।। कालभैरवाष्टकम् ।।


Image result for free download images of lord kalbhairav


वृत्तचामरअक्षरे- 15, गण     )

 

देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं

व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् 

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।1 

 

देवराज इंद्र नम्र होउनीच वंदितो

पाउलेच कालभैरवाचि नित्य सेवितो

नागराज शोभतो जनेयुच्या समान तो

मस्तकी मनोज्ञ हा मृगांक मंद तेवतो।।1.1

( मृगांक - चंद्र )

भक्तवत्सलू असे कृपाळु देव काशिचा

नारदासवे मुनीहि लीन रे पदी तुझ्या

शोभती दिशा दहा महान वस्त्र हे तुला

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।1.2


भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं

नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् 

कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।2


कोटि कोटि सूर्य हे प्रकाशती जणू नभी

तेज हे तसे तुझे सुनील अंगकांति ही

तारुनी भवाब्धितून नेसी तूच लीलया

इच्छिलेच जे मनात देसि तेच तू जना।।2.1

 

सूर्यचंद्रअग्नि हे तुझेचि नेत्र भैरवा

भासती प्रफुल्ल पंकजासमान कोमला

तूच मृत्युचाचि काळब्रह्मरूप  अक्षरा

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।2.2


शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् 

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।3

टंक – परशु )

पाशअंकुशासवे त्रिशूळदंडटंक हा

आयुधे धरून हाति सज्ज तू सदाकदा

नीलवर्ण नीलकंठ आदितत्त्व तूच हा

तू अनादि  तू अनंत नित्य निर्विकार हा।।3.1


शौर्य हे तुझे अतुल्यअद्वितीय वीर तू

सर्वशक्तिमान तू,समर्थ तू असे प्रभु

तांडवादि नृत्य आवडे विशेष रे तुला

काशिराज कालभैरवा प्रणाम हा तुला।।3.2


भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं

भक्तवत्सलं स्थिरं समस्तलोकविग्रहम्।

निक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।4

प्रशस्त – प्रशंसनीयस्तुत्य, विग्रह – शरीर )

सेवका सुखोपभोग देतसे अलोट तू

मोक्ष मुक्तिची विराट भेट देतसेचि तू

देह हा प्रमाणबद्ध शोभतोचि सुंदरा

ह्या शरीरसौष्ठवापुढे फिके जगत् पहा।।4.1

 

ओढ भक्तप्रीतिची तुलाचि भक्तवत्सला

दीनबंधु काशिराज ख्याति ही तुझी सदा

सुस्थिरा मती तुझीच ब्रह्मरूप सर्वदा

अल्पही विकल्प मानसी नसे तुझ्या कदा।।4.2


विश्व हे विशाल सर्व,देहची तुझा भला

केसरीसमा कटीवरी सुवर्णमेखला

वाजते रुणूझुणू मनोज्ञ नाद मंगला

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।4.3

 

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं

कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् 

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।5

(तिसर्‍या चरणात शेषपाश अथवा केशपाश असे पाठभेद आहेत.ते दोन्ही अर्थ घेतले आहेत.)

सेतु – निश्चित नियम विधी , शर्म - प्रसन्नताआनंदखुशी,आर्शीवाद,आधार, विभु – आत्मसंयमी,सर्वव्यापीयोग्य,सर्वशक्तिमान,राजा )

रक्षितो सुधर्म सर्व बंधनेच पाळुनी

ध्वस्तनष्ट हा करी अधर्ममार्ग सर्वही

कर्मबंधनातुनीच सेवकांस सोडवी

सौख्य देउनी समस्त भक्तवृंद तोषवी।।5.1

 

आत्मसंयमी  असेचि सर्वव्यापि योग्य हा

नागपाश कांचनी झळाळतीच अंगी या

केश हे तुझे सुवर्णवर्ण कालभैरवा

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।5.2


रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं

नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम्

मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।6

निरंजन - लोभ,मोह,शोक,क्रोध,हाव,मृत्युच्या भयापासून मुक्त )

दिव्य रत्न पादुका झळाळती पदी तुझ्या

 पाउले नितांत रम्य नाहती प्रभेत त्या

लोभ,मोह,शोक,क्रोध,हाव,मृत्युच्या भया-

-पासुनी असेचि मुक्त देव हा निरंजना।।6.1

 

एकमेव अद्वितीय इष्ट देव  हा भला

मृत्युचाहि दर्प चूर चूर हा करी पहा

मृत्युचा भयाण उग्र पाश तोडितो महा

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।6.2


अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं

दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम्।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।7

सन्तति – प्रसारविस्तार )

मेघगर्जनेसमान हास्य भैरवा तुझे

भेदुनी अनेक विश्व आरपार जातसे

कर्म जो जसे करी फळे तशीच दे तया

न्याय हा तुझा कठोर धाक घालितो मना।।7.1

 

दृष्टिचा तुझ्याच खेळपाप जातसे लया

अष्टसिद्धि या उभ्या पुढेचि जोडुनी करा

रुंडमाळ ही रुळे गळ्यात भैरवा तुझ्या

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।7.2


भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं

काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं

काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ।।8

विभुम् – शक्तिशाली,ताकदवान,प्रमुख,योग्य,धीरजितेंद्रिय,आत्मसंयमी,सर्वव्यापक,कालआत्मा,स्वामी,शासक,प्रभु,राजा )

सर्व भूतसृष्टिच्या महान नायकाच तू

सेवका दिगंत कीर्ति निष्कलंक देसि तू

तीक्ष्ण दृष्टि राहते तुझीच काशिच्यावरी

पाप-पुण्य पाहुनी जना फळेच दे तशी।।8.1

 

आत्मसंयमी असेचि धीरशक्तिमान तू

सर्वव्यापि,काळ तूसमर्थ एक तू प्रभू

राजनीतिजाणकारतू जगत्पती महा

काशिच्याच ईश्वरा प्रणाम कालभैरवा।।8.2


कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं

ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम्।

शोकमोहलोभदैन्यकोपतापनाशनं

ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसंनिधिं ध्रुवम् ।।9

विचित्र – नानाविध,आश्चर्ययुक्त,सुंदर,मनोहर ; पुण्यम् – सद्गुण, नैतिक गुणशुभकल्याणकारी ) 

गोड गोड स्तोत्र ‘कालभैरवाष्टकं’ अहा

ज्ञान मुक्तिचाचि राजमार्ग खास हा पहा

सद्गुणांस वाढवी पवित्र शुद्धनिर्मला

शोकमोह घालवी लोभ स्पर्शु  दे मना।।9.1

 

क्रोध तो महान शत्रुदेइ त्रास ना कदा

दैन्यही पळेचि दूर,ताप कोठला मना?

जो म्हणेचि स्तोत्र हे विशुद्ध भाव ठेउनी

प्राप्त होइ स्थान त्यास कालभैरवापदी।।9.2


कालभैरवाष्टकास आणिते अरुंधती  

भारदस्त त्या मराठमोळिया वचेमधी

भावभक्तिच्या रसात  चिंब जाहलेच जे

स्तोत्र अर्पिते सुयोग्य वाचकांस मी इथे ।।


Image result for free download images of lord kalbhairav
------------------------------------------


खरनाम संवत्सर,कार्तिक कृष्ण सप्तमी (कालाष्टमी,-कालभैरव जयंती.)
18 नोव्हे. 2011.



 



शिव महा पुराणाच्या आधारे असे संगतात क,


भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी

काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते.



दुसरी एक कथा अशी सांगतात की,

                       देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथेच प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच.

 ।। कालभैरवाष्टकम् ।।

          आई कधी प्रेमळही नसते किंवा रागीटही नसते. आपल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून ती त्याला प्रेमाने समजावत असते. तेच लेकरू भलतेसलते उपद्व्याप करायला लागलं तर ती त्याच्यावर  कधी डोळे वटारते तर कधी त्याच्या पाठीत एक धपाटा घालते वा अपराध मोठा असेल तर बदडूनही काढते.

        सर्व जगताचा पिता विश्वेश्वर शिव आईसारखाच आपल्या सर्व प्रजेचं कल्याण इच्छिणारा असल्याने नेहमीचं शांत, सौम्य रूप सोडून अनेकवेळा त्याला आपल्या प्रजेच्या भल्यासाठी रौद्रावतारही धारण करावा लागतो.

         मोठी झालेली समंजस मुलं  जर भांडु लागली किंवा खोटारडेपणा करू लागली तर पालकांच्या रागाला पारावार राहात नाही.

          असच शिवाचंही झालं एकदा. शिवानेच निर्माण केलेले विष्णू आणि ब्रह्मदेव दोघांपैकी कोण श्रेष्ठ म्हणून भांडायला लागले. हमरीतुमरीवर आले. अनेक देवांनी ऋषींनी त्यांना समजाऊन पाहिलं. वेदाचा आधार देऊन तुमच्या दोघांपेक्षा शिव श्रेष्ठ आहे हेही सांगून पाहिलं. पण त्यांचं समाधान होण्याऐवजी दोघेही अजूनच संतापले. ``उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।‘’ म्हणजे मूर्ख लोक सज्जनांनी केलेल्या उपदेशाने शांत होण्याऐवजी आगीत तेल पडल्यासारखे अजूनच भडकतात. तसचं काहीसं झालं. त्यांना शांत करण्यासाठी आणि खरं सत्य उमगण्यासाठी शेवटी शिवानेच एक उपाय केला. त्याने ब्रह्मदेवाला सांगितलं तू माझ्या मुकुटाला हात लावून ये. तर विष्णूला सांगितलं, तू माझ्या पायांना पाहून ये. अनेक ब्रह्मांडांना आपल्यात सहज सामावून घेणार्‍या शिवाच्या विशालपणाची कल्पना दोघांना यावी आपण ह्या शिवमय अथांग समुद्राची जणु एक लाट आहोत हे त्यांना उमगावं त्यानेच त्यांचं भांडण शमेल असं  शिवाला वाटलं. विष्णू पाताळात कितीही खोल गेला तरी शिवचरणांचं दर्शन होईना. त्याला आपली चूक उमगली. शिवाच्या विशालपणाची चुणुक त्याला दिसली. कोण श्रेष्ठ हे वेगळं उत्तर त्याला कोणी सांगावं लागलं नाही. अहंकार जाऊन शिवचरणी नम्र झालेला विष्णू परत आला आणि त्याने शिवापुढे लोटांगण घातले आणि इतकावेळ न दिसलेले कल्याणकारी शिवचरण त्याला दिसले.

               मनात मखलाशी असेल तर मात्र माणूस आडमार्ग घेतो आणि त्यातच फसत जातो. ब्रह्मदेवाने कितीही ब्रह्मांड पार करूनही आपल्याला शिवाच्या मस्तकाचं दर्शन होत नाहिऐ हे लक्षात आल्यावर स्वर्गातल्या कामधेनूला आणि नंदनवनातील केवड्याला फितवलं. ``तुम्ही साक्षीदार म्हणून माझ्यासोबत या आणि मी शिवाच्या मुकुटाला हात लावला म्हणून सांगा तुम्हाला काहीही अपाय होणार नाही असं मी अभय देतो.’’ असं सांगितलं. प्रत्यक्ष आपला पिताच असं वागायला सांगत आहे म्हटल्यावर नाईलाजाने दोघे त्याच्यासोबत आले. शिवाला बढाई मारत ब्रह्मदेवाने शिवाच्या मुकुटाला हात लावून आल्याचं रसभरित वर्णन सांगितलं. कामधेनूने आणि केवड्याने दुजोरा दिला. ब्रह्मदेवाच्या खोटारडेपणाने शिवाच्या क्रोधाचा जणू उद्रेक झालाकामधेनूला त्याने शाप दिला तू ज्या मुखाने खोटं बोललीस ते तुझं मुखं कायम अपवित्र राहिलं. (गाय कुठेही चरत असते) तिने क्षमा मागितली. तेंव्हा तिला वरदान मिळालं की गायीचं शेणं आणि गोमुत्र अत्यंत पवित्र असेल. मित्रांनो, ऐका गोष्टीतून अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपल्याकडे सहज ज्ञान दिलं गेलं आहे. कारण शेतात पाळलेल्या दोन  गायी म्हातार्‍या झाल्या म्हणून भाकड ठरत नाहीत कारण त्यांच्या शेणापासून आणि गोमुत्रापासून उत्तम खत तयार होत. गोबरगॅसही होतो. आजही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही वाईच्या गाईच्या गोमुत्र फवारणीने रसरशीत येते हे पाहिल्यावर शिवाने गायींना दिलेला उःशाप नसून मानवाला दिलेलं वरदान गोष्टीरूपातून आपल्यापर्यंत किती पुरातन कलापासून पोचवलं गेलं ह्याचं मला कौतुक वाटतं. असो. केवड्याला मात्र शिवाच्या माथ्यावर जागा मिळणार नाही व त्याला काटे येतील असा शाप मिळाला.

            आता ब्रह्मदेवाची पाळी होती. संतापलेल्या शिवाने स्वतःमधून  अत्यंत उग्र भीतीदायक अशा काळभैरवाची निर्मिती केलीम्हटलं तर हा शिवाचा पुत्र, शिवाचा अंश किंवा क्रोधाने काळानिळा झालेला शिवच म्हटलं तरी चालेल. आई रागावली की तिचा अवतार वेगळाच दिसतो. समोर असलेलं पोर घाबरून रडायला लागतं. तसा हा काळभैरव ब्रह्मदेवाच्या खोटारडेपणावर संतापला. मोठ्या पदावर बसलेल्या माणसाने जाणीवपूर्वक केलेली चूक खालच्या लोकांना वाईट आदर्श घालून देते. श्रेष्ठ लोक वागतील तसचं त्यांच्या हाताखालचे वागतात. त्यामुळे पूर्वी आपल्या न्यायव्यवस्थेत  अधिकारपदावरच्या व्यक्तीने जाणूनबुजून केलेल्या चुकीला फार मोठी शिक्षा दिली आहे.  काळभैरवाने नुसत्या नखाने नागवेलीच्या पानाची शिर काढून टाकावी त्याप्रमाणे  ब्रह्मदेवाचं एक शिर नखलून टाकलं. ब्रह्मदेवाला पाच मस्तकं होती म्हणजे तो इतरांपेक्षा पाचपट बुद्धिमान होता इतकाच अर्थ. एक शिर कापून त्याची बुद्धिमत्ता कमी केली म्हणजेच त्याचा मी फार हुशार आहे हा अहंकार कमी केलामुलाला शिक्षा दिली तर आईला आनंद थोडाच होतो? तीही पदराने आपले डोळे सारखे पुसत राहते. तसचं ब्रहमदेवाचं एक शिर हातात घेऊन उभ्या असलेल्या कालभैरवाला अपराधीपणाच्या भावनेने ग्रासलं. शेवटी शिवाने त्याला सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यास सांगितलं. जेथे तुझ्या हातून हे शिर गळून पडेल तेथे तुझा अपराध पूर्ण धुतला गेला असं समज. असंही सांगितलं. अनेक वर्ष तीर्थयात्रा करत कालभैरव काशीला आला आणि तेथेच त्याच्या हातातील ब्रह्मदेवाचं शिर गळून पडलं. थोडक्यात स्वतःच्या अपराधीपणाची भावना तेथे गळून पडली. काश् ह्या क्रियापदाचा अर्थ आहे चमकणे. विद्वानांच्या ज्ञानाने चमकणार्‍या काशीत काळभैरवाने कायमचं वास्तव्य केलं.

          ----------------------------------

1 comment:

  1. नमस्कार,

    ह्या ब्लॉगवरील सर्व भावानुवाद हे अरुंधती दीक्षित म्हणजे मीच केलेले आाहेत. ही वरील प्राकृत रचना माझीच आाहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete