श्रीरुक्मिणीचे श्रीकृष्णाला पत्र

 


           विदर्भ-नरेश भीष्मकाची रुक्मिणी ही अत्यंत गुणी, बुद्धिमान, लावण्यवती, उदार आणि ऋजु स्वभावाची सर्वात धाकटी कन्या. भीष्मकाला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहु, रुक्मकेश आणि रुक्ममाली असे अजून पाच पुत्र होते.        

         श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या, त्याच्या मनोहारी रूपाच्या, सद्गुणांच्या, दिलदारपणाच्या, पराक्रमाच्या, वैभवाच्या, त्याची महती सांगणार्‍या अनेक गोष्टी, अनेक प्रसंग रुक्मिणीच्या कानावर सतत येत होत्या. त्याच्या त्या गुणांवर भाळून रुक्मिणीने निश्चय केला की हाच माझ्या अनुरूप पती आहे. रुक्मी सोडून  रुक्मिणीचं लग्न कृष्णाबरोबर व्हावे अशी सार्‍यांचीच इच्छा होती.

                    रुक्मी श्रीकृष्णाचे अत्यंत द्वेश करत असे. त्याचा ह्या विवाहाला पूर्णपणे विरोध होता.  रुक्मीचे जरासंधासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. शिशुपाल हा जरासंधाच्या इशार्‍याने वागणारा नामधारी राजा होता. रुक्मीने बहिणीचा विवाह शिशुपालाशी करायचा निश्चित केलं. इतकच नाही तर रुक्मिणी स्वयंवराचं निमंत्रणही श्रीकृष्णाला पाठवलं नाही. हे कळल्यावर रुक्मिणी खूप धास्तावली. तिला त्या दुष्ट शिशुपालासोबत लग्न अजिबात मान्य नव्हतं. खूप विचार करून रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून ताबडतोब ते एका विश्वासू ब्राह्मणाच्या हाती द्वारकेस श्रीकृष्णाकडे धाडले. श्रीकृष्णानेही त्या ब्राह्मणाचा आदरसत्कार केला, त्याची योग्य विचारपूस केलीत्याचं जेवणखाण झाल्यावर, त्याला योग्य विश्रांती मिळाल्यावर त्याच्या येण्याचं कारण विचारलं. त्यावर त्याने राजकन्या रुक्मिणीने त्याला संदेश पाठविल्याचं सांगितलं. श्रीकृष्णाने त्याला पत्र वाचावयास सांगितले. रुक्मिणीचे ते सात श्लोकांचे पत्र ब्राह्मणाने वाचून दाखवले आणि तो म्हणाला, आता ह्या संबंधात जे काही करायला पाहिजे त्याचा आपण सत्वर विचार करावा आणि योग्य निर्णय घेऊन त्वरित कारवाई करावी.

  स्मितवदन श्रीकृष्णाने त्यावेळी प्रेमाने त्या ब्राह्मणाचा हात हाती घेतला आणि  मी स्वयंवराला येत असल्याचे आश्वासन रुक्मिणीला देण्यास सांगितले. इतकच नाही तर अनेक दिवसांपासून रुक्मिणीच्या सौंदर्याची, सद्गुणांची, बुद्धिमत्तेची, चातुर्याची कीर्ती  माझ्या कानावर आहे; तिला भेटण्याची उत्कंठा माझ्याही मनात आहे; तिच्या विचाराने कित्येकवेळा मला रात्री झोप येत नाही ही कबुलीही मनमोकळेपणाने कृष्णाने दूत म्हणून आलेल्या ब्राह्मणाला दिली आहे.

  श्रीरंगाच्या प्रेयसीचं हे  पहिले प्रेमपत्र होते तरी कसे आणि काय?

 

वृत्तवसन्ततिलका

श्रुत्वा गुणान्भुवनसुन्दर श्रृण्वतां ते

निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापम्

रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभं

त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपं मे॥१

( त्रप लाज, अप त्रप म्हणजे लाज गेली आहे असे. चित्तम् अप-त्रपम्  -लाज गेली आहे असे माझे मन.)

कीर्ती तुझी भुवनसुंदर ऐकता मी

येताच सद्गुण तुझे सहजीच कानी

घेतीच ठाव मम ते सहजी हृदीचा

होई प्रसन्न मन हे नच खेद चित्ता ।। 1.1

 

झाले मनोहरचि विश्व तुझ्यामुळे हे

झालाचि हा सफळ जन्म असेचि वाटे

पाहे तुझ्या अति मनोहर जो छबीस

त्यासी गमे उमगला मनि जीवनार्थ ।। 1.2

 

मी भाळुनी तव गुणांवर मोहना रे

लज्जाहि पार विसरून तुला स्मरे रे

कृष्णा मनोमन तुला वरिले हृदी मी

लागे तुझीच मज आस सदा मनासी ।। 1.3

 

का त्वा मुकुन्द महती कुलशीलरूप-

विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम्।

धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या

काले नृसिंह नरलोकमनोऽभिरामम्॥२

 

ऐश्वर्य, सद्गुण, तुझे कुळ, शील, विद्या

 वा देखणेपण सवेचि पराक्रमाच्या

तारुण्य, उज्ज्वल तुझा महिमा मुकुंदा

तूची बलाढ्य जगति नरसिंहरूपा ।। 2.1

 

सार्‍या जना सुखविते प्रतिमा तुझी ही

कैसी न ती मग रुचे तरुणींस चित्ती

सांगा कुणी कुलवती अति धैर्यशाली

बाला गुणी नच वरेलचि का हरीसी ।। 2.2

 

तन्मे भवान्‌ खलु वृतः पतिरङ्ग जाया-

मात्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि।

मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद्

गोमायुवन्मृगपतेर्बलिमम्बुजाक्ष॥३

 

आत्माच अर्पण तुम्हा प्रभु  मीच केला

स्वीकार पत्नि म्हणुनी करि कृष्णनाथा

जो श्रेष्ठ भाग वनराजचि केसरीचा

कोल्हा कसा करु शके लव स्पर्श त्याला ।। 3.1

 

हा चेदिराज शिशुपाल धरी मनीषा

व्हावा विवाह मजसी म्हणुनीच चित्ता

हे पद्मलोचन हरी मजला हरी रे

 डोळ्यात प्राण मम आणुन वाट पाहे ।। 3.2

 

पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्र-

गुर्वर्चनादिभिरलं भगवान्‌ परेशः।

आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं

गृह्णातु मे न दमघोषसुतादयोऽन्ये॥४

 

केले असेल जरि पुण्यचि मी पुरेसे

सेवा करून नित सज्जन तोषवीले

पूजा यथाविधिच ती गुरु बाह्मणांची

देऊन दान कनकादि व्रते करोनी ।। 4.1

 

मी पूजिले जरिच  देवगणास भावे

यावे तुम्ही प्रभुवरा हरण्या त्वरेने

नेईल दुष्ट शिशुपाल मला बळानी

 आधीच त्या मजसि न्या तुमच्यासवेची ।। 4.2

 

श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भान्

गुप्तः समेत्य पृतनापतिभिः परीतः।

निर्मथ्य चैद्यमगधेन्द्रबलं प्रसह्य

मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥५

 

यावे विदर्भ नगरीत उद्या मुकुंदा

 व्हावे उपस्थित सभेत  स्वयंवराला

सैन्यासवेच नगरीत प्रवेशुनीया

तुम्ही परास्त करणे मगधापतीला ।। 5.1

 

देऊन मात शिशुपालहि जिंकुनीया

जिंकून राक्षसविवाह करी मुकुंदा

तुम्ही अजेय मज न्या तव द्वारिकेला

मूल्यस्वरूप समजा निज रुक्मिणीला ।। 5.2

 

अन्तःपुरान्तरचरीमनिहत्य बन्धूं-

स्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम्।

पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा

यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात्॥६

 

``अन्तःपुरातुन तुला हरुनीच नेता

आप्तांसवे लढुन योग्य न मारणे त्यां’’

ऐसा विचार न रुचे जरि आपल्याला

सांगेन योग्य बरवाचि उपाय तुम्हा ।। 6.1

 

मी सांगते तुज विवाहप्रथा कुळाची

आलीच चालत कितीक पिढ्या पिढ्या ही

जाते प्रभात समयी कुलदेवतेला

सौभाग्य-कांक्षिणि वधू करण्यास पूजा ।। 6.2

 

वेशीवरी नगरिच्या दिन एक आधी

त्या पार्वती-जननिच्या निज मंदिरासी

यावेचि त्याच समयी प्रभु मंदिरासी

न्यावे हरून मजला तुमच्यासवेची ।। 6.3

 

यस्याङ्घ्रिपङ्कजरज:स्नपनं महान्तो

वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोऽपहत्यै

यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं

जह्यामसून् व्रतकृशाञ्छतजन्मभिः स्यात्॥७ ।।

 

तो विश्वनाथ शिव, सत्पुरुष वा महर्षी

ज्याची पवित्र पदधूलचि घेउनी ही

त्यानेचि स्नान करुनीच अपाप होती

ती श्रीहरीचरण साथ मला मिळावी ।। 7.1

 

ऐसी असे कमलनेत्र हृदी मनीषा

लाभो मला पति म्हणूनचि तू मकुंदा

ना लाभला जर हरी पति रुक्मिणीसी

ना लाभली चरणधूलचि मोहनाची

 

ही रुक्मिणी व्रत कठोरचि आचरोनी

काया तिची झिजवुनी कृशकाय होई

हे कृष्णचंद्र तनुतूनचि प्राण गेले

घेईन जन्म तरिही शतदाच मी रे

 

पत्नीपदा मिळविण्या तव रे मुकुंदा

लाभावया मज तुझी पदधूल वंद्या

लाभेल निश्चित मला तव संग नित्या

न्यावे हरून मज सत्वर कृष्णचन्द्रा ।। 7.3


हे प्रेमपत्र सुमनोगत रुक्मिणीचे

जे मार्गदर्शक असे तरुणींस मोठे

कर्तृत्व श्रेष्ठ महिमा कथिला वरचा

भावानुवादित करेचि प्रवीणजाया

---------------------------------

आषाढ कृष्ण कामिका एकादशी  16 जुलै, 2020