( वृत्त – हरिभगिनी किंवा स्वर्गङ्गा मात्रा – (8+8+8+6 = 30)
सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं
गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासम्।
मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं
क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्।।1
( अनाकाश- सर्व पंचमहाभूते ह्याच्या ठायी आहेत. त्यामुळे फक्त एक आकाश हे त्याचे स्वरूप होऊ शकत नाही म्हणून त्याला अनाकाश म्हटले आहे .परमाकाश - आकाशालाही व्यापून उरणारा असे महा आकश हे ज्याचे स्वरूप आहे तो. )
सत्यरूप जो अनंत अक्षय । नित्य असे जो ज्ञानमयी
पंचमहाभूते या ठायी । जैसे कण मेरूवरती
गगन थोकडे याच्यापुढती। गगनरूप हा कसा असे
अनाकाश हा आकाशासह । महाकाश होऊन उरे॥1.1
नंद-अंगणी रिंगण घाली । दुडुदुडु दुडुदुडु चपल हरी
सायासेही मिळे न कोणा । अनायास भक्ता रिझवी
नसे परिश्रम याला काही । भक्तांचा हा जगजेठी
दमून जाई काम करोनी । भक्तांच्या मेळ्यात परी॥1.2
निराकार हा विविधाकारी । मायेने नित भासतसे
विश्वाकारे नटे पूर्णता । विश्व सकल हे हरी असे
वैभवशाली धरा, रमेचा । नाथ अनाथ असेचि सदा
नमन तुला आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा।। 1.3
मृत्स्नामस्तीहेति यशोदाताडनशैशवसन्त्रासं
व्यादितवक्त्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिम्।
लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं
लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥ 2
``अरे!
अरेरे! पाहू मजला ।अशी कशी खासी माती''
यशोमती ही दटावताची । बालसुलभ वाटे भीती
देइल का मज चोप वाटुनी । उघडुन मुख दावे तिजसी
तिन्ही लोकही चौदा भुवने । दिसून आली हरीमुखी॥ 2.1
एकचि जो आधारस्तंभ या । त्रैलोक्याचा असे धनी
प्रकाश देई ज्ञानाचा हा । यास न कोणी प्रकाशवी
लोकनायका महानायका । नंदनंदना जगदीशा
नमन तुला आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा।। 2.2
त्रैविष्टपरिपुवीरघ्नं क्षितिभारघ्नं भवरोगघ्नं
कैवल्यं नवनीताहारमनाहारं भुवनाहारम् ।
वैमल्यस्फुटचेतोवृत्तिविशेषाभासमनाभासं
शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥3
स्वर्गपुरीच्या देवांना जे । छळती दानव दैत्य कुणी
त्या दैत्यांचा नाश करोनी । भार पृथ्विचा दूर करी
भवरोगासी शमवी ऐसी । `हरी बुटी' अनमोल जगी
कैवल्याची मूर्ति खरोखर । मोक्षरूप हा सदा हरी॥ 3.1
आहारासी न लगे काही । अनाहार नित तृप्त तरी
प्रलयासमयी विश्व सकल हे । आहारा ह्या पडे कमी
गोप गोपि गोकुळी भरवती । प्रेमे लोणी हरी-मुखी
लपवुन कोणी जरा ठेविता । ये गोपांसह धाड घरी ॥ 3.2
सत्वगुणांच्या उत्कर्षाने । हृदय विमल जे नित होई
प्रतिबिंबित हा तिथेचि होई । अन्य कुठे ना दिसे कधी
शांति ढळे ना हृदयाची ज्या । शान्त सुधांशु जणू सुखदा
नमन तुला आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा।। 3.3
गोपालं भूलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं
गोपीखेलनगोवर्धनधृतिलीलालालितगोपालम्।
गोभिर्निगदितगोविन्दस्फुटनामानं बहु नामानम्
गोधीगोचरदूरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥4
भूलोकी गोपालरूप हा । गोप कुळी जन्मा येई
लळा लाविती नाना लीला । गोपींसंगे खेळ किती
गोपालांसह गुरे राखितो । स्वये बनुन गोपाल हरी
गोपालांचा प्रतिपालक हा । हरि गोवर्धनगिरिधारी॥4.1
गायी हंबरती गोविंदा । गोविंदा अति स्पष्ट किती
गोविंदा गोविंदा ऐसे । वेदहि चारी घोष करी
सहस्रनामे गौरविले या । स्तुती करोनी सुजनांनी
एकचि व्यक्ती नाना नाती। तयास संबोधने किती॥4.2
वाचा खुलते अनुग्रहे ज्या । परी न वाचा जाणु शके
बुद्धीला देईच झळाळी । बुद्धिला ना तरी कळे
बुद्धी वाणीला जे कोडे । पडेचि अवघड सदाकदा
नमनचि त्या आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा।।4.3
गोपीमण्डलगोष्ठीभेदं भेदावस्थमभेदाभं
शश्वद्गोखुरनिर्धूतोत्कृतधूलीधूसरसौभाग्यम्।
श्रद्धाभक्तिगृहीतानन्दमचिन्त्यं चिन्तितसद्भावं
चिन्तामणिमहिमानं प्रणमत गोविन्दं परमानन्दम् ॥5
गोष्ठी - समुदाय, सम्मेलन, गप्पागोष्टी
रंगुन जाई गोपींच्यासह । गप्पागोष्टी करतांना
अभिन्न असुनी धरे भिन्नता । विश्वाचे वैविध्यचि हा
अनेक रूपातून येतसे । प्रत्यय एकचि रूपाचा
एकतत्त्व हरि भरून राही । विश्वातचि सार्या सार्या ।।5.1
गायी घेउन चरावयासी । गोपांसह वनि जातांना
उधळे गाय खुरांनी धूली । त्यात रंगला बघ कान्हा
धूली-धूसर रूप तयाचे । मनमोहक शोभे हरिला
हृदयी ज्याच्या श्रद्धा भक्ती । नंदनंद दे मोद तया॥5.2
विचारांचिया पलीकडे हा । कसा लाभ व्हावा याचा
सत्स्वरुपासी आठविता हा । भेटे हृदयी योगिजना
चिदानंद चिंतामणि पुरवी। सर्व सर्व या मनोरथा
नमनचि त्या आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा।।5.3
स्नानव्याकुलयोषिद्वस्त्रमुपादायागमुपारूढं
व्यादित्सन्तीरथ दिग्वस्त्रा दातुमुपाकर्षन्तम् ताः।
निर्धूतद्वयशोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं
सत्तामात्रशरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥6
कृष्णजळी यमुनेत खेळता । व्रजबाला स्नानासमयी
मनोवस्त्र हरि नेई हरुनी । कदंबतरुवर नकळतची
भान हरुन त्या गवळणि येती । दिशावस्त्र देही धरुनी
ओढ हरीला भेटायाची । वसन असो वा नसो तरी॥6.1
शोक मोहही नेई हरुनी । ज्ञानरूप हा नित्य हरी
बुद्धीच्या गर्भात वसे जो । विवेक रूपे कृष्ण हरी
सकलचि हे अस्तित्व जगाचे । शरीर त्याचे पूर्णतया
नमन असो आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा ॥6.2
कान्तं कारणकारणमादिमनादिं कालघनाभासं
कालिन्दीगतकालियशिरसि नृत्यन्तं सुविनृत्यन्तम्।
कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषघ्नं
कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥7
कलित- धरून ठेवलेला , पकडून ठेवलेला, धारण केलेला
लावण्याचे स्वरूप सुंदर । कारण पाचहि भूतांचे
सृष्टीचे विश्वाचे सार्या । कारण एकचि हरी असे
कालिंदीच्या जळी कालीया-शिरी कुशल जो नृत्य करी
काळचि कालीयाचा तोची । कालघनासम रुद्र अती॥7.1
मेघ नभी घनदाटचि जैसा । तसा कृपा वर्षाव करी
कालखंड ना याचा कुठला । काळ सकळ हा असे हरी
सारे सारे ह्याच्या रूपी । सामावुन जाते सहजी
कलीयुगाची पापे सारी । दोष सकल हा दूर करी॥7.2
वर्तमान वा भूत भविष्यचि । काळचक्र जे सदा फिरे
त्याचे कारण एकचि केवळ । विश्वनियंता हरि असे
ज्ञान सकल हे तुलाचि ठावे । नंदनंदना जनार्दना
शरण तुला आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा॥7.3
वृन्दावनभुवि वृन्दारकगणवृन्दाराधित वन्देऽहं
कुन्दाभामलमन्दस्मेरसुधानन्दं सुहृदानन्दम्।
वन्द्याशैषमहामुनिमानसवन्द्यानन्दपदद्वन्द्वं
वन्द्याशेषगुणाब्धिं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्॥8
वृंदावनि पूजिति हरीसी । देववृंद, स्त्रीवृंद महा
निष्कलंक हरि कुंदफुलांसम । सतेज सात्विक सुंदरसा
मंद हासता कुंदकळ्यांसम । दंतपंक्ति देती शोभा
झरझर अमृत झरे स्मितातुन । सुखवत सुहृदांच्या हृदया॥8.1
विश्ववंद्य नारद मुनिवृंदा । पादपद्म सुखवी कृष्णा
गुणनिधान गुणनिधी श्रीहरी । वंद्य-चरण मुनिवृंदांना
सकल गुणांच्या महासागरा । नमन मुकुंदा श्रीरंगा
नमन असो आनंदकंद हरि । परमानंदा गोविंदा॥8.2
गोविन्दाष्टकमेतदधीते गोविन्दार्पितचेता यो
गोविन्दाच्युत माधव विष्णो गोकुलनायक कृष्णेति।
गोविन्दाङ्घ्रिसरोजध्यानसुधाजलघौतसमस्ताघो
गोविन्दं परमानन्दामृतमन्तस्थं स समभ्येति॥9
हृदयि धरोनी गोविंदासी । गोविंदाष्टक म्हणेल जो
नंदनंदना कृष्ण माधवा । गोविंदासी स्मरेल जो
अमृतमय सुखसागर हरिच्या। ध्यान पदांचे करेल जो
पापे त्याची विलीन होती । हरिचरणाच्या ध्याने हो॥9.1
हरि स्मरणाने निर्मल होता । हृदय-मंदिरी पवित्र या
अंतःकरणाच्या सिंहासनि । हरी विराजे सदाकदा
परमानंदी लागे टाळी । होता साक्षात्कार हृदी
सर्वश्रेष्ठ आनंदरूप गोविंदाची होता प्राप्ती॥ 9.2
-------------------------------------------------------------------------
मन्मथ नाम संवत्सरे चैत्र शुद्ध कामदा एकादशी /
31 मार्च 2015
खुप छान आहे.
ReplyDeleteखूप छान झाले आहे. यानिमित्ताने या स्तोत्राचा अर्थ कळला.
ReplyDelete