।। श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम् ।।

।। श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम् ।।

( वृत्तमंदाक्रान्ता, अक्षरे- 17, गण - म भ न त त ग ग, यति 4, 6, 7 )

दत्तात्रेयं परसुखमयं वेदगेयं ह्यमेयं

योगिध्येयं हृतनिजभयं स्वीकृतानेककायम् ।।

दुष्टाऽगम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवन्द्यं

वन्दे नित्यं विहितविनयं चाव्ययं भावगम्यम् ।। 1

( अमेयअपरिमेय, असीम)

सौख्याचे ही सुख गमतसे वेद गाती स्तुती ही

ठायी ठायी भरुनचि उरे ब्रह्मरूपेच जेची

भक्तांचे जो भय हरितसे देऊनी धैर्य त्यांसी

होई ह्याचा विजय जगती; वंद्य देवादिकांसी ।। 1.1

 

घेई रूपे अगणित; धरी देह कित्येक  कैसे

दुष्टांना हा जरि नच मिळे भक्तिभावेचि लाभे

नाही मृत्यू जननचि जया नित्य तैसाच राहे

दत्तात्रेया नमन तुज; तू ध्येय योगीजनांचे ।। 1.2

 

 

(वृत्तशार्दूलविक्रीडित, अक्षरे – 19, गण- म स ज स त त ग, यति – 12, 7)

दत्तात्रेय नमोऽस्तु ते भगवते पापक्षयं कुर्वते ।

दारिद्र्यं हरते भयं शमयते कारुण्यमातन्वते ।।

भक्तानुद्धरते शिवं च ददते सत्कीर्तिमातन्वते।

भूतान्द्रावयते वरं प्रददते श्रेयः पते सद्गते ।। 2

पापांचे करुनीच पर्वत दुरी; दारिद्र्य दैन्या हरी

थारा ना उरवी भयास हृदयी; भक्ता दयाळू करी

नेई तारुन जो भवाब्धितुनि या; दे मुक्ति भक्तांप्रति

भक्तांचे करुनी भले सकलची; सत्कीर्ति देतो तयी ।। 2.1

 

सारे भूत पिश्शाच हे गण महा निर्दालुनी शांतवी

देऊनी वर इष्ट, योग्य प्रिय ते भक्तांस जो तोषवी

श्रेयांचेच असेचि श्रेय सकला; देईच सत्संगती

दत्तात्रेयचि  थोर मी नमितसे जो देतसे सद्गती ।।2.2

 

(अनुष्टुभ् छंद )

एकं सौभाग्यजनकं  तारकं लोकनायकं ।

विशोकं त्रातभजकं नमस्ये कामपूरकं ।। 3

सौभाग्य देतसे भक्ता। एकमेवचि देव जो

संसारसागरी जोची । नौकेसमचि तारितो ।। 3.1

दुःख शोक हरे जोची । तारी भक्तास संकटी

कामना पुरवी सार्‍या । देई  श्रेय नि प्रेयही ।। 3.2

एकछत्री असे सत्ता । लोकांच्या हृदयावरी

लोकनायक दत्तासी । नमितो आदरे अति ।। 3.3

 

नित्यं स्मरामि ते पादे हतखेदे सुखप्रदे ।

प्रदेहि मे शुद्धभावं भावं यो वारयेद् द्रुतम् ।। 4

तुझीच पावले देवा । दत्तात्रेया सुखप्रदा

दुःख खेद निवारी जी । स्मरेन हृदि सर्वदा ।। 4.1

भिक्षा विशुद्ध भक्तीची । द्या दत्तराज माऊली

कामक्रोधचि जाओ ते । नको त्यांचीच सावली ।। 4.2

 

( वृत्त उपजाती / इन्द्रमाला , अक्षरे- 11, गणज त ज ग ग )

समस्तसंपत्प्रदमार्तबन्धुं । समस्तकल्याणदमस्तबन्धुम् ।  

कारुण्यसिन्धुं प्रणमामि दत्तं । यः शोधयत्याशु मलीनचित्तम् ।।5

भक्तांस ऐश्वर्यचि  सर्व देई । दुःखी जनांचे करि दुःख दूरी

संपूर्ण कल्याण करी जनांचे । वैराग्यमूर्ती परिवार त्यागे ।। 5.1

असे दयेचाच असीम सिंधू । मनोमला धूतचि दीनबंधू ।

असो नमस्कारचि दत्तराया । अनन्यभावे  स्मरतो तुम्हाला ।। 5. 2

 

समस्तभूतांतर बाह्यवर्ती । यश्चत्रिपुत्रो यतिचक्रवर्ती

सुकीर्तिसंव्याप्तदिगंतरालः । स पातु मां निर्जितभक्तकालः ।। 6

ह्या प्राणिमात्रांसचि व्यापुनीही । बाहेर राही तनुच्या मधेही ।

सर्वत्र राही भरुनी दिशाते । अत्यंत ही उज्ज्वल कीर्ति ज्याची ।। 6.1

असे यतिंचा यतिराज जोची । कैवल्य राज्यातचि चक्रवर्ती ।

भक्तास रक्षी कळिकाळ जिंकी । ह्या अत्रिपुत्रा नमितो सदा मी  ।। 6.2

 

व्याध्याधिदारिद्र्यभयार्तिहर्ता स्वगुप्तयेऽनेकशरीरधर्ता ।

स्वदासभर्ता बहुधा विहर्ता कर्ताप्यकर्ता स्ववशोऽरिहर्ता ।।7

स चानसूयातनयोऽभवाद्यो विष्णुः स्वयं भाविकरक्षणाय ।

गुणा यदीया न हि बुद्धिमद्भिर्गण्यंत आकल्पमपीह धात्रा ।। 8

असो मनस्ताप शरीरव्याधी । दारिद्र्य दैन्यादि अतीव भीती

पीडा असो दुःसह सेवकासी । दत्तात्रया धाव निवारण्यासी ।। 7.1

नानाचि रूपे धरितोच स्वामी । रक्षावया संकटि सेवकासी

कर्ता जगाचा, स्थिति, नाशकारी । परी उदासीन न गर्व काही ।। 7.2

कर्ता असोनीच असे अकर्ता । हा मुक्तआत्मा करि भक्त सेवा

भक्ता करी संकटमुक्त तोची  । हा विष्णुरूपी अवतार मोही ।।7.3

होऊन अत्रीअनसूय पुत्र । जन्मास येई बहु बुद्धिमंत

करावया रक्षण सेवकांचे । हा दत्तरूपी अवतार जन्मे ।। 8.1

करो स्तुती इंद्र नि ब्रह्मदेव । युगे युगे काळ सरून जाय

तरी न संपे गुण-मालिका ही । प्रभो तुझी ही गुण-खाण मोठी ।। 8.2

 

न यत्कटाक्षामृतवृष्टितोऽत्र । तिष्ठन्ति तापाः सकलाः परत्र ।

यः सद्गतिं सम्प्रददाति भूमा । स मेऽन्तरे तिष्ठतु दिव्यधामा ।।9

सुधामयी दिव्य कटाक्ष वर्षा । तापत्रयासी करि नष्ट सार्‍या

देई सुखे जोचि अपार सारी । देई गती उत्तम श्रेष्ठ अंती

जो सेवका श्रेय नि प्रेय देई । तो पुण्यधामा गुरुराज श्रेष्ठी ।

श्रीदत्त तो ब्रह्मस्वरूप राहो । व्यापून माझ्या नित अंतरंगी ।।

 

स त्वं प्रसीदात्रिसुतार्तिहारिन् । दिगम्बर स्वीयमनोविहारिन्

दुष्टा लिपिर्या लिखितात्र धात्रा । कार्या त्वया साऽति शुभा विधात्रा ।। 10

दिगंबरा क्लेशहराचि तुम्ही  विहार मोदे करि भक्तचित्ती

ब्रह्मा लिही घोरचि प्राक्तनासी । माझ्या कपाळी अतिदुःखदायी ।। 10.1

कल्याणकारी करणे तयासी । दत्तात्रया अत्रिसुताच तुम्ही

जमेल ना हे इतरा कुणासी । प्रसन्न व्हावे मज सेवकासी ।। 10.2

 

सर्वमङ्गलसञ्युक्त सर्वैश्वर्यसमन्वित ।

प्रसन्ने त्वयि सर्वेशे  किं केषां दुर्लभं कुह ।। 11

नाना ऐश्वर्य पावित्र्य । सर्व कल्याण मंगल

हेच रूप असे ज्याचे । तो दत्तात्रेय ज्यावर ।। 11.1

प्रसन्न होतसे ज्यासी । सर्वांचा एक ईश्वर

चिंता त्यास कशाची ती । आहे त्या काय दुर्लभ ।। 11.2

 

 हार्दांधतिमिरं हन्तुं शुद्धज्ञानप्रकाशक ।

त्वदंघ्रिनखमाणिक्यद्यतिरेवालमीश नः ।। 12

अंधार भरला दाट । अज्ञानानाचाच जो हदी

ज्ञानरूपी प्रकाशाने । श्रीदत्ता नाशिता तुम्ही ।।12.1

माणिकासम आरक्त । पावलांच्या नखातुनी

द्युति फाके तयानेही । फिटे अंधार दाटही ।। 12.2

 

स्वकृपार्द्रकटाक्षेण वीक्षसे चेत्सकृद्धि मां ।

भविष्यामि कृतार्थोऽत्र पात्रं चापि स्थितेस्तव ।। 13

ओथंबला दयेने जो । प्रभो ऐसा कटाक्ष तो

क्षणएक मला लाभो । धन्यता देतसेचि जो ।। 13.1

कटाक्षानेचि त्या एका । काया पावन ही घडो

वास्तव्या आपुल्या होवो । देह हा योग्य हे प्रभो ।। 13.2

 

क्व च  मन्दो वराकोऽहं क्व भवान्भगवान्प्रभुः ।

अथापि भवदावेश भाग्यवानस्मि ते दृशा ।। 14

गुणमूर्ती कुठे तुम्ही । कुठे अज्ञ अडाणि मी

कृपापूर्ण कटाक्षाने । होतसे भाग्यवान मी ।। 14.1

वणवा जाळितो राना । तैसा कटाक्ष हा करी

उच्छेद सर्व पापांचा । दत्तराज क्षणातची ।। 14.2

 

विहितानि मया नाना पातकानि च यद्यपि ।

अथापि ते प्रसादेन पवित्रोऽहं न संशयः ।। 15

देवा जरी करंटा मी । माझ्याऐसा न पातकी

परी कृपाप्रसादाने  । झालो पावन मी झणी ।। 15

 

स्वलीलया त्वं हि जनान्पुनासि

तन्मे स्वलीलाश्रवणं प्रयच्छ ।

तस्याः श्रुतेः सान्द्रविलोचनोऽहं

पुनामि चत्मानमतीव देव ।। 16

भक्ता करी पावन दिव्य लीला

दिगंबरा ती मज ऐकवाना

येवोत हे नेत्र भरून माझे

वाहोत अश्रू अति प्रेमभावे ।। 16.1

त्याने धुवोनी मम चित्त सारे

करीन ते पावन शुद्ध सारे ।। 16.2

 

पुरतस्ते स्फुटं वच्मि  । दोषराशिरहं किल

दोषा ममामिताः पांसुवृष्टिबिंदुसमा विभो ।। 17

पांसु धूलीकण

सत्य सांगतसे देवा । आपुल्यापुढतीच मी

दोषराशी असे मीची । दोषा ना माझिया मिती ।। 17.1

धूलीकण कमी येथे । वर्षेचे थेंबही कमी

पडतील कमी माझ्या । प्रभो दोषांहुनी किती ।। 17.2

 

पापीयसामहं मुख्यः त्वं तु कारूणिकाग्रणीः।

दयनीयो नहि क्वापि मदन्य इति भाति मे ।। 18

पाप्यांमधेच सार्‍या ह्या । महापापी असेच मी

दयाळुंच्या मधे देवा । श्रेष्ठ ना आपणाहुनी ।।18.1

माझ्याहून दयेसी ना । दुजा पात्र असे कुणी

दिगंबरा दयाळा हे  । कृपा माझ्यावरी करी ।।18.2

 

ईदृशं मां विलोक्यापि कृपालो ते मनो यदि

न द्रवेत्तर्हि किं वाच्यमदृष्टं मे तवाग्रतः ।। 19

पाहूनीही मला ऐसे । पाझरे ना दया तुझी

दुर्दैवाची कथा माझी । मग सांगू तुला कशी ।। 19

 

त्वमेव सृष्टवान्सर्वान्दत्तात्रेय दयानिधे ।

वयं दीनतराः पुत्रास्तवाकल्पाः स्वरक्षणे ।। 20

दत्तात्रेया तुम्ही सारी । लीलेने सृष्टि  निर्मिली

अवलंबून हे देवा । अर्भके ही तुझ्यावरी ।। 20.1

सामर्थ्य ना असे काही । आमुच्या जवळी प्रभो

रक्षिणे सर्वथा आम्हा । आहे उचित हे विभो ।। 20.2

 

जयतु जयतु दत्तो देवसङ्घाभिपूज्यो

जयतु जयतु भद्रो भद्रदो भावुकेज्यः ।।

जयतु जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो

जयतु जयतु सत्यः सत्यसन्धोऽनवद्यः ।। 21

( सत्यसंधप्रतिज्ञेचे पालन करणारा, सत्यनिष्ठ, ईमानदार, निष्कपट)

जय जय जय दत्ता सर्व देवांस वंद्या

जय जय जय दत्ता पूजिती भक्त तुम्हा

नित हित करिता हो सेवकांचेच तुम्ही

सुखदचि अविनाशी नित्य कल्याणमूर्ती ।। 21.1

कळत विमल ज्ञानातून ही दत्तमूर्ती

अखिल निगम हेची ज्ञान देती तुझेची

अमल चरित दावी आपुली सत्यनिष्ठा

जय जय गुरुदत्ता वंदितो पावली या ।। 21.2

 

यद्यहं तव पुत्रः स्यां पिता माता त्वमेव मे ।

दयास्तन्यामृतेनाशु मातस्वमभिषिञ्च माम् ।। 22

दत्तात्रेया जरी मी हो । असेन पुत्र आपुला

तरी माता पिता तुम्ही । माझे; मी तव एकला

सुधामय कृपास्तन्ये । भुकेल्या मज तोषवा

कृपावर्षाव स्नानाने । करी पावन सत्वरा ।। 22

 

ईशाभिन्ननिमित्तोपादानत्वात्स्रष्टुरस्य ते ।

जगद्योने सुतो नाहं दत्त मां परिपाह्यतः ।। 23

जाळे बांधावया कोळी । काढी धागा तनूतुनी ।

उपादान असे तोची । जाळ्याचे त्या तसे तुम्ही ।। 23.1

जगत् योनी असे तुम्हा । वदती सर्व जाणते

प्रभो त्याचीच न्यायाने । पुत्र मी आपुला असे ।। 23.2

म्हणून सांगतो तुम्हा । दत्तात्रेया तुम्हा असे

करावे रक्षणा माझ्या । हेचि कर्तव्य आपुले ।। 23.3

 

तव वत्सस्य मे वाक्यं सूक्तं वासूक्तमप्यहो

क्षन्तव्यं मेऽपराधश्च त्वत्तोऽन्या न गतिर्हि मे ।। 24

जरी मी बोललो देवा । बरे वाईट काहिही

पुत्राच्या अपराधासी । पोटी घाली पिता तरी ।। 24.1

आपल्यावीण ना दत्ता। दुजे कोणी मला असे

आसरा एक तू माझा । गती माझीच तू असे ।। 24.2

 

अनन्यगतिकस्यास्य बालस्य मम ते पितः ।

न सर्वथोचितोपेक्षा दोषाणां गणनापि च ।। 25

आईवीण न जाणेचि जसे अर्भक या जगी

अन्य ना जाणि मी तैसे । जाणितो माऊली ।। 25.1

 आता मोजी न दोषांसी । उपेक्षा मम ना करी

दुर्लक्षिणे शिशूसी ह्या । शोभे ना तुज माऊली ।। 25.2

 

अज्ञानित्वादकल्पत्वाद्दोषा मम पदे पदे ।

भवन्ति किं करोमीश करुणावरुणालय ।। 26

पदोपदी चुका होती । अज्ञ मी असमर्थ मी

देवा काय करू मीची । दयासिंधूच हो तुम्ही ।। 26

 

अथापि मेऽपराधैश्चेदायास्यन्तर्विषादताम् ।

पदाहतार्भकेणापि माता रुष्यति किं भुवि ।। 27

अपराधांनीच माझ्या का  । त्रासता गुरुमाऊली

अर्भकाच्याच लाथांनी । काय त्रासेचि माऊली ।। 27

 

रंकमंकंगतं दीनं ताडयन्तं पदेन च ।

माता त्यजति किं बालं प्रत्युताश्वासयत्यहो ।। 28

लाचार दीन बाळासी । मांडीवरून का कोणी

लाथा मारे म्हणोनी का । टाकिते माय माऊली ।। 28.1

म्हणे उलट ती त्यासी । छकुल्या  ना असे रडी

करी आश्वस्त बाळासी । हृदयाशी धरून ती ।। 28.2

 

तादृशं मामकल्पं चेन्नाश्वासयति भो प्रभो

अहहा बत दीनस्य त्वां विना मम का गतिः ।। 29

निराधार मला ह्याची । तुम्हावीण नसे कुणी

शिशूच सारखा त्या मी । असहाय्य असे अती ।।29.1

केले आश्वस्त ना तुम्ही । दुजा पर्याय ना मसी

दिगंबरा नका लोटू । मला दूरीच हो तुम्ही ।। 29.2

 

शिशुर्नायं शठः स्वार्थीत्यपि नायातु तेंऽतरम् ।

लोके हि क्षुधिता बालाः स्मरन्ति निजमातरम् ।। 30

स्वार्थी लबाड ऐसे का । वदे बाळास माऊली

लागता भूक बाळासी । आठवे एक माय ती ।। 30.1

जाणती जन हे सारे । जाणिता हे प्रभो तुम्ही।

म्हणून दोष माझे हे । घाला पोटात माऊली ।। 30.2

 

जीवनं भिन्नयोः पित्रोर्लोक एकतराच्छिशोः ।

त्वं तूभयं दत्त मम मास्तु निर्दयता मयि ।। 31

जगी माता पिता दोघे । भिन्न व्यक्तीच त्या जरी

जरी विभक्त राहाती । अनाथ शिशु ना कधी ।। 31.1

संगोपन करे कोणी । वात्सल्ये शिशुचे अती

दत्तराज तुम्ही माझी । माऊली अन तातही ।। 31.2

सांभाळ करणे माझा । असे दायित्व आपुले

वागू नकाच माझ्याशी । दत्ता निष्ठूर हो असे ।। 31.3

 

स्तवनेन न शक्तोऽस्मि त्वां प्रसिदयितुं प्रभो।

ब्रह्माद्याश्चकितास्तत्रमन्दोऽहं शक्नुयां कथम् ।। 32

सामर्थ्य इतुके कैसे । स्तुती मी आपुली करू

वक्तृत्त्वपटु ब्रह्मादि । जिथे चकित/विस्मित सद्गुरू ।।32.1

गुणसागर तुम्ही हो । असे मंदमतीच मी

बोबडे बोल बाळाचे । तरी मातेस तोषवी ।।32.2

 

दत्त त्वद्बालवाक्यानि । सूक्तासूक्तानि यानि च ।

तानि स्वीकुरु सर्वज्ञ । दयालो भक्तभावनः ।। 33

दत्तराज तुम्ही माझी । माऊलीच कृपाळू ही

जाणता सर्वही देवा । माया भक्तांवरी करी ।। 33.1

अयोग्य योग्य बोलांसी । माझ्याहो दत्तमाऊली।

घ्यावे गोडचि मानूनी । शिशु मी अज्ञ जाणुनी ।। 33.2

 

ये त्वां शरणमापन्नाः कृतार्था अभवन्हि ते ।

एतद्विचार्य मनसा दत्त त्वा शरणं गतः ।।34

आले शरण जे जे हो । पाऊली दत्तमाऊली

धन्य झाले म्हणोनी मी । आलो शरण पाऊली ।। 34

 

त्वन्निष्ठास्त्वत्परा भक्तास्तव ते सुखभागिनः ।

इति शास्त्रानुरोधेन दत्त त्वां शरणं गतः ।। 35

दृढ विश्वास श्रद्धा ही । वाहती आपुल्या पदी ।

अशा तत्पर भक्तांसी । सुखे सर्वचि लाभती ।। 35.1

 आग्रहे वदती शास्त्रे । त्याला अनुसरून मी

 आलो अनन्यभावे हो ।  दत्ता शरण मी पदी ।। 35.2  

 

स्वभक्ताननुगृह्णाति भगवान्भक्तवत्सलः ।

इति संचित्य संचित्य कथंचिद्धारयाम्यसून् ।। 36

भक्तांवरी कृपा राहे । आपुली भक्तवत्सला

श्रद्धेया, भगवंता हे ! विश्वासाने अशा भल्या, ।।36.1

आहे तगून मी देवा । कष्टाने दीन बापुडा

सर्व भिस्त असे माझी । आपणावर हो सदा ।। 36.2

 

त्वद्भक्तस्त्वदधीनोऽहमस्मि तुभ्यं समर्पितम् ।

तनुं मनो धनं चापि कृपां कुरु ममोपरि ।। 37

देवा अनन्यभावेची । आलो शरण मी तुला

असे निर्भर दत्ता हो । आपुल्यावर मी सदा ।। 37.1

वाहिले आपुल्या पायी । चित्त, चैतन्य वित्त हे

करी कृपा प्रभो आता । तुजला विनवी असे ।। 37.2

 

त्वयि भक्तिं नैव जाने, न जानेऽर्चनपद्धतिम् ।

कृतं न दानधर्मादि प्रसादं करु केवलम् ।। 38

नसे व्याख्या मला ठावी भक्तीची पद्धती कशी

 न केले दान धर्मादि । दत्ता प्रसन्न व्हा तरी ।। 38

 

ब्रह्मचर्यादि नाचीर्णं नाधीता विधितः श्रुतिः ।

गार्हस्थ्यं विधिना दत्त न कृतं तत्प्रसीद मे ।। 39

ब्रह्मचर्य न पाळी मी । वेदाध्ययन ना करी

गृहस्थाश्रम हेटाळी । दत्ता प्रसन्न व्हा तरी ।। 39

 

न साधुसंगमो मेऽस्ति न कृतं वृद्धसेवनं ।

न शास्त्रशासनं दत्त केवलं त्व दया कुरु ।। 40

संत संग न ठावा तो । वृद्ध सन्मान ना करी

 अवज्ञा नित शास्त्रांची । तरी दत्ता दया करी ।। 40

 

ज्ञातेऽपि धर्मे नहि मे प्रवृत्ति-

र्ज्ञातेऽप्यधर्मे न ततो निवृत्तिः ।

श्रीदत्तनाथेन हृदिस्थितेन

त्वया नियुक्तोऽस्मि तथा करोमि ।। 41

जाणूनही धर्म न ओढ त्याची

जाणी अधर्मा परि सोडि ना मी

दिगंबरा राहुन चित्ति माझ्या

 कामास ज्या योजियले करे मी ।। 41

 

कृतिः सेवा गतिर्यात्रा स्मृतिश्चिंता स्तुतिर्वचः ।

भवंतु दत्त मे नित्यं त्वदीया एव सर्वथा ।। 42

एक एक कृती माझी । असो सेवाच आपुली

चालणे सर्वही माझे । तीर्थयात्रा असो भली

आठवीनच जे जे मी । ते ते स्मरण रे तुझे

जे जे बोलीन वाचेने । स्तुति ती आपुली असे

इतुकेच मला द्यावे । वरदान दिगंबरा

प्रार्थना आपुल्या पायी । उद्धरा मज ईश्वरा ।। 42

 

प्रतिज्ञा ते न भक्ता मे नश्यंतीति सुनिश्चितम् ।

श्रीदत्त चित्त आनीय जीवनं धारयाम्यहं ।। 43

प्रतिज्ञा आपुली ठावे । भक्त तारीन निश्चये

पुन्हा पुन्हा स्मरोनी ती । प्रभु ना प्राण सोडिले ।।43

 

दत्तोऽहं ते मयेतीश आत्मदानेन योऽभवत् ।

अनसूयात्रिपुत्रः स श्रीदत्तः शरणं मम ।। 44

अनसूया सती आणि ऋषी अत्रींस जो वदे

दिले दानचि माझे मी । पाहुनी सत्त्व आपुले ।। 44.1

पुत्ररूपेच आलो मी । आपुल्या जवळी ऋषे

असे माझाच तो त्राता । त्यासी शरण मी असे ।। 44.2

 

कार्तवीर्यार्जुनायादाद्योगर्द्धिमुभयीं प्रभुः ।

अव्याहतगतिं चासौ श्रीदत्तः शरणं मम ।। 45

अणिमा गरिमा आदि । दिले साम्राज्य सिद्धिही

कार्तवीर्याजुना ज्याने। दिधली मोक्षसिद्धीही ।। 45.1

 अव्याहत गती देई । ब्रह्माण्डी सर्व त्यासही

 दत्त त्राताचि तो माझा । आलो शरण त्या पदी ।। 45.2

 

आन्वीक्षिकीमलर्काय विकल्पत्यागपूर्वकम् ।

योऽदादाचार्यवर्यः स श्रीदत्तः शरणं मम ।। 46

विद्या अन्वीक्षिकी देई । संदेह निरसूनीची

मदालसा सुतासी त्या । अलर्कासीच सर्वही ।। 46.1

दत्तराज असे तोची । तोची आचार्यश्रेष्ठची

असे माझाच त्राता तो । आलो शरण त्या पदी ।। 46.2

 

चतुर्विंशतिगुर्वाप्तं हेयोपादेयलक्षणं ।

ज्ञानं यो यदवेऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ।। 47

गुरू चोवीस मानूनी । मिळवी ज्ञानसंग्रहा

करावे काय टाकावे । ग्राह्य- त्याज्यचि बोध हा ।। 47.1 

हेचि ज्ञान दिले ज्याने । यदुराजास चांगले

दत्तात्रेयचि त्राता तो । त्याची मी  धरि पावले ।। 47.2

 

मदालसागर्भरत्नालर्काय प्राहिणोच्च यः ।

योगपूर्वात्मविज्ञानं श्रीदत्तः शरणं मम ।। 48

(प्रहीणत्याग केलेला, विरक्त )

मदालसेचिया पोटी गर्भरूप अलर्क जो

शिरोमणीच योग्यांचा । वैराग्यानेच पूर्ण जो ।। 48.1

आत्मज्ञानचि जे गुह्य  । देई त्यासचि उत्तम

त्राता तो दत्तराजाची  । असो त्यासीच वंदन ।। 48.2

 

आयुराजाय सत्पुत्रं सेवाधर्मपराय यः ।

प्रददौ सद्गतिं चैष श्रीदत्तः शरणं मम ।। 49

आयुराजा करी सेवा । होऊनी अति तत्पर

सद्गती देऊनी त्यासी । तोषवी हा गुरूवर ।। 49.1

देई नहुष नामेची । गुणी पुत्रचि सत्वर

त्राता त्या दत्तरायासी । आलो शरण सत्वर ।।49.2

 

लोकोपकृतये विष्णुदत्तविप्राय योऽर्पयत् ।

विद्यास्तच्छ्राद्धभुग्यः स श्रीदत्तः शरणं मम ।। 50

विष्णुदत्तचि नामे त्या । ब्राह्मणा गृहि कर्मठ

आमावास्येस श्राद्धाचे । घेतसे जोचि भोजन ।। 50.1

प्रसन्न होऊनी देई । मंत्रशास्त्रचि सुदृढ

नाना विद्या तया देई । सार्‍या लोकहितास्तव ।। 50.2

त्राता तो दत्त माझाची । गातो त्याचेच मी स्तव

आलो शरण पायी मी । दत्तराजास केवळ ।।50.3

 

भर्त्रा सहानुगमनविधिं यः प्राह सर्ववित् ।

राममात्रे रेणुकायै श्रीदत्तः शरणं मम ।। 51

जमदग्नी-ऋषीपत्नी । जाता पतीसवे सती

रेणुकेसचि  त्या सांगे  । जो सगमनाविधी ।। 51.1

आचार्य होऊनी तोची । करे सर्व सतीविधी

त्राता तो दत्त माझाची । आलो शरण त्या पदी ।। 51.2

(ह नंतर थांबा येतोय. थोडांसा लांबवला पाहिजे)

समूलमाह्निकं कर्म सोमकीर्तिनृपाय यः ।

मोक्षोपयोगि सकलं श्रीदत्तः शरणं मम ।। 52

सोमकीर्ती नृपासी जो । सांगे संध्यादि आह्निक

तत्त्वज्ञानचि मोक्षाचे । तो दत्त मम रक्षक ।। 52

 

नामधारकभक्ताय निर्विण्णाय व्यदर्शयत् ।

तुष्टः स्तुत्या स्वरूपं स श्रीदत्तः शरणं मम ।। 53

दत्तदर्शन ना होई  । म्हणुनी खिन्न जो मनी

नामधारीच त्या भक्ता । दर्शनानेच तोषवी ।। 53.1

जोची सरस्वतीगंगाधरासी स्तुतिने जरा

प्रसन्न होई प्रत्यक्ष । त्राता तो मम एकला  ।। 53.2

 

यः कलब्रह्मसंवादमिषेणाऽह युगस्थितिः ।

गुरूसेवां च सिद्धाऽऽस्याच्छ्रीदत्तः शरणं मम ।। 54

शिष्यश्रेष्ठ तपस्वी जो । असे सिद्धमुनीच जो

बोले त्यांच्या मुखातूनी । चारी युगस्थितीच जो ।।54.1

कृत त्रेता नि द्वापार । कली यांचे स्वरूप हे

कळी आणि विधात्याचा । संवादाच्याच जो मिषे ।। 54.2

तसेचि गुरुसेवेची । करे विषद थोरवी

सांगुनी वेदधर्माचे । सांदीपनी चरित्रही ।। 54.3

तोची दत्तगुरू माझा । असे त्राताचि एकला

आलो शरण त्याला मी । वंदितो त्याचिया पदा ।। 54.4

 

दुर्वासः शापमाश्रुत्य योंबरीषार्थमव्ययः ।

नानावतारधारी श्रीदत्तः शरणं मम ।। 55

भक्ताला घालितो पाठी । सोसुनि त्याचिया कळा

झेली दुर्वास शापांसी । भक्ता ना लागु दे झळा ।। 55.1

मत्स्य कूर्म असे घेई । नाना ते अवतारची

भक्त अंबरिषा राखी । शाप भोगीच श्रीपती ।। 55.2

दत्तात्रेय असे तोची । त्राता माझाचि सर्वदा

आलो शरण त्याला मी । वंदितो त्याचिया पदा ।। 55.3

 

अनसूयासतीदुग्धास्वादायैव त्रिरूपतः ।

अवातरदजो योऽपि श्रीदत्तः शरणं मम ।। 56

अनसूया सतीची ती । वृत्ति सात्त्विक पाहुनी

स्तन्य प्राशावया येती । ब्रह्मा विष्णू महेशची ।। 56.1

अजन्मा असुनी जेची । अवतीर्णचि हो भुवी

बाळरूपात तिघेही । माझे रक्षक ते जगी ।। 56.2

 

पीठापुरे यः सुमतिब्राह्मणीभक्तितोऽभवत् ।

श्रीपादस्तत्सुतस्त्राता श्रीदत्तः शरणं मम ।। 57

ब्राह्मणी सुमतीनामे । पीठापुरीच जी वसे 

प्रसन्न भक्तिने झाला । दत्तात्रेया तुम्ही जसे ।। 57.1

पुत्र श्रीपाद नामेची । लाभला आपुल्या कृपे

झाला आधार तो सार्‍या । परिवारा नृपासवे  ।। 57.2

तोची दत्तगुरू माझा । असे त्राताचि एकला

आलो शरण त्याला मी । वंदितो त्याचिया पदा ।। 57.3

------------------------

अपूर्ण--


1 comment: