जगन्नाथ पण्डितकृता गङ्गालहरी / पीयूषलहरी
पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण
दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी.
वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली.
(त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला
दिपविणारी विद्वत्ता, उत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर
लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे
मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली.
मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो
स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली होती. एक दिवस बादशहा
शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या
शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ
पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न
झालेल्या बादशहाने त्याला `काय वाटेल ते माग' असे सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली.
नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. बादशहाने जगन्नाथ पंडिताला
जहागिरीही दिली. पण एका यवन कन्यबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना
सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर आल्या आल्या त्याने जगन्नाथ पंडिताची जहागिरी, संपत्ती जप्त केली.
दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला.
त्यावेळी
अपय्या दीक्षित ह्या व्याकरण पंडितांने हा कसला कवी म्हणून जगन्नाथ
पंडितांची वारंवार अवहेलना केली. अपय्या दीक्षित खवचटपणे
म्हणाले,-- किं निःश्शङ्कं शेषे शेषे वयसि त्वमागे मृत्यौ। जगन्नाथाने थंडपणे
त्यांच्याकडे पाहतो आणि गंगेकडे दृष्टिक्षेप टाकतो. विचारणारा वरमून वदतो , अथवा
सुखं शयीथाः निकटे जागर्ति जाह्नवी भवतः।। हा तर कामाचा पुतळा, धर्माचा मारेकरी म्हणून
टवाळी केली. लवंगिकेच्या उरलेल्या एका वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकणार्या
जगन्नाथ पंडिताने लवंगिकेसह काशीला गंगामातेच्या किनार्य़ाचा आश्रय घेतला. भट्टोजी
दीक्षितांना उत्तरादाखल जगन्नाथ पंडिताने गंगेवर एक एक श्लोक रचण्यास प्रारंभ
केला. असे म्हणतात त्याच्या प्रत्येक श्लोकागणिक गंगा एक एक पायरी वरती चढत आली
आणि शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला लवंगिकेसह तिने
आपल्या पोटात घेतले. `दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' म्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा
जगदीश्वराच्या तरी पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला
मोलाचे योगदान देऊन गंगेत विलीन झाला.
52 श्लोकांचे हे गंगालहरी स्तोत्र साहित्याचा एक उत्तम नमुना आहे. प्रत्येक श्लोक एकापेक्षा एक वरचढ आहे. येणार्या गंगादशहराच्या निमित्ताने ह्या अनुपम स्तोत्राचा आस्वाद आपल्याला मराठीतही घेता यावा म्हणून गंगालहरींना मराठीत भावानुवादित करुन आपल्या सर्व भक्तगणांसमोर ठेवतांना मला आनंद होत आहे. ह्या गंगालहरी वाचतांना आपल्या मनात आनंदलहरी निर्माण करतील अशी आशा आहे.
गङ्गालहरी / पीयूषलहरी
गङ्गालहरी / पीयूषलहरी
जगन्नाथ पण्डितकृता गङ्गालहरी
(वृत्त-
शिखरिणी अक्षरे - 17, गण- य म न स भ ल ग , यति - 6, 11 )
समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्-
महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः ।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां
सुधासोदर्यं* ते सलिलमशिवं नः शमयतु ।। 1 ।।
अन्वय - (भो गङ्गे!) हे गंगे ते- तुझे तत् – ते सलिलं- जलप्रवाह नः – आमच्या अशिवं - अकल्याणास शमयतु – शमवो. नाश करो. यत् - जे सकल वसुधायाः – संपूर्ण पृथ्वीचे किमपि – अनिर्वचनीय, अमूल्य समृद्धं - समपन्नता सौभाग्यं - , लीलाजनितजगतः – ज्याने विना सायास ही 14 जगे निर्माण केली आहेत तो खण्डपरशोः – शत्रूचे खंडन/ नाश करणारा परशु ज्याच्या जवळ आहे असा शिव महैश्वर्यं- असीम सम्पत्ती श्रुतीनां - वेदांचे सर्वस्वं – संपूर्ण धन सर्वस्व, सुमनसां- पवित्र मनाच्या देवांचे मूर्तं -मूर्तिमंत सुकृतं - पुण्य सुधासौंदर्यं - अमृतासमान शोभा / सुधासोदर्यं – अमृताची बहीण असणं (1)
(सुधासोदर्यम्* - सुधा म्हणजे अमृत हे
समुद्रमंथनातून बाहेर आले तर गंगा समुद्रात विलीन होते. एकाच समुद्राच्या पोटी
असलेल्या या जणु सख्या बहिणीच आहेत. त्यांचे गुण ही सारखेच आहेत. दोघीही
कल्याणकारीच आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे. काही ठीकाणी सुधासौंदर्यम् असा पाठही आहे.
अर्थात ह्याचाही अर्थ अमृताप्रमाणे सौंदर्य असलेली म्हणजेच कल्याणकारी असाच आहे. )
असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे
असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते
जलौघाने तू गे शमविसि तृषा या धरणिची
तृषार्ता पृथ्वीला निवविसि जलानेच जननी ।। 1.1
तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिसी
सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती ।
फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी
महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी।।1.2 2
जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले
जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि गमे ।
शिवाला त्या वाटे तव सलिल ऐश्वर्य बहु हे
म्हणोनी का मूर्ध्नी तुजसि करितो धारण सखे ।।1.3
असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे
असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।
तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते
सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके।।1.4
सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे
मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे ।
सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे
अनर्थांसी सार्या नित शमवु दे हे माय मम गे ।। 1.5
दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां
द्रुतं दूरीकुर्वन्सकृदपि गतो दृष्टिसरणिम्।
अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह
प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु न: ।। 2
अन्वयार्थ - (भो गङ्गे! ) इह दृष्टिसरणिं - नेत्रमार्गाप्रत सकृत् अपि – एकवार ही गतः(सन्) – प्राप्त झाला असता दरिद्राणां दैन्यं – दीन जनांचे दारिद्र्य, अथ- आणि दुर्वासनहृदां – ज्यांच्या मनात दुष्ट
वृत्ती राहते असे, पापी पुरुषांचे दुरितं - पाप अपि- सुद्धा दृतं- तात्काळ दूरीकुर्वन्- दूर करणारी द्राक् -शीघ्र आविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः-
माया अविद्या त्यांचा जो द्रुम म्हणजे वृक्ष त्याच दलन म्हणजे खंडन
करण्याची दीक्षा देणारा गुरू अयं –
(जो) हा, , ते- तुझा वारां प्रवाहः – जळाचा प्रवाह, नः - आम्हाला अपारां- अपरिमित श्रियं- सम्पत्ती दिशतु- देवो. । (2)
जलौघासी पाहे निमिषभर जो दीन कुणिही
तयाच्या दैन्याची जननि न निशाणीहि उरवी
मनी दुष्टांच्याही कणव अति निर्माण करिसी
चुकीच्या संकल्पा हटविसि मनातून सहजी ।। 2.1
मनी फोफावे जो सघन तरु अज्ञानस्वरुपी
करी त्याचे उन्मूलन सहजि लाटा सुरधुनी
गुरू तो शिष्याला सजग करी ज्ञानांजनबळे
सलीलाने तैसे मम सकल अज्ञान हरणे ।। 2.2
गुरू माऊली तू तवची जलधारा पुनित ही
मनाच्या अज्ञाना अति जलद टाकी निरसुनी ।
तुझी धारा वाहे अविरतचि माते सुखमयी
हरो ती पापांना करुनि मजला मंगलमयी ।। 2.3
उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी-
कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः ।
भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गंगातनुभुव-
स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ।।3
अन्वय – उदञ्चन्मार्तण्ड- उगवणारा सूर्य स्फुटकपट- स्पष्ट कपट हेरम्बजननी- गणपतीची आई म्हणजे
पार्वती कटाक्ष- नजरेचा कटक्ष व्याक्षेप- चिरकाल स्थिती क्षणं – स्वल्पकाळ जनित - उत्पन्न संक्षोभनिवहाः- भयांचा समूह हरशिरसि शिवाच्या माथ्यावर; त्वङ्गन्तः – कापतात, थरथरतात. गङ्गातनु – गंगेची तनू म्हणजे देह
म्हणजे तिचा प्रवाह भुवः – उत्पन्न होतात प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः -अत्यंत उंच उंच लाटा भवतां - तुम्हा
भक्त जनांच्या दुरितभय- पाप,भय,भीती भङ्गाय भवतु – त्याचा भंग, नाश होवो । (3)
असूया दाटूनी धरुन सवतीममत्सर मनी
अति क्रोधे झाले नयनचि जिचे लाल अजुनी ।
जशी लाली प्राचीवर पसरते सूर्य उदयी
उमा टाकी ऐशी जळजळित दृष्टी तुजवरी ।। 3.1
शिवानीच्या ऐशा तिखटचि कटाक्षांस बघुनी
भवानीचा मोठा फणफुणत त्रागाच बघुनी ।
भयाने काया का थरथरत राहे तव अशी
जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करसी ।। 3.2 ।।
नभाशी लाटा ह्या तव सहजि स्पर्धाच करिती
जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती ।
तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे
धुवोनी पापांसी विमल मजसी तूच करिगे ।। 3.3 ।।
तवालम्बादम्ब स्फुरदलघुगर्वेण सहसा
मया सर्वेऽवज्ञासरणिमथ नीताः सुरगणाः।
इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा
निराधारो हा रोदिमि कथय केषामिह पुरः।।4
भो अम्ब! – हे जननि! तव- तुझ्या आलम्बात्- आश्रयामुळे स्फुरन् अलघु गर्वेण- ज्याचा दर्प अत्यंत वाढला
आहे अशा मया – मला/मी सर्वे – संपूर्ण सुरगणाः – देवांचे ताफे, समूह अवज्ञासरणिं -अवहेलनेच्या मार्गावर तिजप्रत सहसा – अविचाराने, अकस्मात् नीताः – नेले. भो भागिरथि – हे भगिरथ राजाच्या गंगे, इदानीं - आता उद्धरण समयी यदि – जर औदास्यं भजसि – उदासीन क्रियाशून्यत्व अंगिकारलेस
तदा- तर निराधारः – आधार सुटलेला, आधारहीन अहं – मी इह – या लोकी केषां – कोणाच्या पुरः – पुढे रोदिमि - रडू? हा! – हाय हाय! इति – हे; त्वं कथय – तूच सांग. (4)
अगे माझ्या पाठी जननि नित खंबीर असता
कुणा भ्यावे मी का? मजसि तव आधार असता! ।
विचाराने ऐशा जननि बहु गर्विष्ठ बनलो
किती देवांच्या मी अमल समूदायांस हसलो ।। 4.1।।
उपेक्षा देवांची मजकडुन झाली म्हणुन का
‘‘अशा वेळी माझ्या’’, जननि फिरवी पाठ अशि का ।
अगे उद्धाराचा समय मम येताच जवळी
अबोला ऐसा का धरि मजसवे हाय! जननी ।। 4.2 ।।
अगे सोडूनी तू मजसि जरि जाशीलच अशी
अनाथासी कैसा तुजविणचि आधार जगती ।
कसा स्फुंदू माते शिरुनचि कुणाच्या कुशित मी
निराधारासी ह्या, तुजविण न कोणीच जगती।। 4.3 ।।
स्मृतिं याता पुंसामकृतसुकृतानामपि च या
हरत्यन्तस्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः।
इयं सा ते मूर्तिः सकल-सुर-संसेव्यसलिला
ममान्त:सन्तापं त्रिविधमपि पापं च हरताम् ।। 5
हे गंगे! या – जी अकृत – जे केले नाही सुकृत – पुण्य अपि – तरीसुद्धा अकृतसुकृतानां अपि –पुण्य न करणार्याही पुंसां -पुरुषांच्या स्मृतिं – स्मरणाप्रत याता सति – प्राप्त झाली असता चंद्रांशुसरणिः – चंद्राच्या किरणांचा पथ तिमिरं इव – अंधाराला जसा अंतः तंद्रा – अंतःकरणाील तंद्रा म्हणजे
अज्ञानाला हरति – नाश करतो सा इयं – ती ही सकल सुर संसेव्य सलिला -
सगळ्या देवांना जिचे पाणी सेवनीय आहे अशी सलिल- पाणी ते – तुझी मूर्तिः – प्रवाहरूप मूर्ती मम – माझ्या अंतः – अतःकरणासंबधी त्रिविधं पापं- कायिक, वाचिक, मानसिक अशी
तीन प्रकारची पापं/दुष्कृत (आणि पातकांपासून उत्पन्न झालेला) त्रिविधा संतापं –(आध्यात्मिक, आधिदैविक,
आधिभौतिक )अशा सन्तापं – दुःख, क्लेश हरताम् दूर करो. (5)
उभ्या जन्मी ज्यांना कधिहि न सदाचार शिवला
अशाही पाप्यांनी हृदयि करिता आठव तुझा ।
महादोषांतूनी हसत करिसी मुक्तचि तयां
सदा देसी स्फूर्ती विरघळवि त्यांची शिथिलता ।। 5.1
तमा सारी दूरी कुमुदप्रिय तो चंद्रचि जसा
तसे तू हारी गे सकल तिमिरासी हृदयिच्या ।
कृपाळू ही मूर्ती जलमय तुझी देव स्मरती
कृपादृष्टीने तू तगमग मनीचीच शमवी ।। 5.2
अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा
विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम्।
सुधातः स्वादीयस्सलिलभरमातृप्ति पिबतां
जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम्।।6
(भो जननि !) हे माते! प्राज्यं अपि – समुद्रवलयांकित अशाही राज्यं – राज्याते/राज्यासी सहसा – एकाएकी, निर्लोभपणे तृणं इव – गवताप्रमाणे परित्यज्य – टाकून विलोलद्वानीरं – विलोलंतः वानीराः यस्मिन् तत्। वायूने वेताची झाडे जेथे कापत आहेत अशा. वानीर – वेताची झाडे तव- तुझ्या तीरं – तीरावर श्रितवतां -आश्रय करते झाले. सुधातः – अमृताहून स्वादीयस्सलिभरं – फार फार मधुर. सलिलाना – पाण्याचा भर – समूह स्वादीयान् -अति मधुर आतृप्ति -तृप्ति होईपर्यंत पिबतां – पिणार्या जनानां – लोकांचा आनंदः – आनंद निर्वाणपदवीं - मोक्षाचा दर्जा, स्थान, मार्ग परिहसति – उपहास करतो. (6)
जयांच्या सीमा ह्या पसरतिच आसिंधु; अशि ही
महासाम्राज्येही तृणसम अती तुच्छ स्मरुनी ।
महीच्या ऐश्वर्या सुखद विभवासीच त्यजुनी
तुझ्या ओढीने हे नृप कितिक आले तव तिरी ।। 6.1
बने वेळूची ही डुलति पवनासंगति जिथे
बनी वेतांच्या त्या वसतिच सुखाने नृप तिथे ।
मिळे त्यांना तृप्ती सलिल तव आकंठ पिउनी
सुधेलाही नाही सर तव जलाची लवभरी ।। 6.2
तुझे प्राशूनीय मधुर जल हे अमृतमयी
अगे ते मोक्षाला हसति उपहासेच जननी ।।6.3
प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी-
गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः।
मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता
विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम्।। 7।।
भो
मातः ! - हे आई प्रभाते - प्रभातकाळी
स्नातीनां (स्नांति -स्नान करतात त्या स्नाती)-
तुझ्या पाण्यात स्नान करणार्या नृपतिरमणीनां –
राजांच्या सुंदर स्त्रियांच्या कुचतटिगतः - स्तनांच्या
भागावर रात्री विलासार्थ लावलेला मृगमद- कस्तूरी तव –
तुझ्या तोयैः – पाण्याशी, पाण्यासोबत यावत्
- जेव्हा मिलति -संलग्न होतो तावत् – तात्काल विमलवपुषः –
ज्यांचे (वपु-) शरीर पातके जाऊन निष्पाप
झाले आहे ते मृगाः – (कस्तूरी) मृग/हरिण वैमानिकशतसहस्रैः
- विमानातून फिरणार्या (देवांची) शते आण त्या शतांची सहस्रे -म्हणजे हजारो
देवगणांनी परिवृताः – युक्त
झालेले नंदनवनं – इंद्राच्या क्रीडावनात
स्वच्छंदं – यथेच्छ, मनसोक्त विशंति – संचार करतात. (7)
जळी स्नानासाठी अरुण-उदयाच्याच समयी
स्त्रिया राजांच्या ह्या जळि शिरति आकर्षक अती
तयांच्या अंगीची जळि विरघळे कस्तुरि उटी
तुझ्या संपर्काचा जननि महिमा अद्भुत अती ।।7.1।।
अगे कस्तूरीसी सलिल करता स्पर्श अमले
मिळे त्या पुण्याने `परिमलमृगा' स्वर्ग सुख हे
हजारो देवांच्या सह फिरति ते नंदनवनी
वनीचे कस्तूरी-मृग सहज स्वर्गी विहरती ।। 7.2 ।।
(परिमलमृग – कस्तुरीमृग. क्तुरीमृगांची कस्तुरी वापरून केलेली उटी गंगेच्या पाण्यात विरघळली , तेंव्हा गंगेचा स्पर्श त्या कस्तुरीला झाल्याने जणू त्या कस्तरीमृगांनाही स्वर्ग प्राप्त झाला.)
स्मृतं सद्यः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि
प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति।
इदं तद् गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं
मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु।।8
भो
भागिरथी – हे गंगे यत्- जे
सकृत -एकदा अपि – सुद्धा
स्मृतं- चिंतिले असता सद्यः – तात्काळ
स्वांतं- अंतःकरणातें शांतं - द्वेश,लोभादि
विकार रहित/ सुखयुक्त अशातें विरचयति- धारण करतो/लिहीतो/ यत्- जे
सकृदपि – एकवारही प्रगीतं – उत्कंठेने
, भक्तिभावाने गीत उच्चारले असता पापं– पाप, दु;ख च
-आणि भवतापं – संसार संबंधी दुःखे, ताप
झटिति -तत्काल हरति – नाश
करते. तत् – ते/हे श्रवणरमणीयं -कानांना
सुखकारक किंवा ऐकावयास मधुर गंगा इति -गंगा असे
प्रसिद्ध पदं – अक्षरसमुदाय
– मम – माझ्या प्राणप्रान्तः – मरणसमयी
वदनकमलान्तः – मुखकमलामधे विलसतु – नृत्य
करो. (8)
अगे “गंगा” ही जी श्रवण सुख दे अक्षरद्वयी
करे कानांनाही निरतिशय जी तृप्त सहजी ।
जया उत्कंठेने सहज स्मरता एकसमयी
मिळे चित्तासी ह्या अपरिमित शांती त्वरितची ।। 8.1 ।।
अगे संसाराचा अति जटिल गुंता उकलवी
अशा ह्या नामाचे स्मरण घडु दे अंतसमयी ।
`नमो गंगे' ऐशा मधु-मधुर शब्दांस रसना
सदा सेवो, ठेवो मुखकमलि गे अंतसमया ।। 8.2 ।।
यदन्तः खेलन्तो बहुलतरसन्तोषभरिता
न काका नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः।
निवासाल्लोकानां जनिमरणशोकापहरणं
तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः ।। 9
भो गंगे – हे गंगे यदन्तः – (यस्य अन्तः यदन्तः) ज्या
तीरावर खेलन्तः – क्रिडा करतात,खेळतात काकाः
– कावळे बहुलतरसन्तोषभरितः – अतिशय
आनंदाने युक्त झालेले नाकस्य – स्वर्गाचा
अधीश्वर- पती नाकाधीश्वरस्य –
इंद्राचे नगर- गाव/पुर ते
साकांक्षमनः – इच्छेने युक्त,साभिलाष
मन- अतःकरण न भवन्ति – होत
नाहीत; तसेच निवासात् – निवास
केल्याने, राहिल्याने लोकानां – जनांचे जनिमरणशोकापहरणं
– जन्म, मृत्यू आणि शोक (पत्नी, पुत्र इत्यादि नाशापासून होणारे दुःख ते जनिमरणशोक
) त्याचा नाश करणारे तत् – ते हे तुझे तीरं-
किनारे, काठ नः आम्हाला
श्रमशमन – श्रमांचे शमन - नाश
धीर – समर्थ
श्रमशमनधीरं-
श्रमांचा नाश करण्यास समर्थ असलेले भवतु – होवोत.(9)
कुणीही येता गे तुज जवळि त्यासी सुखविसी
असो साधा दुर्लक्षित खग कुणी वायस जरी ।
तुझ्या तीरी तोही अनुपम सुखासीच मिळवे
मनाजोगे खेळे मुदितमन स्वच्छंद विहरे ।। 9.1 ।।
कधी स्वर्गाची तो हृदयि अभिलाषा नच धरी
नको वाटे त्यासी सुखमयचि स्वर्गादिक गती ।
बुडाले शोकाते जन प्रियजनांच्याच विरहे
दिलासा लाभे त्या तव तिरि रहाताच सुभगे ।। 9.2 ।।
कितीही सायासा तनु-मन-श्रमासीच हरण्या
धडाडीची तू गे अढळ अति खंबीर असता ।
सुबत्ता समृद्धीयुत तव किनारे सुखद हे
करो दूरी कष्टा, श्रम, खटपटी, शीण अमुचे ।। 9.3 ।।
न यत्साक्षाद्वेदैरपि गलितभेदैरवसितं
न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः।
निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो
विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिनि तत्त्वं न विषयः ।। 10 ।।
हे सुरतटिनी –हे देवांच्या नदी गंगे, यत् - जे गलित भेदैः – गेला आहे भेद ज्यांच्यापासून ते गलितभेद- अद्वैत प्रतिपादक अशा वेदैः अपि – वेदांनीही साक्षात – प्रत्यक्ष अवसितम् – इयत्तेने वर्णिले नाही यस्मिन्- ज्या विषयी जीवानां- व्यासादि प्राण्यांचा मनोवागवसरः (मनः च वाक् च मनोवाचौ) त्यांचा अवसर – व्यापार तो मनोवागवसरः न प्रसरति – प्रसार पावत नाही, प्रवृत्त होत नाही निराकारं ज्याचा आकार गेला आहे ते शरीर नसलेले नित्यं – निरंतर,नित्य, उत्पत्ती,नाश रहित, निज – आपला महिम- महिमा निर्वासित – नाशिले आहे तमः – अंधार; स्वप्रकाशाने किवा स्वप्रभावाने नाशिले आहे तम अंधकार ज्याने ते – निजमहिमनिर्वासिततमः – स्वतःच्या महतीने किंवा स्वप्रकाशाने नाशिला आहे तम म्हणजे अंधकार ज्याने विशुद्ध – मायामलविरहित तत्त्वं – (तत् त्वं असि – ते तू आहेस) न संशयः – ह्यात संशय नाही. (10)
असे अद्वैताचे निरवयव जे ब्रह्मपदची
करीती ज्याचाची निगम महिमामंडन अति ।
परी वर्णू जाता म्हणति, ‘‘कळले ना अजुनही’’
पदा त्या वर्णाया शरण म्हणुनी मौन धरिती ।। 10.1 ।।
मती खुंटे व्यासांचिहि उकलता ब्रह्मपद जे
स्फुरे ना वाचा ही स्वरुप बघुनी निर्गुण असे ।।
अशा तत्त्वाचे का अनुसरण सोडूनचि भले
करावा ऐसा का सलिल-तनुचा गौरव बरे
।। 10.2 ।।
विचारी ऐसे का मज जललते गे जननि तू
अगे अज्ञानाचा घनतम निवारी सहज तू ।।
असे चिद्रूपाची सगुण पुतळी तूच सुभगे
निराकारी ऐसे विमल अविनाशी जल तुझे ।। 10.3 ।।
( निगम - वेद )
महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन्
न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि।
अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया
ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः ।। 11 ।।
भो
भागिरथि – हे गंगे यत् –
जे महादानैः – मोठ्या दानांनी (गज, अश्व, तुला, परु
शिबिक आदि ) ध्यानैः – चित्त एकाग्र करणार्या
प्राणायमरूप समाधिने बहुविध – अनेक प्रकारच्या वितानैः
– यज्ञांनी च – आणि घोराभिः –
भयंकर, करावयास अत्यंत कठीण अशा सुविमलतपोराशिभिः अत्यंत
शुद्ध निर्मळ अशा तपाच्या मोठ्या संचयाने, समूहाने अपि न लभ्यं –
सुद्धा जे मिळत नाही तत् – ते अचिन्त्यम्-
विचार सुद्धा करू शकणार नाही असे विष्णोः पदम् –
नारायणाचे पाय, किंवा विष्णोः पदं –
वैकुंठ अखिलसाधारणतया –
कोणाला लहान मोठे असा भाव न ठेवता, सर्वांना समभावाने ददानां
– देणारी त्वं – तू इह
– ह्या लोकी केन – कोणाशी तुलनीया
– तुलयितुं योग्या- तोलावयास योग्य, बरोबरी करण्यास पात्र असि
– आहेस? इति – ते, आम्हाला कथय
– सांग. (11)
विचारांच्या वाटे अति पलिकडे विष्णुपद जे
जयाच्या लाभाच्या मन कधि विचारास न धजे ।
किती मोठी दाने व्रत नियम ध्यानादि करुनी
मिळेना कोणासी हरि चरण जे घोर तपुनी ।। 11.1 ।।
असे वैकुंठाचे पद सहजि देसी मिळवुनी
अगे सर्वांशी तू नितचि समभावास धरुनी
जनांना नेशी त्या निकट हरिच्या पादकमली
तुझ्या दातृत्वाला जगति तुलना नाहि जननी ।। 11. 2 ।।
नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं
शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु।
अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो
विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम् ।। 12
(भो
गंगे हे गंगे,) ईक्षमात्रात् – दर्शनमात्रेच
नृणाम् – मनुष्याच्या भवभयम्
– संसारापासून उत्पन्न होणारं भय परिहरन्त्याः –
नाश करणारी शिवायाः – कल्याणकारी शिवाची किंवा
कल्याण करते ती ते – तुझ्या मूर्तेः – (प्रवाहरूपी सगुण)
मूर्तीच्या महिमानं – महात्म्य इह - या लोकी कः –
कोण निगदितु – बोलेल? श्रीकण्ठः – (
हलाहल प्राशनाने काळा होण्याची) श्री म्हणजे शोभा ज्याच्या कंठाला प्राप्त झाली
आहे तो श्रीकंठ शिव अमर्षम्लानायाः
-क्रोधाने म्लान , मूर्छित झाली आहे गिरिभुवः – हिमालय पर्वतापासून उत्पन्न
झालेल्या पार्वतीचा परमं – अत्यंत अनुरोधम्
विहाय – अनुनय, अनुसरण सोडून यां
– जिला नियतं – निरंतर शिरसि-
मस्तकी धारयति - धारण करतो. (12)
तुझे होता माते क्षणभरचि गे दर्शन निके
अगे तू कल्याणी हरसि भवदुःखे समुळ गे ।
कसा वर्णावा तो तवचि महिमा उज्ज्वल बरे
विषाचा कंठा जो मिरवि हर त्या तू रुचतसे ।। 12.1 ।।
हृदी शंभूच्या तू उपजविच मोहा बघुन हे
शिवाची अर्धांगी फणफणत कोपागृही झुरे
हिमाद्रीकन्येचा अनुनय परी ना शिव करे
तिला दुर्लक्षूनी शिव तुजसि माथ्यावरि धरे ।। 12.2 ।।
विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-
रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः।
हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां
कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे।।13
(भो गंगे हे गंगे,) उन्मतैः अविचारी पुरूषांनी विननिन्द्यानि – महा निंदा करावयास अत्यंत योग्य अशी अपि च – आणि पतितैः – मोठी मोठी ब्रह्महत्यादि पातके करून प्रायश्चित्त न केल्याने जातिभ्रष्ट झालेल्या पुरूषांनी परिहार्याणि -टाकावयास योग्य, परिहार्य अशी व्रात्यैः- उपनयनादि संस्कार न झाल्याने धर्मभ्रष्ट झालेल्या पुरूषांनीही अवाच्यानि -बोलावयास अशक्य अशी, उच्चारही करता येणार नाही अशी पिशुनैः – भीतीने अंगावर काटा येऊन अपास्यानि -ज्याचा त्याग करतात अशी कियतां – अपरिमित लोकानां- लोकांच्या एनांसि – ज्याच्या योगाने पुरूष अघः – नरकाप्रत जातात अनवरत – निरंतर हरन्ती – नाशणारी अशी एका – असहाय अशी कदा- अपि – कधिही अश्रान्ता – श्रम न पावणारी त्वं -तू जगति – भूमंडलावर विजयसे – जय पावतेस. (13)
कुकर्मे ऐकूनी अति अधम जी विकृत अती
खलांचा माथाही सहजचि झुकवा शरमुनी ।
मदोन्मत्तांनाही खजिल करि जे पाप मनि गे
न उच्चारावे ही, म्हणतिच अधर्मी नर असे ।। 13.1 ।।
धजेना ज्या कर्मा अधम करण्या निंद्य म्हणुनी
खलांच्या ये अंगी सरसरुन काटाच श्रवणी ।
अशाही पापांचे निरसनचि तू एक करि गे
न घे विश्रामासी अनवरत सत्कार्य करि हे ।। 13.2 ।।
असे कोणापाशी तुजसमचि सामर्थ्य इतुके?
श्रमांचे वाटेना कधि तुजसि ओझे जललते
तुझ्या ह्या कीर्तीचा त्रिभुवनिच डंका घुमतसे
जगी सातत्याने सुविजय पताका फडकते ।।13.3 ।।
स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये
जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा।
अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां
गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः।।14
(अये जननि – हे आई) अवनितलशोपहृतये – पृथ्वीतळावरील जनांच्या शोकशमनासाठी स्वर्लोकात् – स्वर्गातून स्रवन्ती – द्रवणारी, पडणारी अशी त्वं – तू पुरभिदा- त्रिपुरासुराला भेदणार्या
त्या शिवाने जटाजूटग्रन्थौ – जटा बांधू तयार झालेल्या गाठीमध्ये यत् – ज्यापेक्षा विनिबद्धा – विशेष कौशल्याने तुला बांधले आहे. तव- तुझ्या गुणानां एव – सर्व भूतदया पाप हरण करणे
इत्यादि गुणांचाच अयं- हा बंधनरूप दोषः – दोष परिणतः – परिणाम पावला. (14)
जगाच्या कल्याणा अवतरसि पृथ्वीवर कशी
तुझ्या धारा धो धो उतरतिच स्वर्गातुन भुवी
तयांना लीलेने शिव शिरि धरी बद्ध करुनी
विरक्ताच्या चित्ती उपजविसि मोहास फिरुनी।।14.1
कशी ही लीला गे तव जल तरंगांत लपली
ठरे अंगीचाही गुण अवगुणाच्यासम कधी
गुणांच्या सान्निध्ये नकळत कसा दोष उपजे
निराकारालाही सगुण करिसी तूच सरिते ।।14.2
जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्
ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन्।
निलिम्पैर्निमुक्तानपि च निरयान्तर्निपततो
नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि ।। 15 ।।
हे अम्ब - हे जननि, इह- या कलियुगी जडान् – जडमति वा कुठलेही काम
करावयास न जमणार्या अन्धान् – नेत्रहीन पंगून् – पांगळ्यास, प्रकृतिबधिरान् ,
उक्तिविकलान् – जन्मजात बधिरांना मूकांना, ग्रहग्रस्तान् – नवग्रहांच्या
दशेने त्रस्त झालेल्यांस, किंवा भुतपिशाच गणांनी अशांत, त्रस्त अखिल
– संपूर्ण दुरित
-पातके त्याचा निस्तार – नाश त्याची सरणिः
प्रायश्चित्त मार्ग अस्ता – नाही आहे.
अस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् –ज्यांना प्रायश्चित्ते नाहीत अशी महा पातके
करणारे त्यांना ; निलिम्पैः
-देवांनी निर्मुक्तान् – आपल्या
हातून रक्षण होत नाही म्हणून त्यागलेले अशा अपि च - आणि निरयस्य -नरकाचा जो अन्त मध्य तो
निरयान्त निरयान्तः- नरकामधे,
निपततः – पडतात ते नरान् – माणसांना त्रातुं
– रक्षिण्यास त्वं – तू परमं-
उत्कृष्ट भेषजं -औषध असि-
आहेस. (15)
अपंगा अंधांना विकलमति वा मूक बधिरा
ग्रहांच्या पीडेने हतबलचि झाले जन तया ।
न प्रायःश्चित्ते ज्या अधम कृति जे नीच करती
सुरांच्या क्रोधाने पिचति नरकी जे नर तयी ।। 15.1 ।। -----
जयांसी ताराया हतबल असे देवगण हा
अशांना ताराया जगि असशि दिव्यौषधि महा ।।15.2 ।।
स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-
मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति।
मुदा यं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः
समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः ।। 16 ।।
भो मातः हे आई, स्वभावस्वच्छानां -स्वभावतःच निर्मळ असलेल्या
सहजं – अनायासाने शिशिर – शीतल अशा ते तुझ्या;
अपां – उदकांचा अपारः – अथांग निरवधि – असा अयं - हा कः अपि -काही एक लोकोत्तर, महिमा- मोठेपणा; जगति -जगतात जयति – सर्वोत्कर्षाने राहतो.
सगरजाः – सगर राजाचे राजपुत्र अवद्य
– निंद्य, अनवद्य
– स्तुत्य अशी द्युति – कांती, प्रभा; बिभ्रति - धारण करतात ते; अनवद्यद्युतिभृतः
- देदिप्यमान, कान्तिमान असे; स्फुट – प्रकट पुलक
-रोमांच सांद्र -गच्च भरलेले, सम्पृक्त; स्फुटपुलकसान्द्र
– रोमांचिततनु; द्युतल- स्वर्ग लोकाते; समासाद्य-
प्राप्त करून,पावोन; अद्यापि – अजूनही; यं
– ज्या महात्म्याने मुदा – आनंदाने; गायन्ति
– गातात. (16)
तुझे पाणी आहे नितळ सहजी शीतल अती
जयाची कीर्ती ही बहु पसरली दूरवरती
तुझ्या पुण्यस्पर्शे सगरसुत ते दिव्य बनती
विमानी बैसोनी स्मरति महिमा गे सुरधुनी।।16.1
सुखे रोमांचांनी तनु बहरुनी येत तयिची
पवाडे गाती ते अजुनहि तुझे स्वर्गसदनी ।।16.2
कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनस:
समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः।
अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान्
नरान् दूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे ।। 17
भो जननि – हे आई कृतक्षुद्रैनस्कान् – स्वल्प किवा क्षु्द्र पापे करणारे अथ – पापाचरणानंतर झटिति - तत्काल; सन्तप्तमनसः – पश्चात्तापयुक्त अंतःकरणाच्या नरान् – पुरुषांते समुद्धर्तुम् – केलेल्या पापापासून मुक्त करण्यास त्रिभुवनतले – त्रैलोक्यात; तीर्थनिवहाः - तीर्थांचे समूह; सन्ति – आहेत; अथापि – परंतु ; हे जननि – हे आई; प्रायश्चित्त- पापनाशसमर्थ धर्माचे प्रसरण म्हणजेच आचरण; त्याचे पंथ – मार्ग ते प्रायश्चितप्रसरणपथ त्याते अतीत -अतिक्रांत आहे चरित -आचरण अपि – सुद्धा. म्हणजे खूप काळ बुद्धिपूर्वक मोठी मोठी पातके केल्यामुळेजयांना प्रायशचिताचा मार्गच राहिला नाही अशाही (नरान्- पुरुषाते) दूरीकर्तुं -पापापासून दूर करावयास त्वं इव – तुझ्यासारखी त्वं – तूच! विजयसे – उत्कर्ष पावतेस. (17)
किती तीर्थे त्यांची गणति करिती
कोण जगती
अती छोटी पापे धुवुनि जन उद्धार करिती
परी प्रायश्चित्ते नसतिच जया वेद वदती
हरोनी पापे ती सतत यशसोपान चढसी
।। 17
निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां
प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः।
समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां
श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः।।18
(भो
जननि – हे आई); धर्माणां – वेदप्रणित
धर्माचे; निधानं – खजिना, दौलत, आगर, भांडार ;
च – आणि नवमुदां – नूतन
हर्ष ; किमपि – काही एक ; विधानम्
– आज्ञा, यज्ञ; च - आणि
तीर्थानां - पवित्र जलस्थानांमध्ये ; प्रधानं
– मुख्य च – आणि; त्रिजगतः – त्रैलोक्याचे ; अमलपरिधाानं- स्वच्छ, निर्मळ वस्त्र च
- आणि बुद्धेः – बुद्धीचे ; समाधानं
– स्थैर्, शांती, संतोष ; अथ – आणि ;
अधियां – मूढांचे, दुष्टांचे ; तिरोधानं – अंतर्धान
होणे, दूर हटवणे ; च – आणि ; श्रियां
– सौभाग्य, मोक्षसिद्ध्यादि लक्ष्मीचे ; आधानं – विरासत,
वारसा हक्काने मिळालेली सम्पत्ती, निवेश असे;
तव – तुझे वपुः – प्रवाहरूपी शरीर नः
– आमचे ; तापं – पीडा, कष्ट, संताप, वेदना,
दुःख ; परिहरतु – दूर करो . (18)
सदाचाराचा तू कणखरचि पाया मज गमे
असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष मनि गे
असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती
गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती।।
विवेकाच्या चित्ती नित स्फुरत जो मोद सुभगे
असे तोची तू गे असशि धन तू पुण्य कृतिचे
क्षणार्धी नेई गे कुमति विलयासी जल तुझे
मनीच्या क्षोभाला तव तनुलता स्पर्श करु दे ।।18
पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां
महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम्।
ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो
वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि ।। 19 ।।
भो
मातः - हे आई ; इह – ह्या लोकी यत् – ज्या अर्थी ; ते – तुझा ; वियोगः -ताटातूट
किंवा स्नान सेवनादिकांचा लाभ न होणं
; अयं – हा
; द्रविणमदिरा – धन हेच जणु दारू वा मद्य
त्याने आघूर्णित – भ्रमित
आहे ; दृक् – दृष्टि; ज्यांची ते ; द्रविण
– धन ; द्रविणमदिराघूर्णितदृशः –
धनरूपी मद्याने ज्यांचे डोळे फिरले आहेत अशा; नाना
-अनेक ; महीपानां - राजांच्या
; पुरः – पुढे ; नियतं – नियमाने
; धावं धावं - धावून धावून – तरूणतरखेदस्य
– अत्यंत वृद्धी पावणार्या अशा खेदाने ग्रासलेल्या ; स्वहितशतहन्तुः
– आपल्या शेकडो कल्याणांचा नाश करणार्या ; जडधियः – मंदबुद्धी,
मूर्खाचा ; मम एव
माझाच ; मंतुः – अपराध
(समजून) ; अतः – या कारणास्तव (त्वया-
तुझ्याकडून ) क्षणम् अपि - क्षणभर तरी करुणा –
दया ; (करणीया – केली जावी.) (19)
धनाची धुंदी ज्या नृपति पदि त्या नित्य झुकलो
तया मागे मागे फिरत बहु दुःखात पिचलो
स्वहस्ते पाडीला जणु स्वपदि धोंडा जननि मी
स्वकल्याणाचा गे भरकटत गेलो सुपथ मी ।। 19.1 ।।
अशा ह्या वेड्याची कणव करि गे तूच हृदयी
क्षमा माझ्या सार्या गहन अपराधांसचि करी
अगे मानूनी तू क्षणभर कृपापात्र मजसी
तुझ्या वात्सल्याचा अनुभव मला दे कणभरी ।। 19.2 ।।
मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-
स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि।
सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं
जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु।।20
तरंगांची नक्षी जलि पवन रेखाटित असे
परागांची लाली कमल हलता त्यात मिसळे
सुरस्त्री अंगीची उटि मिसळते ज्या तव जली
जलाने त्या नाशी जननमरणा तू लवकरी ।।20
समुत्पत्ति: पद्मारमणपदपद्मामलनखा-
न्निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने।
अथायं व्यासङ्गो
हतपतितनिस्तारणविधौ
न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्ति जगति।।21
निघाली तू माते हरिचरण पद्मे त्यजुनिया
जरा विश्रांतीसी थबकसि शिवाच्या शिरि जरा
धुवाया पापांसी श्रमवि तव काया अविरता
म्हणोनी वाढे या जगति महिमा उज्ज्वल तुझा।।21
नगेभ्यो यान्तीनां
कथय
तटिनीनां
कतमया
पुराणां संहर्तुः
सुरधुनि
कपर्दोऽधिरुरुहे।
कया वा
श्रीभर्तुः
पदकमलमक्षालि
सलिलै-
स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः।।22
गिरी जन्मा येती कितिक सरिता; ना तुजसमा
मिळे ना कोणासी शिवशिरि कधी स्थान सुषमा
हरीच्या पायासी विमल करण्याचीच क्षमता
नसे एकीलाही सर तव नखाची तसुभरा।।22
विधत्तां निःशङ्कं
निरवधिसमाधिं
विधिरहो
सुखं शेषे
शेतां
हरिरविरतं
नृत्यतु
हरः।
कृतं प्रायश्चित्तैरलमथ
तपोदानयजनैः
सवित्री कामानां यदि जगति जागर्षि जननि।।23
सुखे ब्रह्मा बैसो नयन मिटुनी ध्यान करण्या
हरी झोपो शेषावर, शिव करो तांडव सदा
नको प्रायश्चित्ते तप यजन दाने करु नका
असे गंगा जागी जगि अशुभ दुःखांसि हरण्या ।।23
अनाथः स्नेहार्द्रां
विगलितगतिः
पुण्यगतिदां
पतन्विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः
सिद्धभिषजम्।
सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं
शिशुः सम्प्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम्।।24
अनाथाची माझ्या जननि असशी तू सुखमयी
यशाचा दावी तू पथ; भटकतो मी जनि-वनी
जगाला उद्धारी; पतित बहु मी श्रांत-हृदयी
असे रोगी मी; तू असशि कुशला वैद्य जननी ।।24.1
तहानेला मी गे; जलतनुचि तू अमृतमयी
तुझ्यापाशी आलो; करि उचित माझेच जननी ।।24.2
विलीनो वै
वैवस्वतनगरकोलाहलभरो
गता दूता
दूरं
क्वचिदपि
परेतान्
मृगयितुम्।
विमानानां व्रातो
विदलयति
वीथीर्दिविषदां
कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात्।।25
तुझ्या रूपाने गे सुख अवतरे या महिवरी
तुझ्या पुण्याईने सकल जन स्वर्गास मिळवी
विमानी लोकांची लगबगचि जाण्या सुर-पुरी
प्रभावे गंगेच्या नरकपुरि ती ओस पडली।।25.1
कृतांताच्या दूता शव मिळत नाही तव तिरी
सजा द्याया त्यासी नरकपुरिची ती भयकरी
न ये ऐकू कानी नरकपुरिचा गोंधळ कधी
अशी ही कल्याणी तव सुरस गाथा सुखमयी।।25.2
स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिल-
ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां न:
प्रतिदिनम्।
हरन्तां सन्तापं
कमपि
मरुदुल्लासलहरी-
च्छटाश्चञ्चत्पाथः कणसरणयोः दिव्यसरितः।।26
मनी कामक्रोधे धगधगत आहेच वणवा
जयाच्या ज्वाळा ह्या उसळुनि करी दग्ध तनुला
जलासंगे खेळे पवन उधळे मौक्तिक वरी
तुषारांनी त्या तू मम हृदय-दाहास शमवी ।।26
इदं हि
ब्रह्माण्डं
सकलभुवनाभोगभवनं
तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिन्दुकमिव।
स एष
श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो
जलानां संघातस्तव जननि तापं हरतु नः।।27
धरी त्रैलोक्याला उदरि जरि ब्रह्मांड बरवे
प्रवाही गंगेच्या परि फळ झुले ते चिमुकले
जटांमध्ये गुंते तव जल शिवाच्या च शिरि हे
सलीलौघाने त्या जननि मजसी पावन करे ।।27
त्रपन्ते तीर्थानि
त्वरितमिह
यस्योद्धृतिविधौ
करं कर्णे
कुर्वन्त्यपि
किल
कपालिप्रभृतयः।
इमं तं
मामम्ब
त्वमियमनुकम्पार्द्रहृदये
पुनाना सर्वेषामघमथनदर्पं दलयसि ।।28
मला पाहोनी गे शरमतिहि तीर्थे मनि त्वरा
करा ठेवी कानी `शिवशिव' म्हणे देवगण हा
अशा पाप्याला म्या कर पुनित हे जाह्नवि पुन्हा
दरिद्री तीर्थांच्या हरण करि गर्वासि शुभदा ।।28
श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितै-
र्विमुक्तानामेकं किल
सदनमेनःपरिषदाम्
।
अहो मामुद्धर्तुं
जननि
घटयन्त्याः
परिकरं
तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः।।29
अती नीचांनाही धजवत नसे पाप करण्या
धनी पापांचा मी सकलचि अशा; भार भुइला
तरी उद्धाराया मजसि कटिबद्धा जननि तू
स्तुती गाऊ कैसी तव जननि मी गे नरपशू ।।29
न कोऽप्येतावन्तं
खलु
समयमारभ्य
मिलितो
यदुद्धारादाराद्भवति जगतो
विस्मयभरः।
इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती- –
मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः।।30
`जयाच्या उद्धारे सकलजन हो विस्मयभरे
अशासी तारीता सहजि मम कीर्तीच पसरे'
तुझ्या या उद्देशा सफल करण्या मी पतित गे
तुझ्या दारी आलो करि तव
मनीषा सफल गे ।।30
श्ववृत्तिव्यासङ्गो नियतमथ
मिथ्याप्रलपनं
कुतर्केष्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम्।
अपि श्रावं
श्रावं
मम
तु
पुनरेवं
गुणगणा-
नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम्।।31
जगे श्वाना जैसा खळगि भरण्या क्षुद्र तनुची
वरी बोले खोटे सतत परदोषांसि चघळी
सदा निंदा तोंडी `गुण' मम असे ऐकुन जनी
तुझ्या वाचोनी गे मम
मुख न कोणी निरखती ।।31
विशालाभ्यामाभ्यां किमिह
नयनाभ्यां
खलु
फलं
न याभ्यामालीढा
परमरमणीया
तव
तनुः।
अयं हि
न्यक्कारो
जननि
मनुजस्य
श्रवणयो
र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः।।32
मनासी मोही गे जलमय तुझी सुंदर छबी
परी त्या रूपा जी कमलनयने ना निरखिती
न नादा ऐकी जे खळखळ जलाच्या मधुरशा
मिळे कैसी त्यांना सुखद अनुभूती तव पहा ॥32.1
टपोरे डोळे ते असुन उपयोगी न लव ते
नसे ज्या कानांसी मधु
मधुर उद्देश्य कुठले
फुका गात्रे ऐशी असुनि नसल्यातीतचि जमा
नसे कामाचे ते अवयवचि धिःकार तयिचा ।।32.2
विमानैः स्वच्छन्दं
सुरपुरमयन्ते
सुकृतिनः
पतन्ति द्राक्पापा
जननि
नरकान्तः
परवशाः।
विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ
जनपदे
न यत्र त्वल्लीला दलितमनुजाशेषकलुषा।।33
सुखाने पुण्यात्मे सहज सुरलोकी
विहरता
विमानी बैसोनी अनुभवति स्वच्छन्द जगता
परी पाप्यांसाठी भयद बहु ती रौरवपुरी
पराधीनांसी त्या त्वरित करि बंदीच जुलुमी ।। 33.1
अशा या भेदांच्या असति नगरी
पापसदृशी
परी सर्वांसगे अति सुखद तू वर्तन करी
असो पापी वा तो सुजन करसी ना फरक तू
अगे माते देसी सकलचि जना मोक्षफल तू ।। 33.2
अपि घ्नन्तो
विप्रानविरतमुशन्तो
गुरुसतीः
पिबन्तो मैरेयं
पुनरपि
हरन्तश्च
कनकम्।
विहाय त्वय्यन्ते
तनुमतनुदानाध्वरजुषा-
मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः।।34
करी विद्वानाचा वध कुणि अती निर्दयपणे
लबाडीने कोणी कनक धन नेई लुटुन ते
गुरूपत्नीलाही अधम कुणी भोगे फसवुनी
सुरापानाऐसी अति अधम कृत्ये नित करी॥34.1
महापाप्यांनी या स्मरुन तुजसी अंतसमयी
जरी केले गंगाजल जवळ ते अंतसमयी
तरी त्यांच्या पायी सुरव र मुनी नित्य नमिती
अती पुण्यात्म्यांच्या वरचढचि त्या देव समजी ॥34.2
मिळे यज्ञाचे ज्या फळ सकल सर्वस्व त्यजुनी
नरांपेक्षा ऐशा वरचढ सुखे त्यांस मिळती॥ 34.3
अलभ्यं सौरभ्यं
हरति
सततं
यः
सुमनसां
क्षणादेव प्राणानपि
विरहशस्त्रक्षतहृदां।
त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्
पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम्।।35
न ये कोणा हाती परिमल फुलांतील कधिही
परी त्या चोरूनी पवन सहजी जाय निघुनी
वियोगाने चित्ती विरहि जन जे नित्य झुरती
तयांच्या प्राणांसी परिमलरुपी
बाण
हरती ।। 35.1
असा नेई वारा सुमनधन वा प्राणधन जो
करे दुष्टावा त्या सुमन सुजनांसी पवन जो
तुझ्या लाटांसंगे पवन फिरुनी हो पुनित तो
जगाच्या उद्धारा त्रिभुवनि फिरे पुण्यगति तो ।।35.2
कियन्तः सन्त्येके
नियतमिह
लोकार्थघटकाः
परे पूतात्मान:
कति
च
परलोकप्रणयिनः।
सुखं शेते
मातस्तव
खलु
कृपातः
पुनरयं
जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः।।36
कुणी लोकांसाठी झटति जगि या
पुण्य मिळण्या
किती स्वर्गप्रेमी करिति तप
नाना विध अहा
सुकीर्ती लाभाया इह नि परलोकीच विमला
किती चाले त्यांची खटपट बहू सौख्य मिळण्या ।। 36.1
अगे माते माझा इह-परचि हा भार सकला
अती विश्वासाने जननि तव खांद्यावर दिला
जगन्नाथासी या लवभर न चिंता छळतसे
इथे घेई निद्रा जननि तव तीरावर सुखे ।। 36.2
भवत्या हि
व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्-
परित्राणस्नेह: श्लथयितुमशक्यः
खलु
यथा।
ममाप्येवं प्रेमा
दुरितनिवहेष्वम्ब
जगति
स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः।।37
जगी या पाखंडी अधम पतितांची च भरती
तयांच्या उद्धारा जननि असशी तू दृढव्रती
मला माते आहे अति जटिल पापातच रती
स्वभावा कोणी का बदलु शकतो ह्याचि जगती ।। 37
प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-
तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसंतानविधुतिः।
बिलक्रोडक्रीडज्जलडमरुडंकारसुभग-
स्तिरोधत्तां तापं त्रिदशतटिनीताण्डवविधिः।।38
शिवाच्या नृत्याते विखुरति जटा मुक्त गगनी
अशा संध्याकाली ‘कर लहरि’ मुद्रा तव करी
कपारींमध्ये हे जल डमरु वाजे खळखळा
तुझ्या नृत्याने या पुनित करि तू सर्व जगता ।।38
सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं
यदि त्वं
मामम्ब
त्यजसि
समयेऽस्मिन्सुविषमे।
तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते
निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा।।39
दिल्या सोडोनी मी हित अहित चिंता तुजवरी
नको सोडू माझ्या बिकट समयी तूच मजसी
तडा विश्वासासी जननि जर गेलाच तर गे
‘दयाळू सर्वांसी’ अशि विमल कीर्ती तव बुडे ।।39
कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः
पुरारेः प्रेङ्खन्त्यो
मृदुलतरसीमन्तसरणौ।
भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं
कोमलरुचा
करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः।।40
शिवाच्या वामांगी बसलि युवती कोण म्हणुनी
तिला भेटाया तू उतरलिस खाली शिवसखी
जटाजूटातूनी उसळत शिवाच्या लहरि या
उमेच्या केसांना जल-निकर हे स्पर्श करिता।।40.1
तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता
बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना
तुषारांसी टाकी निपटुनिच ती कोमलकरा
अशा या लाटांचा जगति जय होवो सतत हा।।40.2
(जल-निकर – जलबिंदुंचा समुदाय)
प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्रभवती-
मुपाधिस्तत्रायं स्फुरति
यदभीष्टं
वितरसि
शपे तुभ्यं
मातर्मम
तु
पुनरात्मा
सुरधुनि
स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्।।41
मनी नाना इच्छा धरुनि तुजपाशी कितिक हे
जथे या लोकांचे जमति परि त्या कारण तुझे
‘अभीष्टाते देसी’ जगि तव अशी कीर्ति पसरे
परी चित्ती प्रेमाविण शपथ माझ्या नच दुजे ।।41
ललाटे या
लोकैरिह
खलु
सलीलं
तिलकिता
तमो हन्तुं
धत्ते
तरुणतरमार्तण्डतुलनाम्।
विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं
त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम्।।42
तुझ्या पाण्याने या तिलक करिता
दुःख शमते
कपाळी दुर्दैवी विधिलिखितही ते बदलते
तुझ्या कर्तृत्वाला जननि तुलिता
भास्कर हरे
तुझ्या या मातीने मति पुनित
होवो त्रिपथगे।।42
नरान्मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो
हसन्तः सोल्लासं
विकचकुसुमव्रातमिषतः।
पुनानाः सौरभ्यैः
सततमलिनो
नित्यमलिना-
न्सखायो न:
सन्तु
त्रिदशतटिनीतीरतरवः।।43
जया देशी गंगा नसुनि जन ते गुंग स्वगृही
फुलांच्या रूपाने हसति तरु त्यांना तव तिरी
सुगंधातें भुंगे करुनी सुख स्नाने सुखविती
अशा या वृक्षांशी अतुट जडु दे प्रीति हृदयी।।43
यजन्त्येके देवान्कठिनतरसेवांस्तदपरे
वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये।
अहं तु
त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे
जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम्।।44
करी कोणी यज्ञा कुणि धरितसे योग पथ हा
अती कष्टाने वा कुणि करितसे देव यजना
हृदी गंगा नामे अविरतचि मी तृप्त मनसा
जगाच्या जंजाळा सहज मनि मानी तृणसमा ।।44
अविश्रान्तं जन्मावधिसुकृतजन्मार्जनकृतां
सतां श्रेयः
कर्तुं
कति
न
कृतिनः
सन्ति
विबुधाः।
निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु
भवतीं
विनाऽमुष्मिँल्लोके न परमवलोके हितकरम्।।45
सदाचारी साधू झटति करण्या पुण्य कृतिसी
तयांचे साधाया हित असति हे सज्ज सुरही
निराधारी पापी मजसम वरे एक तुजसी
तुझ्या वाचोनिया मजसि गति नाहीच दुसरी ।। 45
पयः पीत्वा
मातस्तव
सपदि
यातः
सहचरै-
र्विमूढैः संरन्तुं
क्वचिदपि
न
विश्रान्तिमगमम्।
इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे
चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम्।।46
तुझे पाणी प्यालो महति परि त्याची न मजला
तुला सोडूनी मी फिरत बसलो मूर्ख जगि या
परी विश्रांती ही पळभर कुठे ना गवसली
म्हणोनी आलो मी दमुनि तव तीरी परतुनी ।। 46.1
तुझ्या अंकी वारा मृदुल मृदुला शीतल गमे
बहू जागा मी गे मजसि निजवी प्रेमभरि गे
सुदीर्घा निद्रा ही जननि तव अंकीच निजु दे
दयाळू माते हे मजवरि कृपा तूच करि गे ।।46.2
बधान द्रागेवं
द्रढिमरमणीयं
परिकरं
किरीटे बालेन्दुं
नियमय
पुन:
पन्नगगणैः।
न कुर्यास्त्वं
हेलामितरजनसाधारणतया
जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः।।47
तुझा शेला बांधी कसुनि कमरेसी भरजरी
विषारी सर्पांनी करकचुन बांधी शशि शिरी
असे पापी साधा अशि मम उपेक्षा नच करी
जगन्नाथाची या (जगाच्या नाथाची) भरलि घटिका मोक्षसमयी।।47
शरच्चन्द्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां
करैः कुम्भाम्भोजे
वरभयनिरासौ
च
दधतीम्।
सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-
स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः।।48
तुझी मूर्ती रम्या शरद पुनवेच्या शशि समा
कला चंद्राची ही सजवि तव भाळा अनुपमा
सुधा धारा वाहे तव धवल वस्त्रे झुळझुळा
उभी गंगा शोभे धवल मगरीच्या वरि अहा।।48.1
धरी हाती कुंभा, वर, अभय, पद्मास शुभदा
तुझ्या या रूपाचे स्मरण करिता हार न कदा ।।48.2
(वृत्त- पृथ्वी, अक्षरे -17, गण- ज स ज स य ल ग, यति- 8,9)
दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-
र्भवज्वलनभर्जिताननिशमूर्जयन्ती नरान्
चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती
तनोतु मम शंतनोः सपदि शंतनोरङ्गना।।49
सुधेसम तुझे अती मधुर हास्य दुःखा पुसे
भवाग्नि नित पेटला जळत लोक तू वाचवे
प्रकाशि हृदयी चिरंतनचि चित्कला मूर्त तू
तनूस मम शांतवी सुखवि शंतनू पत्नि तू ।।49
(वृत्त –शार्दूलविक्रीडित, अक्षरे – 19, गण- म सज स त त ग, यति – 12,7)
मत्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं
सुराणां
गणैः
स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं
गारुत्मतैर्ग्रावभिः
वीचिक्षालितकालियाहितपदे स्वर्लोककल्लोलिनि
त्वं तापं तिरयाधुना मम भवज्वालावलीढात्मनः।।50
मंत्रांनी कर टेकिले मजपुढे झाली उणी औषधे
देवांचा जिरलाच गर्व पुरता झाली सुधा म्लान गे
ज्या पाहोनि मलाच भंगलि पहा रत्ने भयाने अहा
उद्धारी भवतापदग्ध मज या गंगे मुरारिप्रिया।।50.1
कालीयावर नाचता हरिपदा मालिन्य आले विषे
त्यासी तूच धुवोनि टाकि अमले भागीरथि प्राणदे
लाटा या तव पुण्यश्लोक सरिते स्वर्गीय नादा करी
चावी हा भवसर्प घोर मजला माते विषासी हरी ।।50.2
(वृत्त – स्रग्धरा, अक्षरे – 21, गण- म र भ न य य य , यति- 7 7 7)
द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं
सर्वस्वं हारयित्वा
स्वमथ
पुरभिदि
द्राक्
पणीकर्तुकामे
साकूतं हैमवत्या
मृदुलहसितया
वीक्षितायास्तवाम्ब
व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु।।51
द्यूता मध्ये हरोनी; शशि, वृषभ, मणी, चर्मवस्त्रे गणांसी
शंभू होता दरिद्री, हसुनि समयि त्या पार्वती बोलली ती
`गंगा लावा पणाला' बघुनि तुजकडे `प्राणनाथा त्वरेनी'
ऐकोनी शब्द क्रोधे उसळति लहरी, नाशु दे पाप राशी।।51
(वृत्त – इंद्रमाला/उपजाती, इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्राचे मिश्रण)
विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यः
कृतानेकजनार्तिभङ्गा
मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु।।52
शिवा-शिरी भूषण होय गंगा । करी जनांच्या भवतापभंगा ।
तरंग उत्तुंग जिचे मनोज्ञा । करोचि काया मम ही पवित्रा।।52
सुदीर्घ गंगालहरी मनोज्ञा । देतील आनंद हुशार तज्ज्ञा
तसाचि सामान्य जना-जनांना । लाभो सदा अक्षय हाचि ठेवा
म्हणून त्याचा अनुवाद केला । अरुंधतीने अति गोड साचा
प्रसन्न हो पावन चित्त त्याने । मनात विश्वासचि सार्थ वाटे
---------------
(
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, दशहरा प्रारंभ, 29 मे 2014 )
स न वि वि
ReplyDeleteआज गंगा लहरी स्तोत्रामधील एक शब्दाचा अर्थ शोधत असताना तुमचा ब्लॉग सापडला आणि एखादा खजिना हाती लागला आहे असं वाटलं . ☺
मी ठाणे येथे राहणारी एक गृहिणी आहे आणि सध्या पौरोहित्य शिकते आहे. त्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्हाला गंगा लहरी पाठ करायचे आहे . अर्थ समजून पाठ करावे म्हणून मी अर्थ शोधत होते
तसं मला बुक गंगा वर श्री विंझे यांचा पद्यानुवाद मिळाला आहे , पण त्यातील भाषा जास्त जुनी आहे. शिवाय त्यांनी एका श्लोकाला एकच श्लोक असा अनुवाद केला आहे ,
असो
तुमच्याशी परिचय करून घ्यायला आवडेल, माझ्या तुटपुंज्या ज्ञानात तुम्ही भर घालू शकाल, म्हणून लगेचच हे पत्र लिहिते आहे
तुम्ही हे खूप छान काम केलं आहे
धन्यवाद आणि शुभेच्छा
कळावे,
सुनवंती उरसेकर
ReplyDelete...विदग्ध तज्ज्ञा।
तसाचि सर्वा इतरेजनांना
...
——————————
वा! वा! अरुंधती!
काय सुंदर अनुवाद केला आहेस. तुझ्या लेखणीतून असंच सरस लेखन घडो आणि आम्हाला त्याचा आनंद दीर्घकाळ मिळो.
आम्हा सर्व सदस्यांतर्फे तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
काव्यलब्धरसास्वादप्रवीणकुलदीक्षिता।
लभतां प्रतिभा नित्यं परोत्कर्षमरुन्धती।।
On Fri, 19 Jun 2020 at 5:55 AM, Arundhati Dixit wrote:
अशा सुंदर सुवासिक पुष्पांजलीमुळे अतिशय आनंद झाला. अत्यंत सुबोध आणि काव्यमय अनुवाद करणे हे साध्य पूर्ण केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. आणि मला गुरुपदी ठेवल्याबद्दल धन्यवाद. 🌹🌹🌹
ReplyDeleteनमस्ते ताई, मी शुभम निकम. कोल्हापूर मधून. हे स्तोत्र भाषांतर २०१६ मध्ये वाचनात आले होते. तुम्ही अनुवाद केलेले हे स्तोत्र पुन्हा पुन्हा लयबद्ध वाचून मी भावगदगद होत असतो. मी सुद्धा तुम्हालाच गुरू मानले.
ReplyDeleteयाच ढब मध्ये काव्यलेखन/ अनुवाद करण्याचा आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्ती २०२१ मध्ये झाली. तोपर्यंत मी या अनुवादातील काही पद्यं सतत चिंतन मनन करत असे. २०२१ ला मी सुद्धा एका स्तोत्राचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच एकमेव त्यांचे प्रेरणास्थान आहात. तुमच्या सारख्या महाप्राज्ञ गुरूंच्या चरणी माझ्यासारख्या "परमरसिक" शिष्याचा मानाचा मुजरा. अनेक शुभेच्छा व अनंत आभार.
एक सुंदर अनुवाद, वाचून मन भरले, खूप खूप धन्यवाद मॅडम
ReplyDeleteनमस्कार. ,मला मूर्धनी अर्थ कळला नाही.सांगाल का?1.3
ReplyDeleteमाथ्यावर, डोक्यावर, शिरी
Delete