अरुंधतिकृता शनीदेवस्तुती

 

अरुंधतिकृता शनीदेवस्तुती

अनुष्टुभ् छंद

(प्रतिचरणाचे पाचवे अक्षर लघु, सहावे गुरू 2,4 चरणाचे 7 वे अक्षर लघु व1,3 चरणाचे 7वे अक्षर गुरू / चरणाच्या सुरवातीस भ किंवा न गण नको)

सूर्यपुत्रा दयावंता । महाभयहरा शनी

कृपाघना शनीदेवा । तारिले मजला तुम्ही ।। 1

 

नमस्कार असो माझा । पादपद्मीच हे प्रभो

अहंकारहरा देवा । नवा जन्म दिला विभो ।। 2

 

साडेसाती असे मोठी । कष्टदायी भयंकरी

पीडा देते शरीरासी । मनासी छळते अती ।। 3

 

सुटला ना तुझ्या देवा । तडाख्यातून एकही

असो गुरू असो दैत्य । सोडिले ना तुवा कुणी ।। 4

 

विक्रमादि नृपालाही । येई प्रत्यय तत्क्षणी

वनवास दिला रामा । पाडिले रावणा रणी ।। 5

 

पराक्रम असा मोठा । ऐकुनी आपुला महा

हबकून मनी गेले । भरली धडकी मला ।। 6

 

उसन्या अवसानाने । तरीही  बोलले जगा

नभीची तारका कैची । पीडा देईल ती मला ।। 7

 

परंतु आतुनी जाळे । भीती एक अनामिका

 धास्ती कुरतडे चित्ता । कुणा संगेचि सामना ।। 8

 

काय काय मला आता । भोगाया लावतो शनी

मनोमन म्हणे मीही । श्लोक स्तोत्र तुझे मनी ।। 9

 

नीलाञ्जनसमाभासं । रविपुत्रं यमाग्रजं

छाया-मार्तण्ड-सम्भूतं । तं नमामि शनैश्चरम् ।। 10

 

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तकोऽयमः

सौरिः शनैश्चरोमन्दः पिप्पलादेन संस्तुतः ।। 11

 

परी येता घरी माझ्या । कृपाळू हे शनैश्चरा

`चला बघू नव्याने या । जगा' ऐसेचि बोलला ।। 12

 

हाकिला रथ वेगाने । पुढ्यात घेऊनी मला

असता तूच पाठीशी । स्थान राहील का  भया ।। 13

 

येरवी ना दिसे नेत्रा । जग ते दाविले तुम्ही

होऊनी विस्मिता मीही । बघे अद्भुत सृष्टि ही ।। 14

 

गुंत्यातुनीच नात्यांच्या । रथ हा हाकिता तुम्ही

चेहरे ओळखीचे ते । झाले कैसे अनोळखी ।। 15

 

माझेच आप्त हे सारे । प्रेम माझे तयांवरी

येतील धावुनी वेगे । संकटी म्हणताचि मी ।। 16

 

हसलास जरासा तू । म्हणाला, `बघ ही मजा'

वेळ नाही कुणालाही । माझ्यासाठी दिसे मला ।। 17

 

पुत्राहूनहि केले मी । प्रेम ज्यांच्यावरी भले

झिडकारून गेले ते । देऊनी शोक दुःख ते ।। 18

 

काळाने ओढुनी नेले । धनार्थ सोडिले कुणी

कुणी खुर्चीसवे गेले । राहे ना सोबती कुणी ।। 19

 

कुठे गेले कुठे गेले । रडे मी अति स्फुंदुनी

म्हणे गेले म्हणे गेले । जग सारेचि नासुनी ।। 20

 

फाटले हृदय शोकाने । वणवा जाळतो उरी

हाय हाय म्हणोनी मी । दुःख केले भयंकरी ।। 21

 

नाही वडील ना माय । बंधू बहीण वा कुणी

पुत्र, पौत्र नसे माझे । सून व्याही विहीण ती ।। 22

 

छुप्या अव्यक्त शत्रूंचा । फाडला बुरखा तुम्ही

भ्रमनिरास होवोनी । आले शुद्धीत पूर्ण मी ।।  23

 

येरवी ना दिसे नेत्रा । जग ते दाविले तुम्ही

ज्यांच्यावरी विसंबे मी । झाले घातकरी किती ।। 24

 

दिव्य अंजन तुम्ही हो । साक्षात परमेश्वरा

दिव्यदृष्टीच देवोनी । दाविले जग हे मला ।। 25

 

झोंबे अंजन डोळ्यांसी । मिटवी पापण्यासही

पाणी घळघळा नेत्री । हाय हाय वदे मुखी ।। 26

 

जाता काळ परी थोडा । वेदना शमवी पुरी

डोळे उघडिता दृष्टी । होतसे तीक्ष्ण स्पष्टही ।। 27

 

 

होते वाटत दृष्टीसी । चित्र अस्पष्ट धूसरी

सुस्पष्ट होतसे तेची ।  शंका ना उरवी मनी ।। 28

 

देवा तैसा असे तूची ।  नीलांजन जणू महा

आरंभी त्रास तू वाटे । दृष्टी देसी परी महा ।। 29

 

पुरलेला दिसे ठेवा । अंजनाने कुणा जसा

परमानंद ठेवा हा । माझ्या हाती दिला तसा ।। 30

 

कृपेने तुझिया कैची  । जगाची रीत दाविली

मान्य केली मनानेही । झाले निश्चिंत शांत मी ।। 31

 

कुंभाराने जसा द्यावा । घटासी हात आतुनी

वरतूनची थापीने । आकारा घट आणुनी ।। 32

 

नीलांजना तसे तूची । आकारा मज आणिले

आधार देऊनी चित्ता । उपकार करी भले ।। 33

 

देवा माझ्यासवे तूची । नित्य शाश्वत राहसी

संकटी धरुनी हाता । सांभाळून मला धरी ।। 34

 

जसा स्वप्नामधे कोणी । बरळे सत्य मानुनी

कळेना परि ते त्याला । स्वप्न मिथ्या छळे अती ।। 35

 

परी उठविता त्यासी । स्वप्न संपेच तत्क्षणी

म्हणे केले बरे तुम्ही । जागे केलेच सत्वरी ।। 36

 

भ्रम वेड फिटे तैसे । झाले होते पिशापरी

मानून सत्य हे सारे । मिथ्या मी जवळी करी ।। 37

 

मी मी मलाच माझेची । स्वप्नी मी बरळे अशी

हालवून जरा केले । जागे देवा मला तुम्ही ।। 38

 

 

संपता स्वप्न सारेची । नाती मिथ्या सभोवती

गेलीच संपूनी ती जी । होती वाटत आपुली ।। 39

 

कृपा होता जसा पंगू । पर्वता-शिखरी चढे

बोलू लागे मुका कोणी । वेद मंत्र खड्या सुरे ।। 40

 

तशी दिली करी माझ्या । लेखणी अति अद्भुता

शारदाम्बा लिहू लागे । अचंबित करी मला ।। 41

 

अज्ञ मी गृहिणी साधी । झाली होतेच हिंपुटी

कृपा केली तुम्ही देवा । स्तोत्र सार दिले करी ।। 42   

 

घेतला लिहुनी साचा । स्तोत्र-भावार्थ साजिरा

दीन अत्यंत ऐशा ह्या । मजला देऊनी वरा ।। 43

 

तोडिले भवबंधासी । लाविले चरणी तुझ्या

आता ना वळुनी मागे । पाहे अरुंधती जगा ।। 44

 

ज्याला ज्याला म्हणे तूची । आपुला हे शनैश्चरा

म्हणे ना आपुला कोणा । सोडे ना चरणा तुझ्या ।। 45

 

मागणे एक पायी हो । मागते मी शनैश्चरा

कर माझा न सोडावा । धरिला जोचि एकदा ।। 46

 

असे अंधचि मी देवा । दृष्टी माझी तुम्हीच गा

असे पंगू कशी चालू । आधारासचि हात द्या ।। 47

 

हृदी माझ्या असो मूर्ती । नित्य एक मनोहरी

तुझी नीलांजना ऐसी । नित्य आनंददायिनी ।। 48

 

निळ्या निळ्या प्रकाशाने । तेवते नित अंबरी

शांत शांत तुझी मूर्ती । राहो माझ्याच अंतरी ।। 49

 

पाहता रोज आकाशी । तुजला रविनंदना

उभारी येतसे चित्ता । संकटांशी लढावया ।। 50

शांतवृत्ती समाधानी । होते माझीच तत्क्षणी

अत्यानंदे म्हणू लागे । अरुंधती तुझी स्तुती ।। 51

 

प्रसन्नात्मा शनीदेवा । आनंद दिधला तुम्ही

आनंदाचा महा ठेवा । दाविला मजला तुम्ही ।। 52

 

गुरू माझा असे तूची । पिता माताच सर्वही

मित्र, पुत्रचि तू देवा । मालकीची तुझ्या कुडी ।। 53

 

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः

मन्दचारः प्रसन्नात्मा पीडां दहतु मे शनिः ।। 54

 

कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तको यमः

सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ।। 55

----------------------------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment