**।। सौन्दर्यलहरी ।।**
( विश्लेषण – श्लोक ६१ – ८० )
श्लोक ६१-
तुहिन म्हणजे हिम. तुहिनगिरी म्हणजे हिमालय. ज्या प्रमाणे फडकणारी ध्वजपताका ही
एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची, सैन्याची वा देशाची अस्मिता असते; गौरव चिह्न असते; त्यांच्या
कीर्तीचा डंका चहुदिशी वाजवत असते; त्याप्रमाणे हे माते! तू त्या हिमालयाच्या कुळाचे
भूषण आहेस. हिमालयाच्या वंशांची ध्वजा ( ध्वजपटी)
आहेस. त्याच्या कीर्तीचा डंका तुझ्या उत्तुंग पराक्रमामुळे, उज्ज्वल यशामुळे सर्वत्र
गाजत आहे. तुझ्या गुणांमुळे जशी तुझी उज्ज्वल कीर्ती सर्वत्र पसरली आहे तशी तुझ्या
लावण्याची कीर्तीही सुदूर पसरलेली आहे. तुझा नासावंश म्हणजे नाक चाफेकळी प्रमाणे सरळ
सुंदर आहे. जसा बांबू सरळ असतो तसे सरळ आहे. तुझे हे चाफेकळी प्रमाणे सुंदर असलेले नाक आम्हाला
जी उचित आहेत, योग्य आणि उपयुक्त आहेत अशी सर्व फळे मिळवून देवो.
येथे वंश ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. कुल/कुळ आणि कळक/ बांबू. सरळ वाढणार्या बांबूमधे आणि नासावंश म्हणजे सरळ नासिकेत असलेलं साम्य येथे दाखवले आहे. बांबूची जाडी फार नसते. तो सरळ असतो. असं म्हणतात की बांबू मधे मोती तयार होतात./सापडतात. माय! तुझ्या ह्या सरळ नासावंशावर /नाकावर बाहेर तू मोठा पाणीदार मोती धारण केला आहेस. इतकेच नव्हे तर तुझा नासावंश त्या वंश म्हणजे बांबू प्रमाणे नाकाच्या आतही मोत्ये धारण करतो.
शिशिरकर म्हणजे चंद्र. येथे त्यांना चंद्र नाडी असे सुचवायचे
आहे. म्हणजे डावी नाकपुडी. डाव्या नाकपुडीला
इडा नाडी असे म्हणतात तर उजव्या नाकपुडीला पिंगला नाडी म्हणतात. ह्या डाव्या नाकपुडीतून
बाहेर पडणार्या वार्यामुळे, म्हणजे निःश्वासामुळे, तुझ्या नासावंशाने आतही मौक्तिके/
मौक्तिकालंकार धारण केले आहेत हे दिसत आहे. तू जर तुझ्या चंद्रनाडीत मौक्तिके धारण
केलीच नसतीस तर ती बाहेर पडणार्या श्वासासोबत ती कशी दिसली असती? तुझ्या मौक्तिक अलंकारांची
शोभा अवर्णनीय आहे. तुझा हा नासादंड/ नासावंश आमचे कल्याण करो.
असौ नासावंशस्तुहिनगिरिवंश-ध्वजपटि
त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् ।
वहत्यन्तर्मुक्ताः शिशिरकर-निश्वास-गलितं
समृद्ध्या यत्तासां बहिरपि च मुक्तामणिधरः ।। ६१
(तुहिन - हिम तुहिनगिरी – हिमालय. नासावंश – नाक. ध्वजपटि – झेंडा.
फलतु – फळ प्राप्त करून देवो. शिशिरकर – चंद्र. शिशिरकर-निश्वास-गलितं – डाव्या म्हणजे चंद्र नाडीतून बाहेर पडणारा निश्वास/ बाहेर पडणारा वायू
. मुक्तामणि – मोती. नेदीयस- निकट,
जवळ येऊन)
*गिरींचा राजा जो गिरिवरचि उत्तुंग जगती
हिमाद्रीची त्या तू अति सरस कन्याच असशी।
ध्वजा तू वंशाची हिमगिरिस तू भूषण असे
मनासी मोहे गे तव सरल हे नाकचि उमे ।। ६१. १।।
तुझ्या नासावंशा सरळ बघुनी, ये मम मनी
अगे शोभे बांबूसम सरळ हे नाक तुजसी
मिळे मोती वंशी जननिच वदंता अशि असे
तुझ्या नासावंशा चपखलचि लागू पडतसे ।। ६१. २।।
(बांबूला कळक अथवा वंश म्हणतात. )
इडा नाडीतूनी जननि तव निःश्वासस्वरुपी
अगे ये बाहेरी जननि जणु मुक्तावलिच
ही
असे बाहेरीही सुबक नथ मोत्यांचिच अहा
असे अंतर्बाह्यी मणिमय सजे नाक तव गा ।। ६१. ३।।
महत्भाग्याचे हे सरळ तव गे नाकचि उमे
अम्हा ‘सोऽहं’ प्राप्ती घडवुनचि कल्याण
करू दे
अगे ब्रह्मज्ञाने सफलचि घडो जन्म अमुचा
तुला आलो माते शरण चरणी वंदन तुला ।।
६१.४ ।।
----------------------------------------------
श्लोक ६२ –
लवण म्हणजे मीठ. पदार्थात लवणाची मात्रा अगदी बरोब्बर जमायला
लागते. मीठ चवीपुरतंच लागतं. तरीही योग्य मात्रेत लागतं. साखर थोडी कमी जास्त झालेली
चालते; मीठाचं तसं नाही. मीठाप्रमाणे अवयवांच्या प्रमाणबद्धतेचं, सौंदर्याचं, संतुलन
साधणार ते लावण्य असतं. थोडं काही कमी नाही किंवा काही जास्त नाही. एखाद्या सुंदर स्त्रीचे
डोळे सुंदर असले तर नेमके दात वेडेवाकडे असतील. लावण्यात सर्व अवयवांचं सौंदर्य गणलं
जातं. त्रिपुरसुंदरीचं लावण्य हे अनुपम आहे. तिचे कुरळे, काळे रेशमी केस असोत, भांग
असो , कपाळ असो, नासिका असो वा दात असोत. सर्व काही आखीव रेखीव सुंदरच आहे. सौंदर्याचं
परिमाण ठरवणारे आहेत. त्याचप्रमाणे त्या सर्वांची एकमेकांशी संगतवार जुळणीही मोठी अबलख
आहे. ज्याप्रमाणे एखाद्या अप्रतिम सुंदर रत्नहारामधे विविध आकाराच्या कोंदणात नेमक्या
आकारची आणि रंगसंगतीची रत्नं बसवलेली असतात त्याप्रमाणे त्रिपुरसुंदरीचे अवयव अन् अवयव
दुसर्या अवयवाला अत्यंत पूरक आणि शोभायमान करणारे असेच आहेत.
तिचे दात मोत्याच्या
माळेप्रमाणे एकसारखे, चमकदार आणि पांढरे शुभ्र आहेत. म्हणुन तिला सुदती/सुंदर दातांची
म्हटलं आहे. पांढर्या शुभ्र दातांना झाकणारे तिचे ओठ हेही अत्यंत कमनीय, आरक्त आणि
आणि रसरशीत आहेत. तिच्या ओठांची ही रसरशीत लाल कांती नैसर्गिक आहे. त्यावर अजुन कुठला
लालिमा लावलेला नाही. तिच्या नैसर्गिक लाल ओठांचं वर्णन करायचं झालं तर, पोवळ्याच्या
वेलीला जर का आरक्त रसरशित फळ आलं तर त्याचा तो कोवळा, तजेलदार गडद आरक्त वर्ण कसा
असेल त्याप्रमाणे ह्या ललिताम्बिकेचे ओठ अत्यंत सुंदर आहेत.
पण ----!
पोवळ्याची वेलही नसते वा तिला आरक्त फळं ही येत नाही.
कोणी म्हणेल मग पिकलेली
तोंडली (बिम्बम्) नाही का लालबुंद दिसत? त्यांची उपमा द्यायला काय हरकत आहे? पण!
---- ह्या जगात जेवढे म्हणून रंग आहेत ते सर्व ह्या जगदम्बेपासूनच पदार्थांना मिळालेले
आहेत. तिच्या ओठांचा हा लाल रंगही असाच! तोंडल्यांनी हा रंग तिच्या ओठांपासूनच घेतला
आहे. मग ते तिच्या ओठांबरोबरच्या तुलनेत कसे टिकाव धरून राहतील? उलट आमच्या मायच्या
ओठांचाच आरक्तवर्ण आम्ही घेतला आहे असं सांगून ती तोंडल्याची वेल शरमेने खाली मान घालून
उभी राहील.
माय! तुझ्या ओठांच्या अरुण वर्णाशी तुलना करावी असं ह्या जगात
काहीही नाही, तो झळाळणारा तुझ्या रसरशीत ओठांचा अरुणवर्ण आमचं कल्याण करो. माय! तुला
नमन!
प्रकृत्या रक्तायास्तव सुदति दन्तच्छद-रुचेः
प्रवक्ष्ये सादृश्यं जनयतु फलं विद्रुमलता ।
न बिम्बं तद्बिम्ब-प्रतिफलन-रागादरुणितं
तुलामध्यारोढुं कथमिव विलज्जेत कलया ।।६२
(सुदती – सुंदर दात असलेली. दन्तच्छद – दातांचं आाच्छादन म्हणजे ओठ. विद्रुमलता – प्रवाळाची/ पोवळ्याची वेल. बिम्ब – तोंडले (पिकलेले )
स्मिताने थोडेसे विलग तव होता अधरची
तुझ्या दातांच्या ह्या
अति धवल पंक्ती चमकती
तुझ्या ओठांचे गे रसरशित आरक्तपण हे
तयांची ही कांती अति
सहज नैसर्गिक असे ।। ६२.१
तयांना साजेशी मजसि उपमा ना सुचतसे
जगी नाही काही तव अधरकांतीसम दुजे
पहाया साम्यासी तव अधरयोग्या नच दिसे
जगी या काहीही तव अधरलालीसम भले ।। ६२.२
प्रवाळाची वेली जरि कधिच हो अंकुरित गे
जरी येई त्यासी अति मधुर आरक्त फळ ते
तरी ओठांसंगे क्षणिक
तुलना होऊ शकते
परी या वेलीसी नचचि कधि
अस्तित्त्व कुठले ।। ६२.३
म्हणावे ओठांसी जणु पिकलि
ही तोंडलि असे
परी तेही खोटे तव ``अधर-वर्णा’’ जग धरे
जगी लालीमा गे जननि दिसतो, तो तुजमुळे
असा आरक्ताचा अधरमहिमा
हा तव असे ।। ६२.४
मिळे लालीमा हा तुजकडुन
तोंड्ल्यास पुरता
तरी त्याची कैसी तवचि
अधरांसीच उपमा
अगे लज्जेने ती शरमुनचि
बोलेल लतिका
मिळाला आम्हासी तुजकडुन
हा रंग बरवा ।। ६२.५
----------------------------------------------
श्लोक ६३ -
माय! तुझा हा कोजागरीच्या
चंद्राप्रमाणे असलेला चेहरा आह्लादक आहे त्यात काही संशय नाही. तुझ्या चेहर्यावर पसरलेलं
हे मंद स्मित तुझ्या चेहर्यापुरतं मर्यादित न राहता ज्याप्रमाणे चंद्राचं शीतल चांदणं
सर्व जगतावर एखाद्या रुपेरी मुलायम आच्छादनासारखं पसरतं तस सार्या विश्वावर पसरून
त्याला मोहिनी घालतं.
एखाद्या शांत, गहन सरोवरात
मधेच एखादं अमृताचं फळ पडलं तर त्याच्या वर्तुळाकार उमटणार्या आणि शांतपणे पुढे सरकणार्या
तरंगलहरी जशा किनार्यापर्यंत पसरत जातील त्याप्रमाणे एकदा जरी मंद स्मितासाठी तुझे
ओठ विलग केलेस तर तुझ्यामधेच असलेल्या त्या प्रसन्नतेच्या लहरी तुझ्या स्मिताच्यारूपात
आनंदलहरी होऊन संपूर्ण विश्वावर प्रसन्नतेचं, शांत सौम्य आनंदाचं जणु जाळ पसरत जातात.
मला तर वाटतं की, चकोर पक्षी तुझ्या ह्या स्मित हास्याच्या चांदण्यानी
वेडावून, कायम तुझ्या स्मितहास्याच्या, धवल कीर्तीच्या, वात्सल्यमय चांदण्याचेच आकंठ
पान करत असतात. पण-----! तुझ्या ह्या अमृताप्रमाणे हास्याची मधुर चव सतत घेता घेता
त्यांच्या चोचीला (जिभेला) सुद्धा जरा जडपणा येत असावा. (चञ्चुजडिमा) किंवा सतत गोड गोड खाल्यानंतर जसं जिभेला दुसरं काहीतरी तिखट
खाण्याची इच्छा होते, किंवा दिवाळीचा खमंग फराळ खाऊन नंतर जसं काही दिवस फक्त वरणभात
वा कढीभात आणि लिंबाचं लोणचं खावसं वाटतं, त्याप्रमाणे त्या चकोरांना सुद्धा तुझ्या
स्मितहास्याची मधुर चव घेतल्यानंतर थोडी आंबट-तिखट कांजी प्यावी असं वाटत असणार. म्हणूनच
ते अधुन मधून आंबट, खारट कांजी प्रमाणे हा चंद्रप्रकाश पितात.
हे जगज्जननी हा अमृताहूनही गोड असलेला, चंद्रबिंबाहूनही शांत,
सौम्य, मधुर असलेला, सर्व जगताला मोहित करणारे ज्ञान अज्ञानाचं गूढ जाळं पसरवणारा हा
तुझा मुखचंद्रमा माझंही कल्याण करो. तुला अत्यंत नम्रभावे वंदन माते!
स्मितज्योत्स्नाजालं
तव वदनचन्द्रस्य पिबतां
चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा ।
अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचयः
पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया
।।६३
तुझे चंद्राहूनी स्मित मधुर आह्लादक अती
प्रभा त्याची शुभ्रा झिरपत असे सर्व जगती
चकोरां वेडावी मधुर चव हास्याचिच तुझ्या
सदा प्राशी तेची मधुरस्मित जोत्स्नेसम अहा ।।
६३.१
चकोरे प्राशीता अपरिमित जोत्स्नेसम स्मिता
तयांच्या चोचींना मधुर रस देई जडपणा
अती गोडासंगे तिखट कधि वा आंबट रुचे
अती माधुर्याने बदल रसना
मागत असे ।। ६३.२
शशी जोत्स्नेची ती म्हणुन कधि कांजी
निरस ती
चकोरासी वाटे पिउन बघतो
आंबट जरी
म्हणोनी स्वच्छंदे शशिकिरण प्राशी निरस
ते
अगे तो रात्रीसी चव-बदल व्हावी लव म्हणे
।।६३.३
सुधांशू तेजाच्या अमृतमय
त्या स्वादु लहरी
स्मिताच्या तेजाच्या
पुढति अति निकृष्ट गमती
जणु का तेजाचे उलगडत
जाळे स्मित तुझे
असे हे तेजस्वी मुखकमल
कल्याण करु दे ।। ६३.४
----------------------------------------------
श्लोक
अगे माते! काय ही तुझी ओजस्वी वाणी!
आपल्या पतिच्या गुण
मालिकेचे चाललेले तुझे हे अथक वर्णन म्हणु, का त्याच्या गुणांच्या कथा सरितेचा तुझ्या
मुखातून निरंतर वाहणारा प्रवाह म्हणु, का शिवाच्या ओजस्वी चरित्राचा हा सागर म्हणु?
तुझी सांगण्याची धाटणीही किती सुंदर आहे. शब्दांची पुनरुक्ती करून, पुन्हा पुन्हा एखादि
संकल्पना पटवून देऊन, यमक, अनुप्रास अशा असंख्य अलंकारांनी नटलेली तुझी वाणी ऐकतांना
श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत. खरोखरीच माते तुझ्या जिह्वेवर सरस्वती कायमचा निवास करत
आहे.
माते तुझी रसना निरोगी
असल्यामुळे आरक्त आहे. जणु काही त्या लालबुंद जास्वंदीची छायाच तुझ्या रसनेवर पडली
आहे असे वाटते. तुझ्या आरक्त जिभेच्या टोकावर बसलेली सरस्वती स्फटिकासमान स्वच्छ, पारदर्शी,
अत्यंत तेजस्वी, धवल आहे. शुभ्रवस्त्रा आहे. पण तुझ्या लालचुटुक जिभेच्या संपर्कात
आलेल्या स्फटिकाच्या शिल्पाप्रमाणे पारदर्शक सरस्वतीचा धवल देहही माणिक ह्या लाल रत्नाप्रमाणे
डाळिंबी तेजाने चमकत आहे. स्वतःचे रूप बदलून जणु माणकाचा देह धारण करत आहे. माय! तुझ्या रसनेचा महिमा अगाध आहे.
माय! तुझ्या वाणीतून अशा प्रकारे सतत शिव म्हणजे कल्याणकारी
सत्य सरिता वाहत असल्याने, तू जे बोलशील तेच घडून येतं. तुझ्या वाणीचा कायम विजय होतो.
तुला नमन माते!
अविश्रान्तं पत्युर्गुणगण-कथाम्रेडन-जपा
जपापुष्पच्छाया तव जननि
जिह्वा जयति सा ।
यदग्रासीनायाः स्फटिक-दृषदच्छच्छविमयी
सरस्वत्या मूर्तिः परिणमति
माणिक्यवपुषा ।। ६४
( आम्रेडन – पुनरुक्ती, पुन्हा पुन्हा रंगवून सांगणे. जपापुष्प –
जास्वंदीचे फूल. स्फटिक-दृषदच्छच्छविमयी ( स्फटिक + दृषद् + अच्छ + छविमयी ) स्फटिक -बिलोरी. दृषद् – शिळा. अच्छ – स्वच्छ, निर्मल, पारदर्शी. अच्छः
– स्फटिक. छविमयी. यदग्रासीना - यत् अग्र आसीना -टोकावर बसलेली. परिणमति-रुपांतरीत
होणे, बदलणे, परिवर्तन होणे. वपु – देह. माणिक्यवपु – माणिकाचा
देह.)
शिवाची ओजस्वी चरित-सरिता ही गुणमयी
मुखातूनी वाहे अविरत तुझ्या माय जननी
करीसी शब्दांची सुखद पुनरावृत्ति सहजी
सुवृत्ती गुंफूनी यमक अनुप्रासे सजवुनी
।। ६४.१
कथेच्या सौंदर्या बहु खुलविसी रोचकपणे
तयामध्ये जाती रसिक जन हे रंगुन पुरे
अहो जी तेजस्वी धवल स्फटिकाच्यासम दिसे
अगे जिह्वाग्रे ती अमल मतिदात्री तव
वसे ।। ६४.२
निरोगी आरक्ता रुचिर रसना ही तव दिसे
पडे जास्वंदीची जणु अरुण छाया तिजवरे
अगे वाग्देवी ही नितळ स्फटिकाच्यासम
जरी
असे शुभ्रा कांती परि
बदलते रंग सहजी ।। ६४.३
जिभेच्या संपर्के दिसत जणु माणिक्यमय
गा
दिसे ती डाळींबी जणु अरुणवर्णा सुललिता
स्वतःच्या रूपासी बदलुन करे धारण जणू
अगे आरक्ता का बहु चमकती माणिक तनू
तुझ्या जिह्वेचा हा सकल महिमा उज्ज्वल
असे
करे भक्तीभावे नमन तुजला मी जननि गे ।। ६४.५।।
----------------------------------------------
श्लोक
हे माते, हे जगज्जनी तू शक्तिस्वरूप आहेस. रणांगणावर
लढणार्या योद्ध्यांना तू जोश, चैतन्य, स्फुरण देतेस. त्यांच्यामधे जिंकण्याची
विजिगीषु वृत्ती उत्पन्न करतेस. जेव्हा हे सर्व देव अत्यंत बलाढ्य, अत्यंत क्रूर,
अत्यंत मायावी अशा राक्षसांबरोबर मोठ्या शौर्याने, धैर्याने, प्राणांची बाजी लावून
लढतात आणि जिंकतातही तेव्हा; अत्यानंदाने, कौतुकाच्या अपेक्षेने, आणि आपल्या
हातावर कौतुकाने काही खाऊ प्रसाद म्हणून मिळावा ह्या पुत्रसुलभ अपेक्षेने ते
रणांगणातून थेट तुझ्याकडेच येतात. सर्वप्रथम तुला भेटण्याची त्यांची आतुरता,
उत्सुकता, उतावीळपणा सहज लक्षात येण्यासारखा असतो कारण रणांगणावरील पोशाखही न उतरवता, त्यांचा पराक्रम
सांगण्यासाठी ते तडक तुझ्याचकडे आल्याने त्यावेळी त्यांच्या अंगावरची चिलखतंही तशीच
असतात. ते काढायचही त्यांना भान नसतं. कधी एकदा मातेला भेटून तिला सारा वृत्तांत सांगतो अशी त्यांना
घाई झालेली असते. अंगावरच्या चिलखतांनीच, माथ्यावरील मुकुट काढून, ते तुला नमस्कार
करतात. जिंकलेल्या सर्व शत्रूंचे काढून आणलेले मुकुट ते तुझ्या पायी अर्पण करतात. माय
त्यावेळी तुझ्या मुखात असलेला त्रयदशोगुणी/दशगुणी विडा त्यांच्या मुखात भरवून तू
त्यांच कौतुक करतेस. तो तांबूल साधासुधा थोडाच असतो? (खाली काही श्लोक आनंद लहरी ह्या पार्वतीच्या वेगळ्या स्तोत्रातील देत आहे.) ( आनंदलहरी
)
उमे जाळोनीया सकल अवघे मीपण सुखे
चुना केला त्याचा धवल अति तू शुद्ध गिरिजे
मनाचा बुद्धिचा करुनी अडकित्ता चमकता
सुपारी फोडोनी कतरसि मनीषाच अवघ्या।।3.1
सदा शांतीच्या ह्या हरित मन पर्णावर सदा
विवेकाचा लावी अरुण रमणा कात बरवा
सुबुद्धीची घाली रुचकर अती वेलचि वरी
महा वैराग्याची परिमलयुता जायपतरी।।3.2
तयी भावार्थाचा अति रुचिर कर्पूर सजवी
दयाबुद्धीरूपी सुमधुर खडीसाखर गुणी
भवानी बांधोनी नित दशगुणी तांबुल असा
सुबुद्धीरूपी या ठसविसि लवंगा वर तया।।3.3
मुखामध्ये घोळे तव दशगुणी तांबुल असा
असा राहे जोची तव दशगुणी तांबुल मुखी
तुझ्या भक्तांना तो अनुपम सुखे दे मिळवुनी ।।3.4
( नामूलं लिख्यते किंचित् । असं मल्लिनाथ ह्या टिकाकाराने
म्हटलं आहे. मराठीत कृष्णाचा, नारायणाचा –
इत्यादि देवांचा विडा म्हणून काव्य असते. हा विडा दशगुणी किंवा त्रयदशोगुणी असल्याचे
उल्लेख आहेत. पण ह्या पारंपारिक रचनांचे रचनाकार अज्ञातच आहेत. त्यांच्या त्या कल्पनेवरूनच
वरील विडा अरुंधतीने शिखरिणी ह्या वृत्तात बांधलेला आहे. श्री आद्य शंकराचार्य विरचित
आनंदलहरी ह्या पार्वतीच्या स्वतंत्र स्तोत्रासाठी केला आहे.)
तुझ्या मुखीचा असा दशगुणी वा त्रयदशोगुणी तांबूल देवांना मिळाल्यावर
त्यांच्या नेत्रात आनंदाश्रू येणार नाहीत काय? तुझ्याकडून मिळणारा प्रसाद घेऊन ते धन्य
होतात.
खरे पाहता सार्या देवांचे देव, सर्व देवात श्रेष्ठ महादेव असतांना
हे सारे देव विजयश्री मिळाल्यावर सर्वप्रथम महादेवांच्या भेटीला न जाता तुलाच भेटायला
येतात कारण, शिवाला काही अर्पण केलं तर त्याने स्वीकारून जे काही उरेल त्याला निर्माल्य
मानलं जातं. त्यात चंडेश्वराचा अंश असतो असं म्हणतात. त्यामुळे तो प्रसाद म्हणून कोणी
ग्रहण करत नाही.
माते तुझं वात्सल्यच
वेगळं! पुत्रांप्रति असलेलं तुझं प्रेम तुला महादेवांहूनही श्रेष्ठ बनवतं. हे महादेवी,
माझं तुला नमन!
रणे जित्वा दैत्यानपहृतशिरस्त्रैः कवचिभि
र्निवृत्तैश्चण्डांश-त्रिपुरहर-निर्माल्य-विमुखैः
।
विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशि-विशद-कर्पूर-शकला
विलीयन्ते मातस्तव वदन-ताम्बूल-कवलाः
।।
अगे शौर्याची ती करुनिच महा शर्थ समरी
ध्वजा उंचावोनी जगति विजयाची पुनरपी
तुला भेटायाला सुरवर उतावीळ बनुनी
रणातूनी येती तडक तुजपाशीच जननी ।। ६५.१
सुवर्णा-रत्नांचे मुकुट रिपुचे काढुन रणी
तुला अर्पायासी सुरवर अती उत्सुक मनी
जयाची वार्ता ही प्रथम जननिसी कळविण्या
प्रशंसेचा पाठी सुखदचि फिरावा कर तुझा ।। ६५. २ ।।---
प्रसादाचा व्हावा अनुपमचि तो लाभ तुझिया
अशा ह्या आशेने नमन करण्या माय तुजला
जथे देवांचे हे नच उतरवीता चिलखता
शिरीचे काढूनी मुकुट करती वंदन तुला
।। ६५.३
अगे ह्या देवांना भरविसि स्वहस्तेच जननी
मुखीच्या तांबूला जणु तव प्रसादासम किती
तुझ्या तांबूलाने सकल म्हणती धन्य क्षण
हा
तुझ्या ह्या घासाने सकल सुर ते तृप्त
मनि गा ।। ६५.४
तुझ्या तांबूलाते अतिधवल कर्पूरचि असे
सुगंधी कर्पूरा बघुनि शशिखंडासम गमे
।
असे देवांमध्ये जरि शिव महा श्रेष्ठतम
हा
तरी ना कोणी हे प्रथम कधि या वंदिति
शिवा ।। ६५. ५
शिवाच्या पायी ते प्रथम करती ना नमन
गे
शिव स्वीकारोनी उरतचि असे जेचि सगळे
असे निर्माल्याचे प्रतिक तयि घेती न
कुणिही
असे चंडेशाचा म्हणति असतो अंशच तयी
।। ६५. ६
असे शंभूहूनी तवचि महिमा श्रेष्ठ जननी
महादेवाआधी प्रथम तुजला देव नमती ।।
६५. ७
----------------------------------------------
श्लोक ६६ -
ह्या गौरीचं बोलणंच भारी गोड! सगळ्यांनाच आपलसं
करणारं! अमृतालाही लाजवणारं! तिच्या ह्या
वात्सल्यमय वागण्याने नेहमी दोन स्त्रियांमधे असलेल्या मत्सरालाही कुठे जागा उरत
नाही. देवांचाही देव असलेल्या महेशाच्या जीवन सरितेला उमेची जीवन सरिता मिळाल्यावर
होणारा हा संगम इतका पवित्र इतका मनोहर आहे की स्वतः शारदाम्बा ह्या गौरीसमोर
बसून उमा महेशाच्या जीवनाची अद्भुत कथा
तिला गाऊन ऐकवत आहे. हया मतिदात्रीच्या वीणेतून झंकारणारे मधुर स्वर आणि तिची
स्तुतीरचना ऐकल्यावर गिरीजेलाही मान हलवत वाहव्वा! म्हणावसं वाटलं नाही तरच नवल! आपल्या
आपत्याचं कौतुक करतांना माता जशी थकत नाही त्याप्रमाणे शारदेचं कौतुक करतांना
गिरीजेच्या मुखातून जणु अमृतच बरसू लागलं.
गिरीजेच्या
मुखातून स्तुती ऐकल्यावर, तिच्या वाणीचं माधुर्य, ओज शब्द लालित्य ऐकल्यावर, तिचा नादमधुर स्वर
ऐकल्यावर, तिची सांगण्याची लोभस धाटणी पाहिल्यावर, तिचं बोलणं ऐकतच रहावं असं
सहाजिकच सरस्वतीला वाटलं. गौरीच्या ह्या निर्झराप्रमाणे खळाळत येणार्या
शब्दरचनेपुढे आपल्या वीणेचा झंकार अत्यंत
निरस आहे, तिच्यातून येणार्या बोलांना, हा गोडवा, ही गोलाई , ही मीण नाही, ही
नादमधुरता नाही हे पाहून सरस्वतीने हलकेच आपली वीणा गवसणी/ खोळ घालून खाली ठेवली.
विपञ्च्या गायन्ती विविधमपदानं पशुपते-
स्त्वयारब्धे वक्तुं चलितशिरसा साधुवचने
।
तदीयैर्माधुर्यैरपलपिततन्त्रीकलरवां
निजां वीणां वाणी निचुलयति चोलेन निभृतम्
।। ६६
(विपञ्चिका , विपञ्ची – वीणा.
अपदानम् – पवित्र आचरण, सर्वोत्तम कार्य, मान्य जीवनचर्या. तन्त्री –
वीणेची तार. निचुलयति – खोळ घालून ठेवणे. झाकून ठेवणे. चोल – खोळ, गवसणी.
निभृतम् – चुपचाप, शांतपणे खाली ठेवलेली. )
सुखे छेडूनिया सुरमधुर
वीणा स्तुति करी
अहो वाग्देवी ती गिरिश-गिरिजेची तरलशी
तयांच्या प्रेमाचे रसभरित ते वर्णन
करी
कधी हर्षााने ती परिणय प्रसंगास खुलवी
।। ६६.१
विषा कैसे प्राशी अविचल मने शंभु शिव
तो
वधीला कैसा तो कधि त्रिपुर उन्मत्त बहु तो
तिच्या शब्दा शब्दातुन जणु कथा रम्य सगळी
पुन्हा का साकारे सलग नयनांच्याच पुढती ।। ६६.२
तिच्या काव्यासंगे मधुमधुर झंकारत असे
तिच्या हातीची ती सुरमधुर वीणा सहज गे
स्तुती ऐकोनीया चपखल अती सुंदर अशी
उमा वेळावी ``वा!’’ म्हणुनचि मुदे मान सहजी ।।
६६.३
करे ब्रह्माणीचे मधुरवचने कौतुक किती
सुधाही लाजे का मधुर वचने ऐकुन तिची
अहो त्या माधुर्यापुढति मधु-वीणा निरस ती
म्हणोनी वाग्देवी त्वरित तिज घाले गवसणी ।। ६६.४
----------------------------------------------
श्लोक ६७
सुहृदहो!
( एका एका श्लोकासवे आपण पुढे जात असतांना; जणु काही गुंडाळी करून ठेवलेलं त्रिपुरसुंदरीचं सुंदर चित्र उलगडत जात आहे आणि आपण अत्यंत कुतुहलानी
अचंबित होऊन अजुन अजुन ते कसं आहे हे बघत राहिलो आहोत असं मला वाटतय! हे पार्वतीमातेचं अप्रतिम शब्दशिल्प आपल्याच अज्ञानाच्या
आवरणाखाली झाकललं होतं. त्यावरील आवरण जसं जसं दूर होत जाईल तसतशी पार्वतीची सुंदर
मूर्ती आपल्या नजरेसमोर साकार होत जाईल. तिचे सुंदर भुरभुरणारे रेशमी केस, सुंदर भांग,
आकर्ण नेत्र, महिरापीसारखे कान, सरळ नाक, पोवळ्याचा लालिमा असलेले ओठ, गोबरे गाल बघता
बघता त्या शब्दशिल्पावरील अवगुंठन अजून थोडं दूर होत तिची सुंदर हनुवटी आज आपण पाहणार
आहोत.)
हे गिरिजे,
बालपणी तुझे सद्गुण, तुझ्या चेहर्यावरचा गोडवा, बालसुलभ निरागस
भाव, गोजिरेपणा पाहून वात्सल्याने तुझा पिता, हा हिमालय (तुहिनगिरी) तुझी सुंदरशी हनुवटी
(चुबुक) हलकेच हाती धरुन तुझ्या माथ्याचे चुंबन घेत असे. त्याला तर तू म्हणजे त्याच्या
मुकुटात खोचलेला नवरत्नांचा तुराच वाटतेस.
तारुण्यात शंभूमहादेवांसोबत असताना लज्जेने तुझी मान खाली जाता, महेश बोटांच्या अग्राने हळुच तुझी हनुवटी वर उचलून त्याच्याकडे वळवून तुझा झुकलेला चेहरा वर करतात. तुझे नेत्र त्यांच्या नेत्रांना भिडताना, तुझं पारदर्शक मन तुझ्या नेत्रातील विभ्रमातून, तुझ्या चेहर्यावरील निरागस भावांमधून प्रचितीला येतं. आणि म्हणुनच तुझ्या ह्या चेहर्याचा आरसा करून शंभू स्वतःचे विश्वरूप जणु तुझ्या चेहर्याच्या दर्पणात बघत असतात असं मला वाटतं. मित्रांनो येथे आरशाचा उल्लेख ‘मुकुर’ असा केला आहे. मुकुर म्हणजे चेहरा बघण्यासाठी छोटी मूठ असलेला आरसा. (ही छोटीशी मूठ हातात धरून आपला चेहरा निरखणार्या लावण्यवती आपल्याला लेण्यांमधे पाहिल्याचे आठवत असेल.)
तुझी ही सुंदरशी निमुळती
हनुवटी म्हणजे तुझ्या पारदर्शक ‘आनन-आरशाची’ सुंदर मूठ आहे. दुसरी कुठलीही योग्य उपमा तुझ्या
हनुवटीस नाही. तुझी हनुवटी अनुपम सुंदर आहे.
कराग्रेण स्पृष्टं तुहिनगिरिणा वत्सलतया
गिरीशेनोदस्तं मुहुरधरपानाकुलतया ।
करग्राह्यं शंभोर्मुखमुकुरवृन्तं गिरिसुते
कथंकारं ब्रूमस्तव चुबुकमौपम्यरहितम्
।। ६७
( कराग्रेण –
हाताच्या अग्राने म्हणजे बोटांच्या टोकांनी. तुहिन – हिम. तुहिनगिरी – हिमालय.
वत्सलतया – वात्सल्याने, प्रेमाने. गिरीशेनोदस्तं – गिरीशेन उदस्तम्। उदस्तम
– वर उचललेली, त्याच्याकडे वळवलेली. मुहुस् – वारंवार. मुकुर – चेहरा
पाहण्याचा आरसा. वृन्तम् - (आरशाची)
मूठ चुबुक – हनुवटी; अधरपानाकुलतया – अधरपानासाठी/चुंबन घेण्यासाठी अत्यंत
उत्कंठित. औपम्यरहितम् – उपमा रहित;)
हिमाद्रीकन्ये गे मधुर तुझिया बाल्यसमयी
धरोनीया प्रेमे तव हनुवटीसी हिमगिरी
अहो वात्सल्याने करि तव सदा कौतुक किती
गुणांसी रूपासी बघुन तुझिया हर्षित मनी ।। ६७.१
तुझी तारुण्याने मुसमुसत काया बघुन ही
मुखीचे पाहूनी अनुपम असे भाव सहजी
ढळे ना शंभूची नजर सुमुखा सोडुन कशी
तुझ्या लावण्याने जननि शिव हा मोहित मनी ।। ६७.२
पहाता लज्जेने सुमुख झुकलेले तव असे
बघोनि आरक्ता अधरचि प्रवाळासम तुझे
किती वेळा शंभू तव अधरपानास्तव उमे
धरूनी प्रेमाने तव हनुवटीसीच उचले ।। ६७.३
तुझ्या नेत्रांचे दो विमल बघुनी दर्पण जसे
अगे ऐन्याजैसे नितळ बघुनी आनन तुझे
स्वतःच्या त्या विश्वात्मकचि प्रतिबिंबा जवळुनी
अगे न्याहाळाया शिव तव मुखा दर्पण करी ।। ६७.४
तुझे माते वाटे मुखकमल हे दर्पणसमा
असे त्या ऐन्याची तव हनुवटी मूठ ललिता ।
तिच्या सौदर्यासी दुजि न कुठली योग्य उपमा
करो ती सर्वांचे जननि हित कल्याणचि सदा ।। ६७.५।।
----------------------------------------------
श्लोक 68
सुहृत्हो!
तुहिनगिरी कन्येच्या, त्रिपुरसुंदरीच्या चेहर्यावरील अवगुंठन जणु काही दूर
होऊन आता आपल्याला तिची अत्यंत सुंदर ग्रीवा म्हणजे मान/ गळा/कंठ दिसत आहे. आहाहा!
जणु काही सुंदरसं कमळ तोलून धरणारी ही कमलनाल/ कमळाचा देठच जणु! मदनानी उमेच्या
ज्या लावण्यखाणी चेहर्याचा रथ करून शिवाला पराभूत केलं; सरस्वतीने ज्या अनुपम
मुखकमलाच्या जिह्वेवर कायमचं वास्तव्य केलं; लक्ष्मीनेही ज्या कमलाननाचे ऐश्वर्य
पाहून त्याचाच कायमचा आश्रय घेतला ते पार्वतीचे सुमुख तोलून धरणारी तिची
ग्रीवा/मान एखाद्या कमलाच्या देठाप्रमाणे शोभून दिसत आहे.
हे माय! ‘इयं तव ग्रीवा’ म्हणजे हा तुझा कंठ ‘तव मुख-कमल- नाल’ म्हणजे जुणु
काही तुझ्या सुंदर मुखकमळाचा देठच आहे.
जणु त्या मानेला नलिनीनाल/ कमळाच्या देठाचे सौंदर्य, चारुता, लालित्य
प्राप्त झाले आहे. (कमलनालश्रियम्). हे माय! तुझा हा सुंदरसा कंठ किंचित काळसर
दिसत आहे. गळ्यात घातलेल्या टपोर्या शुभ्र मोत्यांच्या माळा शुभ्र असूनही अशा
काळसर का बर दिसत आहेत? कारण माय तू अगुरु ह्या सुगंधी असलेल्या झाडाच्या खोडाचा
उगाळलेला लेप/ उटी लावल्याने तुझ्या गळ्यातील शुभ्र मोत्यांनाही अगरुचा कल्क
(जम्बाल) लागण्याने ते काळसर दिसत आहे.
किंवा तुझ्या गळ्यावरील काळसर उटीची छाया तुझ्या गळ्यातील मोत्यांच्या सरांवर पडून
ते काळसर दिसत असावेत. ( मित्रांनो आपली
भारतभू हीच जणू काही लावण्यवती पार्वती असावी असे वारंवार मला वाटते. कारण कपाळावर
ती कस्तुरी आणि केशराचा लेप लावते. ही दोन्ही सुगंधी द्रव्ये काश्मीरमध्येच
मिळतात/तयार होतात. किंबहुना केशरालाच संस्कृतमधे काश्मीर म्हणतात. कंठ आणि
वक्षावर लावलेली उटी अगुरु ह्या सुगंधी तरुवराच्या खोडाच्या गंधाची आहे. ही सुगंधी
झाडे इशान्य भारतात असतात. तर सर्वांगावर लावलेली चंदन उटी ही पश्चिम घाटात मुबलक
असतात. आमची माय भारतभू आहेच अशी गंधवती! विविध रत्नांची, मोत्यांचीही ही भूमी
आहे.)
हे जगज्जननी! महापराक्रमी अशा ज्या `पुरदमन’ शिवाने महा बलाढ्य अशा पुर
आसुराचेही निर्दालन केले; तो विश्वेश्वर दोन्ही बाहुंनी तुला नित्य आलिंगन देत आहे.( भुजाश्लेषान्नित्यं) त्याच्या आलिंगनाने रोमांचित खालेला तुझा
कंठ मला अजुनच कमलनाले प्रमाणे वाटतो. कारण कमलाच्या देठावर बारीक लव दिसून येते.
तर काही कमलांचे देठ हे काटेरीही असतात. (कण्टकवती)
माय तुझ्या ह्या पद्माननाची,
कलनालेसमान असलेल्या कंठाची शोभा जशी अपूर्व आहे त्याच प्रमाणे तुम्हा
गिरीजा-गिरीशाचे नितांत सुंदर प्रेमही अभंग आणि अविस्मरणीय असे आहे. तुला नमन
माते!
भुजाश्लेषान्नित्यं पुरदमयितुः कण्टकवती
तव ग्रीवा धत्ते मुखकमलनालश्रियमियम्
।
स्वतः श्वेता कालागुरु-बहुल-जम्बाल-मलिना
मृणाली-लालित्यं वहति यदधो हारलतिका
।। ६८
(श्लेष – आलिंगन. कमलनाल किंवा
कमलिनी - कमळाचा दांडा ,देठ. पुर – त्रिपुरासुर.
पुरदमन – पुर दैत्याचे निर्दालन करणारा. कण्टकवती – रोमांचित/ काटेरी. अगुरु – सुगंधी
लाकडाची उटी. जम्बाल – चिखल. )
डुलावे पद्माने जळि कमलदेठावर सुखे
तसे डोले मानेवर सुबकशा आनन तुझे
अगे मोत्याचे हे धवल सर कंठातिल तुझ्या
असोनी तेजस्वी जननि दिसती काळसर का?
।। ६८.१
उटी शोभे कंठी अगुरु तरुची दाट जननी
तयाने मोत्याचे सर दिसति हे काळसरची
उटीच्या कल्काने सर बनति हे श्यामल
असे
असोनी तेजस्वी जणु कमलदेठासम दिसे ।।
६८.२
पुरारी हा देता तुजसि दृढ आलिंगन सखे
कसा होई रोमांचित जननि हा कंठ तव गे
दिसे ग्रीवा रोमांचित कमलनालेसम कशी
जशी त्या देठाला लव मृदुल शोभे सुबकशी
।। ६८.३
तुझी ग्रीवा रम्या, अबलख तिचा डौल विरळा,
सरोजाजैसे हे सुमुख तव मोहे मम मना
तुझी मुक्तामाला धवल परि ती श्यामल गमे
तिघांचि शोभा ही अनुपम दिसे हे जननि गे ।।६८.४
करो ती विश्वाचे सतत शुभ कल्याणचि शिवे
तुझ्या भक्तासाठी तव हृदि कृपा नित्य वसु दे ।। ६८.५ ।।
----------------------------------------------
श्लोक ६९ -
सुहृत्हो!
आपल्या शरीरावर कपाळ, गळा, तळहात, पोट, तळपाय अशा विविध ठिकाणी
विविध प्रकारच्या रेषा असतात. ‘समुद्र’ ह्या महापंडितानी त्यांचा अभ्यास करून त्यातील
कुठल्या रेषा शुभ असतात, मोठ्या भाग्याच्या असतात, कुठल्या रेषा ह्या अशुभ असतात ह्याचा
अभ्यास केला. म्हणून ह्या रेषांना सामुद्रिक रेषा म्हणतात. (हस्तसामुद्रिक हा शब्द
आपल्या परिचयाचा असतो.) त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री/पुरुषांच्या कपाळावर, गळ्यावर
आणि पोटावर असलेल्या सलग तीन रेघा/वळ्या ह्या मोठ्या भाग्याच्या सूचक आहेत. (ललाटे
च गले चैव मध्ये चापि वलित्रयम् । स्त्रीपुंसयोरिदं ज्ञेयं महासौभाग्यसूचकम् ।।) श्री
ललिताम्बिकामहात्रिपुरसुन्दरीच्या कंठस्थानी ज्या मृदु, गंभीर, आरक्तवर्णी अशा तीन
आडव्या रेघा दिसत आहेत; त्या महात्रिपुरसुन्दरीदेवी ही महा ऐश्वर्यसम्पन्न असल्याचे द्योतक आहेत.
ही जगदंबा गाण्यातील सर्व प्रकारात म्हणजेच गति, गमक आणि गीत ह्या सर्व प्रकारात निपुण आहे. मार्गसंगीत
(देवांच्या उपासनेसाठी ब्रह्मदेवाने वेदातून शोधून काढलेले), देशीसंगीत (वेगवेगळ्या
लोक रीवाजानुसार लोकरंजनासाठी गायले जाणारे), शुद्ध संगीत, लौकिक संगीत ------ असे
संगीताचे असंख्य प्रकार आहेत. गमक म्हणजे आवाजात निर्माण केला जाणारा, मनाला सुखावह वाटणारा विविध प्रकारचा कंप.
त्यात ताना, बोल ताना, मीण, ----- इत्यादि सर्व प्रकार येतात. गमक पाच प्रकारचे असल्याचे
सांगतात. गीत हे शंकराला बहु प्रिय आहे. सांसारिक
दुःखांवर विंझणवारा घालत संगीताची हळुवार लकेर दुःख दूर करते. अशा सर्व संगीताचे ज्ञान
ह्या जगदंबेला आहे. वास्तविक त्रिपुरसुंदरीचे वर्णन करतांनाच तिला ‘नारायणी नादरूपा’
असे ललितासहस्रनामात म्हटले आहे. ती नादब्रह्मस्वरूप आहे. म्हणून तिला ‘‘नादब्रह्मरूपा’’
असेही म्हणतात.
हे जननी, विवाहाच्या वळेस महाशंभूदेवांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र
घातल्यावर ‘‘प्रगुणगुण’’ म्हणजे अनेक तंतुं असलेले मांगल्यसूचक सूत्राचे धागे ज्याला
‘त्रिसर’ म्हणतात ते तुझ्या गळ्यात बांधले. ते त्रिसर म्हणजेच तुझ्या गळ्यावरील तीन
रेषां असाव्यात. कारण त्रिसर हा शब्द तीन ह्या संख्येची साक्ष देणारा (प्रतिभू) आहे.
तर कधी मला वाटतं तुझ्या गळ्यावरील ह्या तीन रेघा म्हणजे अनेक
प्रकारच्या मधुर रागांच्या जणु जन्मभूमी असलेल्या षड्जग्राम, मध्यमग्राम आणि गांधारग्राम
ह्या तीन ग्रामांच्या म्हणजे स्वरसमूहांच्या (ग्राम म्हणजे स्वरसमूह) सीमा दर्शविणार्या
अथवा त्या तीन ग्रामांच्या स्थितीचे नियमन करणार्या सीमारेषाच आहेत. (नानाविध-मधुर-रागाकरभुवां
त्रयाणां ग्रामाणां स्थितिनियमसीमानः इव ते गले रेखाः विराजन्ते ।) ह्या तीन स्वरसमूहांपैकी/रागांपैकी
षड्जग्राम आणि मध्यमग्राम हे पृथ्वीवर गायले जातात तर गांधारग्राम देवलोकी गायला जातो.
गले रेखास्तिस्रो गति-गमक-गीतैक-निपुणे
विवाह-व्यानद्ध-प्रगुण-गुण-संख्या-प्रतिभुवः
।
विराजन्ते नानाविध-मधुर-रागाकरभुवां
त्रयाणां ग्रामाणां स्थिति-नियम-सीमान
इव ते ।। ६९
तुझ्या कंठी रेघा खुलुन दिसती तीन-वलया
अगे माते सामुद्रिक नियम शास्त्रानुसरि ह्या
महा सौभाग्याच्या प्रतिक असती सौख्यमय ह्या
ललाटी कंठी वा
स्थित उदरभागी सलग ह्या ।। ६९.१ ।।
तयांसी पाहूनी मज गमतसे माय जननी
बहू तंतूयुक्ता सकलगुणसंम्पन्न जणु ही
विवाहाच्या वेळी जणु त्रिपदरी पोत शिव ही
तुझ्या कंठी बांधी बहुगुणयुता मंगलमयी ।। ६९.२।।
तुझ्या कंठीच्या
ह्या बहु सुबक लेखा त्रिवलया
असे संगीताची नित जननभूमीच सुफला
अगे नादब्रह्मस्वरुप असशी नादमय तू
असे संगीताच्या
विविधचि प्रकारी निपुण तू ।। ६९.३।।
अगे संगीताच्या विविधचि तर्हा गायन करी
अगे माते तूची गति गमक गीता निपुणची
गती संगीताच्या विविधचि प्रकारांस म्हणती
स्वरांच्या
कंपासी गमक म्हणती गानसमयी ।। ६९.४ ।।
स्वरांच्या कंपाने
विविध उठती भाव तरला
असे गीता शुद्धा
समधुरचि शास्त्रीयचि कला
सुरग्रामांच्या या सुमधुरचि सीमा सुरमयी
तिन्ही ग्रामांच्या वा नियमन स्थितीचे करिति
त्या ।।६९.५ ।।
स्वरातूनी साती करुन स्वर ते संकलितची
अहो होती ग्रामे सकल मिळुनी तीन जगती
तयी षड्जग्रामा धरणिवर गाती नरचि हे
दुजा ग्रामा गाती धरणिवर ते मध्यमचि
हे ।।६९.६।।
अहो गांधारग्राम सुरवरचि गाती सुरपुरी
अशा ह्या ग्रामांच्या स्थिति नियम सीमा
ठरविती
तुझ्या कंठीच्या ह्या त्रिवलयचि लेखा बहुगुणी
करे नादब्रह्मस्वरुप तव पायी नमन मी ।।६९. ७।।
----------------------------------------------
श्लोक ७० –
हे जगज्जननी त्रिपुराम्बिके! तुझे हे लांबसडक सुंदर दंडगोल चारी हात कमलाच्या
वेलीहूनही सुंदर आहेत. हा कमलामधे जन्मलेले चार मुखांचे ब्रह्मदेवही सतत तुझ्या चारी
हातांची प्रशंसा करत असतात. पण! त्याच्या ह्या प्रशंसेमागे मला तर दुसरंच कारण लपलेलं
दिसतय.
माय गं! एकेकाळी ह्या पंचानन शिवाप्रमाणे ब्रह्मदेवालाही पाच
मुखे होती. त्यामागे त्याने सर्व विहित कामे उत्तम करावीत हा उद्देश्य होता. पण ती
कामे सोडून ब्रह्मदेव स्वतःची तुलना महादेवासोबत करू लागले. पण ऐश्वर्य असूनही विरक्त
असलेले देवांचे देव महादेव कुठे आणि मोठेपणाचा हव्यास असलेले विधिमहाशय कुठे! अहंकाराने
ताठून आपले कर्तव्य विसरणार्या ब्रह्मदेवाचे एक शिर अंधकाचेही निर्दालन करणार्या
महादेवांनी एका फटक्यात नखाने असे नखलून टाकले की जणू विड्याच्या/नागवेलीच्या/ तांबूलाच्या
पानाच्या शिरा आणि देठ नखाने सहज नखलून टाकावेत.
मला वाटते, त्यामुळे ब्रह्मदेवाने शिवशंभूची मनात कायमची धास्ती
घेतली असणार. मनातून ह्या ब्रह्मदेवाला शिवशंभूमहादेवाची सतत भीती वाटत असणार. आपली
उरलेली चार मस्तके शंभूपासून सुरक्षित रहावीत म्हणून ते तुझी स्तुती करून, काही बाका
प्रसंग आलाच तर, तू त्यांची मदत करू शकशील, शंभूमहादेवांना शांत करून ब्रह्मदेवाच्या बाजूने शब्द टाकून बचाव करू शकशील हया अंतस्थ हेतूने तुझ्या चारही बाहूंची अथक स्तुती
करत असावेत.
(मित्रांनो, मला वाटते की, चार मस्तके, चार हात, किंवा पाच मस्तके
ही जास्तीची संख्या ही बद्धीची कुवत, वा (हातांचे) अनन्यसाधारण कर्तृत्त्व दाखवण्यासाठी
वापरलेले आहेत. सिंहालाही पंचानन म्हणतात. कारण तो त्याचे चार पंजे आणि एक मुख अशा
पाचींनी भक्ष्यावर तुटून पडतो. त्याला फाडून खातो. शिवाच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वापलिकडे
असलेले शक्तिसामर्थ्य, मनोबल, चातुर्य, बुद्धीबल अनन्यसाधारण आहे. त्याच्याशी कोणाची
तुलना होऊ शकत नाही. ब्रह्माही त्याच्यापुढे खुजा ठरतो.)
मृणालीमृद्वीनां तव भुजलतानां चतसृणां
चतुर्भिः सौन्दर्यं सरसिज-भवः स्तौति
वदनैः ।
नखेभ्यः संत्रस्यन्प्रथम-मथनादन्धकरिपो-
श्चतुर्णां शीर्षाणां सममभय-हस्तार्पण-धिया
।। ७
( मृणालिन् / मृणाली- कमळ. मृद्वी
– वेली. चतसृणां – चतुर् मूळ शब्द अर्थ चारी (भुजांचे). चतुर्भिः
– चार(तोंडांनी) भुजलता- लतेप्रमाणे सरळ सुंदर बाहू बाहु, हात. सरसिजभव
– सरस म्हणजे तलाव तलावात जन्म घेते ते सरसिज म्हणजे कमळ. सरसिजभव
– कमळातून जन्माला आलेले भगवान ब्रह्मदेव. प्रथममथनात् – पहिल्याच फटकार्यात
क्षति पोचवणारा. मारणारा, नाश करणारा. नखेभ्यः संत्रस्यन् – नखानी नखलून टाकणे.
अंधकरिपू – भगवान शंकर )
तुझे चारी बाहू कमललतिकेहून मृदु हे
तयासी वाखाणे अथक विधि चारीहिच मुखे
भयाने येई गे शरण तुजसी तो जननि का?
दिसे हे त्यामागे मजसिच दुजे कारण पहा ।। ७०.१।।
कराया कामासी सकलचि दिशांची निगुतिने
कधीकाळी होती विधिस बरवी पाच सुमुखे
महादेवां जैसी सुचवि नित श्रेष्ठत्व जगि ती
विधीच्या कर्तृत्त्वा सहजचि अधोरेखित
करी ।।
परी शेफारूनी करत बसला तोचि तुलना
महादेवांसंगे विसरुनिच कर्तव्य विहिता
अहंकाराचे त्या त्वरित फळ देई पशुपती
महा क्रोधे त्याचे शिर नखलुनी दंडित
करी ।।
शिवाने द्यावे हो अभय उरलेल्या विधि-मुखा
तुझ्या बाहुंची का म्हणुन विधि गाई
स्तुति सदा
शिवच्या क्रोधाचे भय धरुन चित्ती बहु
उमे
अगे ब्रह्मा येई शरण तव पायीच गिरिजे ।। ७०.४।।
----------------------------------------------
श्लोक ७१ –
हे जगज्जननी!
तुझ्या
लावण्याची प्रशंसा करायला शब्द कमी पडतात. तुझे दंडगोल नाजुक बाहू सुंदर आहेतच पण
तुझी नखं अत्यंत निरोगी असून चमकदार लालसर आहेत. तुझ्या नखांमधून बाहेर
पडणारे किरण (उद्योत) किंवा तुझ्या नखांची प्रभा इतकी आरक्त आहे की, प्रभातसमयी
नुकत्या नुकत्या उमलणार्या ताज्या टवटवीत कमळांच्या लालिम्यालाही जणु ती हसत आहेत असे वाटते. जणु
काही नवीन ताज्या कमळाचा लालिमा आणि तेजही तुझ्या नखांच्या तेजापुढे फिके आहे. असे
असतांना हे माय! तूच सांग! तुझ्या हातांच्या कांतिची शोभा आम्ही काय वर्णन करणार? मला वाटते ही लक्ष्मी क्रीडा करत असतांना तिच्या
पायाचा लाक्षारस म्हणजे आळता ज्याला लागला आहे अशा कमळात आणि तुझ्या करकमलात असेल
तर काही लेशभर साधर्म्य, साम्य असू शकेल. नाहीतर बाकी कशा बरोबरही तुझ्या
करकमलांची तुलना होऊ शकणार नाही. माय तुझ्या करकमलांची प्रभा/ कांति अपूर्व आहे. असे तुझे हे दोन्ही अनुपम करकमल आमचे कल्याण
करो.
नखानामुद्योतैर्नव-नलिन-रागं विहसतां
कराणां ते कान्तिं कथय कथयामः कथमुमे
।
कयाचिद्वा साम्यं भजतु कलया हन्त कमलं
यदि क्रीडल्लक्ष्मीचरणतल-लाक्षारसचणम्
।। ७१
( उद्योत – किरण. नलिन- कमळ. कथय – तूच सांग. कयाचित्
कलया - कदाचित् एखाद्या अंशाने तरी साम्य साधू शकेल का नाही याची खात्री देता येत
नाही. लाक्षारस – पायाला लावायचा लाल आळता. चण – विख्यात, प्रसिद्ध, कुशल )
कसे वर्णू माते, करकमल हे सुंदर अति
नखांचा लालीमा, पसरवि प्रभा ही दशदिशी
।
नखांचा लालीमा जणुचि उपहासे हसतसे
सरोजांना सार्या टवटवित आरक्तचि उमे
।। ७१.१ ।।
नखांच्या कांतीची जननि कशि व्हावीच
तुलना
कुणासंगे कैशी जननि मज तू सांग कधि का ।
जरी ओला लाक्षारस चरणि लावून कमला
फिरे पद्मातूनी जरि उमलत्या नूतन अशा
।। ७१.२ ।।
तिच्या पायाचा तो रस चमकता लालचुटुका
जरी लागूनी ते कमल दल होतीच अरुणा
रमेच्या ऐशा ह्या जरि चरणस्पर्शेच कमळे
महा ऐश्वर्याने डुलतिल जरी मोहुन सुखे ।। ७१.३।।
तरी त्यांच्या
कांतीसह क्षणभरी होय तुलना
नखांच्या कांतीची
लवभरचि गे माय तुझिया ।
अशा ह्या हस्तांची
मजवर कृपा नित्य असुदे
मना भृंगा राही जननि-पदपद्मी
सतत रे ।। ७१.
----------------------------------------------
श्लोक ७२ –
हे
जगज्जननी!
तू
वात्सल्यमूर्ती आहेस. तुझ्या शिशुंबद्दल तुझ्या हृदयात असलेल्या अलोट प्रीतीमुळे
तुझ्या दोन्ही स्तनांमधून सतत दूध पाझरत असतं; आणि तुझे दोन्ही पुत्र
कार्तिकस्वामी आणि हेरम्ब म्हणजे गणपती सतत तुझ्या अमृतासमान दुधाचे स्तनपान करत
असतात. तुझा हा मोठा पुत्र गजानन तर सुखाने तुझ्या मांडीवर लोळत तुझे स्तनपान करत
असतांना एका स्तनाचे दूध पीतांना दुसर्या स्तनाला धरून ठेवतांना आचानक त्याच्या
मनात एक भलतीच शंका आली की, आईने माझी दोन्ही गंडस्थले काढून तर घेतली नाहीत ना?
तिचे हे दोन स्तन म्हणजे माझी गंडस्थळे तर नाहीत?
त्यामुळे दूध पीता पीता पटकन तो आपल्या डोक्याला चाचपून आपली गंडस्थळे
सुरक्षित आहेत ना? ह्याची खात्री करून घेत आहे. त्याच्या बालसुलभ मनातील ही भीती,
ही शंका, विभ्रम पाहून त्याचे पिता
शिवशंभूना, कार्तिकस्वामींना आणि स्वतः तुलाही हसु आले आहे.
माते! जसे तू तुझ्या पुत्रांना मोठ्या
वात्सल्याने स्तनपान करत आहेस त्याप्रमाणे मलाही तुझा पुत्र मानून, तुझेच बाळ समजून
असेच प्रेमाने स्तनपान करशील का? तुझ्या अमृतमय स्तन्याचे प्राशन करून मी धन्य
होईन का? तुझे हे दुग्धपूर्ण स्तन आमचेही
पोषण करोत. तुझ्या अमृतमय दुग्धधारांनी आमचेही कल्यण होवो. आमचेही दुःख दूर जावो.
माते! तुला नमन!
समं देवि स्कंदद्विपवदनपीतं स्तनयुगं
तवेदं नः खेदं हरतु सततं प्रस्नुतमुखम्
।
यदालोक्याशङ्काकुलित-हृदयो हास-जनकः
स्वकुम्भौ हेरम्बः परिमृशति हस्तेन
झडिति ।। ७२
( स्कंद – कार्तिकस्वामी. द्विपवदन – द्विप म्हणजे हत्ती
द्विपवदन – गजानन,गणपती. प्रस्नुतमुखम् – ज्याच्यातून सतत दूध झरत आहे. हेरम्ब
– गणपती. नः खेदं हरतु – दुःख हरण करोत. परिमृषति – हात लावून पाहणे. स्वकुम्भौ
– स्वतःची दोन्ही गंडस्थळे. )
कसा हा हेरम्बू जननि स्तनपाना करि तुझ्या
दुदू पीता पीता धरुनचि दुजा तो स्तन
उगा ।
करे चाळा दोन्ही पृथुल स्तनभारासह तुझ्या
परी भासे त्यासी स्तनद्वयचि गंडस्थल
समा ।। ७२.१
"अहो माझे गंडस्थल जननि घे काढुन कसे?"
विचाराने ऐशा विचलितचि हो चित्ति तयिचे
।
स्वहस्ते पाहे तो स्वशिरचि पुन्हा चाचपुनिया
असे का माझेची मजजवळि गंडस्थल सदा।।
७२.२।।
तयाचा पाहूनी शिशुसुलभ तो विभ्रम असा
करे वात्सल्याने गिरिश गिरिजा कौतुक
पहा ।
सुखावोनी चित्ती हसतिच तया पार्वतिपती
सवे स्कंदाच्या गे करत स्तनपाना गणपती
।। ७२.३।।
तयांच्या वात्सल्ये सतत झरती अमृतमयी
दुधाच्या धारा ह्या पृथुलचि स्तनातून
जननी ।
अगे माते त्यांना धरुन हृदयी स्तन्य दिधले
तसे देशी का गे तव सुत मला मानुन सवे
अगे माते त्यांच्यासमचि मम कल्याण करि गे
तुझ्या पायी आलो; समज मजला पुत्र तव गे ।। ७२.५।।
----------------------------------------------
श्लोक
७३ –
हे जगज्जननी !
तुझे
हे दोन्ही पुत्र आता लहान का राहिले आहेत? तुझा द्विरदवदन म्हणजे गजमस्तक असलेला हा
थोरला पुत्र सार्या गणांचा पति म्हणजे मुख्य आहे. तर दुसरा सार्या देवांचा
सेनापती आहे. त्याने क्रौंच राक्षसालाही ठार मारले. दोघे अद्वितीय पराक्रमी आहेत.
शिवाय ते आता बाल राहिलेले नसून कुमार वा युवा अवस्थेला प्राप्त झाले आहेत. बलवान
आहेत. तरीही अजूनही ते दोघे वधू न शोधता यतीचेच जीवन व्यतीत करत आहेत. आणि अजूनही
तुझे स्तन्य पिऊन त्या ब्रह्मानंदात लीन झाले आहेत.
माते तुझे हे स्तन म्हणजे जणु अमृत रसाने भरलेल्या
माणिकमय अशा निस्यंदिनीच आहेत. (निस्यंदिनी – ज्यातून सतत रस पाझरत राहतो.) कुतुप
म्हणजे दुधाच्या कुप्या वा बुधले आहेत. ह्याबद्दल
माझ्या मनात आता कुठलीच शंका राहिलेली नाही.
( सुहृदहो!
येथे पार्वतीचा उल्लेख नगपतिपताका असा केले आहे. पार्वती म्हणजे जणु काही 'नगपति'
म्हणजे हिमालयाच्या कीर्तीची पताका आहे. मित्रांनो, मला वाटते की हिमालयात गंगा,
यमुना, सिंधु, झेलम, चिनाब अशा असंख्य नद्या उगम पावतात. त्यांच्या अमृताप्रमाणे
असलेल्या जलाने त्या अनेकांची तहान भागवत असतात. त्यांच्या तीरावर अनेक
संस्कृतींचा विकास होत होता. झाला आहे. आणि होतही राहील. ह्या नद्या हेच त्या
पार्वतीचे न आटणारे स्तन्य आहे. असंख्य संकटांना तोंड देत, त्यांच्यावर विजय
मिळविणार्या मानवजातीचे नेतृत्त्व करणारे, भूतमात्रांचे सेनापतीपद भूषविणारे
भगिरथासारखे असंख्य वीर हे सलील आपल्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी
स्वतःच्या जीवीताचीही पर्वा करत नाहीत तेथे आपल्या काम्य/ वैवाहिक जीवनाचे
त्यांना काय मोल? हे माणिक्यकुंभांमधील अमृतमय जल हे एकच त्यांच्या जीवनाचे ध्येय
राहिले आहे.)
हे
माते तुझ्या दोन्ही पुत्रांना तुझे स्तन्य प्राशन करून जशी तृप्ती लाभते; तशा
तृप्तीचा लाभ मलाही घडू दे. मलाही तू आपला बाळ समजून तुझ्या मांडीवर घे आणि त्या
ब्रह्मानंदाचे सुख दे.
अमू ते वक्षोजावमृत-रस-माणिक्य-कुतुपौ
न सन्देहस्पन्दो नगपतिपताके मनसि नः
।
पिबन्तौ तौ यस्मादविदित-वधू-सङ्ग-रसिकौ
कुमारावद्यापि द्विरदवदन-क्रौञ्चदलनौ
।। ७३
( कुतुप – तेल इत्यादिची कुपी. नगपतिपताका- नग म्हणजे पर्वत. नगपति
– हिमालय. नगपतिपताका -हिमालयाची कीर्तिपताका. द्विरदवदन – गजानन. क्रौंचदलन – क्रौंच
राक्षसाला ठार मारणारा कार्तिकस्वामी. )
जिथे गंगे जैशा कितिक सरितांचा उगम गे
हिमाद्रीची ऐशा नित विनत पुत्री असशि गे
नसे किंतु माझ्या हृदि तव स्तनांच्या विषयि
गे
सुधेने संपृक्ता जणु मधुर निस्यंदिनिच ते ।। ७३.१
तुझ्या स्तन्याच्या त्या सुखमय पानात रमुनी
तुझ्या पुत्रांना गे लव रुचि न राहे परिणयी
कुमारांना दोन्ही अजुनहि वधू ना रुचतसे
अजूनीही दोघे यतिसम व्रती राहति सुखे ।। ७३.२
तुझ्या पुत्रांसी तू पियुषसम जे स्तन्य दिधसी
मिळे त्यांना तृप्ती पिऊन नित जे अमृतमयी
अगे त्या स्तन्याचे मजसि करवी पान जननी
सदा वात्सल्याने समजुन मला तुत्र तवची ।। ७३.३
----------------------------------------------
श्लोक
७४ –
अहो! काय ह्या पुरारी महादेवांचा पराक्रम! त्यांनी गजासुरालाही ठार मारून त्याच्या गंडस्थलावरील मोती काढून घेतले.
(असं म्हणतात की काही हत्तींच्या गंडस्थलावर मोती असतात. ते तेथेच तयार होतात.) हे
मोती ह्या विजयाची आठवण म्हणून शंभूमहादेवांनी आपल्या पट्टराणीला हिमगिरीसुता पार्वतीला
भेट म्हणून दिले.
हे माय! ह्या मोत्यांची माळ तुझ्या
वक्षस्थलावर मोठी शोभून दिसत आहे. ही माळ अत्यंत अमल म्हणजे ज्याच्यावर जराही मळ नाही,
ज्यात काही दोष नाहीत, अशी सुंदर धवल पाणीदार मोत्यांची आहे. पण! हे जगज्जननी ! तुझ्या आरक्त ओठांची लालसर छाया त्यावर
पडून ती रंगित झाली आहे की काय असे वाटत आहे. (शबलिता) मला तर ती कुठेशी धवल, कुठे
लालसर आरक्त अशी कर्बुरी रंगाची दिसत आहे. पराक्रमाचा रंग लाल असतो; तर अलांछित कीर्तीचा रंग शुभ्र धवल असतो. हे जगज्जननी!
तू शिवाच्या पराक्रमाला आणि धवल कीर्तीला ह्या माळेच्या रूपाने तुझ्या वक्षस्थली कायमचे
स्थान दिले आहेस. धारण केले आहेस. शिवाच्या सामर्थ्याचा आणि यश कीर्तीचा तुला सार्थ
अभिमान आहे; जो ह्या माळेच्या रूपाने तू वक्षावर मिरवित आहेस.
वहत्यम्ब स्तम्बेरम-दनुज-कुम्भ-प्रकृतिभिः
समारब्धां
मुक्तामणिभिरमलां हारलतिकाम् ।
कुचाभोगो
बिम्बाधररुचिभिरन्तः शबलितां
प्रतापव्यामिश्रां
पुरदमयितुः कीर्तिमिव ते ।। ७४ ।।
( स्तम्बेरम – हत्ती. दनुज- दानव. स्तम्बेरमदनुज – गजासुर.
हारलतिका – माला. शबल – नाना रंगी.)
शिवाने मारीला गज-असुर उन्मत्त सहजी
तया गंडस्थानी मिळति किति ते मौक्तिकमणी
तयांसी काढूनी शिव तुजसि दे भेट म्हणुनी
रुळे वक्षी माला धवल अमला मौक्तिकमयी ।। ७४.१
असे शुभ्रा माला परि दिसति ते रंग विविधा
तुझ्या ओठांची गे अरुण पडछाया पडुन गा
दिसे ती कर्बूरी दिसति बहु तेजस्विच मणी
छटा दोन्ही त्याच्या धवल दिसते लाल मधुनी ।। ७४.२
शिवाच्या शौर्याची चमकत छटा लालसर ही
शिवाच्या कीर्तीची धवलचि छटा ही उजळली
शिवाच्या सामर्थ्या धवल सुयशासी मिरविसी
महा सन्मानाने सतत तव कंठात जननी ।। ७४. ३
तुझ्या वक्षस्थानी जणु मिळविले स्थान अढळा
शिवाच्या शौर्याने, धवल सुयशाने जननि गा ।। ७४. ४
----------------------------------------------
श्लोक ७५
सुहृत्हो!
पार्वतीच्या अमृतमय स्तन्याचा उल्लेख आलेल्या
बहुतेक श्लोकांमधे पार्वतीचा उल्लेख हिमालयाची पुत्री म्हणजेच पर्वताची पुत्री
ह्या अर्थी आहे. मागच्या काही श्लोकात आणि ह्या श्लोकातही पार्वतीचा उल्लेख
नगपतिपताका, तुहिनगिरिकन्या, धरणिधरकन्या असा पहायला मिळतो. थोडासा बारकाईने विचार
केला तर मला असे वाटते की, पर्वतांमधून उगम पावणार्या गंगा, यमुना मंदाकिनी
इत्यादि अनेक नद्यांच्या पाण्यात अत्यंत अलौकिक गुण आहेत. गंगेचं पाणी नासत नाही.
असे म्हणतात की, गंगा ज्ञान देते, यमुना स्नेह उत्पन्न करते. नर्मदा वैराग्य देते.
अनेक नद्यांच्या पाण्यात भूतमात्रांना निरोगी करण्याचे गुणधर्म आहेत. हिमालयाच्या
पर्वतराजीत उगम पावलेल्या नद्यांचे पाणी पिऊन, म्हणजेच प्रत्यक्ष माातेहूनही जास्त
काळजी घेणार्या पर्वतपुत्री पार्वतीचे स्तन्य पिऊन, ह्या नद्यांकाठी बहरलेल्या,
विचारांनी समृद्ध झालेल्या अनेक संस्कृतींमधून उच्च विचारांचे, ज्ञानाचे स्तन्य
मिळवून साधारण माणूस सुद्धा महान होतो. पयःपारावारः म्हणजे
मूर्तिमंत क्षीरसागर. हे माय! तुझे स्तन्य म्हणजे तुझ्या हृदयातून प्रकट झालेला
अथांग क्षीरसागर आहे. ‘पयःपारावारः’ ह्या ऐवजी सुधाधारासारः- असा पाठ घेतल्यास
तुझे स्तन्य म्हणजे अमृताच्या धारांचा प्रवाह आहे. सुधाधारासारः परिवहति सारस्वतमिव – म्हणजे अमृताच्या धारांच्या प्रवाहाप्रमाणे असलेले
हे तुझं स्तन्य म्हणजे साक्षात सारस्वत, मूर्तिमंत वाङ्मयच वहात आहे असं मी समजतो.
माते! त्याच्या प्राशनाने अज्ञ सुद्धा मोठा ज्ञानी बनू शकतो.
जो छोटासा बालक असतो तो आईशिवाय कोणालाही ओळखत
नाही. त्याला आईशिवाय बाकी काहीही नको असते. अशा अनन्य असलेल्या बालकाला आई
आपणहूनच उचलून घेते. त्याला आपले स्तन्य देऊन तृप्त करते. म्हणून येथे आदि
शंकराचार्यही आपला उल्लेख " द्रविडशिशु ”
असा करतात. त्यांना ज्ञानाशिवाय कसलीच
रुची नसल्याने किंवा ज्ञानाचीच तहान असल्याने दयेने, करुणेने ओथंबलेल्या, दयार्द्र
चित्त पार्वती मातेने हे ज्ञानरूपी स्तन्य त्यांना आकंठ पाजले. हे अक्षररूपी स्तन्य पिऊन मोठा झालेला हा शारदेचा पुत्र असा तसा कसा निपजेल?
लहानपणीच त्याने केलेल्या काव्यामुळे मोठ्या मोठ्या विद्वानांनीही त्यांच्या माना
कौतुकाने डोलावल्या. ज्ञानाच्या लालसेने केरळमधून काशी, बद्रिनाथ केदारनाथपर्यंत
आलेल्या ह्या बालकाचे/ द्रविड-शिशुचे कौतुक केले. महान विद्वानांनीही आदर केला.
आदि शंकराचार्य म्हणतात, माते! तुझा महिमा अपार आहे. ``अशक्यासी तूची सहज करिसी शक्य जननी’’
तव स्तन्यं मन्ये धरणिधरकन्ये हृदयतः ।
पयःपारावारः परिवहति
सारस्वतमिव ।
दयावत्या दत्तं
द्रविडशिशुरास्वाद्य तव यत्
कवीनां प्रौढानामजनि
कमनीयः कवयिता ।। ७५ ।।
(धरणिधर – पर्वत. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पार्वतीला धरणिधरकन्या
म्हटले आहे. पारावार – समद्र. पयःपारावारः म्हणजे मूर्तिमंत क्षीरसागर.
‘पयःपारावारः’ ह्या ऐवजी सुधाधारासारः-अमृताच्या धारांचा प्रवाह. सारस्वत –
वाङ्मय. मन्ये – मानतो, समजतो. द्रविडशिशु – हा शंकराचार्यांनी
स्वतःसाठी वापरलेला शब्द असून त्याचा अर्थ द्रविड मुलगा. अजनि – झाला.)
शिशू-वात्सल्याने गिरिवरसुते अमृतसमा
फुटे पान्हा वेगे तवचि हृदयातून मधुरा
तुझा पान्हा माते अमृतमय हा सागर महा
सुधा धारांचा वा अविरत असे ओघ सुखदा/यशदा ।। ७५ .१
जणू वाहे सारस्वत जननि पान्ह्यातुन तुझ्या
प्रवाही धारा ही विमल मधुरा वाङ्मयसुधा
दयार्द्रा तू ह्या गे द्रविड शिशुसी पान करवी
तुझ्या ह्या स्तन्याचे जननि तव हे अक्षररुपी ।।
७५.२
तुझ्या ह्या स्तन्यासी पिउन घडला हा तव शिशु
करे जो काव्यासी अनुपमच आह्लादक बहु
महा विद्वानांच्या अखिल समुदायी सहज तो
करोनी सत्तर्का स्वमत प्रतिपादे सहज तो ।। ७५. ३
तुझ्या स्तन्याच्या ये घडुनच प्रभावे सकल हे
कृपा ही कैसी गे शिशुवर तुझ्या तू करितसे ।। ७५. ४
----------------------------------------------
श्लोक ७६ –
हे जगज्जननी!
तुझ्या लावण्यवती कायेचा आखीव रेखीव एक एक अवयव जणु काही सौदर्याचे यथा योग्य प्रमाण ठरवणारा
मानदंडच आहे.
मदनाने तुझ्या चेहर्याचा
रथ केला. तुझ्या कानांच्या पाळ्यांचे धनुष्य केले. आणि त्याला तुझ्या किंचित तिरक्या
दृष्टीक्षेपाचा बाण जोडून श्रीशिवशंभूवर सोडला. पृथ्वीचा रथ, सूर्यचंद्राची
चाके, अशा तयारीने आलेल्या साक्षाात महादेवांचा पराभव केला. मित्रांनो लावण्यवती पार्वतीच्या
नुसत्या मुखकमलाच्या दर्शनानेच, तिच्या लाजर्या कटाक्षांनीच शिवशंभूची काय अवस्था
झाली ह्याचे किती सुंदर वर्णन आहे हे! मदनासाठी वापरलेला शब्दही चपखल आहे. येथ मदनाला
“मनसिज” म्हणजे मनात जन्मलेला म्हटलं आहे. मनात उत्पन्न होणार्या कामवासनेला सर्वांनाच
आवर घालता येत नाही. त्यासाठी मनावर कठोर नियंत्रण,
अत्यंत मोठा ताबा लागतो. शिवानेही आपला तिसरा डोळा उघडला. त्यात ह्या मनात उत्पन्न
झालेल्या कामवासनेला म्हणजे मनोजाला/ कामदेवाला/मदनाला जाळून टाकलं. शिवाच्या महाक्रोधाच्या
अग्निज्वाळांनी मदनाला पुरतं लपेटून टाकलं. लप लप
करत त्या त्याचे अंग चाटू लागल्या. ( हर-क्रोध-ज्वालावलिभिरवलीढेनवपुषा) हा दाह असह्य होऊन मदनानी थेट उमेच्या सरोवरा समान
असलेल्या खोल, गहन, सुंदर अशा नाभि-तलावात उडी घेतली. तेथेच त्याच्या अंगाचा दाह शांत
झाला. नाभीसरोवराच्या शांत, गहन तळ्यात तो आजही रहात आहे. पण एखादी पेटलेली गोष्ट अचानक
पाण्यात बुडवली तर त्यातून जशी धुराची वलयं उमटू लागतात त्याप्रमाणे मदनाच्या अंगाचा
दाह जरी शमला तरी पेटलेली काया विझल्याने त्याच्या शरीरातून धूम्रलता म्हणजे धुराची
एक कमनीय लकेर बाहेर पडली. हे जगज्जननी! आजही तुझ्या पोटावर, नाभीपासून लवेची बारीक
रेघ ह्या रूपात ती दिसत आहे. लोक जरी कौतुकाने त्याला लव असलेली सुरेख रोमावली म्हणत
असले तरी ती मदनाची धूमावली आहे. तुझ्या नाभीत मदनाने/ अनंगाने कायमचा आश्रय घेतला
आहे. मदनाचं वास्तव्य म्हणजेच सर्वांचे चित्त वेधून घेणारा आकर्षकपणा. मदनाला अनंग
म्हणतात. प्रत्यक्ष शरीर नाही पण सार्या सौन्दर्याची, लावण्याची एक प्रतिकात्मक मूर्तीच
जणु! पार्वतीच्या अंगप्रत्यंगावर मदनाचं कायमचं वास्तव्य आहे. ज्या प्रमाणे तिच्या
चेहर्यावर ‘मनसिज’ अशा कामाचं वास्तव्य आहे त्याप्रमाणे तिच्या कमलासमान नाभीमधेही
प्रचंड आकर्षकपणा आहे; ज्याने तपस्वी असलेल्या शिवाचे चित्तही विचलित व्हावे.
हर-क्रोध-ज्वालावलिभिरवलीढेनवपुषा
गभीरे ते नाभीसरसि कृतसङ्गो मनसिजः
।
समुत्तस्थौ तस्मादचलतनये धूमलतिका
जनस्तां जानीते तव जननि रोमावलिरति
।। ७६
(अवलि – रांग, ज्वालावलि
– ज्वालांचा समूह. अवलीढ – ज्याला अग्निज्वाला चाटून जात आहेत. वपु –
शरीर. वपुषा – शरीराने. गभीर – गहन, खोल. सरसि- तलावात. कृतसङ्गः
-आसरा घेतला. मनसिज – मनात जन्मलेला
तो कामदेव/मदन. अचल – जो चल नाही, हलत नाही, एका जागी स्थिर असतो तो म्हणजे
पर्वत. अचलतनया – पर्वताची मुलगी पार्वती. समुत्तस्थौ तस्मात् – त्यातून
बाहेर पडली. धूमलतिका – धुराची लकेर.)
महा क्रोधाने हा शिव उघडिता नेत्र तिसरा
लपेटे ज्वाळांनी चहुकडुन अग्नीच मदना
।
सहस्रा जिह्वांनी लपलपत चाटे तनुस त्या
असह्या दाहाने मदनतनु ती होरपळता ।।
७६.१ ---
शमावा अंगीचा मरणप्रद तो दाह म्हणुनी
तुझ्या नाभीरूपी सरसि उडि घेई मदनची
तलावा जैसी ही विमल तव नाभी गहन गे
करे वास्तव्यासी मदन अजुनी कायम तिथे
।। ७६.२
निवे तेथे त्याचा तनु दहनिचा दाह पुरता
विझे अंगीचा त्या अनल-वणवा तो उसळता
विझे अग्नी त्याने निघति जणु का धूम्रवलये
अगे नाभिस्थानि जणु दिसति रोमावलिरुपे
।। ७६.३
करो कल्याणा ती बहु सुखद रोमावलि-लता
तुला हर्षाने मी नमन करतो मायचि पुन्हा
।। ७६.४
----------------------------------------------
श्लोक ७७ –
माय!
तुझी अत्यंत बारीक कंबर, अत्यंत कृश कटिभागावर असलेली तुझी नाभी
आणि त्याच्या भोवतली सूक्ष्म मृदुल लवेचा परिघ पाहिला की मला तर यमुनेच्या शांत डोहात
उत्पन्न होणार्या सूक्ष्म तरल तरंगाचा भास होत आहे. त्या तरंगांप्रमाणे किंचित थरथरणारी ही रोमावली
मोठी सुंदर दिसत आहे. तुझ्या वक्षावर कमलकलिकांप्रमाणे विकसित झालेल्या स्तनांच्या
एकमेकांना भिडण्यामुळे यमुनेच्या छोट्यातल्या छोट्या लाटेप्रमाणे तुझ्या नाभीचा आकार/
(नाभीजवळील लवेची रेघ) तयार झाला आहे.
एकमेकांवर घासल्या जाणार्या स्तनद्वयांमुळे तेथील आकाश चेमटून/चेंगरून
त्याला तेथे रहायलाच जागा उरली नाही. म्हणून
ते आकाश जणु काही सूक्ष्र्म रूप घेऊन तुझ्या गंभीर, खोल, दुर्गम अशा नाभिच्या गुहेमध्ये
(कुहरात) सूक्ष्म रोमराजीच्या रूपाने जणु प्रवेश करत आहे. (श्लोक 76 मधे नाभीजवळ असलेल्या
रोमावलीची धुराच्या वलयांशी घातलेली सांगड गृहित धरून आकाशाचाही रंग हा नीलवर्ण असतो.
ही रोमराजी/ सूक्ष्म मृदुल लव किंचित काळसर वर्णावर असल्यामुळे जणु आकाशाचं प्रतिकच
आहे. असे गृहित धरले आहे. )
हे माते सौन्दर्याचे, लावण्याचे परिमाण असलेलेले हे तुझे अनुपम
असे नाभिकुहर आणि सूक्ष्म रोमराजी तुझ्या सर्व भक्तांचे कल्याण करो. हे जगज्जननी तुला
नमन!
यदेतत्कालिंदी-तनुतर-तरङ्गाकृति शिवे
कृशे मध्ये किञ्चिज्जननि तव यद्भाति
सुधियाम् ।
विमर्दादन्योन्यं कुचकलशयोरन्तरगतं
तनूभूतं व्योम प्रविशदिव नाभीकुहरिणीम्
।। ७७
(विमर्दनम् – अंगाला अंग घासणे, अंगमर्दन.)
जळी कालिंदीच्या हळुच उठते सूक्ष्म लहरी
दिसे तैसी रोमावलि तवचि नाभी भवति ही
स्तनांच्या वृद्धीने नित घसट त्यांचीच बघता
विसावा आकाशा नच मिळत वक्षावर तुझ्या ।। ७७.१
अगे आकाशाने म्हणुन धरले सूक्ष्मस्वरुपा
विसावा शांती वा नित सुखसमाधान मिळण्या
प्रवेशे शांतीने गहन तव ह्या नाभिकुहरी
वसे तेथे रोमावलि-स्वरुप निश्चिंत-हृदयी ।। ७७.२
मनोहारी नाभी, लहरिसम रोमावलि तयी
करो कल्याणासी पदि तव विनंती जननि ही ।। ७७.३
----------------------------------------------
श्लोक ७८
हे जगज्जननी,
ह्या चारुगात्री गंगेच्या वेगवान प्रवाहात स्वतःभोवती आवर्तनं घेत फिरणारे भोवरे तयार होतात. त्या भोवऱ्यांमधे आत खेचून घेण्याची मोठी ताकद असते. ते वेगवान भोवरे क्षणात उत्पन्न होतात क्षणात नाशही पावतात. माय! तुझी ही सुंदर नाभी त्या गंगावर्तासारखी मन खेचून घेणारी असली तरी गंगेतील भोवर्यांप्रमाणे नष्ट होणारी नसून अविनाशी आहे.
माय! कधी कधी तर मला असे वाटते की, तुझ्या नाभीपासून निघालेल्या रोमलतिकेभोवतीचे, ह्या रोमलतिकेला उत्तम पोषण मिळावे म्हणून केलेले हे गोलाकार नाभीरूपी आळे तर नाही? त्या उत्तम पोषणाने ही रोमलतिका बहरून येऊन तिला स्तनरूपी दोन सुंदर कळ्या आल्या आहेत.
हे जगज्जननी! कधी तुझी नाभी मला एखाद्या धगधगत्या अग्निकुंडासमान दिसत आहे. मला वाटते हे त्या कुसुमशर म्हणजे मदनाचेच अग्निसमान धगधगते तेज सामावलेले हे गोलाकार अग्निकुंड आहे.
मित्रांनो! शिवाने आपला तिसरा डोळा उघडून जाळून टाकलेला, जळत जाणारा मदन जगज्जननीच्या नाभिकुहरात शिरला त्यामुळे नाभी धगधगत्या अग्निकुंडासारखी दिसत असावी. अथवा मदनबाधा झालेला जीव जळत राहतो. मदनाच्या कुसुमशरानी दग्ध झाला नाही असा जीव सापडणं मुश्किल! त्यामुळे सर्व जीवांना जाळणाऱ्या ह्या मदनाचे साक्षात तेज ह्या नाभिकुंडात सामावले आहे.
किंवा माते हे त्या रतीचे क्रिडास्थान तर नाही? माते तुझी नाभी म्हणजे ह्या विश्वेश्वराच्या साफल्यसिद्धीचे जणु निवासस्थान आहे. त्याच्या साफल्याच्या गुहेचे जणु प्रवेशद्वार आहे. हे जगज्जननी जे तुझे नाभिकुंड सतत विजयी होते, सर्वांचा पराभव करते असे हे तुझे नाभिस्थान आमचे कल्याण करो. त्याचा विजय असो!!
स्थिरो गङ्गावर्तः स्तन-मुकल-रोमावलि-लता
कलावालं कुण्डं कुसुमशर-तेजो-हुतभुजः
रतेः लीलागारं किमपि तव नाभिर्गिरिसुते
बिलद्वारं सिद्धेर्गिरिश-नयनानां विजयते
।। ७८
प्रवाही गंगेच्या जल जणु फिरे भिंगरिसमा
जसे चक्राकारी बनवुन जळी खोल खळगा
तुझ्या नाभिस्थाना बघुन मज तैसे गमतसे
जळाचे का आवर्तन फिरत तव नाभीच बनले
।। ७८.१
खळे गंगौघाचे जळि न टिकते फार क्षण
ते
तुझी नाभी माते स्थिरचि अविनाशी असतसे
तुझी नाभी वाटे सुबक जणु आळे बनविले
मुळाशी वेलीच्या नित करित संवर्धन तिचे
।। ७८.२
तयामध्ये आली फुलुन जणु रोमावलि लता
लतेसी आल्या गे स्तनयुगुल ह्या दोनचि
कळ्या
लता सौंदर्याची जपणुक कराया म्हणुन
का
असे आळे हेची करितचि लता-पोषण सदा ।।
७८.३
स्मराचे अग्नीच्यासम
धगधगे तेज जणु हे
तुझ्या नाभीच्या
ह्या नित अनलकुंडी विलसते
रतीचे वाटे हे अनुपमचि क्रीडास्थल कुणा
नटे सौंदर्याने जननि तव नाभिस्थल सदा
।। ७८.४
शिवाच्या नेत्रांच्या सुखदचि कटाक्षातुन झरे
अहो सिद्धीचे त्या अनुपमचि साफल्य अवघे
तुझ्या नाभीमध्ये नित वसतसे ते जननि गे
असे त्या सिद्धीचे जणुचि विवर-द्वारचि उमे ।।
७८.५
शिवाच्या सिद्धीचे जननि वसतिस्थान विजयी
सदा होवो माते सतत विजयी हे त्रिभुवनी ।। ७८.६
----------------------------------------------
श्लोक ७९ –
हे शैलजा! हे
पार्वती!
तुझा
शरीराचा मध्यभाग/कटिभाग मुळातच अत्यंत कृश, बारीक आहे. त्यातून तू पर्वतराज हिमालयाची
मुलगी असल्याने मोठे मोठे पर्वत हेच तुझे स्तन आहेत. त्यांच्या भाराने तू कमरेत
किंचित वाकल्यासारखी, थकलेली दिसत आहेस. तुझा कटिभाग इतका बारीक आहे की नदीच्या
हळुहळु ढासळू पाहणार्या काठावरच्या वृक्षाच्या स्थैर्याची (स्थेम्नः) जशी दुर्दशा
झालेली असते; जसा तो तरू ढासळणार्या काठासोबत कधीही मोडून पडू शकतो त्या प्रमाणे
तुझा कटिभाग मोडून तर जाणार नाही ना अशी मला भीती वाटते. माते तुझी ही स्वभावतःच
कृश असलेली कटी कायम सुरक्षित रहावी, कुशल रहावी म्हणून मी मनापासून प्रार्थना
करतो. माय ! तुझं हे अत्यंत कमनीय अलौकिक रूप सतत माझ्या नेत्रांसमोर राहो. आणि
माझे कल्याण करो. माते तुला नमन
निसर्ग-क्षीणस्य स्तनतटभरेण क्लमजुषो
नमन्मूर्तेर्नारीतिलक शनकैस्त्रुट्यत
इव ।
चिरं ते मध्यस्य तृटित-तटिनी-तीरतरुणा
समावस्थास्थेम्नो भवतु कुशलं शैलतनये
।। ७९
(निसर्ग-क्षीणस्य – निसर्गतःच बारीक असलेला. क्लम- थकावट, क्लांति. क्लमजुष
– थकावटीनी,क्लांतीनी आश्रय घेतलेला. नारीतिलकमूर्ते -सर्व स्त्रियामध्ये श्रेष्ठ
अशी तुझी मूर्ती वा छबी. शनकैः – शनैः शनैः – हळुहळु. त्रुट- तुटणे.
त्रुट्यत इव – तुटत चालला आहे असे वाटणे. त्रुटित-तटिनी-तीर-तरुणा-समावस्थास्थेम्नः
– अगदी ढासळू पहात असलेल्या नदीच्या काठावरील स्थित वृक्षाची जशी अवस्था असेल त्याप्रमाणे.
शैलतनया – पर्वताची मुलगी. स्थेमन् – दृढता, स्थिरता, अचलता )
स्त्रियांमध्ये आहे छबि तवचि सर्वोत्तम
उमे
म्हणोनी संबोधी तुजसि जन “नारी-तिलक”
गे
असे तन्वी तूची जणु चवळिची शेंग बरवी
स्तनांच्या भाराने दिसत थकलेली कटि
तुझी ।। ७९.१
तुझी पाहूनी ही जननि लवलेली कृशकटी
कळेना कैसी ही सहन स्तनभारा तव करी
जलौघाच्या वेगे जरि नदिकिनारा खचतसे
मृदाधारे थोड्या कुणि तरु किनारी टिकतसे --- ।। ७९.२
मृदा ती वाहुनी हळुहळुचि जाताच उरली
असे वाटे आता कधिहि तरु जाईल तुटुनी
मुळे रोवूनी जो दृढ अचल राहेच टिकुनी
दशा त्या वृक्षाची अवघडचि हो दुर्धर अति ।। ७९.३
नदीकाठीच्या त्या तरुसम तुझी ही कृश कटी
मला वाटे माते अवचितचि जाईल तुटुनी
न जावी मोडूनी विपुल स्तनभारे तव कटी
मनीषा ऐसी गे कुशल तव राहो कृशकटी ।।७९. ४
----------------------------------------------
श्लोक
८० –
हे
देवी जगज्जननी!
तुझ्या
मनोहर प्रकाशानी हे त्रैलोक्य उजळून निघालं आहे. ह्या विश्वात क्षणोक्षणी
चाललेल्या ज्या प्रचंड घडामोडी आम्हाला भयकंपित करतात; तो तर तुझा सहज
मनोरंजनासाठी चाललेला खेळ, क्रीडा आहे.
माय!
तू क्षणकालही न विसंबता सतत भगवान शिवशंभूंच्या नावाचा जप करत असतेस. तुझ्या
चित्तात त्यामुळे जे अष्टसात्त्विक भाव प्रकट होतात ते अगदी सहज दिसून येत आहेत.
(स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वैपुथ/कंप,
वैवर्ण/अंगाचा रंग पांढरट पिवळा पडणे, अश्रु, प्रलय/मूर्छा) कारण त्याने
तुझ्या अंगाला घाम सुटून त्यात तुझी चोळी भिजून तुझ्या अंगाला चिकटण्यामुळे तुझे
स्तन जणु काही सुवर्णकुंभ/कनककलश वाटत आहेत. तुझ्या बाहुमूलाच्या ठिकाणी ते सारखे
घासले जात आहेत. जणु काही तू परिधान केलेल्या कंचुकीच्या बंधनाला ते तोडु पहात
आहेत. तनुभुवा म्हणजे कामदेव. कामदेवाने तुझा हा अत्यंत कृश तनुमध्यभाग वा कटिभाग
पाहिल्यावर तो तुटू नये; नदीच्या ढासळणार्या काठावरील तरुप्रमाणे मोडून
पडू नये; त्याचे संरक्षण व्हावे म्हणून, जणु काही तुझ्या पोटावर/ उदरावर तीन
वळ्यारूपी वेलीचे (लवलीवल्लिचे ) तीन वेढे
घट्ट गुंडाळून ठेवले आहेत. त्यामुळे तुझा उरोभाग, तनु मध्य, त्रिवलयांकत
उदरभाग मोठा सुंदर दिसत आहे. तुझे हे लावण्यमय रूप सतत माझ्या डोळ्यासमोर मला दिसत राहो. तुझी ही
सुंदर कटि आमचे रक्षण करो. कल्याण करो. हे माते तुला नमन!
कुचौ सद्यःस्विद्यत्तट-घटित-कूर्पास-भिदरौ
कषन्तौ दोर्मूले कनक-कलशाभौ कलयता ।
तव त्रातुं भङ्गादलमिति वलग्नं तनुभुवा
त्रिधा नद्धं देवि त्रिवलि लवलीवल्लिभिरिव
।। ८०
( सद्यस् -शिवाचे नाव किंवा
आत्ता, वर्तमानात. - स्विद् – घाम येणे. कूर्पास –कंचुकी. कष्
– घासला जाणे, कसोटीच्या दगडावर सोन्याची परीक्षा करणे. देवि – दिव् - प्रकाशणे किंवा खेळणे त्यामुळे देवीचा अर्थ त्रैलोक्य
प्रकाशित करणारी वा विश्वाची घडामोड जिची क्रिडा, खेळ आहे ती. तनुभुवा – कामदेव.
त्रिवलि – पोटावरील तीन वळ्या. लवलीवल्लि -एक प्रकारची वेल.)
स्वयं तेजाने तू उजळविसि त्रैलोक्य अवघे
तुझ्या क्रीडेने वा जगतचि घडे वा बिघडते
म्हणोनी देवी ही तुजसिच उपाधी मिळतसे
हृदी त्या शंभूचे सतत करिसी ध्यान गिरिजे ।। ८०.१
शिवाच्या ध्यानाने हृदि स्फुरति जे
सात्विक असे
तुझ्या चित्ती जेची सहज अति जे भाव
सगळे
अशा ह्या ध्यानाने तव शरिर घामात निथळे
भिजूनी चोळी ही स्तन कनककुंभासम दिसे ।। ८०.२
जणू तोडू पाहे स्तन सकल बंधांस तव हे
तुझ्या दंडांसी ते घसट करती लोभसपणे ।। ८०.३
तुझी रम्या काया भुवन मदनाचे जणु असे
तुझ्या रोमारोमामधुन विलसे तेज तयिचे
स्तनांच्या भाराने तव कृशकटी ही तुटु नये
अनंगाने युक्ती म्हणुन बघ ही योजिलि असे ।। ८०. ४
तुटावी ना माते तव कृशकटी कोमल अती
म्हणोनी बांधिले उदर वलयांनीच तिनही
असे
हे घेताची त्रिवलय लपेटून उदरा
कटीमध्याला ये अभिनवचि शोभा जननि गा ।। ८०. ५
करो ती कल्याणा नित हित करो माय अमुचे
तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करितो मी नमन गे।। ८०.६
----------------------------------------------
No comments:
Post a Comment