श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम्




श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम्

 दक्षिणामूर्ति म्हणजे भगवान शंकर. दक्षिणा ह्या शब्दाचा अर्थ सुंदर असा आहे. दक्षिणामूर्ति हे भगवान शंकराचे कल्याणकारी स्वरूपही असेच सुंदर आहे. लोकांना अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्या करताच परमेश्वराने दक्षिणामूर्तिचा अवतार घेतला. हा अवतार दक्षिण भारतात झाला म्हणूनही ह्याला दक्षिणामूर्ति असे म्हणतात. ही मूर्तिही दक्षिणाभिमुखच असते. 

               श्री आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले हे स्तोत्र म्हणजे जणु वेदांताचे सारच म्हणावे लागेल. जीवा शिवाची एकरूपता कशी आहे हे अतिशय चपखल दृष्टांत देऊन आचार्यांनी पटवून दिले आहे.

 

               ईश्वर ही संकल्पना, ईश्वराचे सर्वव्यापकत्व सोप्या प्रकारे समजावून सांगितले आहे. जीव, जगत् , आणि ईश्वर यांची एकरूपता समर्पक उत्तरे देऊन सिद्ध करून दाखवली आहे. भोक्ता जीव, भोग्य जग, भोगदाता परमात्मा आणि मोक्षदाता सद्गुरू हे सर्व तत्त्वतः अभिन्न आहेत हे सोप्या सिद्धांतांच्या द्वारे पटवून दिले आहे.

             भावानुवाद करतांना एक दोन ठिकाणी हे सिद्धांत अजून सोपे करण्यासाठी आणि मनात पूर्णपणे उतरण्यासाठी ज्ञानेश्वरीतीलही काही पूरक आणि सुंदर दृष्टांत मी त्यात गुंफले आहेत. हे सर्व दृष्टांत देतांना मूळ स्तोत्राच्या अर्थाला कोठेही धक्का लागणार नाही पण त्याचे मुळचे सौंदर्य अजुन खुलून येईल ह्याची काळजी घेतली आहे. 

             

श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम्

 (वृत्त- शार्दूलविक्रीडित; अक्षरे -19; गण - म स ज स त त ग ; यति-12)

विश्वं दर्पणदृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतं

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं तथा निद्रया

यः साक्षात्कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।1

 

गावाचे प्रतिबिंब ते दिसतसे जैसेचि हे दर्पणी

वा स्वप्नी बघतो स्वतःस नर तो बाहेर देहातुनी

अज्ञाने  गमते तसेच जग हे बाहेर आत्म्यातुनी

मायेचीच कृती मना भ्रमविते, व्यामोह तो निर्मुनी।।1.1

 

माझ्याहून नसे दुजा कुणिच ‘मी’ येता मला जागृती

स्वप्नीच्या भय, मोह या अनुभवा थारा न जागेपणी

प्रत्यक्षात नसे दुजे नगर ही, जे राहते दर्पणी

राहे ती नगरी मधेच नगरी, आभास तो दपर्णी।।1.2

 

देऊनी अपरोक्ष ज्ञान मजला निद्रेतुनी जागवी

देऊनी अनुभूति अद्वय अशा  ब्रह्मस्वरूपाचिही

‘आता विश्वप्रपंच ना मजहुनी हा वेगळा’; दाखवी

ऐशा त्या श्री गुरूमूर्तिसी शरण मी; श्रीदक्षिणामूर्तिसी।।1.3

 

बीजास्यान्तरिवाङ्कुरो जगदिदं प्राङ्निर्विकल्पं पुनः

मायाकल्पितदेशकालकलनावैचित्र्यचित्रीकृतम्।

मायावीव विजृम्भयत्यपि महायोगीव यः स्वेच्छया

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।। 2

( कलना बोध, जाणून घेणे )

जैसा वृक्षचि खोड पान सहिता संपूर्ण सामावतो

छोट्याशा अति बीमधेच सहजी अंकूर रूपात तो।

होते विश्व तसेचि लीन सहजी त्या निर्विकल्पामधे

व्यापूनी जगतास या उरतसे जे सर्वव्यापी असे।।2.1

 

उत्पत्तीसमयी परी जगचि हे वैविध्यतेने नटे

आहे भिन्नचि देशकालगणना हा भास मायेमुळे।

योगी वा कुणि जादुगार सहजी वाटे जगा मांडितो

इच्छेने सहजीच वा मिटवुनी खेळास त्या टाकितो।।2.2

 

शालू सुंदर रेशमी भरजरी पाहून झाल्यावरी

ठेवावा घडि घालुनीच सहजी होता तसा त्यापरी

देइ जांभई लीलया तशी कृती अत्यंत साधी जया

ऐशा त्या गुरुमूर्तिला शरण मी श्री दक्षिणामूर्तिला।।2.3

 

यस्यैव स्फुरणं सदात्मकमसत्कल्पार्थगं भासते

साक्षात्तत्वमसीति वेदवचसा यो बोधयत्याश्रितान्।

यत्साक्षात्करणाद्भवेन्न पुनरावृत्तिर्भवाम्भोनिधौ

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।3

( यस्यैव-ज्या आत्म्याचे। सदात्मकम् -सत्स्वरूप असलेले।स्फुरण - चैतन्य।असत्कल्पार्थगं - असत्तुल्य अर्थात स्वतसिद्ध  सत्तारहित असलेल्या विश्वातील सर्व पदार्थांमधे । भासते-प्रतीतीला येते )

विश्वाच्या अणुरेणुतून प्रकटे चैतन्य रूपीच जो

भक्तांना अपरोक्ष ज्ञान सहजी ‘ते तू असे’ देई जो

साक्षात्कार जिवा घडे मगचि तो ना ये पुन्हा जन्मुनी

ऐशा त्या गुरुमूर्तिलाचि नमितो श्रीदक्षिणामूर्तिसी।।3

 

नानाच्छिद्रघटोदरस्थितमहादीपप्रभाभास्वरं

ज्ञानं यस्य तु चक्षुरादिकरणद्वारा बहिः स्पन्दते

जानामीति तमेव भान्तमनुभात्येतत्समस्तं जगत्

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।4

 

छिद्रांची बहु नक्षि ज्यावर असे ऐशा घटी ठेविता

तेजस्वी अति दीप तो उजळुनी बाहेर फाके प्रभा।

तैसे तेवत आत्मतत्त्व नित हे राहीच देहामधे

बाहेरी प्रकटेच नेत्र, मुख वा सर्वेंद्रियातून जे।।4.1

 

तोची ‘ज्ञान प्रकाश’ थोर मिळता जाणीव होते जिवा

‘जाणीतो जग सर्व मे’ म्हणतसे तो जीव ज्याच्या बळा।

त्याची ज्ञानस्वरूप सुंदर अशा  चैतन्यरूपास मी

सप्रेमे,विनये प्रणाम करितो श्रीदक्षिणामूर्तिसी।।4.2

 

देहं प्राणमपीन्द्रियाण्यपि चलां बद्धिं च शून्यं विदुः

स्त्रीबालान्धजडोपमास्त्वहमिति भ्रान्ता भृशं वादिनः

मायाशक्तिविलासकल्पितमहाव्यामोहसंहारिणे

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।5

 

आहे देहचि आत्मतत्त्व वदती काहीच हे भ्रांति ने

कोणी अन्यचि प्राण, बुद्धि म्हणती; आत्माच हाची असे

वाटे सर्वचि इंद्रिये अचल ही ‘सत्तत्व’ ते भ्रांतिने

संदेहेचि पछाडले जग जणु अज्ञान, मोहामुळे।।5.1

 

मायेचाच असे प्रभाव सगळा व्यामोह ती निर्मिते

आत्म्याच्या विषयी कुणी अथक हे वाचाळ मांडी मते

जैसे बालक, अंध वा कुणि स्त्रिया बोले अडाणी कुणी

तैसे मानव घोर अल्पमति हे आत्म्यास ना ओळखी।।5.2

 

वाटे चंद्र पळे ढगातुन पुढे वेगे अती का असा

वा र्‍याने ढग पांगता कळतसे तो मेघची हालला

संदेहास करीच दूर मनिच्या ज्ञानामृता देऊनी

ऐशा त्या गुरुमूर्तिसी शरण मी श्रीदक्षिणामूर्तिसी।।5.3

 

राहुग्रस्तदिवाकरेन्दुसदृशो मायासमाच्छादनात्

सन्मात्रः करणोपसंहरणतो योऽभूत्सुषुप्तः पुमान्।

प्रागस्वाप्समिति प्रबोधसमये यः प्रत्यभिज्ञायते

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।6

 

जैसे की ग्रहणात  राहु अथवा केतूमुळे ग्रासिले

तेजस्वी रविबिंब, चंद्र पुरते जातीच झाकोळले 

मायेचा पडदा तसाच पडतो या शुद्ध आत्म्यावरी

ना ये ओळखु ‘आत्मत्तत्त्व’ मग ते झोपे जणू जीवची।।6.1

 

छायाग्रस्त रवी-शशी चमकती छायाच होता दुरी

होता ज्ञान, विरे च झोप, कळते, होतोच झोपेत मी

अज्ञाना हरुनीच जागवि मला चैतन्यमूर्ति कुणी

ऐशा त्या गुरुमूर्तिसी शरण मी श्रीदक्षिणामूर्तिसी।।6.2

 

 

बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा सर्वास्ववस्थास्वपि

व्यावृत्तास्वनुवर्तमानमहमित्यन्तः स्फुरन्तं सदा

स्वात्मानं प्रकटीकरोति भजतां यो मुद्रया  भद्रया

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।7

( व्यावृत्त - विलग केलेला। व्यावृत्ति- आवरण काढून टाकणे, निष्का  सन )

देहाच्या समवेत जे नित असे तीन्ही अवस्थांमधे

राहे बाल्यचि यौवनात जवळी वृद्धापकाळामधे

देहा जागृति वा सुषुप्ति असु दे स्वप्नात वा देह रे

देही तेवत राहते सतत हे ‘सत्तत्व’ ची शुद्ध रे।।7.1

 

जाते ओळखले चि  तत्व जगि हे ‘मी’ या च एकाक्षरे

जो जाईल तया अनन्य शरणा त्यासीच हे सापडे

जे कल्याण करी निरंतर स्फुरे वस्तूतुनी सर्वही

ऐशा त्या गुरुमूर्तिसी शरण मी श्रीदक्षिणामूर्तिसी।।7.2

 

विश्वं पश्यति कार्यकारणतया स्वस्वामिसम्बन्धतः

शिष्याचार्यतया तथैव पितृपुत्राद्यामनाभेदतः।

स्वप्ने जाग्रति वा य एष पुरुषो मायापरिभ्रामितस्-

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।8

 

विश्वाचा व्यवहार सर्व बघता वाटे किती भेद हे

सारे विश्वचि कार्य-कारण रुपे येतेच हे प्रत्यये

हाची मालक, दास तो कुणि असे कन्या पिता भेद हे

हा शिष्योत्तम हा गुरू; कुणि पिता हा पुत्र त्याचा असे।।8.1

 

देहाच्या नगरी वसे पुरुष जो आत्मा तया नाव रे

तोची स्वप्न सुषुप्ति जागृति अशा पाही अवस्थांसि रे

विश्वाचे व्यवहार सर्व बघतो तो साक्षिभावे सदा

मायेने परि वाटतो सहजी हा साऱयात की गुंतला।।8.2

 

चंद्राचे प्रतिबिंब ते हलतसे वाटे हले चंद्र हा

किंवा शांत जलाशयी पहुडला वाटे तरंगांविना

मेला चंद्र म्हणे अडाणिच कुणी आटूनि जाता जला

आहे चंद्र नभी अबाधित जसा देहीच आत्मा तसा।।8.3

 

वाटे लिप्त अलिप्त जो असुनही मायेमुळे सर्वदा

भेदांनी नटला असे गमतसे अज्ञान ते राहता

तेची आत्मस्वरूप -  तो पुरुष तो -  आत्माचि जो तत्वता

ऐशा त्या गुरुमूर्तिला शरण मी त्या दक्षिणामूर्तिला।।8.4

 

भूरम्भांस्यनलोऽनिलोऽम्बरमहर्नाथो हिमांशुः पुमा-

नित्याभाति चराचरात्मकमिदं यस्यैव मूर्त्यष्टकम्।

नान्यत्किंचन विद्यते विमृशतां यस्मात्परस्माद्विभोस्-

तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये।।9

 

पृथ्वी, तेज, सलील, वायु सहिता आकाश हे पाचही

भानू, चंद्र सवेच जीव मिळुनी विश्वाचि हो निर्मिती

ह्या वस्तूतुनी आठही, जगचि हे जातेच साकारले

कोठेही बघता चराचर जगी ह्या अष्ट रूपात ते।।9.1

 

आहे एकचि आत्मतत्त्व भरले ज्ञानी म्हणे या जगी

जाता पाहु नसे दुजे जगति या आत्म्याहुनी अन्यची

विश्वाकार धरे घडी उघडता ऐसे महा वस्त्र हे

तेची आत्मस्वरूप शुद्ध नमितो श्री दक्षिणामूर्ति हे।।9.2

 

सर्वात्मत्वमिति स्फुटीकृतमिदं यस्मादमुष्मिंस्तवे

तेनास्य श्रवणात्तथार्थमननाद्ध्यानाच्च संकीर्तनात्।

सर्वात्मत्वमहाविभूतिसहितं स्यादीश्वरत्वं ततः

सिद्ध्येत्तत्षुनरष्टधा परिणतं चैश्वर्यमव्याहतम्।।10

( परिणत- विनीत, झुकलेल्या  )

केले स्पष्टचि आत्मतत्त्व सहजी स्तोत्रात या सर्व हे

घेता जाणुनि, स्तोत्र पाठ करुनी, भावार्थ चित्ती धरे

जो श्रेष्ठांकरवी करी श्रवण हे गोडी जया चिंतनी

त्यासी ईश्वरतत्त्व लाभ घडतो साऱया विभूतींसवे।।10.1

 

त्यासी ईश्वरतत्व ते दिसतसे या पंचभूतांमधे

भानू चंद्र समस्त सृष्टि सजिवा वा निर्जिवांच्या मधे

जोडोनी कर अष्टसिद्धि च उभ्या त्याच्या पुढे राहती

राही वैभव ते अबाधित जया र्वात्मता लाभली।।10.2

 

 (अक्षरे-15, वृत्त-मालिनी, गण-न न म य य)

वटविटपिसमीपे भूमिभागे निषण्णं

सकलमुनिजनानां ज्ञानदातारमारात्।

त्रिभुवनगुरुमीशं दक्षिणामूर्तिदेवं

जननमरणदुःखच्छेददक्षं नमामि।।11

( विट - पल्लवयुक्त शाखा, विटपिन् वृक्ष किंवा वटवृक्ष )

बसुनि वटतरूच्या दाट छायेत खाली

सकलमुनिजनांसी सर्वही ज्ञान देई

त्रिभुवनगुरु तोची दक्षिणामूर्तिदेव

जनन मरण दुःखा नाशिण्या तो समर्थ।।11.1

 

शरण शरण मीही सर्वभावे अनन्य

नमन नमन पायी दक्षिणामूर्तिच्याच।।11.2

 

चित्रं वटतरोर्मूले वृद्धाः शिष्या गुरुर्युवा।

गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तुच्छिन्नसंशयाः।।12

( संशय - संदेह, शंका ,चंचलता, अस्थिरता )

दिसे वटतरूखाली वृद्ध शिष्य युवा गुरू

व्याख्यान गुरुचे मौन निःसंदेहचि शिष्य ही।।12

 

चिद्घनाय महेशाय वटमूलेनिवासिने।

सच्चिदानन्दरूपाय दक्षिणामूर्तये नम।।13

( सत् सत्य  /चित् - प्रत्यक्ष ज्ञान / आनंद)

बैसला वटवृक्षाच्या छायेमध्ये महेश्वर।

प्रसन्न चित्त जो नित्य  ज्ञानरूपी सदाशिव।

कैवल्यधाम संपूर्ण  दक्षिणामूर्ति शंकर।

सच्चिदानंद रूपी तो वंदितो परमेश्वर।।13

इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्यश्रीमच्छंकराचार्यविरचितं श्रीदक्षिणामूर्तिस्तोत्रं संपूर्णम्।।

असे हे श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेले श्रीदक्षिणामूर्तिस्तोत्र पूर्ण झाले.

-------------------------------------------------------

19 फेब्रुवारी 2011 / माघ कृ. प्रतिपदा गुरुप्रतिपदा

अष्टधा सिद्धी - (अणिमा- सूक्ष्म रूप धारण करणे, महिमा-मोठे रूप धारण करणे,लघिमा-कापसाप्रमाणे हलके होणे,  गरिमा-खूप जड होणे, प्राप्ति- पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व वस्तूंचे प्रत्यक्ष इंद्रियांनी आकलन होणे, प्राकाम्य - आकाश गमनासारख्या अलौकिक गोष्टी करता येणे,  ईशित्व- आपल्या संकल्प बलाने सृष्टि स्थिति आणि प्रलयकरण्याचे आणि सूर्यचंद्रादिकांचाही निग्रह करण्याचे सामर्थ्य असणे, वशित्व - लोकपालांसह सर्व लोकांना आधीन करून घेण्याचे सामर्थ्य असणे, )

 

 


1 comment: