अनात्मश्रीविगर्हणम्

                                    नरजन्माचे सार्थक होण्यासाठी नक्की कशाची आवश्यकता आहे ?  साधारणपणे ज्या माणसाकडे - विद्या, धन, संपत्ती, उत्तम पती अथवा पत्नी, मुले बाळे  असतात. त्यांना  समाजात सन्मानाने वागविले जाते. त्याचे सर्व चांगले चालले आहे असे समजले जाते. तो एक प्रतिष्ठित नागरीक म्हणून सर्वांच्या मनात मानाचे स्थान मिळवून असतो.
                                           आचार्य अशा सुप्रतिष्ठित माणसासंबधी बोलतांना त्याला आणि पर्यायाने आपल्याला एक प्रश्न विचारतात. उच्चविद्या, धन, मान, सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळालं म्हणजेच सर्व मिळालं काय?  त्याने काय साधणार आहे? नरजन्माचे सार्थक करायचे असेल तर एवढेच सांगा की आत्मसाक्षात्कार झाला का नाही. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार झाला नाही तो पर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी फिजूल आहेत. व्यर्थ आहेत.
                                     कोणी असा मात्र अर्थ घेऊ नये की विद्या, धन, मान, संपत्ती ह्या गोष्टी कोणी  मिळवूच नये. संसारात राहतांना ह्या सर्व गोष्टी मिळविणे भागच आहे. पण ह्या सर्व गोष्टी मिळाल्या नंतरही जोपयर्यंत   शरीरस्थ आत्मा आणि त्या सर्वव्यापी परमात्म्याचं नातं प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत त्यांच मिलन होत नाही किंवा जोपर्यंत त्या सर्वव्यापी परमात्म्यामधे तुम्ही विलीन होत नाही तो पर्यंत सर्व मिळूनही हाती काहीच लागलं नाही असं म्हणावं  लागेल. जो पर्यंत माणूस आपल्या कर्तृत्वाचं कर्तेपद सोडत नाही तोपर्यंत त्याला खरतर कुठलच समाधान लाभत नाही.

अनात्मश्रीविगर्हणम्


(शालिनी - अक्षरे -11, गण - म त त ग ग, यति - 4,7)

लब्धा विद्या राजमान्या तत: किं
प्राप्ता संपत्प्राभवाढ्या तत: किम्
भुक्ता नारी सुन्दराङ्गी तत: किं
येन स्वात्मा नैव  साक्षात्कृतोऽभुत्।।1

झाला मोठा उच्च विद्या मिळोनी
सन्मानासी पात्र देशी विदेशी
वा तो स्थाने भूषवी उच्च मोठी 
लक्ष्मी सेवी पाउले त्या नराची।।1.1

त्याच्या साठी अप्सरा भोगदासी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।1.2



केयुराद्यैर्भूषितो वा तत: किं
कौशैयाद्यैरावृतो वा तत: किम्।
तृप्तो मृष्टान्नादिना वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।2

उंची वस्त्रे भूषणे भूषवीती
मिष्टांन्नाचा  स्वाद तो रोज घेई
ऐश्वर्यासी ना उणे त्यास काही
सार्‍याने या साधले काय त्यानी।।2.1

ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।2.2



दृष्टा नाना चारु देशास्तत: किं
पुष्टाचेष्टा बन्धुवर्गास्तत: किम्।
नष्टं दारिद्य्रादि दु:खं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।3

हिंडूनी तो देश कित्येक येई
पाही त्यांच्या सृष्टिसौंदर्य, श्रीसी
देई पैसा सोयर्‍या धायर्‍यांसी
घेई त्यांची काळजी सर्व काही।।3.1

दारिद्य्राला तो पिटाळून लावी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।3.2




स्नातं तीर्थं जह्नुजादौ तत: किं
दानं दत्तं द्व्याष्टसंख्यं तत: किम्
जप्ता मन्त्रा: कोटिशो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।4

तीर्थक्षेत्री जाउनी नित्यनेमी
गंगा,गोदा,सिंधु स्नाने करोनी
देवोनी वा दान नाना प्रकारी
मंत्राचाही पाठ कोटी करोनी।।4.1

पूजूनीही सर्व त्या देवतांसी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।4.2



गोत्रं सम्यग्भूषितं वा तत: किं
गात्रं भस्माच्छादितो वा तत: किम्।
रुद्राक्षादि: संधृतो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।5

नाही अंगी सद्गुणांची कमी ती
ह्याच्या नावे गोत्रही धन्य होई
वा लावी तो भस्मलेपास गात्री
रुद्रांक्षांची घालितो  माळ कंठी।।5.1

कर्मे सारी आचरोनीच ऐसी
सांगा याने साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।5.2



अन्नैर्विप्रास्तर्पिता वा तत: किं
यज्ञैर्देवास्तोषिता वा तत: किम्
कीर्त्या व्याप्ता: सर्वलोकास्तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।6

मिष्टांन्नाच्या घालुनी भोजनासी
केले लाखो ब्राह्मणां तुष्ट भारी
केल्या पूजा यज्ञयागादि काही
देवांसीही तोषवीले मनासी।।6.1

तीन्ही लोकी कीर्ति होऊन मोठी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।6.2




काय: क्लिष्टश्चोपवासैस्तत: किं
लब्धा: पुत्रा: स्वीयपत्न्यास्तत: किम्
प्राणायाम: साधितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।7

राहूनीया एकभुक्ता,  अभुक्ता
केली काया क्षीण, देऊन कष्टा
पत्नी लाभे सुस्वभावी तयासी
आपत्येही लाभली योग्य त्यासी।।7.1

प्राणायामे जिंकिले इंद्रियांसी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।7.2



युद्धे शत्रुर्निजितो वा तत: किं
भूयो मित्रै: पूरितो वा तत: किम्।
योगै: प्राप्ता: सिद्धयो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।8

युद्धामध्ये जिंकिले शत्रु यानी
मिंत्रांचा तो घोळका त्या सभोती
योगाने वा प्राप्त सिद्धी तयासी
सार्‍याने या साधले काय त्यानी।।8.1

ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।8



अब्धि: पद्भ्यां लङ्घितो वा तत: कि
वायु: कुम्भे स्थापितो वा तत: किम्
मेरु: पाणावुद्धृतो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।9

लाभे सिद्धि त्यास अद्भूत मोठी
ज्याच्या योगे सिंधु लंघूनि जाई
मेरूलाही लीलया  हाति ठेवी
का त्या वाटे तो कडाही खडा ची।।9.1

अभ्यासाने साधिले कुंभकासी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।9.2



क्ष्वेल: पीतो दुग्धवद्वा तत: किं
                   वह्निर्जग्धो लाजवद्वा तत: किम्    
प्राप्तश्चार: पक्षिवत्खे तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।10

दुग्धा जैसे वीष ही प्राशितोची
लाह्यां जैसे तो निखारेहि खाई
सिद्धी सार्‍या प्राप्त होता तयासी
पक्षां जैसी तो नभी झेप घेई।।10.1

सार्‍या गोष्टी व्यर्थ त्या अर्थ नाही
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।10



बद्धा: सम्यक्पावकाद्यास्तत: किं
साक्षाद्विद्धा लोहवर्यास्तत: किम्।
लब्धो निक्षेपोऽञ्जनाद्यैस्तत: कि
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।11

अग्नी वायू पंचभूते च सारी
होती ह्यासी नित्य आधीन पाही
डोळ्यांमध्ये अंजने दिव्य घाली
शोधी साठे गुप्त सोने हिरे ही।।11.1

लोखंडाचे स्वर्ण केले तरीही
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।11.2



भूपेन्द्रत्वं प्राप्तमुर्व्या तत: किं
देवेद्रत्वं संभृतं वा तत: किम्
मुण्डिन्द्रत्वं चोपलब्धं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।12

झाला सार्‍या पृथ्विचा तोचि स्वामी
देवेंद्राच्या वा चढे आसनी ही
सन्याशांचा श्रेष्ठ राहे गरुची
सार्‍याने या साधले काय त्यानी।।12.1

ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।12.2



मन्त्रै: सर्व: स्तम्भितो वा तत: कि
बाणैर्लक्ष्यो भेदितो वा तत: किम्
कालज्ञानं चापि लब्धं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।13

ह्याच्या मंत्रांच्या प्रभावा बघोनी
आश्चर्याने लोक स्तंभीत होती
विद्या लाभे ह्या अलौकीक ऐसी
लक्षाचा हा वेध घेई शरानी।।13.1

कालज्ञासी या कळे वर्तमान
जाणे सारे भूत वा हा भविष्य
ना जाणे हा एक विद्या न ऐसी
सार्‍याने या साधले काय त्यानी।।13.2

ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।13.3



कामातङ्क: खण्डितो वा तत: किं
कोपावेश: कुण्ठितो वा तत: किम्।
लोभाश्लेषो वर्जितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।14

जिंकी व्याधी कामरूपी जरीही
क्रोधालाही थांबवी धैर्यधारी
लोभालाही स्पर्शु ना दे जराही
सार्‍याने या साधले काय त्यानी।।14.1

ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।14.2



मोहध्वान्त: पेषितो वा तत: किं
जातो भूमौ निर्मदो वा तत: किम्।
मात्सर्यार्तिर्मीलिता वा ततः किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।15

मोहाचा हा दाट अंधार भारी
धैर्याने त्या तो करी चूर्ण त्यासी
गर्वाचा ना लागला यास वारा
ऐसा त्याचा या जगी  बोलबाला ।।

मात्सर्यादी षड्रिपू घालवोनी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।15



धातुर्लोक: साधितो वा तत: किं
विष्णोर्लोको वीक्षीतो वा तत: किम्।
शंभोर्लोक: शासितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।16

राही हाही ब्रह्मदेवासवेची
आनंदाने सत्यलोकी सदेही
वैकुंठाच्या दर्शनाने च होई
पुण्यात्मा हा  नित्यची पुण्यदेही।।16.1

कैलासाचा जाहला हाचि स्वामी
सार्‍याने या साधले काय त्यानी
ज्यासी आत्मज्ञान झालेची नाही
लाभूनी तो सर्व राहे अभागी।।16.2



यस्येदं हृदयेसम्यगनात्मश्रीविगर्हणम्।
सदोदेति स एवात्मसाक्षात्कारस्य भाजनम्।।17

‘आत्मज्ञाना विना नाही। विद्या वा कमला खरी’
ज्याच्या ज्ञान हृदी ऐसे।  आत्मज्ञानास पात्र ची



अन्ये तु मायिकजगद्भ्रान्तिव्यामोहमोहिता:।
तेषां जायते क्वाऽपि स्वात्मसाक्षात्कृतिर्भुवि।।18

माया मोहात गुंतोनी । लोक जातात जे जगी
अनुभूतिच आत्म्याची। कल्पांतीही न ये तयी

----------------------------------------------

30 जुलै  2013





3 comments:

  1. लाभूनी तो सर्व राहे अभागी या धृपद ओळीतून स्तोत्राचा अर्थ चांगला ध्वनित होतो परंतु ततः किम चा खटका प्रत्येक ओळीत येण्यासाठी "तरी काय झाले" अशा स्वरूपाची पुन्हा पुन्हा येणारी शब्द रचना वापरता येईल का .....

    ReplyDelete
  2. धन्यवाद! आपली सूचना खूप मोलाची आहे. मी नक्कीच त्याप्रमाणे सुधारणा करायचा प्रयत्न करीन.

    ReplyDelete
  3. धन्यवाद! आपली सूचना खूप मोलाची आहे. मी नक्कीच त्याप्रमाणे सुधारणा करायचा प्रयत्न करीन.

    ReplyDelete