अगा पंढरीच्या राया – #पाण्डुरंगाष्टकम् चे विश्लेषण

#अगा पंढरीच्या राया

पांडुरंग हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. त्याच्यावर सर्व भक्तांनी जितका हक्क गाजवला असेल तितका हक्क क्वचितच कुणा इतर देवांवर गाजवला असेल. ``सुंदर ते ध्यान-----‘’ म्हणत कोणी त्याच्या रूपावर मोहीत झाले. तर ``धरीला पंढरीचा चोर म्हणून कोणी त्याला हृदयात कोंडून ठेवले. कोणी त्याला अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले, कोणी त्याला जेवायला भाग पाडले. नाम्याचं कीर्तन ऐकून देहभान हरपून नाचणार्‍या विठ्ठलाला आपलं धोतर सुटल्याचंही भान राहिलं नाही तर जनीकडे दळण दळून घाईघाईत गुपचुप मंदिरात येऊन उभे राहतांना तिची ठिगळं लावलेली वाकळ आपल्या खांद्यावर असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.

                         हे झाले भारतातील. भारताबाहेरही बाहेरही पांडुरंग महिमा थोरच आहे. व्हिएटनाममधे भद्रवर्मन नावाच्या राजाचं चंपा नावाचं राज्य होतं. त्याचे पाच प्रांत होते; - विजय, पांडुरंग, इंद्रपुर, अमरावती आणि कौठारा.(कोठार तांदळाचे) हे चंपा राज्य तेथील अन्नम भागात होते. म्हणजेच फार पूर्वी व्हिएटनाम चे नाव अन्नम् होते. अर्थात तांदळाचे कोठार. ह्या अन्नम भागाच्या पृथ्वींद्रवर्मन नावाच्या हिंदू राजाने  प्रथम ``पांडुरंग’’ ह्या राजवंशाची सुरवात केली. आजही तेथील राजांच्या  नावामागे पांडुरंग हा किताब असतो; जसा थायलंडच्या राजाच्या नावामागे राम असतो.

             हे विठ्ठला,  हे पांडुरंगा! तू आमच्या कष्टकर्यांचा देव. आम्ही खळ्यात मळ्यात काम करता करता चिखलात बरबटलेली माणसं. तूही मेघश्यामल सावळा होतास; तो गायी चरायला नेऊन गायीच्या खुरांनी उधळलेल्या गोधूलीने पांढुरका झालास. तुझं हे पांढुरक पांडुरंग रूप  आम्हाला म्हणूनच भावतं. आमच्यासारखं वाटत.

                आम्ही भोळेभाबडे कष्टकरी लोक, ज्ञान, तपस्या काय जाणणार? पण कुठलंही साधंसुधं काम मग ते दळण-कांडण असो, शेतीत राबणं असो, वा साफसफाईचं हलक्याप्रतीचं समजलं जाणारं असो! काम करतांनाही संतांनी आम्हाला तुझं नाव घ्यायला शिकवलं. आमच्या कष्टातून, कामतून तुझं पावन नाम जसं जसं फिरत राहिलं, तसं तसं प्रत्येक काम विशेष रीतीने चांगलं होत गेलं. कामाच्या जोडीला आंतरिक मेळ असला, कामात मन ओतलं असेल, कामात राम असेल, नाम असेल, तर कर्म निराळेच होते. संतांनी आम्हाला कर्म, विकर्म, अकर्म शिकवलं. लाकडाला अग्नी लागला की लाकूडच धगधगीत पेटून उठतं. तेच विकर्म. कर्मात मन ओतलं की ते विकर्म होतं. काम काम राहतच नाही स्फुल्लिंगासारखं पेटून उठतं. भुईनळ्यात दारू असली तरी तो पुठ्ठ्याच्या खोक्यातही ठेवता येतो. पण तो पेटवला की त्यातून रंगिबेरंगी अग्नीफुले बरसू लागतात. खोक्यासकट सर्व जाळून टाकतात.  हेच विकर्म! तू आमच्या कष्टांनाच `योगः कर्मसु कौशलम् ।म्हणत कर्मयोग करून टाकलस. आमच्या ह्या कष्टात `ग्यानबा तुकारामआणि  `पांडुरंग हरीह्या नामाचं विकर्म ओतलस आणि ----आणि आमच्या ढोरासारख्या कष्टदायक कामाला कसला परीसस्पर्श झाला कळलच नाही. कर्म दिव्य झालं. कर्मात विकर्म ओतलं की कर्म दिव्य होत. जीवनाचं स्फुलिंग चेतलं.  तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखे दुःख, कष्ट जणु आकाशाच्या पोकळीने शोषून घेतले. भक्ती आणि कर्मयोगाच्या रसरशीत मुशीत पार पार जळून गेले. मुशीत खाली राहिलं ते फक्त लखलखित रामनाम. आणि काम? काम काम राहिलच नाही. काम, नाम आणि परमधाम-राम ही त्रिपुटी एक झाली. अग्नीत जळण्यापूर्वी हे चंदन हे बाभूळ, हे शेण असे भेद. एकदा का पेटले की सर्व अग्नीच. विकर्माने कर्म  जळून गेले की खाली उरते ती राख म्हणजेच अकर्म. काम काम राहिलच नाही. कामाचा बोजाच उरला नाही. कष्टच संपले. आता कुठलंही काम आम्ही हाती घेतलं की त्यात आम्हाला `राजस सुकुमार मदनाचा पुतळाअसा तूच दिसायला लागलास. कर्मफळाची अपेक्षा कसली? नरहरी सोनार म्हणू लागला,

 देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।।

 देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नामसोने ।।

 त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। 

तर सावता माळ्याला कांदा, मुळा भाजी अवघी विठाबाई दिसू लागली.

आणि सारे आनंदाने नाचू लागले. अवघा रंग एक जाला`पांडुरंग! जे जे काम करू ते ते विठ्ठल. काम हाच एक पवित्र यज्ञ झाला. `मीपणाची आहुती त्यात कधी पडली कळलच नाही. मीच नाही तर काम कोण करणार? आता कर्त्यातील `मीच गळून पडल्यावर कर्ता म्हणून कोणाला तरी बसवायलाच पाहिजे. शेवटी तुलाच कंबर कसायला लागली. बघणारे आश्चर्याने म्हणु लागले, ``कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम!’’  जनी? जनी कुठे आता? आता ती दळतच नाही. `दळिता कांडिता तुज गाईन अनंताअसं न विसंबता जनी म्हणायला लागली आणि तिचं दळणं सुटलं.  जनीचं दळणही तूच दळतोस. जनीच्या अंगावर तुझ्या नामाचा भरजरी शेला पांघरून तिची दुःखाची ठिगळंवाली वाकळ खांद्यावर घेऊन मंदिरात उभा राहिलास. एकनाथांकडे श्रीखंड्या निवांत भिंतीवर बसलेला आणि तू पाणी भरत राहिलास. तुझ्या नामाचं विकर्म देहात ओतलं की कितीही काम असो अकर्माचं परम सुखदायी रसायन तयार होतं. ``सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारीत़’’ असा तुझ्यावर आमचा भार घालून जो तो तुझं नाव घेत निवांत होतो.

                    तुझ्या शोधात ज्ञानी तपस्वी रानावनात भटकत राहिले. डोंगर, कडे, कपारी पालथी घातली. तू मात्र `मुको कहाँ ढूँढे रे बंदेमैं तो तेरे पास ---रे !’ म्हणत कर्माचा कर्मयोग आचरणार्या पुंडलिकाच्या अस्सल भक्तिचा नमुना दाखवायला, सार्या युक्तीवादप्रवीण पण नुसत्याच बडबड्या मुनीवरांना घेऊन आलास. ``अरे पुंडलीका, कर्मयोग कसा असतो हे ह्या मुनीमहाराजांना दाखवायला आणि तुझा परिचय करून द्यावा म्हणून मी येथवर आलो आहे. तुझं काम करत असलास तर मी थांबतो थोडं.’’  पुंडलीक शहाणा. गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, ``वीट देतो त्यावर उभा रहा.’’ माझं काम संपणार नाही आणि तुला येथून हलता येणार नाही. अरे तू नजरेसमोर उभा राहिलास की माझं कर्म अकर्म झालं. माझी कर्माची जाणीवच संपली. मी काम करत आहे हीच जाणीव नसेल आणि सदानंदरूपी कर्मफळ माझ्या पुढ्यात असेल तर मला दुज्या फळाची गरजच काय? माझ्या दारात अमृताचा वर्षाव करणारा मेघ आला असेल तर त्याला मी जाऊ कसा देईन? आनंदाचा पारावार आज आपणहून माझ्या घरी आला आहे. भेटीचं कारणच संपलं तर थोड्याच वेळात हे सुख संपेल. मला इवल्या टिवल्या वरदानाची लालुच दाखवून विठु परत जाईल. मला हे सौख्य सतत मिळण्यासाठी त्याला नजरेआड करून चालणार नाही. त्याला सतत माझ्या डोळ्यासमोर मनाच्या भक्कम चिर्यावर, विटेवर उभा ठेवीन. युगानुयुगे पुंडलीकाची वाट बघत त्याच्या हृदय विटेवर तुझी दोन्ही बिंब-प्रतिबिबासारखी समान पावले ठेऊन तू सुचारुपणे उभा आहेस. आणि पुंडलीक कर्मयोगातून अखंडपणे तुझे सुख अनुभवित आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्यां 

 वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।

समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।।1

 

 

तटी भीवरेच्या वसे पंढरी जी।

 जिथे नांदते ब्रह्मविद्या सुखानी।

तिथे श्रेष्ठ संतामहंतां सवेची।

 विठू भक्तभोळाच धावून येई।।1.1

 

तयाच्या मनी लागली ओढ  मोठी।

 कधी भेटतो पुंडलीकास या मी ।

 युगामागुनी लोटली ही युगेची।

 तरी पाहतो वाट हा वाळवंटी।।1.2

 

कसा तोषवू पुंडलीकास माझ्या।

 प्रतीक्षा करी पंढरीचाच राणा ।

असे मेघ जो अमृता वर्षणारा 

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।1.3

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

 

--------------------------------------------------

#पाण्डुरंगाष्टकम्

श्लोक  2

              अहो पांडुरंगा, तुमची ही रमणीय मूर्तीच माझ्या तपाचं फळ आहे. सर्व ऐश्वर्य तुमच्या रूपाने माझ्या समोर उभं आहे. तुमचं  मेघश्यामल रूप, (नीलमेघावभासं ) मेघमालेतून चमचमत जाणार्या वीजेप्रमाणे लखलखणारं दिव्य वस्त्र (तडिद्वाससं) माझ्या मनाला अत्यंत आनंद देत आहे. माझ्या मनातून अत्यानंदाच्या सहस्र सहस्र उर्मी धावत आहेत. आपलं सगुण साकार रूप डोळ्यासमोरून हालत नाहीए. आम्हा भक्तांचीच ही गत तर त्या रमेने काय करावे? ती तर पांडुरंगमय झाली आहे. तिला आपल्याशिवाय काही सुचतच नाहीए. सारे विषय पांडुरंग! तिच्या हृदयमंदिरात सदोदित आपणच विराजमान आहात. ( रमामन्दिरं ) तिचं पवित्र हृदय आपणच आहात. कोणी कलाकाराने रमेचं सुंदर मंदिर बनवलं तर तेही आपणच असाल. सौंदर्याचं सौंदर्य, मोहकतेचा मोहकपणा, लावण्याचं लावण्य आपण आहात. (सुन्दरं ) चैतन्याचा प्रकाश आपण आहात. भक्तांच्या हृदयी तेवणारा भक्तीचा चित्प्रकाश आपल्याविना दुसरा कसा असेल?( चित्प्रकाशम्)

             अहो पांडुरंगा! आपल्याला उभे राहण्यासाठी आपल्या परम भक्ताने पुण्डलिकाने विट तर आपल्याला दिली. केवढीशी ती विट! त्या विटेवर पुंडलिकाची वाट बघत उभं राहणं सोपं का आहे? अठ्ठावीस युगे उलटून गेली. आपण कटिवर हात ठेऊन विटेच्या बरोबर मधोमध अत्यंत नियंत्रितपणे, संयमितपणे, पूर्ण सावधानी बाळगून, अत्यंत स्थिर, अचूकपणे , सर्वबाजूंनी समान अंतर ठेऊन, पूर्णपणे समतोल साधत उभे आहात. (समन्यस्तपादं ) जणु विश्वाचाच समतोल साधत उभे आहात. कोणाच्याही बाजूने आपण झुकला तर विश्वाचाच तोल ढळेल हे लक्षात घेऊन सर्वांशीच समबुद्धी असलेलं आपलं वर्तन स्पृहणीय आहे आणि म्हणूनच वरं म्हणजे श्रेष्ठही आहे. 

 

             आपल्या मनोहर समचरणांबद्दल काय बोलावे? (वरं तु इष्टिकायां समन्यस्तपादं ) सर्व संतांनी, सर्व भक्तानी त्यांच्यावरून आपले जीव ओवाळून टाकले आहेत. मुक्तकेशी नावाच्या कोणा गणिकेला आपल्या रूपाबद्दल गर्व झाला. तिने आपली बोटे नमस्कारासाठी  पांडुरंगचरणांना लावली मात्र आपल्या कोमल पायांवर त्याचा व्रण उमटला. आपली सुंदर, कोमल, एकसारखी पावले पाहून तिचा अहंकार गळून गेला.(माणसांच्या डाव्या उजव्या पावलात थोडातरी फरक असतो. त्या एकमेकांच्या आरशातल्या प्रतिमेप्रमाणे नसतात. पांडुरंगाची डावी उजवी पावले एकमेकांच्या तंतोतंत आरशातल्या प्रतिमेप्रमाणे आहेत.) इतकी कोमल पावले भक्तभेटीच्या आतुरतेने, भक्त भेटीची ओढ लागून  पुंडलिकाने टाकलेल्या वीटेवर मात्र न थकता आजही कशी बरं उभी आहेत? (न्यस्त म्हणजे प्रयुक्त, अन्तर्हित, ठेवलेले. तर इष्टिका म्हणजे विट)

तडिद्वाससं नीलमेघावभासं 

 रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्

वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।2

 

जसा मेघ संपृक्त झाला जलानी 

 लकाके तयातून सौदामिनी ही

 तसा शोभतो हा विठू नीलवर्णी

 कटी शुभ्र वस्त्रा झळाळी विजेची।।2.1

 

रमेच्या मनी रम्य मूर्ती जयाची

 मना मोहवी देव चैतन्यमूर्ति

अती साजिरी पावले एकजैसी

 विठू ठेवि वीटेवरी योग्यरीती।।2.2

 

जया पाहता पापणी ही ढळेना

 फिका मोक्ष वाटेमिळे सौख्य जीवा

नमस्कार त्या पंढरीच्याच राया

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।2.3

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

--------------------------------------------------

पाण्डुरंगाष्टकम्

श्लोक 3

        हे पांडुरंगा, माझ्यासाठी तू सर्व गोष्टी इतक्या सोप्या केल्या आहेस की काय सांगू? नाव तूच, नावाडी तूच, पैलतीरही तूच! पांडुरंगा, हा भवसागर केवढा भयंकर! त्याचा ना ऐल ना पैल. मोह, मत्सर, लोभासारख्या महा भयानक मगरी, सुसरी, देवमासे मला गिळायला, माझा फन्ना उडवायला बसले आहेत. असं असतांनाही तू तुझ्या भक्तांना केवढा दिलासा देत आहेस. इतरांसाठी हा भवसागर कतीही गहन, खोल असला तरी माझ्या भक्तांसाठी तो फक्त कमरेएवढा आहे. कमरेवर हात ठेऊन तू हा भवसागर कमरेइतकाच खोल आहे. घाबरू नका. म्हणून सांगितल्यावर मनात भय कसं राहिल? आता मी निःशंक आहे. निर्भीड आहे. गतसंदेह आहे.  संसार सागरात बुडण्याचं भय माझ्या मनातून कधीच पळून गेलं आहे.

                 ज्या ब्रह्मज्ञानासाठी हे ज्ञानी लोक आकाशपाताळ एक करतात, अनेक जन्म घ्यावे लागतात म्हणून आम्हाला भीती दाखवतात ते ब्रह्म आहे तरी किती दूर? ह्या आमच्या अडाण्यांच्या  प्रश्नाला तू किती सोप्प उत्तर दिलं आहेस. कमरेवर ठेवलेल्या तुझ्या कोमल हातांची बोटे नाभीपासून चार बोटेच दूर आहेत त्याप्रमाणे भवाहून ब्रह्म चारच बोटे दूर आहे हे सांगून तू आम्हा साध्या साध्या लोकांना केवढा दिलासा दिलास. हे परब्रह्मरूपा, पांडुरंगा तुला प्रणाम!

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां 

 नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्॥3

 

कटी ठेविले हात हे दर्शवाया 

 कटी एवढा खोल सिंधू भवाचा

असे भक्त माझातरी पैलतीरा

 सुखे पोचवीतो नसे कष्ट त्याला।।3.1

 

दिशा नाभिची दर्शवीतीच बोटे 

 भवाहून ब्रह्मा असे चार बोटे ।

असा मोक्ष सोपा करी जोचि भक्ता

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।3.2

 

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

--------------------------------------------------

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 4

हे पांडुरंगा,

अनिमिष नेत्रांनी मी तुझे धीरगंभीर रूप अनुभवत आहे. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, देव शिरोधार्य ठेवून मग कुठलंही काम करावं हे सांगायला तू मस्तकावर मुकुट (केयूर) म्हणून शिवलिंग धारण केलं आहेस. मस्तकावर शिव म्हणजेच कल्याणस्वरूप, कल्याणाचं प्रतिक धारण केल्यावर हातून होणारी प्रत्येक कृती ही कल्याणकारीच होणार हे का वेगळं सांगायला पाहिजे? एका धीरगंभीर साच्यात मांगल्य, पावित्र्य, सौंदर्य, जगत्कल्याण, ओतून तुझी ही ``वरम्’’ म्हणजे अत्यंत उत्तम, श्रेष्ठतम, लावण्यपूर्ण शांतरसात निथळणारी राजस सुकुमार मूर्ती तयार झाली आहे --- जी तिनही लोकांचे, त्रैलोक्याचे लालन पालन करते.( लोकपालं ) कल्याण करते.       

               विठ्ठला, आपल्या गळ्यातील कौस्तुभमण्यातून बाहेर पडणारी प्रभा आपल्या मुखाला उजळून टाकत आहे. ``अलं करोति ।‘’ म्हणजेच,  आता ह्या एका भूषणानंतर सजवणं  बास! असं सांगतो तो अलंकार. संपूर्ण सजल्याची , सौंदर्याच्या पूर्णतेची ग्वाही देतो असा तो कौस्तुभमणी आपल्या कंठात अलंकार म्हणून शोभून दिसत आहे. दंडावर रत्नांचे बाजुबंद विलसत आहेत.( केयूर)

               जेथे सर्व गुण असतात तेथच ही अत्यंत चंचल असलेली लक्ष्मी कायम वास्तव्य करते; अन्यथा बघता बघता निघून जाते. तीच लक्ष्मी आपल्याजवळ सदोदित निवास करत आहे. क्षणभरही आपल्याशिवाय विसंबत नाही. ( श्रीनिवासम्) आपण सर्वगुणसम्पन्न आहात ह्याचा अजून दुसरा दाखला काय पाहिजे? आपलं हे परम शांत, कल्याणकारी (शिवं ), श्रेष्ठ (वरं) रूप म्हणूनच अत्यंत पूजनीय (ड्यं) आहे.

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे

 श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम्।

शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।4

 

(केयूर – बाजुबंद किंवा मुकुट.  वरं – श्रेष्ठ. जुष्टप्रसन्न, संतुष्ट, अनुकूल. ) 

 

प्रभा दिव्य कंठी दिसे कौस्तुभाची

 भुजा बाजुबंदासवे शोभताती

शिवाच्या प्रतीका धरे आदरानी 

 शिरोभूषणा मानुनी मस्तकी ही।।4.1

 

असे श्रीपती श्रेष्ठ कल्याणकारी 

 पिता ह्या जगाचा सदा शांतमूर्ती

जयाच्या हृदी राहते नित्य लक्ष्मी 

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपी।।4.2

 

पाण्डुरंगाचा मुकुट बारकाईने पाहिल्यास तो मुकुट नसून शिवलिंग आहे असे दिसून येईलम्हणजेच शिवाला 

सतत त्याने मस्तकी धरले आहे.)

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

----------------------------------

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 5

                        पांडुरंगा तुझं हे शरदाच्या चंद्राप्रमाणे असलेलं विलोभनीय मुख (शरच्चंद्रबिम्बाननं शरदऋतुतील चंद्राच्या बिंबाप्रमाणे असलेलं आनन म्हणजे मुख) पाहून संतही जिथे ``भाग गेला शीण गेला’’ म्हणतात तेथे मी अजून काय बोलणार? हे कल्याणमूर्ते, तुझं हे सौम्य, शांत रूप कोजागिरीच्या चंद्राच्या चांदण्याप्रमाणे माझ्या मनात झिरपत आहे. आत आत मनाच्या गाभ्यापर्यंत त्याच्या आनंद -धारा उतरत आहेत. पण तुला चंद्र तरी कसं म्हणू? तो सुद्धा कला कलांनी उणावत जातो. तुझी सदोदित स्वयंप्रकाशात निथळणारी ही आनंदमूर्ती पाहून तो चंद्रसुद्धा लाजून जाईल. तुझा हेवा करेल. तुझ्या त्याच अद्तीय रूपाला माझे वंदन असो.

          तुझ्या चेहर्‍यावरील मोहक मंद स्मिताने त्रैलोक्याला वेड लावलं आहे. (चारुहासं ) आनंदकंदातून उमलून येणारं फूल वा आनंदघनातून बरसाणार्‍या धारा वा नादब्रह्मातून उमटणारा स्वर वा परब्रह्माचा आनंद हा विलक्षण मोदमयीच असणार. तुझ्या ह्या मंद मनोहर स्मिताने मी वेडावलो आहे

 

             ज्या विश्वविजयी मदनाच्या ध्वजेवर मकर विराजमान असतो त्या मदनाने आपल्या कानावरच जणु काही त्याची पताका मकरकुण्डलांच्या रूपाने उभारली आहे. धनुष्याप्रमाणे सुंदर असलेले आपले कानही जर भक्तचित्तांचा असा वेध घेत असतील तर जो  `सुखाचे हे सुखअसं आपलं सुंदर मुख पाहील तो आपल्या रूपावर मोहित झाल्याशिवाय कसा राहील? हया रत्नजडित कुंडलांवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन आपल्या गालावर उमटलेली प्रकाशाच्या अनंत कवडशांची रंगित नक्षी ( लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गम्।) पाहतांना माझे नेत्र उघडझापही विसरून गेले आहेत

            तुझे हे ओठ जास्वंदीच्या लालचुटुक कळ्या म्हणू का नुकते उगवणारे सूर्यबिंब म्हणु? का पिकलेली तोंडली म्हणु? का त्या लाल जास्वंदीच्या ठायी तू तुझे ओठ हळुच टेकवलेस तर नाहीस? तुझ्याच ओठांचा रंग ह्या तिघांनाही प्राप्त झाला आहे. दोन्ही बाजूंनी निमुळते होत जाणारे कमळाच्या टप्पोर्या कळी प्रमाणे तुझे हे कञ्जनेत्र ( कं म्हणजे पाणी पाण्यात जन्मते म्हणून कमळाला कंज / कञ्ज म्हणतात.) माझ्या मनाला भुरळ घालत आहे. तुझ्या चेहर्यावरून माझी नजर हलत नाहीए. पांडुरंगा तुला प्रणाम!

 

 

शरच्चंद्रबिम्बाननंचारुहासं 

 लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गम्।

जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।5

 

जरी शारदी पौर्णिमेचा सुधांशु 

 उणावे कलांनी तयाचा प्रकाशु

म्हणोनी तुला पाहता खिन्न होई

 म्हणे कोण माझ्याहुनी चित्तवेधी।।5.1

 

हळू स्पर्शती कुंडले गोड गाली 

 जरा हालता रत्नज्योती प्रकाशी

प्रकाशात रांगोळिच्या सप्तरंगी 

 तुझे थोर लावण्य मोहे मनासी।।5.2

 

तुझे ओठ जास्वंदिच्या पाकळ्याची

 गमे केशरी हा रवी सुप्रभाती

तुझे नेत्र आकर्ण पद्मासमाची

 तुला वंदितो तूचि ब्रह्मस्वरूपी।।5.3

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

----------------------------------

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 6

         आहाहा!!!! ह्या पांडुरंगाच्या मुकुटाची शोभा काय वर्णावी? त्याच्यावरील हिरे, पाचू, पुष्कराज, माणिक, इंद्रनील अशी अत्यंत अमूल्य रत्ने नुसती झळकत आहेत. त्यांच्या मधून बाहेर पडणार्या किरणांनी पांडुरंगाच्या मुखाभोवतालच्या दिशा उजळून निघाल्या आहेत. त्या शांत रत्नतेजात पांडुरंगाची शांत मूर्ती मोठी लोभस दिसत आहे. सर्व देवांनीही पांडुरंगाला अभिवादन करून, त्याची पूजा, सत्कार करून, अत्यंत बहुमूल्य रत्न, रत्नहार पांडुरंगाला  अर्पण केले आहेत. मोरांची नक्षी असलेला हा रत्नजडित कंठा त्याच्या शंखाकृती सुंदर गळ्यात शोभून दिसतोय. तर कृष्णावताराची आठवण करून देणारं मोरपीस नवरत्नांच्या मुकुटातही रत्नांसमवेत तेवढेच सुंदर दिसत आहे. देवाची ही तीन ठिकाणी लवलेली कमनीय काया श्रीकृष्णाच्या त्रिभंगाकृती उभे राहण्याची आठवण करून देत आहे. माझ्या डोळ्यात पांडुरंगाची ही लावण्यवती मूर्ती मी साठवून ठेवत आहे. ही अद्वितीय सुंदर मूर्ती मी माझ्या हृदयात अधिष्ठित करत आहे. हे परब्रह्मरूपा पांडुरंगा तुला प्रणाम!

किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं

 सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः।

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।6

 

बर्ह - मोरपीसे,पिसारा; अवतंसम् - आभूषण,हार,कर्णभूषणे,मुकुट किंवा अलंकाराचे काम करणारी कोणतीही वस्तू. त्रिभंगाकृतीदेवांच्या मूर्ती वा लेण्यांमधील वा दाक्षिणात्य देवळांमधील इतरही सुंदर मूर्ती पाय, कंबर, मान ह्या तीन जागी लवलेल्या, बाक असलेल्या दिसतात. त्याने त्यांच्या कमनीयतेला जास्तच उठाव येतो. )

 

शिरोभूषणाची दिसे दिव्य आभा 

 हिर्‍यांच्या प्रभेने दिशा रंगल्या या

मनोहारि ह्या विठ्ठला पूजिण्याला 

 उभे देव ते घेउनी रत्नमाला।।6.1

 

लवे तीन जागीच काया सुडौल 

मयूराकृती रत्नकंठा अमोल

किरीटी सुखे खोविले मोरपीस

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूप।।6.2

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

 

-------------------------------------

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 7

              हे पांडुरंगा, आपण सर्वशक्तिमान आहात. ह्या जगाचे स्वामी आहात. ह्या जगावर आपलीच सत्ता चालते. हे सर्व जग आपल्या आज्ञेने चालत आहे. हे कालस्वरूप परमात्मा पांडुरंगा आपण ह्या सर्व ब्रह्मांडाला व्यापून उरला आहात. (विभुं ) 

              हे आनंदकंदा, तू सगुण रूपाने माझ्या दृष्टीसमोर उभा आहेस. आणि माझी तहान, भूक विसरून मी तुझं हे अद्वितीय रूप सेवत आहे. तहानेल्या चातकाला जलाने ओथंबलेल्या जलदापरीस दुसर्या कशाने आनंद होणार? पण,

तुझ्या ह्या सगुण रूपाचा मोह धरावा का निर्गुणाचा? तुझ्या ह्या सगुणरूपातूनच तू आम्हाला तुझ्या अथांग निर्गुण रूपापर्यंत पोचवतोस. तुझ्या वेणुतून निघालेला मधुर वेणुनाद ---छे-- छे!! त्या पोकळ वेणुला कसला रे नाद? तुझेच श्वास--- तुझेच उच्छ्वास --- ते! हे पांडुरंगा तो वेणुनाद तूच. (वेणुनादं) त्या अचेतन अलगुजाला सचेत करणारा तो वेणुनाद, त्या अलगुजाचा मधुर आत्मा तूच. सार्या विश्वात संचार करणारा, (चरन्तं) भरून राहिलेला तो मंजुळ नाद, ते नादब्रह्म तूच. माझ्या हृदयाच्या एकतारीतून पांऽऽऽडु-रं- --- पांऽऽऽडु-रं-ग उमटणारे सूर ह्या मधुर अलगुजाच्या विश्वव्यापी नादात मिसळून गेले बघ. घटाकाश आणि आकाश एकरूप झाले. सत् चित् आनंदात मी विरून गेलो. पण मला तर तुझा पारच लागत नाहीए. तुझा पलिकडचा काठच दिसत नाहीए. ( दुरन्तं)हे अनंता, तुझं हे अथांग रूप पाहून `तव पाऊलची न दिसेअशी माझी गत झाली आहे. तू उभा का बसलेला; सामोरा का पाठमोरा मला काही काही कळत नाहीए.

       अरे अर्जुनानी सुद्धा विश्वरूप नको म्हणून तुझं साजिरं सगुणरूपच मागून घेतलं. मग मी तर सामान्य! तू ज्या सहजपणे ह्या गोपवेशात वावरतोस ( स्वयं लीलया गोपवेषं दधानम्।) तेच तुझं रूपडं मलाही प्रिय आहे. तुझं असणं हेच इतकं आश्वासक आहे की तुझ्या नुसत्या असण्यानीच सारे सुखावून जातात.  तू तर आनंदाचा आनंद!  ब्रह्मानंदाला मोहक हसू यावं आणि त्या हसण्यात सारं जग विरघळून जावं तसं  तुझ्या नुसत्या मोहक स्मितानेच तू गोपिकांना वेडं पिसं करून टाकतोस.(चारुहासं ) तुझी प्रत्येक कृती इतकी आनंददायी असते की मुकी जनावरंही तुझ्यावरच्या प्रेमाने हंबरू लागतात. गायींना पान्हा फुटतो. (गवां वृन्दकानन्ददं )

हे परब्रह्मरुपा, हे परब्रह्मरूपा हे पाण्डुरंगा तुला नमन असो.



विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं

 स्वयं लीलया गोपवेषं दधानम्।

गवां वृन्दकानन्ददं चारुहासं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।7

 

विभुं-शक्तिशाली,  समर्थयोग्यसर्वव्यापकराजास्वामीशासकब्रह्माविष्णुमहेश,  आत्माकाळ।

चरन्तम् -विहरणारादुरन्तम् - अंतहीनअनंतज्याच्या पार जाणे कठीण आहे असा. )

 

प्रभोवेणुचा तूच मंजूळ आत्मा

 भरोनी सदा राहतो पूर्ण विश्वा

करी तूच सर्वत्र संचार देवा 

 नसे तू अशी पाहिली मी  जागा।।7.1

 

तुझ्या पैलतीरा कुणी पाहिले ना 

 अनंता अमर्याद तू अंतहीना

स्वये गोप झालागुरे राखी कान्हा

 सुखावून गायी फुटे त्यांसी पान्हा।।7.2

 

कसा मंद हासे पिसे लावतो गे

 उभ्या गोप-गोपी हरे भान त्यांचे

असे तूच आत्मा असे तूच शास्ता 

 तुला वंदितो विठ्ठला ब्रह्मरूपा।।7.3

 

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!


----------------------------------

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 8

            हे अनंता, तुला अंतच नाही तर जन्म तरी कुठला?( अजं) अजन्मा असा तू अनंतकाळापासून सर्व विश्वात सर्वत्र भरून राहिला आहेस. आणि हे विश्व तुझ्यात. ह्या विश्वाच्या उत्पत्तीच्या आधीपासूनही तू आहेसच. हे विश्वच तुझ्यामधे सामावलं आहे. जशी कळीला जाग आली की फूल उमलतं त्या प्रमाणे कधी ह्या विश्वाचा पसारा तूच पसरतोस आणि आवरूनही तूच घेतोस.

पांडुरंगा आपण ह्या रुक्मिणीचे पंचप्राण. रुक्मिणीच्या प्राणांचं चैतन्य! (रुक्मिणीप्राणसंजीवनं) हे रुक्मिणीच्याही प्राणांना संजीवन देणर्या रुक्मिणीकांता, जीवदान देणार्या पांडुरंगा, आपण सर्व भक्तांचा परम विश्रामधाम आहात.

जागृती, स्वप्न, सुषुप्ती  वा बाल्य, तारुण्य, वार्धक्य ह्यांच्या पलिकडे जे एकमेव कैवल्य धाम आहे, जी तुर्या अवस्था आहे जेथे आत्मा आणि परमात्मा तद्रूप होतो ते एकमेव (कं) कैवल्यधाम आपणच आहात.  जेथे आत्मा आणि परब्रह्माचे ऐक्य होते ती चौथी तुरीय अवस्था आपणच आहात.

         आपलं सदोदित अत्यंत प्रसन्न (प्रसन्नं) असलेलं मुखं पाहून भक्तगण आपल्याला शरण आले आहेत. (प्रपन्न) त्या भक्तांचे दुःख (आर्ति) हरण करणारे  देवांचेही देव परब्रह्मस्वरूप परमात्मा, भगवान श्रीहरी आपणच आहात. मी अनन्य भावाने आपल्याला शरण आलो आहे.

 

अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं 

 परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्।

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं 

 परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।8

 

अजं- ज्याला जन्म नाही तोपरं- उच्चतम,परमात्मा ,मोक्ष; एकं- अनुपम,बेजोड तुरीय  आत्म्याची चौथी अवस्था जेथे आत्मा परमात्म्यात लीन होतोकैवल्य – मोक्ष। )

 

अहो विठ्ठला रुक्मिणीप्राणदाता 

 तुम्हा जन्म नामृत्युची कोण वार्ता

घटाकाश आकाश ना भेद ऐसा

 तुम्ही स्थान ते अद्वितीया तुरीया।।8.1

 

असे दीनबंधू सदा सुप्रसन्ना

 पळे दुःख ते पाहता श्रीमुखाला

जया वंदिती देव ही देवता या 

 नमस्कार त्या विठ्ठला ब्रह्मरूपा।।8.2

जीवाचिया जीवा, प्रेमभावाचिया भावा, अहो पंढरीच्या राया, परब्रह्मरूपा, नमो नमः नमो नमः । आपल्याला सादर वंदन!

            जन्मतःच तुझ्या नामाची पताका माझ्या माय-बापांनी  माझ्या खाद्यांवर दिली. पावलं जे जे चालली, चालत आहेत आणि चालतील ती तुझ्याच गावाची वाट असेल. सारं आयुष्यच पवित्र वारी. बीज पेरतांनाही फळ फूल सावली, लाकूड कशाची अपेक्षा करायची नाही ह्याचा परीपाठ घालून द्यायलाच ह्या तुळशीला तू माझ्या डोक्यावर दिलस आणि फळाशा सोडायचा अर्थ उमगला. पावित्र्याने मन भरून आलं. सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी अशी ही तुळसच माझ्या डोक्यावर ठेऊन हे जीवन तुला अर्पण केलं आहे. हे पांडुरंगा माझी ही जीवनवारी सफल कर.

 

पाण्डुरंगाष्टकम् -

श्लोक 9

पांडुरंगा, संतांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, जो कोणी तुझं हे पुण्यदायी नाम भक्तीभावाने सतत म्हणत राहील, त्याची ह्या संसारसागरात तूच काळजी घेशील. तो ह्या संसार सागरात बुडणार नाही. त्याची नाव तूच नारून नेशील. तो भक्त हरीच्याच घरी पांडुरंगाच्याच समवेत कायम वैकुठधामी राहील. देवा, हे संतांचं वचन तू खोट करू नकोस. तुझ्या पायी शाश्वत स्थान दे. अजून माझे काही मागणे नाही.

 

स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये  पठन्त्येकचित्तेन भक्त्या  नित्यम् 

भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले  हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति।।9

 

म्हणे पुण्यदायी स्तुती विठ्ठलाची। कुणी भक्तिभावेच एकाग्र चित्ती

भवाब्धी तरोनी तया अंतकाळी। हरी देतसे दीर्घ वैकुंठ प्राप्ती।।9

माझ्या हृदयाच्या एकतारीतून सतत एकच नाद झंकारत राहो पाऽऽण्डुरंग! पाऽऽण्डुरंग!! पाऽऽण्डुरंग!!! पाऽऽण्डुरंग!!!! पाऽऽण्डुरंग!!!!!

 

--------------------------------------------------------------------------------------

#लेखणी अरुंधतीची


No comments:

Post a Comment