अन्नपूर्णास्तोत्रम् विश्लेषणासहित

 

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 7  

          आपल्याकडे मुलीच्या लग्नात भलेही जावयाने मुलीच्या माहेरकडून हुंडा घेतला नसला तरी मुलगी सासरी जातांना पत्नीच्या माहेरहून मुलगा एक वस्तू नक्की उचलून घेऊन जातो; ती म्हणजे देवात ठेवलेली बाळकृष्णाची आणि एका हातात कलश आणि दुसर्या हातात पळी घेऊन बसलेली अन्नपूर्णेची मूर्ती. सगळ्यांना जेऊ घालणारी, सगळ्यांच्या पोटापाण्याची काळजी घेणारी. नवीन नवरीला सतत सांगणारी, ``कोणाची अबाळ होऊ देऊ नकोस हं.’’

               आपल्याकडच्या कहाण्या जरी वाचल्या तरी लक्षात येईल की गाडग्या मडक्यात तळाला गेलेल्या मुठभर धान्याच्या भाकरी करून सून कधी दारी अचानक आलेल्या कुष्ठ रोग्याला खाऊ घालते. तर कधी शनिवारी येणार्या भुकेल्या छोट्या मुलाला खाऊ घालते. शेवटी सर्वांच्या पोटात असलेली भूक ही एकाच प्रकारची! सर्वांनाच हतबल करणारी. आपल्याकडे एकट्यानी खायचे संस्कार नाहीत. एक तीळ सात जणात वाटून खावा असंच आपल्याला सांगितलं जातं. कहाण्या, श्लोकांमधून मनावर बिंबवलं जातं.  एखाद्या ट्रेकच्या वेळेला सगळेजणं दमले तरी दमलेल्यांमधून काहीजणं पुढे येतात आणि कधी स्वयंपाक करून तर कधी बरोबर आणलेल्या डब्यांमधुन सर्वांना वाढायला सुरवात करतात. कारणं दमलेल्याला, भुकेलेल्या जेऊ घालणं ही इतकी आनंददायक कृती आहे की पोट भरून तृप्त झालेल्याने भले धन्यवाद देवोत वा न देवोत, त्याच्या डोळ्यातून ते व्यक्त होतच राहतात. ती तृप्ती वाढणार्यालाही कृतार्थ करून जाते. तृप्त झालेला माणूस म्हणतो, ``आत्मा संतुष्ट झाला.’’ बाकी कुठल्या दानात आत्मा संतुष्ट होत नाही. बाकी दान हाव वाढवणारं असतं तर अन्नदान खरोखरीचं तृप्त करणारं असतं.

              ही अन्नपूर्णेची हसरी मूर्ती सतत समोर दिसली की  सासरी आलेल्या मुलीलाही आपण तिच्याप्रमाणे वागावं हे मनावर न कळत बिंबत जातं. असं म्हणतात की कुंभारीण नावाचा एक किडा मातीचं घर बनवतो तेव्हाच, झुरळासारख्या एखाद्या मोठ्या किड्याला अर्धवट दंश करून अपंग करून त्याच्या घरात ठेऊन मग अंडी घालतो. व घर मातीनी लिंपून बंद करून टाकतो. आतमधे अंड्यातून बाहेर आलेल्या आळ्या झुरळाला खाऊन मोठ्या होतात आणि सरते शेवटी कुंभारणी बनून बाहेर येतात. पाहणार्याला वाटतं की कुंभारणीला सतत आठवता आठवता, भयाने का होईना पण तिचेच चिंतन करता करता झुरळच कुंभारीण होते. ह्याच्यातील लक्षात घेण्यासारखी गोष्ट इतकीच की सतत समोर दिसणारी किंवा सतत चिंतनात असलेली गोष्ट माणसाच्या सुप्त मनावर फार खोल परिणाम करत असते. आणि सतत चिंतनात असलेल्या गोष्टीप्रमाणे बनविते. देवात सतत दिसणारी अन्नपूर्णाही नवीन सुनेला चार पदार्थ करून ते सर्वांना खाऊ घालण्याची उर्मी निर्माण करत असते. असो.

              अग्नी आणि त्याच्या ठिणग्याही अग्नीच असतात. ठिणगी छोटी असली तरी ती अग्नीचे सर्व गुणधर्म अंगी बाणून असते.  छोटीशी ठिणगी अंगावर पडली तरी भाजणारच. त्याप्रमाणेच देवातली पळी घेऊन बसलेली अन्नपूर्णा विश्वात्मक, एका मोठ्या शक्तीचं प्रतिक आहे. त्या विश्वात्मक शक्तीची सर्वांना रुचेल भावेल अशी स्त्रीरूपातील प्रतिमा आहे. कोणती ही विश्वात्मक शक्ती?

                आपल्या देशातील पर्वत, नद्या, आरण्ये, सरोवरे ह्या सर्वांचा फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीवर अगदी खोल ठसा उमटला आहे. श्रीकृष्णाने गायींना चारा, पाणी मिळवून देणार्या गोवर्धन पर्वताची पूजा सुरू करून पर्वतालाही देवत्व बहाल केलं. भारतभूमीला आपण पूर्वीपासून देवभूमीच संबोधतो. आपल्या मातृभूमीचा, भारतभूमीचा उल्लेख माता असाच करतो. ह्या सुजला सुफला अशा मातृभूमीला शत शत वेळा वंदन करतांना बंकीमचंद्रांची लेखणीही वंदे मातरम् --- हे गीत लिहून गेली. यदुनाथ भट्टाचार्यांच्या (जे रविंद्रनाथांचे संगिताचे गुरू होते) सूरांनी ते पैलू पाडलेल्या हिर्यासारखं चमकू लागलं; आणि कोटी कोटी हृदयांच्या कोंदणात स्यमंतक मण्यासारखं ते कायमचं विराजमान झालं.

रोज सकाळी उठल्या उठल्या ``पादस्पर्शं क्षमस्व मे ’’ म्हणून ज्या धरणीमातेला वंदन करतो,  तिची क्षमा मागून दिवसाची सुरवात करतो---- त्या पृथ्वीचं सुंदर वर्णन आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी श्री आद्यशंकराचार्यांची रचनाही अशीच सुंदर आहे ती म्हणजे---- अन्नपूर्णास्तोत्र !

आपण नेहमी स्तोत्र जाणून घेतांना पहिल्या श्लोकापासून सुरवात करतो. आज ही नेहमीची परिपाटी बदलून आपण अन्नपूर्णास्तोत्राच्या सातव्या श्लोकापासून सुरवात करत आहोत. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन मग त्यांना भाषण करायला सांगतात. तसं काहीसं हे आहे. अन्नपूर्णेचा परिचय करून घेऊन मग स्तोत्रातील तिच्या स्तुतीकडे वळू या. अन्नपूर्णा स्तोत्राच्या सातव्या श्लोकात आचार्यांनी ही अन्नपूर्णा कोण ते सांगितले आहे.

उर्वी म्हणजेच भूमाता, पृथ्वी सर्वच प्राणीमात्रांचा आश्रयस्थान आहे. तीच सर्व जनांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी आहे. सर्वांची ती मोठ्या प्रेमाने काळजी घेत असते. तिच्या ऐश्वर्याला काही सीमा नाही. ती सर्व शक्तिसम्पन्न, अत्यंत समर्थ आहे. आपल्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही तिचीच कृपा आहे. ज्या गोष्टीला पृथ्वीवर अस्तित्त्व आहे ती गोष्ट आपण वापरू शकतो ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवता ही धरणीमाता आपल्याला सतत पुरवत असते. म्हणूनच आपण तिला धरणीमाता म्हणतो. आईच असं वागू शकते. एकदा आई ह्या व्यक्तीरूपात आपण भूमातेला पाहिलं की गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा त्रिवेणी संगम तिच्या तिनपेडी काळ्याभोर घनदाट वेणीसारखा दिसू लागतो. काळीभोर नागिणीसारखी वेणी असलेली ही ऐश्वर्यसम्पन्न माता, काळीशार जमीन असलेली आमची भूमाता आम्हाला सातत्याने अन्नदान करत असते. कोणालाही ती कधी उपाशी ठेवत नाही. तिचं अन्नाचं कोठार हे संपणारं आहे. पदार्थविज्ञानात output हे कायम input पेक्षा कमी असतं; असं शिकवलं जातं. म्हणजे100 ग्रॅम कणकेच्या पोळ्या बनवल्या तर पोळी लाटतांना लावायला लागलेलं थोडतरी पीठ वाया जातच आणि प्रत्यक्ष बनलेल्या पोळ्यांमधे 100 ग्रॅम कणकेपेक्षा नेहमीच थोडी कमी कणिक असते. कुठल्याही मशिनच्या input पेक्षा output हे कायमच कमी असतं. पण पृथ्वी एकच अशी आहे की जिच्यात एक दाणा पेरला तर ती हजारपट जास्त देते. मानवाच्या, प्राणीमात्रांच्या, सर्व भूतमात्रांच्या कल्याणासाठी सतत एवढी सजग असणारी भूमातेशिवाय दुसरी कोण असू शकेल?

           तिने दिलेल्या अपरिमित साधन सम्पत्ती, ऐश्वर्याचा उपभोग घेतल्यानंतर तृप्त तृप्त झालेल्या मनात कोणतीही कामना कशी बर शिल्लक राहील? पोट भरलं की माणूस समोर असलेलं ताट दूर सारतो. त्याप्रमाणे तृप्ततेतून मनात अंकुरलेली सहज ``आता पुरे’’ ही भावना म्हणजेच मोक्ष. ``हे माय मी तृप्त आहे. आता मला अजून काही नको. `इदं ममम्हणत मी तुझं तुला सर्व काही परत करतो. हे शरीरसुद्धा! ज्या पंचमहाभूतातून हे उभं राहिलं त्यातच ते विलीन होवो.’’ ही त्यागभावना हाच मोक्ष! सर्व कर्मातून आलेली स्वाभाविक  अलिप्तता म्हणजे मोक्ष!   संसारापासून मनानी निवृत्त होणं, सुटत सुटत जाणं --- हा मोक्ष हे माय तू प्राणीमात्रांच्या मनात उत्पन्न करतेस. 

सर्वांचं कल्याण करण्यासाठी तू कटिबद्ध आहेस. ``काश्यते सा काशी’’ म्हणजे जी सतत उजळलेली आहे, जी सतत चमकत असते अशा काशीची तू अधिष्ठात्री देवता आहेस. वैराग्य आणि ज्ञान हे काशीच्या मातीचे गुण आहेत. वैराग्य आणि ज्ञान ह्या श्रेष्ठ गुणांनी ही भूमी पावन झाली आहे.

हे जननी, एखादी गोष्ट मागायची तर ती त्या व्यक्तीकडे असणं जरुरी आहे. त्या व्यक्तीला आपल्याबद्दल आपुलकी पाहिजे आणि त्या व्यक्तीची ती वस्तू द्यायची दानतही पाहिजे. थोडक्यात ती व्यक्ती ऐश्वर्यसम्पन्न ही पाहिजे, प्रेमळ पाहिजे आणि निर्मोही पण पाहिजेच. माय तुझ्या इतकं ऐश्वर्य अजून कोणाकडे असणार? ``मी सम्राट, मी धनी’’ म्हणणारेही तुझ्या भूभागावरील एका कोपर्यात तुच्छ किड्यासारखे कणभर ऐश्वर्याला ``माझं माझं’’  म्हणत कवटाळून राहत असतात. त्यांच्यापुढे मी काय म्हणून हात पसरू? तुझ्या जवळ मी भिक्षा मागतो. हे माय माझ्या झोळीत भिक्षा घाल--- ज्ञान आणि वैराग्याची. ज्ञानाइतकं ऐश्वर्य दुसरं काही नाही आणि वैराग्याइतका दुसरा थोर गुण नाही. ज्याच्या मनात कुठलीच गोष्ट मिळविण्याचा हव्यास नाही, लोभ नाही ज्याला कशाचाच मोह पडत नाही. तोच जितेंद्रिय होतो. सहाही षड्रिपू तो जिंकून घेतो. ज्याच्या मन ताब्यात त्याच्याच ताब्यात त्याची इंद्रियं असतात. ज्यानी मनावर, इंद्रियांवर विजय मिळवला त्याला भय कसलं? हे माते तुझ्याइतका इंद्रियनिग्रह दुसरा कोण शिकवेल? क्षणोक्षणी आम्ही तुझ्यावर पदाघात करतो, तुला त्रास देतो पण तुझी क्षमाशीलता कधीही लयास जात नाही.

 तुझ्या जवळचं सर्वात महान ऐश्वर्य  म्हणजेच हे ज्ञान आणि दुसरं म्हणजे तुझं हे निर्मोहीपण, निर्लेप मन माझ्या झोळीत घाल माय! वैराग्याला चिकटलेलं ओशाळेपण, लाचारी ज्ञानामुळे दूर होते. तुझ्या दारात झोळी पसरून मोठ्या आत्मविश्वासाने जराही ओशाळेपण येता मी तुला पुकारत आहे  भिक्षां देहि ।  मी तुझा मुलगा तुझ्या समोर उभा आहे. तू परम दयाळू आहेस. लेकरावर तू प्रेमाचा वर्षाव नाही करणार तर अजून कोण करेल? हे भूमाते, हे अन्नपूर्णे, हे जगज्जननी

भिक्षां देहि ! माझ्यावर कृपा कर.

 

उर्वी सर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी

वेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी

साक्षान्मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी।।7

( उर्वी - विस्तृत जमीन, भूमि वेणि: किंवा वेणी - केसांची वेणी किंवा गंगा यमुना सरस्वती नद्यांचा संगम जय -  इंद्रियनिग्रह किंवा विजय )

भूमाता अति वंद्य थोर असशी संपन्न तू श्यामला

माते  नित्यचि अन्न हे पुरविसी तू जीवसृष्टीस या

गंगा थोर, सरस्वती यमुना ह्या निम्नगांनी तुझी

काळीभोरचि गुंफिली त्रिपदरी वेणी अती साजिरी।।7.1

 

मोक्षाचा पथ दाविसी मुनिजना कल्याण त्यांचे करी

  तूची संयम निग्रहास शिकवी साफल्य दे जीवनी                                              

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।7.2

--------------------------------------------------------------------

अन्नपूर्णास्तोत्रम्

श्लोक 1

देवीला अयोनिजा  म्हटल्याचा वारंवार उल्लेख येतो. त्याचा अर्थ इतकाच की देवी ही शक्तीस्वरूप आहे. शक्ती दाखवता येत नाही पण तिचा परिणाम दिसून येतो. तिच्यामुळे होणारे बदल  हे दृश्य असतात.  उष्णता दाखवता येत नाही पण तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात उष्णता आहे हे जाणता येतं. प्रकाश दिसत नाही पण प्रकाशामुळे दिसतं. सौंदर्यलहरींच्या पहिल्याच श्लोकात आद्य शंकराचार्य म्हणतात,                                

शिवाला शक्तीची जरि मिळते जोड लवही

तरी येई त्याला बहु विकलता पांगुळवि जी

कराया कृत्ये वा सहज घडण्या स्पन्दन-गती

असे का शक्तीसी तिजसमचि पर्याय जगती ।। 1.1

कुठलंही काम होण्यासाठी, करण्यासाठी आपल्यालाच काय देवांनाही शक्तीची जरुरी असते. ह्या शक्तीमुळे वेगवेगळी कामं साध्य होतात. हे जननी तू शक्तीस्वरूप आहेस. विविध प्रकारच्या शक्ती ही तुझी रूपं आहेत. मनोनिग्रह, मनोबल, मनाला उभारी, आनंद देणारी शक्ती तू आहेस संघशक्तीही तूच आहेस. शक्तींचे अनेकविध प्रकार आहेत जे सारे सारे तुझ्यात सामावलेले आहेत.

नित्यानन्दकरी -

      उचलून एखदी गोष्ट दिली तर त्याचा आनंद फार काळ टिकत नाही. पण तीच गोष्ट बनवायला, तयार करायला शिकवली तर त्यामुळे मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा वा कायम स्वरूपाचा असतो. एखादा रुचकर पदार्थ बनवून मुलाला दिला तर त्याने होणारा आनंद तेवढ्यापुरताच असतो. पदार्थ संपला की आनंदही संपतो. तोच पदार्थ आईने त्याला बनवायला शिकवला तर तो आयुष्यभर स्वतः बनवून घेऊ शकतो. जणु आनंद निर्मितीचं तंत्र आईने त्याला  सांगितलेले असते. वडिलांनी दिलेले पैसेही क्षणकाळ आनंद देऊन संपून जातात पण चांगली विद्या ऐश्वर्याचा स्रोत तयार करते.

              अन्नपूर्णा तिच्या भक्तांना क्षणकाल आनंद देता नित्य आनंदाची  जणु निस्यंदिनीच देते. ती स्वतःच सतत आनंदाने संपृक्त आणि जिच्यातून सतत आनंद पाझरत आहे अशी आनंदाची निस्यंदिनी आहे. आनंदकद वा आनंदरूपच आहे. अशी ही आनंदकंदरूपी अन्नपूर्णा ज्याच्या मनात सतत निवास करत असेल; ज्याने आपल्या मनाच्या मातीत ही आनंदकंदरूपी अन्नपूर्णा पेरली अशा भक्ताला अर्थातच आनंदाला काय तोटा? 

साळीचिया बीजाबळे साळ येते जन्मा कळे 

 केळीतून येते केळे आनंदकंदातून आनंद  ।।

वराभयकरीवर अभयकरी -

``अभय’’ ही सुद्धा बाहेरून हातात देण्यासारखी गोष्ट नाही तर ती हृदयातून निर्माण होणारी प्रक्रिया आहे. भक्ताला ही अन्नपूर्णा असं वरदान देते की भक्त ह्दयातूनच भयरहित, निर्भय, निडर होतो. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी घातलेल्या खतामुळे झाडाची प्रतिकारशक्ती आतूनच वाढते. मुळाला घातलेल्या पाण्याने पाने तरारून येतात; वरतून पाणी शिंपडून नाही. त्याप्रमाणे हे असं कुठलं वरदान आहे असं कुठलं मागणं  आहे जे वररूपात दिल्यावर भयभावना नाहिशी होते? अभयाचं वरदान मिळविण्यासाठी वैराग्याची , ज्ञानाची याचना करावी लागते. ज्ञान नसेल तर वैराग्य लाचार बनवतं.  ज्ञानानी परिपूर्ण वैराग्यच माणसाला निर्भीड बनवतं. आपल्या आईचं निर्लेप, निर्मोहीपण आचार्य भिक्षेत मागून घेत आहेत.

प्रालेयाचलवंशपावनकरी-

            ईश्वर जरी सर्वत्र असला तरी जेथे जेथे शक्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, भव्यता हे गुण प्रकर्षानी दिसून येतात, तेथे तेथे देवत्वाचा वास असतो. त्या ईश्वराच्या विभूतीच असतात. म्हणजे ईश्वराची रूपेच असतात. भव्य हिमालयात खळाळणार्या नद्या असोत वा तेथील निसर्गसृष्टी असो वा तेथील आसमंतात भरून राहिलेलं भारून टाकणारं वातावरण असो; तीच पर्वतराज हिमालयाची पुत्री. भूमातेचं हे मनोहर रूप आहे.  प्रालेयाचल म्हणजे हिमालय. हिमालय पुत्री पार्वती, जगज्जननी आहे. आपल्या पित्याच्या कुळाला प्रतिष्ठा मिळवून देणारी आहे. जेव्हा पिता आपल्या कर्तृत्त्ववान आपत्याच्या नावाने ओळखला जातो तेव्हा तो त्याचा सर्वोच्च सन्मान असतो. हिमालयाला तो सन्मान त्याच्या मुलीने, पार्वतीने मिळवून दिला आहे. सर्व पातकांचा, दुष्ट, वाईट बुद्धीचा ती नाश करते.

सौन्दर्यरत्नाकरीसमुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आली. अशी ही पृथ्वी सौंदर्याचा रत्नाकर आहे. तिच्या बाह्य सौदर्यासोबत माणसाला निरामय आनंदी जगण्यासाठी लागणार्या अनेक वस्तूंची ती खाण आहे.

निधूर्ताखिलघोरपापनिकरी - लोकांचं दारिद्र्य, दुःख, मनाची मरगळ, दुर्विचार, हताशपणा, उदासी, सर्व सर्व दुःखाचं कितीही मोठं बोचकं असलं; अगदी डोंगरांएवढं जरी मोठं असलं तरी ते सर्व ही अन्नपूर्णा  धुवून टाकते. अहो! प्रत्यक्षमाहेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष महेश्वराची पत्नी आहे ती. ज्याच्यावर राजाची कृपा होईल तो का दरिद्री राहील? इथे तर विश्वेश्वराची अर्धांगिनी हीच जर मला माता म्हणून लाभली तर मी अनाथ, असहाय्य कसा राहीन?

नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी

निधूर्ताखिलघोरपापनिकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।

प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।1

( वराभयकरी - वर  अभय करी - वर आणि अभय देणारी प्रालेयम् -  हिम,  प्रालेय + अचल = प्रालेयाचल -  हिमालय निकर: - ढीग, समूह,संग्रह )

जाई वाटत हर्ष, प्रेम, अभया भक्तांस तू सर्वदा

त्यांचे पूर्ण करी मनोरथ सदा माते तुझी ही कृपा।

हे लावण्य तुझे मला गमतसे रत्नाकराच्या समा

नाही पार तया, विशाल इतुके हे  नित्यची नूतना।।1.1

 

पापांचे धुवुनीच पर्वत महा  भक्ता करी पावना

प्राणाहून असेचि तू प्रिय शिवा, माहेश्वरी  सर्वदा

झाला धन्य पिता तुझा हिमगिरी घालून जन्मा तुला

सारा वंशचि दिव्य हा तुजमुळे हे पार्वती शैलजा।।1.2

 

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।1.3

--------------------------------------------------

       अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 2  

              एखाद्या असीम गोष्टीचा वापर करता येत नाही.  नदीभर पाणी वाहत असलं तरी पिणार्याला छोटं भांडभरच पाणी लागतं. समुद्रात असलेल्या अपरिमित पाण्यातून ढग जेव्हा थोडस पाणी घेऊन येतो आणि सर्वत्र पावसाच्या रूपात देतो तेव्हाच ते वापरता येतं. संपूर्ण पृथ्वीची कल्पना करणं अवघड जातं. म्हणून आपण आपल्या देशापुरत्या मर्यादित भूभागाचा विचार करतो. पण तोही भूभाग विस्तृत असल्याने आपण एका सुंदर मूर्तीरूपात ह्या धरित्रीला पाहतो. भारतमातेच्या रूपात तिचं चिंतन करतो. पर्वतपुत्री नदी वा पर्वतापासून मिळणार्या निसर्गाला पार्वतीच्या रूपात चित्रबद्ध करतो. चिंतनाला सोपं करतो. आईच्या रूपात पाहून एक नैसर्गिक प्रेमळ नातं तयार करतो.

                  आपल्या ह्या धरणीमातेचं सौंदर्य काय वर्णन करावं? आपण जशी शितावरून भाताची परीक्षा करतो त्याप्रमाणे पृथ्वीवरील भारतभूमीचं जरी सौंदर्य पाहिलं तरी सार्या अवनीवरील वैविध्याची कल्पना येईल. ह्या धरणीवर हिरे माणिक, पाचू, वैडूर्य अशा अनेक रंगी नाना रत्नांचे साठे किती अलौकिक आहेत. संस्कृत मधल्या विचित्र ह्या शब्दाचा अर्थ रंगीत, रंगीबेरंगी असा होतो. तर विडम्बमान म्हणजे शोभून दिसणे, अलंकृत होणे असा आहे. विविधरंगी नवरत्नांच्या खाणींनी ही धरणी सम्पन्न आहे. तसेच ही भूमी केवढ्या जैव वैविध्यानेही नटली आहे - - - तीही रत्नेच. सतत नवनवी नररत्ने येथे जन्म घेत असतात. शेवटी ``एकाहुन एक सही जगामधी थोरपणाला मिरवु नको’’ असं कवीलाही सांगावं लागतं.               

               आपली भारतभूमी गंधवती आहे. भारताच्या उत्तरेला काश्मीरला केशर कस्तुरीनी भारत समृद्ध आहे. काश्मीर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थच केशर असा आहे. तेथील कस्तुरीमृगं ही तर भारताची अलौकिक ठेव आहे.  पश्चिम घाट चंदन, कर्पूर वृक्षांनी नटला आहे. तर पूर्व व इशान्य भारत सुवासिक आगर/ आगरू ने समृद्ध आहे. भारताला भारतमाता ह्या व्यक्तीरूपात पाहिलं तर असं वाटावं की भारत मातेने कपाळावर केशर-कस्तुरीचा मळवट भरला आहे. अंगावर चंदन, आगर ह्यांची उटी लावली आहे. भारतावर असलेली सूर्यकृपा इतर देशांवर नाही. तेथील प्रचंड थंडी भारतात सीमित स्वरूपात आहे. भारताच्या माथ्यावर सूर्यकिरणांचं असलेलं आकाशाचं सुवर्ण छत्र म्हणजेच जणू अन्नपूर्णेच्या शिरी सतत विराजमान असलेली सुवर्ण मेघडंबरी. (हेमाम्बराडम्बरी). सोनेरी कोवळ्या सूर्यकिरणांचं विणलेलं अद्भूत वस्त्र माझी भारतमाय ल्यायली आहे. 

           भारतात कांची ही हजारो हजारो वर्ष उत्तम पोताच्या रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध नगरी आहे. आकर्षक रंगसंगती, त्यात गुंफलली खर्या सोन्या चांदीची जर; त्यामुळे हया साड्या ललनांनाच मोहवून टाकतात असं नाही तर किमान हजार वर्षापूर्वी श्री आद्य शंकराचार्यांनी त्रिपुरसुंदरी स्तोत्रात पार्वतीच्या अंगावर कांचीची आकाशी रंगाची साडी असून त्यावर लालबुंद बुट्टे असल्याचे केलेलं वर्णनही आश्चर्यकारक वाटतं.  जरीचा बुट्टीदार शालू जणु ह्या अन्नपूर्णेने धारण केला आहे. भारतभूमी फक्त निसर्गानेच नटली नसून हजारो वर्षार्पूर्वीपासून उद्योगधंद्यांमधेही अग्रणी आहे ह्याची ग्वाही ही स्तोत्रे देऊन जातात.

           जलस्त्रोतांनी समृद्ध असलेल्या ह्या भारतमातेच्या वक्षावर गंगा, यमुना ह्या नद्यांसारख्या अनेक नद्या मोत्याच्या सरांसारख्या शोभून दिसत आहेत. सागरातून निर्माण होणारे टपोरे मोती असोत वा समुद्रातील जलचर सृष्टी असो हे सर्व जण पृथ्वीला सुंदर नटवत असतात. जणु भारतमातेची किंवा सपूर्ण पृथ्वीचीच असलेली सुंदर प्रतिमा ! - - ही अन्नपूर्णा गळ्यात मोत्याचे सर घालून अंगावर सोन्यामोत्याचे दागिने घालूनच सजली आहे.  ही सुंदर पृथ्वी, ही सौन्दर्यशाली माझी भारतमाता मला वंदय आहे. जेथे विद्या विनय सम्पन्न एकाहूनही एक असे श्रेष्ठ विद्वान, पंडित राहत असल्याने जी काशी विद्वत्तेच्या तेजानी उजळून निघाली आहे अशा काशीची अन्नपूर्णा पार्वती ही अधिष्ठात्री देवता आहे. तेथे तिचा वास सतत असतो. ``हे माते! हे अन्नपूर्णे मी तुझा मुलगा तुला भिक्षा मागतो आहे. मला तुझ्या कृपेची भिक्षा घाल.’’

नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी

मुक्ताहारविडम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी

काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।2

( विचित्र -  निरनिराळ्या रंगांचे मुक्ताहार-  मोत्यांचे हार विडम्बमान - शोभून दिसणे काश्मीर - केशर आगर - एक सुवासीक  पदार्थ )

मोत्यांचे  अति पाणिदार रुळती कंठी तुझ्या हार हे

हाती कंकण बाजुबंद, कटिसी ही मेखला शोभते

सोनेरी वसनात मूर्ति तव ही मोही मना माय गे

अंगी चंदन कस्तुरी उटि तुला ही केशराची रुचे।।2.1

 

पाचू माणिक पुष्कराजचि हिरे सिंहासना भूषवी

सोन्याची झळके प्रभावळ तया तैसीच आडंबरी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।।।2.2

------------------------------------------------------

       अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 3 

योगानन्दकरी -

           योगः कर्मसु कौशलम् अत्यंत एकाग्रतेने, कौशल्याने, बिनचूक केलेलं विहीत काम म्हणजेच योग. वा काम बिनचूक अत्यंत योग्य होण्यासाठी जी एकाग्रता, मनोनिग्रह लागतो तोही योगच. विहित काम म्हणजे स्वतः निवडलेलं वा काही वेळेला स्वतःला दुसरा पर्याय नसल्यानेही स्वीकारलेलं पण  समाजाला घातक नसलेलं, समाजाला पूरक असलेलं, समाजाच्या कल्याणाचं काम. जेव्हा माणूस अशाप्रकारे तन मन लावून अत्यंत उत्साहानी तहान भूक हरपून हे काम करतो तेव्हा त्याला जगाचाच विसर पडतो आणि पर्यायाने दुःख, दैन्य ह्या पीडा देणार्या गोष्टी त्याच्या मनःपटलावरूनही दूर जातात. अशा  काम करण्यातून निर्माण होणारा आनंद हा पराकोटीचा सुंदर असतो. तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हा आनंद माता अन्नपूर्णेश्वरी भक्ताच्या हृदयात उत्पन्न करत असते. ते काम तडीस गेलं तरी वा नाही तडीस गेलं तरी तो माणूस आनंदानी संपृक्त झालेला असतो.

रिपुक्षयकरी -

                      शत्रू जेवढे बाहेर असतात त्याहीपेक्षा जास्त शत्रू आपल्या मनातच दबा धरून बसलेले असतात. आळस, राग, लोभ, मोह, मत्सर, क्रोध यांनी माणूस जेवढा जर्जर झालेला असतो तेवढा कदाचित बाहेरच्या शत्रूंनी झालेला नसतो. जो यम नियमांच्या मार्गावरून जात असतो त्याला इतरजण हसले, त्याला वेडं ठरवलं  तरी त्याला फरक पडत नाही. यामुळे बहुतेक शत्रूंचा नायनाट हा तेथेच होतो. प्रत्यक्ष अन्नपूर्णेची कृपा झाल्यावर मनाला जी प्रचंड उर्जा लाभते, काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळते, कुठलंही काम करायला सदोदित तयार असलेलं मन लाभतं; त्यामुळे संकटं आलेलीही त्या भक्ताला जाणवत नाहीत. वरदानंद भारती कयम एक उदाहरण द्यायचे की, प्रियकराला भेटायला आतुर झालेली तरुणी रस्त्याने जात असतांना वाटेतच एक जण खाली वाकून नमाज पढत होता. ती तरुणी त्याच्या पाठीवर चढून उतरून पुढे जाते. जेव्हा तो त्या तरुणीबद्दल तक्रार करतो. त्या तरुणीला बोलावलं जातं. आपण असं कोणाच्या पाठीवरून चालत गेलो हे तिला जराही आठवत नसतं. वाटेत खड्डे आले का दगड आले हे मला काहीच माहीत नाही असं ती सांगते. शेवटी न्यायाधीश म्हणतात, ``अरे, तू नमाज पढत होतास म्हणालास पण खर तर तुझंच लक्ष नमाज पढण्यात नसल्याने ही तरुणी तुझ्या पाठीवरून गेल्याचं तुला जाणवलं, लक्षात राहिलं. त्याउलट ह्या तरुणीला प्रियकराला भेटण्याशिवाय कशाची जाणीव राहीली नाही. ’’ नदी सागराला भेटायला जातांना वाटेत कडे आहेत का अत्यंत अवघड डोंगर आहेत ह्या कश्या कश्याचा तिच्या वाहण्यावर परिणाम होत नाही जेथे डोंगर येईल तेथे ती सहज डोंगर फोडून काढते. जेथे कडा असेल तेथे वरतून उडी घेते. लोकांसाठी तोच मनोहर प्रपात ठरतो. ही संकटांवर मात करणारी मनोहर वाटचाल संकटांची दखलही घेत नाही.

   धर्मैकनिष्ठाकरी -         

भगवान श्रीकृष्ण गीतेत दुसर्या अध्यायात सांगतात, 

एकदा का तुझा कर्तव्याचा निश्चय दृढ झाला की तुझं मन, तुझी मति कधीही अस्थिर होणार नाही. अशी निश्चयात्मिका बुद्धी कायम एकच असते. ज्यांचा त्यांच्या कर्तव्याबद्दलचा निश्चय पक्का नसतो त्यांना कधी असं करावं तर कधी तसं करावं असं वाटत राहिल्याने त्यांच्या निश्चयाला असंख्य फाटे फुटतात. कुठलीच गोष्ट ते तडीस नेऊ शकत नाहीत.

तू तुझं अंतःकरण तुझ्या स्वाधीन ठेव. खंबीर रहा. मनावर ताबा ठेव. सुख, दुःख, हर्ष शोकात त्याला लडबडू देऊ नकोस.  अंतःकरणात असलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन असलेलं तुझं मन कधीही भरकटत जाणार नाही. तू कोण काय म्हणेल? ह्या उथळ विचारांच्या डबक्यातून बाहेर पड. मग स्थिरचित्त परमात्म्यामधे लीन होता तुला विशाल, काठोकाठ निर्मळ जलाने भरलेल्या सरोवरात आल्याची अनुभूती येईल. एकदा का तुझा निश्चय पक्का झाला की, मला हे मिळायला पाहिजे होतं, मीच ते मिळण्यास योग्य असतांनाही हेच का माझ्या नशिबात असे प्रश्न तुला पडणार नाहीत.

जी तुझ्या आणि तुझ्याच स्वाधीन आहे अशी दृढमति, निश्चयात्मक एकमेव दृढबुद्धी तीच योगस्थिती समज. अशा प्रकारे योगस्थ झाल्यावर एखादि गोष्ट साध्य झाली किंवा साधली नाही तरी मन विचलीत होत नाही. सुखाची आसक्ती संपते आणि दुःखाचा तिटकारा किंवा शोकही संपतो. येणारी उद्विग्नता लयास जाते. तरंगहीन पाण्याप्रमाणे मन निश्चल होतं. दिवा निवांत स्थळी ठेवला की जसा फडफडत नाही तसं मनाचं भिरभिरणं, अस्वस्थता, कोलाहल सार सार संपतं.

          हाच मार्ग श्री अन्नपूर्णा भक्तांना दाखवत असते. हीच स्वधर्माबद्दल असलेली निष्ठा.  धर्म म्हणजे नियमानी वागणं.

चन्द्रार्कानलभासमानलहरी

            अन्नपूर्णेच वर्णन करतांना आचार्य म्हणतात तिची कांती तेजस्वी असली तरी कधी चंद्राप्रमाणे सौम्य तर कधी सूर्यासारखी तळपणारी तर कधी अग्नी ज्वालांसारखी धगधगणारी आहे. तेजाची लवलवती रेषा ह्या रूपात कुंडलीनी जागृत होणार्या योग्यांना ती स्वतःच्या देहात प्रत्ययाला येते.

 तप:फलकरी - जो वर सांगितल्याप्रमाने काम करतो त्याला फळाची अपेक्षा नसली तरी अन्नपूर्णा त्याच्या कामाचं फळ त्याच्या पदरात नक्की टाकते. शिवमहिम्नात पुष्पदंत गंधर्व म्हणतो, ``हे शिवा काम करून पूर्ण होतं तेव्हा त्या कामाला अस्तित्त्व शिल्लक राहिलेलं नसत. जे अस्तित्त्वात नाही त्याचं फळ कसलं? पण तरीही तू भक्ताच्या कामाची नोंद ठेऊन त्याला योग्य फळ आपणहून देतोस. तप करणारयाला  पुढे काय होईल हे माहीत नसतं. पण तरीही तो त्या तपातून अन्नपूर्णेपर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो. अन्नपूर्णाही तिच्या भक्ताला योग्य फळ देऊन कायम तुष्ट करते. आणि धर्मानी वागणार्यांचं रक्षणही करते.

 अशा अन्नपूर्णेला आचार्य म्हणतात, हे माय माझ्यावर तुझी कृपा असली तर अजून काय पाहिजे ? मला हात धरून तू चालवत असलीस तर तू मला अयोग्य मार्गावर कशी नेशील? माय माझ्या झोळीत भिक्षा घाल. मी तुझ्या दाराशी उभा आहे. तुला साद घालतो आहे. भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।

 

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरी

चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।

सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।3

 

होता तन्मय चित्त जे मिळतसे सारे समाधीसुखं

योगाचे सुख ते मिळे तुजमुळे माते अनायास गं

नाशी भीषण शत्रु तूच सहजी निर्धोक मार्गा करी

ठेवी तेवत सेवका हृदि सदा तू धर्मनिष्ठा भुवी।।3.1

 

तेजस्वी सवित्यासमान कधि वा चंद्रासमा शीतला

वाटे अग्नि शिखा कधी धधकती पाहून माते तुला

तीन्ही लोक असे सुरक्षित सदा माते कृपेने तुझ्या

भक्तांना करिसी प्रदान सगळे ऐश्वर्य तू गे महा।।3.2

 

भक्तांचे तपही फळे तुजमुळे सिद्धी मिळे साधका

आशीर्वाद तुझा सदा मिळतसे जो तोषवी सेवका

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।।।3.3

------------------------------

       अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 4 

                 अन्नपूर्णेचा सर्व जीवन प्रवास मोठा विलक्षण आहे. तिला उमा म्हणतात, `उयते सा उमाम्हणजे जी सर्व विश्व आपल्यात ओवून ठेवते. विश्वातील कुठला लहानसा मणीही घरंगळू न देता, त्याची अबाळ न होऊ देता आपल्या हृदयाशी कवटाळून घेते. सर्वांना आपल्या छत्रछायेत ठेवणारी उमा सर्वांची माऊली होण्याआधीही ऋषी मुनी तिला उमा संबोधत होते ``उऽऽ मा’’ म्हणजे ``अगं नको.’’ कारण ह्या मुलीने अत्यंत खडतर तप आरंभलं होतं. शिव शंभूला प्राप्त करण्यासाठी. दिवसेंदिवस त्या तपाची उग्रताही वाढत होती. शेवटी तर हिमालयाच्या कडेकपारीत राहून ती नुसती वाळलेली पानं खाऊन राहू लागली. तिच्या ह्या तपाकडे पाहून मुनींनाही तिची काळजी वाटू लागली. `` नको गं नको! मुली, इतकी खडतर तपश्चर्या नको करूस. आम्हाला बघवत नाहीत तुझे हाल. म्हणून ते तिला उऽऽऽ मा ! उ ऽऽऽ मा! नको मुली नको’’ असं म्हणू लागले. पण तिच्या दुर्दम्य, दृढ इच्छाशक्तीने तिने शंकरालाही यायलाच लावलं. कैलासाच्या गिरीकंदराला घर मानून राहणार्या ह्या उमेचा शिव शंभूनी स्वीकार केला. आणि शं(कल्याण)  कर (करणारा) कल्याण करणार्या शंकराची ती अर्धांगिनी `शाङ्करीम्हणजे कल्याणीच  झाली. अशा ह्या कल्याणस्वरूप पती पत्नीनी सारं जग आपलं मानंलं. तेच ह्या जगाचे मायबाप झाले. उजाड असलेल्या कैलासावर स्वर्ग अवतरला. हरी, इंद्र, ब्रह्मदेव सार्यांचेच ते घर झाले. अग्नीनंदन  कुमार कार्तिकेयालाही तिने प्रेमाने जवळ घेतलं. तो तिलाच आपली आई मानू लागला. म्हणून तिला कौमारी म्हणू लागले.

           आत्ता पर्यंत व्यक्ती स्वरूपात पाहिलेल्या उमा माऊलीला ज्ञानशक्तीरूपात आचार्य दाखवत आहेत. कोणावरही कृपा करतांना देव त्याला कुठली वस्तू भेट देत नाही तर त्याच्या मनात, त्याच्या हृदयात तशी कुशाग्र बुद्धी उत्पन्न करतो. उमा माऊली भक्तांच्या हृदयात ज्ञानदीप लावून त्यांना वेदांचा अर्थ आकलन होण्याची कुवत निर्माण करते. तिच्या कृपेनेच वेदांचा अर्थ चित्तात प्रकट होतो. उमा माऊलीला जाणायचं असलं, तर ओंकारातून तिला जाणून घेता येतं. ही ज्ञानाकार असलेली उमा `अक्षरीम्हणजे केव्हाही नाश न होणारी अशी आहे. क्षर म्हणजे गळून जाणे. बुद्धीरूप असलेली उमा ही अक्षर आहे. सर्व विद्यांमधे श्रेष्ठ अशी परा विद्या देणारी आहे. ``मी कोण?’’ हयाचं ज्ञान देणारी आहे.  हे ज्ञान मिळणं म्हणजेच मोक्षाचा दरवाजा उघडणं. मोक्षाचा दरवाजा उघडणार्या ह्या काशीच्या अधिष्ठात्री देवतेला आचार्य भिक्षा मागत आहेत तिच्या कृपेची.

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी !

 

कैलासाचलकन्दरालयकरी गौरी ह्युमा शाङ्करी

कौमारी निगमार्थगोचरकरी ह्योंकारबीजाक्षरी।

मोक्षद्वारकपाटषाटनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।4

( उमा -   म्हणजे हे बाळे हे मुली , मा म्हणजे नको. उमा म्हणजे  हे मुली एवढी तपश्चर्या नको करूस कौमारी - कुमार कार्तिकेयाची आई म्हणून कौमारी )

कैलासी गिरिकंदरी तप महा  केलेस जेंव्हा उमे

तेंव्हाबाळ नको करू तप असेसारे मुनी बोलले

इच्छाशक्ति अजोड पाहुन तुझी स्वीकार शंभू करी

तेंव्हा तू गिरिजा तया अवसरी झाली उमा शांकरी।।4.1

 

अग्नीनंदन कार्तिकेय तुजला आई म्हणे आपुली

कौमारी म्हणती म्हणून तुजला सारे अती आदरी

चित्ती ज्ञानप्रदीप लावुन करी सोपाच वेदार्थ ही

सम्यक् ज्ञान चि व्हावया तव उमे ओंकार हा मंत्रची।।4.2

 

मोक्षाची सहजीच तू उघडसी माते कवाडे पुरी

हे निःसीम अगाध प्रेम तव गे वर्षेच भक्तांवरी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।4.3

---------------------------

       अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 5

दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी -

              देव सगळीकडेच असतो. पण काही ठिकाणी त्याचं अस्तित्त्व प्रकर्षानी जाणवत राहतं. जेथे जेथे अस्तित्त्व जाणवतं, त्या परमेश्वराच्या विभूती आहेत. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच तेथे नित्य वास करत असतो.  काही विभूती दिसतात. दृश्य असतात, तर काही दिसत नाहीत म्हणजे अदृश्य रूपात असतात. पण जाणवतात.---  वारा दिसत नाही जाणवतो. सुवास दिसत नाही पण जाणवतो. वसंत ऋतु दिसत नाही पण तरुवेलीना आलेला बहर वसंत आल्याची साक्ष देतो. पोट भरल्यावर मिळणारी तृप्ती दिसत नाही पण जाणवते तशा. ह्या सर्व विभूतींना चालवणारी, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी, त्यांच्याकडून हवं तसं काम करून घेणारी जी ताकद आहे तीच अन्नपूर्णा. सूर्याला तेज, चंद्राला शीतलता, पाण्याला पातळपण देणारी शक्ती.  ही पृथ्वीच काय पण हे सर्व ब्रह्मांड तिच्यात सामावलं आहे. हे ब्रह्मांडाचं अति प्रचंड भांड किंवा ब्रह्मांडाचा हंडा आपल्या उदरात सामाउन घेणारी ही जी अन्नपूर्णारूपी प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद आहे तिच्याबद्दल बोलतांना आचार्य म्हणतात, `` ह्या विश्वाच्या रंगमंचावर चाललेलं हे महाप्रचंड नाट्य लिहीण्याचं कामही हीच शक्ती करते. (लीलानाटकसूत्रलेखनकरी) काही ठिकाणी पाठभेद असून तेथे ``सूत्र खेलन करी’’ असा पाठ सापडतो. म्हणजे ह्या महाप्रचंड नाटकात जे जे काम करत आहेत; म्हणजेच ब्रह्मांडात असलेल्या अनेक आकाशगंगा, ग्रह नक्षत्र सर्व सर्व---,  पृथ्वीवरचे जे समस्त जीव आहेत, ते कठपुतळ्यांसारखे सूत्रानी बांधलेले आहेत. आणि कोणी अज्ञात शक्ती  त्यांच्या दोर्या हलवून तिला पाहिजे तो खेळ त्यांच्या कडून करवून घेते. ही आज्ञात शक्ती म्हणजेच ही माय अन्नपूर्णा होय. ह्या शक्तीमुळेच ह्या ब्रह्मांडात तारे, ग्रह नक्षत्र एकमेकांशी अत्यंत सुंदर रीत्या संधान साधूनही आहेत आणि सर्व नियम कठोरपणे पाळून प्रत्येकाचे अस्तित्त्व टिकवूनही एकमेकांपासून अंतर राखूनही आहेत.

 विज्ञानदीपाङ्कुरी - फार सुंदर शब्द आचार्यांनी वापरला अहे विज्ञानदीपांकुरी! जसा धान्य पेरल्यावर त्याला अंकुर येतो त्याप्रमाणे जो भक्त मनात ह्या शक्तीचं ओंकाररूपी बीज पेरतो, त्याला भक्तीचं पाणी घालतो; त्या भक्ताच्या मनात ज्ञानदीपाचा अंकुर फुटतो. अंकुर वाढतो तसा ज्ञानप्रकाशही वाढत जातो.

   श्रीविश्वेशमन:प्रसादनकरी - एका विवाहित जोडप्याच्या सर्व आवडीनिवडी एकसारख्या असतील अशी सुतराम शक्यता नसते. तरीही एकमेकांच्या आवडींचा  एकमेकांच्या व्यवहाराचा जराही निषेध न करता, त्याला दोष न देता, दुसर्याचं मन जपत त्याला प्रसन्न ठेऊन आपल्याही कार्यात बाधा येऊ देता एकमेकांना पूरक राहणं हे फार आवश्यक आहे. विश्वेश्वर विश्वाचा नाश करण्यासाठी सज्ज  असला तरी त्यावर कुठलीही नाराजी व्यक्त करता पार्वती, अन्नपूर्णा  अथकपणे, कंटाळता तेवढ्याच प्रेमाने परत परत जगाची उत्पत्ती करतच राहते. आणि तिची उत्पत्ती शिवही तेवढ्याच कौतुकाने बघतो. एकमेकांचं मन प्रसन्न ठेवण्याची कला ह्या दोघांकडूनच शिकावी. काही उत्पन्न केल्याशिवाय विनाश करता येणार नाही आणि विनाश झाला तरच काही नवीन बनविता येणं शक्य आहे.

              अशा ह्या काशीपुरीत कायम वास्तव्य करणार्या अत्यंत प्रसन्नचित्त अन्नपूर्णेला, आचार्य  साद घालत आहेत, `` माय! मी तुझा मुलगा तुझ्या दारात उभा आहे.  तुझ्याजवळच्या सर्वोत्कृष्ट गुणांची भिक्षा मागत आहे. माय मला ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा घाल. माय तुझी कृपा असेल तरच ही भिक्षा मिळेल. माय तुझी कृपा कायम माझ्यावर राहू दे.

दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी

लीलानाटकसूत्रलेखनकरी विज्ञानदीपाङ्कुरी।

श्रीविश्वेशमन:प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।5

विभूति - ताकद,महिमा,दैवी शक्ती, देव देवता,

जेथे अंशचि ईश्वरी वसतसे ऐश्या विभूती जगी

काही या दिसतीच दृश्य जगती अदृश्य याची किती

त्यांना तू नित मार्गदर्शन करी सामर्थ्य देसी तया

हा ब्रह्माण्ड-घडा तुझ्याच उदरी आहेच सामावला।।5.1

 

ह्या विश्वात घडेचि जे प्रतिदिनी लीला तुझी श्यामले

विश्वाची नित सूत्रधार असशी तू खेळवी विश्व हे

ज्ञानाचे नित चेतवीच हृदयी स्फुल्लिंग तू  आगळे

मोक्षाचा पथ स्पष्ट हा दिसतसे भक्तांस त्याच्या बळे।।5.2

 

विश्वेशास चि शांतवी कृति तुझी कल्याणकारी महा

त्याचे चित्त प्रसन्न नित्य करिसी मांगल्यदायी उमा

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।5.3

--------------------------------------

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 6

आदिक्षान्तसमस्तवर्णनिकरी -

             अ ते क्ष  पर्यंत वर्णमालेतील कचटतप वर्गातील सर्व अक्षर समूह (निकर); धातू, प्रत्यय, त्यातून निर्माण होणारा सर्व शब्द प्रपंच; त्या शब्दांतून निघणारा नाद व निर्माण होणारा अर्थ प्रपंच; त्या त्या शब्दाशी अनुस्यूत असलेली म्हणजे जोडली गेलेली पदार्थ सृष्टी; शब्दांमुळे शरीराच्या विविध अवयवांना electrical impulses  म्हणजेच किरणांच्या स्वरूपात होणारं पदार्थसृष्टीचं ज्ञान; ह्या सर्व गोष्टी आणि त्या घडवून आणणारी जी म्हणून अदृश्य शक्ती आहे तीच ही अन्नपूर्णा आहे. तिच्यामुळेच सर्व प्राणीमात्रांचा दिनक्रम चालू राहतो. तीच ही वाणीची देवी सरस्वती आहे. कल्याणांच स्वरूप असलेल्या शंभुमहादेवाला ती अत्यंत प्रिय आहे. शम्भुप्रिया आहे. कारण तीही कल्याणस्वरूप शाङ्करी, शिव अर्धांगी आहे.

काश्मीरत्रिपुरेश्वरीअन्नपूर्णा काश्मीरनिवासनी आहे. काश्मीरला देवीचे शक्तिपीठ आहे. तिनही पुरांची ती स्वामिनी त्रिपुरेश्वरी आहे.

त्रिनयनी - शिव आणि पार्वतीला तीन नेत्र आहेत असे म्हणतात. हा तिसरा नेत्र अत्यंत दूरदर्शीपणाचा द्योतक आहे. भूत आणि वर्तमानात डोकावणे, त्याबद्दल काही आडाखे मांडणे हुशार माणसाला शक्य आहे पण भूत आणि वर्तमानाचे योग्य ज्ञान आणि सर्व भूतमात्रांच्या वागण्यावर असलेली मजबूत पकड ह्यामुळेच शिव आणि शक्ती हयांना फार पुढचे भविष्यही जणु सुस्पष्ट दिसत असते. किंवा पुढच्या भविष्याला आकार द्यायचे काम शिव आणि शक्ती सतत करत असतात. म्हणून ते दोघेही त्रिनेत्री आहेत. विश्वेश्वरी - विश्वेश्वराची अर्धांगी असल्याने तीही ह्या विश्वाची जननी आहे. सर्व विश्वावर तिचीच सत्ता चालते.

            तिला शर्वरी म्हणजे कालरात्री म्हणतात. शंकर सर्व संहारक असल्याने त्याला शर्व म्हणतात. त्या शर्वाची पत्नी म्हणून पार्वतीला शर्वरी म्हणतात. त्याचप्रमाणे शर्वरी म्हणजे रात्र. अज्ञानी लोकांना मोहाची झोप आणणारी. झोपविणारी, खरं ज्ञान होऊ न देणारी म्हणूनही तिला शर्वरी म्हणतात. 

स्वर्गद्वारकपाटपाटनकरी

भक्तांना स्वर्गाचा मार्ग दाखवणारी स्वर्ग मिळवून देणारी म्हणजेच मरतांनाही  एक कृतार्थ आयुष्य जगल्याची अनुभूती देणारी, आयुष्यात धन्यता मिळवून देणारी, चित्तप्रसाद देणारी ही माऊली काशी नगरीची ज्ञान वैराग्याची पताका कायम उंच फडकत ठेवते. तिच्याजवळ आचार्य भिक्षा मागत आहेत.-- ``माय, मी तुझ्या दारात उभा आहे. मला भिक्षा घाल. ज्यामुळे माझं ज्ञान, वैराग्य निश्चल होईल, दृढ होईल अशा तुझ्या भक्तीची भिक्षा माझ्या झोळीत घाल.’’

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।

 

आदिक्षान्तसमस्तवर्णनिकरी शम्भुप्रिया शाङ्करी

काश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी।

स्वर्गद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।6

धातू, प्रत्यय, अक्षरे असशी तू वर्णमालेतली

वाणीचे असशीच वैभव खरे तूची अधिष्ठान ही

अर्धांगी शिवशंभुची प्रिय अती प्राणेश्वरी शांकरी

विश्वाची जननी  त्रिनेत्र तव हे माते अलौकीक ची।।6.1

 

स्वर्गाचे नित द्वार तू उघडसी भक्तांस तू शर्वरी

मोहाची दुलईच घालुन सुखे मूढांस तू झोपवी

तूची गे त्रिपुरेश्वरी सुरमणी काश्मीरची सुंदरी

कांती ही तव केशरासम असे तांबूस गौरांग ही।।6.2

 

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया हे अन्नपूर्णेश्वरी।।6.3

--------------------------------------

           सातव्या श्लोकाचं विश्लेषण प्रथम सुरवातीलाच दिलं आहे. स्तोत्राची सलगता रहावी म्हणून येथे  श्लोक आणि त्याचा पद्य अर्थ परत दिला आहे.

 

उर्वी सर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी

वेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी

साक्षान्मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।7

( उर्वी - विस्तृत जमीन, भूमि वेणि: किंवा वेणी - केसांची वेणी किंवा गंगा यमुना सरस्वती नद्यांचा संगम जय -  इंद्रियनिग्रह किंवा विजय )

भूमाता अति वंद्य थोर असशी संपन्न तू श्यामला

माते  नित्यचि अन्न हे पुरविसी तू जीवसृष्टीस या

गंगा थोर, सरस्वती यमुना ह्या निम्नगांनी तुझी

काळीभोरचि गुंफिली त्रिपदरी वेणी अती साजिरी।।7.1

 

मोक्षाचा पथ दाविसी मुनिजना कल्याण त्यांचे करी

  तूची संयम निग्रहास शिकवी साफल्य दे जीवनी                                              

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।7.2

--------------------------------------

             

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 8

श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं खरं पण त्यानंतर अर्जुन म्हणाला, ``हे हृषिकेषा तू परत तुझ्या नेहमीच्या सौम्य रूपातच माझ्यासमोर प्रकट हो. हे रूप पाहून मला भीती वाटत आहे. श्रीकृष्णालाही आपल्या भक्तोत्तमामुळे त्याचं सौम्य परिमित रूपच धारण करावं लागलं. त्याप्रमाणे विश्वाचा प्रचंड हंडा आपल्या उदरात सामावून घेणारी विश्वरूप अन्नपूर्णा कितीही व्यापक असली तरी  एका स्त्रीरूपात, आईच्या रूपात पाहतांना सर्वांनाच विशेष आनंद होतो. ती माय प्रत्येकाला आपली वाटते. अनेकोअनेक रत्नांनी समृद्ध असलेल्या पृथ्वीचं सौदर्य एका माऊलीरूपी स्त्री देहात ओतताच लावण्यवती माय आपल्या नजरेसमोर उभी राहते.

सर्वविचित्ररत्नरुचिरा - माणिक, हिरे पाचुच्या अशा विविध रंगी दीप्तीमान रत्नांलंकारांनी नटलेली. प्रजापती दक्षाची पुत्री असल्याने तिला दाक्षायणी म्हटलं आहे. सर्व अलंकारांमुळे ती सुंदर दिसत आहे का अलंकारांना तिच्या सौदर्यामुळे शोभा आली आहे हे ठरवणं अवघड आहे. वामा म्हणजे अत्यंत डौलदार, मोहक अशी तिची छबी आहे.

          स्वादुपयोधरा - आईचं वात्सल्य अनुभवायचं असेल तर त्यासाठी शिशुच झालं पाहिजे. त्याला मातेशिवाय बाकी जगच नसतं. मातेला अनन्य भावाने पाहात असलेल्या ह्या शिशुवर आई सर्व वात्सल्याचा वर्षाव करते. त्याला प्राणापलीकडे सांभाळते. सती अनसूयेच्या मनातील वात्सल्यभाव पाहिल्यावर ब्रह्मा, विष्णु महेश्वरांनाही आपल्या मोठेपणाचा त्याग करून नवजात अर्भक या रूपात शिशुत्व पत्करावं लागलं. सुहृदहो, स्तोत्रात आलेले देवीच्या स्त्रीदेहाचे वर्णन शिशु होऊन अनन्यभावाने अनुभल्याशिवाय कळणार नाही. जिचं स्तन्य शिशुसाठी अत्यंत गोड , शक्तीवर्धक आहे अशी ही माझी माय आहे. पृथ्वीरूपात पाहिलं तर डोंगरावर उगम पावणार्या नद्यांच स्तन्यस्वरूप पाणी सर्व जीवजंतु पीतात. पाणी पिऊन सर्व प्राणीमात्र संतुष्ट होतात. प्रियकरी - माझी माय स्वादुपयोधरा आहे आणि सर्वांचं प्रिय म्हणजे हित करणारीही आहे.

सौभाग्यमाहेश्वरीसौभाग्य म्हणजे पतीपत्नीतील प्रेम, सामंजस्य, दृढ विश्वास  जो सार्या जगाचं सौभाग्य आहे अशा महेश्वराची तू पत्नी आहेस. तुमच्या दोघांमधील पराकोटीचं सामंजस्य तुमच्या अर्धनारीशवर रूपातून प्रत्ययाला येतं.

 

भक्ताभीष्टकरी -

तू पवित्र आणि कल्याण करणारी आहेस आहेस. भक्तांच्या मनात काय आहे हे जाणून तू त्यांना त्यांच्या मनीचं अभीष्ट देतेस.

दशाशुभहरी - तू भक्तांच्या जीवनातील दहा अशुभ हरण करतेस. दशाशुभहरी - दश अशुभ हरी - दहाप्रकारच्या पापांचा नाश करणारी दश अशुभ - चोरी, हिंसा,परस्त्रीगमन ही तीन कायिक पापे, कठोर बोलणे, खोटे बोलणे, निंदाचहाडी करणे, असंबद्ध प्रलाप ही चार वाचिक पापे तर दुसऱयाचा अपहार करण्याचा विचार करणे, अनिष्ट चिंतन करणे, खोटा अभिनिवेश बाळगणे ही तीन मानसीक पापे मिळून दहा प्रकारची पापे होतात. अशा हे अन्नपूर्णेश्वरी मला भिक्षा घाल असे श्री आद्य शंकराचार्य म्हणत आहेत.  

 

देवी सर्वविचित्ररत्नरुचिरा दाक्षायणी सुन्दरी

वामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।

भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।8

रत्नांचे किति आगळे विविध हे अंगावरी दागिने

लावण्या खुलवी मनोहर तुझ्या हे दक्षपुत्री   शिवे

माते स्तन्य पिऊन अमृतसमा हे विश्व साकारले

सर्वांचे हित पाहसीच सुभगे शंभूस तू आवडे।।8.1

 

भक्तांच्या नित कामना पुरविसी, त्यांनाच तू सोडवी-

सा र्या कायिक, मानसीक अथवा वाचीक पापातुनी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।8.2

--------------------------------------

 

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 9

          घनदाट अंधार कितीही झाडून, झटकून व्हॅक्युम क्लिनर लावूनही जात नाही. तेथे प्रकाश देणारी दिवटीच ठेवावी लागते. तसा मनातील अज्ञानाचा अंधार दूर करायचा असेल तर तेथेही ज्ञानाचा प्रकाश पसरावा लागतो. अन्नपूर्णा ही ज्ञानमय आहे. त्यामुळे स्वयंप्रकाशी आहे. जणु काही कोटी कोटी चंद्र, सूर्य (अर्क) वा धगघगत्या अग्नीप्रमाणे (अनल) ती आहे. ज्याप्रमाणे प्राचीवर सूर्य येताच त्याच्या लाखो, कोटी किरणांमुळे पूर्व दिशा उजळून जाते त्याप्रमाणे ज्ञानरूपी अन्नपूर्णेचा मनाच्या क्षितीजावर उदय झाला की मनातील अज्ञानाचा अंधार क्षणात दूर होतो. सौंदर्यलहरींच्या 21 व्या श्लोकात देवीचं फार सुंदर वर्णन आहे.

जशी विद्युल्लेखा सळसळत जाते उजळुनी

प्रकाशाची धावे क्षणभर जणू निर्झरिणि ती।।

                  अशी ही अन्नपूर्णा  मनात साकार झाल्यावर अज्ञानाची काय शामत आहे तेथे रेंगाळत रहायची. अज्ञानाला स्वतःच अस्तित्त्व कुठे? सौंदर्यलहरींमधेच शिवासोबत शरीरातील कुंडलनीरूपी पार्वतीचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात की ती शिवाच्या मांडीवर बसलेली आहे सोन्याच्या कांबीप्रमाणे वा क्षणार्धात प्रकाशाच्या दीर्घ लवलवत्या रेघेप्रमाणे चमकून भक्तांना ज्ञानप्रकाशाची, मनात उजाडल्याची अनुभूती देते. हा प्रकाश सूर्य, चंद्र अग्नी ह्यांनाही दीपवणारा असतो. तेवढा एक क्षण लाभला तर भक्ताच्या मनात उजाडतं.

अविद्या माया वा सकलचि अहंकार मनिचा

रिपू क्रोधा जैसे मल सकल कामादि मनिचा

धुवोनी केले हे मन विमल ज्यांनी सकलही

तुझ्या ह्या रूपासी अनुभवति ते निर्मलमती ।।

               जी इतरांना निर्मळ करते ती स्वतःही अत्यंत निर्मळ, लोभस, हवीहवीशी वाटणारी आहे. चंद्रकोरीप्रमाणे सुहास्य विलसणारी तिची जिवणी, नुकत्या प्राचीवर आलेल्या सूर्याप्रमाणे प्रसन्न चेहरा आणि लालबुंद ओठ, चंद्र, सूर्याप्रमाणे झळाळती कांती असलेल्या ह्या अन्नपूर्णेच्या कानातील कुंडलही सूर्यचंद्रासारखे तेजस्वी मन प्रसन्न करणारे आहेत.

             तिच्या हातामधील आयुधांबद्दल सांगतांना आदि शंकराचार्य म्हणतात, तिच्या हातात स्फटिकाची माला, ज्ञानदानाचं प्रतिक असलेलं पुस्तक  आहे त्याशिवाय पाश आणि अंकुशही आहे. पाश हा मृत्यूचं प्रतिक आहे आहे. शिव आणि त्याच्या सर्व परिवारातील सदस्यांकडे पाश आणि अंकुश आहे जो बाकी देवांकडे दिसत नाही. यम नियमानी न वागणार्याला विवेकरूपी अंकुशाची टोचणी देणारी ही माय आहे. अत्यंत वत्सल असली तरी ``हृदये कृपा समरनिष्ठुरता’’ अशा दोन्ही भावना अत्यंत निर्लेपपणे सांभाळणारी आहे.

     अशा अन्नपूर्णेला श्री आद्यशंकराचार्य भिक्षा मागत आहेत तिच्या कृपेची!

चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशी चन्द्रांशुबिम्बाधरी

चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।

मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।9

 

जैसे येति सहस्र भानु उदया वा चंद्र  कोट्यावधी

तेजस्वी चमकेचि अग्नि जणु वा तैसीच कांती तुझी

मानेसी कलवून किंचित जशी  येई नभी कोर ती

तैसी ही जिवणी प्रसन्न हसरी शांती भंगे तुझी।।9.1

 

कानी कुंडल हालताचि पसरे दिव्य प्रभा चारु गे

वाटे  तेज समग्र एकवटले भानू शशी अग्निचे

चंद्रार्कास चि ओतुनी मुशिमधे मूर्ती घडे का तुझी

तेजाची पुतळीच तू लखलखे  सर्वांग-तेजोमयी।।9.2

 

माला, पुस्तक, पाश, अंकुश धरी हातात तू वत्सले

माते तू उपकार थोर करिसी कीर्ती तुझी सांगते

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।9.3

--------------------------------------

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 10

क्षत्रत्राणकरी - जे सर्व समाजाचं रक्षण करतात त्यांना क्षत्रिय म्हटलं आहे. हे जातिवाचक नसून कृतीवाचक आहे. त्यामुळे सर्व सैन्य व त्यातील सैनिक, अधिकारी हे क्षत्रिय म्हटले पाहिजेत. त्राण म्हणजे म्हणजे रक्षण करणे. (उदा. पायांचं रक्षण करतात म्हणून पादत्राण)  रणांगणावर लागणारं शौर्य आणि कितीही बिकट परिस्थिती असली तरी शौर्याच्या जोडीनी लागणारं धैर्य मनात निर्माण करण्याचं काम ही अन्नपूर्णा करत असते. रणांगणावर योद्धयांचं रक्षणही तीच करते. सियाचन सारख्या अत्यंत खडतर जागीही सैनिकांचे मनोबल उंच ठेवण्याचे काम ती करते.

                ही महाभयहरी आहे. सर्वात मोठं भय हे मृत्यूचे भय. मनातून मृत्यूचेही भय घालवणारी ही पार्वतीमाय जरा इतिहासात डोकावून पाहिलं तर ठायीठायी आपल्याला प्रत्ययाला आली आहे. ``आधी लगिन कोंडाण्याचं’’ म्हणतांना तानाजीला निर्भय करणारी हीच रणरागिणी पार्वती माय आहे; आणि शिवाजीमहाराज विशाळगडावर पोचेपर्यंत घोडखिंड आपल्या रक्ताने पावन होईतो लढून तिला आपल्या बलिदानाने पावन करणार्या बाजीप्रभुंपुढे मरणानेही ओशाळावे असे धैर्य प्रदान करणारी ही महाभयहरी अशी पार्वती माताच आहे. काही ठिकाणी महाभयकरी असा पाठभेद आहे. शत्रूच्या मनात दहशत उत्पन्न करणारी अशी ती महाभयकरीही आहे. 

माता कृपासागरी माता आणि कृपेचा सागर ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. माता म्हणजे मूर्तीमंत वात्सल्य, जिच्या कृपेला अंत नाही अशी फक्त माताच असू शकते. सर्व प्राणीमात्रांचं हित करणारी अशी ही माय आहे.

सर्वानन्दकरी सदाशिवकरी आईच्या वरवर दिसणार्या रागामधे लेकराचं कल्याणच असतं. त्यामुळे नित्य शिव म्हणजे कल्याण करणार्या ह्या माऊलीच्या कृपेमुळे भक्ताला दीर्घकालीन फायदाच होणार असतो. त्यामुळेच सर्व आनंद देणारी, सर्वांना सुखी करणारी अशी ही माऊली आहे. विश्वेश्वरी श्रीधरी - विश्वाचा जो सर्वेसर्वा मालक आहे अशा विश्वेश्वराची पत्नी विश्वेश्वरी आहे. ऐश्वर्य सम्पन्न आहे. सर्व प्रकारच्या वैभवानी ती परिपूर्ण आहे. कुठलीही उणीव तिच्या ऐश्वर्यात नाही. दक्षाची मुलगी असली तरी दक्षाने केलेल्या यज्ञात पतीच्या झालेल्या अपमानाने अत्यंत संतप्त झालेल्या सतीने यज्ञकुंडातच स्वतःची आहुती दिली. त्यानंतर झालेल्या भीषण रणकंदनात झालेल्या प्रचंड नुकसानात दक्षाचाही नक्षा उतरला. दक्षाला पश्चातापानी रडण्याशिवाय काही हाती राहिलं नाही.

निरामयकरी- पृथ्वीवर प्रदूषण असो वा एखादी आपत्ती असो. निसर्ग आपणहूनच ती सुधारत असतो.  परत एक नवं निरोगी निसर्ग चक्र तयार करत असतो. त्याप्रमाणे आपल्याकडे ``नास्ति मूलं अनौषधम्।‘’ म्हणतात प्रत्येक रोगाला उपचारही पृथ्वीवरच असतो. सर्व प्राणीमात्रांना निरोगी ठेवणारी ही धरणीमाताच आहे. अशा ह्या अन्नपूर्णला श्री आद्य शंकराचार्य भिक्षा मागत आहेत तिच्या कृपेची!

 

क्षत्रत्राणकरी महाभयहरी माता कृपासागरी

सर्वानन्दकरी सदाशिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी।

दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।10

 

देवी तू नित क्षात्र तेज असशी या क्षत्रियांचे रणी

चित्तीचे भय घोर सर्व हरुनी, रक्षी तयां संगरी

माते पार नसे कृपेस तुझिया तू गे दयाळु अती

भक्तांना सुखवी अपार करुणा कल्याणकारी तुझी।।10.1

 

दक्षाचा पुरताच तू उतरवी नक्षाच यज्ञात गे

अर्पूनी तव दिव्य देह समिधा त्या यज्ञकुंडात गे

तेंव्हा दक्षप्रजापति हि रडला ताठा तयाचा विरे

आहे पूर्णचि विश्व थोर अवघे हे मालकीचे तुझे।।10.2

 

ब्रह्मांडी नित ठायि ठायि भरले ऐश्वर्य तेची तुझे

भक्तांना करिसी निरामय सखे रोगा निवारून गे

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।10.3

--------------------------------------

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 11

इशावास्योपनिषदात एक मंत्र आहे.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥

`` सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते.’’

            ब्रह्मस्वरूप असलेली अन्नपूर्णा अशीच सर्वप्रकारे पूर्ण आहे. उत्पत्ती, स्थिती, लय ह्या क्रियांनी तिच्यात कुठलीच अपूर्णता येत नाही. जे ब्रह्मांडात खरं आहे ते पिंडातही खरच आहे. ह्या पृथ्वीचा विचार केला तरी, लाखो वर्ष येथे जीवसृष्टी, मानवसृष्टी असूनही पृथ्वीवरील खनिज सम्पत्ती , येथील अन्नधान्य याचा कधीही तुटवडा पडत नाही. येथील निसर्गचक्र कायम सुरळीत चालू राहतं. त्याला बाध येत नाही. ही अन्नपूर्णा अन्नधान्यानी कायम परिपूर्ण आहे. तिचं अन्नधान्याचं भांडर जसं अक्षय आहे त्याप्रमाणे ही सर्वगुणसम्पन्न आहे. तिचं गुणभांडारही अक्षर आहे.

             अशी ही शक्तीस्वरुप अन्नपूर्णा पार्वती शंकराची प्राणशक्ती आहे. क्रिया शक्ती आहे. सर्व देवांमधे श्रेष्ठ महेश्वर असूनही अन्नपूर्णेशिवाय तो काही करू शकत नाही. अशी श्रेष्ठ माऊली लाभल्यावर श्रेष्ठ अशा भक्तोत्तमाने प्रेमाने मोठ्या लाडाने तिच्याकडे भाजी भाकरी का मागावी? अशा ह्या अन्नपूर्णेकडे मागणंच मागायचं तर एखादं क्षुद्र मागणं कशाला मागायचं? नरजन्माचं कल्याण होईल अशीच मागणी करावी. विश्वाच्या ऐश्वर्यसम्पन्न साम्राज्ञीकडेच मागणं मागायचं असेल तर उत्तम गोष्टच तिच्याकडून मागून घ्यावी. आचार्य म्हणूनच अन्नपूर्णेला भिक्षा मागतात,

``हे माय, ज्ञान आणि वैराग्य ज्यामुळे सिद्ध होईल अशी तुझ्या भक्तीची भिक्षा माझ्या झोळीत घाल.’’

 

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे।

ज्ञानवैराग्यसिध्यर्थं भिक्षां देहि पार्वती।।11

 

अन्नभांडार हे राहे माते अक्षय हे तुझे

गुण भांडारही राहे माते अक्षर हे तुझे॥

 

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे

पंचप्राण शिवाचे तू शिव-शक्तीच तू असे॥

 

झोळीत माझिया घाली भिक्षा एकचि मायगे

ज्ञान वैराग्या लाभाया मजला दृढ भक्ति दे॥

--------------------------------------------

 

अन्नपूर्णास्तोत्रम्

        श्लोक 12

             Global village वा संपर्काच्या प्रभावी माध्यमांमुळे विश्वाचं संकुचित होणं ही काही पाश्चिमात्यांची आजची कल्पना नाही. ``हे विश्वचि माझे घर’’ हा विश्वबंधुत्त्वाचा विचार आपल्याकडे पुरातन काळापासूनच आहे. विश्व हेच घर म्हटल्यावर त्यातील कोणीच परका राहत नाही. आपल्याकडे विश्वं विष्णु;  म्हणजे हे संपूर्ण विश्वच विष्णु आहे म्हणतात. विश्वात्मक देवच आपण मानतो.

               जन्मदात्रे आईवडील जन्मभर पुरत नाहीत आणि जन्मभर सांभाळूही शकत नाहीत. आचार्य म्हणतात, ``सर्व विश्व चालविणरी ही शक्तीस्वरुप अन्नपूर्णा हीच माझी माय आहे. तीच मला योग्यायोग्याचे आकलन करवणारी विवेकरूपी शक्ती आहे. सर्व देवांचा देव महादेव माझा पिता आहे.’’ केवढा हा आत्मशक्तीवर, स्वतःच्या विवेकावर असलेला आत्मविश्वास!  शिवभक्त म्हणजेच जगाच्या कल्याणाची कामना करणारे, त्याप्रमाणे वागणारे लोक; जगाच्या पाठीवर कुठेही असोत ते माझे बंधु आहेत. आणि हे सारे त्रिभुवन हाच माझा देश, माझे राष्ट्र आहे. माझी मायभूमी आहे.

             सर्व देशांच्य सीमा सहज ओलांडणारी धर्माची ही व्यापक कल्पना आपणही आपल्या मनात रुजवायला हवी. स्वार्थापोटी, पैशांच्या लोभापोटी, नोकरी, बढतीच्या हव्यासापोटी, लाच, व्यसनं अशा अनेक  वाईट गोष्टींच्या अमिषाने स्वार्थी, लोभी, दुष्ट प्रवृत्तीचे वा दुष्ट विचारांच्या जाळ्यात अडकलेले अडाणी लोक एकत्र येतात. दुष्टांची एकजुट क्षणात होते. दुर्योधन, शकुनी आणि कर्णाची स्वार्थाच्या पायावर मजबूत असलेली मैत्री एकमेकांना पूरक असते. थोड्याशा मिळालेल्या चिरीमिरीवर पत्थरबाजी, मोर्चांना हिंसक वळण देणे, ह्यासाठी टोळ्यांनी माणसे मिळतील. पण घर बांधायला, शेतात काम करायला मजूर मिळणार नाहीत.  कौरवांचं सैन्य हे कायम पुरेसं, अपरिमित असत. आणि पांडवांचं सैन्य कायम तुटपुंज असतं.

                   अभावानेच सद्वचारी लोक एकत्र येतांना दिसतात. विश्वकल्याणाची अपेक्षा, इच्छा मनात असणार्यांनी किमान एकमेकांच्या संपर्कात तरी असायला नको का? भले तो विश्वात कुठेही असो एखाद्या वाईट गोष्टीचा निषेध करण्यासाठी, कल्याणकारी विचार जनमानसात रुजण्यासाठी, दुर्जनांविरुद्ध खंबीर उभं राहण्यासाठी सर्व शिवभक्त/ कल्याण पथ अवलंबणार्यांनी एकजुटीने राहायला नको का? एकाच्या हाकेला सगळ्यांनी प्रतिसाद दयायला नको का? विचार कितीही चांगले असले पण ते अमलातच आणले नाही तर काय उपयोग? नाव भले पैलतीराला पोचवत असली तरी तिच नाव डोक्यावर बांधून घेतली तर पाण्यात वा जमिनीवर ती कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. सत्शील लोकांची एकजूट करण्यासाठी, त्यांनी बंधुभावाने राहण्यासाठी चला आपण जागतीक पातळीवर प्रयत्न करू. मग प्रत्यक्ष धर्मस्वरूप शिव वा श्रीकृष्ण आपल्या सोबत आहेतच.

 

माता पार्वती देवी पिता देवो महेश्वर:

बान्धव: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्।।12

माताच पार्वती देवी पिता माझा महेश्वर

शिवभक्त असे बंधू  घर हे  भुवनत्रय ।।12

--------------------------------------------

 

लेखणी अरुंधतीची-