शिवानन्दलहरी ( विश्लेषणासहित ) -

शिवानन्दलहरी ( विश्लेषणासहित ) -

भाग 1-  श्लोक 1-50

 

 श्लोक 1

(23 फेब्रु. 2021 जया एकादशी माघ शुद्ध एकादशी.)

               लहरी ह्या प्रकारची स्तोत्रे ही दीर्घ स्तोत्रे असतात. गंगालहरी, सौंदर्यलहरी, आनंदलहरी, जीवनमुक्तानंदलहरी, शिवानंदलहरी ही आशयघन दीर्घ स्तोत्रे आहेत. अथांग जलाशयात लहरी उमटतात. अफाट समुद्रात लाटा उसळतात. त्याप्रमाणे ह्या स्तोत्रांमधून आनंदाच्या उठणार्‍या लाटा इतक्या संसर्गजन्य असतात की ही स्तोत्रे जाणून घेतांना त्याच  आनंदाच्या लाटा आपल्याही मनात उठत राहतात.

                  श्री आद्यशंकराचार्यांनी रचलेले ``शिवानंदलहरी’’ स्तोत्र म्हणजे साहित्यातील एक उत्तम रत्नच आहे. अनेक वृत्त त्यात वापरली आहेत. कल्पनाविलास मनाला मोहवून टाकणारा आहे.

 

                   पार्वती आणि परेश ह्यांचं अतूट नातं. एकमेकात विलीन झालेल्या हया गिरिजा-गिरिजेश्वरांच्या माथ्यावर प्रतिपदेच्या चंद्राची सौम्य, शीतल, मोतिया रंगाची प्रकाशमान कोर विराजमान आहे. अत्यंत कठोर तप दोघांनीही आचरलं आहे. किंबहुना अत्यंत खडतर तपश्चर्या हेच त्यांच जीवन आहे. अग्नीत घातल्यावर सुवर्णातील हीण ज्याप्रमाणे जळून शुद्ध सुवर्णच शिल्लक राहतं, त्याप्रमाणे दोघांनीही केलेल्या उग्र तपात दंभ, दर्प, अहंकार, क्रोध, मत्सर, मनातील कडवट कठोरपणा आणि अज्ञान जळून खाक झालं आहे. ज्ञानाच्या प्रकाशात झळाळणार्‍या शिव आणि शक्तीच्या तपःपूत अशा व्यक्तिरेखा म्हणजे जणु काही खडतर तपःश्श्चर्येलाच साच्यात ओतून तयार झालेल्या अत्यंत सात्त्विक आणि प्रसन्न अशा शिव-शक्तीच्या मूर्ती आहेत. 

                ह्या दोघांच्या दर्शनानी मनाला मिळणारी प्रसन्नता इतक्या उच्च कोटीची असते की भक्तांना वाटावं माझ्या अत्यंत कठोर तपाच्या फलस्वरूपच  हे पार्वतीपरमेश्वराचे मनोहारी स्वरूप माझ्या मनात प्रकट झाले आहे. ज्यांना पाहून मनात आनंदाची निस्यंदिनी सतत  पाझरत राहते अशा ह्या विश्वाच्या मायबापांना, शिवपार्वतीला माझा  नमस्कार असो.

 (वृत्त- शिखरिणी, अक्षरे-17, गण - य म न स भ ल ग, यति -6,11 )

 

कलाभ्यां चूडालङ्कृत-शशि-कलाभ्यां निजतपः -

फलाभ्यां भक्तेषु प्रकटित-फलाभ्यां भवतु मे ।

शिवाभ्यामस्तोक-त्रिभुवन-शिवाभ्यां हृदि पुन-

र्भवाभ्यामानन्द-स्फुरदनुभवाभ्यां नतिरयम् ।।1

 

(कला  आत्मतत्त्व,चंद्राची कोर। चूडा - मस्तकी बांधलेले केस। अस्तोक  चिरंतन, अखंड, पुष्कळ । नति -  झुकुन अभिवादन करणे )

 

रुपेरी चंद्राचा मुकुट नित ज्यांच्या शिरि असे

उभ्या कैवल्याचे मुकुटमणि शोभे उभय जे

जयांच्या मूर्ती ह्या जणु तप तयांचे अवतरे

गमे भक्तांनाही फळ निज तपाचे प्रकटले।।1.1

 

असे मांगल्याचे स्वरुप जणु जे मंगलमयी

स्रवे आनंदाची हृदयि नित निस्यंदिनिच जी

 महा ब्रह्माण्डाचे जनक जननी जे शिवमयी

भवानी रुद्रासी नमन करितो त्या प्रथम मी।।1.2

अन्वयासहित - पहिल्या श्लोकात नतिः अयम् । नतिः म्हणजे नमस्कार. अयम् म्हणजे हा. माझा हा नमस्कार असो. कोणाला नमस्कार असो? ज्याला नमस्कार त्या शब्दाची चतुर्थी वापरतात. येथे शिवाभ्यां नतिरयं म्हणजे शिवाला नमस्कार असो. नेहमी शिवाय नमः। असे म्हटले जाते मग येथे शिवाभ्यां का? म्हटले असावे? कारण शिव ह्या शब्दाचे ते चतुर्थीचे द्विवचन आहे. म्हणजे कल्याणकारी दोघांना माझे नमन असो. हे दोन कल्याणकारी दोघे म्हणजे शिव आणि शिवा म्हणजे शिवपार्वती. आता श्लोकात जेवढी चतुर्थीची द्विवचनं आली आहेत ती सर्व शिव पार्वतीची विशेषणं आहेत.  कसे आहेत हे दोघे शिव आणि शिवा?

 कलाभ्यांयेथे कलाचा अर्थ आत्मतत्त्व असा आहे. म्हणजे जे दोघे ब्रह्मस्वरूप आहेत असे शिवपार्वती - त्यांना

 चूडालङ्कृत-शशि-कलाभ्यां- चूडा म्हणजे पार्वतीची केशरचना आणि शिवाच्या मस्तकावर बांधलेल्या जटा त्यांच्यावर शशिकला म्हणजे चंद्राची कोर आहे असे शिव पार्वती  -त्यांना

निजतपः फलाभ्यांज्यांचे देह स्वतः कलेल्या उग्र तपाच्या फलस्वरूपच उरले आहेत. अशांना अशा शिवपार्वती यांना

भक्तेषु प्रकटित-फलाभ्यांभक्त शब्दाची सप्तमी बहुवचन भक्तेषु भक्तांमध्ये म्हणजे भक्तांच्या हृदयात त्यांच्या तपाचं फळ म्हणून प्रकट होणार्‍या त्या शिव पार्वतीला

त्रिभुवन-शिवाभ्यां - त्रिभुवनाचं कल्याण असलेल्या त्या शिव पार्वतीला

हृदि पुनर्भवाभ्यामानन्द-स्फुरदनुभवाभ्यां शिवाभ्यांहृदयात स्फुरण पावणारा आनंद आणि त्या आनंदाचा अनुभव हे ज्यांचे स्वरूप आहे. हा आनंद सुद्धा अस्तोक म्हणजे चिरंतन स्वरूपाचा आहे अशा ह्या शिवपार्वतीला माझे नमन. )

 

------------------------------------------------------------

                 

 शिवानन्दलहरी -  श्लोक 2

 (24 फेब्रु. 2021)

                           जीवनात ध्येयाप्रत जातांना, मार्गातील संकटांना तोंड देतांना, आपण एखादी आदर्श व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. प्रत्येक माणसात काही गुणदोष हे असतातच अशा वेळी सर्व गुणांनी युक्त , दोष रहित अशी कल्याणकारी मूर्ती जिला आापण शिव म्हणतो ती जर मनात स्थापन केली तर आापण संकटांवर सहज मात करतो. श्री आाद्य शंकराचार्य म्हणतात-

                 हे शिवा तुझ्या अलौकिक जीवनपटावरून नुसती नजर जरी फिरवली तरी, मला तो एखाद्या निर्मळ पवित्र नदीच्या विशाल जलौघाप्रमाणे अत्यंत वेगाने सदोदित पुढे पुढे जातांना दिसतो. त्यातून सतत नवनवीन आनंदाच्या लहरी उठत राहतात. हे प्रभो आपल्या ह्या जीवनसरितेचं वर्णन आणि स्तुती  करतांना त्या लाटा ``शिवानंदलहरीं’’च्या रूपाने माझ्या मनाच्या डोहात सतत आंदोळत राहतात.

                   अनेक मुखांनी समुद्राला मिळतांना गंगेचे जसे अनेक प्रवाह होतात त्याप्रमाणे तुझ्या ह्या जीवनसरितेमधून निघालेले विवेकरूपी स्त्रोत  भक्तांच्या  बुद्धीरुपी प्रवाहांमधे येऊन मिसळतात. आणि त्यांच्या बुद्धीलाही पवित्र, निर्मळ करतात.

                    ह्या तुझ्या ओघवत्या निर्मल चरित्रातून निघालेल्या ह्या आनंदलहरी मनातील सारे किंतु, सारी किल्मिषं, सारी सारी दुःखं, मनोमालिन्य दूर करतात. मनावरची सारी विकल्पांची कोळीष्टकं, सारी उदासीनतेची धूळ दूर झाली की मनही कसं निर्मळ, शांत, प्रफुल्लित, ताजंतवानं होतं. सर्व जीवांना त्यांचे कष्ट विसरून जायला होतात. जीवन जगायची एक नवीन उमेद मिळते.

                   अशा ह्या शिवानंदलहरी अजून अजून उंच उसळोत. त्यांच्या पावित्र्याचा, निर्मलपणाचा उत्कर्ष होवो.

 

 

गलन्ती शंभो त्वच्चरित-सरितः किल्बिष-रजो

दलन्ती धी-कुल्या-सरणिषु पतन्ती विजयताम् ।

दिशन्ती संसार-भ्रमण-परितापोपशमनं

वसन्ती मच्चेतो-ह्रद-भुवि शिवानन्दलहरी ।।2

 ( गल्- पाझरणे,निर्माण होणे.  दल् – विकसित होणे.   धी – बुद्धी.  कुल्या - सत्कुलोद्भव किंवा छोटी नदी.  धीकुल्या - वेदविषयक बुद्धी.  सरणि - पथ, मार्ग, अविरत, अखंड प्रवाह. हृद -डोह )

 

तुझी पुण्यात्मा रे चरित-सरिता ओघवति ही

प्रवाहातूनी त्या उठति लहरी अमृतमयी

 सदा आह्लादाच्या अनुपम सुखाच्या प्रिय अती

मनाच्या डोही त्या लहरति शिवानंदलहरी ।। 2.1

 

भवाच्या चक्राते अडकुनि फिरे जीव दुबळा

तयाच्या कष्टाचे निरसन करी शांतवुनि त्या

करी दूरी धूली सकल दुरितांचीच सहजी

सदा उर्जा देती हटवुन निराशाच मनिची ।। 2.2

 

करी विस्तीर्णा ही अखिल मतिधारा पुनितची

मिळोनी बुद्धीसी विमल पथ दावी शिवमयी

ध्वजा राहे ज्यांची फडकत सदा या त्रिभुवनी

हृदी राहो त्याची शिव शिव सदानंद लहरी ।।2.3

---------------------------------------

 

शिवानन्दलहरी श्लोक 3

(25 फेब्रु. 2021)

                हे विश्वेश्वरा, माझ्यासारख्या सामान्याला आपल्या विश्वात्मक रूपाचे ज्ञान कसं बरं होणार? तुमचं स्वरूप मी कसं जाणून घेणार?  कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी आपलं आकलन होत नाही.  हे तीन वेद हेच तुमचं स्वरूप आहे. त्यांच्या अभ्यासानीच तुमचं आकलन होऊ शकतं. त्या आकलनानंतर तुम्ही अत्यंत हृद्य, मनोहर आहात हे लक्षात येतं. तुमची विश्वात्मकता, व्यापकता पाहतांना दिसून येतं की, सूर्य, चंद्र, अग्नी हे तुमचे नेत्र आहेत. अत्यंत बलवान त्रिपुरासुराचाही  नाश करून आण आपलं श्रेष्ठत्त्व सिद्ध केलं आहे.

 

               हे सांबसदाशिवा तुमचं डोळ्यांसमोर उभं राहतं ते सगुण रूपही असच मनोहर आहे. तुमच्या दाट सघन केसांच्या डोक्यावर बांधलेल्या जटा तुम्हाला शोभून दिसत आहेत. तुमच्या अंगावर सळसळणारे सर्प तुम्हाला हाराप्रमाणे शोभा देत आहेत. हे शंभो अत्यंत चंचल असलेल्या मनावर तुम्ही विजय मिळवला आहे. त्या चंचल मनाचं प्रतिक अशा हरिणाला आपण हातात उचलून धरलं आहे. जो मनाला ताब्यात ठेवतो त्यालाच खर्‍या आनंदाचा लाभ होतो हा बोध आपण हातात धरलेल्या ह्या मृगाच्या रूपानी आम्हाला देत आहात. मनाला वश करणाराच महादेव असू शकतो. अशाच महादेवाला इतरांबद्दल कणव निर्माण होते. तोच सर्व भूतमात्रांचा मुख्य, पालनकर्ता होऊ शकतो. त्याच्यावरच सर्व जीवसृष्टी अवलंबून असते.  ह्या सर्व विविधतेने नटलेल्या सृष्टीतून शिवरूपात आपण प्रकट झाला आहात. हे सर्व विश्व म्हणजेच शिव आहे. हे विश्वात्मका, हे विश्वेश्वरा माझ्या हृदयात अनन्य भावाने मी सतत तुमचच चिंतन करत आहे.

 

त्रयीवेद्यं हृद्यं त्रिपुर-हरमाद्यं त्रिनयनं

जटाभारोदारं चलदुरग-हारं मृगधरम् ।

महादेवं देवं मयि सदयभावं पशुपतिं

चिदालम्बं साम्बं शिवमतिविडम्बं हृदि भजे ।।3

 

( त्रयीवेद्यम्  वेंदांच्या सहाय्याने ज्याचे यथार्थ ज्ञान होते । अतिविडम्ब- बहुरूपाने नटणारा। उरग- नाग,साप,   मानवी मुखाचा साप। निगम – वेद। चिदालम्ब- चित् आलम्बम् ज्ञानाचे आश्रयस्थान, कैवल्याचे विश्रांतीस्थान। अतिविडम्ब बहुरूपाने नटणारा )

 

तुला जाणायासी निगमपथ सोपान बरवा

तुझी मूर्ती रम्या सुखवि त्रिपुरारी  मम मना

शिवा सर्वश्रेष्ठा अनल शशि आदित्य नयना

शिरी शोभे शंभो विपुलचि जटाभार तुझिया।।3.1

 

तुझ्या कंठी हारासम सळसळे सर्प गहिरा

असे देवांचा तू अधिपति महेशा सुरवरा

धरी हाती शंभो अति चपळ का चंचल मृगा

जणू लीलेने तू करिसि  वश त्या चंचल मना।।3.2

 

दया माझ्यासाठी हृदयि तव ओथंबुनि भरे

 असे कैवल्याचा सगुण पुतळा तू पशुपते

नटे विश्वाकारे नमन तुजला हे नटवरा

तुझी भक्ती राहो सतत हृदयी तेवत शिवा।।3.3

-------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी श्लोक 4

(26 फेब्रु. 2021)

                         रस्त्याच्या कोपर्‍या कोपर्‍यावर, जिन्याच्या कोपर्‍यात कोनाड्यात, एखाद्या पिंपळ उंबराखाली वेताळ, मरिआई सारखे कुठले ना कुठले छोटे मोठे देव, पीर,बीर स्थापन केले जातात. मनातल्या छोट्यामोठ्या  मागण्या नवस म्हणून बोलल्या जातात. काही वेळा त्या पूर्ण होतात. काहीवेळा नाही होत. मनातील गोष्ट पूर्ण झाली की नवसाला पावणारा देव म्हणून लोकांच्या मनातील त्याच्याविषयीची श्रद्धा अजून सबळ  होते. लोक म्हणायाला लागतात की, ``माझं पूर्वजन्माचं काहीतरी फारमोठं पुण्यच होतं की ज्याच्यामुळे हा देव मला प्रसन्न झाला.’’

                    श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, ``हे शिवा, मनातील ही , ती अशी इच्छापूर्ती करणारी हजारो दैवते गल्लीबोळात पडलेली आहेत. त्यांची भक्ती करण्यात मला कृतार्थता वाटत नाही. मला अशा छोट्या मोठ्या इच्छापूर्तीसाठी कोणाही दैवताची गरज नाही. विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र ही सगळी दिग्गज मंडळी `आम्ही शिवाचे निकटवर्ती आहोत असा दावा करत असतात. पण त्यांनाही अजून तुझी प्राप्ती झाली नाही. हे विश्ववंद्या महेशा मी तुला एक मागणं मागतो, तुझी ही कमळासारखी कोमलं पावलं कायम माझ्या हृदयात  वास करोत. त्यांच्याशिवाय मला अन्य कशाचीही अभिलाषा नाही. ‘’ 

 

सहस्रं वर्तन्ते जगति विबुधाः क्षुद्र-फलदा

न मन्ये स्वप्ने वा तदनुसरणं तत्कृतफलम् ।

हरि-ब्रह्मादीनामपि निकट-भाजामसुलभं

चिरं याचे शम्भो शिव तव पदाम्भोज-भजनम् ।।4

 

( विबुधाः - देव,देवता । निकटभाजाम् -  निकटवर्ती )

 

अती छोटी छोटी पुरविति अभीष्टे मनिचि जे

अशा या देवांची गणतिहि हजारावर असे

महा पुण्याईने मजसिच मिळे भक्ति तयिची '

असे ना येई रे मम मनसि वा स्वप्निहि कधी।।4.1

 

तुझी प्राप्ती व्हाया तळमळति ब्रह्मा नित हरी

परी ना लाभे तू अति निकटवर्ती असुनही

विनंती माझी ही इतुकिच तुझ्या  वंद्य चरणी

सदा चित्ती राहो चरणकमले कोमल तुझी।।4.2

-------------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी श्लोक 5

(27 फेब्रु. 2021)

 

``हे शिवा,

             मी काही कोणी ज्ञानी पंडित नाही. माझ्याजवळ कुठलीच कौशल्ये नाहीत. माझ्याजवळ चातुर्याचाही अभाव आहे. माझा स्वभावही कोणाच्या पुढेपुढे करण्याचा नाही. सर्वच आघाड्यांवर मी पिछाडीला आहे. सामांन्यांहून सामान्य असलेल्या ह्या मला कोण जवळ करणार? ना राजदरबारी मला स्थान आहे ना जनमानसात. ना मी कोणाच्या उपयोगी पडू शकतो ना मी कोणाचे मनोरंजन करू शकतो. सर्वांकडून उपेक्षित माणूस कोणाकडून कसली अपेक्षा करणार? अशावेळेला मला एकच माहित आहे की तू मात्र कोणाचीच उपेक्षा करत नाही. मी दीन असलो तर तू दीनबंधू आहेस.’’

            श्री आद्य शंकराचार्य आईच्या ममतेनी समाजातील अत्यंत उपेक्षित अशा माणसाची व्यथा व्यक्त करतांनाही त्याचे दुःख, त्याची व्यथा, त्याच्या मनातील सल स्वतःवर आरोपित करून घेतात. उल्लेख करतांनाही कोणी क्षुद्र वा अत्यंत दयनीय आहे असे ते म्हणत नाहीत तर  त्याचे सर्व दोष  आचार्य स्वतःवरच लादून घेतात. त्यामुळेच खरोखरच्या अडाणी, जड, मूढ माणसाचा इवलासी  अहंकारही त्याने दुखावला जात नाही. उलट माझ्यापेक्षाही कोणी दीन आहे ह्या कल्पनेनी तो मनातून सुखावतो. हा आचार्यांचा केवढा मोठेपणा!

 

 

स्मृतौ शास्त्रे वैद्ये शकुन-कविता-गान-फणितौ

पुराणे मन्त्रे वा स्तुति-नटन-हास्येष्वचतुरः।

कथं राज्ञां प्रीतिर्भवति मयि कोऽहं पशुपते

पशुं मां सर्वज्ञ प्रथित-कृपया पालय विभो।।5

 

स्मृती शास्त्रांमध्ये गति मज दयाळा लव नसे

पुराणाची गोडी खुलवुनि कथा ना जमतसे

न मंत्रोच्चारांचे पठणचि यथायोग्य जमते

कथा गाणी काव्ये स्तुति शकुन  हेही नच कळे।।5.1

 

चिकित्सा रोगाची नच मज कळे औषधि तया

विनोदाची नाही चुरचुरित भाषा अवगता

रुचे राजा ऐसा अभिनय कराया जमत ना

कृपा भूपाची ती मजवर कशी होइल शिवा।।5.2

 

दयाळा सर्वज्ञा पशुच अति मी क्षुद्र कुणि हा

मला सांभाळी तू मजवर करोनी तव कृपा

कृपेची गाथा ही तव दुमदुमे रे दशदिशा

समर्था स्वामी तू करि न मजसी दूर सखया।।5.3 

-----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी श्लोक 6

(1 मार्च 2021)

          हे शिवा,

 स्वतःला पंडित म्हणविणारे हे हुशार लोक नेहमी कसली कसली चर्चा करत असतात. काय तर म्हणे मातीचा मुलगा घट! कापसाचा नातू पट!  हे सर्व घट म्हणजे नुसती माती आहे. हा कपड्याचा तागा म्हणजे कापसाचे उभे आडवे धागे म्हणजे कापूसच आहे. हे जग ओतःप्रोत ब्रह्माने भरलेलं आहे. ब्रह्माची चर्चा करणारे बोलून बोलून त्यांच्या घशाला कोरड पडेपर्यंत खुशाल  चर्चा करोत. मला एवढच माहित आहे. लहान बाळाला त्याच्या आईचं नाव, वय काही काही माहित नसतं. पण त्याला आई जशी अनन्य असते तशी माझ्या मनात तुझी पावलं सतत राहू दे.

             शाळेत ज्याप्रमाणे पहिलीतल्या मुलाची आणि दहावीतल्या मुलाची अभ्यासाची पातळी वेगवेगळी असते त्याप्रमाणे अध्यात्मातही प्रत्येकाची पातळी वेगळी असते हे लक्षात घेऊन आचार्यांनी प्रत्येकाची काळजी घेतली आहे. जे बाळ भातही खाऊ शकत नाही त्याला पक्वान्ने देऊन कसे चालेल? अद्वैताकडे जातांना द्वैतही समजून घ्यायला पाहिजे. आमावास्येनंतरची प्रतिपदेची सूक्ष्म चंद्रकोरीची रेघ दिसत नसेल तर ती रेघ दिसेपर्यंत ``ती बघ त्या फांदीवर’’ असे बघणार्‍याला समजेल असे सांगावे लागते. एकदा का फादीचा संदर्भ लक्षात घेऊन चंद्रकोर दिसली की ती फांदीवर नाही हे वेगळे सांगावे लागत नाही. त्याप्रमाणे पहिल्या काही श्लोकांमधे भक्ताची श्रद्धा दृढ व्हावी, त्याची भक्ती अनन्य असावी ह्यासाठी हे श्लोक आहेत.

 

घटो वा मृत्पिण्डोऽप्यणुरपि च धूमोऽग्निरचलः

पटो वा तन्तुर्वा परिहरति किं घोर-शमनम्।

वृथा कण्ठक्षोभं वहसि तरसा तर्क-वचसा

पदाम्भोजं शम्भोर्भज परम-सौख्यं व्रज सुधीः।।6

 

  ( तरस्- चाल,वेग,शक्ति,उर्जा )

 

असे माती सारी घटचि नुसता बाह्य स्वरुपी

असे तंतू मुख्या वरवर दिसे वस्त्र नयनी 

अणू रेणू हेची घटक जगती मूळ असती

लपे अग्नी तेथे जिथुनि निघतो धूर भवती॥6.1

 

वृथा ऐसी चर्चा नच शमवि प्रक्षोभ मनिचा

अशा या तर्कांनी नच सुकवि कंठास मनुजा

असे सौख्याचा जो परम अविनाशीच सुखधी

अशा विश्वेशाची चरणकमळे आठव मनी ।।6.2

------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी श्लोक 7

 (2 मार्च 2021)

 

 

हे शंभो,

             माझ्या मनात सतत तुझे चरण कमल राहोत. मुखी तुझी स्तुती राहो. माझ्या डोळ्यांपुढे सतत तुझीच मूर्ती दिसो. हाताने तुझीच पूजा घडो. माझ्या कानी सतत तुझेच नाम ऐकू येवो. माझी बुद्धी तुझ्या पायी एकाग्र होवो. अशाप्रकारे माझ्या सर्व इंद्रियांद्वारे जर तुझी सेवा घडत असेल तर हे कंठनीला अजून तुझ्या वर्णनाचे गहन असे ग्रंथ वाचण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे काहीच सादन उपलब्ध नाही.

             अनन्य  भावाने शरण जाणार्‍या भक्ताला अजून दुसरे काहीही करायची आवश्यकता नसते.

 

 

मनस्ते पादाब्जे निवसतु वचः स्तोत्र-फणितौ

करौ चाभ्यर्चायां श्रुतिरपि कथाकर्णन-विधौ।

तव ध्याने बुद्धिर्नयन-युगलं मूर्तिविभवे

परग्रन्थान्कैर्वा परमशिव जाने परमतः।।7

 

सदा राहो चित्ती चरणकमले कोमल तुझी

मुखी राहो माझ्या तवचि स्तुति स्तोत्रे मधुर ही

घडो हाती माझ्या तव चरणसेवा अविरता

  सदा कानांनी मी सुखमयचि ऐको तव कथा।।7.1

 

सदा बुद्धि व्हावी तव चरणि एकाग्र सदया

तुझी मूर्ती रम्या मम नयनि राहो प्रभुवरा

प्रभो सांगा आता तव गहन त्या ग्रंथविभवा 

कसे अभ्यासावे जवळि नुरले साधन शिवा।।7.2

--------------------------------------------------

शिवानन्दलहरी

 श्लोक – 8

          काही वेळेला दोन गोष्टींमधल्या साधर्म्यामुळे लोक फसतात. एखादा चमकणारा शिंपलाच कोणी चांदी म्हणून उचलून घेतो. रत्नाची परीक्षा नसलेला माणूस चमचमणारा काचेचा तुकडाच रत्न म्हणून उचलतो. ज्याने दुधाची चवच घेतली नाही तो पीठ मिसळलेल्या पाण्यालाही दूध समजतो. वाळवंटात सूर्याच्या प्रखर तेजाने पाण्याचा आभास निर्माण होऊन एखादा तहानलेला पाण्याच्या आशेने त्या मृगजळामागे धावत राहतो. त्याप्रमाणे,

हे विश्वेश्वरा,

  आपलं विश्वात्मक रूप मर्यादित बुद्धीच्या अज्ञानी लोकांना कळत नाही. कुठल्याही देवाला शरण जाणं हे महादेवालाच शरण जाण्यासारखं आहे. पण हे त्यांना उमजत नाही. ते देवादेवांमधेही भेद कल्पू लागतात. मर्यादित बुद्धी आणि अज्ञान ह्यांच्या संगतीने अशी देवादेवांमध्ये फरक करणारी देवभ्रान्ती मनात उत्पन्न झाली की; देव ह्या सर्व कल्पनांचे अधिष्ठान शिवच आहे हे त्यांना ओळखता येत नाही. ते प्रत्येक देवाला भिन्न भिन्न नामारूपाने भजत राहतात. आपण त्यांच्यावरही कृपा करावी.

यथा बुद्धिः शुक्तौ रजतमिति काचाश्मनि मणि-

र्जले पैष्टे क्षीरं भवति मृगतृष्णासु सलिलम्।

तथा देवभ्रान्त्या भजति भवदन्यं जडजनो

महादेवेशं त्वां मनसि च न मत्वा पशुपते।।8

 

( शुक्ति  शिंपला। रजत - चांदी )

 

बघोनी शिंपेसी उचलि जव त्याला जडमती

 मिळाली चांदी ही मनि म्हणतसे हर्षित अती

हिरा काचेलाही समजुनि तया धारण करी

 पिठाच्या पाण्यासी मधुर म्हणतो दूध म्हणुनी।।8.1

 

तहानेला धावे जवं मृगजळासीच बघुनी

तसे अज्ञानी हे भटकति उपेक्षूनी तुजसी

दिसे त्या देवासी नमुन म्हणती जागृत अती

कळे ना त्यांना हे स्वरुप तव विश्वात्मक मुळी।।8.2

--------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक -9

हे  कैलासनाथा,

               तुझी यथासांग पूजा करावी म्हणून हे वेडे लोक काय काय करतील सांगवत नाही. कमळाच्या वेलींच्या दाट जाळीत पाय अडकेल अशा कठीण सरोवरात कमळे खुडण्यासाठी पोहत जातात. कुणी डोंगर दर्‍यांमधे असलेली अलौकीक फुले, फळे गोळा करण्यासाठी जीव धोक्यात घालून कडे, कपारी चढून ती मिळवण्यात धन्यता मानतात. कोणी निबीड आरण्यात काट्याकुट्यांच्या पाऊलवाटा तुडवत तेथपर्यंत पोचतात आणि मोठ्या हिकमतीने फुले, फळे तोडून आणतात. कोणी बहाद्दर तर दुसर्‍यांच्या बागेतील फुलेही शिताफिने चोरून आणतात. पण त्यांच्या अंतःकरणातच भक्ती नसेल, तुझ्याबद्दल प्रेम नसेल तर अशाप्रकारे देहाला पीडा देऊन काय साध्य होणार? ह्या फुकटच्या अवडंबराने तुझी प्राप्ती थोडीच होणार आहे? हे पार्वतीशा, अनन्यभावाने तुला फक्त अंतःकरण अर्पण केले, तुझ्या पावलांवर मन-सुमन अर्पण केले तर ज्या सौख्याची अनुभूती येते ती बाकी कितीही अवडंबर माजवून येणार नाही.

गभीरे कासारे विशति विजने घोरविपिने

विशाले शैले च भ्रमति कुसुमार्थं जडमतिः।

समर्प्यैकं चेतःसरसिजमुमानाथ भवते

सुखेनावस्थातुं जन इह न जानाति किमहो।।9

 

सुपुष्पे अर्पावी तुजसि म्हणुनी मूढमति हे

कुणी पाण्यामध्ये कमळ खुडण्यासी धडपडे

कुणी रानामध्ये निबिड अति एकाकि भटके

फुले पत्री नानाविध मिळविण्या दुर्मिळ फळे।।9.1

 

कडे पायी पायी चढुन कुणि जाई गिरिवरे

मिळाया बेलाचे त्रिदल हिरवे पान इवले

कळेना कोणासी मन-सुमन हेची तुज रुचे

तुझ्या पायी अर्पी सुमन-धन तो सौख्य मिळवे ।।9.2

--------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी-

 श्लोक -10

हे परमेश्वरा,

            मला कुठला जन्म मिळाला हयाने काय फरक पडतो?  मला कोणताही जन्म द्या. माणूस म्हणून द्या, देव म्हणू द्या. मी एखाद्या पर्वतावर वा वनात राहणारा वाघ, सिंह, हरीण होवो वा एखादं चिलट वा डास! मी गायी बैलासारखे पशु म्हणून अस्तित्त्वात येवो वा एखादा कीटक! मी आकाशात विहार करणारा एखादा पक्षी म्हणून जन्माला येवो वा न उडणारा मोर! पण माझं हृदय मात्र आपल्या चरणकमळांच्या स्मरणाने सतत परिपूर्ण असो. शिवा, तुझ्या पावलांच्या स्मरणाने होणार्‍या आनंदाच्या लाटांवर लाटा माझ्या मनात उठत राहोत. त्या मोदमयी शिवानंदलहरींच्या लाटांवर माझं मन आंदोळत राहो. ही एकच माझी मनीषा आहे.

             हे शंभो! एकदा का माझं मन तुमच्या चरणांवर जडलं की मग मला अजुन काय पाहिजे. माझा जन्म ही अत्यंत दुय्यम गोष्ट आहे.

 

नरत्वं देवत्वं नग-वन-मृगत्वं मशकता

पशुत्वं कीटत्वं भवतु विहगत्वादि-जननम्।

सदा त्वत्पादाब्ज-स्मरण-परमान्दलहरी-

विहारासक्तं चेद्हृदयमिह किं तेन वपुषा।।10

 

मला लाभो काया सुर नर पशूचीहि कितिदा

किडा मुंगी पक्षी म्हणुनि मिळु दे जन्म शतदा

शरीरासी नाही लघुतमहि कर्तव्य मजला

हृदी राहो माझ्या इतुकिच मनीषा परि शिवा॥10.1

 

 स्मरे जेंव्हा मी हे तव चरण रे पंकजसमा

उठो आनंदाच्या विमल लहरी चित्ति सुखदा

मनाला माझ्या या नित विहरु दे त्यातचि सदा

मनी आसक्ती ही तव पद सरोजीच असु द्या ।।10.2

 

--------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी -

श्लोक 11 -

 (6 मार्च 2021)

 हे कैलासनाथा , हे पशुपती,

तुझी भक्ती करणारा कोण आहे; उच्च कुलीन आहे का नीच आहे; विद्वान आहे का सामान्य आहे; एखादा घर, संसार सांभाळणारा गृहस्थधर्मी आहे का बटु आहे; का सर्वसंग परित्याग केलेला जटाधारी यती आहे; ह्यानी काय फरक पडतो?  जो आपलं हृदयच तुला अर्पण करतो तो कोणी का असेना, तू त्याचा सगळा भार स्वतःच वाहतोस. तू त्याला कुठल्याही संकटाचे कष्ट वाटू देत नाहीस.

 

बटुर्वा गेही वा यतिरपि जटी वा तदितरो

नरो वा यः कश्चिद्भवतु भव किं तेन भवति।

यदीयं हृत्पद्मं यदि भवदधीनं पशुपते

तदीयस्त्वं शम्भो भवसि भव-भारं च वहसि।।11

 

गृहस्थी संसारी बटु यति जटाधारि असुदे

असो कोणीही तो नर कुणि तयाने न बिघडे

तुझ्या पायी वाहे हृदयकमला जो  पुरुष रे

तयाच्या वाहे तू परम भवभारासी शिव हे ।।11

---------------------------------------------------

शिवानन्दलहरी-

 श्लोक 12 -

( 7 मार्च 2021)

हे विश्वनाथा,

            तुझी प्राप्ती व्हावी म्हणून  हे लोक काय काय करतात;  सर्वसंग परित्याग करून कुणी गुहेत जाऊन बसतो; कुणी रानावनात काट्याकुट्यात भटकत तुला शोधत राहतो; कुणी पाण्यात उभ राहून तपश्चर्या करतो. कोणी निखार्‍यावर चालण्याचे महाभयानक दिव्यही करतो.

                 पण हे करून खरच सर्वसंग परित्याग घडतो का? का गुहेत, रानीवनी विजनवासातही तो आप्तजनांचा आणि इतरेजनांचा संगच त्यांचा पाठलाग करतो? ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची वाट न धरता भलत्याच मार्गावरून मार्गक्रमणा करणार्‍याला ते गाव कसं सापडणार?

                    हे परेशा, ज्याच्या मनात तुझी कोमल चरणयुगुले आहेत त्याला कोठे जायला कशाला पाहिजे?  देहाला यातना देऊन  तू कसा मिळशील? ज्याचे कान, नाक, डोळे, वाणी, मन तुझ्या स्वरूपाशीच एकरूप झाले आहेत ज्याला तुझ्या अनन्य भक्तीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही तोच खरा योगी तोच खरा आनंदनिधान.

 

 गुहायां गेहे वा बहिरपि वने वाद्रि-शिखरे

जले वा वह्नौ वा वसतु वसतेः किं वद फलम्।

सदा यस्यैवान्तःकरणमपि शम्भो तव पदे

स्थितं चेद्योगोऽसौ स च परम-योगी स च सुखी।।12

 

तुझ्या प्राप्तीसाठी नर विजनवासीच बनुनी

गुहे मध्ये राही गिरिवर फिरे दुर्गम अती

तुला शोधायाला कुणि फिरतसे निर्जन वनी

करी वा पूजार्चा सदनिच यथासांग तव ही।।12.1

 

बसोनी एकांती कुणि करितसे ध्यान तपची

उभा पाण्यामध्ये कितिक घटका देह शिणवी

निखा र्‍यांच्या रस्त्यावरुन कुणि चाले जडमती

अशाने का होते सुखद तव प्राप्ती कधितरी?।।12.2

 

सदा चित्ती ज्याच्या चरणयुगुले  पावन तुझी

तयाच्या सौख्यासी नच उरतसे पार कधिही

तुझे राही अंतःकरणि पद तो धन्य नर ची

असे योग्यांमध्ये नरवरचि तो श्रेष्ठ जगती।।12.3

----------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 13 –

हे दीनबंधो,

           वाट चुकलेला आंधळा जसा अजूनच भरकटत जातो तसा मी अज्ञानामुळे ज्ञानाचा प्रकाश हरवून मी अंध झालो आहे. हे दयाळा, आपल्या भक्तीपासून वंचित राहिल्याने मी अत्यंत मूढ जडमती असा आहे. अंधळा हत्ती जसा सैरभैर होऊन जंगलात कुठेही पळत सुटतो त्याप्रमाणे ह्या क्षणभंगुर, ज्यात काही तथ्य नाही अशा ह्या संसारात सैराट धावतांना, मी कल्याणकारी अशा योग्य मार्गापासून जास्त जास्तच दूर चाललो आहे. माझ्यासारखा दीनवाणा पाहिल्यावर हे शंभो आपण कसे स्वस्थ बसाल? कारण आपण दीन बंधू आहात. माझ्या सारखा दीन कोणी नाही आणि आपल्यासारखा दीनांचा त्राता कोणी नाही. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा.

असारे संसारे निज-भजन-दूरे जड-धिया

भ्रमन्तं मामन्धं परम-कृपया पातुमुचितम्।

मदन्यः को दीनस्तव कृपण-रक्षातिनिपुण-

स्त्वदन्यः को वा मे त्रिजगति शरण्यः पशुपते।।13

असार- निरससारहीन,रसहीन,निरर्थक,व्यर्थ,क्षणभंगुर, जडधी  मंदबुद्धी,विवेकशून्य,अज्ञानी )

उगा संसारी या भरकटत राहे सतत मी

विवेकाची दृष्टी हरवुनि बसे मी जडमती

कळेना अंधा या तव चरण सेवा सुखकरी

मला उद्धाराया मजवरि कृपा शाश्वत करी।।13.1

 

असे शंभो हेची उचित तुजसी वर्तन खरे

अभागी नाही या जगति मज ऐसा पुरुष रे

नसे त्रैलोक्यी या तुजसम दयावंत कुणिही

तुझ्या पायी आलो सदयहृदया घेचि जवळी।।13.2

 

----------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 14 -

हे प्रभो,

                तू अनाथांचा  नाथ आहेस. तू पतितांसाठी पतितपावन आहेस. दीनांसाठी दीनदयाळ आहेस. दीनबंधू आहेस. जितका जास्त हीन दीन तेवढी तुझ्या मनात त्यांच्यासाठी आपोआप ज्यास्त करुणा, कणव, प्रेम दाटून येते. अत्यंत  आपुलकी उत्पन्न होते.

                मी अत्यंत हीन दीन आहे हे लक्षात घेऊन हे दीनानाथा तू माझ्या मदतीला धावून ये. मित्र संकटात असतांना त्याच्या मदतीला धावून येतो तोच मित्र. ही एकच मैत्रीची व्याख्या मला पाठ आहे. हे दयाळा, मी तुला आर्त साद घालत आहे. तू प्रयत्न केलेस तरच माझी ही स्थिती पालटेल. हे करुणाकरा आपण माझं सदोदित रक्षण करा. सतत माझ्या पाठीशी उभे रहा.

 

 

प्रभुस्त्वं दीनानां खलु परमबन्धुः पशुपते

प्रमुख्योऽहं तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः।

त्वयैव क्षन्तव्याः शिव मदपराधाश्च सकलाः

प्रयत्नात्कर्तव्यं मदवनमियं बन्धुसरणिः।।14

 

( किमुत-कैमुतिक न्याय - अजू किती अधिक या न्यायाने ; म्हणजेच मी जेवढा जेवढा जास्त दीन तेवढा तेवढा तू जास्त दयाळू , जे अती दीन आहेत त्यांच्या बद्दल तुझ्या मनात अजुन अजुन जास्त करुणा उत्पन्न होते. )

 

अनाथांच्या नाथा व्यथित पतिताच्याच सुहृदा

असे रंकांमध्ये अधम अति मी रंक अवघा

बघोनी दीनांसी तुजसि बहु येई कळवळा

तयांच्या उद्धारा बहु श्रमतसे तूचि सदया।।14.1

 

असे या न्यायाने मम सुहृद तू रे जिवलगा

करी या दीनाच्या सकल अपराधांसिच क्षमा

प्रयत्ने रक्षावे मजसिच दयाळा नित भुवी

असे मैत्रीची ही अवगत मला रीत जगती ।।14.2

----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 15 -

हे महेश्वरा ,

                        आपण माझ्याकडे पूर्ण डोळेझाक करत आहात.  प्रभो, आपलं माझ्याकडे इतकं दुर्लक्ष का? माझी इतकी उपेक्षा का?  काय ? तुम्हाला ही जरासुद्धा हयगय, चालढकल वाटत नाही? अहो ह्या ब्रह्मदेवानी माझ्या कपाळावर ललाटलेख असा काही लिहिला आहे की, मला तुमचे स्मरण ही होणार नाही. मी तुमच्या रूपात, तुमच्या नामात तल्लीन होणार नाही. अरेरे!! हेच माझं परम दुर्दैव आहे. हे परमेश्वरा, हे परेशा , माझ्या कपाळावरील ही वेडीवाकडी अक्षरं तू पुसून टाक.

                      कृपा करून आपण ``मला हे शक्य नाही , ती अक्षरे पुसण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही, तेवढी माझी क्षमता नाही.’’ अशी उत्तरे देऊन मला नाराज करू नका. कारण मला माहित आहे , जेंव्हा ब्रह्मदेवाने अपराध केला तेंव्हा आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन सर्वांना झाले. आपण नुसत्या नखाने त्याचे भलेमोठे मस्तक नखलून टाकले.

 

 

उपेक्षा नो चेत्किं न हरसि भवध्यान-विमुखां

दुराशाभूयिष्ठां विधि-लिपिमशक्तो यदि भवान्।

शिरस्तद्वैधात्रं न न खलु सुवृत्तं पशुपते

कथं वा निर्यत्नं कर-नख-मुखेनैव लुलितम्।।15

 

असे दुर्दैवी मी स्मरण तव होई न हृदयी

दिसेना आशेचा किरण मज या दाट तिमिरी

ललाटी माझ्या हे विधिलिखित का तू न पुससी

उपेक्षा माझी का करिसि मज दुर्लक्षुनि अती।।15.1

 

`ललाटीच्या लेखा पुसुनि लिहिण्यासी नविन त्या-

नसे शक्ती माझी ' वचन तव ऐसे उचित ना

विधात्याच्या तू रे नखलुनि शिरा दंड दिधला
महा सामर्थ्याचा परिचय जगासी घडविला।।15.2

----------------------------------------------------------

शिवानन्दलहरी-

श्लोक 16 -

 हे दयाघना शंकरा,

        आपण खोटं बोलणार्‍या त्या विधात्याचे एक शिर नखलून टाकल्यानंतरही त्याला दीर्घायू करणार असाल, तर खुशाल करा. अजून त्याची ती खोटारडी चार चार तोंडेही बिनदिक्कत जपून ठेवा. पण त्यानेच माझ्या कपाळावर असा काही दुर्दैवी ललाटलेख लिहिला आहे. ज्याने मला तुमचे स्मरण होणार नाही. मी तुमच्या रूपात, तुमच्या नामात तल्लीन होणार नाही. त्याने कितीही कसेही वागो पण प्रभो मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही तुमची प्रेमळ कृपादृष्टी नुसती माझ्याकडे वळवली तरी, माझं रक्षण होईल. खर तरं मी ही सगळी अनाठायी काळजी कशाला करू? कारण हे प्रभो सर्व दीन, अभागी, शोचनीय अशा लोकांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही तत्परतेने कटिबद्ध आहात. दया हा तर आपला स्थायीभाव आहे.

 

 

विरिञ्चिर्दीघायुर्भवतु भवता तत्परशिर-

श्चतुष्कं संरक्ष्यं स खलु भुवि दैन्यं लिखितवान्।

विचारः को वा मां विशद कृपया पाति शिव मे

कटाक्ष-व्यापारः स्वयमपि च दीनावन-परः।।16

 

( विरिंचि-  ब्रह्मदेव )

विधाता होवो तो सहजिच चिरंजीव जगती

शिरे त्याची चारी जपुन अति ठेवा सकल ती

परी त्याने भाळी मम लिहुनि दुर्दैवलहरी

मला केले दुःखी हर हर शिवा घे समजुनी।।16.1

 

कटाक्षाने एका शिवमय कृपेनेच तुझिया

मला पाही शंभो; मजसि भय कैसे मग जिवा

जगी दुःखी कष्टी पतित पिचलेले जन अती

तयांना रक्षाया तव मनि दया पाझरत ही।।16.2

----------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक- 17

हे करुणाकरा,

 माझं गतजन्मीचं पुण्य म्हणू की तुमची कृपा म्हणू? आपण मला प्रसन्न तर झाला. पण हे विश्वेश्वरा आपण तर सार्‍या विश्वाचे स्वामी. आपल्या पायांवर नतमस्तक होण्यासाठी, आपली कृपा संपादन करण्यासाठी मी पाहतो तर येथे देवांची रीघ लागली आहे. आपल्या चरणांची धूळ मस्तकी लागावी म्हणून देवांची झुंबड उडाली आहे.  सारे आपल्या पवित्र पावलांवर त्यांची मस्तके ठेवीत असतांना देवांच्या मस्तकांची आणि त्यांच्या मस्तकांवरील रत्नजडित मुकुटांची इतकी दाटी झाली आहे की मला त्यांच्या सुवर्णाच्या मुकुटावरचे चमचमणारे हिरे मोती, वैडुर्य अशी नाना तेजस्वी रत्ने आणि त्यांचा आजूबाजूला पसरलेला प्रकाशच फक्त दिसतो आहे. हे शंकरा तुझी कृपा होऊन सुद्धा मला अभाग्याला तुझी कमल कोमल पावले दिसू नयेत आणि त्यांच्या दर्शनापासून मी वंचितच रहावं ह्याला काय म्हणावं?

         हे शंभो, तुझी कृपा होऊनही तुझ्या वंदनीय चरणांवर माझं मन अनन्य भावाने शरण आलं नाही ह्याचच हे द्योतक असावं. तू मला अनन्य भक्तीचं वरदान दे बाकी मला काही काही नको.

 

फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो

प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमल-पादाब्ज-युगलम्।

कथं पश्येयं मां स्थगयति नमःसम्भ्रम-जुषां

निलिम्पानां श्रेणिर्निज-कनक-माणिक्य-मुकुटैः।।17

(निलिम्प – देव. श्रेणि –समुह. जुष्- आनंद घेणारे. सम्भ्रम-जुषां – उतावीळ झालेले. थोडक्यात शिवाच्या पायावर नमस्कार करण्यासाठी अत्यानंदाने उतावीळ झालेल्या देवांच्या समुहाची गर्दी. प्रत्येक देवाने नमस्कारासाठी आपले मस्तक वाकवतांना  शिवाच्या पायावर जणु रत्नमाणिकहिर्‍यांच्या मुकुटांचीच गर्दी झाली आहे.  ही सर्व धांदल  मला थांबवते म्हनजे स्थगयति। कशापासून तर शिवाचे चरण दिसण्यापासून )

फळे पुण्याई ही जणुच गतजन्मातिल अजी

तुला येवोनी वा अतिव करुणा सांग हृदयी

कृपा केली मोठी हर हर दयाळा मजवरी

तरी माझ्या नेत्री तव चरण शंभो न दिसती।।17.1

 

तुझ्या पायी माथा सकल सुर भावे नमविति

किरीटांचे त्याच्या चमकति हिरे माणिक अती

तुझ्या पायी गर्दी बहु उसळली स्वर्णमय ही
दिसू ना देती ते चरणयुगुले कोमल तुझी।।17.2

----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 18 -

 हे जगत्स्वामी, हे परमेश्वरा,

 आपली कृपा, आपलं औदार्य, आपलं दाक्षिण्य काय वर्णावं? आपल्या परम कृपेनीच ब्रह्मदेवाला जगत्स्रष्टा ही महान पदवी मिळाली तर विष्णू जगत्पालक म्हणून विख्यात आहे. ज्याच्या जवळ महान सामर्थ्य आहे तोच दुसर्‍यांवर कृपावंत होऊन त्यांना इतकं सामर्थ्य बहाल करू शकतो.

             हे परमेश्वरा, माझी अशी कुठलीही अवाजवी महत्त्वाकांक्षा पूर्ण र असं माझं मागणं ही नाही. माझं रक्षण करा इतकचं काय ते मी तुला मागतो आहे. तू माझ्या रक्षणार्थ सदैव माझ्यासोबत राहशील ना?

त्वमेको लोकानां परम-फलदो दिव्य-पदवीं

वहन्तस्त्वन्मूलां पुनरपि भजन्ते हरिमुखाः।

कियद्वा दाक्षिण्यं तव शिव मदाशा च कियती

कदा वा मद्रक्षां वहसि करुणा-पूरित-दृशा।।18

 

तुझ्या औदार्याची महति बहु लोकोत्तर असे

करे जो भक्तीसी फळ मिळतसे त्या तव कृपे

जगत्स्रष्टा किंवा त्रिभुवनपती हीच बिरुदे 

दिली देवांसी तू तरिहि तव गातीच स्तवने।।18.1

 

कृपेची ऐशी ही महति तव ऐकून जगती

 मनी माझ्या आशा सदयहृदया पालवलि ही

नका सोडू वा र्‍यावर मजसि रक्षा नित तुम्ही

कृपापूर्णादृष्टी मजवरिच टाका क्षणभरी।।18.2

----------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 19 -

हे चंद्रमौळी,

ह्या संसाराच्या चटक्यांनी मी होरपळतोय. पोटासाठी येथे सतत वणवण भटकावं लागतं. आपमतलबी, दुसर्‍यांच्या दुःखाची जराही पर्वा नसलेल्या, दुष्ट धनिकांचे उंबरठे झिजवावे लागतात.  हे पाहून सुद्धा तुला माझी जराही दया नाही का रे? का तुलाही माझी ही ससेहोळपट पाहून सुखावायला होतं? माझी व्यथा जर तुला रिझवण्यास योग्य वाटत असेल, माझी दुःखे जर तुला सुख देत असतील, संसारात होणारी ही माझी फरपट पाहून तुला जर विशेष संतोष वाटत असेल तर हे करुणाकरा, हे दयाघना माझ्या दुःखाने का होईना पण मी तुझ्या मनाला प्रसन्नता देऊ शकलो ह्याचच मला मोठं समाधान आहे. 

 

 

दुराशा-भूयिष्ठे दुरधिप-गृह-द्वार-घटके

दुरन्ते संसारे दुरित-निलये दुःख-जनके।

मदायासं किं न व्यपनयसि कस्यापकृतये

वदेयं प्रीतिश्चेत्तव शिव कृतार्थाः खलु वयम्।।19

 

क्षुधार्ता पोटाची सतत भरण्या क्षुद्र खळगी

धनी उन्मत्तांची झिजवतचि दारे फिरत मी

निराशा आशेचा धरि मुखवटा; लोक फसती

चुराडा आशांचा हर हरचि होतो प्रतिदिनी।।19.1

 

सदा नाना दुःखे हतबलचि जीवांस करिती

दिसेना कष्टांचा शिव शिव शिवा अंत मजसी

कशी येईना रे तुजसी करुणा सांग मजसी

प्रभो पाहोनीया ममचि दयनीया स्थिति अशी।।19.2

 

जरी माझी दुःखे तवचि हृदयासी सुखविती

कृपा वा आहे ही शिव शिव दुज्याच्यावर तुझी

जरी माझी चिंता व्यथित करते ना तुज मनी

समाधानी आम्ही मनि न कुठली आस उरली।।19.3

----------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 20 -

 

हे भूतनाथ, हे पशुपते,

माझं हे मन अत्यंत अस्थिर, अचपळ आहे. पार्‍याप्रमाणे माझ्या हातातून कधीच निसटून जात आहे. ते माझ्या काबूत येत नाही. अरे वावटळीला कडण्यासाठी कधी फासेपारध्याचा साधा फास उपयोगी पडेल का? तरंगाना गोळा करण्यासाठी  गाळणी काय कामाची? हे पशुपते माझं मन---- छे ! मन कसलं माकडच ते! काय मर्कटलीला करेल ते सांगवत नाही. तू तुझ्या नामाच्या दोरीने , तुझ्या दृढ अशा भक्तिरूपी रज्जून त्याला घट्ट बांधून कायमचं तुझ्या ताब्यात ठेव. त्याला इकडे तिकडे भरकटू देऊ नकोस.

 

सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ

नटत्याशा-शाखास्वटति झटिति स्वैरमभितः।

कपालिन् भिक्षो मे हृदयकपिमत्यन्त चपलम्

दृढं भक्त्या बद्ध्वा शिव भवदधीनं कुरु विभो।।20

 

कपाली शंभो! मी, अचपळ मना आवरु कसे

फिरे मोहाच्या या गहन वनि स्वच्छंद कपि हे

चढे संकल्पाच्या तरुवरचि हे मर्कट बळे

डहाळ्या आशेच्या धरुनि लटके त्यास उलटे।।20.1

 

उड्या मारी तेथे कधि धडपडे चंचल अती

असे त्याची वस्ती रुचिर-युवती-वक्ष शिखरी

तुझ्या भक्तीची बा दृढ अतुट रज्जूच करुनी

तया बांधी शंभो करुनि वश त्या ठेव जवळी।।20.2

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 21 -

 हे त्रिभुवनजयी विश्वेश्वरा,

                 आपण माझ्या माकडाप्रमाणे मर्कटलीला करणार्‍या मनाला दृढ भक्तिरज्जुने बांधलं आहे. माझं मन आपल्याला कायमचं वश झालं आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे. कृपा करून तीचा आव्हेर करू नका.

        हे विश्वेशा, प्रत्यक्ष जगदंबा आपल्या सेवेसाठी दिवस रात्र एक करत आहे. सारे गण आपली सेवा करायला मिळावी म्हणून आपल्याप्रति समर्पित आहेत.

               मीही आपल्या निवासासाठी माझ्या मनाची  एक सुंदर कुटी तयार केली आहे. धैर्याचा अविचल खांब मधोमध रोवून त्यावर चित्ताचा स्वच्छ सुंदर शुभ्र असा पट मी आच्छादन म्हणून घातला आहे. माझ्या सद्गुण रूपी रज्जूंनी  ह्या तंबूचं कापड ओढून असं व्यवस्थित बसवलं आहे की त्यावर दुर्विचारांची एकही सुरुकुती राहू नये.  अत्यंत सुंदर, पवित्र विचारांची कमळ नक्षी मी त्यावर चितारली आहे.  ज्ञानाचा सुंदर कोरीव नक्षिकामाचा मनोहारी दरवाजा त्याला बसवला आहे. ही कुटी अद्वितीय सुंदर व्हावी म्हणून प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी मी सन्मार्गावर खूप झटून कष्ट केले आहेत.

             माझ्या मनाच्या ह्या विलोभनीय कुटीत आपण आपल्या सर्व परिवारासह कायमचं विश्रांतीला येऊन रहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण मला नकार देऊ नका. आपण माझ्या विनंतीचा स्वीकार करा.

 

 

धृति-स्तम्भाधारां दृढ-गुण-निबद्धां सगमनां

विचित्रां पद्माढ्यां प्रतिदिवस-सन्मार्ग-घटिताम्।

स्मरारे मच्चेत्तः-स्फुट-पट-कुटीं प्राप्य विशदां

जय स्वामिन् शक्त्या सह शिवगणैः सेवित विभो।।21

 

( स्फुट- श्वेत,उज्ज्वल,शुभ्र। विशद- स्वच्छ,पवित्र,निर्मल,विमल, विशुद्ध शांत निश्चिन्त आरामदायी )

 

जगज्जेता ऐसी महति जगती ज्याचिच असे

अनंगासी त्या तू सहज करसी राख हर हे

गणांचा स्वामी तू गण असति हे अंकित तुझे

तुझ्या सेवेसाठी झटत जगदंबा नित असे।।21.1

 

तुला विश्रांतीसी विमल कुटि ही मी बनविली

तया स्वीकारी तू तुजसि उपयोगी नित रणी

उभा धैर्याचा हा  अविचल असा खांबचि मधे

वरी चित्ताचा हा विमल पट आच्छादित असे।।21.2

 

गुणांच्या रज्जूने चहुकडुनि ताणून तयि रे

उभारी ज्ञानाचे सुभटचि महाद्वार प्रभु हे

उठावासी रेखी धवलपटि उत्फुल्ल कमळे

किती नाना रंगी हरखुनिच जाईल मन हे।।21.3

 

सदा सन्मार्गी या झटुनि श्रमलो मी प्रतिदिनी

उभाराया ऐसी अनुपम कुटी मंगलमयी

प्रवेशावे शंभो जय जय तुझे स्वागत करी

रहावे विश्रामा कुटित मम शंभो नित तुम्ही।।21.4

 

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 22 -

हे भूतनाथ,

            अंती तू सर्वांच्या सर्वस्वाचं हरण करतोस म्हणून तुला चोरांचा चोर, सर्वश्रेष्ठ तस्कर म्हणजेच तस्करपती म्हणून संबोधतात. माझ्या मनालाही मद, लोभ, मत्सर, क्रोध--- इत्यादिंची कुसंगत जडली आहे. त्यांच्या कुसंगतीने त्याला चोरीचेही भय वाटत नाही. जिथे जिथे विषय भोग दिसतील तिथे तिथे गुपचूप चोर पावलाने जराही चाहूल न लागू देता ते घुसते आणि विषयोपभोग मिळवते. माझ्या ह्या चोरट्या मनानी माझा नुसता छळ चालवला आहे. हे प्रभो मी निरपराध आहे. पण ह्या मनानी माझी चालवलेली ही पिळवणूक फार असह्य आहे. त्रासदायक आहे. प्रभो आपण तर तस्करपती! चोर जाणे चोराच्याच वाटा. त्यामुळे तुम्हीच त्याच्यावर नियंत्रण करू शकाल. त्याला बांधून तुम्ही कायम त्याला तुमच्या ताब्यात ठेवा.

प्रलोभाद्यैरर्थाहरण-परतन्त्रो धनिगृहे

प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते।

इमं चेतश्चोरं कथमिह सहे शंकर विभो

तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपाम्।।22

 

करी सर्वस्वाचे हरण नित तू रे पशुपती

म्हणोनी संबोधी निगम तुजला तस्करपती

असे चोरीची रे चटक मम चित्तास भलती

मदालोभादिंची अनुचित तया मैत्र नडली।।22.1

 

कुसंगाने त्यांच्या विषय करण्या प्राप्त सगळे

दिसे त्यासी जेथे विषयसुख तेथे शिरतसे

अती पीडादायी मज निरपराधा छळितसे

तया बांधोनी तू तुजजवळ ठेवी सतत रे ।।22.2

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 23 -

ह्या श्लोकामागे एक कथा आहे ती सांगते मग श्लोकार्थ.

          विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही शिवाचे भक्त होते. त्यांना आपल्यात श्रेष्ठ भक्त कोण असा अहंकार निर्माण झाला. तेंव्हा शिवाने ब्रह्मदेवाला शिवाच्या मस्तकास हात लावून यायला सांगितला तर विष्णूला शिवाच्या पावलांना स्पर्श करून येण्यास सांगितले.

             शिवाचे विश्वात्मक रूप जाणून घेण्यासाठी विष्णू शिवाच्या पायाच्या दिशेने जात राहिले. वराहाच्या रूपाने कितीही खाली जाऊन सुद्धा त्यांना शिवाच्या पावलांचे दर्शन होईना. ते परत आले आणि त्यांनी शिवासमोर साष्टांग दंडवत घालून आपल्याला पावले न दिसल्याचे सांगितले. ज्या क्षणी त्याने साष्टांग नमन केले म्हणजेच अहंकार सोडला त्याक्षणी त्यांना शिवाच्या पावलांचे दर्शन झाले.

              ब्रह्मदेव हंसाचं रूप घेऊन वर वर उडत राहिले पण त्यांना शिवाच्या मस्तकाचे दर्शन होईना. शेवटी थकून भागून ते नंदनवनात बसलेले असतांना त्यांना कामधेनू दिसली. त्यांनी तिला आपल्या बरोबर शिवाकडे येण्यास सांगितले व ब्रह्मदेवाने शिवाच्या मस्तकाचे दर्शन घेतल्याची ती साक्षीदार असल्याचे तिला सांगायला सांगितले. विधात्याच्या आग्रहामुळे भयाने कामधेनू यायला तयार झाली. आणि तिने शिवाला तसे सांगितलेही. परंतु शिवाला ब्रह्मदेवाच्या खोटेपणाचा राग येऊन ज्या मुखाने तो खोटे बोलला ते मुख त्याने आपल्या नुसत्या नखाने उडवून टाकले. व कामधेनूला ज्या तोंडाने ती खोटे बोलली ते तोंड अपवित्र राहील म्हणून शाप दिला. 

येथे आचार्य म्हणतात, हे शिवा मी तुझी भक्ती करून तुझ्या कृपेने एकदा विष्णू झालो तर एकदा  ब्रह्मदेव झालो. पण मला काही तुझे विश्वात्मक रूप समजून आले नाही. तुझ्या प्राप्तीसाठी माझा जीव तळमळत आहे. आता मला तुमचा विरह सोसवत नाही. माझा अजून अंत पाहू नका. मला आपले विश्वरूप दाखवा. प्रभो मला दर्शन द्या.

 

करोमि त्वत्पूजां सपदि सुखदो मे भव विभो

विधित्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति।

पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षि-मृगता-

मदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शंकर विभो।।23

 

तुझ्या भक्ता देई सहजचि शिवा विष्णुपद ही

तुझ्या सेवेचे वा फळ मिळतसे ब्रह्म-पद ही

दिले सेवेचे तू फळ मजसि ते उत्तम अती

दिसेना मूर्ती रे मजसि परि विश्वात्मक तुझी।।23.1

 

वराहाच्या रूपे किति समय पाताळ फिरलो

तुझे नाही शंभो पदकमल मी शोधु शकलो

पुन्हा हंसाचे मी स्वरुप करुनी धारण शिवा

उडालो आकाशी परि नच शिरोदर्शन मला।।23.2

 

कसे सोसावे मी अपरिमित दुःखास असल्या

तुझ्या भेटीसाठी मम तळमळे जीव बहु हा

नको मोठी मोठी मजसिच पदे विश्वविजया
तुझ्या रूपाचे रे मजसि घडु दे दर्शन शिवा।।23.3

----------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 24 -

 

हे साम्बा, हे स्वामी,

             मला आपली अनन्य भक्ती लाभो. आपल्यावाचून मला कोणाचा आठव सुद्धा होऊ नये. मला तर वाटते की मी कैलासावरच्या आपल्या रत्नमंडित भव्य प्रासादात आपल्या प्रसन्न, धीरगंभीर, ध्यानस्थ मूर्तीसमोर आपल्या अन्य गणांसमवेत, माझे दोन्ही हात नमस्कारासाठी जोडून, ते कपाळाला टेकवून, युगानुयुगे आपले अखंड नामस्मरण करत रहावे. त्यातून लाभणार्‍या परमानंदामुळे हा युगा युगांचा काळ मला क्षणासारखा अत्यंत त्रोटक, अत्यंत अल्पस्वल्प वाटावा.

हे प्रभो आपले सानिध्य लाभल्यावर बाकी सर्व सुखे ही अत्यंत नगण्य, खुजी अथवा दुःखमयच आहेत.

 

कदा वा कैलासे कनक-मणि-सौधे-सह गणै-

र्वसन् शम्भोरग्रे स्फुट-घटित-मूर्धाञ्जलिपुटः।

विभो साम्ब स्वामिन् परम-शिव पाहीति निगद-

न्विधातृणां कल्पान्  क्षणमिव विनेष्यामि सुखतः।।24

 

( विधातृणां मधल्या तृला डबल वाटी पाहिजे )

 

सुवर्णा-रत्नांच्या भवनि तव कैलासशिखरी

गणांच्या संगे मी तुज पुढति ध्यानस्थ बसुनी

कपाळा लावोनी सविनय सुखे अंजुलि कधी

शिवा सांबा स्वामी म्हणत  तुजला पाहिन हृदी।।24.1

 

युगा मागे जाओ युग सुखद या नामस्मरणी

परी कल्पांचा तो समय मज भासो क्षणिकची

विधात्याच्या लेखी युग युगहि आहे क्षण जसे

तुझ्या सान्निध्याने युग मजसि भासो पळभरे।।24.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 25 -

हे भोलेनाथ,

    आपल्या दर्शनासाठी माझ्या मनाची उत्सुकता, आतुरता शिगेला पोचली आहे. सगुण रूपात आपण मला दर्शन द्यावं ही माझ्या मनाची आस आपण पुरवा.

       ब्रह्मदेव, विष्णू आणि बाकी सारे देव आपल्या नामाचा , आपल्या स्तुतीचा जयघोष करत मिरवणुकीने जात आहेत; सारे योगीजनही त्यात सामील झाले आहेत; आपल्या ``ॐ नमः शिवाय।‘’ च्या नामाच्या घोषाने दशदिशा दुमदुमून जात आहेत, भरून आणि भारून गेल्या आहेत; आपले सर्व गण नानाप्रकारे शिवलीला प्रस्तुत करत आहेत. अशाप्रकारे सार्‍या पृथ्वीवरच शिवलीलांचा सोहळा चालू असतांना  नंदीवर वशिंडाला धरून साम्ब रूपात म्हणजेच माता पार्वतीच्यासह / अम्बेसह (अम्बया सहितः साम्बः ) आपली स्वारी येत आहे; चंचल मनाला पूर्ण काबूत आणल्याच्या प्रतिकरूपाने हातात चंचल मृग धरला आहे;  दुसर्‍या हाती खण्ड-परशु प्रकाराचे शस्त्र धारण केले आहे. असे हे त्रिनयन स्वरूप हे नीलकण्ठा   माझ्या डोळ्यासमोर कधी उभे राहील? आपले असे रूप पाहण्यासाठी मी अधीर झालो आहे.

 

स्तवैर्ब्रह्मादीना जयजय-वचोभिर्नियमिनां

गणानां केलीभिर्मद-कल-महोक्षस्य-ककुदि।

स्थितं नीलग्रीवं त्रिनयनमुमाश्लिष्ट-वपुषं

कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरशुम्।।25

 

 ( केलि - खेळ,क्रीडा महोक्ष-नंदिबैल। ककुद् – वशिंड ; नीलग्रीव नीलकंठ म्हणजेच शंकर उमाश्लिष्ट-वपुषं – उमेनी आलिंगन दिलेला शंकराचा देह )

 

विधात्याच्या संगे सुरगण हि गाती स्तुति तुझी

निनादे योग्यांचा ` जय जय शिवा ' घोष गगनी

गणांच्या लीलांनी गजबजुन जाईच अवनी

घुमे नंदीचाही रव गभिर मोदे दश दिशी।।25.1

 

अशा थाटामध्ये अवतरत स्वारी स्मितमुखी

वशिंडा-आधारे बसुनि नित  नंदीवर तुझी

उमा वामांगी ही विलसत असे अर्ध शरिरी

शिवा नीलग्रीवा त्रिनयन तुझी मूर्ति बरवी।।25.2

 

धरी हाती एका चपळ मन वा चंचल पशु

दुजा हाती आहे तळपत तुझा खंडपरशु

तुझी मूर्ती ऐसी निववि हृदयाला कधि प्रभु

मला सांगा शंभो सुखविल कधी याचि नयनु।।25.3

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

 श्लोक 26 –

हे गिरीशा,

आपले चरणकमल मला कसे दिसावेत? मी तर त्यांच्या दर्शनाची निरंतर आस लावून बसलो आहे.  माझी उत्कट इच्छा आहे की, आपले हे कमलचरण मला दिसावेत.  मी त्यांना माझ्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि मन तृप्त होईपर्यंत त्यांना निरखत रहावे. माझ्या पाणावलेल्या नेत्रांतून त्यांना अखंड जलाभिषेक घडावा. हे गिरिजेश्वरा आपले चरणारविन्द अवलोकन करत असतांना दाटून आलेल्या  कंठाने वारंवार आपल्या चरणांवर माझं मस्तक टेकवत, साक्षात माझ्यावर कृपाछत्र असलेली आपली कमल-कोमल, भव्य पाले मी माझ्या मस्तकावर धारण करावीत; हे माझ्या मनीचं खोल खोल रुजलेलं गुज आहे. आपले हे चरणारविन्द छातीसी धरून त्यांना घट्ट आलिंगन द्यावं आणि माझ्या हृदयाशी त्यांना कवटाळून धरावं; हृदयात जपून ठेवावं; ह्या चरणारविन्दांवर नुकत्या उमलत असलेल्या ताज्या टवटवीत कमल कलिका वाहून मी त्यांची यथासांग पूजा करावी; शंभो, आपल्या पायांवरच उमलत असलेल्या हया कमलांचा सुगंध दाही दिशात पसरावा. त्या सुगंधानी कोंदाटून गेलेल्या हवेतून प्रत्येक श्वासागणिक आपल्या पदारविन्दांना स्पर्श करून आलेला तो परिमळ मी छातीत खोलखोल भरून घ्यावा; ब्रह्मदेवालाही आजवर जो अनुभव लाभला नाही तो मला लाभावा ही माझी उत्कट इच्छा, हे माझं मनोरथ कधी बरं पूर्ण होईल? आपण ते पूर्ण करा.

 

कदा वा त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याङ्घ्रियुगलं

गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन्।

समाश्लिष्याघ्राय स्फुट-जलज-गन्धान् परिमला-

नलभ्यां ब्रह्माद्यैर्मुदमनुभविष्यामि हृदये।।26

 

( भव्य- मनोहर,प्रिय,सौम्य शांत,आनंददायी,भाग्यवान, शुभ । अङ्घ्रि - पाय। अङ्घ्रि युगलम् – दोन्ही पाय )

 

घडावे कैसे रे शुभद तव हे दर्शन मला

दिसावी कैसी ही चरणकमले लोचनि मला

महद्भाग्याने मी धरिन कधि हाती तव पदा

कृपाछत्रासी या धरिन कधि माथी पुलकिता।।26.1

 

कधी आलिंगोनी हृदयि जपुनी ठेविन तया

तुझ्या पायी वाही कमलकलिका अस्फुट अशा

भरूनी राहे हा परिमळ तयांचाचि अवघा

न ये ब्रह्मादींना अनुभवि अशा मी अनुभवा।।26.2


-------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 27 –

हे शिवसुंदरा,

आपल्या ऐश्वर्याचं काय वर्णन करावं? साक्षात सुवर्णाचा मेरू पर्वत आपण लीलया उचलून घेतला आहे. देवांचा खजिना सांभाळणारा तो धनवान कुबेर आपल्या पायाचा दास झाला आहे. सर्व कामना पूर्ण करणार्‍या कल्पलता आपल्या घराच्या दारात डुलत उभ्या आहेत. सर्व इच्छा पुरविणार्‍या चिंतामणीच्या पायर्‍या आपल्या घराला शोभत आहेत. हे गंगाधरा, आपल्या मस्तकावर आपण  अमृतालाही पैजेने जिंकेल अशी अमृतमय गंगा घारण केली आहे. तर हे चंद्रशेखरा आपल्या माथ्यावर  ऐश्वर्यसम्पन्न चंद्रकोर विराजमान आहे. कल्याणाचं ही कल्याण  आपल्यापुढे गुडघे टेकवून आपल्या चरणी कायमचं वास्तव्याला आले आहे. आपल्या ह्या  अगणित ऐश्वर्याच्या राशींमधे जे तुझ्याकडे नाही आणि ते मी तुला द्यावे असे काहीच शिल्लक नाही. म्हणून हे प्रभो माझ्यापाशी असलेले माझे `सुमनधन मी आपल्याला अर्पण करतो. त्याचा आपण स्वीकार करावा.

 

करस्थे हेमाद्रौ गिरिश निकटस्थे धनपतौ

गृहस्थे स्वर्भूजामर-सुरभि-चिन्तामणि-गणे।

शिरस्थे शीतांशौ चरणयुगलस्थेऽखिल-शुभे

कमर्थं दास्येऽहं भवतु भवदर्थं मम मनः।।27

 

( धनपति -  कुबेर । स्वर्भूज –- कल्पवृक्ष। अमरसुरभि - कामधेनु। चिन्तामणि –- सर्व इच्छा पूर्ण करणारे रत्न अथवा गणपती )

 

सुवर्णाचा मेरू तव करतळी तू उचलिला

स्विकारूनी दास्या धनपति तुझ्या पायि रमला

तुझ्या दारी शंभो नित बहरली कल्पलतिका

करी इच्छापूर्ती तव जवळि चिंतामणिच हा।।27.1

 

सुधा धारा वर्षे सुखदचि शशी मस्तकि तुझ्या

असे कल्याणाचे तव चरणि वास्तव्य शुभदा

तुला द्यावे ऐसे धनचि कुठले सांग उरते

असे माझ्यापाशी सुमनधन ते अर्पित असे।।27.2

----------------------------------------------------------------------

 

शिवानन्द लहरी-

   श्लोक 28 -

1 ते 27 व्या श्लोकापर्यंत शिवानन्दलहरीचे श्लोक हे शिखरिणी ह्या वृत्तात होते आता 28 ते 66 पर्यंत चे श्लोक शार्दूलविक्रीडित वृत्तात आहेत. अपवाद फक्त 44 व्या श्लोकाचा आहे.

               देवाच्या पूजनाने, त्याचे रूप सतत डोळ्यांना दिसून मनाने भक्त त्याच्या रूपात लीन होतो. त्याला बाकी जगाचा विसर पडतो. तीच सरूपता.

       ईश्वराचे गुण गाता गाता त्याच्या कीर्तानाने तो त्या सार्‍या घटनांचा जणु काही साक्षीच होतो ईश्वराच्या इतक्या समीप नेणारी ती समीपता.

               ह्याचीच पुढली पायरी म्हणजे तो इतर देवगणांसोबत, ईश्वरासोबतच समान लोकात रहायला लागतो. म्हणजेच सालोक्यता.

 

             ह्या तीन अवस्थांपर्यंत भक्त आणि भगवंत ह्यामधे भेद राहतो जो चवथ्या अवस्थेत म्हणजे सरूपता ह्या अवस्थेत संपतो. भक्त आणि भगवंत हे एकरूप होतात. जगापासून हळु हळु सुटत सुटत जाण्याचा हा क्रम म्हणजेच मोक्षाची एक एक पायरी चढत जाण्यासारखे आहे. विश्वरूपाशी तदाकार झालेल्या भक्ताच्या भक्त, भक्ती आणि भगवंत ह्या त्रिपुटीचा लय होतो.

जसे हिण काढण्यापूर्वी ही सोने सोनेच असते त्याप्रमाणे भक्त आणि भगवंत हा अभेदच असतो. पाण्यावरील शेवाळ हाताने दूर करून टाकल्याव स्वच्छ पाणी दिसते तसे अज्ञान दूर सारल्यावर  भक्त भगवंतरूपच असतो. (गीता - अध्याय 18, श्लोक 55)

           आकाश आकाशात दाटावे, तरंगाने सर्वांगानी जलमय व्हावे, प्रकाशाने सूर्यबिंबात विलास करावा, अशाप्रमाणे स्वयंसिद्ध अभेद भक्तीने भक्त  ईश्वराशी ऐक्य पावतो. हाच मोक्ष.

 

वृत्त- शार्दूलविक्रीडित,  अक्षरे-19, गण- म स ज स त त ग )

 

सारूप्यं तव पूजने शिव महादेवेति सङ्कीर्तने

सामीप्यं शिव-भक्ति-धुर्य-जनता-सांगत्य-सम्भाषणे।

सालोक्यं च चराचरात्मक-तनु-ध्याने भवानीपते

सायुज्यं मम सिद्धमत्र भवति स्वामिन्कृतार्थोऽस्म्यहम्।।28

 

( सारूप्य- देवाच्या स्वरूपात लीन होणे, तदाकारता प्राप्त होणे, सामीप्य-निकटता , सालोक्य- (समानो लोकोऽस्य )-त्याच लोकात  स्वर्गात देवतांबरोबर राहणेसायुज्य - समरूपता तादात्म्य पावणे, अभिन्नता, समरूपता,एकता )

 

प्रेमे पूजन रे तुझेच करिता सारूप्य मुक्ती मिळे

घेता नाम मुखे तुझे मधुर हे सामीप्य मुक्ती मिळे

संतांच्या बसुनी समीप करिता चर्चा अती आदरे

अज्ञानास करोनि दूर मिळते सालोक्य मुक्ति त्वरे।।28.1

 

चित्ती विश्वस्वरूप ध्यान करिता सायुज्य मुक्ती मिळे

चारी मुक्ति नरास ज्या मिळति त्या तादात्म्यता लाभते

चारी मुक्ति दिल्यास तू मज शिवा झालो तदाकार रे

झाला धन्य कृतार्थ जन्म मम हा शंभो भवानीपते।।28.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्द लहरी -

 श्लोक 29 -

 हे महेश्वरा.

   काया, वाचा, मनाने मी तुमचीच पूजा, तुमचीच स्तुती, तुमचेच ध्यान करत आहे. आपली अनन्य भक्ती  हेच माझ्या जीवाचे ध्येय आहे. हे गंगाधरा आता तरी माझ्यावर कृपा करा. आपला नेत्रकटाक्ष अंगावर पडून जीवन धन्य होवो अशी  स्वर्गाचे देवही इच्छा करत असतात. माझीही आपल्याला तीच विनंती आहे की, आपला एक कृपाकटाक्ष माझ्यावर पडो. त्याने माझे जीवन धन्य धन्य होईल. मला परम कृतार्थता लाभेल. आपण मला योग्य तो बोध करावा.

 

त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहं

त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो।

वीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थितां

शम्भो लोकगुरो मदीय-मनसः सौख्योपदेशं कुरु।।29

 

शंभो मी करितोचि पूजन तुझ्या या पावलांचे सुखे

ओठी नाम; पदारविंद तव हे माझ्या हृदी राहते

आहे रे तुझिया पदी विनवणी मी प्रार्थितोची मुखे

द्यावी या शरणागतास मजला भिक्षा शिवा शंभु रे।।29.1

 

स्वर्गी देवही याचना करि तुझ्या देवा कृपादृष्टिची

तोची नेत्रकटाक्ष  लाभुनि मिळो साफल्य या जीवनी

हे विश्वेश जगद्गुरू मम मना बोधामृते तोषवा

चित्ता सौख्य मिळेल अक्षय अशा ज्ञानामृता दिव्य द्या।।29.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 30 -

हे विश्वरूपा, हे व्योमकेशा,

            आपले हे विश्वरूप पाहून मी गांगरून गेलो आहे. बावरून गेलो आहे. माझी क्षुद्रता, तुझी पूजा-अर्चना करण्यासाठी माझी असहाय्यता मला विशेष करून जाणवत आहे. हे प्रभो, हे सर्व अंतरिक्ष हेच आपले वस्त्र असतांना मी ते स्वच्छ कसे करणार? मी काही हजारो हात असलेला कार्तवीर्य नाही किंवा हजारो हजारो किरण लाभलेला सूर्यही नाही. मी अत्यंत तुच्छ क्षुद्र आहे.

               बरे आपल्याला फुले वहावीत म्हणावे तर माझे कर्तृत्त्व विष्णूसारखे नाही. श्रीविष्णूने  आपल्याला 1000 कमळे अर्पण करायचे ठरवले. त्याला एक कमळ कमी पडत आहे असे लक्षात आल्यावर त्याने बाणाच्या टोकाने स्वतःचा एक डोळाच काढून  त्या कमळाच्या जागी अर्पण केला. 

               आपल्या अंगाला उटी लावावी म्हणावे तर मला गंधवाही वाराच व्हायला लागेल. ते मी कसे बरे होणार? हे गंगाधरा आपल्या मस्तकावर गंधाक्षता लावणं ही सोपी वाटणारी गोष्टही मी करू शकत नाही. आपल्या ह्या विश्वात्मक रूपाची पूजा करायला दुसरे विश्वात्मक रूपच अवतरले पाहिजे. त्यासाठी भगवान विष्णूच पाहिजेत (आपण दोघे एकरूप आहात.) हे काम मला असाध्य आहे.

             मी आपल्याला नैवेद्य सुद्धा  देऊ शकत नाही. कारण एवढा नैवेद्य शिजविण्यासाठी मला स्वतःलाच अग्नीस्वरूप व्हावं लागेल. आणि वढा नैवेद्य अर्पण करायला सोन्याचे पात्र मी कुठून आणि कसे आणू? त्यासाठी मला हिरण्यगर्भच व्हावे लागेल.

               हे चंद्रमौळी हे कुठलच काम करणं, काही काही मला शक्य नाही. मी आपला अत्यंत सामान्य असा दास आहे. आपली सेवा कशी करावी हे मला काहीच उमगत नाही. प्रभो आपण मला क्षमा करा.  

 

वस्त्रोद्धूत-विधौ सहस्र-करता पुष्पार्चने विष्णुता

गन्धे गन्धवहात्मताऽन्नपचने बर्हिर्मुखाध्यक्षता।

पात्रे काञ्चन-गर्भतास्ति मयि चेद्बालेन्दुचूडामणे

शूश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिंस्रिलोकीगुरो।।30

 

(सहस्रकरता- हजारो हातांची किंवा हजारो किरणे जे काम करू शकतील अशी क्षमता जी सहस्रार्जुन किंवा सूर्य याच्याकडे आहे । गंधवहात्मता – गंध सर्वत्र वाहून नेण्याची क्षमता. विश्वरूप शिवाला गंध किंवा उटी लावण्यासाठी सर्वत्र संचार करणारा वारा किंवा विश्वात कुठेही असणारा वासुदेवच या कामास योग्य आहे ।  बर्हिमुखाध्यक्षता – देवांचा अध्यक्ष असलेला बर्हि म्हणजे अग्निस्वरूपता । )

 

शंभो वस्रचि अंतरिक्ष तव हे कैसे करू स्वच्छ मी

नाही मी प्रभु कार्तवीर्य अथवा नाही सहस्रांशु मी।

विश्वा व्यापुनि तू उरे तुजसि मी वाहू सुपुष्पे कशी

ना मी विष्णुच सर्वव्यापक असा  व्यापे जगा सर्वही।।30.1

 

शंभो भव्यचि मस्तकी तव कशा गंधाक्षता लावु मी

हे गंगाधर! वासुदेव नच मी तो सर्वगामी हरी।

लावाया तुजसी उटी पवन ना तो गंधवाहीच मी

नाही अग्निच मी, कसा करु तुझ्यासाठी स्वयंपाकची।।30.2

 

आणू कोठुनि स्वर्णपात्र प्रभु मी नैवेद्य अर्पावया

हे विश्वेश! हिरण्यगर्भ नच मी; सामान्य मी दास हा

चंद्राची सुकुमार कोर विलसे शंभो तुझ्या मस्तकी

हे विश्वेश जगद्गुरू करु कशी सेवा तुझी अज्ञ मी।।30.3

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक  - 31

हे नीलकंठा,

                      आपण अत्यंत दयाळू आहात रंजल्या गांजलेल्यांवर दया करणे हा आपला स्वभाव आहे. समुद्रमंथनाच्यावेळी  समुद्रातून जेंव्हा जीवघेणे हालाहल बाहेर आले तेंव्हा देव आणि दैत्य यांना पळता भुई थोडी झाली. अशावेळी हे पशुपते सर्व प्राणीमात्रांचं रक्षण करण्याच्या हेतूने आपण त्या कालकूटाचं सेवन केलं. आणि ते विष आपल्या कंठात कायमचं रोधून ठेवलं. आपण ते कालकूट गिळलं असतं तर आपल्या पोटात सामावलेल्या ब्रह्माण्डाचा नाश झाला असता आणि बाहेर उलटून टाकलं असतं तर देव लोक नाश पावला असता. हे लक्षात घेऊन आपण ते जहर कायमचं आपल्या कंठात ठेवून दिलं आहे. त्या प्रचंड पीडेने हे कंठनीला आपला कंठ जळून काळानीळा झाला तरी आपण आपला संयम सोडला नाही.

                                      हे मी एवढ्यासाठीच सांगत आहे की, हे पशुपते आपण सर्व प्राणीमात्रांवर निःसीम प्रेम करता हे मला ठाऊक आहे. मी आपला अत्यंत हीन दीन असा सेवक आपल्याला शरण आल्यावर माझा आव्हेर करू नका. आपण दीनबंधू आहात. मला आपण आश्रय द्या.

 

नालं वा परमोपकारकमिदं त्वेकं पशूनां पते

पश्यन्कुक्षि-गतांश्चराचरगणान्बाह्यस्थितान्रक्षितुम्।

सर्वामर्त्यपलायनौषधमतिज्वालाकरं भीकरं

निक्षिप्तं गरलं गले न गलितं नोद्गीर्णमेव त्वया।।31

 

केली पुष्कळ मी कृपा तुजवरी आता न होणे कृपा! '

ऐसे  तू झिडकारि ना मज शिवा शंभो कृपासागरा

जेंव्हा सागरमंथनी गरल ते आले वरी भीषण

सारे दानव, देव ही पळुनि ते गेले भये सत्वर।।31.1

 

तेंव्हा प्राशुन ते असह्य विष तू,कंठी असे रोधिले

नाही तू गिळले,म्हणून उदरी ब्रह्मांड राही सुखे

ना यत्किंचित त्यास वा उगळिले बाहेर ओठातुनी

देवादि गण रक्षिले भयद त्या हालाहलापासुनी।।31.2

 

ऐसे प्रेम तुझे अलौकिक असे निःसीम सर्वांवरी

सारे हे जग जाणिते तव कृपा आधार तू एकची

सांगा हो  मग दीनबंधु मजला लोटाल दूरी कसे

गेले रंजुनि गांजुनी जन तया तूचि म्हणे आपुले।।31.3

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 32 -

             शिव शंकराच्या दोन महान गुणांवर ह्या श्लोकात श्री आद्य शंकराचार्यांनी प्रकाश टाकला आहे. ते आहेत, धैर्य आणि माधुर्य. ज्याच्या जवळ धैर्य असते त्याच्याचपाशी माधुर्य राहते. केवढ्या विदारक परिस्थितीला मनाचा तोल ढळू न देता तोंड दिले आहे हे पाहिल्यावरच धैर्य किती टोकाचे आहे ह्याचा अंदाज येतो. समुद्रमंथनातून जोवर उत्तमोत्तम गोष्टी बाहेर येत होत्या तोवर कोणाला महान अशा महादेवांची आठवण झाली नाही. पण जेंव्हा महाभयंकर असे कालकूट विष बाहेर येऊ लागले तेंव्हा त्याच्या विषारी वाफांनीच राक्षस आणि देव पळत सुटले. महादेवांची करुणा भाकू  लागले.

                 अशा महा भयानक परिस्थितीशी सामना करण्यासाठी  कल्याणाचे प्रतिक असलेले शिवशांतमूर्ती  पुढे आले. स्वतः अत्यंतिक पीडा सहन करून त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. त्यांचे ते अजोड धैर्य, अविचलपणा आणि चेहर्‍यावर टिकून असलेलं माधुर्य पाहून जगद्गुरू शंकराचार्य ह्या विश्वनाथाला विचारतात-

हे कंठनीला,

ज्वालोग्रः सकलामराति-भयदः क्ष्वेलः कथं वा त्वया

दृष्टः किं च करे धृतः करतले किं पक्व-जम्बूफलम्।

जिव्हायां निहितश्च सिद्ध-घुटिका वा कण्ठदेशे भृतः

किं ते नीलमणिर्विभूषणमयं शम्भो महात्मन्वद।।32

 

पाहूनी जहरी भयाण विष ते वाफाळते दारुण

देवांना भरली उरीच धडकी त्यांची उडे गाळण

ज्वालांचे बघुनी तयावर महा थैमान ते भीषण

दृष्टिक्षेपहि टाकण्यासि नव्हते कोणाकडे धाडस।।32.1

 

त्याची उग्र हलाहला निरखिले ठेऊनि तुम्ही करी

होते जांभुळ का? रसाळ पिकले? सांगा मला हो तुम्ही

होते औषध का ?गुटीच कुठली?संजीवनी औषधी?

की ठेवी रसनेवरीच सहजी नाही द्विधा अंतरी।।32.2

 

कंठी धारण तू करी गरल ते शांती ढळे ना तुझी

कंठा नीलम-रत्नमंडित तुम्हा का वाटतो हारची?

सांगा हे कसलेचि धाडस प्रभो नाही कुणी पाहिले

देऊ काय तुला विशेषण शिवा? तू तारिले विश्व हे !।।32.3

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

  श्लोक 33  -

हे परमात्मरूपा परेशा,

                मुक्ती म्हणजे काय? मुक्तीचा अर्थ, जर ह्या संकटांनी भरलेल्या, दुःखमय संसारसागरातून तरून जाणे एवढाच असेल तर मुक्ती मिळवण्यासाठी जे संकटं आणि दुःख पाहून स्वतःच घाबरून गेले त्या देवांना मी शरण कशासाठी जाऊ? जे सन्मार्गावर चालतांना स्वतःच डळमळायला लागले ते मला काय मुक्ती देणार आहेत?  आणि अशी जर का मनात येईल तेंव्हा, मनात येईल त्याला, केंव्हाही, कधीही, मुक्ती मिळत असती तर हे सारे देवगण आपल्या पावलांवर शरण कशाला आले असते?

            हे सर्व देवगण आपल्याला जर देवांचे देव महादेव, महेश्वर ह्या नावाने संबोधत असतील तर त्यामागे आपले थोरपण आहे. महासंकटातही आपली न ढळणारी असामान्य शांतवृत्ती, धैर्य, पराक्रम आहे. म्हणून हे महेश्वरा मी आपल्या पावलांवर शरण आलो आहे.

 

नालं वा सकृदेव देव भवतः सेवा नतिर्वा नुतिः

पूजा वा स्मरणं कथा-श्रवणमप्यालोकनं मादृशाम्

स्वामिन्नस्थिर-देवतानुसरणायासेन किं लभ्यते

का वा मुक्तिरितः कुतो भवति चेत्किं प्रार्थनीयं तदा।।33

 

देवा सांग मला तुला शरण मी आलो जरी एकदा

केले पूजन वा प्रणाम स्तुति वा घेता मुखे नाम वा

केले एकचि वार दर्शन तुझे वा ऐकली मी कथा

व्हाया साध्य मनोरथा हृदयिच्या नाही पुरे हेचि का।।33.1

 

बाकी देवगणांस मी शरण का जावे उगी ना कळे

  सन्मार्गावर देव जो डळमळे देणार तो काय रे

शंभो तू म्हणशील मुक्ति मजसी देतील हे देव रे

सांगा हो मज मुक्ति मुक्ति म्हणजे आहे तरी काय ते।।33.2

 

दुःखाच्या भवसागरात तरणे व्याख्या जरी मुक्तिची

स्वस्थानावरुनीच जे ढळति ते देतील मुक्ती कशी

ऐसी मुक्ति इथे-तिथे जरि मिळे पैशास रे पायली

शंभो सांग मला कशास सगळे येती तुझ्या पावली।।33.3

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 34 -

हे मृत्युंजया,

ज्यांनी अनंतकाळ तपःश्चर्या केली आहे, असे भले भले ऋषी, मुनी, देवही एखाद्या महान संकटाला पाहून घाबरून जातात. प्रलयाचं आक्राळ विक्राळ रूप पाहून देवांचंही धैर्य गळून पडतं. अशा वेळेला आपण मात्र आत्मस्थितीत, ब्रह्मानंदात मग्न असता. सुख दुःख ह्या दोन्हीलाही आपण एकरूप पाहता. त्यामुळे हर्षाने उचंबळून येणे वा दुःखाने हादरून जाणे दोन्हीही आपल्याठायी संभवत नाही. आपल्या मनाची ही निर्विकार स्थिती पाहून हे धुरंधरा, आपल्या धैर्याचं वर्णन मी पामराने काय करावं? आपण महान आहात. मी अत्यंत नम्रपणे आपल्या चरणांवर विनीत होतो.



किं ब्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भव-

द्धैर्यं चेदृशमात्मनः स्थितिरियं चान्यैः कथं लभ्यते।

भ्रश्यद्देवगणं त्रसन्मुनिगणं नश्यत्प्रपञ्चं लयं

पश्यन्निर्भय एक एव विहरत्यानन्दसान्द्रो भवान् ।।34

 

धैर्यासी तव काय वर्णु शिव हे थारा भया ना जरा

राहे आत्मस्थितीत तू सहजची नाही सुखा पार या

ऐसे धैर्यचि,निर्विकार स्थिति ही लाभे कुणाला कशी

आहे देवगणांसही पतन रे होतीच ते नष्ट ही।।34.1

 

होती हे भयग्रस्त त्रस्त ऋषिही जाता लया धैर्यची

जाई विश्वप्रपंच पूर्ण विलया उत्पात होती जगी
सारे विश्व विनष्ट होत बघुनी शांती न भंगे तुझी

आनंदात निमग्न तू विलसती आनंद उर्मी हृदी॥.34.2

--------------------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

श्लोक 35 -

हे योगीश्वर,

                आपण आपल्या भक्तगणांच्या योगक्षेमाची चिंता वाहाण्यास समर्थ आहात. योग म्हणजे सर्व भक्तगणांच्या हिताचे, म्हणजेच जे काही इष्ट आहे, अशा अप्राप्त वस्तू आपण त्यांना मिळवून देता. आणि क्षेम म्हणजे त्यांच्या प्राप्त अशा कल्याणकारी वस्तूंचे आपण सतत संरक्षण करता. अशा प्रकारे आपण सतत भक्ताच्या योगक्षेमाचे रक्षण करता. आपण कल्याणकारी दृश्य/दृष्ट फळे जशी भक्ताला प्राप्त करून देता त्याप्रमाणे अदृष्ट फळ म्हणजेच मुक्तीचाही आपल्या भक्तांना उपदेश देता. आपण अशा दृष्टादृष्ट फळांचा अनुभव भक्ताला देता.

      हे दयाळा,    

                    आपण सर्व विश्वाला आंतर्बाह्य व्यापले आहे. त्यामुळे आपल्याला माहित नाही असे काहीही नाही. आपण सर्व काही जाणताच. आणि त्याच न्यायाने तुम्ही सतत माझ्या अंतरंगाला व्यापून आहात. माझ्या मनात आपल्या चिंतनाशिवाय बाकी काहीही नाही हेही आपण जाणता. माझे अंतरंग व्यापणार्‍या हे प्रभो मलाही आपण आपले अंतरंग मानावे. एवढीच कृपा माझ्यावर करा.

 

योगक्षेम-धुरंधरस्य सकल-श्रेय-प्रदोद्योगिनो

दृष्टादृष्ट-मतोपदेश-कृतिनो बाह्यान्तर-व्यापिन:।

सर्वज्ञस्य दयाकरस्य भवत: किं वेदितव्यं मया

शम्भो त्वं परमान्तरङ्ग इति मे चित्ते स्मराम्यन्वहम्।।35

 

( योग – भक्तांना इष्ट गोष्टींचा लाभ करून देणे। क्षेम – प्राप्त वस्तूंचे रक्षण करणे। धुरंधर – समर्थ । दृष्टफळ – भुक्ति अदृष्ट फळ – मुक्ति। )

 

देसी भक्तगणांस इष्ट सगळे त्यांच्या करी रक्षणा

ऐसा एक समर्थ तू जगति या कल्याणकारी शिवा

भक्तांचे हित साधणेचि अवघे हा धर्म आहे तुझा

देसी भुक्ति तशीच मुक्ति सहजी सन्मार्ग सांगी सदा।।35.1

 

अंतर्बाह्यचि व्यापिले सकल या विश्वास शंभो तुम्ही

सांभाळी जगता तुझीच ममता शंभो कृपावारिधी

सांगावे तुजसीच काय प्रभु मी सर्वज्ञ तूची असे

आहे तू मम अंतरंग अवघे चित्ती तुला मी स्मरे।।35.2

--------------------------------------------------------------


शिवानन्दलहरी

  श्लोक 36 -

                   नवीन घरात नव्याने रहायला येण्यापूर्वी त्या घराची वास्तुशांत करतात. हे महेश्वरा, आपण माझ्या देहरूपी प्रासादात कायमच्या वास्तव्यासाठी यावे ह्यासाठी मी वास्तुशांतीचे पुण्याहवाचन सुरू केले आहे. माझ्या प्रसन्न अंतःकरणाचा अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ कलश मी प्रेमाच्या जलाने पूर्ण भरला आहे. त्यावर भक्तीचे सूत्र /सूत गुंडाळले आहे. आपले कोवळे पादपल्लव मी त्यात घातले आहेत. त्यावर सद्बुद्धीचे श्रीफळ/ नारळ त्यावर ठेवले आहे. ह्या शरीररूपी गृहाची शुद्धी होण्यासाठी मी सत्त्वगुणाचे मंत्र माझ्या वाणीने धीरगंभीरपणे म्हणत आहे आणि मोठ्या थाटात पुण्याहवाचनाला सुरवात करत आहे. आता अत्यंत शुद्ध, पवित्र झालेल्या माझ्या देहरूपी वास्तूत आपण चिरंतन आनंदाने रहायला यावे.

 

भक्तो भक्तिगुणावृते मुदमृतापूर्णे प्रसन्ने मनः-

कुम्भे साम्ब तवाङ्घ्रि-पल्लवयुगं संस्थाप्य संवित्फलम्!

सत्त्वं मन्त्रमुदीरयन्निज-शरीरागार-शुद्धिं वह-

न्पुण्याहं प्रकटीकरोमि रुचिरं कल्याणमापादयन्।।36

 

वास्तव्यास करी निरंतर शिवा देहाचिया मंदिरी

केले हे बघ वास्तुपूजन शिवा प्रेमे यथासांग मी

आहे स्वच्छ प्रसन्न निर्मळ असा माझा मनोकुंभ हा

आहे भक्तिरसामृतेचि भरला शंभो शिवा शंकरा।।36.1

 

भक्ती सूत्र तयावरी सविनये गुंडाळिले  शंभु मी

हेची कोमल पादपल्लव तुझे मी स्थापिले त्यातची

शंभो श्रीफळ बुद्धिचे रुचिर हे मी ठेविले त्यावरी

माझी सात्विकवृत्तिरूप म्हणतो ह्या पुण्य मंत्रास मी

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

श्लोक 37 -

हे वेदस्वरूपा देवाधिदेवा,

                जेंव्हा ह्या देवांनी आणि आपल्या भक्तजन समुदायानी आपण निर्माण केलेल्या ह्या असीम, अथांग वेदरूपी ज्ञानसागराचं मंथन करायचं ठरवलं, तेंव्हा त्यांच्या अत्यंत उत्साही मनांचीच रवी बनवली. आपल्या दृढ भक्तीच्या दोर्‍या त्यास जोडून मोठ्या उमेदीने हा वेदसागर मंथन करायला सुरवात केली. ह्या प्रसंगी वेदसागरातून सोम म्हणजे चंद्र किंवा शरीराला पोषक असा सोमरस  बाहेर आला. कल्पतरू, कामधेनु आणि चिंतामणी ही तीन कामना पूर्ण करणारी रत्ने बाहेर आली. (सुपर्ब सुरभी म्हणजे जिच्या दूध देण्याच्या ग्रंथी अत्यंत निरोगी चांगल्या आहेत असी कामधेनू) हे त्रैलोक्यराणा, शिव चंद्रमौळी, आपण तयार केलेल्या ह्या वेद सागराच्या पठण, मनन चिंतन रूपी मंथनातून प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. ह्याच सागरमंथनातून अक्षय लक्ष्मी प्राप्त होते. आपण निर्माण केलेल्या ह्या वेदसागरातून देव आणि भक्त त्यांची इच्छित फळे मिळवतात.

 

आम्नायाम्बुधिमादरेण सुमन:संघाः समुद्यन्मनो

मन्थानं दृढभक्ति-रज्जु-सहितं कृत्वा मथित्वा तत:।

सोमं कल्पतरुं सुपर्ब-सुरभिं चिन्तामणिं धीमतां

नित्यानन्द-सुधां निरन्तर-रमासौभाग्यमातन्वते।।37

 

 ( आम्नाय - पुण्यपरंपरा,वेद। सुमनसंघाः -  देवांचे समुदाय,भक्तजनसमुदाय । सुपर्ब -  चांगल्या ग्रंथींनी युक्त )

 

देवांचे समुदाय सात्विक महा हे भक्त श्रेष्ठीच वा

उत्साहा करती रवी ; अविचला भक्तीस रज्जू पहा

त्याने मंथन घोर तेचि करिती वेदार्णवाचे शिवा

शंभो आपण वेदसिंधु अवघा केलाचि निर्माण हा ।।37.1

 

 त्यातूनी प्रकटे सुधाकर अहा जो शांतवी सज्जना

भक्तांचे पुरवी अभीष्ट सगळे ही कल्पवल्ली शिवा

ज्ञानाची शमवी तहान सुरभीदे ज्ञानदुग्धामृता

भक्तांची मनकामना पुरवितो चिंतामणी सर्वदा।।37.2

 

नित्यानंद तयातूनी प्रकटला आहे सुधेच्यासमा

देई सौख्य मना निरंतर अती या बुद्धिजीवीजना

ज्ञानाते रममाण नित्य करते सौभाग्यलक्ष्मी रमा

वेदांचे करुनीच मंथन मिळे चित्ती सदानंद हा।।37.3

--------------------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

श्लोक 38 -

                 पूर्व दिशेला एखाद्या डोंगरामागून अमृत बरसवित प्रसन्न, शांत, निर्मळ पौर्णिमेच्या चंद्राचा उदय होतो. डोंगराआडून हळु हळु प्रकाशाची आभा फाकत होणारा चंद्रोदय, चंद्र वर आल्यावर पर्वतावर पडणारी त्याची किरणे हे दृश्यच मोठं विलोभनीय असतं. त्याला पाहून समुद्राला भरती येते. तर चंद्रविकासी कुमदिनी आनंदाने  विकसित होतात. डुलु लागतात. चंद्रासोबत सारे तारांगणही तो घेऊन येतो.

       त्याप्रमाणे भक्तांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा साठा जणु पर्वताकार होतो. आणि तोच पुण्याचल/पुण्यपर्वत जणु मनाच्या प्राचीवर डौलात उभा राहतो. पूर्वा ही जशी प्रकाशाची दिशा तशी मनाची पूर्वा ही ज्ञानाचा उदय होणारी आणि अज्ञानाचा अंधार दूर करणारी दिशा. त्याच मार्गावरून शिवरूपी पूर्णचंद्र हळु हळु मनाच्या कमलात उतरून येतो. मन कमलात ह्या शिवचंद्राचा उदय होताच आनंद सागराला तुफान भरती येते. सर्व गणांसहित आणि हातात चंचल मृग धरलेला (मनावर विजय मिळवून त्याला कायम आपल्या आधीन ठेवणारा) हा शिवचंद्र मनातील सारी किल्मिषं, अज्ञानाचा अंधार दूर करतो. भक्तांची मने प्रसन्न करतो. मनात शिव, आनंद लहरी उसळत राहतात.

 

 

प्राक्पुण्याचल-मार्ग-दर्शित-सुधा-मूर्तिः प्रसन्न: शिव:

सोम: सद्गण-सेवितो मृगधर: पूर्णस्तमो-मोचक:।

चेत:पुष्कर-लक्षितो भवति चेदानन्द-पाथोनिधि:

प्रागल्भ्येन विजृम्भते सुमनसां वृत्तिस्तदा जायते।।38

 

( प्राक् -  पूर्वी । पुण्याचल -  पुण्याचा पर्वत। पुष्करम् - नीलकमलशिवाचे विशेषण, शिवाच्या सात विशाल प्रभागांपैकी एक । पाथोनिधि समुद्र )

 

पुण्याई गतजन्मिची दृढ अती अत्युच्च मेरूसमा

दावी मार्ग प्रसन्न अमृतमयी ऐसा तुझ्या मूर्तिचा

पूर्वेच्या क्षितिजावरी उगवता पूर्णाकृती चंद्रमा

संगे घेउनि तारकागणचि हे हाती धरोनी मृगा।।- -

 

थारा ना उरतो तमास, किरणे ही स्पर्शिता पृथ्विला

प्रेमे सिंधु उचंबळे; कुमुदिनी उत्फुल्ल रात्रीस या

तैशी पाहुनि मूर्ति ही तव शिवा संगे गणांच्याच या

पाहोनी अतिरम्य कोर तुझिया माथ्यावरी उज्ज्वला।।- -

 

हाती चंचल तू मृगास धरिले हे रूप मोही मना

अज्ञाना हरुनी प्रकाशित करी या भक्तचित्तांस बा

मावेना हृदयीच मोद इतुका होई तुला पाहता

चित्ताच्या कमलात मूर्ति तव ही येता न तोटा सुखा।।38.3

--------------------------------------------------------------

शिवानन्दलहरी

 श्लोक 39 -

               मागचे काही श्लोक पाहता शिवतत्त्व प्राप्त करण्याच्या दिशेने भक्त जात असल्याचे लक्षात येईल. त्याने सदाचरण, भक्ती, नामस्मरण, ईश्वराविषयी प्रेम आत्मसात करून जणु काही देहाची वास्तु ह्या पुण्याहवाचनाने शुद्ध करून घेतली आहे. जन्मोजन्मीच्या प्रचंड सुकृताच्या जोरावरच त्याला अज्ञान दूर करणारी, ज्ञानरूपी प्रकाश पसरवणारी पूर्व दिशा प्राप्त झाली. ह्या सुकृताच्या मार्गावरील पायघड्यांवरून चंद्रासमान शिव त्याच्या अंतःकरणात उदय पावले.  आणि त्याच्या हृदयकमलाच्या सिंहासनावर आरूढ झाले.

 आता 39 व्या श्लोकात आचार्य म्हणतात,

हे कैवल्यधामा शिवा,

                   मी धन्य झालो.  मी आपल्यासाठी सजवलेल्या माझ्या हृदयाच्या विशाल नगरीच्या  अत्यंत पवित्र अशा मन-कमलरूपी सिंहासनावर आपण आरूढ झाला. आता मला कसली चिंता? जिथे आपण तिथे पाप कसे असू शकेल? तिथे कुविचार आणि कुआचारांना स्थान तरी कसे मिळेल? त्यामुळे आता मोठ्या आत्मविश्वासाने निश्चितपणे मी सांगू शकेन की, माझी प्रत्येक कृती ही योग्य आणि धर्माधिष्ठितच आहे. माझं प्रत्येक वर्तन हे सद्वर्तनच आहे. माझा प्रत्येक विचार हा सद्विचारच आहेत. आणि मी योग्य सत्पथावरच चालत आहे. हे प्रभो आपण माझ्या हृदयसिंहासनावर विराजमान झाल्याने माझ्या मनातील क्रोध, मोह, हाव, लालसा सारे सारे शत्रू चित होऊन पळून गेले आहेत. आपण त्यांचा कधीच पराभव केला आहे.

             माझ्या मनाच्या प्रासादात ज्ञानानंद वेली ज्ञान आणि आनंदाच्या फुलांनी बहरून आली आहे. त्याच्या सुगंधाने माझे मन सतत प्रफुल्लित झाले आहे. न संपणार्‍या सौख्याची अनुभूती मी सतत घेत आहे. माझं मन आनंदाने काठोकाठ भरून गेलं आहे.

 

धर्मो मे चतुरङ्घ्रिकः सुचरितः पापं विनाशं गतं

काम-क्रोध-मदादयो विगलिताः कालाः सुखाविष्कृतः।

ज्ञानानन्द-महौषधिः सुफलिता कैवल्य-नाथे सदा

मान्ये मानस-पुण्डरीक-नगरे राजावतंसे स्थिते।।39

( अवतंस – आभूषण )

माझ्या हृत्कमलारुपी नगरिच्या या दिव्य सिंहासनी

होता तूचि विराजमान प्रभु रे मी धन्य या जीवनी

आता वर्तन धर्मपूर्ण मम हे मी सांगतो निश्चये

गेले पाप लया, गळून पडले क्रोधादि शत्रू सवे ।।39.1

 

मोदाचा क्षण ना सरे क्षणभरी; आनंद ओसंडतो

ज्ञानानंद लता सदैव फुलता मी डोलतो डोलतो

अंगोपांग कशी सुखे डवरली ही औषधी वल्लरी

सौख्याची अनुभूति ये नित मला कैवल्यधामा हृदी।।39

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 40 -

हे शंभो शंकरा,

              आपली चरित्ररूपी सरिता मोठी अद्भुत आहे. त्यातून अनेक आवर्तनं घेत खळाळत जाणारं जीवन मोठं विलोभनीय आहे. म्हणून हे विश्वेश्वरा, मी माझ्या बुद्धीचे रहाटगाडगे  बनवले आहे. ह्या विवेकरूपी रहाटगाडग्यावर माझ्या वाणीचे, अत्यंत कुशल शब्दांचे छोटे छोटे पोहरे (गाडगी) त्यावर लावले आहेत. माझे शब्दरूपी पोहरे आपल्या जीवनसरितेत आकंठ बुडून, शिगोशिग भरून वर येत आहेत. मी बांधलेल्या/रचलेल्या छोट्या मोठ्या कवितारूपी पाटांमधून ह्या शब्दाशब्दांतून भरून आलेले आपल्या चरित्रसरितेचे जल माझ्या अंतःकरण रूपी वाफ्यांमधे मी खेळवले आहे. त्यामुळे अंतःकरणात लावलेली भक्तीच्या भाताची रोपं तरारून वर आली आहेत आणि तुर्‍यांनी  बहरली आहेत. इतकं अलोट साफल्याचं पीक आल्यावर आता मला दुष्काळाचं भय ते कसलं? भक्ती आणि भक्तीमुळे येणारे साफल्य ह्यामुळे मी तृप्त निश्चिंत आहे. मी आपल्या चिंतनात मग्न आहे.

 

 

धीयत्रेण वचो-घटेन कविता-कुल्योपकुल्या-क्रमै-

रानीतैश्च सदाशिवस्य चरिताम्भोराशि-दिव्यामृतैः।

हृत्केदारयुताश्च भक्तिकलमाः साफल्यमातन्वते

दुर्भिक्षान्मम सेवकस्य भगवन्विश्वेश भीतिः कुतः।।40

 

( कलम - मे जून मधे लावलेला तांदूळ जो डिसेंबर जानेवारीत तयार होतो। केदार -  पाण्याने भरलेले शेत । कुल्य- छोटी नदी ,पाट )

 

बुद्धिरूप रहाटयंत्र मम हे; मी त्यावरी बांधिले

शब्दांचे मम वाणिचे चिमुकले गंगाधरा पोहरे

शंभो दिव्य तुझ्या चरित्र-सरिते मध्येच ओथंबुनी

शब्दांचे घट सर्वथैव भरले दिव्यामृते पूर्णची।।40.1

 

त्याची दिव्य जलास स्तोत्र कविता ह्यांच्याच पाटातुनी

माझ्या चित्त मळ्यात मी फिरविता ही आर्द्र झाली भुई

वोळंबे करुनी सरी निगुतिने वाफ्यांस त्या सिंचता

भक्तीचा फुलला मळा मम हृदी ओंब्या डुलु लागल्या।।40.2

 

भक्तीचे बघुनीच पीक हृदयी हा जीव आनंदला

झाला सर्व सुकाळ तो मम हृदी दुष्काळ तो संपला

हे विश्वंभर सेवकास तव या भीती कशाची मनी

झालो मी कृतकृत्य निर्भय हृदी साफल्य ये जीवनी।।40.3

--------------------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

श्लोक 41 -

हे मृत्युंजया,

हा संसारसागर फार दुस्तर आहे. त्यातून आपल्या सहाय्याविना तरून जाणे फार कठीण आहे. हे लोकनायका, आपली कृपा हेच माझे ऐश्वर्य आहे. आपणच माझ्याशी अबोला धरला तर मी कुठे जाणार? आपण समाधिस्थ होऊन असे मौन धरून राहू नका. आपण माझ्याशी बोला. माझ्या सर्व इंद्रियांना आपल्याला मिळविण्याची, आपल्याला प्राप्त करून घेण्याची उत्कंठा लागली आहे. ती मला सारखी आदेश मागत आहेत. माझी रसाना आपली सुंदर स्तोत्रे गाण्यासाठी अधीर झाली आहे. माझे मन आपल्या ध्यानात तल्लीन होण्यासाठी आतुर आहे. माझे पाय आपल्या प्रदक्षिणेसाठी उतावीळ झाले आहेत. माझे हात आपल्या पूजनासाठी मला वारंवार आज्ञा मागत आहेत. माझी दृष्टी कंठनीलाला पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. कान शिवचरित्र ऐकायला मिळावे म्हणून अस्वस्थ झाले आहेत. माझे मस्तक आपल्या चरणी झुकण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही. हे प्रभो मी माझ्या सर्व अवयवांना आपल्या सेवेसी हजर केले आहे. आणि माझे हे सर्व अवयव अत्यंत तत्परतेने आपली सेवा करत आहेत. आता आपण मला दर्शन द्या.

 

पापोत्पात-विमोचनाय रुचिरैश्वर्याय मृत्युंजय

स्तोत्र-ध्यान-नति-प्रदक्षिण-सपर्या-लोकनाकर्णने।

जिह्वा-चित्त-शिरोऽङ्घ्रि-हस्त-नयन-श्रोत्रैरहं प्रार्थितो

मामाज्ञापय तन्निरूपय मुहुर्मामेव मा मेऽवचः।।41

 

आपत्तीतुन घोर याचि सुटण्या ऐश्वर्यप्राप्तीसही

द्या आदेश विनाविलंब मजला ही इंद्रिये सांगती

स्तोत्रे सुंदर गावयासि रसना आज्ञाचि मागे मला

द्या संकेत मला म्हणेचि मन हे ध्यानास शंभूचिया।।41.1

 

विश्वेशा-चरणी प्रणाम करण्या आदेश द्या मस्तका

द्यावा शंभु प्रदक्षिणाचि करण्या निर्देश या पावला

पूजाया गिरिजेश्वरा कर म्हणे द्यावी अनुज्ञा मला

दृष्टी ही म्हणते मलाचि बघु द्या त्या कंठनीळा सदा।।41.2

 

कानांनी मज प्रार्थिले शिवचरित्रा ऐकु द्या हो मला

सेवेसी तव लाविले अवयवा प्राप्ती तुझी व्हावया

पाही रे वरचेवरी मज शिवा प्रेमे सदा वत्सला

शंभो मौन बरे नव्हे मजसवे सोडी अबोला तुझा।।41.3

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 42 -

हे भिल्लराज गिरीशा,

आपण `दुर्गातिप्रिय आहात. `दुर्गातिप्रियचे दोन अर्थ होतात.  शिवाला दुर्गा म्हणजे भवानी म्हणजेच पार्वती अत्यंत प्रिय आहे. शिवाला गिरीश म्हणतात. सर्व गिरींचा म्हणजेच पर्वतांचा ईश. सर्व पर्वतीय भागातील लोकांचा मुख्य. पार्वती ही पर्वत कन्या असल्याने गिरीश असलेल्या शिवाला प्रिय आहे. त्याच प्रमाणे गिरीश  म्हणजे डोंगर दर्‍यांत राहणार्‍या भिल्लाचे प्रमुख. भिल्लांचे प्रमुख असल्याने शिवाला सुरक्षित,उत्तम किल्ल्यात राहायला आवडते. आणि म्हणुनच श्री शंकराचार्य म्हणतात,

              हे गिरीशा! हे गिरिजेश्वरा! मी माझ्या मनाचाच किल्ला /दुर्ग आपल्यासाठी बनविला आहे. माझ्या मनाचे गांभीर्य, अत्यंत गहनता हा त्या मनदुर्गाभोवती खणलेला खोल खंदक आहे. माझ्या मनात उथळपणाला कोठेच वाव नाही. धृति म्हणजे धैर्य. घनधृति म्हणजे अत्यंत पक्के, कठोर धैर्य  ही ह्या मनोरूपी किल्ल्याची अभेद्य तटबंदी आहे. मला कायम सद्गुणी मित्रांचा भक्कम पाठिंबा आहे. हे माझं आप्तबल दुसर तिसरं काही नसून माझ्या मनात स्फुरण पावणार्‍या सद्गुणांचा समुह आहे. यम-नियमांचं कठोर पालन केल्याने माझी सर्व इंद्रिये अत्यंत सुदृढ आहेत. ती बलशाली इंद्रियेच ह्या मनदुर्गाचे दरवाजे आहेत. मी मिळवलेल्या अनेक विद्या म्हणजे किल्ल्याच्या रोजच्या व्यवहारासाठी लागणारी सर्व सामुग्री आहे. ते अन्न धान्य असो वा शस्त्रसामुग्री वा दारुगोळा सर्व ह्या विद्यांच्या रूपानी माझ्या मनाचे कोठार परिपूर्ण भरले आहे.

         हे दुर्गातिप्रिय देवा आपल्याला राहण्यासाठी माझा मनोदुर्ग अत्यंत सुरक्षित, योग्य जागा आहे. आपण कृपा करून कायमचे येथे वास्तव्य करावे.

 

गाम्भीर्यं परिखापदं घनधृतिः प्राकार उद्यद्गुण-

स्तोमश्चाप्तबलं घनेन्द्रियचयो द्वाराणि देहे स्थितः ।

विद्यावस्तुसमृद्धिरित्यखिलसामग्रीसमेते सदा-

दुर्गातिप्रियदेव मामकमनो-दुर्गे निवासं कुरु।।42

 

 (गाम्भिर्यम्- अगाधता, खोली। परिखा – किल्याच्या चारी बाजूला बनविलेला खंदक। कमन- सुंदर, मनोहर )

 

  दुर्गातिप्रियदेव! सज्ज करुनी या चित्तदुर्गास मी

देतो आज निमंत्रणास प्रभु हो, येथे रहावे तुम्ही

चित्ताचीच अगाधता हृदयिची गंभीरता खोल ही

हेची खंदक रक्षिती प्रबळ ह्या माझ्या सुदुर्गाप्रति।।42.1

 

 धैर्याचा करुनी अभेद्य तट मी राखीच रात्रंदिनी

सारे सद्गुण मित्रसैन्य अवघे राहे उभे सज्जची

आहे भक्कम द्वार पुष्ट सबला या इंद्रियांचे अती

विद्या ही उपयुक्त वस्तु सगळ्या ' दुर्गास ज्या लागती।।42.2

 

यावे चित्तगडात वस्ति करण्या दुर्गाप्रिया आजची

या हो या गिरिजेश्वरा त्वरित या दुर्गात माझ्या तुम्ही।।42.3

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 43 –

भिल्ल किंवा किरात लोक रानात राहतात. तेथेच विविध प्राण्यांची शिकार करतात. प्रत्येकाच्या अंतसमयी श्री महादेव सर्वच भूतांचे प्राण हरण करतात म्हणून त्यांना भिल्लांचे भिल्ल, किरातांचे किरात म्हणजेच किरातांचे मुख्य म्हटले आहे. अर्जुन पाशुपतास्त्र मिळवायला हिमालयात गेला तेंव्हाही आदि किरात रूपात असलेल्या शिवशंकराची आणि त्याची गाठ पडली असे वर्णन आहे. त्यामुळे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात,

हे पशुपते, हे पार्वतीपते,

          आपण आदिकिरात आहात. आपण रानावनात उगाच भटकत का राहता? आपल्या योग्य असं जंगल मी जाणतो. आपण माझ्या देहातच वस्तीला या. माझ्या देहात मनोरूपी आरण्यात अज्ञानवृक्षांची घनदाट झाडी आहे. तेथे अत्यंत मदोन्मत्त असे काम, क्रोध, मोह, मत्सर असे एकाहून एक क्रूर आणि भयंकर हिंस्र पशू निवास करतात. ते माणसांना खाऊन टाकतात. आपण येथे कायमचा वास करून ह्या पशूंची शिकार करण्याचा आनंद घ्यावा. आपण माझ्या देह, मनात राहून कामक्रोधादिंना पूर्ण नष्ट करावे अशी मी आपल्याला विनंती करतो.

 

 मा गच्छ त्वमितस्ततो गिरिश भो मय्येव वासं कुरु

स्वामिन्नादिकिरात मामकमनःकान्तारसीमान्तरे।

वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्यमोहादय-

स्तान्हत्वा मृगया-विनोद-रुचिता-लाभं च सम्प्राप्यसि।।43

 

( कमन -  मनोहर,सुंदर । अकमन -  भीषण, )

 

स्वामी आदिकिरात! आपण रहा वस्तीस देहामधे

साधाया मृगया तुम्ही न फिरणे येथे तिथे वा कुठे

देही या घनदाट जंगल असे माझ्या मनाचे उभे

येथे वावरतीच हिंस्त्र पशु हे मात्सर्य क्रोधादिचे।।43.1

 

आहे मोह महाभयंकरचि हा जो खातसे मानवा

मारूनी पशु हे भयंकर अती शंभो मला सोडवा

घ्यावा मोद इथे करून मृगया हे भिल्लराजा तुम्ही

ऐसे कानन ना मिळेल तुजसी हिंडून या भूवरी।।43.2

--------------------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

   श्लोक 44 –

 

       श्लोक 43 मधे आचार्य आदिकिरात रूपी शंकराला आपल्या देहाच्या घोर आरण्यात रहायला येण्यासाठी विनंती करत होते. आता श्लोक 44 मधे ते म्हणतात, हा `पंचानन म्हणजेच पाच मुखे असलेला शंकरभगवान माझ्या देहातल्या हृदयरूपी गुहेत वस्तीला आलेला आहे. आता मला भय कसलं? ह्या श्लोकातील वापरलेल्या विशेषणांचे दोन अर्थ होतात, जे सिंह आणि शंकर ह्या दोन्हींना सामायिक घेता येतात. सिंहाचे चार पंजे त्याच्या अक्राळविक्राळ दाढांप्रमाणे पशूला फाडून काढतात. म्हणून चार पंजे आणि त्याचा जबडा अशा पाच गोष्टी विदारण करतात म्हणून सिंहालाही पंचानन म्हणतात. दोघेही पर्वतावर गुहेत राहतात. शिव `चेतःकुहरे म्हणजे हृदयरूपी गुहेत तर सिंह पर्वतातील गुहेत राहतो. `विशदाकृती म्हणजे अत्यंत पवित्र, निर्मळ, लोभस मूर्ती असलेला शिव. सिंहाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कमनीय देह असलेला. `करलग्नमृग शिवाच्या बाबतीत ज्याने हातात चंचल मृग धरला आहे. तर शिकार करणार्‍या सिंहाच्या पंजात चपळ हरीण सापडलं आहे. `करीन्द्रभङ्ग’ - करी म्हणजे हत्ती. करीन्द्र म्हणजे हत्तींच्या कळपाचा मुख्य मोठा हत्ती. सिंह हत्तीचं गंडस्थळ फोडतो. तर शिवाने गजासूराला ठार मारलं. `घनशार्दूलविखण्डन’ – शार्दूल म्हणजे वाघ. मोठ्या वाघाला ठार मारणारा सिंह आणि शिव असे हेही विशेषण दोघांना लागू पडते. `अस्तजन्तु’ – म्हणजे जंगलातील सर्व श्वापदांना परास्त करणारा सिंह तसेच प्रलयकाळी शिव सर्व सृष्टीचा नाश करतो म्हणून तोही `अस्तजन्तु आहे.

                थोडक्यात सिंहासारखा पराक्रमी असा शिवपञ्चानन माझ्या हृदयात रहायला आल्यावर मला काम, क्रोध, मद, मत्सर अशा शक्तीशाली,हिंस्र वाघ, हत्तींचं भय कसलं? मी आता पूर्ण निर्भय झालो आहे.

        वृत्ताविषयी बोलायचं तर आत्तापर्यंत शिखरीणी, शार्दूलविक्रीडित अशी दोन वृत्ते वापरली होती, हे तिसरे वृत्त माल्यभारा अर्धसम वृत्त आहे. ज्याचे 1 आणि 3 तर 2 आणि 4 हे चरण/ओळी समान आहेत.

 

 (वृत्त – कालभारिणी/माल्यभारा/मालभारिणी अक्षरे -चरण1,3 – 11;   चरण 2,4-12

गण- चरण1,3 (स स ज ग ग ); चरण-2,4 (स भ र य))

 

करलग्नमृगः करीन्द्रभङ्गो-

घनशार्दूलविखण्डनोऽस्तजन्तुः।

गिरिशो विशदाकृतिश्च चेतः

कुहरे पञ्चमुखोऽस्ति मे कुतो भीः।।44

 

 ( करलग्नमृग -  ज्याच्या हातात मृग आहे असा शिव किंवा ज्याने मृग म्हणजे पशू पकडला आहे असा सिंह । करीन्द्रभङ्ग - हत्तीलाही ठार मारणारा अर्थात सिंह किंवा शिव । घनशार्दूलविखण्डन - बलिष्ठ वाघाला मारणारा अर्थात सिंह किंवा शिव । अस्तजन्तु -  ज्याच्या भीतीने जंगलात प्राणी वास्तव्य करीत नाही असा सिंह किंवा मनातील षड्रिपूंचा नाश करणारा शिव। गिरीश -  पर्वतावर वास्तव्य करणारा सिंह अथवा हिमालयाच्या पर्वतराजीवर राहणारा शिव। विशदाकृति - – उठावदार, पवित्र, निर्मल ।  पंचमुख – सिंह किंवा शिव कुहर - गुहा )

 

रिले सहजी मृगासि ज्याने

गज-गंडस्थल ज्या विदीर्ण केले

सहजी वधितो बलिष्ठ व्याघ्र

बलशाली पशु जो करी परास्त।।44.1

 

फिरतो गिरिकंदरीचि मुक्त

हृदयी निर्भय ना द्विधा कधीच

करि हिंस्रपशू-विहीन रान

प्रकटे मूर्ति मनोज्ञ शुद्ध स्पष्ट।।44.2

 

मम या हृदयाचिया गुहेत

शिव पंचास्यचि राहता सुखात

मजसी भय कोठुनी असेल

बनलो निर्भय शांतचित्त आज।।44.3

--------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

   श्लोक 45 –

                   शिवतत्त्वाचं ज्ञान हे वेदातून होतं म्हणून श्री शंकराचार्य म्हणतात ह्या वेदांच्या उंच उंच शाखांवर / फांद्यावर द्विज राहतात. (द्विजचा एक अर्थ पक्षी असा आहे. कारण पक्षी पहिल्यांदा अंडं ह्या स्वरूपात असतो. तो अंड्यातून बाहेर येतांना जणु त्याचा दुसरा जन्मच होतो. तर द्विजचा दुसरा अर्थ ज्यांनी ब्रह्मज्ञान संपादन केलं आहे असे ज्ञानी जणु काही त्यांचे अज्ञानी जीवन संपवून दुसरेच नवीन ज्ञानसम्पन्न जीवन मिळवतात. म्हणजे त्यांचा दुसरा जन्मच होतो. )

                 वेदांच्या ह्या उंच उंच डहाळ्यांवर शिवाच्या कोमल पावलांचे घरटे आहे. हे घरटे अत्यंत उबदार, सुखसोयींनी युक्त आहे. तेथे सर्व दुःख लयास जातात. येथेच गोड रसाळ फळे चाखता येतात. म्हणजेच शिवाच्या कोमल पावलांचं सान्निध्य मिळालं की शिव-सलोकता, शिव-समीपता, शिव-सरूपता, शिवसायुज्यता (म्हणजेच हळु हळु शिवमय होणे) ह्या चारी मोक्षांचे फळ लाभते. हे सदाशिव पावलांचे घरटे कायम ज्ञानप्रकाशाने उजळून गेले आहे.

                   म्हणून माझ्या मना, तू इकडे तिकडे व्यर्थ भटकणे सोडून दे आणि ह्या कमलाप्रमाणे कोमल असलेल्या शिवपावलांच्या घरट्याचा आश्रय घे. तेथे तू रमून जाशील.  जीवनातील सारी कृतार्थता तुला तेथेच लाभेल.

 

(वृत्त शार्दूलविक्रीडित, अक्षरे-19,गण म स ज स त त ग, यति -12,7 )

 

न्दः शाखि-शिखान्वितैर्द्विज-वरैः संसेविते शाश्वते

सौख्यापादिनि खेदभेदिनि सुधासारैः फलैर्दीपिते।

चेतःपक्षिशिखामणे त्यज वृथासञ्चारमन्यैरलं

नित्यं शंकर-पादपद्म-युगली-नीडे विहारं कुरु।।45

 

वेदांच्या घनदाटवृक्षशिखरी फांद्यांवरी उंच या

आहे हे उबदार एक घरटे शंभू-पदांचेचि या

आले येथ किती किती द्विज पहा शाखांवरी आश्रया

येथे गोड फळे रसाळ मिळती ही अमृताच्यासमा।।45.1

 

सौख्याचे फलभार हे लगडले दुःखा न जागा जरा

येथे आश्रय नित्य तो मिळतसे सा र्‍या मुमुक्षू जना

हे माझ्या मन पाखरा फिरु नको येथे तिथे तू वृथा

घेई या घरट्यात आश्रय; करी स्वच्छन्द क्रीडा मना।।45.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

श्लोक 46 -

       विवाह झाल्यावर आपल्या प्रिय नववधूला घेऊन एखाद्या रमणीय जागी विहार करावा, राजमहालात रहायला जावं असं कोणाला वाटणार नाही? म्हणूनच श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, `` हे माझ्या मनोरूपी राजहंसा तुला मनमुक्त विहार करायचा असेल तर तुझ्या भक्तीरूपी नववधूला घेऊन तू गिरिजेश्वराच्या कमलासारख्या कोमल पावलांच्या भव्य अशा राजमहालात विहार करायला जा. हा भव्य राजमहाल शिवाच्या अत्यंत उज्ज्वल हिर्‍याप्रमाणे चमकणार्‍या नखांच्या ओळींनी प्रकाशमान झाला आहे. उजळून निघाला आहे. जणु काही त्या प्रकाशातून अमृतच झिरपत आहे. शिवाच्या नखांचीही कांती इतकी सुंदर आहे की त्याच्या नखांची सर इतर कशाला येणे शक्य नाही. शिवप्रभुचे पाय तर इतके निर्मल, कोमल आहेत की असे वाटावे की लाल कमळेच फुलली असावीत. पद्मराग रत्नांप्रमाणे म्हणजेच माणिकांप्रमाणे प्रभुची पावले आरक्त आहेत. शिवाच्या ह्या चरणकमलरूपी भव्य प्रासादाचा निर्मळ मनाच्या, विशुद्ध बुद्धीच्या अनेक भक्तांनी, अनेक परमहंसांनी आश्रय घेतला आहे. हे माझ्या मानस-राजहंसा तूही येथे तुझ्या भक्तीरूपी नववधूला घेऊन येथे स्वच्छंद विहार कर.

 

आकीर्णे नख-राजि-कान्ति-विभवैरुद्यत्सुधा-वैभवै-

राधौतेऽपि च पद्मराग-ललिते हंस-व्रजैराश्रिते।

नित्यं भक्तिवधू-गणैश्च रहसि स्वेच्छा-विहारं कुरु

स्थित्वा मानसराजहंस गिरिजानाथाङ्घ्रि-सौधान्तरे।।46

 

( आकीर्ण - पसरणे,परिपूर्ण असणे,भरून जाणे। राजि - मालिका,ओळ,पंक्ति। पद्मराग – माणिक। राध् – राजी करणे, प्रसन्न करणे, )

 

माझ्या मानसराजहंस विहरी स्वच्छंद तू सर्वदा

प्रासादी शिव-पाद-पंकजरुपी अत्यंत या निर्मला

वाटे माणिक हे जणू जडविले शंभू-पदी आगळे

लाली या नखपंक्तिची उजळवी सारीच ही दालने।।46.1

 

तेजाने उजळून त्या झळकतो प्रासाद हा साजिरा

येई वा उदयास वैभव पुन्हा या अमृताचेचि का

होती लुब्ध तयावरी परमहंसाचे थवे हे सदा

प्रासादी मनमुक्त ते विहरती सीमा न त्यांच्या सुखा।।46.2

 

कांता भक्तिरुपीच घेउनि सवे ये राजहंसा मना

गौरीवल्लभ-पादपद्म-भवनी चंद्रप्रकाशा समा

एकान्तात करी विहार सखया लाटांवरी सौख्यदा

सौख्याचा भरला तुडुंब जलधी या पाउली शंभुच्या।।46.3

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

 श्लोक 47 -


         वसंतऋतु आला हे वेगळं सांगायला लागत नाही. झाडाला नवीन पालवी फुटते. फांद्याफां द्यांवर फुले बहरून येतात. आसमंतात सुगंधाची उधळण होते. कोकीळा गाऊ लागतात.

        माझ्या हृदयातही शिवशम्भुच्या ध्यानरूपी वसंताचं आगमन झालं आणि माझ्या मनाच्या नंदनवनात आनंदीआनंद झाला आहे.  सर्व मलीन अशा वासनांरूपी जुन्या पानांची पानगळ होऊन पुण्यकर्मांची, शुद्ध-निर्मल वासनांची कोवळी पालवी फुटली आहे. भक्तीरूपी लतांचे लसलसते अंकुर फुटले आहेत. सद्गुणांच्या कळ्या लागल्या आहेत. शिवनामावलीची फुले विकसीत झाली आहेत. ज्ञान, आनंद हा मकरंद त्यातून स्रवत आहे. परब्रह्माची प्राप्ती, शुद्ध बोधाची फळे हे ह्या वनाचं खरं वैभव आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयात भक्तीचा मळा फुलवून हा आनंद लुटावा.

शम्भुध्यान-वसंत-सङ्गिनि हृदारामेऽघ-जीर्ण-च्छदाः

स्रस्ता भक्ति-लता-च्छटा विलसिताः पुण्य-प्रवाल-श्रिताः।

दीप्यन्ते गुणकोरका जप-वचः-पुष्पाणि सद्वासना

ज्ञानानन्द-सुधा-मरन्द-लहरी संवित्फलाभ्युन्नतिः।।47

 

( सङ्गिन् -– अनुरक्त, स्नेहशील,संयुक्त,मिसळून गेलेले।  आराम -  बाग हृदाराम -  हृदयरूपी बाग,

अघ -  पापकोरकः/कोरकम् - कळी )

 

चित्ती ध्यासचि लागता निशिदिनी या पावलांचा शिवा

शंभु-ध्यान-वसंत स्पर्श घडता माझ्या मनाला जरा

चित्ताचे फुलले प्रमोदवन हे आलीच शोभा नवी

पाने जीर्ण मलीन सर्व झडली ही वासनांची जुनी।।47.1

 

झाल्या भक्ति-लताचि अंकुरित या त्यांना फुटे पालवी

तेजस्वी शुभ पुण्यदायक अशा सद्भावनांची नवी  

अंगोपांग कशा कळ्या बहरल्या नाना गुणांच्या तया

नामाची फुलती फुले अगणिता शंभो उमावल्लभा।।47.2

 

`इच्छा उत्तम, ज्ञान, मोद' - मध ह्या पुष्पांतुनी पाझरे

माधुर्यासचि अमृतासम असे गोडी फिकी ना पडे

आत्मज्ञान फळे रसाळ तयिची बोधामृते पूर्ण ही

हेची वैभव अद्वितीय अवघे बागेस या भूषवी।।47.3

 

--------------------------------------------------------------



शिवानन्दलहरी

   श्लोक 48 -

                  हे माझ्या मानसराजहंसा, ह्या शिवशुंभुच्या पावलांचं ध्यान, चिंतन जणु काही एकाद्या शांत, गहन, विस्तीर्ण सरोवराप्रमाणे आहे. नित्य अविनाशी आनंद रस हे जणु स्फटिकाप्रमाणे निर्मळ जल त्यात आहे.  तपःपूत अशा देव आणि मुनींची अंतःकरणे हीच येथील अत्यंत कोमल अशी कमळे आहेत. ह्या जलाशयातील अविनाशी आनंदरसावर ह्या टप्पोर्‍या कमल कलिका डुलत आहेत. ज्याप्रमाणे जलाशयापाशी सुंदर सुंदर दुर्मिळ पक्षी निवास करतात त्याप्रमाणे ह्या जलाशयाजवळ अत्यंत ज्ञानसम्पन्न द्विज निवास करतात.

                     हे माझ्या मानसराजहंसा, इतर कुठल्यातरी क्षुद्र गोष्टींच्या प्राप्तीसाठी कुठल्यातरी क्षुद्र देवदेवतांच्या आहारी जाऊन त्यांच्या चिंतनरूपी डबक्यात डुबक्या मारत चिखलात भरून जाण्यापेक्षा तू निष्काम बुद्धीने, कैवल्यमूर्ती सच्चिदानंदघन पार्वतीशाच्या चिंतनरूपी शांत, गहन, विस्तीर्ण सरोवराचा कायमचा आश्रय घे आणि तेथेच रहा. तेथेच आनंदाने विहार कर.

 

नित्यानन्द-रसालयं सुर-मुनि-स्वान्ताम्बुजाताश्रयं

स्वच्छं सद्विज-सेवितं कलुषहृत्सद्वासनाविष्कृतम्।

शम्भु-ध्यान-सरोवरं व्रज मनोहंसावतंस स्थिरं

किं क्षुद्राश्रय-पल्वल-भ्रमण-संजात-श्रमं प्राप्स्यसि।।48

 

 ( नित्यानंद-रसालयम् – अविनाशी आनंदाचा अनुभव हेच ज्यातील जल आहे  सद्विज -  सुंदर पक्षी किंवा सदाचार संपन्न तत्त्ववेत्ते ब्राह्मण स्वान्त -  मन  पल्वल -  डबके कलुष – मलीन )

 

शंभू चिंतन हे सरोवर असे आनंददायी महा

नित्यानंद रसे जलाशयचि हा राहे भरोनी पुरा

याची रम्य तळ्यात चित्तकमळे येती फुलोनी पहा

योग्यांची अति शुद्ध पावन अशी देवादिकांची सदा।।48.1

 

आहे हे स्फटिकासमा नितळची पाणी सुधेच्या समा

घेती आश्रय श्रेष्ठ हे द्विज इथे जाती कुठे अन्य ना

राही मानसराजहंस सखया येथेचि तू राजसा

शोधी ना डबकेचि क्षुद्र कुठले आराम तेथेचि ना।।48.2

--------------------------------------------------------------

 

शिवानन्दलहरी

 श्लोक 49 –

                 मी माझ्या हृदयात ``शिव-भक्ती’’ची अत्यंत सुकुमार अशी वेल मोठ्या आंनदाने लावली आहे. तिच्या संरक्षणासाठी तिच्या भोवती `गिरिजापतीचे चरणहेच आळे बनविले आहे. माझ्या मनात न मावणारा परमानंद हेच जणु काही अमृत मी त्या वेलीला पाणी म्हणून शिंपत आहे. त्यामुळे ही भक्तीवेल चांगली जोम धरू लागली आहे. फोफावत आहे. माझ्या मनाचे स्थैर्य, बळकटपणा हाच ह्या वेलीला चांगला भक्कम आधार मी दिला आहे. त्याच्याच आधाराने तरारून आलेल्या ह्या वेलीला असंख्य धुमारे फुटले आहेत. कितीतरी फांद्या फुटून ही वेल जोमदारपणे वाढत आहे. तिच्या श्रवण, कीर्तन ह्यांच्या शाखा, उपशाखा माझ्या अन्तःकरणाच्या मांडवावर पसरून त्यांनी या मन-मांडवाला पूर्ण आच्छादून टाकलं आहे. तिला मलिन वासनांची कुठलीही कीड लागलेली नाही. ती अत्यंत निरोगी टवटवीत आहे. माझ्या सत्कर्माचं खत घालून अत्यंत निगुतीने वाढवलेली ही वेल मला शंभुप्राप्तीची रुचिर, अभीष्ट फळे देत राहो.

 

 

आनन्दामृत-पूरिता हर-पदाम्भोजालवालोद्यता

स्थैर्योपघ्नमुपेत्य भक्ति-लतिका शाखोपशाखान्विता।

उच्चैर्मानसकायमानपटलीमाक्रम्य निष्कल्मषा

नित्याभीष्ट-फलप्रदा भवतु मे सत्कर्म-संवर्धिता।।49

 

 ( आलवालम् – आळे ।  मानसकायमानपटलीम् आक्रम्य – अन्तःतकरणरूपी मांडवावर चढून । निष्कल्मष – निर्दोष, निरोगी ।  अभीष्ट -  इच्छित ।  सत्कर्म-संवर्धिता-  सत्कर्माचे खत घालून वाढविलेली )

 

शंभो मी शिवभक्तिरूप लतिका प्रेमे हृदी लावली

केले मी `गिरिजापती- चरण ' हे आळे तिच्या भोवती

आनंदामृत शिंपिताचि तिजला आली नव्हाळी नवी

फांद्या या फुटल्या अनेक तिजला एकावरी एक ची।।49.1

 

स्थैर्याचा दृढ खांब जाय चढुनी ही भक्तिची वल्लरी

आच्छादे मन-मांडवास मम या फोफावली वेल ही

नाही कीड तिच्यावरीच कुठली दुर्वासनांची मुळी

मी सत्कर्म खतास घालुनि तिला जोपासिले पूर्णची।।49.2

 

ऐसी सुदृढ ही निरामय लता आली तरारून जी

देवो इच्छित नित्य सुंदर फळे शंभो तुझ्या प्राप्तिची।।49.3

--------------------------------------------------------------

 

 

शिवानन्दलहरी

 श्लोक 50 –

                       जे चैतन्य, जे देवत्व वा ब्रह्मतत्त्व एखाद्या सगुणसाकार छोट्याशा मूर्तीत, वा शिवलिंगात भरलेलं आहे तेच देवत्व, तेच चैतन्य आपल्या भोवती असलेल्या निसर्गातही भरलेलं आहे. आणि तेच देवत्व संपूर्ण ब्रह्मांडातही भरून राहिलं आहे. श्री आद्य शंकराचार्य जेंव्हा श्रीशैलावर गेले असतील तेंव्हा तेथील निसर्ग आणि तेथील शिवलिंग ह्यातील दिसून आलेले साधर्म्य त्यांनी ह्या श्लोकात सुंदर प्रकट केले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग आहे. लिंग ह्याचा अर्थ शिवाचे चिह्न, प्रतीक,प्रतिमा, देवमूर्ती. ---- जे  पार्वतीने आलिंगिले आहे. म्हणजेच येथेही शिवशक्ती हे एकरूपपणे वास करतात. रोज संध्यासमयी शिवपार्वतीच्या भव्य तांडव नृत्याला येथे प्रारंभ होतो.

            हेच भव्य नृत्य जणु निसर्गामधून प्रत्ययाला येते. श्रीशैलावर पांढर्‍याशुभ्र खोडाचे, सरळसोट बुंध्याचे विशाल अर्जुनवृक्ष उभे आहेत. त्यावर मल्लिकेच्या फुलांच्या वेली झाडाच्या शेंड्यांपर्यंत चढलेल्या आहेत. मल्लिकेला आपल्याकडे मालती जरी म्हणत असले तरी दक्षिण भारतात मल्लिकेची अत्यंत सुगंधी फुले ``मल्लिगे’’ ह्या नावाने ओळखली जातात आणि मुंबईत दादर फुल मार्केट वा माटुंगा येथे काही दिवस उपलब्ध असतात. श्रीशैलावर नैसर्गिकपणे उभे असलेले हे अर्जुनवृक्ष आणि त्याला शेंड्यांपर्यंत बिलगलेल्या सुगंधी मल्लिका पाहून त्यातही आचार्यांना शिवपार्वतीचे मोहक दर्शन झाले. पूर्वी एकेकाळी श्रीशैलावर अर्जुनवृक्ष आणि मालतींच्या तरुलतांनी घनदाट जंगल तयार झाले असावे जेथे ह्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची स्थापना केली असावी.

                संध्यासमयी सूर्य अस्ताला जात असतांना आकाशात पसरलेला लालिमा, सूर्य प्रकाशानी हळु हळु घेतलेली माघार, पूर्ण चंद्राचा क्षितिजावर होणारा उदय आणि त्यासोबत सर्व सृष्टीत झिरपणारा चांदीच्या रसासारखा शांत रुपेरी चंद्रप्रकाश ह्या पार्श्वभूमीवर अर्जुन वृक्षांची आणि मालतीची फुले उमलायला लागतात. दोन्ही झाडे फुलांनी फुलून जातात. संपूर्ण निसर्गात होणारा हा बदल म्हणजेच जणु काही शिव पार्वतीचे भव्य संध्या-तांडव. जणु काही मल्लिकार्जुनाचे शिवलिंग आसमंत भरून जाईल असे एक भव्य रूप धारण करते. (विजृम्भितं)

          शिवाच्या नृत्याला तांडव म्हणतात. तांडवाचेही संध्या तांडव, उमा तांडव, कलिकातांडव असे मोहक प्रकार आहेत. संहारतांडव हा फक्त भय उत्पन्न करणारा नृत्याविष्कार आहे. संध्यासमयी दिवस अस्तास जाता असतांना आणि रात्रीची चाहूल लागलेली असतांना त्या फुलांवर असंख्य भुंग्याच्या, किटकांच्या झुंडी गुणगुणत मध गोळा करत असतांना जणु काही असंख्य ऋषीमुनी श्री मल्लिकार्जुनाची स्तुतीस्तोत्रे गात आहेत असे वाटते. ह्या स्तुतीस्तोत्रांनी, मंत्रांच्या उद्घोषांनी श्रीशैलाचा सर्व परिसर धीर गंभीर अत्यंत निर्मल अशा वासनांनी (असकृत्) दाटून गेला आहे. मोठा विलोभनीय वाटत आहे. फुलांच्या सुगंधाने मोहित होऊन ह्या मल्लिकार्जुनावर नाग-सापांनीही वस्ती केली आहे. त्यामुळे सर्पालंकार घातलेल्या शिवाचीच जणु काही सर्व देव, महात्मे (सुमनस्) पूजा करत आहेत असे वाटते. अर्जुनवृक्ष आणि मल्लिका दोन्हीही तरु लता अत्यंत औषधी आहेत. तसेच शिव आणि पार्वती हेही अत्यंत गुणी आणि भक्तवत्सल आहेत. भक्तांना मदत करणारे आहेत. आयुष्याला कृतार्थ करणारे अनेक दैवी गुण ज्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत आहेत (गुणाविष्कृत) अशा, ह्या चित्ताचा ठाव घेणार्‍या मल्लिकार्जुनाची मी नित्य सेवा करत आहे.


सन्ध्यारम्भ-विजृम्भितं श्रुति-शिरः-स्थानान्तराधिष्ठितम्

सप्रेम-भ्रमराभिराममसकृत्सद्वासना-शोभितम्।

भोगीन्द्राभरणं समस्त-सुमनः-पूज्यं गुणाविष्कृतं

सेवे श्रीगिरि-मल्लिकार्जुन-महालिङ्गं शिवालिङ्गितम्।।50

 

 

 ( विजृम्भितम् – विकसितकळ्यांनी फुलून गेलेला किंवा तांडव करणारा । भोगिंद्र + आभरणम्  - सापांची भूषणे अंगावर असलेला । गुणाविष्कृतम् – आयुष्याला कृतार्थ करणार्‍या अनेक गुणांचा, दैवी संपत्तीचा आविष्कार ज्यातून होत आहे असे (मल्लिकार्जुन महालिंग) । शिवा -  पार्वती श्रीगिरीश्री शैल  ) 

 


श्री शैल्यावर वृक्ष अर्जुन उभा हा श्वेत उंचापुरा

त्यालाची बिलगून वेल चढली ही मल्लिकेची पहा

होता सांज, कळ्या कळ्या उमलती ह्या वृक्ष-वेलींवरी

शोभा पाहुन वाटते मम मनी जोडी उमा शंभुची।।50.1

 

येथे शंभु-उमा निवास करती ऐसे म्हणे वेदही

श्री शैलावर मल्लिकार्जुन महा संबोधती देवही

येथे तांडव शंभु तो करितसे अस्तास जाता रवी

आलिंगे गिरिजेश्वरास गिरिजा हे रूप मी आठवी।।50.2

 

ह्याची मालति-अर्जुनावर करी गुंजारवा भृंगही

का वा साधु महंत देव करती पूजा उमा-शंभुची

प्रेमे भक्तिरसात गर्क स्तविती गौरी-महेशा मुखी

जाई भारुन आसमंत  तिथला त्या पुण्य मंत्रातुनी।।50.3

 

ऐशा सात्त्विक भावना चहुकडे आंदोलती  त्या नभी

त्याने ते शिवलिंग अद्भुत दिसे स्वर्गीय शोभाच ती

जैसे अर्जुन मालती गुणकरी आहे महा औषधी

तैसे हे गुणवंत शंकर उमा आधार विश्वाप्रति।।50.4

 

होई भूषण नागराज चि महा हे कांचनी कांतिचे

गौरीशंकर मल्लिकार्जुन दिसे हे त्यामुळे आगळे 

पाहूनी शिवलिंग भक्ति जडली माझी तयाच्याप्रति

हाची पावन मल्लिकार्जुन महा मी पूजितो मन्मनी।।50.5

 

--------------------------------------------------------------

 शिवानन्दलहरी भाग 2 (श्लोक 51 ते 100 साठी खालील लिंकवर क्लिक करा. )

  भाग 2 लिंक