स्वरूपानुसन्धानाष्टकम् / विज्ञाननौका


स्वरूपानुसन्धानाष्टकम् / विज्ञाननौका

 (अनुसन्धानम्पृच्छा, निरीक्षण,उद्देश्य, योजना स्वरूप अनुसन्धानम्स्वतःचे रूप /आत्मतत्व जाणून घेण्याचा उद्देश, आत्मस्वरूपाची जाणीव, मी कोण आहे ह्याचे निरीक्षण आणि उत्तर)

( वृत्त भुजंगप्रयात, अक्षरे-12, गण- य य य य यति- 6, पाद  )

तपोयज्ञदानादिभिः शुद्धबुद्धिर्
विरक्तो नृपादेः पदे तुच्छ बुद्ध्या ।
परित्यज्य सर्वं यदाप्नोति तत्त्वं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 1

गमे तुच्छ साम्राज्य ज्याच्यापुढेची
गमे कस्पटासारखी ती सुखेही
जयाचीच प्राप्ती घडावी म्हणोनी
परित्याग तो कामनांचा करोनी ।। 1.1

तपे आचरीती अती उग्र मोठी
करोनी महायज्ञ ते पुण्यदायी
करोनीच सत्पात्र दाने जनांसी
करोनी मती शुद्ध त्यागी विरागी ।। 1.2

महा कष्टदायी पथा आक्रमोनी
नरा प्राप्त होतेच जे तत्त्व अंती
नसे नाश ज्यासी असे नित्य जेची
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 1.3


दयालुं गुरुं ब्रह्मनिष्ठं प्रशान्तं
समाराध्य भक्त्या विचार्य स्वरूपम् ।
यदाप्नोति तत्त्वं निदिध्यास विद्वान्
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 2

(निदिध्यासवारंवार चिंतन, मनन करणे प्रशांतजो चंचल नाही, सन्तुष्ट, धीर गंभीर समाराधनम- संतुष्ट करणे )
असे धर्मनिष्ठाच खंबीर ज्याची
असे धीर गंभीर जो ज्ञानमूर्ती
दयाळू अशा ह्या गुरूचीच सेवा
करोनीच अत्यादरे भक्तिपूर्णा ।। 2.1

विनंती करे आत्मरूपास सांगा
करे प्रश्न, चर्चाच जाणून घ्याया
तया अंतरी लागुनी ध्यास त्याचा
उजाडे हृदी तत्त्व जे पूर्ण त्याच्या ।। 2.2

असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 2.3


यदानन्दरूपं प्रकाशस्वरूपं
निरस्तप्रपञ्चं परिच्छेदहीनम् ।
अहंब्रह्मवृत्येकगम्यं तुरियं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 3
( निरस्तनिरास होणे परिच्छेदहीनम् ज्याला मोजमाप नाही वा ज्याला कालदृष्ट्या, देशदृष्ट्या वा वस्तुदृष्ट्या अंत नाही असे )
असे नित्य आनंद-निस्यंदिनी जे
प्रकाशस्वरूपी झळाळे स्वतेजे
जयाचाच होता मनासीच बोध
लया जातसे बांधणारा प्रपंच ।। 3.1
( आनंद-निस्यंदिनीज्यातून सतत आनं पाझरत राहतो )
असे सर्वकाळी असे सर्वव्यापी
नटे सर्व वस्तुंचिया जे रुपानी
 न ये मोजता मापता तोलता वा
कधी कोणत्याही प्रकारे तयाला ।। 3.2

कितीही जरी लोटला काळ त्याला
नसे अंत त्या सच्चिदानंद रूपा
नसे देशदृष्ट्या, नसे कालदृष्ट्या
नसे वस्तुदृष्ट्या कधी नाश त्याला ।। 3.3

असे जागृती स्वप्न वा त्या सुषुप्ती
तिन्हीही दशांच्याच पल्याड जेची
`असे ब्रह्म मी’ हाचि होता बोध
कळे आन्तरात्म्यास जे तत्त्व श्रेष्ठ ।।

असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 3.4 ।।


यदज्ञानतो भाति विश्वं समस्तं
विनिष्टं च सद्यो यदात्मप्रबोधे ।
मनोवागतीतं विशुद्धं विमुक्तं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 4

असे जोवरी चित्ति अज्ञान सारे
खरे वाटते विश्व  हे भोवतीचे ।
मना जोवरी तत्त्व ना आकळाले
म्हणे तोवरी विश्वची सत्य आहे ।। 4.1

दृढावे जसा चित्ति तो आत्मबोध
लया जाय आभास हे विश्व हाच ।
असे कल्पनाशक्तिच्या पार जेची
कळेना मनाला न वाणीस जेची ।। 4.2

असे बंधनातून जे नित्य मुक्त
असे शुद्ध अत्यंत जेची पवित्र ।
असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 4.3 ।।


निषेधे कृते नेति नेतीति वाक्यैः
समाधिस्थितानां यदाभाति पूर्णम् ।
अवस्थात्रयातीतमद्वैतमेकं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 5
( भाचमकणे, दृष्टीस पडणे, प्रतीती येणे )
जगी सर्व वस्तूच नाकारुनी की,
नसे हे, नसे ते, नसे वस्तु काही
वदे वेद ऐसे `अहो नेति नेति
कळायास ते ब्रह्म ही रीत सोपी ।। 5.1

उरे जेचि मागे जगा दाट व्यापी
भरोनीच विश्वा उरे तत्त्व जेची
समाधी अवस्थेत जे प्रत्यया ये
सुखे पूर्ण ओसंडतो जीव ज्याने ।। 5.2

नसे बाल्य, तारुण्य, वार्धक्य ज्यासी
तिन्हीही अवस्थांचिया पार जेची
असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 5.3 ।।


यदानन्दलेशैः समानन्दि विश्वं
यदाभाति सत्त्वे तदा भाति सर्वम् ।
यदालोचिते हेयमन्यत्समस्तं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 6
(हेय - त्याज्य)

अशा ह्याचि आनंदसिंधू मधूनी
जरी घेतला मोद बिंदू कुणीही
पुरे विश्व त्या सौख्य-बिंदूत डुंबे
भरे विश्व मोदेच त्या लेशमात्रे ।। 6.1

हृदी तत्त्वज्योतीच ही अंकुरीता
प्रकाशात त्या चित्त न्हाऊन जाता
मना भान होतेच सर्वात्मकाचे
दुजे संभवेना तया पाहुनी गे ।। 6.2

जयच्या पुढे सर्वही तुच्छ वाटे
मनासी जग-त्यागही उच्च वाटे
असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 6.3 ।।


अनन्तं विभुं सर्वयोनिं निरीहं
शिवं सङ्गहीनं यदोङ्कारगम्यम् ।
निराकारमत्युज्ज्वलं मृत्युहीनं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 7

( निरीह - तृष्णा रहित उदासीन )

नसे अन्त ज्यासी असे सर्वव्यापी
असे शक्तिशाली जगाचेच स्वामी
निरिच्छास ह्या हो न इच्छा कशाची
परी निर्मिण्या विश्व आधार हेची ।। 7.1

असे विश्वकल्याणकारी सदाही
उदासीन हे नित्य निःसंग राही
कळे जेचि ओंकार-आराधनेनी
निराकार ते त्यास आकार नाही ।। 7.2

नसे मृत्यु यासीच तेजोमयी हे
जगाचे घडे ज्ञान ह्याच्या प्रकाशे
असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 7.3 ।।


यदानन्दसिन्धौ निमग्नः पुमान्स्यात्
अविद्याविलासः समस्तप्रपञ्चः ।
तदा न स्फुरत्यद्भुतं यन्निमित्तं
परं ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि ।। 8

रमे सौख्यसिंधूत जो सर्वकाळ
तया विश्व सारेच मायास्वरूप
नरासीच त्या विश्व हे भासरूपी
उठे भावनांचा न कल्लोळ चित्ती ।। 8.1

जयाच्या निमित्ते प्रतीतीस येते
अलौकीक हे विश्व अद्भूत सारे
असे नित्य जेची नसे नाश ज्यासी
परब्रह्म ते मी असे विश्वव्यापी ।। 8.2 ।।


स्वरूपानुसन्धानरूपां स्तुतिं यः
पठेदादराभक्तिभावो मनुष्यः ।
शृणोतीह वा नित्यमुद्युक्तचित्तो
भवेद्विष्णुरत्रैव वेदप्रमाणात् ।। 9

`स्वरूपानुसन्धानहे बोधकारी
असे स्तोत्र जे आत्मतत्त्वास वर्णी
म्हणे आदरे भक्तिभावेच जोची
करे चित्त एकाग्र वा ऐकण्यासी

सुटे तोचि संसारपाशातुनीही
मिळे विष्णुरूपास येऊन तोची
महात्माच तो ब्रह्मरूपीच होई
तया ह्याच जन्मीच हो ब्रह्मप्राप्ती

--------------------------------------------

वैशाख कृष्ण अपरा एकादशी 18 मे 2020