडलिकाच्या अस्सल भक्तिचा नमुना दाखवायला सार्या युक्तीवादप्रवीण पण नुसत्याच बडबड्या मुनीवरांना घेऊन आलास. ``अरे पुंडलीका, कर्मयोग कसा असतो हे ह्या मुनीमहाराजांना दाखवायला आणि तुझा परिचय करून द्यावा म्हणून मी येथवर आलो आहे. तुझं काम करत असलास तर मी थांबतो थोडं.’’  पुंडलीक शहाणा. म्हणाला, ``वीट देतो त्यावर उभा रहा. माझं काम संपणार नाही आणि तुला येथून हलता येणार नाही. अरे तू नजरेसमोर उभा राहिलास की माझं कर्म अकर्म झालं. माझी कर्माची जाणीवच संपली. मी काम करत आहे हीच जाणीव नसेल तर कर्मफलाचा  आठव कसा यावा? सदानंदरूपी कर्मफळ माझ्या पुढ्यात असतांना मला दुज्या फळाची गरजच काय? माझ्या दारात अमृताचा वर्षाव करणारा मेघ आला असेल तर त्याला मी जाऊ कसा देईन?’’ आजही पुंडलीकाची वाट बघत तू विटेवरच उभा आहेस. आणि पुंडलीक कर्मयोगातून अखंडपणे तुझे सुख अनुभवित आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्यां 
 वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं 
 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।1


तटी भीवरेच्या वसे पंढरी जी
 जिथे नांदते ब्रह्मविद्या सुखानी।
तिथे श्रेष्ठ संतामहंतां सवेची
 विठू भक्तभोळाच धावून येई ।। 1.1

तयाच्या मनी लागली ओढ  मोठी
 कधी भेटतो पुंडलीकास या मी ।
 युगामागुनी लोटली ही युगेची
 तरी पाहतो वाट हा वाळवंटी ।। 1.2

कसा तोषवू पुंडलीकास माझ्या
 प्रतीक्षा करी पंढरीचाच राणा ।
असे मेघ जो अमृता वर्षणारा 
 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा ।। 1.3


                   सर्व ऐश्वर्य तुझ्या रूपाने माझ्या समोर उभं आहे. अहो पांडुरंगा, तुमची ही रमणीय मूर्तीच माझ्या तपाचं फळ आहे. तुमचं  मेघश्यामल रूप, मेघमालेतून चमचमत जाणार्या वीजेप्रमाणे लखलखणारं दिव्य वस्त्र माझ्या मनाला अत्यंत आनंद देत आहे. माझ्या मनातून अत्यानंदाच्या सहस्रशः उर्मी धावत आहेत. तुझं सगुण साकार रूप डोळ्यासमोरून हालत नाही. तुझ्या गळ्यातील कौस्तुभमणी, हातातील बाजुबंद --! अरे, ज्या विश्वविजयी मदनाच्या ध्वजेवर मकर विराजमान असतो त्या मदनाने तुझ्या कानावरच त्याची पताका मकरकुण्डलांच्या रूपाने उभारल्यावर जो पाहील तो तुझ्यावर मोहित झाल्याशिवाय कसा राहील? तुझ्या रत्नजडित कुंडलांवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन तुझ्या गालावर उमटलेली प्रकाशाच्या अनंत कवडशांची रंगित नक्षी पाहतांना माझे नेत्र उघडझापही विसरून गेले आहेत.
जसा मेघ संपृक्त झाला जलानी 
 लकाके तयातून सौदामिनी ही ।
तसा शोभतो हा विठू नीलवर्णी 
 कटी दिव्य वस्त्रा झळाळी विजेची ।। २.१

हळू स्पर्शती कुंडले गोड गाली 
 जरा हालता रत्नज्योती प्रकाशी
प्रकाशात रांगोळिच्या सप्तरंगी 
 तुझे थोर लावण्य मोहे मनासी  ।। २.२


प्रभा दिव्य कंठी दिसे कौस्तुभाची
 भुजा बाजुबंदासवे शोभताती
शिवाच्या प्रतीका धरे आदरानी 
 शिरोभूषणा मानुनी मस्तकी ही ।। २.३
अनिमिष नेत्रांनी मी तुझे धीरगंभीर रूप अनुभवत आहे. देव मस्तकी धरावा आणि मग कुठलंही काम करावं हे सागायला तू मस्तकावर मुकुट म्हणून शिवलिंग धारण केलं आहेस. हे कल्याणमूर्ते, तुझं हे सौम्य शांत रूप कोजागिरीच्या चंद्राच्या चांदण्याप्रमाणे माझ्या मनात झिरपत आहे. पण तुला चंद्र तरी कसं म्हणू? तो सुद्धा कला कलांनी उणावत जातो. तुझी सदोदित स्वयंप्रकाशात निथळणारी ही आनंदमूर्ती पाहून तो चंद्रसुद्धा लाजून जाईल. तुझा हेवा करेल. तुझ्या त्याच अद्तीय रूपाला माझे वंदन असो.

जरी शारदी पौर्णिमेचा सुधांशु 
 उणावे कलांनी तयाचा प्रकाशु
म्हणोनी तुला पाहता खिन्न होई
म्हणे कोण माझ्याहुनी चित्तवेधी ।। ३.१


जया पाहता पापणी ही ढळेना 
 फिका मोक्ष वाटेमिळे सौख्य जीवा ।
नमस्कार त्या पंढरीच्याच राया 
 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा ।। ३.२

 हे आनंदकंदा,  असे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभे रहा. माझी तहान, भूक विसरून  मी तुमचं हे अद्वितीय रूप  सेवत राहतो. तहानेल्या चातकाला जलाने ओथंबलेल्या जलदापरीस दुसर्या कशाने आनंद होणार? अहो पांडुरंगा, रमेच्या हृदयात एकमेव तुम्ही आणि तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय काहीच नाही. तिच्या मनाच्या राऊळात,  हृदयाच्या गाभार्यात तुमची हीच रम्य मूर्ती आहे. त्याच लावण्यमूर्तीला मी वंदन करतो.
        हे पांडुरंगा, माझ्यासाठी तू सर्व गोष्टी इतक्या सोप्या केल्या आहेस की काय सांगू? नाव तूच, नावाडी तूच, पैलतीरही तूच! कमरेवर हात ठेऊन हा भवसागर कमरेइतकाच खोल आहे असा मला सतत दिलासा देत आहेस. बुडण्याचं भय माझ्या मनातून कधीच पळून गेलं आहे. ज्या ब्रह्मज्ञानासाठी हे ज्ञानी लोक आकाशपाताळ एक करतात, अनेक जन्म घ्यावे लागतात म्हणून आम्हाला भीती दाखवतात ते ब्रह्म असतं तरी किती दूर आहे? ह्या आमच्या अडाण्यांच्या  प्रश्नाला तू किती सोप्प उत्तर दिलं आहेस. कमरेवर ठेवलेल्या तुझ्या कोमल हातांची बोटे नाभीपासून चार बोटेच दूर आहेत त्याप्रमाणे भवाहून ब्रह्म चारच बोटे दूर आहे हे सांगून तू आम्हा साध्या साध्या लोकांना केवढा दिलासा दिलास. हे पांडुरंगा तुला प्रणाम!
कटी ठेविले हात हे दर्शवाया 
 कटी एवढा खोल सिंधू भवाचा 
असे भक्त माझातरी पैलतीरा
 सुखे पोचवीतो नसे कष्ट त्याला ।। ४.१

दिशा नाभिची दर्शवीतीच बोटे 
 भवाहून ब्रह्मा असे चार बोटे ।
असा मोक्ष सोपा करी जोचि भक्ता 
नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा ।। ४.२

तुझ्या ह्या सगुण रूपाचा मोह धरावा का निर्गुणाचा? तुझ्या ह्या सगुणरूपातूनच तू आम्हाला तुझ्या अथांग निर्गुणापर्यंत पोचवतोस. तुझ्या वेणूतून निघालेला मधुर वेणूनाद ---छे-- छे!! त्या वेणुला कसला नाद रे? तुझेच श्वास--- तुझेच उच्छ्वास --- ते! हे पांडुरंगा तो वेणुनाद तूच. त्या अचेतन अलगुजाला सचेत करणारा तो वेणुनाद, त्या अलगुजाचा मधुर आत्मा तूच. सार्या विश्वात संचार करणारा, भरून राहिलेला तो मंजुळ नाद, ते नादब्रह्म तूच. माझ्या हृदयाच्या एकतारीतून पांऽऽऽडु-रं- --- पांऽऽऽडु-रं-ग उमटणारे सूर ह्या मधुर अलगुजाच्या विश्वव्यापी नादात मिसळून गेले बघ. घटाकाश आणि आकाश एकरूप झाले. सत् चित् आनंदात मी विरून गेलो.
प्रभोवेणुचा तूच मंजूळ आत्मा 
भरोनी सदा राहतो पूर्ण विश्वा ।
करी तूच सर्वत्र संचार देवा  
नसे तू अशी पाहिली मी  जागा ।। ५.१

अहो विठ्ठला रुक्मिणीप्राणदाता 
 तुम्हा जन्म नामृत्युची कोण वार्ता ।
घटाकाश आकाश ना भेद ऐसा  
तुम्ही स्थान ते अद्वितीया तुरीया ।। ५.२

                हे गोविंदा एखादा घट पाण्यात पूर्ण बुडाला की त्याच्या आत बाहेर सर्वत्र पाणीच राहतं. त्याप्रमाणे ह्या गोपी तुझ्या ह्या अमृतमयी रसायनात आकंठ ?-- नाही---- नाही पूर्णच बुडून गेल्या आहेत. तुझं स्मित हे त्या अमृतमयी रसायनाचे अलौकिक तरंग आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग! ह्या अमृतात बुडालेल्या गोपिकांना तुझ्याशिवाय बाकी कसं काय दिसाव? त्यांना हृदयातही तू, संसारातही तू, कामतही तूच दिसत राहतोस. देव सामोरा की पाठीमोरा हे ही कळत नाही. जो दिसेल त्याला त्या तुझ्या गोविंदरूपात पाहतात. झाडाशी, दगडांशी, माणसांशी त्या गोविंद समजून बोलत राहतात. तुझ्या रूपाचं वेड लागलेल्या, तुझ्या मोहक,  मंद स्मिताने खुळावलेल्या गवळणींना तुझ्याशिवाय काहीच गोड वाटत नाही. तुझं असणं हेच इतकं आश्वासक आहे की तुझ्या नुसत्या असण्यानीच सारे सुखावून जाताततुझ्या नुसत्या मोहक स्मितानेच तू गोपिकांना वेडं पिसं करून टाकतोस.


कसा मंद हासे पिसे लावतो गे 
उभ्या गोप-गोपी हरे भान त्यांचे ।
असे तूच आत्मा असे तूच शास्ता 
तुला वंदितो विठ्ठला ब्रह्मरूपा।। ६.१

   हे गोपाळा, तुझा स्पर्श तुझं बघणं, तुझं बोलणं, तुझं वागणं ह्या सर्वातून दुसर्‍याविषयी अत्यंतिक जिव्हाळा, आपलेपणा, स्नेह पाझरत असतो. तुझ्या स्पर्शातून प्रवाहित होणारे हे प्रेम मुक्या प्राण्यांनाही अनुभवास आल्यावाचून कसे राहील? तुझी प्रत्येक कृती इतकी आनंददायी असते की मुकी जनावरं ही  तुझ्यावरच्या प्रेमाने हंबरू लागतात. गायींना पान्हा फुटतो.

असे दीनबंधू सदा सुप्रसन्ना  
पळे दुःख ते पाहता श्रीमुखाला ।
तुझ्या पैलतीरा कुणी पाहिले ना 
अनंता अमर्याद तू अंतहीना ।। ७.१

स्वये गोप झालागुरे राखी कान्हा । 
सुखावून गायी फुटे त्यांसी पान्हा।। ७.२

हे रुक्मिणीच्याही प्राणांना संजीवन देणर्या रुक्मिणीकांता , जीवदान देणार्या पांडुरंगा, जन्मतःच तुझ्या नामाची पताका माझ्या माय-बापांनी  माझ्या खाद्यांवर दिली. पावलं जे जे चालली, चालत आहेत आणि चालतील ती तुझ्याच गावाची वाट असेल. सारं आयुष्यच पवित्र वारी.  पेरतांनाही फळ फूल सावली, लाकूड कशाची अपेक्षा करायची नाही ह्याचा परीपाठ घालून द्यायलाच ह्या तुळशीला तू माझ्या डोक्यावर दिलस आणि फळाशा सोडायचा अर्थ उमगला. पावित्र्याने मन भरून आलं. सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी अशी ही तुळसच माझ्या डोक्यावर ठेऊन हे जीवन तुला अर्पण केलं आहे. हे पांडुरंगा माझी ही जीवनवारी सफल कर.

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं 
 परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं 
 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।। ८

--------------------------------------------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची
संपूर्ण पाण्डुरङ्गाष्टक आणि त्याच्या अनुवादासाठी खालील link वर
 click करा.