अनेकांना मुखोद्गत असलेले नवग्रह स्तोत्र हे
व्यासांनी इतक्या सुंदर रीतिने आपल्यापुढे मांडले आहे की हे स्तोत्र मन
आणि निसर्गाला जोडणारा एक
सुंदर दुवाच वाटतो. अकाशातल्या ग्रहांचं वर्णन करता करता आपल्याला निसर्गभ्रमण करून आणतो. निसर्गाच्या इतकं जवळ नेतो की
हा
सुंदर निसर्ग बघता बघताच आपली काळजी चिंता दुःखं काही क्षणांसाठीतरी दूर पळतात.
सीताविरहानी शोकाकुल झालेल्या रामचंद्रांनाही पंपासरोवराच्या निसर्ग सौंदर्यानी अशी काही मोहिनी घातली की सीताविरहाच दुःख तेही काही काळ विसरले. तिथल्या निसर्ग सौंदर्यानी आनंदित झाले. आपल्या मनातील दूषित अशा पूर्वग्रहाला उतारा ह्या आकाशस्थ रमणीय सुंदर ग्रहांचाच आहे.
आकाशाचं निरीक्षण करीत गच्चीत झोपण्याचा एखादा लहानपणचा क्षण आठवा. रात्री आपल्या पायापाशी दिसणारा ग्रह हळुहळु वर
सरकत आकाशाच्या मध्यावर येतो आणि कितीतरीवेळ आपल्याला निरखत राहतो. त्याचे सुंदर आशीर्वाद आपल्या डोक्यावर ठेऊन पहाटे हळूच पश्चिम क्षितिजाला टेकतो असे एकामागोमाग एक
ग्रह आपल्याला निरखत आणि त्यांचे शुभाशीर्वाद देत जातात, तेंव्हा ह्या निसर्गरूपी आईनी आकाशाचं चांदण्यांच पांघरूण हळुवार हातानं आपल्या पायापासून डोक्यापर्यंत ओढल्याचा सुखद अनुभव देतचं रात्र संपते. सकाळ होताच ह्या ग्रहांचं निसर्गात जोगोजागी बिंबित झालेलं रूप दिसतं.आणि परत त्यांच्या सुखद आठवणी जाग्या होतात.
सूर्यस्तुती
पक्षांच्या किलबिलाटानी जाग येते. आणि समोरच क्षितीजावर लालचुटुक सूर्याचं बिंब हळु हळु वर येतांना दिसते. अंगणातली जास्वंदही त्याच्यासोबत डोलत असते. तिच्या फुगीर कळ्यांमधून परागांचे कोमल दांडे बाहेर डोकावत असतात.…. सूर्यकिरणा सारखे ! कळी कंप पावत असते. तिच्या कंपनाबरोबर एक एक पाकळी उमलत सूर्याचं जणु दुसरं बिंबच अंगणात हसायला नाचायला लागतं. आपोआप हात जोडले जातात आणि ‘जपाकुसुमसंकाशं - ह्या ओळी अभावितपणे ओठी येतात.
नवग्रह मालिकेतील सूर्य हा
एकमेव तारा! सार्या
ग्रहांना आपल्या नियमात बांधून ठेवणारा! सर्वांचे ऊर्जास्त्रोत! इंग्रजीत सांगायचं झालं तर नवग्रहांमध्ये सूर्याचा pivotal role आहे असच म्हणावं लागेल. पृथ्वीवर सर्व जीव सृष्टी सूर्याच्याच उर्जेवर अवलंबून आहे हे जाणूनच आपल्या पूर्वजांनी त्या दिव्य गायत्रीमंत्राची निर्मिती केली. ह्या सूर्यदेवतेनी आपल्याला जणुकाही वर रूपाने दिलेल्या उर्जेमुळेच उत्साहानी आपण कामाला लागतो. आजचा दिवस कसा जाईल अशी निराशा मनाला स्पर्शही करत नाही. सगळं मनच उजळून जातं!
चला म्हणुच या न मग!
जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महाद्युतिम्
तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्।।1
जसे कुसुम जास्वंदी । रक्तवर्ण तसा रवी
अंधार दूर सारी हा। पापहारीच सर्वही।।
कश्यपाच्याच पुत्रासी । तेजस्वी भास्करास मी
प्रणाम करितो भावे। प्रातःकाळीच नित्यही।।1
ह्या धावपळीच्या जगात निसर्गाला आपण सतत बरोबर ठेऊ शकतोच असं नाही. म्हणून ह्या नवग्रहांशी साधर्म्य साधणारी रत्नही त्या ग्रहाचा अंश म्हणून माणसं वापरायला लागली. अंगठीच्या रूपानी सतत बोटात असणा र्या
ह्या तेजस्वी रत्नामधून परत त्या सुंदर ग्रहमालेची , निसर्गाची आठवण ताजी होते. मनाला प्रसन्नता लाभते. त्या त्या ग्रहांशी साधर्म्य असलेली ही रत्नेही अशीच सुंदर आहेत .
राजवर्खी / sunstone
--------------------------------------------------------------------------------
चंद्रस्तुती
रात्री अचानक जाग येते आणि अंधारात पांढराशुभ्र प्रकाशाचा कवडसा
आपल्याला बाल्कनीत बोलावतांना दिसतो. पावलं आणि मन आपोआप तिकडे वळतात. शांत शीतल
चांदणं समुद्राच्या पाण्याशी खेळतांना दिसतं. समुद्राच्या पांढर्या पुळणीत
चमकणारा एखादा शंख हळुच त्या चंद्राशी आपलं नातं सांगून जातो. हिमालयात कधीकाळी
एखादि रात्र काढली असेल तर ती आठवा. त्या ऊंच ऊंच पर्वत शिखरांच्या माथ्यावर तळपणारा
चंद्र आणि पर्वतशिखरांच्या माथ्यावर नुकता नुकता पडलेला हिमपात दोघांच्या
तळपण्याची अणि शुभ्रतेची जणु स्पर्धाच लागलेली असते. ज्यांना कोणाला कैलासाच्या
शेजारून उगवणार्या ताटाएवढ्या पूर्ण चंद्राचं दर्शन झालं असेल त्यांच्या भाग्याला
तर काय सीमा! प्रत्येकाला हिमालयात जायलाच पाहिजे असंही नाही. अमावास्येच्या
आदल्या दिवशी म्हणजे कृष्ण चतुर्दशीला पहाटेच उठून लांब मोकळ्या जागेत फिरायला जा.
हवेतील सारे धूलिकण खाली बसून हवा निर्मळ झालेली असते. सुखद गारवा आणि आणि शीतल
झुळकींमुळे झोप कुठल्याकुठे पळून जाते. मन उल्हसीत होतं. अशावेळी पूर्वेच्या
क्षितीजावर फिकट पिवळी केशरी चमकदार तरीही शांत शांत चंद्राची कोर मान वेळावत वर
येते. आणि ह्या व्योमकेश - (आकाशच ज्याचे केस आहेत अशा ) चंद्रशेखर (माथ्यावर चंद्रकला धारण करणार्या)
शिवशंकराचं प्रत्यक्ष दर्शनच घडविते. आयुष्य मावळण्याच्या आधिच्या क्षणाचीही तीची
विलोभनीय प्रगाढ शांतता, आणि सर्वांना सुखावणारी वृत्ती, पूर्वग्रह दूषित
मनावरील मळभ दूर सारते. आयुष्य कसं जगावं ह्याचं प्रात्यक्षिक दाखवून जाते.
चंद्राचं वर्णन करतांना व्यासमुनी आपल्याला स्वयंपाकघरापासून आकाशापर्यंत आणि
सागरतीरापासून हिमालयाच्या शिखरांपर्यंत हिंडवून आणतात.
घट्ट विरजलेलं पांढरंशुभ्र दही, समुद्रकिनार्यावरचा पांढराशुभ्र शंख, नवीन नवीन पडलेलं धूळ रहित अमल शुभ्र हिमं - -सगळ मनात आठवता आठवता त्यांच एक अतूट नातं मनात गुंफलं जातं. निर्सगरूप कल्याणकारी असलेला शंकर मनात विसावतो. तो आपलं अभद्र कसं बर करु शकेल? कल्याणकारी चंद्राचं स्मरण हे
कायम मनाला शांतविणारं असंच आहे. चंद्रासारखा सुंदर मोती अशीच सुंदर चद्राची आठवण करून देतो.
भोजराजाकडून सुवर्णमुद्रांची प्राप्ती व्हावी ह्या आशेने एका ब्राह्मणाने - ‘हे भोज राजा मला भात दे, मला वरण दे , मला तूप दे ' असा अर्धवट तीनच चरणांचा श्लोक रचला. चवथा चरण त्याला न जमल्याने तसाच अर्धवट श्लोक घेऊन तो कालिदासाकडे आला. आलेल्या ब्राह्मणाला कालिदासानी चवथा चरण सांगून श्लोक पूर्ण केला- ‘हे भोज राजा मला शरद-पौर्णिमेच्या चंद्रासारखं पांढरं शुभ्र दही दे ' हुशार भोज राजानेही अर्थात सर्व जाणून ब्राह्मणाला सुवर्णमुद्रा दिल्या पण फक्त चवथ्या चरणासाठी असे सांगून!
दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम्।
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुट भूषणम्।।2
दही शङ्ख हिमाजैसा। शुभ्र शीतल चंद्रमा
सागरातून ये जन्मा । मस्तकी शोभतो शिवा।।
सुखवी भूतमात्रांसी। जीववी औषधींस ही
नमस्कार असो माझा। चंद्रासी शुभलक्षणी।।2
भोजराजाकडून सुवर्णमुद्रांची प्राप्ती व्हावी ह्या आशेने एका ब्राह्मणाने - ‘हे भोज राजा मला भात दे, मला वरण दे , मला तूप दे ' असा अर्धवट तीनच चरणांचा श्लोक रचला. चवथा चरण त्याला न जमल्याने तसाच अर्धवट श्लोक घेऊन तो कालिदासाकडे आला. आलेल्या ब्राह्मणाला कालिदासानी चवथा चरण सांगून श्लोक पूर्ण केला- ‘हे भोज राजा मला शरद-पौर्णिमेच्या चंद्रासारखं पांढरं शुभ्र दही दे ' हुशार भोज राजानेही अर्थात सर्व जाणून ब्राह्मणाला सुवर्णमुद्रा दिल्या पण फक्त चवथ्या चरणासाठी असे सांगून!
------------------------------------------------------------
मंगळ पोवळे
आकाशात आपल्या लालसर रंगानी वेधून घेणारा मंगळ क्षणार्धात चमकून जाणार्या वीजेची आठवण करून देतो. भय भीती दूर करून महा पराक्रम करण्यास उद्युक्त करतो. शक्ति हेच त्याचं शस्र! आपल्यात असलेल्या पण
आपल्यालाच जाणीव नसलेल्या आपल्या क्षमतेची तो आपल्याला सतत जाणीव करून देतो. मंगळ हा वयानी कुमार आहे .पराक्रमाला वय
नाही. तुम्ही वयानी लहान आहात का म्हातारे ह्याचा तुमच्यातल्या दुर्दम्य इच्छाशक्तिशी काहीही संबंध नाही
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम्।।3
धरणीपुत्र तेजस्वी। चमके दामिनी जशी
शक्ति-शस्त्र धरे हाती । नमु त्या मंगळाप्रती।।3
मंगळ हा पुथ्वीचाच मुलगा म्हणजे तमाम पृथ्वीवासियांचा सख्खा भाऊ! आपलं आणि मंगळाचं केवढं जवळचं नात व्यास महर्षिंनी सांगितलं आहे! जन्मापासूनच आपल्यापासून दूर गेलेल्या भावाला शोधण्यासाठी आपण ही मरिनर, पाथफाईंडर अशी यान पाठवली आहेत. भारत तरी ह्यात कसा बरं मागे असेल? भारताचे यानही आज मंगळावर जाऊन पोहचले आहे. जो स्वतच मंगलमय आहे तो आपलं सर्वांचं कल्याणच करेल.
------------------------------------------------------------
सूर्याच्या सर्वात जवळ असलेला बुध हा सर्वात लहान ग्रह. बाकी ग्रहांसारखं त्याचं दर्शन सुलभ नाही. तो रोज रोज ही दिसत नाही. सूर्याचा हात धरून जाणारा हा पिटुकला ग्रह सूर्य येण्याची वर्दी देत किंवा सूर्य मावळल्यावर सूर्याला शोधत अल्पकाळ आकशात रेंगाळतांना दिसतो. बुध ग्रह बघण्यासाठी योग्य काळवेळाची वाट बघावी लागते. वर्षाकाठी कधीकाळी ह्या ग्रहाचं दर्शन झालं तर त्यात धन्यता मानावी लागते. छोटासा बुध दिसण्यासाठी एकाग्र चित्ताने आकाशाचं निरीक्षण ही आवश्यक असतं. एवढं करून मधे एखादा छोटासा ढग जरी आला तरी न कंटाळता पुढच्या वेळेची प्रतीक्षा करावी लागते. सहाजिकच बुधाला हात जोडण्यासाठी, त्याच्या पूजनासाठी प्रतीक्षा, सूक्ष्म अवलोकन, एकाग्रता काटेकोर वेळ सांभाळणे,श्रद्धा आणि सबुरी ह्याची जरुरी असते. विद्या आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी ही ह्याच गुणांची आवश्यकता असते. बुधाचे नियमीत दर्शन घेण्याने वरील सर्व गुण आपल्या अंगात सहज बाणविले जातात. आणि हेच गुण आपल्याला आपल्या उद्देश्याप्रत घेऊन जातात.
प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम्
सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ।।4
असे श्यामल तेजस्वी। प्रियंगुच्या कळी परी
रूपवान मनोवेधी। देखणा अप्रतीमची।।
सौम्य शांत असे भारी । गुणसंपन्न तोषवी
मृदु मृदुल सर्वांसी। बुध तो नमितोच मी।।4
ह्या बुधग्रहाचं पृथ्वीवरचं प्रतिबिंब शोधण्यासाठी ही रानावनात शोध घ्यायला लागतो नीलवर्णाच्या चिमुकल्या कळ्यांनी सुशोभित झालेल्या प्रियंगुच्या झाडाचा! बुध प्रियंगुच्या कळीसारखा सुंदर आहे. ही प्रियंगुची कळी पहायला तरी एक निसर्ग भ्रमण करायलाच पाहिजे. काही कारणास्तव शक्य नसेल तर
वाईटही वाटायला नको. नेटवर माहितीचा खजिनाच उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------
गुरूस्तुती

गुरूस्तुती
पुष्कराज
बावनकशी सुवर्णासारखा दिसणारा गुरु आकाशात सहज आपल लक्ष वेधून घेतो. गुरूचा अर्थच मोठा. सर्व ग्रहांमधे ह्याचं स्थानही वरचच! आकशात सोनेरी गुरु दिसला की त्याच्याविषयी अजुन जाणून घ्यावसं वाटतच. ज्ञानाचा खजिनाही ह्या गुरूसारखाच झळाळणारा आणि प्रचंड आहे हेच तो आपल्याला सांगत असतो का?
देवानां च ऋषीणां च गुं काञ्चनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।5
सुवर्ण वर्ण तेजस्वी । प्रज्ञाभास्कर एकची
देव आणि ऋषी यासी । गुरू मानून वंदिती।।
बुद्धिचा हा असे स्वामी । गुरूग्रह सुधामयी
त्रैलोक्याचा असे राणा । वंदितो मी बृहस्पती।।5
------------------------------------------------------------
शुक्रस्तुती
शुक्रस्तुती
हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्
सर्व-शास्त्र-प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्।।6
आपल्या तेजाने मनाला मोह पाडणारा उठावदार शुक्र, सूर्य उगवण्यापूर्वी सूर्य येण्याची वर्दी देतो. किंवा सूर्य मावळल्यावर ‘अंधारातही मी
एकटा असून माझ्या कतृत्वानी मी उज्ज्वलच आहे’ असं सांगत, जगाला अंधाराचाही मोह पाडतो. अंधारालाही त्याच्या लावण्यानी उठाव आणणार्या या ग्रहाचं वर्णन करतांना महर्षि म्हणतात-
अंगकांतीच शुक्राची। कुंदपुष्प हिमापरी
पराग जणु पद्माचा। ऐसा कोमल मानसी।।
दानवांचा गुरू ऐसी । कीर्ति ज्याचीच जाहली
शास्त्रवेत्त्याच शुक्रासी। आदरे नमितोच मी।।6
--------------------------------------------------------------------------
शनी स्तुती

शनी स्तुती
नीलम
सध्या शास्रज्ञांना सर्वात सुंदर वाटणारा ग्रह आहे शनी! त्याचा सुंदर नीळा रंग, त्याच्याभोवतालची चमकदार कडी त्याच्याविषयीचं गूढ आकर्षण अजुनच वाढवितात. पण प्रत्यक्षात मनातला शनी मात्र वेगळाच आहे. सूर्य आणि सावलीचा मुलगा आहे. उजेड आणि अंधार, ज्ञान आणि अज्ञान, कळतयं आणि कळत नाही अशा सम्भ्रमातून मनात उत्पन्न होणारी काळीकुट्ट काजळासारखी भीती हेच त्याच स्वरूप आहे. अर्धवट प्रकाशात दोरी सापासारखी भासून मनात निर्माण होणारं भय हे ह्या शनीचं रूप आहे. दोरीवर आभासित होणार्या सापाला हा
विषारी तो बिनविषारी अशी वर्गवारी नसते; पण
मनातल्या सम्भ्रमातून उत्पन्न होणारं हे भय मात्र सर्व मनालाच विषारी करतं. शनीला ' कोणस्थ ' म्हणतात. कोण म्हणजे कोपरा. 'स्थ' म्हणजे राहणारा. मनाच्या कोपऱयात राहणारा तो विशालाक्ष म्हणजे मोठ्या डोळ्याचा आणि ‘दीर्घ देह' म्हणजे विशालकाय आहे. मनाला वाटणारी भीती वाढत वाढत संपूर्ण मनाला व्यापून टाकते. तर जगाला माहीत नसलेली अनेक गुपितं आपल्या मनाच्या कोपऱयात आपलं मन कुरतडत आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आपल्याला दरडावीत बसलेली असतात. शनी हा यमाग्रज म्हणजे यमाचाही मोठा भाऊ आहे. यम म्हणजेच नियमानी वागणारा. आपल्या कृत्याकृत्याचा हिशोब ठेऊन योग्यवेळी आपल्याला जाब विचारणारा यम बरा असा हा त्याचा थोरला भाऊ सदसत् विवेकबुद्धिच्या रूपाने अपल्या मनात राहून आपल्या प्रत्येक दुष्कृत्यांचा, आळसाचा, अहंकाराचा जाब सतत आपल्याला विचारत राहतो. मनातल्या पापवासनांना धिक्कारत राहतो. मनुष्यप्राणी जन्माला आला की त्याच्या हाडांवर मांस आणि कातड्याप्रमाणे अहंकारही चिकटलेला असतो. तो दूर तर करता येत नाही पण त्याला यम आणि नियमांच्या बंधनात ठेऊन काही अंशी तरी ताब्यात ठेवता येते. शनीला मंदचार असही म्हणतात. ह्या मनातल्या शनीला किती जरी दूर सारायचा प्रयत्न केला तरी तो अजिबात लवकर हालत नाही. ‘जगसे कोई भाग ले प्राणी मनसे भाग ना पाय ' असा हा शनी! अथवा शनि ह्या शब्दाचा अर्थच मुळी हळु हळु चालणारा असा आहे. एखादि भीति मनाला हळु हळु नकळत पूर्ण व्यापते. आणि जातांनाही हळु हळुच दूर होते. असं म्हणतात शनीला उतारा हा मारुतीरायाच्या भक्तिचा असतो. म्हणजेच आपलं शारीरीक मानसीक बळ वाढविणं नियमानी वागणं हाच एक मनातील भीति घालविण्यासाठी उपाय आहे. आपला अहंकार हा ज्ञानाच्या मार्गातला मोठा अडसर आहे तो दूर केला की स्वच्छ सूर्य प्रकाशात दोरी नीट दिसून सर्पाभास नष्ट व्हावा त्याप्रमाणे ज्ञान आणि शारीरीक बलोपासनेनी मनातील भय दूर जाण्यास मदत होते. अवाजवी भीति, नैराश्य दूर होऊन आकाशस्थ सुंदर शनी आपल्याला योग्य मार्ग दाखवितो. सर्वात भयद पूर्वग्रहासाठी सर्वात सुंदर शनीग्रहाचाच उतारा हवा.
नीलाञ्जन-समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।7
काळाची काजळाऐसा। शनिग्रह असे भला
सूर्यपुत्र प्रभावी हा। । यमाचा बंधु थोरला
सावली आणि सूर्याचा । पुत्र चालेचि मंद हा
नमस्कार असो माझा। शनिसी त्या पुनःपुन्हा।।7
------------------------------------------------------------
राहूस्तुती

गोमेध
पृथ्वीचा कललेला आस हेच राहू केतूचं अखंड शरीर! उत्तर ध्रुव हे डोके म्हणजे राहू तर आसाचं दक्षिण टोक हे धड म्हणजे केतू ! चंद्र सूर्या ला लागणारी ग्रहणं ह्या पृथ्वीच्या ह्या कललेल्या आसामुळे घडून येतात. इतक्या विलोभनीय राहूकेतुला नमस्कार असो
अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम्
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्।।8
ग्रासीतो सूर्य चंद्रासी। अर्धकाया-स्वरूपची
गर्भातून जन्मा ये । सिंहिणीच्या महाबळी
दैत्यराजचि राहूसी। प्रणाम करितोच मी
------------------------------------------------------------
केतुस्तुती
पृथ्वीच्या उत्तर अथवा दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाशातून येणारे अनेक मॅग्नेटिक कण खेचून घेतले जातात. हे विद्युत्भारीत दिप्तीमान कण रंगीत झोतांसारखे आकाशभर रंगाचे फलकारे मारावे तसे दिसत राहतात. उत्तर ध्रुवावर त्याला अरोरा बोरॅलिस (arora borealis) म्हणतात तर दक्षिण ध्रुवावर त्याला अरोरा ऑस्ट्रलिस (arora australis) म्हणतात. विविध रंगांचे पसरलेले हे मनोवेधी फलकारे आणि दिव्याच्या ज्योती प्रमाणे दिसणारी पळसाची फुलं ह्यात किती साम्य आहे ना! फुलांनी फुललेलं पळसाचं झाड अरोरा बोरॅलिस किंवा अरोरा ऑस्ट्रलिस सारखं दिसत असेल का?
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम्।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ।।9
पळसाच्या फुलाजैसी। अंगकांतीच केतुची
ग्रह मस्तकरूपी हा। तारका शोभते शिरी
भीतीदायक केतु हा । दिसे रौद्र भयंकरी
नमस्कार असो माझा । केतुसी वरचेवरी।।9
राहू केतूचं साधर्म्य पळसाशी दाखवणार्या व्यासमुनींना त्रिवार मुजरा अगदि पळसाच्या तीन पानांसारखा! नेहमी आणि सर्वत्र! कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीनच असली तरी प्रत्येक पळसाचं सौदर्य मन आकर्षित करतं हेही खरचं! त्याचा भगवा केशरी चमकदार रंग उन्हाळ्यातील रखरखीत वनात सुद्धा आनंद देतो.पोपटाच्या चोचीसारखा त्या फुलाचा बाकदारपणा पृथ्वीच्या कललेल्या आसाप्रमाणेच वाटतो नाही का?
त्याच्यावरच्या चिवचिवाट करणार्या
गुलाबी पळसमैनांमुळे हे झाडच अखंड बोलत आहे असं वाटायला लागत. हे बोलणारं झाडं आपल्याला सुखावून जाईल.
------------------------------------------------------------------------
इति व्यासमुखोद्गीतं य पठेत् सुसमाहितः ।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति।।10
गाईले स्तोत्र व्यासांनी । म्हणे जो हात जोडुनी
दिवसा अथवा रात्री । संकटे ना तयावरी।।10
नरनारीनृपाणां च भवेद्दुःस्वप्ननाशनम्
ऐश्वर्यमतुलं तेषामारोग्यं पुष्टिवर्धनम्।।11
नर नारी नृपांच्या या । क्लेशकारी भयकरी
दुःखदायीच स्वप्नांचा । नाश होतोचि सत्वरी
ऐश्वर्य लाभते मोठे। आरोग्य मनुजासही
तुष्टि,पुष्टि मनोशक्ति। लाभते सर्व सर्व ही।।11
ग्रहनक्षत्रजाः पीडास्तकराग्निसमुद्भवाः
ताः सर्वाः प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशयः।।12
ग्रह नक्षत्र अग्नि चे । चोरांचे भय त्या नसे
महर्षि व्यास हे सांगे । तेथे संशय ना धरे।।12
इति व्यास-विरचितं नवग्रह-स्तोत्रं सम्पूर्णम्
असे महर्षी व्यासांचे । स्तोत्र संपूर्ण जाहले
एवढ्या सुंदर निसर्गभ्रमणानंतर वाईट स्वप्न पडतीलच कशी? अनुभवांची ही
समृद्ध शिदोरी त्याला जन्मभर आनंदच देत राहील आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू आसतो. आपल्या मनातील सर्व किंतु दूर होऊन आपणच आपले चांगले मित्र झालो की दैवही अनुकूल होते. हे दैव म्हणजे तरी काय?
गीतेच्या आठराव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकाचे निरूपण करतांना ज्ञानदेव ‘दैवं चैवात्र पञ्चमम्'चा अर्थ सुरेख रीतिने विषद करून सांगतात.
वाणीस शोभे कवित्व । कवित्वा खुलवी रसिकत्व
रसिकत्वाचे वाढे महत्त्व । परतत्वाच्या स्पर्शे जसे
तैसे मनादिंच्या सर्व शक्ति । त्यांच्या ऐश्वर्यात शोभे मति
आणि बुद्धिला झाली प्राप्ति । इंद्रियांच्या सामर्थ्याचि
मग इंद्रियाच्या सामर्थ्यासी । शृंगार चढविती विशेषीं
देवता, ज्या इंद्रियांपाशी । अधिष्ठानाने राहती
म्हणून चक्षुरादि दहा । इंद्रियांचा गण जो पहा
त्यावर करिती अनुग्रहा । सूर्यादि देवसमुदाय
देवांचा तो समुदाय । हाच पाचवे कारण होय
दैव म्हणुन केला जाय । ज्याचा उल्लेख अर्जुना।।
(श्री.वरदानंदभारती यांच्या अनुवाद ज्ञानेश्वरीतून)
आपली पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये अहंकार रहित बुद्धिने यम नियम पाळून जेंव्हा अति कुशलतेने काम करतात तेंव्हा सर्व सूर्य चंद्रादि देव समुदाय ग्रहमालेतील सर्व ग्रह ही त्याच्या सर्व इंद्रियांवर आपला अनुग्रह करतात आणि त्याचे काम विशेष रीतिने उत्तमप्रकारे पूर्ण करतात. ह्यालाच दैव म्हणतात. अशाप्रकारे ज्याला दैव अनुकूल त्याला ग्रहपीडा ती कोणती?
ॐ श्रीः स्वस्ति।
--------------------------------------------
विजयनाम संवत्सर, चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, 25 एप्रिल 2013
अतिशय सुंदर लेख....! खूप आवडला.
ReplyDelete