रेडिओ, सिनेमा ह्यात आपल्याला मोहवून टाकणारे हे स्तोत्र, त्यातील अर्थाच्या बाजूने ते उलगडत गेल्यासही ते तितकेच अर्थपूर्ण आणि कलात्मकतेचा अनुभव देणारे आहे.
(वृत्त – प्रमाणिका/पंचचामर , अक्षरे-16, गण- ज र ज र ज ग)
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम्।।1
शिवा तुझ्या जटा जणू अरण्य घोर भासते
प्रवाह जह्नुपुत्रिचा पवित्र त्यात पाझरे।
जटांवरून वाहते सलील जे पवित्र हे
करे पुनीत अंग अंग स्कंध कंठ हे तुझे।।1.1
गळ्यात लांब लोंबतीच हार सर्पभूषणे
डमड्डम डमड्डम प्रतिध्वनी घुमे घुमे।
करीसि रौद्र तांडवा शुभंकरा सुदर्शना
तुझ्या पदीच लीन मी करी तुलाच वंदना ।।1.2
जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमान मूर्धनि।
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके
किशोरचन्द्रशेखरे रति: प्रतिक्षणं मम।।2
शिवा तुझ्या विशाल पर्वतासमा जटांवरी
अनेक निर्झरांसवे करे विहार जाह्नवी
सवेग धावते सलील घेतसे प्रदक्षिणा
अनेक निम्नगा जटात जन्मती सुलक्षणा।।2.1
अतीव चंचला तरंग ठायि ठायि ओघळे
लताच दिव्य भासती जणू शिरोविभूषणे
ललाटि अग्निनेत्र हा धगद्धगद् करे ध्वनी
शिरी विराजमान नित्य चंद्रकोर सौम्य ही॥2.2
तुझ्या रुपात ह्या मला प्रसन्नता सदा मिळो
विराट रूप हे तुझेच माझिया मनी ठसो।।2.3
धराधरेंद्रनंदिनीविलासबंधुबंधुर-
स्फुरद्दिगंतसंततिप्रमोदमानमानसे।
कृपाकटाक्षधोरणीनिरुद्धदुर्धरापदि
क्वचिच्चिदंबरे मनो विनोदमेतु वस्तुनि।।3
नगाधिराजपुत्रिचा किरीट दिव्य दे प्रभा
प्रकाशवी दिशा दिशा अनंत रंग दे नभा
सहर्ष उर्मि दाटतीच दृष्य हेचि पाहता
अथांग या नभासमान मानसी तुझ्या शिवा
अखंड हा कृपाकटाक्ष लोकनायका तुझा।
जटील घोर संकटांस बांधण्या समर्थ हा
समस्त या दिशाच हे महान वस्त्र शंकरा।
तनूस भूषवी तुझ्या दिगंबरा दिगंबरा
तुझे स्वरूप पाहता मनोनभात माझिया।
अतीव हर्ष व्यापुनीच राहु दे शुभंकरा।।3
जटाभुजंगपिंगलस्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुमद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखे ।
मदांधसिंधुरस्फुरत्त्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि ।।4
शिरीच पिंगटा जटा तयातुनी भयंकरी
फणा विशाल काढतोच नागराज कांचनी
फण्यावरील दिव्य रत्न काय वर्णु मी प्रभा
कदंबपुष्प, कुंकुमासमान केशरी अहा ।।4.1
प्रकाशि त्याच रंगल्या दिशा दहा सुउज्ज्वला
सुयौवना वधूसमान लाजर्या गुलाबि या
जसा गजेंद्र मत्त डौलदार हा झुले तसे
तुझेहि चर्मवस्त्र जाड,तालि हेलकावते ॥4.2
तुझ्या स्वरूपि या अशाच भूतनाथ माझिया
मना मिळो अपार मोद सर्वदा प्रसन्नता ।।4.3
सहस्रलोचनप्रभृत्यशेषलेखशेखर-
प्रसूनधूलिधोरणीविधूसरांघ्रिपीठभूः।
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटक-
श्रियै चिराय जायतां चकोरबंधुशेखरः।।5
हजार नेत्र ज्यास तोच इंद्र आदि देवता
पदी तुझ्याच मस्तकांस ठेविती पुन्हा पुन्हा
सुरेंद्र मस्तकावरील पुष्पभूषणांतुनी
पराग पावली तुझ्या पडूनि धूसरा करी।।5.1
भुजंगमाळरज्जुने जटाच घट्ट बांधिल्या
जटेत गुंफिलेस तूच वासुकीस लीलया
चकोरचित्तचोर-चंद्रकोर थोर मस्तकी
अशा शिवा सदैव ठेव तू अम्हास वैभवी।।5.2
ललाटचत्वरज्वलद्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्।
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसंपदे शिरो जटालमस्तु नः।।6
(धनंजय -
शिवाच्या मस्तकावरील अग्नीचे नाव ; पंचसायक -
पाच बाण हे ज्याचे रूप आहे असा मदन. आम्रमंजिरी, मोगरा इत्यादि पाच सुवासिक फुले
आणि त्यांचा सुगंध हेच पाच बाणरूपी ज्याचे शरीर आहे असा मदन. ह्याच सुवासरूपी
बाणांनी तो प्रेमीजनांना घायाळ करतो)
ललाटयज्ञवेदि ही तयातुनी धनंजय-
स्फुलिंग तेज लोचनासि दीपवी भयंकर
पिऊनि टाकिलाचि अग्निनेहि कामदेव हा
करी तुला प्रणाम देवराज थोर तेजसा।।6.1
रुपेरि शुभ्र चांदणे पहूडता जटांवरी
जटाच चंद्रकांत होउनी विराजती शिरी
सुधाकरास रेखिले रुपेरि या जटांवरी
गळ्यात मुंडमाळ धाक घालिते मनास ही।।6.2
तुझेच रूप हे अगाध विश्वनाथ शर्व हे
अम्हास ठेव नित्य संपदेमधे सुखामधे।।6.3
करालभालपट्टिकाधगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजयाधरीकृतंप्रचंडपञ्चसायके।
धराधरेन्द्रनंदिनीकुचाग्रचित्रपत्रक
प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने मतिर्मम।।7
कपाळपट्टी ही तुझी भयाण उग्र भेसुरा
‘कृतांत’भासतोच अग्नि, ‘वासुनी बसेच आ’
मुखात घातलाच कामदेव अग्निने भला
धगद्धगद् करीत घोष सर्वभक्षि पेटला।।7.1
सुडौल या उमास्तनांवरीच चित्र रेखिसी
प्रणाम विश्व-चित्रकार,विश्वशिल्पि श्रेष्ठ ही
त्रिलोचना तुझ्या पदांवरीच राहु दे मती
सदा स्थिरा,नको तिलाच अन्य कोणती गती।।7.2
नवीनमेघमंडलीनिरुद्धदुर्धरस्फुरत्-
कुहूनिशीथिनीतमःप्रबन्धबन्धुकन्धरः।
निलिंपनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः।।8
क्षणाक्षणास व्यापतेच कृष्ण शर्वरी नभा
तिलाहि वेढती जशाच गर्द मेघमालिका
तसा तमासमान नीलकंठ श्याम जाहला
हलाहलास प्राशिता तुझा महान नायका।।8.1
जटानिबद्ध जाह्नवी सुशोभता करी शिरा
कटीस चर्म हे रुळे यशोप्रतीक जे तुला
कला मनोज्ञ षोडशा असाचि जो कलानिधी
प्रकाशतो शिरी तुझ्याच मंद मंद तो शशी॥8.2
अखंड वाहतो धुरा जगाचि सर्वकाळ रे
धुरंधरा करी प्रदान भाग्य थोर दिव्य हे।।8.3
प्रफुल्लनीलपङ्कजप्रपञ्चकालिमच्छटा
विडंबिकंठकंधरारुचिप्रबन्धकन्धरम्।
स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे।।9
प्रफुल्ल नील पंकजासमान नीलकांत हा
तुलाच एक शोभतो सुनील कंठ दिव्य हा
करीसि भस्म कामदेव, मारिसी त्रिपूर हा
भवार्णवा करीच नष्ट, दक्षयज्ञ मोडिला।।9.1
गजासुरास चारिले खडे रणांगणी शिवा
यमागृहीच धाडिलेस अंधकासुरास त्या
कृतांत भासतो यमास काळ तूच मृत्युचा
तुझ्याच पायि ठेवि मस्तकास मी सदाशिवा।।9.2
अखर्व/(अगर्व)सर्वमङ्गलाकलाकदम्बमंजरी
रसप्रवाहमाधुरीविजृंभणामधुव्रतम्।
स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं
गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे।।10
( खर्व - बुटकी ; अखर्व - ऊंच )
विशाल उन्नता असे जिच्याच कीर्तिची ध्वजा
दयार्द्र जी दयानिधी न गर्व स्पर्शला जिला
सुमंगला उमाच ही, अनंत जाणिते कला
तिचा कला-कदंबरूपि वृक्ष हा फुले जसा।।10.1
मधुव्रता रसीक एक तूच चाखितोस त्या
उमा-कलाफुलातल्या मधास रे मिलिंद त्या
गिरीश एक तूच जाणि गौरिची महानता
सुवास जाणि नासिका कळे न तोच लोचना।।10.2
करीसि दक्ष यज्ञ थंड अंतकासि दे धडा
प्रचंड अंधकासि खंड खंड तू करी शिवा
त्रिपूर बंड मोडुनीच दंडिलेस तू तया
दिलास प्राणदंड आडदांड त्या गजासुरा।।10.3
करोनि गंड दूर कामदेव तूच जाळिला
समर्पिला अखंड अग्निकुंडि चंड भाळिच्या
त्रिखंड व्यापुनी उरे भवाब्धि तोच खंडिला
तुझ्याच भक्तिने मिळो अखंड शांतता मना।।10.4
जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्विनिर्गमत्करालभालहव्यवाट्।
धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदङ्गतुङ्गमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचंडतांडवः शिवः।।11
कितीक सर्प,नागराज अंगि खेळती तुझ्या
विषारी फुंक फुंकुनी करी प्रदीप्त अग्निला
धगद्धगद् उठे ध्वनी ललाटि अग्नि चेतला
दिशा दिशात झेपवी सुसाट अग्निच्या शिखा।।11.1
धिधिंधिधा धिधिंधिधा घुमे मृदंग बोल हा
करीत तीन सप्तकांत वादनास लीलया
प्रसन्न मंगलामयी गभीर जाहल्या दिशा
प्रतिध्वनी घुमे घुमे टिपेस बोल पोचला।।11.2
मृदुंग ताल पावली धरे, करीत तांडवा
जयोस्तु ते जयोस्तु ते यशस्वि नित्यशंकरा।।11.3
दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंगमौक्तकस्त्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्ठयोर्सुहृदविपक्षपक्षयोः।
तृणारविन्दचक्षुषोः प्रजामहीमहेद्रयोः
समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे।।12
कधी मिळोच गादि झोपण्यास वा कधी शिळा
गळा असोचि सर्पमाळ, मौक्तिकांचि माळ वा
अमोघ रत्न, मृत्तिका असोचि मित्र शत्रु वा
सुनेत्र सुंदरी असो, तृणेच शुष्क वा वृथा।।12.1
प्रजा असो,प्रजापतीच ,भेदभाव ना मना
समान भाव ठेउनी भजेन मी कधी तुला?।।12.2
कदा निलिंपनिर्झरीनिकुंजकोटरे वसन्-
विमुक्तदुर्मति: सदा शिरःस्थमञ्जलिं वहन्
विमुक्तलोललोचनाललामभाललग्नकः
शिवेति मत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्।।13
सुरम्य जाह्नवी तटी कुटीत राहुनी कधी
जपेन ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र मी शिवा कधी
कुटीमधेच राहुनी तिरीच जह्नुपुत्रिच्या
मनामधील दुष्ट भाव दूर मी करोनिया।।13.1
करांजलीच जोडुनी कपाळी टेकवी सदा
पुन्हा पुन्हा जपेन मी ‘शिवा-शिवा’ सगद्गदा
भरून येत लोचने तुझेच रूप पाहता
मिळेल का असेचि सौख्य सांग रे मला शिवा।।13.2
त्यजूनि दैवदत्त चंचला स्त्रिया सुलोचना
अनन्य भक्तिने कधी स्मरेन मी तुला शिवा।।13.3
इमं हि नित्यमेवमुक्तमुत्तमोत्तमं स्तवं
पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततम्।
हरे गुरौ स भक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिनां तु शङ्करस्य चिन्तनम्।।14
असेचि श्रेष्ठ स्तोत्र हे, नरा मुखीच ज्या वसे
विकल्प जाउनी मनास पूर्ण शुद्धता मिळे
गुरूरुपात शंकरास पाहि तो निरंतरा
‘शिवा’ शिवाय अन्य कोणती गती नसे तया।।14.1
मनास मोहवी तुझेच नाम गोड शंकरा
अनन्य भक्ति हाच मोह सर्व जीवसृष्टिला
विकारहीन कामहीन होतसे मनस्थिती
विशुद्ध मानसी अनन्य भक्ति भाव जागृति।।14.2
( वृत्त - वसंततिलका , अक्षरे- 14 , गण- त भ ज ज ग ग, यति - पाद)
पूजावसानसमये दशवक्त्र गीतं
यः शम्भुपूजनमिदं पठति प्रदोषे।
तस्य स्थिरां रथ गजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंम्भुः।।15
जो भक्तियुक्त हृदये नित सांजकाळी
पूजा यथाविधि करून महेश्वराची
लंकापती रचित या शिवतांडवासी
श्रद्धा धरून हृदयी म्हणतो मुखानी॥15.1
देई तयास शिवशंभु गजांत लक्ष्मी
त्याच्या पदी सकल सौख्य सदैव राही
त्यासी मिळे विविध वाहनसौख्य मोठे
त्याच्या घरास कमला कधिही न सोडे।।15.2
भावानुवाद अति सुंदरसा मराठी
हा अर्पितेच रसिकांस अरुंधती ही
इति श्री रावणविरचितं शिवतांडवस्तोत्रं संपूर्णम्।।
असे रावणाने रचलेले शिव-तांडव स्तोत्र पूर्ण झाले
----------------------------------------------
गण दुरुस्ती हवी.
ReplyDeleteगण - ज र ज र ज ग