अरुंधतिकृता शनीदेवस्तुती

 

अरुंधतिकृता शनीदेवस्तुती

अनुष्टुभ् छंद

(प्रतिचरणाचे पाचवे अक्षर लघु, सहावे गुरू 2,4 चरणाचे 7 वे अक्षर लघु 1,3 चरणाचे 7वे अक्षर गुरू / चरणाच्या सुरवातीस किंवा गण नको)

सूर्यपुत्रा दयावंता महाभयहरा शनी

कृपाघना शनीदेवा तारिले मजला तुम्ही ।। 1

 

नमस्कार असो माझा पादपद्मीच हे प्रभो

अहंकारहरा देवा नवा जन्म दिला विभो ।। 2

 

साडेसाती असे मोठी कष्टदायी भयंकरी

पीडा देते शरीरासी मनासी छळते अती ।। 3

 

सुटला ना तुझ्या देवा तडाख्यातून एकही

असो गुरू असो दैत्य सोडिले ना तुवा कुणी ।। 4

 

विक्रमादि नृपालाही येई प्रत्यय तत्क्षणी

वनवास दिला रामा पाडिले रावणा रणी ।। 5

 

पराक्रम असा मोठा ऐकुनी आपुला महा

हबकून मनी गेले भरली धडकी मला ।। 6

 

उसन्या अवसानाने तरीही  बोलले जगा

नभीची तारका कैची पीडा देईल ती मला ।। 7

 

परंतु आतुनी जाळे भीती एक अनामिका

 धास्ती कुरतडे चित्ता कुणा संगेचि सामना ।। 8

 

काय काय मला आता भोगाया लावतो शनी

मनोमन म्हणे मीही श्लोक स्तोत्र तुझे मनी ।। 9

 

नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं

छाया-मार्तण्ड-सम्भूतं तं नमामि शनैश्चरम् ।। 10

 

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तकोऽयमः

सौरिः शनैश्चरोमन्दः पिप्पलादेन संस्तुतः ।। 11

 

परी येता घरी माझ्या कृपाळू हे शनैश्चरा

`चला बघू नव्याने या जगा' ऐसेचि बोलला ।। 12

 

हाकिला रथ वेगाने पुढ्यात घेऊनी मला

असता तूच पाठीशी स्थान राहील का  भया ।। 13

 

येरवी ना दिसे नेत्रा जग ते दाविले तुम्ही

होऊनी विस्मिता मीही बघे अद्भुत सृष्टि ही ।। 14

 

गुंत्यातुनीच नात्यांच्या रथ हा हाकिता तुम्ही

चेहरे ओळखीचे ते झाले कैसे अनोळखी ।। 15

 

माझेच आप्त हे सारे प्रेम माझे तयांवरी

येतील धावुनी वेगे संकटी म्हणताचि मी ।। 16

 

हसलास जरासा तू म्हणाला, `बघ ही मजा'

वेळ नाही कुणालाही माझ्यासाठी दिसे मला ।। 17

 

पुत्राहूनहि केले मी प्रेम ज्यांच्यावरी भले

झिडकारून गेले ते देऊनी शोक दुःख ते ।। 18

 

काळाने ओढुनी नेले धनार्थ सोडिले कुणी

कुणी खुर्चीसवे गेले राहे ना सोबती कुणी ।। 19

 

कुठे गेले कुठे गेले रडे मी अति स्फुंदुनी

म्हणे गेले म्हणे गेले जग सारेचि नासुनी ।। 20

 

फाटले हृदय शोकाने वणवा जाळतो उरी

हाय हाय म्हणोनी मी दुःख केले भयंकरी ।। 21

 

नाही वडील ना माय बंधू बहीण वा कुणी

पुत्र, पौत्र नसे माझे सून व्याही विहीण ती ।। 22

 

छुप्या अव्यक्त शत्रूंचा फाडला बुरखा तुम्ही

भ्रमनिरास होवोनी आले शुद्धीत पूर्ण मी ।।  23

 

येरवी ना दिसे नेत्रा जग ते दाविले तुम्ही

ज्यांच्यावरी विसंबे मी झाले घातकरी किती ।। 24

 

दिव्य अंजन तुम्ही हो साक्षात परमेश्वरा

दिव्यदृष्टीच देवोनी दाविले जग हे मला ।। 25

 

झोंबे अंजन डोळ्यांसी मिटवी पापण्यासही

पाणी घळघळा नेत्री हाय हाय वदे मुखी ।। 26

 

जाता काळ परी थोडा वेदना शमवी पुरी

डोळे उघडिता दृष्टी होतसे तीक्ष्ण स्पष्टही ।। 27

 

 

होते वाटत दृष्टीसी चित्र अस्पष्ट धूसरी

सुस्पष्ट होतसे तेची   शंका ना उरवी मनी ।। 28

 

देवा तैसा असे तूची   नीलांजन जणू महा

आरंभी त्रास तू वाटे दृष्टी देसी परी महा ।। 29

 

पुरलेला दिसे ठेवा अंजनाने कुणा जसा

परमानंद ठेवा हा माझ्या हाती दिला तसा ।। 30

 

कृपेने तुझिया कैची   जगाची रीत दाविली

मान्य केली मनानेही झाले निश्चिंत शांत मी ।। 31

 

कुंभाराने जसा द्यावा घटासी हात आतुनी

वरतूनची थापीने आकारा घट आणुनी ।। 32

 

नीलांजना तसे तूची आकारा मज आणिले

आधार देऊनी चित्ता उपकार करी भले ।। 33

 

देवा माझ्यासवे तूची नित्य शाश्वत राहसी

संकटी धरुनी हाता सांभाळून मला धरी ।। 34

 

जसा स्वप्नामधे कोणी बरळे सत्य मानुनी

कळेना परि ते त्याला स्वप्न मिथ्या छळे अती ।। 35

 

परी उठविता त्यासी स्वप्न संपेच तत्क्षणी

म्हणे केले बरे तुम्ही जागे केलेच सत्वरी ।। 36

 

भ्रम वेड फिटे तैसे झाले होते पिशापरी

मानून सत्य हे सारे मिथ्या मी जवळी करी ।। 37

 

मी मी मलाच माझेची स्वप्नी मी बरळे अशी

हालवून जरा केले जागे देवा मला तुम्ही ।। 38

 

 

संपता स्वप्न सारेची नाती मिथ्या सभोवती

गेलीच संपूनी ती जी होती वाटत आपुली ।। 39

 

कृपा होता जसा पंगू पर्वता-शिखरी चढे

बोलू लागे मुका कोणी वेद मंत्र खड्या सुरे ।। 40

 

तशी दिली करी माझ्या लेखणी अति अद्भुता

शारदाम्बा लिहू लागे अचंबित करी मला ।। 41

 

अज्ञ मी गृहिणी साधी झाली होतेच हिंपुटी

कृपा केली तुम्ही देवा स्तोत्र सार दिले करी ।। 42   

 

घेतला लिहुनी साचा स्तोत्र-भावार्थ साजिरा

दीन अत्यंत ऐशा ह्या मजला देऊनी वरा ।। 43

 

तोडिले भवबंधासी लाविले चरणी तुझ्या

आता ना वळुनी मागे पाहे अरुंधती जगा ।। 44

 

ज्याला ज्याला म्हणे तूची आपुला हे शनैश्चरा

म्हणे ना आपुला कोणा सोडे ना चरणा तुझ्या ।। 45

 

मागणे एक पायी हो मागते मी शनैश्चरा

कर माझा सोडावा धरिला जोचि एकदा ।। 46

 

असे अंधचि मी देवा दृष्टी माझी तुम्हीच गा

असे पंगू कशी चालू आधारासचि हात द्या ।। 47

 

हृदी माझ्या असो मूर्ती नित्य एक मनोहरी

तुझी नीलांजना ऐसी नित्य आनंददायिनी ।। 48

 

निळ्या निळ्या प्रकाशाने तेवते नित अंबरी

शांत शांत तुझी मूर्ती राहो माझ्याच अंतरी ।। 49

 

पाहता रोज आकाशी तुजला रविनंदना

उभारी येतसे चित्ता संकटांशी लढावया ।। 50

शांतवृत्ती समाधानी होते माझीच तत्क्षणी

अत्यानंदे म्हणू लागे अरुंधती तुझी स्तुती ।। 51

 

प्रसन्नात्मा शनीदेवा आनंद दिधला तुम्ही

आनंदाचा महा ठेवा दाविला मजला तुम्ही ।। 52

 

गुरू माझा असे तूची पिता माताच सर्वही

मित्र, पुत्रचि तू देवा मालकीची तुझ्या कुडी ।। 53

 

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः

मन्दचारः प्रसन्नात्मा पीडां दहतु मे शनिः ।। 54

 

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तको यमः

सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ।। 55

----------------------------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -