।। रुक्मिणीस्तोत्रम् ।।

 

।। रुक्मिणीस्तोत्रम् ।।

 

जगन्मातरं मातरं पद्मजादेः

परब्रह्मशक्तिं परामप्रमेयाम्

अचिन्त्यामनन्यामनाद्यन्तरूपां

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 1

अगे माय तू माऊली हया जगाची

असे माय ब्रह्मादि त्या देवतांची

परब्रह्मशक्तीच चैतन्यमूर्ती

पराशक्ति तू सच्चिदानंदरूपी ।। 1.1

 

मतीची नसे धाव कोण्या नराची

तुझे रूप जाणेल ऐसा न कोणी

तुझ्या सारखी एक तू अद्वितीया

रुपासी तुझ्या आदि ना अंत सीमा ।। 1.2

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

सुमान्यां शरण्यां वरेण्यां वदान्यां

हरिप्राप्तिधन्यां विदर्भेषकन्याम् ।

सदा चन्द्रभागातटेविष्टरस्थां

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 2

( वदान्य - ओघवती भाषा  असलेला, वाक्पटू सानुग्रह बोलणारा, दयाळू, दानशील अत्यंत उदार. वरेण्य सर्वोत्तम, श्रेष्ठ, पूज्यतम, वाछनीय, पात्र )

जिच्या  सद्गुणांसी सदा आठवावे

जिला नम्र भावेच चित्ती भजावे

जिचे नाम घ्यावे मुखी आदराने

जिच्या पाऊली आदरे नम्र व्हावे ।। 2.1

 

जिची गोड वाणी प्रवाही प्रभावी

जणू जाह्नवी पूत कल्याणकारी

अशी रुक्मिणी मान्य सार्या जगासी

अशी रुक्मिणी माय आहेच माझी ।। 2.2

 

कटी ठेऊनी हात राही उभी ती

विटेच्यावरी ठेऊनी पावले ती

पतिच्यासवे चंद्रभागा तिरी ह्या

विदर्भीय तू राजपुत्रीच धन्या ।। 2.3

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

विभोर्विठ्ठलस्यार्धभागे वसन्तीं

सतीं पाण्डुरङ्गप्रियां कोमलाङ्गीम् ।

शरच्चन्द्रबिम्बाननं दिव्यकान्तिं

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 3

सती साध्वी स्त्री वा पत्नी

असे तूचि अर्धांगिनी विठ्ठलाची

मनोमंदिरी पूजिसी विठ्ठलासी

प्रिया विठ्ठलाची असे तू शुभांगी

असे सुंदरा कोमलांगी शिवांगी ।। 3.1

 

 

मुखासी तुझ्या पाहुनी माय भासे

उदेलाच कोजागिरीचा शशी गे

असे सौम्य तेजात ओथंबलेले

तुझे शांत लावण्य गे मोहवीते ।। 3.2

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 


यदीयं प्रभावात् विधिः सर्गशक्तो

जगत्पालनेऽ भूदुपेन्द्रः समर्थः ।

लये व्योमकेशोऽपि तां सर्वभौमां

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 4

( उपेंद्र विष्णु, सर्ग – सृष्टि, सृष्टिरचना  )

प्रभावे तुझ्या शक्ति ब्रह्म्यास लाभे

तयानेच साकारतो विश्व सारे

अगे माय शक्ती हरीसीच देता

करी पालना तो जगाच्याच सार्‍या ।। 4.1

 

करे सृष्टिचा नाश शंभूच अंती

असे लाभलेली तुझी त्यास शक्ती

दिली ना जरी शक्ती तू देवतांसी

अशक्या करावे कसे शक्य त्यांनी ।। 4.2

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

कृपालेशतोऽस्या रविर्भाति लोके

चकास्ति प्रभा विद्युतः तारकाणाम् ।

सुधांशुः सदाऽऽह्लादकोऽनङ्गसूं तां

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 5

कृपेचा  तुझ्या लाभता अंश एक

मिळे तेज सूर्या झळाळेच वीज

प्रकाशे नभी तारकांचेच पुंज

मना मोद देई शशी सौम्य शांत ।। 5.1

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

श्रुतिनामगम्यां सुभावैकगम्यां

मनोवागतीतां चिदानन्दसत्ताम् ।

रमां शारदां पार्वतीं सर्वमूलां

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 6

तुला जाणिती ना श्रुती वेदवाक्ये

परी भक्तिने गे तुला जाणता ये

असे पार वाणी मनाच्याच तू गे

तुझ्या नाचि पर्यंत कोणीच पोचे ।। 6.1

 

असे माय तू चित्कला ब्रह्मरूपी

असे ह्या जगाचीच तू बीजमूर्ती

रमा शारदा तू उमा कृष्णपत्नी

तुझ्या शक्तिने चालते विश्व हेची ।। 6.2

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

धरित्रीं सवित्रीं समस्यादिकर्त्रीं

त्रिलोकैकधात्रीं वरां भीमपुत्रीम् ।

भवोत्पन्नभीशोकमोहापहर्त्रीं

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 7

( सवित्रीमाता, गाय. धात्री पालन करणारी. वरापार्वतीचे नाव, श्रेष्ठ )

असे अन्नदात्री धरित्रीच तू गे

असे माय सार्या जगाचीच तू गे

करी स्नेहभावेच संगोपनासी

तिन्ही लोक सांभाळसी माय तूची ।।7.1

 

भवाब्धी असे माय हा क्लेशकारी

इथे मोह लाटा नरा घेति पोटी

इथे वादळे संकटांचीच येती

तुफानीच वारा भयाचा सुटेची ।। 7.2

 

किती हेलकावेच ही जीवनौका

कसे पार जावे मनी दाट शंका

परी श्रेष्ठ तू भीमकन्या विदर्भी

तुझे नाम ही नाव तारून नेई ।। 7.3

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

 

लसत्मञ्जुहास्यप्रभालङ्कृतोष्ठीं

कटाक्षे कृपार्द्रां प्रियोपेन्द्रगोष्ठीम्

कटौ न्यस्तहस्तामनन्ताधिदेवीं

शुभां रुक्मिणीं कृष्णपत्नीं नमामि ।। 8

( गोष्ठीसंलाप, बोलणे, प्रवचन, नातेसंबंध, नातेवाईक. आधि - ठेव )

 

तुझ्या गोड मंदस्मिताहून नाही

दुजा श्रेष्ठ ओठा अलंकार काही

प्रभा दंतपंक्तीतुनी फाकते जी

तयाच्या प्रकाशे मुखा ये झळाळी ।। 8.1

 

हरीनाम संकीर्तने पुण्य वाणी

असे लाडकी विष्णुपत्नीच त्याची

दया पाझरे दृष्टितूनी तुझ्या गे

तुझ्या गोड मायेत हे भक्त न्हाले ।। 8.2

 

गे ठेव मोठी गमे तू अनंता

 असे पट्टराणी हरीचीच तू त्या

कटी ठेऊनी हात राहे उभी तू

प्रफुल्लीत माते सदा सर्वदा तू।। 8.3

 

असे रुक्मिणी तूचि कल्याणमूर्ती

नमस्कार श्रीरंगजाया तुलाची ।। ध्रु.

---------------------------------------