**।। सौन्दर्यलहरी ।।**( विश्लेषण – श्लोक 42 –6 0 )

       **।। सौन्दर्यरी ।।**

( विश्लेषण – श्लोक 42 –6 0 )

श्लोक 


सुहृत्हो,

 41 श्लोकांपर्यंत आपण सौंदर्यलहरीचा पहिला भाग आनंदलहरी पाहिला. शिव आणि शक्ति चिदानन्दस्वरूप आहेत. शिव हा आनंदरूप आहे तर शक्तिला चित्शक्ति असं म्हणतात. पहिल्या 41 श्लोकांपर्यंत शिवतत्त्वाचं प्राधान्य असल्याने त्यांना आनंदलहरी म्हणून आपण पाहिलं. आता श्लोक 42 पासून शक्तितत्त्वाचं प्राधान्यानी वर्णन करणारे मोठे सुरेख श्लोक आहेत.

ह्या श्लोकात हिमगिरिसुता म्हणजे पार्वतीच्या मुकुटाचं सुंदर वर्णन आहे. हिम म्हणजे बर्फ, हिमगिरी म्हणजे हिमालय आणि त्याची सुता म्हणजे मुलगी.  म्हणजे पार्वती. 

आपण सूर्य नमस्कार घालताना सूर्याची जी १२ नावे घेतो त्यांना १२ आदित्य म्हटले जाते. हे बारा आदित्य/सूर्य ह्यांना  श्लोकात सुंदर शब्द वापरला आहे तो म्हणजे गगनमणि! म्हणजे आकाशातील रत्नेच जणु!  ह्या सर्व गगनमणिंचे जणुकाही रत्न,माणिक,मोती झाले आहेत. (गतैमाणिक्यत्वं – रत्न माणकांच्या पदाला पोचले आहेत. गेले आहेत).  हे आदित्यरूपी माणिक, मोती, रत्ने मुकुटाच्या वर असलेल्या गोल वर्तुळाकार नक्षीवर (नीडेय) अत्यंत दाटिवाटीने वर्तुळाकारात जडवली आहेत. शुद्ध सुवर्णाच्या मुकुटावर जडवलेली ही स्वतेजाने तळपणारी रत्ने पाहिल्यावर तुझ्या तेजस्वी मुकुटाबद्दल काय बोलावे?

(मित्रांनो, आपण कधी हिमालयात सूर्योदय पाहिला असेल, त्यावेळी  विविध रंगांनी तळपणारी हिमशिखरे पाहिली असतील, त्यातून परावर्तित होणारी रंगशलाकांची आतशबाजी पाहिली असेल तर पार्वतीच्या बारा आदित्यांची रत्ने जडविलेल्या सोनेरी मुकुटाची थोडी कल्पना करू शकता.)

 आचार्य म्हणतात, जो कोणी ह्या नगाधिराजतनया त्रिपुरसुंदरीच्या  मुकुटाचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त होईल, त्याची नजर तिच्या मुकुटावर शांत, सौम्य तेजाने तळपणार्‍या चंद्रकोरीकडे ( चन्द्रशकल. शकल म्हणजे तुकडा) जाईल. ह्या चंद्रकोरीवर ह्या विविध रत्नांचा पडलेला विविधरंगी प्रकाश पाहून ही शुभ्र कोर सप्तरंगात (शबल – विविध रंगी) निथळतांना पाहून क्षणभर ही चंद्रकोर नाहीच!---- हे तर सप्तरंगी इंद्रधनु  आहे  असा भास त्याला होईल.

गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिः सान्द्रघटितं

किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः ।

स नीडे यच्छायाच्छुरणशबलं चन्द्रशकलं

धनुः शौनासीरं किमिति न निबध्नाति धिषणाम् ।। ।।

( गगनमणिचंद्र, सूर्य ग्रह, तारे, नक्षत्र. सान्द्रदाटीवाटीने, खच्चून, भरगच्च. शबलरंगिबेरंगी, विविध रंगी. नीडेय- मुकुटाच्या वर्तुळाकारात बसवलेली रत्ने. असिरः किरण, बाण. चंद्रशकल - चंद्रकोर  धिषणा – स्तुती, भाषण, बुद्धि. शौनासीर – इंद्र. धनुः शौनासीरं - इंद्रधनुष्य )

सुवर्णाचा शोभे मुकुट तव बावन्नच कशी

तया वर्णु जाता मजजवळ शब्दासच कमी 

शशी सूर्याचे हे गगनमणि रत्ने बनवुनी

किरीटी दाटीने जडवुन बने नक्षि समुची ।। .१ ।।

 

कशा गोलाकारी चमकतिच रत्नावलि अहा!

किती नाना रत्ने अनुपम असे रंग तयिचा 

प्रभा रत्नांची ही बहु रुचिर रंगीत पडता

सुलेखा चंद्राची तव शिरि दिसे इंद्रधनु का ।। .२ ।।

 

बघे जो जो त्यासी अनुपम दिसे ही शशिकला

असे हे इंद्राचे धनुष मति सांगेच तयिला ।। .।।

--------------------------

श्लोक ३-


सुहृत्हो, श्लोकाचा सुंदरसा अर्थ सांगण्यापूर्वी थोडासा वेगळा प्रसंग सांगायचा मोह आवरत नाहीए. पण तो प्रसंग विषयान्तर नसून आपल्या सर्वांना श्लोकाच्या जास्त जवळ नेईल असे मला वाटते.

कंबोडियन अंकोर एअरलाइन्स किंवा इंडोनेशियन गरुडा एअरलाइन्स च्या एका जाहिरातीमधे (आता नक्की आठवत नाही.) त्यांच्या देशातील सुखसोयी दाखवून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तेथील सुंदर सुंदर फोटो जसे दाखवले होते; तसा एका तरुणीचा सुंदर केश कलाप दाखवतांना केसांच्या जागी नुसती विविध फुलंच दाखवली होती. तिचा तो पुष्पमय केशकलाप डोळ्यांनी क्लिक करून मनाच्या कप्यात सुरक्षित ठेवत असतांनाच त्यातील कमळांचा सुगंध मला थेट आचार्यांच्या सौंदर्यलहरींच्या तरंगांवरील 43व्या तरंगलहरींकडे घेऊन आला.

तो फुलांनी सजलेला---- नाही नाही---! नुसता पुष्पमय केशकलाप आठवताच माझे डोळे सौन्दर्यलहरींच्या 43 व्या श्लोकावर खिळतात. आपण म्हणतो, ``सूतावरून स्वर्गाला जाणं’’ पण केसाची शिडी करून मुक्तीच्या गावाला नेणारा हा श्लोक मनातून जाणं अवघड.

गोफणीसोबत गोल गोल फिरणारा दगड फिरता फिरता वेग घेत कधी सुटून आकाशाचा वेध घेत जातो त्याप्रमाणे सुंदर मखमली केसांमधे गुंतत जाणारं मन कधी सर्व आकर्षण सोडून सहजपणे मुक्तीच्या विशाल आकाशात निसटून जातं तेच कळत नाही. एका गोलाकार वर्तुळात फिरणारा दगड बघता बघता त्या गोलाच्या एकबिंदूस्पर्शरेषेतून (tangent) कधी कसा निसटून जातो हे कळू नये त्याप्रमाणे विषयांपाशी आसक्त मन कधीच सर्व सोडून एका क्षणस्पर्शात वैराग्याच्या, मुक्तीच्या जगात प्रवेश करतांनाचा प्रवास हा ज्याचा त्याने अनुभवावा लागतो.

 श्री आद्य शंकराचार्य जगन्माता त्रिपुरसुंदरीच्या कमनीयतेचं वर्णन करतांना सहज तिच्या घनदाट केसांवर स्थिरावतात. वळणं वळणं घेत जाणारं (meandering) सुंदर नदीच पात्र निळ्या कमळांनी फुलून गेल्यावर तिच्यातील पाणी, प्रवाह काहीही न दिसता नुसती नीलकमले दिसत रहावीत त्याप्रमाणे त्रिपुरसुंदरीच्या मऊ रेशमी केसांच्या लडी म्हणजे नीलकमलांचं इंदिवर श्याम (इंदीवर म्हणजे निळं कमळ ) असं जणु नलिनीबनच! जिथे बघावं तिथे पूर्ण उमललेली, काही अस्फुट तर काही कळ्या अशी नील कमलांची दाटी झालेली.  ह्या नलिनीबनासोबत त्याचा परिमलही प्रवाहित झालेला! नीलकमलांची सुगंधित नदी संथ वाहत असावी असा हा सुंगधित घनदाट केश कलाप पाहून आद्य शंकराचार्य म्हणतात,

``माय, माझ्या मनात मात्र अज्ञानाचा घनदाट अंधार भरला आहे. तुझी ही काळीभोर वेणी, --- तुझा हा नील कमलांचा सुगंधी केशकलाप तो मात्र माझ्या मनातील घनतम अंधाराचा नाश करू शकेल. तुझे केस अत्यंत स्निग्ध, मृदु, मुलायम, चमकदार आहेत. माझ्या जरठ झालेल्या मनाला त्याचा जरासा जरी स्निग्धांश लाभला, कोमलपण लाभलं, त्याची चमक लाभली तर नक्कीच माझं मन उजळून जाईल. कोंदाटलेल्या माझ्या मनात तुझ्या केसांचा परिमळ कोपर्‍या कोपर्‍यातून फिरला तर माझ्या मनातील कुबट दुर्विचारांचा वास निघून जाईल.

तुझ्या केसांच्या सुगंधाचं तर काय वर्णन करावं? असा अलौकिक सुगंध आजपर्यंत कोणी अनुभवला नसेल. त्या सुगंधाचा मन मोहवून टाकणारा ताजेपणा पाहिल्यावर कल्पवृक्षाच्या फुलांना सुद्धा स्वतःची लाज वाटली असावी म्हणून की काय इन्द्राच्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या सुंदर सुगंधी फुलांनीही नंदनवन सोडून दिले आहे. तुझ्या केशकलापाचा एक अंशभर जरी सुगंध मिळाला तरी आमचे जीवन धन्य होईल असा विचार करून त्यांनी तुझ्या केशकलापाचा आश्रय घेतला आहे. अशा असंख्य स्वर्गीय फुलांनी, कल्पसुमाच्या घोसांनी, नंदनवनातील कल्पलतेच्या कुसुम-तुर्‍यांनी, फुलांच्या लोंगरांनी, पुष्प गुच्छांनी तुझ्या केसांवर गर्दी केली आहे.

माय! अगं, कल्पतरु माणसाच्या मनातील सार्‍या इच्छा पूर्ण करतो. येथे तर तुझ्या केसांच्या मृदुल लडी कल्पसुमांचंही  इप्सित पूर्ण  करत आहेत. तुझा हा केशकलाप कल्पतरुचाही कल्पतरु आहे; मग माझ्या मनातील आस तो कशी बरं पूर्ण करणार नाही? माझ्या मनातील घनदाट अज्ञान दूर होऊन तेथे ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी, माय! मला हवं असलेलं ज्ञान मिळण्यासाठी तुझ्या केशकलापाच्या ब्रह्मज्ञानरूपी सुगंधाचा अंशही पुरे. माझं मन सुमनही तुझ्या ह्या मोहक केश लडींमधे माळलं जाओ. तेथेच गुंतून राहो.

धुनोतु ध्वान्तं नस्तुलित-दलितेन्दीवरवनं

घन-स्निग्धं श्लक्ष्णं चिकुर-निकुरुम्बं तव शिवे ।

यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो

वसन्त्यस्मिन्मन्ये वल-मथन-वाटी-विटपिनाम् ।। ।। 

 ( धुनोतु – धुवून टाको. ध्वान्त – अंधार. नः – आमचा. तुलित- उपमा दिलेला, तुलना केलेला. दलित- पूर्ण उमललेला, पूर्ण पसरलेला. इन्दिवर – नीलकमल. श्लक्ष्णम्मृदु, कोमल, स्निग्ध, सौम्य, चमकदार. चिकुरकेस.  निकुरुम्बकेस, केशकलाप. वलमथनइंद्र. वाटी – उद्यान, उपवन.  विटप/ विटपिन् – झाडे, फांद्या, झाडांचा विस्तार )

लडी ह्या केसांच्या सघनचि मऊ दाट कुरळ्या

बघोनी वाटे गे फुललि कमळे नील बहुला । 

फिरे दृष्टी मोदे गहन जणु इंदीवर वनी

कळ्या पुष्पे जेथे फुलति किति दाटीतच निळी ।।  ४. १ ।। 

 

जणू गुंफीली का सघन तव वेणी सुबकशी

तुर्‍यांनी गुच्छांनी सकल सुमनांनी मिळुन ही । 

जलौघाने जाई भरुन सरिता घेत वळणे

तशी ही वेणी गे परिमल फुलांनीच बहरे ।।  ४.।। 

 

 

भरे अज्ञानाचा घन तिमिर चित्तीच अमुच्या

तुझ्या हया केसांनी त्वरित विरु दे तो तम महा । 

तुझ्या ह्या केसांचा परिमल सुगंधी दरवळे

सुगंधाची त्या गे नचचि तुलना हो कधि शिवे ।।  ४.३ ।। 

 

 म्हणोनी इंद्राच्या सुखद बगिचातील कुसुमे

तयांमध्येही ती सुविमलचि कल्पद्रुम-फुले ।  

तुझ्या ह्या केसांचा लव मिळविण्या सौरभ शिवे

फुलांच्या घोसांनी सजवितिच वेणी तव उमे ।।  ४.।। 

--------------------------

श्लोक   –


सरळ, लांबवर जाणारा, बारीक भांग घनदाट केस दर्शविणारा असतो. सौंदर्याचं लक्षणही असतो. (केस विरळ झाले की भांगही फाटतो किंवा जाड रेघेप्रमाणे दिसतो.) त्रिपुरसुंदरीचा असा सुंदर, सरळ, लांब, बारीक भांग बघून आचार्य म्हणतात, ‘‘ माय! तुझा हा आखीव, रेखीव सुंदरसा भांग म्हणजे, तुझ्या ह्या सुंदर अशा चेहर्‍याच्या सौंदर्यलहरी; वा तुझ्या मुखकमलातून निर्माण होणार्‍या लावण्ययुक्त लहरींचा पुढे पुढे धावणारा प्रवाह आहे.’’ सरणि म्हणजे पथ, मार्ग सीमन्त म्हणजे सीमारेषा अथवा भांगांची रेषा. (सौभाग्याचे लक्षण म्हणून भांगात सिंदूर भरण्याची पद्धत काही ठिकाणी प्रचलित आहे. म्हणून) आचार्य म्हणतात, ‘‘ही सीमन्तसरणि म्हणजे तुझा भांग पाहून असं वाटत आहे की उगवत्या सू्र्याच्या आरक्त किरणांचा समुहच जणु काही तुझ्या ह्या भांगात तू माळला आहेस.’’

‘‘माय तुझे हे घनदाट केस त्या घनदाट अंधाराप्रमाणे काळेभोर आहेत. सूर्य अंधाराचा नाश करतो म्हणून अंधाराला कायमच सूर्याची भीती वाटते. सूर्य किरण आपला नाश करतील म्हणून अंधार कायम सूर्याला आपला शत्रू मानतो. मला वाटते माय, तुझ्या केसांना अशी भीती वाटत असावी की, हे भांगातून जाणारे सूर्यकिरण आपल्याला आपल्या काळ्या (कबरी) रंगामुळे अंधार तर समजणार नाहीत ना? म्हणून तुझ्या ह्या केसांनी सूर्यकिरणांच्या समूहाला जणूकाही दोन्ही बाजूंनी बदिस्त करून टाकले आहे. (सीमन्त चा अर्थ भांग आणि सीमित करणे ) ह्या काळ्या केसांनी त्या सूर्य किरणांची सीमा तुझ्या भांगापुरतीच मर्यादित ठेवली आहे.

माय असा तुझा सुंदर भांग आमचे रक्षण करो. (दुर्विचार, दुर्बुद्धी, दुराचार ह्या सर्वांपासून आम्हाला परावृत्त करो.)

*तनोतु क्षेमं नस्तव वदन-सौदर्यलहरी-

परीवाहः स्त्रोतःसरणिरिव सीमन्तसरणिः ।

वहन्ती सिन्दूरं प्रबल-कबरी-भार-तिमिर-

द्विषां वृन्दैर्बन्दीकृतमिव नवीनार्ककिरणम् ।। ४  ।।*

 ( नः क्षेमं तनतु - आमचे कल्याण करो. सरणि -मार्ग. सीमन्तसरणि – भांग. परीवाहः – वाहणारा. स्त्रोत – पाट, निर्झर. द्विषांवृदैः – द्वेष करणार्‍यांनी अथवा शत्रू समुहाने. बन्दिकृत – बंधक, बंदी बनवलेले. नवीनार्क – नवीन अर्क – नुकता उदयाला येणारा सूर्य.  )

*तुझ्या भांगाने हे मृदुल कुरळे केस तव हे

 विभागूनी केला जणु सरळ सौभाग्यपथ गे

तुझ्या लावण्याचा खळखळत तो निर्झर सुखे  

जणू जातो वाटे पुढति पुढती रम्य गतिने ।। . १।।  

 

पहाटे सूर्याच्या किरण-निकरांनी सजवुनी

जणू सिंदूराची उमटलिच लेखा सरळ ही  

नभी भानू येता सकल तम जाईच विलया

म्हणोनी का भ्याले घनतमसमा केश विपुला ।। .।।

 

अहो ह्या भांगाचे किरणमय आरक्तपण हे

बघोनी केसांच्या मनि उपजले का भय असे  

करी दो बाजूंनी अरुणपथ बंदिस्त पुरते

तुझे काळे काळे घनतम-समा केश कुरळे ।। .।।

 

अगे सूर्याच्या ह्या किरण-निकराच्या सम असा

सुदीर्घा आरक्ता सरळ तव हा भांग सुखदा  । 

मनोहारी वाटे जननि तव भक्तांस सकला

करो कल्याणासी जन-जननि गे नित्य अमुच्या ।।.।। *

--------------------------------------

श्लोक 


सुहृदहो,

 सौन्दर्यलहरी म्हणजे श्लोक 42 पासून त्रिपुरसुन्दरीचं अत्यंत सुंदर वर्णन आपण बघत आहोत. कधी तिच्या चमचमणार्‍या तेजस्वी मुकुटाचं तर कधी तिच्या भांगाचं!

तिच्या मऊ मऊ दाट रेशमी कुरळ्या (अराल) केसांच्या लडी वार्‍यामुळे तिच्या चेहर्‍याभोवती उडतांना पाहून आचार्य म्हणतात, माय तुझा चेहरा नुकत्या उमललेल्या कमळासारखा ताजा, टवटवीत, प्रफुल्लित, अत्यंत सुंदर आहे. त्यावर येणार्‍या तुझ्या केसांच्या लाडिक बटा पाहून मला तर असं वाटतय की, भुंग्यांच्या शिशुंनी तुझ्या चेहर्‍याला कमळ समजून मध मिळविण्यासाठी तुझ्या मुखकमलावर दाटी केली आहे. (भुंगे काळे असतातच पण शिशुंची कांती अजून चमकदार असते. त्रिपुरसुंदरीचे केस काळेभोरही आहेत आणि चमकदारही आहेत.) अत्यंत प्रसन्न अशा तुझ्या चेहर्‍यावर मंद स्मित उमटलं आहे. स्मितामुळे तुझे ओठ किंचित विलग होण्यामुळे एकसारखी असलेली दंतपक्ती मोत्यांप्रमाणे चमकत असताना, ते कमळतील केसरांप्रमाणे दिसत आहे. असे हे तुझे मुखकमल अत्यंत मनोहर दिसत आहे. तुझ्या ह्या मुखकमलावर लोलुप होऊन त्याचा आस्वाद घेणारे शंकरांच्या (स्मरदहन) नेत्रांचे भृंग मुखकमलाचा मध  आणि सुगंध मिळवून अत्यंत आनंदित होत आहेत.

 माय असं तुझं हे सुंदर मुखकमल आमचंही  कल्याण करो.

*अरालैः स्वाभाव्यादलि-कलभ-सश्रीभिरलकैः

परीतं ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिम्।

दरस्मेरे यस्मिन्दशनरुचिकिञ्जल्करुचिरे

सुगन्धौ माद्यन्ति स्मर-दहन-चक्षुर्मधुलिहः ।। ।।*

 ( अराल – कुरळे. कलभ -  पिलु. अलि- भुंगा. अलिकलभ- भुंग्यांची छोटी पिल्ले. अलक – केसांच्या बटा. परीत –वेढलेलं. वक्त्र – मुख. परिहसति – चेष्टा करतात. उपहास करतात. पङ्केरुह – कमळ. स्मेर – मंद हास्य. दशन- दात. किञ्जल – कमळाचे फूल. स्मरदहन – मदनाला जाळणारा म्हणजे शंकर. मधुलिह - लोलुप)

*तुझ्या काळ्या काळ्या जननि कुरळ्या केश लडि ह्या

पुढे येती कैशा फिरुन मुखपद्मावर तुझ्या 

मला वाटे जैसे भ्रमर-शिशु हे गुंजन करी

सरोजाहूनी ह्या सुखद मुखपद्मावर किती ।। .।। 

 

जरासे होता गे विलग तव हे ओठ जननी

करीता थोडेसे स्मित; चमकती दात तवही

जणू पद्माचे ते विमल दिसती केसर किती

मुखाची शोभा ही अनुपम दिसे माय जननी ।। ५.२ ।।* 

 

शिवाच्या नेत्रांचे भ्रमर फिरती ह्या तव मुखी

सुगंधासाठी वा अधर-मधुपानास्तव किती

शिवाच्या नेत्रांसी सुखवित असे जे मुख तुझे

करो कल्याणासी जननि अमुच्या गे सतत हे ।। ५ .३ ।। *

-------------------------------------

 श्लोक ६-


मित्रांनो,

आपण त्रिपुरसुंदरीच्या मुकुटाचं वर्णन ऐकलं. तिच्या भांगाचं सुंदर वर्णन ऐकलं. तिच्या सुंदर काळ्याभोर, मऊ मुलायम रेशमाच्या लडींप्रमाणे असलेल्या केसांचा स्निग्ध स्पर्श अनुभवला. आज तिच्या भव्य भाळाचं सौंदर्य अनुभवु या.

कोणाही व्यक्तीची भव्य कपाळपट्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव आणणारी असते. तारुण्यात ह्या भालप्रदेशाला आगळेवेगळे तेज असते.  तेजस्वी असूनही ज्यांच्या तेजाची प्रखरता तापदायक नाही  म्हणजे ‘‘मार्तंड जे तापहीन’’ अशा व्यक्ती अभावानेच पहायला मिळतात. सहाजिकच चंद्राची शीतलता आणि मोत्यासारखा प्रकाश देणारी व्यक्तिमत्त्वे हृदयाला आह्लाद देणारी असतात.  चंद्राची प्रतिपदेची सुलेखा असो वा पौर्णिमेचा चंद्र असो सारखेच आह्लादक असतात. उत्तम मोत्यांचे तेजही नेत्रांना सुखदायक असते. मोत्यांच्या तेजाला लावण्य म्हणतात. आचार्य म्हणतात, ‘‘ माते तुझा भालप्रदेश विशाल, नितळ, मोत्यांच्या तेजासारखाच सुंदर , तेजस्वी, लावण्यसम्पन्न आहे. तुझ्या मुकुटात असलेला चंद्र आणि तुझा भालप्रदेश ह्यांचा मोत्यासारखा रंग, कांति, तेजस्विता इतकी सारखी आहे की मला तर तुझ्याकडे पाहून एकाच चंद्राची ही दोन शकलं/ तुकडे बघावेत असं वाटतय. तुझ्या मुकुटावर शोभणार्‍या चंद्राचा तुकडा पाहिला तर त्याची दोन्ही टोक वरच्या बाजूला आहेत तर तुझ्या भालप्रदेशाच्या चांदव्याची दोन्ही टोकं ही खालच्या दिशेला तोंड करून आहेत. हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून असलेले दोन तेजस्वी तुकडे जर समोरासमोर आणून एकमेकांकडे टोकं करून व्यवस्थित जोडले तर, त्यांचे आकारही एकसारखेच पण एकमेकांना पूरक असल्याने चुन्याने एकमेकात बसवले तर तो जोड लक्षातही येणार नाही आणि एक पूर्ण चंद्र तयार होईल. मला वाटतं, हा पौर्णिमेचा चंद्र असाच तयार होत असावा इतके तुझ्या भालप्रदेशात आणि चंद्रात रंग, तेजस्विता, विमलता ह्या सर्व गोष्टींमधे साधर्म्य आहे. सुधालेप म्हणजे चुना. पूर्वी हा चुना बनवितांना त्यात मध, शिपल्यांची पूड इत्यादि अनेक पदार्थ घालून  तोही चंद्राच्या तेजाची बरोबरी करू शकेल  असा चमकदार होत असे. बहुतेक वेळेला जुन्या प्रासादांच्या गिलावा केलेल्या भिंती आजही चमकदार दिसतात, त्याचे तेच कारण असावे. जोड पक्का असला तरी त्यातील डिंक म्हणा किंवा जोडणारा पदार्थ दोन तुकड्यांच्यामधे विजोड दिसतो.  येथे शिंपल्यांचे तेज, चंद्राचे तेज आणि त्रिपुरसुंदरीच्या भाळाचे तेज, कांती, रंग ह्यांच्यामधे पूर्ण साम्य आहे. वरवर दिसण्यात जसे हे सारखे आहेत तसे गुणांमधेही आहे. चंद्र अमृतकिरणे बरसवत असतो. आणि मातेच्या भालप्रदेशाचे गुणवर्णन अजून काय करावे? तो तर सुधामयीच आहे.

*ललाटं लावण्य-द्युति-विमलमाभाति तव यद्-

द्वितीयं तन्मन्ये मुकुटघटितं चन्द्रशकलम् ।

विपर्यासन्यासादुभयमपि सम्भूयच मिथः

सुधालेप-स्यूतिः परिणमति राका-हिमकरः ।। ६।।*

(द्युति  - तेज . सुधालेप – चुना. स्यूतिः –टाका घालून शिवणे, जोडणे. विपर्यास – उलटे. न्यास – ठेवणे, एखाद्या अवयवाचं आरोपण करणे. उभय – दोघे.  परिणमति – रुपांतरीत होणे. मिथस् – एकत्र येणे, सहकारी बनणे, एकरूप होणे. राका- पौर्णिमा. हिमकर – चंद्र. राका-हिमकरः – पौर्णिमेचा शीतल चंदणं देणारा चंद्र )

*तुझ्या लावण्याची पसरलि प्रभा शुभ्र विमला

कपाळासी मोत्यासम चमक आह्लादक अहा 

शिरी चंद्राची ही धवल चमके कोर बघुनी

मला वाटे माते शशि-शकल हे दोन दिसती ।। . १।।

 

किरीटी चंद्राचे शकलचि असे एक, तुझिया

तयाखाली शोभे शकलचि ललाटस्वरुप गा 

शिरीच्या चंद्राची दिसती वर टोके सुबकशी

करी खाली टोके हिमकर ललाटस्वरुपची ।। .२  ।।

 

मुखे त्या दोघांची करुनिच समोरी निगुतिने

चुन्याने सांधूनी सुबकरितिने दोन शकले 

घडे गोलाकारी सुखकरचि हा पूर्ण शशि गे

दिसे जो आकाशी तळपत असे अमृतकरे ।। .३ ।।

 

ललाटाचे ऐसे सुखद तव लावण्य सुखवी

तुझ्या भक्तांसी गे; नमन करती ते तव पदी ।।.।।*

-----------------------------------

श्लोक ४७ -

 माता पार्वतीच्या सौंदर्याचं वर्णन करावं ते आद्य शंकराचार्यांनीच!  पार्वतीच्या कमनीय भुवयांचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात, ‘‘त्या जितेंद्रिय, विश्वनाथ विश्वेश्वर शंकराबरोबर युद्ध करायचं तर त्या दुबळ्या मदनाकडे होतच काय? फुलांचं धनुष्य! फुलांचेच बाण!! भुंग्यांची न सांधली जाणारी धनुष्याची दोरी! ह्या असल्या कुचकामी साधनांनी तो काय साधणार?   त्या वीरवर बलशाली विश्वनाथाशी लढाई काय करणार? पण काही वेळा जे शक्तीने साध्य होत नाही ते युक्तीने साधता येतं.

शंकराला जिंकायचच तर मदनानी दुसरी युक्ती योजली. माते! त्याने तुझ्या कमानदार भुवयाचं धनुष्य हाती धरलं. तुझ्या काळ्याभोर नेत्रांची दोरी त्याला बांधली. तुझ्या नजरेचा अचूक बाण त्याला लावला आणि तुझ्या भुवईचं धनुष्य ताणून तुझ्या नजरेचा बाण सोडताच शिवही सपशेल पराभूत झाले.’’

सप्तशतीतही देवीच्या सुंदर कमानदार भुवयांचं वर्णन आहे. पण ही भुवई नुसती वर उचलली तर काय होईल ह्याची ही एक सुंदर चुणुक आपल्याला सप्तशतीतही पहायला मिळते.

शोभेचि मंदस्मित लोभस हे तुझेची

 चंद्रासमा मुख तुझे सुखवी जगासी।

कोपे कसा नच कळे बघुनी तयासी

 उन्मत्त दुष्ट महिषासुर दैत्य पापी।।12.1

 

कैसा प्रहार करण्या धजलाच तोची

 पाहूनही वदन निर्मळ हे तुझेची

ही गोष्ट अद्भुत गमे न पटे मनासी ।

 त्याहून अद्भुत परी पुढची कहाणी।।12.2

 

आह्लाददायक तुझा मुखचंद्रमा हा

बिंबाकृती शशिसमा उदयाचलीच्या ।

पाहून दैत्य महिषासुर मातला हा

येऊन क्रोध तुजला बहु लाल होता --- ।। 12.3

 

क्रोधे तुझी चढविता भुवईच तू ही

 कैसा न दुष्ट महिषासुर प्राण त्यागी

जेंव्हा कृतांत अति क्रोधित ये समोरी

 राहील का कधि जिवंतचि जीव कोणी ।।13.1

 अशा ह्या पार्वतीच्या नेत्रांचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात, माय! तुझ्या नयन धनुच्या मध्यभागी, रेखीव भुवयांच्या मधे (जिथे केस नसतात ) डाव्या हातानी मदनाने हे धनुष्य मुठीत पकडल्यामुळे ह्या नेत्रधनूचा मध्यभाग म्हणजेच जिथे आज्ञाचक्र स्थित आहे, ते तुझं अंतर्मन लोकाना दिसत नाही. कळत नाही. हे माय तुला संपूर्ण जाणून घेणं हे कोणालाच शक्य नाही. मधे असलेला अनंगाचा कामरूपी हात, म्हणजेच जणु लोकांच्या मनातील वासना तुझ्यापर्यंत, तुझ्या अंतर्मनापर्यंत कोणाला पोचू देत नाहीत.

*भ्रुवौ भुग्ने किञ्चिद्भुवनभयभङ्गव्यसनिनि

त्वदीये नेत्राभ्यां मधुकररुचिभ्यां धृतगुणम् ।

धनुर्मन्ये सव्येतरकरगृहीतं रतिपतेः

प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमुमे ।।  ।।*

( भुग्नबाकदार, कमानदार. भुवनभयभङ्गव्यसनिन् – त्रिभुवनाचे भय दूर करण्याच्या कामाचं जणु काही सवयच जडलेली. प्रकोष्ठ कोपर.)

( मदनाची नावे  - अनंग, कंदर्प, काम, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर. )

करावे त्रैलोक्या भयरहित हा छंद जडला

तुला माते ऐसा जगत-उपकारास्तव भला

मुठीमध्ये ठेऊ जगत मम धाकात सगळे

अशा ह्या दैत्यांचे भिववितिच संकल्प मनिचे ।। .१ ।।

 

भिती ज्यांची वाटे सुरवर मुनींसी नित हृदी

जिरे त्यांची मस्ती लव उचलिता तू भुवइसी

धनुष्याकारी ह्या तव असति रेखीव भुवया

अनंगाचे जाई सुमनधनु जे व्यर्थ न कदा ।। .।।

 

असा आहे माते तवचि भुवयांचाच महिमा

खलांना ठेवाया वठणिवर त्या अंकुशसमा

तयांच्या सौंदर्या नचचि उपमा सुंदर दुजी

शिवाला जिंकाया भृकुटि धनु योजी मदन ही ।। .३ ।।

 

न ये कामी त्याचे कुसुमधनु ते शंभु पुढती

न चाले पुष्पांचा मृदुल शर या शंभुवरती

धनुष्याची दोरी भ्रमरमय ती काम न करी

तुझ्या नेत्रांचा का मदन म्हणुनी आश्रय धरी ।। .४ ।।

 

अगे काळे काळे नयन भ्रमरांच्यासम तुझे

 करे त्याची दोरी जय मिळविण्या तो मदन गे

धरे डाव्या हाती भृकुटि धनु ताणून सुभगे

दुजी युक्ती नाही जय मिळविण्या शंभुवर गे ।। .।।

 

धनुष्याच्या मध्या मदन कर आच्छादित करे

मुठीने झाके जो नयनधनुचा भागचि उमे

 तुझ्या भ्रू मध्यासी बघु न शकती हे जन कधी

कळेना लोकांसी जननि तव अंतर्मन कधी ।। .।।

 

मनोजाच्या योगे हृदि उपजता कामचि असा

दिसावे कैसे ते जननि तव अंतर्मन जना ।। .।। *

-------------------------------------

 

श्लोक  –

हे विश्वरूप माय! तुझा उजवा नेत्र सूर्यस्वरूप आहे. तो उघडता दिवस निर्माण होतो. तर डावा नयन हा चंद्रस्वरूप असल्याने तो उघडता रात्र निर्माण होते. तुझा तिसरा डोळा हा अग्नीस्वरूप आहे. तो एखाद्या सुवर्ण कमळाची कळी किंचित उमलावी त्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी दिसत आहे.  तुझा हा चक्षु तिन्ही सांजा म्हणजे तीन सन्धिकाळ तयार करतो.  हे तीन सन्धिकाळ  खालीलप्रमाणे-

) सकाळ आणि दुपार ह्यांचा मिलनकाळ ,  (मध्याह्न)

) दुपार आणि रात्र वा ह्यांचा मिलनकाळ (संध्याकाळ)

) रात्र आणि सकाळ ह्यांचा मिलन काळ. (पहाट/उषःकाल)

ह्या तिन्ही संधिकाळाला मिळून मराठीत तिन्हीसांजा म्हणण्याची पद्धत आहे.

 सूर्य उगवताच आपण झोपेतून जागे होतो. आपली दिवसभराची कामे करायला सुरवात करतो. सूर्याचा प्रकाश आपल्याला कार्याला प्रवृत्त करतो. तर चंद्र शीतलता प्रदान करतो मनाला आह्लाद देतो. तर तिसरा अग्नि नेत्र यज्ञयागादि कर्मांचे आणि जगाच्या जीवन व्यवहाराचे साधन बनला आहे. अग्नीमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत सुरू राहतात. इतकच काय पण! पोटात असलेल्या वैश्वानर नावाच्या आग्निमुळे सर्व पचनाचे व देहधर्माचे व्यवहार सुरळीत होतात. रोजचे श्रद्धापूर्वक, भक्तियुक्त अंतःकरणाने केलेले विहित कार्य हे यज्ञस्वरूपच असते. माते अशाप्रकारे तुझे तिनही लोचन सर्व जगताचे कार्य सक्षमपणे चालू ठेवतात.  माय जसे सूर्य चंद्र अग्नी हे तुझे तीन अक्ष आहेत तसे शिवाचेही आहेत. आपण दोघेही त्रिनेत्री आहात. दोघे एकरूपच आहात. सूर्य चंद्र अग्नी ह्यांना काळाची सीमा नाही. काळाचा परिच्छेद करणारे नेत्र असल्यामुळे  महाशम्भू आाणि साक्षात तू त्रिपुराम्बका दोघेही कालातीत आहात. तु्म्हाला काळ धक्काही लावू शकत नाही; असाही ध्वन्यर्थ या स्तुतीत आहे. हे माय! मी आपणा उभयतांना नम्रभावे वंदन करतो.

अहः सूते सव्यं तव नयनमर्कात्मकतया

त्रियामां वामं ते सृजति रजनी-नायकतया ।

तृतीया ते दृष्टिर्दर-दलित-हेमाम्बुज-रुचिः

समाधत्ते सन्ध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम् ।।।। *

( अहःदिवस, सकाळ. सूतेजन्म देते. सव्यंउजवा. अर्क – सूर्य यामः – तीन तासांची वेळ. त्रियामा – तीन संधिकाळ. रजनि नायक- चंद्र. दरम् - थोडेसे, जरासे, किंचित. दर-दलित – किंचित विकास पावलेले. हेमाम्बुज – सोन्याचे कमळ. समाधत्ते – रचना करणे. )

रवी चंदा अग्नी तव नयन माते सुखविती

घडे त्यांच्या योगे दिवस, रजनी, संधि तिनही

रवीरूपी जेंव्हा जननि उजवा नेत्र उघडे

उषःकालाने हा सुखद दिन आरंभचि घडे ।। . १ ।। 

 

शशीरूपी डावा नयन तव निर्मीच रजनी

तिन्ही सांजा होती अनल-नयनासी उघडुनी

करे अग्नीरूपी नयनचि उषःकाल जननी

तसेची मध्याह्ना अनल करि संध्यासमयही ।। .।। 

 

तुझ्या ह्या नेत्रांची किति महति गावी जननी गे

रवीरूपी हाची नयन उजळे विश्व सगळे

कराया कर्तव्या जगत व्यवहारास करण्या

करे भानूरूपी नयन तव उद्युक्त सकला ।। . ।। 

 

जगा देई शांती अपरिमित आह्लाद बहु गे

शशीरूपी माते तव नयन हा सौम्य अति गे

अगे अग्नीरूपी कनक-कमलाच्या कळि समा

पवित्रा नेत्राने घडति किति यज्ञादिक क्रिया ।। . ४।। 

 

वसे देही वैश्वानर स्वरुप तो अग्नि जठरी

वसे प्राण्यांच्या तो तनुत नित वैश्वानर रुपी

त्रिनेत्री तुम्ही हे उभय कळिकाळापलिकडे

उमा शंभु यांचे नच विलग अस्तित्त्व उरते ।। .५  ।। 

 

अहो विश्वाच्या ह्या जननि-जनकांच्या सुचरणी

झुको भक्तीभावे नमन करण्या मस्तक झणी ।।  ८.६  ।। *

-------------------------------------

श्लोक ९-


प्रसंगानुरूप त्रिपुर सुंदरीच्या नजरेतून व्यक्त होणार्‍या भावामध्ये असलेला हळुवारपणा, नाजुकता, ऐश्वर्यसम्पन्नतेची प्रचिती देणारी झलक वा सर्वांच्या मनात आदरयुक्त दरारा निर्मण व्हावा असा आबदारपणा असे किती भाव तिच्या नजरेत तरळत असतात. तिची पाहण्याची दृष्टीच अशी आहे की त्या दृष्टीच्या छटांचे लावण्य बघणारा भक्तगण मोहित होऊन जणु काय त्याची नजरबंदी व्हावी. तिच्या नजरेच्या विविध आठ छटांना आचार्यांनी अर्थानुरूप सुंदर नावं दिली आहेत.  त्या आठ दृष्टींची नाव पुढीलप्रमाणे -

  विशाला, २ कल्याणी, ३ अयोध्या,  धारा,  मधुरा,  ६  भोगवती,  अवन्ती,  विजया.

  विशाला ही कायम अन्तर्विकसित स्वरूपाची दृष्टी  असल्याने तिला विकसिता असेही म्हणतात.

  कल्याणी ही नावाप्रमाणेच प्रसन्न, भक्तांचे कल्याण करणारी आहे. राग, मत्सर, असूया रहित आहे. तिला विस्मिता असेही म्हणतात.

 अयोध्या – कोणालाही नुसत्या दृष्टिक्षेपात जिंकून घेणार्‍या ह्या दृष्टीचा सामना करणं सर्वांनाच कठीण आहे. कुवलय म्हणजे नील कमलांच्या टवटवीत प्रफुल्लितपणलाही मागे टाकणारी प्रभा ह्या दृष्टीला सम्पन्न करणारी आहे. ह्या दृष्टीमधे डोळ्याच्या बाहुल्या पूर्णपणे मोठ्या झालेल्या, विकसित झालेल्या आहेत. (स्मेर म्हणजे प्रफुल्लित, विस्फारलेल्या) ह्या दृष्टीला स्मेर-कनीनिका असेही म्हणतात. कनिनीका म्हणजे डोळ्यातील पुतळी./बाहुली.

 धारादृष्टी ही करुणेनी ओथंबलेली असते. कृपेचा वर्षाव करत असते. तिला अलसा असेही म्हणतात.

 किमपि मधुरा - ही शब्दात सांगता येणार नाही अशी अनिर्वचनीय माधुर्याने रसाळ असते. हिला वलिता, विलसिता असेही म्हणतात.

 भोगवतिका – सुख साक्षात्काराची सूचक हिला स्निग्धा असेही म्हणतात.  काहीजण आभोगवतिका म्हणतात. आभोगः म्हणजे विस्तार, लांबीरुंदी. आभोगवतिका म्हणजे दीर्घदृष्टी वा जी सर्वत्र फैलावलेली आहे.

 अवन्ती – म्हणजे भक्त जनांचे रक्षण करणारी. हिलाच मुग्धा असेही म्हणतात.

 बहुनगरविस्तारविजया – अनेक नगरींच्या विस्तार-वैभवावर मात करणारी ही दृष्टी अर्धोन्मीलित कटाक्षयुक्त आहे. हिलाच आकेकरा (अर्धोन्मीलित) असे म्हणतात.

माते! अशा ह्या तुझ्या  नजरेतून व्यक्त होणार्‍या भावांचे ऐश्वर्य शाश्वत आहे. इतकेच नाही तर तुझ्या नजरेतील ह्या विविध भावांतील एक एक भावाचा उत्कर्ष  झालेल्या आठ नगरीही जणु काही तुझ्या नजरेचा एक एक गुण घेऊन आजही उभ्या आाहेत.

 विशाला म्हणजे हिमालयातील बदरीनाथ नगरी. तर  कल्याणी म्हणजे मुंबई जवळील कल्याण नगरी.  उत्तरप्रदेशातील आयोध्या.  माळव्यातील धारानगरी म्हणजेच धारा.  आग्र्याजवळील मथुरा म्हणजेच मधुरा. तर काही जण मदुरा ही मधुराच म्हणतात.  भोगावती-  काहीजण अमरावतीला भोगावती म्हणतात तर काही जण कांचीपुरीला भोगावती म्हणतात.  अवंती म्हणजे उज्जैन.  विजया म्हणजे विजयनगर! वा विजापूर. मला वाटते तुझी दृष्टी त्या त्या भावाने त्या त्या नगरीस पुनित करते. उठाव आणते. माय! अशी ही तुझी दृष्टी, माझ्यावर कृपेचा वर्षाव करो. तुला माझे नमन माते!

विशाला कल्याणी स्फुटरुचिरयोध्या कुवलयैः

कृपाधाराधारा किमपि मधुराभोगवतिका ।

अवन्ती दृष्टिस्ते बहु-नगर-विस्तार-विजया

धृवं तत्तन्नाम-व्यवहरण-योग्या विजयते ।।  ।। *

 

*तुझ्या दृष्टीमध्ये तरळति किती भाव विविधा

अगे माते कैसे विविध समयासी उचित गा 

विशाला दृष्टी ही जननि तव अंतर्विकसिता

तियेसी ज्ञानी हे म्हणति जननी गे विकसिता ।। . ।।

 

असे कल्याणी ही; विरहित असूया, करि कृपा

हिताचे भक्तांच्या नजर करते विस्मितदृषा 

अयोध्या नामे ही नजरचि अजेया नित असे

अयोध्येसी कोणी जगतिच पराभूत न करे ।। .।।

 

जया संबोधीती कुवलयचि नीलोत्पल असे

मनोहारी दृष्टी सकल हृदयां ती निवविते 

असे कारुण्याचा अमित जलधी जी निरुपमा

कृपाधारांचा जी करित नित वर्षाव निरता ।। . ३  ।। --

 

कृपाधारा दृष्टी म्हणति अलसा ही तिज कुणी

असे माधुर्याची किमपि मधुरा  दृष्टि तव ही 

असे माधुर्याची अनुपमचि निस्यंदिनि महा

तिला संबोधीती कुणि विलसिता वा चि वलिता ।। . ४ ।।

 

सुखाची प्रत्यक्षा सकल अनुभूतीच हृदया

अगे जी देते ती, वदति तिजला भोगवतिका

अवंती भक्तांचे करितचि असे रक्षण सदा

तिला मुग्धा ऐसे म्हणति अजुनी  प्राज्ञ जन वा ।। . ५  ।।

 

महासाम्राज्ये ही नित भरभराटी अनुभवे

महा सामर्थ्याने नित नगरविस्तारचि घडे 

तयांच्या ऐश्वर्यावर करितसे मात तव गा

तुझी दृष्टी माते म्हणति तिज विस्तारविजया ।। . ।।

 

अगे ह्या अर्धोन्मीलित तव कटाक्षास विजयी

जगी संबोधीती  जन सकल आकेकर इति 

असे नावा ऐसी उचित व्यवहारा अनुरुपा

तुझी दृष्टी ऐसी जननि अति सर्वोत्तम धृवा ।। .७  ।।

 

असे ह्या नावांनी परिचित अशा आठ नगरी

तयांच्या नावाच्या सम असति त्याही गुणमयी 

कृपादृष्टी ऐसी जननि मम कल्याणचि करो

कृपेचा माते हे नजर तव वर्षावचि करो ।। . ।।*

-------------------------------------


श्लोक 


येथे ह्या त्रिपुरसुंदरीच्या नेत्रांबद्दल बोलतांना आचार्य म्हणतात, वाल्मीकि, महर्षी व्यास इत्यादि नामवंत कवींच्या रचना असोत वा भूत वर्तमान, भविष्य जाणणार्‍या त्रिकालज्ञ  विष्णु, शिव यांच्या रचना असोत. हे रसभरित काव्यग्रंथ जणु मधाने ओथंबणार्‍या फुलांच्या ताटव्याप्रमाणे आहेत. हे माय, तू नेहमी तुझ्या कानांनी अत्यंत रसाळ अशा काव्य रचना ऐकत असतेस. तुझे कान त्यातील अवीट गोडीचा सतत आस्वाद घेत असतात. आणि म्हणूनच त्यांना मिळणारा हा असीम आनंद आपल्यालाही अनुभवता यावा म्हणून तुझ्या कानांसंगे केलेली मैत्री तुझे मासोळीसारखे  रेखीव, लांबलचक, कानांकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही  आकर्ण नेत्र कधीही सोडत नाहीत. माय अगे, तुझे आकर्ण नेत्र इतके सुंदर आहेत त्याचं कारणही हेच आहे.

 तुझ्या नेत्रात काळ्याभोर भुंग्यांच्या छाव्याप्रमाणे/ शावकाप्रमाणे फिरणारे हे दोन चंचल कृष्णगोल सतत काव्य-सुधा-रस प्राशन केल्याने इतके चमकदार, सुंदर दिसत आहेत की पाहणार्‍याची दृष्टी त्यांच्यावर खिळून त्याची समाधीच लागावी.

पण माय तू तर त्रिनयना आहेस. भूत, भविष्य जाणणारा तिसरा  नेत्र (अलिकनयन) तुझ्या कपाळावर आहे. कपाळावरच्या नेत्राला काव्यरससुधा प्राशनाचं, तुझ्या बाकी दो नेत्रांना  मिळणारे हे सहज सौख्य कधी मिळत नाही. म्हणून का तो सतत रागावलेला, लालबुंद असतो? अग्निज्वाळांनी घातलेल्या तांडवाने भुभुत्कार करत राहतो. 

कवीनां संदर्भ-स्तबक-मकरन्दैक-रसिकं

कटाक्ष-व्याक्षेप-भ्रमर-कलभौ कर्णयुगलम् ।

अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरला-

वसूयासंसर्गादलिक-नयनं किञ्चिदरुणम् ।। ० ।। 

(कविकवी, त्रिकालज्ञ, तत्त्ववेत्ता । सन्दर्भ -संगति, संलग्नता, निरंतर संबंध.  स्तबक - फुलांचा गुच्छ, ताटवा, घोस । कटाक्ष - व्याक्षेप – नेत्रांचे चंचल होणे, इकडे तिकडे नखरेलपणाने नाचणे. अमुञ्चन्तौ – सहवास न सोडणारे दोन्ही (नेत्र). तरल – चपळ. नवरसास्वादतरलौ -  नवरसांचा स्वाद घेण्यास उत्सुक. असूयासंससर्गात – मत्सरग्रस्त होऊन  कलभ  शिशु, छावाभ्रमरकलभौ - जणु भ्रमरांचे छोटे दोन छावे. अलिकम् – मस्तक.  अलिकनयनम् – कपाळावरील नेत्र)

 

तुझ्या कानांनी गे श्रवण करिसी काव्य रचना

कवी वाल्मीकी वा अनुपम अशी व्यास प्रतिभा । 

महा तत्त्वज्ञानी हरिहर त्रिकालज्ञ अवघे

कृतींचा त्यांच्याही श्रवण करिसी काव्य-रस गे ।। .१ ।।

 

फुलाच्या घोसांच्या सम बघुनिया काव्यरचना

किती त्या संपृक्ता नवरस-मधानेचि भरल्या 

रुची सत्काव्याची अनुपम मिळो नित्य म्हणुनी

सुदीर्घा आकर्णा नयन तव कर्णांस मिळती ।। .।।

 

रसांच्या ओढीने नयन तव घे  धाव तिकडे

करी कानांची हे सतत सलगी दीर्घ नयने 

कटाक्षा पाहोनी मजसि गमते हे जननि गे

मिलिंदांचे छावे चपळ पळती का उभय हे ।।. ।।

 

मिळे दो नेत्रांना नवरसरुपी काव्य मधु जो

तुझ्या भाळीच्या ह्या तृतिय नयना ना मिळत तो 

म्हणोनी क्रोधाने मज अरुण वर्णी दिसतसे

मुखासी ऐशा गा तव जननि मी गे स्मरतसे ।। . ।।

----------------------------

श्लोक  –


सुहृत्हो!   व्या श्लोकात त्रिपुरसुंदरीच्या नेत्रांमध्ये तरळणारे विविध भाव आणि त्या नजरेचे गुण घेऊन उभ्या असलेल्या आठ नगरी आपण पाहिल्या. त्रिपुरसुंदरीचे नयन इतके भावविभोर आहेत की नऊही रसांची उत्पत्ती जणु काही तिच्या नेत्रातून होत असते. प्रसंगाला अनुरूप असे भाव तिच्या नजरेतून व्यक्त होतांना पाहणे मोठे मनोहर आहे.

हे माय! शिवाकडे पाहतांना शृंगाररसाने ओथंबलेली तुझी दृष्टी इतर देवादिकांकडे पाहतांना मात्र अत्यंत तुच्छ व तिरस्कारयुक्त होते. बीभत्स रसाने भरलेली हीच दृष्टी शिवाच्या जटांवर विराजमान झालेल्या गंगेकडे क्रोधाने बघतांना मात्र उगवणार्‍या सूर्याप्रमाणे लाल होते. जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरीतही ह्या क्रोधाचे वर्णन जगन्नाथ पंडिताने सुरेख केले आहे. गंगेला उद्देशून आहे. शिवाच्या वामांगी ही कोण सुंदर युवती बसली आहे हे पहायला गंगा खाली उतरली. उतरतांना गंगेच्या पाण्याचे तुषार पार्वतीच्या भांगामध्ये पडून ते मोत्यांप्रमाणे चमकू लागले. पण गंगेच्या ह्या भलत्या धारिष्टाने पार्वतीचे नेत्र रागाने, क्रोधाने नुकत्या उगवलेल्या लालबुंद सूर्यासारखे आरक्त झाले. भांगातील पाण्याचे चुकार थेंबही तिने निपटून टाकले.  मराठीत देते.

शिवाच्या वामांगी बसलि युवती कोण म्हणुनी

तिला भेटाया तू उतरलिस खाली शिवसखी

जटाजूटातूनी उसळत शिवाच्या लहरि या

उमेच्या केसांना जल-निकर हे स्पर्श करिता।।40.1

 

तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता

बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना

तुषारांसी टाकी निपटुनिच ती कोमलकरा

अशा या लाटांचा जगति जय होवो सतत हा।।40.2

 

माय त्यावेळी राग तुझ्या डोळ्यावाटे व्यक्त होतांना जणु रौद्र रसाची निष्पत्ती होत आहे. तर शंकराचा अलौकिक जीवनपट पाहतांना माय तुझ्या लोचनांमधे विस्मय आणि आश्चर्याचे भाव मावत नाहीएत. जो विरक्त, विरागी आहे, तो सर्व जगाचे कल्याण करणारा आहे ही कल्पनाच अद्भुत असून तुझ्या नेत्रातून शिवाची चरितसरिता अद्भुत रस निर्माण करते. पण त्याचवेळी शिवाच्या अंगावर सळसळणारे महा विषारी सर्प पाहून तुझ्या नेत्रातून भयाचे दर्शन घडते. जणु भयानक रसाचे दर्शन तुझ्या नेत्रातून होते. माय! तुझ्या नजरेच्या सौंदर्यापुढे सरोवरात फुलणार्‍या कमळांचं (सरसीरुह) सौंदर्यही फिकं पडतं. आपल्या दृष्टी सौंदर्याने कमळांनाही तू जिंकून घेतेस; माय, जय-पराजय फक्त संग्रामातच दिसून येतो असे नाही तर ह्या अत्यंत कोमल अशा कमळांच्या सौंदर्यावर मात करण्यासाठी त्यांच्याहून अधिक कोमल आणि आह्लादक नजरेनेच त्यांच्यावर मात  करता येणे शक्य आहे. तुझी दृष्टी कमळावरही मात करते; हा तुझ्या दृष्टीचा विजय अद्भुत रस म्हणावा का कोमलातल्या कोमलावरही मात करण्याची, विजय मिळविण्याची सहजप्रवृत्ती ही वीररसाचा एक वेगळाच कोमल आविष्कार समजावा हे मला कळत नाही. तुझ्या सख्या, तुझ्या मैत्रिणी तुला भेटताच तुझ्या मुखावरचं प्रसन्न स्मित हास्य हास्यरसाची उत्पत्ती करणारं आहे. तुला शरण आलेल्या माझ्यासारख्या दीन भक्तांकडे पाहतांना मात्र तुझ्या नेत्रात सारं कारुण्य एकवटतं. कृपा, दया, अनुकंपेने भरून आलेल्या हृदयाचं प्रतिबिंब स्पष्टपणे डोळ्यात दिसून येतं. हा शांतरस सर्व रसांना जिंकणारा निरुपाधिक, निजानंदस्वरूप, शब्दात सांगता येण्यासारखा नाही तुझ्याठिकाणी तो स्वतःसिद्धच आहे. हा निजानंदच तुझं खरं स्वरूप आहे.

 

शिवे शृङ्गारार्द्रा तदितरजने कुत्सनपरा

सरोषा गङ्गायां गिरिशचरिते विस्मयवती ।

हराहिभ्यो भीता सरसिरुहसौभाग्यजननी

सखीषु  स्मेरा ते मयि जननि दृष्टिः सकरुणा ।। ।।

 ( तदितरजने – तत् इतर जने – बाकी लोकांसाठी. कुत्सनपरा-  तुच्छभाव व्यक्त करणारी. सरोषा रागावलेली, क्रोधित. हराहिभ्यो भीता – सर्पांना घाबरलेली. सरसिरुह – कमळ. स्मेर – स्मित, मंद हास्य )

 तुझ्या दृष्टीमध्ये नवरसचि ओथंबति उमे

प्रसंगा, संगाने अनुपम मुखी भाव बदले   

तुझी दृष्टी जेव्हा सतत शिवशंभुवर खिळे

घडे शृंगाराचे अनुपम तदा दर्शन शिवे ।।  .१ ।। 

 

परी दृष्टी ती गे इतर सुर सामान्य निरखे

गमे जे विश्वेशाहुन कुणि निराळे तुजसि गे  

तुझ्या दृष्टीमध्ये तरळत असे तुच्छपण ते

घडे दृष्टीचा हा फरक तव बीभत्सचि उमे ।।  .२ ।। 

 

बघोनी गंगेसी जळत जणु क्रोधे नजर गा

मुखी दाटे तेव्हा बहु भयदची रौद्ररस हा  

अगे विश्वेशाची चरितसरिता तू निरखिता

मुखी आश्चर्याचे उमटति कसे भाव तुझिया ।।  .३ ।। 

 

परी शंभूचे हे सकल बघता वर्तन असे

चिताभस्मा लावी, सततचि स्मशानी बसतसे  

महा वैराग्याचे प्रतिक तव स्वामी बघुनिया

मुखी दाटे तेंव्हा जननि रस हा अद्भुत तुझ्या ।। .४ ।। 

 

शिवासी वेढूनी कितिक बसले सर्पचि महा

पदी कंठी कानी कर शिर उरी राहति सदा  

करीती फुत्कारा विषधर विखारी बघुनिया

मुखासी भीतीने भयरस करी व्याप्त नयना ।।  . ।। 

 

कटाक्षामध्ये गे तव सहज दाटे मृदुलता

तयाच्या सौंदर्यापुढति नच सौंदर्य कमळा  

तुझी दृष्टी माते कमलविभवा जिंकिच पहा

तुझ्या दृष्टीचा हा विजय सुचवी वीररस हा ।।  .६ ।। 

 

सख्यांसंगे माते स्मितवदन आह्लादक दिसे

फुले सौख्याने ते किति निखळ आनंद विलसे  

सुखाविष्काराचा सुखमय असा हास्य रस गे

जना मोहे माते सुखद तव हा हास्यरस गे ।।  .।। 

 

कृपापूर्णा दृष्टी सुखवि निज भक्तांस तव गे

करे दीनांसी ती नित हृदयि आश्वासित उमे  

मुखी ओसंडे तो परम सुखदा शांतरस गे

निजानंदाचे हे स्वरुपचि स्वयंसिद्ध तव गे ।।  .।। 

------------------------

श्लोक  


हे जननि!

तुझे कानापर्यंत पोचलेले सुदीर्घ नयन हे जणु काही मदनाचे अत्यंत अचूक असे दोन बाणच आहेत. बाणांचा वेग वाढण्यासाठी त्यांच्या मागे पिसे (गरुत) लावलली असतात. येथे त्या पिसांचे काम तुझ्या सुंदर लांब दाट पापण्या(पक्ष्माणि) करत आहेत. बाणाच्या टोकावर मात्र लोखंडाचे अत्यंत तीक्ष्ण, धारदार पाते लावलेले असते. पिसांमुळे वेगाने पुढे जाणारा बाण धारदार पात्यामुळे बरोबर लक्ष्यात घुसतो. हे जननि तुझी नजरच अशी धारदार आहे की बाणाचे तीक्ष्ण टोक जसे सहज लक्ष्याचाा वेध घेते त्याप्रमाणे तुझ्या नुसत्या कटाक्षाने त्रिपुरासुराचेही तुकडे तुकडे करणार्‍या श्री शिवशंभूचा वैराग्यरूपी शांतरस (प्रशम-रस) पार पाघळून (विद्रावण) जातो. त्याच्या वैराग्याचे भेदन करून श्री सदाशिवाच्या अंतःकरणात सृष्टीच्या उत्पत्तीला अनुकूल अशा संकल्पांचे स्फुरण होते.

जणु काही शिवावर शरसंधान करण्यासाठी मदनाने आकर्ण / कानापर्यंत ताणून धरलेल्या तुझ्या नेत्रधनुष्याने मदन बाणांचा खेळ खेळत आहे.

हे जगज्जननि! तुझं कर्तृत्त्व इतकं उत्तुंग आहे की त्या नगाधिराज हिमाद्रिच्या मुकुटात खोचलेल्या तुर्‍यातील तू जणु काही एक अत्यंत सुगंधी कलिकाच आहेस असं मला वाटतय. माते तुला माझे नमन असो.

गते कर्णाभ्यर्णं गरुत इव पक्ष्माणि दधती

पुरां भेत्तुश्चित्त-प्रशम-रस-विद्रावण-फले ।

इमे नेत्रे गोत्रा-धर-पति-कुलोत्तंस-कलिके

तवाकर्णाकृष्ट-स्मर-शर-विलासं कलयतः ।।  ।।

(अभ्यर्ण – निकट, समीप, सान्निध्य, सामीप्य. विद्रावण – हाकलवून लावणे. पराभूत करणे. पाघळवणे. कर्णाभ्यर्णं – कानाच्या निकट आलेले. गरुत् – पक्षांची पिसे. पक्ष्म – पापण्या. गोत्रा – पृथ्वी. गोत्राधरपति- हिमालय. कुल – वंश. त्या वंशाचा उत्तंस – दागिना, शिरोभूषण असलेला तुरा त्यातील  कलिका. पुर – त्रिपुरासुर.  

 

हिमाद्रीच्या माथी किरिट झळके रत्नमय हा

तयी पुष्पांचा गे परिमलयुता शोभत तुरा 

तुर्‍यामध्ये त्या तू सुमन कलिका सौरभयुता

तयाच्या वंशाची गुणयुत शिरोभूषण सुता ।। .।। 

 

अनंगे खेचूनी शर जणु धनुष्या बसविले

अशी ही माते गे दिसति तव आकर्ण नयने 

शरासी लाभाया गति म्हणुन जी लाविति पिसे

दिसे तैसे माते गहन तव हे नेत्रदल गे ।। . ।। 

 

शराचे पाते जे लखलख करे तीक्ष्ण बहु जे

तशी जाई माते नजर तव भेदून हृदये 

शिवाच्या वैराग्या नजर करते लक्ष्य तव ही

शिवाच्या शांतीचा जननि करिसी भेद सहजी ।। . ।। 

 

तुझ्या नेत्रांचे हे शर-धनुष योजून बरवे

अनंगाने केले अचुक शरसंधान जणु हे 

उठे उत्पत्तीचा शिवहृदिच संकल्प तयिने

कराया सृष्टीची पुनरपि तुला निर्मिती शिवे ।। .४ ।। 

 

कसे खेळीती हे नयन शरसंधान तव हे

तुझ्या दृष्टीचा हा शर करुनि आकर्ण नयने  

अनंगाचा रंगे जणु सकल हा खेळचि गमे

अशा ह्या नेत्रांनी मजसि निरखी माय सदये ।। २ .।। 

----------------------------------

श्लोक  –


हे ईशान-दयिते! ( ईशाान म्हणजे शिव आणि दयिता म्हणजे प्रिय) हे शंभुप्रिये! रेखीवपणे काजळ रेखलेल्या तुझ्या नेत्रांमध्ये मला तीन रंगांचे मिश्रण प्रकर्षाने दिसून येत आहे. किंवा ह्या तीन रंगांनी तुझ्या लोचनांना काजळ घातल्याप्रमाणे उठाव आला आहे. (निरोगी व्यक्तिच्या डोळ्यात लाल, पांढरा आणि काळा  हे रंग अत्यंत तजेलदार, टवटवीत , तेजस्वी असतात. चमकदार काळ्या बाहुल्या/कृष्णमंडळ तर त्याच्या भोवतालचा भाग म्हणजे श्वेतमंडळ किंवा बुब्बुळे सतेज शुभ्र पांढरी  आणि डोळ्याच्या नाकाजवळच्या कोपर्‍यात गुलाबीसर लालसर छोटीशी त्वचा असते. शिवाय पांढर्‍या भागात लाल रक्तवाहिन्याही दिसतात. आजारी व्यक्तीचे डोळे निस्तेज दिसतात. तेजस्वी डोळे कायम निरोगीपणाची आणि प्रखर बुद्धिमत्तेची साक्ष देतात. ) ह्या तेजस्वी, सरस अशा तीन रंगाच्या सुरेख रंगसंगतीमुळे हे जननि तुझे डोळे अत्यंत शोभून दिसत आहेत.(विभाति)

हे तीन रंग जणु काही सत्त्व, रज आणि तमोगुणाचे द्योतक आहेत. शुभ्र हा सत्त्वगुणाचा तर लाल हा रजोगुणाचा तर काळा/नील हा तमोगुणाचा द्योतक आहे. त्रिपुरसुंदरीचे तीन नेत्र म्हणजे सूर्य, चंद्र अग्नी हे आहेत. सूर्य चंद्र अग्नी हे जसे तीन वर्ण सूचित करतात. त्याप्रमाणे तुझे नेत्र तीन रंग दर्शवतात जे त्रिगुणांचे प्रतिक आहेत.

सूर्यकिरणांचा शुभ्र अग्नीचा आरक्त तर चंद्राचा श्यामल वर्ण (पाण्डुरंगशास्त्री गोस्वामींच्या पुस्तकाप्रमाणे) तुझ्या नेत्रात दिसून येत आहे. ( चंद्र काळा नाही पण त्याची सोळावी कला आमावास्या जी सार्‍या कलांमधे असतेच असे आपण गृहीत धरतो म्हणून येथे श्यामल असावा किंवा श्यामल हा वर्णापेक्षा शीतलता दर्शविणारा असावा असे मला वाटते.)

माय! प्रलयकाळी ब्रह्मा, विष्णू, महेश हे सारेच ईशान तत्त्वात/ सदाशिव तत्त्वात लीन झालेले असतात. (उपरत) सृष्टीकाली ह्या तिघांना जन्म देण्यासाठी हे सत्त्व, रज, तम गुणांचे द्योतक असलेले तीन रंग जणु काही तू तुझ्या नेत्रांमधे धारण केले आहेस.

जणु काही द्रुहिण म्हणजे ब्रह्मदेव रक्तवर्णी रजोगुणापासून तर विष्णु सत्त्वगुणी शुभ्रवर्णातून तर रुद्र तमोगुणी नील/काळा वर्णातून उत्पन्न झाले आहेत.

रुद्र म्हणजे शंकर तमोगुणापासून उत्पन्न झाला आहे त्याच्यापासून सहस्रदलकमलात असलेले सदाशिवतत्त्व वेगळे आहे. पूर्वीच्या श्लोकांमधे आपण पाहिले की हे सहस्रदलकमल हे मस्तकात टाळूच्या जवळ असते. तेथे त्रिपुरसुंदरी आणि सदाशिवतत्त्वाचे सामरस्य आहे.

माय! तुझ्या सुलोचनांचा हा महिमा अवर्णनीय आहे. तुला माझा नमस्कार असो.

*विभक्तं-त्रैवर्ण्यं व्यतिकरि-लीलाञ्जनतया

विभाति त्वन्नेत्र-त्रितयमिदमीशान-दयिते

पुनः स्रष्टुं देवान्द्रुहिण-हरि-रुद्रानुपरतान्

रजः सत्त्वं बिभ्रत्तम इति गुणानां त्रयमिव ।। ३ ।।*

(व्यतिकर – मिश्रण. ईशान - भगवान सदाशिव. दयिता – प्रिय. द्रुहिण- ब्रह्मा. उपरत – विरक्त, उदासीन येथे अव्यक्त. त्रितय – तीन भाग असलेला.)

*तुझ्या नेत्री काळी, धवल अन आरक्तचि छटा

प्रकर्षाने येती दिसुन तिनही रंग मजला 

शलाका ही काळी तवचि नयनी काजळमयी

तिन्ही नेत्रांमध्ये उठुन दिसते सुंदर अती ।। .१ ।।

 

उमे सत्त्वाचा हा धवल नितची द्योतक असे

रजाचा रक्ताशी; तमगुणचि काळ्यासह जुळे 

रवी अग्नी चंद्रस्वरुप तव गे नेत्र तिनही

तयांच्या रंगांच्या उमटति छटा ह्या त्रिनयनी ।। .।।

 

दिसे सूर्याची ही तिनहि नयनी शुभ्रचि छटा

असे चंद्राजैशा नयनि पुतळ्या श्यामल अशा 

(पांडुरंगशास्त्री गोस्वामींच्या सुबोधस्तोत्रसंग्रहानुसार)

मिळे अग्नीचेही नयनि लव आरक्तपण का

तयाने नेत्रांचे खुलत बहु लावण्य सकला ।। .३ ।।

 

विधी विष्णू रुद्राकडुन करण्या सृष्टिरचना

गुणांची तीन्ही गे जरुर पडते हे जननि गा 

म्हणोनी का तीन्ही गुण असति नेत्रात तुझिया

त्रिदेवांची ह्या गे तुजकडुन उत्पत्ति करण्या ।। ३ .4।।

 

हरि ब्रह्मा शंभू तव गुणचि एकेक धरुनी

तिघेही जन्मा ये; करिति, धरिती, नाश करिती 

हजारो ज्यासी गे दल असति पद्मातचि अशा

वसे तू मूर्ध्नीच्या शिवसह शिवाची प्रियतमा ।। . ।।*

---------------------------------------------

श्लोक  -


गंगा, यमुना, सरस्वती ह्या पवित्र नद्यांच्या संगमाला प्रयागराज म्हणतात. असे म्हणतात की ह्या पवित्र प्रयागात भक्तांची सारी पापे धुतली जातात. तो परत निर्मळ होतो. अघ म्हणजे पाप. अनघ म्हणजे सर्व पापे धुवून विमल झालेला.

माय! तू आपले चित्त भगवान सदाशिवांना अर्पण करून टाकले आहेस. त्यांच्याशी तू पूर्ण समरस आहेस. सदाशिवांना पशुपति म्हणतात. ते सार्‍या जीवांचे स्वामी आहेत.  त्यांच्याशी एकरूप तू सर्व जीवांचे रक्षण करतेस. माते तुझे नेत्र सतत ‘दयामित्र’ म्हणजे करुणेने भरलेले असतात. जणु काही दया ही तुझ्या नेत्रांची सखीच आहे. ती तुझ्यावरील प्रेमाने कधि तुला सोडून जात नाही. सतत तुझ्या नेत्रांशी मैत्री करून असते. म्हणुनच तुला आमच्या विषयी, प्राणिमात्रांविषयी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम आहे. तुझ्या डोळ्यांमधे असलेले शुभ्र, आरक्त आणि नील वर्ण म्हणजे जणुकाही  सत्त्व रज तम ह्या गुणांच्या नद्याच आहेत. ही सत्त्व गुणाची शुभ्र गंगा, तमोगुणी काळी यमुना, आणि रक्तवर्णी शोण (शोण ह्याचाच अर्थ रक्त वा रक्तवर्णी, लाल असा आहे. आपल्याकडील नद्यांचे रंगही वेगवेगळे आहेत. ) ह्यांचा त्रिवेणी संगम मला तुझ्या नेत्रांमध्ये झालेला दिसतो. आम्हाला पवित्र करण्याच्या वत्सल भावनेनी, उदात्त हेतूनी  तुझ्या नेत्रांमध्ये हा पवित्र त्रिवेणीसंगम झाला आहे. तुझे मुख आमच्यासाठी प्रयागराज आहे. आमची सारी सारी पापे धुवून काढण्यासाठी, पापक्षालन होण्यासाठी तुझा नुसता एक नेत्रकटाक्षही पुरे माय!

 

पवित्रीकर्तुं नः पशुपति-पराधीन-हृदये

दयामित्रैर्नेत्रैररुण-धवल-श्याम-रुचिभिः ।

नदः शोणो गङ्गा तपन-तनयेति ध्रुवममुं

त्रयाणां तीर्थानामुपनयसि सम्भेदमनघम् ।।।।

( पवित्रीकर्तुं – पवित्र निर्मळ करण्यासाठी.  नः – आम्हाला. सम्भेद संगम. , तीन तीर्थांच्या संगमाला प्रयाग म्हणतात. तपन – सूर्य. तपनतनया – सूर्यपुत्री यमुना. उपनय – निकट आणणे. जवळ आणणे. अघ – पाप. अनघ – पापरहित, निर्मळ )

 

अगे माते तूची हृदय दिधले हे तव शिवा

तयासंगे होशी समरस सदा तूचि सुभगा 

दयाभावाने हे नयन तव ओथंबति शिवे

जिवांना सांभाळी अति सदयतेने जननि गे ।। .१ 

 

तुझ्या ह्या नेत्रांची अति सुखद ही मैत्रिण दया

तिच्या सान्निध्याने कमलनयनां ये मृदुलता 

म्हणोनी घाली तू सकल जगती पाखर अशी

तुझ्या ह्या मायेची अतिव करुणेची सुखदशी ।। .२ 

 

तुझ्या नेत्री माते धवल अरुणा नीलचि छटा

सुरम्या भासे गे मजसिच प्रयागासम  अहा 

तिन्ही रंगांचा हा त्रिगुण सरिता संगम दिसे

 तुझ्या डोळ्यांमध्ये त्रिविध गुण हे एकवटले ।।.3

 

असे गंगा शुभ्रा प्रतिक जणु हा सत्व गुणचि

तमोरूपी श्यामा दिसत यमुना नेत्रि तव ही 

रजाचे आहे जो प्रतिक नद हा शोण अरुणा

हराया भक्तांचे दुरित धरसी संगम असा ।।.।।

------------------------------------

श्लोक 


उन्मेष म्हणजे पापण्यांचे उघडणे तर निमेष म्हणजे पापण्या मिटणे. जेव्हा क्षणभरासाठी आपण डोळे/ पापण्या मिटतो तेव्हा आपल्याला जग दिसत नाही. (जग असतं पण आपल्याला दिसत नाही) पापण्या उघडल्या की मात्र सर्व जग दिसू लागतं. त्रिपुराम्बिकेनी पापण्या मिटताच तिला जर जग दिसत नसेल तर तो एक क्षणकालही तिच्या कृपादृष्टीपासून वंचित रहायला लागणं हा ह्या जगासाठी प्रलयच आहे. तिने सृष्टीकाळी तिचे लोचन उघडताच तिची कारूण्यानी ओथंबलेली नजर ह्या सर्व जगावर फिरत असल्याने, तिच्या त्या कृपाकटाक्षाचे अमृत मिळताच सार्‍या जगाची पुन्हा उत्पत्ती होते.

म्हणतात ना की घार उडते उडते उंच आकाशी परी लक्ष पिलापाशी अगदी तिच भावना मातेला जगाबद्दल आहे. ह्या जगज्जनीला सर्व जगाबद्दल पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम असल्याने,  हे जग कधी नाश पावू नये, प्रलय होता कामा नये. प्रलयापासून ह्या जगाचे मला सतत रक्षण केले पाहिजे ह्या भावनेने ती इतकी सतर्क असते की ती आपले डोळे मिटु देत नाही.

येथे एक गोष्ट सांगायला मला आवडेल. दमयन्तीच्या स्वयंवराच्यावेळी तीन देव नलाप्रमाणेच रूप घेऊन आले होते. दमयन्तीही चाणाक्ष होती तिने नलाला बरोबर ओळखले आणि त्याच्या गळ्यात वरमाला घातली. कारण देव स्वभावतःच अनिमेष म्हणजे डोळे न मिटणारे, सतत आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे असतात. त्यात ते क्षणभरही उसंत घेत नाहीत. त्रिपुरसुंदरी तर सर्व देवांची देव महादेवी असल्याने तिच्यावर असलेली महान जबाबदारी सांभाळण्यात ती पापण्यांच्या उघडझापेचाही व्यत्यय येऊ देत नाही.

हे माय! जिथे तू पापण्याही मिटत नाहीस तेथे तुझे माझ्याकडे लक्ष नाही असे मी कसे म्हणू? तुझा कृपाकटाक्ष असाच माझ्यावर राहू दे. तुला वंदन माते!

 

*निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगती

तवेत्याहुः सन्तो धरणिधर-राजन्य-तनये ।

त्वदुन्मेषाज्जातं जगदिदमशेषं प्रलयतः

परित्रातुं शङ्के परिहृत-निमेषास्तव दृशः ।। ५ ।।*

*अगे माते तूची नयन मिटता हा! प्रलय ये

पुन्हा नेत्रांसी तू लव उघडिता विश्व प्रकटे ।

लया- उत्पत्तीची परिचित कथा ही कळतसे

महा विद्वानांच्याकडुन सकलांसी जननि गे ।। .१ ।। 

 

घडे सारे कैसे जननि निमिषार्धात सगळे

तुझ्या सामर्थ्याची चुणुक बघता विस्मय गमे ।

परी ब्रह्मांडाच्या प्रति तवचि वात्सल्य किति हे

विसंबेना तूची क्षणभरहि माते सदय गे ।। .२ ।। 

 

जगा संरक्षाया सजग नित ही नेत्रकमले

तुझा हा जिह्वाळा तुज मिटु न दे नेत्रदल हे ।

ममत्त्वा वात्सल्या उभय बघुनी हे गुण तुझे

अगे जाई भारावुन जननि मी, वंदन करे ।। .३ ।।  *

-----------------------------

श्लोक -


अगे माते!  तुला सारेजण अपर्णा म्हणतात ते उगीच नाही. कारण ‘‘अपगतं ऋणं यया सा अपर्णा ’’ ( पाण्डुरंशास्त्री गोस्वामींच्या सुबोधस्तोत्र संग्रहातून) म्हणजे जिच्या कृपेने माणूस ऋणमुक्त होतो, ती अपर्णा. ईश्वराने आपल्याला दिलेला हा देह  आत्मसाक्षात्कार करून घेऊन कृतार्थ होण्यासाठी दिला आहे. मनुष्य जन्म मिळूनही ही कृतार्थता लाभली नाही तर माणूस कायम ईश्वराच्या ऋणातच राहतो. पण हे माय तुझ्या नावाच्या जपाने/ भजनाने माणूस ऋणमुक्त होतो. म्हणून तुला अपर्णा म्हणतात.

हे जननि तुझे हे आकर्ण दीर्घ, चंचल नयन, अत्यंत सुंदर आहेत. पण मला वाटते की, तुझे हे कानांपर्यंत पोचलेले नेत्र पाहून,  जलातील मासे  आणि  नीलकमलांच्या कलिकांना मात्र एक वेगळीच आशंका येत असते.  नेत्रांचा सुंदर निमुळता आकार ह्या माशांनी आणि नीलकमलांनी चोरला असे तुझे नेत्र तुझ्या कानात सांगून आपली चुगली तर करत नाहीत ना? ह्या भीतीने हे पाण्यातले मासे डोळेच मिटत नाहीत. तर ह्या नीलकमलकलिका तुझा राग सहन करावा लागेल ह्या भीतीने सकाळी त्यांना सूर्यकिरणांनी स्पर्श केला तरी आपली दले उघडायलाच तयार नसतात. जणु काही  न जाणो दिवसा उजेडी आपली चोरी लक्षात आली तर आपली काही धडगत नाही ह्या भयामुळे त्यांचे दल-दरवाजे बंद करू घेतात.  त्यांनी दरवाजे न उघडण्यामुळे त्यांच्यात त्यांची लक्ष्मी/श्री /शोभा कशी प्रवेश करणार? सकाळी त्यांना त्यांची शोभा/श्री सोडून जात असावी. तेव्हा ही शोभा तुझ्या नयनातून व्यक्त होत राहते.  रात्री परत ही शोभा त्यांच्यापाशी परत येत. अर्थातच हे रात्रविकासी निळ्या कमळांना/ कुवलयांना उद्देशून म्हटले आहे.

हे अपर्णे तुझ्या नामाच्या स्मरणाने आम्हाला कृतार्थता लाभो. तुझी कृपा आम्हाला कायम लाभो.

*तवापर्णे कर्णेजप-नयन-पैशून्य-चकिता

निलीयन्ते तोये नियतमनिमेषाः शफरिकाः ।

इयं च श्रीर्बद्ध-च्छद-पुट-कवाटं कुवलयं

जहाति प्रत्यूषे निशि च विघटय्य प्रविशति ।। ५६ ।।*

( अपर्णा - अपगतं ऋणं यया सा अपर्णा. – जिच्याकृपेमुळे ऋण नाहिसे होते ती. पैशून्यम् – चुगली, तक्रार, बदनामी. शफरिका – छोटा चमकदार मासा / ईल नावाचा मासा. अनिमेष – डोळे न मिटता कुवलय – नीलकमल. निलीयन्ते –लपून बसणे. उमलत नाही असे. कवाट – कवाड, दार. जहाति – सोडून जाते. )

सुखावे नेत्रांसी हृदय करि आह्लादित किती

तुझ्या नेत्रांमध्ये कमलगुण हे एकवटती 

ऋणातूनी मुक्ती मिळवुनचि देसी म्हणु गे

अपर्णा ऐसे गे म्हणति तुजला भक्तगण हे ।। ५६.१


तुझ्या नेत्रांची गे घसट तव कर्णांसह अशी

पहाता भीतीने कमल अन मासे बिथरती 

करी कर्णांसी का नयन चुगली हे मम अशी

विचाराने ऐशा विचलितचि होती उभयही ।। ५६.

 

‘‘सुदीर्घा नेत्रांचा बहु निमुळता सुंदर असा

सरोजे चोरीला किति सुबक आकार मम हा 

अहो मत्स्यांनीही तरलपण माझे उचलले’’

असे का कर्णांसी तव नयन हे सांगत असे ।।५६.३

 

तुझ्या क्रोधाचे गे हृदयि भय वाटूनचि उमे

जळी मासोळी ही लपुन, मिटते ना नयन गे 

दलांची दारे ही मिटवुनचि इंदीवर बसे

जरी स्पर्शे त्यासी रविकिरण, ना हे तरि हसे।।५६.४*

-----------------------------------

श्लोक ७-

हे जननी, तुझ्या लोचनांचे सौंदर्य काय वर्णन करू? एखाद्या नीलकमलाप्रमाणे ते मनमोहक, सुंदर आहेत. कमळाच्या कळीच्या आकाराप्रमाणे मधे टपोरे असलेले तुझे नेत्र दोन्ही कडांना निमुळते होत गेले आहेत. तुझे हे दीर्घ नेत्र पाहून जणु काही नीलकमलाची कळी उमलत आहे की काय असेच वाटावे. उमलणार्‍या कमळाचे सौंदर्य वाढत जाते त्याप्रमाणे तुझ्या अर्धोन्मिलीत नेत्रांना उघडतांना त्यातून अमृतमय कृपेचा वर्षाव होत आहे. माय तुझ्या ह्या दृष्टीच्या कृपा वर्षावात आम्हा दीन जनांना न्हाऊ घाल. तुझ्या ह्या कृपासागरात यथेच्छ डुंबत आम्हाला  चिंब चिंब होऊ दे.

आमच्यावर/ (माझ्यावरही) तू जर अशा कृपादृष्टीची पखरण केलीस तर तुझं काही कमी होणार आहे का गं? का तुझं तिळभर तरी ऐश्वर्य कमी होणार आहे? तुला त्यासाठी काही वेगळी कौडीही खर्च करावी लागणार नाही वा तुझी काही हानीही होणार नाही. माय हा तर सज्जनांचा स्वभावच आहे. त्यांच्या हृदयात हा माझा हा परका असा भेदभाव नसतोच मुळी. अत्यंत शीतल अशा चांदण्याचा वर्षाव करणारा हा सुधाकर, हा हिमकर, चंद्र कधी तरी हा भव्य प्रासाद आहे तर हे अरण्य आहे; हा महाल ही झोपडी असा भेदभाव करतो का? मला खात्री आहे. असा भेदभाव तुझ्या मनात नाहीच मुळी. तू तुझ्या सर्व भक्तांकडे अत्यंत समभावाने, अत्यंत कृपाळु नजरेनेच बघतेस. तुला नमन माते!

दृशा द्राघीयस्या दर-दलित-नीलोत्पलरुचा

दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे ।

अनेनायं धन्यो भवति न च ते हानिरियता

वने वा हर्म्ये वा सम-करनिपातो हिमकरः ।।५७ ।। *

( दृशा – डोळे, कमळ. द्राघीयस् – दीर्घ, खूप लांब. दरदलित – विकसित. उत्पल – कमळ. निलोत्पल – निळे कमळ. दवीयस् – दूर. कुठे दूरवर. स्नप – स्नान करणे, शिंपडणे, डुबकी मारणे. हर्म्यम् – प्रासाद, महाल, विशाल भवन. अयं – येथे हा दीन जन म्हणजेच आम्ही भक्त.  समकरनिपातः  - सारख्याच किरणांचा वर्षाव करतो. हिमकर – ज्याचे किरण अत्यंत शीतल आहेत असा चंद्र.

*निळ्या रंगाच्या ह्या कमल-कलिकांच्या सम तुझ्या

सुदीर्घा नेत्रांनी विकसित जरा अस्फुट अशा 

पहा दीनार्तासी क्षणभरचि गे वत्सलपणे

कृपेच्या धारांनी भिजवि सकलांसी जननि गे ।। .१ ।।

 

कृपादृष्टीने गे जननि तव ह्या मंगलमयी

करावे जन्माचे समुचितचि कल्याण ममही 

उणे ना होई गे तिळभरहि ऐश्वर्य तव हे

व्ययाने मायेच्या विभव तव वृद्धिंगत करे ।। .।।

 

नसे हानी काही क्षिति न तुज येई लवभरी

तुझी माया सर्वांवर समसमा  ही बरसवी 

जनी प्रासादी वा बरड अति माळावर वनी

सुधा धारा सर्वांवर बरसवी अंबरमणी ।। .३ ।।*

----------------------------------------------------

श्लोक ५८

 ‘ग’ म्हणजे इकडे तिकडे जाणारा, हलु शकणारा. ‘अग’ म्हणजे जो इकडे तिकडे फिरू शकत नाही म्हणजे पर्वत. तर ‘राजन्य’ म्हणजे श्रेष्ठ. हे माय! तू त्या सर्वश्रेष्ठ नगाधिराज हिमालयाची (राजन्य-अग) ची तनया आहेस. तनु म्हणजे शरीर आणि त्याच्या शरीरापासूननिर्माण झालेली ती तनया म्हणजे मुलगी आहेस.

तुझ्या कानाच्या पाळ्या(पाली) अत्यंत कमनीय आहेत. जणु काही सुंदर महिरापच रेखावी अशा सुंदर आहेत. ह्या धनुष्याकृती कमानदार, बाकदार कानाच्या पाळ्या पाहून कोणालाही कौतुकाने हे कामदेवाचं/ मदनाचं धनुष्य आहे असंच वाटावं. तुझ्या ह्या लांबलचक दीर्घ नेत्रांमधून निघणारे दृष्टीचे हे तिरके कटाक्ष नेत्रांच्या मागे असलेल्या ह्या धनुराकार असलेल्या कानांच्या धनुष्याला बाण लावल्याप्रमाणे लगटून जात आहेत. मदनाने त्याच्या पुष्प धनुष्याला बाण लावावा तशी तुझी डोळ्याच्या कोपर्‍यांमधून बाहेर पडणारी दीर्घ नजर  तुझी स्तुती गाणार्‍या  तुझ्या भक्तांच्या किंवा देवांचेही गुरूवर असलेल्या बृहस्पतीचेही हृदय वेधून घेत आहे. माय तुझ्या भक्तांची तुझ्या सुंदर कानांच्या पाळ्यांवरून आणि  अत्यंत मनोहर अशा दृष्टीवरून नजर हलत नाही. त्यांच्या हृदयात तुझ्या ह्या अनुपम चेहर्‍याशिवाय बाकी काहीच विषय वा विचार नाहीत.

अरालं ते पालीयुगलमग-राजन्य-तनये

न केषामाधत्ते कुसुम-शर-कोदण्ड-कुतुकम् ।

तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलस-

न्नपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धान-धिषणाम् ।। ५८ ।। *

( अरालकमानदार, धनुष्याकार, बाकदार. पालीकानाची पाळी, कान. अग पर्वत. राजन्यश्रेष्ठ म्हणजे पर्वतश्रेष्ठ हिमालयाची तनया/मुलगी /कन्या तिरश्चीन – पार्श्वस्थ, तिरका, अनियमित. अपाङ्ग -डोळ्याचा कोपरा. व्यासङ्ग – संयोग,  एकनिष्ठता, चिकाटीने एखादी क्रिया करत राहणे. अपाङ्गव्यासङ्ग- डोळ्यांच्या कोपर्‍यातून कटाक्ष टाकायची सवय. श्रवणपथम् उल्लङ्घ्य – कानांच्या मार्गाचे उल्लंघन करून.  कुसुमशर -      फुलांचा बाण वापरणारा अर्थातच मदन. कुतुकम – कौतुक, कुतुहल, जिज्ञासा. धिषणाम् – स्तुती गाणार्‍यांचे , भक्तांचे. )

अगे ह्या कानांच्या अतिव कमनीया धनुसमा

तुझ्या ह्या पाळ्या गे बघुनि मनि दाटे कतुहला 

कमानी कानांच्या मदन धनु का हे विलसते

असे दाटे मोठे कुतुहल जनांच्या हृदयि गे।। ५८.

 

कटाक्षासी टाकी हळुच तिरक्या तूच सहजी

तुझी चित्ताकर्षी जननि बहु मोहे सवय ही 

अशी दीर्घदृष्टी जननि तिरकी सुंदर अती

अगे जाई उल्लंघुन तव श्रुती मार्ग जननी ।। ५८.

 

श्रुती दृष्टीचे हे शर-धनु तुझे रम्य जननी

करे जे भक्तांचे हृदय-शरसंधान जननी 

तुझ्या चित्ताकर्षी विमलचि कटाक्षेच जननी

करी भक्तांचे तू अति सहज कल्याण जगती ।। ५८.३ *

----------------------------------

श्लोक ५९ -

हया जगज्जननीच्या कानाच्या पाळ्या किती सुबक नक्षीदार धनुष्याप्रमाणे कमनीय आहेत हे आपण मागच्या श्लोकात पाहिले.

हे माय! तुझ्या कानात हिरे, माणिक, मोती इत्यादि रत्नांची अत्यंत सुंदर कलाकुसर असलेले तुझे कुंडल /झुमके पाहिल्यावर कानांमुळे कुंडलांना शोभा आली का कुंडलांमुळे तुझे कान अजून सुंदर दिसू लागले हे सांगणे अवघड आहे. ह्या मणिमय कुंडलामधून विविध रंगाचा प्रकाश फाकला आहे. पूर्ण चंद्रामुळे सायंकाळ सुंदर होते. तर सांज होताच चंद्राचे तेज वाढत जाते; तर शशी आणि निशा दोघांमुळे आकाशाला अलौकिक शोभा प्राप्त होते. तसच काहीसं येथेही दिसून येत आहे. माय तुझ्या चेहर्‍याची त्वचा जणु आरशासारखी अनुपम नितळ आहे; त्यामुळे ह्या कुंडलांचं प्रतिबिंब तुझ्या गोबर्‍या गालाच्या त्वचेवर स्पष्ट दिसून येत आहे. तुझी ही कुंडले तुझ्या कानांचीच नाही तर गालांचीही शोभा वाढवत आहेत.

अशी तजेलदार त्वचा तारुण्य व निरोगी शरीराचं जणु प्रतिक आहे.

कानाच्या पाळ्या सुंदर! त्यात घातलेले रत्नजडित कुंडल सुंदर! त्या दिव्य अनमोल रत्नांची विवध रंगी प्रभा सुंदर! आणि जगज्जननीच्या अत्यंत नितळ गालांवर पडलेलं त्याच अलौकिक प्रतिबिंब नुसतं कल्पनेनी नजरेसमोर तरळणं मनाला अलौकिक आनंदाची अनुभूती दिल्याशिवाय रहात नाही.

आपण जर वेरूळच्या लेण्यांना भेट दिली तर शंकर पार्वतीच्या लग्नाच्या प्रसंगात पार्वतीने घातलेले नखशिखांत दागिने आपल्याला नक्कीच मोहवून टाकतील. त्यात पार्वतीच्या कानातील गोलाकार कुंडल (इअररिंग्ज) तिच्या गालांना व खांद्याना स्पर्श करतांना दिसतात. त्यावरून आचार्यांच्या श्लोकातील कल्पना जास्त स्पष्ट होईल.

``वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले’’ अशा राधेच्या वर्णनाआगोदर सौंदर्यलहरींमधे श्री आद्य शंकराचार्यांनी पार्वतीच्या कुंडलांचं केलेलं वर्णन मोठं बहारदार आहे. पार्वतीच्या कानातील गोल गोल मोठीमोठी सोन्याची कुंडले; त्यावर अनेक हिरे, पाचू आणि मौल्यवान रत्ने जडवली आहेत. हे जसे पार्वतीच्या ऐश्वर्याचं हे वर्णन आहे त्याचप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी भारतातील भरभराटीत असलेल्या उद्योगधंद्यांचेही द्योतक आहेत.

विश्वविजयी मदनाने महादेवांना जिंकण्यासाठी आपण असमर्थ आहोत, आपले फुलांचे बाण शिवासाठी कुचकामी आहेत हे पाहिल्यावर लावण्यवती पार्वतीच्या सुंदर मुखाचाच रथ केला. अनंगच तो! अंग तर नाही पण मन आणि भावना तर आहेत! तिची रथाच्या चाकाप्रमाणे असलेली वर्तुळाकार  कुंडले आणि तिच्या गोबर्‍या नितळ गालांवर पडलेलं रत्नकुंडलांचं गोल मनोहारी प्रतिबिंब ह्या चार चाकांचा (चतुश्चक्रं) रथ करून महादेवांना जिंकायला निघालेला अनंग एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला पृथ्वीचा रथ, सूर्य चंद्राची चाके असा प्रचंड जामानिमा घेऊन मोठ्या तयारीनिशी महेश्वर, महादेव अनंगाशी लढायला सज्ज झाले खरं,--- पण अरेरे! मदनानी उमेच्या आननमयी रथात बसून विजयाचा ध्वज फडकावला. पार्वतीच्या लावण्यापुढे शिवाचा सपशेल पराभव झाला.

स्फुरद्गण्डाभोग प्रतिफलित-ताटङ्क-युगलं

चतुश्चक्रं मन्ये तव मुखमिदं मन्मथरथम् ।

यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दु-चरणं

महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते ।। ५९ ।। *

( गंड – गाल; ताटङ्क युगलं – कानातील कुंडलांची जोडी, बाळ्या, प्रतिफलित – प्रतिबिंबित होणे.  मन्मथरथम् – मदनचा रथ. द्रुह्यत् -षडयंत्र करणे, हानी पोचवणे. अवनिरथ – पृथ्वीचा रथ. अर्केन्दु – अर्क – सूर्य, इन्दु – चंद्र. चरणम् – रथाची चाके. महावीर – महापराक्रमी. मारमदन. मन्मथमदन.  प्रमथपति – भगवान शिव. )

तुझ्या कानी दोन्ही डुलती बघ जे कुंडल कसे

सुवृत्ताकारी हे कनकमणि कांतीयुत असे 

तयांची तेजस्वी विमल प्रतिमा ही उमटते

सुवृत्ताकारी ह्या तव नितळ गालांवर उमे ।। ५९.१

 

तुझ्या कानीचे दो अनुपम असे कुंडल अहा

तुझ्या गाली त्याच्या सुबक प्रतिबिंबास बघता 

अनंगाचा वाटे रथ पवनवेगे उधळला

कशी चारी चाके करिति मन संमोहित पहा ।। ५९.२

 

रथी बैसोनीया अबलख तुझ्या आननमयी

अनंगाची स्वारी सुविजय पताका फडकवी  

महा तेजस्वी हा मदन लढण्या सज्जचि गमे

शिवासंगे युद्धा तव मुख तया आश्रय पुरे ।। ५९.३

 

करोनी पृथ्वीचा रथ शिव उभा सज्ज लढण्या

रवी चंद्राची ही अतुट तयि चाके कणखरा 

 असे स्वामी मोठा सकलचि गणांचा अधिपती

तुझ्या लावण्याचा मदन परि होतोच विजयी ।। ५९.४।। *

-----------------------------------

श्लोक ६० –


हे माय! तुझ्या सर्वच गोष्टी अनुपम आहेत. तुझे मृदुल घनदाट केस असोत, सरळ, लांब भांग असो, तुझं भव्य कपाळ असो, विशाल नेत्र असोत, गोबरे गाल असोत वा तुझी मधुर वाणी असो! त्याची बरोबरी कशासोबतही होऊ शकत नाही. माय तू बोलू लागलीस की तुझं बोलणं इतकं अर्थगर्भ, रसाळ, नादमय असतं की अमृताच्या सागरातून उठणार्‍या लाटांचा नाद सुद्धा इतका सुमधुर नसेल. अमृताची प्रसन्नता, मृतामध्येही चैतन्य निर्माण करण्याचं कौशल्य/ सामर्थ्यही थोटे वाटावे अशी अथांग प्रसन्नता, असे असीम सामर्थ्य तुझ्या वाणीत आहे. तू पद्यात म्हटलेल्या सूक्तांमधे आहे. ऐकणार्‍याचं मन मोहरून जावं, त्याच्या हृदयाची तार झंकारून उठावी, तुझं बोलणं नुसतं ऐकतच बसावं अशा अमृताचा वर्षाव करणार्‍या शब्दमाला तुझ्या मुखातून स्रवत असतात, एखाद्या वीणेच्या झंकाराप्रमाणे तुझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ऐकल्यावर प्रत्यक्ष सरस्वतीही मंत्रमुग्ध होऊन जाते. तुझा प्रत्येक बोल कानांच्या ओंजळी करून, त्यात साठवून त्यातील एकही अमृतमय शब्द खाली पडु नये अशी खबरदारी घेत शारदाम्बा तो प्राशन करत असते. म्हणजेच अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकत असते.

तुझी ही मंजुळ वाणी ऐकून प्रत्यक्ष शारदाम्बाही क्षणोक्षणी तुला वाहव्वा म्हणून दाद देतांना, तुझं कौतुक करतांना थकत नाही. तुझ्या वाणीने मोहित झालेली सरस्वती आनंदानी मान डोलावत असताना तिच्या कानातील झुमके/ भोकरं किंवा लोंबती कर्णफुले हालून, त्यातून निघणारा मंद असा किणलिकिण आवाज जणु काही माय! तुझ्या प्रत्येक वचनाला अनुमोदन देत असतो. माय तुझी वाणी धन्य आहे. माझ्यासारख्या दीनालाही तुझ्या वाणीच्या अमृताचा लाभ घडो. माते तुला नमन!

 सरस्वत्याः सूक्तीरमृत-लहरी-कौशल हरीः

पिबन्त्याः शर्वाणि श्रवणचुलुकाभ्यामविरलम् ।

चमत्कार-श्लाघा-चलित-शिरसः कुण्डलगणो

झणत्कारैस्तारैः प्रतिवचनमाचष्ट इव ते ।। ६०।।  *

 (कौशल- कुशलता, क्षेम, प्रसन्नता, समृद्धि, चतुराई. सूक्ती – ऋचा किंवा पद्यांचा समूह.  चुलुक – ओंजळ. शर्व – भगवान शंकर. शर्वाणी - शर्वाची पत्नी, पार्वती. चमत्कार – विस्मय, आश्चर्य, काव्यसौंदर्याची अनुभूती. श्लाघा – प्रशंसा, स्तुती. चलित शिरसः – मान डोलावणे झणत्कार – (येथे) कानातील कुंडल हालण्यामुळे त्यांचा होणारा किणकिण आवाज. प्रतिवचन – दिलेली दाद. अविरल – सतत, निरंतर, नित्य, अखंड, चुलुका – ओंजळभर.)

 शिवे! शर्वाणी गे ! असशि शिव-अर्धांग-युवती

तुझी वाणी माते मधुमधुर ही अद्भुत अती 

सुधासिंधूच्याही उठति लहरी नादमय ज्या

सुधा कल्लोळा ना सर मधुर वाणीसम तुझ्या ।। ६०.।।

 

करे चैतन्याचा मृत तनुत संचारचि सुधा

मना संतोषाचे अमुप वर दे अमृत सदा 

परी माते सूक्तांपुढति तुझिया अमृत फिके

सुधेच्या कौशल्या सहज हरवी शब्द तव गे ।। ६०.।।

 

अगे ब्रह्माणीही श्रवण करि संभाषण तुझे

करोनी कानांची अतिकुशल ती ओंजळ उमे 

कधी आश्चर्याने प्रमुदित मने वा सहजची

वहाव्वा! बोलोनी हलवित असे मान अपुली ।। ६०. ३  ।।

 

सवे मानेच्याही हलति सहजी कुंडल तिचे

करी ते नादासी किणलिकिण माधुर्यमय ते 

तुझ्या शब्दांना ती सुरमय पहा सम्मति असे

तुझ्या ह्या बोलांनी मजसि करि गे तृप्तचि शिवे ।। ६०. ।। *

-------------------------------------

श्लोक     1 - 20

श्लोक  21 – 41

श्लोक  61 – 80

श्लोक  81 – 100

No comments:

Post a Comment