पुराणिकबुवा , काळा डाकू आणि हरी

 

पुराणिकबुवा , काळा डाकू आणि हरी


1

एक पुराणिक खुलवुन खुलवुन सांगे कृष्णपुराण

सायंकाळी रोज राऊळी बहु कथा रंगवून

2

ऐकत असता श्रोते जाती विसरुन घरचे भान

इतुके जाती सारे त्याच्या कथेत रंगून

3

  झरझर झरझर प्रसंग सरती नयनांपुढती सर्व

अनुभवती ते श्रोते सारे   प्रत्यक्ष कृष्णपर्व

4

कीर्ती त्याची झाली मोठी कितीक गावोगाव

गावचि लोटे   बहु संख्येने ऐकण्या कृष्णभाव

 

---------------------------


5

एके दिवशी वेश बदलुनी आला डाकू एक

 काळा डाकू। नाम तयाचे।  दहशत त्याची खास

6

धनाढ्य व्यक्ती हेरण्यास हे  राउळ आहे छान

म्हातार्याच्या   रुपात बसला खांबासी टेकून

7

कथेत नाही लक्ष तयाचे  जाणून  पुराणीक

बोले बाबा लक्ष देऊनी तू कथा नीट ऐक

8

ऐक आजची सुरस असे ही । बघ कथा कृष्णचोर

जगतामध्ये नाही झाला त्याहुन मोठा चोर

9

चोर दचकला म्हणे बुवाला कसे कळे मी चोर

 नसेचि कोणी नवखा डाकू चोरावर मी मोर

10

गोष्ट असे का श्रोत्यांसाठी करण्यास सावधान

चोर बैसला इथेच जवळी मजला उद्देशून

 11

शब्द शब्दची ऐकु लागला  तो मनी सावधान

आणि गुंतला कृष्ण कथेतचि विसरुन त्याचे भान

12

बुवा सांगती कृष्ण जातसे गायी घेऊन रोज

सवंगड्याच्या सोबत जेंव्हा फटफटेचि पूर्वेस

13

ऐकू येतो रानी तेंव्हा   तो घंटांचा नाद

गायींच्या ज्या गळ्यात हलती चालतांनाचि मंद

14

ऐकू येते मंद बासुरी सूर मधुर ते खास

भारुन जाते रान तयाने रानाचा तो श्वास

15

दिसू लागतो प्रकाश रानी छटा नभाच्या त्यात

बलरामाला संगे घेऊन ये कृष्णचंद्र रोज

16

बालगुराखी त्याच्या संगे पेंद्या दिमतीस

रत्नमुकुट शिरि मोहनाचिया त्यात मोरपीस

17

कानी कुंडल रत्नमण्यांचे शोभा त्यांची फार

माणिक मोती पाचु पोवळे  वैडुर्याचे हार

18

 वर्णन करिता दागदागिने हो चोर सावधान

खूणगाठ तो मनात बांधे एक पुरे धनवान

19

एक कृष्ण हा बराचि सावज नको अन्य सामान्य

सर ह्याची का कुणास येइल हा दिसे असामान्य!

20

 काय बोलती बुवा तयावर ह्याचे बारिक लक्ष

कृष्ण कथा एकाग्र चित्त तो ऐके होऊन दक्ष

21

बुवा सांगती वर्णन पुढती ऐकणे श्रोतेजन

चोरहि बसला कृष्णकथा ती। ऐकण्या सरसावुन

22

 बुवा सांगती त्रैलोक्याचा   धनी श्रीपती जाण

शरण तयाला   येता देतो जे हवे तेचि दान

23

काळे कुरळे केसचि मोहक त्या भाळी रुळतात

गळ्यात कंठा मधेचि कौस्तुभ  ते अमूल्यची रत्न

24

 अमोघ कौस्तुभ आला कैसा समुद्रमंथनातुन

गोष्ट तयाची बुवा सांगती श्रोत्यांसी खुलवून

25

कुणी म्हणे हा कालीयाच्या शिरी मणी अनमोल

कालीयाला धडा शिकवण्या कृष्ण घेइ काढून

26

एकचित्त तो डाकू ऐके कौस्तुभ पुराण थोर

मनी म्हणे तो  हंऽऽऽम्!!

बराच दिसतो ऽऽ!  उपद्व्यापि की! हा पोर कृष्ण चोर

27

जरी मिळाला । कौस्तुभ मजला । चिंता मजला काय

एक मणी तो । विकून मिळविन धन-धान्याची रास

28

प्रवचन झाले लोक पांगले उरले बुवा नि चोर

धान्यधुन्य अन पैसे सारे गोळा करे पुराणीक 

29

खांद्यावर तो कुर्हाड ठेऊन सरसावलाचि चोर

दरडावुन त्या पुराणिकासी तो वदे याद राख!

30

 म्हणती मजला काळा डाकू मी माहित सर्वांस

सांगितली जी गोष्ट आजची । खरी असे का सांग!

31

सर्वांगासी घामचि फुटला शब्द फुटेना एक

घाबरून तो थिजून गेला जागीच पुराणीक

32

 हो हो आहे खरीच सारी तो वदे घाबरून

रोज जातसे कृष्ण सावळा ह्याची रानातून

33

कसेबसे त्या लावी वाटे पळ काढे तेथून

जीवावरचे संकट टळले गाव जाय सोडून

34

चोर रात्रभर विचार करि त्या ।  कृष्णाचाची एक

कृष्ण कंठिचा कौस्तुभ त्याला घेऊ दे ना झोप

35

मिटले डोळे तरी दिसे त्या कृष्ण सावळा तोच

चारायासी गुरे चालला तो दाट वनातून

36

उद्याच जाइन काढुन घेइन ते रत्नचि अनमोल

जगजेठी तो देतो म्हणती त्या जो जे मागेल

37

असे तसाही पोर शेंबडा माझ्यापुढती तोच

दरडावुन मी जरा बोलता होईल ना हिम्मत

38

विचारात त्या चोर पोचला रानाच्या सीमेस

रानवाट ती दिसता त्यासी हरखुन गेला खास

39

जसे वर्णिले बोवांनी त्या तसेच होते सारे

रानवाटही तशीच होती   कथानुसारी सारे

--------------------------------------------

40

तो दिवस जरा ये । मावळतीला तोच

तो चोर चढोनी । तरुवर बैसे उंच

असशील चोर तू । गोकुळिचा त्या चांग

तू ओळखिले ना । मजसी पूर्ण अजून ।।

41

ग्रामीण गौळणी । होत्या भोळ्या सांब

फसविले म्हणोनी । तूची हातोहात

 परि आहे आता । माझ्याशी तव गाठ

मी अस्सल डाकू । डाव तुझे मज पाठ

42

तो दिनकर घेई । किरणे हळुच मिटून

रानात सावल्या । हलति लांब होउन

माघार घेतसे । प्रकाश रानातून

त्या तमात जाती । रानवाटा बुडून

44

ती रात्र काजळी  होती  भयद अपार

ती रातकिड्यांची अविरत की किरकीर

गर्जती श्वापदे हिंस्र रानटी क्रूर

झाडीत सळसळे क्षणक्षण नवा थरार

45

परि चोर होईना कशानेहि विचलीत

तो कृष्ण सावळा होता मन व्यापून

त्या आस लागली कौस्तुभ कौस्तुभ एक

फसवीन सहज मी अट्टल चोरचि एक

----------------------------------------

46


एकचित्त तो वाटेवरती डोळे लावुन बसला

आणि अचानक चैतन्याचा प्रवेश रानी झाला

47

प्राचीवरती रंग उषेचे उमटु लागले काही

धूळ खुरांची उधळत होती क्षितिजावरती पाही

48

तोच नाद ये कानावरती किण किण घंटांचाची

माना हलवित येतांना त्या दिसू लागल्या गायी

49

मंद पसरला प्रकाश निळसर अज्ञात गूढ रानी

वेणूचा तो मंजुळ स्वरही घुमू लागला कानी

50

जागे झाले । रानचि सारे डुलू लागले मोदे

प्रसन्न मुद्रा आला कान्हा रान हसे ते बोधे  

51

असामान्य ते वैभव हरिचे निरखु लागला तोची

अमोघ रत्ने ऐशी त्याने कधी पाहिली नव्हती

 

हरी मुखावर रत्नांची त्या प्रभा पसरली सारी

कौस्तुभ मणि तो त्याची शोभा सर्वांहुनही न्यारी

52

जसा जसाची येऊ लागला जवळी तो वनमाळी

सावरून तो बसला डाकू लुबाडण्या कृष्णासी

53

झाडाखाली येता मोहन उडी मारुनी पुढती

कृष्ण पुढ्यातचि सहज उतरला तो डाकू शिताफीनी

54

काठी धरुनी मार्गी अडवी कुर्हाड खांद्यावरती

गोपाळासी अडवुन बोले डाकू दरडावोनी

55

तूच फसविले गोपींसी त्या परि ना फसणारा मी

यशोदेसही सहज फसविले सोम्या गोम्या ना मी

 

राधेलाही लावुन नादी पार बनविले तूची

 ओळखून मी आहे सारे मी ना भोळा कोणी

56

कटाक्ष तिरपा टाकुन त्यावर  तो हसला वनमाळी

मधाळ काही बोलु लागला चोरासंगे बोली

57

काम करे जे । सुईच सहजी तलवार करे कैसी

करुन बोलणी साध्य होतसे तेची कुर्हाड नाशी

58

करुन बोलणी आपापसात जरि साध्य होय हेतू

कशास त्यासी शस्त्र परजणे करणे मी तू मी तू

59

तूची आहे डाकू काळा माहित मजला सारे

बुवा पुराणिक मला भेटले त्यानेच मज धाडिले

60

तुझा नि माझा एकचि आहे व्यवसायचि चोरीचा

पैसा अडका चोरी तूची मी चोरी सर्वस्वा

61

बुवा बोलले तुला पाहिजे कौस्तुभ मणि हा माझा

क्षुल्लक इतुक्यासाठी तू का मजवर घाली डाका

62

समानधर्मी आपण दोघे कामचि अपुले चोरी

वाटुन घेऊ अर्धे अर्धे तू घे मागुन आधी

63

चोर म्हणे दे कौस्तुभ मजला करू नकोस चलाखी

काळा डाकू म्हणती मजला तव शब्द तूच राखी

64

हसुन हरीने स्वये काढुनी कौस्तुभ कंठातुनी

स्वये घातिला   कौस्तुभ कंठी  चोरासचि प्रेमानी

65

विस्फारुनिया नेत्र बघे तो अमोघ कौस्तुभ रत्ना

म्हणे निमाली पोटाची ती जन्माची मम चिंता

66

येता येता आठवला त्या बुवा पुराणिक तेंव्हा

आनंदाने त्यास सांगण्या गावातचि तो आला

67

 

परी पुराणिक बोवा त्याला दिसला नाही कोठे

सांगुन गेला बुवा जनांसी चोराविषयी मोठे

68

``भेटायाचे असेच मजला ह्याच क्षणी बोवासी

पत्ता त्याचा दिधला ना तर बघीन एकेकासी ''

69

डाकूचे त्या भय वाटोनी पत्ता त्यासी देती

 गावकरी ते   अति कष्टाने कोठे बुवा राहती

70

उत्साहाने चोर पोचला त्या पुराणिकाच्या घरी

त्याला पाहून थर थर कापे तो बुवा गवतापरी

71

लक्ष तिकडे परि चोराचे तो मग्न स्वतःत असे

उत्साहाने बोलु लागला पुराणिकासी असे

 

-----------------------------------------------------

72


तू जसेचि वदला । तसेचि घडले रानी

तू सांगितल्या त्या खुणाहि पानोपानी

झाडावर बसलो रात्रीच्या मी वेळी

 रात्र संपता तो आला हो वनमाळी

73

मी झाडावरुनी । उडी मारली खाली

 मम पुढ्यात होता । हसत उभा वनमाळी

तू जसे वर्णिले । तसेच होते सारे

मज पाठचि होता । दिनक्रम हरिचा ना रे

74

तो किशोर होता । वेणु वाजवित त्याची

ते सूरचि गहिरे । रानाला जागविती

क्रूर सिंह अन् । वाघही त्याच्या पाठी

 जणु सखे तयाचे । मित्र असे वावरती

75

ते खट्याळ डोळे । रोखुन माझ्यावरती

मज सहज म्हणाला, । स्मित वदन तो श्रीपती

मज माहित आहे । बुवा पुराणिक नामी

पाठविले त्याने । तुजला येथे रानी

76

तुज काय पाहिजे । तेही मजला ठावे

 मम कंठीचा हा । कौस्तुभ तुजला मोहे

तू असशी डाकू व्यवसाय अपुले एक

धन हरितोसी तू  मी हरितोचि सर्वस्व

77

मग तेढ कशाला समान वृत्ती अपुली

तू सखाच माझा आपण समानधर्मी

मज दिधला काढुन कौस्तुभ त्याने सहजी

आहेच दरारा रानी माझा ह्याची

78

तो बुवा पुराणिक । पाहे आश्चर्याने

चोरासी निरखे । बहुत अविश्वासाने

काढून दाखवी । कौस्तुभ मणि तो त्याते

तो डोळे चोळुन । चोळुन बघतचि राहे

79

दचकला बुवा तो । घाले गळ चोरासी

मज दाखव हरि तू । कुठे भेटला त्यासी

हसुनिया वदे तो । चोर- ``पुराणिक बोवा

तूच दिलेला तो । पत्ता तुज ना ठावा?

80

चल सायंकाळी माझ्यासंगे बोवा

मग माग हरीसी  हवे असे ते तुजला

तो दोस्त असे मम विश्वासू अन् चांगला

दोघेही करतो एकचि व्यवसायाला

81

दोघेचि निघाले रानात सांजवेळी

झाडावर त्याची चढुन बैसले राती

घाबरून जाई बुवा पुराणिक भलता

ती सिंह गर्जना ऐकून पारचि भ्याला

82

थरथराट त्याचा क्षणोक्षणी तो होई

 परि चोर म्हणे तो वाट जराशी पाही

येईल कृष्ण तो बघ इतुक्यातचि रानी

येईल जाग ह्या रानास मंगलमयी

83

मग चोर वदे तो  हरपुनीच देहभान

हरि आऽऽला! आऽऽला! । घुमले कानी पैंजण!

ऐकतोस ना तू बुवा कान देओनी

तो बुवा गोंधळुन अंधारातच पाही

---------------------------------------

84


ते घंटांचे ध्वनि मंजुळ पडती कानी

बघ आल्याच तांबु, कपिला, ढवळ्या गायी

ऐकतोस ना तू सूर बासरीचे ते

जे मुग्धचि करिती रान तयावर डुलते

85

तो तल्लिन होऊन चोर वदे त्या फिरुनी

असा कसा रे बुवा धांदरट तूची

एकाग्रपणाने  ऐक हरीचा पावा

मग कळेल तुजला मार्ग कोणता हरिचा

 

86

बासरी नसे ती ना सूर बासरीचे

तो कृष्ण फुंकितो । प्राण सर्व सृष्टीते

तो प्रकाश निळसर । दिसू लागला पाहे

आलाच सावळा । स्मित मंद तयाचे मोहे

87

बलराम गौर तो । बाकी सखे सभोती

बघ पेंद्या हरिच्या । आहे उजव्या हाती

 अंगावर धाबळ । हाती काठी त्याच्या

गोपाळ चालले । करीत नाना गमत्या

88

त्या कुरळ्या अवखळ । केसांच्या लडि पाही

बघण्यास हरीमुख । पुन्हा पुन्हा ये पुढती

ते मृदुल केस, त्या । बांधून रत्नमालेने

खोविले तयातचि मोरपीस कृष्णाने

89

कानात तयाच्या । रत्नकुंडले लक्षी

गालावर त्याची पसरे प्रकाश-नक्षी

भाळावर त्याच्या तिलक केशरी शोभे

हरि-गळ्यात कंठा रत्नांचा तो शोभे

90

तो हसुन सख्यांवर कटाक्ष तिरपा टाके

नजरेत विरघळे विश्वचि त्याच्या सारे

अडकला जीव मम खळीत गालीच्या रे

बघ रूप हरीचे कैसे मनास मोहे

91

रेशमी पितांबर काठ जरिचे त्यासी

ते रूप वर्णिता शब्दहि ना सापडती

तो जरिबुट्याचा  शेला सुंदर पाही

  हातातचि वेणू हरिहृदय जगा सांगी

92

आपाद रुळे जी दाट फुलांची माळा

जणु सौदामिनि ती चमके ढगात काळ्या

तो मोहक परिमळ आला वनमालेचा

भरगच्च फुले गुंफिली सख्यांनी त्याच्या

93

घमघमतो तुलसीहार वैजयंतीचा

आजानुबाहु भूषवी बाजुबंदांना

कमरेस मेखला । विळखा घालुन बोले

श्यामला मोहना । कमलमनोहर तू  रे

94

घेऊन श्वास तो । खोल खोलची बोले

नासिकेतुनी ना । परिमळ हृदयी पोचे

हा परिमळरूपी । हृदयी कृष्ण विराजे

का परमसुखाची अनुभूती मज येते

95

ते श्रुतीत झरती ना सूर बासरीचे

राधिकारमण तो प्रवेशतो चित्ताते

हृदयास व्यापिले त्याने माझ्या सार्‍या

हरि हरी नाम हे उमटे हृदयी कोर्‍या

----------------------------------------------

96


चल मार उडी तू बोले डाकू काळा

बघ समोर आला तो कृष्ण सावळासा

गोविंद भेटण्या अधीर तोची झाला

तो बुवासकटची उडी मारता झाला ।।

97

मज कुठे ढकलितो । वदे पुराणिक बोवा

मारण्या मला तू रानात आणिले का?

विश्वास ठेविला उगा तुझ्यावर मी हा!

दुर्बुद्धी मजला  कैसी सुचली देवा

 98

तू चोर बिलंदर । डाकू फसवा वागे

बोलेच पुराणिक । बुवा त्यासची रागे

अंधार दाटला । रानात किर्रऽऽ ही झाडी

 फसविशी सांगुनी । आला कृष्ण सौंगडी

99

मी बोलत नाही एक अवाक्षर खोटे

मी उभा धरोनी हात हरीचा येथे

त्या पुराणिकासी वदे चोर तो तेथे

हे अघटित कैसे मजला ही ना कळते

100

तो पाही हरिसी गालात हासतांना

मग पुसे तयासी काय तुझी ही माया

तू दिसतो मजला परि ना दिसतो यासी

हे कसले चेटुक करिसी तू व्रजवासी

-----------------------------------

101


हे सख्या समोरी उभा असे तू परी

तू इतुक्या जवळी असून रे श्रीहरी

का दिसत नाहि या  पुराणिकासी तरी

का तुझी वागणुक आहे अशी दुहेरी

102

तो हसुन जरासा बोले त्या वनमाळी

तव आस अनावर मजला भेटायाची

तुज भय ना उरले क्रूर श्वापदांचेही

रंगलास तू रे माझ्याच कृष्णरंगी

103

मी देतो ज्याला जे जे तया हवे ते

मज भेटायाची । आस तुझ्या चित्ताते

हा बुवा पुराणिक कथा सांगतो माझी

परि पैशांवरती रेंगाळे मनमाशी

104

बोवास कमी ना । पैशांची या काही

धन धान्यधुन्य अन । कीर्तीवर हा मोही

रि कथा करी तो । नेमानेची माझी

परि मनात हेतू । कोण काय देतोची

105

गडबडला चोरचि ऐकुन हरिच्या बोला

हा बोवा माझ्या विश्वासावर आला

मी पडेन खोटा जर तू या ना दिसला

हे कृपा करी रे   मजवर तू गोपाळा

106

वदलाच हरी तो आपण समानधर्मी

व्यवसाय आपुले एकचि हे जाणोनी

ऐकतो एवढे मी रे तुझ्याचसाठी

दिसलीच बुवाला कृष्ण मूर्ती सावळी

107

 घळघळा झरे ते नीरचि नेत्रांमधुनी

अवरुद्ध कंठ तो वदे पुराणिक त्यासी

जन्मात मला जे कधी साधले नव्हते

रे तुझ्यामुळे ते मित्रा आज मिळाले

108

हरिकथाच केली टिचभर पोटासाठी

कोरडा राहिलो मी सुधासराकाठी

घननीळ बरसला अमृत धारा ओठी

परि तहानलेला सदा राहिलो  कष्टी

109

परि जन्म सार्थकी आज लागला माझा

भवबंधचि सुटला नेत्री हरी बैसला

भारावुन वदला   तो चोर त्याचवेळी

सर्वस्वचि गेला मम लुटून तो वनमाळी

110

मी कौस्तुभ मिळवुन   हरीस ना ठगवीले

ठगविले हरीने कौस्तुभ देऊन पुरते

देतोचि तुला मी अर्धे धन ते माझे

तो कुंजविहारी मजसी ऐसे बोले

111

घातिलाचि कौस्तुभ स्वहस्ते हरिने गळा

 अन विरघळलो मी रंगात त्या सावळ्या

ठगविले मला ह्या सर्वस्व चोर हरिने

देउनी कौस्तुभा मजला चोरुन नेले

112

मज भूलचि पडली नकळत का त्या वेळी

रे हाय हाय मी विपरीत खेळलो खेळी

मी कांचन सोडुन काच घेतली लोभे

ती चूकच माझी आता मजला भोवे

113

मी गाय घेतली कामधेनुच्या बदली

घेतली झोपडी सोडुन भव्य हवेली

तोडून घरासी कुंपण केले मीची

मी कसाचि मुकलो आनंद-सागरासी

114

मी छप्पर तोडुन । पलंग त्याचा केला

मी गायी विकुनी । गोठा की बांधियला

मी अमृत टाकुन । अंबिल कांजी प्यालो

मी कौस्तुभ घेऊन । सर्वस्वाला मुकलो

 

115

---------------------------

हातातुन सुटता । काठी पडेच जैसी

तैसाच कोसळे । चोर हरीच्या पायी

तुजवीण नको मज । अन्य दुजे वनमाळी

मज स्थानचि द्यावे  । तुझ्याच ह्या पदकमळी

116

अश्रुंनी धुतली पदकमले ती हरिची

मनसुमन वाहुनी पूजा पूर्ण जहाली

उठविले हरीने अपुल्या हातानेची

हृदयासी धरले प्रेमभराने त्यासी

117

 आनंदसागरी   जव तरंग आनंदाचा

तैसाच जाहला तो तरंग कालिंदीचा

रंगुनी हरीच्या त्या रंगात सावळ्याशा

 तो काळा डाकू झालाच हरीमय तेंव्हा ।।

118

सर्वस्वचोर मनमोहकचि हसला हरि

अन गोष्ट ऐकता । चित्त हरुन मम जाई

ही अरुंधती हो । कथा सांगते त्याची

हा चोर विलक्षण । सांभाळा हृदये अपुली

-------------------------