**।। सौन्दर्यलहरी ।।** ( विश्लेषण – श्लोक 21 – 41 )

 

      **।। सौन्दर्यरी ।।**

( विश्लेषण – श्लोक  –  )

श्लोक – 


महाललिता त्रिपुरसुंदरीचे दर्शनाचा अनुभव, अनुभूती अथवा तिची प्रचिती जे घेतात त्यांच्या मनात निरतिशय आनंदाच्या, आह्लादाच्या, निरंतर उंचबळणार्‍या जणु लहरींवर लहरी उठत राहतात. जणु काही ते स्वतःच एखाद्या विशाल आनंदसरोवरातील लाट होऊन त्या आनंद सरोवरात विहरत असतात.  आनंदाचे डोही आनंद तरंग बनतात. ‘‘परमानन्दलहरीं दधति ’’ त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही. आनंदाला सतत भरती आल्याचा अनुभव ते घेत असतात. हा अनुभव घेतल्यावर आता अजून काही काही नको अशा तृप्त अवस्थेला ते पोचतात. ‘‘आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया’’ ह्या भावनेने तृप्त असतात. गीतेतील सहाव्या अध्यायात 22 व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे

यं ल्लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरूणापि विचाल्यते ।। . ।।

परमात्मसुखाच्या प्राप्तीचा लाभ झाल्यानंतर ती व्यक्ती अजून कुठलाही लाभ हा लाभ समजतच नाही. त्याच्यावर कितीही मोठ्या दुःखाची कुर्‍हाड कोसळली तरी ती व्यक्ती जराही विचलित होत नाही.

पण! असा हा आनंदाचा अनुभव कोणाला मिळतो? असा आानंद मिळवणारा असतो तरी कसा?  अशा व्यक्तीचा उल्लेख श्लोकात ‘‘महान्तः’’ असा केला आहे. म्हणजेच निःसीम, अनन्य भक्त असलेले महान योगीश्वर हेच त्रिपुरसुंदरीच्या रूपाला पाहू शकतात. अशा साधकांचं मन अत्यंत पवित्र, निर्मळ असतं. त्याच्या मनात साठलेले सारे मळ त्याने जणु काही खरडून खरडून काढलेले असतात. निपटून टाकलेले असतात. पिळून टाकलले असतात. मनाचे मळ म्हणजे, काम, क्रोध, मोह ---इत्यादि षड्रिपु. माया म्हणजे अविद्या, अहंकार, अभिनिवेश ह्या सगळ्याचा निरास झाला की; मन अमल-विमल सुंदर होतं. अहो! मनाचे हे अहंकारादि सर्व शत्रू हाडाला मांस आणि कातडं चिकटलेलं असावं त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चिकटून असतात.  ते सर्व काढून टाकणं सोपी का गोष्ट आाहे? त्यासाठी दधिचीसारखी खडतर तपश्चर्या आवश्यक असते.

ही परमआनंददायी त्रिपुरसुंदरी कशी दिसते? कुठे राहते? अशा योगीश्वराला कुठे भेटते? ह्याचं वर्णन करतांना आचार्य सांगतात की, आकाशात अचानक वीज चमकून जावी त्याप्रमाणे सूर्य, चंद्र, अग्नी स्वरूप असलेली तेजाची सूक्ष्म रेघ, निर्झरी, क्षणभर चमचमचम चमकून गेल्याचा प्रत्यय साधकाला सर्व चक्रांच्या वरती भ्रूमध्यात असलेल्या आज्ञाचक्रात येतो.  आज्ञा चक्राच्याही वर महापद्माटवी म्हणजे जणु काही सहस्रदल कमलांच्या अरण्यात ही त्रिपुरसुंदरी वीजेसारखी सळसळत संचार करते. त्या सहस्रदलकमलातील पूर्णचंद्रात ती बसते. (निषण्णा) अत्यंत शोभून दिसते.

काही लोक कला ह्या शब्दाचा अर्थ कुंडलिनी शक्ती असा घेतात. आपण कुंडलिनी जागृत होतांनाचे जे वर्णन वाचले होते त्यात मूलाधार चक्रावर साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही कुंडलिनी जागृत होताच शरीरारील साही चक्रे भेदून शेवटचे सहावे आज्ञा चक्रही भेदून मस्तकात असलेल्या सहस्रदलकमला पर्यंत वर जाते. आणि त्या सहस्रदल कमलातील चंद्रमंडलात/ पूर्ण चंद्रात विराजमान होते. ह्या साही कमळांच्यावर विराजमान असलेली कला किंवा सादकला , सर्वांपेक्षा श्रेष्ठ , परा, परात्परा अथवा परमेश्वरी  म्हणजेच ही त्रिपुरा वा त्रिपुरसुंदरी आहे. ही वीजेप्रमाणे जाणारी तेजाची रेघ आज्ञाचक्र ते सहस्रदलकमल पर्यंत अनुभवाला येते.

 जे तंत्रविद्या जाणकार आहेत ते महाललितात्रिपुरसुंदरी ही श्रीयंत्रमय मानतात.  ते ईं हे बीजाक्षर/बीजमंत्र म्हणजेच त्रिपुरसुंदरीची आकृती मानतात. मानतात. श्रीचक्रात ईं हा बीजाक्षरमंत्र सर्व आवरणांच्या वर असलेल्या ब्रह्मरंध्रातील सहस्रदलकमलातील चंद्रमंडल हेच आहे. तेथे ही त्रिपुरसुंदरी ‘‘निषण्णां’’ म्हणजे बसलेली आहे. तिला त्रिपुरसुंदरी का म्हणतात  हे खाली पाहू.

1 त्रिपुरसुंदरी ही सूर्य, चंद्र आणि अग्निस्वरूप आहे.

2 ती श्रीचक्ररूप आहे. श्रीचक्रात

बिंदुत्रिकोण आणि वसुकोण हा एक खंड, 

दहादहा त्रिकोण असलेली दोन चक्रे आणि 14 त्रिकोणांचे एक चक्र हा दुसरा खंड , तर अष्टदलचक्र, षोडषदलचक्र आणि तीन भूपुरे मिळून तिसरा खंड.

हे तीनही खंड सोम, सूर्य, अग्नी हेच तीन खंड आहेत. ह्या त्रिखंडालाच

3 जागृति, स्वप्न, सुषुप्ति

4 स्थूल, सूक्ष्म, कारण

5 प्रमाता, प्रमाण, प्रमेय

6 विश्व, तैजस, प्राज्ञ

7 सृष्टि, स्थिति, प्रलय

 8 ज्ञान, इच्छा, क्रिया

अशी त्रिपुटीसूचक नावे दिली जातात. आपली आराध्य देवता त्रिपुटींची अधिष्ठात्री असल्याने तिला त्रिपुरा किंवा त्रिपुरसुंदरी अशी नावे आहेत.

सकल तत्त्वातीत असलेल्या त्रिपुरसुंदरीच्या ह्या स्वरूपाला सादकला म्हणतात. साद म्हणजे चरम गती, परम अधिष्ठान, सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याने तिला परा, परात्परा, परमेश्वरी परमानन्दलहरी असे म्हणतात!

* तटिल्लेखा-तन्वी तपन-शशि-वैश्वानरमयीं

निषष्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलाम्

महापद्माटव्यां मृदित-मल मायेन मनसा

महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लाद-लहरीम् ।। ।।*

  ( तटित्वीज, लेखा – रेघ. तन्वी- बारीक, कृश, चवळीच्या शेंगेसारखी अंगकाठी असलेली. तटिल्लेखा-तन्वी  बारीक रेघेप्रमाणे दिसणारी वीज  तपन – सूर्य. शशि – चंद्र. वैश्वानर – अग्नी. निषण्णा – विराजमान.  अटवी- अरण्य महापद्माटवी – सहस्रदलकमल हेच जणु काही अरण्य आहे. मृदित - दूर केलेले, निरास झालेले, चूर्ण झालेले. महान्तः - मोठे मोठ अनन्य भक्त असलेले योगीश्वर)

*सहा चक्रेरूपी असति कमले जी तनुमधे

सहा पद्मांच्या त्या वरति तव गे मूर्ति विलसे ।

जशी विद्युल्लेखा सळसळत जाते उजळुनी

प्रकाशाची धावे क्षणभर जणू निर्झरिणि ती ।। .।।

 

तशी आज्ञाचक्री चमकुन क्षणार्धातचि विरे

प्रकाशाची दीर्घा लवलवति रेषा क्षणभरे ।

अशी येई भक्तां जननि अनुभूती तवचि गे

रवी इंदू अग्नीमय स्वरुप माते तव दिसे ।। .।।

 

 अगे मूर्धस्थानी कमलचि सहस्रादल असे

दलांचे शोभे हे वन गहन मोठे जटिल गे ।

बसे तेथे तू गे कमलदलरूपी घनवनी

अशा ह्या रूपासी विमलमति हे भक्त बघती ।। .।।

 

अविद्या माया वा सकलचि अहंकार मद गे

रिपु क्रोधा जैसे मल सकल कामादि मनिचे

 धुवोनी केले हे मन विमल ज्यांनी सकलची

 तुझ्या ह्या रूपासी अनुभवति ते निर्मलमती ।। .४ ।।

 

तुझी प्राप्ती होता निरतिशय आनंदलहरी

हृदी त्यांच्या माते उठति नित त्या येचि भरती

उणावे ना त्यांचा अपरिमित आनंद कधिही

कृपा ऐसी माझ्यावर जननि तू नित्यचि करी ।। .।।*

(  मूलाधारचक्राला चतुर्दल कमल म्हणतात. 4 पाकळ्यांचे कमळ

तर स्वाधिष्ठान चक्राला षड्दल कमल म्हणतात. 6 पाकळ्यांचे कमळ

मणिपूर चक्रदशदलकमल 10 पाकळ्यांचे कमळ

अनाहतचक्रद्वादशदल कमल 12 पाकळ्यांचे कमळ

आज्ञाचक्रद्विदल कमल 2 पाकळ्यांचे कमळ )

----------------------

 

श्लोक  -


बाळ आईकडे धावत आल्यावर ``मला उच्चून कदे घे’’ असं त्यानी म्हणायची आई वाट बघत नाही. त्याच्या ‘‘ आऽऽई !’’    ह्या हाकेतूनच, त्याच्या मनातील भीती जाणून, ती आधीच त्याला उचलून कडेवर घेते. त्याप्रमाणे ``माऽऽय गेऽऽ’’ अशी आर्त हाक ऐकताच ही जगज्जननी भक्ताने ``माय माझ्यावर कृपा कर. मला ह्या भवसागराची भीती वाटत आहे. ह्या दासावर कृपा कर’’ हे सर्व ऐकेपर्यंत थांबत नाही. त्याच्या मुखातून नुसतं ``भवानि त्वं----’’ असं येताच (येथे भवानी हा ईकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे संबोधन एकवचन असतांना) त्याचा अर्थ भवानि त्वम् म्हणजे `मला तुझ्यासारखं कर’ असा करून, क्षणात त्याला पोटाशी धरते. त्याला सायुज्यपद देते. सायुज्यपद म्हणजे स्वतःप्रमाणे, स्वतःसारखे करणे. येथे ``भवानि त्वं’’ ह्या शब्दांवर श्लेष आहे. त्याचे दोन अर्थ होतात. 1 हे भवानी तू 2 मला तुझ्यासारखं कर.

 

 भवानी भक्ताला स्वतःप्रमाणे निर्भीड बनवते. स्वतःप्रमाणे सर्व गुणसम्पन्न करते. त्यामुळे त्याच्या मनातील भवसागराची भीती नाहिशी होते. पांडुरंगाष्टकामधे आचार्य म्हणतात, विठ्ठला तू कमरेवर दोन्ही हात ठेऊन भक्तांना सांगत आहेस की मी तुमच्या सोबत असल्यावर हा भवसागर फक्त कमरेएवढा खोल आहे. सौंदर्य लहरी ह्या स्तोत्रात तेच भवानी आपल्या भक्तांना नुसतं सांगत नाही तर सर्व भक्तांना ``स्व-स्वरूप’’ करून टाकत आहे. हा कुठच्या कुच्चर माणसाचा `असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ हा मार्ग नाही. मी काही न करता हाक मारताच मला मिळायला पाहिजे हा सोकावलेला उद्धटपणा नाही. तर खरे आर्त मनातून प्रकट होताच श्रद्धेच्या बळावर अशक्याला शक्य करण्याची ताकद प्राप्त करून घेण्याचा भगिरथ मार्ग आहे. कर्ममार्गाला श्रद्धेच्या बळावर विवेकपथावर ठेऊन ध्येयापर्यंत घेऊन जाणारा हा मार्ग आहे. स्वतःमधे अजोड ताकद निर्माण करणारा मार्ग आहे. ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही कल्याणरूपी भवानी, त्रिपुरसुंदरीच आहे.

ध्येयाला सिद्धीत परिवर्तित करणारी ही शक्ती इतकी ऐश्वर्यसम्पन्न आहे, इतकी विलोभनीय आहे की सारे देवही ह्याच शक्तीरूप जगज्जननीच्या त्रिपुरसुंदरीच्या पायी लीन झाले आहेत. किंबहुना त्यांना प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ इंद्रपद असो वा दैवी गुण असो ह्या शक्तीच्या कृपेनीच प्राप्त झाले आहेत.

इंद्रासह सर्व देवांनी आपली मस्तके तिच्या पायावर झुकवतांना त्यांच्या माथ्यावरील अनमोल आणि कलाकुसर केलेल्या सोन्याच्या मुकुटात जडवलेली अत्यंत मौल्यवान रत्ने चमकत आहेत. नवरत्नातून बाहेर पडणारे सप्तरंगी प्रकाशमय कवडसे जननिच्या पायावर, अंगावर पडून विलोभनीय दृश्य तयार झाले आहे. हे पाहून वाटत आहे की, सोन्याच्या निरांजनात रत्नांच्या वाती लावून जणुकाही हे सर्व देव तुझी मनापासून आरती गात आहेत. इतके करूनही दीन आर्त अनन्य भक्ताला जे सायुज्य पद मिळते ते देवांनाही मिळत नाही.

 त्या रत्नमाणकांच्या प्रकाशात उजळून निघालेला तुझा चेहरा इतका विलोभनीय, इतका आह्लादक आहे की माझ्या हृदयात तुझी हीच मंगलमय छबी कायमची विराजमान झाली आहे. 

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-

मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः

तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं

मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मुकुट-नीराजित-पदाम् ।। २ *

 

म्हणाया जाती जे ``तुजसम भवानी मजवरी 

भवाब्धि ताराया समजुनि कृपा कोणचि करी’’। 

तयांचे ऐकोनी `` तुजसम भवानी मज’’ असे

करे त्यासी तू गे तुजसम भवानी त्वरित गे ।।२. ।। 

 

तयांना देसी तू त्वरित तव सायुज्य पद ते

मिळे ना जे कोणा चरणकमला पूजुन  कसे। 

तुझ्या पायी होती सकल सुरही लीन विनये

विधी विष्णू शंभू सुरवरचि देवेंद्रहि नमे ।।२.२ ।। 

 

तयांचे रत्नांचे मुकुट तव पायीच झुकता

सुवर्णा रत्नांची तव पदि प्रभा दिव्य बघता। 

प्रकाशाचे ऐसे बघुन नवरंगी कवडसे

अती हर्षोल्लासे मम मन विचारतचि डुबे ।। २.३ ।। 

 

सुरम्या रत्नांच्या कनकमय नीरांजनिमधे

दिसे रत्नज्योत्स्ना अनुपमचि ज्योतीसम तिथे। 

गमे ओवाळीती मृदुल पदपद्मांस तुझिया

जथे हे देवांचे मणिमय दिव्यांनी समुचिता ।। २.४ ।। 

 

मिळे जे भक्तीने जननि तुजला गे विनविता

नसे सायुज्याचे पद सुलभ तेची सुरवरा। 

दिवे रत्नांचेही जननि तुज ओवाळुन असे

कृपा ना लाभे ती जर हृदि नसे भाव लव गे ।। २.५ ।। *

----------------------

 

श्लोक २३ -


 शिव आणि शिवा ह्या दोघातही लवमात्र भेद नाही अत्यंत एकरूपपणे, एकरसपणे ते एकत्र रहात आहेत शक्तिशिवाय शिव नाही आणि शिवाविना शक्ति नाही असं हे दोघांचं सायुज्य  (युज्  म्हणजे जोडलं जाणं) आहे. एकरूपता आहे. एकात्मता आहे. त्याला अत्यंत काव्यमय रीतीने सांगतांना आाचार्य म्हणतात,  

अगे माते ! तो शिवशंभू कल्याणस्वरूप, मंगलमय आहे हे पाहून तुला त्याची इतकी ओढ लागली की तू त्या शिवशंभूची नुसती सांगण्यापुरती शाब्दिक अर्धांगिनी राहिली नाहीस तर खरोखरीच त्याच्या शरीराचा वाम म्हणजे डावा अर्धा भाग व्यापून राहिली आहेस. जणु काही तू त्याच्या शरीराचा अर्धा हिस्सा हरण करून तेथे रहात आहेस; पण तेवढ्यावर तुझं समाधान झालेलं दिसत नाही. तुझी अतृप्तता इतकी की, शिवशरीराचा उर्वरीत, उरलेला अर्धाभागही तू व्यापून टाकला असावास असा संदेह माझ्या मनात निर्माण झाला आहे. (शिवाच्या धमन्याधमन्यांमधून वाहणारी शक्ति म्हणजे ही त्रिपुरसुंदरीच आहे. ) आप म्हणजे पाणी. आप आपात मिसळावं तशी `आपोआप’ तू त्यात मिसळून गेली आहेस. लावण्याने लावण्याचे प्रतिबिंब बघता कोण बिंब आणि कोण प्रतिबिंब हेच कळू नये तसे तुमचे हे मिलन मला भासत आहे. सूर्याचे एक किरण, दोन किरण असे वेगवेगळे करता येत नाहीत. ते सर्व मिळूनच सोनेरी प्रकाश पसरतो तशा विश्वमय पसरलेल्या तुम्हा दोघांच्याही दीप्ती एकरूपच आहेत.

मी असे म्हणतो त्याचे कारण, तू सर्वस्वी श्रीशंभूसारखीच दिसत आहेस. मला तर तुमच्या दोघांमधे काही फरकच दिसत नाहीए.  जणु त्याचं दिसणं ही तू हरण केलस की काय? तुमच्या दोघांचा वर्ण प्रभातसमयी होणार्‍या अरुणोदयाप्रमाणे मनोहारी, आरक्त, अत्यंत तेजस्वी आहे. सूर्य, चंद्र अग्नी हे त्रिलोचन तुम्हा दोघांचेही आहेत. इतकच नाही तर चंद्राची किंचित तिरकी कोर मला शिवशंभूच्या जटारूप मुकुटावर जशी दिसत आहे तशीच तुझ्याही सुंदर केशरचनेवर घातलेल्या एखाद्या सुंदर अलंकारासारखी भासत आहे. भगवान शंकर चंद्रचूड असले तर तूही चंद्रचूडच आहेस. जणु काही तुम्ही एकमेकांनी एकमेकांच्या सायुज्यभावाला प्राप्त केलं आहे.

शिव आणि शक्तिचं हे एकरसत्व आठव्या श्लोकात आपण पाहिलं आणि पुढेही अनेक श्लोकांमधे पाहू. आठव्या श्लोकात म्हटलं आहे

पलंगी सौख्याच्या शिवमय शिवाकार  बनुनी

शिवासंगे तूची पहुडलि चिदानंदलहरी ।

शिवमय असूनही, शिवाची असीम शक्ती, प्रेरणा तूच असूनही हे माय! तुझ्या जवळ लेशमात्र अहंकार नाही. अत्यंत विनम्रपणे तू किंचित पुढे झुकली आहेस; तुझ्या स्तनभाराने तू किंचित पुढे झुकली आहेस. मागच्या काही श्लोकांमधे आपण ह्या त्रिपुराम्बिकेची जी विविधं रूपं पहात आहोत त्यातील हे शिवसायुज्यस्वरूप किंवा शिवात लीन झालेलं शिवमय स्वरूप!  शिवस्वरूप होणे असो वा शक्तिस्वरूप होणे असो दोन्हीही सारखेच!

( संपूर्ण व्योम हेच शिवशंभूच्या पसरलेल्या जटा म्हणा वा अत्यंत विलोभनीय अशी ह्या परमेश्वरीच्या केशकलापाची केलेली आकर्षक रचना म्हणा. त्यावर खोचलेला हा चंद्रकोरीचा दागिना अनुभवा. क्षितिजाकडे झुकलेल्या नभाला स्तनभाराने विनम्र झालेल्या त्रिुपुरसुंदरीमधे कल्पना करून बघा.  आणि मग ह्या विश्वरूपाला आपल्या पूर्वजांनी शिव आणि शक्तिरूपी अशा एका सुंदर साच्यांमधे ओतून बनवलेली मूर्ती किती विलोभनीय आहे ह्याची अनुभूती घ्या.)

त्वया हृत्वा वामं वपुरपरितृप्तेन मनसा

शरीरार्धं शम्भोरपरमपि शङ्के हृतमभूत्

यदेतत्त्वद्रूपं सकलमरुणाभं त्रिनयनं

कुचाभ्यामानम्रं कुटिल-शशि-चूडाल-मुकुटम् ।। २३।। *


अगे मांगल्याचे प्रतिक शिवकाया सुखमयी

बघोनी व्यापे तू जननि शिवकायार्ध; तरिही ।

शमे ना चित्ताची अति प्रखर ती आस तुझिया

 मिळे कैसी तृप्ती हृदय भरले ना  तव जरा ।।  २३.।।

 

अगे आक्रामीसी शिवतनुस त्या उर्वरित गे

मिळे सौख्यासी गे सुख सकल तैसे मिलन हे ।

सुखाच्या बिंबाने सुखद प्रतिबिंबास बघता

कळे ना दोघांसी `पर’चि कुठला `मी’ च कुठला ।। ।२३.

 

प्रकाशाने जावे मिसळुन प्रकाशी सहज गे

जलामध्ये जावे जल मिसळुनी त्यासम शिवे ।

शिवामध्ये राही शिव बनुन तू गे शिवसमा

अभेदाने राही शिवमयचि सायुज्य स्वरुपा ।। २३. ।।

 

दिसे दोघांचीही नित अरुण वर्णी तनुलता

रवी अग्नी इंदू नयन तुमचे तीन अरुणा 

झुके नम्रामूर्ती अधिक स्तनभारे तनुलता 

शिरी चंद्राची ही अनुपम दिसे कोर धवला ।। २३. ।।* 

 

----------------------

श्लोक २४ 


बाई गं! ह्या ब्रह्मांडातील प्रचंड घडामोडी केवळ तुझ्या क्षणभर वर होणार्‍या भुवईच्या संकेतावर चालतात. हे माते! तुझ्या आज्ञेवाचून ह्या जगातील पानही हलत नाही. तू क्षणभर नुसती भुवई वर केलीस की, विधाता हे जग निर्माण करतो ( ‘‘धाता जगत् सूते’’), विष्णू त्या जगाचे पालन पोषण करतो (‘‘हरिः अवति’’), ‘‘रुद्र क्षपयते’’ म्हणजे प्रलयकाली रुद्र ह्या जगाचा लय करतो. ह्या प्रमाणे विश्वाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय ह्या कामी नियुक्त असलेले देव तुझ्या क्रियाशील झालेल्या भ्रूलतांची आज्ञा होताच आपापली कामे करू लागतात.( ‘‘तव क्षणचलितयोः भ्रूलतिकयोः आज्ञां आलम्ब्य  धाता जगत् सूते। हरिः अवति। रुद्रः क्षपयते’’ । )

ण रुद्रदेवतेनी प्रलयकाळी सर्व कार्याचा नाश केल्यावर कार्याची कारणे शिल्लक राहतात. घट फुटला तरी खापराचे तुकडे शिल्लक राहतात. पट फाटला तरी धागेदोरे शिल्लक रहातात. त्याप्रमाणे कार्यप्रपंचाचा नाश झाल तरी कारणप्रपंच शिल्लक राहतोच. कारण प्रपंच म्हणजे प्रपंचाचे कारण. वेदान्ताप्रमाणे हा कारण प्रपंच म्हणजेच प्रकृति/ अविद्या/ माया/  वा अज्ञान. प्रपंचाचे कारण असलेली ही प्रकृति  अव्यक्त रूपात असते. सांख्य तिला अलिंग म्हणतात.

 रुद्राने सृष्टीचा नाश केल्यानंतरही अशा ह्या अस्ताव्यस्त, विस्कळीत झालेल्या कारण प्रपंचाचाही लय करण्याचं काम ईशाचं म्हणजे महेशाचं आहे. महेश तुझ्या भुवईचा संकेत होताच तुझी आज्ञा म्हणून सर्व विस्कळीत झालेला कारणप्रपंच आपल्या स्वरूपात लपवून टाकतो, लय करून घेतो, सामावून घेतो. त्याचा लय करतो म्हणजे अव्यक्त स्वरूपात ठेवतो. अशा प्रकारे कारणप्रपंचालाही आपल्यात लीन करून शेवटी तो ईश म्हणजे महेश /महेश्वर देखील स्वतःचा देह सदाशिव तत्त्वात मिळवून सदाशिवस्वरूपात स्वतःला लीन करून घेतो. ( ईशः एतत् तिरस् कुर्वन् स्वं अपि वपुः तिरयति )

 ब्रह्मा, विष्णु, रुद्र, आणि ईशान म्हणजे महेश ह्यांना सृष्टीच्या उत्पत्तीच्या काळी परत त्यांच्या कार्यासह उत्पन्न करण्याच्या, आविर्भूत करण्याच्या क्रियेला अनुग्रह किंवा आविर्भाव म्हणतात. ( अनुग्रह, आविर्भूत, तिरयति इत्यादि काही शब्द पारिभाषिक असतात. वेगवेगळ्या पंथाप्रमाणे त्याजागी दुसरे शब्दही वापरले जातात. हा अर्थ पांडुरंगशास्त्री गोस्वामी ह्यांच्या पुस्तकातून घेतला आहे.  ) सदाशिवाच्या अनुग्रहानेच सृष्टिकाली  हे सर्व देव प्रकट होऊन आपापली कार्ये करतात. हा सदाशिवाचा अनुग्रहही तुझ्या भ्रुकुटीच्या/ भुवईच्या एका संकेतावर अवलंबून आहे.

( तिरोधान आणि आविर्भाव ह्याबद्दल सांगतांना काही प्राज्ञांचे मत पुढीलप्रमाणे आहे. तिरोधान म्हणजे लपवणे आणि आविर्भाव म्हणजे उत्पन्न करणे. थोडक्यात वस्तू नाामशेष( नावही शिल्लक नाही) होत नाही. एका गोल चकतीवर  विविध चित्र काढली; त्यावर दुसरी चकती ठेवली; वरच्या चकतीला एक  गोलाकार भोक ठेवले. वरची चकती गोलाकार खालच्या चकतीवर फिरवली तर जेथे भोक येईल तेथे जे चित्र असेल ते दिसेल. चकती फिरवल्यावर भोक पुढे गेले तर ते चित्र दिसणार नाही म्हणजे ते तिरोधान होईल. तर भोकाखाली आलेले दुसरे चित्र आविर्भूत होईल. वा शिवाचे डोळे मिटणे म्हणजे निमेष. त्यावेळी जग दिसत नाही. व शिवाचे डोळे उघडणे म्हणजे उन्मेष. त्यावेळी विश्व दृष्टीस पडते. असो! )

बाई गं! ज्या देवतांचे अफाट कार्य पाहून आमची छाती दडपून जाते, आम्ही अक्षरशः अवाक होतो, त्याच्या कार्याचा आवाका आमच्या बुद्धीच्या अवाक्यात, टप्प्यात येत नाही, अशा  ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईशान/महेश आणि सदाशिव  ह्या पाचही देवता तुझ्या भुवईच्या नुसत्या संकेतावर क्रमशः सृष्टि, स्थिति, प्रलय, तिरोधान आणि अनुग्रह ही कामे करत असतात. सर्वांवर अनुग्रह करणार्‍या सदाशिवालाही तू तुझ्या भुवईच्या तालावर काम करायला लावतेस.  अगे माय! तुझी सर्वांवर चालणारी हुकुमत, अधिकार, स्वामित्व इतकं मोठं आहे की तुला कोणाला प्रत्यक्ष आज्ञा देण्याचीही गरज भासत नाही, इतका तुझा दरारा आहे. सर्वजण तुझ्या नुसत्या भुवईच्या वर होण्यालाच  `त वरून ताक समजून’ तुझ्या मनातील भाव जाणून विनाविलंब त्यांची काम करतात. तुझी भुवईची हालचाल म्हणजे जणु पडत्या फळाची आज्ञा आहे.

 तुझ्या भ्रूलीलेचा जर हा महिमा असेल तर तुझ्या प्रभावाचं वर्णन मी काय करणार? मला वाटतं, माय! तत्त्वतः तू एकच असून कार्यभेदाने अनेक नावे व रूपे धारण करतेस. तुला माझा साष्टांग दंडवत असो.

जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते

तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति ।

सदापूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णाति च शिव-

स्तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः ।। २४  ।। *

( हरिरवति – हरिः अवति। - अव् (अवति) – रक्षण करणे, कृपा करणे, प्रसन्न करणे, सुख देणे, संतुष्ट करणे. क्षप् – फेकणे, नाश करणे. तिरस् कृर्वन् – अंतर्धान पावणे, लय पावणे, तिरयति – लपवणे, झाकणे गुप्त ठेवणे, दृष्टीस न पडु देणे.)

जराशी होता गे जननि भुवई ही वर तुझी

विधाता निर्मी हे जगत तव आज्ञा समजुनी ।

 तुझ्या भ्रूसंकेतावर करित तो पालन हरी

तुझ्या भ्रूलीलेने प्रलय घडवी रुद्र सहजी ।।  २४.।।

 

जगाच्या नाशाने जग घडतसे विस्कळित जे

स्वतःमध्ये  सामावुन जगत घे ईश सगळे ।

स्वदेहासीही तो सहज शिवतत्त्वी लय करी

पुरे त्यासाठी गे लव उचलणे तू भुवइसी ।। २४.२  ।।

 

धरे अव्यक्तासी जग प्रलयकाळी जननि गे

परी सृष्टी काली फिरुनि जग हो व्यक्त सगळे ।

विधी विष्णू रुद्रा सहचि चवथा ईश मिळुनी

करीती ब्रह्मांडा पुनरपिच निर्माण जननी ।। २४. 

 

स्वकार्याच्या ज्ञाना उपजवुन त्यांच्या मतिमधे

तयांची उत्पत्ती घडत शिवतत्त्वाकडुन गे ।

तुझ्या भ्रूसंकेतावर घडतसे कार्य सकला

शिवालाही लागे अनुमति तुझी कार्य करण्या ।। २४.।।

 

 शिवाच्या तत्त्वासी जननि सहजी अंकित करे

तुझ्या भ्रूलीलेच्या बघुनिच प्रतापा नच सुचे ।

तुझ्या सामर्थ्याच्या जननि अनुमाना करु कसे

तुला आलो मी गे शरण जननी हे शरणदे ।। २४.५ ।। *

पुन्हा नीट लक्षात येण्यासाठी पाचही देवांची नावे व कार्ये

1 विधाता / धाता/ विधी / ब्रह्मा – जगाची निर्मिति  (सृष्टि)

2 हरी / विष्णू -  जगाचा सांभाळ, पालन-पोषण (स्थिति)

3 रुद्र – प्रलयकाळी सर्व कार्यांचा नाश करणे. (लय)

कार्यांचा नाश होतो कारण शिल्लक राहते जगाचा नाश झाला तरी उद्ध्वस्त झालेल्या जगाचे अवशेष उरतात.

4 ईश / ईशान / महेश / महेश्वर – हे जगाचे अवशेष स्वतःत सामावून घेतो व व्यक्त दिसणारे जग अव्यक्त स्थितीत जाते. (तिरोधान)  काही  विद्वान ह्यास निमेषही म्हणतात.

महेश किंवा ईशान ( विधाता, हरी, रुद्र ) तिघांना आापल्यात सामावून घेतो आणि स्वतःही त्या परमशिवतत्त्वात विलीन होतो.

5 सदाशिव / शिवतत्त्व – सृष्टीच्या निर्मितीच्यावेळी म्हणजे सृष्टिकाली हे शिवतत्त्व ह्या उरलेल्या चारही देवांना त्यांच्या कार्यासह निर्माण करते, आविर्भूत करते.  ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि ईशान ह्यांना निर्माण करतांना त्यांचं कार्य काय आहे ह्या माहितीसह निर्माण करण्याच्या कृतीला (जणु काही त्यांच्या गुणसूत्रात किंवा RNA -DNA मधे भरून ) अनुग्रह किंवा आविर्भाव  म्हणतात.

सदाशिवाचा वा शिवतत्त्वाचा हा अनुग्रहही त्रिपुरसुंदरीच्या भ्रूलीलेवर अवलंबून असतो.

----------------------

श्लोक  -


हे माय !

ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र हे देव इतर सर्व देवांमध्ये श्रेष्ठ गणले जातात पण ; माय तू साक्षात विश्वरूप त्रिपुरसुंदरी आहेस. तुझ्या त्रिगुणात्मक शरीरातून एक एक गुण घेऊन ह्या देवांची निर्मिती झाली आहे. ( दुसर्‍या श्लोकात आपण पाहिलं आहे की,)

जरी कार्ये मोठी हर हरि विधी पूर्ण करिती

परी सामग्रीची गरज करण्या पूर्ण सगळी

विधी घेई माते चरणकमळातून तुझिया

परागासी एका सकल जग साकार करण्या ।। 2.1

 

पुर्‍या त्रैलोक्याच्या सहज प्रतिपाळास हरिला

पुरे होई धूलीकण चरणिचा एक तुझिया

कणार्धासी त्या गे शिरि उचलिता तो लटपटे

सहस्राशीर्षांचा  सबळ हरिही तो डगमगे ।। 2.2

 

जगाच्या संहारा चरणरज माते उचलुनी

निजांगी भस्माचा शिव करितसे लेपनविधी

तिघांचा चाले हा जगि अजुनही खेळ बरवा

अहो उत्पत्ती वा स्थिति विलय अव्याहत असा ।।2.3 ।।

 

मिळे ह्या तीघांना तुजकडुन स्फूर्ती सतत ही

असे तू चिच्छक्ती भरुन उरली ह्या त्रिभुवनी

कळावा कैसा तो जननि तव हा व्यापकपणा

कसा जाणावा तो जननि महिमा थोर तव हा ।। 2.4 ।। 

ज्याप्रमाणे सारया नद्या समुद्रात मिळूनही समुद्राला त्यांचा भार होत नाही वा अजून धोधो पाऊस पडला तरी समुद्र सर्व पाणी आपल्यात सामावून घेतो त्याप्रमाणे  सर्व देव तुझ्यात समाविष्ट आहेत. समुद्रात कितीही तरंग उमटले, लाटा निर्माण झाल्या, अगदी त्सुनामी जरी आल्या तरी समुद्राच्या व्याप्तीहून त्यांची व्याप्ती मोठी होऊ शकत नाही. म्हणून षट्पदी ह्या स्तोत्रात आद्य शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘ समुद्रात सतत तरंग उठत असले, समुद्र तरंगांनी युक्त असला तरी समुद्राला तारंग म्हणता येत नाही.’’  (सामुद्रो हि तरङ्ग: क्वचन समुद्रो न तारङ्गः )  ह्या उक्तिप्रमाणे ह्या सर्व  देवांपेक्षाही तुझी व्याप्ती असीम आहे. तुझं कर्तृत्त्व अफाट आहे. तुझी आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. तू सर्वश्रेष्ठ आहेस. (गणितातील सेट थेअरी मधे सर्व सेटस् हे युनिव्हर्सल सेट मधे ज्या प्रमाणे येतातच त्याप्रमाणे सर्व देव हे त्रिपुरसुंदरीचेच अंश आहेत.)   

म्हणून हे कल्याणकारी शिवे! स्वतः महेश्वरही शिवशक्तितत्त्वाचे  वर्णन करताना दक्षिणामूर्तिसंहितेत पार्वतीला सांगतात,

ब्रह्माविष्णुमहादेवा अस्याः पुत्राः वरानने ।

चतुर्थोऽहं महेशानि सुतस्तस्या महेश्वरः ।।

हे माय! हे जे मी सांगत आहे, ते फक्त मी सांगत आहे असे नाही तर ह्या सर्व देवांना पाहिलं तर, हे देव तू ज्या रत्नखचित चौरंगावर, पादपीठावर पाय ठेवतेस त्या पादपीठाच्या जवळ तुझ्यापायापाशी उभे राहून अत्यंत भक्तिभावाने, नम्र होऊन  तुझ्यापुढे नतमस्तक झालेले दिसत आहेत. नमस्कारासाठी जोडलेले त्यांचे कोमल हात त्यांनी अत्यंत आदराने स्वतःच्या कपाळाला लावल्याने ते कमळाच्या कळ्यांप्रमाणे दिसत आहेत. देवांनी त्यांच्या मुकुटात अप्रतिम अलंकाराप्रमाणे आरक्त कमलकलिकांचा तुरा खोवावा, तसे त्यांचे जोडलेले हात एखाद्या तुर्‍यांप्रमाणे अनुपम दिसत आहेत. ही तुझी महती आहे. तुझ्या मोठेपणामुळेच  हे सर्व देव तुझ्या पावलांजवळ नम्रपणे उभे आहेत.

त्रयाणां देवानां त्रिगुणजनितानां तव शिवे

भवेत्पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता

तथा हि त्वत्पादोद्वहन-मणि पीठस्य निकटे

स्थिता ह्येते शश्वन्मुकुलित-करोत्तंस- मुकुटाः ।। ।। *

तुझी मूर्ती माते त्रिगुणमय ही दिव्य अतुला

तुझ्यातूनी घेती विधि, हर, हरी एकचि गुणा ।

रजासी सत्वासी धरुन अथवा तामस गुणा

अगे जन्मा येती विधि हरि महादेवचि पहा ।। ५.।। 

 

तुझ्या अंशातूनी प्रकटति तिघेही सुरमणी

म्हणोनी तीघेही तनय तव गे माय असती ।

तुझ्या पूजेने गे म्हणुन घडते पूजन जसे

तिन्हीही देवांचे अति सहज माते तुजसवे ।। ५. ।।

 

तुला ठेवायासी चरणकमळे पावन तुझी

सुवर्णा-रत्नांचे तव पद-तळी आसन रूपी ।

असे त्या चौरंगा निकटचि उभे देवगणही

स्तुती गाती माते अति मधुर शब्दातुन तुझी ।। ५.।।

 

तुझ्या पायी हेची सुरवर अती नम्र बनुनी

नमस्कारासाठी कर जुळवुनी कोमल अती

शिरी लावी जेंव्हा कमल-कलिकांच्या-सम करा

किरीटी भासे तो कमल कलिकांचा मृदु तुरा ।। ५.४ ।।*

----------------------

श्लोक  –

१ २ ३ ४ ५ ६ ७  ८ ९ ०

 १ २ ३ ४ ५ ६ ७  ८ ९ ०

जेव्हा भीषण प्रलय ह्या सर्व विश्वाला ग्रासतो तेव्हा हे विश्व निर्माण करणार्‍या विरिञ्चि म्हणजे ब्रह्मदेवाचे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या मूल तत्त्वात विघटन / पृथःक्करण होऊन तो सार्‍या पंचमहाभूतात मिसळून जातो.(`पञ्चत्वं व्रजति’) अखंडपणे ह्या ब्रह्मांडाचे पालन पोषण करणार्‍या विष्णुलाही थांबावे लागते. विश्राम करावा लागतो (विरति) कारण तोही ह्या पंचमहाभूतात विलीन होऊन जातो. सर्व प्राणीमात्रांचा अत्यंत निष्ठूरपणे नाश करणारा म्हणून ज्याला ``कीनाश’’ म्हटले जाते त्या यमाचाही नाश होतो. ( कीनाशः विनाशं भजति ।) यमही मरतो. देवांनाही धनदौलत पुरवणारा अत्यंत धनवान कुबेर (धनद) त्याचही निधन होतं. चौदा भुवनांचे अधिपती चौदा इंद्र आहेत. ह्या चौदा इंद्राचा मुख्य अथवा जो लोकपाल आहे त्याला महेंद्र म्हणतात. महेंद्रासह हया चौदा इंद्रांचा समुदाय आहे त्याला खालील श्लोकात ``माहेंद्री वितति’’ म्हटले आहे. अशा ह्या इंद्रांच्या समुहालाही प्रलयकाळी कायमची तंद्री लागते. ग्लानी येते. प्रचंड थकावट वाटून ते क्लांत होतात. प्रलयकाळी त्यांचेही कायमचे डोळे मिटतात. म्हणजे ते ही काम करणं सोडून पंचमहाभूतात विलीन होतात. प्रलयकाळी अस्ताव्यस्त झालेले विश्व, ब्रह्मा, विष्णु, रुद्र ह्यांच्या अवशेषांसह महेश स्वतःत सामावून घेतो; आणि त्या विश्वासहित स्वतःही सदाशिवतत्त्वात विलीन होतो. ह्या सदाशिव तत्त्वाला मरण नाही. ते अविनाशी आहे. (पदार्थ विज्ञानाप्रमाणे कुठलीही पदार्थ नाश पावत नाही फक्त एका स्वरूपातून दुसर्‍या स्वरूपात त्याचे रुपांतर/स्थित्यंतर होते.)

हे जननी, अशा महाप्रलयकाळी तुझे पती सदाशिव हे मात्र तुझ्यासह आनंदाने विहार करत असतात. हा तुझ्या पातिव्रत्याचा प्रभाव आहे. ( शिवतत्त्व आणि शक्तितत्त्व हे एकरूप आहेत.)

 

विरिञ्चि पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिं

विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् ।

वितन्द्री माहेन्द्री विततिरपि सम्मीलितदृशा

महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ ।। ६ *

 

महा कल्पांताच्या भयद समयी नाश  घडता

विरिंची जाई हा वितळुनचि भूतात सकला ।

विरामे पूर्णत्त्वे हरिसि नच अस्तित्त्व उरते

यमालाही धाडे यमसदनि कल्पांतचि बळे ।।  .।।

 

कुबेरालाही त्या नचचि चुकतो नाश  समयी

धनेशाचे होई निधन प्रलयाच्याच समयी ।

असोनी चौदाही सुखद भुवनांचे अधिपती

महेंद्रांच्या निद्रेमधुन उठती ते न फिरुनी ।। . ।।

 

महा संहाराच्या भयद समयी तू पतिसवे

विहारी स्वच्छन्दे तुज कुठुन मृत्यूभय असे

शिवालाही लाभे जननि अविनाशीपणचि जे

तुझ्या सौभाग्याचा जननि महिमा अद्भुत असे ।।  .३ ।। *

----------------------

श्लोक ७ 


  बाहेर अंगणात खेळणार्‍या लेकराकडे आईचं लक्ष असलं तरी रांगणार्‍या, तिच्या भोवती भोवती खेळणार्‍या, पायात येणार्‍या लेकराला आई पटकन उचलून घेते. त्याप्रमाणे देवाला कधी आपला विसर पडत नाही. पण अंगणात खेळण्यात रमून गेलेल्या मुलाला पडल्याधडल्या शिवाय आईची लगेच आठवण येत नाही. संत तुकाराम महाराज देवाकडे एक सुंदर मागणं मागतात, देवा मला तुझा कधी विसर पडू देऊ नकोस. मला तुझ्या जवळ ठेव. लहान बाळाप्रमाणे मला तुझ्याशिवाय बाकी कोणीही आठवू नये.  ‘‘न अन्य’’ म्हणजे तुझ्या शिवाय कोणी दुसरा मला नको.

 ‘‘ भाव तेथे देव ’’ ह्या संतांच्या उक्तीप्रमाणे चित्त भक्तिभावाने उचंबळून आले की, पूजा घेण्यासाठी देव आपणहून तेथे उपस्थित होतो. नेत्रांसमोर साकार झालेल्या ह्या सगुण मूर्तीची पूजा करायला मग कुठल्याच बाह्य उपचारांची गरज नसते. शिवानन्दलहरींमधे आचार्य म्हणतात, देवा, तुला फक्त भक्ताचं ‘मनसुमनच’ हवं असतं. पण ते काही त्यांना कळत नाही.

सुपुष्पे अर्पावी तुजसि म्हणुनी मूढमति हे

कुणी पाण्यामध्ये कमळ खुडण्यासी धडपडे

कुणी रानामध्ये निबिड अति एकाकि भटके

फुले पत्री नानाविध मिळविण्या दुर्मिळ फळे।।9.1

 

कडे पायी पायी चढुन कुणि जाई गिरिवरे

मिळाया बेलाचे त्रिदल हिरवे पान इवले

कळेना कोणासी मन-सुमन हेची तुज रुचे

तुझ्या पायी अर्पी सुमन-धन तो सौख्य मिळवे ।।9.2

 

‘‘तुझी सेवा करीन मनोभावे’’ म्हणत चित्त परमेश्वराच्या चरणांवर अर्पण केलं की `भावाचा भुकेला देव’ क्षणाचीही वाट बघत नाही. भक्ताला देवाने ‘‘ चित्तचैतन्य चोरून नेले ’’ हा अनुभव येतो.

आचार्य म्हणतात, हे माय गे! माझी बुद्धी तुझ्या चरणकमलांचा कायमचा आश्रय घेऊन तेथेच राहू दे. त्यामुळे मी जे जे कार्य करीन ते कार्य तुझ्याच चरणांवर अर्पित होऊन माझी प्रत्येक कृती ही माझ्याकडून तुझी पूजा घडेल.

वरवर माझी निरर्थक वाटणारी बडबड हाच तुझा अविरत चाललेला जप ठरो. आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करण्यासाठी सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी अशा कित्येक हस्तमुद्रा सांगितल्या आहेत. पण मला त्या माहित नाहीत. मी चालता बोलतांना माझे जे हातवारे होतील हे माय त्या तुझं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी, तुला संतुष्ट करण्यासाठी केलेल्या माझ्या हस्तमुद्रा असोत. मी जेथे जेथे जाईन, त्यावेळेस माझे पाय जे चालण्याचं काम करतील ती तुला प्रदक्षिणा होवो. (गतिः प्रादक्षिण्य) मी जे खाईन, पिईन त्या सर्व तुला दिलेल्या आहुती होवोत. झोपण्यासाठी जमिनिवर अंग टेकवणं वा गादीवर पहुडणे हा तुला घातलेला साष्टांग दंडवत असो. (प्रणामः संवेशः)  माझा हा रोजचा जीवनक्रम तुला अनन्यभावाने शरण आलेल्या ह्या भक्ताची पूजा प्रणालीच होवो. (मे अखिलं विलसितं आत्मार्पणदृशा तव सपर्या-पर्यायः भवतु । )

सुहृदहो, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा भक्ताला आपल्या आराध्यावाचून काहीही दुसरा विषयच उरत नाही. तो तन, मन त्यालाच अर्पण करतो. बहुतेक वेळेला आपण जी पूजा करतो, तेव्हा आपलं लक्ष फोन, पेपर, कोण काय बोलतय, करतय, आपल्या भोवती चाललेल्या `क्ष’ गोष्टींकडे वेधलेलं असतं. त्यामुळे आपली साग्रसंगीत पूजाही अनन्यभावाने केलेल्या ह्या मानसपूजेपुढे कमी प्रतीची ठरते.

आचार्यांनी शिवमानसपूजेमधेही हेच सांगितलं आहे. मी त्याच्या एका श्लोकाचा मराठी भावानुवाद देते. आणि नंतर मूळ श्लोक पाहू.

आत्मा तू स्वयमेव; बुद्धि मम ही साक्षात् उमा शांकरी

पंचप्राण सवंगडी सहचरे; प्रासाद कायाच ही

घेण्यासी विषयोपभोग सगळे केलीच जी मांडणी

तेची पूजन रे तुझे पशुपते; निद्रा समाधी स्थिती ।।4.1

 माझी चाल, परिक्रमा विधिवता आहे तुला घातली

जे जे बोल मुखातुनी प्रकटती आहे स्तुती ती तुझी

जे जे काम करीन मी, तवचि ती  पूजा असे निश्चिती

शंभो हे मजला न वाचुन तुझ्या आराध्य ह्या जीवनी।।4.2

 

जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना

गतिः प्रादक्षिण्य-क्रमणमशनाद्याहुति-विधिः।

प्रणामः संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृशा

सपर्या-पर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् ।। ७  ।। *

( संवेश – झोपणे. सपर्या – पूजा, अर्चना सेवा. पर्याय - प्रणाली, प्रक्रिया, प्रकार आत्मार्पणदृशा – आत्मार्पणदृष्टीने )

मुखातूनी माझ्या नित उमटती शब्द सहजी

असावे तेची गे, जपस्वरुप वा निर्मल स्तुती 

करे जेंव्हा संभाषण हलवुनी हात मम जे

असाव्या मुद्रा त्या सुखविति तुला ज्या बहु उमे ।। ७. १ ।। 

 

कराया कार्यांसी चरण मज नेती चहु दिशा

घडो ह्या चालीची अविरत तुला गे परिक्रमा 

मुखाने जे खाई नित हवनकर्मासम असो

सुखाने झोपे मी तव चरणि ते वंदन असो ।।७. २ ।।

 

अगे आस्वादीतो सुखमयचि हे जीवन जसे

असो पूजा ती गे मजकडुन आत्मार्पण पुरे 

तुझी पूजा माते मम सकल हा जीवनविधी

घडो साफल्याची मजकडुन प्रत्येकचि कृती ।। ७. ३ ।। *

----------------------

श्लोक  –

असं म्हणतात की, अमृत/ सुधा प्राशन कणार्‍याला कुठले रोग होत नाहीत; वा वृद्धत्व येत नाही. ती व्यक्ती कायम सुंदर व चिरतरूण राहते. तिला मरण येत नाही. म्हणूनच ह्या अमृतासाठी देव-दानवांमधे मोठा कलहही माजला होता. पण ह्या अमृताचा परिणामही कायमचा टिकून रहात नसावा; कारण जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा अमृत प्राशन करून स्वतःला अमर अजर म्हणवणारे महाबलशाली ब्रह्मा, विष्णु, महेश, रुद्र इत्यादि  सार्‍या सार्‍या देवांचंही विघटन होऊन ते पंचमहाभूतात मिसळून जातात.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुसरी बाजू पाहता, समुद्रातून बाहेर आलेलं अत्यंत जहाल विष पाहून सगळ्या देवांची आणि दैत्यांची भीतीने गाळण उडाली. त्या महाविषातून येणार्‍या नुसत्या वाफांनी देव आणि दैत्य बेशुद्ध होऊ पडू लागले. शेवटी सारेजण शिवशंभूला शरण आले. त्रैलोक्याला वाचविण्यासाठी ते जळजळीत विष शिवाने प्राशन केल्यावरही काळ त्याला ग्रासू शकला नाही. शिवतत्त्व हे अविनाशी राहते. एकीकडे अमृत पिऊन देवही काळाच्या मुखात जातात. मरण पावतात. (विपद्यन्ते) तर दुसरीकडे कालकूटासारखं जहाल विष पिऊनही काळ शिवाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. हा सर्व कशाचा परिणाम म्हणावा? हा शिवाचा स्वतःचा पराक्रम म्हणावा का? का त्याचं महा सामर्थ्य? पण ही शिवाची शूरवीरता दिसत नाही.

मग?-------

ह्या अचाट महिम्याचे  मूळ कशात आहे हे शोधलं तर असं दिसेल की माते! हे शिवाचे स्वतःचे साहस वा बहाद्दुरी नाही. हे शिवाचं शौर्य नाही तर!---  हे त्रिपुरसुंदरी, तुझ्या कानात तू जे झुमके अथवा बाळ्या अथवा जे कुंडल (ताटङ्क) घातले आहेस त्या सौभाग्य अलंकारांचा हा परिणाम आहे. जिच्या सौभाग्य अलंकारांचा एवढा महिमा असेल तर तिचा महिमा केवढा असेल?  जी स्वतःच अमृतमय असून शिवाचा देहार्ध व्यापून आहे तिच्या अमृतमय देहार्धामुळेच महा जहाल विषानेही शिवतत्त्वाचा विनाश झाला नाही. शिवतत्त्वाला विनाश नाही. ते  अविनाशी आहे.

*  सुधामप्यास्वाद्य प्रतिभय-जरा-मृत्युहरिणीं

विपद्यन्ते विश्वे विधि-शतमखाद्या दिविषदः ।

करालं यत्क्ष्वेलं कवलितवतः कालकलना

न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्कमहिमा ।। ८ ।। *

( विधि – ब्रह्मदेव. शतमख – इंद्र. विपद्यन्ते – मरतात. कलनम् - ग्रासणे, पकडणे. कराल – जहाल. ताटङ्क – कानाचे आभूषण )

जरी आले देवा अमरपण ते अमृतबळे

विधी विष्णू इंद्रादिक अजर झाले प्रबळ ते ।

लया जाती कैसे परि प्रलयकाळीच सगळे

उरे ना कोणीही; सकल शिवतत्त्वातचि विरे ।। ८.१ ।। 

 

परी शंभूने त्या गिळुनचि हालाहल कसे

कळीकाळासीही अति सहज रोखून धरले ।

स्वतःचे शंभुचे अपरिमित सामर्थ्य नच हे

असे तूची त्याचे सकल बल सामर्थ्य अवघे ।। ८.।। 

 

तयासंगे राहे अमृतमय तू नित्यचि शिवे

म्हणोनी जाई तो तरुन नित आपत्तितुन गे

अगे पाहू जाता शिव-जय स्वयंसिद्ध नच हा

तुझ्या कानीच्या ह्या सुभग झुमक्यांचा विजय हा ।। ८.३ ।। * 

 

----------------------

श्लोक   –

ह्या श्लोकात एक चित्रमय प्रसंग इतका हुबेहुब वर्णन केला आहे की जणु काही तो आपल्या डोळ्यांसमोर घडत असावा.

त्रिपुरसुंदरी ही सार्‍या विश्वाचे नियमन करणारी शक्ती आहे. तिच्याकडून शक्तीचा एक अंश तरी आपल्याला मिळावा ही प्रत्येक देवाची इच्छा आहे. त्या अंशभर ताकदीच्या जोरावर ते विश्वात मोठे पराक्रम करू शकतात. इतरांवर वर्चस्व गाजवू शकतात. त्रिपुरसुंदरीचा अतुलनीय महिमा जाणून तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्याकडे देवांच्या रांगा लागलेल्या आहेत. तिन्ही लोकी ज्यांचा महिमा गायला जातो, असे दानवांनाही वरचढ असलेले देव, रत्नजडित सिंहासनावर बसलेल्या अंबिकेच्या पायावर साष्टांग दंडवत घालत आहेत.

 त्याच वेळेला नेमके भालदार चोपदार वर्दी देतात की, ‘‘ज्यांच्या पराक्रमापुढे सारे देव दानव विस्मित आहेत,---- महाभयंकर हालाहल प्राशून ज्यांनी ब्रह्मांडाला जराही आच न लागू देता सुरक्षित ठेवले---- ते देवांचे देव---- महादेव शिव, आपल्या अर्धांगिनी देवी श्रीललिताम्बिका महात्रिपुरसुंदरींना भेटण्यासाठी येत आहेत होऽऽऽऽऽ!!  आणि काय विचारता! एकच गोंधळ उडून जातो.

कोणी महान व्यक्ती अचानक भेटीला आल्यावर हातातील काम सोडून ज्याप्रमाणे कोणी धावत त्याच्या स्वागताला जाईल त्याप्रमाणे महात्रिपुरसुंदरी ललिताम्बिका देवी सर्व देवगणांनी घातलेल्या लोटांगणांची दखलही न घेता आपल्या रत्नजडित सिंहासनावरून उठून ( भवस्याभ्युत्थाने ) महादेवांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वाराकडे निघालेल्या पाहून सर्व देवगणांचीही धांदल उडून गेली. ( खरे तर शिव शक्तिविना शवच आहे. वारंवार शक्तिच्या मदतीने तरून जात आहेत. तरीही आपल्या मोठेपणाचा लवलेशही न दाखवता त्रिपुराम्बिका अत्यंत प्रेमाने, शिवाच्या स्वागतासाठी जात आहे.)  साष्टांग नमस्कार घातलेले देव माता त्रिपुराम्बिका निघून गेल्या आहेत, महादेव शिव येत आहेत---- ते आत्ता पोचतीलच हे जाणवून गडबडीने उठायला जातांना झालेल्या गर्दीच्या गोंधळात देवांच्या शिरी विराजमान असलेले रत्नजडित मुकुट खाली पडत आहेत.

तेथे असलेला सेवकवर्ग ह्या देवांच्या प्रचंड गर्दीला दोन्ही बाजूंना करून मधली वाट मोकळी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देवांची गर्दी हटविण्यासाठी जोरजोरात आोरडत आहेत. महात्रिपुरांबिकेचे सेवक ते! आपल्या मालकिणीचे वर्चस्व दरारा तेही जाणून आहेत. त्यामुळे त्याच्या स्वरातही न कळत एक धाक, गुर्मी, दरारा जाणवत आहेत. त्यांची भाषाही त्यामुळे तशीच आहे. ‘‘अरेऽऽऽ!! मागे सरका! मागे सरका !’’  जमिनीवर पडलेले असंख्य मुकुट कडेला करण्याची त्यांची गडबड चालू आहे. ‘‘अरे हा रत्नखचित मुकुट ब्रह्माजींचा दिसतोय! कडेला लोटून द्या! (वैरिञ्चं मुकुटं परिहर) अरे हा टोकदार मुकुट कोणाचाऽऽ रे! विष्णुपंतांचा दिसतोय पायाला टोचेल तिकडे कोपर्‍यात द्या भिरकावून! (जहि) शिवशक्तीच्या वाटेवर काहीही टोचेल असे ठेऊ नका.’’ देवही त्या साध्यासुध्या पहारेकर्‍यांच्या दरडावण्यापुढे नम्र झाले आहेत. ते जे काय सांगतील ते बिनातक्रार ऐकत आहेत.  ‘‘काय ह्या देवांना त्यांचे मुकुटही सांभाळता येत नाहीत! हा बघा हा बघा त्या देवेंद्राचा मुकुट पडलेला दिसतोय! इथे स्वतःचे मुकुट सांभाळायला जमत नाहीत आणि ह्यांना स्वर्गाचं राज्य पाहिजे म्हणे!’’ पहारेकरीच ते!  स्वतः अब्जाधीश मालक जरी सौम्य, शांत, प्रेमळ असला तरी त्याचे नोकर मात्र जास्तीत जाास्त गुर्मी दाखवतात.  स्वामीपेक्षा सेवकाचाच तोरा बघून घ्यावा असा असतो.

थोडक्यात तिथे जमलेल्या देवांच्या प्रचंड, असीम गर्दीचं नियंत्रण करतांना ह्या सेवकांच्या आरोळ्या, देवांनाही कस्पटासमान लेखणं, हे देवीचे प्रस्थ किती बडं आहे ह्याची जणु एक चुणूक दाखवणारे आहे. (मित्रांनो येथे पहारेकर्‍यांच्या तोंडी असलेली भाषा ही त्यांची गुर्मी दाखवणारी असल्याने शब्द योजनाही तशीच केली आहे.)

किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः

कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारि-मुकुटम् ।

प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनं

भवस्याभ्युत्थाने तव परिजनोक्तिर्विजयते ।।   ।। *

( किरीट / कोटीर – मुकुट. विरिञ्चि – ब्रहमदेव. कैटभभिदः – कैटभ राक्षसाचा नाश करणारा विष्णू. जम्भारि – जम्भ राक्षसाचा नाश करणारा इंद्र. जहि – दूर सारा. परिजन – सेवक. प्रसभ – बलपूर्वक, जबरदस्ती.  उत्थानम्- उठणे, अभि + उत्थानम्अभ्युत्थानम् स्वागतासाठी उद्युक्त होणे.  भवस्य अभ्युत्थाने- शिवाच्या स्वागतासाठी तुझे उठून जाणे.)

तुझ्या सेवेसी गे जननि झटती देवगण हे

तुला भेटायासी करति किति गर्दी सकल गे 

करीती भक्तीने तुज चरणि साष्टांग नमना

अशावेळी जेंव्हा तव सदनि येई शिवसखा ।। ९ .१ ।। 

 

शिवाच्या येण्याची सदनि तुज वर्दीच मिळता

उठोनी जासी तू जननि करण्या स्वागत तदा 

पहारा देणारे हटवितिच देवांसि सकला

तयांच्या आरोळ्या दुमदुमति प्रासादि तुझिया ।। ९. ।। 

 

किती हो देवांची गडबड महा धांदल उडे

उठू जाता त्यांचे मुकुट पडती स्वर्णमयि ते 

पहारा देणारे सतत वदती निष्ठुरपणे

``सरा बाजू सारे! नियम नच का ठाऊक इथे’’ ।। ९.३ ।। 

 

``असे हा ब्रह्म्याचा मुकुट’’ दरडावे ``कर दुरी’’

``असे टोकेरी हा मुकुट बहु टोचेलचि पदी

दिसे हा विष्णूचा जन म्हणति ज्या कैटभअरी’’

असा हा भृत्यांचा बहु गलबला हो तिथवरी ।। ९ .४ ।। 

 

``कसा देवेंद्राचा मुकुटचि मधे हा तडमडे

कडेला द्यावा तो भिरकवुनची दूर तिकडे ’’

अशा ह्या आरोळ्या सुचविती तुझे प्रस्थचि बडे

तुझ्या श्रेष्ठत्त्वाचा जणु विजय डंका गमतसे ।। ९. ।। *

----------------------

श्लोक –


 हे माय तुझ्या देहातून उत्पन झालेल्या अत्यंत तेजस्वी, आह्लाददायक किरणरूपी (घृणि – किरण) देवता तुझी सेवा करत आहेत. देवता ह्या किरणांप्रमाणे प्रकाशमान असतात. त्यामुळे हे स्वयंप्रकाशी त्रिपुरसुंदरी माते! तुझ्या अंगातून जे किरण बाहेर पडत आहेत त्या म्हणजे निरनिराळ्या देवता आहेत. त्या सर्वांमुळे तू अत्यंत आनंददायी,  मनोरम, प्रफुल्लित दिसत आहे. अत्यंत प्रसन्न, सुंदर, ऐश्वर्यसम्पन्न दिसत आहेस. ह्या देवता श्री त्रिपुरसुंदरीचा देहच असलेल्या श्री चक्रामध्ये विराजमान झाल्या आहेत. (20 व्या श्लोकातही हे वर्णन आहेच *किरन्तीमङ्गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं )

माय तू नित्य आहेस. कालही होतीस आजही आहेस उद्याही राहशील. तुला काळाचं भय नाही. तू अजन्मा आहेस तशी अमरही आहेस. सदैव सर्वत्र तूच आहेस. आणि म्हणूनच उपासनेसाठी उपास्य म्हणूनही एकमेव तूच योग्य आहेस. (निषेव्य).  आपल्या सनातन विचारधारेप्रमाणे देवाची भक्ती ही देव भेटेपर्यंतच मर्यादित नाही तर उपासक आणि उपास्य ह्यांची पूर्ण एकतानता, पूर्ण एकरूपता, एकरसता , सायुज्यता होणे हा त्याचा अंतिम टप्पा मानला जातो. शिव बनून शिवाची पूजा करावी असे म्हटले जाते. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही ज्ञानमार्गी त्रिपुटी व उपासना, उपासक आणि उपास्य ही भक्तिमार्गी त्रिपुटी जेव्हा लय पावतात तेव्हा निर्गुण निराकार परमतत्त्व उरते. ‘‘तत्त्वमसि’’ ते परम तत्त्व तूच आहेस, ‘‘अहम् ब्रह्माऽस्मि’’ म्हणजे उपास्य आणि नित्य अशा तुलाच जो स्वात्मरूपाने पाहील तो तुझ्याप्रमाणे सर्व ऐश्वर्यसम्पन्न होईल.

हे ललिते! सूर्य, चंद्र आणि अग्नी हे शिवाचे तीन नेत्र आहेत म्हणून त्याला त्रिनेत्री वा त्रिनेत्रधारी म्हणतात. शिवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्य, चंद्र आणि अग्नी ह्या तीन मार्गांनी प्रसन्न करतात म्हणूनही तो त्रिनेत्री.  किंवा नेत्र – नी नयति म्हणजे वाहून नेणे. त्र म्हणजे साधन. (जसे जनित्र, खनित्र)  इडा पिंगला सुषुम्ना हे तीन नाडीमार्ग प्राण/चेतना वाहून नेतात म्हणून त्यांना नेत्र म्हटले आहे. त्या तीन आहेत म्हणून त्रिनेत्री. योगीजन ह्या त्रिनेत्रींच्या बळावर शिवाला प्रसन्न करतात. म्हणूनच त्याला त्रिनेत्री म्हणतात. अशा शिवाचं महान ऐश्वर्य तुझ्या महान साधकाला कधी मोहात पाडणार नाही तर तो शिवाची महान समृद्धीही तृणवत् मानेल.

 तो स्वतःच त्रिपुरसुंदरीमय झाला असल्याने त्याला काळाचे भय कुठले? तो महाप्रलयकालचा अग्नीही त्याच्या मनात भय निर्माण करू शकणार नाही. त्याचं हे अम्बिकेसमवेत असलेलं सायुज्य पाहून; कळिकाळ त्याला कधीही भय दाखवू शकणार नाही. त्याची ही निडरता पाहून साक्षात प्रलयाग्नी (महासंवर्ताग्नि) एखाद्या उजळलेल्या निरांजनी प्रमाणे आपल्या स्वतःला त्याच्यावरून ओवाळून घेईल आणि त्याची आरती करेल.

स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरमितो

निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः ।

किमाश्चर्यं तस्य त्रिनयन-समृद्धिं तृणयतो

महासंवर्ताग्निर्विरचयति नीराजनविधिम् ।। ० ।। *

 

( स्वदेहोद्भूता – स्वतःच्या देहातून उत्पन्न झालेल्या. घृणिकिरण.  निषेवकभक्त, सेवक, नषेव्य- उपास्य, भक्तीकरण्यास योग्य. त्रिनयनशिव. किंवा नयन म्हणजे मार्ग, प्राप्तीचे साधनसूर्य, चंद्र, अग्नी ही शंकराच्या प्राप्तीची तीन साधने आहेत. किंवा योगी लोक इडा पिंगला, सुषुम्ना ह्या तीन मार्गांनी सदाशिवतत्त्वाचा साक्षत्कार करून घेतात. महासंवर्ताग्नि – कल्पांन्त काळचा प्रलयाग्नि. त्रिनयन समृद्धिं तृणयतो – शिवाच्या महान ऐश्वर्याालही कस्पटासमान लेखतो. )

असे तूची नित्या तुजसि नच प्रारंभ कधिही

तुला नाही सीमा जननि तुज ना शेवट कधी 

करायासी भक्ती तुजविण न आदर्श दुसरा

असे भक्तांसाठी तव चरणसेवाचि फलदा ।। ३०.१ ।।

 

प्रभा देहातूनी किरणमय दैवी पसरता

गमे देहातुनी तव प्रकटले देवगण का 

तुझी सेवा तेची करिति अति तादात्म्य हृदये

प्रभारूपी देवांसह बनतसे देह तव गे ।। ३०. ।।

 

प्रभारूपी देवांसह जननि सत् चित् स्वरूपची

अगे श्रीचक्राच्या तव तनुत शोभून दिसशी

कुणी सोऽहं भावे तुजसिच तदाकार  भजुनी

करे भक्ती तोची अनुपमचि ऐश्वर्य मिळवी ।। ३०.३ ।।

 

शिवाच्या ऐश्वर्या तृणसमचि तो तुच्छ समजे

तया कल्पान्ताचा अनल नित ओवाळित असे

शिवाहूनी तोची कितिकपट श्रीमंत जगती

तुझ्या मध्ये तोची मिसळुन बने तूच जननी ।। ३०.।।*

----------------------

श्लोक  –


सुहृदहो !

आज आपल्याला विज्ञानाधिष्ठित तंत्र आणि यंत्र ह्यावर आधारीत जग दिसतं. तंत्रांच्या विकासाने रोज आपण प्रगतीची नवी नवी शिखरं गाठत असतांनाही कुठेतरी अजून सुधारणा, अजून तंत्रविकास ह्यासाठी आपण सतत धडपडत असतो. ह्या जादुई तंत्रांनी आपली कामं फटाफट होत असल्याने आपण अजून त्यांच्या आहारी जातो. त्यांच्यात गुरफटत जातो. आपल्या मनातील कामना अजून अजून वाढीला लागते. शेवटी जीवन सुकर, सुगम, सुखद करण्यासाठी चाललेली आपली धडपड फसवी तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. जीवन सुकर, सुगम, सुखद करण्याच्या नादात नेमकं सुखच पार्‍यासारखं हातातून निसटून जातं. मनाला हव्या असलेल्या शांततेलाच कधी तडा जाऊन भंग पावली कळत नाही. आजचे विज्ञान व तंत्रज्ञान हे अध्यात्मिक तंत्रापेक्षा वेगळे असले तरी त्यात गुरफटले जाणे, मोह निर्माण होणे दोन्हीतही सारखेच आहे. वाचकांना थोडी कल्पना येण्यासाठी म्हणून वर्तमान संदर्भ दिला.

विशिष्ट प्रकारच्या सिद्धि अथवा ऐहिक फळे  सत्वर प्राप्त करून देणार्‍या साधनांचा  अथवा उपासनेचा मार्ग दाखविण्यार्‍या  शास्त्राला तन्त्र असे म्हणतात.  तंत्र शास्त्राचे आद्य प्रवर्तक  भगवान शंकरच आहेत. ही तंत्रे बुद्धीमध्ये काम्यफलांविषयी मोह निर्माण करतात. म्हणून वैष्णवसंप्रदाय ह्या तंत्रशास्त्राला मोहशास्त्र असे म्हणतो. अद्भुत सिद्धि प्राप्त करून घेण्यासाठी माणूस तंत्रविद्येच्या नादी लागतो. व शेवटी त्यात त्याचा नाशच होतो. तंत्रविद्यांना शंबरतंत्र अथवा शंबरविद्या असेही म्हणतात. शंबरचा अर्थ मायावी अथवा जादूगारी असा आहे.

काही तंत्रे  अशी-

महामायाशंबरतंत्र – ह्या तंत्राच्या साधनाने साधक लोकांच्या मनात निरनिराळे भास निर्माण करतो. काट्याची टोकं कापसाप्रमाणे मऊ वाटायला लावणे तर मऊ कापूस काटेरी वाटणे; रॉकेलला अत्तराचा वास तर अत्तराला केरोसीनचा वास येतो असे  वाटायला लावणे.

 ‘तत्त्वशंबरतंत्रा’ने पंचमहाभूतांचे एकमेकात परिवर्तन करता येणे शक्य होते. अनेक मूळ तत्त्वाचे एकमेकात परिवर्तन करणे, मातीचे सोने बनविणे वा अनेक रासायनिक प्रक्रियांमार्फत आश्चर्यकारक संयुगे बनविणे, विघटन करणे, हे अनेक हजारो वर्षांपूर्वी होत होते. आजही सोन्यापासून एकवेळ कमी प्रतीचा धातू बनू शकेल पण लोखंडापासून सोनं बनू शकत नाही. पण फार पूर्वी अशी काही तंत्रे शोधलेली होती. जी कमी प्रतिच्या धातूपासून उच्च प्रतिचे धातू बनवू शकत होती. अ‍ॅटॉमिक फिजन, फ्युजन माहित असल्याशिवाय हे शक्य नाही. रसायन शस्त्राला पूर्वी किमया म्हणत असत परंतु शास्त्रातील अचंबित करणार्‍या गोष्टी पाहून किमया ह्या शब्दाला रसायन शास्त्रापेक्षा  काही तरी अद्भुत चमत्कार ह्या अर्थी आपण वापरू लागलो.

किमया म्हणजे रसायनशास्त्राच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टींची निर्मिती करणे, रसायनांद्वारे वीज निर्मिती, अशा ह्या सिद्धी म्हणजे आजच्या युगातील विज्ञानाच्या अनेक शाखातील प्रगती वा विविध क्षेत्रातील शास्त्रांचे ज्ञान असे म्हणता येईल.

ह्या शिवाय योगिनीजालतंत्र, सिद्धभैरवतंत्र, बटुकभैरवतंत्र ----- अशी 64 तंत्र आहेत. भगवान शंकरांनी जरी ही तंत्र चांगल्यासाठी भल्यासाठी निर्माण केली असली तरी ‘‘सकलमतिसन्धाय भुवनं’’ – म्हणजे ही सगळी तंत्र ह्या त्रिभुवनाला फसवण्यासाठी, जणु काही तयार केली गेली असे वाटू लागले. प्रत्यक्ष कुठलीही विद्या फसवणारी नसते. माणूस किती विवेकाने त्याचा उपयोग करतो हे महत्त्वाचे. मित्रांनो, लाखो, कोटी वर्ष पृथ्वी आणि जीवसृष्टी आहेच. अनेक वेळेला ही जीवसृष्टी त्यांच्या परमउत्कर्षाप्रत गेलेलीच असणार आणि नाशही पावली असणार. अथवा तेच त्यांच्या नाशाचे कारण असणार. अथवा परमउत्कर्षातून मिळणार्‍या दुःखद अनुभवाने परत सर्वजण मूळपदावर आले असणार. सर्व जग ह्या तंत्राच्या मागे लागून त्यात दिवसेंदिवस जास्तच गुरफटत जात आहे हे पाहून, श्री भगवान शंकरांनी निर्माण केलेली ही 64 तंत्रे फसवी आहेत. त्यांच्या चलाखीने माणसाला अजून त्यात गुंतवणारी, नादी लावणारी आहेत असे श्री त्रिपुराम्बिकेलाही वाटू लागले.

मोक्ष प्रतिपादन करणारा वेदान्त लोकांना सांगून भगवान शिव गप्पच बसले. हे आई त्रिपुरसुंदरी! तुझे भक्तवात्सल्य किती वर्णन करावे? अशा वेळेस लोकांचा कळवळा येऊन; धर्म, अर्थ, काम आणि परमपुरुषार्थाचा लाभ लोकांना व्हावा ह्यासाठी काही साधन प्रकट करणे आवश्यक होते. तेव्हा हे माय जगज्जननी! पुन्हा साधकांना सर्व पुरुषार्थांचा लाभ होईल अशा योग्यतेचे तुझे एक स्वतंत्र (‘स्व’ जाणण्याचे) तंत्रच ह्या भूवर प्रकट करण्यासाठी शिवाकडे तू आग्रह धरलास. तेव्हा शिवाने ‘श्रीविद्या’  हे तुझे नवे तंत्र प्रकट केले. ह्या पृथ्वीवर अवतीर्ण केले.

चतुःषष्ट्या तन्त्रैः सकलमतिसन्धाय भुवनं

स्थितस्तत्तत्सिद्धि-प्रसव परतन्त्रैः पशुपतिः ।

पुनःस्त्वन्निर्बन्धादखिल-पुरुषार्थैक- घटना-

स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षिति-तलमवातीतरदिदम् ।। १ ।। *

( अतिसन्धानम् – छळ, कपट, फसवणुक, चलाखी. निर्बन्ध -आग्रह, हट्ट, मागणी. क्षितितलम् - पृथ्वीतळावर  अवातीतरत् – अव + तृ अवतार/ अवतरणे/ पृथ्वीवर अवतरणे )

(अन्वय – पशुपतिः चतुषष्ट्या तन्त्रैः सकलं भुवनं अतिसन्धाय पुनः त्वन्निर्बन्धात् इदं ते तन्त्रं क्षितितलम् अवातीतरत् ।)

 

मिळाया सिद्धी वा त्वरित मिळण्या ऐहिक फळे

शिवाने तंत्रे ही जरि रचलि चौसष्टचि शिवे ।

परी त्याने गुंते मन फिरुन मोहातचि पुन्हा

फळाच्या सिद्धीच्या; विसरुन विवेकास मनिच्या ।। .१ ।। 

 

अशा वेळी माते जन बघुन मोहात फसले

बघोनी शांतीने शिवहि मननी शांत बसले  

तुला भक्तांचा ह्या मनि कळवळा येउन उमे

अगे! शंभूपाशी जननि किति तू आग्रह धरे ।। . ।। 

 

कराया लावी तू जननि नवतंत्रासचि असे

जयाने चारीही मिळति पुरुषार्थांचिच फळे  

अशा श्रीविद्या ह्या तव नविन तंत्रास रचिता

कृपा होई भक्तांवर घडुनि त्या लाभ सगळा ।। .३ ।। *

----------------------

श्लोक  ३


सुहृदहो,

 मागच्या श्लोकात आपण पाहिले की, माता महात्रिपुरसुंदरीला 64 तंत्रांच्या मोहात फसत जाणार्‍या लोकांचा कळवळा येऊन तिने भगवान शिवाला तिचे श्रीविद्यातंत्र नावाचे नवीन तंत्र निर्माण करण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे शिवानेही साधकांना सर्व पुरुषार्थांचा लाभ होईल अशा योग्यतेचे श्रीविद्यातंत्र नावाचे एक स्वतंत्र (‘स्व’ जाणण्याचे) तंत्र / नवीन साधन ह्या भूवर प्रकट केले.

तंत्रशास्त्राप्रमाणे देवता ही मंत्रमय असते. त्यामुळे पूजाविधीतही मंत्राला जास्त प्राधान्य असते. हा मंत्र गोपनीय असतो. ह्या तंत्रातील मुख्य समजला जाणारा मंत्र ह्या श्लोकात प्रत्यक्ष न सांगता परोक्ष पद्धतीने सांगितला आहे. म्हणजेच ह्या श्लोकातील प्रत्येक शब्द हे अनुक्रमे मंत्रातील एक एक अक्षर निर्दिष्ट करते. ही अक्षरे क्रमाने लिहील्यास/महटल्यास तो मंत्र तयार होतो. ‘परोक्षप्रिया इव हि वै देवाः’ असे श्रुतिवचन आहे.  जसे आपण आई, वडील अथवा मोठ्या वडिलधारी माणसांना त्यांच्या सुनीता, माधुरी, गंगाधर, सुरेश, पुरुषोत्तम  अशा नावाने हाक न मारता आई बाबा, काका, दादा, पंत अशी संबोधने वापरतो तसेच देवांनाही त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्याशी परोक्ष पद्धतीने केलेला व्यवहारच आवडतो.

संप्रदायांप्रमाणे श्रीविद्यामंत्राचे पंचदशीविद्या, षोडशीविद्या, कादिविद्या हादिविद्या असे अनेक भेद आहेत येथे श्री आचार्य आपल्याला हा मंत्र मोठ्या खुबीने सांगत आहेत. ह्या श्लोकात क्रमाने शिव, शक्ती ---- असे 15 शब्द वापरले आहेत. प्रत्येक शब्द मंत्रातील एक बीज अक्षर निर्दिष्ट करतो, सुचवतो. मंत्राचे सोळावे अक्षर गरुमुखातून ऐकावे असे म्हणतात. असा एकंरीत 16 अक्षरी हा मंत्र आहे. आपण आचार्यांनाच आपले गुरू मानून हा मंत्र जाणून घेऊ या.

चंद्राला प्रतिपदा ते पौर्णिमा अशा 15 कला असतात. आमावास्येला चंद्र दिसत नसला तरी असतो म्हणून ती 16 वी कला माानतात. ह्या बीजमंत्रातही अशी 15 अक्षरे श्लोकात व 1 अक्षर गुरूमुखातून अशी 16 अक्षरे असल्याने हया श्रीविद्यातंत्राला चंद्रकलाविद्यातंत्र असेही म्हणतात.  ( श्लोकातील क्रमाने एक एक शब्द आणि त्यातून मंत्राचे कुठले बीज निर्दिष्ट होते हे खाली सांगितले आहे.) 

( 1 ) शिव हा पहिला शब्द.  कला 1ली – दर्शा. तिची अधिष्ठात्री देवता त्रिपुरसुंदरी. ही कला शिवतत्त्वात्मक आहे. त्यामुळे शिव शब्दाचा अर्थ दर्शा. ह्या कलेले प्रकृतिभूत अक्षर क आाहे म्हणून श्लोकातील पहिला शब्द शिव हा क हे अक्षर सुचवितो. जो मंत्राचे पहिले अक्षर आहे.

( 2 ) शक्ति हा दुसरा शब्द दृष्टा ह्या दुसर्‍या कलेचे वाचक असून ते शक्तितत्त्वात्मक आहे. शक्ति तत्त्वाचे बीजभूत अक्षर ए आहे. ए हे मंत्राचे दुसरे अक्षर आहे.

( 3 ) काम हा शब्द दर्शता ह्या तिसर्‍या कलेचा वाचक आहे. तिसर्‍या कलेची देवता ही कामच आहे. दर्शता कलेचे बीजभूत अक्षर ई आहे.  तेच  मंत्रातील तिसरे अक्षर आहे.

( 4 ) क्षिति म्हणजे पृथ्वी. पृथ्वीतत्त्वाचे  ल हे बीजाक्षर आहे. हे मंत्रातील 4 थे अक्षर आहे.

( 5 ) त्यानंरचा शब्द अथ आहे. अथ म्हणजे मागील 4 बीजाक्षरांचा एक खंड पूर्ण झाला हे सुचविणारे हृीं हे बीजाक्षर ( ह्या चार अक्षरांच्या खंडाला अग्निखंड म्हणतात; तर हृीं हया बीजाक्षरासह पाच अक्षरांच्या समूहाला वाग्भवकूट म्हणतात.)

( 6 ) आता दुसरा खंड सुरू होतो. दुसर्‍या खंडातील पहिले अक्षर रवि – सूर्यतत्त्ववाचक. सूर्यत्त्वााचे अक्षर – ह ( हे मंत्रातील 6 वे अक्षर)

( 7 ) सातवा शब्द शीतकिरण – म्हणजे चंद्र – स हे बीजाक्षर ( मंत्रातील 7वे अक्षर )

( 8 ) श्लोकातील 8 वा शब्द स्मर. स्मर म्हणजे कामदेव. त्याचे प्रकृतिभूत अक्षर क (मंत्रातील 8वे अक्षर)

( 9 ) हंस म्हणजे सूर्य. सूर्य ह अक्षराचा अधिपति आहे. त्यामुळे  ह (मंत्रातील 9 वे अक्षर)

( 10 ) शक्र – म्हणजे इंद्र त्याचे ल हे बीज आहे ( मंत्रातील 10 वे अक्षर )

( 11 ) येथे दुसरा खंड  ( कामराजकूट ) संपला त्याला हृीं  हे बीजाक्षर जोडले.  दुसर्‍या खंडात 6 अक्षरे आहेत.

शक्र नंतर तदनु हा शब्द येतो. तदनु म्हणजे त्या नंतर. दुसरा खंड संपून त्याच्या नंतर काय सुरू होणार ते सांगतो. परा, मार, हरयः  असे तीन शब्द येतात.

( 12 ) परा याचा अर्थ चंद्रकला असा आहे. चंद्राचे बीजाक्षर स आहे (मंत्रातील 12 वे अक्षर )

( 13 ) मार म्हणजे कामदेव. तो सर्वांना मारतो किंवा त्याच्यापायी सर्व मरतात म्हणून त्याला मार म्हणतात.  मारचे बीजअक्षर क आहे. ( मंत्रातील 13 वे अक्षर )

( 14 ) हरि चा अर्थ येथे  इंद्र होतो. इंद्राचे बीजाक्षर ल आहे. ( मंत्रातील 14 वे अक्षर)

येथे सोमखंड वा चंद्रखंड पूर्ण होतो. खंड पूर्ण झाला की आपण हृीं हे अक्षर जोडतो. ते ह्या ( मंत्रातील 15 वे अक्षर) हृीं सह ह्या खंडाला शक्तिकूट म्हणतात.

 ही 15 बीजाक्षरे म्हणजे मंत्रात्मक अशा त्रिपुरसुंदरी मातेचे अवयव मानले जातात.

चंद्र जसा 16 कलांनी पूर्ण असतो त्याप्रमाणे श्री ललितामहात्रिपुरसुंदरी 16 कलांनी युक्त आहे. चंद्राच्या पहिल्या कलेला प्रतिपदा तर पंधराव्या कलेला पौर्णिमा तर सोळाव्या कलेला आमावास्या म्हणतात. चंद्र कलेकलेने वाढतो म्हणजे आधीच्या कला पुढच्या कलेत समाविष्टच असतात. पौर्णिमेला सर्व 16 ही कला चंद्रात दिसतातच असा 16 कलांचा पूर्ण चंद्र आपल्याला पौर्णिमेला दिसतो. त्यानंतर एकएक कला उणावत जाते. पण सोळाव्या कलेला र्‍हास नाही. चंद्र दिसत नसला तरी असतोच. म्हणून ‘षोडशी तु कला ज्ञेया सच्चिदानन्दरूपिणी । ’ असे म्हणतात.

चंद्राचा कधीच र्‍हास वा क्षय होत नाही. तो सदासर्वकाळ पूर्णरूपातच असतो.  त्याचप्रमाणे महात्रिपुरसुंदरी हिचे अधिष्ठान असलेल्या मूर्धस्थानातील सहस्रदल कमलातील चंद्रमंडलाचे स्थानही तसेच आहे. सूर्यमंडलाच्या आड चंद्रमंडल जाण्याने कला निर्माण होतात. `अमा’ म्हणजे एकत्र आणि `वास्या’ म्हणजे राहणे. सूर्य, चंद्र एकत्र राहतात, एकासमोर एक य़ेतात त्याला आमावास्या म्हणतात तर जेव्हा सूर्यमंडल आणि चंद्रमंडल याच्यामध्ये पूर्ण व्यवधान /वियोग असते तेव्हा पूर्णचंद्र/पौर्णिमा असते. त्यामुळे सोळावी कला ही सर्व कलांमध्ये अनुस्यूतच आहे. तिच्यावर वृद्धि वा र्‍हासाचा परिणाम होत नाही म्हणून ती नित्य मानली जाते. तीच ही तुर्या स्थिती. मानली जाते. जेथे त्रिपुरसुंदरीचा कायमचा निवास असतो.

ह्या 15 अक्षरांच्या बीजमंत्रामुळे (जे तिचे अवयव आहेत)म्हणून हिला पंचदशाक्षरी वा षोडशीविद्या ; क ह्या अक्षराने सुरवात (आदि) म्हणून कादिविद्या ---- इ. असे म्हटले जाते.

यस्य वा पश्चिमं जन्म यदि वा शंकरः स्वयम् ।

तेनैव लभ्यते विद्या श्रीमत्पञ्चदशाक्षरी ।।

ज्याची जन्ममरण परंपरा शेवटाला येऊन पोचली असेल अथवा जो स्वतःच भगवान शंकर असेल त्यालाच ही पंचदशाक्षरी विद्या प्राप्त होऊ शकते असे आगमतंत्रात सांगितले आहे.  येथे थोडीशी चुणुक इतपतच माहिती दिली आहे.

 

*शिवः शक्तिः कामः क्षितिरथ रविः शीतकिरणः

स्मरो हंसः शक्रस्तदनु च परामारहरयः ।

अमी हृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता

भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् ।। ३२*

(अवसानेषु तिसृभिः हृलेखाभिः घटिताः ते अमी वर्णाः हे जननि तव नामावयवतां भजन्ते)

*अहो त्या देवाचे स्वरुप/शरिर असते मंत्रमय ते

असे तंत्रामध्ये वदति नित तंत्रज्ञ सगळे

असे श्रीविद्या हे अनुपमचि तंत्रात सकला

जयासी शंभूने अवनिवर केले प्रकट ह्या ।। ३२.

 

परी अप्रत्यक्षे कथति नित तो मंत्र सगळा

तसा येथे देती गुरुवर आचार्य सकला

असे एका शब्दातुन सुचवि बीजाक्षर इथे

क्रमाने शब्दांच्यामधुन पुरता मंत्र प्रकटे ।। ३२.

अहो हाची सोळाक्षर सकल तो मंत्र असुनी

इथे श्लोकी पंध्राक्षर बहु खुबीने सुचविली

मिळावे सोळावे नित गुरुमुखातून म्हणती

मिळे शिष्या सोळाक्षर सकल तो मंत्र श्रमुनी ।। ३२.

 

शिवा सांगे मंत्री प्रथम असे अक्षर असे

असे शक्तीचे अनुसरित बीजाक्षर दुजे

असे कामाचे नित तृतिय बीजाक्षर उमे

असे चौथे पृथ्वी क्षिति सुचवि बीजाक्षर हे ।।३२.४

 

असे र्‍हीं हे पंचाक्षर सुचवितो शब्द अथ हा

पुरा होई येथे जननि पहिला खंडचि असा

(पहिला खंड – 4 अक्षरे अग्निखंड हृीं सस 5 अक्षरांचा  वाग्भवकूट)

दुजा खंडामध्ये प्रथम रवि हा शब्दचि असे

दुजा खंडाचे गे प्रथम असे अक्षर असे ।। ३२.५

 

रवी तत्त्वाचे अक्षर नित सहावेचि असे

असे मंत्री सप्ताक्षर सुचवी शीतकिरणे

समानार्थी चंद्रासचि असतसे शब्द वरचा

सकारे चंद्राचे नित कथियले बीज असे ।। ३२.

 

स्मराचे आहे अक्षर प्रकृतीभूत सहजी

असे तेची अष्टाक्षर जननि मंत्रातिल मुळी

 अहो सूर्याला ह्या म्हणति नभिचा हंस चि असे

रवीबीजाचे ते नवमचि बीजाक्षर असे ।। ३२.७

 

 

असे शक्राचे ते नित दशम बीजाक्षर हे

अहो इंद्राला ह्या म्हणति जन हे शक्र चि असे

दुजा खंडा अंती तयि परत र्‍हीं अक्षर जुळे

पुरा होतो ऐसा सकलचि दुजा खंडचि इथे ।। ३२.८

 

(दुसरा खंड - कामराजकूट)

दुज्या खंडा अंती ``तदनु च’’ असे सांगत असे

दुज्या खंडा लागूनचि असति शब्दत्रय इथे

दुज्या खंडा अंती असतिच परा मार हरयः

परा हे चंद्राचे म्हणतिच दुजे नाम सकला ।। ३२.९

 

परा शब्दे येथे नित सुचविले अक्षर हे

अगे ते बारावे शशिशकल बीजाक्षर असे

जयापायी सारे मरति अथवा जो मृत करे

अगे संबोधीती म्हणुन मदना `मार’ चि असे ।। ३२.१०

 

अहो त्या माराचे नित कथति बीजाक्षर हे

असे ते तेरावे सलग जुळते अक्षर पुढे

हरी वा इंद्राचे नित कथति बीजाक्षर हे

असे जे चौदावे तयि पुढति र्‍हीं अक्षर असे ।। ३२.११

(तिसरा खंड – सोम अथवा चंद्रखंड)

असे हा मंत्राचा चरम तिसरा खंड जननी

पुरा होई पंध्राक्षर जननि हा मंत्र तवची

तिन्ही खंडाअंती जननि तव र्‍हीं बीजचि असे

 असे ते मंत्राचे जननि जणु चैतन्य अवघे ।। ३२.१२

 

अगे ह्या वर्णांनी अवयवचि मंत्रात्मक तुझे

इथे वर्णीयेले स्वरुप तव मंत्रात्मक असे

तिन्ही खंडाच्या ह्या नित पलिकडे खंड चवथे

कला ही सोळावी म्हणतिच तुरीया तिजसि गे ।। ३२.१३

(चवथा खंड – चंद्रकलाखंड, तुरीय खंड वा चंद्रकला म्हणजेच महात्रिपुरसुंदरी)

अशा ह्या रूपाचे स्मरण करती भक्त जन हे

तुझ्या ह्या रूपाचे करिति नित आराधन शिवे

तुझे हेची मंत्रात्मक स्वरुप गे वंद्य मजसी

तुला माते भावे नमन करतो मी तव पदी ।। ३२.१४*

----------------------

श्लोक –   


हे जगज्जननी,

तू अनादि आणि अनंत आहेस म्हणून तुला नित्या असे म्हणतात. तुझे काही भक्त तुझ्या उपासनेने निःसीम, अनंत, निरतिशय आनंद (महाभोग) मिळवतात. तुझे भक्त सुखाच्या सरोवरात सुखाचे तरंग बनून राहतात. त्यांच्या सर्व कामना पूर्ण झालेल्या असतात. तुझ्या उपासनेतून त्यांना मिळणार्‍या ह्या आनंदाची तुलना कोणाबरोबर आणि कशाबरोबरही होऊ शकत नाही. जर तुलना करायचीच झाली तर ब्रह्मदेवाला जो आनंद मिळतो तो, तुझ्या भक्तांना तुझी उपासना करून मिळणार्‍या आनंदाच्या एक शतांश सुद्धा नाही. म्हणजे ब्रह्मदेवाच्या तुलनेत तुझे उपासक शतपट जास्त आनंद मिळवतात.

 असा महान आनंद मिळविण्यात तत्पर असलेले आणि आनंदाचा रसास्वाद घेण्यात अत्यंत रसिक असलेले हे तुझे भक्त तुझी उपासना करताना तुझा पंचदशाक्षरी मंत्र सतत स्मरत असतात, पठण करत असतात.

श्री ललितामहात्रिपुरसुंदरीच्या आग्रहास्तव जगाच्या कल्यांणासाठी श्री भगवान सदाशिवाने श्रीविद्या नावाचे स्वतंत्र तंत्र हया भूतलावर अवतीर्ण केले हे श्लोक 32 मधे आपण पाहिलं. हा मंत्र कसा म्हणावा हयाचा विधी श्लोक 33 मधे दिला आहे.

 

हा मंत्र म्हणण्यापूर्वी  क्लीं, हृीं, श्रीं ही तीन बीजाक्षरे म्हणून मग हा मूळ मंत्र पठण करावा.  ही बीजाक्षरे देतांनाही त्यांच्या ऐवजी 1 स्मरं 2 योनिं 3 लक्ष्मीं असे तीन सूचक शब्द दिले आहेत. जे ह्या बीजाक्षरांना सूचवतात. निर्दिष्ट करतात. मंत्राच्या आरंभी जोडली गेलेली क्लीं, हृीं, श्रीं ही तीन बीजाक्षरे जणु काही शिवाला अर्पण केलेले त्रिदल असे बेलाचे पानच असावे असे वाटते.

हा जप करण्यासाठी जणु काही तुझ्या भक्तांनी चिंतामणि मण्यांची तयार केलेली माळ आपल्या हातात धरलेली असते. चिंतामणि हे असे रत्न आहे की, जे सर्व चिंता, दुःख, व्यथा, यातना, क्लेश, पीडा दूर करते.  अशा रत्नांचे मणि गुण म्हणजे दोर्‍यात ओवून /माळ करून भक्ताने हातात ती माळ धारण केली आहे. गुण ह्याचा अर्थ सद्गुण असाही आहे त्यामुळे भक्त सद्गुणी आहे त्याने सद्गुणरूपी दोर्‍यात हे चिंतामणिचे मणि/रुद्राक्ष (अक्ष) ओवून ही माळ केली आहे. अक्षचा अजून एक अर्थ अ पासून क्ष पर्यंत सर्व मूळाक्षरे. ही मूळाक्षरे हेच जणु काही चिंता दूर करणार्‍या चिंतामणिरूपी रत्नाचे मणि आहेत.

श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, तुझ्या भक्तांनी हृदयकमलात पूजारूपी यज्ञ आरंभ केला आहे, त्यासाठी हृदयरूपी अग्निकुंडात शिवशक्तिरूपी अग्नि चेतवला आहे. हया अग्नीला सतत उद्दीपना मिळावी तो जराही न शमता सतत तेजस्वी रहावा ह्यासाठी तुझा हा पंधरा अक्षरी बीजमंत्र आणि त्या आधीची बिल्वदलाप्रमाणे असलेली तीन बीजाक्षरे क्लीं, हृीं, श्रीं म्हणजे जणु सुरभीच्या म्हणजे कामधेनूच्या दुधापासून बनविलेल्या तुपाच्या शेकडो धारांनी यज्ञवेदीवर दिलेली आहुती आहे. कामधेनू ही सर्व कामना पूर्ती करणारी आहे. तिचं दूध, साय, लोणी, तूप हे एकाहून एक श्रेष्ठ आहे. अजून अजून मूल्य वर्धन झाल्याचे दर्शविणारे आहेत. अशा कामधेनूच्या तुपाने होणारा परिणाम नक्कीच सर्वश्रेष्ठ लाभ घडवून आणणारा आहे. जगदंबेचा हा मंत्र हा असा अत्यंत परिणामकारक आहे

 थोडक्यात शिवशक्तिस्वरूप प्रेय आणि श्रेय असलेली जी उर्जा माझ्या हृदयात उत्पन्न झाली आहे. ती सतत मला प्रेरणा देत राहो ह्यासाठी हा स्फूर्तीदायी मंत्र मला मदत करेल. तो मी सतत/ अखंड जपत राहीन.

 हे माते तू नित्य आहेस. तुला मी कायमचा शरण आलो आहे.

स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः

निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।

भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः

शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ।।।। *

(त्रितय – तिन भाग असलेला. निधाय – नीटपणे ठेऊन. निरवधि – निःसीम, ज्याला अंत नाही, अनंत काळ. महाभोग – निरतिशय आनंद. सुरभि – कामधेनु. घृत – तूप. आहुति – यज्ञात अर्पण केले जाणारे तूप वा समिधा वा इतर द्रव्य.)

( अन्वय – हे नित्ये! निरवधिमहाभोगरसिकाः  एके तव मनोः आदौ स्मरं योनिं, लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणि-गुण—निबद्धा-अक्षवलयाः शिवाग्नौ सुरभि-घृत-धारा-आाहुति शतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति।)

*अजन्मा माते तू नच तुजसि मृत्यूच कधिही

असे तूची नित्या तुजसि दुखवी काळ न कधी 

तुझ्या भक्तांना जे अनुपम मिळे सौख्यचि महा

शतांशासी त्याच्या मिळवु शकतो ना विधिच हा ।। . १।।

 

अगे ब्रह्मज्ञानी जननि अनुयायी तव पहा

तुझ्या त्या मंत्राचा करिति जप पंध्राक्षरि (15 अक्षरांचा) सदा 

(‘तुझ्या पंचदश अक्षरी मंत्राचा जप’ हे वृत्तात बसवता आले नाही तरी क्षमस्व!)

तुझे माते विश्वात्मक प्रतिक ते मंत्रस्वरुपी

अशा मंत्रारंभी वदति नित ते अक्षर त्रयी ।। 33.

 

असे ती क्लीं, हृीं, श्रीं सुचविलिच शब्दातुन तिन्ही

जसे क्लीं बीजासी सुचवित असे शब्द स्मरची 

तसे योनी शब्दे सुचवित असे र्‍हीं पद पुन्हा

तसे लक्ष्मी शब्दातुन सुचवि श्रीं बीज जननी ।। . ।।

 

अगे हे क्लीं, हृीं, श्रीं म्हणति पहिल्यांदा स्तुतिचिया

णू बिल्वाचे ते त्रिदल चरणी अर्पिति तुझ्या 

धरी माला चिंतामणिमयचि रत्नाचिच करी

कराया मंत्राचा सतत जप गे विश्वजननी ।। .

 

असे स्थापीला जो हृदयकमलवेदीवर सदा

असे यज्ञाग्नी जो जननि शिवशक्तीस्वरुप गा ।

अशा यज्ञी मंत्रस्वरुप-सुरभीच्या घृतयुता-

हजारो धारांची जननि नित दे आहुति तुला ।। .।।

(मूळ स्तोत्रात शतैः म्हणजे शतधारा म्हटलं आहे. वृत्तात बसण्यासाठी हजारो धारांची असा बदल केला आहे.)

तुझ्या सेवेसी गे नित असति जे तत्पर सदा

हृदी सातत्याने जप करिति जे भक्तचि तुझा 

हृदी आनंदाच्या नित उठति उर्मीच अतुला

तयांच्या सौख्याची विधिसह न होईच तुलना।। .६ ।।*

 

----------------------

श्लोक – ४ 


1 समग्र धर्म, 2 समस्त ऐश्वर्य, 3 संपूर्ण यश, 4 सकल श्री, 5 पूर्ण ज्ञान, 6 पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला ‘‘भग’’ असे म्हणतात. हे माते! हे सर्व गुण समुच्चय तुझ्यातही आहेत आणि सदाशिवांमधेही आहेत म्हणूनच तुला भगवती म्हणतात तर सदाशिवांना भगवान म्हणतात. हे माय भगवान सदाशिव विश्वरूप आहेत. त्यांच्या विश्वरूपाला मूर्त रूपात दाखविणारी तू आहेस. संपूर्ण विश्वरूप कल्याणकारी अशा मूर्तरूपात/दृश्यरूपात साकार झालं तर हे माय ते कल्याणकारी, अत्यंत लावण्यसम्पन्न असं मूर्तरूप म्हणजेच तू आहेस. जगाचं पोषण करण्यात तत्पर असलेले हे सूर्य (मिहिर) आणि चंद्र (शशि) ही तुझी उन्नत अशी दोन वक्षस्थले आहेत. शिव आणि शिवा हा भेद आहेच कुठे? शिवस्वरूपाशी समरस असलेला, एकरस असलेला हा तुझा देह अत्यंत शु्दध, पवित्र आहे. पापाचा त्यात लवलेशही नाही. ( मित्रांनो, जेव्हा मी केलं असा अहंकार निर्माण होतो तेव्हा पापाचा उगम होतो. पंचमहाभूतांकडे हा अहंकार जराही नाही. म्हणूनच आपण पाण्याने बुडवल, अग्नीने जाळलं------ असं न म्हणतात, पाण्यात बुडला, जळून मेला असं म्हणतो. मारण्याचा दोष पाणी अग्नी, वारा, तेज  --- ह्या पंचमहाभूतांना लागत नाही. अहंकार रहित असलेल्या त्रिपुराम्बिकेला म्हणूनच कुठलेली दोष चिकटत नाहीत. ती अत्यंत पवित्र आहे.)

माय! तुझा देह नवात्मा म्हणजे सतत नवचैतन्याने बहरलेला आहे. तारुण्याच्या तेजाने मुसमुसत आहे. तुझ्याशी समरस असलेले ‘‘परानंद’’ म्हणजे भगवान शंकर आणि त्यांच्याशी समरस असलेली ‘‘परा’’ म्हणजे परात्पर शक्तिस्वरूप तू अशा तुम्हा दोघांचे एकमेकांशी एवढे तादात्म्य आहे की, तुमच्या तादात्म्यात यत्किंचितही भेद नाहीच! त्यामुळे तुमच्या पैकी कोण मुख्य आणि कोण गौण हा प्रश्नच उरत नाही. जेव्हा शिवतत्त्व प्राधान्याने असते त्यावेळी शक्तितत्त्व गौण/ अंगभूत असते; अव्यक्त रूपात असते. आणि जेव्हा शक्तितत्त्व प्राधान्याने असते तेव्हा शिवतत्त्व अव्यक्त वा गौण असते.

शिवाला नवात्मा असं म्हणतात. नित्य नूतन असा त्याचा एक अर्थ. दुसरा म्हणजे ज्याचे स्वरूप नऊ भागांमध्ये विभागले गेले आहे. नवात्मा म्हणजे भगवान सदाशिव. ह्या शंभूला महा भैरव वा आनंदभैरवही म्हणतात. ह्या आनंद भैरवालाच नवात्मा म्हणतात. आनंदभैरवाची नऊ रूपे

कालव्यूहः कुलव्यूहो नामव्यूहस्तथैव च

ज्ञानव्यूहस्तथा चित्तव्यूहःस्यात्तदन्तरम्  ।

नादव्यूहस्तथा बिन्दुव्यूहः स्यात्तदन्तरम्

कलाव्यूहस्तथा जीवव्यूहः स्यादिति ते नव ।।

व्यूह म्हणजे विशिष्ट रचना. शरीर रचनेसाठी योगसूत्राने कायाव्यूह शब्द वापरला आहे. त्याप्रमाणेच काल, कुल, नाम, ज्ञान, चित्त आदि नऊंची जी विशिष्ट रचना आहे त्यांनाही व्यूह म्हटले आहे.   1 कालव्यूह, 2 कुलव्यूह, 3 नामव्यूह, 4 ज्ञानव्यूह, 5 चित्तव्यूह, 6 नादव्यूह, 7 बिंदुव्यूह, 8 कलाव्यूह, 9 जीवव्यूह.

1 कालव्यूह – म्हणजे काळाची विशिष्ट रचना. चंद्र, सूर्य आणि त्यानमित्ताने होणारे कालखंड. क्षण, लव, घटिका, मुहूर्त, दिन, पक्ष, मास, ऋतु, अयन, संवत्सर------ ते कल्पांन्तापर्यंतचा काळ महाभैरवाचे स्वरूप आहे.

2 कुलव्यूह- (मला नक्की माहित नाही.)

3 नामव्यूह/ संज्ञास्कंध – सर्व पदार्थांना असलेल्या नामांची विशिष्ट रचना. सर्व पदार्थांची साम्यनामे आणि विशेषनामे हे भैरवाचेच स्वरूप आहे.

4 ज्ञानव्यूह / विज्ञानस्कंध – सविकल्प, निर्विकल्प असे ज्ञानाचे सर्व प्रकार. एकंदर सर्व ज्ञानाची अस्तित्त्वात असलेली रचना.

5 चित्तव्यूह -मन, बुद्धी, चित्त, अहंकार, महतत्त्व इत्यादिंनी चित्ताची घडणारी रचना

6 नादव्यूह – परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी, संपूर्ण अक्षरराशी

7 बिंदुव्यूह – षटचक्रांचा समुदाय

8 कलाव्यूह – मूळ  मातृकांसमूह, म्हणजे, अ पासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण

9 जीवव्यूह -सुखदुःखांचे भोक्ते जीवात्मे

 वरील नऊ व्यूह आनंदभैरवाचे देह मानले जातात. त्यामुळे संपूर्ण विश्व हे आनंदभैरव भगवान सदाशिवांचे शरीर आहे.

श्री त्रिपुरसुंदरी ही श्रीचक्रस्वरूप आहे. संपूर्ण वर्णसमूह ह्या त्रिपुरसुंदरीचे रूप आहे. संपूर्ण वर्णसमूह/ वर्णराशी  अ वर्ग, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग , य वर्ग, श वर्ग,  आणि या सर्वांच्या मूर्ध स्थानी मेरूप्रमाणे असलेला क्ष वर्ग अशा नऊ भागांमधे दर्शविला जातो.

तात्पर्य, भगवान शंकर हे जसे नवात्मा आहेत तसेच त्रिपुरसुंदरी पण नवात्माच आहे. ह्याच अभिप्रायाने शंकर शंकरी, भेरव भैरवी, आनंद भैरव आनंदभैरवी इत्यादि नामसादृश्यही दोघांमधे असल्याचे दृष्टीस पडते.

म्हणून श्री त्रिपुरसुंदरीलाही नवात्मा म्हणतात.  भगवान सदाशिव/ आनंदभैरव आणि त्रिपुरसुंदरी/ आनंदभैरवी दोघेही समरस आहेत अशा तुम्हा दोघांनाही माझे वंदन असो.

*शरीरं त्वं शम्भोः शशि-मिहिर-वक्षोरुह-युगं

तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् ।

अतः शेषः शेषीत्ययमुभय-साधारणतया

स्थितः सम्बन्धो वां समरस-परानन्द-परयोः ।। ४ *

( परानंद – भगवान् शंकर. परा – त्रिपुरसुंदरी. अघ- पाप. अनघ-  निर्दोष, शुद्ध. नवात्मा – सतत नवीन, नव चैतन्याने युक्त, सतत तरुण. मिहिर – सूर्य )

( अन्वय – हे भगवति त्वं शम्भोः शशि-मिहिर वक्षोरुहयुगं शरीरं असि, अहं तव आत्मानं अनघं नवात्मानं मन्ये; अतः  समरसपरानन्दपरयोः वा शेषः शेषी इति अयं सम्बन्धः उभयसारणतया स्थितः असि।)  

शिवाची काया तू समरस शिवाच्या तनुत गे

भरे पावित्र्याने अमल तनु निर्दोष अनघे ।

जगाला पोषी जे स्तन तवचि ते गे रवि-शशी

महा ऐश्वर्याने विलसतिच वक्षी उभयही ।। .१ ।।

 

सदा तारुण्याने मुसमुसत गे ही तव तनू

बघावी केंव्हाही परि गमतसे नूतन जणू ।

अशा तादात्म्याने फरक शिव शक्तीत न उरे

न मोठा छोटा हा फरक शिव-शक्तीतचि दिसे ।। . ।।

 

नवात्मा दोघेही भरुन उरले विश्व सगळे

असे दोघांचेही शरिर म्हणजे विश्व सगळे ।

तुम्हा दोघांमध्ये प्रमुख अथवा गौण न कुणी

म्हणोनी माझे हे नित उभयतांसी नमनची ।। .३ ।। 

 

तुझ्यापाशी आहे सकल यश ऐश्वर्य अवघे

समग्र श्री पूर्णा सकलचि तुला धर्महि कळे

असे वैराग्याच्या सह सकल ते ज्ञान अवघे

सहाही गोष्टीच्या म्हणति समुदाया भग असे ।। .।।

 

जिच्यापाशी आहे सकल भग ती गे भगवती

म्हणोनी संबोधी तुजसि जन हे गे भगवति

शिवालाही सारे म्हणति भगवान् शंकर जगी

रे भक्तीने मी नित उभयतांसी नमनची ।। .५ ।।*

----------------------

श्लोक  –


हे माते! हे जगज्जननी!

1 दोन्ही भुवयाच्या मध्यात म्हणजे भ्रूमध्य प्रदेशात जे आज्ञाचक्र आहे; ते मन तत्त्वाचे आहे. ते मनतत्त्व तूच आहेस.

2 कंठस्थानी असलेल्या विशुद्धिचक्रातील आकाशतत्त्वही तूच आहेस.

3 हृदयाच्या जवळ असलेल्या अनाहत नावाच्या संवित् चक्रातील मरुत् म्हणजे वायुतत्त्वही तूच आहेस.

4 उपस्थाच्या सान्निध्यात असलेल्या स्वाधिष्ठान चक्रातील अग्नितत्त्वही तूच आहेस. येथे अग्नि चा उल्लेख मरुत्सारथी केला आहे. मरुत् म्हणजे वारा. वारा ज्याचा सारथी आहे असा अग्नी. अग्निला चेतवण्यासाठी वार्‍याची जरूर असते. सारथि म्हणजे सहाय्य करणारा.

5 नाभिस्थानी असलेल्या मणिपूर चक्रातील आप म्हणजे जलतत्त्वही तूच आहेस

6 गुदस्थानी असलेल्या मूलाधारचक्रातील पृथ्वितत्त्व ही तूच आहेस.

म्हणजेच पृथ्वी, जल, तेज, वायु, आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. ह्या वेगवेगळ्या पंचमहाभूतात तुझे परिणाम पावणं (एवं त्वयि परिणतायां),  तू एकच असूनही त्यांच्या रूपात तुझं दिसणं म्हणजे ह्या संपूर्ण विश्वात तुझ्यापेक्षा निराळं काहीच नाही (न हि परं) हेच सिद्ध करतं.

‘‘ हे शिवयुवति!  त्वं एव स्वात्मानं विश्ववपुषा परिणमयितुं भावेन चिदानन्दकारं बिभृषे ’’ वपु म्हणजे शरीर. विश्ववपु म्हणजे विश्वरूप शरीर. हे पार्वती, हे शिवयुवती! तू विश्वरूपाने नटण्यासाठी, तुला विश्वरूपाने परिणत करण्यासाठी मोठ्या सुंदर उदात्त भावनेने, आनंदाने, मोठ्या हौसेने (भावेन)  चिदानन्दाकाराला  धारण करतेस (बिभृषे). चित् म्हणजे शक्तितत्त्व तर आनंद म्हणजे शिवतत्त्व. ह्या दोन्ही तत्त्वांच्या रूपाने तूच नटली आहेस. तूच शक्तीही आहेस,  तूच शिवही आहेस. मागच्याच श्लोकात आपणं पाहिलं होतं की,

 तुझ्याशी समरस झालेले ‘‘परानंद’’ म्हणजे भगवान शंकर आणि त्यांच्याशी समरस झालेली ‘‘परा’’ म्हणजे परात्पर शक्तिस्वरूप तू अशा तुम्हा दोघांचे एकमेकांशी एवढे तादात्म्य आहे की, तुमच्या तादात्म्यात यत्किंचितही भेद उरत नाही त्यामुळे तुमच्या पैकी कोण मुख्य आणि कोण गौण हा प्रश्नच उरत नाही. जेव्हा शिवतत्त्व प्राधान्याने असते त्यावेळी शक्तितत्त्व गौण असते अव्यक्त रूपात असते आणि जेव्हा शक्तितत्त्व प्रा  धान्याने असते तेव्हा शिवतत्त्व अंगभूत/ अव्यक्त वा गौण असते. तूच शिव आहेस. तूच शक्ति आहेस. सर्व काही तूच आहेस. कार्यही तूच. कारणही तूच. कार्य वा कारणाचे अधिष्ठानही तूच आहेस. प्रकृतिरूपाने ही तूच परिणत होतेस; अधिष्ठान रुपाने तू निर्विकारही राहतेस. माते मी तुला वंदन करतो.

*नस्त्वं व्योम त्वं मरुदसि मरुत्सारथिरसि

त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् ।

त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा

चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृषे ।। ५ *

( व्योम – आकाश, मरुत् – वायु, आप - पाणी. मरुत्सारथि – सारथि म्हणजे सहाय्यक. वारा ज्याचा सहाय्यक आहे तो म्हणजे अग्नी. परिणाम – हा पारिभाषिक शब्द असून त्याचा अर्थ परिवर्तन. वपु- देह. विश्ववपु – हे विश्व ज्याचा/जिचा देह आहे. बिभृषे – धारण करतेस.)

*अगे आज्ञाचक्री जननिच मनस्तत्त्व स्वरुपी

वसे भ्रू-मध्याते मन बनुनि तू नित्य जननी 

अगे कंठस्थानी वसशि नित आकाश बनुनी

विशुद्धी चक्राते जननि नित आकाशस्वरुपी ।। .१ ।।

 

अगे संवित् चक्री मरुत स्वरुपी तूच वससी

अगे जेची आहे जवळ हृदयाच्याच जननी 

वसे स्वाधिष्ठानी जननिच मरुत्सारथि रुपे

करे ज्यासी वायू मदत नित त्या अग्निस्वरुपे ।। . २ ।।

 

वसे नाभिस्थानी जननि मणिपूरी जलरुपी

वसे मूलाधारी जननि धरणीतत्त्व बनुनी 

अगे पृथ्वी, वायू, जल, अनल, आकाश सगळे

अशी पाची भूते जननि असशी तूच मन हे ।। .।।

 

धरायासी विश्वस्वरुप तनु हे विश्ववपुषे

चिदानंदाकारा जननि करिसी धारण मुदे

असे तूची शक्ती जननिच जिला चिद् म्हणति गे

महा आनंदाचे स्वरुप शिव हे तू असशि गे ।।.४ ।।

 

असे तूची शक्ती शिवहि असशी तूच जननी

असे तूची सारे शिवयुवति तू सर्व जगती

अगे कार्ये तूची सकलचि अधिष्ठान तयिचे

अगे कार्यांचेही जननि असशी कारण उमे ।। .५ ।।

 

परी ये ना बाधा तुजसि कधिही हे जननि गे

तुझ्या पायी आलो शरण तुजला विश्ववपुषे ।। .।। *

----------------------

श्लोक  -


सुहृदहो!

आपण ह्या उपक्रमाच्या आरंभी पाहिलं होतं की, ह्या स्तोत्राचे दोन भाग होतात. 1 ते 41 पर्यंतच्या श्लोकांना आनंदलहरी म्हणतात तर 41 ते 100 पर्यंतच्या श्लोकांना सौंदर्यलहरी म्हणतात. 35 व्या श्लोकात माता श्री महात्रिपुरसुंदरीने चिदानन्दाकाराला धारण केल्याचे पाहिले. चित् म्हणजे शक्तितत्त्व तर आनंद म्हणजे शिवतत्त्व. दोघांचे एकमेकांशी एवढे तादात्म्य आहे की, ते एकरस, समरस असल्यामुळे त्यांच्या पैकी कोण मुख्य आणि कोण गौण हा प्रश्नच उरत नाही. पण जेव्हा शिवतत्त्व प्राधान्याने असते त्यावेळी शक्तितत्त्व गौण असते अव्यक्त रूपात असते आणि जेव्हा शक्तितत्त्व प्राधान्याने असते तेव्हा शिवतत्त्व अंगभूत/ अव्यक्त वा गौण असते.

1- 41 ह्या श्लोकांमधे शिवतत्त्वाला प्राधान्य दिले आहे असे मला वाटते. आणि श्लोक 42 पासून शक्ति तत्त्वाला प्राधान्य दिले असावे असे मला वाटते.

 आता ह्या 36 व्या श्लोकापासून 41 व्या श्लोकांपर्यंत आपल्या शरीरातील मूलाधारादि षट्चक्रांमध्ये  शिवशक्तिस्वरूप श्री त्रिपुरसुंदरीचे  वास्तव्य असल्याचे वर्णन आहे. ही सहा चक्रे म्हणजेच शरीरांतर्गत एक श्रीचक्रच होय अशा भावनेनीही उपासना केली जाते.

 आपल्या शरीरातील सहा चक्ररूपी जे श्रीचक्र आहे, त्यातील एका एका चक्रात शिवशक्तिस्वरूप त्रिपुरसुंदरीचे वेगवेगळ्या रूपात कसे वास्तव्य असते ते दिले आहे. आचार्य सांगतात, हे जगज्जननी! माझ्या शरीरात जी सहा चक्रे आहेत, त्यांची अधिष्ठात्री तूच आहेस. ही चक्रेही तुझीच आहेत. तेथे तूच निवास करतेस. त्यातील दोन भुवयांच्यामध्ये जे चक्र आहे किंवा जे कमळ/पद्म आहे त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथे भगवान शंभूनाथ तुझ्यासह विराजमान झाले आहेत. तेथे त्यांना परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ म्हणतात. आणि तुला चित्पराम्बा किंवा परचिदम्बा म्हणतात. तेथे विराजमान झालेले शम्भुनाथ इतके तेजस्वी आणि आह्लाददायक आहेत की कोट्यवधी सूर्य, चंद्र जरी एकदम उगवले तरी ते इतके प्रकाशमान आाणि आह्लादक असू शकणारही. मला वाटते सूर्यासाठी येथे वापरलेला  तपन हा शब्द सूर्याचं प्रखर तेज, तप्त झळया, त्यामुळे पृथ्वीवरील जीवांचा होणारा दाह दर्शविणारा आहे. खरोखरचे असे कोट्यवधी सूर्य उगवले तर ते जीवसृष्टी बेचिराख करतील. पण भ्रूस्थानी असलल्या आज्ञाचक्रातील शंभूनाथांचं तेज कोट्यवधी सूर्याना मागे टाकणारं असलं तरी त्यात दाहकता मात्र मुळीच नाही. ‘‘मार्तंड जे तापहीन’’ अशा प्रकारे ते तेज त्रासदायक नाही उलट उगवत्या असंख्य बालसूर्यांपेक्षा कित्येकपटींनी आह्लाददायक आहे. येथे शक्तिस्वरूप असलेल्या तुझ्या देहाशी त्यांच्या देहाचा वामभाग सम्मिलीत झाला आहे.

 अशा ह्या स्वरूपाचे जो कोणी भक्त  भक्तियुक्त अंतःकरणाने ध्यान करतो तो  ‘‘ निरालोक ’’ नावाच्या सर्वोत्तम लोकाला प्राप्त होतो.  ह्या लोकापर्यंत सूर्य, चंद्र, अग्नि ह्यांचे तेज पोचू शकत नाही. स्वयंप्रकाशी शुद्ध चित् तत्त्वाच्या अलौकिक प्रकाशाने हा लोक उजळून गेलेला असतो. निरालोक ला अलोक ही म्हणतात महणजे पूर्णपणे एकान्त, विजन असलेला हा लोक आहे.  ह्याला भालोकभुवन असेही म्हणतात म्हणजे प्रकाश आणि आनंदाने परिपूर्ण असलेला हा लोक अनिर्वचनीय आनंद आणि ज्ञानाचे सुख देणारा असतो. एखादा विरळाच ह्या स्थानी कायमचा विराजमान होऊन राहू शकतो.

काशीक्षेत्राची अधिष्ठात्री देवता भगवान विश्वनाथ / शंभुनाथच आहेत. त्यांच्या अर्धांगी चित्शक्तिरूप परांबा विराजमान आहे. हा संदर्भ घेऊन पुढील अर्थही लावला जातो. आपल्या मूलाधारचक्रापासून  इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्या उगम पावतात त्याच गंगा आाणि यमुनास्वरूप आहेत. त्यांचा आज्ञाचक्रात संगम होतो. म्हणून भ्रूमध्याला प्रयागराज म्हणतात. तेथून पुढे त्या वारणा आणि अस्सी हया दोन नद्या उगम पावून त्या मेंदूतील सहस्रदलकमलाकडे जावयास निघतात. वारणा आणि अस्सि ह्या दोन नद्यांच्या मधे जो प्रदेश येतो तो वाराणसी/काशी म्हणून ओळखला जातो. आणि येथेही शंभुनाथ आणि जगदम्बा चित्परांबा हे विराजमान आहेत.

 आपल्या ‘‘काशीपञ्चकम्’’ मधेही आचार्य ब्रह्मज्ञान झाल्यावर अवघा देह पवित्र काशीक्षेत्र होतो असे सांगतात. त्यातील काही ओळी मी मराठीत देत आहे.

  झाली कायाच काशी, अति पुनित अशी, तेवता ब्रह्मज्ञान

चित्तामध्ये गुरूची अविरत स्मरतो पाउले हा प्रयाग

विश्वाला व्यापिते जी त्रिभुवन जननी ज्ञानगंगा सदैव

वाहे बोधामृताची सतत हृदि अती जाह्नवी ही पवित्र ।।5.1

 

चित्ती भक्ती अनन्या; मनि अढळ वसे  नित्य निष्ठा गया ही

विश्वाच्या या क्रियांना अगणित असुनी सूर्य जैसाच साक्षी

तैसा जो अंतरात्मा सकल जन मनी साक्षिभावेच राही

तोची विश्वेश माझ्या हृदि वसत असे तूर्यवस्था धरोनी।।5.2

 

तीर्थांचे तीर्थ झालो; अति पुनित असा देह हा ज्ञानरूपी

देहामध्येच माझ्या वसति सकल हे देव तीर्थादिके ही

शोधू आता कशाला विमल नव नवी व्यर्थ तीर्थे दुजी मी

आता ना अन्य तीर्थे मजविण मजला जाहलो मीच काशी।।5.3

असो आपण  36 वा श्लोक व त्याचा अर्थ पाहू.

 

तवाज्ञाचक्रस्थं तपन-शशि-कोटि-द्युति-धरं

रं शम्भुं वन्दे परिमिलित-पार्श्वं परचिता ।

यमाराध्यन्भक्त्या रवि-शशि-शुचीनामविषये

निरालोकेऽलोके निवसति हि भालोकभुवने ।। ।। *


सहा चक्रे जी जी मम तनुत वास्तव्य करती

अगे श्रीचक्राते सकलचि अनुस्यूत असती 

असे भ्रूमध्याते द्विदल तव जे चक्र बरवे

तया आज्ञाचक्री तुजसह विराजे शिव तिथे ।। . १ ।।

 

अशा आज्ञाचक्री तुज परचिदंबा म्हणति गे

महाशंभूनाथा म्हणतिच शिवासी नित तिथे 

जणू कोटी कोटी नभि उगवले सूर्य शशि हे

असा तेजस्वी तो शिव दिसत आह्लादक तिथे ।। . ।।

 

इथे वांमांगाने शिव विलिन होई तुजमधे

अगे चित् शक्ती ह्या तवचि स्वरुपाशी मिळतसे 

करे ह्या रूपाचे जननि नित आराधन हृदी

निरालोकासी तो जननि करतो प्राप्त सहजी ।। . ।। 

 

जिथे पोचायासी जमत न रवी वा शशिस ही

जिथे चित् तत्त्वाच्या उजळत प्रकाशे सकल ही 

प्रकाशाच्या ऐशा सुखमयचि `भालोकभुवनी’ 

दा राहे तोची अढळ शिव शक्तीस भजुनी ।। .।। *


----------------------

श्लोक  ३ –


36 व्या श्लोकापासून 41 व्या श्लोकापर्यंत आपण शिवशक्ति आपल्या शरीरातील सहा चक्रांमध्ये अथवा सहा कमलांमध्ये कुठल्या स्वरूपात रहात आहेत. हे पहात आहोत. 36 व्या श्लोकात भ्रूमध्यामधे म्हणजे भुवयांच्या मध्यात असलेल्या आज्ञाचक्रामध्ये शिव आणि शक्ती हे परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ आणि चित्पराम्बा किंवा परचिदम्बा ह्या रूपाने राहतात हे पाहिलं.

 आज आपल्या गळ्यामध्ये स्थित असलेलं विशुद्धिचक्र पाहू. ह्या विशुद्धि कमळाच्या 16 पाकळ्या असतात असे मानले आहे. विशुद्धिचक्राची अधिष्ठात्री देवता त्रिपुराम्बाच आहे. ह्या विशुद्धिचक्रात स्फटिकासमान चमकदार, शुभ्र कांति असलेले परमपवित्र भगवान सदाशिव हे विराजमान आहेत. येथे ते व्योम म्हणजे आकाश तत्त्वाचे जनक आहेत. आकाशतत्त्व आत्मतत्त्वापासून अभिव्यक्त/प्रकट झाले आहे. भगवान सदाशिव आत्मतत्त्वस्वरूपच आहेत. विशुद्धिचक्रात त्यांना व्योमेश्वर म्हणतात. हे जननि मी त्यांची सेवा करत आहे.

पण! हे आई! तू निश्चयाने शिवसमान सामर्थ्य असलेली आहेस. जी जी कामे भगवान सदाशिव करतात ती सर्व कामे म्हणजेच विश्वाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, निग्रह, अनुग्रह (हे सर्व पारिभाषिक शब्द आपण 24 व्या श्लोकात पाहिले आहेत. आपण परत पाहू शकता किंवा ब्लॅगवर सलग श्लोक आहेतच त्यात पाहू शकता.) ही सर्व कामे भगवान सदाशिवांप्रमाणे तूही करतेस.

किंवा

 तुमची कार्ये जरी भिन्न असली तरी तुम्हा दोघांचे सामर्थ्य निश्चितपणे (शिव-समान-व्यवसिताम्) समान आहे. कारण शिव हा साक्षी  व अकर्ता आहे. तर शक्ति शिवाच्या केवळ असण्याने कार्यरत होते. म्हणून त्यांची कार्ये तशी समान नाहीत. त्याचे कार्य भिन्न असले तरी सामर्थ्य समान असू शकते.

 विशुद्धिचक्रात ह्या व्योमेश्वराच्या सान्निध्यात विराजमान असलेली तू व्योमेश्वरी आहेस. तुमच्या दोघांची कांती चंद्रप्रकाशाप्रमाणे आह्लादक आहे. तुमच्या दोघांच्या शरीरातून एक दिव्य प्रभा सर्वत्र पसरली आहे.  चंद्रप्रभा ज्याप्रमाणे सर्व जगताला आच्छादित करते त्याप्रमाणे सर्व भक्तांच्या अन्तःकरणात सर्वत्र तुमची ही लोभस प्रभा प्रसार पावत आहे. भक्तांच्या चित्ताचा कानाकोपरा त्याने व्यापून टाकला आहे. त्यामुळे तेथे असलेला अज्ञानाचा अंधकार समूळ नाश पावला आहे. संस्कृत साहित्यात असे म्हणतात की चकोरपक्षी फक्त चंद्राचे चांदणे पिऊन राहतो. चन्द्रज्योत्स्ना हाच त्याचा आहार आहे. ( चकोर ह्या काल्पनिक पक्ष्याचा उल्लेख संस्कृत साहित्यात येतो.) त्यामुळे चकोरी (चकोर पक्षाची मादी) चंद्र प्रकाशाने जशी आनंदून जाते, त्याप्रमाणे तुमचे भक्त विशुद्धिचक्रामध्ये आपल्या उभयतांचे शिवशक्तिरूपाने विराजमान आह्लादक रूप पाहून अत्यंत आनंदित होतात आणि अनन्यभावाने तुम्हा दोघांनाही भजतात.

*विशुद्धौ ते शुद्ध-स्फटिक-विशदं व्योमजनकं

शिवं सेवे देवीमपि शिव-समान-व्यवसिताम् ।

ययोः कान्त्या यान्त्याः शशिकिरण-सारूप्यसरणे-

र्विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगती ।। ३७ ।।*

( विशद – स्वच्छ, पवित्र, निर्मल, विमल, चमकदार, शुभ्र. सरण – जाणारा, गतिशील,वाहणारा, वहनशी, प्रगतिशील. ध्वान्त- अंधार. व्यवसायात्मिका – निश्चयात्मिका.  शिव-समान -व्यवसिता – शिवाच्या समान, शिवाप्रमाणेच दृढ संकल्प असलेली, सर्व जबाबदारी पार पाडणारी. समान संकल्प, निर्धार असलेली. प्रयत्नशील, निश्चयी, उर्जस्वी, उद्योगी, परिश्रमी, धैर्यवान, दायित्व पार पाडणारी.)

*असे कंठस्थानी कमलस्वरुपी चक्र स्थित जे

विशुद्धी नावाचे असति दल सोळाच तयि गे 

तयामध्ये राहे स्फटिकसम विश्वेश्वर शिव

असे आकाशाचा जनक शिव तो आत्मस्वरुप ।। . १।। 

 

म्हणोनी संबोधी जगत तयि व्योमेश्वर असे

हृदी त्या व्योमेशा अविरतचि मी गे भजतसे 

असे शंभूअंगी अतुल बल सामर्थ्य नित जे

तुझ्या अंगी तेची जननि वसते निश्चितपणे ।। . ।। 

 

अगे ‘सांभाळावे जगत सगळे’ निश्चय असे

तुम्हा दोघांचाही; उभय झटता त्यास्तव भले 

जरी माते कार्ये असति तुमची भिन्न स्वरुपी

री सामर्थ्याते लव फरक ना निश्चितपणे ।। . ।। 

 

पहाता दोघांची जननि  क्षमता तुल्यबळ ही

तुझ्या पायी आलो नमन तुजला वंद्य जननी 

विशुद्धी चक्राते वसशिच शिवासन्निध सदा

मनाला भक्तांच्या उभय करिता मोदित सदा ।। .४ ।। 

 

असे दोघांचीही अति विमल कांती शशिसमा

सदा आह्लादाचे किरण निघती त्यातुन सदा 

प्रभा विस्तारे ही सहज पसरे भक्तहृदयी

हरे अज्ञानाचा घन तमचि ती सर्व सहजी ।। . ५ ।। 

 

प्रभेने ज्ञानाच्या उजळुन निघे चित्त सहजी

तयाने होई गे अति विमल भक्तांचिच मती 

सुखावे चंद्रासी बघुनच चकोरी  हृदयि गे

विशुद्धीचक्राते  बघुन शिवशक्तीसचि तसे ।। .६  ।। ----

 

हृदी होती आनंदित सकल हे भक्तगणची

तुम्हा दोघांनाही स्मरत हृदयी मी निशिदिनी।। .७ ।।   *

 

----------------------

श्लोक 38

१ २ ३ ४ ५ ६ ७  ८ ९ ०

 १ २  ४ ५ ६ ७  ८ ९ ०

आपल्या हृदयाच्या सान्निध्यात जे अनाहत चक्र आहे त्यालाच संवित्कमल म्हणतात. ह्या संवित्कमलाला 12 पाकळ्या आहेत.  ह्या 12 पाकळ्यांमधे किंवा 12 कमलदलात एक एक आदित्यदेवता विराजमान आहे. त्यामुळे येथे 12 आदित्यांचा प्रकाश सदैव विलसत असतो. (सूर्यनमस्कार घालताना जी 12 सूर्याची नावे घेतली जातात तेच हे 12 आदित्य)

समुन्मीलत् म्हणजे ज्याचा पूर्ण विकास झाला आहे, जे पूर्ण उमलले आहे असे (कमळ). हेच स्थान ज्ञानाचे वा आत्मज्ञानाचे आहे.  अशा ह्या कमळात सहाजिकच आत्मज्ञानाचाही मकरंद / मध / मधु पाझरत आहे. मानस सरोवरात ज्याप्रमाणे राजहंस विहरत असतात, त्याप्रमाणे येथेही भक्तांच्या हृदयात ह्या पुष्परसाचा आस्वाद घेण्यासाठी अत्यंत रसिकतेने दोन हंसाची जोडी कायम विहरत असते. त्या दोन हंसांपैकी एक आहेत साक्षात भगवान सदाशिव तर दुसरी हंसी म्हणजे साक्षात ही आदिमाया/ महाशक्ती आहे.

हया भक्ताच्या संवित्कमलामधे / अनाहत चक्रात राहणार्‍या ह्या दोघांना हंसेश्वर आणि हंसेश्वरी म्हणतात. त्यांचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे (किमपि) हे दोघे एकमेकात सतत वार्तालाप करत असतात. त्यांच्या संवादातून चौदा विद्यां आणि चार वेदांची परिणति म्हणजे विकास झाला आहे. तसेच हंस आणि हंसेश्वरीच्या वार्तालापातून चार वेदांचे उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद म्हणजेच शिल्पशास्त्र तसेच शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त ज्योतिष, आणि छंदशास्त्र अशी वेदाची सहा अंगे आणि मिमांसा आणि वेदांत, न्यायशास्त्र, 18 पुराणे आणि धर्मशास्त्र, चौसष्ट कला आणि तंत्रशास्त्र ह्या सर्वांचीही परिणति झाली आहे. विकास झाला आहे.

असं म्हणतात की, राजहंस एकत्र केलेले पाणी आणि दूध वेगवेगळे करतात. त्याप्रमाणे हे हंसेश्वर शिव आणि हंसेश्वरी आदिमाया भक्तहृदयातील गुण दोषांचे पृथक्करण करतात. दोष बाजूला करतात आणि गुणांचे ग्रहण करतात.

शिवाचे सर्वांवर इतके उपकार आहेत की त्याने भूतमात्रांना होणारी सर्व पीडा/महा भयंकर असे हालाहल स्वकंठात धरून ठेवले आहे. आणि लोकांना परम शांती मिळावी, आह्लाद मिळावा म्हणून तो सुधाकर म्हणजेच अमृतकिरणांनी युक्त असलेला चंद्र मस्तकी धारण केला आहे.  अशा ह्या भक्तवत्सल, गणग्राहक हंसेश्वर आणि हंसेश्वरी स्वरूप गुणग्राहक सदाशिव आणि आदिमायेस माझे नमन.

*समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं

भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम्

यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-

र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ।। 38*

( समुन्मीलत् - म्हणजे ज्याचा पूर्ण विकास झाला आहे, जे पूर्ण उमलले आहे असे (कमळ). गुणित – गुणाकार केलेल्या, संगृहीत, मोजलेल्या एकाच जागी ढीग करून ठेलेल्या. परिणति – परिवर्तन, रूपांतर, कायापालट, विकास. किमपि – अनिर्वचनीय. अष्टादश – अठरा. चौदा विद्या + चार वेद =18 विद्या   )

*असे माते संवित् कमल हृदयाच्या निकट जे

तयाची बाराही उमलुन दले पूर्ण विकसे ।

विराजे त्यामध्ये प्रतिदलचि आदित्य सगळे

सदा ज्ञानाचा तो सुमधुर मधू त्यातुन गळे ।। 38.1

 

अशा ह्या पद्माच्या मधुर मधु प्राप्तीस्तव तिथे

सुखे दो हंसाची अनुपमचि जोडी विहरते ।

असे ती जोडी गे शिव अन शिवेची अनुपमा

वसे भक्ता-चित्ती मनसरसि संचार करण्या ।। 38.2

 

अनाहाती हंसेश्वर वदति हंसेश्वरि तया

तयांमध्ये चाले बहु सुखद संवादचि भला ।

तयांच्या संवादातुन विकसती वेद सकला

कला चौसष्ठाही अन सकल विद्याहि चवदा।। 38.3

 

करावे हंसानी जल अन दुधासी अलग ते

तसे भक्तांच्याही करिति गुणदोषा विलग ते ।

गुणग्राहि दोघे करितिच पृथक् दोष-गुणही

करीती भक्ताचे गुणग्रहण मोदे उभयही ।। 38.4

 

करे त्राही त्राही विष सकल लोकांस बहु जे

धरे कंठी तेची अभय सकला देउन त्वरे ।

जनांच्या चित्तासी परि निवविण्या, मोद मिळण्या

धरे चंद्रा माथी अति सुखद त्या शीतल पहा ।। 38.5

 

महापीडा कंठी दडवि इतरांचीच जळती

सुखासी सार्‍यांच्या नित धरि सुधांशूसचि शिरी

असे कल्याणाच्या सुखमयच मूर्ती उभय जे

अगे माते ऐशा शिव अन तुला हे नमन गे ।। 38.6*

----------------------

श्लोक 39

सुहृत्हो,

शिव आणि शक्ती ह्यांचे आपल्या शरीरातील विविध चक्रात असलेले वास्तव्य, तेथील त्यांचे स्वरूप आपण 36 ते 41 ह्या श्लोकांमधे पहात आहोत. 36 व्या श्लोकात भ्रूमध्यातील आज्ञाचक्राापाशी वास्तव्य करणारे परशंभूनाथ आणि चित्पराम्बा हे अत्यंत तेजस्वी असूनही अत्यंत आह्लादक आहेत. तर कंठस्थानी असलेल्या विशुद्धि चक्रातील आकाशतत्त्वाच्या रूपाने राहणारे व्योमेश्वर आणि व्योमेश्वरी स्फटिकाप्रमाणे धवल असून चंद्राप्रमाणे शीतल आहेत. हृदयासन्निध अनाहत चक्रात किंवा संवित्कमलात राहणारे हंसेश्वर आणि हंसेश्वरी हे चारी वेद आणि अठरा विद्यांची निर्मिती करणारे आहेत. ते गुणग्राहक असून भक्ताच्या गुणदोषांचे पृथक्करण करणारे आहेत.

39 व्या श्लोकात मात्र सदाशिवांचं शांत स्वरूप बदलेलं आहे. स्वाधिष्ठान चक्रात संवर्ताग्नीच्या (प्रलयाग्नीच्या) रूपाने भगवान शिव निरंतर वास्तव्य करतात. हे माय!  तेथे त्यांच्या वामभागी तू सर्वश्रेष्ठ अशी समया, समयाम्बा अथवा समयादेवी नावाने विराजमान आहेस.

संवर्ताग्नीच्या रूपाने अधिष्ठित असलेल्या शिवाचा “आलोक” म्हणजे प्रकाश किंवा ज्वाला जेव्हा क्रोधाने असह्य वाढू लागतात; प्रक्षुब्ध झालेल्या शिवाच्या अति प्रचंड दाहाने प्रलय समयी जेव्हा तिन्ही लोकात मोठा हाहाक्कार माजतो; लोक त्राहि त्राहि करतात; त्यावेळी हे माय तुझी अत्यंत दयार्द्र दृष्टी तुझ्या भक्तांवर पडताच त्या महा भयानक ज्वाला, थंडीच्या दिवसात शेकोटी शेजारी बसून शेकावं अशा उबदार वाटू लागतात. माय हा फक्त तुझ्या कृपादृष्टीचा प्रभाव आहे.

माय स्वाधिष्ठान चक्रात संवर्तेश्वररुपी प्रलयकारी भगवान सदाशिव आणि त्यांचे अभिन्न अंग असलेली तू समयाम्बा ! तुम्हा दोघांचे मी स्वाधिष्ठान चक्रात ध्यान करीत आहे. भक्तिपूर्वक स्तवन करीत आहे. तुम्हा दोघांची “ ईड ’’ म्हणजे मनःपूर्वक स्तुती करत आहे.

 

*तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं

तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् ।

यदालोके  लोकान् दहति महति क्रोधकलिते

दयार्द्रां या दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति ।। 39*

(आलोक – प्रकाश, ज्वाला, अत्यंत क्रोध कलित – धरलेला. क्रोधकलित – हृदयात राग धरलेला, भरलेला )

*जिथे स्वाधिष्ठानी शिव वसतसे अग्निस्वरुपी

तिथे त्या संवर्तेश्वर प्रलयकारीच म्हणती

महा क्रोधे त्याच्या उसळतिच ज्वाला वरवरी

कराया संहारा शिव हृदयि प्रक्षोभच किती ।। 39.1

तयाच्या वामांगी जननि समयाम्बा म्हणुनची

बसे तूची माते  धरुनिच दया गे तव हृदी ।

जना संवर्ताग्नी शिवस्वरुप जाळे सकलची

करे त्राही त्राही जन सकल ते मृत्यु बघुनी ।। 39.2

तयावेळी माते सुखकर कृपादृष्टि तव ही

जनांसी सार्‍या ह्या सहज निववी शीतल अशी

कृपा होता भक्तांवर जननि गे शीतल अशी

गमे शेकोटीच्या जवळ बसलो शेकत  अम्ही ।। 39.3

अगे झेलूनीही अनल प्रलयीचा भयकरे

मिळे त्यांना त्याची उब सुखद ती गे तुजमुळे

तुझे स्वाधिष्ठानी स्मरण शिवतत्त्वासह करे

अभिन्ना रूपाने  तुजसि स्तवितो हे जननि गे ।। 39.4*

----------------------

श्लोक 40

तटित् म्हणजे वीज. ज्याच्याजवळ वीज आहे तो तटित्वान. मेघात विजेचे वास्तव्य असते म्हणून मेघांना तटित्वान् म्हणतात. वीज क्षणभरात प्रचंड प्रभेने चमकून जाते. आणि अंधारात तिच्या लखलखाटाने क्षणभरासाठी सर्वकाही उजळवून टाकते. मणिपूर चक्रात सदाशिव अमृत बरसविणार्‍या मेघाच्या रूपाने निवास करतात. म्हणून त्यांना मेघेश्वर म्हणतात. त्यांच्या वामभागी बसलेल्या शक्तिस्वरूप जगदम्बेस म्हणून मेघेश्वरी म्हणातात. ही मेघेश्वरी विद्युल्लतेचे तेज घेऊन तळपत असते. पण! वीज क्षणभर चमकून लुप्त होते; तसे हिचे तेज क्षणभरासाठी नसते. तर स्थिरपणे  तळपणार्‍या सौदामिनीच्या रूपात शिवाच्या वामांगी ही शक्ती विराजित असते. ही निरंतर तळपणारी तटित् स्वरुपी जगदंबा शिवसन्निध असल्याने  सदाशिवांना तटित्वान् म्हणतात. जणु काही प्रलयाग्नीनंतर अमृत बरसवणारा हा मेघ असल्याने शिवाच्या ह्या रूपाला मणिपूरचक्रात अमृतेश्वर म्हणतात तर जगदम्बेला अमृतेश्वरी म्हणतात.

नित्य स्थिरपणे प्रकाशित असलेल्या ह्या शक्तिमुळे वा हे विद्युल्लतेचे स्फुरण तिमिर म्हणजे अंधाराचे ‘‘परिपन्थि’’ म्हणजे नाश करणारे वा अंधाराचा मार्ग थोपवणारे आहे. ‘‘तिमिस्रलोकस्वरूप म्हणजे अंधारमय असलेल्या ह्या मणिपूरचक्रातील अंधाराचा हे माय! तुझ्या तेजामुळे नाश होतो.

हे माय! तू हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, नीलमणी अशा नाना रत्नांचे जे विविधरंगी रत्नजडित अलंकार धारण केले आहेस त्या नाना रत्नांच्या रत्नकांतीने असं वाटत आहे की ह्या श्यामल अशा मेघेश्वरावर जणु काही सप्तरंगी इंद्रधनुष्यच साकार झाालं आहे. रिमझिम पाऊस असल्याशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही. नेहमी गौरकाय असलेले शिव येथे श्यामल मेघाच्या रूपात असणं, लखलखित बिजलीप्रमाणे तुझं त्यांच्या सन्निध असणं, तुझ्या रत्नमाणकांचं इंद्रधनुष्य मेघावर दिसणं ही सारी लक्षणं अमृतवर्षा करण्यासाठी मेघेश्वर उत्सुक असल्याची आहेत. अमृतेश्वर कृपा वर्षाव करण्यास सज्ज आहेत. 

प्रलयकाळी हर म्हणजे अग्नि आणि मिहिर म्हणजे सूर्य ह्यांच्या तापाने तप्त झालेल्या, पोळून निघालेल्या त्रिभुवनाला अमृतमयी वर्षा करून शांत करणारे अमृतेश्वर हे तुझ्याच सामर्थ्याने सम्पन्न आहेत. हे सामर्थ्य त्यांना शक्तीमुळेच प्राप्त झाले आहे. अशा ह्या अमृतेश्वर आणि अमृतेश्वरीला मी शरण आलो आहे. मणिपूरचक्रात मी तुम्हा उभयतांची भक्तिभावाने उपासना करत आहे.

 

*तटित्वन्तं भक्त्या तिमिर-परपन्थि-स्फुरणया

स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।

तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं

निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ।। 40*

( परिपन्थिन् – विरोध करणारा, रस्ता अडवणारा  रत्नाभरण- रत्न आभरण. आभरण- दागिना. परिणतनिषेवणम् – सेवा, पूजा, आराधना, अभ्यास, अनुष्ठान. हर – प्रलयकाळीचा अग्नी. मिहिर - सूर्य )

 

*जिथे मूलाधारी शिव वसत मेघेश्वररुपी

तयाच्या वामांगी बिजलीसम शोभे तव छबी

असे दोघांचेही मणिपुर अधिष्ठान बरवे

तुझ्या शंभूचे गे अति प्रमुख हे मंदिर असे ।। 40.1

 

स्फुरे विद्युल्लेखा क्षणभर परी ती तम हरे

प्रकाशाने तू गे सततचि झळाळे जननि गे

प्रकाशामध्ये ह्या तम विरुन जाई मणिपुरी

तुझ्या भक्तीने गे कर विलय अज्ञान-तमही ।। 40.2

 

अलंकारांनी गे जननि नटली ही तनु तुझी

प्रभा त्या रत्नाची जणु उमटवी इंद्रधनुसी

शिवा अंगी शोभे अबलख असे इंद्रधनु हे

कृपेने ओथंबे शिवस्वरुप मेघेश्वर गमे ।। 40.3

 

म्हणे त्राही त्राही त्रिभुवन महा घोर प्रलयी

रवी अग्नी तापे सकल जन हे होरपळती

सुधा धारा तेव्हा बरसविच मेघेश्वर तदा

 तुझ्या सामर्थ्ये जो जननि नित सम्पन्नचि सदा ।। 40.4

 

असो भक्तीभावे तव उभयतांसी नमनची

करावा सेवेचा मुदित-मन स्वीकार जननी ।। 40.5*

----------------------

श्लोक 41

सुहृत्हो!  ह्या दीर्घ स्तोत्राचे दोन भाग होतात; हे आधी आपण पाहिले आहे. 1- 41 श्लोकांना आनंदलहरी तर 42- 100 ह्या श्लोकांना सौन्दर्यलहरी म्हणतात. संपूर्ण स्तोत्राला सौन्दर्यलहरी म्हणतात. तसेच शिव आणि शक्ति हे दोघे चिदानन्दस्वरूप आहेत. चित् म्हणजे शक्ति तर आनंद म्हणजे शिवशंभू. 34 व्या श्लोकात आपण पाहिले होते की, जेव्हा शिवतत्त्व प्राधान्याने असते तेव्हा शक्तितत्त्व गौण असते आणि जेव्हा शक्तितत्त्व प्राधान्याने असते तेव्हा शिवततत्त्व गौण असते. 1-41 श्लोकात शिवतत्त्वाचे प्राधान्य थोडे अधिक असल्याने त्यांना आनंदलहरी  म्हणत असावे असे मला वाटते. ह्या आनंदलहरीतील आजचा आपला शेवटचा श्लोक पाहू.

सर्व चक्रांची माहिती आपण 9व्या श्लोकात पाहिली होती. हे जननी त्यातील मूलाधार चक्र हेही तुझेच आहे.  नेहमी येथे तू कुंडलिनी रूपात राहतेस तेथे तुझे आणि शंभूनाथांचे कायम वास्तव्य आहे. नवात्मा भगवान येथे तांडव नृत्य करीत आहेत तर तू परचिदाम्बा तेथे लास्य नावाचे नृत्य करत आहे. मागच्याच श्लोकात आपण पाहिले की, प्रलयामुळे सारे विश्व होरपळून गेले असता शिव अमृतेश्वर ह्या मेघाच्या स्वरूपात त्याची कृपा विश्वावर बरसवत राहतो. तर अमृतेश्वरीच्या रूपाने शक्ति शिवतनुवर इंद्रधनुष्याप्रमाणे विराजमान असते. मूलाधारचक्री शिव-शक्तिच्या तांडव आाणि लास्य नृत्यातून नवीन सृष्टीची पुष्टी होते. 34 व्या श्लोकात आपण नवात्मा ह्या शब्दाचे दोन्ही अर्थ पाहिले होते. सतत चैतन्याने, तारुण्याने मुसमुसलेला  असा त्याचा अर्थ आहे. तर दुसर्‍या अर्थाप्रमाणे नऊ विभागात विभागला गेलेला. त्या नऊ भैरवांची नावे आपण 34 व्या श्लोकात परत पाहू शकता. ह्या सर्व रूपातून प्रकट होणारं मूळ रूप आनंदभैरव आहे.

तुझे महा लास्य नृत्य पाहून लोक तुला ‘‘महालास्या’’ म्हणजे ‘‘म्हाळसा’’ म्हणतात. ‘‘नवात्मा’’ भगवान् महाभैरव वा आनंदभैरव हे येथे शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत ह्या नऊ रसांनी युक्त असे ताण्डवनृत्य करीत आहेत. तांडवनृत्य प्रवीण असे शिव स्वतः नटांचेही नट नटराज आहेत. तर तुला येथे समयादेवी, भैरवी, महाभैरवी अथवा आनंदभैरवी ह्या नानांनी संबोधले जाते. तुमच्या दोघांचे हे नृत्य जगाच्या उपकाराकरताच आहे.  प्रलयातून होरपळून बाहेर पडलेल्या विश्वाची पु्न्हा उत्पत्ति अवस्थाच चालू होते. ( उदयविधिम् उद्दिश्य दयया ) त्यामुळे अत्यंत दयार्द्र अंतःकरणाने आपण दोघे मायबाप बनून विश्वाचा प्रतिपाळ करत आहात. विश्वाचा सांभाळ करत आहात. प्रलयाच्यावेळी अनाथ झालेली ही सृष्टी तुमच्या दोघांमुळेच परत सनाथ झाली आहे. मूलाधारचक्रात अभिन्न रूपाने राहणार्‍या आपल्या दोघांना माझे नमन. 

तवाधारे मूले सह समयया लास्य परया

नवात्मानं मन्ये नव-रस-महा-ताण्डवनटम् ।

उभाभ्यामेताभ्यामुदयविधिमुद्दिश्य दयया

सनाथाभ्यां जज्ञे जनक-जननीमज्जगदिदम् ।। 41

(लास्य – पार्वतीच्या नृत्याला लास्य तर शिवाच्या नृत्याला तांडव म्हणतात. महा लास्य करणारी ती महालास्या म्हणजेच म्हाळसा. )

असे मूलाधारी जननिच अधिष्ठान तव गे

नवात्मा शंभूही तुजसह महाभैरव रुपे

पहावे आश्चर्ये अभिनव असे ताण्डव करे

रसांची निष्पत्ती घडवि नटराजा सहज गे ।। 41.1

 

शिवाच्या ह्या नृत्यातुन प्रकटवी तो तरलसे

प्रकर्षाने सारे नवरसचि ते अद्भुतपणे

महानाट्याच्या ह्या बहुविध अशा नृत्यसमयी

तुझ्या लास्याचेही अनुपम अविष्कार दिसती ।। 41.2

 

जगाच्या कल्याणा जननि तुमचे नर्तन असे

पिता माता तुम्ही सकल जगताचे सदय हे

जनांची पाहोनी प्रलयसमयी दीनचि स्थिती

तुम्हासी येई हो बहु कळवळा नित्य हृदयी ।। 41.3

 

तुम्ही  झाला त्यांचे सदयहृदयी पालक जगी

जगाचे प्रेमाने अविरतचि संगोपन करी ।

शिवाभिन्ना शक्ती  नमन चरणी नित्य तुमच्या

करावा सेवेचा मुदित-मन स्वीकारचि सदा ।। 41.4


----------------------------------------------------



श्लोक    1 -  20

श्लोक  42 - 60

श्लोक  61 – 80

श्लोक  81 – 100

1 comment:

  1. ताई आपल्या सौंदर्य लहरी श्लोकांचे विश्लेषण वाचून जो आनंद होतो आहे त्याचे वर्णन करावयास माझे जवळ शब्द नाहीयेत... आपणांस साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त लाभलेला आहे.. अशीच अधिकाधिक सेवा आपल्या हातून घडो... हीच बाप्पा मोरया चरणी प्रार्थना

    ReplyDelete