।। मायापञ्चकम् ।।


।। मायापञ्चकम् ।।

  माया ही परमेश्वराची अशी अदृश्य शक्ती आहे जी अपरोक्षपणे काम करत असते. हा विश्वप्रपंच ज्या कारणामुळे घडून येतो त्यालाच माया म्हणतात.

(मात्रा -चरण 1,2,4 - 8,10 / चरण - 3 - 8,8 ; यति किंवा थांबा दुसर्‍या रंगाने दिला आहे. )
निरुपमनित्यनिरंशकेऽप्यखण्डे
मयि चिति सर्वविकल्पनादिशून्ये ।
घटयति जगदीशजीवभेदं,
अघटितघटनापटीयसी माया ।। 1

 ( निरुपम- ज्याला उपमा नाही असा;  नित्य - कायमस्वरूपी; निरंशक- अवयवरहित; अखण्ड- एकरूप,एकजिनसी; घटयति -  घडवते; पटीयसी - पटु, निष्णात, निपुण,कुशल )

(मात्रा - 8:8:  * 8:8)
उपमा नाही ज्यासी दुसरी । निरुपम आत्मा नित्य असेची
असे निरंशक अवयव रहिता । निराकार हा व्यापे विश्वा ।। 1.1
अखंड भरला जगीच सा र्‍या । भेद नसे ह्या विकल्परहिता
ह्याचि सच्चिदानंदाठायी जीवात्मा परमात्मा जग हा ।। 1.2
अतर्क्य वाटे अशक्य वाटे । भेद असा जी घडवुन आणी
करुन दाखवी अघटित करणी । कौशल्ये ती मायाराणी ।। 1.3

श्रुतिशतनिगमान्तशोधकान-
प्यहह धनादिनिदर्शनेन सद्यः ।
कलुषयति चतुष्पदाद्यभिन्नान्,
अघटितघटनापटीयसी माया ।। 2
पारंगत जे वेदांमध्ये । श्रुति शास्त्रांचे संशोधक जे
असती अभ्यासकही गाढे । माया त्यांना भुलवि अरेरे ।।
धनमानाच्या प्रलोभनाने । बुद्धी त्यांची कलुषित करिते
पशुसम धनिका-घरी राबवी । चतुष्पदासम कामे करवी ।।
असंभवासी संभव करवी । कळे न कैसे अतर्क्य घडवी
करुन दाखवी अघटित करणी ।  कौशल्ये ती मायाराणी ।।

सुखचिदखण्डविबोधद्वितीयं
वियदनलादिविनिर्मिते नियोज्यं
भ्रमयति भवसागरे नितान्तं
अघटितघटनापटीयसी माया ।। 3
सच्चित् सुखमय ज्ञानस्वरूपी । आहे आत्मा अखंड जोची
पृथ्वी जल वायु तेज नभ ही । भूते पाचचि देह निर्मिती ।। 3.1
शरीररूपी पिंज र्‍यात ह्या । कोंडुन घाली जी आत्म्यासी
भरकटवी त्या भवसागरि ह्या । फिरवी वणवण दिशांस दाही ।। 3.2
असंभवासी संभव करवी । कळे न कैसे अतर्क्य घडवी
करुन दाखवी अघटित करणी , कौशल्ये ती मायाराणी ।। 3.3

अपगतगुणवर्णजातिभेदे
सुखचिति विप्रविडाद्यहंकृतिं च
स्फुटयति सुतदारगेहमोहं
अघटितघटनापटीयसी माया ।। 4
आत्म्यासी ना जात पात ती । वर्णभेदही ना तो जाणी
मुक्त शुद्ध हा सुखस्वरूपी । गुण अवगुण ना चिकटे यासी ।। 4.1
हृदी तयाच्या परि अंकुरवी । सुदृढ अंकुर मी माझाची
हे घर माझे मुले नि पत्नी । धनाढ्य बहुश्रुत श्रेष्ठ असे मी ।। 4.2
तिचा न लागे पत्ता तरिही । कळे न कैसे अतर्क्य घडवी
करुन दाखवी अघटित करणी , कौशल्ये ती मायाराणी ।। 4.3

विधिहरिहरभेदमप्यखण्डे
बत विरचय्य बुधानपि प्रकामम् ।
भ्रमयति हरिहरविभेदभावान्
अघटितघटनापटीयसी माया ।। 5
एकरूप हा आत्मा तरिही । हरि हर विधि हा भेद करे ही
ब्रह्म एक चैतन्यरूप हे । देव निर्मिते कोटी कोटी ।। 5.1
विद्वानांना चकवी माया । बुचकळ्यात ही पाडी देवा
विकल्प, भ्रम, संदेह, मोह वा । उपजवि सहजी हृदि सा र्‍यांच्या ।। 5.2
तिचा न लागे पत्ता तरिही । कळे न कैसे अतर्क्य घडवी
करुन दाखवी अघटित करणी , कौशल्ये ती मायाराणी ।। 5.3
--------------------------------------------------
अमृतधारा वळवुन आणी । मराठीत निज अरुंधती ही
दुःखाचा दुष्काळ हरे ही । चैतन्याचा मळाच फुलवी ।
मनन करे जो माया पञ्चक । दुःखातुन तो मुक्त खरोखर
आत्मस्वरूपी लीनचि होता । आनंदाचा त्यासी प्रत्यय ।।
-----------------------------------------------------------------------
माघ शुद्ध त्रयोदशी, महाशिवरात्री / फेब्रुवारी 2020