श्रीगणेशभुजङ्गमस्तोत्रम् विश्लेषण

श्री गणेशाय नमः

                     श्रीगणेशभुजङ्गमस्तोत्रम् विश्लेषण

श्लोक 1

सुहृदहो,

कुठल्याही मंगल, पवित्र, कल्याणकारी कामाची सुरवात ही गणेशपूजनानी केली जाते. शिव आणि पार्वतीचा हा बाळ. शिव हा सार्‍या विनाशाचं प्रतिक तर पार्वती जगातील सार्‍या नवनिर्मितीचं प्रतिक. वरवर पाहता दोघांची कृती एकमेकांच्या विरुद्ध.

पण! विनाश आणि नवनिर्मिती दोन्हीही एकाच कृतीची अभिन्न अंग आहेत. एक कृती घडत असतांनाच दुसरी कृती अपोआप होत असते. नदी डोंगरावरून वाहात येतांना डोंगराची झिज होते. धूप होते. त्याचमुळे पुढे सुपीक गाळाची जमिन तयार होते. विनाश आणि नवनिर्मितीच्या अटितटीच्या सामन्यातून तयार होणारी कलाकृती; दुष्काळ, अतिपाऊस ह्या सर्व आपत्तींना तोंड देत देत जोमदारपणे येणार्‍या भरगच्च कणसांनी डुलणार्‍या शेतासारखी परम मंगलमय असते. त्याच मंगलमूर्तीच प्रतिक म्हणजे गणेश. सर्व जनहिताय कामाची सुरवात म्हणजेच गणेश! ही सुरवात एखाद्या लहानशा कामातूनच होते. सदोषही असते. पण अनुभवाने सततच्या सुधारणांनी हे दोष दूर करत करत एक भव्य दिव्य प्रकल्प आकार घेत असतो. मोठ्या नदीचा उगम म्हणजे  एक छोटा निर्झरच असतो. अग्नी पेटण्यापूर्वी धूर हा येतोच; हेच धूम्रवर्ण गणेशाची बालमूर्ती सांगते. संकटांचा सामना करत मृत्यूच्या माथ्यावर पाय देऊन हाती घेतलेलं काम तडीस न्या हे सांगणारी ही बालगणेश मूर्ती स्वतः शिवाच्या तांडव (ता) तर पार्वतीच्या लास्य () नृत्यांची आद्याक्षरे घेऊन आपला स्वतःचा `तालबनवून त्या पद्मतालावर नाश आाणि सृजनाचा तोल साधत नाचत असते.  

                हा बाळ आनंदाने नाचतांना त्याच्या कमरेच्या मेखलेतील छोट्या छोट्या घंटा किणकिणत आहेत. पायातल्या नूपुरांचाही मंजूळ ध्वनी निनादत आाहे. त्याच्या बाळसेदार गोंडस देहावर मोठ्या सर्पांचे हार रुळत आहेत. कुठलंही काम हाती घेतलं की त्यात येणारी संकटमालिकाच जणु ह्या लांबलचक सर्परुपाने सहजपणे हा गणेश अंगावर वागवत आहे. कायम कालकूट कंठात ठेऊन शांतपणे ध्यानस्थ बसणार्‍या शिवाचाच पुत्र तो! कितीही मोठ्या संकटाचा सामना हसत खेळत करावा हे सांगणार्‍या, आपल्या कृतीतून दाखवून देणार्‍या सर्व गणांच्या मुख्याला शिवपार्वतीच्या बाळाला मी वंदन करतो.           

रणत्क्षुद्रघण्टानिनादाभिरामं 

 चलत्ताण्डवोद्दण्डवत्पद्मतालम्।

लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं

 गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।1

 

(क्षुद्र – छोटा/छोटी ; ईशान -शासकस्वामीमालक शिव ; सूनुः - पुत्र ; तुंदिल – गुबगुबीत,बाळसेदार ;

व्याल – साप,नाग ; ईड् – स्तुती करणे )

 

करे नर्तना बाळ गौरी-शिवाचा 

 धरे पद्मतालावरी छान ठेका ।

निनादे ध्वनी छुन् छुनुन् पैजणांचा 

 मना मोहवी नाद हा मेखलेचा।।1.1

 

तनू गोजिरी बाळसेदार त्याची 

 चकाके भुजंगावली स्वर्ण जैसी ।

असे तात ज्याचे गणांचेच स्वामी 

 उमा-शंभु पुत्रास त्या वंदितो मी।।1.2

-----------------------------------------

श्लोक 2

अचानक कोणी कलाकारानी वीणेची तार छेडावी; झंकारणार्‍या वीणेतून मधुर स्वर आसमंताला आनंदी करत जावेत; असा ताजा तवाना, प्रफुल्लित चेहरा; आणि छोट्या शिशुच्या चेहर्‍यावर अकारण फुलणारे प्रसन्न हास्य घेऊनच हा बाल गणेश नृत्यात रममाण झाला आहे. गजमस्तक असल्याने छोट्या गजबाळाच्या लीला तो दाखवत आहे. नाचतांना त्याची सोंडही पद्मतालावर हलत आहे. फुटबॉल पटु खेळत नसतांनाही जसा भला मोठा चेंडू तर्जनीवर तोलून धरत, गोल फिरवत, खेळत राहतात तसाच हा बाल गणेशही नृत्य करतांना मौजेने महाळुंगाचे फळ आपल्या सोंडेवर उंच धरून, वर फेकून, झेलून तर कधी गोल फिरवत आपल्याच आनंदात रममाण आहे.

त्याच्या गंडस्थळातून सुगंधी मद नावाचा रस पाझरत आहे. भुंगे झुंडीने त्याच्यावर तो अमृतमय रस आपल्याला मिळावा म्हणून गर्दी करत आहेत. (अशक्याला शक्य करण्याचं काम करणार्‍या ह्या बाल गजानानाचे अनुभव, ज्ञान, प्रत्यक्ष परिस्थितीला तोंड देण्याची, ती नियंत्रणात आणण्याची आणि त्यावर प्रभुत्त्व गाजवण्याची हिम्मत पाहून, हे सर्व ज्ञान मिळवण्यासाठी, त्यातून आपणही स्फूर्ती घ्यावी असे वाटणारे असख्य ज्ञानी, गणेशाच्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगणारे ऋषी, मुनी गणेशाजवळ जमले आहेत आणि; हातचे काही न राखता तो हे ज्ञान सर्व मुमुक्षु जनांना देत आहे.) संकटांसमोर कधीही हार न मानणार्‍या अशा ह्या उमामहेशाच्या लाडक्या बाल गजाननाला माझा नमस्कार असो.

ध्वनिध्वंसवीणालयोल्लासिवक्त्रं

 स्फुरच्छुण्डदण्डोल्लसद्बीजपूरम्।

गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमालं 

 गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।2

 

लयीला धरोनी कुणी छेडितांना 

 जशी गोड झंकारते मुग्ध वीणा ।

प्रफुल्लीत तैशी तुझी भावमुद्रा 

 जिथे गोडवा पूर्ण ये प्रत्ययाला।।2.1

 

हले देखणी सोंड तालावरी ही 

 धरोनी फळा नाचवी अग्रभागी ।

सुगंधी मदस्राव गंडस्थलीचा 

 करे धुंद भृंगास आकर्षुनीया।।2.2

 

सदा झुंडिने भृंग हे गुंजनासी 

 करीती जयाच्याच गंडस्थलांगी।

अशा लाडक्या शंभुबाळा तुला बा

 असो नित्यनेमे नमस्कार माझा ।।2.3

-----------------------------------------

श्लोक 3

आपल्या चटकदार रंगामुळे आणि रसरशीतपणामुळे जास्वदीचे ताजे फूल मन मोहून घेते. माणिकाची ऐश्वर्ययुक्त डाळींबी रत्नकांती त्यावर नजर ठरु देत नाही. नजर वेधून घेते. सकाळी प्राचीवर उदयाला येणारे केशरी सूर्यबिंब त्याच्या प्रभेने जगाला आकर्षून घेते. त्याच प्रमाणे तरतरीत निरोगीपणा, त्यामुळे चेहर्‍यावर पसरलेली रसरशीत अंगकाती गणेशाच्या मुखावर विलसत आहे. उत्साह,चैतन्य ह्यांचा जणु खळाळता झराच वाटावा असा हा गणेश आाहे. जिथे नाविन्य आहे, तेथे चैतन्य आहे. जुनाट शिळेपणा आला की तजेला, चैतन्य नाश पावतात. गणेशाचा ओसंडून जाणारा उत्साह, मुखावर झळकणारे प्रज्ञेचे तेज काही आगळे वेगळेच आहे. कुठल्याही वक्र म्हणजे खल, कुटिल, सडक्या प्रवृत्तीचे, तुण्डन करणारा म्हणजे नाश करणारा असा हा ``वक्रतुण्ड’’ आहे. (तुण्ड म्हणजे तोंड, सोंड नाही. तुण्ड म्हणजे नाश करणे. वक्र म्हणजे वाकडे, कुटिल अपप्रवृत्तींचा नाश करणारा तो वक्रतुण्ड. वक्त्र ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ तोंड असा आहे. तो गजवक्त्र म्हणजे गजाचं तोंड असलेला असा त्याचा अर्थ आहे. वक्र आणि वक्त्र मधे हा मूलभूत फरक आाहे.) ब्रह्मांडाचा प्रचंड पसारा त्याच्या पोटात असल्यामुळे लंबोदरही आहे. काही कथांमधे परशुरामाशी लढतांना गणेशाचा एक दात अर्धवट तुटला असा उल्लेख आाहे तर व्यासांचे महाभारत लिहीण्यासाठी जराही वेळ वाया जाऊ नये ह्या घाईत गणेशाने आपला दात तोडून त्याची लेखणी केली असाही उल्लेख आहे. अशा चांगल्या, शुभकामाला जराही उशीर होऊ नये अशी दक्षता घेणार्‍या वा शुभस्यशीघ्रम् म्हणणार्‍या एकदन्ताला, शिव-पार्वतीच्या लाडक्या पुत्राला माझे आदराने नमन!

प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून-

प्रवालप्रभातारुणज्योतिरेकम्।

प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं 

 गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।3

 

जसे पुष्प जास्वंदिचे हे फुले वा 

 प्रभा माणिकाचीच दे सौख्य नेत्रा ।

प्रभातीस ये केशरी सूर्य जैसा 

 तशी दिव्य कांती तुझी एकदंता।।3.1

 

तुझे नाम हे गोड लंबोदरा बा 

 तुला आळवीतो सुखे वक्रतुंडा

उमा शंकराच्याच या लाडक्याला 

 मनापासुनी पूजितो मीच आता।।3.2

-----------------------------------------

श्लोक 4

नाना रंगांच्या रत्नांचे आकर्षक हार आणि विविध अलंकार गजाननाच्या अंगावर शोभून दिसत आहेत. त्या रत्नांमधून फाकणारी त्यांची ऐश्वर्ययुक्त प्रभा  गणेशाच्या मुखावर पसरली आहे. माथ्यावर रत्नकांचनी सुंदर मुकुट आहे. मुकुटावर चंद्राची रेखीव सुलेखा विराजमान आहे.

गणेशाचे हे ऐश्वर्यसम्पन्न रूप पाहता त्याच्या भक्तजनांना दुसरे काहीही मोह पडत नाही. लोक ज्याला वैभव समजतात, तो पैसा अडका, सुवर्णालंकार ह्या कशातच त्यांना जराही स्वारस्य वाटत नाही. समाजाच्या दृष्टीने असे विरागी भक्त निर्धन असतील पण त्यांच्या हृदयात वसणारं गजाननाचं रूप असो वा ज्याप्रमाणे छोट्या दवबिंदूतही सर्व आकाश प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे भक्ताच्या नजरेत सामावलेलं ऐश्वर्यसम्पन्न गणेशाचं रूप, त्याचा महिमा आणि त्याचं गोड नाम असो! हाच त्यांचा मोठा अलंकार आहे. त्यांना याच्यातच गोडी वाटते. त्याचं मन त्याच गणेशध्यानात रमून जातं.

जो ह्या गणेशाचे अनन्यभावाने चिंतन करतो, त्याच्या पदी नम्र होतो त्यांना संसारातील छोट्या, मोठ्या, गहन, क्लिष्ट संकटांचे जराही भय वाटत नाही. गणेश त्यांच्या दुःखांचा लीलया नाश करतो. त्यांना सहजपणे भवसागर पार करून नेतो.अशा ह्या उमामहेशाच्या लाडक्या पुत्राला, गणपतीला माझे सादर वंदन!

विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीटं

 किरीटोल्लसच्चन्द्ररेखाविभूषम्।

विभूषैकभूषं भवध्वंसहेतुं

 गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।4

(विभूष अलंकारादि वैभवरहित असलेले परम विरक्त भक्तजन ; भवध्वंसहेतुं संसार दुःखाचा नाश करणारा)

गळा हार त्या दिव्य रत्नावलीचा

सुखावे तयाची प्रभा लोचनांना ।

शिरोभूषणे चित्तवेधी तुझी बा

 तुझ्या कुंतला भूषवी चंद्रमा हा।।4.1

 

तुझ्यावीण ना भूषणे अन्य ज्यांना

 भवातून मुक्ती मिळे त्या विरक्ता ।

अशा लाडक्या शंभुबाळा पदी हा

 नमस्कार माझा मनापासुनीया।।4.2

-----------------------------------------

श्लोक 5

हा बाल गजानन अत्यंत दयाळू आहे. दोन्ही हात उंचावून तो अभयमुद्रेत उभा आहे. सर्वांना शुभाशीर्वाद देत आहे.  कुठलंही मंगल, शुभ, कल्याणकारी काम करण्यास उद्युक्त करणारीही गणेश रूपी शक्ती, ``केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!’’ अशी प्रेरणा सर्वांना देत असते. काम सुरू केलं की मगच त्यात येणार्‍या अडचणी, संकटं कळायला लागतात, त्यांचे उपाय शोधले जातात. अनेक जण मदतीचे हात पुढ करतात आणि अवघड वाटणारे काम हा हा म्हणता पूर्ण होते.

ज्याप्रमाणे जोमदार पणे वरवर चढणार्‍या फुलाफळांनी बहरून आलेल्या वेलीला पाहून, तिच्या निरोगीपणााला पाहून तिची मुळे पाण्यापर्यंत पोचली आाहेत. वेलीला योग्य माती, खत मिळाले आहे हे वेगळे सांगायला लागत नाही. त्याप्रमाणे गणेशाच्या वर जाणार्‍या कररूपी वल्लरींच्या मूळाशी गजाननाच्या धनुष्याकार भुवया आणि सूक्ष्म नेत्र आहेत. यशाच्या मूळाशी आपल्या कर्मक्षेत्राचे सूक्ष्म निरीक्षण, त्याच्यावर अनेक घटकांचा, घटनांचा होणारा परिणाम ह्याचा खोलवर अभ्यास, त्यासाठी योग्य उपाय योजल्यानेच काम फत्ते होते हेच त्यातून सांगायचे आाहे.  कार्याचा प्रारंभ करणं हीच त्या गणेशाची पूजा आहे.

स्वर्गातील अप्सराही ह्या गणेशाला चामरानी वारा घालत उभ्या आहेत. ह्याचा अर्थ हाच की, असाध्य काम अंगावर घेऊन त्यासाठी नेटाने प्रयत्न करणार्‍या, ते साध्य करून दाखवणार्‍यावर स्तुतीसुमने उधळण्यासाठी आत्ताच्या भाषेत सांगायचे म्हणजे त्याचे अनेको अनेक फॅन्स् तयार होतात. त्याला विंझणवारा घालत राहतात.   

यशाचा मार्ग दाखवणार्‍या, कार्याचा शुभारंभ असलेल्या ह्या पार्वतीमहेश्वरपुत्राला,  गणेशाला माझे सादर वंदन!

उदञ्चद्भुजावल्लरीदृश्यमूलो-

च्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्षम्

मरुत्सुन्दरीचामरैः सेव्यमानं।

गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।5

( भ्राज्-चमकणे। भ्राज - देदिप्यमान, सात सूर्यांपैकी एक)

उभारे भुजा कल्पवल्ली समा या

 सदा भक्तवृंदास आशीश द्याया ।

तयाच्या मुळाशी सदा भ्रूलता या

 अती चंचला भूषवीती मुखाला।।5.1

 

उभ्या अप्सरा घालण्यासीच वारा

 करी घेऊनी हालवीतीच चौर्‍या ।

उमा शंकराच्याच या लाडक्याला

 मनापासुनी पूजितो मीच आता।।5.2

----------------------------------------- 

श्लोक 6

हे गणेशा, तझ्या पिंगट बारीक पण अत्यंत सूक्ष्म डोळ्यांमधे दोन्ही भाव प्रकट होत आहेत. आपल्या डोळ्यात शत्रूला कठोर, न्यायनिष्ठूर, खळांना शासन करणारे उग्र भाव पाहून धडकी भरत आहे तर आपल्या भक्तांसाठी मात्र आापली दृष्टी मृदु, कोमल, दयार्द्र आहे.

संपूर्ण पदार्थसृष्टी, ती अभिव्यक्त करणारा शब्दप्रपंच, त्याचा अर्थप्रपंच, ह्या सर्वांच्या मूळाशी असलेल्या नादाच्या कलेमध्ये बिंदूरूपानी गणेश प्रतितीला येतो. किंवा वर्णसमूहातील (क,च,ट,त,प) क ह्या वर्णसमूहातील (कलाराशीतील) ग अक्षर अनुस्वारासहित म्हणजे बिंदूसहित घेतल्यावर जे ``गं’’ अक्षर तयार होते  ते श्रीगणेशदेवतेचा एकाक्षरी बीजमंत्र आहे. मंत्र हेच देवेचे स्वरूप असते. मंत्रतत्त्वज्ञ योगी गणेशाला कला आणि बिंदू यामधे पाहतात.

अशा ह्या शिवपार्वतीच्या लाडक्या पुत्राला गणेशाला मी भक्तिभावे वंदन करतो.

स्फुरन्निष्ठुरालोलपिंगाक्षितारं

 कृपाकोमलोदारलीलावतारम्।

कलाबिन्दुगं गीयते योगिवर्यै -

र्गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।6

( लोल - चंचल । पिङ्गाक्षितारम् पिंगट रंगाची बुबुळे असलेला )

तुझे न्यायनिष्ठूर हे नेत्र पिंगे

 जरा तूचि विस्फारिता दुष्ट कापे ।

परी सज्जनांसी दयापूर्ण भासे

 तुझी लोचने नीववी सज्जनाते।।6.1

 

अधिष्ठान ज्याचे मुलाधारचक्री

 कला, नाद, बिंदू तुझे रूप हेची ।

असे तूच ओंकार योगी मुनींसी

 उमा शंभुच्या लाडक्या वंदितो मी।।6.2

 

असे मूळ तू याचि वाग्वैभवाचे

 अधिष्ठान अर्थास तू लाभलेले ।

असे शब्द तू , अर्थ ही एक तू ची

 तयाचा घडे नाद तो पूर्ण तू ची।।6.3

 

असे वर्णमालेतला तू ‘ग’ कार

 तयाच्यावरी बिंदु तो बीजमंत्र ।

तुझे रूप एकाक्षरी मंत्र गं हे

 तुला वंदितो वंदितो मी तुला रे।।6.4

-----------------------------------------

श्लोक 7

हे गणेशा,

आपण ॐ कार स्वरूप आहात. ॐ ह्या एका अक्षराने  आपले अस्तित्त्व दर्शवले जाते. सर्व उपाधीपासून मुक्त/निर्मल आहात. भेदरहित/ निर्विकल्प आहात. गुणत्रयातीत म्हणजे तिनही गुणाच्या पलिकडे आहात. जे तत्त्व सर्वव्यापी आहे; त्याला निश्चित आकार कसा असेल? आपण निराकार आहात. जे वेद आपली निरंतर स्तुती करतात, ज्यांच्या वर्णनामधे आपणच आहात; आम्नाय म्हणजे वेद! ज्या वेदांमधे, वेदांच्या गर्भात फक्त आपण आहात; ते चारी वेद आपल्यात सामावले आहेत. आपल्या पोटात आहेत. किंवा सृष्टी निर्माण होतांना जो वेदांना प्रकट करतो असे आपले स्वरूप अत्यंत प्रगल्भ म्हणजे प्रौढ ही आहे आणि `पुराऽपि नव एव’ म्हणजे कितीही मागच्या काळात जाऊन पाहिलं तरी नवाच दिसतो म्हणून त्याला पुराण म्हणतात; अशा हे महादेवपुत्रा मी आपल्याला शरण आलो आहे. आपण ह्या शरणगतावर कृपा करा. प्रसन्न व्हा! प्रभो प्रसन्न व्हा!

यमेकाक्षरं निर्मलं निर्विकल्पं

 गुणातीतमानन्दमाकारशून्यम्

परं पारमोङ्कारमाम्नायगर्भं

 वदन्ति प्रगल्भं पुराणं तमीडे ।।7

(एकाक्षर ओंकार ।  निर्विकल्प भेदरहित ।  गुणातीत -  तिनही गुणांच्या पलीकडे ।  आम्नायगर्भम् -  वेदांच्या गर्भात असलेला / वेदांना आपल्या गर्भात ठेवणारा । पुराणं -  सर्वात जुना / पुरा।़पि नव एव कितीही मागच्या कालात जाऊन पाहिले तरी नवाच दिसतो.)

नसे भेद ज्या जो असे निर्विकल्प

 असे शुद्ध एकाक्षरी जे  स्वरूप ।

गुणातीत जो शुद्ध आनंदकंद

 निराकार ओंकार तो श्रेष्ठ एक।। 7.1

 

तुझ्या पोटि सामावले वेद चारी

 असे तूच सामावला वेदघोषी

तुझे रूप प्राचीन नाविन्यपूर्ण

 तुला वंदितो मी सदा एकचित्त।। 7.2

-----------------------------------------

श्लोक 8

हे गणेशा,

आपण तो परम आानंद, ब्रह्मानंदच आहात. चिंदानंदरूप हेच आपलं खरं रूप आहे. हया विश्वाच्या कणाकणात आपण ठासून भरला आहात. आपल्या शिवाय ह्या विश्वात दुसरं आहेच काय? हे विश्व आपल्या तत्त्वाने संपृक्त / सांद्र आहे. आपण आनंदघन आहात. ह्या विश्वाची उत्पत्ती, विनाश घडवून आणणारे आपणच आहात. आपल्या अगणित लीलांचे वर्णन तरी काय करावे? आपण अत्यंत तेजस्वी, तेजोमय, तेजोनिधी आहात. आपण ते चैतन्य, स्वयंतेज आहात ज्याला विश्वाचं आदिबीज वा ब्रह्म म्हणतात. हे महादेवपुत्रा मी आपल्याला शरण आलो आहे. आपण ह्या शरणगतावर कृपा करा. प्रसन्न व्हा! प्रभो प्रसन्न व्हा!

चिदानन्दसान्द्राय शान्ताय तुभ्यं

 नमो विश्वकर्ते हर्ते तुभ्यम्

नमो़नन्तलीलाय कैवल्यभासे

 नमो विश्वबीज प्रसीदेशसूनो।।8

(सान्द्र संपृक्त, घन ;  चिदानन्दसान्द्र आनंदघन )

असे तूचि चैतन्य,आनंदकंदा

 तुझ्या मानसी काम-क्रोधा न जागा ।

करी विश्व उत्पन्न नेसी लयाला

 असा विश्वकर्ताचि तू विश्वहर्ता।।8.1

 

अनंता तुझ्या सर्व लीला अगाधा

 जगत्-कारणा, तेजसा, ब्रह्मरूपा ।

उमा शंभुच्या लाडक्या एकदंता

 करी रे कृपा चिन्मया एकवेळा।।8.2

-----------------------------------------

श्लोक 9

अत्यंत सुंदर असे हे गणपतीस्तोत्र स्तोत्र आहे. गणेश हा आरंभाचं प्रतिक असल्याने त्याचे स्तवन अत्यंत प्रसन्न वेळेला, जेव्हा झोप पूर्ण होऊन सारी गात्रे परत एकदा काम करायला ताजी तवानी प्रफुल्लित झालेली असतात, अशा दिवसाच्या सुरवातीला, पहाटेच केले तर वाचासिद्धी प्राप्त होईल. तो जे बोलेल ते खरे होईल. त्याच्या वाणीत सत्यनिष्ठेतून आलेला ओज, प्रभाव इतरांना जाणवेल.

ज्याला मंगलमूर्ती श्री गजाननच प्रसन्न आहे त्याला दुर्लभ काय आहे? हे महादेवपुत्रा मी आपल्याला शरण आलो आहे. आपण ह्या शरणगतावर कृपा करा. प्रसन्न व्हा! प्रभो प्रसन्न व्हा!

 

इमं सुस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या

 पठेद्यस्तु मर्त्यो लभेत्सर्वकामान्

गणेशप्रसादेन सिध्यन्ति वाचो

 गणेशे विभौ दुर्लभं किं प्रसन्ने।।9

म्हणे गोड हे स्तोत्र जो सुप्रभाती

 तयासी हवे ते मिळे सर्वकाही ।

गणेश-प्रसादे तयाचीच वाणी

 ‘वदे ते घडे’ ही मिळे त्यास सिद्धी।।9.1

 

कृपाछत्र ज्याच्यावरी सुंदराचे

 तयासी नसे शक्य ते काय आहे ।

तुझ्या पायि आलो प्रभो भक्तिभावे

 उमाशंभु-पुत्रा तुला वंदितो रे।।9.2

-----------------------------------------