शिवानन्दलहरी ( विश्लेषणासहित ) -

 


।। ॐ नमः शिवाय ।।

 भाग   2   श्लोक 51 ते 100 ( विश्लेषणासहित ) -

शिवानन्दलहरी – 

  श्लोक 51 -

                ह्या श्लोकात वापरलेल्या विशेषणांचे दोन अर्थ ध्वनित होतात. एक भुंग्याविषयी तर दुसरा अर्थ शिवाचे वर्णन करणारा आहे.

                भृङ्गीच्छा-नटनोत्कटः -  भृंगी म्हणजे भृंगाची प्रियतमा. तिला रिझवण्यासाठी  भुंगा तिच्याभोवती घिरट्या घालत राहतो. जणु काही नृत्यच करतो. शिवाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भृंगी ऋषींच्या इच्छेमुळे शिव नृत्य करण्यात रममाण झालेला आहे. भृंगी हे शिवाच्या गंणांपैकीही आहे. त्यांच्या इच्छेला मान देऊन शिव नृत्य करत आहे.

                 करि-मद-ग्राही   करि म्हणजे हत्ती. माजावर आलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून मदरस वाहत असतो. तो ग्रहण करण्यासाठी उत्सुक असलेला भुंगा. तर शिवाने गजासुराला ठार मारले. अहंकाराने धुंद झालेल्या गजासुराची मस्ती जिरवली. म्हणून तोही करि-मद-ग्राही आहेच.

 

             स्फुरन्माधवाह्लादः माधव म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतुत फुललेल्या फुलांच्या ताटव्यांमुळे भ्रमर आनंदून जातात. त्यांना अत्यंत आह्लाद होतो  आणि ते आनंदाने गुंजन करू लागतात. म्हणजेच असे नाद-युतः असतात. तर

शिवाला पाहून  माधवाला म्हणजेच विष्णूला अत्यंत आनंद होतो. शिवाच्या डमरूतून विविध नाद निघत असतात. वा शिव विविध वाद्ये उत्तम वाजवतो व त्यातून मधुर ध्वनि निघतात. किंवा शिव हा नादयुत म्हणजे ॐ स्वरूप आहे.    म्हणून शिवशंभूला नाद-युतः म्हटले आहे.

             महा असित वपुः - भुंगा रंगाने अत्यंत काळाभोर म्हणजे महा असित वपुः असा असतो. सित म्हणजे पांढरा. असित म्हणजे काळा. वपु म्हणजे शरीर. हाच संधी जर महा-सित-वपुः असा सोडवला तर शिवाचा वर्ण गौर आहेच त्यात भस्मलेपनानने तो अजूनच गौर, गोरा दिसत आहे.

 

                 पञ्चेषुणा चादृतः - मदनाला पंचेषु किंवा पंचबाण म्हणतात. शिवाने मदनाला भस्म केले तरी त्याच्यावर परत कृपाही केली. तो प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्याला सर्वांच्या मनातच राहण्यासाठी स्थान दिले.  तो प्रत्यक्ष दिसला नाही तरी काम रूपाने प्रकट होतो म्हणून त्याला अनंग, काम अशी नावे मिळाली. अशा प्रकारे जीवदान मिळण्यामुळे त्याला महादेवांविषयी अत्यंत आदर आहे.

तर मदनाने जगाला जिंकायला जी सामग्री वापरली त्यात अप्सरा, फुले, सुगंध, वायु हे जसे आहेत तसा भ्रमरही आहे. म्हणजे भ्रमर हा अंग/ देह विरहीत असलेल्या कामदेवाचा दृश्य परिणामस्वरूप आहे. म्हणून पञ्चेषुणा चादृतः हे विशेषण त्यालाही चपखल बसते. शिवही पञ्चानन आहे.

                     सत्पक्षःभुंगा त्याचे सुंदर पारदर्शी पंख पसरून घिरट्या मारतो म्हणून त्याला सत्पक्ष म्हटले आहे. तर शिव म्हणजेच कल्याणकारी. तो कायम सत्याचाच पक्ष घेतो. म्हणून त्याला आचार्य सत्पक्षः म्हणतात.

               सुमनोऽवन सुमन/ फुलांच्या वनात भुंगा रमून जातो. त्याला राजीव म्हणजे कमळ आवडते.

  सुमन म्हणजे देव किंवा सन्मार्गी ऋषी मुनी. अवन म्हणजे रक्षण करणे. शिव देवांचे आणि ऋषीमुनींचे रक्षण करतो. म्हणून त्याला सुमनोऽवन म्हणतात. अशा ह्या श्रीशैल्य पर्वतावर निवास करणार्‍या शिवरूपी भ्रमराला भक्तांच्या हृदयकमळात रहायला आवडते. तो तेथेच रमून जातो. म्हणून श्री शंकराचार्य म्हणतात  ``हे शिवरूपी भ्रमरा, तू  माझ्या हृदयकमलात रमून जा.’’ ह्या श्लोकात सर्वांगपरिपूर्ण रूपकाची कल्पना श्री शंकराचार्यांनी फार सुंदर केली आहे.

(वृत्त - शादूर्लविक्रीडित, अक्षरे-19,गण - म स ज स त त ग ) 

भृङ्गीच्छा-नटनोत्कटः करि-मद-ग्राही स्फुरन्माधवा-

ह्लादो नाद-युतो महा-सित-वपुः पञ्चेषुणा चादृतः।

सत्पक्षः सुमनोऽवनेषु स पुनः साक्षान्मदीये मनो-

राजीवे भ्रमराधिपो विहरतां श्रीशैलवासी विभुः।।51

 

भृंगीसी रिझवी मिलिंद करुनी गुंजारवासी जसे

प्रेमे नृत्य करून शंभु रिझवी भृंगीऋषींसी तसे

येता हा ऋतुराज गंधमयची आनंदतो भृंग ही

प्रेमे गुंजन तो करून सुखवी पुष्पा-परागांसही।।51.1

 

होई हा नटराज तन्मय तसा नृत्यामधे रंगुनी

हर्षा ये भरतीच पाहुन तया ह्या माधवाच्या हृदी

सेवाया मधु भृंग आतुर मनी गंडस्थली धाव घे

तैसे मत्त गजासुरास वधिण्या झेपावतो शंभु रे।।51.2

 

काळाभोर मिलिंद नाद करितो  गुंजारवाचा अती

नाद ब्रह्म स्वरूप गौर शिव हा ॐकार नादा करी

फुंके शंखहि वाजवीच डमरू शंभू करी तांडवा

बोले पैंजण वाजवी कितिक ही वाद्येच साथीस त्या।।51.3

 

योजी आम्रसुमंजिरी परिमलू जेत्यांसही जिंकिण्या

पुष्पे,भृंगचि दिव्य बाण करती ते विद्ध सर्वां जना

ऐसा विश्वजयी अनंग जगती जो पंचबाणायुता

वाटे धाक तया मनी म्हणुन तो शंभूपदी नम्र का।।51.4

 

पंखांना हलवून मोहक अती जैसा फिरे भृंग हा

आनंदे सुमनावनात रमतो नाना सुखे दे तयां

तैसा सज्जन संगतीत धरुनी सत्पक्ष, राहे उभा

रक्षाया नित सज्जना सुरगणा शंभूमहादेव हा।।51.5

 

श्री शैलावर मल्लिकार्जुनरुपी राहे महा भृंग हा

हिंडे तो मकरंद गंधयुत हया पद्मांवरी सर्वदा

माझ्या मानसपंकजात भरला आमोद तो भक्तिचा

भृंगश्रेष्ठ महेश्वरा सुरवरा येथे सदा तू रहा।।51.6

------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 52 -

                 ग्रीष्म ऋतु आला की पाण्यासाठी जीव व्याकूळ होऊ लागतो. काळ्या ढगांची सारेजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहू लागतात. श्री शंकराचार्यही म्हणतात, 

               

``हे नीलकंधरा आपण लवकर या. सत्वर धावून या.’’  कं म्हणजे पाणी. पाणी धारण करणार्‍या जलदांना कंधर म्हणतात. हे ढग काळे असतात म्हणून ते नीलकंधर. त्याच प्रमाणे कंधरा म्हणजे कंठ. त्यामुळे नीलकंधरा म्हणजे नीलकंठ. म्हणजेच शंकर.

 

समुद्राच्या खार्‍या पाण्यातील क्षार काढून समुद्राचं गोड पाणी घेऊन ढग येतात. त्यामुळेच सारे प्राणिमात्र समुद्राची नाही तर नीलमेघांची आतुरतेने वाट पाहात असतात. सागरमंथनाच्या वेळी समस्त देव आणि दैत्य गणांच्या मदतीला शिवशंभू धावून गेले. समुद्रातून निघालेलं जळजळीत विष पिऊन त्यांचा कंठ ही काळानिळा झाला. शिवामुळेच सर्व उत्तमोत्तम गोष्टी देवांना मिळाल्या.

 

 संस्कृत वाङ्मयात असे मानतात की चातक पक्षी जमिनीवर पडलेले पाणी पीत नाही. तो पावसाच्या धारांमधीलच पाणी पितो. आचार्य म्हणतात, ``मी तहानलेला चातक पक्षी आहे. हे नीलकंठा आपण कृपेने ओथंबलेला मेघ बनून या. आणि आपल्या करुणारूपी अमृताचा वर्षाव करा. आणि मला तृप्त करा. भक्त जनांना बसणार्‍या दुःखरूपी उन्हाळ्याच्या चटक्यांना आपल्याशिवाय कोण दूर करू शकेल? त्यांनी घातलेल्या आर्त सादेला ओ देत आपण धावून येता. आपल्याच कृपावर्षावाने विद्यारूपी धान्याचं हिरवंगार शिवार त्याच्या संपूर्ण ऐश्वर्याने डुलु लागतं.

 

 हे कंठनीला, ढगांचे आकार सारखे बदलत असतात. त्याचप्रमाणे ज्या ज्या भक्तांच्या मनात आपले जसे जसे रूप तो चिंतत असेल त्या त्या रूपात आपण त्यांच्या हृदयात प्रकट होता. हे नीलकंधरा, ज्याप्रमाणे आकाशातील मेघ पाहून मोर नाचू लागतात त्याप्रमाणे चित्तात प्रकट झालेल्या आपल्या रूपाला पाहून हे सारे भक्त आनंदाने नाचू लागतात. मोरांच्या केकांनी वन जसे दणाणून जाते त्याप्रमाणे भक्तांच्या स्तुतीमंत्रांनी आसमंत भरून जातो. हे मेघ वार्‍यासोबत हलत राहतात त्याचप्रमाणे आपला केशसंभार वार्‍यावर उडत आहे.  मेघ डोंगराच्या शिखरावर आश्रय घेतात त्याप्रमाणे आपणही कैलास पर्वतावर राहता.

 

 हे नीलकंधरा, माझे चित्त-चातक अत्यंत व्याकूळ होऊन आपली प्रतिक्षा करत आहे. आपण कृपेचा वर्षाव करण्यासाठी कृपा वर्षाव करणारा मेघ बनून धावून या. मला कृतार्थ करा.’’ आचार्यांनी हया स्तोत्रात अशी सर्वांगसुंदर रूपके वापरली आहेत.

 

कारुण्यामृत-वर्षिणं धनविपद्ग्रीष्म-च्छिदा-कर्मठं

विद्या-सस्य-फलोदयाय सुमनः-संसेव्यमिच्छाकृतिम्।

नृत्यद्भक्त-मयूरमद्रि-निलयं चञ्चज्जटा-मण्डलं

शम्भो वाञ्छति नीलकन्धर सदा त्वां मे मनश्चातकः।।52

(कंधरा ग्रीवा,कंठ। कं  पाणीकंधर- पाणी धारण करणारा असा मेघ ।  नीलकंधर- नीलकंठ असा शंकर किंवा काळा ढग । चञ्चः हलणारा । कर्मठ / कर्मिष्ठकाम करण्यात तरबेज, कुशल. येथे संकट निवारण्यात कुशल।)

जो कारुण्यजले सदैव भरला तो मेघ तू शंकरा

वृष्टी तू नित सेवकांवर करी ही अमृताच्यासमा

त्याने संकटग्रस्त ग्रीष्म सरुनी आह्लाद वाटे जना

विद्या-धान्यरुपी शिवार फुलवी ' त्यांची असे याचना।।52.1

 

जैसे मेघ प्रतिक्षणी बदलती आकार हे अंबरी

जैसा भाव तसा दिसे विविध तू भक्तांचिया अंतरी

घेई श्यामल मेघ पर्वतशिरी मोदे विसावा जसा

कैलासी रमतो तसा प्रभुवरा हे नीलकंठा शिवा।।52.2

 

येता मेघ नभी मयूर करती आनंदनृत्या भुवी

तैसी मूर्ति तुझी पुढे प्रकटता हे नाचती भक्त ही

माझ्या ह्या मनचातकास सखया तृष्णा तुझी लागली

शंभो तू करुणासरी बरसवी माझ्यावरी सत्वरी।।52.3

--------------------------------------------- 

शिवानन्दलहरी

  श्लोक 53 –

                               मोर आणि शिवशंभू ह्या दोघांनाही ``नीलकंठ’’ म्हणतात. मोराचा कंठ नैसर्गिकच निळा असतो. तर विषप्राशनाने महादेवांचा कंठ नीलवर्णी झाला. मोर आणि शिवामधलं हे साधर्म्य श्री आद्य शंकराचार्यांनी मोठ्या सुंदर रीतीने ह्या श्लोकात दाखवून दिले आहे.

                              मोर आणि शिव दोघेही ``शिखी’’ आहेत. शिखी म्हणजे डोक्यावर तुरा असलेले. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतोच. तर हे संपूर्ण आकाशच शिवाच्या मस्तकावर तुर्‍याप्रमाणे शोभून दिसत आहे.

                            मोर आणि शिव दोघेही कलापी आहेत. कलाप म्हणजे पिसारा. पिसारा असलेले ते कलापी. मोराचा सुंदर पिसारा तर आपण पहातोच. त्याच्यावर असलेल्या सुंदर डोळ्यांच्या नक्षीने हा पिसारा अजूनच शोभिवंत दिसतो. श्रीशंकराच्या पाठीशी सर्व नागांचा नेता शेष उभा आहे. त्याला असलेल्या असंख्य फण्यांवरील असंख्य डोळ्यांमुळे शिवशंभूच्या मागेही शेषाची ही सुंदर प्रभावळ एखाद्या पिसार्‍याप्रमाणे शोभून दिसत आहे.

                               आकाश काळ्या ढगांनी भरून आलेलं पाहून, शैलांवर म्हणजे पर्वतांवर  श्यामवर्णी  मेघमालांची (घनरुची) गर्दी झालेली  पाहून, मोराच्या आनंदाला पारावार रहात नाही. मोर आनंदाने नाचू गाऊ लागतो. मोराच्या ह्या ओरडण्याला ``केका’’ म्हणतात. तर मोराला ``केकी’’. श्री महादेव त्यांच्या भक्तांना ओंकाराचा उपदेश देऊ लागले. की त्यांचाही धीरगंभीर आवाज पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमधे  घुमू लागतो. हा दर्‍याखोर्‍यात निनादणारा प्रणवोपदेश हाच जणु काही ह्या शिवमयूराच्या केका आहेत असे आचार्य म्हणतात. तसेच ``शैलसमुद्भवां’’ म्हणजे शैलराजपुत्री जी पार्वती जी ``श्यामा’’ म्हणजे सर्वलक्षणसम्न्न अशी लावण्यवती आहे; ``घनरुची’’ म्हणजे अत्यंत तेजस्वी आहे तिला पाहून नटराज शिवमयूर आनंदाने नृत्य करतात.

                          मोराला सुंदर उपवनांमधे विहार करायला आवडतं तर आद्यगुरू महादेवांना वेद आणि उपनिषदरूपी वनात विहार करायला. म्हणजेच महादेवांना वेदांचा उपदेश देण्याची आवड आहे.  अशा ह्या नीलकंठाला उद्देशून श्री आद्य शंकराचार्य म्हणतात,

  हे नीलकंठा, हे शिवरूपी मयूरा आपल्याला भक्तीभावाने माझे शतशत नमन. 

आकाशेन शिखी समस्तफणिनां नेत्रा कलापी नता-

नुग्राही-प्रणवोपदेश-निनदः केकीति यो गीयते।

श्यामां शैल-समुद्भवां घनरुचिं दृष्ट्वा नटन्तं मुदा

वेदान्तोपवने विहार-रसिकं तं नीलकण्ठं भजे।।53

( शिखी  डोक्यावर तुरा असलेला  म्हणजे मोर किंवा आकाशच तुर्‍याप्रमाणे धारण करणारा शंकर। कलाप -  पिसारा, प्रभावळ ।  फणिन्- शेष।  घनरुची   तेजस्वी, सर्वलक्षणसम्पन्न सुंदर स्त्री किंवा काळे ढग । )

हे आकाश तुर्‍यासमान दिसते शंभो तुझ्या मस्तकी

शेषाचा उघडा फणाचि दिसतो शंभो पिसार्‍यापरी

त्याचे नेत्र सहस्र हीच जणु का नक्षी पिसार्‍यावरी

नाचे शंभु-मयूर तो फुलवुनी त्याच्या पिसार्‍यासही।।53.1

 

केकांचाच प्रतिध्वनी उपवनी जैसा निनादे नभी

तैसे शब्द मुखातुनी प्रकटती गंभीरतेने अती

भक्तांसी उपदेश थोर करण्या उच्चारला शब्द ही

टाकी भारुन आसमंत; घुमतो ॐकार दाही दिशी।।53.2

 

पाहूनी नव मेघ आक्रमिति हे या अंबर प्रांगणा

नाचे नील मयूर तो थुइथुई झोकात मोठ्या जसा

तैसी रम्य सुलक्षणीच गिरिजा पाहून मोदे तुम्ही

आनंदे करुनीच तांडव तिला केलेचि अर्धांगिनी।।53.3

 

तू चोखंदळ कंठनील फिरसी वेदान्त बागेतुनी

जैसा मोरचि डौलदार विहरे स्वच्छंद रानातुनी

ऐसा सुंदर कंठनील स्मरतो मी नित्य माझ्या मनी

ह्या स्वर्गीय सुखास मी अनुभवी उत्फुल्ल झालो मनी।।53.4

------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 54 –

 

अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपत येतो. आकाशात मेघ जमू लागतात. पावसाळ्याला प्रारंभ होणार असतो. अशावेळी संध्याकाळी आकाश मेघांनी भरून येते. ढगाचा गडगडाट, विजांचा चमचमाट चालू असतांना लांडोरीसमवेत मोर मोठ्या हर्षाने नृत्य करण्यात दंग होतो.

           सन्ध्या घर्म-दिनात्यय म्हणजे उन्हाळा  संपत आलेला असतांनाच्या संध्याकाळी. कैलासावर राहणार्‍या शंभूमहादेवांनाही थंड हवाच आवडते त्यामुळे उन्हाळा संपत आला ही त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. दिवस मावळता मावळता  आनंदानी नृत्य करावे अशीच वेळ आहे.  तिन्ही सांजेला शिव पार्वतीसोबत तांडव नृत्य करू लागतात. शिवपार्वतीच्या अत्यंत मोहक, कमनीय आकृती आणि त्यांचे अत्यंत आकर्षक नृत्य पाहून जणुकाही शिवरूपी मयूरच त्याच्या प्रियतमे सोबत/लांडोरीसमवेत नृत्य करत आहे असे वाटते. शिवतांडव सुरू झाले की त्याने मोहित होऊन साक्षात विष्णू मृदुंग वाजवतात. मृदुंगाचे वाजवलेले ते बोल, ते तोडे म्हणजेच जणु काही मेघगर्जना. तेथे त्यांचे नृत्य पाहण्यासाठी सारे देवगण जमलेले असतांना मृदुंगाच्या तालावर थिरकणारे शिव पार्वतीचे पाय, नजर ठरणार नाही अशा दोघांच्या गिरक्या आणि गतीने होणार्‍या हालचाली पाहतांना देवांची नजर त्यावर ठरत नाही. त्या देवसमुदायाच्या सुंदर पाणीदार डोळ्यांची होणारी अत्यंत चंचल हालचाल  ह्याच जणु काही निषार्धात सर्ऽर्कन इकडून तिकडे जाणार्‍या वीजा आहेत. हा सर्व रोमहर्षक नृत्यप्रसंग पाहून तेथे जमलेल्या शिव-भक्तांच्या नेत्रातून अविरत वाहणारे आनंदाश्रु हीच जणु काही वर्षा आहे.

अशा अत्यंत रमणीय तांडवनृत्य करणार्‍या त्या शिवमयूराला माझे वंदन असो.

सन्ध्या घर्म-दिनात्ययो हरिकराघात-प्रभूतानक-

ध्वानो वारिद-गर्जितं दिविषदां दृष्टिच्छटा चञ्चला।

भक्तानां परितोष-बाष्प-विततिर्वृष्टिर्मयूरी शिवा

यस्मिन्नुज्ज्वल-ताण्डवं विजयते तं नीलकण्ठं भजे ।।54 

(घर्म-दिनात्ययो  उन्हाळ्याच्या दिवसांचा शेवट आणि पावसाळ्याचा आरंभ । दिविषद् – देव)

घे माघारचि ग्रीष्म पोळुन जगा, येता घनु या नभी

जाई रंगुन पश्चिमा कितिक या रंगात नानावधी

आकाशी घन गर्जती, नभ पुरे जाईच झाकोळुनी

तेजाची उठवीत रेघ निमिषे धावेचि सौदामिनी।।54.1

 

येती धावुन त्या सरींवर सरी पाऊस तो कोसळे

हर्षोत्फुल्ल मयूर तो थिरकतो पाऊस धारांमधे

लांडोरीस बघून भान हरुनी नाचे अती आर्जवे

त्याचा मोहक गर्भरेशिम-निळा कैसा पिसारा फुले।।54.2

 

तैसा शंकर कंठनीळ मजसी भासे मयूरापरी

गौरी शंकर नित्य सांज समयी नृत्यास साकारती

हर्षोत्फुल्लचि भक्त विस्मित मनी या तांडवा पाहुनी

मेघश्यामल वाजवीच हरि तो मेघारवी दुंदुभी।।54.3

 

दृष्टी ना ठरतेच पाहुनि अशा स्वर्गीय नृत्याप्रती

देवांच्या जणु लोचनी चमकते ही शुभ्र सौदामिनी

आनंदाश्रुच भासती जणु मला या पावसाच्या सरी

गौरी शंकर हे मयूर मयुरी नृत्यास साकारती।।54.4

 

त्यांचे तांडव हे विलक्षण असे राहे यशाच्या शिरी

चित्ती अद्वय नीलकंठ स्मरतो शंभो तुझा भक्त मी।।54.5

----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 55 –

            आपल्याकडे एक म्हण आहे ``आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार.’’ आड जर पाण्यानी काठोकाठ भरलेला असेल. तर रहाटगाडग्याला बांधलेलं मडकं/पोहरा पाण्याने शिगोशिग भरून येतो. ज्याला आपले दुःख सांगावे असे वाटते, तो ते दुःख हलके करू शकेल अशी पात्रता त्यात पाहिजे. ज्याला जे मागायचं त्याच्याकडे ती गोष्ट पुरेपूर पाहिजे. आणि त्याला दुसर्‍यांविषयी कनवाळुपणा, दानतही पाहिजे. तरच ती गोष्ट तो दुसर्‍याला देऊ शकतो. जर काही सर्वश्रेष्ठ गोष्ट मागायची असेल तर ती एखाद्या भणंगाला मागून काय उपयोग? ती सर्वश्रेष्ठ दात्यालाच मागायला हवी. माझ्या मनीची आस पूर्ण करणारा एकमेव दाता, देवांचे देव महादेव आहेत.

 

                        महादेव हे सर्व देवांमधे प्रमुख आहेत. आद्य आहेत. ते अमित तेजस् म्हणजेच अपरिमित तेज असलेले तेजःस्वरूप आहेत. इंद्रियांनी त्यांना जाणून घेणे शक्य नाही.  त्यांना जाणून घ्यायचे असेल तर श्रुती आणि वेदांच्या ज्ञानातूनच जाणून घेणे जमेल. जेंव्हा काही ध्येय नजरेसमोर ठेवायचे असेल तेंव्हा ते भव्य दिव्य असावे लागते. भक्तांना ध्येयस्वरूप असलेले शिवशंभू हे सर्व गुणसम्पन्न  आहेत. म्हणूनच भक्तांनी त्यांना प्राप्त करून घ्यावे असे ते एकमेवाद्वितीय ध्येय आहेत. विद्या आणि आनंद ह्या दोन्हींच्या मिलापातून जो ज्ञान आणि आनंदाकार तयार होईल तो म्हणजेच शिवशंभू आहेत. त्यांचं कार्य तर केवढं मोठं! ह्या तिनही जगतांच रक्षण करणं हे काम / हा उद्योग त्यांनी सर्वांच्या प्रेमापोटी स्वतःहून  स्वतःमागे लावून घेतला आहे. अखिल योगी जनांचं एकच ध्येय असतं. त्यांना एकच फळ प्राप्त व्हावं असं वाटतं. ते म्हणजे ब्रह्मपद! योग्यांचं ते अंतिम ध्येय, तेच कैवल्यनिधान म्हणजेच शिवशंभू आहेत. सकल सुरगणांनी जर कोणाचे गुणगान करायचे ठरविले, कोणाची स्तुतीस्तोत्रे आळवावी असे ठरविले तर त्या योग्यतेचे देवांचे देव एकमेव महादेवच आहेत. अनिमेष नेत्रांनी पहात रहावं, डोळ्याचं पारणं फिटेल, असं नृत्य ह्या अर्धनारीश्वराचच! अशा ह्या जटाधारी, जाणून घ्यायला अत्यंत कठीण अशा शंभू महादेवांना मी शरण जातो. त्यांना माझे शतशः प्रणाम! हे महादेवा आपणच माझे ध्येय आहात.

आद्यायामित-तेजसे श्रुति-पदैर्वेद्याय साध्याय ते

विद्यानन्दमयात्मने त्रिजगतः संरक्षणोद्योगिने।

ध्येयायाखिलयोगिभिः सुरगणैर्गेयाय मायाविने

सम्यक्ताण्डव-सम्भ्रमाय जटिने सेयं नतिः शम्भवे।।55

( आद्य देवांमधे प्रमुख,सर्वप्रथम,विश्वाचे मूळ अधिष्ठान । अमिततेजस् –- अपरिमित तेजस्वरूप । वेद्य -  वेदातील श्रुतिवचनांनीच जाणण्यास योग्य ।  साध्यभक्ताचे ध्येयस्वरूप वा फलस्वरूप। विद्यानन्दमयविद्या आणि आनंद हेच ज्यांचे स्वरूप आहे. मायावी -  मायेला खेळविणारे,आपल्या ताब्यात ठेवणारे किंवा आपल्या मायेने विश्वाला मोहविणारे  सम्यक् -  अत्युत्तम । जटिन्जटाधारी वा जाणण्यास अत्यंत कठीण. )

 

आहे देवगणात श्रेष्ठ शिव तू सारे तुला वंदिती

तूची ब्रह्मस्वरूप, ह्या जगतिचे आहे अधिष्ठान ही

तू तेजोनिधि जाणिती तुजसि रे हे भक्त वेदातुनी

प्राप्तीची तव आस नित्य धरुनी सारे तुला पूजिती।।55.1

 

तूची ज्ञान महान मोद असशी तू ध्येय योग्यांमनी

गावी कीर्ति तुझीच या सुरवरे ही श्रेष्ठता बा तुझी

झाले मोहित विश्व हे सकलची पाहून माया तुझी

मायेसी करुनीच अंकित शिवा तू लीलया खेळवी।।55.2

 

आहे तू कटिबद्ध नित्यचि उभा संरक्षण्या विश्व हे

हे अत्युत्तम नृत्य तांडव तुझे विश्वा करी थक्क रे

आश्चर्ये विनयेच सद्गगदित मी शंभो जटाधारिणे

वारंवार तुझ्या पदी नमितसे आता मला रक्षिणे।।55.3

---------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 56 –

           जे कालातीत नित्य असे शिवतत्त्व आहे;  ज्या शिव तत्त्वाला आदि वा अन्त नाही; जे विश्वाच्या संचलनासाठी सत्त्व, रज, तम ह्या त्रिगुणांनी नटलेले आहे; त्या शिवरूपाला, त्रिपुरान्तकाला माझा नमस्कार असो.

          कात्यायनी देवी म्हणजेच पार्वतीचे जे कल्याणस्वरूप, मूर्तिमंत मंगलच आहेत अशा नित्य सत्य शिवरूपाला मी वंदन करतो. सर्व विश्व हेच ज्यांचे कुटुंब  आहे आणि त्याचे पालन करणारे कुटुंबप्रमुख म्हणजेच जे आदिकुटुंब आहेत, त्या कुटुंबप्रमुखाला माझे नमन असो.

            ज्यांच्या चिन्मय मूर्तीचे मुनीजनांच्या हृदयात प्रत्यक्ष दर्शन होत असते, ज्यांच्या मायेने ह्या त्रैलोक्याची निर्मिती होते त्या परमेश्वराला मी अत्यंत नम्रपणे आभिवादन करतो.

              वेदांचा जो अतिंम भाग म्हणजे उपनिषदे आहेत, त्या उपनिषदांमधे संचार करणार्‍या किंवा उपनिषदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे तेच ज्याचे स्वरूप आहे अशा कल्याणस्वरूप शिवापुढे मी नतमस्तक आहे.

             प्रदोषकाळी तांडवनृत्यात आनंदाने मग्न असलेल्या, त्या जटाधारी शंभूमहादेवांना माझे शतशः नमन.

नित्याय त्रिगुणात्मने पुरजिते कात्यायनीश्रेयसे

सत्यायादि-कुटुम्बिने मुनि-मनः-प्रत्यक्ष-चिन्मूर्तये।

माया-सृष्ट-जगत्रयाय सकलाम्नायान्त-सञ्चारिणे

सायंताण्डव-सम्भ्रमाय जटिने सेयं नतिः शम्भवे।।56

( आम्नाय  पुण्यपरंपरा,सांगोपांग वेद तांडवसम्भ्रमाय  तांडवात गिरक्या घेणाऱया,तांडवात मग्न झालेल्या,उत्साहाने तांडव नृत्य करणार्‍या । नति -  झुकून अभिवादन करणे )

राहे नित्य भरून तू जगति या तू संपतो ना कधी

आहे निर्गुण निर्विकार जरि तू तीन्ही गुणांसी धरी

तू देहस्थित जिंकिली नित पुरे ऐसा असे निग्रही

अन्यायी त्रिपुरासुरास वधिता आनंदली मेदिनी।।56.1

 

तू सौभाग्यचि मूर्तिमंत असशी कात्यायनी देविचे

विश्वाचा परिवार  हा अमितची तू मुख्य त्याचा असे

अंतश्चक्षुच वापरून मुनि हे शंभो तुला पाहती

हे विश्वात्मक रूप पाहुनि तुझे सारेचि आनंदती।।56.2

 

त्रैलोक्यासचि निर्मिते सहज ही माया तुझी शंकरा

वेदांती मनमुक्त तूचि करिसी संचार विश्वेश्वरा

उत्साहे करि नृत्य तांडव महा आवर्तने घेउनी

भावे मी अभिवादना करितसे शंभू जटाधारिसी।।56.3

-------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 57 –

मूल खेळात रंगून गेलेलं असतं तेंव्हा त्याला आईची आठवण येत नाही. पण खेळता खेळता ते पडतं. कोपरं ढोपरं फुटतात. खरचटतं. मग ते रडण्याचा मोठ्ठा भोंगा लावत आईकडे धावत जात. तसच,

         आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणी माणसाला देवाची आठवण होत नाही. पण संकटं आली की देवाचे विचार येऊ लागतात. साधारणपणे पूर्व आयुष्य, बाल्य आणि तारुण्य अनेक गोष्टी मिळवण्यात निघून जातं. शिणलेल्या शरीराला मग देवाची आठवण येऊ  लागते, पण आता कशाला देवाची आठवण काढतोस? असे शंकराचार्य म्हणत नाहीत. ते अशा मनाने थकल्या भागल्या माणसाला ही दिलासा देतात. ह्या दमल्या भागल्या माणसाचं  दुःख स्वतःवर आरोपित करूनच हा श्लोक लिहीतात. त्याच्यावतीनेच देवाला साकडं घालतात. आणि म्हणतात,

हे पशुपते, हे शिवा,

 तुला सारेजण जीवनाचे परम कल्याण मानतात. पण इतके दिवस मला तुझी आठवणही आली नाही. मी माझ्या पोटापाण्याच्या, उद्योगाच्या निमित्ताने, पैसा मिळवण्याच्या हव्यासाने व्यर्थ फिरत राहिलो. नाना देशात भटकत राहिलो. शरीर झिजवत राहिलो. मला तुझी आठवण झाली नाही. मग तुझी सेवा, पूजा, अर्चा तर दूरच. पण माझं पूर्वजन्मीचं पुण्यच म्हणायला पाहिजे की हे शिवा तू सर्वान्तर्यामी आहेस. सर्वांच्या हृदयात निवास करतोस. माझे अंतरंग म्हणजे तूच आहेस. हे असं जर असेल तर तुला शरण आलेल्या ह्या तुझ्या अजाण लेकराला क्षमा करून त्याचे तूच रक्षण करायला पाहिजेस.


नित्यं स्वोदर-पूरणाय सकलानुद्दिश्य वित्ताशया

व्यर्थं पर्यटनं करोमि भवतः सेवां न जाने विभो।

मज्जन्मान्तर-पुण्य-पाक-बलतस्त्वं शर्व सर्वान्तर-

स्तिष्ठस्येव हि तेन वा पशुपते ते रक्षणीयोऽस्म्यहम्।।57

 

कासावीस करेची भूक मजसी; ही हिंडवे रे मला

पैशाची धरुनीच आस फिरलो देशोदिशी सर्व ह्या

चित्ती आठव ना तुझा मजसि रे झालाचि तेंव्हा कधी

नाही पूजन अर्चना स्तवन वा केले तुझे मी कधी।।57.1

 

आहे हे मम पूर्व सुकृत शिवा सर्वांतरी तू वसे

न्यायासी धरुनीच ह्या मम हृदी गंगाधरा तू वसे

आता  तू मज रक्षिणे प्रतिदिनी कर्तव्य आहे तुझे
राहो नित्य कृपा तुझी पशुपते मी लेकरू रे तुझे ।।57.2

---------------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 58 –


  हे आदिनाथा,

            हा सूर्य (वारिजबान्धव) एकटा असूनही उदयाला येताच सार्‍या भूमंडळाला, सार्‍या नभोमंडळाला तेजाने व्यापून टाकतो. त्याला मी पाहू शकतो. आपले तेज तर कोटिसूर्यप्रभा असे आहे. आपण कोटि सूर्यांसारखे तेजस्वी असूनही माझ्या अंतःकरणात असलेल्या घनदाट अज्ञानपटलाचा भेद करून आपण माझ्या दृष्टीसही पडत नाही. केवढं हे माझं अज्ञान! हे त्रिपुरान्तका, माझं हे घनतम अज्ञानपटल पण दूर करा आणि मला प्रत्यक्ष दर्शन दया.

एको वारिज-बान्धव: क्षिति-नभो-व्याप्तं तमो-मण्डलं

भित्त्वा लोचनगोचरोऽपि भवसि त्वं कोटिसूर्यप्रभः

वेद्यः किं न भवस्यहो घनतरं कीदृग्भवेन्मत्तम-

स्तत्सर्वं व्यपनीय मे पशुपते साक्षात्प्रसन्नो भव ।।58

( वारिजबान्धव – वारि पाणी. वारिज- पाण्यात जन्म घेते ते कमळ. कमळाचा सखा म्हणे जो त्याला उमलवतो तो सूर्य. )

 

तेजःपुंज रवी झणी वितळवी काळोख-साम्राज्य हे

तोची सूर्य तुझ्या समोर अगदी भासेचि निस्तेज रे

गौरीवल्लभ कोटि कोटि सविता ऐसे तुझे तेज हे

कैसा ना तरिही दिसे मजसि तू अंधार का ना फिटे।।58.1

 

आहे दाटचि केवढा मजपुढे काळोख हा ना कळे

कैसे पाहु तुलाच मी पशुपते अंधास या ना कळे

ह्या अज्ञान-तमास घोर हरुनी प्रत्यक्ष दे दर्शना

माझी आस पुरी करा मजसि द्या दृष्टी तुम्हा पाहण्या।।58.2

-------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 59 –

          ज्याला ज्या गोष्टीमधे अत्यंतिक रुची असते, ती गोष्ट मिळविण्याची आस त्याच्या हृदयाला निरंतर लागून राहते. ती गोष्ट मिळवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत राहतो. ती मिळाली की त्याच्या मनाला आनंदाचं उधाण येतं.         ह्या श्लोकात श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, 

हे परमेश्वरा,

हंसाला कमळांनी भरलेल्या कमलवनात रहायची अत्यंतिक आवड असते. चातकपक्षी पाण्याने ओथंबून आकाशातून येणार्‍या काळ्या मेघांची आतुरतेने वाट बघत असतो. चक्रवाक पक्षी कधी एकदा दिवस उजाडेल आणि कधी मला माझी प्रिया भेटेल म्हणून सूर्यांची प्राण कंठात आणून वाट बघत असतो.( सूर्यास्ताबरोबरच क्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याचा वियोग होतो आणि सूर्योदयाबरोबर त्यांचे पुन्हा मिलन होते असे मानतात.)  चकोरपक्षी चंद्राचे चांदणेच पिऊन जणु काही जगतो असे म्हणतात. त्यामुळे तो चंद्राची आतुरतेने वाट बघतो.

             त्याप्रमाणे हे गौरीनाथा, ज्ञानमार्गानेच ज्याला गवसणी घालता येऊ शकते अशा मुक्तीसुखाच्या प्राप्तीसाठी माझं मन, माझं हृदय, माझं चित्त अत्यंत व्याकूळ होऊन तुमच्या कमळांसारख्या कोमल पावलांची आस धरून बसलेलं आहे. मला आपले चरणकमल दिसावेत ही एकच उत्कट इच्छा माझ्या मनात आहे. माझ्या मनातील ही तळमळ आपण पूर्ण करा.

(चातक  चक्रवाक, चकोर हे संस्कृत साहित्यात  नेहमी उल्लेख केले गेलेले पक्षी आहेत.

 चकोर फक्त चंद्रकिरणे पिऊनच राहणारा पक्षी आहे. तर चातक पक्षी जमीनीवर पडलेले पाणी पीत नाही. तो फक्त ढगातून ,तेही खास करून पहिल्या पहिल्यांदा जे काळे ढग येतात त्याच्यातून पडणे ण्याचे थेंब पिऊनच राहतो.

चक्रवाक पक्ष्यांच्या मिथुनाबाबत असे म्हणतात की सूर्य मावळला की  चक्रवाक मिथुनाची ताटातूट होते. कधी कधी ते पक्षी कमळाच्या फक्त एका पाकळीचा पडदा मधे आल्याने एकमेकांना भेटू शकत नाहीत. रात्रभर ते एकमेकांना साद घालत राहतात. पण सूर्य उगवल्याशिवाय त्यांना आपल्यामधे फक्त एका कमळाच्या पाकळीचाच पडदा होता हे कळत नाही.  ह्या श्लोकात ``कोकः कोकनदप्रियं’’ ह्या दोन शब्दांमधे थोडं सविस्तर असे - कोकः म्हणजे  चक्रवाक,  कोकनदप्रिय म्हणजे सूर्याची आतुरतेने वाट बघत असतो. (लाल कमळाला /कोकनदाला प्रिय तोही सूर्यच)


हंसः पद्मवनं समिच्छति यथा नीलाम्बुदं चातकः

कोकः कोकनदप्रियं प्रतिदिनं चन्द्रं चकोरस्तथा।

चेतो वाञ्छति मामकं पशुपते चिन्मार्गमृग्यं विभो

गौरीनाथ भवत्पदाब्जयुगलं कैवल्य-सौख्य-प्रदम्।।59 

( कोक - सूर्य,चक्रवाक   कोकनद -  लाल कमळ । कोकनदप्रियं -  सूर्य। नीलाम्बुदम् काळे ढग । चेतः मन/चित्त। चिन्मार्गमृग्यम्ज्ञानमार्गातूनच ज्याचा शोध लागू शकतो  )

जेथे पद्मकळ्याच अस्फुट किती पद्मांसवे डोलती

ऐशा पद्मवनात मुक्त रमणे हंसा रुचे मानसी

यावे ते घननीळ मेघ गगनी हे चातकाच्या मनी

होई आतुर चक्रवाक बघण्या सूर्यास या अंबरी।।59.1

 

चंद्रासी बघण्या चकोर झुरतो प्रीती अनोखी अती

तैसे हे मन शोधते शिवपदा व्याकूळतेने किती

ज्ञानाचा पथ नेतसे अचुक हा त्या पादपद्मांप्रति

जेथे मौक्तिक `मुक्ति-सौख्य ' मिळतो जो भूषणा भूषवी।।59.2

------------------------------------------------------ 

शिवानन्दलहरी

  श्लोक 60 –

            पुराच्या रोरावत जाणार्‍या त्या पाण्याच्या लोंढ्यात पडलेला कोणीही जीव, ज्या आसोशीने काठाला लागायचा, काठ घट्ट पकडण्याचा प्रयत्न करेल; कडाक्याच्या उन्हात अंगाची लाही लाही होत असतांना, तापलेल्या रस्त्यावर चालतांना, पाय पोळत असलेल्या जीवाची झाडाच्या सावलीसाठी जी तगमग चालू असेल, धुँवाधार पावसात सापडलेला कोणी ज्या वेगाने एखाद्या निवार्‍याच्या जागेकडे धाव घेईल, एखादा भुकेने कासावीस झालेला जीव ज्याप्रमाणे एखाद्या अन्नदात्याच्या घराकडे उत्कंठेने जाईल; एखादा तहानलेला जसा पाण्याकडे धाव घेईल; संसारतापाने पोळलेला सद्गुरूंच्या चरणी शरण जाईल; जेथे डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही अशा घनदाट अंधारात घाबरलेला जीव प्रकाशासाठी, एखाद्या छोट्याशा पणतीसाठी वाट्टेल ती धडपड करेल; थंडीने हुडहुडी भरलेला शेकोटीच्या उबेसाठी उत्कंठित होईल;  त्याच तळमळीनी, त्याच आसोशीनी, त्याच उत्कंठेनी, तशीच प्राणांची बाजी लावून हे माझ्या मना तू सतत कल्याणाचाच मार्ग दाखविणार्‍या त्या सदाशिवांच्या कमल कोमल पावलांवर शरण जा. ते गंगाधराचे चरण तू अजिबात सोडू नकोस. तुझ्या हृदयाशी घट्ट घट्ट कवटाळून धर. त्यातच तुझे जन्मोजन्मीचे हित आहे.

 

रोधस्तोयहृतः श्रमेण पथिकश्छायां तरोर्वृष्टितो

भीतः स्वस्थ-गृहं गृहस्थमतिथिर्दीनः प्रभुं धार्मिकम्।

दीपं सन्तमसाकुलश्च शिखिनं शीतावृतस्त्वं तथा

चेतः सर्वभयापहं व्रज सुखं शम्भोः पदाम्भोरुहम्।।60

 

( रोध - काठ । स्वस्थ गृहं -  निवारा ।  दीपं सन् तमसा आकुल च  जसा अंधारानी घाबरलेला दिव्याची इच्छा करतो   सन्  इच्छा करणे, पसंत करणे,प्राप्त करणे । सन् तमस आकुलअंधाराने घाबरलेला इच्छा करतो । शिखिनं -  आग, अग्नी, शेकोटी )

जाई वाहुन वेगवान जळी जो रोरावणा र्‍या अती

प्राणांची करुनी शिकस्त पकडे काठास जैशापरी

ओके आग प्रचंड सूर्य गगनी भाजून काढे भुई

तेंव्हा आश्रय घेतसे तरुतळी पांथस्थ जैशापरी ।।60.1

 

धो धो पाउस लागता कुणि पळे जैसा निवार्‍यातची

थंडीने भरता नरा हुडहुडी शेकोटि लावे जशी

अंधारातही शोधितोचि पणती अंधारभीरू जशी

   शोकग्रस्त धरेचि संग गुरुचा आधार त्या वाटुनी।।60.2

 

कासावीस चि होतसे अतिथि जो पोटी भुकेने अती

जैसा शोधि गृहस्थ सज्जन भला तो अन्नदाता भुवी

होई व्याकुळ प्राशिण्या जल जसा धावे जलामागुती

तैसे संकट पाहुनी मम मना गौरीहरा आठवी।।60.3

 

शोधी सत्वर पादपद्म युगले मृत्युंजयाची मना

दुःखाचा करि जी निरास सहजी जागा उरे ना भया

लाभावे मज सौख्य ही तव असे दुर्दम्य इच्छा जरी

ठेवी  घट्ट धरून तू चरण हे गंगाधराचे हृदी।।60.4

----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 61 –

       ह्या श्लोकाला सुरवात करण्यापूर्वी दक्षिण भारतातील अंकोल ह्या  झाडाबद्दल थोडी माहिती श्लोकाच्याच शार्दूलविक्रीडित ह्या वृत्तात पाहू या.

येती पुष्प फळे वसंतऋतुते अंकोलवृक्षाप्रति

येता ग्रीष्म, सडा पडे तरुतळी, त्याच्या फळांचा किती

मुंग्या, कीटक गोड गोड गर तो खाती तयांचा पुरा

बीजे मुक्तची वाळुनी पसरती मातीत त्या खालच्या।।

जाता ग्रीष्म सरून वावटळ ती येतेच जेंव्हा नवी

संगे घेउन पावसास चमके विद्युल्लता ती नभी

काळोख्या रजनीस ती विखुरली बीजेच मातीतली-

घेती आश्रय  घट्टची बिलगुनी वृक्षास फांद्यांसही।। 

ना सोडी तरुसी तिथेच रुजती  अंकोल वृक्षापदी

तैसे चित्त सदैव पाउलि तुझ्या राहो भवानीपती

त्यासी अन्य गती नसो तुजविणा गंगाधरा कोणती

माझी भक्ति रुजो तुझ्याच चरणी ही प्रार्थना एकची।।)

 

असे म्हणतात की, ही बीजे  झाडाला जाऊन कशी चिकटतात हे पाहण्याचा  श्री आद्य शंकराचार्यांनी खूप वेळा प्रयत्न केला. पण त्यांनाही ते पाहता आले नाही. असो! श्लोकाकडे वळू या.

 

           श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, खरी भक्ती जाणून घ्यायची असेल तर अंकोल वृक्षाच्या बिया बघा. कुठल्या आंतरिक ओढीने त्या परत झाडाला जाऊन चिकटतात, तिथेच रुजतात आणि तिथेच पल्लवित होतात हे अनाकलनीय आहे. कितीही वेळेला सुई लोहचुंबकापासून दूर केली तरी ती परत परत त्यालाच जाऊन चिकटते; सुसंस्कारित स्त्री ज्याला पती म्हणून एकदा वरते तो कसाही असला तरी त्याला ती मनानेही सोडत नाही. वेलीँनी एकदा का आधारासाठी एखाद्या झाडाचा आश्रय घेतला की, त्या शेंड्यापर्यंत त्या झाडाला वेढून टाकतात. पर्वतातून निघालेली नदी न पाहिलेल्या समुद्राला भेटण्यासाठी इतकी आतुर असते की ती परत कधी मागे वळूनही बघत नाही. सापाने कात टाकल्यावर ज्याप्रमाणे तो तिच्याबद्दल थोडीही आसक्ती ठेवत नाही त्याप्रमाणे, त्याप्रमाणे, जे मन सर्व विषयांचा त्याग करूनभुंगा जसा उमललेल्या कमळाला जराही सोडून जात नाही, तिथेच गुंजन करत राहतो, त्याप्रमाणे गंगाधराच्या पायांवरच गुंतून राहते; परत कुठल्याही विषयांकडे धाव घेत नाही; ज्या मनाला फक्त शिवाच्या कमल-कोमल पावलांची आस लागली आहे, तेच मन भक्तीरसात परिपूर्ण बुडाले आहे असं म्हणता येईल. तीच खरी भक्ती.

 

 

 

अङ्कोलं निज-बीज-सन्ततिरयस्कान्तोपलं सूचिका

साध्वी नैज-विभुं लता क्षितिरुहं सिन्धुः सरिद्वल्लभम्।

प्राप्नोतीह यथा तथा पशुपतेः पादारविन्दद्वयं

चेतोवृत्तिरुपेत्य तिष्ठति सदा सा भक्तिरित्युच्यते।।61

 

(  कान्तोपलम् / कान्तायसम् / अयस्कान्त - लोहचुंबक । सूचिका -  सुई ।  क्षितिरुहम् -  वृक्ष । सरिद्वल्लभसरितेचा/नदीचा पती सागर )

 

 

देठातून सुटे परीच चिकटे अंकोल-वृक्षास बी

वा आकर्षण लोहचुंबक-सुई हे संपते ना कधी

जैसा एक पती मनी वसतसे साध्वीचिया अंतरी

आधारासचि शोधते तरु महा जैसी सदा वल्लरी।।61.1

 

जाई पर्वत सोडुनीच सरिता रत्नाकराच्या जळी

माघारी परतून ती पुनरपी जाई न मागे कधी

तैसी वृत्ति न जाणिते विषय जी आसक्त ना अंतरी

टाके जी विषयांस कात म्हणुनी, ठेवी स्पृहा ना मनी।।61.2

 

घेई धाव अनन्यभाव धरुनी विश्वेश्वराच्या पदी

त्या आरक्त नितांत सुंदर अशा उत्फुल्ल पद्मांपरी

सोडी ना कमलास भृंग क्षण ही तैसीच शंभूपदी

राहे जी दृढ; सोडिना कधि पदा, ती भक्ति आहे खरी।।61.3

-------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 61 –

       वरील श्लोक क्र. 61 मधे अनन्य भक्ती कशी असते हे सांगितल्यावर शंकराचार्य म्हणतात, जो भक्त अशी अनन्य भक्ती करतो, त्या भक्तांची सर्व काळजी त्याची भक्तीरूपी जननीच घेते. ही भक्तीरूपी माय आपल्या भक्तरूपी शिशुची कशी काळजी घेते हे सांगतांना श्री आद्यशंकराचार्य म्हणतात,

          ही भक्तीरूपी माय आपल्या शिशुचे अत्यंत प्रेमाने लालनपालन करते.  आनंदाश्रुंनी न्हाऊ घालते. त्याने बाळ/भक्त  ताजातवाना आनंदित होऊन जातो. निर्मलतेचे पांघरूण ती आपल्या लाडक्याच्या अंगावर मोठ्या प्रेमाने घालते. भक्तीमाय आपल्या सुवचनांचा शंख किंवा बोंडले करून त्यातून आपल्या शिशुला ``शिवचरित्ररसामृत’’ पाजते. एकटक आपल्या शिशुकडे प्रेमाने पहात ती जणु काही त्याची दृष्ट काढते आणि विभूतीचा आंगारा लावून, आणि अंगावरून रुद्राक्ष फिरवून म्हणते, ``माझ्या सोनुल्याची सर्व इडापीडा टळो. शिव तुझे संरक्षण करो.’’ मग मांडीवरील या बाळाला ती हलकेच ध्यानाच्या अंथरुणावर ठेवून म्हणते, बाळा आता समाधिसुखाची निद्रा घे.

आनन्दाश्रुभिरातनोति पुलकं नैर्मल्यतश्छादनं

वाचाशङ्खमुखे स्थितैश्च जठरापूर्तिं चरित्रामृतैः।

रुद्राक्षैर्भसितेन देव वपुषो रक्षां भवद्भावना-

पर्यङ्कं विनिवेश्य भक्ति-जननी भक्तार्भकं रक्षति।।62

( पुलकम् - पुलकित करणे, आनंदित करणे ।  भसित  विभूति । नैर्मल्य  निर्मळता ।  पर्यङ्क  पलंग, शेज )

 

भक्तीरूपचि माय भक्त-शिशुचे मोदे करी पालन

आनंदाश्रुत न्हाऊ घालुन करी बाळास आनंदित

घाले निर्मळताचि पांघरुण हे अंगावरी त्याचिया

वाणीचा करुनीच शंख भरवी शंभूचरित्रामृता।।62.1


लावूनीच विभूति दृष्ट शिशुची ही काढते नित्यची

मायेने फिरवीच माय शिशुच्या रुद्राक्ष अंगावरी

प्रेमाने निज तान्हुल्यास म्हणते `` पीडा टळो सोनुल्या

बाळा, शंभु करील रक्षण तुझे; घेई समाधीसुखा ''।।62.2

 

ध्यानाची करुनीच शेज निजवी भक्ती तिच्या अर्भका

सांभाळी नित वाढवीच जननी हा बाळराजा तिचा।।62.3

-----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 63 –

               तिरुपती क्षेत्राजवळ कलहस्ति गावात असलेल्या शंकराच्या देवळात, पुजारी रोज पूजा करून गेला की रात्री, कण्णप्प नावाचा पारधी येत असे. तो शंकराचा मोठा भक्त होता. रात्री सामसूम झाले की शंकराची पूजा करण्याकरता नदीवर जाऊन तोंडात पाण्याची चूळ भरून आणत असे. आपल्या तुटक्या, धुळित भरलेल्या चपलांनी तो शंकराच्या पिंडीवरील पूजा फुलं झाडून टाकी. तोंडातील चूळ फू करून शंकराच्या पिंडीवर टाकी. शिकार करून कुटुंबाचं भरण पोषण करून उरलंसुरलं  मांस शंकराला अर्पण करी.

                    रोज आपण केलेली पूजा विस्कटलेली पाहून आणि गाभार्‍यात मांसाचे तुकडे पडलेले पाहून पुजारी दुःखी होत असे. त्याला शंकरानी स्वप्नात येऊन सांगीतले की, ``पूजा विस्कटल्याचे दुःख मानू नको. तो माझा अनन्य भक्त आहे. त्याच्या प्रेमाची चुणुक आज रात्री तू गाभार्‍यात लपून गुपचुप बघ. रोजच्या प्रमाणे पारधी आला असता त्याला शंकराच्या पिंडीत प्रत्यक्ष शंकराचे दर्शन झाले. शंकराच्या एका डोळ्यातून रक्त वाहत होते. ते पाहून तो इतका दुःखी झाला की त्याने बाणाच्या पात्याने आपला एक डोळा काढून शंकराच्या डोळ्याला लावला. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी कण्णप्पाला दृष्टी दिली. गुरवालाही कण्णप्पाच्या अनन्य भक्तीची चांगलीच कल्पना आली. 

               अनन्य प्रेमात स्वार्थाचा लवलेश नसतो. दुसर्‍याच्या दुःखाने माणूस इतका द्रवतो की प्रसंगी आपले प्राणही द्यायला मागे पुढे बघत नाही. त्याला आपल्या प्राणांचं मोलंही वाटनासं होतं. कारण तेथे कोणताच द्वैतभाव नसतो.

देवासाठी जीव ओवाळून टाकणार्‍या ह्या भिल्लाला पाहून शेवटी श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, अनन्य भक्ती काय करत नाही? काहीही करू शकते. हे शंभो, खरोखरच तू धन्य आहेस की तुझे असे अनन्य भक्त आहेत.

मार्गावर्तित-पादुका पशुपतेरङ्गस्य कूर्चायते

गण्डूषाम्बु-निषेचनं पुररिपोर्दिव्याभिषेकायते।

किञ्चिद्भक्षित-मांस-शेष-कवलं-नव्योपहारायते

भक्ति किं नकरोत्यहो वनचरो भक्तावतंसायते।।63

( मार्गावर्तित-पादुका – रस्त्यात ये जा करून धुळीने भरलेली पादत्राणे ।  कूर्चायते –- झाडून काढणे । गण्डूषाम्बु-निषेचनं - तोंडातील चूळ फू करून टाकणे । नव्योपहारायते -  ताज्या पक्वान्ना सारखा होत आहे )

 

जोडे जे भरले धुळीत करुनी ये जा पथी सारखी

तेची होउन कुंचले करि कसे शंभो सफाई तुझी

गाली साठविलीच चूळ तुजला अंघोळ वाटे बरी

मांसाचे उरलेचि घास तुजला नैवेद्य पक्वान्न ही ।।63.1

 

ज्याची भक्ति अनन्य ही तुजवरी तोची तुझा लाडका

कोणी तो भटकाचि भिल्ल असु दे वाटे तुला आपुला

तोची भक्त-शिरोमणी ठरतसे शंभो कृपेने तुझ्या

भक्ती काय करी न ते मज कळे तू धन्य रे वत्सला।।63.2

------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 64 –

``हे चन्द्रशेखरा,

            जी कामे पाहून नेत्र आश्चर्याने विस्फारले जातील अशी अशक्य कामे आपण करून दाखवली. आपल्या अनन्य भक्त असलेल्या मार्कंडेय ऋषींभोवती जेंव्हा यमाने यमपाश टाकले तेंव्हा, मार्कंडेय ``चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ।‘’असा आपल्या नावाचा धावा करू लागले. तो धावा ऐकून आपण धावून आलात आणि त्या यमाच्या छाताडावर अशी काही लाथ मारली आणि ते न तुटणारे यमपाश तटातटा तोडून टाकले की यमही भयग्रस्त झाला.

 

         आपण नटराजाचे रूप घेऊन अत्यंत राकट, दाणगट अशा अपस्मार दैत्याच्या अंगावर ताण्डव नृत्य करून अक्षरशः त्याला तुडवून तुडवून त्याचा लोळागोळा करून टाकला.

                हे कैलासराणा, जिथे तिथे बर्फ, खाचखळगे, टोचणारे दगडगोटे अशा अत्यंत पीडादायी हिमालयातील दुस्तर भूमीवर आपण कायम चालत असता.  केवढे हे कठोर परिश्रम!

             हे कमी की काय म्हणून,  आपल्याला नमस्कार करण्यासाठी ज्या देवांच्या झुंडी सतत आपल्या पावलांवर त्यांचे मुकुट टेकवतात, त्यांना जडवलेले हिरे, माणिक, पाचू आणि नाना रत्ने सतत आपल्या कोमल पावलांवर घासत राहतात. ही रत्ने असली तरी शेवटी अत्यंत कठीण असे दगडच की! ती आपल्या कोमल पावलांवर घासून आपल्याला त्याचा किती त्रास होत असेल!

           हे प्रभो! कुठे आपली कोमल पावले, आणि कुठे त्यांना करायला लागणारी ही कठोर कामे! हे गिरीशा, माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण माझ्या चित्तरूपी रत्नजडित पादुकांचा स्वीकार करा. त्या पायात घालूनच आपण ही सर्व कठोर कामे करा. त्याने आपल्या पावलांना जरासुद्धा इजा होणार नाही.’’

            आचार्यांची केवढी ही भक्ती! आपल्यासाठी काही ना काही मागून घेणारे भक्त कुठे आणि आपल्या आराध्याला जराही त्रास होऊ नये ह्याची इतकी काळजी घेणारा, सर्वश्रेष्ठ भक्तीचा परिचय करून देणारा हा असामान्य भक्त कुठे? 

वक्षस्ताडनमन्तकस्य कठिनाऽपस्मार-सम्मर्दनं

भूभृत्पर्यटनं नमत्सुर-शिरः-कोटीर-सङ्घर्षणम्।

कर्मेदं मृदुलस्य तावक-पद-द्वन्द्वस्य किं वोचितं

मच्चेतो-मणिपादुका-विहरणं शम्भो सदाङ्गीकुरु।।64

( कठिनाऽपस्मार-सम्मर्दनं – अत्यंत कठोर अशा अपस्मारदैत्याच्या शरीराचे पायाने संमर्दन करणे । भूभृत्पर्यटनं – कैलासावर फिरणे । नमत्सुर-शिर-कोटीर-सङ्घर्षणम् -  देवांच्या मुकुटातील रत्नरूपी पाषाणांचे शिवाच्या पायांवर होणारे घर्षण ।)

 

शंभो कोमल पाउले मृदुल ही आहेत पद्मासमा

केले उग्र कठीण कर्म सहजी कैसे तयांनी महा

मार्कंडेय `शिवा शिवा ' म्हणुनची धावा करीता तुझा

आला धावुन सत्वरीच सदया भक्तास त्या तारण्या।।64.1

 

छाताडावर लाथ मारुन यमा केले पराभूत त्या

तोडीले यम पाश ते तटतटा उद्धारिला भक्त हा

केले तांडव उग्र भीषण अती मारी अपस्मार हा

होऊनी नटराज त्या तुडविले नाहीच केली गया।।64.2

 

रत्नांचे मणिकांचनी मुकुटही हे देवची घासता

शंभो कोमल पादपद्मि तुझिया साहे कसा सांग ना

कैलासी खडकाळ दुर्गम अती बर्फाळ भागात त्या

कैसा वावरतोस कोमल अशा ह्या पावलाने शिवा।।64.3

 

कोठे हे तव पाय कोमल अती कोठे कृती व्यस्त या

माझी ही विनतीच मान सखया शंभो सदा वत्सला

माझ्या चित्तरुपीच रत्नजडिता घेई खडावा शिवा

घाली कोमल पावली नित तुझ्या आहे तुला प्रार्थना।।64.4

 -----------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 65 –

              एखाद्या युवकाचे कर्तृत्त्व, गुण, त्याचा प्रभाव पाहूनच कोणी लावण्यवती युवती त्याच्या प्रेमात पडते. हे चंद्रशेखरा आपला पराक्रमही असाच अलौकिक आहे. मार्कंडेयाला वाचवतांना आपला लत्ताप्रसाद मिळाल्याने हा यमही ``आता परत तर या शिवशंभूचा रोष ओढवून घ्यायला लागणार नाही ना? परत माझ्या छातीवर  त्यांच्या पायाचा असह्य  प्रहार तर होणार नाही ना?’’ असे वाटून अत्यंत भयभीत असतो. तर हे सर्व देवगणही आपल्या पराक्रमाने प्रभावित होऊन आपल्याला शरण येऊन सतत आपल्या चरणांवर त्यांचे मौल्यवान मुकुट झुकवून उभे असतात. जणु काही त्यांच्या रत्नजडित मुकुटांवरील देदिप्यमान रत्नांनी ते आपल्याला आरतीच ओवाळीत असतात.

              हे गिरीशा, आपला हा पराक्रम, आपला देव, दैत्य, आणि इतर तिनही लोकात असलेला दरारा, दबदबा पाहून ही मुक्तिरूपी वधू  आपल्या कमळासारख्या कोमल पावलांना दृढ आलिंगन देऊन बसली आहे. असा हा आपल्या चरणांचा महिमा आहे.

            म्हणजेच, जो अनन्यभावाने शिवाच्या चरणांवर शरण गेला आहे त्याला दुर्लभ ते काय?   त्याची सकल मनोरथे पूर्ण होतात.

 

वक्षस्ताडनशङ्कया विचलितो वैवस्वतो निर्जराः

कोटीरोज्ज्वल-रत्नदीप-कलिका-नीराजनं कुर्वते।

दृष्ट्वा मुक्तिवधूस्तनोति निभृताश्लेषं भवानीपते

यच्चेतस्तव पादपद्मभजनं तस्येह किं दुर्लभम्।।65

( वैवस्वत-  यम । निर्जराः -  ज्यांना जरा म्हणजे रोग नाही असे देव ।  निभृताश्लेषं  - दृढ आलिंगन )

क्रोधाने शिवशंभु तो करिल का लत्ताप्रहारा पुन्हा

ह्या वक्षावर माझिया' यम वदे; साशंक  चित्ती सदा

रत्नांचीच निरांजने करुन हे ओवाळती देव का

कोटी रत्न किरीटिचे उजळती पायी तुझ्या वंदिता।।65.1

 

पाहे मुक्तिवधू प्रभाव तव हा; घाले मिठी पाउली

सोडी ना पद हे तुझे क्षणभरी शंभो भवानीपती

येता भक्त अनन्य भाव धरुनी या पादपद्मी तुझ्या

आहे काय तयांस दुर्लभ जगी हे कंठनीळा शिवा।।65.2

------------------------------------------------- 

शिवानन्दलहरी

  श्लोक 66 –

हे पशुपते,

 आपण ही सर्व सृष्टी निर्माण केली. किती विविध प्रकारचे जीव जंतु त्यात निर्माण केले. केवढं हे वैविध्य! हे भूतनाथ, ही सर्व सृष्टी आपण आपल्या मनोरंजनासाठी निर्माण केली. त्यातील सर्व पशुपक्षी हे त्यांच्यापरीने निरनिराळ्या प्रकारे वागून आपले मनोरंजन करत असतात. आपण मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे बघत असता. पाळलेल्या पाळीव प्राण्यांचं ज्याप्रमाणे कौतुक करतात, त्यांना खाऊ देऊन त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना निरोगी ठेवतात, त्याप्रमाणे आपण सर्वांची काळजी घेता. हे शंभो मीही ह्याच प्राण्यांपैकी आपणच निर्माण केलेला आपला एक पाळीव प्राणी आहे. माझ्यापरीने जसे जमेल तसे मी आपले मनोरंजन करायचा प्रयत्न करतो. आपणही माझ्याकडे कौतुक भरल्या नजरेने पहात असता. हे महेशा आता आपण मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करू नका. आपण माझा सदैव योग्य रीतीने सांभाळ करा. 

क्रीडार्थं सृजसि प्रपञ्चमखिलं क्रीडामृगास्ते जना

यत्कर्माचरितं मया च भवतः प्रीत्यै भवत्येव तत्।

शम्भो स्वस्य कुतूहलस्य करणं मच्चेष्टितं निश्चितं

तस्मान्मामक-रक्षणं पशुपते कर्तव्यमेव त्वया।।66 

( क्रीडामृग  मनोरंजनासाठी पाळलेले पशू । )

केला विश्वप्रपंच हा भवतिचा निर्माण तुम्ही शिवा

केले तू   पशु पक्षि मानव तुझ्या शंभो मनोरंजना

हे क्रीडा करुनी तुला रिझविती आनंद देती सदा

त्यांचे पालन लक्षपूर्वक करी सांभाळसी तू तया।।66.1

 

आहे मी पशु एक त्यातिल शिवा सेवेस तू निर्मिला

आश्चर्ये अति कौतुके मजसि तू न्याहाळसी सर्वदा

देवो सर्व कृतीच ह्या मम तुला आनंद मोठा शिवा

कर्तव्या चुकणे न तू पशुपते सांभाळ माझा करा।।66.2

--------------------------------------------


शिवानन्दलहरी

  श्लोक 67 –

हे शिवशंकरा,

                     आपण म्हणजे असं क्षेत्र, अशी भूमी आहात जेथे, मनात आनंद कल्लोळ उठून विविध भावना दाटून येऊन त्या भावना अश्रूच्या रूपांनी वाहू लागाव्यात; त्या विविध आनंद सरितांना पूर येऊन त्यात भिजलेली ही शिवरूपी भूमी सुजला होऊन जावी. परम सुखाच्या रोमांचांनी ती अंकुरित व्हावी. परम सुखाची अनुभूती मिळवून देणारी ही भूमी आहे.  सर्व सुखांचे सोहाळे ह्या भूमित अनुभवायला मिळतात. चिरपद म्हणजे ब्रह्मसुखाची प्राप्ती व्हावी म्हणून सदा सर्वकाळ भक्त ह्या शिवशंभूरूपी क्षेत्रात राबत असतात. अशा त्या परम कल्याणस्वरूप सदाशिवांची भक्ती (भावना) मिळविण्याची आस मला लागली आहे.

(वृत्त- पुष्पिताग्राअक्षरे – चरण1 आणि 12, चरण 2 आणि  13,

गण  विषम न न र य, सम  न ज ज र ग )

 

बहु-विध-परितोष-बाष्प-पूर 

स्फुट-पुलकाङ्कित-चारु-भोग-भूमिम्।

चिर-पद-फल-काक्षि-सेव्यमानां

परम-सदाशिव-भावनां प्रपद्ये।।67

 

( परितोष  सन्तोष, इच्छेचा अभाव )

 

विविध सुखमयीच भावनांनी

नित नयनातुन अश्रु पूर वाही

परमसुखचि भेटते सदाही

बहु सुख भोग जिथेचि प्राप्त होती।।67.1

 

तनु पुलकित कंठ रुद्ध होई

चिर-सुख-दायि अशीच भक्तिभूमि

सुजन जनचि पूजिती जिलाची

अनुचर त्या शिवभक्तिचा असे मी।।67.2

----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 68 –

                   हे पशुपते, माझ्याकडे अत्यंत चांगली लक्षणं असलेली एक गाय आहे. कामधेनुच म्हणा ना. अहो, माझी ही भक्तीरूपी कामधेनु आहे. ती कायम  असीम आनंदरूपी दूध देते. तिचा पान्हा कधीच आटत नाही. अत्यंत श्लाघ्य असं पुण्य हे तिचं अत्यंत सुंदर गोंडस असं वासरू आहे. ह्या दोघांनाही आपल्या स्वच्छ सुंदर अशा चरणांच्या गोठ्यात राहायला खूप आवडतं. आपण कृपा करून त्यांचा सांभाळ करा.

                अहो शिव शंभो, माझी भक्ती इतकी दृढ आहे की ती आपल्या चरणांचा आश्रय सोडून इतरत्र कुठेही जाणार नाही. ह्या अनन्यभक्तीमुळे माझ्या हृदयात सतत आनंदाची निस्यंदिनीच स्रवत आहे. ह्या निष्काम भक्तीचा परिपाक म्हणजे फलस्वरूप माझ्या गाठीला असलेलं अत्यंत विमल अत्यंत श्लाघ्य असं पुण्य हेच होय! हे सदयहृदया, आपण माझ्या हया भक्तीरूप धेनूचं आणि ज्या पुण्यामुळे मला आपल्या चरणांची प्राप्ती झाली त्या गोंडस वासराची सतत काळजी घ्या.    

              

(वृत्त- पुष्पिताग्राअक्षरे -विषम  12,सम 13,

गण  विषम न न र य, सम  न ज ज र ग )

अमितमुदमृतं मुहुर्दुहन्तीं

विमल-भवत्पद-गोष्ठमावसन्तीम्।

सदय पशुपते सुपुण्यपाकां

मम परिपालय भक्ति-धेनुमेकाम्।।68 

( अमितमुदमृतं मुहुर्दुहन्तीं  अपरिमित आनंदरूपी अमृताला पुन्हा पुन्हा देणारी। मुहुःवारंवार, निरंतर। अमित कधीही संपणार नाही असं। सुपुण्यपाकां अत्यंत उत्तम असं पुण्य हेच ज्याचं पाक म्हणजे फळ आहे, गायीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाक म्हणजे तिचं वासरू आहे. )

 

शिव शिव मम भक्ति-कामधेनू

बहु-सुख-दुग्ध-सुधाचि दे दयाळु

 तव अमल-पदे सुरेख गोठा

सदय शिवा मम धेनुसीच द्यावा।।68.1

 

अमित धवल पुण्य हे तिचेची

अतिशय सुंदर वासरू असेची

सदय पशुपते सदाशिवा हो

अविरत पालन धेनुचे करा हो।।68.2

----------------------------------------------------

 शिवानन्दलहरी 

  श्लोक 69 –

हे भोलेनाथ,

           मी जडमूढ आहे, मी एक पशू आहे, मी कलंकित आहे, मी अत्यंत कुटिल आहे. असे माझ्यावर भलभलते  काहीही आरोप लावून, मी आपल्याजवळ येण्यासाठी योग्य नाही असे आपण म्हणू शकत नाही.

        आपल्यामते मी ``जड’’, मंदबुद्धी, वेदांच्या अध्यनासाठी अयोग्य, अत्यंत आळशी, काही न बोलता येणारा जणु काही मुकाच आहे ( जड चे हे सर्व अर्थ आहेत.) पण आपण  डोक्यावर धारण केलेली गंगाही ठिकठिकाणी बर्फ जमल्याने थंडगार चेतनारहित, मंद म्हणजे जडच असते. ती आपल्याला चालते आणि मी आपल्याला कसा बरं चालत नाही?

        आपण जर मला ``पशू’’ समजून दूर लोटत असला तर आपल्याजवळ नंदीबैलाला का बाळगता? तो अत्यंत म्हातारा, ओंगळ असूनही आपण त्याला तर  आपल्या वाहनाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. तो चंचल मृग! त्याला तर आपण सतत उचलून घेऊन छातीशी कवटाळून धरता. मग मी काय पाप केल आहे?

        मी अनेक चुका, पापं करण्यामुळे अपराधी, ``कलंकित’’ असेनही. पण त्या कंलकित चंद्राला आपण आपल्या माथ्यावर भूषणासारखे वागवता. ते कसं बर?

        मी ``कुटिल’’ कपटी, वेड्यावाकड्या स्वभावाचा, बेईमान आहे असं आपल्याला वाटतं. काय तर म्हणे माझी भुवई कायम चढवूनच मी बोलतो. मी जर स्वभावाने इतका वाईट असेन तर आपल्या अंगाखांद्यांवर नागमोडी वळणं घेत सळसळणारे, विषारी फुत्कार टाकणारे कुटिल साप बरे आपल्याला चालतात?

     आपल्याला इतकी जडता, पशुता, कलंकितता, कुटिलता असलेले सर्वजण जर भूषणावह वाटत असतील, आपल्या अलंकारांप्रमाणे आपण त्यांना मिरवत असाल तर, हे राजमौली त्याच्यापुढे तर मी अत्यंत ऋजु स्वभावाचा सरळ आहे. आपण जसं समजता तसा मी नाही. मला असं झिडकारू नका. मीही  आपल्याला सजविण्यासाठी, आपले भूषण (आभरणम्) होण्यासाठी योग्यच आहे. हे प्रभो माझा अंगिकार करा.

( जड शीतल, ज्याचा बर्फ जमला आहे असं थंडगार, चेतनारहित, विवेकशून्य, मंदबुद्धी, उदासीन, गुणविवेचनशून्य, अरसिक, वेदांच्या शिक्षणासाठी अयोग्य, आळशी, मुका

कुटिल वेडावाकडा, कायम भुवई चढवून बोलणारा, स्वभावाने बेईमान, कपटी, नागमोडी वळणं घेत जाणारी नदी वा साप

कलंकित डाग, बट्टा लागलेला लांछित, बदनाम, अपराधी, दोषी )

 

( वृत्त - आर्या )

जडता पशुता कलङ्किता

कुटिल-चरत्वं च नास्ति मयि देव।

अस्ति यदि राजमौले

भवदाभरणस्य नास्मि किं पात्रम् ।।69

 

जड मी पशु मी  कलंकिता

कुटिल असे वर्तणूक मम नित्या 

वाटुनी  मनीच ऐसे

करणे मज दूर ना चंद्रमौले।।69.1

 

न च तथ्य  दिसे मला तयी

शिवमय मी निष्कलंक हा  असेची

सत्य ऋजु बोलतो सदा मी

जड ना पशु ना कलंकिता  मी।।69.2

 

समजा जड मी असेन ही

जळमय गंगेस का शिरि धरीसी

मी पशु असे खरे हे

मग नंदिच आवडे तुला कारे ॥69.3

 

जरि मी असलो कलंकिता

तव शिरि शोभे कलंकित शशी हा

मी कुटिल! मानिले हे

तुज भूषवितीच सर्प कैसे हे।।69.4

 

म्हणुनी तुज प्रार्थना करी

फिरुनि करी तू विचार तव चित्ती

पात्र इतुका न का मी

तुज भूषविण्या समर्थ का नसे  मी।।69.5

------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

  श्लोक 70 –

हे भोलेनाथ,

            काही क्षुद्र देवतांची उपासना करायचेही कडक नियम, विधिनिषेध पाळावे लागतात. एकांतातच गुप्तपणे (रहसि) उपासना करावी वा सामुदायिक रीत्या प्रकटपणे (अरहसि), असे काही कडक उपासना निर्बंध असतात. तेथे स्वतंत्र बुद्धी वापरून चालत नाही. इतके करून त्यांच्याकडून मिळणारी फळे मात्र अगदीच तोकडी, क्षुल्लक, यःकश्चित् असतात.

              पण सम्राटाचे सम्राट असलेल्या आपले म्हणजेच राजमौली महादेवांचे असे काही नियम नाहीत. आपलं अंतःकरण उदार आहे. आपण सतत प्रसन्नचित्त असता. कधीही कोणा भक्तावर अकारण रागवत नाही. भक्ताच्या भावाप्रमाणे आपण  प्रकट होता. आपण `आशुतोषम्हणजेच त्वरीत भक्ताला प्रसन्न होता. आणि अपरिमित आनंद ज्यात आहे अशा ब्रह्मपदाचं रहस्यच त्याच्या हातात ठेवता. असा राजशेखर चंद्रमौलीच जर माझ्या हृदयसिंहासनावर आरूढ असेल तर मला कसली चिंता आणि कशाला? आपल्या चरणी अनन्य भावाने शरण येऊन मी निश्चिंत झालो आहे.

 (वृत्त- पुष्पिताग्राअक्षरे – विषम12,सम  13,

गण  विषम -   न र य, सम  न ज ज र ग ) 

अरहसि रहसि स्वतन्त्रबुद्ध्या

वरिवसितुं सुलभः प्रसन्न-मूर्तिः।

अगणित-फलदायकः प्रभुर्मे

जगदधिको हृदि राजशेखरोऽस्ति।।70 

( रहसि  एकान्तात गुप्तपणे। अरहसि- लोकसमुदायात प्रकटपणे । वरिवसितुं  उपासना करण्यास । आशुतोष सत्वर संतुष्ट होणारे । प्र+भूमअगणित, भूमन्प्राचुर्य, यथेष्टता, भारी परिमाणावर । राजशेखर  राजांचे राजे,सम्राट )

जन विजन असोचि अर्चनेसी

न फरक भेद अभेद भावनांनी

नित सुलभ उपासना जयाची

अगणित गोड फळे सुखेचि देई।।70.1

 

मम प्रभुवर हा प्रसन्नमूर्ति

सकल सुरातचि श्रेष्ठ ईश तोची

सकल जगत व्यापुनी उरेची

मम हृदि राहतसे चि चंद्रमौळी ।।70.2

-----------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 71 –

                 मनात शुद्ध भाव धरून केलेलं परमेश्वराचं ध्यान हेच जणु काही  उत्तम धनुष्य आहे. ते लववून (कुञ्चित) त्याला भक्तीची दोरी घट्ट बांधावी. म्हणजेच ध्यानाला भक्तीच्या सद्गुणांची जोड द्यावी. (गुण ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात. गुण म्हणजे सद्गुण आणि धनुष्याची दोरी.) असं हे कणखर धनुष्य सज्ज झालं की त्याला शिव-नामस्मरणाचे अमोघ बाण जोडावेत. त्या असंख्य बाणांनी मनातील सर्व किल्बिषांचे, काम, क्रोध, मोह, लोभादि सहाही शत्रूंचे पारिपत्य करावे. मनातील सार्‍या शत्रूंना जिंकलेला हा भक्तरूपी वीरवर सर्व बुद्धिमंतांचा सम्राट असतो. सुस्थिर, जे कधीही नाश पावत नाही अशा अविनाशी स्वानंदसाम्राज्याचा तो चिरकाळ आनंद घेतो.

            म्हणून हे मानवा, नरदेहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर तू शिवशंभूच्या कल्याणकारी नामाला कधीही सोडू नकोस.   

(वृत्त  वसंततिलकाअक्षरे-14, गण- त भ ज ज ग गयति- पाद)

 

आरूढ-भक्ति-गुण-कुञ्चित-भाव-चाप-

युक्तैः शिव-स्मरण-बाणगणैरमोघः।

निर्जित्य किल्बिषरिपून्विजयी सुधीन्द्रः

सानन्दमावहति सुस्थिर-राजलक्ष्मीम् ।।71

 ( गुण- सद्गुण, धनुष्याची दोरी । कुञ्चित  आकुंचन करून, संकुचत करून, लववून ,ताणून । निर्जित्य  जिंकून । सु-  चांगलीधी  बुद्धी , सुधीन्द्र  बुद्धिमंतांचा राजा। )

जो ध्यानरूप धनुला लववून थोडे

ही भक्तिरूप दृढ रज्जुच बांधुनी रे

त्यासी अमोघ `शिवनाम'चि बाण जोडी

क्रोधादि शत्रु मनिचे सहजीच जिंकी।।71.1

 

राजाधिराज शिवभक्त सुधींद्र तोची

स्वानंद-राज्य-उपभोगचि नित्य घेई

त्याच्याच राज्यविभवा नच ओहटी ही

त्याचीच सुस्थिर असे नित राज्यलक्ष्मी।।71.2

----------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 72 –

हे त्रिपुरान्तका,

                 आपलं सूक्ष्म चिंतन म्हणजेच ध्यानरूप अंजन होय. (आपल्याकडे अशा काही अंजनांचा उल्लेख येतो की ती डोळ्यात घातल्यावर रात्रीच्या अंधारातही दिसू शकतं. इतकच काय, पण जमिनी खाली पुरलेला ठेवाही  त्या माणसाला दिसून येतो. तो संदर्भ धरून श्लोकार्थ पाहिल्यास) जो भक्त हे अंजन घालून घनदाट अज्ञानरूप अंधाराने भरलेल्या विस्तीर्ण प्रदेशाकडे पाहील; महा बलवान, समर्थ अशा शिवनाममंत्राचा  घोष करेल; त्याच्या सभोवताली दाटलेला हा अज्ञानाचा अंधार दूर होईल.

            ज्या भक्तांचा अज्ञानरूप अंधार दूर झाला आहे त्यांना ह्या चंद्रमौळी शिवाची पावलं दिसू लागतात. स्वर्गात राहणार्‍या देवांच्या ऐश्वर्याला काय कमी? पण ते देवही कायम शंभो! आपल्या पावलांच्या आश्रयाला येतात. नागराजही आपल्या पावलांना सतत घट्ट वेढून बसलेले असतात. जणु काही आपल्या पावलांचं हे अनोखं भूषण आहे. 

       हे कैलासनाथा आपली ही अशी अद्भुत पावलं जे भक्त आपल्या हृदयात ठेवतात किंवा मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलात धारण करतात ते भक्त खरोखरच धन्य होत.  

 

(वृत्त  वसंततिलकाअक्षरे-14, गण- त भ ज ज ग गयति- पाद)

 

ध्यानाञ्जनेन समवेक्ष्य तमःप्रदेशं

भित्त्वा महाबलिभिरीश्वर-नाम-मन्त्रैः।

दिव्याश्रितं भुजग-भूषणमुद्वहन्ति

ये पादपद्ममिह ते शिव ते कृतार्थाः।।72

 

ध्यानांजना नयनि रेखुन शुद्ध-नेत्र

अज्ञान-गर्भ-तमदेश निरीक्षितात

काळोख भेदुन महा शिव-नाम-मंत्रे

येती तुझ्याच चरणी शिवभक्त सारे ।।72.1

 

लौकीक थोरचि असे तव पावलांचा

येथे निवास करितो नित नागराया

आहेचि भूषण सुशोभित पावलांना

देवांसही मिळतसे चरणी निवारा।।72.2

 

जो पादपंकज तुझे हृदयीच ठेवी

ठेवी सहस्रदल या कमलात मूर्ध्नी

झाला कृतार्थ अवघा नरजन्म त्याचा

तो धन्य धन्यचि असे नरवीर मोठा।।72.3

---------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 73 –

              दारा म्हणजे पत्नी. श्री म्हणजे लक्ष्मी. तर भू म्हणजे पृथ्वी . श्रीभूदार म्हणजे लक्ष्मी आणि पृथ्वी ह्या दोन्ही ज्याच्या पत्नी आहेत असा विष्णू . तर भूदार म्हणजे वराह. विष्णूने शंकराचे स्वरूप शोधण्यासाठी भूदार म्हणजे वराहाचे रूप घेतले होते. पृथ्वीत खोल खोल खणत, आत जाण्याचा प्रयत्न करूनही त्याला शिवस्वरूप उमगले नाही.

               म्हणून आचार्य म्हणतात, हे माझ्या मना, तुला जर काही मिळवायचच असलं तर तू शिवचरणांनाच मिळवायचे ध्येय ठेव. शिवाची कल्याणमयी पावले हे मुक्तीरूपी महान औषधी वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत योग्य क्षेत्र (केदार), शेत आहे. तेथेच मुक्तिमहौषधी निरोगी वाढून, अत्यंत फोफावते. विष्णु असो वा महान तत्त्ववेत्ते, तपस्वी असोत त्यांनी शिवाच्या पावलांचं हे क्षेत्र/ शेत/( केदार) संपादन केले असून मुक्ती ही महौषधी मिळविण्यासाठी ते ह्या क्षेत्रात अखंड राबत असतात.

 

भूदारतामुदवहद्यदपेक्षया श्री-

भूदार एव किमतः सुमते लभस्व।

केदारमाकलित-मुक्ति-महौषधीनां

पादारविन्दभजनं परमेश्वरस्य।।73

 

( श्रीभूदार  श्री -लक्ष्मी आणि भू-पृथ्वी ह्या दोन्ही ज्याच्या दारा म्हणजे पत्नी आहेत असा विष्णू भूदार  वराह । केदार - क्षेत्र, शेत । )

 

शंभो तुझ्या चरण-प्राप्तिचिया मिषाने

झाला वराह कमलापति जीवभावे

माझ्या मना म्हणुनि तू तव वृत्ति सोडी

जाई सुखे शरण त्या शिवपादपद्मी।।73.1

 

शंभो तुझे चरण हेचि सुपीक शेत

जेथे विरक्त जन हे नित राबतात

घेतीच पीक नित मुक्ति महौषधीचे

पाहून पीक भरघोसचि डोलती हे।।73.2

------------------------------------------------


शिवानन्दलहरी

  श्लोक 74 –

हे दिगंबरा,

           ह्या सूर्य, चंद्र, तार्‍यांनी नटलेल्या, ज्यात विविध फुलांचे परिमल भरून राहिले आहेत, शीतल पवन वाहत आहे, अशा सुंदर दाही दिशा हेच आपले उंची वस्त्र आहे. ते कधी मलिन होत नाही. आपल्या चरणकमलांचा आमोद ह्या दशदिशात कोंदाटून राहतो. दशदिशांना सुगंधित करतो.

                 पण माझ्या मनाच्या बंद पेटीला मात्र ह्या बाहेरच्या हवेचा स्पर्शही झाला नाही. माझा चित्तकोश अत्यंत वाईटसाईट कामना, काहीतरी अभद्र, अशिष्ट इच्छा, विद्रूप कल्पना अशा दुर्वासनांच्या कुचक्या दुर्गंधीने भरून गेली आहे. ती दुर्गंधी जर दूर करायची असेल तर एकच उपाय आहे.

                आशापाशांनी जखडण्यामुळे उत्पन्न होणार्‍या सर्व क्लेशांचे, दुःखाचे, दुर्वासनांचे आपले चरणकमल खंडण करतात. सर्व कुचकी घाण दूर करतात. आपल्या चरणारविंदांच्या घनदाट आमोदाने माझी मनमंजुषा जर भरून गेली तर तेथे साचून राहिलेला दुर्वासनांचा दुर्गंध कुठच्याकुठे विरून जाईल.

 हे उमानाथा माझ्या मनाच्या मंजुषेत सतत आपले चरणारविंद असु द्या. अन्य काही नको. 

(वृत्त  शालिनीअक्षरे- 11, गण- म त त ग गयति  4,7 ) 

आशा-पाश-क्लेश-दुर्वासनादि-

भेदोद्युक्तैर्दिव्यगन्धैरमन्दैः।

आशा-शाटीकस्य पादारविन्दं

चेतःपेटिं वासितां मे तनोतु।।74

( आशा-शाटीक  दिशारूपी वस्त्र नेसलेला (शिव) । चेतःपेटिं  मनाची पेटी । अमन्द  विपुल गन्धैः अमन्दैः - विपुल गंधाने । )

आशापाशे बंधने ही छळीती

दुःखे देती डागण्या त्यावरीही

उच्छेदाया त्यांस उद्युक्त राहे

तोची शंभू जो दिशावस्त्र नेसे।।74.1

 

कोंदाटे तो वासनांचाचि वास

त्यासी सारे दूर आमोद एक

शंभो ती रे पाउले ही तुझीच

ज्याने चित्ती शुद्ध होतोचि भाव।।74.2

 

शंभो त्याची पादपद्मांस ठेवी

ह्याची माझ्या नित्य तू चित्तपेटी

गंधाने त्या सर्वगामी भरे ही

शंभो माझी ही मनोमंजुषाची।।74.3

 

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 75 –

हे नंदिकेश्वरा,

              आपण सार्‍या लोकांचे स्वामी, सार्‍यांचे नेते! विश्वविजयी मदनालाही आपण राख राख करून टाकले आणि हे  हो काय? आपण ह्या बेढब, म्हातार्‍या नंदीवरून फिरता? छे छे!! हे आपल्याला आजिबात शोभत नाही. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल  असा आपल्याला कसा रुबाबदार  मनाच्या वेगाने धावणारा अबलख वारु पाहिजे. माझ्याकडे असा श्यामकल्याणी अश्व आहे. अत्यंत कल्याणकारक अशा सर्वलक्षणांनी तो युक्त आहे. अहो, त्याच्या गति बद्दल काय विचारता? त्याची चाल मोठी डौलदार, मनोवेधक तर आहेच पण त्याच्या वेगाबद्दल काय सांगु? नजर ठरणार नाही अशा वार्‍यापेक्षाही वेगाने--- छे छे-- अहो मनोवेगानेच हा तुरग धावतो.  आपल्या स्वामीच्या मनातील सर्व जाणणारा हा मनकवडा असा घोडा आहे. थोडाही संशय बाळगू नका. निःसंशय हा अश्व सर्व लक्षण सम्पन्न आहे. कुठला म्हणून काय विचारता? हा माझा मनोरूपी वारु मी आपल्याला बहाल करत आहे. आपण खुशाल त्याच्यावर बसा आणि आपल्याला पाहिजे तसा संचार करा.

 

             हे शिवा माझे मन कायम आपल्या सेवेत राहू दे. आपणच त्याला चालवा, योग्य गती आणि दिशा द्या.

 (वृत्त  वसंततिलकाअक्षरे-14, गण- त भ ज ज ग गयति- पाद)

कल्याणिनं सरस-चित्र-गतिं सवेगं

सर्वेङ्गितज्ञमनघं ध्रुव-लक्षणाढ्यम्।

चेतस्तुरङ्गमधिरुह्य चर स्मरारे

नेतः समस्तजगतां वृषभाधिरूढ।।75

(कल्याणी  कल्याणदायक लक्षणांनी युक्त असलेला । सरस-चित्र-गतिं  ज्याची चाल मोठी  मनोवेधक आहे असा

ध्रुव-लक्षणाढ्यम्  निःसंशय सर्वलक्षण संपन्न. । नेतः - नेतृ शब्दाचे संबोधननेतः समस्तजगतां –- सर्व जगाचे नेते हे विश्वनाथ । )

स्वामी तुम्ही म्हणविता सकला जगाचे

त्राहीच विश्वविजयी मदनास केले

कैसाचि बेढब तुझा अति वृद्ध नंदी

शोभे न वाहन तुला मम गोष्ट ऐकी।।75.1

 

आहेचि सज्ज मम वारु मनोरुपी हा

हो स्वार त्यावर शिवा शुभलक्षणी हा

त्यासी मनोगत कळे निज मालकाचे

त्यासीच योग्य उमगे पथ कोणता ते।।75.2

 

हा वेगवान पवनाहुन तेज भारी

त्याच्यावरी नजर ना ठरते कुणाची

हा युक्त उत्तम अशा शुभलक्षणांनी

शोभेल वाहन; तया नित अंगिकारी।।75.3 

-------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 76 –

हे आशुतोष,

          जलाने ओथंबलेल्या मेघमाला आकाशात आल्या की तृषार्त धरणीला फार प्रतीक्षा करावी लागत नाही. जलवृष्टीने त्या मेघमाला धरणीला चिंब भिजवून टाकतात. सर्व नदी, नाले, तळी भरून वाहू लागतात. धान्याचा सुकाळ होतो. ही पृथ्वी आनंदाने भरून जाते.

          त्याचप्रमाणे शिवाच्या पावलांचे हे विस्तीर्ण आकाश माझ्या घनदाट भक्तिरूपी मेघमालांनी (कादम्बिनी) मी आच्छादून टाकलं आहे. मेघमालांना आकाशाशिवाय कोणाचा आश्रय असणार? माझ्या भक्तिरूप मेघमालांनाही शिवचरणांशिवाय विश्रांतीस्थान नाही. त्या शिवचरणांवर येऊन दाटून राहतात. धुवाँधार आनंदाची वर्षा करतात आणि माझ्या मनाचं मानससरोवर आनंदजलाने तुडुंब भरून वाहू लागतं. माझा हा जन्मच जणु काही भरगच्च भरलेल्या दाण्यांची कणसं डोलावीत तसा आनंदाच्या पिकाने  डोलू लागतो. माझ्या जन्मरूप नव धान्याच्या सुबत्तेनी मी साफल्य मिळवलं आहे. साफल्याशिवाय इतर काही काही नाही.

भक्तिर्महेश-पद-पुष्करमावसन्ती

कादम्बिनीव कुरुते परितोषवर्षम्।

संपूरितो भवति यस्य मनस्तटाक-

स्तज्जन्म-सस्यमखिलं सफलं च नान्यत्।।76 

( पुष्कर- आकाश । आवसन्ती - विश्रांती घेणारी। कादम्बिनी – मेघमाला, ढगांचे समुदाय । परितोष - संतोष, इच्छेचा अभाव ।   तटाक - तळे, सरोवर।

 सस्य -  पीक । )

ओथंबली जलयुता जलदावली ही

तैशी महेशचरणांबुद भक्ति मोठी

वर्षे अखंड सुख ती करिते सुकाळु

आनंद-डोह मनिचा भरला समस्तु।।76.1

 

झाला फलद्रुप उभा नरजन्म त्याचा

हे जन्मरूप नवधान्यचि दे सुबत्ता

ओसंडलीच जणु ओंजळ मौक्तिकांनी

साफल्य हेचि अवघे नच अन्य काही।।76.2

---------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 77 –

             पतिच्या विरहाने व्याकूळ झालेली नववधू जशी पतिच्या आठवणींनी बैचैन होऊन आपल्या प्रियकर अशा प्रिय पतीचेच चिंतन करत असते; त्याचेच गुणवर्णन करत असते; त्याच्या भेटीला ती इतकी उत्सुक झालेली असते की थोडासा विरहकाळही तिला सहन होत नाही;

               त्याप्रमाणे शिवाच्या चरणांवर जडलेली मती, कायमची स्थिर झालेली, आसक्त झालेली बुद्धी सतत शिवनामाचच स्मरण करत राहते. शिवाच्या पावलांचीच तिला सारखी सारखी आठवण येते. शिवमंत्राने संमोहित होऊन अत्यंत उत्कंठेने ती सारखी सारखी शंकरालाच आठवत राहते. शिवाच्या नामसंकीर्तनात आणि गुणसंकीर्तनात रमून जाते. सदासर्वकाळ ती शिवभेटीसाठी अधीर असते.

बुद्धिः स्थिरा भवितुमीश्वर-पाद-पद्म-

सक्ता वधूर्विरहिणीव सदा स्मरन्ती।

सद्भावना-स्मरण-दर्शन-कीर्तनादि

सम्मोहितेव शिवमन्त्रजपेन विन्त्ते।।77 

( विन्त्ते –- विद् सप्तमगण - विचार करणे या धातूचे रूप ।)

झालीच सुस्थिर मती शिवपादपद्मी

व्याकूळ ती विरहिणीसम वागतेची

ती आठवे शिवपदा भरुनीच डोळे

त्याचेच चिंतन करी समया न पाहे।।77.1

 

आसक्त शंभु चरणी शिव-मंत्रमुग्धा

भोले महेश जपते शिव नीलकंठा

भेटीस आतुर अती तिज धीर कैसा

राहे न द्वैत मनिचे उरते अभक्ता॥ 77.2

(अभक्ता -  जी ईश्वरापासून विभक्त नाही ती)

---------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 78 –

                     मुलीचे कन्यादान केले की, पतिसोबत जाणार्‍या मुलीला पाहून मुलीचे वडील मुलीला सांभाळून घेण्याबद्दलच्या आपल्या अपेक्षा ऋजु शब्दात जावयाला सांगतात. मुलगी दिल्यानंतर तिच्या पतीनेअत्यंत आत्मीयतेने वागून पत्नीच्या मनात त्याच्याविषयी, त्याच्या घराविषयी पत्नीला ओढ वाटेल, प्रेम वाटेल असे वागणे(वर-गुणेन)  अपेक्षित असते. आपल्या आंगच्या गुणांनी मुलीचे मन जिंकून घेणे आवश्यक असते.

श्री आद्य शंकराचार्यही श्री विश्वनाथाला म्हणत आहेत, 

 हे प्रभो, माझी सद्बुद्धीरूपी सुशील कन्या आपल्या पदरात घातली आहे. शिष्टता, सौजन्य, नम्र व्यवहार हे ती चांगल्याप्रकारे जाणते. तसं तिला चांगलं वळण मी लावलेलच आहे. (अनुबोधिता) ती अत्यंत विनयी, नम्र आहे. सेवावृत्ती तिच्या अंगातच आहे. ती तुमचं हित चिंतणारी आहे. सतत आपल्या आश्रयाने राहणारी आहे.  आज मी ती आपल्याला अर्पण करत आहे. ज्याप्रमाणे सद्गुणी, सहृदय पती नवपरिणीत वधूच्या आंगचे गुण हेरून त्यांचा कसा विकास होईल, कशी भरभराट होईल ह्याची काळजी घेतो, तिचं कल्याण होईल ह्याची दक्षता घेतो

 त्याप्रमाणे आपल्या ``वर-गुणेन’’ म्हणजे श्रेष्ठ  गुणांनी आपण माझ्या विवेकरूपी कन्यकेचा उद्धार करावा.  

(वृत्त - द्रुतविलम्बित, अक्षरे- 12, गण- न भ भ र, यति- पाद.)

सदुपचार-विधिष्वनुबोधितां

सविनयां सुहृदं समुपाश्रिताम्।

मम समुद्धर बुद्धिमिमां प्रभो

वर-गुणेन नवोढ-वधूमिव।।78

     ( अनुबोधनम्  प्रत्यास्मरण, पुनस्मरण । नवोढ-वधू  नुकतेच पाणिग्रहण केलेली विवाहित स्त्री । )

स्मरण मी दिधलेचि पुन:पुन्हा

मतिरुपी तनुजेसचि माझिया

उचित रीत सदाचरणा धरी

अनुसरीच विवेक पथा मुली ।।78.1

 

विनयशील गुणी मम कन्यका

नववधू बनुनी तव आश्रया

त्वरित ये तव ओढचि लागता

सहचरी नित साथचि दे तुला।।78.2

 

सकल जन्म तुझ्या चरणांवरी

करि सुखे तुज अर्पण बुद्धि ही

सुहृद ती हितचिंतक बा तुझी

मम कुलीन सुता तव जाहली।।78.3

 

तिजसि भाग्य अती रमणीय दे

कुशल मंगल ठेव तिला पुरे।।78.4

--------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 79 –

हे कर्पूरगौरा,

             आपण म्हणजे प्रत्यक्ष करुणेचा अवतार आहात. ह्या ऋषी, मुनी योगी जनांच्या अत्यंत कोमल अशा हृदयकमळांमधे आपण कायम संचार करत असता. आपली पावले इतकी कोमल आहेत की संतसज्जनांच्या कोमल हृदयांनाही ती दुखापत करत नाहीत. उलट त्यांनाही अत्यंत सुखदायक वाटतात.

             आपण भक्तवत्सल आहात. मार्कंडेयाला नेण्यासाठी प्रत्यक्ष यम अवतीर्ण झाला. त्याने आपले यमपाश मार्कंडेयाच्या गळ्यात घातले. तेंव्हा मार्कंडेयाने अत्यंत आर्त स्वरात आपला धावा सुरू केला. हे शंभो, तेंव्हा आपण धावून गेला आणि त्या यमाच्या रानगट छाताडावर लाथेने भीषण प्रहार करून त्याच्या छातीच्या फासळ्या कडकडा मोडल्या.

            हे गिरिजानाथा कुठे त्या यमाची रानवट छाती आणि कुठे आपले कमल कळ्यांसारखे नाजुक पाय? अरेरे!! त्या जोरदार आघाताने आपल्या पायाला खूप दुखलं का बघु बरं? मी माझ्या हातांनी आपले पाय हळुवार चेपीन आणि धन्य धन्य होईन. 

 (वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे-19,गण - म स ज स त त ग, यति -12,पा.   ) 

नित्यं योगिमनः-सरोजदल-सञ्चार-क्षमस्त्वत्क्रमः

शम्भो तेन कथं कठोर-यमराड्वक्षः-कवाट-क्षतिः।

अत्यन्तं मृदुलं त्वदङ्घ्रि-युगलं हा मे मनश्चिन्तय-

त्येतल्लोचन-गोचरं कुरु विभो हस्तेन संवाहये।।79

 

संतांची हृदयेच कोमल अती उत्फुल्ल पद्मे जशी

त्याची पंकज ताटव्यात करिसी संचार या पाउली

क्रोधे भीषण लाथ मारुनि यमा वक्षःस्थळी सांग ना

छातीची पुरि मोडली कडकडा कैसी कवाडे शिवा।।79.1

 

नाही धीर मनास ऐकुन कथा व्याकूळ मी हा बहु

आघाते दुखलेचि का पद तुझे शंभो अरेरे! बघू

स्नेहाने धरुनी पदा करतळी चेपीन शंभो हळु

सेवूनी तव पादपद्मयुगले मी धन्य झालो प्रभु।।79.2

-----------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 80 –

हे गिरिजापते,

   आपण सर्व समर्थ आहात. आपल्याला कोठली गोष्ट अशक्य आहे? भव्य महाल, फुलांची शय्या, फुलांनी आच्छादलेली आसने ही अत्यंत सामान्य सुखे तर आपल्याला किती सहज उपलब्ध होऊ शकतात. पण असे दिसते की, असे सुखोपभोग आपल्याला रुचत नाहीत. आपण कायम दुर्गम अशा हिमालयाच्या शिखरांवर खडकाळ, बर्फाळ प्रदेशातून, काट्याकुट्यातून फिरत राहता, अत्यंत कठीण अशा प्रदेशात आपण नृत्य करता. अरेरे!!! कुठे आपली कोमल पावले आणि कुठे त्यांना सोसायला लागणारी ही दुःखे!!! केवढे हे कठोर कष्ट !!!

            हे शंभो, मला एक शंका येते की, कदाचित आपल्याला माझ्यासारखा  अत्यंत पाषाणहृदयी भक्त जन्माला येणार आहे आणि त्याच्या महा कठीण अशा हृदयात संचार करायला लागेल अशी कुणकुण लागली होती की काय? माझ्या अत्यंत टणक, कठीण, मर्मभेदी हृदयात राहण्याचा सराव करण्यासाठी म्हणून का आपण अशा अवघड, दुर्गम प्रदेशात राहता? तेथेच आपले भव्य तांडवनृत्य  करता?

         हे प्रभो! खरोखरच आपण धन्य आहात! आपण माझ्यासारख्या सामान्य भक्तासाठी काहीही करायला जराही कचरत नाही. थोडेही मागे पुढे बघत नाही. आपल्याला मनोभावे वंदन असो. 

एष्यत्येष जनिं मनोऽस्य कठिनं तस्मिन्नटानीति मद्-

रक्षायै गिरिसीम्नि कोमल-पदन्यासः पुराभ्यासितः।

नो चेद्दिव्य-गृहान्तरेषु सुमनस्तल्पेषु वेद्यादिषु

प्रायः सत्सु शिलातलेषु नटनं शम्भो किमर्थं तव।।80

( गिरिसीम्नि  पर्वतांच्या सीमाप्रदेशात । नो चेत् -  नाही तर । तल्प शय्या, बिछाना । वेदि- महालाचा चौक, ओटा । नटनम् -  नाचणे, अभिनय करणे )

होती का तुज कल्पना पुसटशी येईन जन्मास मी

शंभो सेवक हा कठोर हृदयी एके दिनी भूवरी

पाषाणासम ह्या कठीण हृदयी पायी फिरावे कसे

रक्षावे मजसी कसे म्हणुनि का आरंभिले कर्म हे।।80.1

 

संचारी खडकाळ दुर्गम अशा बर्फाळ प्रांतातुनी

कैलासी गिरिकंदरी करिसि का शंभो पदन्यास ही

कोठे हे तव पाय कोमल अती कोठे तुझी ही कृती

का भक्तासचि तारण्या उजळणी केलीस ही तू बरी।।80.2

 

केले सर्व अमान्य तू परि शिवा छे छे म्हणोनी जरी

पुष्पाच्छादित आसने मृदुल ही शय्या रुचे का न ही

होते भव्य महाल सुंदर तरी आले पसंतीस ना

केले दुर्गम पर्वतावर चि का नृत्यास तू शंकरा।।80.3

-----------------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 81 –

हे अमृतेश्वरा,

                काही काळ --- फक्त काही काळ, जो आपल्या अत्यंत प्रसन्न अशा उमा-महेश स्वरूपातील आपल्या चरण-कमळांची पूजा करेल; किंवा क्षणभर आपल्या पद्मासनस्थ, अर्धोन्मीलित नेत्र असलेल्या, ध्यानस्थ, जटाधारी, धूर्जटी स्वरूपाला आठवत स्वतः ध्यानस्थ होईल; निमिषभर आपल्या पावली अनन्यभावे शरण  येऊन कल्याणस्वरूप शिवपदांना नमन करेल; वा हे नटराजा, जो आपली चरित्रकथा आपल्या कानांनी घडीभर ऐकून तृप्तीचा अनुभव घेईल; वा हे शिवसुंदरा, जो आपले हे नयनमनोहर रूप निरखण्यात काही काळ रमून जाईल; वा पळभर आपल्या गोड गळ्याने कंठनीलाची स्तुतीस्तोत्रे म्हणण्यात रमून जाईल; तो सदा सर्वकाळच आपल्या स्वरूपात तल्लीन होऊन होऊन जाईल,  इतके आपले नाम, रूप चरित्र मनोहर आहे. चित्तवेधक आहे.

            आपली गोडी लागलेल्या अशा  भक्ताला  स्वतःचा कुठला स्वार्थ  शिल्लकच राहणार नाही. पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे त्याला संसाराची सुखदुःखे चिकटू शकणार नाहीत. सूर्य किरण ज्याप्रमाणे पाण्याला भेदून तळापर्यंत जातात पण पाण्याने ओले होत नाहीत तसा हा जीवनात राहून जीवनमुक्त असा जीवनमुक्तात्माच समजावा लागेल.  

कंचित्कालमुमामहेश भवतः पादारविन्दार्चनैः

कंचिद्ध्यान-समाधिभिश्च नतिभिः कंचित्कथाकर्णनैः।

कंचित्कंचिदवेक्षणैश्च नुतिभिः कंचिद्दशामीदृशीं

यः प्राप्नोति मुदा त्वदर्पित-मना जीवन्स मुक्तः खलु।।81

 

किंचित् काळ उमा-महेश-चरणा पूजी यथासांग जो

काही काळचि ध्यान चिंतन करी या पावलांचेचि जो

थोडेसे क्षण वंदुनी तव पदी हो नम्रमूर्तीच जो

काही ते क्षण घालवी तव कथा ऐकावया भक्त जो।।81.1

 

काही काळचि गातसे स्तुति तुझी तल्लीन होऊनि जो

काही काळ तरी स्वरूप तव हे न्याहाळतो भक्त जो

जो अंतःकरणा समर्पुन तुझ्या पायीच झाला सुखी

झाला जीवनमुक्त तोचि पुरता संसार-पाशातुनी।।81.2

-----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 82 –

हे त्रिपुरान्तका,

         आपले सान्निध्य लाभावे म्हणून देवही तळमळत असतात. श्रीविष्णूने आपली साथ मिळावी म्हणून काय काय केलं नाही? आपण त्रिपुरासुराचा वध केला तेव्हां  श्रीविष्णु स्वतः आपला बाण झाले. (मेरू पर्वत शिवाचे धनुष्य झाला तर वासुकी नाग त्या धनुष्याची दोरी झाला.) आपला सहवास सतत मिळावा म्हणून हेच श्रीविष्णु स्वतः नंदीरूपात नित्य आपल्याला वाहून नेतात. त्यानेही त्यांचे समाधान झाले नाही. आपल्या शरीराचाच भाग बनून रहावे ह्या इच्छेने ते आपल्याला अर्धदेह आर्या पार्वतीच्या रूपात व्यापून आहेत. अशाप्रकारे त्यांनी आपले पत्नीत्वही स्वीकारले. अर्धनारीश्वराच्या रूपात  नारीस्वरूप अर्धदेह हा त्या विष्णुचाच! आपल्या चरण कमळांचा शोध घेण्यासाठी विष्णु वराहाचे (घोणित्व) रूप घेऊन थेट पाताळापर्यंत जाऊन आले. हे त्रिलोकेशा, आपले अत्यंत जवळचे मित्रत्व (सखिता)संपादून आपल्या तांडवनृत्यासमयी श्रीविष्णु मृदंग वाजविण्याचे कामही करतात. (मृदंगवहता) आपला सहवास सतत लाभावा ह्यासाठी आपली अशी अनेक छोटी मोठी कामे श्रीविष्णूंनी अत्यंत आसोशीने जीव ओतून केली. इतकेच काय पण आपली सहस्र कमलांनी पूजा करतांना एक कमळ कमी पडल्यावर त्याजागी आपला डोळाच बाणाने काढून  श्रीविष्णूंनी आपल्या चरणी अर्पण केला. हे पिनाकी, हा सर्व घटनाक्रम अत्यंत बोलका आणि आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणारा आहे. आजतरी मला आपल्याहून कोणी दुजा श्रेष्ठ दिसत नाही.

बाणत्वं वृषभत्वमर्ध-वपुषा भार्यात्वमार्यापते

घोणीत्वं सखिता मृदङ्ग-वहता चेत्यादि रूपं दधौ।

त्वत्पादे नयनार्पणं च कृतवाँस्त्वद्देह-भागो हरिः

पूज्यात्पूज्यतरः स एव हि न चेत्को वा तदन्योऽधिकः।।82

( बाणत्वं -  बाण होणे। आर्या - पार्वती, आर्यापती- शंकर ।  घोणित्वं -  वराहरूप धारण करून ।  सखिता  मित्रत्व । मृदंगवहता -  मृदंग वाजविण्याचे काम । देह-भागो हरि -  देहाचा भाग, घटक होऊन विष्णू राहिला आहे. दक्षिणेकडे ताम्रपर्णी नदीच्या परिसरात शंकरनारायणपुरम् या क्षेत्री विष्णु आणि शंकर यांची एकरूप मूर्ती आहे अशा रीतीने श्री हरीने शंकराचे सान्निध्य मिळविले आहे.)

लाभावे सहवास सौख्य नित हे विश्वेश्वराचे मसी

ऐशी उत्कट भावना तरळुनी जाता हरी-अंतरी

केले काय न काय काय हरिने प्राप्ती तुझी व्हावया

संग्रामी त्रिपुरासुरास वधिण्या हा बाण झाला तुझा।।82.1

 

झाला वाहन नंदिबैल हरि हा चाले तुला घेउनी

पत्नी होऊन अर्धदेह बनुनी राहे तुझ्या संगती

शोधाया तुजसी वराह बनला पाताळ धुंडाळिला

होऊनीच सखा तुझा प्रिय अती संगे तुझ्या राहिला।।82.2

 

देई साथ मृदंग वाजवुन तो साकारिता नृत्य तू

रूपे धारण हा कितीक करतो त्याच्या हृदी एक तू

काढूनी तुज अर्पिलेचि नयना उत्फुल्ल पद्मासमा

देही जाय तुझ्याच तो मिसळुनी लाभावया तू सखा।।82.3

 

श्रेष्ठत्वास तुझ्याच सिद्ध करितो हाची पुरावा शिवा

नाही श्रेष्ठ तुझ्याहुनी मज दिसे शंभो शिवा शंकरा।।82.4

-----------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 83 –

हे महामृत्यंजया,

         ह्या सर्व देवांना जन्मही आहे मृत्यूही आहे. (जनन-मृतियुत) ते जनन मरण युक्त आहेत. जनन मरणाच्या फेर्‍यात ते देखील येरझार्‍या घालत आहेत असं असतांना त्यांची सेवा करून, त्यांची स्तुती करून काय लाभ साधणार?  जर तेच असे मृत्यूभयाने भयग्रस्त, त्रस्त असतील तर ते मला काय सुख देणार? मला त्यांच्याकडून सुखाचा लवलेशही मिळायची काही शक्यता नाही. अहो सावरीच्या फळाचा ना खाण्याला उपयोग ना देण्याला.

                     पण जो अजनि  म्हणजेच अजन्मा आहे, ज्याला जन्मच नाही, जो अनादि कालापासून आहेच, त्याला मृत्यूही संभवत नाही. तो अमृतरूप, अजनि असा तूच आहेस. अशा ह्या साम्बसदाशिवा( अम्बया सहितः साम्बः- म्हणजे एकरूप शिव आणि पार्वती, अंबेसहित शिव तो सांब ) , उमाशंकरा, जे जे आपल्याला शरण येतात त्यांना परमानंदाचा लाभ होतो. ते आपल्याला पाहून कृतार्थ होतात. त्यांचं जीवन धन्य धन्य होतं. मीही आपल्या पायांवर शरण आलो आहे.

(वृत्त- मालिनी, अक्षरे- 15, गण - न न म य य, यति -8,पाद.)

जनन-मृतियुतानां सेवया देवतानां

न भवति सुखलेशः संशयो नास्ति तत्र।

अजनिममृतरूपं साम्बमीशं भजन्ते

य इह परमसौख्यं ते हि धन्या लभन्ते।।83

जनन-मृतियुतानां  ज्यांना जन्म आणि मृत्यू आहे ।  अजनि-ज्याला जन्म नाही । अमृतरूप -– ज्याला मृत्यू नाही

जनन मरण ज्यांना ना चुके ते कधीही

सुरवर कसले ते सौख्य कोणास देती?

नच फळ उपयोगी सावरीचे जसेची

न शमवि जठराग्नी ना मिळे मोल त्यासी।।83.1

 

जनन मरण नाही नित्य जो सर्वव्यापी

सुखमयचि असे जो सांब कैवल्यरूपी

शरण पदि तयाच्या जो कुणी भक्त जायी

परम सुख मिळे त्या जीवनी धन्य होई।।83.2

--------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 84 –

हे विश्वबंधो,

 आपण ह्या सर्व विश्वाचे हितचिंतक. हे सर्व विश्व  आपल्यापासूनच उत्पन्न झाले. ह्या सर्व मोठ्या परिवाराकडे बघायचे, त्याची काळजी घ्यायची हे केवढे मोठे काम! त्यात स्वतः गौरी आपल्याला मदत करत आहे. आपली सेवा करत आहे. पण त्या गौरीमातेच्या मदतीला म्हणून तरी आपण कोणालातरी ठेवायला पाहिजे. गौरी माता एकटी किती आपली सेवा करणार? म्हणून त्या गौरीमातेच्या सहाय्यासाठी  मी माझी अत्यंत गुणवती अशी बुद्धिरूपी कन्या  प्रदान करतो माझ्या ह्या मेधावी कन्येचा आपण स्वीकार करावा. हे कल्याण सागरा , हे सत् चित् आनंद सागरा, सच्चिदानंदा, आपण विश्वबंधु  म्हणजे माझेही कल्याण करणारेच आहात तरी कृपया माझ्या हृदयाच्या ह्या भव्य प्रासादात राहायला या. तेथेच कायमची वस्ती करा. तेथेच सुखाने रहा. 

(वृत्त- मालिनी, अक्षरे- 15, गण - न न म य य, यति -8,पाद.)

शिव तव परिचर्यासन्निधानाय गौर्या

भव मम गुणधुर्यां बुद्धिकन्यां प्रदास्ये।

सकल-भुवन-बन्धो सच्चिदानन्द-सिन्धो

सदय हृदयगेहे सर्वदा संवस त्वम् ।। 84 

( भव  विश्वाचे कारण , अधिष्ठान। धुर्या - ओझे सांभाळण्यासाठी योग्यगुणधुर्यां -सर्वगुणसंपन्न गौरीगोरी असलेली )

शिव तव परिचर्या नित्य गौरी करे ही

तिजसिच मदतीला ठेव माझीच पुत्री

सकल गुणयुता ही बुद्धि कन्याच माझी

तव पद-कमळी मी अर्पितो ही शुभांगी।।84.1

 

अपरिमित सुखाचा तूची सिंधू अपार

असशि उदधि तूची ज्ञानरूपी महान

गुणनिधि असशी तू  पूर्ण सत्यस्वरूप

शिव परम-निधाना  सच्चिदानंदरूप।।84.2

 

सकलचि जगताचे तू अधिष्ठान शंभो

सकल जन हितासी दक्ष हे दीनबंधो

मम हृदय असे हा भव्य प्रासाद उंची

सदय हृदय शंभो नित्य तू त्यात राही।।84.3

-----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 85 –

हे इंदुमौले, हे चंद्रशेखरा,

मी आपली पूजा कशी करावी हेच मला कळत नाही. आपली आवड काही जगावेगळीच आहे. अशा जगावेगळ्या गोष्टींनी मी आपली पूजा कशी करू? आपली पूजा करतांना मी आपल्याला फुले, नैवेद्य, वस्त्र, अलंकार कसे अर्पण करू?

                 आपण कालकूटाचं भोजन करता.  मी जलधि मंथन करण्यात प्रवीण/दक्ष असा श्रीविष्णू नाही. तेच आपल्याला कालकूट देऊ जाणे. मी आपल्याला कालकूट कसे देणार? श्रीविष्णुसारखा मी पाताळ भेदून आपले चरण कमळ शोधू शकत नाही. आपली पूजा करतांना कमी  पडलेल्या एका कमळाच्या बदल्यात श्रीविष्णुंनी बाणाच्या पात्याने त्यांचा एक नेत्रच काढून आपल्याला अर्पण केला. श्रीविष्णुंचे ते नेत्रकमल पाहून आपण प्रसन्न झाला. ना मी पाताळात जाऊन आपली पावले शोधू शकतो; ना मी हे असामान्य दिव्य करू शकतो. मग मी आपल्या चरणकळांवर कोठली कमळे वाहू? मी अत्यंत असमर्थ आहे. श्री विष्णूंनी पाताळातून सर्प आणले. ते आपण अत्यंत आनंदाने अंगावर अलंकार म्हणून धारण केले. मी हे काही काही करू शकत नाही. आपण चंद्रमौली आहात. आपल्याला माथ्यावर अलंकार म्हणून चंद्र लागतो. तो मी कसा काय देणार?

 

               आपण स्वतःच शिकार करण्यात निष्णात आहात. ते गजचर्म, व्याघ्रांबर आपण नेसता. पांघरता. ना मी असा शिकारीत तरबेज आहे ना मला आपल्यासारखा अजून कोणी दुसरा  उत्कृष्ट शिकारी माहित आहे. असे असतांना मी आपल्याला  आपल्या आवडीची वस्त्रे तरी कशी देणार?

                 आपली पूजा करतांना अशन, वसन, कुसुम आणि आभूषण देण्यास मी असमर्थ आहे. मग सांगा बरं मी आपली पूजा कशी करावी?

(वृत्त- मालिनी, अक्षरे- 15, गण - न न म य य, यति -8,पाद.)

जलधि-मथन-दक्षो नैव पाताल-भेदी

न च वनमृगयायां नैव लब्धः प्रवीणः।

अशन-कुसुम-भूषा-वस्त्र-मुख्यां सपर्यां

कथय कथमहं ते कल्पयानीन्दुमौले।।85

( अशन -  आहार । भूषा  अलंकार । मुख्यां - प्रधान यज्ञकृत्य, धार्मिक संस्कारवेदमंत्रांचे पठण ।  सपर्या - पूजा । इन्दुमौले -  हे चंद्रचूडा शंकरा, हे मस्तकी चंद्र धारण करणार्‍या शंकरा ।  कल्पयानि  (पूजा ) कशी संपन्न करु? )    

जलधि घुसळण्या हा विष्णु ना साह्यकारी

कुठुन तुजसी द्यावे मीच हालाहलासी

नच मज कुणि भेटे थोर पाताळभेदी

तुजसि कमलपुष्पे आणु कैसी शिवा मी।।85.1

 

सबळ हरिसमा हा दृष्टिक्षेपात नाही

सजवु तुजसि कैसे तक्षकाभूषणांनी

मजसि नच मिळाला थोर कोणी शिकारी

शिव शिव तुज देऊ चर्मवस्त्रा कसे मी।।85.2

 

मजसि कुणि सहाय्या ना करे चंद्रमौळी

कुठुन तुजसि द्यावा चंद्र आकाशिचाही

अशन, कुसुम, भूषा, वस्त्र द्यावे कसे मी

सविधि तव करावे पूजनासी कसे मी।।85.3

-----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 86 –

हे विश्वात्मका, हे विश्वेश्वरा,

             मी आपल्या पूजनाची सर्व तयारी यथासांग केली आहे. पण माझी मोठी बिकट परिस्थिती झाली आहे; मला आपण कुठे नजरेलाच पडत नाही.  माझ्या नेत्रांना आपण दिसूनच येत नाही. ज्ञानदेव माऊली म्हणतात, ``क्षेम देऊ गेले परि पाऊलची ना दिसे।‘’  देवा मी तुझ्या पावलांना मिठी मारायला गेलो. पण मला तुझं पाऊलच दिसत नाही. तशी माझी अवस्था आहे.

           पूर्वी आपल्या रूपाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेव पक्ष्याचं रूप घेऊन उर्ध्व दिशेला गेले. तर वराहरूप घेऊन विष्णू पाताळ ढुंढाळून आले. थोर देवांनाही आपलं स्वरूप कळण्यासाठी पक्षी व्हावं लागलं वा किडामुंगी सारख्या अधम अशा प्राण्यांचं म्हणजे वराहाचं रूप घ्यावं लागलं.  ``तद्रूपिणा’’ म्हणजे आपलं ते रूप पाहण्यासाठी तन्मय/तद्रूप झालेल्या त्यांनाही आपल्या ना मस्तकाचा ठावठिकाणा मिळाला ना आपल्या चरणांचा शोध लावता आला.

             हे उमाजानी, हे उमाकांता, जेथे अशा दिग्गजांनाही आपलं स्वरूप कळू शकत नाही तथे मी  आपलं स्वरूप कसं काय जाणणार?  त्यांच्यासारखा मी पक्षी, कीटकही होऊ शकत नाही. मला दर्शन देणे हे सर्वस्वी आपल्यावर वलंबून आहे. तरी ह्या भक्तावर कृपा करा आणि त्याला दर्शन द्या. 

(वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे-19,गण - म स ज स त त ग, यति -12,पाद.   )

पूजाद्रव्य-समृद्धयो विरचिताः पूजां कथं कुर्महे

पक्षित्वं न च वा किटित्वमपि न प्राप्तं मया दुर्लभम्।

जाने मस्तकमङ्घ्रि-पल्लवमुमाजाने न तेऽहं विभो

न ज्ञातं हि पितामहेन हरिणा तत्त्वेन तद्रूपिणा।।86

(जानि - पत्नी,  उमाजानि –- उमा ही ज्याची पत्नी आहे तो शंकर ।  किटित्वम् - वराहाचे रूप ।)

सामग्री तव पूजना जमविली नाही उणे राहिले

कैसे पूजन मी करु तव शिवा दृष्टीस तू ना दिसे

हंसाचे धरुनी स्वरूप फिरले स्वर्गी विधाता जरी

नाही मस्तक हे तुझेचि दिसले मोठ्या प्रयत्नांति ही।।86.1

 

पाताळात वराह होउनि हरी शोधी तुझे पाय हे

नाही सापडले परी चरण त्या लक्ष्मीपतीसी तुझे

झाले तन्मय हे पितामह किती तद्रूप झाला हरी

त्यांनाही परि विश्वरूप तव हे ध्यानी न ये पूर्ण ची।।86.2

 

 आहे दुर्लभ हे पशुत्व अथवा पक्षी च होणे मला

कैसा लाभ घडेल रे मज शिवा ह्या दर्शनाचा तुझ्या

भांबावे मन हे कळे न मजसी ना पाहता ईश्वरा

व्हावे पूजन हे कसे सफळ रे शंभो उमावल्लभा ।।86.3

------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 87 –

हे धूर्जटी, हे कंठनीला,

                आपलं सुग्रास जेवणं काय? तर महाभयंकर हालाहल! सोन्या मोत्यांची मेखला, अलंकार दागदागिने धारण करायचे सोडून  आपण महाविषारी, फुत्कारणारे नाग, सर्प भूषण म्हणून धारण करता. बरं, झुळझुळीत रेशमी पितांबर तरी! तेही आपल्याला पसंत नाही. आपण कटिभागाला जाडजूड गजचर्म वा व्याघ्रांबर धारण करता. रथ, घोडे अशी प्रतिष्ठा देणारी वाहनेही आपल्याजवळ नाहीत. आपण वाहन म्हणून वापरता तो आपला नंदी अगदीच म्हातारा आणि बेढब आहे. आपल्याकडे मला देण्यासारखं आहे तरी काय? आपल्या चरण कमळांची अनन्यभक्ती तेवढी द्या. अन्य आपल्याकडे मला देण्यासारखेही काही नाही आणि अनन्यभक्तीशिवाय मला आपल्याकडून घेण्यासारखेही काही नाही.

         (फार सुंदर श्लोक आहे हा. एक परमविरक्त तर दुसर्‍याला कशाचीच आसक्ती नाही. जो सर्व काही देऊ शकतो त्याच्याकडून धन, दारा, यश अशा लोकांच्या दृष्टीने सर्वोच्च वाटणार्‍या गोष्टींबद्दल यत्किंचितही मोह नसल्याने तुच्छ समजून आचार्य फक्त सर्वश्रेष्ठ अनन्य चरणभक्ती मागून घेतात.)

 ( अर्ध सम वृत्त  कालभारिणी )

अशनं गरलं फणी कलापो

वसनं चर्म च वाहनं महोक्षः।

मम दास्यसि किं किमस्ति शम्भो

तव पादाम्बुजभक्तिमेव देहि ।।87

(अशनं  आहार  गरलं  - विष। फणी -  सर्प । कलाप  मोत्यांचा हार, घुंगरु लावलेली मेखला । महोक्ष - नंदी।)

 

विष हाचि असे तुझा फराळ

तुजसी भूषण हा असेचि सर्प

गजचर्म तुला कटीस वस्त्र

तुजसी वाहन नंदिबैल वृद्ध।।87.1

 

तुजपाशि असे अजून काय

मज द्याया लव जे असेल योग्य

मम एकचि मागणे असे ची

मज द्या भक्ति तुझ्या पदी स्थिरा जी।।87.2

-------------------------------------------------------


शिवानन्दलहरी

  श्लोक 88 –

हे महेश्वरा, हे भक्तवत्सला,  

        आपले एकाहून एक श्रेष्ठ भक्त पाहिले की  मी किती क्षुद्र, तुच्छ, नगण्य आहे ह्याची मला जास्तच प्रकर्षाने जाणीव होत आहे. आपले महान भक्त श्री रामप्रभुंनी समुद्रावर सेतू बांधला; महर्षी अगस्तींनी अत्यंत उंच आणि विशालकाय अशा विंध्य पर्वताला नुसत्या तळहाताने खाली दाबून ठेंगणे केले. पद्मसंभव असे ब्रह्मदेव तर हया सृष्टीचे कर्ता करविता. आता तुम्ही म्हणाल की, ह्या ब्रह्मदेवालाही मागे टाकेल, असा त्याच्या पराक्रमाच्या वरताण (लङ्घितपद्मसम्भवः) जर माझा काही  पराक्रम असेल  तरच माझ्यामधे आपली पूजा, भक्ती, स्तुती ध्यान, चिंतन करायची काही पात्रता येईल; तर हे कधी शक्य आहे का? मग मला आपल्या भक्तीचा लाभ कसा होणार? मी असमर्थ आहे, दीन आहे म्हणून अपण मला दूर लोटू नका. मी दीन असेन तर आपण दीनबंधू आहात हे आपण विसरू नका.    

 (वृत्त - वंशस्थ, अक्षरे- 12, गण- ज त ज र, यति- पाद.)

यदा कृताम्भोनिधि-सेतुबन्धनः

करस्थलाधःकृतपर्वताधिपः।

भवानि ते लङ्घितपद्मसम्भव-

स्तदा शिवार्चास्तव-भावन-क्षमः।।88

(अन्वय -  हे शिव, अहं यदा  कृताम्भोनिधि-सेतुबन्धनः करस्थलाधकृतपर्वताधिपः  लङ्घितपद्मसम्भवः भवानि तदा ते अर्चा-स्तव-भावनक्षमः भवानि)  करस्थल अधःकृतः पर्वताधिपः - अगस्ति ऋषींनी तळहाताच्या आधाराने विंध्याचलालाही ठेंगणे केले. )

शिवा समुद्रावर सेतु बांधुनी

करून विंध्याचल ठेंगणा जरी

करी विधात्यासम सृष्टि सर्वही

तरीच पूजा करण्या समर्थ मी ।।88.1

 

कसे घडावेचि अशक्य शक्य ते

असंभवा ते करणेचि संभवे

समर्थ होता करि पूजना कसे

बरे नव्हे हे मज दूर लोटणे।।88.2

----------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 89 –

            भक्ती पोटातून उमलून ओठावर आली आहे का नुसतीच दिखाऊ आहे? हृदयात आहे का नुसतच सारं अवडंबर आहे ? हे भगवंताला बरोबर कळतं. आईच्या मांडीवर असलेलं लहान बाळ. अत्यानंदाने आईला लाथा मारत असतं. आईशी अनन्य असलेल्या त्या बाळाची तीही कृती आईला सुखावून जाते. त्याउलट काही कारणाने आपला अपराध लपवण्यासाठी मोठे मूल जर आईशी खोटे खोटे चांगले वागत असेल तर ती त्याला जराही जवळ न करता फटका द्यायलाही कमी करत नाही. अर्जुनाने अनन्यभावाने पशुपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली. भिल्लाच्या रूपात आलेल्या महादेवांशी अर्जुनाने लढाई करतांना धारदार बाण सोडून भोलेनाथांना जखमी केलं तरी, त्या बाणांमुळे ते मनातून आनंदूनच गेले. भक्ताविषयीच्या प्रेमाने त्यांचं मन उचंबळून आलं. त्यांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं. त्या उलट शंकाराची समाधी भंग करण्यासाठी आलेल्या मदनाने महादेवांवर फुलांचा बाण सोडला. पण त्याने क्रुद्ध होऊन महादेवांनी त्याला जाळून टाकले. महादेवांच्या एका भक्ताने तर मुसळानेच त्यांच्या डोळ्यावर प्रहार केला. तर शिवभक्त असलेला एक मुलगा शिवाची निंदानालस्ती करणार्‍या लोकसमूहात अडकल्यावर त्याने शिवपिंडीवर भक्तिभावाने काही दगडच मनापासून वाहिले. तेही शिवाने मोठ्या प्रेमाने मान्य करून घेतले. जसा भाव तसा देव. भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ  आहे.   

म्हणून आचार्य म्हणतात,

हे भोलेनाथ,

 मी आपल्याला साष्टांग नमस्कार घातला (नति). मी आपली स्तुतीही केली(नुति). मी आपली यथासांग पूजाही केली. ध्यान, धारणा, चिंतन सर्व काही मी करत आहे पण हे सर्व करूनही आपण काही संतुष्ट झाल्याची चिह्ने मला दिसत नाहीत. आता धनुष्य घेऊन आपल्याशी युद्ध करून आपल्याला बाणांनी जखमी करू का मुसळाने आपल्याला मारू का आपल्यावर दगड वाहू? कशाने आपण प्रसन्न व्हाल ते तरी एकदा सांगा.

       येथे आचार्य जरी असे म्हणत असले तरी ते स्वतः शिवाचे अनन्य भक्त, शिवस्वरूपच आहेत. सर्वसामान्य माणसांना काय वाटतं ते त्यांनी स्वतःवर आरोपित केल आहे. सामान्यांना वाटतं, अरे मी तर बेल वाहिला, फुलं वाहिली, पूजा केली तरी बघा देवाला माझी आठवण नाही. अशा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणासांसाठी हा श्लोक आहे. बाबा रे, देवाला बाकी काही नको. फक्त हृदयापासून भक्तीचा, भावाचा तो भुकेला आहे. 

(वृत्त - माल्यभारा, अक्षरे-1,3 चरण -11 ; 2,4 चरण-12;  गण- 1,3 चरण-स स ज ग ग;  2,4 चरण- स भ र ययति- पाद.)

नतिभिर्नुतिभिस्त्वमीशपूजा-

विधिभिर्ध्यानसमाधिभिर्न तुष्टः।

धनुषा मुसलेन चाश्मभिर्वा

वद ते प्रीतिकरं तथा करोमि।।89

(नति –- नमस्कार । नुति – स्तुती)

चरणी नमितो करी स्तुती मी

करितो ध्यान समाधि चिंतनासी

तुज पूजियले यथाविधी मी

तरिही तुष्टि नसे शिवा तुझीही।।89.1

 

रुचते धनु का शिवा तुलाची

शरवर्षाव करीच सव्यसाची

तरिही प्रिय तो गमे तुलाची

हितवर्षाव तयावरी करीसी ।।89.2

 

मज ना समजे कृती तुझीच

मुसळाने नयनावरी प्रहार

करि भक्त जरी तुझ्यावरीच

तरि संतुष्ट मनी असेचि तूच।।89.3

 

करण्या तव पूजनास्तवेची

तव पायी दगडांस अर्पिता ही

हृदयात तुझ्या तयास ठेवी

म्हणसी भक्तगणात श्रेष्ठ त्यासी ।।89.4

 

तुज सांग महेश काय अर्पू

धनु ,गोटे,मुसळास का चि शंभू

तव प्रीत कशी मला मिळेल

वसते काय हृदी तुझ्याचि सांग।।89.5

-----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 90 –

हे शंभूमहादेवा,

                         मी अत्यंत हृदयापासून आपली भक्ती करत आहे. माझ्या वाणीने मी आपले अत्यंत उज्ज्वल चरित्र गात आहे. मनात मी आपल्याच भव्य रूपाला सतत आठवत आहे. आपल्या ह्या विलोभनीय आकृतीशिवाय माझ्या मनात अजून काहीही नाही. आपलेच मनन, चिंतन मी करत आहे. माझे मस्तक सतत आपल्या पदी लीन आहे. ह्याखेरीज दुसरा कुठलाही पूजाविधी मी जाणत नाही. इतर कोणत्याही कर्मकांडांचे अनुष्ठान माझ्याकडून होत नाही. (किंवा आपल्याला जे जे प्रिय आहे ते सर्व करण्याशिवाय मी इतर काहीही करत नाही.) आता मला जीवनात आपल्याशिवाय दुसरे काही साध्य करून घेण्यासारखे उरलेच नाही. तरी हे प्रभो प्रसन्न व्हा. मला कृतार्थ करा.  

वचसा चरितं वदामि शम्भो-

रहमुद्योगविधासु तेऽप्रसक्तः।

मनसाऽऽकृतिमीश्वरस्य सेवे

शिरसा चैव सदाशिवं नमामि।।90

(चरितम् – मार्ग,कर्म करणे,अभ्यास, चरित्र । प्रसक्तिःआसक्ति, भक्ती । अहमुद्योगविधासु तेऽप्रसक्तः  -  इतर कोणत्याही पूजाविधीचा उद्योग करण्याचा मी प्रयत्न करीत नाही. अप्रसक्त च्या ऐवजी प्रसक्त असे पद धरल्यास हे शंकरा ! मी तुम्हाला प्रिय असलेले सर्व उद्योग करण्यात तत्पर असतो असा अर्थ घ्यावा)

मुख आळविते तुझ्या गुणांसी

बघते हे मन मूर्ति शंकराची

झुकते शिर हे तुझ्याच पायी

प्रिय जे जे तुजसी करीन तेची।।90.1

 

शिवपूजन हे असेचि माझे

नच उद्योग दुजे मलाचि भावे

तुज वाचुनि ना मला शिवा हे

उरते साध्य न जीवनीच कोठे।।90.2

--------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 91 –

हे राजमौले, हे चंद्रचूड,

             माझ्या हृदयात असलेल्या प्रगाढ अज्ञानामुळे (मूलाविद्येमुळे) मला आपले चित्स्वरूप दिसतच नव्हते. हेच अज्ञान माझ्या सर्व दुःखांचे मूळ आहे. पण आपण माझ्यावर कृपा केली आणि पाण्यातील शेवाळ हाताने दूर करताच निर्मळ सुंदर पाणी दिसायला लागावे; सूर्य प्रकाश पसरताच सर्व जग दृष्टीस पडावे; त्याप्रमाणे सर्व दुःखांचे मूळ असलेली ही मूळ अविद्या माझ्या हृदयातून पूर्णपणे निघून गेली आहे.  मला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देणारी विद्या माझ्या हृदयात प्रकट झाली आहे. हृदयाला प्रिय असलेली ही ``हृद्या’’ विद्या निरतिशय आनंदाचा साक्षात्कार घडवणारी आहे.

       हे राजमौले,  आपले हे पादपद्म मुक्तीपथावर नेणारे आहेत. अपरिमित, अपार, अमर्याद अशा आनंदाचे, सौख्याचे ऐश्वर्य प्रदान करणारे आहेत. मी आपल्या ह्या पदकमलांचे माझ्या हृदयात अनन्य प्रेमाने ``भावे’’ म्हणजे चिंतन  करीत आहे. आणि  ``सेवे’’ म्हणजे सेवीत आहे.

(वृत्त  शालिनी,अक्षरे-11,गण- म त त ग ग, यति- 4,7)

आद्याऽविद्या हृद्गता निर्गतासीत्

विद्या हृद्या हृद्गता त्वप्रसादात्।

सेवे नित्यं श्रीकरं त्वत्पदाब्जं

भावे मुक्तेर्भाजनं राजमौले।।91 

अन्वय -आद्याअविद्या हृद्गता आसीत सा त्वत् प्रसादात् निर्गता , हृद्या विद्या च हृद्गता जाता! मुक्तेः भाजनं श्रीकरं त्वत्पदाब्जं नित्य भावे सेवे । ) ( अविद्या- – मूलविद्या - अज्ञान । राज -  चंद्रराजमौलि - चंद्रशेखर, शंकर )

होती चित्ती माझिया जी अविद्या

त्याची जागा घेतसे ही सुविद्या

अज्ञानाचा होऊनी नाश माझ्या

आनंदाचा लाभला नित्य ठेवा।।91.1


देती नित्या पाउले वैभवा जी

मुक्तीचाही नित्य सोपान होती

पायांसी त्या कोमला, चंद्रमौली!

माझ्या चित्ती पूजितो सर्वकाळी।।91.2

------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 92 –

हे आदिनाथा, हे गौरीहरा,

                       ज्या दुष्कृत्यांचा अक्षरांनी मुखावाटे उच्चारही करू नये (दुरक्षराणि) अशी सर्व दुरिते म्हणजे दुष्कर्म, दुष्ट कृत्ये मी केवळ आपल्या सततच्या नामस्मरणाने दूर केली आहेत. (सतत कल्याणकारी शिवनाम मुखात असेल तर बाकी वाईट शब्द मुखातूनही बाहेर पडणार नाहीत.) त्यामुळे माझं दुर्भाग्य संपलं आहे. आता दुर्दैव माझ्या सावलीलाही उभं राहात नाही. माझा सर्व दुराभिमान, दुरहंकार, फुकाचा ताठा, गर्व सर्व सर्व गळून गेलं आहे. दुसर्‍याच्या दुःखावर डागण्या देणारे कटु बोल, दुसर्‍यांना झोंबतील असे तिखट शब्द, दुसर्‍यांच्या वर्मावर घाला घातल्यासारखे जळजळीत वाग्बाण आता माझ्या मुखातून बाहेर पडत नाहीत; तर जो कल्याणाचा गाभाच आहे; सर्व उत्तम गोष्टींचा अर्कच आहे; वा तत्त्वज्ञानाचं सार आहे अशा  अमृताप्रमाणे अत्यंत मधुर असलेल्या आपल्या शिवतत्त्वाच्या कल्याणकारी चरित्राचे मी आकंठ प्राशन करत आहे. आता क्षणभर आपली कृपापूर्ण दृष्टी आपण माझ्यावर टाका. त्या एका कटाक्षानेच माझं जीवन सफल होईल. आपल्या कृपावर्षावाने उजळून निघेल.

(वृत्त  वसंततिलका, अक्षरे-14,गण- त भ ज ज ग ग, यति- पाद.)

दूरीकृतानि दुरितानि दुरक्षराणि

दौर्भाग्य-दुःख-दुरहंकृति-दुर्वचांसि।

सारं त्वदीयचरितं नितरां पिबन्तं

गौरीश मामिह समुद्धर सत्कटाक्षैः।।92

(दुरक्षराणि दुरितानि ज्याच्या नावाची अक्षरेही उच्चारु नये अशी पापे । दुरहंकृति दुरहंकार। दुर्वचांसि- कटु बोलणे। )

चित्ती करून जपयज्ञ तुझा शिवा हे

दुष्कर्म ते सकल सर्वहि दूर केले

उच्चारणे न कधिही नित पाप ऐसे

झालेचि दूर सगळे तुझिया कृपेने।।92.1

 

दुर्भाग्य सर्व सरलेचि अहंपणाही

नाही मुखी मम असे कटु शब्द काही

शंभो चरित्र मधु हा नित प्राशितो मी

जो अमृतासम असे मज मोद देई।।92.2

 

टाका कटाक्ष अवघ्या तव सत् कृपेचा

गौरीहरा भवभयातुन निस्तरा या।।92.3

------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 93 –

हे कंठनीला, हे भालचंद्रा,

     चंद्राची अत्यंत रेखीव, शांत, प्रकाशमान अशी कोर  आपल्या जटाजूटावर खुलून दिसत आहे. अहो! तो सावळा घनदाट मेघ आणि आपण मला तर एकसारखेच वाटता. ``कं’’ म्हणजे पाणी. म्हणून, पाणी घेऊन येणार्‍या श्याम मेघाला ``कंधर’’- पाणी धारण करणारा म्हणतात. तर ``कंधर’’चा दुसरा अर्थ कंठ असा आहे. मेघाप्रमाणे शिवाचा कंठ नीलवर्णी झाला आहे.

                  दोघेही घनकंधर आहेत आकाश घनदाट मेघांनी भरून जातं. तर हे विश्व शिवतत्त्वाने ओतप्रोत भरलं आहे.

                   दोघेही सारखेच कोमल आहेत. मेघ समुद्रातील क्षार काढून मधुर झालेलं पाणी सार्‍या प्राणीमात्रांसाठी घेऊन येतो; तर अत्यंत कोमल अंतःकरणाचा हा घनकंधर, नीलकंठ भक्तांवर कृपा वर्षाव करतो.

             वीज चमकण्याने मेघ उजळुन जातो तर हा घनकंधर अत्यंत तेजस्वी  महा महस्; प्रकाशाचा प्रकाश, तेजाचं तेज स्वयंप्रकाश आहे.

            अशा ह्या तेजस्वी, गिरिजानाथा, आपण सर्व जगाचे स्वामी आहात. आपण माझ्या हृदयात रममाण व्हावे इतकीच माझी इच्छा आहे. 

(वृत्त  आर्या; चरण1, 3  12 मात्रा;   चरण 2- 18 मात्रा; चरण  15 मात्रा )

सोमकलाधरमौलौ

कोमल-घनकन्धरे महामहसि।

स्वामिनि गिरिजानाथे

मामकहृदयं निरन्तरं रमताम्।।93

(सोम- चंद्र । कला - कोर  मौलि – शिर। सोमकलाधरमौली - चंद्रकोर डोक्यावर असलेला । कं – पाणी  कंधर -  ढग । महस् -  आभा तेज)

चंद्रकला-धर शंभो

कोमल घन-नीळकंठ तेजस हो

पालक गिरिजानाथा

हृदि राहि सुखे निरंतर ह्या।।93

-----------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 94 –

                 आपल्या प्रत्येक अवयवाला धन्यता लाभण्यासाठी, कृतकृत्य होण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे हे ह्या श्लोकात आपल्याला आचार्य सांगत आहेत. ह्या श्लोकात शिवाचा भर्ग असा उल्लेख केला आहे. भर्ग म्हणजे अत्यंत तेजस्वी. शंकर हे अत्यंत तेजस्वी असल्याने त्यांचा भर्ग असा उल्लेख केला आहे. ( यो भर्गं वदति सा रसना, ये भर्गं ईक्षेते ते नयने, यौ भर्गं अर्चतः तौ एव करौ, यः भर्गं सदा स्मरति स एव कृतकृत्यः भवति । )

 

                 शिवनामरसाची गोडी काही औरच आहे. जी रसना अमृतमय शिव-नाम-रसाचा सतत आस्वाद घेते, सातत्याने शिवनामरसपान करत असते ती रसना धन्य आहे. शिवाचे कल्याणकारी रूप ज्या नेत्रांमधे कायमचे वस्तीला येऊन राहिले आहे तेच नेत्र धन्य होत.  नेत्र तेव्हाच कृतकृत्य होतात जेव्हा ते शिवाच्या कल्याणकारी रूपाला पाहण्यासाठी सतत लालचावलेले असतात. जे हात कल्याणमयी विश्वेश्वराच्या पूजेत गढून गेलेले असतात तेच हात धन्य होत. जो माणूस शिवाच्या नामस्मरणात, गुणसंकीर्तनात तल्लीन झाला आहे त्याच्याच नरदेहाचं  खर्‍या अर्थाने सार्थक झालं असं समजावं.

          जी जिह्वा, जे डोळे, जे हात, जो माणूस आपलं हे काम करत नाही तो कर्तव्यपथावरून च्युत झाला असं समजावं.           

            शिव हे विश्वरूप आणि कल्याणकारी तत्त्व आहे. त्यामुळे कल्याणकारी मार्गावरील प्रत्येक काम हे शिवपूजनच आहे. मग ती देशसेवा असो वा आपले रोजचे विहीत कर्म असो. आपले विहित कर्म लहान, क्षुल्लक, मोठे, अशक्य असा भेदभाव न करता अत्यंत प्रामाणिकपणे ``पूर्वात्पूर्वतरं’’ म्हणजे पूर्वी कोणीही केले असेल त्यापेक्षा उत्कष्ट रीतीने करण्यासाठी झटणे ही सुद्धा नरदेहाला कृतकृत्य करणारी शिवपूजाच होय.    

सा रसना ते नयने

तावेव करौ स एव कृतकृत्यः।

या ये यौ यो भर्गं

वदतीक्षेते सदार्चतः  स्मरति।।94

 

ती जिह्वा ते डोळे

तेची हात कृतकृत्य जाणावे

जी बोले, जे पाही,

जे करी शंभु पूजनासी।।94

---------------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 95 –

हे कैलासपती, हे गिरीशा,

अहो, किती हे आपले बहाणे! मला माहित आहे की, आपली पाऊले ही कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे अत्यंत कोमल आहेत. आपण भक्तांच्या अत्यंत कोमल अन्तःकरणात फिरता. पण म्हणून जर आपण मला सांगायला लागला की, ``माझ्या कोमल पायांना तुझ्या अत्यंत कठीण, दुस्तर, खडखडीत हृदयात संचार करतांना मरणप्राय यातना होतात; वा तुझ्या ह्या टणक अन्तःकरणात चालणं फार वेदनादायी आहे, मला ते सोसवणार नाही; तर असा भेदभाव करणारे तर्क वितर्क आपण लढवू नका. भलभलत्या कुकल्पना, आशंका आपण व्यक्त करू नका. मला माहीत आहे आपण अत्यंत दुर्गम अशा कैलासावर, हिमालयात अखंड संचार करीत असता. आपले असे बोलणे आपल्याला शोभा देत नाही, कारण आपण दीनबंधू आहात. पतितपावन आहात तर मी अत्यंत पतित, दीन आहे. मला असं दूर लोटू नका.  

 

अतिमृदुलौ मम चरणा-

वतिकठिनं ते मनो भवानीश।

इति विचिकित्सां संत्यज

शिव कथमासीद् गिरौ तथा वेशः।।95 

( वेश - संचार,प्रवेश )

`मृदुल पाऊले माझी । तव हृदय असे दुर्गम काटेरी

संचार त्यात करिता । बोचेल बहु मम पायांसी '।।95.1

सोड  चिकित्सा ऐसी । हे शिव गिरिजेश्वर कैलासपती

संचार नित्य करिसी । दुर्गम गिरि-कंदरी तूची।।95.2

----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 96 –

हे त्रिपुरारी , हे पुरहरा,

          जगाची पर्वा नसलेल्या आणि मनाची जराही शुद्ध नसलेल्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे (हृदय मद इभं) माझं हृदय मोकाट धावत आहे. त्याला योग्य अयोग्याचं भान राहिलेलं नाही. त्याचा स्वैर संचार सर्व बाजूंनी आपत्तीकारक आणि नुकसान करणारा आहे.

          हे त्रिपुरारी आपण धैर्याचा अंकुश वापरून(धैर्याङ्कुशेन) त्याला रोखा. स्वैर पळणार्‍या माझ्या हत्तीरूपी मनाला एका जागी स्थिर(निभृतं) करा.  आपल्या सर्व बळाचा(रभसात्)  वापर करून त्याला भक्तीरुपी साखळदंडांनी (भक्तिशृङ्खलया) खेचून(आकृष्य) आपल्या चरणरूपी खांबाला (चरण आलाने) चित् म्हणजे चैतन्यरूप वा ज्ञानरूप यंत्राने  घट्ट बांधून ठेवा. माझ्या अहंकारी, मदोन्मत्त मनाला आपल्या चरणांपासून जराही हलू देऊ नका. ही माझी विनंती आहे.

धैर्याङ्कुशेन निभृतं

रभसादाकृष्य भक्तिशृङ्खलया

पुरहर चरणालाने

हृदयमदेभं बधान चिद्यन्त्रैः।।96

( रभस्  - बळ, सामर्थ्य। निभृत- अचल, गतिहीन, स्थिर। आलान- हत्ती बांधून ठेवायची जागा किंवा खांब। पुरहर- त्रिपुरासुराचा नाश केल्याने शंकराला पुरहर म्हणतात  हृदयमदेभं हृदय मद इभं  - मदोन्मत्त हत्ती प्रमाणे असलेल्या माझ्या हृदयास। इभ – हत्ती ।  चिद्यन्त्रैः चित् यन्त्रैः चैतन्य वा ज्ञानरूपी यंत्राने)

 

मम मन हे त्रिपुरारी । मदधुंद गजासम बहु अविचारी

अचल करा हो त्यासी । धाडस या अंकुशानेची।।96.1

खेचा बळ लावोनी । त्या भक्तिशृंखलेने जखडूनी

सत्वर दृढ त्या बांधी । चिद्यंत्राने तुझ्या पायी।।96.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 97 –

हे स्थाणु , हे अनीशा,

             आपण मेरू पर्वताप्रमाणे दृढ आणि अचल आहात. तर माझं मन अत्यंत चंचल आहे. हत्ती माजावर आला की त्याच्या गंडस्थळातून दानोदक नावाचा द्राव पाझरू लागतो. तो रस त्याच्या डोळ्यात गेला की त्याला सारं काही अंधुक, अस्पष्ट दिसायला लागतं. त्यामुळे तो अजुनच बिथरतो. मदाने वेडा झालेला हा हत्ती(करी) मोठ्या उन्मत्तपणे,  बेधडकपणे, (प्रगल्भवृत्या) मोठ्या साहसीपणाने दिशाहीन भटकायला लागतो.  हे शिवा माझं मनही त्या माजावर आलेल्या हत्ती(करी)प्रमाणे गर्विष्ठ आहे. कायम मोठी प्रौढी दाखवत(प्रगल्भवृत्या) उन्मत्तपणे  ते भटकत राहतं.

        माजलेल्या हत्तीला जाड दोरखंडाने बांधून(परिगृह्य) खेचून (नयेन) भक्कम न हालणार्‍या, दृढ अशा खांबाला (स्थाणु) बांधून ठेवतात.

             हे शंभो आपल्याला परम स्थाणु म्हणतात. स्थाणु अचल असतो. स्थिर असतो. स्थाणु म्हणजे न हलणारा भक्कम खांब वा स्तंभ. त्याच्यासारखं असलेलं आपलं हे दृढ परम स्थाणु पद माझ्या मनाला प्राप्त करून देण्यासाठी भक्तीरूपी बळकट दोरखंडाने आपण त्याला बांधून त्या परमस्थाणुपदाकडे, शिवपदाकडे मार्गदर्शन करून (नयेन) आपल्या स्वरूपाशी बांधून ठेवा. ही मी आपल्याला वारंवार विनंती करत आहे.

( वृत्त  माल्यभारा)

प्रचरत्यभितः प्रगल्भवृत्या

मदवानेष मनःकरी गरीयान्।

परिगृह्य नयेन भक्तिरज्ज्वा

परम-स्थाणु-पदं दृढं नयामुम्।।9 

( मदवानेष - मदवान् एष  अभितः -  सर्वत्र। नयामुम् - नय अमुम्- ह्याला ( मनाला) ने। स्थाणु -  स्थिरपद, शंकर, हत्ती बांधतातात तो खांब । करी हत्ती । मनःकरी मनरूपी हत्ती.)

मदमस्त फिरे जसा कुणी हा

गज उन्मत्तचि दाखवीत प्रौढी

मम हे मन रे फिरेतसेची

अति मोकाट सुटे सुसाट पाही।।97.1


दृढ बांधि तयास युक्तिनेची

बहु खेचूनचि भक्तिरज्जुने त्या

स्थिर नित्य असेचि स्थाणु तूची

म्हणुनी बांध मना तुझ्या स्वरूपी।।97.2

-------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 98 –

हे गौरीप्रिया , हे गिरिजेश्वरा,

         माझी ही अत्यंत गुणी सालस अशी कवितारूपी कन्या मी आपल्याला अर्पण करत आहे. आपण तिचा स्वीकार करा. विवाहात देतांना मुलीचे सालंकृत कन्यादान करतात; त्याप्रमाणे माझी ही उपवर झालेली काव्य कन्याही उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अर्थांतरन्यास अशा मनमोहक अलंकारांनी सजवून( सर्वालंकारयुक्ता)  मी आपल्याला अर्पण करत आहे. जशी कन्या उच्च कुळ,  योग्य वंश वा गोत्राची(सकलपदयुता) आहे ना हे बघतात, ती मधुरभाषिणी आहे ना हे बघतात त्याप्रमाणे माझीही काव्य कन्या अत्यंत उच्च दर्जाची, मधुर  शब्द आणि अर्थ असलेली आहे. मुलगी सद्वर्तनी (साधुवृत्ता) असणं अपेक्षित असतं. माझीही कन्या साधुवृत्ताच आहे. शिखरिणी, शार्दूलविक्रीडित, कालभारिणी, स्रग्धरा, माल्यभारा, आर्या, वसंततिलका, शालिनी, वंशस्थ अशा अनेक साधु म्हणजे सुंदर सुंदर वृत्तांमधे मी ती गुंफली आहे. मुलीची अंगकांती तिचे निरोगीपण दाखवत असते म्हणून ती(सुवर्णा)असणे आवश्यक आहे. माझी ही कन्या, उत्तम वर्णरचना असलेली शब्दालंकारांनी युक्त(सुवर्णा) आहे. थोरा मोठ्यांनी मुलीच्या गुणांची पारख करून मुलीची प्रशंसा केलेली मुलगी जशी नक्कीच गुणी असते त्याप्रमाणे माझ्याही काव्यकन्येची सज्जनांनी प्रशंसा केलेली आहे.(सद्भि संस्तूयमाना) वधूपरीक्षा करतांना वधूमधे उत्तमोत्तम गुण आहेत ना हे पारखले जाते.  माझी ही काव्यकन्या ``-रस’’  म्हणजे कारुण्य, वात्सल्य, ओज, माधुर्य, प्रसाद अशा रसांनी युक्त आहे.( सरसगुणयुता) अत्यंत सुलक्षणी (लक्षणाढ्याम् लक्षितां) आहे. मुलीच्या अंगावर जसे काही हटके दागदागिने वा तिचे लावण्य खुलवणार्‍या अंगभूत बाबी असतात त्याप्रमाणे इतरांमधे सहजासहजी  न सापडणार्‍या अत्यंत श्रेष्ठ गुणांनी ही युक्त (उद्यद्भूषाविशेषा) आहे. जशी मुलगी उपजतच विनयशील असावी त्याप्रमाणे माझी ही काव्यकन्या अत्यंत विनयाने ओतप्रोत आहे. एखाद्याच भाग्यशाली कन्येच्या हातावर धनरेषा (द्योतमानार्थरेखा) अगदी स्पष्ट असते. माझ्या ह्या काव्य कन्येची अर्थरेखा म्हणजे विवध अर्थांची जणु सुंदर मालाच गुंफली आहे.  वधू कल्याणकारी गुणांची द्योतक असावी (कल्याणी) त्याप्रमाणे माझी ही उपवर काव्यकन्या खरोखरच  कल्याण प्राप्त करून देणारी आहे.

तरी हे गौरीप्रिया, गौरीश्वरा आपण माझ्या ह्या काव्यकन्येचा स्वीकार करावा अशी माझी फार मनापासून आपल्याला प्रार्थना आहे. 

(वृत्त - स्रग्धरा, अक्षरे - 21, गण - म र भ न य य य , यति - 7, 14,21 )

सर्वालंकारयुक्तां सकलपदयुतां साधुवृत्तां सुवर्णां

सद्भिः संस्तूयमानां सरसगुणयुतां लक्षितां लक्षणाढ्याम्।

उद्यद्भूषाविशेषामुपगतविनयां द्योतमानार्थरेखां

कल्याणीं देव गौरीप्रिय मम कविताकन्यकां त्वं गृहाण।।98

 

माझी ही काव्य कन्या सकल गुणयुता चारुवृत्ता सुवर्णा

नानालंकारयुक्ता सुमधुर-वचना लाघवी गोड बाला

नाना आश्चर्यकारी प्रचुर गुण तिचे भूषवी हे तिलाची

सार्‍या सद्लक्षणांनी सरस बहु असे देखणी ही शुभांगी।।98.1

अर्थाची स्पष्ट रेखा जणु दिसत असे कन्यकेच्या करी या

आहे ही नम्रमूर्ती उपजत विनयी उच्च विद्यासयुक्ता

थोरांनीही प्रशंसा करुनि बहु जिला नित्य वाखाणिलेली

स्वीकारा पार्वतीशा! उपवर तनया भाग्यशालीच माझी।।98.2

---------------------------------------------------

  

शिवानन्दलहरी

  श्लोक 99 –

हे विश्वात्मका , हे विश्वरूपा,

          आपल्या अस्तित्त्वाने हे सर्व चराचर विश्व व्यापून टाकले आहे. त्याच्याही पलिकडे अजून आपला विस्तार किती व केवढा आहे ह्याचा मी ना अंदाज करू शकतो, ना तर्क करू शकतो, ना विचार करू शकतो. आपली अमर्याद व्याप्ती माझ्या तर्काकाच्याही पलिकडची आहे. आपला हा विश्वपसारा जाणून घेण्याचा भल्याभल्यांनी प्रयत्न केला पण त्यांना आपले ज्ञान झले नाही. ह्या विश्वाचे रचनाकार, निर्माते प्रत्यक्ष ब्रह्मदेव पक्ष्याचं रूप घेऊन उंच उंच गेले पण त्यांना आपल्या मस्तकाचे दर्शन झाले नाही; तर श्रीविष्णूंनी वराहरूपाने सर्व पाताळ खणून उलटा पालटा केला पण त्यांना आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले नाही. मी तर ह्या दिग्गजांपुढे कोण क्षुद्र माणूस आहे. मला आपल्या विस्ताराचे, खर्‍या स्वरूपाचे दर्शन कसे लाभावे?

              पण! मला इतकच माहित आहे की, आपण कृपापारावार आहात. दयासिंधू आहात. दयार्द्र दयानिधी आहात. आपण कृपा केली तर मी नक्कीच आपल्याला पाहू शकेन. अन्यथा कसा बघेन?  

( वृत्त  शिखरिणी, अक्षरे -17, गण- य म न स भ ल ग, यति -6,11 

इदं ते युक्तं वा परमशिव कारुण्य-जलधे

गतौ तिर्यग्रूपं तव पद-शिरो-दर्शन-धिया।

हरिब्रह्माणौ तौ दिवि भुवि चरन्तौ श्रमयुतौ

कथं शम्भो स्वामिन् कथय मम वेद्योऽसि पुरतः।।99

( तिर्यग्रूपं - पशु पक्ष्यांचे रूप घेऊन । पुरतः  -पुढे ,प्रत्यक्ष ।   वेद्य -  जाणुन घेण्यास योग्य)

असे भक्तांचे तू निरतिशय कल्याणचि शिवा

असे कारुण्याचा तव हृदय-रत्नाकर महा

तुझ्या विस्ताराचा मजसि लव अंदाज कुठला

कळावा कैसा तू मज जडमतीसी शिव कसा।।99.1


हरि-ब्रह्मा दोघे तव पद-शिरो-दर्शन-मिषे

वराहा हंसाचे स्वरुप धरुनी ते भटकले

विधाता गेला तो वर वर अती उंच गगनी

शकेना पाहू तो परि तव शिरासी चुकुनही।।99.2


जरी पाताळासी हरि बहुत शोधेचि तरिही

तयासीही नाही तव चरण आलेचि दिसुनी

कसा यावा तूची समजुनि मला सांग शिव हे

तुझ्या रूपासी मी कधि बघिन प्रत्यक्ष शिव हे।।99.3

-------------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 100 –

हे विश्ववन्द्या , हे देवाधिदेवा महादेवा,

             मी आपल्याला अनन्य भावाने शरण येऊन, आपली मनापासून स्तुती करत आहे.  आपण मात्र ``बास बास ! पुरे झालं तुझं स्तुतीचं खोटं खोटं नाटकं.’’ असं म्हणून मला दूर लोटू नका. माझा प्रत्येक शब्द माझ्या हृदयातून आला आहे. मी मनापासून बोलत आहे. माझ्या स्पंदना स्पंदनातून आपलंच नामस्मरण होत आहे. तरीही आपल्याला वाटत असेल की, आपल्याला खुश करून आपल्यापासून काहीतरी मिळवण्याच्या स्वार्थी हेतूने मी जर अशीच वृथा खोटी खोटी आपली स्तुती आरंभिली आहे, मी लांगूलचालन करत आहे, तर मी कशाला खोटे बोलू?

            सगळे देव जेव्हा एकत्र जमले होते आणि त्यांच्यामधे आपल्या सर्व देवांमधे कोण सर्वश्रेष्ठ आहे अशी चर्चा सुरू होती तेंव्हा, धान्य पाखडतांना सारं फोल सुपातून उडून जावं त्याप्रमाणे सर्व देवांची नावं देवांच्या जिभेवरून कधीच दूर सारली गेली, जणु वार्‍यावर उडून गेली. आणि सुपातल्या टपोर्‍या धान्याच्या दाण्यांप्रमाणे फक्त एकच नावं सर्वांच्या तोंडी उरलं,-- हर हर महादेव! जय भोलेनाथ! कैलासराणा शिव चंद्रमौळी!

          एखादी गोष्ट मिळवायची असेल, साध्य करून घ्यायची असेल तर ती उत्तमोत्तम, सर्वोत्तम असायला हवी. आपण देवांचेही देव महादेव आहात. आपल्याशिवाय ह्या जगात मला साध्य करण्यासारखे दुसरे काय आहे? आपल्याविना मला दुसरी कोणती गती आहे? हे विश्वेश्वरा मी आपल्या ह्या चरणकमळांवर अनन्यभावे शरण आलो आहे. मी आपला सेवक आहे.  ॐ नमः शिवाय! ॐ नमः शिवाय! ॐ नमः शिवाय! 

( वृत्त  शार्दूलविक्रीडित, अक्षरे -19, गण- म स ज स त त ग, यति -12,7)

स्तोत्रेणालमहं प्रवच्मि न मृषा देवा विरिञ्चादयः

स्तुत्यानां गणनाप्रसङ्गसमये त्वामग्रगण्यं विदुः।

माहात्म्याग्रविचारणप्रकरणे धानातुषस्तोमवद्-

धूतास्त्वां विदुरुत्तमोत्तमफलं शम्भो भवत्सेवकाः।।10

( अलम्बास,पुरे। मृषा -असत्य ,मिथ्या, खोटे। विरिञ्चादयः - ब्रह्मदेवादि देव। स्तोम  ढीग, संग्रह, समुच्चय । धूताः - वार्‍याने उडून गेल्याप्रमाणे नाहीसे झाले। स्तुत्यानां गणनाप्रसङ्गसमये - स्तुती करण्यास योग्य असलेल्यांची गणना करण्याच्या प्रसंगी )

`झाली बास! पुरे पुरे स्तुति!! वृथा आरंभली !' ना म्हणी

खोटे बोलु कशास? देवहि तुला सर्वोच्च हे मानिती ।

सर्वश्रेष्ठ असेचि कोण म्हणुनी चर्चा अती रंगली

ब्रह्मा विष्णु सवेचि देव सगळे सारी जमे मंडळी।।100.1

 

दाणेदारचि फोल मिश्रित अशा या धान्यराशीमधे

वार्‍याच्यासमवेत जाय उडुनी जैसेचि हे फोल रे।

तैसी ही करिता तुझीच तुलना बाकी सुरांच्या सवे

नावे ना टिकली तुझ्याच पुढती इंद्रादिकांची कुठे।।100.2

 

अंती एकचि नाव ते उमटले प्रत्येक ओठी तुझे

`शंभो शंकर विश्वनाथ जय हो! कैलासराणा' असे ।

आहे साध्यचि उत्तमोत्तम असे तू सर्व भक्तांसही

नाही रे तुजवीण अन्य कुठली या सेवकांसी गती।।100.3

  

जे आनंद तरंग अमृतसमा आंदोळती अंतरी

तेची मी अनुवादरूप करुनी ठेवी मराठीतुनी ।

भावार्थास अरुंधती शिवपदी अर्पून इच्छा करी

सौख्याचे उठु दे तरंग रसिका-चित्तीच हे वाचुनी।।

 

-----------------------------------------------------------------

  भाग 1 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


भाग 1 लिंक

रसिक वाचकहो,

नमस्कार!

                 दहा वर्षांपूर्वी (2010 ते 2011) ह्या शिवानंदलहरी वाचून माझ्या हृदयातही आनंदाच्या लहरी उचंबळून येत राहिल्या. ज्या जलाशयात मोठ्या मोठ्या लाटा उसळतात तो जलाशय शांत कसा असावा? आनंदाच्या असल्या तरी ह्या गगनचुंबी लाटा मला अस्वस्थ करत राहिल्या. त्या अस्वस्थतेतून एक विचार मनात आला, ह्याचे मराठी भाषांतर केले तर हया शिवानंदलहरी मनाला स्वस्थता देतील; म्हणून क्षणोक्षणी आनंदाच्या लाटांवर स्वार होऊनच त्याचा भावानुवाद केला.  भावानुवाद पूर्ण झाल्यानंतर मात्र  आनंदजलानी भरलेला मेघ आनंदवर्षा करून निघून जावा तसा मनाला आलेला रितेपणा गेला नाही. 

                  आज परत एकदा हया सर्व श्लोकांचे गद्यात विश्लेषण करून झाले. स्वतः श्री प्रवीण दीक्षितांनीही माझ्या अनेक चुका वेळोवेळी दाखवून हा भावानुवाद बिनचूक होण्यासाठी मदत केली. ज्या चुका राहून गेल्या आहेत त्या सर्वस्वी माझ्या आहेत. आता मात्र माझे मन प्रसन्न, स्थिर आणि शांत झाले आहे. आपल्यालाही तोच निरतिशय आनंद माझ्या वृत्तबद्ध भावानुवादातून मिळावा अशी आशा करून प्रवीणजाया अरुंधती आपला निरोप घेते.

                      हा सर्व भावानुवाद आणि त्याच्या विश्लेषणासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी ह्यांच्या श्री शंकराचार्य कृत सुबोध स्तोत्र संग्रह भाग 1 2 व वामन शिवराम आप्टे ह्यांच्या संस्कृत-हिंदी कोशाचा मला हिमालयासारखा आधार मिळाला. त्या प्रति माझी कृतज्ञता. गेले शंभर दिवस आपण माझ्या ह्या अनुवादमहोत्सवात सामील झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद!

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची

वैशाख शुद्ध पंचमी , श्रीमन्नृपशालिवाहन प्लव नाम संवत्सर 1943

श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती.

 17 मे 2021 सोमवार

 

 

 

No comments:

Post a Comment