**।। सौन्दर्यलहरी ।।** ( विश्लेषण – श्लोक 1 – 2 0 )

 

      **।। सौन्दर्यरी ।।**

( विश्लेषण – श्लोक  –   )


प्रास्ताविक -

हे अमर्याद, असीम विश्व जराही चूक न होऊ देता अत्यंत सुरळीतपणे चालवणारी जी अनादि कालापासून काम करणारी आदिशक्ती आहे, जी महान ताकद आहे, त्या महाशक्तीलाच श्रीविद्या वा ललितामहात्रिपुरसुंदरी म्हणतात. ह्या शक्तीचं स्वरूप, वर्णन, गुणगान सौन्दर्यलहरी ह्या स्तोत्रात श्री आद्य शंकराचार्यांनी फार सुंदर रीतीने केले आहे.

शक्ती दिसत नाही पण तिचे परिणाम हे दृश्य असतात. त्या परिणामांमधून आपण त्या अदृश्य शक्तीची कल्पना करू शकतो. जसा सूर्यप्रकाश दिसत नाही; पण तो धूलीकणांवर पडून परावर्तित होतो. धुलीकणांमुळे जाणवतो आणि आपण त्याची कल्पना करू शकतो. नाहीतर आकाशाच्या पोकळीत धूलीकण नसल्याने प्रकाश किरण असूनही गच्च अंधारच भरलेला राहतो.

विश्वात अनेक प्रकारच्या शक्ती आहेत (जसे विद्युत्, चुंबकीय, गुरुत्वाकर्षण, उष्णता ----) ज्या एकमेकात परिवर्तित होऊ शकतात, बदलू शकतात. सर्व विश्वात कुठल्या ह्या अनेक प्रकारच्या शक्ती  भरून राहिल्या आहेत. ह्या सर्व शक्ती विश्वाचा गाडा सुरळीत चालविणार्‍या त्या महाशक्तीत अंतर्भूत असतात. त्या महाशक्तीचाच विविध शक्ती रूपांमधील आविष्कार ह्या विविध शक्तींच्या रूपातून प्रकट होत असतो.  ज्या प्रमाणे ठिणग्या, ज्वाला आणि अग्नीजाळ ही एकाच अग्नीची रूपे आहेत, त्याप्रमाणे जगातील विविध प्रकारच्या सर्व शक्ती विश्व चालवणार्‍या त्या महा शक्तीचीच वेगवेगळी रूपं अथवा अंश आहेत ज्यामुळे अनेक कार्ये घडवून आणली जातात.  आपल्या शरीरातील चैतन्य अथवा कुंडलिनी शक्तीही ह्याच महान शक्तीचा अंश आहे. इतकच नाही तर ह्या महान शक्तीत आणि आपल्यामधे असलेल्या ह्या शक्तीत एक मेळ (tuning) आहे.  ज्या योगे ती महान शक्ती म्हणजेच श्री त्रिपुराम्बिका सर्व जीवजंतुंवर पूर्ण नियत्रण ठेऊन असते.

ह्या विश्वाच्या व्यवस्थेत संपूर्ण ब्रह्मांडापासून लहानशा एका पेशीपर्यंत एक सुसूत्रता दिसून येते. जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या नियमानुसार घडणार्‍या सर्व  घडामोडी एकमेकींना समान वा पूरक असतात. कालचक्र, गतिचक्र, ऋतुचक्र, आणि आपल्या शरीरातील सहा चक्रे ह्यांचा मेळ साधलेला असतो. पंचमहाभूतांपासून ते पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या सर्व गोष्टी एकमेकांशी समतोल साधून असतात. कृती आणि त्याचा त्यानुसार होणारा परिणाम ह्यात एक समन्वय साधलेला असतो. विश्वाचा तोल साधायचं काम ही महाशक्ती करत असते.

पदार्थविज्ञानात (फिजिक्स) मधे एक नियम सांगतात, एखादी वस्तू ज्या स्थितीत आहे कायम ती त्याच स्थितीत राहते. ती वस्तू जर एका जागी स्थिर असेल तर ती तशीच तेथेच स्थिर राहते किंवा एखादी वस्तु फिरत असेल तर ती फिरतच राहते. स्थिर वस्तूला चल करण्यासाठी वा चल वस्तुला स्थिर करण्यासाठी ताकदीची, शक्तीची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक घटना घडविण्यामधे अथवा न घडविण्यामधे त्या विश्वरूप महाशक्तीची मोठी भूमिका असते.

आज आपल्या रोजच्या व्यवहारात आपण मिक्सर, मायक्रोवेव्ह, फ्रिज अशी अनेक उपकरणं वापरत असतो. ही उपकरणं आपल्याला रोजचं जीवन सुकर होण्यासाठी खूप मदत करत असतात. घराबाहेर पडायचं असलं तरी, कार, बस, विमान, ट्रेन ही साधनंही आपल्यामागे सशक्तपणे उभी असतात. प---ण! त्यांना मिळणारी विद्युत् उर्जाच बंद पडली तर ही उपकरणं असून नसल्यासारखी असतात.

हा सिद्धांत केवळ निर्जीवांसाठी नाही तर सजीवांसाठीही आहे. शक्तीच नसेल तर हात उचलण्यासारखी सोपी क्रियाही होणार नाही. चैतन्य नसलेलं शरीर निव्वळ कलेवर असतं. शक्ती आणि कर्ता ह्या दोन्ही गोष्टी असल्या तरच दृश्य परिणाम दिसून येतो. जग चालवणारी ही शक्ती सर्व विश्वामधे सर्वत्र  प्रचितीला येत असते.

आपल्याला कुठलं काम करायची इच्छा आहे त्यानुसार ती शक्ती प्रत्येकाला प्राप्त करून घ्यावी लागते. मग ते शारीरिक बल असो, बुद्धीबल असो मानसिक बल असो, सिद्धी प्राप्त करून घेण्याचे आत्मबल असो वा कोठले कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठीचे. ही शक्तीची उपासना त्या त्या क्षेत्रात अत्यंत मेहनत घेऊनच सिद्धीपर्यंत पोचवते. ज्याच्या गाठी काही पुण्य असेल त्यालाच हा विवेक कळतो.

सौन्दर्यलहरी ह्या स्तोत्रात श्रीविद्येच्या उपासनेत श्रीचक्रपूजेला वा श्री यंत्रपूजेला अग्रस्थान आहे.  तंत्रशास्त्राच्या दृष्टीने हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्यातील प्रत्येक श्लोक हा मंत्रस्वरूप आहे. प्रत्येक श्लोकात काही बीजभूत मंत्र अंतर्भूत असतात. प्रत्येक श्लोकासाठी पृथक् पृथक् असे यंत्र आहे. त्याची पूजा अनुष्ठान पद्धतिही आहे. प्रत्येकाची फळेही वेगवेगळी आहेत. `श्रीयंत्र’ हे ह्या स्तोत्राचे मुख्य यंत्र आहे. आणि `श्रीविद्या’ ह्या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राच्या निरूपणाच्या मिषाने  देह हेच श्रीचक्र असून  त्यातील षट्चक्रांचे अत्यंत उत्तम विवेचन केलेले असून उपासकाची  कुंडलिनी कशी जागृत होते व तो कुंडलिनी शक्तीच्या जागृतीने अन्तर्मुख होऊन शिवशक्तीस्वरूपाशी कसा समरस होतो हेही वर्णिले आहे.

ह्या स्तोत्रासंबंधी अशीही एक आख्यायिका आहे की, एकदा भगवान श्री आद्यशंकराचार्य कैलासावर गेले असता  तेथे पार्वतीसह विराजमान भगवान शंकरांना पाहून त्यांनी भक्तीभावाने त्यांना नमन करून प्रसन्न झालेल्या शिवाकडून सौन्दर्यलहरी हे स्तोत्र मागून घेतले. प्रसन्न झालेल्या शिवाने सौन्दर्यलहरी लिहिलेली पाने शंकरांचार्यांच्या हाती दिली. ती पाने घेऊन येत असता नंदिकेश्वराची दृष्टी त्यांच्यावर गेली. तो त्यांच्या अंगावर धावून गेला.  आणि त्यांच्या हातातील पाने तोंडाने ओरबाडली. उरलेली फाटकी पाने घेऊन आचार्य धावत सुटले ते थेट भूमंडळावर आले. निवांतपणे जेव्हा बसून ते श्लोकांची जुळवाजुळव करू लागले तेव्हा काही श्लोक खंडित झाले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा शंकराची उपासना केली आणि  आणि शिवकृपेने मधेच तुटलेले श्लोक त्यांना परत स्फुरले आणि त्यांनी हे स्तोत्र पूर्ण केले.

काही जण ह्या स्तोत्राचे दोन भाग मानतात. पहिल्या  श्लोकांच्या भागाला आनंदलहरी म्हणतात तर पुढच्या ते ०० म्हणजेच ५९  श्लोकांच्या भागाला सौन्दर्यलहरी म्हणतात. पहिला अंश/भाग मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्त्विक स्वरूपाचे प्रतिपादन करत आहे तर दुसरा भाग ध्यानाला योग्य अशा तिच्या सगुण स्वरूपाचे प्रतिपादन करत आहे. लोकव्यवहारात ह्या दोन्ही भागांना मिळूनच सौन्दर्यलहरी म्हणतात. अशा प्रकारे तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, योगशास्त्र, तत्त्वज्ञान आणि साहित्याच्या दृष्टीने अप्रतीम काव्य असलेले सौन्दर्यलहरी हे शंभर श्लोकांचे स्तोत्र एक आगळेवेगळे अत्यंत उच्च कोटीचे स्तोत्र आहे. शक्तीच्या उपासनेसाठी इतरही अनेक स्तोत्रे असली तरी हे स्तोत्र अत्यंत विशाल, गहन अशा सरोवरासारखे आहे. ज्यात सर्व स्तुतींचा सामावेश होतोच.

असो! पण सर्व स्तोत्र आपण अत्यंत लक्षपूर्वक  वाचावे, मनन चिंतन करावे कारण काही श्लोक हे कळण्यास तितके सोपे नाहीत. अध्यात्मिक भाषेचा वापर कमित कमी करून साध्या भाषेत ते सांगायचा मी प्रयत्न केला आहे.

कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी ह्यांनी दिलेली टिका सप्रमाण मानून मी प्रथम वा नवीन वाचकांना रुचेल पटेल, गहन वाटणार नाही एवढाच अर्थविस्तार देत आहे.  त्यातील तांत्रिक भाग, प्रत्येक श्लोकासाठी असलेली यंत्र वा त्याचा उपासना विधी हा भाग मी येथे दिलेला नाही. श्लोकाखाली दिलेले शब्दार्थ वामन शिवराम आपटे  ह्यांच्या शब्दकोशातून ( चौखम्बा प्रकाशन) दिलेले आहेत. तसेच संस्कृततज्ज्ञ आदरणीय प्रो. माणिकताई ठकार ह्यांनी माझा अर्थाला नेमकेणा येण्यासाठी ज्या सूचना केल्या त्या माझ्या श्लोकात येतील ह्याचा मी प्रयत्न केला आहे.  ज्या त्रुटी आहेत त्या माझ्या.

----------------------------

श्लोक 

शिव स्वतः सर्व गोष्टींमधे कितीही कुशल असला तरी शक्तीच नसेल तर तो इकडची काडी तिकडे करू शकणार नाही. अगदी इवलीशी गोष्टही करू शकणार नाही. साधं स्पंदनही करू शकणार नाही. साध्याशा घडणार्‍या कृतीतही शक्ती आवश्यक असते. शक्तीनेच ब्रह्माण्डही चालत आहे. आणि शक्तिनेच एकपेशीय इवलासा जीवही जीवनक्रमणा करत असतो. हे शक्ती महात्म्य जाणून ब्रह्मा विष्णू महेशही आाणि इतर देव शक्तिस्वरूप अशा त्रिपुरसुंदरीची करुणा भाकत असतात. तिचं गुणगान करत असतात. तिच्याकडून बल, शक्ती मिळावी म्हणून तिची स्तुती स्तोत्रे गात असतात. तीच सर्वांची आराध्यदेवता आहे. अशा ह्या शक्तिस्वरूप देवीला प्रारंभीच माझे नमन असो.


* शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं

नचेदेवं देवो खलु कुशलः स्पन्दितुमपि

अतस्त्वामाराध्यां हरि हर विरिञ्चादिभिरपि

प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ।।  ।। *

{ अन्वय - देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं नचेत् सः स्पन्दितुं अपि खलु कुशलः न। अतः हरि-हर-विरिञ्चिदिभिः अपि आराध्यां त्वा प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ।।}

 

* शिवाला शक्तीची जरि मिळते जोड लवही

तरी येई त्याला बहु विकलता पांगुळवि जी ।

विना शक्ती विश्वंभर शिव शवाच्या सम उरे

विना शक्ती होती सुरहि सगळे आगतिक गे ।।.।।

 

 न शक्तीवाचूनी घडत जगती कार्य कुठले

असो ते मोठे वा अति अतिच वा क्षुद्र कुठले ।

कराया कृत्ये वा सहज घडण्या स्पन्दन-गती

न शक्तीवाचूनी सुरसमिप पर्याय जगती ।।.।।

 

म्हणोनी आराध्या म्हणति तुज ब्रह्मा हर हरी

तुझी प्राप्ती माते कठिण; जरि ना पुण्य पदरी ।

असे गाठी ज्याच्या अति विमल ते पुण्य विपुला

तया होते बुद्धी, नमन स्तवनासीच तुझिया ।।  .।।*

--------------------------

श्लोक 


आई पोळ्या करतांना पाहून छकुलीही मागे लागते, `` आई, मला पण पोळी करायचीए.’’ मग आईही सुपारीएवढा गोळा तिच्या खेळातल्या पोळपाटावर ठेवते. बराचवेळ छकुली छोटिशी चानकी लाटत राहते.

भातुकली माहित नाही आता खेळतात का नाही; पण माझ्या लहानपणी घरातील एखादी चादर बाल्कनीत दोनचार ठिकाणी बांधून केलेल्या आडोशाला घर म्हणत; प्रत्येकाच्या घरातून आलेल्या गुळ, पोहे, दाण्यांवर भातुकली साजरी व्हायची. खूप वेळ झाला की आईचा आवाज येई, ``मुलांनो, चला आवरा रे आता भातुकली.’’ मुलंही बांधलेली चादर सोडून परत भातुकली आवरून खाऊचा चट्टामट्टा करून आपापल्या घरी जात.

 जिच्या विस्ताराची आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी ही जगज्जननी शक्ती आहे. तिच्या इशार्‍यावर सार्‍या ब्रह्मांडाचे व्यवहार सुरळीत चालू आहेत. लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या तार्‍यांना, कृष्ण विवरांना पहाणं तर दूरच पण त्यांची माहिती मिळवणंही असंभव अशा अगणित तार्‍यांना, सूर्यांना, विवरांना, लाखो आकाशगंगाना स्वतःत सामावून त्यांना नियमानी बांधून त्यांचं अस्तित्त्व टिकवणारी ही त्रिपुरसुंदरी आणि तिचा असीम विस्तार पाहून ब्रह्मा विष्णू महेशालाही सृष्टी बनवण्याचा भातुकलीसारखा खेळ खेळावासा वाटू लागला. तिघांनी कामही वाटून घेतली. पण त्याच्यासाठी त्यांना साधन सामुग्रीची आवश्यकता होती. त्यासाठी-

 ब्रह्मदेवाने मातेच्या चरणकमलातील एक पराग उचलून सृष्टी बनवायला घेतली. अविकल म्हणजे निरंतर ही सृष्टी बनविण्याचे, त्रैलोक्य निर्मितीचे त्याचे काम अजूनही चालूच आहे. त्यानी बनवलेल्या खेळातल्या सृष्टीतील खेळातल्या इवल्या इवल्या भूतमांत्रांना रोज अन्न देऊन जगवण्याची जबाबदारी विष्णूवर आली.  त्याने मातेच्या पायाला लागलेला एक कण उचलला. पण तो सहस्रशीर्ष असा विष्णु तो एक कण डोक्यावर उचलून आणता आणताच त्याच्या भाराने डगमगायला लागला. भातुकली आवरून ठेवायचं काम महेश्वराला मिळालं. त्याने मातेच्या पायाची कणभर धूळ उचलून घेऊन त्याच्या कामाला प्रारंभ केला.

 थोडक्यात महाप्रचंड अशा  ब्रह्मांडामधील, एका असीमित विश्वामधील, अनेकोअनेक तार्‍यांमधील, सूर्यासारख्या एका तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहांमधील, एका पृथ्वीचा कारभार अखिल ब्रह्मांडाच्या तुलनेत नखभर वा कणभर सुद्धा नाही. त्यात त्याच्यावरील प्राणीसृष्टी आणि माणूस हा किती नगण्य आहे ही कल्पनाच केलेली बरी. ह्या असीम विश्वाचा कारभार चालवणार्‍या त्या शक्तीची कणभर ताकद पृथ्वीच्या अस्तित्त्वासाठी वापरली जात असली तरी, ह्या ब्रह्माण्ड नावाच्या अमर्याद विस्तार असलेल्या आाणि अत्यंत सुरळीत चालू असलेल्या यंत्राचा आपण लघुतम भाग असल्यानी आपल्या अस्तित्त्वासाठी ह्या शक्तीची जाणीव ठेऊन तिचं यथामति, यथा शक्ती स्वरूप जाणण्याची प्रत्येकाच्याच मनाला लागलेली ओढ असते.

जिचा थोडासा अंश घेऊन ही सृष्टी उत्पन्न करण्याचा, सांभाळण्याचा आणि ती पुन्हा मिटवून टाकण्याचा ब्रह्मा, विष्णू, महेशाचा अव्याहत उद्योग आजही चालूच आहे त्या शक्तिस्वरूप त्रिपुरसुंदरी मातेला माझे आदरपूर्वक वंदन!

 

*तनीयांसं पांसुं तव चरणपङ्केरूहभवं 

विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम्

वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसां

हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ।।  ।।*

{अन्वय - हे भगवती! विरिञ्चिः तव चरणपङ्केरूहभवं तनीयांसं पांसुं सचिन्वन् लोकान् अविकलं विरचयति शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति। हरः एनं संक्षुद्य भसितोद्धूलनविधिं भजति }

( तनीयांसं – तनु – अगदी छोटासाा कण, तनीयांसं-त्या कणापेक्षाही छोटा म्हणजे सर्वात लहान कणिका म्हणुया हवतर ; पांसुं- धूलीकण, तनीयांसं पांसुं- धुळीची कणिका ; पङ्केरुह - पंक म्हणजे चिखलातून उत्पन्न झालेले कमळ. चरणपङ्केरुहभवं - चरणकमळ ; विरिञ्चि - ब्रह्मदेव ; अविकल – अक्षत, सतत, निरंतर; शौरी - विष्णू ; कथमपि - कसेबसे, कसेतरी; संक्षुद्य – सम्  क्षुद् – तुडवणे, ठेचणे, विनाश करणे, तांडवाने छिन्नभिन्न नष्ट करणे.  ; भसित - जळून भस्म झालेले.)

* जरी कार्ये मोठी हर हरि विधी पूर्ण करिती

परी सामग्रीची गरज करण्या पूर्ण सगळी ।

विधी घेई माते चरणकमळातून तुझिया

परागासी एका सकल जग साकार करण्या ।।२. ।।

 

पुर्‍या त्रैलोक्याच्या सहज प्रतिपाळास हरिला

पुरे होई धूलीकण चरणिचा एक तुझिया ।

कणार्धासी त्या गे शिरि उचलिता तो लटपटे

सहस्राशीर्षांचा  सबळ हरिही तो डगमगे ।। २.२ ।।

 

जगाच्या संहारा चरणरज माते उचलुनी

निजांगी भस्माचा शिव करितसे लेपनविधी ।

तिघांचा चाले हा जगि अजुनही खेळ बरवा

अहो उत्पत्ती वा स्थिति विलय अव्याहत असा ।।२. ।।

 

मिळे ह्या तीघांना तुजकडुन स्फूर्ती सतत ही

असे तू चिच्छक्ती भरुन उरली ह्या त्रिभुवनी ।

कळावा कैसा तो जननि तव हा व्यापकपणा

कसा जाणावा तो जननि महिमा थोर तव हा ।। २.।।*

--------------------------

श्लोक 


माय मी तुझी स्तुती करीन म्हटल्यावर, `` हा अडाणी आहे, अज्ञानी आहे, हा काय माझी स्तुती करणार? माझी महती अपरंपार आहे ह्याच ज्ञान तोकडं आहे. हा दरिद्री तर संसारसागरात रुतला आहे.’’ अशी माझी अवहेलना करु नकोस. मी तुझी महती जाणून आहे माय. मी जरी दुबळा असलो तरी, तू काय करू शकतेस हे मला माहित आहे. तुझ्या पायाच्या एका रजःकणाचं काय सामर्थ्य आहे, हे ब्रह्माविष्णुमहेशाच्या कर्तृत्त्वाला पाहून सहज कोणीही जाणू शकेल. तुझी कृपा असेल तर काय शक्य होणार नाही?

लहान मूल असो वा वृद्ध; भल्या सकाळी प्राचीवर उदयाला येणारा लालबुंद सूर्यबिंबाचा सोहळा पाहून प्रफु्ल्लित होतो. गडद अंधारात फटफटल्याच्या खुणा उमटु लागतात. एक एक क्षण समय पुढे सरकत असताना एक एक प्रकाशक्षण आणि प्रकाश कण वाढत जाण्याच्या प्रक्रियेसोबत दिशांमधला काळेपणा जाऊन त्यांचा गडद निळा रंग हळु हळु चमकदार निळ्याकडे झुकायला लागतो. बघता बघता सगळ्या जगातील अंधार दूर करणारी एक प्रकाशनगरीच पूर्वेला अवतरते.

हे माय, पूर्वेची प्रकाश नगरी सार्‍या सार्‍या अंधाराचा नाश करते त्याप्रमाणे ज्याच्या चित्तात तुझ्या अरुणवर्णी ज्ञानमयी पावलांचा उदय होतो त्याच्या जीवनातील सारा सारा अंधार दूर होतो.

माय तुझे पाय म्हणजे मधाने ओथंबलेल्या  फुलांच्या  ताटव्यासारखे आहेत. ज्ञानाची निस्यंदिनी (निस्यंदिनी – ज्याच्यातून सतत रस गळत असतो)  आहेत. त्यातून सतत झरणार्‍या ज्ञानमयी अमृताने सार्‍या अज्ञान्यांचे अज्ञान दूर होते.

 अगे एक चिंतामणी मिळाला तर  दरिद्री दुःखिताच्या चिंता दूर होतात तू तर चिंतामणीची `गुणनिका’ म्हणजे माळ, समुह, राशी आहेस. मग माझं अज्ञान दूर नाही का करू शकणार?

ज्या विष्णूनी वराहरूप धारण करून संपूर्ण पृथ्वीलाच पाण्याबाहेर काढलं, त्या वराहाचा भरभक्कम सुळा तू होतीस; हे का  मला माहित नाही? जिने पृथ्वीला चिखलपाण्यातून बाहेर काढलं ती मला संसाराच्या चिखलातून बाहेर काढू शकणार नाही का? अगे! तू तर माझी माय आहेस. बाळाकडे आई दुर्लक्ष कसं करेल? तुझी ह्या मतिमंद बालकावर कृपा झाली तर मला काय अशक्य आहे. तुझ्या पायाचा एक धूलीकण म्हणजे प्रकाश नगरी आहे. तो रजःकण म्हणजे ज्ञानाची निस्यंदिनी आहे. तुझ्या चरणकमलाचा एक परागकण म्हणजे चिंतामणीची माला आहे. अथवा समुद्रात बुडणार्‍या पृथ्वीला वर काढणारा वराहाचा सुळा आहे. (मराठी अर्थ करतांना पायाच्या रजःकणाऐवजी मातेची पाऊले असा अर्थ घेतला आहे. )

माय फक्त माझ्यावर कृपा कर. तुझ्या अरुणचरणांचा उदय माझ्या हृदयात होऊ दे माते ---- तुझ्या अरुण चरणांचा उदय माझ्या हृदयात होऊ दे! उदयोऽस्तु माते उदयोऽस्तु!!!

*अविद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी

जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी

दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका, जन्मजलधौ

निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ।।  ।।*

(अन्वय – हे मातः तवचरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रा मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति?)

 (स्तबक - पुष्पगुच्छ, फुलांचा तुरा, फुलोरा; गुणनिकाराशी, माळ. झरी -निर्झर, झरा, नदी. स्रुति- वाहणे, टपकणे, अर्क निघणे / धारा, रसप्रवहण, स्राव. मुररिपुवराहस्य दंष्ट्रा – विष्णुरूपी वराहाची दाढ. )

*सहस्रार्चि प्राचीवर उगविता तो प्रतिदिनी

हजारो तेजस्वी किरण पसरोनीच भवती ।

घडे जैसी प्राचीवर जणु प्रकाशीत नगरी

तसे माते पद्मासम चरण हे दिव्य तवची ।। .१।।

 

घडे ज्याच्या चित्ती तवचरण सूर्योदय असा

मनोबोधे त्यांचे मनक्षितिज हो उज्ज्वल अहा

तयाने अज्ञांचे सहज विरते अज्ञपण ते

तुझ्या तेजांशाने कुमति-नर चाणाक्षचि घडे ।। .२।।

 

सुगंधी पुष्पांचे फुलतिच फुलोरे तरुवरी

किड्यांना भुंग्यांना मधुर मध तो तृप्तचि करी ।

तसा मंदांसाठी पद - सुमन - संभार तव गे

जयी चैतन्याचा जणु मधुमयी निर्झर झरे ।।. ३ ।।

 

दरिद्र्यांचे सार्‍या हरण करण्या दैन्य अवघे

तुझी माते चिंतामणिमयचि माले सम पदे ।

समुद्री जे सारे जनन मरणाच्याच बुडती

तयांच्या उद्धारा त्वरित नित ये धावुन हरी ।।.  ।।

 

वराहा रूपासी हरि करितसे धारण स्वये

सुळ्याने ज्या एका हरि धरणिसी तोलुन धरे ।

सुळा विष्णूचा तो असशी जननी तू कणखर

जनांसी काढाया भव - जलधि - पंकातुन वर ।। .५ ।। 


अगे माते ऐसी महति तव गे ज्ञात मजला

म्हणोनी उत्साहे तव स्तुतिस प्रारंभ करिता।

``असे हा अज्ञानी नच लव असे पात्र’’ म्हणणे

नसे तर्कासीही कधिच पटणारे जननि गे ।। .६।।

 

कृपाळू माता तू; जननि तव मी बाळचि असे

दया ना येई गे तुजसि मम ऐसे कधि घडे ।

कृपा अज्ञासीही सदयहृदये तज्ज्ञ करते

अनन्या बाळा ह्या करशिल कशी दूर सदये ।।.७।।*

--------------------------

 

श्लोक 

एकदा एक अभिनेता भेटला. साधं बोलतांनाही त्याचे अभिनय केल्याप्रमाणे हातवारे, चेहर्‍यावरचे नाटकी भाव, आपणच कोणी खर्‍या आयुष्यातील हिरो आहोत असा आविर्भाव, वागण्या बोलण्यातील अरेरावी सगळच काचेवर चरा उमटल्याप्रमाणे मनावरही ओरखडा उमटवत होते. हिरोप्रमाणे वागतांना त्याने केलेले कपडे अगदि विसंगत आणि हास्यास्पद दिसत होते.

त्याच्या उलट अनेक फार फार मोठ्या व्यक्तींना भेटल्यावर त्यांचा साधेपणा, आत्मीयता, वेळ पाळण्याची शिस्त, पोटातून ओठावर येणारे शब्द, हसू सारचं वेड लावून गेलं. मॉरिशसला राष्ट्रपती अब्दुल कलाम आलेले असताना तेथील हॉटेलमधील एका सफाई कर्मचार्‍याने भीत भीत त्यांना ``मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.’’ असं सांगितल्यावर त्यांनी अत्यंत साधेपणाने हसून त्याच्या बरोबरच्या सर्वच जणांना मोठ्या आपुलकीने बोलावून घेतलं. त्यांची विचारपूस केली त्यांच्या सगळ्यांबरोबरच फोटो घेतले.

 इतकच काय! तेथील मच्छिमारांनाही `` माझे पूर्वज मच्छिमार होते’’ असं ते मोठ्या कौतुकाने सांगत होते. ``हा समुद्र भारताचे आणि मॉरिशसचे किनारे जोडतो.’’ म्हणतांना आपल्या देशाविषयी, जन्मस्थानाविषयी भावुक झालेले कलाम नंतर महिनाभर वृत्तपत्र आणि लोकांच्या बोलण्याचा, आदराचा विषय होऊन गेले. त्यांचा लहान मुलासारखा उत्साह, प्रखर बुद्धिमत्ता, आणि त्याच्या जोडीने असलेला साधेपणा सर्वांनाच भावून गेला.

श्री आाद्य शंकराचार्यही म्हणत आहेत, ``माते तू ह्या अखिल विश्वाची शक्ती आहेस. तूच ह्या जगातील देवदेवतांना शक्ती देतेस. तुझ्याकडून मिळालेला हा शक्तिरूप प्रसादच जणू ते त्यांच्या भक्तांना वाटत असतात. त्यांच्या शक्तीची प्रेरणा तूच आहेस. त्यांच्या सामर्थ्याच्या त्यांनी कितीही बढाया मारल्या तरी ते सामर्थ्य त्यांना तुझ्यामुळे प्राप्त झाले आहे.’’

माणसाला पुढच्या क्षणाला काय होईल, कोणतं संकट कोसळेल हे कळत नसल्याने सतत कशाना कशाची भीती वाटत असते. त्याला ``तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’’ असं नुसतं कोणी म्हटलं तरी जीवाला बरं वाटतं. आपल्याला संकटात कोण मदत करेल, अभय देईल ह्या साठी तो कोणा ना कोणाकडे तरी आशेने बघत असतो. अशा वेळेला  हे देव जेव्हा लोकांना अभय देण्यासाठी हातांची श्रेष्ठ अशी अभय मुद्रा करून, हात उंचावून उभे असतात, तेव्हा मला हसू आल्याशिवाय रहात नाही. मला तर तो एखाद्या अभिनत्याने केलेला अभिनयच वाटतो. कारण देवांची शक्तिदायिनी वा प्रेरणा तूच आहेस

तुला ह्या देवांसारखी अशा उसन्या अभिनयाची गरज नाही. कारण तुझ्यासारखी सामर्थ्यवान तूच आहेस. जगातील सर्व शक्ती तूच आहेस. तुझ्याकडे जो कोणी काही मागणं घेऊन येतो, त्याच्या अपेक्षेपेक्षा अनेकपटींनी जास्त इच्छा तू पूर्ण करतेस. तुझ्या सारख्या समर्थ दात्यासमोर `घेता किती घेशील दो करांनी’ अशा असमर्थ भक्ताला तू सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मपदच बहाल करतेस. तुझ्या पायावर माझं नमन असो.

*त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः

त्वमेका नैवासि प्रकटितवराऽभीत्यभिनया

भयात्त्रातुं दातुं फलमपि वाञ्छासमधिकं

शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ ।। ।।*

(अन्वय – ``हे मातः जगज्जननि! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवराऽभीत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये! हि भयात् त्रातुं अपि च वाञ्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः । 2 ’’)

*करा उंचावोनी अभयवर मुद्राचि बघता

गमे देवांचा हा अभिनयचि आकर्षक मला ।

तुझ्या वाचोनी का सुरसमिप सामर्थ्य असले

विना शक्ती कैसे अभय दिधणे संभव असे ।। ४.।।

 

असे स्फूर्ती शक्ती सकल बल चैतन्य अवघे

 अगे तू देवांचे; चलनवलना प्रेरित करे ।

करया विश्वाचे नियमनचि देवांकडुन हे

तुझ्या संकेताचे लवभरचि उत्तेजन पुरे ।। ४. ।।

 

तुला बाकी देवांसम अभिनयाची गरज ना

तोलामोलाचे तुजसमचि जाण्या शरण वा ।

निवाराया भीती तव चरण हे सक्षम भले

मनीषेहूनीही किति अधिक देती पद तुझे ।। . ।।*

--------------------------

 

श्लोक  

ऐश्वर्य आणि दानत जर एकमेकांच्या हातात हात घालून आले तर धनाढ्याला, ऐश्वर्यसम्पन्न व्यक्तीला महान बनवतात. त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करतात. ऐश्वर्या सोबत येणारा कंजूषपणा जसं कोणाचं भलं करू शकत नाही त्याप्रमाणे, दरिद्री माणसाची दानतही कोणाचं भलं करू शकत नाही. ऐश्वर्य त्याच्यापाशीच टिकतं ज्याच्यापाशी असीम शक्ती आहे. आणि माय तू तर शक्तीस्वरूप आहेस. ह्या विश्वाचं नियंत्रण करणारी सर्वश्रेष्ठ शक्ती आहेस. तुझी आराधना करणार्‍या हरीला/विष्णूला तुझ्या कृपेने इतकं सामर्थ्य प्राप्त झालं की तो मोहिनीचं रूप घेऊन वैराग्याचं प्रतिक असलेल्या महादेवालाही भुलवू शकला.

--- आणि माय क्रोधित झालेल्या महेश्वरानी राख राख करून टाकलेल्या मदनाला--- तुला शरण आलेल्या अनंगाला तुझ्या कृपेनेच तू नुसतं जिवंत केलं नाहीस तर त्याला असामान्य देखणेपणही देऊ केलस. त्याला विश्वजयी बनवलस. अक्षी म्हणजे डोळा. महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडून मदनाला जाळलं तरी पार्वतीच्या वात्सल्यमय नजरेतून, सुंदर नेत्रातून तो पुन्हा जन्माला आला. कामरूपी मदनाला आपल्या नजरेतून जन्माला घालणारी म्हणून तिला कामाक्षी म्हणतात. (लावण्यवतीच्या कटाक्षावर भाळला नाही असा नर दुर्लभच!) मदनाच्या सौंदर्यामुळे रति त्याच्यावर इतकी भाळली की, सारं सारं विसरून एकटक त्याच्याकडेच बघत राहिली. येथे आचार्यांनी योजलेले शब्द मोठे सुंदर आहेत; `रति-नयन-लेह्येन वपुषा’ म्हणजे रती जणु अनिमेष नेत्रांनी त्याला चाटून घेत आहे इतकी सुंदर काया माते तुझ्या कृपेनेच मदनाला प्राप्त झाली. अशा अप्रतिम देखणेपणाच्या जोरावर ह्या मदनाने अनेक अनेक वैराग्यमूर्ती अशा महर्षींनाही मोहात पाडलं. त्यांचं चित्त विचलित केलं. माते तू धन्य आहेस! तुझ्या कृपेने असाध्य तेही साध्य होऊ शकतं; मग माझ्यासारख्या सामान्याला ज्ञान नाही का प्राप्त होऊ शकणार?

सर्व सांगायचा उद्देश हाच आहे की, माय तू केवढ्या अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज करून दाखवतेस मग मला ज्ञान देणं तुला अशक्य थोडच आहे? लहान बाळ एखादी गोष्ट मिळेपर्यंत आईचं लक्ष वेधून घेण्याचा सतत प्रयत्न करतो. ``तू त्याला दिलं मला का नाही?’’ अशी आईमागे भुणभुण लावतो. वेळ आली तर रडतो, भोकाड पसरतो पण पाहिजे ते मिळवतोच! ह्या जगज्जननीपुढे आपल्यालाही ``तुझ्याविना मला अजून कोणी नाही. तूच एकटी माझ्या मनातील जाणून मला हवं ते देऊ शकतेस’’ असं अनन्य होता आलं तर अपलं मनोरथ का बर पूर्ण होणार नाही?

*हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं

पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत्

स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा

मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्  ।। ५  ।।*

(अन्वय – ‘‘ हे मातः! हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि।’’ )

( रति-नयन-लेह्येन वपुषा – नेत्रांनी रति चाटून घेत आहे अशा शरीराने. प्रणत-जन-सौभाग्यजननी- नम्र झालेल्या लोकांना सौभाग्य देणारी जननि. स्मर - मदन )

* अगे माते येती शरण चरणी भक्त तुझिया

तयांना देसी तू सुख सुधन सौभाग्य सकला ।

करे विष्णू सेवा चरणकमलांचीच म्हणुनी

प्रसन्ना देसी तू अतुलनिय सामर्थ्य हरिसी ।।  ५. ।।

 

कृपेने शक्तीच्या हरि मिळवि सामर्थ्य इतुके

महेशालाही तो भुलवि अपुल्या मोहिनिरुपे ।

शिवक्रोधाने जो मदन जळुनी जाय जननी

तुला येता तोची शरण; मिळवी दिव्य तनुसी ।। .२।।

 

तयाच्या डौलाने भुललि रति लावण्यखणि गे

अनंगाची काया जणु पिऊन टाकेचि नयने ।

तुझ्या आशीषाने मदन बनला विश्वविजयी

मुनींच्या निर्मोही हृदि उपजवी मोह सहजी ।। .।।*

--------------------------

श्लोक ६ 

हे माय! तुझी कृपा झालीच तर ती काय करू शकत नाही?  अत्यंत दुबळा जीव सुद्धा विश्व काबीज करण्याइतका सामर्थ्यवान ठरतो. हे गिरिजे! त्या मदनावर तुझी कृपा होताच सारं विश्व त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागलं.

आधी मदन तो काय! महादेवांनी क्रोधानी तिसरा नेत्र उघडू त्याला जळून टाकलं. त्याला शरीरच नाही.  अंगच नाही म्हणून त्याला अनंग म्हणू लागले. पण तो तुला शरण येताच तू त्याला स्वतःचा पुत्र मानलेस. तुझ्या नेत्रांमधून, तुझ्या अक्षीतून तुला शरण आलेल्या कामदेवानी जन्म घेतला म्हणून तू कामाक्षी झालीस. (अक्षी म्हणजे डोळे. लावण्यवती पार्वतीच्या नजरेनेच शिवाच्या हृदयाचा असा काही ठाव घेतला की तिच्या नजरेतून जन्मलेल्या कामदेवाने/मदनाने शिवालाही जिंकले. ) त्या कामदेवाकडे धनुष्य आहे पण तेही लेचपेचं! ना गांडीव ना कोदंड!  नाजुक साजुक सुकुमार फुलांचं जुणुं खेळातलं साधसं धनुष्य! त्यात किती दम असणार? ( पण ह्याच सुकुमार फुलांच्या बाणाने महा विरक्त शिवही मोहित झाला. ) त्या धनुष्याची दोरी पहावी तर काय? फुलांवर सतत ये जा करणार्‍या भुंग्यांमुळे तयार झालेली रेषा! बरे त्याचा भाता तरी अर्जुनाप्रमाणे बाणांनी अक्षय भरलेला असावा तर तसेही नाही. अक्षय्य भाता सोडाच, त्याच्या भात्यात अवघे पाच बाण! ते सुदधा आम्र मंजिरी, मोगरा अशा फुलांचे, त्यांच्या सुगंधाचे! त्याने तो काय युद्ध करणार? अनंगाचं सैन्य किंवा त्याला मदत करणारा तो एकुलता एक वसंत! त्याचं अस्तित्त्व तरी किती? वर्षातून दोन ते तीन महिने. तो त्याला मदत ती काय करणार? बरं ह्या मदनाचा रथ तर पहा! तो दिसतच नाही. ज्याला आकार ना उकार असा मलय पर्वतावरील अति मंद मंद वारा हाच त्याचा रथ! अशा ह्या युद्धासाठी कुचकामी वाटणार्‍या साधनांना तुझ्या कृपेमुळे असं काही सामर्थ्य प्राप्त झालं आहे की हाच अनंग सार्‍या विश्वावर विजय मिळतो. विश्वजयी अशी पताका फडकवत असतो. माय ही सारी तुझी कृपा आहे. तुझ्या कृपाकटाक्षाचा परिणाम आहे.  (योग्य कारण नसतांना कार्य सिद्धीस जाते हा विभावना अलंकार आहे.)

माते! तुझा हा अद्भुत पराक्रम पाहून मी तुला शरण आलो आहे. शरण आलेल्यांना तू महान सौभाग्य प्रदान करतेस ही तुझी ख्याती आहे. त्यानुसार मलाही तुझा कृपालेश लाभो!

*धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः

वसन्तः सामन्तो मलय-मरुदायोधन-रथः

तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपाम्

अपाङ्गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते ।। ६  ।।*

( अन्वय – ``हे हिमगिरिसुते! अनङ्गः ते अपाङ्गात् कां अपि कृपां लब्ध्वा इदं सर्वं जगत् एकः विजयते’’ )

(मौर्वी – धनुष्याची दोरी. विशिख – बाण. अनङ्ग – ज्याला अंग म्हणजे शरीर नाही असा, म्हणजे मदन. हिमगिरी – हिमालय, हिमगिरिसुता - हिमालयाची मुलगी पार्वती. अपाङ्ग – तिरकी नजर)

*अनंगा हातीच्या कुसुम धनुला त्राण कितिसा

तयाला बांधाया भ्रमरमय  तो दोर लटिका ।

जगाला विंधाया असति अवघे पाच शर ते

वसंताची राहे मदत अवघी तीन महिने ।। .१।।

 

पत्ता आकारा, मलय-पवना त्या रथ म्हणे

करे सार्‍या विश्वावर नित चढाई हिमतिने ।

अनंगा ना काया परि ठरतसे विश्वविजयी

कृपादृष्टी माते क्षणभर तुझी काय करी? ।। .२  ।।*

--------------------------

श्लोक 

एखाद्या निर्गुण निराकार गोष्टीचं मनन चिंतन करता येतं पण, ध्यान करायचं असेल तर सगुणरूपाचच ध्यान शक्य आहे. ह्या श्लोकात आचार्य शक्तीस्वरूप देवीचं प्रसन्न सुंदर चित्र आपल्या नेत्रांसमोर उभं करतात. ही ऐश्वर्यसम्पन्न शक्ती शिवाची अर्धांगिनी आहे. वेल चढण्यासाठी वेलीला वृक्षाच्या खंबीर आधाराची गरज असते. पण वृक्ष खंबीरपणे उभा राहण्यासाठी त्या वृक्षामधे त्याच्या जैविक तत्त्वातूनच एक उमदा जोम असावा लागतो. त्या ताकदीच्या जोरावर तो डौलात / (सुप्रतिष्ठित) उभा असतो. शिवाला स्थाणु म्हणतात. स्थाणु म्हणजे जो अचल, स्थिर उभा आहे असा. हा स्थाणु म्हणजेच शिव मंगलमय, कल्याणकारी, सर्वांना सुखी करणारा आहे. विश्वंभर आहे. सार्‍या विश्वाच असणं किंवा नसणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या पूर्णपुरुषाच्या डौलामागे जी खरी पुरुषी ताकद आहे, जो त्याचा मूर्तिमंत अहंकार, जी पुरुषिका आहे, ती म्हणजेच त्रिपुरसुंदरी पार्वती. पुरुषिका असलेली ही त्रिपुरसुंदरी, विश्वशक्ती शंकराला बिलगून, शंकराच्या आधाराने, शंकराच्या कृपेवर हतबलपणे उभी नाही तर शंकराच्या कर्तृत्त्वाचा, अहंकाराचा Robust Gene किंवा DNA बनून त्याच्या धमन्या धमन्यांमधून अखंड वाहते आहे. नसानसातून सळसळते आहे. शिवाची चेतना शक्ती होऊन त्याला कार्यक्षम करते आहे.

येथे वापरलेला अहंकार हा शब्द आपण वापरतो त्या अहंकारापेक्षा पूर्ण वेगळा आहे. अहंकार आणि उद्दामपणा हे दोन पूर्ण वेगळे गुण आणि अवगुण आहेत. प्रचंड क्षमतेतून निर्माण होतो तो, `मी करू शकतो' हा अहंकार. तर स्वतःच्या शक्तीच्या भ्रामक समजुतीतून,अज्ञानातून जन्माला येतो तो उद्दामपणा. असीम क्षमतेतून निर्माण झालेल्या अशा अहंकारासोबत येतो तो नम्रपणा. सर्वांविषयी पराकोटीचं वात्सल्य. अशी ही विनीत असलेली साक्षात विश्वंभराची पुरुषिका आहे तरी कशी?  आचार्य म्हणतात,

माय! तुझ्या ऐश्वर्यसम्पन्न लावण्यमूर्तीचं मी काय वर्णन करावं? सोन्याला सुगंध असावा, नादब्रह्माला सुकुमार रूप लाभावं, सूर्याला कोवळेपणा लाभावा त्याप्रमाणे तुझ्या ऐश्वर्य आणि लावण्य ह्या गुणांना वात्सल्य आणि दातृत्त्वाची अमोघ जोड आहे. फलभाराने वृक्ष वाकावा तशी तुझ्या सद्गुणांच्या भाराने तू अत्यंत नम्र, विनयशील आहेस.

अशी ही त्रिपुराम्बिका तिचं ध्यान करणार्‍या भक्ताच्या हृदयमंदिरी येण्यासाठी हळु हळु पावलं टाकत असताना जणु तिच्या सोन्याच्या कमरपट्याला लावलेल्या छोट्या छोट्या घुंगरांचा किणकिणकिण असा मंजुळ ध्वनि होत आहे. सर्व विश्वाला स्तन्य देणार्‍या ह्या माऊलीच्या गजशावकाच्या गंडस्थळाप्रमाणे असलेल्या स्तनातून वाहणार्‍या अमृतधारांनी सर्व भक्तबालके तृप्त होत आहेत. स्तनभाराने वा आपल्या लेकराला स्तन्य देण्यासाठी ही माय विनीत होऊन किंचित पुढे झुकली आहे. कोजागरीच्या चंद्राप्रमाणे प्रसन्नवदना आहे. एखादी गोष्ट सतत घासली गेली तर ती झिजते त्याप्रमाणे मुनीजनांच्या निरंतर ध्यानाने, सतत श्रीविद्या वा श्रीयंत्राच्या केंद्रस्थानावर, म्हणजे त्रिपुरांबिकेच्या मध्यभागावर म्हणजेच कटिप्रदेशावर सतत त्यांच मन एकाग्र करण्याने जणु काही तिची कंबर `परिक्षीणा’ म्हणजे अत्यंत कृश झाली आहे.

ही वत्सलमाता कोमलांगी असली तरी कणखरपणे आपल्या लेकरांचं रक्षण करण्यासाठी हातात पाश, अंकुश, धनुष्यबाण घेऊन ती शस्त्रसज्जही आहे. अशी ही त्रिपुराम्बिका आमच्या नेत्रासमोर सतत राहो. आमच्या हृदयमंदिरात निवास करो.

*क्वणत्काञ्चीदामा करिकलभ-कुम्भस्तननता

परिक्षीणा मध्ये परिणत-शरच्चन्द्र-वदना

धनुर्बाणान्पाशं सृणिमपि दधाना करतलैः

पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहोपुरुषिका ।।  ।।*

(काञ्चीदाम - कमरपट्टा ; परिक्षीणा - कृश ; परिणता – झुकलेली वा नम्र  सृणि - अंकुश ;  पुरस्तात् - पुढे, येथे हृदयमंदिरात करि- हत्ती, कलभ – हत्तीचं पिलु. करिकलभ-कुम्भस्तननता – हत्तीच्या पिल्लाच्या गंडस्थळाप्रमाणे असलेल्या स्तनांमुळे किंचित खाली झुकलेली )

  

 *सुवर्णाचा शोभे कटि कमरपट्टा सुबकसा

तयाच्या छोट्याशा किणकिणति घंटा मधुरशा ।

स्वस्तन्याने पोशी सकल जगता प्रेममय जी

असे वात्सल्याची जणु सगुण मूर्तीच जननी ।। 7. ।।

 

स्तनांच्या भाराने  अति विनयशीला गमतसे

कराया विश्वाचे भरण नित तू तत्पर असे ।

सदा ध्यानासाठी स्मरण करता सिंहकटि ही

कटीभागी होई कृश मुनिजने ध्यान करुनी ।। ७ .

 

मुखा वर्णू कैसे शरद पुनवेच्या शशिसमा

सुखाचा ठेवा हा अनुपम सुधेनेचि भरला ।

धरी शस्त्रे सारी कुसुम शर लावून धनुला

खळांना दंडाया दृढमतिच पाशांकुशयुता ।। ७ .३ ।।

 

जिच्या सामर्थ्याने शिव करितसे विश्वचि सुखी

जगी ख्याती होई शिव नित असे मंगलमयी ।

असे कल्याणाची सगुण जणु मूर्तीच शिव हा

असे तू त्याचा हा सकलचि अहंकार बरवा ।।. ४ ।।

 

शिवाचे ओजस्वीपण सकल उत्साह तयिचा

अगे माते तू त्या परम पुरुषाची पुरुषिका ।

तुझी मूर्ती राहो सतत नयनांच्याच पुढती   

सदा राही माझ्या हृदयकमली तूच जननी ।। .५  ।।*

--------------------------

श्लोक –

जी स्वतःच ह्या विश्वाची नियामक शक्ती आहे, त्रिभुवनसम्राटाची पत्नी, अर्धांगिनी आहे तिचं ध्यान करण्यासाठी तिचं अत्यंत मनमोहक रूप आचार्यांनी सातव्या श्लोकात आपल्या नेत्रांसमोर उभं केलं. अशा ह्या त्रिपुरांम्बिकेचा निवास असेल तरी कुठे आणि कसा? त्रिभुवन सम्राटाची पत्नी काय अशीतशी कुठेही  राहील का? तिच्या प्रासादाचं वर्णन करतांना आचार्य सांगतात,

अमृताच्या सुखसागरात जिथे अमृताच्या आनंदमय लहरी उसळत आहेत, देवांना प्रिय असलेल्या कल्पवृक्ष, पारिजात अशा मनोरम तरुवरांनी जेथील परिसर नटला आहे, अशा रत्नद्वीपावर फळा, फुलांनी बहरलेल्या नंदनवनात, कदंबवृक्षांच्या उपवनात, जिथे सर्व चिंता दूर पळून जातात अशा चिंतामणी रत्नांनी बांधलेला प्रासाद आहे. असं म्हणतात, एक छोटे चिंतामणी रत्न मिळाले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथे तर ह्या जगज्जननीचा महालच चिंतामणी रत्नांनी बांधला आहे. खरेतर जेथे ही माय राहील ती जागा चिंतामणी, चिंतामुक्त आनंदमय होऊन जाईल.

अशा ह्या रत्नमहालात जो पलंग आहे तोच मुळी स्वतः शिवच आहे. `जगताचं कल्याण’ ह्या संकल्पनेला जर आपण जर सगुण रूपात पाहिलं तर शिवाची मूर्ती नजरेसमोर तयार होईल. ह्या रत्नमहालातील पलंग हा शिवाकार, कल्याणमय, कल्याणस्वरूप असा आहे ज्यावर ही जगज्जननी शिवासमवेत पहुडली आहे. नुसतीच नाही तर शिवमय झाली आहे. शक्ती आणि शिव, हित आणि कल्याण शुभ आणि क्षेम हे एकरूप आहेत, एकमेकांच्या दृढ आलिंगनात कायमच बद्ध आहेत. 

( श्री चक्राचे वर्णन पाहिले तर तेथे एकात एक असलेली नऊ चक्रे वा आवरणे आहेत. बाहेरून  श्रीयंत्रात प्रवेश करतांना तिसरे आवरण पार करून आत आल्यावर सर्व बाजूंनी मोकळा वर्तुळाकार भव्य प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर म्हणतात. ह्या सुधासागरात पुढे मोठे द्वीप दृष्टीला पडेल याच द्वीपाला मणिद्वीप म्हणतात. पुढे श्लोक 9, 10, 11 मधे त्याचे वर्णन आहे.)

 

*सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपि-वाटी-परिवृते

मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे

शिवाकारे मञ्चे परमशिव-पर्यङ्क-निलयां

भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ।। ।।*

( नीप कदंबवृक्ष, विटपिन् – वृक्ष. सुरविटपि- कल्पवृक्ष, देवांना आवाडणारे वृक्ष. वाटी – ज्या भूखंडावर भवन बांधले आहे अशी जागा वा उद्यान, उपवन, फलोद्यान. निलय – एखाद्या स्थानावर उतरणे, राहणे वा घर. कतिचन – कित्येक, कितीतरी )

*सुधा सिंधु मध्ये सुखद सजल्या रम्यचि स्थळी

चहूबाजूंनी त्या खळखळत पीयूष लहरी ।

तिथे ऐश्वर्याने नटुन बसले द्वीपचि भले 

अमूल्या रत्नांनी  कितिक तयिचे वैभव खुले ।। . 


अशा रत्नद्वीपावर बहरल्या नंदनवनी

कदंबाच्या रम्या परिमलयुता त्या उपवनी ।

जिथे चिंता सारी मिटुन सुख होईच हृदयी

अशा सौंदर्याच्या विभवयुत चिंतामणिगृही ।। .२ ।।

 

पलंगी सौख्याच्या शिवमय शिवाकार बनुनी

 शिवे! तेजोमूर्ती !  परमशिवसंगे पहुडसी ।

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करती जेचि विरळे

जगी तेची माते सुजन बहु ते धन्य सगळे ।। .३ ।। *

--------------------------

 

श्लोक 

आपला संपूर्ण देहच हे श्रीललिताम्बिका, महात्रिपुरसुंदरीचे अधिष्ठान / निवासस्थान/पद/ आसन आहे.  प्रत्येकाच्या देहात सुप्त रूपात ही ताकद असतेच.  जेव्हा ही ताकद सुप्त रूपात असते तेव्हा इंद्रिये विषयांच्या मागे धावत असतात. त्यांना विषयांमधेच आनंद मिळतो. ज्यामुळे इंद्रियांना गोड वाटते तेच खरे सुख असे जीवाला वाटते.

 आपल्या अनुभवी ऋषीमुनींनी अशी नोंद योगग्रंथात केली आहे की, आपल्या देहात सहा चक्रे वा सहा कमळे आहेत जेथे ही शक्ती/ताकद प्राबल्याने असते. ह्या एकेका चक्रामधे पंचमहाभूतातील एका एका भूताचे अधिष्ठान वा प्राबल्य असते. वा शरीराबाहेरील त्या त्या भूतातील शक्ती आपल्या शरीरातील त्या विशिष्ट चक्राला जोडली गेलेली असते. ही सहा ठिकाणे, सहा चक्रे वा कमळे शरीरात कुठे कुठे असतात, ती पंचमहाभूतातील कुठल्या तत्त्वाशी जोडली गेली आहेत, त्यांना किती पाकळ्या असतात हे खाली दिले आहे.

( शरीरात सहा चक्रे असतात. खालपासून वरपर्यंत त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे असतो

सर्वात खाली गुदद्वाराशी मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्त्वाचे आहे.  चार दलांच्या कमलाप्रमाणे आहे.

त्याच्यावर उपस्थेन्द्रियाच्या(जननेंद्रियाच्या) जवळ स्वाधिष्ठानचक्र अग्नितत्त्वाचे आहे. सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे 

 मणिपूरजलतत्त्वाचे आहे. हे नाभीच्या मागच्या बाजूस पाठीच्या कण्याच्या आत परंतु मज्जारज्जूच्या बाहेर असते. दहा दलांच्या कमळाप्रमाणे आहे.

हृदयाजवळ अनाहत चक्र- वायु तत्त्व बारा दलांच्या कमळाप्रमाणे आहे.

कंठस्थानी विशुद्धिचक्र -आकाशतत्त्व , या चक्राला  सोळा पाकळ्या आहेत.

भ्रूमध्यप्रदेशी आज्ञाचक्र- मनस्तत्त्व) या चक्राला  दोन पाकळ्या आहेत.

षट्चक्रोपरि संस्थिता म्हणजे ह्या साही चक्रांच्या वर सर्वश्रेष्ठ जागी सहस्र दल कमलात चित् शक्ती रूपी कुंडलिनी स्वरूप श्री त्रिपुराम्बिका राहते.

ललितासहस्रनामामधे ज्या ज्या चक्रात ती अधिष्ठित आहे त्याप्रमाणे तिला मूलाधाराम्बुजारूढा, स्वाधिष्ठानाम्बुजगता, मणिपूराब्जनिलया, अनाहताब्जनिलया, विशुद्धिचक्रनिलया, आज्ञाचक्राब्जनिलया, सहस्रदलपद्मस्था अशी नावे आहेत. अशा प्रकारे शरीरातील सर्वच चक्रांमधे निवास करून ती त्या चक्रातील भूततत्त्वांना व देवतांना कार्यप्रवण करत असते. ती जीवचैतन्याच्या रूपाने सर्व देहालाच जीवन देत असते म्हणून तिला प्राणदा, प्राणरूपिणी अथवा जीवा, जीवभूता असेही म्हणतात.

ही कुंडलिनी रूपात राहणारी शक्ती अत्यंत सूक्ष्म स्वरूपात राहते. ती किती सूक्ष्म आहे हे सांगताना म्हणतात की ती `निवारशूकवत् तन्वी’ अशी आहे. म्हणजे देवभाताच्या कुसाचा शेंडा जसा अत्यंत बारीक, पातळ(तन्वी) असतो तशी सूक्ष्म आहे वा `बिसतन्तुतनीयसी’ म्हणजे कमळातील तंतुप्रमाणे आहे.

सूक्ष्म रूपात असलेली ही शक्ती जर जागृत झाली तर बहिर्मुख म्हणजे बाहेरच्या सुखसाधनांमधे लिप्त झालेली इंद्रिये व माणूस अंतर्मुख होतो. बाहेरचा शोध संपतो. बाहेरच्या सुखसाधनांची क्षणभंगुरता त्याला कळते आणि निरतिशय अशा, कशावरही अवलंबुन नसलेल्या निजानंदाचा अनुभव तो चिरंतन काळ घेत राहतो.

कुंडलिनी ही मूलाधारचक्राचा आधार घेऊन स्वाधिष्ठान चक्रावर अधिष्ठित झाली आहे. आसनस्थ आहे. ज्ञानेश्वरीत तिचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. एखाद्या नागिणीप्रमाणे तिचे साडेतीन वेटोळे  आहे.  नागाचे पिले कुंकुमे न्हाले। वळण देऊनि आले सेजे जैसे।। तैसे ते कुंडलिनी मोटका औटे वळणी अधोमुख सर्पिणी निनेली असे ।। ज्ञानेश्वरी -6 -122—

 देहाच्या मूलस्थानी/गुदस्थानी असलेल्या ह्या कुंडलिनीला दोन भुवयांच्या मधे भ्रूमध्यात असलेल्या आज्ञाचक्राच्याही वर, सर्वतोपरी वर असलेल्या सर्वश्रेष्ठ, सहस्रदल कमलामध्ये असलेल्या अत्यंत तेजस्वी अशा चंद्रमंडलातील शिवस्वरूपाशी समरस होऊन राहण्याची `महासक्ती’ म्हणजे प्रचंड आसक्ती किंवा आवड आहे. म्हणून ती शरीरातील सहाही चक्रे भेदून सहस्रदल कमलामध्ये असलेल्या अमृतमंडलात सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीसदाशिव तत्त्वाशी एकरूप होऊन राहते. सहाही चक्रांच्या वर असल्याने तिला `षट्चक्रोपरि संस्थिता’ असे म्हणतात.

जागृत झालेली कुंडलिनी शक्ती एका एका चक्राचे भेदन करत शेवटी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले आज्ञाचक्र भेदते. येथेच साधकाला महात्रिपुरसुंदरीचा थोडासा साक्षात्कार होतो. ह्याच चक्रात विद्युल्लेखेप्रमाणे  क्षणभर ती प्रतीतीला येते. त्याने सर्व इंद्रिये साधकाच्या आधीन होतात.

 मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलात प्रवेश करते तेव्हा ती माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव ह्या तत्त्वांशी संपृक्त होते. मायाविशिष्ट महेश्वर हा जीवभावाला प्राप्त होत असतो तर शुद्ध-विद्या-विशिष्ट सदाशिव हा परमशिवपदाला प्राप्त होतो. सहस्रदलकमलात विलसत असलेल्या चंद्रमंडलात महात्रिपुरसुंदरी ह्या परमशिवतत्त्वाशी समरस होऊन विहार करत असते. एकरूप  होऊन राहते. हे शिवशक्तीचे ऐक्य, सामरस्य एकमेव, अद्वितीय, परिपूर्ण परमब्रह्मस्वरूपच आहे.

 

*महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं

स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि

मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं

सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ।। ।।*

( हे मातः त्वं मूलधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थितं हुतवहं अपि, हृदि मरुतं, उपरि आकाशं भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्यासह विहरसे )

( कं - पाणी , कुलपथ- सुषुम्ना मार्ग वा देहातील सहा चक्रे. वा कुल म्हणजे प्रकृतीच्या निर्मितीचा पसारा. शिव हा निर्माता नाही म्हणून तो अकुल आहे. साधकाने अनेकांकडून एकत्वाकडे जायचे आहे. म्हणून त्याला कुलाच्या पलीकडे जावे लागते. तो जाण्याचा मार्ग अर्थात कुलपथ.  भित्त्वा – भेदन करून, फोडून. भ्रूमध्य – दोन भुवयांचा मध्यभाग. रहसि – गुप्तपणे, एकान्तात)

 

*अगे मूलाधारी सहज धरणी भेदन करी

जलासी भेदी तू जननि मणिपूरी सहजची ।

अगे स्वाधिष्ठानी करुन अनला भेदन पुढे

हृदी वायू भेदी अनहतचि चक्रामधिल गे ।। ९. ।।

 

वरी कंठी भेदी गगनचि विशुद्धी मधिल ते

करी आज्ञाचक्रामधिल मन-भेदा जननि गे ।

सहा चक्रे देही अति सहज भेदून जननी

सुषुम्ना मार्गाचा अति सहज तू भेद करिसी ।। .२ ।।

 

असे मूर्ध्नी जेची कमळचि सहस्रादलमयी

तिथे मूर्धस्थानी पतिसह एकान्ति  रमसी ।

तुझ्या ह्या रूपाचे करति मुनि जे ध्यान हृदयी

चिदानंदामध्ये रमति जन ते धन्य जगती ।। .३।।*

(अनाहत ऐवजी अनहत वा सहस्रदल ऐवजी सहस्रादल हे वृत्ताच्या नियमामुळे लिहावे लागले आहे. )

श्रीयंत्र

----------------------------

श्लोक 

मागच्या 9व्या श्लोकात मूलाधार चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठान चक्रावर एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोपलेली कुंडलिनी जागृत झाल्यावर ती शरीरातील सहा चक्रांचे भेदन करून मस्तकात असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमळातील चंद्रमंडलात विहार करते असे सांगितले होते.  

मूर्धस्थानी असलेले सहस्रदलकमल हे जणु काही श्रीचक्ररूप आहे. श्रीचक्र हे शिवशक्तीरूप पूर्ण तत्त्वाचे अधिष्ठान आहे. श्रीचक्रात ज्याप्रमाणे चक्रे आाहेत त्याप्रमाणे आपल्या शरीरातही 6 चक्रे आहेत.

श्रीचक्राच्या सर्वात बाहेर तीन रेघांचा चौरस/ चतुष्कोण असतो ह्याला भूपुर असे म्हणतात. ह्याला चार बाजूला असलेली चार दारे ह्या भूपुरालााच संलग्न/ त्याचाच भाग असतात त्यातून आत प्रवेश केला की थोडी मोकळी जागा सोडून एकाच्या आत एक अशी 3 वर्तुळे ही बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत. ह्या वर्तुळांच्या आत 16 पाकळ्यांचे कमळ आहे. त्याच्या आत आठ पाकळ्यांचे कमळ आहे. ह्या अष्टदश कमलाच्या आत प्रथम सर्वबाजूंनी मोकळा असलेला वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या वर्तुळाकार प्रदेशात अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पाच चक्रे दिसतील. त्यांच्या मधे असलेले त्रिकोण आणि चक्रांची नावे खालील प्रमाणे

 पहिले चक्र -  चौदा त्रिकोण – चतुर्दशाकार

दुसरे चक्र – 10 त्रिकोण – बहिर्दशार

तिसरे चक्र – 10 त्रिकोण - अन्तर्दशार

 चौथे चक्र – 8 त्रिकोण – अषटकोण / वसुकोण

पाचवे चक्र – 1 त्रिकोण – शुद्ध त्रिकोण

 श्रीचक्राप्रमाणे सहस्रदलकमलातील श्री चक्रात सर्व कलांनी परिपूर्ण वृद्धी-क्षय विरहित आणि निष्कलंक असे चंद्रमंडल आहे. श्रीचक्राच्या सर्वात आतल्या शुद्ध त्रिकोणात जसा मध्यवर्ती बिंदू आहे त्याप्रमाणे सहस्रदल कमलातील श्री चक्रात हा पूर्णचंद्र विराजमान झालेला आहे. तेथेच श्री ललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवतत्त्वासी समरस होऊन सामरस्याने/ समरस होऊन विहरत असते.

याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शाने स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्राव होत असतो. व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर शरीराचेही परिपोषण होत असते. असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धांत आहे.

रसाम्नायमहस् ह्या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. येथे रसांची परिपूर्ण अभिवृद्धी असते. महस् म्हणजे तेजोमय, कांतिरूप असलेला चंद्र. त्या चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीने साधकाच्या नाड्यांचे व देहाचे पोषण होते.

हे सर्व कार्य कुंडलनीच्या रूपाने चालत असते. त्यानंतर  ही कुंडलिनी खाली उतरते. व पुन्हा आपल्या प्रदेशात म्हणजे मूलाधारचक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठान चक्रामधे सापाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालुन झोप घेत असते. ती तिची निद्रा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यात तोंड घालून होत असते. त्या ठिकाणी असलेल्या सुषुम्ना नाडीचा मार्गही तिने आपल्या मुखाने अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी आणि लं हे अक्षर पृथ्वीचे बीज मानले जाते म्हणून आधार चक्राला कुल म्हटले जाते. आधारचक्र मध्यभागी खोलगट असल्याने त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडातही सूक्ष्म छिद्र आहे त्यालाच आचार्यांनी `कुहर’ असे म्हटले आहे. इडा आणि पिंगला ह्यांच्यामधे असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचे मुख झाकलेले असल्याने तेथे प्राणवायूचा प्रवेश होत नाही. व जो पर्यंत तेथे प्राणवायू पोचत नाही तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाही.  जोपर्यंत अंतर्मुखता नाही तोपर्यंत मनाला स्वस्थता लाभत नाही. समाधान मिळत नाही. अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणे आवश्यक आहे. ते कुंडलिनी जागृत झाली की मगच होते.

*सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः

प्रपञ्चं सिञ्चन्ती पुनरपि रसाम्नाय-महसः

अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं

स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ।।   ।।*

*अगे माते कैसी चरण युगुले वर्णु तव गे

सुधेची सौख्याची जणु सुखद निस्यंदिनि असे

तयातूनी धारा अविरत स्रवे अमृतमयी

तयाच्या वर्षावे सकल शरिरा तृप्त करिसी ।। .१।।

 

शरीरी नाड्यांच्या सकल समुहा शिंपण करी

शरीरा नाड्यांना तयि मिळतसे पुष्टि बरवी

पुन्हा येसी खाली उतरुन तुझ्या पूर्व स्थितिसी

करोनी वेटोळे पुनरपि स्वस्थानि बससी ।। १.।।

 

तुझी साडेतीनी वलयचि भुजंगासम दिसे

पुन्हा मूलाधारी अनुभवित झोपेसचि सुखे

शिरे चक्राधारी पुनरपिच रंध्रात सहजी

तुझ्या ह्या खेळाने जननि उपकारास करिसी ।।.३ ।।*

----------------------------

श्लोक १ -


श्रीयंत्राची प्रतिमा समोर ठेऊन हा श्लोकार्थ वाचला तर त्याचे विवेचन सहज समजेल.

 हे  माते !  श्रीयंत्रात चार उर्ध्वमुख (वरच्या बाजूला टोक असलेले) त्रिकोण शंकराचे असल्याने त्यांना ``श्रीकंठ’’ असे म्हणतात. मध्यबिंदूपासून खाली पाच अधोमुख ( खाली तोंड वा टोक असलेले त्रिकोण) असलेले त्रिकोण शक्तीचे असल्याने त्यांना ``शिवयुवति’’ असे म्हणतात. वर टोक असलेले चार त्रिकोण आणि खाली टोक असलेले पाच त्रिकोण हे मध्यवर्ती असलेल्या बिंदूने प्रभिन्न म्हणजे पृथक्, वेगळे झालेले आहेत. असे हे   4 + 5 = 9  त्रिकोण हे विश्वप्रपंचाचे मूळ कारण आहे. प्रत्यक्ष शिवपार्वतीचे स्वरूप आहे. हे नऊ त्रिकोण हे श्रीचक्राचे अंतरंगस्वरूप आहे; ज्याची मुख्य देवता शक्ति आहे तर; आठ दलांचे कमळ, 16 दळांचे कमळ, तीन वर्तुळाकार मेखला, आणि तीन रेघांचे भूपुर हे श्रीयंत्रााचे बहिरंगस्वरूप आहे. ज्याची मुख्य देवता शिव आहे.

 उर्ध्वमुख शिवचक्रातील आणि अधोमुख शक्तिचक्रातील सर्व मिळून 43 त्रिकोण होतात. शिवशक्तींचं सामरस्य झालेला बिंदू जेथे शिवशक्तीचा कायमचा निवास आहे;  जेथे शक्तिस्वरूप त्रिपुरसुंदरी ही परमशिवाच्या अंकावर विराजान आहे.शिवशक्तिला परमदेवता म्हणतात. तो पोकळ बिंदू चव्वेचाळीसावा समजावा. 

ह्या त्रिकोणांच्या भोवताली अष्टदल कमल, त्यच्या बाहेर षोडष दल कमल, त्याच्या बाहेर तीन वर्तुळांची मेखला, आाणि त्याच्या बाहेर चतुष्कोणाकार ( चौरसाप्रमाणे)  तीन भूपुरांच्या रेषा असे क्रमाने पूर्णतेला पोचलेले श्रीचक्र हे माते तुझे मंदिर आहे.  त्याचा महिमा मी काय वर्णन करू? तो अवर्णनीय आहे.

*चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि

प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः

चतुश्चत्वारिंशद्वसुदल-कलाश्र-त्रिवलय-

त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ।। ।।*

( ``हे मातः त्रिपुरसुन्दरी ! चतुर्भिः श्रीकण्ठैः शम्भोः सकाशात् प्रभिन्नाभिः पञ्चभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरण कोणाः वसुदल-कलाश्र-त्रिवलय-त्रिरेखाभिः सार्धं परिणतः सन्तः चतुश्चत्वारिंशत् भवन्ति ।)

*असे जे सांबाचे प्रतिक जणु श्री यंत्र बरवे

शिवाचे शक्तीचे सुखद वसतिस्थान नित जे ।

त्रिकोणांचे चारी नित असतसे उर्ध्वमुख ज्या

असे शंभूरूपी प्रतिक तयि श्रीकंठ समजा ।।  . ।।

 

असे केंद्रामध्ये शिवप्रतिक जो बिंदु शिव हा

असे तो शक्तिचे नितचि वसतिस्थान बरवा ।

तिथे तादात्म्याने वसत शिवअंकी नित शिवा

असे बिंदुस्थानी शिवसहचि शक्ती वसतिला ।।  .२ ।।

 

शिवाशक्तीरूपी प्रतिकमय जो बिंदु इवला

तयाखाली शक्तिस्वरुपचि त्रिकोणांस बरव्या ।

अधोमूखी पाचांस शिवयुवती नाव दिधले

प्रपंचा विश्वाच्या असति नउ हे कारण भले ।।  .३ ।।

 

नऊ त्रीकोणांसी विलगचि करे बिंदु मधला

पुर्‍या त्रेचाळीसा धरुनचि त्रिकोणांस सगळ्या

तयामध्ये बिंदू मिळवुनिच तो एक मधला

पुरे चव्वेचाळीस मिळुनचि श्रीयंत्र घडता ।। .४ ।।

 

त्रिकोणांसी वेढी कमल-दल ते आठ मिळुनी

तयांच्या बाहेरी कमलदल सोळा उमलती ।

असे त्री रेघांचे वलय कमलांच्या पुढती ते

असे श्रीयंत्राच्या भवति जणु ती मेखलचि गे ।।  .५ ।।

 

त्रिरेघांनी युक्ता भवतिच चतुःष्कोण सजती

असे ये पूर्णत्वा जननि तव श्रीयंत्रस्वरुपी ।

मना मोही तेची सुखद तव राऊळ जननी

तयाची वर्णाया महति नच मी पात्र जननी  ।।  .६ ।।*

----------------------------

  श्रीयंत्राची माहिती-

श्री चक्राची अधोमुख त्रिकोण असलेली आपल्याकडची बाजू पश्चिम समजून बाकी दिशा ठरवल्या जातात.  आपल्याकडील बाजू ही पश्चिम प्रमाण मानून वरची बाजू पूर्व; आपल्या उजव्या हाताची बाजू दक्षिण डाव्या हाताची बाजू उत्तर येते. डाव्या हातचा वरचा कोपरा इशान्य, डावीकडचा खालचा कोपरा वायव्य; उजवीकडचा वरचा कोपरा अग्नेय तर उजवीकडचा खालचा कोपरा नैऋत्य दिशा येते.

 श्रीचक्राला 9 आवरणे असतात. प्रत्येकाला चक्र म्हणतात. सर्वात बाहेरून आत येतांना सर्वात बाहेरचे

1 चतुष्कोणाकार भूपुर - ह्यालाच त्रैलोक्य मोहनचक्र -असे म्हणतात. ह्याच्या चारी दिशांना चार दारे आहेत. तीन रेघा म्हणजे जणु मंदिराचे तीन प्राकार आहेत पहिली रेषा शुक्ल, दुसरी अरुण तिसरी पिवळ्या रंगाची आहे.

पहिल्या रेषेने तयार झालेल्या चौकोनाच्या चारी दरवाजात, चारी कोपर्‍यात व पश्चिम रेघेच्या (सर्वात आपल्याकडील) उजवीकडील अर्धभागात तर सर्वात वर म्हणजे पूर्व रेषेवरील डावीकडील अर्धभागात दहा प्रकारच्या सिद्धी व त्या सिद्धींच्या अधिष्ठात्री देवता विराजमान असतात.

अणिमा - देह अणुसमान सूक्ष्म करणे. ज्यामुळे कोणी त्याला पाहू शकत नाही.), महिमा - देह असीम विशाल करणे),

लघिमा - शरीराचा भार/वजन अत्यंत हलके करू न वार्‍याच्या वेगाने उडता येणे),  गरिमा - शरीराचा आकार न बदलता त्याला इतके जड करणे की कोणि त्याला हलवू शकणार नाही.),

 प्राप्ति – ह्यात साधकाला कोणीही अडवू शकत नाही. कोणीही न आडवता तो जेथे जाये असेल तेथे सर्वांसमक्ष अदृश्य होऊन जाऊ शकतो. कोणी त्याला पाहू शकत नाही वा अडवू शकत नाही.

प्राकाम्य – समोरच्याने मनोगत व्यक्त न करताही साधक कोणाच्याहि मनातील विचार सज समजू शकतो.

ईशित्व – साधक स्वतः ईश्वरस्वरूप होऊन सर्व विश्वावर त्याचे अधिपत्य स्थापित करू शकतो.

वशित्व – साधक कुठल्याही व्यक्तीच्या मनावर ताबा मिळवून त्याला दास बनवून ठेऊ शकतो. ज्यामळे त्याचा निश्चित पराजय होतो.

 एखाद्या मंदिरात प्रवेश केल्याप्रमाणे आपण आत जात आहोत. जो साधना व तपाने भूपराची ही पहिली रेष ओलाडतो त्याला ह्या अष्टसिद्धी प्राप्त होतात.

भूपुराच्या दुसर्‍या रेषेत भूपुराच्या चारी दरवाजांमधे आपल्या डावीकडे चार आणि चारी कोपर्‍यात चार अशा आठ मातृका/लोकमाता विराजमान असतात.

ब्राह्मी / ब्रह्माणी ही परम पिता ब्रह्माची शक्ती प्रकटित करते. ही पीतवर्ण, चतुर्भुज असून कमल वा हंसावर विराजमान आहे.

 माहेश्वरी / रुद्राणी -   ही महादेवाची शक्ती प्रकटित करते. त्रिनेत्रधारी अशा ह्या चतुर्भुज देवीच्या हातात त्रिशूळ, डमरू, रुद्राक्षमाल आणि कपाल आहे. शक्ति हाच तिचा परिचय आहे. नंदी हे तिचे वाहन आहे.

 कौमारी, ही शिवपुत्र कार्तिकेयाची शक्तिस्वरूप देवी कुमारी, कार्तिकी वा अम्बिका ह्या नावानेही ओळखली जाते. ही चतुर्भुज असून तिच्या हातात परशु, भाला, धनुष्य आणि चांदीची मुद्रा आहे. कधी कधी स्कंदाप्रमाणे तिलाही सहा हात दाखवतात.

 वैष्णवी - ही भगवान विष्णूची शक्ती प्रकट करते. ही चतुर्भज असून हिच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. अनेक आभूषणांनी नटली आहे. ऐश्वर्यसम्पन्न आहे. गरुडावर विराजित आहे.

इंद्राणी / ऐंद्री / महेंद्री - ही देवराज इंद्राची शक्ती प्रकटित करते. हजार भुजा, हजार नेत्र असे चे स्वरूप असून ती ऐरावतावर आरूढ आहे.

वाराही ही भगवान विष्णुच्या वराह अवतारातील यमदेवाची शक्ती प्रकटित करते. तिच्या हातात दंड, हल/नांगर, खड्ग, आणि पानपात्र आहे. रेड्यावर स्वार असून अर्धनारी वराहरूपात दाखवली जाते.

चामुण्डा -  हे चंडीच्या शक्तीचे दुसरे रूप आहे. हिचं रंगरूप महाकालीप्रमाणेच आहे. ह्या कृष्णवर्णी देवीने नरमुंडमाला घातल्या आहेत. हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग, पानपात्र आहे. त्रिनेत्रधारी देवी स्वार होऊन शवे तुडवीत जात आहे. असे तिचे अत्यंत भयानक रूप आहे.

नारसिंहि विष्णूच्या नृसिंह अवताराप्रमाणे ही देवी आहे. काहीजण महालक्ष्मी ही आठवी मातृका आहे असे मानतात.

भूपुराच्या तिसर्‍या रेषेत आल्यावर सर्वसंक्षोभिणीमुद्राशक्ति, सर्वविद्राविणी मुद्राशक्ति इत्यादि दहा शक्ति देवता चारी द्वारात, चारी त्रिकोणात त्याप्रमाणे पश्चिमकडील म्हणजे आपल्याकडील उजव्या अर्ध्या बाजूवर तर वरील म्हणजे पूर्वेकडील डाव्या अर्ध्या बाजूवर प्रत्येक ठिकाणी एक याप्रमाणे सुप्रतिष्ठित असतात. यांना प्रकट योगिनी असेही म्हणतात.

 वरील भूपुर ओलांडून आात आाल्यावर सर्वबाजूंनी विशाल पटांगण दृष्टीस पडते. ह्या पटांगणातून पुढे आल्यावर मेखला वा तीन वलये दृष्टीस पडतात. ही वलये

सत्त्व, रज तम ह्या तीन गुणांची अथवा

 सोम, सूर्य, अग्नी ह्या तीन तत्त्वांची अथवा

  इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती ह्या तीन शक्तींची द्योतक आहेत.

ह्या तीन मेखला ओलांडून आपण आत आल्यावर सोळा पाकळ्यांचे कमळ दिसेल. ह्या सोळा पाकळ्या म्हणजे जणु चंद्राच्या सोळा कला मानल्या जातात. त्यामुळे हे चक्र चंद्रस्वरूप मानले जाते. आपल्या बाजूकडील खालच्या पाकळीला आारंभ करून उजवीकडून डावीकडे प्रत्येक पाकळीत कामाकर्षिणी, नित्याकलादेवी, बुद्ध्याकर्षिणी, याप्रमाणे सोळा देवींची मंदिरे आहेत. त्या सोळा देवींना गुप्त योगिनी असे म्हणतात.

ह्या सर्व देवतांचे दर्शन घेऊन आपण आत गेल्यावर आपल्याला आठ दलांचे कमल दिसेल. त्याची आठ दले म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराच्या आठ मूर्तीच आहेत. पृथ्वी, जल तेज, वायु आणि आकाश त्याच प्रमाणे सूर्य, चंद्र आणि आत्मा ह्याच त्या शंकराच्या आठ मूर्ती आहेत. ह्याशिवाय ह्या कमलाची चारी दिशांची चार दले आणि चारी कोणातील चार दले ह्यात अनंगकुसुमादेवी, अनंगमेखलादेवी, अनंगमदनादेवी इत्यादि आठ देवतांची मंदिरे आहेत. ह्या आठ देवता ह्या श्री राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरी देवीच्या गुप्तचर योगिनी आाहेत. ह्या आठ देवता चौदाही भुवनांचे निरीक्षण करत असतात.

हे तिसरे आवरण पार करून आत आल्यावर सर्व बाजूंनी मोकळा वर्तुळाकार भव्य प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर म्हणतात. ह्या सुधासागरात पुढे मोठे द्वीप दृष्टीला पडेल याच द्वीपाला मणिद्वीप म्हणतात.

यात आपण प्रवेश केला की, आपल्याला चौदा त्रिकोण असलेले श्रीचक्रातील चौथे आवरण दृष्टीस पडेल. याला सर्वसौभाग्यदायकचक्र असे म्हणतात. ह्या चक्रातीलअधोमुख असलेल्या खालच्या त्रिकोणापासूनउलट्या क्रमाने उजवीकडून डावीकडे असलेल्या प्रत्येक त्रिकोणात सर्वसंक्षोभिणीशक्ति, सर्वविद्राविणीशक्ति इत्यादि नावे असलेल्या चौदा देवता विराजमान झाल्या आहेत. ह्यांना सर्वसंप्रदाय-योगिनी असे म्हणतात.

त्याच्यापुढे दोन दशारचक्रे आहेत. बहिर्दशार व अंतर्दशार ह्यातील बाहरेच्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रात खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने सर्वसिद्धिप्रदादेवी, सर्वसंपत्प्रदादेवी इत्यादि नावे असलेल्या दहा देवता सर्व त्रिकोणात पहायला मिळतात. हे चक्र दशावतारात्मक विष्णुस्वरूप आहे. यातील देवतांना कुलोत्तीर्णयोगिनी असे म्हणतात.  अंतर्दशारक्रामधेही याचप्रमाणे प्रत्येक त्रिकोणात सर्वज्ञादेवी, सर्वैश्वर्यप्रदादेवी इत्यादि दहा देवता आहेत.यांना निर्गभयोगिनी असे म्हणतात

पाचवे आणि सहावे आवरण ओलांडून आपण आत गेल्यावर आपल्याला आठ त्रिकोण असलेले सातवे आवरण लागेल या सातव्या आवरणातील खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने वशिनी वाग्देवता , कामेश्वरी वाग्देवता  इत्यादि नावे असलेल्या आठ वाग्देवताप्रत्येक त्रिकोणात एक ह्याप्रमाणे प्रतिष्ठित झालेल्या दिसतील ह्यांना रहस्ययोगिनी असे म्हणतात. सर्वरोगहर नाव असलेल्या सातव्या आवरणातून आपण आत गेल्यावर आपल्याला मुख्य त्रिकोणाचे दर्शन होईल.

ह्या मुख्य त्रिकोणाला सर्वसिद्धिप्रद असे नाव आहे. या त्रिकोणाच्या सभोवार श्रीकामेश्वर भगवान सदाशिव आणि कामेश्वरी महात्रिपुरसुंदरी यांची धनुष्यबाण, पाश आणि अंकुश, अशी आयुधे आहेत. या त्रिकोणाच्या तिन भुजा म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण व तमगुणप्रधान अशा तीन मूर्तिमंत शक्ति-देवताच आहेत. हा त्रिकोण नादशक्तीचे आधिष्ठान आहे. ह्या त्रिकोणाचा रंग दुपारीच्या फुलासारखा आरक्त आहे. ह्या त्रिकोणाच्या भुजांजवळ कामगिरीपीठ, जालंधरपीठ आणि पूर्णगिरिपीठ अशी तीन पीठे म्हणजे सिंहासने आहेत. या सिंहासनांवर ब्रह्मा, विष्णु, महेश आपापल्या शक्तिदेवांसह विराजमान आहेत. या देवता जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री आहेत. त्याप्रमाणे सृष्टी, स्थिती, लय ह्यांच्याही अधिष्ठात्री आहेत. ह्या त्रिकोणांच्या तीन भुजा म्हणजे अग्निचक्र,सूर्यचक्र व सोमचक्र होत इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती यांच्याही त्या अधिष्ठान आहेत.

याच त्रिकोणात महात्रिपुरसुंदरीचेच रूप बालत्रिपुरसुंदरीच्या रूपाने विराजमान आहे. देवता ही मंत्रमय असल्याने श्री ललितात्रिपुरसुंदरीचा  मंत्रच हया त्रिकोणात दिला असल्याचे आढळते. तर काही चक्रातून महात्रिपुरसुंदरीचा पंचदशाक्षरी महामंत्र (15 अक्षरे असलेला) अथवा महामंत्रराज  ह्या त्रिकोणात देतात.

वर सांगितलेल्या शुद्ध त्रिकोणाच्या आत असलेला मध्यवर्ती बिंदू; तो ह्या चक्रातील नववे आवरण असून त्याला बैंदवस्थान म्हणतात. ह्या बिंदूला सर्वानंदमयचक्र म्हणतात. हे या चक्रातील सर्वोच्च स्थान होय.

 जसे एखाद्या भव्य मंदिरात अनेक प्राकार ओलांडून अनेक मंदिरांचे दर्शन घेत तेथील मुख्य मंदिरातील सभागृहातून गर्भगृहात जावे व आपल्या इष्ट  देवतेचे  दर्शन घेऊन धन्य व्हावे त्याप्रमाणे जो साधक श्रीचक्राचा सांगोपांग विचार करीत आतल्या बिंदूपर्यंत पोचतो आणि तेथे अनन्य भावाने श्रीमहात्रिपुरसुंदरीचे दर्शन घेतो तो धन्य होतो. त्याची कर्माधीन जन्ममरण परंपरा संपते व तो साक्षात शिवरूप होतो.

देहातील ब्रह्मरंध्रातील सहस्रदलकमल हेही एक स्वतंत्र श्रीयंत्रच आहे..

----------------------------

श्लोक  

 श्लोक 8, 9, 10, 11 ह्या तीन श्लोकात आपण त्रिपुरसुंदरीचं वास्तव्य असलेले अत्यंत भव्य, सुंदर असं तिचं ``श्रीयंत्र’’ नावाचं मंदिर जाणून घेतलं. त्या मंदिरातील भूपुराच्या द्वारातून आत येऊन तीन प्राकार ओलांडून एक एक चक्र ओलांडून आत येत मंदिराचे बहिरंग पाहिले तसे अंतरंगही पाहिले. नऊ आवरणे पार करून जेव्हा प्रत्यक्ष त्रिपुरांबिकेचं दर्श घडतं तेव्हा तिच्या सौंदर्याची वाखाणणी करायला शब्दच उरत नाही. अर्थात येथे पोचणे म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करणेच होय.

 आचार्य म्हणतात, माते !, हे हिमगिरिसुते तुझ्या रूपाच्या  ऐश्वर्याचं मी काय वर्णन करणार? हे ब्रह्मा, विष्णू, इंद्र, बृहस्पती ह्यांच्यासारखे दिग्गज मोठा प्रयास करूनही  ``कथमपि’’ म्हणजे कसेबसे तरी का होईना  ‘‘ कल्पन्ते किम्? ’’ समर्थ होतात काय? अर्थातच होत नाहीत; तेथे माझ्या सारख्या पामराने तुझ्या लावण्याचं, ऐश्वर्याच काय वर्णन करावं?

अमर म्हणजे देव. ह्या देवांच्या सौंदर्यवती ललना म्हणजे स्त्रिया (पत्नी अथवा अप्सरा) तुझ्या सौंदर्याचं दर्शन एकदा तरी व्हावं म्हणून झुरत असतात. शिव आणि शक्ती ह्यांच्या असलेल्या सामरस्यामुळे, एकरूपतेमुळे एक शंभूच फक्त तुझं सौंदर्याचं अवलोकन करू शकतो. तुला जाणू शकतो. तुझ्या असीम विस्ताराचा आस्वाद घेऊ शकतो; जे बाकी कोणालाही शक्य नाही. ह्या देवस्त्रियांचं सौंदर्य तुझ्या पासंगालाही पुरणार नाही. त्यांच्या मनातील तुला भेटण्याची आस पूर्ण होण्यासाठी, तुझं लावण्य निरखण्याची मनाची तळमळ, तगमग पूर्ण करण्यासाठी, आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी, तुझ्या भव्य दिव्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून ह्या ललना शेवटी मोठ्या भक्तीने ह्या महादेवाची, श्री शंकराची उपासना करतात. आणि मोठ्या कष्टाने, मनःपूर्वक केलेल्या प्रयत्नाने अप्राप्य अशा ``गिरिश-सायुज्य-पदवीं यान्ति’’ म्हणजे गिरीशाच्या म्हणजे शिवाच्या सायुज्य पदवीपर्यंत पोचतात. म्हणजे शिवमय होतात. शिवस्वरूप होतात. तेव्हाच त्यांना तुझ्या रूपाचं, तुझ्या असीम लावण्याचं अवलोकन करता येतं. आस्वाद घेता येतो.  सदाशिवाशी तादात्म्य पावूनच हे शक्य आहे. अन्यथा नाही.

*त्वदीयं सौन्दर्यं तुहिन-गिरि-कन्ये तुलयितुं

कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः

यदालोकौत्सुक्यादमर-ललना यान्ति मनसा

तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम् ।। २ ।।*

( तुहिन – हिम; तुहिनगिरिकन्या – हिमगिरिकन्या, पार्वती.)

*तुझ्या लावण्याची हिम-गिरि-सुते काय तुलना

जरी इंद्र ब्रह्मा हरिसमचि विद्वान सकला ।

प्रयासाने मोठ्या करुन स्तुति का साधत तया?

असे तेथे कैची अजुनच निराळी मम कथा ।। .१ ।।

 

लपे ना उत्कंठा तव अमित लावण्य बघण्या

म्हणोनी स्वर्गीच्या सकल ललना येति शरणा ।

पदी त्या शंभूच्या; मिळवितिच सायुज्य-पद ते

तुझ्या लावण्याचे अनुपम तदा दर्शन घडे ।।  .

 

तुझ्या सौंदर्याचा अनुभवचि घेण्यास विरळा

तुझ्या लावण्याची सकल अनुभूतीच मिळण्या ।

असे युक्ती हीची शिवमयचि व्हावेचि पुरते

शिवा-वाचोनी का स्वरुप तव कोणा उलगडे ।। २. ।।*

----------------------------

श्लोक 


प्रत्येक प्राणी, पक्षी, माणूस आपल्यासोबत एक अदृश्य आभा वलय घेऊन फिरत असतो. तो जिथे जाईल तिथे हे वलय लोकांच्या मनावर चांगली वा वाईट छाप उमटवत असतं. कधी वेंधळेपणाची, कधी आढ्यतेची तर काहींना पाहताक्षणीच त्यांच्याबद्दल नितांत आदर निर्माण होतो. काही वात्सल्यमूर्ती वाटतात किंवा खूप गोडही!

कधी कधी एखादी स्त्री सर्वांगसुंदर असते वा एखादा पुरुषही रुबाबदार असतो. पण !------ कळत नाही कुठे माशी शिंकते; त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव असतील वा अजून काही नकोशी लकब असेल, वा काही नसतांना देखील पहाताक्षणीच मन त्यांच्यावर नापसंतीची फुली मारून टाकते. त्याच्या उलट काही काळेसावळे, वेडेबागडे, कुठल्याही प्रकारे आकर्षक व्यक्तिमत्त्व नसलेले लोक पहाताक्षणीच हवेहवेसे वाटतात. कधी त्यांच्या नुसत्या सुहास्यातच आपण विरघळून जातो तर कधी त्यांच्या एखाद्या नजरेच्या कटाक्षात ! नुसतच नाही तर चांगले कित्येक दिवस, तर काही वेळेला जन्मभर मनात ठाण मांडून बसतात. म्हणावं तर लोकांना आकर्षित करावं असं काहीही नसतांना देखील !

माणसच का प्राणी पक्षी सुदधा ह्याला अपवाद नाहीत. काही प्राणी वा पक्षी त्यांच्या खास लकबीने सहज लक्ष वेधून घेतात. आणि न कळत आपले हृदयही काबीज करतात. तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का?

असो! पण त्याचं उत्तर मला ह्या आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात मिळालं. ह्या जगाची नियामक शक्ती असलेल्या जगज्जननी त्रिपुरसुंदरीच्या एका कटाक्षाचा हा प्रभाव बरं! तिच्या नुसत्या एका कटाक्षाने मदनाचा देह दिव्य झाला आणि लावण्यमूर्ती रतीची नजर त्यावरून हटेना. त्या त्रिपुरसुंदरीचाच कटाक्ष तो! तो नुसता एखाद्यावर पडला तर काय होऊ शकेल हे सांगताच येणार नाही. त्रिपुरसुंदरीचा कटाक्ष लाभलेली व्यक्ती जन्मजातच आाकर्षक व्यक्तिमत्त्व घेऊन जगात येते. आचार्यांच्याच मिश्किल भाषेत पाहु या!  

*नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं

तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः

गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्त्रस्त-सिचया

हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ।।३ ।।*

( वर्षियस् – अत्यंत वृद्ध . नयनविरसं – डोळ्यानी बघवत नाही असा विद्रूप. नर्मन् – क्रिडा, विनोद, विलास. नर्मसु जडम् – मनोरंजन, विनोदबुद्धी नसलेला अपांग- दृष्टीक्षेप/ तिरका कटाक्ष. सिचय – खांद्यावील वस्त्र, पदर. दुकूल - रेशमी वस्त्र, शेला )

*तुझ्या लावण्याच्यासम रुचिर दृष्टी तव असे

कटाक्षाने एका जननि तव ते काय  घडे

तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे तो जरठही

दिसे मोठा आकर्षकचि उमदा सुंदर अती ।। ३.  ।। 

 

असो काणा, भेंगा, कुरुपचि अडाणी उमज ना

प्रभावी भाषेने नच पडतसे छापहि जरा

 कटाक्षाने एका परि तवचि गे मंगलमयी

किती त्याच्या पाठी फिरति युवती भान हरुनी ।। ३. २ ।। 

 

सुटे वेणी, वक्षी पदर ढळता भानहि नसे

बहूमोलाचा तो कधि कमरपट्टा पडतसे

गळे शेला खाली धुळित बहु लोळे भरजरी

असे खासा रेश्मी बहु किमति आकर्षक जरी ।। ३.३ ।।

 

दशा ऐशी होई कितिक युवतींची जर अशी

नको सांगाया त्यावर जनहि आकृष्ट सहजी

कृपादृष्टी भक्ता बनवित असे लोभस तुझी

कटाक्षाचा एका जननि महिमा वर्णु किति मी?  ।। ३.।।*

----------------------------

श्लोक  


ह्या श्लोकात त्रिपुरसुंदरीच्या चरणांचा महिमा सांगितला आहे. त्यासोबत आपले आणि पृथ्वीचे, आपले आणि ब्रह्मांडाचे कसे घट्ट नाते आहे हे हेही दाखवले आहे ह्या नात्यात एक सुखद सुसंवाद आहे. सुरेलपणा आहे. एकतानता, सामजस्य आहे. साम्यही आहे. आपल्या आणि ब्रहमांडात होणार्‍या घडामोडींना एक सुरेख समान लय आहे. त्या लयीत एखाद्या सुरेल गाण्याचा एखादा सूर आपण आहोत. जेव्हा दोन वाद्यांचे सूर एकमेकांशी जुळतात तेव्हा तो सूर जास्त घुमतो. गाण्याला उठाव येतो. तंबोर्‍याची जव्हार काढल्यावर सूर जास्तच बोलायला लागतो ; तसा जीवाची शिवाशी असलेली संगत जाणवली की संसार संपून जातो. दुःखाचा बेसूरपणा लयाला जातो आपली त्या आनंदरूप शक्ती सोबतची एकतानता एका सुरेल गाण्याचा भाग होऊन जाते. (मित्रांनो, ह्यात अध्यात्मिक विवेचन नसेल पण हे मला उमगलेलं विश्वदर्शन आहे. ) 

आपण कसे ह्या ब्रह्मांडाला जोडले गेलो आहोत हे दाखवायचं झालं तर एक साधं उदाहरण घेऊ या भाषा! भाषेत शब्द असतात. शब्दांना अर्थ असतो म्हणजे ते शब्द निसर्गातील पदार्थसृष्टीशी जोडलेले असतात. कमळ म्हटल्यावर आपल्याला डोळ्यासमोर (बाहेरच्या जगातील) सरोवरातील कमळ उभं राहतं. कमळ नसतच तर हा शब्दही आला नसता. म्हणून पृथ्वी, अग्नी, जल, वायु, आकाश ही पंचभूते आणि मन ह्यावरच सारी पदार्थसृष्टी, आपला सारा शब्द प्रपंच आणि त्याचा अर्थप्रपंच आधारीत आहे. एकमेकात घट्ट विणला गेला आहे.

प्रकाश पडल्याशिवाय असलेली वस्तू दिसत नाही.  आणि प्रकाश पडला तरी सक्षम नेत्र आणि मेंदुशिवाय त्याचं आकलन होत नाही. ज्ञान रूप प्रकाश देणारी स्वयंप्रकाशी ज्ञानमयी त्रिपुरसुंदरी आणि त्याचे आकलन घडवणारी शरीरातील षट्चक्रे, षट्क्रातील देवतारूप किरणे अशी ही सांगड आहे.

ज्ञानरूप, किरणमय अशा हया अक्षरांच्या व अर्थाच्या देवता आपल्या शरीरात असलेल्या मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि आणि आज्ञा अशा चक्रात राहून ब्रह्मांडाशी आपली सांगड घालत राहतात. ह्या देवता कोण? ह्या देवता म्हणजे स्वयंप्रकाशी, चित्स्वरूप त्रिपुरसुंदरीच्या शरीरातूनबाहेर पडलेले किरणच होत. जसा सूर्यातून प्रकाश बाहेर पसरतो त्याप्रमाणे ही तत्वे अणि ज्ञानरूप किरणे (मयूख) म्हणजेच ह्या देवता. ह्या त्रिपुरसुंदरीच्या देहातून ज्ञानरूप किरणांप्रमाणे बाहेर पडतात. आणि आपल्याला ब्रह्मांडाचे ज्ञान देतात.

ह्या सहा तत्त्वांची आपल्या शरीरातील सहा चक्रे ह्यात कशी काम करतात ते पाहू. ‘‘क्षितौ म्हणजे पृथ्वी तत्त्वाने युक्त असलेल्या मूलाधार चक्रात षट्पञ्चाशत् म्हणजे 56 किरणे आहेत. वा आकलन करून देणार्‍या किरणरूप देवता आहेत. 16 स्वर व 34 व्यंजने मिळून 50 अक्षरे होतात. त्यात ऐं, र्‍हीं श्रीं ऐं क्लिं सौः अशी सहा मंत्रबीजे मिळून पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्री 56 किरणे असतात.

‘उदके ’’ म्हणजे जलतत्त्वात्मक मणिपूर चक्रामध्ये 52 किरणे असतात.    ‘‘ हुताशे ’’ म्हणजे अग्नितत्त्वात्मक स्वाधिष्ठान चक्रात 62 किरणे असतात.   ‘‘अनिले’’ म्हणजे हृदयाच्या मागच्या बाजूस स्थित असलेल्या वायुतत्त्वात्मक अनाहत चक्रात 54 किरणे असतात. ‘‘ दिवि ’’म्हणजे कंठस्थानी असलेल्या आकशतत्त्वयुक्त विशुद्धि चक्रामध्ये द्विषट्त्रिंशत म्हणजे 72 किरणे आहेत. ह्याच्यावर भ्रूमध्यात मन ह्या तत्त्वाने युक्त असलेल्या आज्ञाचक्रात 64 किरणे आहेत. (56 + 52 + 62 + 54 + 72 + 64 = 360 )  एकंदर भारतीय कालगणनेनुसार एका वर्षात 360 दिवस असतात (अधिक मासाने दिवसांच्या हिशोबात येणारी तूट भरून काढली जाते.) आपल्या देहात जशी सहा चक्रे आहेत तसे वसंत, ग्रीष्म इत्यादि सहा अयने आहेत. एक संवत्सर ह्या कालपिंडातील जणु ती सहा चक्रेच आहेत.

योगी जनांनी अनुभवलेली ही किरणे किंवा तत्त्वे आणि किरणरूप देवता आहेत; त्यांच्या वर, त्यांच्यापलिकडे ‘‘ तेषां अपि उपरि तव पादाम्बुजयुगं आस्त ।’’ सर्व तत्त्वात्मक ब्रह्मांडाच्याही वर कालातीत सर्व तत्त्वातीत श्रीचक्रातील बिंदुस्थानात तुझी कोमल पावले विराजमान आहेत. देहपिंडातही सर्व चक्रांच्या वर ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमलात पूर्ण चंद्रमण्लात तुझे चरणकमल  विराजमान आहेत. अशा तुझ्या पावलांचा महिमा मी कसा वर्णन करणार?

*क्षितौ षट्पञ्चाशद् द्वि-समधिक-पञ्चाशदुदके

हुताशे द्वाष्टिश्चतुरधिक- पञ्चाशदनिले

दिवि द्विष्षट्-त्रिंशन् मनसि चतुःषष्टिरिति ये

मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुज-युगम् ।। ।। *

( मयूख – किरणे )

*महा भूतांसंगे मन धरुन तत्त्वे नित सहा

धरा, अग्नी, पाणी, पवन, अन आकाश, मन वा 

शरीरामध्येही असति नित चक्रे स्थित सहा

सहा चक्रांठायी स्थित असति भूते मन तथा ।। ४. ।।

 

सहा तत्त्वातूनी नित प्रकटिती शब्द सगळे

तया शब्दातूनी उमटति किती अर्थ तयिचे

पसारा शब्दांचा अन सकल वाच्यार्थ तयिचा

पदार्थांची सृष्टी समजवुन सांगी नित पहा ।। ४. २ 

 

असे जी श्रीविद्या-स्वरुप जननी कुंडलिनि ही

तिचा कैसा वर्णू चरणमहिमा तो उचितची

जसे सूर्याचे हे किरण चहुबाजू पसरती

प्रभा तैशी फाके नित जननिच्या ह्या तनुतुनी ।।४.३ 

 

जशी सूर्याची ही अमित किरणे त्या समचि ही

किती नाना तत्त्वे किरणस्वरुपी देवगणही

जरी लाखो लाखो असति किरणे ही कितितरी

परी काही संख्या ठरविलिच सांकेतिक अशी ।। .४ ।।

 

महा तेजस्वी ते किरणस्वरुपी देवगण ते

असे अर्था-शब्दातचि नित अधिष्ठान तयिचे  

अधिष्ठात्री देवी वसति नित अर्थातुन जशा

रहाती प्रत्येकी क च ट त प वर्गाक्षरि तशा ।। .५ ।।

 

वसे मूलाधारी नितचि धरणी तत्त्व उमदे

तयातूनी येती लखलखित छप्पन्न किरणे 

जलाच्या तत्त्वाचे मणिपुरि अधिष्ठानचि असे

तयातूनी येती उजळवित बावन्न किरणे ।। ४.।।*

 

(16 स्वर, 34 व्यंजने, 50 अक्षरे ही पंचनहाभूते, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेद्रिये, अंतःकरण चतुष्टय, दशविध प्राण, प्रकृति तत्त्व, पुरुष तत्त्वांची सूचक आहेत. ही पन्नास अक्षरे अधिक ऐं ह्रीं श्रीं क्लीं सौः ही सहा मंत्रबीजाक्षरे मिळून पृथ्वीची/ पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्रातील आाहेत. ही शिवशक्तिस्वरूप असल्याने त्यांची जोडीजोडीने 28 नावे शास्त्रात सापडतात. उदा. त्रिपुरसुंदरी, त्रिपुरसुंदर; महावज्रेश्वरी, महावज्रेश्वर. याच प्रमाणे जलतत्त्वात्मक मणिपूर चक्रात 52 किरणे आहेत.)

वसे स्वाधिष्ठानस्वरुप कमलाते अनल गे

तयातुनी येती उजळवित बासष्ठ किरणे 

हृदी वायूतत्त्वातुन निघति चोपन्न किरणे

असे कंठस्थानी `दिव’ म्हणुन आकाशयुत जे ।। ४.७ ।।

 

विशुद्धी चक्रा त्या असतिच बहात्तोरि (72) किरणे

वरी त्याच्या राहे मनस्वरुप जे तत्त्व पुढचे 

तया आज्ञाचक्रातुन निघति चौसष्ठ किरणे

मिळूनी सारी ही सकल तिनशेसाठ किरणे ।। .८ ।।

 

जशी देही तत्त्वे सकल तिनशेसाठ असती

तसे एका वर्षी दिवस तिनशेसाठ बसती 

जशी देही चक्रे तशिच अयने ही नित सहा

सुसामजस्याची प्रचिति जगती देहिच पहा ।। ४.।।

 

तुझे कालातीत स्वरुप जननि तत्त्वमय ते

असे ब्रह्मांडाच्या बहु पलिकडे स्थान तव गे 

तिथे काळाचे हे गणित लव ना चालत असे

असे ब्रह्मांडी जे तव स्वरुप ते पिंडि दिसते ।।४. ।।

 

असे ब्रह्मांडाच्या सकल रचनेच्या पलिकडे

तुझे शक्तीरूपी जननि नित वास्तव्यचि भले 

करी कौशल्याने नियमन जगाचे सकळ जी

अगे माते तू ती वससि मम श्रीचक्र-कमली ।। ४. ।।

 

असे सार्‍या चक्रांवरति नित श्रीचक्र जननी

तया बिंदुस्थानी नित वसशि तू मोदमयची 

असे मूर्ध्नी माते कमलचि सहस्रादल युता

तिथे व्यापी तू गे सकलचि शशीमंडल महा ।। .।।

 

तुझ्या ह्या रूपाचा चरणकमलांचाच महिमा

कसा गावा मी गे; करु सकलची गौरव कसा ? ।। ४.।।*

----------------------------

श्लोक  


 आठव्या श्लोकापासून थोडा थोडा परिचय करून देत श्लोक 14 पर्यंत आपण तंत्रविद्येनुसार यंत्ररूप असे श्रीविद्येचे, श्रीयंत्रांचे वर्णन पाहिले. आपल्या ऋषी मुनींनी अभ्यास आणि योगसाधनेच्या बळावर ह्या विश्वनियमन करणार्‍या शक्तीचे श्री ललिताम्बिका महात्रिपुरसुंदरीचे विश्वात्मक रूप, ह्या अखिल विश्वाचे गूढ जणू ह्या एका यंत्रात गूढ रीतीने बंदिस्त केले आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी ह्या नियमानुसार कोऽहं ?  मी कोण आहे?, मी जर त्या असीम अशा शक्तीचा अंश असेन, हेच श्रीयंत्र माझ्याही मेंदूत स्थित असलेल्या सहस्रदलकमलात असेल, तर तीच मला ‘‘मी’’ जाणून घेण्याची गुरुकिल्ली आहे. हा ‘‘मी’’ चा शोध आपल्याला ब्रह्मांडाचे गूढ उकलण्यासही उपयोगी पडणार आहे.

श्रीयंत्र हे त्या शक्तीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या एकएक पायर्‍या चढून, पार करून आपल्याला गर्भगृहात असलेल्या शक्तिमातेचे दर्शन घ्यायचे आहे. शक्ती बनून शक्तीची पूजा करायची आहे.  मुख्य मंदिराच्या आवारात आल्यावर तीन रेघांचे भूपुर ओलांडणे म्हणजे जणू काही मोहनगरीचे तीन खंदक वा तीन अडथळे पार करून आत येणे होय. तपश्चर्या आणि योग हयांच्या सहाय्याने आपण एकेक आवरण पार करणार आहोत. तप म्हणजे चिकाटी तर `योगः कर्मसु कौशलम्’ हया न्यायाने आपल्याला `मी’ चा शोध घेण्यासाठी, त्या असीम सर्वव्यापी शक्तीचा प्रत्यय येण्यासाठी, चिकाटी आणि कौशल्य हे गुण आत्मसात करण्याची जरूर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातच बसलेल्या अष्टसिद्धीत जो भुलला त्यासाठी पुढचा मार्ग तिथेच खुंटला. मनोनिग्रहाने जो आतपर्यंत पोचेल त्याला त्या शक्तीची प्रचिती येईल. कुंडलिनी जागृत होण्याचा अनुभव मिळेल.

 एकदा का त्या चैतन्याचा प्रत्यय आला, तर ती चित्कला कशी आहे हे आपल्याला सांगतांना आचार्य तिला सगुण रूपात आपल्यासमोर साकार करतात.

 शरद ऋतुतील निरभ्र आकाशात कोजागरी पौर्णिमेला टिपूर शुभ्र चांदणं आकाशाला व्यापून पृथ्वीवर बरसत राहतं. त्या अत्यंत शांत, सौम्य आह्लादक अशा चांदण्याप्रमाणे ही त्रिपुरसुंदरी अत्यंत तेजस्वी, आनंदनिधान, आनंदाची निस्यंदिनी ( जिच्यातून सतत आानंद झरत राहतो अशी) आहे. तिच्या माथ्यावर प्रतिपदेची रेखीव प्रसन्न कोर मुकुटात झळकत आहे. अत्यंत प्रसन्न रूप असलेल्या ह्या मातेने, अत्यंत ममतेनी, भक्ताच्या मनातील भय दूर करणारी अभयमुद्रा (त्रास-त्राण) तिच्या एका हाताने धारण केली आहे. तर दुसरा हात त्याला वर देण्यासाठी वर उचलला आहे. (वर) तिच्या एका हातात स्फटिकाचा कलश आहे. (स्फटिकघटिका) पाठभेदाप्रमाणे काही जण स्फटिकमण्यांची माळ (स्फटिकघुटिका/ स्फटिकगुलिका) असाही अर्थ करतात. तर एका हातात पुस्तक आहे.

आचार्य म्हणतात, माय तुझ्या ह्या अशा प्रसन्न रूपाचे  ध्यान करून, तुझ्या पावलांना फक्त एकदा (सकृत्) जरी नमस्कार केला तरी कृपाळूपणाने तू त्याला बृहस्पतीसारख्या सज्जन कवीश्वराजवळ असलेली अलौकिक वाणी देतेस. त्याचे शब्दलालित्य मनाला इतके मोहवून टाकते की त्याच्या मधुर्यापुढे दूध, मध, द्राक्षं ह्या सर्वांची रुचकर चव, जिभेला मोहीनी घालणारं माधुर्यही फिकं पडतं. माय तुझी कृपा कुठलीही अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य करून दाखवते. माझ्यावर कृपा कर.

*शरज्ज्योत्स्ना-शुद्धां शशियुत-जटाजूट-मुकुटां

वर-त्रास-त्राण-स्फटिक-घटिका-पुस्तक-कराम्

सकृन्न त्वां नत्वा कथमिव सतां सन्निदधते

मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः ।। ।। *  

( फणित – अनासायास घडणे)

*निरभ्रा आकाशी शरद-पुनवेच्या सुसमयी

प्रभा चंद्राची भूवर झरत आह्लादक अति  

तुझी कांती तैसी अमल विमला कोमल तशी

तुझ्या भक्तांच्या गे जननि हृदयासीच सुखवी ।। ५.

 

तुझ्या केसांच्या गे मउ मउ लडी सुंदर अशा

तयांची शोभे ही मुकुटसम गे केशरचना   

अलंकारी त्यासी हिमकरचि नक्षत्रपति हा

तुझ्या केसांमध्ये खुलुन दिसतो भूषणसमा ।। ५.२ 

 

कराने एका तू सहज वरमुद्रा धरियली

दुज्या हाताने तू नित अभयमुद्राच धरिसी 

धरी माला हाती धवल स्फटिकांचीच जननी /

(धरे हाती तूची स्फटिक कलशासी सुखमयी)

असे विद्येचे जे शुभ प्रतिक ते पुस्तक करी ।। ५.

 

तुझ्या ह्या रूपाचे जननि करिता ध्यान हृदयी

तुला भक्तीभावे नमन करता एक समयी

तया देसी ऐसी मधु मधुर वाणी सहजची

फिके त्याच्या शब्दांपुढति मध द्राक्षे दुध दही ।। ५.४ ।।

 

गमे संताच्या वा सुरगुरु मुखातून झरले

अशा शब्दांनी ते सुखविति जनांसी बहु भले 

कृपा भक्तांसी ही करिसि जननी वत्सलपणे

अशक्यासी तूची सहज करसी शक्य नित गे ।। ५.।।*

----------------------------

श्लोक 


 सुहृदहो! आपला हात धरून श्री आद्य शंकराचार्य आपल्याला त्रिपुरांबिकच्या मंदिराची शोभा दाखवत दाखवत थेट गर्भगृहात घेऊन आले आहेत. एखाद्या मौल्यवान रत्नावर पडलेला प्रकाश परावर्तित होताच, त्याच्या अनेक पैलूतून विखुरणर्‍या विविध रंगछटा नजरेला याव्यात त्याप्रमाणे ह्या मातेची विविध रूपं ते आपल्याला दाखवत आहेत. मागच्या म्हणजे 15 व्या श्लोकातील तिचं शरदातील चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे/ ज्योत्स्नेप्रमाणे शांत, सौम्य धवल, कांतिमान असं मनाला आह्लाद देणारं रूप आपण पाहिलं.

 आतपी म्हणजे सूर्य. बाल आतपी म्हणजे बाळपणीचा वा नुकता जन्मलेला सूर्य; म्हणजेच नुकता पूर्व क्षितिजावर उगवणारा सूर्य. सूर्योदयाच्यावेळी दिसणारा हा केशरी, लाल, पिवळा सूर्याचा गोळा सर्वांच्या मनाला प्रसन्न करतो. 15 व्या श्लोकात चंद्राप्रमाणे आह्लादक दिसणारी त्रिपुरांबिका ह्या सोळाव्या श्लोकात अरुणवर्णी मोठी प्रसन्न दिसत आहे. ह्या तिच्या प्रसन्न अरुणवर्णी रूपाचं नावच अरुणा आहे. ती सर्वैश्वर्यसंपन्न आहे. वामकेश्वर तंत्रामधे ‘‘अरुणाख्यां भगवतीमरुणाभां विचिन्तयेत्’’  असे वर्णन आहे. जे त्रिपुराम्बिकेचं एक रूप आहे. या अरुणा देवीला आठ हात असून पाश, अंकुश, धनुष्य-बाण,वरमुद्रा अभयमुद्रा, पुस्तक आणि स्फटिकांची माळ तिने हातांमधे धरली आहे. तिला तीन नेत्र आहेत आणि ती अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करत आहे.

 सूर्य उगवताच कमलवनातील सर्व कमळं फुलावीत त्याप्रमाणे ह्या त्रिपुरांबिकेचं/ अरुणाचं दर्शन झाल्यावर, ब्रह्मदेव, बृहस्पती, इंद्र अशा अत्यंत प्रतिभाशाली, बुद्धिमंतांची हृदयं, अंतःकरणरूपी कमलवनं आनंदानी डोलू लागली नाहीत तरच नवल!  जे कोणी सज्जन तुझ्या ह्या मंगलमयी अरुणवर्णी रूपाचं/ अरुणाचं ध्यान करतील त्यांना मोठमोठ्या विद्वान वा देवतांनाही रिझवेल अशी अलौकिक वाणी प्राप्त होते. (ये अरुणामेव भवतीं भजन्ते ते वाग्भिः सतां रञ्जनं विदधति।)

हे अरुणे! तुझ्या भक्ताच्या जिह्वेवर विरिञ्चि प्रेयसी म्हणजे ब्रह्मदेवाची प्रेयसी व पत्नी असलेली साक्षात सरस्वती नर्तन करत असते. आणि जणु काही ही सरस्वतीदेवीच तिच्या नव्या नव्या मधुरतम शृंगाररसाच्या तरंगांनी युक्त अशा वाणीच्या लालित्याने सज्जनांच्या मनाचे रंजन करत असते. हे माय तुझा महिमा इतका मोठा आहे की, एखादा मुका माणूसही अत्यंत प्रतिभासम्पन्न होतो.  ‘‘अमी’’ म्हणजे हे तुझी उपासना करणारे साधक मोठ्या विद्वानांनाही धन्य धन्य वाटेल अशा त्यांच्या सर्वगुणसम्पन्न भाषावैभवाने झळाळत असतात.

*कविन्द्राणां चेतः कमलवन-बालातप-रुचिं

भजन्ते ये सन्तःकतिचिदरुणामेव भवतीम् ?

विरिञ्चि-प्रेयस्यास्तरुण-तर-शृङ्गार लहरी-

गभीराभिर्वाग्भिर्विदधति सतां रञ्जनममी ।।  ।।*

 ( बालातप - बाल आतप – उगवतीचा सूर्य )

*जसा येता प्राचीवर अरुणवर्णी दिनपती

डुलू लागे मोदे उमलुनि कळ्या पद्मवनही

प्रभातीच्या सूर्यासम अरुणवर्णी मुख तसे

तुझे पाहोनीया सुरगुरु कवीन्द्रा सुख मिळे ।। .।।

 

सुकान्ति तेजस्वी बघुन अरुणा नाम तव हे

गमे साजेसे हे उचित तुजसी सार्थ बहु गे

तुझ्या ह्या रूपाचे करिति जन जे ध्यान कुणिही

विधात्याच्या पत्नीकडुन वरदानास मिळवी ।। . 

 

अहो वाग्देवीच्या मधुरतम वाणीतुन जशा

जणू शृंगाराच्या लहरि उमटाव्या तरलशा

तयांच्या वाणीचे बहु नवनवोन्मेषचि तसे

महा विद्वानांना बहु सुखविती नित्यचि उमे।।६.।।

 

महा संतोषाने खुलति डुलती सज्जन मनी

फुलावी जैसी का रुचिर कमळे पद्मवनिची

कृपेने मातेच्या सकल गमते शक्य जगती

अगे आलो माते तव सुत तला गे शरण मी।। ६. ।। *

----------------------------

श्लोक  


श्री त्रिपुरसुंदरीची निरनिराळी रूपे आपण पहात आहोत. कधी चंद्राप्रमाणे शीतल आह्लादक, तर कधी उगवत्या सू्र्याप्रमाणे अरुणा, तर श्लोक 17 मधे ती मातृकारूप आहे. मातृका म्हणजे अक्षर/वर्णसमूह. किंवा अ पासून क्ष पर्यंत संपूर्ण वर्णसमूहाच्या अधिष्ठात्री देवतांना मातृका म्हणतात. ह्यांनाच वाणीची निर्मिती करणार्‍या म्हणून ‘‘वाचां सवित्री’’ म्हणतात. सवित्री म्हणजे आई.  वाणीची आई म्हणजे हया मातृका आहेत.

आता ह्या मातृका कोणत्या ?

वर्ग - , , , , असे  16 स्वर

वर्ग (घशातून उच्चार/ कण्ठ्य) -   5 अक्षरे किंवा व्याकरणात स्पर्श असे म्हणतात

वर्ग ( जिभेने उच्चार)- 5 अक्षरे किंवा स्पर्श

वर्ग (तालव्य) -  5 अक्षरे किंवा स्पर्श

वर्ग (दन्त्य)-  5 अक्षरे किंवा स्पर्श

वर्ग (ओष्ठ्य)- 5 अक्षरे किंवा स्पर्श

वर्ग - 4 अक्षरे किंवा स्पर्श

वर्ग - क्ष  5 अक्षरे किंवा स्पर्श

अशी एकंदर 50 अक्षरे असलेले अ,क,च,ट,त,प हे वर्ग धरले . प्रत्येक वर्ण समूहाची एक अधिष्ठात्री देवता असते. त्यांना वाग्देवता किंवा मातृका  म्हणतात. त्यांची नावे वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमला इत्यादि आहेत. त्यांच्यासह 12 योगिनी, 4 शक्तिदेवता आहेत. ह्या सर्व मातृकांचा समावेश श्री चक्रात झालेलाच आहे. श्री चक्राची अधिष्ठात्री देवता आणि संपूर्ण मातृकांची (अक्षर आणि शब्द प्रपंचाची)  अधिष्ठात्री देवता श्री महात्रिपुरसुंदरी ही एकच आहे. याच अभिप्रायाने तंत्रशास्त्रात मातृकां वशिनीयुक्तां योगिनीभिः समन्विताम् । गन्धाद्याकर्षिणीयुक्तां संस्मरेत्त्रिपुराम्बिकाम् ।। या श्लोकाने मातृका आणि त्रिपुराम्बिका ह्या दोन्ही शब्दांनी  एकाच देवतेचा निर्देश केला आहे.

 प्रत्येक अक्षर हे देवतास्वरूप आहे. ह्या मातृकांची/ देवतांची अंगकांती विशाल अशा चंद्रकांत मण्याच्या/रत्नाच्याप्रमाणे शुभ्र आहे. विमल आहे. जणु शुभ्र प्रभेत निथळत आहे.

ह्या विविध अक्षररूपी 50 देवतासह संपूर्ण श्रीयंत्ररूपी श्रीमहात्रिपुरसुंदरीचं ध्यान केल्याने , मनात भक्तियुक्त अंतःकरणाने चिंतन केल्याने, ती व्यक्ती महान प्रतिभाशाली लेखकांप्रमाणे अत्यंत सुंदर रचना, काव्य करू शकते. जणु काही शारदाम्बेच्या मुखकमलातील सुगंध त्याच्या काव्याला लाभून त्याचे लिखाण अत्यंत लोकप्रिय होते.

* सवित्रीभिर्वाचां शशि-मणि-शिला-भङ्ग-रुचिभिः

वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः

कर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः

वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः ।।   ।।*

( अन्वय - हे जननि! वाचां सवित्रीभिः शशि-मणि-शिला भङ्ग-रुचिभिः वशिन्याद्याभि; सह त्वां यः सञ्चिन्तयति, सः महतां भङ्गिरुचिभिः वाग्देवी-कमला मोदमधुरैः वचोभिः काव्यानां कर्ता भवति । )

( सवित्री – माता. वाचां सवित्री – वाणीला निर्माण करणारी, मूळाक्षरांची अधिष्ठात्री तिला मातृका म्हणतात.  शशि-मणि - चंद्रकांत मणी. भङ्गि रुचिभिः  – वाग्विलासाने,  मधुर शब्दजालाने

*अहो वाग्शक्तीसी नित करिति साकार जगति

ते क्षा पर्यंता जे  वर्ण गट ची 

अधिष्ठात्री त्यांच्या असति वशिनी मोदिनी अशा

महादेवी रत्नासम नितळ शुद्धा धवल त्या ।।.।।

 

करे भक्तीने जो नमन तुज त्यांच्यासह सदा

तयाच्या काव्याची मधुमधुर गोडी अनुपमा 

जणू वाग्देवीचे मुखकमल उत्फुल्ल हसरे

सुगंधाने त्याच्या परिमलयुता काव्य तयिचे ।।७. ।।*

----------------------------

श्लोक १८

हे अरुणा! हे जगज्जननी!

सूर्य क्षितीजावर येतांना सूर्योदयाच्या थोडं आधीपासून प्राचीवर म्हणजे पूर्व दिशेला लाल, केशरी, पिवळा, सोनेरी अशा विविध रंगांचा जणु काही रंगोत्सव चालू होतो. पूर्वा त्या रंगात रंगून जाते. हे माय त्या बालसूर्याप्रमाणे (तरूण तरणि) तुझी अंगकांतीही देदिप्यमान आहे. तुझ्या ह्या सुकुमार, अत्यंत कोमल अशा तनुलतेच्या प्रभेत हा सर्व अंतरिक्षलोक/ स्वर्ग (दिवं) आणि सर्व पृथ्वी ( उर्वी) म्हणजेच हा भूलोक न्हाऊन निघत आहे. निथळत आहे. गुलाबी रंगात बुडून गेला आहे.

खरतर छाया म्हणजे सावली. `तुनुच्छाया’ म्हणजे देहाची सावली. पण आपण ``एखाद्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या `छत्रछाये’त सामान्य लोक कसे सुरक्षित असतात’’ असे म्हणतो त्याप्रमाणे ह्या मातेच्या देहाच्या सावलीत, कृपाछत्राखाली असलेला स्वर्ग असो वा भूलोक असो; तिच्या अत्यंत मनोरम अशा कृपावर्षावात नितांत मोहक दिसत आहे. तिच्या रंगात रंगून गेला आहे.

 (श्लोक 16, 17 मधे आपण त्रिपुराम्बिकेचा मुखचंद्रमा मोहक अरुणवर्णी आहे हे पाहिले आहे.) हे माय नेत्रांसमोर तुझ्या अशा अत्यंत रमणीय मुखाचे जो कोणी ध्यान करेल, त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्त्वही मोठं लोभस आणि आकर्षक होईल.  वनातील चंचल नेत्राच्या हरिणीप्रमाणे लाजाळू, विनयशील स्वभाव असलेल्या उर्वशीसह इतर किती किती अप्सरांनाही त्याचा मोह पडेल. (उर्वशी म्हणजे जी आपल्या रूपाने ऋषी, मुनी देवांनाही वश करते. सर्व लावण्यवतींची प्रातिनिधिक ह्या अर्थाने येथे हा शब्द आहे. त्यामळे मराठी भाषांतर करतांना वृत्तात बसण्यासाठी उर्वशी ऐवजी रंभा हे नाव घेतले आहे. )

*तनुच्छाया भिस्ते तरुण-तरणि-श्रीसरणिभिः

दिवं सर्वामुर्वीमरुणिमनि मग्नां स्मरति यः

भवन्त्यस्य त्रस्यद्वन-हरिण-शालीन-नयनाः

सहोर्वश्या वश्याः कति कति गीर्वाणगणिकाः ।। १८ ।।*

( तरणि – सूर्य, सूर्यकिरण, नाव. तरुणतर- बालस्वरूपातील. तनुच्छाया – अंगकांती. सरणिः / सरणी – प्रकार, पथ, मार्ग, क्रम , विधी. श्रीसरणी – शोभेचा प्रकार सर्वामुर्वीम्सर्वाम् उर्वीम्- सर्व पृथ्वी वा भूलोक. मग्न- बुडून जाणे, लीन होणे, लिप्त होणे. त्रस्त – भयभीत, चंचल. गीर्वाण-गणिका – देवस्त्रिया, अप्सरा कति कति – किती किती - कित्येक )

*गुलाबी तेजस्वी दिनकर दिसे पूर्व क्षितिजी

अपूर्वाई लोकां बहु असतसे बाल रविची

जसा येई प्राचीवर रवि तसा रंग तव हा

महा ऐश्वर्याने झळकत तुझा देह अरुणा ।। १८.१

 

प्रभा कैसी माते तव अरुणवर्णा पसरली

सदा आच्छादे ती सकल वसुधा स्वर्गपुरिसी

तुझ्या ह्या रूपाचे नर करिल जो चिंतन कुणी

पडे त्या भक्ताचा सकलचि जना मोह हृदयी ।। १८.२

 

जशा रानी कोणी फिरति हरिणी बावरुनिया

टपोर्‍या नेत्रीही भरुनचि असे चंचलपणा 

हरीणाक्षी तैशा इतर ललना स्वर्गपुरीच्या

तया पाठी जाती; जरि असति शालीन सकला ।। १८.३ *

----------------------------

श्लोक १९

 हे माय !  हे हरमहिषि !

हर म्हणजे भगवान श्री शंकर त्यांची तू महिषि म्हणजे पट्टराणी आहेस. तंत्रविद्या जाणणरे तंत्रज्ञ तुझे शरीर हे यंत्रस्वरूप वा बीजाक्षर स्वरूप मानतात. म्हणून तुझे बीजाक्षर ‘क्लीं’ अथवा ‘ र्‍हीं ’ अथवा केवळं ‘ ईं ’ हे बीज अक्षर  हे मंत्ररूप असे तुझे स्वरूप आहे; तसे तुझे आकृतीनेही मूर्तरूप म्हणजे दृश्य शरीर आहे. त्यालाच कामकला वा मन्मथकला म्हणतात. काम म्हणजे भगवान सदाशिव. ‘‘ काम्यते सर्वैः इति कामः ।’’ म्हणजे आपल्या सौभाग्य वा उन्नतसाठी सर्वांकडून ज्याची अपेक्षा केली जाते तो काम म्हणजे परमात्मा. ‘‘ ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।’’ ह्या गीतावचनाप्रमाणे परमात्म्याचे वास्तव्यस्थान हृदयच आहे. ह्या अभिप्रायाने ईश्वराला ‘‘हार्द’’ असेही महणतात.  म्हणून त्याची जी कला म्हणजे शक्ति ती कामकला वा हार्दकला म्हणतात. म्हणजे त्या परमशिवाची शक्ती आहे.

अथवा मन्मथकला अथवा कामकला म्हणजे सृजनशीलता. ( येथे कला हा व्यक्तिमत्त्वाचा पैलू ह्या अर्थी) शिवाच्या केवळ असण्याने प्रकृति कार्यरत होते. सर्वजण त्याची म्हणजे शिवाच्या कृपेची काम / कामना / इच्छा करतात. ( येथे काम म्हणजे संकल्प, इच्छा असा अर्थ धरून. `कामस्तदग्रे समवर्तत’  असे उपनिषदे म्हणतात.)

 ईं हे अक्षर जर त्या त्रिपुरसुंदरीचे शरीर असेल, मूर्तरूप दाखवणारी आकृती असेल तर ईं बीजात सर्वात वरती एक बिंदु आहे. हा बिंदु शुद्ध रविस्वरूप आहे. ‘‘रूयते स्तूयते इति रविः’’ म्हणजे सर्वांकडून जो स्तविला जातो तो परमात्मा शक्तिसह मुख्य बिदूच्या रूपाने सर्वात वर विराजमान आहे. हा बिंदु म्हणजे साधकाने महात्रिपुरसुंदरीचे मुख समजावे (मुखं बिंदुं कृत्वा)

त्याच्याखाली दोन बिंदु  आहेत ते अग्नितत्त्व व सोमतत्त्व ह्या स्वरूपाचे आहेत. अग्नि आणि सोम ह्या दोन तत्त्वांनी जगाचे पोषण होते. म्हणून अग्नि आणि सोम ही दोन तत्त्वे महात्रिपुरसुंदरीचे स्तन समजावेत. येथे स्तन हा शब्द कंठापासून नाभिस्थानापर्यंतचा भाग ह्या विस्तृत अर्थाने घेतला आहे.

ह्या दोन बिंदुंच्याखाली ‘‘ ह ’’ ह्या अक्षरातील खालच्या अर्ध्या भागाप्रमाणे दिसणारा भाग किंवा त्रिकोणामधे दिसणारा भाग त्रिपुरसुंदरीच्या नाभिस्थानापासून चरणकमलांपर्यंतचा भाग आहे अशी भावना केल्यास त्या भागाला मन्मथकला, हार्दकला, कामकला, योनी, प्रकृति वा या जगाचे मूळ कारण म्हटले आहे. तसेच  त्रिपुरसुंदरीचा जो बीजमंत्र ईं इत्याकारक अक्षरालाही कामकला असेच म्हणतात.कारण मंत्र आणि देवता दोन्ही एकरूपच आहेत.

अशा प्रकारे एका ईं ह्या अक्षरात संपूर्ण त्रिपुरसुंदरीचे रूप समाविष्ट झालेले आहे. आपल्या नजरेसमोर साकार केलेले आहे. (  सर्वात वरचा बिंदू – तिचा चेहरा ; खालील दोन बिंदू – कंठ ते कटिपर्यंतचा भाग ; ह ह्या अक्षरातील खालच्या   अर्धभागाप्रमाणे दिसणारा ईं ह्या अक्षराचा खालचा भाग- कटि ते चरण )

 अशा बीजमंत्राच्या रूपाने नटलेल्या तुझ्या मन्मथकलेचे, कामकलेचे ( कला म्हणजे शक्ति ) ध्यान करेल (यो ध्यायेत्)  (सः) म्हणजे तो भक्त त्या ईं बीजाच्या उपासनेने सर्व जगातील स्त्रियांना  आकृष्ट करून घेईल हे  तर काहीच

नाही. ही तर अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे. ( इत्यतिलघु- इति अति लघु ) तो आपल्या साधनेने सूर्यमंडल, चंद्रमंडल हे जिचे स्तन आहेत/ पोषणाची साधने आहेत, अशा त्या विश्वात्मक शक्तिला, त्या त्रिलोकरूप कामिनीलाही सत्वर (आशु) आपल्याकडे आकृष्ट करून घेईल. थोडक्यात, हे माय! ईं ह्या बीजाक्षराच्या रूपाने नटलेल्या तुझ्या स्वरूपाच्या ध्यानाचा महिमा इतका थोर आहे की, जो कोणी ह्याचे ध्यान करेल त्या भक्तावर सतत तुझी कृपा राहील. त्यावर सारे त्रैलोक्य मुग्ध होईल.

मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो

हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम्।

सद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु

त्रिलोकींमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तन-युगाम् ।। १९ ।।

( आशु – सत्वर. )

  ( अन्वय - हे हरमहिषि! मुखं बिन्दुं कृत्वा, तस्य अधः कुचयुगं कृत्वा, तदधः हरार्धं कृत्वा, यः ते मन्मथकलां ध्यायेत् सः विनिताः सद्यः संक्षोभं नयति इति अतिलघुः सः रवीन्दुस्तनयुगां त्रिलोकीं अपि आशु भ्रमयति ।)

अगे मंत्रज्ञानी तुज बघति `ईं’  अक्षररुपी

असे तेची माते तव स्वरुप ते मंत्रमय ची 

असे तेची माते स्वरुप तव गे आकृतिरुपी

अशा ह्या रूपाचे मुनि करिति ते ध्यानचि मनी ।। १९.१।।

 

ईं ह्या बीजाच्या वर रविरुपी बिंदुचि असे

जयासी सारेचि स्तविति परमात्मा म्हणुन ते 

 असे ते देवीचे मुखकमल आह्लादक असे

 असे खाली त्याच्या पुनरपि च दो बिंदुच सखे ।। १९.२।।

 

जगाला पोषी जे स्तनयुगल माते तवचि हे

अगे दो बिंदुंनी रविशशिरुपी दर्शविति ते

अहो अग्नि-सोमाचिच असति तत्त्वे जगति जी

गळा ते नाभी हे तव शरिर ते दर्शविति ती ।। १९.३।।

 

तयाखाली अर्धे दिसतचि ‘ह’ हे अक्षर भले

तुझी नाभीपासूनचि चरणपर्यंत तनु गे

त्रिकोणी आकारे दिसत तनुचा भाग तव हा

असे ईं बीजाने शरिर नटलेले तव उमा।। १९.४।।

 

करी सातत्याने सृजन नवनिर्माणचि सदा  

तुझ्या ह्या वैशिष्ठ्या जननि म्हणती  मन्मथकला

शिवाचे त्यासाठी जननि असणे केवळ पुरे

शिवाच्या अस्तित्वे प्रकृति प्रसवे विश्व सगळे  ।।१९.५।।

 

असे भक्तांसाठी शिव सुभग आत्मोन्नतिप्रदा

हृदी ध्यानाने त्या भजति मुनि त्या कांक्षति शिवा

अगे शंभूसी ‘हार्द’ म्हणति अथवा ‘काम’ चि असे

तयाच्या शक्तीसी म्हणतिच `कला’ हे जननि गे ।। १९.६।।

 

करे ईं बीजाचे जननि हृदि जो ध्यानचि सदा

स्त्रियांना सार्‍या तो नर करितसे मोहित मना

नसे हे काहीही; अखिल जग जी पोसत असे,

स्वस्तन्ये त्रैलोक्या रवि-शशिच ह्याची स्तनयुगे- ।। १९.७।।

 

जगाची शक्ती जी नियमन करे विश्व अखिला

त्रिलोकीरूपी तू त्वरित वश हो त्यास ललना ।

मिळे ऐसी सिद्धी जननि तव भक्तासच अशी

कृपा होई भक्तांवर त्वरित ऐसीच तव ही ।। १९. ।।

----------------------------

श्लोक – 


श्री महात्रिपुरसुंदरीच्या वगवेगळ्या रूपांचे दर्शन आपण मागील अनेक श्लोकात घेत आहोत. 20 व्या श्लोकात ह्या स्वयंप्रकाशी देदिप्यमान देवीच्या तेजस्वी कायेतून किरणशलाकांचे वा प्रकाशाचे झोत सर्वत्र पसरत आहेत.  असं म्हणतात की, चंद्र प्रकाशात शुभ्र असा चंद्रकातमणि पाझरून त्यातून अमृत झरु लागतं. जणु काही ह्या देवीचा देह हाच शुभ्र अशा चंद्रकात रत्नाची मूर्ती असून त्यातून किरणरुपी अमृत बाहेर पडत आहे. म्हणून तिला अमृतेश्वरी असे म्हणतात. जो भक्त त्याच्या हृदयात ह्या अमृतेश्वरी रूपाचं चितन करतो, ध्यान करतो तो गरुडराजाप्रमाणे सर्पांचाही नक्षा उतरवतो. नुसत्या त्याच्या दृष्टिक्षेपानेच सर्प घाबरून पळून जातात मग त्यांच्या चावण्याचे भय ते काय? एखाद्याला सर्प चावलाच तर अशा साधकाच्या अमृतमय दृष्टीची जणु सरिताच तो विषदंश दूर करते. तापाने फणफणणारा रोगीही साधकाच्या दृष्टीच्या अमृतसरितेने चिंब होऊन बरा होतो. अमृतेश्वरीच्या उपासनेचा हा केवढा प्रभाव! ह्या उपासनेने साधक हा गरूडासारखा प्रभावी होत असल्याने या साधनाला ‘‘गरूडध्यानयोग’’ असे तंत्रशास्त्रात नाव आहे.

*किरन्तीमङ्गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं

हृदित्वामाधत्ते हिमकर-शिलामूर्तिमिव यः

सर्पाणां दर्पँ शमयति शकुन्ताधिप इव

ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया ।।  ।।*

( ‘‘ हे जननि! किरणानि-कुरुम्बामृतरसं किरन्तीं हिमकर-शिलामूर्तिं इव यः त्वां हृदि आधत्ते सः शकुन्तधिपः इव सर्पाणां दर्पं शमयति, सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति च । ’’ )

( निकुरुम्बझुंड, संग्रह, पुंज. हिमकर – चंद्र, हिमकरशिलामूर्ति – चंद्रकातमण्याचीच जणु मूर्ति. सिराशरीरातील धमनी, नाडी, नलिकाकार वाहिका, वाहिका, पाट. प्लुष्टजाळला जाणारा. शकुन्त – पक्षी, शकुन्ताधिप – पक्ष्यांचा राजा गरूड )

*तुझ्या अंगातूनी शत शत धुमारे फुटति हे

प्रकाशाच्या लक्षावधि किरण-पुंजासमचि गे

तया ज्योत्स्नेच्या त्या निरुपम शलाकांमधुन गे

प्रकाशासंगे हे बरसत असे अमृत निके ।। ०.।।

 

सुधांशू ज्योत्स्नेच्या घवल किरणातून जणु ही

छबी ये आकारा जननि तव ही उज्ज्वल अशी

तुझी चंद्राकांता-मणिमयचि मूर्ती सुबकशी

धरे चित्ती जोची दृढ अढळ त्यासी न भयही ।। ०.।।

 

विषाचे सर्पांच्या भय गरुडराजास कसले

तसे सर्पांचे ना भयचि तव भक्तांस लव ते

सुधा-धारा खेळे धमनि-धमनीतून नित जी

तयाने दृष्टी हो जणुचि सरिता अमृतमयी ।। ०.३ ।।

 

महा तापानेही जरि फणफणे देह सगळा

ज्वराच्या पीडेने सकल शरिरा ये अवकळा

तुझ्या भक्ताने गे नजर नुसती ती फिरवता

तया दृष्टिक्षेपे त्वरित शमती ते ज्वर महा ।। .।। *

-----------------------------------------------------------

 

खालील लिंक्स वर क्लिक केल्यास ते श्लोक वाचता येतील.


श्लोक  21 – 41

श्लोक  42 - 60

श्लोक  61 – 80

श्लोक  81 – 100

No comments:

Post a Comment