श्रीरामताण्डवस्तोत्रम् ( विश्लेषणासह )

 


रणांगणात वीजेप्रमाणे तळपणार्या त्या प्रभुरामचंद्राचं रूप, त्याचा तो अविस्मरणीय पराक्रम, रगारगातून व्यक्त होणारा रावणाविषयीचा तीव्र संताप, नसानसातून उसळणारं चैतन्य, धमन्यातून सळसळणारं रक्त, सीतेचं हरण केल्यामुळे सात्विक संतापाने लाल झालेल्या डोळ्यातून बाहेर पडणारा प्रचंड क्षोभ शत्रूसैन्याला जणु जाळून काढत होता. गिळून टाकत होता. त्यांच्यावर आग ओकत होता. प्रचंड वेगाने शत्रूसैन्यात धुमाकूळ घालणार्या त्या प्रभुरामाच्या डोक्यावर बांधलेल्या जटा सुटून त्या चेहराभर विखुरल्या होत्या. वार्यावर उडत होत्या. त्याच्या त्या झंझावाती दर्शनाने रावणाचे सैन्य गर्भगळीत झाले नसते तरच नवल. विनाशकारी तांडवस्वरूप श्रीराम आणि त्याचा अलौकिक पराक्रम शत्रूला दे माय धरणी ठाय करून गेला.

(वृत्त -, अक्षरे-, गण , यति - पाद. )

जटाकटाहयुक्तमुण्डप्रान्तविस्तृतम् हरेः

अपांगकृद्धदर्शनोपहार चूर्णकुन्तलः ।

प्रचंण्डवेगकारणेन पिंजलः प्रतिग्रहः

स क्रुद्धतांडवस्वरूपधृग्विराजते हरिः  ॥१॥

( अपांगदृष्टी, धृग्- धारण करणे, पिंजल- शोकसंतप्त, भयभीत, व्याकूळ, विस्मित प्रतिग्रहप्रभाव टाकणे )

महापराक्रमी सुधीर रामचंद्र संगरी

तुटून शत्रुच्यावरी पडे जसाच केसरी

विशाल भाल झाकले जटा सुटून त्या शिरी

विशाल लाल नेत्र आग ओकती रिपूवरी ॥१.१॥

 

प्रचंड राग तो हृदी; उफाळतोच त्वेष ही

बघून शत्रु तो पळे निभाव नाचि लागुनी

बघून वेग तो जणू कृतांत पातला गमे

फिरे विनाशरूप राम शत्रुच्या दळामधे ॥१.२॥

------------------------------------------------

श्री प्रभुरामचंद्राची सेना प्रचंड स्फूर्तीने शत्रूसैन्यात एखाद्या बाणाप्रमाणे घुसत होती. बाणाच्या टोकाप्रमाणे वेगाने घुसणार्‍या सैन्याच्या अग्रभागी रामप्रभू होते तर सैन्याच्या व्यूहाचे पुढून मागून अजेय योद्धे रक्षण करत होते. हनुमान, जांबवंत, वालीपुत्र अंगद या सेनानींच्या मार्गदर्शनाखाली कवचधारी, अस्त्र शस्त्र सज्ज योद्धे शत्रू सैन्याचा असा काही समाचार घेत होते की प्रचंड भडकलेल्या दावानलाला समुद्राच्या जणु काही त्सुनामी सारख्या महाप्रचंड लाटांनी होत्याचे नव्हते करावे, सहज विझवून टाकावे.  जणु काही रामरूपी काळ आ वासून सर्वांना गिळत प्रचंड वेगाने शत्रुसैन्यात फिरत होता.

अथेह व्यूहपार्ष्णिप्राग्वरूथिनी निषंगिनः

तथांजनेयऋक्षभूपसौरबालिनन्दनाः ।

प्रचण्डदानवानलं, समुद्रतुल्यनाशकाः

 

नमोऽस्तुते सुरारिचक्रभक्षकाय मृत्यवे ॥२ ॥

( व्यूहपार्ष्णि  व्यूहाची पिछाडी, प्राग्र्‍म्- अग्रणी, मख्य, उत्तम, श्रेष्ठ  वरुथिन्कवचधारी. निषंगिन्धनुर्धारी, खड्गधारी. अंजनेयहनुमान. ऋक्षभूपजांबवंत )

धडाडता वनाग्नि तो जसा विझे जलाब्धिने

तशीच राक्षसी दळे विनष्ट राघवामुळे

रचून कूट व्यूह राम चालला पुढे पुढे

घुसेचि सायकासमान शत्रुच्या दलांमधे ॥२.१॥

 

सुसज्ज वीर अंजनेय जांबवंत स्फूर्तिने

दलास मागुनीच पूर्ण रक्षती रणामधे

गमेचि काळ ग्रास घेत चालला निरंतरी

अशा प्रभूस त्या प्रणाम शूर वीर धीरची ॥२.२॥

------------------------------------------------

चवदा वर्षांचा वनवास स्वीकारणार्‍या प्रभु रामचंद्रांच्या अंगावर भगवी वस्त्रं शोभून दिसत होती. खर सांगायचं झालं तर, पराक्रमाची धारच एवढी सतेज असते की त्या पराक्रमी पुरुषावर तो जे ल्यायला असेल ते वस्त्र सुंदर होऊन जातं. त्याने सहजगत्या पेललेलं ते कोदंड धनुष्य, एक पाऊल पुढे टाकत घेतलेला लढण्याचा पवित्रा--- रणांगणावरही विलोभनीय वाटत होता. सीता अपहरणाचा तो प्रसंग आजही प्रभु रामचंद्राच्या मनात तेवढाच ताजा होता. आणि रावणाविषयी असलेला रागही! अशा पाप्याला क्षमा नाही! त्याला एकच रस्ता दाखवावा लागतो तो म्हणजे यमसदनाचा! संपूर्ण समाजाला हाच धडा घालून द्यायला हवा! कोणी दुसर्‍याच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेलं असेल तर तो दंडनीय अपराध आहे. आणि त्याला दंड एकच! --- मृत्युदंड!! मृत्युदंड!! मृत्युदंड!!! ह्याच नियमाची अम्मलबजावणी पुढे श्रीकृष्णाने पांडवांकडून करून घेतली आहे.

कलेवरे कषायवासहस्तकार्मुकं हरेः

उपासनोपसंगमार्थधृग्विशाखमंडलम् ।

हृदि स्मरन् दशाकृतेः कुचक्रचौर्यपातकम्

विदार्यते प्रचण्डतांडवाकृतिः स राघवः ॥३॥

( कार्मुक धनुष्य.)

 

कषाय वस्त्र शोभते रघुत्तमा-तनूवरी

महामुनी समा दिसे धरे धनू विलक्षणी

दशाननाकडून जी असभ्य जाहली कृती

हरून जानकीस ने कुकर्म ते स्मरे हरी  ॥३.१॥

 

तिचा निषेधरूप त्यास दंडण्यास ये हरी

रिपूदलास विंधण्या असे सुसज्ज संगरी

जरी तयास घेरतीच शत्रुवीर हे रणी

पदास रोवुनी उभा असे प्रभू रणांगणी ॥३.२॥

 

महाधनूस लावुनी सुयोग्य बाण लीलया

अचूक वेध शत्रुचाच घेत धाडि रौरवा

अफाट शत्रुसैन्य ते विदीर्ण राम ते करे

तया प्रणाम मी करून वंदितोच पाऊले ॥३.३॥

------------------------------------------------

राक्षस मायावी तर होतेच पण त्यांना सत्याचीही चाड नव्हती. कुणाची पत्नी पळवणं हा त्यांच्या लेखी गुन्हा नव्हता. स्वतः रावण कुबेराचं राज्य बळकावून बसला होता. असत्य हाच राक्षसांचा धर्म होता. स्वतःच्या स्वार्थासाठी बाकीही असुरांचा रावणाला पाठिंबा होता. श्रीरामानी राज्यत्याग केला असला तरी त्याने राजेपण सोडललं नव्हतं. अन्यायाला शासन हा राजाचा धर्म वनातही श्रीरामाने वालीलाही सांगितला होता आणि सुग्रीवाच्या पत्नीचं हरण करणार्‍या वालीला त्यांचा सुयोग्य दंडही दिला होता. रावणला आणि रावणाच्या निंदनीय कामाला दुजोरा देणार्‍या सर्व राक्षसांचा संहार करण्यासाठी कटिबद्ध झालेल्या रामानी रावणाला ठार मारायचच ह्या निश्चयाने अशक्य ते शक्य करून दाखवलं. समुद्रावर सेतू बांधला. वानरसेनेसहित लंकेवर स्वारी केली. अजिक्य लंका मातीच्या ढिगाप्रमाणे ढासळली. माजलेल्या असुरांचा श्रीरामप्रभुंनी आपल्या पराक्रमी कोदंड धनुष्यानी चांगलाच समाचार घेतला.

प्रकाण्डकाण्डकाण्डकर्मदेहछिद्रकारणं

कुकूटकूटकूटकौणपात्मजाभिमर्दनम् ।

तथागुणंगुणंगुणंगुणंगुणेन दर्शयन्

कृपीटकेशलंघ्यमीशमेकराघवं भजे ॥४॥

 

अधर्म घोर वाढण्यास, धूर्त चाल चालती

करीति निंदनीय कर्म भ्रान्तबुद्धि पातकी

जनास त्रस्त जे करीति शस्त्र शास्त्र योजुनी

तया अमोघ रामबाण तो कसाचि दाखवी ॥४.१॥

 

समुद्रसेतु बांधुनी, करेचि पार जो तया

महान पातक्यांस घोर, राक्षसांस दंडण्या

अशा पराक्रमी सुधीर, धर्मवीर त्या नृपा

करीतसेच मी प्रणाम, शक्तिशालि राघवा ॥४.२॥

------------------------------------------------

राघवाचा डोळे दीपवणारा पराक्रम मोठ्या मोठ्या महारथ्यांनाही आश्चर्याने थक्क करत होता. विजेच्या वेगाने होणार्‍या श्रीरामाच्या हालचाली, आपल्या सर्व सेनेला दिलं जाणारं प्रखर नेतृत्त्व, त्याच्या सोबत असलेला परस्पर संवाद आणि सेनेला विश्वास देत बरोबर घेऊन लढायचे नेतृत्त्व गुण! राघवाचं सगळच विलक्षण! घामाच्या आणि रक्ताच्या धारांमधे चिंब झालेल्या प्रभु श्रीरामाने आपल्या समस्त शस्त्र अस्त्रांचा शत्रूला असा काही तडाखा दिला की शत्रूसैन्याच्या वीरांच्या शवांनी सगळी धरणी झाकून गेली. समुद्रातही शवांचा खच पडला. रक्त मासाच्या चिखलानी, कापल्या गेलेल्या, तुटलेल्या अवयावांच्या ढिगांनी रणभूमी झाकून गेली.

सवानरान्वितः तथाप्लुतं शरीरमसृजा

विरोधिमेदसाग्रमांसगुल्मकालखण्डनैः ।

महासिपाशशक्तिदण्डधारकैः निशाचरैः

परिप्लुतं कृतं शवैश्च येन भूमिमण्डलम् ॥५॥

(असृज् रक्त.)

 

नभीच तारकांमधे शशीच शोभतो जसा

कपीदलात रामचंद्र वीर शोभतो तसा

कपीदळांमधे सुसज्ज अग्रणीच राहुनी

कुटील व्यूह मार्गदर्शना करेच श्रीहरी ॥५.१॥

 

तनूस रक्त माखुनीच लाल लाल जाहला

लढेच राक्षसांसवे अघोर शक्तियुक्त त्या

जरी असेच पाश दंड शक्ति वेगवेगळ्या

अमोघ सर्वनाशि त्या खळांकडे कितीकशा ॥५.२॥

 

तरीहि राघवापुढेच होऊनिच निष्प्रभा

सडा पडेच रक्तमांस हात पाय अस्थिचा

पडे तुटून अंगअंग वेगळी रणांगणी

प्रचंड ढीग ते भयाण झाकती धरा रणी ॥५.३॥

------------------------------------------------

 

लंकापुरी अजिंक्य होती. अभेद्य होती. महापराक्रमी राक्षसांच्या पराक्रमाने सुरक्षित होती. भुवई वर उचलून तिच्याकडे बघण्याची कोणाची शामत नव्हती. समुद्राने वेढलेली होती. सभोवताली खोल खंदक, त्यात लपलपणार्‍या अग्नी ज्वाळांनी तिच्या जवळ यायची शत्रूची हिम्मत नव्हती. रावणाचं नाव ऐकूनच शत्रू तिकडे फिरकत नव्हता. शिवाय विशालदंष्ट्र, कुंभकर्ण मेघनाद, अहिरावण, आदि, अकम्पन, अशा महारथींनी तिच्या भोवती आपल्या पराक्रमाचं सुरक्षा कवच तयार केलं होतं. अशा ह्या सुवर्ण लंकेवर एक वनवासी पायी पायी, वानरांच सैन्य घेऊन,  समुद्रावर सेतू बांधून, चालून आला होता. सर्वच अघटित होत. अनपेक्षित होतं. पण रावणाला ते अत्यंत बालीश वाटत होतं. पण रामाचा दुर्दम्य पराक्रम,  मनात खदखदणारा राग ह्या पुढे सर्व सुरक्षा यंत्रणा विफल होत्या. मृत्यूला अगम्य काही नसतं. व्याधीला दुर्धर कोणी नसतो. शत्रूला अभेद्य राज्य नसतं. रावणालां ते कळलं नाही.

विशालदंष्ट्रकुम्भकर्णमेघरावकारकै:
तथाहिरावणाद्यकम्पनातिकायजित्वरै:
सुरक्षिताम् मनोरमाम् सुवर्णलंकनागरीम्
निजास्त्रसंकुलैरभेद्यकोटमर्दनम् कृतः ॥६॥

 

विशालदंष्ट्र, कुंभकर्ण मेघनाद ह्या समा

महारथी सुवीर लंकिनीपुरीस रक्षिता

अजिंक्य जी अभेद्य जी अलंघ्य जी असे सदा

तिच्यावरीच अस्त्र शस्त्र चालवीच राम हा ॥६.१॥

 

करेचि चाळणी तिची सुबाहु राम लीलया

 करेचि खंड खंड ती विदीर्ण होय सर्वथा

भकास ती भयाण ती उजाड जाहली पहा

सुवर्ण लंकिनीपुरी मिळे धुळीस पूर्णता ॥६.२॥

------------------------------------------------

राम रावणाचं अद्भुत युद्ध पाहण्यासाठी ऋषी, मुनी, अत्यंत प्रज्ञावंत, सिद्ध, योगी, चारण/भाट जमले होते. सतत लढून दमलेल्या रामाशी लढायला जेव्हा नवीन दमाचा रावण रणांगणावर आला तेव्हा रामाच्या पाठीवर हात ठेऊन महर्षी अगस्तिंनीं त्याला `आदित्यकवचस्तोत्र’ देऊन ते तीन वेळा म्हणायला सांगून त्याला ``तू विजयी होशील.’’ असा आशीर्वाद दिला. प्रत्यक्ष सूर्यनारायण आकाशात हे युद्ध पाहायला थांबले होते. धनुष्याला बाण जोडून उभ्या असलेल्या श्रीरामांना त्यानी सांगितलं, `` रामा सोड तो बाण! आता त्वरा कर!’’ रामाने सोडलेल्या बाणाने क्षणात रावणाचं शिर उडवून नेलं. तो क्षण आपल्या नेत्रांनी पाहणार्‍या, मुनींनी सिद्ध, चारणांनी/ भाटांनी, त्यावेळी अत्यानंदानी रामाच्या नावाचा प्रचंड जयजयकार केला. जयघोष केला. त्या मुनींनी लिहीलेला, वर्णन केलेला तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहत आहे.


प्रबुद्धबुद्धयोगिभिः महर्षिसिद्धचारणै:
विदेहजाप्रियः सदानुतो स्तुतो च स्वस्तिभिः।
पुलस्त्यनंदनात्मजस्य मुण्डरुण्डछेदनम्
सुरारियूथभेदनं विलोकयामि साम्प्रतम् ॥७॥

 

हे सवेग जाय छेदुनी क्षणात रामबाण तो

दशाननाचिया शिरा मुनींचिया समक्ष हो

प्रगाढ ज्ञानवंत ते विवेकयुक्त सिद्धही

सुजाण योगि भक्तवृंद पाहती महर्षिही ॥७.

 

तयांचिया स्तुतीतुनी प्रसंग वर्णनातुनी

पहातसे अतीव मंगला क्षणास त्याच मी

थरार येत प्रत्ययास युद्ध घोर पाहि मी

उभाचि नेत्रसंपुटापुढे प्रसंग तत्क्षणी ॥७.

------------------------------------------------

रावणाच्या सैन्यात जणु रामाच्या आणि वानरदळांच्या रूपाने प्रत्यक्ष  आक्राळ विक्राळ मृत्यूच फिरत होता. रणांगणावर कृतांत वाटणारा राम अंतःकरणाने अत्यंत कोमल होता. त्याने समस्त वानरसैन्याची हृदयं आपल्या प्रेमळ वागण्याने जिंकून घेतली होती. वानरे, अस्वले अशा प्राणीमात्रांनाही त्यांच्या हिताचा उपदेश करणारा राम आपलासा, हवाहवासा वाटत होता. लंकेची पूर्ण माहिती असलेल्या बिभीषणारोबर युद्धाची मंत्रणा करणारा राम अत्यंत काळजीपूर्वक व्यूह रचना करत होता. अनेक युद्धविशारद प्रभू रामांना मोलाचा सल्ला देत होते. रघुवीरही तो आमलात आणत होते. लक्ष्मण तर सावलीसारखा ह्या रघुवीराच्या पाठी उभा होता. सर्वांचं मन जिंकणार्‍या त्या प्रभुरामचंद्रांना मी माझ्या हृदयसिंहासनावर स्थापन करून त्यांचा सतत आठव करत आहे.



करालकालरूपिणं महोग्रचापधारिणम्
कुमोहग्रस्तमर्कटाच्छभल्लत्राणकारणम्।
विभीषणादिभिः सदाभिषेणनेऽभिचिन्तकं
भजामि जित्वरम् तथोर्मिलापतेः प्रियाग्रजम् ॥८॥

कृतांत पातला रणी असाचि उग्र भासतो

महान त्या धनूस राम लीलायाचि पेलितो

कपीदळांस अस्वलांस राम एक रक्षितो

भवाब्धिच्याच मोहरूप वीचितून तारितो ॥८.१॥

 

 बिभीषणादि युद्धनीतितज्ज्ञ बांधवांसवे

करे सुमंत्रणा हरी उद्या कसे लढायचे

स्वबंधु धाकटाच सावलीसमा जयासवे

असाचि रामचंद्र मी हृदीच स्थापिला असे ॥८.२॥


------------------------------------------------

श्रीरामानी  रावणाच्या सैन्यावर असा काही निकराचा हल्ला चढवला की, रावणाचे राक्षस सैन्य बांध फुटलेल्या नदीच्या ओघाप्रमाणे इतस्ततः पळत सुटले. शस्त्र चालवणारे, शस्त्रे सांभळून ती योद्ध्यांना योग्यवेळी पुरवणारे, झेंड्याचे बिनीचे स्वार लढायचे विसरून हातात भाला, बरची, तलवार वा झेंडे पताका जे काय असेल ते धरून जीवाच्या आकांताने पळत होते. सूर्याचे प्रखर किरण पसरता जसे अंधाराचे अस्तित्त्व पसून टाकतात त्याप्रमाणे सूर्यवंशी श्रीरामप्रभू रणांगणात येताक्षणी त्यांच्या महान पराक्रमाची नुसती चुणक पाहूनच राक्षस सैन्याची पळता भुई थोडी झाली.

 

इतस्ततः मुहुर्मुहुः परिभ्रमन्ति कौन्तिकाः

अनुप्लवप्रवाहप्रासिकाश्च वैजयन्तिकाः ।

मृधे प्रभाकरस्य वंशकिर्तिनोऽपदानतां

अभिक्रमेण राघवस्य तांडवाकृतेः गताः ॥९॥

(मुहुर्मुहुः वारंवार, खूप वेळा. कौन्तिकः - भाला चालवणारा. प्रासिकःभाला, बरछी ठेवणारे. मृधम्- संग्राम, युद्ध, लढाई )

 

जणू रिपूदळात राम येचि वादळासमा

 धुमाकुळास रामसैन्य घालिता बघोनिया

रघुत्तमापुढेच धैर्य ढासळून शत्रुचे

इतस्ततः पळेचि सैन्य वाट ती फुटे जिथे ॥९.१॥

 

करी धरून खड्ग शस्त्र वा ध्वजाच काहिही

इतस्ततः रिपूदळेच सैन्यलोट वाहती

कुणी बघून रौद्ररूप त्या धुरंधरा रणी

सहस्ररश्मि ठाकला म्हणे न ताप साहुनी ॥९.२॥

 

------------------------------------------------

श्रीरामप्रभूंमधे सर्व सद्गुण एकवटले होते. ते स्वतः मूर्तिमंत सद्गुणच होते. किंबहुना जर सार्‍या सद्गुणाना मूर्त रूपात आणायचे ठरवले तर ती  घडणारी मूर्ती रामप्रभूंचीच असले. अन्य कोठली नाही. ह्या सद्गुणांना कुठला आकार नसतो. कुठलाही रोग लागत नाही. अहो अग्नीला कधी वाळवी लागेल का? तेजस्वीपणाला कुठला रोग लागणार? सारी सृष्टी ह्या सद्गुणांच्या पायावर आजही उभी आहे. सृष्टीत हे तेजस्वी सद्गुण आहेतच. ते रामरूपानी तर कधी कृष्णरूपानी जन्माला येतात. सद्गुण स्वतःच मार्गदर्शक असल्याने त्यांच्यावर अंकुश कसला? ते स्वतःच निरंकुश स्वामित्त्व सिद्ध करणारे असतात. असा सर्वगुणसंपन्न नर पूर्णपुरूष मानला जातो.  



निराकृतिं निरामयं तथादिसृष्टिकारणम्
महोज्ज्वलं अजं विभुं पुराणपूरुषं हरिम्।
निरंकुशं निजात्मभक्तजन्ममृत्युनाशकम्
अधर्ममार्गघातकम् कपीशव्यूहनायकम् ॥१०॥

 

असेचि सद्गुणस्वरूप रामचंद्र हा महा

गुणांस ना मिती कधी गुणांस दोष तो कसा

असे गुणांवरी उभारलीच सृष्टि पूर्णता

गुणांस जन्म मृत्यु ना प्रकाशमान ते सदा ॥१०.

 

सदैव राम व्यापुनी उरे मनामनातुनी

कितीक काळ लोटला तरी तरूण तो जनी

कुणी पुसू शके न त्या निरांकुशा मनातुनी

जगत्प्रभूच सत्पथास दावि संकटातुनी ॥१०.

 

भयास जन्ममृत्युच्या निवारितो प्रभूच जो

असत्यमार्ग नाशुनीच सत्यमार्ग दावितो

सुसज्ज वानराचिया दळास मार्गदर्शी जो

असोच माझिया हृदी सदैव राम राम तो ॥१०.

------------------------------------------------

महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र आणि अनेक ऋषीमुनींकडून अस्त्र शस्त्र विद्या शिकून श्रीराम व लक्ष्मण अस्त्र शस्त्र विद्येत पारंगत झाले होते. अनेक यज्ञांचं रक्षण करण्याचं काम ह्या बंधुद्वयाने अत्यंत कौशल्याने केल्याने त्यांना लढाईचा प्रत्यक्ष अनुभवही होता. सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्रांमधे हे दोघेही तरूण राजकुमार पारंगत होते. त्यामळे आपल्या विविध शस्त्रांस्त्रांचा अचूक मारा शत्रूसैन्यावर करून त्यांनी शत्रू सैन्याला जिकीरीला आणले. नामोहरम केले. शत्रूसैन्याची दाणादाण उडाली. सर्वत्र शत्रुपक्षाच्या सैनिकांच्या शवांचा खच पडला. अवयव तुटून पडू लागले. सारी रणभूमीच नाही तर समुद्रही शवांनी भरला.

 

करालपालिचक्रशूलतीक्ष्णभिंदिपालकै:

कुठारसर्वलासिधेनुकेलिशल्यमुद्गरैः

सुपुष्करेण पुष्कराञ्च पुष्करास्त्रमारणैः

सदाप्लुतं निशाचरै: सुपुष्करञ्च पुष्करम् ॥११॥

 

प्रचंड खड्ग शूल चक्र अंकुशासवे धनू

महान अस्त्र शस्त्र चालवी रिपूवरी प्रभू

 रामबाण व्यर्थ  जाय एकही कधी रणी

जसा प्रदीप्त अग्नि भेदभाव ना करी कधी ॥११.१॥

 

इथे तिथे, जिथे तिथे नभात वा धरेवरी

अथांग सागरी नसे शवांस मोजदाद ती

तुटून हात पाय शत्रुचे  सांडिले रणी

नसेचि एक कोपरा जिथे  रक्त थेंबही ॥११.२॥
------------------------------------------------

रणात वज्रासमान कठोर असलेला प्रभुरामचंद्र, अन्यायाविरोधात मेरूपर्वताप्रमाणे अचल उभा असलेला रघुनंदन, आपल्या आश्रयाला आलेल्या सेवकांना, भक्तगणांना हृदयाशी धरणारा, फुलाप्रमाणे कोमल हृदय असलेला श्रीराम, तर दुसर्‍या बाजूला कर्तव्य कठोर, समर्थ असा शासक राजा राम! --- रामाचे गुण सर्वांनाच भुरळ घालणारे आहेत. परस्पर विरोधी पक्षांनाही रामाचं व्यक्तिमत्त्व आदरणीय होतं. भले देव असोत वा दानव! एखाद्या नावाला त्या माणसामुळे गौरव प्राप्त होतो वा तिरस्कार! राम ह्या नावाला खरं सौदर्य प्राप्त झालं कारण ते राम ह्या सद्गुणी व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे. म्हणून त्या नावातही रामाचे सर्व गुण जणु काही उतरले आहेत. ते नाम तारकब्रह्म होऊन सामान्यांनाही ह्या भवसागरातून एखाद्या नावेप्रमाणे तारून न्यायला समर्थ आहे.

 


प्रपन्नभक्तरक्षकम् वसुन्धरात्मजाप्रियम्
कपीशवृंदसेवितं समस्तदूषणापहम्।
सुरासुराभिवंदितं निशाचरान्तकम् विभुं
जगद्प्रशस्तिकारणम् भजेह राममीश्वरम् ॥१२॥

 

कुणीच दीन आर्त भक्त मागता पदाश्रया

तयांस रक्षितोच राम जानकीपती सदा

गमेचि प्राण जानकीस राम राम राम हा

महान ती कपीदळेच मानिती रघुत्तमा ॥१२.

 

समस्त लांछनांस हा निवारतो महाबळी

समस्त पाप ताप ना छळी जनास भूतळी

खरास, दूषणास रौरवास राम पाठवी

प्रशंसण्यास पात्र रामचंद्र एकमेवची ॥१२.

 

जसाचि देवदेवतांस वंद्य रामचंद्र हा

तसाचि आदरास पात्र राक्षसांस राम हा

रुची तमात ज्या निशाचरांस गाढ वाटते

तयांस मृत्युपंथ राघवाकडून तो मिळे ॥१२.

 

समस्त विश्व गात रामगौरवाचिया कथा

तुम्हीच विश्ववंद्य विश्वतारका प्रभूवरा

असेचि एकमेव अद्वितीय  धर्मरक्षका

अशा समर्थ शासका प्रणाम पावली तुझ्या ॥१२.



इति श्रीभागवतानंद गुरुणा विरचिते श्रीराघवेंद्रचरिते इन्द्रादि देवगणै: कृतं श्रीराम तांडव स्तोत्रम् सम्पूर्णम्।।

श्री भागवतानंद गुरूंनी रचलेल्या ``राघवेंद्रचरित’’ ह्या ग्रंथातील  इंद्रादि देवगणांनी केलेलं रामतांडवस्तोत्र अशा प्रकारे पूर्ण झाले.

-----------------------------------

लेखणी अरुंधतीची-