**।। सौन्दर्यलहरी ।।**

 

                                         **।। सौन्दर्यरी ।।** श्लोकार्थ

( 51 - 75 )

श्लोक 51 –

शिवे शृङ्गारार्द्रा तदितरजने कुत्सनपरा

सरोषा गङ्गायां गिरिशचरिते विस्मयवती ।

हराहिभ्यो भीता सरसिरुहसौभाग्यजननी

सखीषु  स्मेरा ते मयि जननि दृष्टिः सकरुणा ।। 51

 ( तदितरजने – तत् इतर जने – बाकी लोकांसाठी. कुत्सनपरा-  तुच्छभाव व्यक्त करणारी. सरोषा रागावलेली, क्रोधित. हराहिभ्यो भीता – सर्पांना घाबरलेली. सरसिरुह – कमळ. स्मेर – स्मित, मंद हास्य )

 तुझ्या दृष्टीमध्ये नवरसचि ओथंबति उमे

प्रसंगा, संगाने अनुपम मुखी भाव बदले

तुझी दृष्टी जेव्हा सतत शिवशंभुवर खिळे

घडे शृंगाराचे अनुपम तदा दर्शन शिवे ।। 51.1

 

परी दृष्टी ती गे इतर सुर सामान्य निरखे

गमे जे विश्वेशाहुन कुणि निराळे तुजसि गे

तुझ्या दृष्टीमध्ये तरळत असे तुच्छपण ते

घडे दृष्टीचा हा फरक तव बीभत्सचि उमे ।। 51.2

 

बघोनी गंगेसी जळत जणु क्रोधे नजर गा

मुखी दाटे तेव्हा बहु भयदची रौद्ररस हा

अगे विश्वेशाची चरितसरिता तू निरखिता

मुखी आश्चर्याचे उमटति कसे भाव तुझिया ।।51.3

 

परी शंभूचे हे सकल बघता वर्तन असे

चिताभस्मा लावी, सततचि स्मशानी बसतसे

महा वैराग्याचे प्रतिक तव स्वामी बघुनिया

मुखी दाटे तेंव्हा जननि रस हा अद्भुत तुझ्या ।। 51.4

 

शिवासी वेढूनी कितिक बसले सर्पचि महा

पदी कंठी कानी कर शिर उरी राहति सदा

करीती फुत्कारा विषधर विखारी बघुनिया

मुखासी भीतीने भयरस करी व्याप्त नयना ।। 51.5

 

कटाक्षामध्ये गे तव सहज दाटे मृदुलता

तयाच्या सौंदर्यापुढति नच सौंदर्य कमळा

तुझी दृष्टी माते कमलविभवा जिंकिच पहा

तुझ्या दृष्टीचा हा विजय सुचवी वीररस हा ।। 51.6

 

सख्यांसंगे माते स्मितवदन आह्लादक दिसे

फुले सौख्याने ते किति निखळ आनंद विलसे

सुखाविष्काराचा सुखमय असा हास्य रस गे

जना मोहे माते सुखद तव हा हास्यरस गे ।। 51.7

 

कृपापूर्णा दृष्टी सुखवि निज भक्तांस तव गे

करे दीनांसी ती नित हृदयि आश्वासित उमे

मुखी ओसंडे तो परम सुखदा शांतरस गे

निजानंदाचे हे स्वरुपचि स्वयंसिद्ध तव गे ।। 51.8

---------------------------------------------

श्लोक 52

गते कर्णाभ्यर्णं गरुत इव पक्ष्माणि दधती

पुरां भेत्तुश्चित्त-प्रशम-रस-विद्रावण-फले ।

इमे नेत्रे गोत्रा-धर-पति-कुलोत्तंस-कलिके

तवाकर्णाकृष्ट-स्मर-शर-विलासं कलयतः ।। 52

(अभ्यर्ण – निकट, समीप, सान्निध्य, सामीप्य. विद्रावण – हाकलवून लावणे. पराभूत करणे. पाघळवणे. कर्णाभ्यर्णं – कानाच्या निकट आलेले. गरुत् – पक्षांची पिसे. पक्ष्म – पापण्या. गोत्रा – पृथ्वी. गोत्राधरपति- हिमालय. कुल – वंश. त्या वंशाचा उत्तंस – दागिना, शिरोभूषण असलेला तुरा त्यातील  कलिका. पुर – त्रिपुरासुर.  

 

हिमाद्रीच्या माथी किरिट झळके रत्नमय हा

तयी पुष्पांचा गे परिमलयुता शोभत तुरा

तुर्‍यामध्ये त्या तू सुमन कलिका सौरभयुता

तयाच्या वंशाची गुणयुत शिरोभूषण सुता ।। 52.1

 

अनंगे खेचूनी शर जणु धनुष्या बसविले

अशी ही माते गे दिसति तव आकर्ण नयने

शरासी लाभाया गति म्हणुन जी लाविति पिसे

दिसे तैसे माते गहन तव हे नेत्रदल गे ।। 52.2

 

शराचे पाते जे लखलख करे तीक्ष्ण बहु जे

तशी जाई माते नजर तव भेदून हृदये

शिवाच्या वैराग्या नजर करते लक्ष्य तव ही

शिवाच्या शांतीचा जननि करिसी भेद सहजी ।। 52.3

 

तुझ्या नेत्रांचे हे शर-धनुष योजून बरवे

अनंगाने केले अचुक शरसंधान जणु हे

उठे उत्पत्तीचा शिवहृदिच संकल्प तयिने

कराया सृष्टीची पुनरपि तुला निर्मिती शिवे ।। 52.4

 

कसे खेळीती हे नयन शरसंधान तव हे

तुझ्या दृष्टीचा हा शर करुनि आकर्ण नयने

अनंगाचा रंगे जणु सकल हा खेळचि गमे

अशा ह्या नेत्रांनी मजसि निरखी माय सदये ।। 52.5

---------------------------------------------

श्लोक 53 –

*विभक्तं-त्रैवर्ण्यं व्यतिकरि-लीलाञ्जनतया

विभाति त्वन्नेत्र-त्रितयमिदमीशान-दयिते

पुनः स्रष्टुं देवान्द्रुहिण-हरि-रुद्रानुपरतान्

रजः सत्त्वं बिभ्रत्तम इति गुणानां त्रयमिव ।। 53*

(व्यतिकर – मिश्रण. ईशान - भगवान सदाशिव. दयिता – प्रिय. द्रुहिण- ब्रह्मा. उपरत – विरक्त, उदासीन येथे अव्यक्त. त्रितय – तीन भाग असलेला.)

*तुझ्या नेत्री काळी, धवल अन आरक्तचि छटा

प्रकर्षाने येती दिसुन तिनही रंग मजला

शलाका ही काळी तवचि नयनी काजळमयी

तिन्ही नेत्रांमध्ये उठुन दिसते सुंदर अती ।। 53.1

 

उमे सत्त्वाचा हा धवल नितची द्योतक असे

रजाचा रक्ताशी; तमगुणचि काळ्यासह जुळे

रवी अग्नी चंद्रस्वरुप तव गे नेत्र तिनही

तयांच्या रंगांच्या उमटति छटा ह्या त्रिनयनी ।। 53.2

 

दिसे सूर्याची ही तिनहि नयनी शुभ्रचि छटा

असे चंद्राजैशा नयनि पुतळ्या श्यामल अशा

(पांडुरंगशास्त्री गोस्वामींच्या सुबोधस्तोत्रसंग्रहानुसार)

मिळे अग्नीचेही नयनि लव आरक्तपण का

तयाने नेत्रांचे खुलत बहु लावण्य सकला ।। 53.3

 

विधी विष्णू रुद्राकडुन करण्या सृष्टिरचना

गुणांची तीन्ही गे जरुर पडते हे जननि गा

म्हणोनी का तीन्ही गुण असति नेत्रात तुझिया

त्रिदेवांची ह्या गे तुजकडुन उत्पत्ति करण्या ।। 53.4

 

हरि ब्रह्मा शंभू तव गुणचि एकेक धरुनी

तिघेही जन्मा ये; करिति, धरिती, नाश करिती

हजारो ज्यासी गे दल असति पद्मातचि अशा

वसे तू मूर्ध्नीच्या शिवसह शिवाची प्रियतमा ।। 53.5*

---------------------------------------------

श्लोक 54 - 

पवित्रीकर्तुं नः पशुपति-पराधीन-हृदये

दयामित्रैर्नेत्रैररुण-धवल-श्याम-रुचिभिः ।

नदः शोणो गङ्गा तपन-तनयेति ध्रुवममुं

त्रयाणां तीर्थानामुपनयसि सम्भेदमनघम् ।।54

( पवित्रीकर्तुं – पवित्र निर्मळ करण्यासाठी.  नः – आम्हाला. सम्भेद संगम. , तीन तीर्थांच्या संगमाला प्रयाग म्हणतात. तपन – सूर्य. तपनतनया – सूर्यपुत्री यमुना. उपनय – निकट आणणे. जवळ आणणे. अघ – पाप. अनघ – पापरहित, निर्मळ )


अगे माते तूची हृदय दिधले हे तव शिवा

तयासंगे होशी समरस सदा तूचि सुभगा

दयाभावाने हे नयन तव ओथंबति शिवे

जिवांना सांभाळी अति सदयतेने जननि गे ।। 54.1

 

तुझ्या ह्या नेत्रांची अति सुखद ही मैत्रिण दया

तिच्या सान्निध्याने कमलनयनां ये मृदुलता

म्हणोनी घाली तू सकल जगती पाखर अशी

तुझ्या ह्या मायेची अतिव करुणेची सुखदशी ।। 54.2

 

तुझ्या नेत्री माते धवल अरुणा नीलचि छटा

सुरम्या भासे गे मजसिच प्रयागासम  अहा

तिन्ही रंगांचा हा त्रिगुण सरिता संगम दिसे

 तुझ्या डोळ्यांमध्ये त्रिविध गुण हे एकवटले ।।54.3

 

असे गंगा शुभ्रा प्रतिक जणु हा सत्व गुणचि

तमोरूपी श्यामा दिसत यमुना नेत्रि तव ही

रजाचे आहे जो प्रतिक नद हा शोण अरुणा

हराया भक्तांचे दुरित धरसी संगम असा ।।54.4

---------------------------------------------

श्लोक 55

*निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगती

तवेत्याहुः सन्तो धरणिधर-राजन्य-तनये ।

त्वदुन्मेषाज्जातं जगदिदमशेषं प्रलयतः

परित्रातुं शङ्के परिहृत-निमेषास्तव दृशः ।। 55 ।।*

*अगे माते तूची नयन मिटता हा! प्रलय ये

पुन्हा नेत्रांसी तू लव उघडिता विश्व प्रकटे ।

लया- उत्पत्तीची परिचित कथा ही कळतसे

महा विद्वानांच्याकडुन सकलांसी जननि गे ।। 55.1

 

घडे सारे कैसे जननि निमिषार्धात सगळे

तुझ्या सामर्थ्याची चुणुक बघता विस्मय गमे ।

परी ब्रह्मांडाच्या प्रति तवचि वात्सल्य किति हे

विसंबेना तूची क्षणभरहि माते सदय गे ।। 55.2

 

जगा संरक्षाया सजग नित ही नेत्रकमले

तुझा हा जिह्वाळा तुज मिटु न दे नेत्रदल हे ।

ममत्त्वा वात्सल्या उभय बघुनी हे गुण तुझे

अगे जाई भारावुन जननि मी, वंदन करे ।। 55.3*

---------------------------------------------

श्लोक 56-

*तवापर्णे कर्णेजप-नयन-पैशून्य-चकिता

निलीयन्ते तोये नियतमनिमेषाः शफरिकाः ।

इयं च श्रीर्बद्ध-च्छद-पुट-कवाटं कुवलयं

जहाति प्रत्यूषे निशि च विघटय्य प्रविशति ।। ५६ ।।*

( अपर्णा - अपगतं ऋणं यया सा अपर्णा. – जिच्याकृपेमुळे ऋण नाहिसे होते ती. पैशून्यम् – चुगली, तक्रार, बदनामी. शफरिका – छोटा चमकदार मासा / ईल नावाचा मासा. अनिमेष – डोळे न मिटता कुवलय – नीलकमल. निलीयन्ते –लपून बसणे. उमलत नाही असे. कवाट – कवाड, दार. जहाति – सोडून जाते. )

सुखावे नेत्रांसी हृदय करि आह्लादित किती

तुझ्या नेत्रांमध्ये कमलगुण हे एकवटती

ऋणातूनी मुक्ती मिळवुनचि देसी म्हणु गे

अपर्णा ऐसे गे म्हणति तुजला भक्तगण हे ।। ५६.१

तुझ्या नेत्रांची गे घसट तव कर्णांसह अशी

पहाता भीतीने कमल अन मासे बिथरती

करी कर्णांसी का नयन चुगली हे मम अशी

विचाराने ऐशा विचलितचि होती उभयही ।। ५६.

 

‘‘सुदीर्घा नेत्रांचा बहु निमुळता सुंदर असा

सरोजे चोरीला किति सुबक आकार मम हा

अहो मत्स्यांनीही तरलपण माझे उचलले’’

असे का कर्णांसी तव नयन हे सांगत असे ।।५६.३

 

तुझ्या क्रोधाचे गे हृदयि भय वाटूनचि उमे

जळी मासोळी ही लपुन, मिटते ना नयन गे

दलांची दारे ही मिटवुनचि इंदीवर बसे

जरी स्पर्शे त्यासी रविकिरण, ना हे तरि हसे।।५६.४*

---------------------------------------------

श्लोक 57

दृशा द्राघीयस्या दर-दलित-नीलोत्पलरुचा

दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे ।

अनेनायं धन्यो भवति न च ते हानिरियता

वने वा हर्म्ये वा सम-करनिपातो हिमकरः ।।५७ ।।

( दृशा – डोळे, कमळ. द्राघीयस् – दीर्घ, खूप लांब. दरदलित – विकसित. उत्पल – कमळ. निलोत्पल – निळे कमळ. दवीयस् – दूर. कुठे दूरवर. स्नप – स्नान करणे, शिंपडणे, डुबकी मारणे. हर्म्यम् – प्रासाद, महाल, विशाल भवन. अयं – येथे हा दीन जन म्हणजेच आम्ही भक्त.  समकरनिपातः  - सारख्याच किरणांचा वर्षाव करतो. हिमकर – ज्याचे किरण अत्यंत शीतल आहेत असा चंद्र.

*निळ्या रंगाच्या ह्या कमल-कलिकांच्या सम तुझ्या

सुदीर्घा नेत्रांनी विकसित जरा अस्फुट अशा

पहा दीनार्तासी क्षणभरचि गे वत्सलपणे

कृपेच्या धारांनी भिजवि सकलांसी जननि गे ।। 57.1

 

कृपादृष्टीने गे जननि तव ह्या मंगलमयी

करावे जन्माचे समुचितचि कल्याण ममही

उणे ना होई गे तिळभरहि ऐश्वर्य तव हे

व्ययाने मायेच्या विभव तव वृद्धिंगत करे ।। 57.2

 

नसे हानी काही क्षिति न तुज येई लवभरी

तुझी माया सर्वांवर समसमा  ही बरसवी

जनी प्रासादी वा बरड अति माळावर वनी

सुधा धारा सर्वांवर बरसवी अंबरमणी ।। 57.3*

 ---------------------------------------------

श्लोक ५८

अरालं ते पालीयुगलमग-राजन्य-तनये

न केषामाधत्ते कुसुम-शर-कोदण्ड-कुतुकम् ।

तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलस-

न्नपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धान-धिषणाम् ।। ५८ ।।

( अरालकमानदार, धनुष्याकार, बाकदार. पालीकानाची पाळी, कान. अग पर्वत. राजन्यश्रेष्ठ म्हणजे पर्वतश्रेष्ठ हिमालयाची तनया/मुलगी /कन्या तिरश्चीन – पार्श्वस्थ, तिरका, अनियमित. अपाङ्ग -डोळ्याचा कोपरा. व्यासङ्ग – संयोग,  एकनिष्ठता, चिकाटीने एखादी क्रिया करत राहणे. अपाङ्गव्यासङ्ग- डोळ्यांच्या कोपर्‍यातून कटाक्ष टाकायची सवय. श्रवणपथम् उल्लङ्घ्य – कानांच्या मार्गाचे उल्लंघन करून.  कुसुमशर -      फुलांचा बाण वापरणारा अर्थातच मदन. कुतुकम – कौतुक, कुतुहल, जिज्ञासा. धिषणाम् – स्तुती गाणार्‍यांचे , भक्तांचे. )

अगे ह्या कानांच्या अतिव कमनीया धनुसमा

तुझ्या ह्या पाळ्या गे बघुनि मनि दाटे कतुहला

कमानी कानांच्या मदन धनु का हे विलसते

असे दाटे मोठे कुतुहल जनांच्या हृदयि गे।। ५८.

 

कटाक्षासी टाकी हळुच तिरक्या तूच सहजी

तुझी चित्ताकर्षी जननि बहु मोहे सवय ही

अशी दीर्घदृष्टी जननि तिरकी सुंदर अती

अगे जाई उल्लंघुन तव श्रुती मार्ग जननी ।। ५८.

 

श्रुती दृष्टीचे हे शर-धनु तुझे रम्य जननी

करे जे भक्तांचे हृदय-शरसंधान जननी

तुझ्या चित्ताकर्षी विमलचि कटाक्षेच जननी

करी भक्तांचे तू अति सहज कल्याण जगती ।। ५८.

---------------------------------------------

श्लोक ५९ -

स्फुरद्गण्डाभोग प्रतिफलित-ताटङ्क-युगलं

चतुश्चक्रं मन्ये तव मुखमिदं मन्मथरथम् ।

यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दु-चरणं

महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते ।।५९

( गंड – गाल; ताटङ्क युगलं – कानातील कुंडलांची जोडी, बाळ्या, प्रतिफलित – प्रतिबिंबित होणे.  मन्मथरथम् – मदनचा रथ. द्रुह्यत् -षडयंत्र करणे, हानी पोचवणे. अवनिरथ – पृथ्वीचा रथ. अर्केन्दु – अर्क – सूर्य, इन्दु – चंद्र. चरणम् – रथाची चाके. महावीर – महापराक्रमी. मारमदन. मन्मथमदन.  प्रमथपति – भगवान शिव. )

तुझ्या कानी दोन्ही डुलती बघ जे कुंडल कसे

सुवृत्ताकारी हे कनकमणि कांतीयुत असे

तयांची तेजस्वी विमल प्रतिमा ही उमटते

सुवृत्ताकारी ह्या तव नितळ गालांवर उमे ।। ५९.१

 

तुझ्या कानीचे दो अनुपम असे कुंडल अहा

तुझ्या गाली त्याच्या सुबक प्रतिबिंबास बघता

अनंगाचा वाटे रथ पवनवेगे उधळला

कशी चारी चाके करिति मन संमोहित पहा ।। ५९.२

 

रथी बैसोनीया अबलख तुझ्या आननमयी

अनंगाची स्वारी सुविजय पताका फडकवी

महा तेजस्वी हा मदन लढण्या सज्जचि गमे

शिवासंगे युद्धा तव मुख तया आश्रय पुरे ।। ५९.३

 

करोनी पृथ्वीचा रथ शिव उभा सज्ज लढण्या

रवी चंद्राची ही अतुट तयि चाके कणखरा

 असे स्वामी मोठा सकलचि गणांचा अधिपती

तुझ्या लावण्याचा मदन परि होतोच विजयी ।। ५९.४

---------------------------------------------

श्लोक ६० –

सरस्वत्याः सूक्तीरमृत-लहरी-कौशल हरीः

पिबन्त्याः शर्वाणि श्रवणचुलुकाभ्यामविरलम् ।

चमत्कार-श्लाघा-चलित-शिरसः कुण्डलगणो

झणत्कारैस्तारैः प्रतिवचनमाचष्ट इव ते ।। ६०

 (कौशल- कुशलता, क्षेम, प्रसन्नता, समृद्धि, चतुराई. सूक्ती – ऋचा किंवा पद्यांचा समूह.  चुलुक – ओंजळ. शर्व – भगवान शंकर. शर्वाणी - शर्वाची पत्नी, पार्वती. चमत्कार – विस्मय, आश्चर्य, काव्यसौंदर्याची अनुभूती. श्लाघा – प्रशंसा, स्तुती. चलित शिरसः – मान डोलावणे झणत्कार – (येथे) कानातील कुंडल हालण्यामुळे त्यांचा होणारा किणकिण आवाज. प्रतिवचन – दिलेली दाद. अविरल – सतत, निरंतर, नित्य, अखंड, चुलुका – ओंजळभर.)

शिवे! शर्वाणी गे ! असशि शिव-अर्धांग-युवती

तुझी वाणी माते मधुमधुर ही अद्भुत अती

सुधासिंधूच्याही उठति लहरी नादमय ज्या

सुधा कल्लोळा ना सर मधुर वाणीसम तुझ्या ।। ६०.

 

करे चैतन्याचा मृत तनुत संचारचि सुधा

मना संतोषाचे अमुप वर दे अमृत सदा

परी माते सूक्तांपुढति तुझिया अमृत फिके

सुधेच्या कौशल्या सहज हरवी शब्द तव गे ।। ६०.

 

अगे ब्रह्माणीही श्रवण करि संभाषण तुझे

करोनी कानांची अतिकुशल ती ओंजळ उमे

कधी आश्चर्याने प्रमुदित मने वा सहजची

वहाव्वा! बोलोनी हलवित असे मान अपुली ।। ६०. ३  

 

सवे मानेच्याही हलति सहजी कुंडल तिचे

करी ते नादासी किणलिकिण माधुर्यमय ते

तुझ्या शब्दांना ती सुरमय पहा सम्मति असे

तुझ्या ह्या बोलांनी मजसि करि गे तृप्तचि शिवे ।। ६०.

---------------------------------------------

श्लोक 61-

असौ नासावंशस्तुहिनगिरिवंश-ध्वजपटि

त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् ।

वहत्यन्तर्मुक्ताः शिशिरकर-निश्वास-गलितं

समृद्ध्या यत्तासां बहिरपि च मुक्तामणिधरः ।।  

(तुहिन - हिम तुहिनगिरीहिमालय. नासावंशनाक. ध्वजपटि – झेंडा. फलतु – फळ प्राप्त करून देवो. शिशिरकर – चंद्र. शिशिरकर-निश्वास-गलितं – डाव्या म्हणजे चंद नाडीतून बाहेर पडणारा निश्वास/ बाहेर पडणारा वायू . मुक्तामणि – मोती.  नेदीयस- निकट, जवळ येऊन)

*गिरींचा राजा जो गिरिवरचि उत्तुंग जगती

 हिमाद्रीची त्या तू अति सरस कन्याच असशी।

ध्वजा तू वंशाची हिमगिरिस तू भूषण असे

 मनासी मोहे गे तव सरल हे नाकचि उमे ।। . १।।

 

तुझ्या नासावंशा सरळ बघुनी, ये मम मनी

अगे शोभे बांबूसम सरळ हे नाक तुजसी

मिळे मोती वंशी जननिच वदंता अशि असे

तुझ्या नासावंशा चपखलचि लागू पडतसे ।। ६१. २।।

(बांबूला कळक अथवा वंश म्हणतात. )

इडा नाडीतूनी जननि तव निःश्वासस्वरुपी

अगे ये बाहेरी जननि जणु मुक्तावलिच ही

असे बाहेरीही सुबक नथ मोत्यांचिच अहा

असे अंतर्बाह्यी मणिमय सजे नाक तव गा ।। ६१. ३।।

 

महत्भाग्याचे हे सरळ तव गे नाकचि उमे

अम्हा ‘सोऽहं’ प्राप्ती घडवुनचि कल्याण करू दे

अगे ब्रह्मज्ञाने सफलचि घडो जन्म अमुचा

तुला आलो माते शरण चरणी वंदन तुला ।। ६१.४ ।। 

---------------------------------------------

 श्लोक 62 –

प्रकृत्या रक्तायास्तव सुदति दन्तच्छद-रुचेः

प्रवक्ष्ये सादृश्यं जनयतु फलं विद्रुमलता ।

न बिम्बं तद्बिम्ब-प्रतिफलन-रागादरुणितं

तुलामध्यारोढुं कथमिव विलज्जेत कलया ।।६२

(सुदती – सुंदर दात असलेली. दन्तच्छद – दातांचं आाच्छादन म्हणजे ओठ. विद्रुमलता – प्रवाळाची/ पोवळ्याची वेल.  )

स्मिताने थोडेसे विलग तव होता अधरची

तुझ्या दातांच्या ह्या अति धवल पंक्ती चमकती

तुझ्या ओठांचे गे रसरशित आरक्तपण हे

तयांची ही कांती अति सहज नैसर्गिक असे ।। ६२.१

 

तयांना साजेशी मजसि उपमा ना सुचतसे

जगी नाही काही तव अधरकांतीसम दुजे

पहाया साम्यासी तव अधरयोग्या नच दिसे

जगी या काहीही तव अधरलालीसम भले ।। ६२.२

 

प्रवाळाची वेली जरि कधिच हो अंकुरित गे

जरी येई त्यासी अति मधुर आरक्त फळ ते

तरी ओठांसंगे क्षणिक तुलना होऊ शकते

परी या वेलीसी नचचि कधि अस्तित्त्व कुठले ।। ६२.३

 

म्हणावे ओठांसी जणु पिकलि ही तोंडलि असे

परी तेही खोटे तव ``अधर-वर्णा’’ जग धरे

जगी लालीमा गे जननि दिसतो, तो तुजमुळे

असा आरक्ताचा अधरमहिमा हा तव असे ।। ६२.४

 

मिळे लालीमा हा तुजकडुन तोंड्ल्यास पुरता

तरी त्याची कैसी तवचि अधरांसीच उपमा

अगे लज्जेने ती शरमुनचि बोलेल लतिका

मिळाला आम्हासी तुजकडुन हा रंग बरवा ।। ६२.५

---------------------------------------------

श्लोक 63 -

 स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां

चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा ।

अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचयः

पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया ।।६३

तुझे चंद्राहूनी स्मित मधुर आह्लादक अती

प्रभा त्याची शुभ्रा झिरपत असे सर्व जगती

चकोरां वेडावी मधुर चव हास्याचिच तुझ्या

सदा प्राशी तेची मधुरस्मित जोत्स्नेसम अहा ।। ६३.१

 

चकोरे प्राशीता अपरिमित जोत्स्नेसम स्मिता

तयांच्या चोचींना मधुर रस देई जडपणा

अती गोडासंगे तिखट कधि वा आंबट रुचे

अती माधुर्याने बदल रसना मागत असे ।। ६३.२

 

 शशी जोत्स्नेची ती म्हणुन कधि कांजी निरस ती

चकोरासी वाटे पिउन बघतो आंबट जरी

म्हणोनी स्वच्छंदे शशिकिरण प्राशी निरस ते

अगे तो रात्रीसी चव-बदल व्हावी लव म्हणे ।।६३.३

 

सुधांशू तेजाच्या अमृतमय त्या स्वादु लहरी

स्मिताच्या तेजाच्या पुढति अति निकृष्ट गमती

जणु का तेजाचे उलगडत जाळे स्मित तुझे

असे हे तेजस्वी मुखकमल कल्याण करु दे ।। ६३.४

---------------------------------------------

श्लोक 6

अविश्रान्तं पत्युर्गुणगण-कथाम्रेडन-जपा

पापुष्पच्छाया तव जननि जिह्वा जति सा ।

यदग्रासीनायाः स्फटिक-दृषदच्छच्छविमयी

सरस्वत्या मूर्तिः परिणमति माणिक्यवपुषा ।। ६४

( आम्रेडन – पुनरुक्ती, पुन्हा पुन्हा रंगवून सांगणे. जपापुष्प – जास्वंदीचे फूल. स्फटिक-दृषदच्छच्छविमयी ( स्फटिक + दृषद् + अच्छ + छविमयी ) स्फटिक -बिलोरी. दृषद् – शिळा. अच्छ – स्वच्छ, निर्मल, पारदर्शी. अच्छः – स्फटिक.  छविमयी. यदग्रासीना - यत् अग्र आसीना -टोकावर बसलेली. परिणमति-रुपांतरीत होणे, बदलणे, परिवर्तन होणे. वपु – देह. माणिक्यवपु – माणिकाचा देह.)

शिवाची ओजस्वी चरित-सरिता ही गुणमयी

मुखातूनी वाहे अविरत तुझ्या माय जननी

करीसी शब्दांची सुखद पुनरावृत्ति सहजी

सुवृत्ती गुंफूनी यमक अनुप्रासे सजवुनी ।। ६४.१

 

कथेच्या सौंदर्या बहु खुलविसी रोचकपणे

तयामध्ये जाती रसिक जन हे रंगुन पुरे

अहो जी तेजस्वी धवल स्फटिकाच्यासम दिसे

अगे जिह्वाग्रे ती अमल मतिदात्री तव वसे ।। ६४.२

 

निरोगी आरक्ता रुचिर रसना ही तव दिसे

पडे जास्वंदीची जणु अरुण छाया तिजवरे

अगे वाग्देवी ही नितळ स्फटिकाच्यासम जरी

से शुभ्रा कांती परि बदलते रंग सहजी ।। ६४.३

 

जिभेच्या संपर्के दिसत जणु माणिक्यमय गा

दिसे ती डाळींबी जणु अरुणवर्णा सुललिता

स्वतःच्या रूपासी बदलुन करे धारण जणू

अगे आरक्ता का बहु चमकती माणिक तनू

तुझ्या जिह्वेचा हा सकल महिमा उज्ज्वल असे

करे भक्तीभावे नमन तुजला मी जननि गे ।। ६४.४

---------------------------------------------

श्लोक 65

रणे जित्वा दैत्यानपहृतशिरस्त्रैः कवचिभि

र्निवृत्तैश्चण्डांश-त्रिपुरहर-निर्माल्य-विमुखैः ।

विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशि-विशद-कर्पूर-शकला

विलीयन्ते मातस्तव वदन-ताम्बूल-कवलाः ।। 


अगे शौर्याची ती करुनिच महा शर्थ समरी

ध्वजा उंचावोनी जगति विजयाची पुनरपी

तुला भेटायाला सुरवर उतावीळ बनुनी

रणातूनी येती तडक तुजपाशीच जननी ।।६५.१

 

सुवर्णा-रत्नांचे मुकुट रिपुचे काढुन रणी

तुला अर्पायासी सुरवर अती उत्सुक मनी

जयाची वार्ता ही प्रथम जननिसी कळविण्या

प्रशंसेचा पाठी सुखदचि फिरावा कर तुझा ।। ६५. २ ---

 

प्रसादाचा व्हावा अनुपमचि तो लाभ तुझिया

अशा ह्या आशेने नमन करण्या माय तुजला

जथे देवांचे हे नच उतरवीता चिलखता

शिरीचे काढूनी मुकुट करती वंदन तुला ।। ६५.३

 

अगे ह्या देवांना  भरविसि स्वहस्तेच जननी

मुखीच्या तांबूला जणु तव प्रसादासम किती

तुझ्या तांबूलाने सकल म्हणती धन्य क्षण हा

तुझ्या ह्या घासाने सकल सुर ते तृप्त मनि गा ।। ६५.४

 

तुझ्या तांबूलाते अतिधवल कर्पूरचि असे

सुगंधी कर्पूरा बघुनि शशिखंडासम गमे ।

असे देवांमध्ये जरि शिव महा श्रेष्ठतम हा

तरी ना कोणी हे प्रथम कधि या वंदिति शिवा ।। ६५. ५

 

शिवाच्या पायी ते प्रथम करती ना नमन गे

शिव स्वीकारोनी उरतचि असे जेचि सगळे

असे निर्माल्याचे प्रतिक तयि घेती न कुणिही

असे चंडेशाचा म्हणति असतो अंशच तयी ।। ६५. ६

 

असे शंभूहूनी तवचि महिमा श्रेष्ठ जननी

महादेवाआधी प्रथम तुजला देव नमती ।। ६५. ७

--------------------------------------------

श्लोक ६६ -

विपञ्च्या गायन्ती विविधमपदानं पशुपते-

स्त्वयारब्धे वक्तुं चलितशिरसा साधुवचने ।

तदीयैर्माधुर्यैरपलपिततन्त्रीकलरवां

निजां वीणां वाणी निचुलयति चोलेन निभृतम् ।। ६६

(विपञ्चिका , विपञ्ची – वीणा. अपदानम् – पवित्र आचरण, सर्वोत्तम कार्य, मान्य जीवनचर्या. तन्त्री – वीणेची तार. निचुलयति – खोळ घालून ठेवणे. झाकून ठेवणे. चोल – खोळ, गवसणी. निभृतम् – चुपचाप, शांतपणे खाली ठेवलेली.  )

सुखे छेडूनिया सुरमधुर वीणा स्तुति करी

अहो वाग्देवी ती गिरिश-गिरिजेची तरलशी

तयांच्या प्रेमाचे रसभरित ते वर्णन करी

कधी हर्षााने ती परिणय प्रसंगास खुलवी ।। ६६.१

 

विषा कैसे प्राशी अविचल मने शंभु शिव तो

वधीला कैसा तो कधि त्रिपुर उन्मत्त बहु तो

तिच्या शब्दा शब्दातुन जणु कथा रम्य सगळी

पुन्हा का साकारे सलग  नयनांच्याच पुढती ।। ६६.२

 

तिच्या काव्यासंगे मधुमधुर झंकारत असे

तिच्या हातीची ती सुरमधुर वीणा सहज गे

स्तुती ऐकोनीया चपखल अती सुंदर अशी

उमा वेळावी ``वा!’’ म्हणुनचि मुदे मान सहजी ।। ६६.३

 

करे ब्रह्माणीचे मधुरवचने कौतुक किती

सुधाही लाजे का मधुर वचने ऐकुन तिची

अहो त्या माधुर्यापुढति मधु-वीणा निरस ती

 म्हणोनी वाग्देवी त्वरित तिज घाले गवसणी ।। ६६.४

--------------------------------------------

श्लोक ६७

कराग्रेण स्पृष्टं तुहिनगिरिणा वत्सलतया

गिरीशेनोदस्तं मुहुरधरपानाकुलतया ।

करग्राह्यं शंभोर्मुखमुकुरवृन्तं गिरिसुते

कथंकारं ब्रूमस्तव चुबुकमौपम्यरहितम् ।। ६७

 ( कराग्रेण – हाताच्या अग्राने म्हणजे बोटांच्या टोकांनी.  तुहिन – हिम. तुहिनगिरी – हिमालय. वत्सलतया – वात्सल्याने, प्रेमाने. गिरीशेनोदस्तं – गिरीशेन उदस्तम्। उदस्तम – वर उचललेली, त्याच्याकडे वळवलेली. मुहुस् – वारंवार. मुकुर – चेहरा पाहण्याचा आरसा. वृन्तम् -  (आरशाची) मूठ चुबुक – हनुवटी; अधरपानाकुलतया – अधरपानासाठी/चुंबन घेण्यासाठी अत्यंत उत्कंठित. औपम्यरहितम् – उपमा रहित;)

हिमाद्रीकन्ये गे मधुर तुझिया बाल्यसमयी

धरोनीया प्रेमे तव हनुवटीसी  हिमगिरी

अहो वात्सल्याने करि तव सदा कौतुक किती

गुणांसी रूपासी बघुन तुझिया हर्षित मनी ।। ६७.१

 

तुझी तारुण्याने मुसमुसत काया बघुन ही

मुखीचे पाहूनी अनुपम असे भाव सहजी

ढळे ना शंभूची नजर सुमुखा सोडुन कशी

तुझ्या लावण्याने जननि शिव हा मोहित मनी ।। ६७.२

 

पहाता लज्जेने सुमुख झुकलेले तव असे

बघोनि आरक्ता अधरचि प्रवाळासम तुझे

किती वेळा शंभू तव अधरपानास्तव उमे

धरूनी प्रेमाने तव हनुवटीसीच उचले ।। ६७.३

 

तुझ्या नेत्रांचे दो विमल बघुनी दर्पण जसे

अगे ऐन्याजैसे नितळ बघुनी आनन तुझे

स्वतःच्या त्या विश्वात्मकचि प्रतिबिंबा जवळुनी

अगे न्याहाळाया शिव तव मुखा दर्पण करी ।। ६७.४

 

तुझे माते वाटे मुखकमल हे दर्पणसमा

असे त्या ऐन्याची तव हनुवटी मूठ ललिता/मृदुला/सरला

तिच्या सौदर्यासी दुजि न कुठली योग्य उपमा

करो ती सर्वांचे जननि हित कल्याणचि सदा ।। ६७.

-------------------------------------------- 

श्लोक 68

भुजाश्लेषान्नित्यं पुरदमयितुः कण्टकवती

तव ग्रीवा धत्ते मुखकमलनालश्रियमियम् ।

स्वतः श्वेता कालागुरु-बहुल-जम्बाल-मलिना

मृणाली-लालित्यं वहति यदधो हारलतिका ।। ६८

(श्लेष – आलिंगन. कमलनाल किंवा कमलिनी  - कमळाचा दांडा ,देठ. पुर – त्रिपुरासुर. पुरदमन – पुर दैत्याचे निर्दालन करणारा. कण्टकवती – रोमांचित/ काटेरी. अगुरु – सुगंधी लाकडाची उटी. जम्बाल – चिखल.   )

डुलावे पद्माने जळि कमलदेठावर सुखे

तसे डोले मानेवर सुबकशा आनन तुझे

अगे मोत्याचे हे धवल सर कंठातिल तुझ्या

असोनी तेजस्वी जननि दिसती काळसर का? ।। ६८.१

 

उटी शोभे कंठी अगुरु तरुची दाट जननी

तयाने मोत्याचे सर दिसति हे काळसरची

उटीच्या कल्काने सर बनति हे श्यामल असे

असोनी तेजस्वी जणु कमलदेठासम दिसे ।। ६८.२

 

पुरारी हा देता तुजसि दृढ आलिंगन सखे

कसा होई रोमांचित जननि हा कंठ तव गे

दिसे ग्रीवा रोमांचित कमलनालेसम कशी

जशी त्या देठाला लव मृदुल शोभे सुबकशी ।। ६८.३

 

तुझी ग्रीवा रम्या, अबलख तिचा डौल विरळा,

सरोजाजैसे हे सुमुख तव मोहे मम मना

तुझी मुक्तामाला धवल परि ती श्यामल गमे

तिघांचि शोभा ही अनुपम दिसे हे जननि गे ।।६८.४

 

करो ती विश्वाचे सतत शुभ कल्याणचि शिवे

तुझ्या भक्तासाठी तव हृदि कृपा नित्य वसु दे ।। ६८.

--------------------------------------------

श्लोक ६९ -

गले रेखास्तिस्रो गति-गमक-गीतैक-निपुणे

विवाह-व्यानद्ध-प्रगुण-गुण-संख्या-प्रतिभुवः ।

विराजन्ते नानाविध-मधुर-रागाकरभुवां

त्रयाणां ग्रामाणां स्थिति-नियम-सीमान इव ते ।। ६९

 

तुझ्या कंठी रेघा खुलुन दिसती तीन-वलया

अगे माते सामुद्रिक नियम शास्त्रानुसरि  ह्या

महा सौभाग्याच्या प्रतिक असती सौख्यमय ह्या

ललाटी कंठी वा स्थित उदरभागी सलग ह्या ।। ६९.१ ।।

 

तयांसी पाहूनी मज गमतसे माय जननी

बहू तंतूयुक्ता सकलगुणसंम्पन्न जणु ही

विवाहाच्या वेळी जणु त्रिपदरी पोत शिव ही

तुझ्या कंठी बांधी बहुगुणयुता मंगलमयी ।। ६९.२।।

 

तुझ्या कंठीच्या ह्या बहु सुबक लेखा त्रिवलया

असे संगीताची नित जननभूमीच सुफला

अगे नादब्रह्मस्वरुप असशी नादमय तू

असे संगीताच्या विविधचि प्रकारी निपुण तू ।। ६९.३।।

 

 

अगे संगीताच्या विविधचि तर्‍हा गायन करी

अगे माते तूची  गति गमक गीता निपुणची

गती संगीताच्या विविधचि प्रकारांस म्हणती

स्वरांच्या कंपासी गमक म्हणती गानसमयी ।। ६९.४ ।।


स्वरांच्या कंपाने विविध उठती भाव तरला

से गीता शुद्धा समधुरचि शास्त्रीयचि कला

सुरग्रामांच्या या सुमधुरचि सीमा सुरमयी

तिन्ही ग्रामांच्या वा नियमन स्थितीचे करिति त्या ।।६९.५ ।।

 

स्वरातूनी साती करुन स्वर ते संकलितची

अहो होती ग्रामे सकल मिळुनी तीन जगती

तयी षड्जग्रामा धरणिवर गाती नरचि हे

दुजा ग्रामा गाती धरणिवर ते मध्यमचि हे ।।९.६।।

 

अहो गांधारग्राम सुरवरचि गाती सुरपुरी

अशा ह्या ग्रामांच्या स्थिति नियम सीमा ठरविती

तुझ्या कंठीच्या ह्या त्रिवलयचि लेखा बहुगुणी

करे नादब्रह्मस्वरुप तव पायी नमन मी ।।६९. ७।।  

--------------------------------------------

 

श्लोक 70 -

मृणालीमृद्वीनां तव भुजलतानां चतसृणां

चतुर्भिः सौन्दर्यं सरसिज-भवः स्तौति वदनैः ।

नखेभ्यः संत्रस्यन्प्रथम-मथनादन्धकरिपो-

श्चतुर्णां शीर्षाणां सममभय-हस्तार्पण-धिया ।।

( मृणालिन् / मृणाली- कमळ. मृद्वी – वेली. चतसृणां – चतुर् मूळ शब्द अर्थ चारी (भुजांचे). चतुर्भिः – चार(तोंडांनी) भुजलता- लतेप्रमाणे सरळ सुंदर बाहू बाहु, हात. सरसिजभव – सरस म्हणजे तलाव तलावात जन्म घेते ते सरसिज म्हणजे कमळ. सरसिजभव – कमळातून जन्माला आलेले भगवान ब्रह्मदेव. प्रथममथनात् – पहिल्याच फटकार्‍यात क्षति पोचवणारा. मारणारा, नाश करणारा. नखेभ्यः संत्रस्यन् – नखानी नखलून टाकणे. अंधकरिपू – भगवान शंकर  )

तुझे चारी बाहू कमललतिकेहून मृदु हे 

तयासी वाखाणे अथक विधि चारीहिच मुखे

भयाने येई गे शरण तुजसी तो जननि का?

दिसेची त्यामागे मजसिच दुजे कारण पहा ।। .

 

कराया कामासी सकलचि दिशांची निगुतिने

कधीकाळी होती विधिस बरवी पाच सुमुखे

महादेवां जैसी सुचवि नित श्रेष्ठत्व जगि ती 

विधीच्या कर्तृत्त्वा सहजचि अधोरेखित करी ।। .

 

परी शेफारूनी करत बसला तोचि तुलना

महादेवांसंगे विसरुनिच कर्तव्य विहिता

अहंकाराचे त्या त्वरित फळ देई पशुपती

महा क्रोधे त्याचे शिर नखलुनी दंडित करी ।। .

 

शिवाने द्यावे हो अभय उरलेल्या विधि-मुखा

तुझ्या बाहुंची का म्हणुन विधि गाई स्तुति सदा

शिवच्या क्रोधाचे भय धरुन चित्ती बहु उमे

अगे ब्रह्मा येई शरण तव पायीच गिरिजे ।। .

--------------------------------------------

श्लोक ७१ –

नखानामुद्योतैर्नव-नलिन-रागं विहसतां

कराणां ते कान्तिं कथय कथयामः कथमुमे ।

कयाचिद्वा साम्यं भजतु कलया हन्त कमलं

यदि क्रीडल्लक्ष्मीचरणतल-लाक्षारसचणम् ।। ७१

( उद्योत – किरण. नलिन- कमळ. कथय – तूच सांग. कयाचित् कलया - कदाचित् एखाद्या अंशाने तरी साम्य साधू शकेल का नाही याची खात्री देता येत नाही. लाक्षारस – पायाला लावायचा लाल आळता.  चण – विख्यात, प्रसिद्ध, कुशल )

कसे वर्णू दोन्ही, करकमल हे सुंदर अति

नखांचा लालीमा, पसरवि प्रभा ही दशदिशी

नभी फाके लाली अरुण उदयाच्याच समयी

सरोजांना घाई उमलतचि जावे दळ अशी ।। ७१.१  

 

अशी आरक्ता ही टवटवित उत्फुल्ल कमळे

फिकी तेजस्वी ह्या कर-कमल-कांती पुढति गे

करे क्रीडा मोदे, विचरि कमला त्याचि कमली

अहो ओला लाक्षारसचि कमलेच्याच चरणी ।।-- ७१.२ ---

 

सरोजा लागूनी करितचि दले लाल अरुणा

अशा पद्मांसंगे लव तव नखांचीच तुलना

करो कल्याणासी जननि कर दो कोमल तुझे

अगे माते माझे चरणकमळी वंदन असे ।। ७१.३

--------------------------------------------

श्लोक ७२ –

समं देवि स्कंदद्विपवदनपीतं स्तनयुगं

तवेदं नः खेदं हरतु सततं प्रस्नुतमुखम् ।

यदालोक्याशङ्काकुलित-हृदयो हास-जनकः

स्वकुम्भौ हेरम्बः परिमृशति हस्तेन झडिति ।। ७२

( स्कंद – कार्तिकस्वामी. द्विपवदन – द्विप म्हणजे हत्ती द्विपवदन – गजानन,गणपती. प्रस्नुतमुखम् – ज्याच्यातून सतत दूध झरत आहे. हेरम्ब – गणपती. नः खेदं हरतु – दुःख हरण करोत. परिमृषति – हात लावून पाहणे. स्वकुम्भौ – स्वतःची दोन्ही गंडस्थळे. )

कसा हा हेरम्बू जननि स्तनपानास करता

दुदू पीता हस्ते स्तन धरुन चाळा करि उगा

अहो कैसे आले पृथुल मम गंडस्थल इथे

विचाराने ऐशा विचलित हो चित्ति बहु गे ।। ७२.१

 

स्वहस्ते पाहे तो स्वशिरचि पुन्हा चाचपुनिया

तयाचा पाहूनी शिशुसुलभ तो विभ्रम असा

अहो वात्सल्याने गिरिश गिरिजा कौतुक करी

सुखावोनी चित्ती हसतिच तया पार्वतिपती ।। ७२.२

 

सवे स्कंदाच्या गे करत स्तनपाना गणपती

तयांच्या वात्सल्ये सतत झरती अमृतमयी--

दुधाच्या धारा ह्या पृथुलचि स्तनातून जननी

करो कल्याणासी तव सुत मला गे समजुनी ।। ७२.३

--------------------------------------------

श्लोक ७३ –

अमू ते वक्षोजावमृत-रस-माणिक्य-कुतुपौ

न सन्देहस्पन्दो नगपतिपताके मनसि नः ।

पिबन्तौ तौ यस्मादविदित-वधू-सङ्ग-रसिकौ

कुमारावद्यापि द्विरदवदन-क्रौञ्चदलनौ ।। ७३

( कुतुप – तेल इत्यादिची कुपी. नगपतिपताका- नग म्हणजे पर्वत. नगपति – हिमालय. नगपतिपताका -हिमालयाची कीर्तिपताका. द्विरदवदन – गजानन. क्रौंचदलन – क्रौंच राक्षसाला ठार मारणारा कार्तिकस्वामी. )

जिथे गंगे जैशा कितिक सरितांचा उगम गे

हिमाद्रीची ऐशा नित विनत पुत्री असशि गे

नसे किंतु माझ्या हृदि तव स्तनांच्या विषयि गे

सुधेने संपृक्ता जणु मधुर निस्यंदिनिच ते ।। ७३.१

 

तुझ्या स्तन्याच्या त्या सुखमय पानात रमुनी

तुझ्या पुत्रांना गे लव रुचि न राहे परिणयी

कुमारांना दोन्ही अजुनहि वधू ना रुचतसे

अजूनीही दोघे यतिसम व्रती राहति सुखे ।। ७३.२

 

तुझ्या पुत्रांसी तू पियुषसम जे स्तन्य दिधसी

मिळे त्यांना तृप्ती पिऊन नित जे अमृतमयी

अगे त्या स्तन्याचे  मजसि करवी पान जननी

सदा वात्सल्याने समजुन मला तुत्र तवची ।। ७३.३

--------------------------------------------

श्लोक ७४ –

वहत्यम्ब स्तम्बेरम-दनुज-कुम्भ-प्रकृतिभिः

मारब्धां मुक्तामणिभिरमलां हारलतिकाम् ।

कुचाभोगो बिम्बाधररुचिभिरन्तः शबलितां

प्रतापव्यामिश्रां पुरदमयितुः कीर्तिमिव ते ।। ७४ ।।

( स्तम्बेरम – हत्ती.  दनुज- दानव. स्तम्बेरमदनुज – गजासुर. हारलतिका – माला.  शबल – नाना रंगी.)

शिवाने मारीला गज-असुर उन्मत्त सहजी

तया गंडस्थानी मिळति किति ते मौक्तिकमणी

तयांसी काढूनी शिव तुजसि दे भेट म्हणुनी

रुळे वक्षी माला धवल अमला मौक्तिकमयी ।। ७४.१

 

असे शुभ्रा माला परि दिसति ते रंग विविधा

तुझ्या ओठांची गे अरुण पडछाया पडुन गा

दिसे ती कर्बूरी दिसति बहु तेजस्विच मणी

छटा दोन्ही त्याच्या धवल दिसते लाल मधुनी ।। ७४.२

 

 

शिवाच्या शौर्याची चमकत छटा लालसर ही

शिवाच्या कीर्तीची धवलचि छटा ही उजळली

शिवाच्या सामर्थ्या धवल सुयशासी मिरविसी

महा सन्मानाने सतत तव कंठात जननी ।। ७४. ३

 

तुझ्या वक्षस्थानी जणु मिळविले स्थान अढळा

शिवाच्या शौर्याने, धवल सुयशाने जननि गा ।। ७४. ४

--------------------------------------------

श्लोक ७५

  तव स्तन्यं मन्ये धरणिधरकन्ये हृदयतः ।

पयःपारावारः परिवहति सारस्वतमिव ।

दयावत्या दत्तं द्रविडशिशुरास्वाद्य तव यत्

कवीनां प्रौढानामजनि कमनीयः कवयिता ।। ७५ ।।

(धरणिधर – पर्वत. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पार्वतीला धरणिधरकन्या म्हटले आहे. पारावार – समद्र. पयःपारावारः म्हणजे मूर्तिमंत क्षीरसागर. ‘पयःपारावारः’ ह्या ऐवजी सुधाधारासारः-अमृताच्या धारांचा प्रवाह. सारस्वत – वाङ्मय. मन्ये – मानतो, समजतो. द्रविडशिशु – हा शंकराचार्यांनी स्वतःसाठी वापरलेला शब्द असून त्याचा अर्थ द्रविड मुलगा. अजनि – झाला.)

शिशू-वात्सल्याने गिरिवरसुते अमृतसमा

फुटे पान्हा वेगे तवचि हृदयातून मधुरा

तुझा पान्हा माते अमृतमय हा सागर महा

सुधा धारांचा वा अविरत असे ओघ सुखदा/यशदा ।। ७५ .१

 

जणू वाहे सारस्वत जननि पान्ह्यातुन तुझ्या

प्रवाही धारा ही विमल मधुरा वाङ्मयसुधा

दयार्द्रा तू ह्या गे द्रविड शिशुसी पान करवी

तुझ्या ह्या स्तन्याचे जननि तव हे अक्षररुपी ।। ७५.२

 

तुझ्या ह्या स्तन्यासी पिउन घडला हा तव शिशु

करे जो काव्यासी अनुपमच आह्लादक बहु

महा विद्वानांच्या अखिल समुदायी सहज तो

करोनी सत्तर्का स्वमत प्रतिपादे सहज तो ।। ७५. ३

 

तुझ्या स्तन्याच्या ये घडुनच प्रभावे सकल हे

कृपा ही कैसी गे शिशुवर तुझ्या तू करितसे ।। ७५. ४

--------------------------------------------

 श्लोक   1 - 25

श्लोक  26 - 50

श्लोक  51 -  75

श्लोक  76 - 100



No comments:

Post a Comment