**।। सौन्दर्यलहरी ।।**



      **।। सौन्दर्यरी ।।** श्लोकार्थ

76 -100 )

 हर-क्रोध-ज्वालावलिभिरवलीढेनवपुषा

गभीरे ते नाभीसरसि कृतसङ्गो मनसिजः ।

समुत्तस्थौ तस्मादचलतनये धूमलतिका

जनस्तां जानीत तव जननि रोमावलिरति ।। 76

महा क्रोधाने हा शिव उघडिता नेत्र तिसरा

लपेटे ज्वाळांनी चहुकडुन अग्नीच मदना ।

सहस्रा जिह्वांनी लपलपत चाटे तनुस त्या

असह्या दाहाने मदनतनु ती होरपळता ।। 76.1---

 

शमावा अंगीचा मरणप्रद तो दाह म्हणुनी

तुझ्या नाभीरूपी सरसिच उडी घे मदनची

तुझी शोभे नाभी गहनचि तलावासम उमे

करे वास्तव्या तो मदन अजुनी कायम तिथे ।। 76.2

 

निवे तेथे त्याचा तनु दहनिचा दाह पुरता

विझे अंगीचा त्या अनल-वणवा तो उसळता

विझे अग्नी त्याने निघति जणु का धूमवलये

अगे नाभिस्थानि जणु दिसति रोमावलिरुपे ।। 76.3

 

करो कल्याणा ती बहु सुखद रोमावलि-लता

तुला हर्षाने मी नमन करतो मायचि पुन्हा ।। 76.4 


यदेतत्कालिंदी-तनुतर-तरङ्गाकृति शिवे

कृशे मध्ये किञ्चिज्जननि तव यद्भाति सुधियाम् ।

विमर्दादन्योन्यं कुचकलशयोरन्तरगतं

तनूभूतं व्योम प्रविशदिव नाभीकुहरिणम् ।। 77


जळी कालिंदीच्या हळुच उठती सूक्ष्म लहरी

दिसे तैसी रोमावलि कृश तुझ्या माय उदरी

स्तनांच्या वृद्धीने नित घडत संघर्ष बघता

विसावा आकाशा नच मिळत वक्षावर तुझ्या ।। 77.1

 

अगे आकाशाने म्हणुन धरले सूक्ष्मस्वरुपा

विसावा शांती वा नित सुखसमाधान मिळण्या

प्रवेशे शांतीने गहन तव ह्या नाभिकुहरी

वसे तेथे रोमावलि-स्वरुप निश्चिंत-हृदयी ।। 77.2

 

मनोहारी नाभी, लहरिसम रोमावलि तयी

करो कल्याणासी पदि तव विनंती जननि ही ।।77.3


स्थिरो गङ्गावर्तः स्तन-मुकल-रोमावलि-लता

कलावालं कुण्डं कुसुमशर-तेजो-हुतभुजः

रतेः लीलागारं किमपि तव नाभिर्गिरिसुते

बिलद्वारं सिद्धेर्गिरिश-नयनानां विजयते ।।78

प्रवाही गंगेच्या जल फिरत आवर्तनचि घे

जणु गोलाकारी फिरतचि असे भोवरि/ भिंगरि जसे

तुझ्या नाभिस्थाना बघुन मज तैसे गमतसे

मनी वाटे आवर्तन फिरत गंगाजळिच हे ।। 78.1

 

जळीचे ते आवर्तन परि दिसे हो क्षणिक ते

तुझी नाभी माते स्थिरचि अविनाशी असतसे

मला वाटे आळे बघुन तव नाभीस जननी

मुळाशी वेलीच्या सुबक रचना गोलच अशी ।। 78.2

 

तयामध्ये शोभे अति रुचिर रोमावलि लता

लतेसी आल्या गे स्तनयुगुल ह्या दोनचि कळ्या

लता सौंदर्याची जपणुक कराया म्हणुन का

असे आळे हेची करितचि लता-पोषण सदा ।। 78.3

 

स्मराचे अग्नीच्यासम धगधगे तेज जणु हे

तुझ्या नाभीच्या ह्या नित अनलकुंडी विलसते

रतीचे वाटे हे अनुपमचि क्रीडास्थल कुणा

नटे सौंदर्याने जननि तव नाभिस्थल सदा ।। 78.4

 

शिवाच्या नेत्रांच्या सुखदचि कटाक्षातुन झरे

अहो सिद्धीचे त्या सकलचि साफल्य अवघे

तुझ्या नाभीमध्ये नित वसतसे ते जननि गे

असे त्या सिद्धीचे जणुचि विवर-द्वारचि उमे ।। 78.5

 

शिवाच्या सिद्धीचे जननि वसतिस्थान विजयी

सदा होवो माते सतत विजयी हे त्रिभुवनी ।। 78.6


निसर्ग-क्षीणस्य स्तनतटभरेण क्लमजुषो

नमन्मूर्तेर्नारीतिलक शनकैस्त्रुट्यत इव ।

चिरं ते मध्यस्य तृट-तटिनी-तीरतरुणा

समावस्थास्थेम्नो भवतु कुशलं शैलतनये ।। 79

स्त्रियांमध्ये तूची प्रिय प्रमुख सर्वोत्तम उमे

म्हणोनी संबोधी जननि तुज नारी-तिलक गे

असे तन्वी तूची जणु चवळिची शेंग बरवी

स्तनांच्या भाराने दिसत थकलेली लवभरी ।। 79.1


परी वाटे ऐसी बघुन तव ही गे कृशकटी

नदीकाठीचा का तरु तुटत आला बहुगुणी

कटीमध्या माते बघुन कृश अत्यंत तव ह्या

मला वाटे माते सहज तुटुनी जाइलचि हा ।। 79.2


न जावी मोडूनी तव कटिच ही कोमल कृशा

मनापासूनी ही धरुन हृदि इच्छा तव हिता

अगे चिंतीतो मी तव सकल कल्याणचि उमे

तुझ्या ह्या रूपासी नमन करितो मी सतत गे ।। 79.3


कुचौ सद्यःस्विद्यत्तट-घटित-कूर्पास-भिदरौ

कषन्तौ दोर्मूले कनक-कलशाभौ कलयता ।

तव त्रातुं भङ्गादलमिति वलग्नं तनुभुवा

त्रिधा नद्धं देवि त्रिवलि लवलीवल्लिभिरिव ।। 80


स्वयं तेजाने तू उजळविसि त्रैलोक्य अवघे

तुझ्या क्रीडेने वा जगतचि घडे वाचि बिघडे

म्हणोनी देवी ही तुजसिच उपाधी मिळतसे

हृदी त्या शंभूचे सतत करिसी ध्यान गिरिजे ।। 80.1

 

अशा ह्या ध्यानाने तव तनुच घामात निथळे

भिजूनी चोळी ही स्तन कनककुंभासम दिसे

जणू तोडू पाहे स्तन सकल बंधांस तव हे

तुझ्या दंडांसी ते घसट करती लोभसपणे ।। 80.2

 

तुटावी ना त्याने तव कृशकटी कोमल अती

म्हणोनी बांधिले उदर वलयांनीच तिनही

 असे हे घेताची त्रिवलय लपेटून उदरे

कटीमध्याला ये अभिनवचि शोभा जननि गे ।। 80.3

 

करो ती कल्याणा नित हित करो माय अमुचे

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करितो मी नमन गे।। 80.4


गुरुत्वं विस्तारं क्षितिधरपतिः पार्वति निजा-

न्नितम्बादाच्छिद्य त्वयिहरणरूपेण निदधे ।

अतस्ते विस्तीर्णो गुरुरयमशेषां वसुमतीं

नितम्बप्राग्भारः स्थगयति लघुत्वं नयति च ।। 81

हिमाद्री रांगा ह्या किति पसरल्या विस्तृत अती

असे तूची पुत्री हिमगिरिपतीची बहु गुणी

तुला समृद्धीचे/ वैपुल्याचे अन अमित विस्तार स्वरुपी

हिमाद्रीच्या रांगांकडुनचि मिळे स्त्रीधन किती ।। 81.1

 

नितंबांना माते बघुन मजसी वाटत असे

अगे ठेवीयेले तुजजवळ हे स्त्रीधन तुझे

गुरुत्वा,विस्तारा बघुन गमते गे हृदि असे

तयांनी झाकीले सकल अवनिसीच पुरते  ।। 81.2

 

गुरुत्वाने येई सकलचि धरेसीच लघुता

तुझ्या सौंदर्याने अवनिसचि ये न्यूनपण का

धरेच्या भारासी बनवि हलके मोहकपणा

गुरुत्वा विस्तारा जननि करतो वंदन पुन्हा ।। 81.3


करीन्द्राणां शुण्डान्कनक-कदली-काण्ड-पटली-

मुभाभ्यामूरभ्यामुभयमपि निर्जित्य भवति ।

सुवृत्ताभ्यां पत्युः प्रणति-कठिनाभ्यां गिरिसुते

विधिज्ञे जानुभ्यां विबुध-करिकुम्भ-द्वयमसि ।। 82

सुवर्णी केळीचा कनकमय गाभा नितळसा

गजेंद्राची शुंडा सरळ कमनीया असुनिया

तुझ्या पायांजैसे नच दिसत घोटीवपण त्या

तुझ्या पायांचे हे सुबकपण दे मातचि तया ।। 82.1

 

विधिज्ञा गे तूची तुज उमगले वेद अवघे

असे माते तूची श्रुतिस्वरुप तू ज्ञानस्वरुपे

तरीही वेदांसी जननि नित तू गे अनुसरे

जनासी सार्‍या तू सतत पथदर्शी म्हणुन गे ।। 82.2

 

अगे माते देसी अतुल बळ मोठेपण शिवा

तुझ्या सामर्थ्याने शिव मिरवि विश्वेश्वर पदा

परी वेदांचे हे नियमचि शिरोधार्य तुजला

करे नेमाने तू नमन गुडघे टेकुन शिवा ।। 82.3

 

तुझ्या टेकूनीया जननि गुडघ्यांसी नित असे

सुवृत्ताकारी हे कठिण तव होतीच गुडघे

गजाचेही गंडस्थल न इतुके गे कठिण ते

विनम्रा मूर्ती ही तवचि मम राहो हृदि उमे ।।82.4


पराजेतुं रुद्रं द्विगुणशरगर्भौ गिरिसुते

निषङ्गौ जङ्घे ते विषमविशिखो बाढमकृत ।

यदग्रे दृश्यन्ते दश-शर-फलाः पादयुगली-

नखाग्रच्छद्मानः सुर-मुकुट-शाणैक-निशिताः ।। 83


शिवासी जिंकाया सहजचि पराभूत करण्या

महा चातुर्याने मदन करि क्लृप्तीच विजया

तुझ्या पायांचे गे सुबक करि भाते मदन हा

तयामध्ये ठेवी विषम शर ते पाच अतुला ।। 83.1

 

 (भल्यासीही वेडे करि; बहुत दे तापचि तया

अती क्लांतासी त्या कृश करित शोषूनचि तया

सुचू ना दे काही जणु दगड तो कुंठित मती

अगे प्रमोन्मादे शर करितसे मूर्छित तयी ) ।। 83.2

 ( उन्मादन, तापन, शोषण, स्तंभन आणि संमोहन हे मदनाचे पाच बाण आहेत. )

अनंगे ठेवीले जरि शरचि हे पाच अवघे

दिसोनी येती का मजसिच दहा बाणचि कसे

दहा बोटांची ही तळपति नखे पाहुन गमे

दहा बाणांची ही तळपतिच पाती धवल गे ।। 83.3

 

तुझ्या पायी येती शरण सगळे देव गण ही

किरीटांसी त्यांच्या जननि तव पायी नमविती

तयांचे रत्नांचे मकुट मज `शाणा’सम दिसे

शराच्या पात्यांना करिति बहु ते धार सगळे ।। 83.4

 

स्मराचे ऐसे हे दशशरयुता दो तिरकस

असे अस्त्रा-शस्त्रांहुन अधिक तेजे तळपत

नखांना ऐशा ह्या नमन करितो मी जननि गे

कृपा व्हावी दासावर जननि गे नित्य तव हे ।। 83.5

 

श्रुतीना मूर्धानो दधति तव यौ शेखरतया

ममाप्येतौ मातः शिरसि दयया धेहि चरणौ ।

ययोः पाद्यं पाथः पशुपति-जटाजूट-तटिनी

ययोर्लाक्षा-लक्ष्मीररुणहरिचूडामणिरुचिः ।। 84

या वेदांताचे शिरकमल ऐसे समजती

असे सायी जैसे उपनिषद हे श्रेष्ठतरची

तयासीही वाटे तव पद शिरोधार्य जननि

शिरी सन्मानाने मिरविति शिरोभूषण तयी ।। 84.1

असे माते हेची तव चरण सिद्धान्तमयची

असे वेदांताचे प्रतिक जणु हे पाय जननी

जया वेदांनीही नित नमन केले लवुन गे

अगे माते ऐशा चरणकमला वंदन असे ।। 84.2

 

   नमोवाकं ब्रूमो नयन-रमणीयाय पदयो-

स्तवास्मै द्वन्द्वाय स्फुट-रुचि-रसालक्तकवते ।

असूयत्यत्यन्तं यदभिहननाय स्पृहयते

पशूनामीशानः प्रमदवनकङ्केलितरवे ।। 85

 ( वाकम् – सारसोंका समूह या उडान, ब्रू घोषणा करणे , संकेत करणे.)


अहाहा कैसी ही चरण-युगुले नाजुक तुझी

तयासी शोभे हा नव अरुण लाक्षारस किती

तुझ्या गोर्‍या गोर्‍या नितळपदि हा लालचुटुका

जरा ओला ओला रस दिसत तेजस्वि बहु हा ।। 85.1

 

अहो स्वर्गामध्ये प्रमदवनि पाहून तुजसी

तुझी पाहुनीया चरणकमळे मोहक अती

अशोकासी वाटे मम तनु घडो ही पुलकिता

पदांच्या स्पर्शे ह्या मम बहरु दे देह सगळा ।। 85.2

 

तुझ्या स्पर्शाची ही तरुवर मनी आस बघुनी

असूया मात्सर्ये शिव करितसे क्रोध हृदयी

मनी त्याच्या ईर्षा जलनचि अशोकाविषयिची

जना सांगे माते चरण महिमा हा तव किती ।। 85.3

 

मृषा कृत्वा गोत्रस्खलनमथ वैलक्ष्यनमितं

ललाटे भर्तारं चरणकमले ताडयति ते ।

चिरादन्तःशल्यं दहनकृतमुन्मूलितवता

तुलाकोटिक्वाणैः किलकिलितमीशानरिपुणा ।। 86 

( वैलक्ष्य – कृत्रिम, खोटं हसू, )

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत तुजला खोचकपणे

शिवाने प्रेमाने तुज `प्रियतमे भागिरथि गे’

जरा संबोधीता चुकुन; तुजला क्रोधचि चढे ।। 86.1

 

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिव गे

पदाघाताचे गे फळ शिव-कपाळी बसतसे

 अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य असले

म्हणे हाची माझा विजय अति अत्युत्तम असे ।। 86.2

 

अहो केले ज्याने मम तनुस ह्या भस्म अवघे

धडा त्या नेत्राला अजि मिळतसे योग्यचि बरे

प्रहाराने त्याची किलकिल करे पैंजण तुझे

अनंगाला मोदे खुदु खुदु हसू येत जणु हे ।। 86.3


हिमानीहन्तव्यं हिमगिरिनिवासैकचतुरौ

निशायां निद्राणं निशि चरमभागे च विशदौ ।

वरं लक्ष्मीपात्रं श्रियमतिसृजन्तौ समयिनां

सरोजं त्वत्पादौ जननि जयतश्चित्रमिह किम् ।। 87

सरोजाच्यासंगे चरणकमलांचीच तुलना

कशी व्हावी माते; तव चरण विश्वात अतुला

हिमाद्रिमध्ये गे कमल कलिका ना उगवती

जिथे गोठे सृष्टी कमलकलिका तेथ कसली ।। 87.1

 

परी बर्फामध्ये चरण सहजी चालति तुझे

हिमाने त्यांना हो क्षति नचचि पोचे लवहि गे

सरोजे जाती गे मिटुन बघता सूर्य क्षितिजी

परी राहे रात्रंदिनि चरण उत्फुल्ल तवची ।। 87.2

 

सरोजाते राही कमलनयना जीच कमला

वसे ती आनंदे चरणकमली नित्य तुझिया

करीती भक्तीने स्तवन तव एकाग्रचि मने

तयांना देसी तू सकलचि ऐश्वर्य विभवे ।। 87.3

 

निजानंदाचे ते भरभरुन दे दान सकला

सरोजासी नाही जननि क्षमता ही तुजसमा

तया कैसी यावी चरणकमलांची सर तुझ्या

तुझ्या ह्या तेजस्वी चरणकमला वंदन पुन्हा ।। 87.4


पदं ते कीर्तीनां प्रपदमपदं देवि विपदां

कथं नीतं सद्भिः कठिन-कमठी-कर्परतुलाम् ।

कथं वा बाहुभ्यामुपनयन-काले पुरभिदा

यदादाय न्यस्तं दृषदि दयमानेन मनसा ।। 88

(प्रपद – पायाचा अग्रभाग/पाऊल.  कीर्तीनां पदं – कीर्तीचे अग्रस्थान, शिखर. विपदां अपदम् – संसारात भोगाव्या लागणार्‍या विपत्ती, संकटे अधिदैविक, अधिभौतिक, अध्यात्मिक. अपद- कधीही स्थानहोऊ शकत नाही. कमठी-कर्पर – कासवाच्या पाठीचे कवच. दृषदी - दगडावर )

 

पदाग्रे नोहे ही; नित धवल कीर्ती शिखरची

जगीच्या दुःखांना पद न मिळते गे तव पदी

पदी जे जे येती जननि विपदांतून सुटती

अनर्था दुर्भाग्या मुळि न बघती ते नर कधी ।। 88.1

 

परी कूर्मपृष्ठा सम तव पदाग्रेच म्हणती

कवी कोणी त्यांच्या असहमत मतासी जननि मी

पदाग्रे कैसी ही जननि तव गे कोमल किती

कुठे त्या कूर्माच्या कठिण कवचाचीच महती ।। 88.2

 

अगे लाजाहोमा समयिच विवाहात तुमच्या

स्वतःच्या हाताने उचलुन तुझ्या कोमल पदा

शिवाने ठेवीले जननि दगडाच्यावर कसे

मनाचा आहे तो जरिच कनवाळू तरि असे ।। 88.3

 

``सदा अश्माऐसी कणखरचि खंबीरचि रहा

प्रिये विश्वाच्या ह्या सकल परिवारात मम ह्या

कुटुंबाचे माझ्या करि भरण तू पोषण उमे

सदा हया कर्तव्या कधि न चुकणे’’ शंकर वदे ।। 88.4

 

तुझ्या सामर्थ्याचा मनि धरुन विश्वास जननी

दिली कल्याणाची तुजसि गिरिजे कामगिरि ही

दया त्रैलोक्याची शिवमनी सदा राहत असे

अगे माते आलो चरणकमळी मी शरण गे ।। 88.5

 

नखैर्नाकस्त्रीणां करकमलसंकोचशशिभि-

स्तरूणां दिव्यानां हसत इव ते चण्डिचरणौ ।

फलानि स्वस्थेभ्यः किसलय-कराग्रेण ददतां

दरिद्रेभ्यो भद्रां श्रियमनिशमह्नाय ददतौ ।। 89

कसे वर्णू सारे तव चरणसौंदर्य जननी

घडे लावण्याचे अनुपमचि हे दर्शन पदी

असे वाटे माते जणु उगवला अंबरमणी

नखांच्या रूपाने जननि बहु आह्लादक अती ।। 89.1

 

प्रभा का चंद्राची जणु पसरलीसे दशदिशी

नखातूनी ऐसी धवल किरणे ही सुखविती

जसे चंद्रस्पर्शे कमलदल जाती मिटुन ते

कळी होऊनी ते नमन करि चंद्रासचि जसे ।। 89.2

 

घडे माते तैसे नखकिरण-स्पर्शेच तुझिया

मिटोनी घेती गे करकमल ह्या गे सुरस्त्रिया

अगे ह्या देवांच्या सकल ललना गे तव पदी

करांसी जोडूनी नमन अति भावेच करती ।। 89.3

 

तुझे माते कैसे चरण उपहासेच हसति

अगे स्वर्गीच्या ह्या सुखकर अशा कल्पतरुसी

तरू देती सौख्या सुरवरपुरीच्या सुरगणा

परी भूलोकीची करितिच उपेक्षा म्हणुनिया ।। 89.4

 

दरिद्री दीनांना सुख वितरती मंगलमयी

तयांच्या सेवेसी चरणकमले तत्पर अती

नखांची कांती ही सकल जन इच्छाच पुरवी

पदांसी ऐशा गे शरण नित आलोच जननी ।। 89.5

 

ददाने दीनेभ्यः श्रियमनिशमाशानुसदृशी-

ममन्दं सौन्दर्यप्रकरमकरन्दं विकरति ।

तवास्मिन्मन्दारस्तबकसुभगे यातु चरणे

निमज्जन्मज्जीवः करण-चरणः षट्चरणताम् ।। 90

जगी दुःखी दीना चरण तव हेची सुखविती

यांना सौख्याची भरभरुन दानेच लुटती

तुझी माते दोन्ही चरणकमळे सुंदर अशी

प्रभा सौंदर्याचे दिशि-दिशिच प्रक्षेपण करी ।। 90.1

 

अगे कल्पवृक्षा बहर सुमनांचा लगडला

सुधा ओथंबूनी, सुमनकलिका गच्च फुलल्या

दिसे तैसे माते तव चरण पुष्पासम मला

सदा दीना देती विपुल मकरांदास मधुरा ।। 90.2

 

अगे माते माझे धरुन मन पंचेंद्रियहि ती 

सहा होती माझे पद म्हणुन मी षट्पद धरी

मला मातेच्या ह्या चरण कमली भृंग बनुनी

सदा राहू द्यावे पुरवि मनिची आस जननी ।। 90.3


पदन्यासक्रीडापरिचयमिवारब्धुमनसः

स्खलन्तस्ते खेलं भवन-कलहंसा न जहति ।

अतस्तेषां शिक्षां सुभगमणिमञ्जीररणित-

च्छलादाचक्षाणं चरणकमलं चारुचरिते ।। 91

करिसी डौलाने सहजिच पदन्यास जगती

पदांची जादू ही बघुन सहजी नेत्र खिळती

तुझ्या हया चालीसी अनुसरति हे हंस जननी

तुझ्या ह्या ऐटीचा अविरतचि अभ्यास करती ।। 91.1

 

अरेरे ! त्यांचेही बघुनही चुके पाउल कधी

तरी ना सोडी ते तुजस पदाभ्यास तरिही

चिकाटी त्यांची ती तव चरणखेळास करण्या

अगे माते त्यांचा बघुन मनिचा निश्चय खरा ।। 91.2

 

पदन्यासासी या सहज शिकवावे कृतितुनी

म्हणोनी वाळ्यांची किणकिण करीसी मधुरशी

छुनुन् छुन् छुन् वाजे; हरत हृदये पैजण तुझे

तुझ्या ह्या पायांशी विनित मम गे मस्तक असे ।। 91.3


गतास्ते मञ्चत्वं द्रुहिण-हरि-रुद्रेश्वरभृतः

शिवः स्वच्छ-च्छाया-घटित-कपट-प्रच्छद-पटः ।

त्वदीयानां भासां प्रतिफलन-रागारुणतया

शरीरी शृङ्गारो रस इव दृशां दोग्धि कुतुकम् ।। 92

विधी विष्णू रुद्रा सहचि चवथा ईश्वर असे

शिवाच्या तत्त्वाते मिसळुन रहाती नितचि हे

महाभूतांमध्ये अवनि जल तेजात पवनी

असे ह्या चौघांचे सहजचि अधिष्ठान जननी ।। 92.1

 

परी पायी आले सकल तव हे दास बनुनी

रूपे घेता येती नवनविन त्यांना हवि तशी

तुझ्यासेवेसाठी, जननि तुज विश्राम करण्या

पलंगाचे चारी सबळ दृढ ते पायस्वरूपा ।। 92.2

 

असे आकाशी ह्या अमलचि अधिष्ठान शिव हे

अहो त्यांची कांती अमल स्फटिकाच्यासम दिसे

स्वये झाला गादी अन विमल आच्छादन सुखे

अशा ह्या पर्यंकी सुखमय तुझा देह विलसे ।। 92.3

 

शिवाच्या तेजस्वी स्फटिकसम तेजात मिसळे

तुझी तेजोकांती सुखमय आरक्तचि उमे

घडे अद्वैताचे अनुपमचि हे दर्शन उमे

जणू आकारा ये सुभग सुख शृंगाररस गे ।। 92.4

 

अराला केशेषु प्रकृतिसरला मन्दहसिते

शिरीषाभा चित्ते दृशदुपलशोभा कुचतटे ।

भृशं तन्वी मध्ये पृथुरुरसिजारोहविषये

जगत्त्रातुं शम्भोर्जयति करुणा काचिदरुणा ।। 93

(दृशद् – पत्थर, उपल- मूल्यवान दगड )

तुझ्या केसांच्या ह्या मृदुल कुरळ्या रेशिम लडी

वळूनी डौलने रुळति तव चंद्रासम मुखी

स्वभावी ऐसे ना परि तव असे वक्रपणची

असे माते तूची सहज सरला अमृतमयी ।। 93.1

 

स्वभावाचे साक्षी नितळ स्मित हे मोहक तुझे

मनाच्या माधुर्या प्रकट करते हे जननि गे ।

 तुझ्या चित्तासी ह्या शिरिष-सुमनाचीच उपमा

दिसे शोभूनी गे तव सरल ह्या कोमल मना ।। 93.2

 

पहाडांमध्ये गे उगम सरिता पावत असे

जगाच्या कल्याणा वितरतचि जाई जल जसे

तशी पुष्टी तुष्टी मिळत नवचैतन्य अवघे

तुझ्या ह्या स्तन्याने सकलचि भूतांस सुभगे ।। 93.3

 

असे माते तूची कृशकटि सुडौला समुचिता

तुझ्या ह्या गात्रांचा अनुपम असे मोहकपणा

जगाला रक्षाया शुभ अरुणवर्णी तनु तुझी

असे का शंभूची सकल करुणा ही प्रकटली ।। 93.4

 

मनाने होवो मी समरस तुझ्या दिव्य स्वरुपी

खर्‍या आनंदाचा अनुभव मला देइ जननी

कृपा होवो माते मजवर अपूर्वाच तव ही

तुझ्यापायी माते नमन करतो मी प्रतिदिनी ।। 93.5

 

कलङ्कः कस्तूरी रजनिकर-बिम्बं जलमयं

कलाभिः कर्पूरैर्मरकत-करण्डं निबिडितम् ।

अतस्त्वद्भोगेन प्रतिदिनमिदं रिक्तकुहरं

विधिर्भूयो भूयो निबिडयति नूनं तव कृते ।। 94

 

तुझ्या सौंदर्यासी नित खुलविण्या वस्तु सगळ्या

भरोनी ठेवाया अनुपम करंडा शशिच हा

अगे माते साक्षात् हिमकरचि नक्षत्रपति तो

करंडा पाचूचा अनुपम तुझा गे विलसतो ।। 94.1

 

गुलाबाचे पाणी, परिमलचि नानाविध अहा

सुगंधी कस्तूरी अमुप भरलेली तयि पहा

शशीबिंबामध्ये जल दिसतसे जे दुरुनिया

गुलाबाचे पाणी जननि विधि ठेवी भरुनिया ।। 94.2

 

सुधांशूच्या बिंबावर दिसतसे डाग नयना

असे कस्तूरीचा अनुपमचि ठेवाच सगळा

सुगंधी वस्तूंचा प्रतिदिन करी वापर सखे

तयाने चंद्राचा क्षय घडतसे रोज सखये ।। 94.3

 

परी ब्रह्मा ठेवी परत भरुनी वस्तु सगळ्या

तयाने पूर्णत्वा पुनरपि ये सोम सुखदा

कला चंद्राच्या ह्या प्रतिदिनिच येती अनुभवा

तयाचे हे वाटे मजसिच खरे कारण मना ।। 94.4


पुरारातेरन्तःपुरमसि ततस्त्वच्चरणयोः

सपर्यामर्यादा तरल-करणानामसुलभा ।

तथा ह्येते नीताः-शतमख-मुखाः सिद्धिमतुलां

तव द्वारोपान्त-स्थितिभिरणिमाद्याभिरमराः ।। 95

 महा शक्तीशाली त्रिपुर त्रिपुरारी वधतसे

महाराणी त्याची असशि शिव-अंतःपुर उमे

दरारा ऐसा हा त्रिभुवनि तुझा गाजत असे

तुझ्या पूजेचे गे सहजि न कुणा भाग्य मिळते ।। 95.1

 

तुझ्या राऊळी ना सुरवर इंद्रा अनुमती

जरी केले त्याने शत शतचि ते यज्ञ तरिही

तया श्रीचक्राच्या अडवितिच दारातच मुळी

म्हणे त्याच्या चित्ता लव न स्थिरता येचि कधिही ।। 95.2

 

परी द्वारापाशी असति दशसिद्धी नित उभ्या

तिथे पोचे त्याला अपरिमित देतीच विभवा

मिळे देवेंद्रासी विभव सगळे स्वर्गसुखही

मिळे देवांसीही अमुप सुखसंपत्ती बरवी ।। 95.3

 

तुझ्या द्वारीच्या ह्या सकलचि गणांचाच महिमा

जरी ऐसा मोठा तरिच महिमा गे तव कसा?

म्हणोनी आलो गे शरण तुजला मीच जननी

कृपेने होऊ दे जननि तुझिया धन्य मजसी ।। 95.4

   

कलत्रं वैधात्रं कति कति भजन्ते न कवयः

श्रियो देव्याः को वा न भवति पतिः कैरपि धनैः ।

महादेवं हित्वा तव सति सतीनामचरमे

कुचाभ्यामासङ्गः कुरवकतरोरप्यसुलभः ।। 96

तपश्चर्या मोठी करुन नर संपादिति कृपा

अहो वाग्देवीची तपुन कमलेचीच अथवा ।

सुविद्या लक्ष्मीही सततचि तया सोबत असे

म्हणोनी त्या ``वाचस्पति’’ म्हणति ``लक्ष्मीपति’’ असे ।। 96.1

 

असो वाग्देवी वा कमलनयना श्रेष्ठ कमला

तुझा त्यांच्याहूनी कितिक पटिने श्रेष्ठ महिमा ।

पहाता निष्ठा ही तव प्रखर शंभूप्रति दृढा

धजे ना बोलाया कधि कुणिच गौरीपति कुणा ।। 96.2

 

अशोकासी वा त्या कुरबक तरूसीच फुलण्या

सुनारी देती त्या सुखकरचि आलिंगन पहा

असे वृक्षांसाठी समुचितचि हा  `दोहद’ विधी

तया वक्षस्पर्शे तरुवर सुखाने बहरती ।। 96.3

 

मिळे एका शंभू-सुरवर-शिवा भाग्य असले

तुझ्या स्पर्शाचा तो अनुभव शिवासी मिळतसे ।

रमा वाग्देवीच्या सहचि तुलना ना तव उमे

असे विश्वाची तू जननि तुजला वंदन असे ।। 96.4

 

गिरामाहुर्देवीं द्रुहिण-गृहिणीमागमविदो

हरेः पत्नीं पद्मां हरसहचरीमद्रितनयाम्।

तुरीया कापि त्वं दुरधिगम-निःसीम-महिमा

महामाया विश्वं भ्रमयसि परब्रह्ममहिषि ।। 97

तुला माते वाणी म्हणति मतिदात्री कुणिच हे

महाकाली कोणी कुणि म्हणति लक्ष्मीच कमले

कधी रुद्राची त्या म्हणति तुज अर्धांगिनि सखे

कधी अद्रीकन्या म्हणति तुजला पार्वति सुखे ।। 97.1

 

खरे पाहू जाता सकल असती ही तव रुपे

महामाया तूची असशिच महाशक्ति स्वरुपे ।

असे ह्या रूपांच्या अति पलिकडे स्थान तव गे

चिदानंदामध्ये अविरतचि तू मग्न सुभगे ।। 97.2

 

अहो विश्वाचे जी सहजचि संचालन करे

महाशक्ती ती गे अजुन कळली ना कधिच गे! ।

तुझ्या सामर्थ्याने अति सुगम ब्रह्मांड फिरते

परी माते तूची दुरधिगम ना आकळतसे ।। 97.3

 

तुरीया तू माते जनन-मरणाच्या पलिकडे

तुझ्या विस्ताराचा मज न दिसतो अंतचि शिवे

तुझ्या ह्या तत्त्वाचे स्मरण मजला नित्य घडु दे

तुझ्या पायी माझे नमन  मम हे शक्तिस्वरुपे ।। 97.4

 

कदा काले मातः कथय कलितालक्तक-रसं

पिबेयं विद्यार्थी तव चरण-निर्णेजन-जलम् ।

प्रकृत्या मूकानामपि च कविताकारणतया

कदा धत्ते वाणी-मुखकमल-ताम्बूलरसताम् ।। 98

तुझ्या आरक्ता ह्या चरणकमला कोमल अशा

किती शोभे लाक्षारसयुतचि गे लाल अळिता ।

कधी केव्हा कैसे मज चरण तीर्थोदक तुझे

मिळे ह्या जन्मी गे; पुरव मनिची आस दृढ गे ।। 98.1

 

असो कोणीही तो अकुशल कलाहीन नर गे

करे काव्यासी तो मधुरचि अलंकारयुत गे।

असे ह्या तीर्थाचा जननि महिमा उज्ज्वल असा

मिळे वाणी विद्या चतुरपण ते जन्म-बधिरा ।। 98.2

 

प्रभावाने ज्याच्या नित मिळत चातुर्य सकला

जणू वाग्देवीचा रुचिर मुख-तांबूल-रस हा ।

अशा ह्या तीर्थाचा मजसि घडु दे लाभ सुखदा

अगे माते माझे चरणकमली वंदन तुला ।। 98.3

 

सरस्वत्या लक्ष्म्या विधिहरिसपत्नो विहरते

रतेः पातिव्रत्यं शिथिलयति रम्येण वपुषा ।

चिरंजीवन्नेव क्षपित-पशु-पाश-व्यतिकरः

परानन्दाभिख्यं रसयति रसं त्वद्भजनवान् ।। ९९ ।।

( वपु – शरीर. वपुषा - शरीराने. त्वत् भजनवान- तुझे भजन करणारा. अभिख्य – ख्याती, यश, शोभा, प्रसिद्धी. सपत्न – शत्रू, विरोधी, प्रतिद्वंद्वी. विधिहरीसपत्न – ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्याकडे प्रतिद्वंद्वी  वा शत्रू म्हणून पाहतात. व्यतिकर - संबंध. )

मनोभावे येतो शरण तुजला भक्तवर जो

तुझ्या भक्तासी त्या निरतिशय आनंद मिळतो

तया संगे राहे सतत मतिदात्री व कमला

घडे वाग्देवीचा नरवर रमेचाहि प्रिय हा।। ९९.१

 

पहाता दोघींना सतत सहवासात तयिच्या

हरि ब्रहमा त्याचा हृदि करति गे मत्सर महा

दिसे तेजस्वी तो प्रचुर धन विद्या मिळविता

फिरे डौलाने तो मिरवितचि ऐश्वर्य सकला ।। ९९.२

 

तुझ्या भक्ताच्या गे शिरि वरदहस्तास बघता

तयामध्ये भासे मदन अति सर्वांगसुरुपा

तयाच्या सौंदर्ये सहज फसते ही कशि रती

तिच्या पातिव्रत्या कशि शिथिलता ये क्षणभरी ।। ९९.३

 

करे श्री विद्येचे हृदि निरत आराधनचि जो

सुदीर्घायुष्याचे फळ मिळवितो भक्तवर तो

घडे अज्ञानाचा लय सकल माते तव कृपे

तयाने जीवाचे गळुन पडती पाश अवघे ।। ९९.४

 

सुदैवी मुक्तात्मा अविरत निजानंद मिळवे

मला तैसी मुक्ती जननि पशुपाशातुनचि दे ।। ९९. ५


 

प्रदीपज्वालाभिर्दिवसकर-नीराजनविधिः

सुधासूतेश्चन्द्रोपल-जल-लवैरर्घ्यरचना ।

स्वकीयैरम्भोभिः सलिल-निधि-सौहित्य-करणं

त्वदीयाभिर्वाग्भिस्तव ननि वाचां स्तुतिरियम् ।। १०० ।।

( दिवसकर – सूर्य, चंद्रोपल – चंद्रकांत मणी. असे म्हणतात की चंद्रच्या किरणांनी तो पाझरतो/ पाघळतो. ) 

जसे ओवाळावे उजळुनि दिवा त्या दिनकरा

मनोभावे पूजा कुणिच अनलाचीच करण्या ।

दिवा दावी त्या हो, अति प्रखर अग्नीस नमुनी

करे श्रीगंगेसी जळ लव तिचे अर्पण जळी ।।१००.१

 

समुद्रा पूजाया जलनिधितुनी ओंजळभरी

जलासी घेऊनी पुनरपि जसे तर्पण करी ।

सुधाकुंभा जैसा शशि बरसवी अमृतसरी

प्रकाशाने त्याच्या विरघळतसे चंद्रमणिही ।।१००.२

 

रसाने रत्नाच्या रजनिपतिचे पूजन जसे

करावे; तैसे गे मम कृति असे हे जननि गे ।

करे दो शब्दांनी स्तुति तवचि शब्दांकित तशी

असे मी केलेली लव उचलुनी शब्द-धन ची ।। १००.३

 

जिच्या विस्तारासी नच जगति सीमाच कुठली

अशा वाणीची तू जननि असशी अमृतमयी।

उभ्या ऐश्वर्याचा अमित तव विस्तारचि कुठे

कुठे माझे बाळास चिमखडे बोलचि थिटे ।।१००. ४

( उभ्या ऐश्वर्याचा म्हणजे संपूर्ण ऐश्वर्याचा. काळानुरूप हा शब्द दुर्बोध झाला असला तर महा ऐश्वर्याचा असा पाठ घ्यावा. )

 

नसे दोन्हीची गे जननि तुलना ती लवभरी

परी घे मानुनी मधुर तव पुत्राचिच कृती

अनन्या भावाने जननि तव आलोच चरणी

अगे जाणोनी घे मम हृदयिचा भाव जननी ।। १००.५

---------------------------------

देती आनंद सर्वांसी । `सौंदर्यलहरी'च ह्या

उठती हृदयी  त्याने । आनंदाचे तरंग गा

त्या आनंद तरंगांनी । मराठीसहि स्पर्शावे

म्हणोनि ते मराठीते । अरुंधतिच आणते

--------------------------------------------------

6 जानेवारी 2023, पौष, शाकंभरी पौर्णिमा शके 1944


श्लोक   1 - 25

श्लोक  26 - 50

श्लोक  51 -  75

श्लोक  76 - 100