।। ललितापञ्चरत्नस्तोत्रम् ।।


Image result for devi picture free


श्री ललिता हे पार्वतीचे एक मोहक रूप आहे. ही  विद्या देणारी  देवता आहे.  देवीमातेचे हे प्रातःसमरण म्हणजे पहाटे उठल्या उठल्या म्हणावयाचे स्तोत्र आहे. पहिल्या श्लोकात ललितादेवीच्या सुंदर मुखाचे वर्णन आहे तर दुसर्‍या श्लोकात तिच्या सुंदर हातांचे वर्णन आहे. तिसर्‍या श्लोकात तिच्या सुंदर पावलांचे वर्णन आहे. चौथ्या श्लोकात वेदांमधे वर्णन केलेल्या तिच्या परम तात्विक रूपाचे चिंतन केले आहे. आणि  पाचव्या श्लोकात तिचे गुण वर्णन करणारी नामे स्मरत तिला केलेले वंदन आहे. पाची श्लोकातून मातेचे सुंदर रूप डोळ्यासमोर साकार होते. ह्या पाच सुंदर श्लोकांची रत्नमालाच जणु मातेला अर्पण केली आहे.

(वृत्त वसंततिलका, अक्षरे- 14, गण त भ ज ज ग ग)

प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दं
बिम्बाधरं पृथुलमौक्तिक-शोभिनासम्।
आकर्ण-दीर्घ-नयनं मणिकुण्डलाढ्यं
मन्दस्मितं मृगमदोज्ज्वल-भालदेशम्।।1

( मृगमद -  कस्तुरी )

मूर्ती तुझीच ललिते  स्मरतो प्रभाती
पद्मासमान मुख हे तव पुण्यदायी
प्राचीवरीच सविता जिवणी तशी ही
शोभेचि मौक्तिक महा तव नासिकेसी।।1.1

आकर्ण  नेत्र जणु पंकज नीलवर्णी
रत्नप्रभा पसरली तव कुंडलांची
मोही मनास तव हे स्मित मंद ओठी
भाळी सुगन्धयुत कस्तुरि-कुंकुमादि।।1.2



प्रातर्भजामि ललिताभुज-कल्पवल्लीं
रक्ताङ्गुलीय-लसदङ्गुलि-पल्लवाढ्याम् 
माणिक्य-हेमवलयाङ्गद-शोभमानां
पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमेषु-सृणीर्दधानाम्।।2

बाहूच कल्पलतिका तव हे शुभांगी
पूजीन मी हृदयी गे नित सुप्रभाती
डाळिंबि माणिक खुले तव अंगुलीसी
भासेचि पल्लव नवे  कर हे गुलाबी।।2.1

सोन्यात माणिक हिरे जडवून केली
ही कंकणे, चमकती करभूषणेही
तांबूस ऊस-धनुला शर हा फुलांचा
पाशांकुशासि धरिले सहजीच हाता।।2.2



प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं
भक्तेष्टदान-निरतं भवसिन्धु-पोतम्।
पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं
पाशाङ्कुश-ध्वज-सुदर्शनलाञ्छनाढ्यम्।।3

मी वंदितोचि कमलासम पाउले ही
माते तुझीच विमला नित सुप्रभाती
इच्छाच भक्तमनिची करी पूर्ण सारी
नौकेसमान पद हे  भवसिंधु तारी ।।3.1

ब्रह्मा महेंद्र रमले तव पादपद्मी
बाकीहि देव सगळे पद वंदिताती
चिह्ने सुलक्षणि अती तव पादपद्मी
हे पाश अंकुश ध्वजा शुभ चक्र पायी।।3.2



प्रात: स्तुवे परशिवां ललितां भवानीं
त्रय्यन्त-वेद्य-विभवां करुणानवद्याम्।
विश्वस्य सृष्टि-विलय-स्थिति-हेतुभूतां
विश्वेश्वरां निगम-वाङ्मनसातिदूराम्।।4

गातो प्रभात समयी तव गोड नामा।
 ब्रह्मस्वरूप जननी तव काय माया
वेदांत जाणि तव रूप जरा जरासे।
वेदांतभूषणचि तू करुणानिधी गे।।4.1

उत्पत्ति, स्थैर्य, विलया जग हेचि जाई।
त्याचेच कारण असे परि तूच आई
माते,स्वरूप तव आकलनास दूर।
 माहीत ना म्हणति वेद हि चार चार।।4.2



प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम
कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति
वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति।।5

कामेश्वरी करि मनोरथ पूर्ण तूची
 अर्धांगिनी असशी तूचि महेश्वराची
लक्ष्मीच तू असशि गे कमले शुभांगी
 त्रैलोक्यस्वामिनिपराम्हणती तुलाही।।5.1

तू शांभवी करितसे उपकार लोकी
 माता जनाचि सकला जगदंब तूची
माते अनुग्रह तुझा खुलवीच वाचा 
 वाग्देवता असशी तूच सरस्वती गा।।5.2

तूस्थूल’ ‘सूक्ष्मअनकारणया पुरांची
 मातेच मालक खरी त्रिपुरेश्वरी ही
कामेश्वरीच कमला गिरिजेशपत्नी
 श्री शांभवीच जगदंब परा  अशीही।।5.3

श्री शारदा त्रिपुरसुंदरि  नाम पंक्ती 
 गाईन पुण्यप्रद ही नित मी  प्रभाती।।5.4

यः श्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः
सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।
तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना
विद्याश्रियं विमलसौख्यमनन्तभाग्यम्।।6


ही पंचश्लोक रचना स्तुति गोड साची
गाई प्रभातसमयी ललितांबिकेची
त्यासीच माय ललिता झणि सुप्रसन्ना
त्याच्या मुखी वसतसे नित शारदाम्बा ।।


त्यालाच मंगलमयी सुख सर्व लाभे
तो निष्कलंक धन मान अखंड भोगे।।6.2


-------------------------------------

http://arundhatipraveendixit.com/#

7 जानेवारी 2011, शुक्रवार पौष शु.3

5 comments: