भवान्यष्टकम्

        Image result for free download images of devi Bhavani

        

            भवानी ही शंकराची प्राणवल्लभा आहे. शंकराच्या अलौकिक कर्तृत्वाच्या मागे असलेली प्रेरणा शक्ती म्हणजेच भवानी. शिव कितीही समर्थ असला तरी जोपर्यंत ह्या शक्तीची त्याला साथ नाही तो पर्यंत तो काहीच करू शकत नाही. हा प्रचंड शक्तीचा स्त्रोत - - भवानी, तिच मला तारू शकते. तीला अनन्य मनाने शरण आलो आहे असे आचार्य ह्या स्तोत्रात सांगत आहेत.

( वृत्त – भुजंगप्रयात, अक्षरे -12, गण- य य य य 6,6)

न तातो न माता न बन्धुर्न दाता

न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।

न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।1।।

नसे माय ना तात माझे कुणीही

 नसे आप्त वा बंधु नात्यात कोणी

मुले ना मुली पोटचे वा कुणीही

 अभीष्टास देईच दाता असाही ।।1.1 ।।

धनी नाचि माझा नसे दास-दासी

 न पत्नी  न विद्या मला जीविका ही

असे ध्येय तू वाट तू आसराही

 मला एक तू एक तूची भवानी।।1.2।।

 

भवाब्धावपारे महादुःखभीरुः

प्रपातप्रकामी प्रलोभी प्रमत्तः।

कुसंसारपाशप्रबद्धः सदाऽहं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।2

( प्रपात पडलेला । प्रकामी- श्रृंगारप्रिय,स्वच्छंद वागणारा । प्रलोभी अति हाव,लालसा असलेला । प्रमत्त  -मदोन्मत्त, स्वैराचारी, वेडा, बेफिकीर, बेसावध )

महासागरू हा भवाचाच मोठा

 तयाचा दिसे पैलतीरू मला ना

अतीदुःखदायी मला भीववी हा

 पडे त्यात मी गे उठूही शकेना।।2.1

 मदोन्मत्त मी स्वैर,स्वच्छंद, वेडा

 अमर्याद ही लालसा, काम माझा

मला नित्यनैमित्तिके ही सुचेना ।

 अशांती मना राहिली व्यापुनीया ।।2.2

भवाच्याच पाशात हा गुंतलो मी

 तुझ्यावीण ना मार्ग दृष्टीस येई

असे ध्येय तू वाट तू आसराही

 भवानी तुझ्यावीण माझे न कोणी।।2.3

 

 न जानामि दानं न च ध्यानयोगं

न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमत्रम् ।

न जानामि पूजां न च न्यासयोगं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।3

कळेना मला दान द्यावे कसे ते

 करावे कसे चित्त एकाग्र माझे

जमेना मला  ध्यान वा योग शास्त्रे ।

 वसेना मुखी गे स्तुतीमंत्र स्तोत्रे।।3.1

करावी कशी स्थापना मूर्तिची ती ।

 यथासांग पूजा कळेना मला ती

असे ध्येय तू वाट तू आसराही

 मला एक तू एक तूची भवानी ।।3.2

 

 न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं

 न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्।

न जानामि भाक्तिं व्रतं वापि मातर्

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।4

मला गंधवार्ता नसे सुकृताची

 कधीही न गेलोचि मी तीर्थक्षेत्री

कराया मना लीन त्या आत्मतत्त्वी

 जमेना मला; मुक्ति कैसी कळे ती।।4.1

तुझ्या पूजना ना व्रते जाणितो मी

 नसे भक्तिमार्गी गती अल्पशीही

असे ध्येय तू वाट तू आसराही

 भवानी तुझ्यावीण माझे न कोणी।।4.2

 

कुकर्मी कुसंङ्गी कुबुद्धीः कुदासः

कुलाचारहीन: कदाचारलीनः।

कुदृष्टि:  कुवाक्यप्रबन्धः सदाहं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।5

 

कुकर्मी रती संगती दुर्जनांची

 मनी घोळते वासना पापबुद्धी

दुजाचे सदा दोष पाहेच दृष्टी

 असभ्यासही लाजवीतेच वाणी।।5.1

दुराचार केला कुलाचार नाही

 तुझा दास होण्या नसे पात्र आई

असे ध्येय तू वाट तू आसराही ।

 मला एक तू एक तूची भवानी ।।5.2

 

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं

दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्

न जानामि चान्यत्सदाऽहं शरण्ये

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।6

 

प्रजेचा पिता तो असो देव ब्रह्मा

 असो रुद्र तो श्रेष्ठ देवात सा र्‍या

असो दिव्य लक्ष्मीपती विष्णु रम्या

 सुरांचा असो राजराजेश्वरो वा।।6.1

शशी शांत वा उग्र तो सूर्य कोणी

 न जाणेचि या एकही दैवता मी

असे ध्येय तू वाट तू आसराही

 भवानी तुझ्यावीण माझे न कोणी।।6.2

 

विवादे विषादे प्रमादे प्रवासे

जले चानले पर्वते शत्रुमध्ये।

अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।7

(विवाद संघर्ष, भांडण, वाद-विवाद, विचारविमर्श, तर्क चर्चा। विषाद - खिन्नता, उदासी, निराशा, शोक, म्लान। प्रमाद - चूक, अवहेलना, दुर्घटना, भय, असावधानी, अनवधान।  प्रवास - विदेशयात्रा, परदेश गमन, विदेश निवास)

असो तर्कचर्चा, उदासीन मी वा

 असो पंडितांच्या सवे वाद जेंव्हा

मना खिन्नता व्यापुनी राही जेंव्हा

 घडे चूक ती घोर हातून माझ्या।।7.1

विदेशी असो वा प्रवासात जेंव्हा

 चहूबाजुनी शत्रुनी वेढलेला

असो अग्नि ज्वाळा मला पोळणा र्‍या

 जलाच्या भये दीन मी आर्त जेंव्हा ।।7.2

अती दुर्गमू पर्वती मी असो वा

 अती घोर रानी चुके मीच जेंव्हा

करी रक्षणा रक्षणा तू भवानी

 मला एक तू एक तूची भवानी ।।7.3

 

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो

महाक्षीणदीनः सदाजाड्यवक्त्रः।

विपतौ प्रविष्: प्रनष्टः सदाहं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ।।8

न कोणीच त्राता दरिद्री मला या

जराजर्जरा देह झालाचि माझा

नसे त्राण गात्री; अडे प्राण कंठी

 फुटेना मुखे शब्द माझ्याचि ओठी।।8.1

चहूबाजुनी घेरिले संकटांनी

 उभाची असे सर्वनाशू समोरी

असे ध्येय तू वाट तू आसराही 

भवानी तुझ्यावीण माझे न कोणी।।8.2


जे भवान्यष्टकं घेई । मनाचा ठाव तो पुरा ।

अनुवाद करोनीया । त्याचा अत्यंत साजिरा ।।

अत्यंत आदरे भावे । नमुनी आद्य शंकरा ।

शिरपेची मराठीच्या । खोवी अरुंधती तुरा ।।

--------------------------------------

नंदन नाम संवत्सर,चैत्र शुद्ध पंचमी। 27 मार्च 2012

 

 

 

 

 

1 comment:

  1. खूपच सुंदर. धन्यवाद 🙏🙏🌷🌷

    ReplyDelete