**।। सौन्दर्यलहरी ।।**

 

      **।। सौन्दर्यरी ।।** विवेचन

प्रास्ताविक -

हे अमर्याद, असीम विश्व जराही चूक न होऊ देता अत्यंत सुरळीतपणे चालवणारी जी अनादि कालापासून काम करणारी आदिशक्ती आहे, जी महान ताकद आहे, त्या महाशक्तीलाच श्रीविद्या वा ललितामहात्रिपुरसुंदरी म्हणतात. ह्या शक्तीचं स्वरूप, वर्णन, गुणगान सौंदर्यलहरी ह्या स्तोत्रात श्री आद्य शंकराचार्यांनी फार सुंदर रीतीने केले आहे.

शक्ती दिसत नाही पण तिचे परिणाम हे दृश्य असतात. त्या परिणामांमधून आपण त्या अदृश्य शक्तीची कल्पना करू शकतो. जसा सूर्यप्रकाश दिसत नाही; पण तो धूलीकणांवर पडून परावर्तित होतो. धुलीकणांमुळे जाणवतो आणि आपण त्याची कल्पना करू शकतो. नाहीतर आकाशाच्या पोकळीत धूलीकण नसल्याने प्रकाश किरण असूनही गच्च अंधारच भरलेला राहतो.

विश्वात अनेक प्रकारच्या शक्ती आहेत ज्या एकमेकात परिवर्तित होऊ शकतात, बदलू शकतात. सर्व विश्वात कुठल्या ना कुठल्या शक्तीच्या रूपात त्या भरून राहिल्या आहेत. ह्या सर्व शक्ती त्या महाशक्तीत अंतर्भूत असतात.  ज्या प्रमाणे ठिणग्या, ज्वाला आणि अग्नीजाळ हे एकच असतात त्याप्रमाणे जगातील विविध प्रकारच्या सर्व शक्ती विश्व चालवणार्‍या त्या महा शक्तीचीच वेगवेगळी रूपं अथवा अंश आहेत ज्यामुळे अनेक कार्ये घडवून आणली जातात.  आपल्या शरीरातील चैतन्य अथवा कुंडलिनी शक्तीही ह्याच महान शक्तीचा अंश आहे. इतकच नाही तर ह्या महान शक्तीत आणि आपल्यामधे असलेल्या ह्या शक्तीत एक मेळ (tuning) आहे.

ह्या विश्वाच्या व्यवस्थेत संपूर्ण ब्रह्मांडापासून लहानशा एका पेशीपर्यंत एक सुसूत्रता दिसून येते. जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या नियमानुसार घडणार्‍या सर्व  घडामोडी एकमेकींना समान वा पूरक असतात. कालचक्र, गतिचक्र, ऋतुचक्र, आपल्या शरीरातील सहा चक्र ह्यांचा मेळ साधलेला असतो. पंचमहाभूतांपासून ते पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या सर्व गोष्टी एकमेकांशी समतोल साधून असतात. कृती आणि त्याचा त्यानुसार होणारा परिणाम ह्यात एक समन्वय साधलेला असतो. विश्वाचा तोल साधायचं काम ही महाशक्ती करत असते.

पदार्थविज्ञानात (फिजिक्स) मधे एक नियम सांगतात, एखादी वस्तू ज्या स्थितीत आहे कायम ती त्याच स्थितीत राहते. ती वस्तू जर एका जागी स्थिर असेल तर ती तशीच तेथेच स्थिर राहते किंवा एखादी वस्तु फिरत असेल तर ती फिरतच राहते. स्थिर वस्तूला चल करण्यासाठी वा चल वस्तुला स्थिर करण्यासाठी ताकदीची, शक्तीची गरज आहे.

आज आपल्या रोजच्या व्यवहारात आपण मिक्सर, मायक्रोवेव्ह, फ्रिज अशी अनेक उपकरणं वापरत असतो. ही उपकरणं आपल्याला रोजचं जीवन सुकर होण्यासाठी खूप मदत करत असतात. घराबाहेर पडायचं असलं तरी, कार, बस, विमान, ट्रेन ही साधनंही आपल्यामागे सशक्तपणे उभी असतात. प---ण! त्यांना मिळणारी विद्युत् उर्जाच बंद पडली तर ही उपकरणं असून नसल्यासारखी असतात.

हा सिद्धांत केवळ निर्जीवांसाठी नाही तर सजीवांसाठीही आहे. शक्तीच नसेल तर हात उचलण्यासारखी सोपी क्रियाही होणार नाही. चैतन्य नसलेलं शरीर निव्वळ कलेवर असतं. शक्ती आणि कर्ता ह्या दोन्ही गोष्टी असल्या तरच दृश्य परिणाम दिसून येतो. जग चालवणारी ही शक्ती सर्व विश्वामधे सर्वत्र  प्रचितीला येत असते.

आपल्याला कुठलं काम करायची इच्छा आहे त्यानुसार ती शक्ती प्रत्येकाला प्राप्त करून घ्यावी लागते. मग ते शारीरिक बल असो, बुद्धीबल असो मानसिक बल असो, सिद्धी प्राप्त करून घेण्याचे आत्मबल असो वा कोठले कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठीचे. ही शक्तीची उपासना त्या त्या क्षेत्रात अत्यंत मेहनत घेऊनच सिद्धीपर्यंत पोचवते. ज्याच्या गाठी काही पुण्य असेल त्यालाच हा विवेक कळतो.

सौन्दर्यलहरी ह्या स्तोत्रात श्रीविद्येच्या उपासनेत श्रीचक्रपूजेला वा श्री यंत्रपूजेला अग्रस्थान आहे.  तंत्रशास्त्राच्या दृष्टीने हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्यातील प्रत्येक श्लोक हा मंत्रस्वरूप आहे. प्रत्येक श्लोकात काही बीजभूत मंत्र अंतर्भूत असतातच. प्रत्येक श्लोकासाठी पृथक् पृथक् असे यंत्र आहे. त्याची पूजा अनुष्ठान पद्धतिही आहे. प्रत्येकाची फळेही वेगवेगळी आहेत. `श्रीयंत्र’ हे ह्या स्तोत्राचे मुख्य यंत्र आहे. आणि `श्रीविद्या’ ह्या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राच्या निरूपणाच्या मिषाने  देह हेच श्रीचक्र असून  त्यातील षट्चक्रांचे अत्यंत उत्तम विवेचन केलेले असून उपासकाची  कुंडलिनी कशी जागृत होते व तो कुंडलिनी शक्तीच्या जागृतीने अन्तर्मुख होऊन शिवशक्तीस्वरूपाशी कसा समरस होतो हेही वर्णिले आहे.

ह्या स्तोत्रासंबंधी अशीही एक आख्यायिका आहे की, एकदा भगवान श्री आद्यशंकराचार्य कैलासावर गेले असता  तेथे पार्वतीसह विराजमान भगवान शंकरांना पाहून त्यांनी भक्तीभावाने त्यांना नमन करून प्रसन्न झालेल्या शिवाकडून सौन्दर्यलहरी हे स्तोत्र मागून घेतले. प्रसन्न झालेल्या शिवाने सौन्दर्यलहरी लिहिलेली पाने शंकरांचार्यांच्या हाती दिली. ती पाने घेऊन येत असता नंदिकेश्वराची दृष्टी त्यांच्यावर गेली. तो त्यांच्या अंगावर धावून गेला.  आणि त्यांच्या हातातील पाने तोंडाने ओरबाडली. उरलेली फाटकी पाने घेऊन आचार्य धावत सुटले ते थेट भूमंडळावर आले. निवांतपणे जेव्हा बसून ते श्लोकांची जुळवाजुळव करू लागले तेव्हा काही श्लोक खंडित झाले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा शंकराची उपासना केली आणि  आणि शिवकृपेने मधेच तुटलेले श्लोक त्यांना परत स्फुरले आणि त्यांनी हे स्तोत्र पूर्ण केले.

काही लोक ह्या स्तोत्राचे दोन भाग मानतात. पहिल्या 41 श्लोकांच्या भागाला आनंदलहरी म्हणतात तर पुढच्या 59 श्लोकांच्या भागाला सौन्दर्यलहरी म्हणतात. पहिला अंश मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्त्विक स्वरूपाचे प्रतिपादन करत आहे तर दुसरा भाग ध्यानाला योग्य अशा तिच्या सगुण स्वरूपाचे प्रतिपादन करत आहे. लोकव्यवहारात ह्या दोन्ही भागांना मिळूनच सौन्दर्यलहरी म्हणतात. अशा प्रकारे तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, योगशास्त्र, तत्त्वज्ञान आणि साहित्याच्या दृष्टीने अप्रतीम काव्य असलेले सौन्दर्यलहरी हे शंभर श्लोकांचे स्तोत्र एक आगळेवेगळे अत्यंत उच्च कोटीचे स्तोत्र आहे. शक्तीच्या उपासनेसाठी इतरही अनेक स्तोत्रे असली तरी हे स्तोत्र अत्यंत विशाल, गहन अशा सरोवरासारखे आहे. ज्यात सर्व स्तुतींचा सामावेश होतोच.

असो! पण सर्व स्तोत्र आपण अत्यंत लक्षपू्र्वक  वाचावे, मनन चिंतन करावे कारण काही श्लोक हे कळण्यास तितके सोपे नाहीत. अध्यात्मिक भाषेचा वापर कमित कमी करून साध्या भाषेत ते सांगायचा मी प्रयत्न करीन.

कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी ह्यांनी दिलेली टिका सप्रमाण मानून मी प्रथम वा नवीन वाचकांना रुचेल पटेल, गहन वाटणार नाही एवढाच अर्थविस्तार देत आहे.  त्यातील तांत्रिक भाग, प्रत्येक श्लोकासाठी असलेली यंत्र वा त्याचा उपासना विधी हा भाग मी येथे दिलेला नाही. श्लोकाखाली दिलेले शब्दार्थ वामन शिवराम आपटे ह्यांच्या शब्दकोशातून ( चौखम्बा प्रकाशन) दिलेले आहेत.

----------------------------

श्लोक 1

शिव स्वतः सर्व गोष्टींमधे कितीही कुशल असला तरी शक्तीच नसेल तर तो इकडची काडी तिकडे करू शकणार नाही. अगदी इवलीशी गोष्टही करू शकणार नाही. साधं स्पंदनही करू शकणार नाही. साध्याशा घडणार्‍या कृतीतही शक्ती आवश्यक असते. शक्तीनेच ब्रह्माण्डही चालत आहे. आणि शक्तिनेच एकपेशीय इवलासा जीवही जीवनक्रमणा करत असतो. हे शक्ती महात्म्य जाणून ब्रह्मा विष्णू महेशही शक्तिस्वरूप त्या त्रिपुरसुंदरीची करुणा भाकत असतात. तिचं गुणगान करत असतात. तिच्याकडून बल, शक्ती मिळावी म्हणून तिची स्तुती स्तोत्रे गात असतात. तीच सर्वांची आराध्यदेवता आहे. अशा ह्या शक्तिस्वरूप देवीला प्रारंभीच माझे नमन असो.

 

* शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं

नचेदेवं देवो खलु कुशलः स्पन्दितुमपि

अतस्त्वामाराध्यां हरि हर विरिञ्चादिभिरपि

प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ।। 1 ।। *

{ अन्वय - देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं नचेत् सः स्पन्दितुं अपि खलु कुशलः न। अतः हरि-हर-विरिञ्चिदिभिः अपि आराध्यां त्वा प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ।।}  


* शिवाला शक्तीची जरि मिळते जोड लवही

तरी येई त्याला बहु विकलता पांगुळवि जी

विना शक्ती विश्वंभर शिव शवाच्या सम उरे

विना शक्ती होती सुरहि सगळे आगतिक गे ।।1.1।।

 

 न शक्तीवाचूनी घडत जगती कार्य कुठले

असो ते मोठे वा अति अतिच वा क्षुद्र कुठले

कराया कृत्ये वा सहज घडण्या स्पन्दन-गती

न शक्तीवाचूनी सुरसमिप पर्याय जगती ।।1.2।।

 

म्हणोनी आराध्या म्हणति तुज ब्रह्मा हर हरी

तुझी प्राप्ती माते कठिण; जरि ना पुण्य पदरी

असे गाठी ज्याच्या अति विमल ते पुण्य विपुला

तया होते बुद्धी, नमन स्तवनासीच तुझिया ।। 1.3 ।।*

--------------------------

श्लोक 2

आई पोळ्या करतांना पाहून छकुलीही मागे लागते, `` आई, मला पण पोळी करायचीए.’’ मग आईही सुपारीएवढा गोळा तिच्या खेळातल्या पोळपाटावर ठेवते. बराचवेळ छकुली छोटिशी चानकी लाटत राहते.

भातुकली माहित नाही आता खेळतात का नाही; पण माझ्या लहानपणी घरातील एखादी चादर बाल्कनीत दोनचार ठिकाणी बांधून केलेल्या आडोशाला घर म्हणत; प्रत्येकाच्या घरातून आलेल्या गुळ, पोहे, दाण्यांवर भातुकली साजरी व्हायची. खूप वेळ झाला की आईचा आवाज येई, ``मुलांनो, चला आवरा रे आता भातुकली.’’ मुलंही बांधलेली चादर सोडून परत भातुकली आवरून खाऊचा चट्टामट्टा करून आपापल्या घरी जात.

 जिच्या विस्ताराची आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी ही जगज्जननी शक्ती आहे. तिच्या इशार्‍यावर सार्‍या ब्रह्मांडाचे व्यवहार सुरळीत चालू आहेत. लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या तार्‍यांना, कृष्ण विवरांना पहाणं तर दूरच पण त्यांची माहिती मिळवणंही असंभव अशा अगणित तार्‍यांना, सूर्यांना, विवरांना, लाखो आकाशगंगाना स्वतःत सामावून त्यांना नियमानी बांधून त्यांचं अस्तित्त्व टिकवणारी ही त्रिपुरसुंदरी आणि तिचा असीम विस्तार पाहून ब्रह्मा विष्णू महेशालाही सृष्टी बनवण्याचा भातुकलीसारखा खेळ खेळावासा वाटू लागला. तिघांनी कामही वाटून घेतली. पण त्याच्यासाठी त्यांना साधन सामुग्रीची आवश्यकता होती. त्यासाठी-

 ब्रह्मदेवाने मातेच्या चरणकमलातील एक पराग उचलून सृष्टी बनवायला घेतली. अविकल म्हणजे निरंतर ही सृष्टी बनविण्याचे, त्रैलोक्य निर्मितीचे त्याचे काम अजूनही चालूच आहे. त्यानी बनवलेल्या खेळातल्या सृष्टीतील खेळातल्या इवल्या इवल्या भूतमांत्रांना रोज अन्न देऊन जगवण्याची जबाबदारी विष्णूवर आली.  त्याने मातेच्या पायाला लागलेला एक कण उचलला. पण तो सहस्रशीर्ष असा विष्णु तो एक कण डोक्यावर उचलून आणता आणताच त्याच्या भाराने डगमगायला लागला. भातुकली आवरून ठेवायचं काम महेश्वराला मिळालं. त्याने मातेच्या पायाची कणभर धूळ उचलून घेऊन त्याच्या कामाला प्रारंभ केला.

 थोडक्यात- महाप्रचंड अशा विश्वामधील, एका सीमित ब्रह्मांडामधील, अनेकोअनेक तार्‍यांमधील, सूर्यासारख्या एका तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहांमधील, एका पृथ्वीचा कारभार विश्वाच्या मानाने नखभर वा कणभर सुद्धा नाही. त्यात त्याच्यावरील प्राणीसृष्टी आणि माणूस हा किती नगण्य आहे ही कल्पनाच केलेली बरी. ह्या असीम विश्वाचा कारभार चालवणार्‍या त्या शक्तीची कणभर ताकद पृथ्वीच्या अस्तित्त्वासाठी वापरली जात असली तरी, ह्या विश्व नावाच्या अमर्याद विस्तार असलेल्या आाणि अत्यंत सुरळीत चालू असलेल्या यंत्राचा आपण लघुतम भाग असल्यानी आपल्या अस्तित्त्वासाठी ह्या शक्तीची जाणीव ठेऊन तिचं यथामति, यथा शक्ती स्वरूप जाणण्याची प्रत्येकाच्याच मनाला लागलेली ओढ असते. 

जिचा थोडासा अंश घेऊन ही सृष्टी उत्पन्न करण्याचा, सांभाळण्याचा आणि ती पुन्हा मिटवून टाकण्याचा ब्रह्मा, विष्णू, महेशाचा अव्याहत उद्योग आजही चालूच आहे त्या शक्तिस्वरूप त्रिपुरसुंदरी मातेला माझे आदरपूर्वक वंदन!


तनीयांसं पांसुं तव चरणपङ्केरूहभवं 

विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम्

वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसां

हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ।। 2 ।।

{अन्वय - हे भगवती! विरिञ्चिः तव चरणपङ्केरूहभवं तनीयांसं पांसुं सचिन्वन् लोकान् अविकलं विरचयति शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति। हरः एनं संक्षुद्य भसितोद्धूलनविधिं भजति }

( तनीयांसं – तनु – अगदी छोटासाा कण, तनीयांसं-त्या कणापेक्षाही छोटा म्हणजे सर्वात लहान कणिका म्हणुया हवतर ; पांसुं- धूलीकण, तनीयांसं पांसुं- धुळीची कणिका ; पङ्केरुह - पंक म्हणजे चिखलातून उत्पन्न झालेले कमळ. चरणपङ्केरुहभवं - चरणकमळ ; विरिञ्चि - ब्रह्मदेव ; अविकल – अक्षत, सतत, निरंतर; शौरी - विष्णू ; कथमपि - कसेबसे, कसेतरी; संक्षुद्य – सम्  क्षुद् – तुडवणे, ठेचणे, विनाश करणे, तांडवाने छिन्नभिन्न नष्ट करणे.  ; भसित - जळून भस्म झालेले.)

* जरी कार्ये मोठी हर हरि विधी पूर्ण करिती

परी सामग्रीची गरज करण्या पूर्ण सगळी

विधी घेई माते चरणकमळातून तुझिया

परागासी एका सकल जग साकार करण्या ।। 2.1

 

पुर्‍या त्रैलोक्याच्या सहज प्रतिपाळास हरिला

पुरे होई माते कण चरणिचा एक तुझिया

कणार्धासी त्या गे शिरि उचलिता तो लटपटे

सहस्राशीर्षांचा  सबळ हरिही तो डगमगे ।। 2.2

 

जगाच्या संहारा चरणरज माते उचलुनी

निजांगी भस्माचा शिव करितसे लेपनविधी

तिघांचा चाले हा जगि अजुनही खेळ बरवा

अहो उत्पत्ती वा स्थिति विलय अव्याहत असा ।।2.3 ।।

 

मिळे ह्या तीघांना तुजकडुन स्फूर्ती सतत ही

असे तू चिच्छक्ती भरुन उरली ह्या त्रिभुवनी

कळावा कैसा तो जननि तव हा व्यापकपणा

कसा जाणावा तो जननि महिमा थोर तव हा ।। 2.4 ।।*

--------------------------

श्लोक 3

माय मी तुझी स्तुती करीन म्हटल्यावर, `` हा अडाणी आहे, अज्ञानी आहे, हा काय माझी स्तुती करणार? माझी महती अपरंपार आहे ह्याच ज्ञान तोकडं आहे. हा दरिद्री तर संसारसागरात रुतला आहे.’’ अशी माझी अवहेलना करु नकोस. मी तुझी महती जाणून आहे माय. मी जरी दुबळा असलो तरी, तू काय करू शकतेस हे मला माहित आहे. तुझ्या पायाच्या एका रजःकणाचं काय सामर्थ्य आहे, हे ब्रह्माविष्णुमहेशाच्या कर्तृत्त्वाला पाहून सहज कोणीही जाणू शकेल. तुझी कृपा असेल तर काय शक्य होणार नाही?

लहान मूल असो वा वृद्ध; भल्या सकाळी प्राचीवर उदयाला येणारा लालबुंद सूर्यबिंबाचा सोहळा पाहून प्रफु्ल्लित होतो. गडद अंधारात फटफटल्याच्या खुणा उमटु लागतात. एक एक क्षण समय पुढे सरकत असताना एक एक प्रकाशक्षण आणि प्रकाश कण वाढत जाण्याच्या प्रक्रियेसोबत दिशांमधला काळेपणा जाऊन त्यांचा गडद निळा रंग हळु हळु चमकदार निळ्याकडे झुकायला लागतो. बघता बघता सगळ्या जगातील अंधार दूर करणारी एक प्रकाशनगरीच पूर्वेला अवतरते.

हे माय, पूर्वेची प्रकाश नगरी सार्‍या सार्‍या अंधाराचा नाश करते त्याप्रमाणे ज्याच्या चित्तात तुझ्या अरुणवर्णी ज्ञानमयी पावलांचा उदय होतो त्याच्या जीवनातील सारा सारा अंधार दूर होतो.

माय तुझे पाय म्हणजे मधाने ओथंबलेल्या  फुलांच्या  ताटव्यासारखे आहेत. ज्ञानाची निस्यंदिनी आहेत. त्यातून सतत झरणार्‍या ज्ञानमयी अमृताने सार्‍या अज्ञान्यांचे अज्ञान दूर होते.

 अगे एक चिंतामणी मिळाला तर  दरिद्री दुःखिताच्या चिंता दूर होतात तू तर चिंतामणीची `गुणनिका’ म्हणजे माळ, समुह, राशी आहेस. मग माझं अज्ञान दूर नाही का करू शकणार?

ज्या विष्णूनी वराहरूप धारण करून संपूर्ण पृथ्वीलाच पाण्याबाहेर काढलं, त्या वराहाचा भरभक्कम सुळा तू होतीस; हे का  मला माहित नाही? जिने पृथ्वीला चिखलपाण्यातून बाहेर काढलं ती मला संसाराच्या चिखलातून बाहेर काढू शकणार नाही का? अगे! तू तर माझी माय आहेस. बाळाकडे आई दुर्लक्ष कसं करेल? तुझी ह्या मतिमंद बालकावर कृपा झाली तर मला काय अशक्य आहे. तुझ्या पायाचा एक धूलीकण म्हणजे प्रकाश नगरी आहे. तो रजःकण म्हणजे ज्ञानाची निस्यंदिनी आहे. तुझ्या चरणकमलाचा एक परागकण म्हणजे चिंतामणीची माला आहे. अथवा समुद्रात बुडणार्‍या पृथ्वीला वर काढणारा वराहाचा सुळा आहे. (मराठी अर्थ करतांना पायाच्या रजःकणाऐवजी मातेची पाऊले असा अर्थ घेतला आहे. )

माय फक्त माझ्यावर कृपा कर. तुझ्या अरुणचरणांचा उदय माझ्या हृदयात होऊ दे माते ---- तुझ्या अरुण चरणांचा उदय माझ्या हृदयात होऊ दे! उदयोऽस्तु माते उदयोऽस्तु!!!


*अविद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी

जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी

दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका, जन्मजलधौ

निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ।। 3 ।।*

(अन्वय – हे मातः तवचरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रा मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति?)

 (स्तबक - पुष्पगुच्छ, फुलांचा तुरा, फुलोरा; गुणनिकाराशी, माळ. झरी -निर्झर, झरा, नदी. स्रुति- वाहणे, टपकणे, अर्क निघणे / धारा, रसप्रवहण, स्राव. मुररिपुवराहस्य दंष्ट्रा – विष्णुरूपी वराहाची दाढ

*सहस्रार्चि प्राचीवर उगविता तो प्रतिदिनी

हजारो तेजस्वी किरण पसरोनीच भवती

घडे जैसी प्राचीवर जणु प्रकाशीत नगरी

तसे माते पद्मासम चरण हे दिव्य तवची ।। 3.1

 

घडे ज्याच्या चित्ती तवचरण सूर्योदय असा

मनोबोधे त्यांचे मनक्षितिज हो उज्ज्वल अहा

तयाने अज्ञांचे सहज विरते अज्ञपण ते

तुझ्या तेजांशाने कुमति-नर चाणाक्षचि घडे ।। 3.2

 

सुगंधी पुष्पांचे फुलतिच फुलोरे तरुवरी

किड्यांना भुंग्यांना मधुर मध तो तृप्तचि करी

तसा मंदांसाठी पद - सुमन - संभार तव गे

जयी चैतन्याचा जणु मधुमयी निर्झर झरे ।। 3.3।

 

दरिद्र्यांचे सार्‍या हरण करण्या दैन्य अवघे

तुझी माते चिंतामणिमयचि माले सम पदे

समुद्री जे सारे जनन मरणाच्याच बुडती

तयांच्या उद्धारा त्वरित नित ये धावुन हरी ।। 3.4 ।।

 

वराहा रूपासी हरि करितसे धारण स्वये

सुळ्याने ज्या एका हरि धरणिसी तोलुन धरे

सुळा विष्णूचा तो असशी जननी तू कणखर

जनांसी काढाया भव - जलधि - पंकातुन वर ।। 3.5 ।।

 

अगे माते ऐसी महति तव गे ज्ञात मजला

म्हणोनी उत्साहे तव स्तुतिस प्रारंभ करिता

``असे हा अज्ञानी नच लव असे पात्र’’ म्हणणे

नसे तर्कासीही कधिच पटणारे जननि गे ।। 3.6

 

कृपाळू माता तू; जननि तव मी बाळचि असे

दया ना येई गे तुजसि मम ऐसे कधि घडे

कृपा अज्ञासीही सदयहृदये तज्ज्ञ करते

अनन्या बाळा ह्या करशिल कशी दूर सदये ।। 3.7।।*

 --------------------------


श्लोक 4

एकदा एक अभिनेता भेटला. साधं बोलतांनाही त्याचे अभिनय केल्याप्रमाणे हातवारे, चेहर्‍यावरचे नाटकी भाव, आपणच कोणी खर्‍या आयुष्यातील हिरो आहोत असा आविर्भाव, वागण्या बोलण्यातील अरेरावी सगळच काचेवर चरा उमटल्याप्रमाणे मनावरही ओरखडा उमटवत होते. हिरोप्रमाणे वागतांना त्याने केलेले कपडे अगदि विसंगत आणि हास्यास्पद दिसत होते.

त्याच्या उलट अनेक फार फार मोठ्या व्यक्तींना भेटल्यावर त्यांचा साधेपणा, आत्मीयता, वेळ पाळण्याची शिस्त, पोटातून ओठावर येणारे शब्द, हसू सारचं वेड लावून गेलं. मॉरिशसला राष्ट्रपती अब्दुल कलाम आलेले असताना तेथील हॉटेलमधील एका सफाई कर्मचार्‍याने भीत भीत त्यांना ``मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.’’ असं सांगितल्यावर त्यांनी अत्यंत साधेपणाने हसून त्याच्या बरोबरच्या सर्वच जणांना मोठ्या आपुलकीने बोलावून घेतलं. त्यांची विचारपूस केली त्यांच्या सगळ्यांबरोबरच फोटो घेतले.

 इतकच काय! तेथील मच्छिमारांनाही `` माझे पूर्वज मच्छिमार होते’’ असं ते मोठ्या कौतुकाने सांगत होते. ``हा समुद्र भारताचे आणि मॉरिशसचे किनारे जोडतो.’’ म्हणतांना आपल्या देशाविषयी, जन्मस्थानाविषयी भावुक झालेले कलाम नंतर महिनाभर वृत्तपत्र आणि लोकांच्या बोलण्याचा, आदराचा विषय होऊन गेले. त्यांचा लहान मुलासारखा उत्साह, प्रखर बुद्धिमत्ता, आणि त्याच्या जोडीने असलेला साधेपणा सर्वांनाच भावून गेला.

श्री आाद्य शंकराचार्यही म्हणत आहेत, माते तू ह्या अखिल विश्वाची शक्ती आहेस. तूच ह्या जगातील देवदेवतांना शक्ती देतेस. त्यांच्या सामर्थ्याच्या त्यांनी कितीही बढाया मारल्या तरी ते सामर्थ्य त्यांना तुझ्यामुळे प्राप्त झालं आहे.

माणसाला पुढच्या क्षणाला काय होईल, कोणतं संकट कोसळेल हे कळत नसल्याने सतत कशाना कशाची भीती वाटत असते. त्याला ``तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’’ असं नुसतं कोणी म्हटलं तरी जीवाला बरं वाटतं. आपल्याला संकटात कोण मदत करेल, अभय देईल ह्या साठी तो कोणा ना कोणाकडे तरी आशेने बघत असतो. अशा वेळेला  हे देव जेव्हा लोकांना अभय देण्यासाठी हातांची श्रेष्ठ अशी अभय मुद्रा करून, मारे हात उंचावून उभे असतात, तेव्हा मला हसू आल्याशिवाय रहात नाही. मला तर तो एखाद्या अभिनत्याने केलेला अभिनयच वाटतो. कारण देवांची शक्तिदायिनी वा प्रेरणा तूच आहेस.

तुला ह्या देवांसारखी अशा उसन्या अभिनयाची गरज नाही. कारण तुझ्यासारखी सामर्थ्यवान तूच आहेस. जगातील सर्व शक्ती तूच आहेस. तुझ्या सारख्या समर्थ दात्यासमोर `घेता किती घेशील दो करांनी’ अशा असमर्थ भक्ताला तू सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मपदच बहाल करतेस. तुझ्या पायावर माझं नमन असो.

*त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः

त्वमेका नैवासि प्रकटितवराऽभीत्यभिनया

भयात्त्रातुं दातुं फलमपि वाञ्छासमधिकं

शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ ।। 4 ।।*

(अन्वय – ``हे मातः जगज्जननि! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवराऽभीत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये! हि भयात् त्रातुं अपि च वाञ्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः । 2 ’’)

*करा उंचावोनी  अभयवर मुद्राचि बघता

गमे देवांचा हा अभिनयचि आकर्षक मला

तुझ्या वाचोनी का सुरसमिप सामर्थ्य असले

विना शक्ती कैसे  अभयवर हे संभव असे ।। 4.1 ।।


असे स्फूर्ती शक्ती सकल बल चैतन्य अवघे

 अगे तू देवांचे; चलनवलना प्रेरित करे

करया विश्वाचे नियमनचि देवांकडुन हे

तुझ्या संकेताचे लवभरचि उत्तेजन पुरे ।। 4.2 ।।


तुला बाकी देवांसम अभिनयाची गरज ना

तोलामोलाचे तुजसमचि जाण्या शरण वा

निवाराया भीती तव चरण हे सक्षम भले

मनीषेहूनीही किति अधिक देती पद तुझे ।। 4.3 ।।*

--------------------------

श्लोक 5

ऐश्वर्य आणि दानत ह्या हातात हात घालून आलेल्या दोन गोष्टी एखाद्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करतात. ऐश्वर्या सोबत येणारा कंजूषपणा जसं कोणाचं भलं करू शकत नाही त्याप्रमाणे, दरिद्री माणसाची दानतही कोणाचं भलं करू शकत नाही. ऐश्वर्य त्याच्यापाशीच टिकतं ज्याच्यापाशी असीम शक्ती आहे. आणि माय तू तर शक्तीस्वरूप आहेस. ह्या विश्वाचं नियंत्रण करणारी सर्वश्रेष्ठ शक्ती आहेस. तुझी आराधना करणार्‍या हरीला/विष्णूला तुझ्या कृपेने इतकं सामर्थ्य प्राप्त झालं की तो मोहिनीचं रूप घेऊन खडखडित  वैराग्याचं प्रतिक असलेल्या महादेवालाही भुलवू शकला.

--- आणि माय क्रोधित झालेल्या महेश्वरानी राख राख करून टाकलेल्या मदनाला--- तुला शरण आलेल्या अनंगाला तुझ्या कृपेनेच तू नुसतं जिवंत केलं नाहीस तर त्याला असामान्य देखणेपणही देऊ केलस. त्याला विश्वजयी बनवलस. अक्षी म्हणजे डोळा. महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडून मदनाला जाळलं तरी पार्वतीच्या वात्सल्यमय नजरेतून, सुंदर नेत्रातून तो पुन्हा जन्माला आला. कामरूपी मदनाला आपल्या नजरेतून जन्माला घालणारी म्हणून तिला कामाक्षी म्हणतात. (लावण्यवतीच्या कटाक्षावर भाळला नाही असा नर दुर्लभच!) मदनाच्या सौंदर्यामुळे रति त्याच्यावर इतकी भाळली की, सारं सारं विसरून एकटक त्याच्याकडेच बघत राहिली. येथे आचार्यांनी योजलेले शब्द मोठे सुंदर आहेत; `रति-नयन-लेह्येन वपुषा’ म्हणजे रती जणु अनिमेष नेत्रांनी त्याला चाटून घेत आहे इतकी सुंदर काया माते तुझ्या कृपेनेच मदनाला प्राप्त झाली. अशा अप्रतिम देखणेपणाच्या जोरावर ह्या मदनाने अनेक अनेक वैराग्यमूर्ती अशा महर्षींनाही मोहात पाडलं. त्यांचं चित्त विचलित केलं. माते तू धन्य आहेस! तुझ्या कृपेने असाध्य तेही साध्य होऊ शकतं; मग माझ्यासारख्या सामान्याला ज्ञान नाही का प्राप्त होऊ शकणार?

सर्व सांगायचा उद्देश हाच आहे की, माय तू केवढ्या अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज करून दाखवतेस मग मला ज्ञान देणं तुला अशक्य थोडच आहे? लहान बाळ एखादी गोष्ट मिळेपर्यंत आईचं लक्ष वेधून घेण्याचा सतत प्रयत्न करतो. ``तू त्याला दिलं मला का नाही?’’ अशी  आईमागे भुणभुण लावतो. वेळ आली तर रडतो, भोकाड पसरतो पण पाहिजे ते मिळवतोच! ह्या जगज्जननीपुढे आपल्यालाही ``तुझ्याविना मला अजून कोणी नाही. तूच एकटी माझ्या मनातील जाणून मला हवं ते देऊ शकतेस’’ असं अनन्य होता आलं तर अपलं मनोरथ का बर पूर्ण होणार नाही?

*हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं

पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् 

स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा

मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्  ।। 5 ।।*

(अन्वय – ‘‘ हे मातः! हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि।’’ )

रति-नयन-लेह्येन वपुषा – नेत्रांनी रति चाटून घेत आहे अशा शरीराने. प्रणत-जन-सौभाग्यजननी- नम्र झालेल्या लोकांना सौभाग्य देणारी जननि. स्मर - मदन )

अगे माते येती शरण चरणी भक्त तुझिया

तयांना देसी तू सुख सुधन सौभाग्य सकला ।

करे विष्णू सेवा चरणकमलांचीच म्हणुनी

प्रसन्ना देसी तू अतुलनिय सामर्थ्य हरिसी ।। 5.1

 

कृपेने शक्तीच्या हरि मिळवि सामर्थ्य इतुके

महेशालाही तो भुलवि अपुल्या मोहिनिरुपे

शिवक्रोधाने जो मदन जळुनी जाय जननी

तुला येता तोची शरणमिळवी दिव्य तनुसी ।। 5.2

 

तयाच्या डौलाने भुललि रति लावण्यखणि गे

अनंगाची काया जणु पिऊन टाकेचि नयने 

तुझ्या आशीषाने मदन बनला विश्वविजयी

मुनींच्या निर्मोही हृदि उपजवी मोह सहजी।। 5.3 ।।*

-------------------------- 



कधी कधी एखादी स्त्री सर्वांगसुंदर असते वा एखादा पुरुषही रुबाबदार असतो. पण !------ कळत नाही कुठे माशी शिंकते; त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव असतील वा अजून काही नकोशी लकब असेल, वा काही नसतांना देखील पहाताक्षणीच मन त्यांच्यावर नापसंतीची फुली मारून टाकते. त्याच्या उलट काही वेडेबागडे लोक पहाताक्षणीच हवेहवेसे वाटतात. नुसतच नाही तर चांगले कित्येक दिवस, तर काही वेळेला जन्मभर मनात ठाण मांडून बसतात. म्हणावं तर लोकांना आकर्षित करावं असं काहीही नसतांना देखील! माणसच का प्राणी पक्षांबद्दल सुद्धा हा अनुभव मला आला आहे. कधी काळी सकाळी आईबाबांच्या घरासमोरून फिरवायला नेतांनाही नाचत गेल्यासारखं मोठ्या नजाकतीने चालणारं कुत्र मला अजून आठवतं. प्राणी आवडणारी माझी वहिनीही त्यावेळी त्या कुत्र्याला पहायला बाल्कनीत येत असे. आमच्या काळ्या सावळ्या मावसभावाची/ बापूची आम्ही मुलं कित्ती वाट पहात असू. त्याच्याबरोबर मनातल्या सर्व गप्पा मारायला मला फार आवडे. काही दिवसांनी हा बापू आजोबा आमच्या मुलांचाही तेवढाच प्रिय झाला. आईचा नातेवाईक असूनही  माझे वडीलही त्याची दर सुट्टीत वाट बघत असत. तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का?

 असो! पण त्याचं उत्तर मला ह्या आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात मिळालं. ही माणसं वा प्राणी जन्मजात हा गुण घेऊनच आलेली असतात. ही जी जग चालवणारी शक्ती आहे ती त्यांच्यावर जगात येतांनाच एक कटाक्ष टाकत असावी. त्या त्रिपुरसुंदरीचाच कटाक्ष तो! तो नुसता एखाद्यावर पडला तर काय होऊ शकतं ते  आचार्यांच्याच मिश्किल भाषेत पाहु या!  

नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं

तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः 

गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्त्रस्त-सिचया

हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ।।13 ।।

तुझ्या लावण्याच्यासम रुचिर दृष्टी तव असे

कटाक्षाने एका जननि तव ते काय   घडे

तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे तो जरठही

दिसे मोठा आकर्षकचि उमदा सुंदर अती ।। 13.1

 

घडे ज्याच्या चित्ती तवचरण सूर्योदय असा

मनोबोधे त्यांचे मनक्षितिज हो उज्ज्वल अहा

तयाने अज्ञांचे सहज विरते अज्ञपण ते

तुझ्या तेजांशाने कुमति-नर चाणाक्षचि घडे ।। 3.2

 

सुटे वेणीवक्षी पदर ढळता भानहि नसे

बहूमोलाचा तो कधि कमरपट्टा पडतसे 

दशा ऐशी होई कितिक युवतींची जर अशी

नको सांगाया त्यावर जनहि आकृष्ट सहजी ।। 13.3 ।।

--------------------------



बाळ आईकडे धावत आल्यावर ``मला उच्चून कदे घे’’ असं त्यानी म्हणायची आई वाट बघत नाही. त्याच्या आऽऽई ह्या हाकेतूनच, त्याच्या मनातील भीती जाणून, ती आधीच त्याला उचलून कडेवर घेते. त्याप्रमाणे ``माऽऽय गेऽऽ’’ अशी आर्त हाक ऐकताच ही जगज्जननी भक्ताने ``माय माझ्यावर कृपा कर. मला ह्या भवसागराची भीती वाटत आहे. ह्या दासावर कृपा कर’’ हे सर्व ऐकेपर्यंत थांबत नाही. त्याच्या मुखातून नुसतं ``भवानि त्वं----’’ असं येताच (येथे भवानी हा ईकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे संबोधन एकवचन असतांना) त्याचा अर्थ भवानि त्वम् म्हणजे `मला तुझ्यासारखं करअसा करून, क्षणात त्याला पोटाशी धरते. त्याला सायुज्यपद देते. सायुज्यपद म्हणजे स्वतःप्रमाणे, स्वतःसारखे करणे. येथे ``भवानि त्वं’’ ह्या शब्दांवर श्लेष आहे. त्याचे दोन अर्थ होतात. 1 हे भवानी तू 2 मला तुझ्यासारखं कर.

 

 भवानी भक्ताला स्वतःप्रमाणे निर्भीड बनवते. स्वतःप्रमाणे सर्व गुणसम्पन्न करते. त्यामुळे त्याच्या मनातील भवसागराची भीती नाहिशी होते. पांडुरंगाष्टकामधे आचार्य म्हणतात, विठ्ठला तू कमरेवर दोन्ही हात ठेऊन भक्तांना सांगत आहेस की मी तुमच्या सोबत असल्यावर हा भवसागर फक्त कमरेएवढा खोल आहे. सौंदर्य लहरी ह्या स्तोत्रात तेच भवानी आपल्या भक्तांना नुसतं सांगत नाही तर सर्व भक्तांना ``स्व-स्वरूप’’ करून टाकत आहे. हा कुठच्या कुच्चर माणसाचा `असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरीहा मार्ग नाही. मी काही करता हाक मारताच मला मिळायला पाहिजे हा सोकावलेला उद्धटपणा नाही. तर खरे आर्त मनातून प्रकट होताच श्रद्धेच्या बळावर अशक्याला शक्य करण्याची ताकद प्राप्त करून घेण्याचा भगिरथ मार्ग आहे. कर्ममार्गाला श्रद्धेच्या बळावर विवेकपथावर ठेऊन ध्येयापर्यंत घेऊन जाणारा हा मार्ग आहे. स्वतःमधे अजोड ताकद निर्माण करणारा मार्ग आहे. ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही कल्याणरूपी भवानी, त्रिपुरसुंदरीच आहे.

ध्येयाला सिद्धीत परिवर्तित करणारी ही शक्ती इतकी ऐश्वर्यसम्पन्न आहे, इतकी विलोभनीय आहे की सारे देवही ह्याच शक्तीरूप जगज्जननीच्या त्रिपुरसुंदरीच्या पायी लीन झाले आहेत. किंबहुना त्यांना प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ इंद्रपद असो वा दैवी गुण असो ह्या शक्तीच्या कृपेनीच प्राप्त झाले आहेत.

इंद्रासह सर्व देवांनी आपली मस्तके तिच्या पायावर झुकवतांना त्यांच्या माथ्यावरील अनमोल आणि कलाकुसर केलेल्या सोन्याच्या मुकुटात जडवलेली अत्यंत मौल्यवान रत्ने चमकत आहेत. नवरत्नातून बाहेर पडणारे सप्तरंगी प्रकाशमय कवडसे जननिच्या पायावर, अंगावर पडून विलोभनीय दृश्य तयार झाले आहे. हे पाहून वाटत आहे की, सोन्याच्या निरांजनात रत्नांच्या वाती लावून जणुकाही हे सर्व देव तुझी मनापासून आरती गात आहेत. इतके करूनही करूनही दीन आर्त अनन्य भक्ताला जे सायुज्य पद मिळते ते देवांनाही मिळत नाही.

 त्या रत्नमाणकांच्या प्रकाशात उजळून निघालेला तुझा चेहरा इतका विलोभनीय, इतका आह्लादक आहे की माझ्या हृदयात तुझी हीच मंगलमय छबी कायमची विराजमान झाली आहे

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-

मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः 

तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं

मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मुकुट-नीराजित-पदाम् ।। 22

 

म्हणाया जाती जे ``तुजसम भवानी मजवरी 

भवाब्धि ताराया समजुनि कृपा कोणचि करी’’

तयांचे ऐकोनी `` तुजसम भवानी मज’’ असे

करे त्यासी तू गे तुजसम भवानी त्वरित गे ।। 22.1

 

तयांना देसी तू त्वरित तव सायुज्य पदे ते

मिळे ना जे कोणा चरणकमला पूजुन  कसे

तुझ्या पायी होती सकल सुरही लीन विनये

विधी विष्णू शंभू सुरवरचि देवेंद्रहि नमे ।। 22.2

 

तयांचे रत्नांचे मुकुट तव पायीच झुकता

सुवर्णा रत्नांची तव पदि प्रभा दिव्य बघता

प्रकाशाचे ऐसे बघुन नवरंगी कवडसे

अती हर्षोल्लासे मम मन विचारतचि डुबे ।। 22.3

 

सुरम्या रत्नांच्या कनकमय नीरांजनिमधे

दिसे रत्नज्योत्स्ना अनुपमचि ज्योतीसम तिथे

जणू ओवाळिती पदकमल हे कोमल तुझे

असे वाटे चित्ता सुर करति हे आरति सुखे ।। 22.4

 

मिळे जे भक्तीने जननि तुजला गे विनविता

नसे सायुज्याचे पद सुलभ तेची सुरवरा

दिवे रत्नांचेही जननि तुज ओवाळुन असे

कृपा ना लाभे ती जर हृदि नसे भाव लव गे ।। 22.5

 

कंबोडियन अंकोर एअरलाइन्स किंवा इंडोनेशियन गरुडा एअरलाइन्स च्या एका जाहिरातीमधे (आता नक्की आठवत नाही.) त्यांच्या देशातील सुखसोयी दाखवून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तेथील सुंदर सुंदर फोटो जसे दाखवले होते; तसा एका तरुणीचा सुंदर केश कलाप दाखवतांना केसांच्या जागी नुसती विविध फुलंच दाखवली होती. तिचा तो पुष्पमय केशकलाप डोळ्यांनी क्लिक करून मनाच्या कप्यात सुरक्षित ठेवत असतांनाच त्यातील कमळांचा सुगंध मला थेट आचार्यांच्या सौंदर्यलहरींच्या तरंगांवर घेऊन आला

जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या ``सौंदर्य लहरी’’ ह्या स्तोत्रावरून नजर टाकतांना डोळे एका (43 व्या) श्लोकावर खिळले. आपण म्हणतो, ``सूतावरून स्वर्गाला जाणं’’ पण केसाची शिडीकरून मुक्तीच्या गावाला नेणारा हा श्लोक काही केल्या मनातून जाईना.

गोफणीसोबत गोल गोल फिरणारा दगड फिरता फिरता वेग घेत कधी सुटून आकाशाचा वेध घेत जातो त्याप्रमाणे सुंदर मखमली केसांमधे गुंतत जाणारं मन कधी सर्व आकर्षण सोडून सहजपणे मुक्तीच्या विशाल आकाशात निसटून जातं तेच कळत नाही. एका गोलाकार वर्तुळात फिरणारा दगड बघता बघता त्या गोलाच्या एकबिंदूस्पर्शरेषेतून (tangent) कधी कसा निसटून जातो हे कळू नये त्याप्रमाणे विषयांपाशी आसक्त मन कधीच सर्व सोडून एका क्षणस्पर्शात वैराग्याच्या, मुक्तीच्या जगात प्रवेश करतांनाचा प्रवास हा ज्याचा त्याने अनुभवावा लागतो.

 श्री आद्य शंकराचार्य जगन्माता त्रिपुरसुंदरीच्या कमनीयतेचं वर्णन करतांना सहज तिच्या घनदाट केसांवर स्थिरावतात. वळणं वळणं घेत जाणारं सुंदर नदीच पात्र निळ्या कमळांनी फुलून गेल्यावर तिच्यातील पाणी, प्रवाह काहीही दिसता नुसती नीलकमले दिसत रहावीत त्याप्रमाणे त्रिपुरसुंदरीच्या मऊ रेशमी केसांच्या लडी म्हणजे नीलकमलांचं इंदिवर श्याम (इंदीवर म्हणजे निळं कमळ ) असं जणु नलिनीबनच! जिथे बघावं तिथे पूर्ण उमललेली, काही अस्फुट तर काही कळ्या अशी नील कमलांची दाटी झालेलीह्या नलिनीबनासोबत त्याचा परिमलही प्रवाहित झालेला! नीलकमलांची सुगंधित नदी संथ वाहत असावी असा हा सुंगधित  घनदाट केश कलाप पाहून आद्य शंकराचार्य म्हणतात,

``माय, माझ्या मनात मात्र अज्ञानाचा घनदाट अंधार भरला आहे. तुझी ही काळीभोर वेणी, --- तुझा हा नील कमलांचा सुगंधी केशकलाप तो मात्र माझ्या मनातील घनतम अंधाराचा नाश करू शकेल. तुझे केस अत्यंत स्निग्ध, मृदु, मुलायम, चमकदार आहेत. माझ्या जरठ झालेल्या मनाला त्याचा जरासा जरी स्निग्धांश लाभला, कोमलपण लाभलं, त्याची चमक लाभली तर नक्कीच माझं मन उजळून जाईल. कोंदाटलेल्या माझ्या मनात तुझ्या केसांचा परिमळ कोपर्‍या कोपर्‍यातून फिरला तर माझ्या मनातील कुबट दुर्विचारांचा वास निघून जाईल.

तुझ्या केसांच्या सुगंधाचं तर काय वर्णन करावं? असा अलौकिक सुगंध आजपर्यंत कोणी अनुभवला नसेल. त्या सुगंधाचा मन मोहवून टाकणारा ताजेपणा पाहिल्यावर कल्पवृक्षाच्या फुलांना सुद्धा स्वतःची लाज वाटली असावी म्हणून की काय इन्द्राच्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या सुंदर सुगंधी फुलांनीही नंदनवन सोडून दिले आहे. तुझ्या केशकलापाचा एक अंशभर जरी सुगंध मिळाला तरी आमचे जीवन धन्य होईल असा विचार करून त्यांनी तुझ्या केशकलापाचा आश्रय घेतला आहे. अशा असंख्य स्वर्गीय फुलांनी, कल्पसुमाच्या घोसांनी, नंदनवनातील कल्पलतेच्या कुसुम-तुर्‍यांनी, फुलांच्या लोंगरांनी, पुष्प गुच्छांनी तुझ्या केसांवर गर्दी केली आहे.

माय! अगं, कल्पतरु माणसाच्या मनातील सार्‍या इच्छा पूर्ण करतो. येथे तर तुझ्या केसांच्या मृदुल लडी कल्पसुमांचंही  इप्सित पूर्ण  करत आहेत. तुझा हा केशकलाप कल्पतरुचाही कल्पतरु आहे; मग माझ्या मनातील आस तो कशी बरं पूर्ण करणार नाही? माझ्या मनातील घनदाट अज्ञान दूर होऊन तेथे ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी, माय! मला हवं असलेलं ज्ञान मिळण्यासाठी तुझ्या केशकलापाच्या ब्रह्मज्ञानरूपी सुगंधाचा अंशही पुरे. माझं मन सुमनही तुझ्या ह्या मोहक केश लडींमधे माळलं जाओ. तेथेच गुंतून राहो.

 

धुनोतु ध्वान्तं नस्तुलित-दलितेन्दीवर –वनं

घन-स्निग्धं श्लक्ष्णं चिकुर-निकुरुम्बं तव शिवे ।

यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो

वसन्त्यास्मिन्मन्ये वल-मथन-वाटी-विटपिनाम् ।। 43

  (श्लश्णमृदु, कोमल, स्निग्ध, सौम्य, चमकदार. चिकुरकेस.  निकुरुम्बकेस, केशकलाप. वलमथनइंद्र. )

लडी ह्या केसांच्या सघनचि मऊ दाट कुरळ्या

बघोनी वाटे गे फुललि कमळे नील बहुला

फिरे दृष्टी मोदे गहन जणु इंदीवर वनी

कळ्या पुष्पे जेथे फुलति किति दाटीतच निळी ।। 43.1

 

जणू गुंफीली का सघन तव वेणी सुबकशी

तुर्‍यांनी गुच्छांनी सकल सुमनांनी मिळुन ही

जलौघाने जाई भरुन सरिता घेत वळणे

तशी ही वेणी गे परिमल फुलांनीच बहरे ।। 43.2


भरे अज्ञानाचा घन तिमिर चित्तीच अमुच्या

तुझ्या हया केसांनी त्वरित विरु दे तो तम महा

तुझ्या ह्या केसांचा परिमल सुगंधी दरवळे

सुगंधाची त्या गे नचचि तुलना हो कधि शिवे ।। 43.3

 

 म्हणोनी इंद्राच्या सुखद बगिचातील कुसुमे

तयांमध्येही ती सुविमलचि कल्पद्रुम-फुले

तुझ्या ह्या केसांचा लव मिळविण्या सौरभ शिवे

फुलांच्या घोसांनी सजवितिच वेणी तव उमे ।। 43.4

 

 माता पार्वतीच्या सौंदर्याचं वर्णन करावं ते आद्य शंकराचार्यांनीचकधी वाटतं, स्त्रीदेहाचं इतकं सुंदर वर्णन एका सन्यासी माणसाला कसं बर जमलं असेल? आणि त्याचं उत्तरही त्यांच्या सन्यासीपणातच मिळालं.

एखादी क्रिकेटची मॅच चालू असतांना, कॉमेंट्री करणारा खेळत नसतो. तो सगळयात वर उंच जिथे त्याला प्रेक्षकांचा, खेळाडूंचा वा इतरांचा त्रास नसेल, पण जिथून सर्व स्वच्छ, नीट दिसत असेल अशा केबिनमधे बसून समोर काय चाललं आहे ते प्रेक्षकांना, श्रोत्यांना उलगडून सांगत असतो. तो खेळत नसला तरी क्रिकेटच्या बारकाव्यांचा तज्ज्ञ असतो. येणार्‍या बॉलवर विकेट जाणार का छक्का पडणार ह्याचा त्याच्या नजरेला अचूक अंदाज असतो.

एक सन्यासीही असाच संसार सागराच्या काठावर, तटावर शांत बसलेला असतो. तटस्थ असतो. शंकराचार्यांच्याच शब्दात  ( जीवनमुक्तानंदलहरी -) सांगायचं झालं तर  -

सुवर्णालंकारे नटुनि, वसने लेवुन नवी

गमे चित्राऐसी नगर नर नारी सुबकशी

बघे त्यांना ज्ञानी जणु विविध आकार भवती

रमे साक्षीभावे परि न पडतो गुंतुन कधी।।1.1

जला स्पर्शूनीही किरण भिजती ना कधि जसे

न ये जाळ्यामध्ये सलिल कधि वा ओढुनि बळे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।। 1.2

असा असतो. म्हणूनच कुठच्याही भावनांमधे लडबडता स्त्री देहाचं चेहर्‍याचं सुंदर वर्णन करु शकतो. काम आणि मोहाचा अंशही नसलेलं हे सौंदर्याचं वर्णन मग स्त्री देहाचं राहता एका अलौकिक देवतेचं, मातेचंच होऊन जातं.

पार्वतीच्या कमनीय भुवयांचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात,

त्या जितेंद्रिय शंकराबरोबर युद्ध करायचं तर मदनाकडे होतच काय? फुलांचं धनुष्य, फुलांचेच बाण, भुंग्यांची सांधली जाणारी त्या धनुष्याची दोरी! ह्या असल्या कुचकामी साधनांनी तो काय साधणारविश्वनाथाशी लढाई काय करणार?

शंकराला जिंकायचच तर मदनानी दुसरी युक्ती योजली. माते! त्याने तुझ्या कमानदार भुवयाचं धनुष्य हाती धरलं. तुझ्या काळ्याभोर नेत्रांची दोरी त्याला बांधली. तुझ्या नजरेचा अचूक बाण त्याला लावला आणि तुझ्या भुवईचं धनुष्य ताणून तुझ्या नजरेचा बाण सोडताच शिवही पराभूत झाले.

सप्तशतीत देवीच्या सुंदर कमानदार भुवयांचं वर्णन आहे. पण ही भुवई नुसती वर उचलली तर काय होईल ह्याची ही एक सुंदर चुणुक आापल्याला पहायला मिलते.

शोभेचि मंदस्मित लोभस हे तुझेची । चंद्रासमा मुख तुझे सुखवी जगासी।

कोपे कसा नच कळे बघुनी तयासी। उन्मत्त दुष्ट महिषासुर दैत्य पापी।।12.1

कैसा प्रहार करण्या धजलाच तोची । पाहूनही वदन र्निमळ हे तुझेची

ही गोष्ट अद्भुत गमे न पटे मनासी । त्याहून अद्भुत परी पुढची कहाणी।।12.2

 

अत्यंत क्रोधवश हे मुख लाल होता। बिंबाकृती शशिसमा उदयाचलीच्या

क्रोधे तुझी चढविता भुवईच तू ही । कैसा न दुष्ट महिषासुर प्राण त्यागी।।13.1

जेंव्हा कृतांत अति क्रोधित ये समोरी। राहील का कधि जिवंतचि जीव कोणी।।13.2

 अशा ह्या पार्वतीच्या नेंत्रांचं वर्णन करतांना आचार्य म्हणतात, माय! तुझ्या नयन धनुच्या मध्यभागी, रेखीव भुवयांच्या मधे ( जिथे केस नसतात ) डाव्या हातानी मदनाने हे धनुष्य मुठीत पकडल्यामुळे ह्या नेत्रधनूचा मध्यभाग म्हणजेच तुझं अंतर्मन लोकाना दिसत नाही. कळत नाही. हे माय तुला संपूर्ण जाणून घेणं हे कोणालाच शक्य नाही. मधे असलेला अनंगाचा कामरूपी हात, लोकांच्या मनातील वासना तुझ्यापर्यंत, तुझ्या अंतर्मनापर्यंत कोणाला पोचू देत नाहीत.

 

भ्रुवौ भुग्ने किञ्चिद्भुवनभयभङ्गव्यसनिनि

त्वदीये नेत्राभ्यां मधुकररुचिभ्यां धृतगुणम् ।

धनुर्मन्ये सव्येतरकरगृहीतं रतिपतेः

प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमुमे ।। 4

( भुग्नबाकदार, कमानदार. प्रकोष्ठ कोपर


धनुष्याकारी ह्या तव असति रेखीव भिवया

कमानी त्यांच्या गे लवभरचि तू वक्र करिता

भयाने दैत्याची भलतिच उडे गाळण कशी

मुठीमध्ये ठेऊ जगत म्हणती जे सकलची ।। 47.1

 

असे ऐसा माते तवचि भुवयांचाच महिमा

खलांना ठेवाया वठणिवर त्या अंकुशसमा

तयांच्या सौंदर्या नचचि उपमा सुंदर दुजी

शिवाला जिंकाया भृकुटि धनु योजी मदन ही ।। 47.2

 

न ये कामी त्याचे कुसुमधनु ते शंभु पुढती

न चाले पुष्पांचा मृदुल शरही शंभुवरती

धनुष्याची दोरी भ्रमरमय ती काम न करी

तुझ्या नेत्रांचा का मदन म्हणुनी आश्रय धरी ।। 47.3

 

अगे काळे काळे नयन भ्रमरांच्यासम तुझे

 करे त्याची दोरी जय मिळविण्या तो मदन गे

धरे डाव्या हाती भृकुटि धनु ताणून सुभगे

दुजी युक्ती नाही जय मिळविण्या शंभुवर गे ।। 47.4

 

धनुष्याच्या मध्या मदन कर आच्छादित करे

मुठीने झाके जो नयनधनुचा भागचि उमे

 तुझ्या मध्यासी त्या बघु न शकती हे जन कधी

कळेना लोकांसी जननी तव अंतर्मन कधी ।। 47.5

 

मनोजाच्या योगे मनि उपजता कामचि असा

दिसावे कैसे ते जननि तव अंतर्मन जना ।। 47.6

 

एकदा औरंगजेबाच्या दरबारात कवी भूषण आपला भाऊ रत्नाकर ह्याच्या बरोबर गेला असता, औरंगजेबानी त्याला काही काव्य प्रस्तुत करण्यास सांगितलं तेव्हा कवी भूषणानी दोन अटी घातल्या आणि त्या मान्यही करायला लावल्या. तो म्हणाला, ``खाविंद माझ्याकडून स्तुती ऐकतांना आपले हात मिशीवर जातील. मिशीवर जाणारे आपले हात पवित्र असावेत. तरी आपण हात धुवून बसावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शिवाजीचा भाट आहे त्यामुळे दुसर्‍या कोणाची स्तुती करत नाही.’’ ``मिशीवर हात नाही गेला तर तुझा खात्मा करीन.’’ असे सांगत औरंगगगगजेब हात धुवून बसला.

भूषणनी कवनाला सुरवात केली. ``हे औरंगजेबा, तुझ्या दरबारातील हे सगळे मांडलिक राजे म्हणजे तुझ्या दरबाराच्या बागेतील मधाने भरलेल्या फुलांचे ताटवे आहेत. आणि तू त्यांच्याकडून कर रूपाने मध गोळा करणारा भृंग आहेस. ``वा वा!’’ असं म्हणतांना औरंगजेबाचा हात मिशीवर गेलाच! पण कवी भूषण हसत म्हणाला, ``थांब हुरळून जाऊ नकोस. माझं पुढचही कवन ऐक. तू भृंगाप्रमाणे मध ( कर रूपाने मोठे मोठे उपहार आणि सोने, जमिनी) मिळवत असतोस. हया फुलांच्या ताटव्यात शिवाजी महाराज केतकी प्रमाणे शोभून दिसतात. त्यांच्याकडून तुला काहीही मिळत नाही. त्यांच्याकडे मध घ्यायला तू गेलास की तुला  कररूपी मध तर मिळत नाहीच पण केवड्याच्या बनात शिरण्याचं तुझं धाडस दरवेळेला तुझ्या अंगलट आल्याशिवाय राहात नाही. कारण तुझं तोंड धूलीधुसर होऊन (केवड्याच्या कणसामध्ये मध नसतोच पण धुळीसारखे असंख्य परागकण भरलेले असतात.) रागाने लाल होऊन, दर वेळेला पराभवाची माती खाऊनच तू परत येतोस. हे सर्व सांगण्याचं कारण पुढे कळेल.

येथे ह्या त्रिपुरसुंदरीच्या नेत्रांबद्दल बोलतांना आचार्य म्हणतात, वाल्मीकि, महर्षी व्यास इत्यादि नामवंत कवींच्या रचना असोत वा भूत वर्तमान, भविष्य जाणणार्‍या त्रिकालज्ञ  विष्णु, शिव यांच्या रचना असोत. हे रसभरित काव्यग्रंथ जणु मधाने ओथंबणार्‍या फुलांच्या ताटव्याप्रमाणे आहेत. हे माय, तू नेहमी तुझ्या कानांनी अत्यंत रसाळ अशा काव्य रचना ऐकत असतेस. तुझे कान त्यातील अवीट गोडीचा सतत आस्वाद घेत असतात. आणि म्हणूनच त्यांना मिळणारा हा असीम आनंद आपल्यालाही अनुभवता यावा म्हणून तुझ्या कानांसंगे केलेली मैत्री तुझे मासोळीसारखे  रेखीव, लांबलचक, कानांकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही  आकर्ण नेत्र कधीही सोडत नाहीत. माय अगे, तुझे आकर्ण नेत्र इतके सुंदर आहेत त्याचं कारणही हेच आहे.

 तुझ्या नेत्रात काळ्याभोर भुंग्यांच्या थव्याप्रमाणे फिरणारे हे चंचल कृष्ण गोल सतत काव्य-सुधा-रस प्राशन केल्याने इतके चमकदार, सुंदर दिसत आहेत की पाहणार्‍याची दृष्टी त्यांच्यावर खिळून त्याची समाधीच लागावी.

पण माय तू तर त्रिनयना आहेस. भूत, भविष्य जाणणारा तिसरा  नेत्र (अलिकनयन) तुझ्या कपाळावर आहे. कपाळावरच्या नेत्राला काव्यरससुधा प्राशनाचं, तुझ्या बाकी दो नेत्रांना  मिळणारे हे सहज सौख्य कधी मिळत नाही. म्हणून का तो सतत रागावलेला, लालबुंद असतो? अग्निज्वाळांनी घातलेल्या तांडवाने भुभुत्कार करत राहतो. (जणु काही शिवाजी कडून फुटका मणि न मिळालेल्या औरंगगगजेबासारखा! )

कवीनां संदर्भ-स्तबक-मकरन्दैक-रसिकं

कटाक्ष-व्याक्षेप-भ्रमर-कलभौ कर्णयुगलम् ।

अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरला-

वसूयासंसर्गादलिक-नयनं किञ्चिदरुणम् ।। 50 

(कविकवी, त्रिकालज्ञ, तत्त्ववेत्ता । स्तबक - फुलांचा गुच्छ, ताटवा, घोस । कलभछावाभ्रमरकलभौ - जणु भ्रमरांचे छोटे दोन छावे. अलिकम् - मस्तक

तुझ्या कानांनी गे श्रवण करिसी काव्य रचना

कवी वाल्मीकी वा अनुपम अशी व्यास प्रतिभा

महा तत्त्वज्ञानी हरिहर त्रिकालज्ञ अवघे

कृतींचा त्यांच्याही श्रवण करिसी काव्य-रस गे ।। 50.1

 

फुलाच्या घोसांच्या सम बघुनिया काव्यरचना

किती त्या संपृक्ता नवरस-मधानेचि भरल्या

रुची सत्काव्याची अनुपम मिळो नित्य म्हणुनी

सुदीर्घा आकर्णा नयन तव कर्णांस मिळती ।। 50.2

 

रसांच्या ओढीने नयन तव घे  धाव तिकडे

करी कानांची हे सतत सलगी दीर्घ नयने

कटाक्षा पाहोनी मजसि गमते हे जननि गे

त्वरेने भृंगांचे चपळ शिशु दोघे पळति हे ।।50.3

 

मिळे दो नेत्रांना नवरसरुपी काव्य मधु जो

तुझ्या भाळीच्या ह्या तृतिय नयना ना मिळत तो

म्हणोनी क्रोधाने मज अरुण वर्णी दिसतसे

मुखासी ऐशा गा तव जननि मी गे स्मरतसे ।। 50.4

 

  कधीकाळी मी शाळेत असतांना बांगडीएवढ्या मोठ्या इअररिंग्जची फॅशन आली होती. अर्थात आमच्यासारख्या शाळकरी 8वी 9वीत शिकणार्‍या मुलींसाठी फॅशन हा शब्द सर्व घरातून कटाक्षाने वर्ज्य असे. आईच्या वयाच्या बायका ``काय गं बाई! आता एवढचं करायच राहिलं होत!’’ अशा सारखे उद्गार काढून आमचा हिरमोड करीत. फारच हट्ट धरला तर ``तुमच्या तुमच्या घरी गेलं की काहीही करा!’’ हे सर्व मुलींची तोंड बंद करणारं, एका ठशाचं उत्तर सर्व घरी सारखच असे.  खरतर त्यांच्या तारुण्यात केसांचे फुगे पाडणे, फुग्याची ब्लाऊज घालणे हे त्याही करत होत्याच.

असो! पण आईचं लक्ष नसतांना मी माझ्या प्लॅस्टिकच्या बांगड्यांना थोडी चिर पडली की कानात अडकवून आरशासमोर उभं राहून मान हलवून बघत असे. कानात हलणार्‍या बांगड्यांनी आपण कोणी स्वर्गसुंदरीच आहोत असा भासबिस होऊन काही क्षण मन स्वर्गसफर करून येत असे.

नंतर अनेकवेळा मी औरंगाबादला अजंठा, वेरूळच्या लेण्यांमधे गेले होते. शंकर पार्वतीच्या लग्नाच्या प्रसंगात पार्वतीने घातलेले नखशिखांत दागिने पाहून दरवेळेला मला आहाहा! असं होत असे. इतरही शिल्प-कन्यांचे अलंकार मनाला सुखवून गेले. तथील शिल्पकन्यांची वस्त्राभूषणे बारकाईने दाखवून अनेक सिनेमा कलाकारांसाठी तसे वस्त्रालंकार कसे बनवले गेले हे तेथील गाईड दरवेळेला आवर्जून सांगत असे

पार्वतीच्या कानातील इअररिंग्ज चक्क तिच्या खांद्याला चिकटतील एवढ्या मोठ्या होत्या. त्या दाखवत आमच्या गाईडने किती सालच्या कुठल्या सिनेमातल्या कुठल्या अभिनेत्रीने अशा भल्यामोठ्या इअररिंग्ज घातल्या होत्या तेही सांगून दरवेळेला माझ्या नवयौवन स्मृतींना जागं केलं. सिनेमात मी कच्ची असल्याने तपशील मला सांगता येणार नाही. सांगायचा मुद्दा- कानात मोठ्या मोठ्या इअररिंग्ज घालायची प्रथा काही आजची नाही तर वेरुळ लेण्यांच्या काळापासून तर आहेच आहे; कदाचित त्याच्याही आधीपासून आहे.

``वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले’’ अशा राधेच्या वर्णनाआगोदर सौंदर्यलहरींमधे श्री आद्य शंकराचार्यांनी पार्वतीचं केलेलं वर्णन मोठं बहारदार आहे.

 पार्वतीच्या कानातील गोल गोल मोठीमोठी सोन्याची कुंडले; त्यावर अनेक हिरे, पाचू आणि मौल्यवान रत्ने जडवली आहेत. त्या कुंडलांचा प्रकाश पार्वतीच्या गोबर्‍या गालांवर पडल्यावर तिच्या गालांच्या नितळ कांतीवर या कुंडलांचं प्रतिबिंब साकार झालं आहे.

विश्वविजयी मदनाने महादेवांना जिंकण्यासाठी आपण असमर्थ आहोत, आपले फुलांचे बाण शिवासाठी कुचकामी आहेत हे पाहिल्यावर लावण्यवती पार्वतीच्या सुंदर मुखाचाच रथ केला. अनंगच तो! अंग तर नाही पण मन आणि भावना तर आहेत! तिची रथाच्या चाकाप्रमाणे असलेली कुंडले आणि तिच्या गोबर्‍या नितळ गालांवर पडलेलं रत्नकुंडलांचं गोल मनोहारी प्रतिबिंब ह्या चार चाकांचा रथ करून महादेवांना जिंकायला निघालेला अनंग एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला पृथ्वीचा रथ, सूर्य चंद्राची चाके असा प्रचंड जामानिमा घेऊन मोठ्या तयारीनिशी महेश्वर, महादेव अनंगाशी लढायला सज्ज झाले खरं,--- पण अरेरे! मदनानी उमेच्या आननमयी रथात बसून विजयाचा ध्वज फडकावला. पार्वतीच्या लावण्यापुढे शिवाचा सपशेल पराभव झाला.

स्फुरद्गण्डाभोग प्रतिफलित-ताटङ्क-युगलं

चतुश्चक्रं मन्ये तवमुखमिदं मन्मथरथम् ।

यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दु-चरणं

महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते ।। 59

( गंड – गाल; ताटङ्क युगलं – कानातील कुंडलांची जोडी, बाळ्या,   मार मदन. मन्मथमदन. )

तुझ्या कानी दोन्ही डुलती बघ जे कुंडल कसे

सुवृत्ताकारी हे कनकमणि कांतीयुत असे

तयांची तेजस्वी विमल प्रतिमा ही उमटते

सुवृत्ताकारी ह्या तव नितळ गालांवर उमे ।। 59.1 

 

तुझ्या कानीचे दो अनुपम असे कुंडल अहा

तुझ्या गाली त्याच्या सुबक प्रतिबिंबास बघता

अनंगाचा वाटे रथ पवनवेगे उधळला

कशी चारी चाके करिति मन संमोहित पहा ।। 59.2

 

रथी बैसोनीया अबलख तुझ्या आननमयी

अनंगाची स्वारी सुविजय पताका फडकवी

महा तेजस्वी हा मदन लढण्या सज्जचि गमे

शिवासंगे युद्धा तव मुख तया आश्रय पुरे ।। 59.3

 

करोनी पृथ्वीचा रथ शिव उभा सज्ज लढण्या

रवी चंद्राची ही अतुट तयि चाके कणखरा

 असे स्वामी मोठा सकलचि गणांचा अधिपती

तुझ्या लावण्याचा मदन परि होतोच विजयी ।। 59.4

 

माय! तुझा हा कोजागरीच्या चंद्राप्रमाणे असलेला चेहरा आह्लादक आहे त्यात काही संशय नाही.तुझ्या चहर्‍यावर पसरलेलं हे मंद स्मित तुझ्या चेहर्‍यापुरतं मर्यादित राहता ज्याप्रमाणे चंद्राचं शीतल चांदणं सर्व जगतावर एखाद्या रुपेरी मुलायम आच्छादनासारखं पसरतं तस सार्‍या विश्वावर पसरून त्याला मोहिनी घालतं.

 एखाद्या शांत, गहन सरोवरात मधेच एखादं अमृतफळ पडलं तर त्याच्या वर्तुळाकार उमटणार्‍या आणि शांतपणे पुढे सरकणार्‍या तरंगलहरी जशा किनार्‍यापर्यंत पसरत जातील त्याप्रमाणे एकदा जरी मंद स्मितासाठी तुझे ओठ विलग केलेस तर तुझ्यामधेच असलेल्या त्या प्रसन्नतेच्या लहरी तुझ्या स्मिताच्यारूपात आनंदलहरी होऊन संपूर्ण विश्वावर प्रसन्नतेचं, शांत सौम्य आनंदाचं जणु जाळ पसरत जातात.

मला तर वाटतं की, चकोर पक्षी तुझ्या ह्या स्मित हास्याच्या चांदण्यानी वेडावून, कायम तुझ्या स्मितहास्याच्या, धवल कीर्तीच्या, वात्सल्यमय चांदण्याचेच आकंठ पान करत असतात. पण-----! तुझ्या ह्या अमृताप्रमाणे हास्याची मधुर चव सतत घेता घेता त्यांच्या जिभेलासुद्धा खूप आईस्क्रिम खाल्यावर येतो तसा जरा जडपणा येत असावा. किंवा सतत गोड गोड खाल्यानंतर जसं जिभेला दुसरं काहीतरी तिखट खाण्याची इच्छा होते, किंवा दिवाळीचा खमंग फराळ खाऊन नंतर जसं काही दिवस फक्त वरणभात वा कढीभात आणि लिंबाचं लोणचं खावास वाटतं, त्याप्रमाणे त्या चकोरांना सुद्धा तुझ्या स्मितहास्याची मधुर चव घेतल्यानंतर थोडी आंबट-तिखट कांजी प्यावी असं वाटत असणार. म्हणूनच ते अधुन मधून आंबट, खारट कांजी प्रमाणे हा चंद्रप्रकाश पितात.

हे जगज्जननी हा अमृताहूनही गोड असलेला, चंद्रबिंबाहूनही शांत, सौम्य, मधुर असलेला, सर्व जगताला मोहित करणारे ज्ञान अज्ञानाचं गूढ जाळं पसरवणारा हा तुझा मुखचंद्रमा माझंही कल्याण करो. तुला अत्यंत नम्रभावे वंदन माते!

 स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां

चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा ।

अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचयः

पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया ।। 63

 

तुझे चंद्राहूनी स्मित मधुर आह्लादक अती

प्रभा त्याची शुभ्रा झिरपत असे सर्व जगती

चकोरां वेडावी मधुर चव हास्याचिच तुझ्या

सदा प्राशी तेची मधुरस्मित जोत्स्नेसम अहा ।। 63.1

 

चकोरे प्राशीता अपरिमित जोत्स्नेसम स्मिता

तयांच्या चोचींना मधुर रस देई जडपणा

अती गोडासंगे तिखट कधि वा आंबट रुचे

अती माधुर्याने बदल रसना मागत असे ।। 63.2

 

 शशी जोत्स्नेची ती म्हणुन कधि कांजी निरस ती

चकोरासी वाटे पिउन बघतो आंबट जरी

सुधांशू तेजाच्या अमृतमय  त्या स्वादु लहरी 

स्मिताच्या तेजाच्या पुढति अति निकृष्ट गमती ।। 63.3

 

जणु का तेजाचे उलगडत जाळे स्मित तुझे

असे हे तेजस्वी मुखकमल कल्याण करु दे ।। 63.4

 

हे माते, हे जगज्जनी तू शक्तिस्वरूप आहेस. रणांगणावर लढणार्‍या योद्ध्यांना तू जोश, चैतन्य, स्फुरण देतेस. त्यांच्यामधे जिंकण्याची विजिगीषु वृत्ती उत्पन्न करतेस. जेव्हा हे सर्व देव अत्यंत बलाढ्य, अत्यंत क्रूर, अत्यंत मायावी अशा राक्षसांबरोबर मोठ्या शौर्याने, धैर्याने, प्राणांची बाजी लावून लढतात आणि जिंकतातही तेव्हा अत्यानंदाने, कौतुकाच्या अपेक्षेने, आणि आपल्या हातावर कौतकाने काही खाऊ प्रसाद म्हणून मिळावा ह्या पुत्रसुलभ अपेक्षेने ते तकड रणांगणातून थेट तुझ्याकडेच येतात. त्यांच्या अंगावरची चिलखतही तशीच असतात. ते काढायचही त्यांना भान नसतं आणि कधी एकदा मातेला  भेटून तिला सारा वृत्तांत सांगतो अशी त्यांना घाई झालेली असते. अंगावरच्या चिलखतांनीच ते तुला नमस्कार करतात. माय त्यावेळी तुझ्या मुखात असलेला त्रयदशोगुणी विडा त्यांच्या मुखात भरवून तू त्यांच कौतुक करतेस. तो तांबूल साधासुधा थोडाच असतोआनंदलहरी  )

उमे जाळोनीया सकल अवघे मीपण सुखे

चुना केला त्याचा धवल अति तू शुद्ध गिरिजे

मनाचा बुद्धिचा करुनी अडकित्ता चमकता

सुपारी फोडोनी कतरसि मनीषाच अवघ्या।।3.1

सदा शांतीच्या ह्या हरित मन पर्णावर सदा

विवेकाचा लावी अरुण रमणा कात बरवा

सुबुद्धीची घाली रुचकर अती वेलचि वरी

महा वैराग्याची परिमलयुता जायपतरी।।3.2

तयी भावार्थाचा अति रुचिर कर्पूर सजवी

दयाबुद्धीरूपी सुमधुर खडीसाखर गुणी

भवानी बांधोनी नित दशगुणी तांबुल असा

सुबुद्धीरूपी या ठसविसि लवंगा वर तया।।3.3

मुखामध्ये घोळे तव दशगुणी तांबुल असा

असा राहे जोची तव दशगुणी तांबुल मुखी

तुझ्या भक्तांना तो अनुपम सुखे दे मिळवुनी ।।3.4

असा दशगुणी प्रत्यक्ष तुझ्या मुखीचा तांबूल देवांना मिळाल्यावर त्यांच्या नेत्रात आनंदाश्रू येणार नाहीत काय? तुझ्याकडून मिळणारा प्रसाद घेऊन ते धन्य होतात.

हे सारे देव जिंकल्यावर सर्वप्रथम देवांचे देव महादेव त्यांच्या मात्र भेटीला प्रथम जात नाहीत. कारण शिवाला काही अर्पण केलं तर त्याने स्वीकारून जे काही उरेल त्याला निर्माल्य मानलं जातं. त्यात चंडेश्वराचा अंश असतो असं म्हणतात. त्यामुळे तो प्रसाद म्हणून कोणी ग्रहण करत नाही.

  माते तुझं वात्सल्यच वेगळं! पुत्रांप्रति असलेलं तुझं प्रेम तुला महादेवांहूनही श्रेष्ठ बनवतं. हे महादेवी, माझं तुला नमन!

 

रणे जित्वा दैत्यानपहृतशिरस्त्रैः कवचिभि

र्निवृत्तैश्चण्डांश-त्रिपुरहर-निर्माल्य-विमुखैः

विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशि-विशद-कर्पूर-शकला

विलीयन्ते मातस्तव वदन-ताम्बूल-कवलाः ।। 65


रणी दैत्यांना त्या करुनिच पराभूत सहजी

रणातूनी येती सुरगण कराया नमनची

असे अंगी त्यांच्या चिलखत रणी जे चढविले

सवे त्याच्या येती प्रथम करण्या वंदन शिवे ।। 65.1

 

प्रसादाची माते धरुन मनि गे आस तुझिया

शिरीचे काढूनी मुकुट करती वंदन तुला

प्रसादा देऊनी सुखविसि सुरांसीच सकला

तुझ्या तांबूलाने सकल म्हणती धन्य क्षण हा ।। 65.2

 

शिवाच्या पायी ते प्रथम करती ना नमन गे

शिव स्वीकारोनी उरतचि असे जेचि सगळे

असे निर्माल्याचे प्रतिक तयि घेती कुणिही

असे चंडेशाचा म्हणति असतो अंशच तयी ।। 65.3

 

प्रसादासाठी गे परि जननि येती तुजकडे

मुखीचा लाभाया तव मधुर तांबूल सुभगे

तुझ्या तांबूलाते अतिधवल कर्पूरचि असे

सुगंधी कर्पूरा बघुनि शशिखंडासम गमे ।।65.4

 

मुखीच्या तांबूला ग्रहण करती देवगण ते

तुझ्या ह्या घासाने सकल सुर ते तृप्त मनि गे

असे शंभूहूनी तवचि महिमा श्रेष्ठ जननी

महादेवाआधी प्रथम तुजला देव नमती ।। 65.5

 

ह्या गौरीचं बोलणंच भारी गोड! सगळ्यांनाच आपलसं करणारं!  अमृतालाही लाजवणारं! तिच्या ह्या वात्सल्यमय वागण्याने नेहमी दोन स्त्रियांमधे असलेल्या मत्सरालाही कुठे जागा उरत नाही. देवांचाही देव असलेल्या महेशाच्या जीवन सरितेला उमेची जीवन सरिता मिळाल्यावर होणारा हा संगम इतका पवित्र इतका मनोहर आहे की स्वतः शारदाम्बा ह्या गौरीसमोर बसून  उमा महेशाच्या जीवनाची अद्भुत कथा तिला गाऊन ऐकवत आहे. हया मतिदात्रीच्या वीणेतून झंकारणारे मधुर स्वर आणि तिची स्तुतीरचना ऐकल्यावर गिरीजेलाही मान हलवत वाहव्वा! म्हणावसं वाटलं नाही तरच नवल! आपल्या आपत्याचं कौतुक करतांना माता जशी थकत नाही त्याप्रमाणे शारदेचं कौतुक करतांना गिरीजेच्या मुखातून जणु अमृतच बरसू लागलं.

 गिरीजेच्या मुखातून स्तुती ऐकल्यावर, तिच्या वाणीचं माधुर्य, ओज  शब्द लालित्य ऐकल्यावर, तिचा नादमधुर स्वर ऐकल्यावर, तिची सांगण्याची लोभस धाटणी पाहिल्यावर, तिचं बोलणं ऐकतच रहावं असं सहाजिकच सरस्वतीला वाटलं. गौरीच्या ह्या निर्झराप्रमाणे खळाळत येणार्‍या शब्दरचनेपुढे  आपली वीणा ही अत्यंत निरस आहे, तिच्यातून येणार्‍या बोलांना, हा गोडवा, ही गोलाई , ही मीण नाही हे पाहून सरस्वतीने हलकेच आपली वीणा गवसणी/ खोळ घालून खाली ठेवली.

विपञ्च्या गायन्ती विविधमपदानं पशुपते-

स्त्वयारब्धे वक्तुं चलितशिरसा साधुवचने ।

तदीयैर्माधुर्यैरपलपिततन्त्रीकलरवां

निजां वीणां वाणी निचुलयति चोलेन निभृतम् ।। 66

(विपञ्चिका , विपञ्ची – वीणा)

सुखे छेडूनिया सुरमधुर वीणा स्तुति करे

अहो वाग्देवी. ती गिरिश-गिरिजेची तरल गे

तयांच्या प्रेमाचे रसभरित ते वर्णन करी

कधी हर्षााने ती परिणय प्रसंगास खुलवी ।। 66.1

 

विषा कैसे प्राशी अविचल मने शंभु शिव तो

वधीला कैसा तो कधि त्रिपुर उन्मत्त बहु तो

तिच्या शब्दा शब्दातुन जणु कथा रम्य सगळी

पुन्हा का साकारे सलग  नयनांच्याच पुढती

 

तिच्या काव्यासंगे मधुमधुर झंकारत असे

तिच्या हातीची ती सुरमधुर वीणा सहज गे

स्तुती ऐकोनीया चपखल अती सुंदर अशी

उमा वेळावी ``वा!’’ म्हणुनचि मुदे मान सहजी ।। 66.2

 

करे ब्रह्माणीचे मधुरवचने कौतुक किती

सुधाही लाजे का मधुर वचने ऐकुन तिची

अहो त्या माधुर्यापुढति मधु-वीणा निरस ती

 म्हणोनी वाग्देवी त्वरित तिज घाले गवसणी ।। 66.3


हे गिरिजे,

बालपणी तुझे सद्गुण, तुझ्या चेहर्‍यावरचा गोडवा, बालसुलभ निरागस भाव, गोजिरेपणा पाहून वात्सल्याने तुझा पिता, हा हिमालय तुझी सुंदरशी हनुवटी हलकेच हाती धरुन तुझ्या माथ्याचे चुंबन घेत असे. त्याला तर तू म्हणजे त्याच्या मुकुटात खोचलेला नवरत्नांचा तुराच वाटतेस.

तारुण्यात शंभूसोबत असताना लज्जेने तुझी मान खाली जाता, महेश तुझी हनुवटी धरून तुझा झुकलेला चेहरा वर करतो. तुझं पारदर्शक मन तुझ्या चेहर्‍यातून प्रचितीला येतं. आणि म्हणुनच तुझ्या ह्या चेहर्‍याचा आरसा करून शंभू स्वतःचे विश्वरूप जणु तुझ्या चेहर्‍याच्या दर्पणात बघत असतो. मला वाटतं, तुझी ही सुंदरशी निमुळती हनुवटी म्हणजे तुझ्या आनन आरशाची सुंदर मूठ आहे. दुसरी कुठलीही योग्य उपमा तुझ्या हनुवटीस नाही. तुझी हनुवटी अनुपम सुंदर आहे.  

कराग्रेण स्पृष्टं तुहिनगिरिणा वत्सलतया

गिरीशेनोदस्तं मुहुरधरपानाकुलतया ।

करग्राह्यं शंभोर्मुखमुकुरवृन्तं गिरिसुते

कथंकारं ब्रूमस्तव चुबुकमौपम्यरहितम् ।। 67

 ( औपम्यरहितम् – उपमा रहित; चुबुक – हनुवटी; तुहिनगिरी – हिमालय; मुहुस् – वारंवार )

हिमाद्रीकन्ये गे तव हनुवटीसी धरुनिया

तुझे वात्सल्याने करितचि असे कौतुक पिता

तुझी लज्जेने गे झुकत असता मान सहजी

स्वहस्ते शंभू तो वर उचलतो गे हनुवटी ।। 67.1

 

किती वेळा शंभू तव अधरपानास्तव उमे

धरूनी प्रेमाने तव हनुवटीसीच उचले

स्वतःचे ते विश्वात्मक स्वरुप यावेच बघता

म्हणोनी वाटे त्या तव मुखचि हे दर्पणसमा ।। 67.2

 

बघे शंभू जेव्हा नयनि झुकलेल्या जवळुनी

स्वतःच्या त्या विश्वात्मकचि प्रतिबिंबास जननी

तुझे माते वाटे मुखकमल हे दर्पण जणू

 अ‍से त्याची छोटी तव हनुवटी मूठचि जणू ।। 67.3

 

दुजी ना काहीही तव हनुवटीसीच उपमा

तिच्या सौदर्यासी जगि न कुठली योग्य उपमा

जगी राहे माते तव हनुवटी गे अनुपमा

करो ती सर्वांचे जननि हित कल्याणचि सदा ।। 67.4

एखाद्या नवदाम्पत्याला पाहून सहजपणे म्हटलं जातं, ``वा! जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभून दिसतोय हं!’’  ....लक्ष्मी चंचल आहे. तिची अट अशी की, जो सर्वगुणसम्पन्न आहे अशाकडेच मी कायमची राहीन. त्यामुळे नारायणाला लक्ष्मीचाही `लोभधरून चालत नाही. आणि त्यामुळे लक्ष्मीलालक्ष्मीचीही आसक्ती नसलेल्यानारायणाचे तो शेषावर झोपलेला असतांना पाय चुरत रहावं लागतं. कधी कधी आपण केलेल्या पणांमधे आपणच कसे फसतो बघा! दोघांना एकमेकांचा सहवास मिळवण्यासाठी कवढे कष्ट पडतात. लक्ष्मीला वामांगी बसण्यासाठी भूतळावर येऊन रखमाईचं रूप घ्यायला लागतं. तेव्हा कुठे ``वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’’ चा अनुभव येतो. किमान रुसून वेगळीकडे उभं रहायला तरी मिळतं; नाहीतर विष्णूला नरसिंह तरी व्हावं लागतं. नरसिंहाच्या रूपात त्याच्या वामांगी बसणं!---- अरेरे

असो! उमामहेशाचं मात्र तसं नाही. दोघं कायम एकमेकांसोबतच दिसणार. मुलं बाळं व्यवस्थित शिकून सवरून योग्य पदाला पोचली असल्याने तीही काळजी नाही. गप्पागोष्टी करायला, सारीपाट खेळयला त्यांना कैलासही चालतो किंवा स्मशानालाही त्यांची ना नाही. परत लक्ष्मी देवींसारखं चालले मी तुला सोडून हेही भय नाही. `घर दोघांचही असतं. एकानं पसरलं तर दुसर्‍याने आवरायचं असतं.’ ह्या चंद्रशेखरानेच म्हटलेल्या कवितेचा धागा धरून पार्वतीने केलेला सारा पसारा आवरता घ्यायचं काम कंटाळता शंकरबाप्पा करत असतात. आणि पतिदेवांनी कितीही नासधूस केली तरी धुसफुसता पार्वतीमाता परत संसार मांडतच राहतात.

----! गप्पागोष्टी करतांना कधी कधी शंकररायांनाही पतिदेवसुलभ पार्वतीची थट्टा करण्याची लहर येते. त्यातही एकदा तिची थट्टा करतांना तिनी कृतककोपाने आपल्याकडे पहावं असं वाटून खोट खोट हसत ते ``प्रियतमे पार्वती’’ असं म्हणता चुकून (मृषा) मनातील प्रिय गंगेचच नाव उच्चारून बसले. आपण मराठीत जीभ चळली म्हणतो संस्कृतमधे `गोत्रस्खलनम्हणतात. ज्या मैत्रिणीला डोक्यावर बसवलय तिच्या नावानी आपल्याला हाक!!!!!!

ह्याच्यानंतर होणार भयंकर नाट्य जे घरोघरी घडेल तेच तिथेही घडलं पत्नीचे पाय पकडण्यासाठी शंकरबाप्पा खाली वाकायच्या आतच तायक्वांदोमधील एक सणसणित front forword का वरून खाली दाबून टाकणारी snap kick का spinning hook kick इतक्या जलद गतीने त्यांच्या कपाळावर बसली की ही कोणती हे कळायलाच त्यांना वाव मिळाला नाही.

अशा घटना आपल्या शेजार्‍यांना गवाक्षातून पहायला सहाजिकच किती  खमंग वाटतात. तिथेही नेमकं तेच झालं. अहो तो छछोर मदन! शंकराला त्रास देण्यावरून त्याला एकदा त्याच्या कोपाचा सामना करायला लागला होता. जाळून टाकलं शंकरानी. पण पार्वतीआई मधे पडल्या. अहो! हे तरूण असेच मूर्ख असतात. हा माझ्या मुलासारखा. जाऊ दे नं माफ करा. शंकरानी माफ केलं. पण सांगितलं, शरीराशिवायच तू अस्तित्त्वात असशील. म्हणून तो अंग नसलेला अनंग झाला. मग काय ह्याचं फावलचं की.  CCTV Camera सुरू. बंधनच गेलं. योग्य गोष्टींच्या द्वारा आपलं अस्तित्त्व जाणवून देण्याची पूर्ण मुभा त्याला होती. परत शंकराच्या कपाळावरच्या ह्या अग्नीनी मला जाळलं होतं, ही सल मनात होतीच. त्याला असा लाथेचा मार सहन करावा लागतोय ह्या दृश्यानीच मदन सुखावला. खा मेल्या! मार खा. तुला मिळणारा मार म्हणजे माझ्या विजय पताका आहेत.

लाथ मारतांना पार्वतीच्या पायातील पैंजणांचा किकिलकिल असा गोड आवाज झाला. अहो तो पैंजणांचा नव्हे तर पैंजणांच्यामधून तो मदनच खुदु खुदु / किलकिलकिल असा हसत होता.

सुहृदहो, येथे फेसबुक वा आभासी माध्यमांवर आपण सारेच अनंग आहोत. आपल्या `विग्रहवरम्हणजे बेटर हाफ बद्दल इथे मनसोक्त लिहितांना प्रत्येकजण दुसर्‍याला किलकिलकिल करत, त्याला अंगठे मोडत आनंदी होत असतो. जरा जपून!

मृषा कृत्वा गोत्रस्खलनमथ वैलक्ष्यनमितं

ललाटे भर्तारं चरणकमले ताडयति ते

चिरादन्तःशल्यं दहनकृतमुन्मूलितवता

तुलाकोटिक्वाणैः किलकिलितमीशानरिपुणा ।। 86 

( वैलक्ष्य – कृत्रिम, खोटं हसू, )

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत तुजला खोचकपणे

शिवाने प्रेमाने तुज `प्रियतमे भागिरथि गे

जरा संबोधीता चुकुन; तुजला क्रोधचि चढे ।। 86.1

 

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिव गे

पदाघाताचे गे फळ शिव-कपाळी बसतसे

 अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य असले

म्हणे हाची माझा विजय अति अत्युत्तम असे ।। 86.2

 

अहो केले ज्याने मम तनुस ह्या भस्म अवघे

धडा त्या नेत्राला अजि मिळतसे योग्यचि बरे

प्रहाराने त्याची किलकिल करे पैंजण तुझे

अनंगाला मोदे खुदु खुदु हसू येत जणु हे ।। 86.3

-------------------------------

हे माय, तुझ्या फुलांसारख्या पायांना आम्ही आमच्या मतिच्या कुवतीनुसार काहीबाही उपमा देतो खरंपण त्या सगळ्याच फोल असतात तुझी पावलं अलौकिक सुंदर आहेत, अत्यंत मुलायम, कोमल आहेत म्हणून त्यांना कमल कोमल, कमलाच्या कळीप्रमाणे कोमल कसे म्हणावेतुझे पाय अत्यंत कोमल असूनही हिमाद्रिच्या भव्य, उत्तुंग रांगावर सहज पदन्यास करत असतात. कठीण पर्वतरांगा पार करत असतात. दगडात, काट्याकुट्यात निःशंकपणे फिरत असतात. हाडं गोठवून टाकणार्‍या थंडीत तू लीलया आनंदाने कैलासावर राहतेस. हे त्या कमळांना कधीतरी शक्य आहे का? हिमाचं नाव घेताच ते माना टाकतात. पाणी गोठणार्‍या थंडीत टिकून राहण्याची त्यांची कुवत नाही. ते सामर्थ्य फक्त तुझ्या अत्यंत कोमल पावलांमधे आहे. माय गे, किंबहुना धैर्य आणि माधुर्य, सामर्थ्य आणि कोमलपणा हे एकमेकांना पूरक गुणं आहेत. एक असेल तर दुसरा आपणहून हजर होतो. तो फक्त तुझ्या पावलात आहे. कमळात नाही.

कमळात रहायला लक्ष्मीला फार आवडतं. ते तिचं अधिष्ठान, वसतिस्थानच आहे. पण कमळ सुकलं की मग काय? तुझी चरण कमले सतत उत्फुल्ल असतात. सतत सजग असतात. ह्या विश्वाचं कल्याण करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी सावध असतात. सतर्क असतात. कमळांचं तसं नाही. कमळं सुकतात म्हणजेच त्यांचं ऐश्वर्य म्हणजेच त्यातील लक्ष्मी निघून जाते. तुझ्या पादपद्मांचे तसे नाही. माय, म्हणूनच ही रमा कायम स्वरूपी तुझ्या पावलांवर आनंदानी राहात असते. लक्ष्मी जेथे नित्य निवास करते त्या ठिकाणी जगातले सर्व सद्गुण एकवटलेले असावे लागतात. ते सर्व सद्गुण तुझ्या पावलांमधे सामावले आहेत माते.  

तुझ्या चरणकमलांची तुलना कमळांसंगे होऊच शकत नाहीतुझ्या पावलांमधे इतकं सामर्थ्य आहे की, जो भक्त तुला शरण येईल त्याला तू पूर्ण ऐश्वर्य देतेस. सर्व वैभव प्रदान करतेस. निरतिशय आनंद प्रदान करतेसतुझा भक्त कधीही तुझ्याकडून विन्मुख जात नाही. एका कमळाला हे कसं शक्य आहे?

 माय ज्या चरणयुगुलांमधे सर्व गुण केंद्रित झाले आहेत ते तुझे पाय मी कसे सोडीन?

हिमानीहन्तव्यं हिमगिरिनिवासैकचतुरौ

निशायां निद्राणं निशि चरमभागे विशदौ

वरं लक्ष्मीपात्रं श्रियमतिसृजन्तौ समयिनां

सरोजं त्वत्पादौ जननि जयतश्चित्रमिह किम् ।। 87

सरोजाच्यासंगे चरणकमलांचीच तुलना

कशी व्हावी माते; तव चरण विश्वात अतुला

हिमाद्रिमध्ये गे कमल कलिका ना उगवती

जिथे गोठे सृष्टी कमलकलिका तेथ कसली ।। 87.1

 

परी बर्फामध्ये चरण सहजी चालति तुझे

हिमाने त्यांना हो क्षति नचचि पोचे लवहि गे

सरोजे जाती गे मिटुन बघता सूर्य क्षितिजी

परी राहे रात्रंदिनि चरण उत्फुल्ल तवची ।। 87.2

 

सरोजाते राही कमलनयना जीच कमला

वसे ती आनंदे चरणकमली नित्य तुझिया

करीती भक्तीने स्तवन तव एकाग्रचि मने

तयांना देसी तू सकलचि ऐश्वर्य विभवे ।। 87.3

 

निजानंदाचे ते भरभरुन दे दान सकला

सरोजासी नाही जननि क्षमता ही तुजसमा

तया कैसी यावी चरणकमलांची सर तुझ्या

तुझ्या ह्या तेजस्वी चरणकमला वंदन पुन्हा ।। 87.4


हे माय! कमळाची कळी हाताला केवढी कोमल लागते; पण ती चिखल आणि पाण्याला भेदून वर येते. चिखलातून वर येतांना तिला कुठेही चिखल चिकटलेला नसतो. तशीच तुझी ही पावलं अत्यंत खडतर मार्गावर चालूनही अत्यंत कोमल आहेत. कुठल्याही प्रवादाचा, आक्षेपाचा एखादा छोटासा शिंतोडासुद्धा त्यांच्यावर उडालेला नाही.  

शिवपार्वती परिणयाच्या समयी, लाजाहोमाप्रसंगी मेघाप्रमाणे अत्यंत दयार्द्र  असलेल्या श्रीशिवांनी तुझं पाऊल स्वतःच्या हाताने उचलून अत्यंत कठीण अशा पाषाणावर ठेवलं. आणि ते तुला म्हणाले, ``प्रियतमे पार्वती, ह्या पाषाणासारखी माझ्यासोबत कणखरपणे पाय रोवून उभी रहा. माझ्या खांद्याला खांदा लावून सर्व कामे करतांना माझी साथ दे. माझा हा विश्वाचा परिवार फार मोठा आहे. माझ्या परिवाराची देखभाल तुला करावी लागेल. सर्वांच्या भरणपोषणाची जबाबदारी आजपासून मी तुझ्यावर सोपवत आहे.’’ आजही लग्नविधीत वधूचे पाऊल सहाणेवर ठेवायची प्रथा आहे. तर गौरीहराची पूजा पाट्यावर मांडली जाते.

अर्थात उमेच्या खडतर तपाची परीक्षा घेऊनच विश्वनाथाने ही जबाबदारी तिच्यावर सोपवली. ऋषी, मुनी जिचं खडतर तप पाहून तिला `उऽऽ मा! ’ म्हणजे--- ``अगं इतकं खडतर तप करू नकोस बाळे!’’ म्हणायचे ती उमा आता `उयते सा उमा’ म्हणजे, सोन्याच्या तारेत सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे, सर्व विश्व आपल्यामधे ओवून गोवून ठेवणारी प्रेमळ विश्वजननी जगज्जननी झाली. सर्वांची काळजी घेणारी माता पार्वती झाली. देवेंद्र आणि इतरदेवांची, सुरांची, असुरांची सर्वांचीच माता झाली

एखादा दगड फोडायची किंवा त्याला ही घट्ट धरून उभी रहायची ताकद एखाद्या कोमल लहान अंकुरातच असते. दगडालाही भेदण्याची ताकद हाताला सुखद आणि मुलायम वाटणार्‍या पाण्यातच असते. हे लक्षात घेतल्यावर हे माते आपल्या पतीचा विश्वास टिकवून तुझी कोमलं पावलं ह्या विश्वाचं भरण, पोषण, रक्षण कण्यासाठी खंबीरपणे पहाडासारख्या संकटमालिकांवर अचलपणे, खंबीरपणे उभी आहेत हे कोणालाही मान्यच करायला लागेल. सर्वांना तू इतका जीव लावला की कोणाला तू आपल्यापेक्षा वेगळी आहे असं वाटलच नाही. सर्वांना तू आपल्यासारखं करून टाकलं. तुझ्या ह्या पावलांवर मी नतमस्तक आहे माय!

 

पदं ते कीर्तीनां प्रपदमपदं देवि विपदां

कथं नीतं सद्भिः कठिन-कमठी-कर्परतुलाम् ।

कथं वा बाहुभ्यामुपनयन-काले पुरभिदा

यदादाय न्यस्तं दृषदि दयमानेन मनसा ।। 88

(प्रपद – पायाचा अग्रभाग/पाऊल.  कीर्तीनां पदं – कीर्तीचे अग्रस्थान, शिखर. विपदां अपदम् – संसारात भोगाव्या लागणार्‍या विपत्ती, संकटे अधिदैविक, अधिभौतिक, अध्यात्मिक. अपद- कधीही स्थानहोऊ शकत नाही. कमठी-कर्पर – कासवाच्या पाठीचे कवच. दृषदी - दगडावर )

 

पदाग्रे नोहे ही; नित धवल कीर्ती शिखरची

जगीच्या दुःखांना पद न मिळते गे तव पदी

पदी जे जे येती जननि विपदांतून सुटती

अनर्था दुर्भाग्या मुळि न बघती ते नर कधी ।। 88.1

 

परी कूर्मपृष्ठा सम तव पदाग्रेच म्हणती

कवी कोणी त्यांच्या असहमत मतासी जननि मी

पदाग्रे कैसी ही जननि तव गे कोमल किती

कुठे त्या कूर्माच्या कठिण कवचाचीच महती ।। 88.2

 

अगे लाजाहोमा समयिच विवाहात तुमच्या

स्वतःच्या हाताने उचलुन तुझ्या कोमल पदा

शिवाने ठेवीले जननि दगडाच्यावर कसे

मनाचा आहे तो जरिच कनवाळू तरि असे ।। 88.3

 

``सदा अश्माऐसी कणखरचि खंबीरचि रहा

प्रिये विश्वाच्या ह्या सकल परिवारात मम ह्या

कुटुंबाचे माझ्या करि भरण तू पोषण उमे

सदा हया कर्तव्या कधि न चुकणे’’ शंकर वदे ।। 88.4

 

तुझ्या सामर्थ्याचा मनि धरुन विश्वास जननी

दिली कल्याणाची तुजसि गिरिजे कामगिरि ही

दया त्रैलोक्याची शिवमनी सदा राहत असे

अगे माते आलो चरणकमळी मी शरण गे ।। 88.5

 

  आपण ``एखाद्याच्या नखाची सर कोणाला येणार नाही’’ असं म्हणतो खरं, पण! --- अशी नखं कशी असतील किंवा असावीत असा विचारही करत नाही. अशा नखांचं सौंदर्य नक्कीच कोणालाही आश्चर्यचकित करणारं असलं पाहिजे. साधारणपणे निरोगी माणसाची नखं स्वच्छ गुलाबीसर थोडी चकचकीत असतात. श्री आद्य शंकराचार्य ह्या त्रिपुरसुंदरीच्या पायाच्या नखांचं गुणवर्णन करतांना म्हणतात, माय! तुझी नखं पाहून मला तर असं वाटतय की जणु पौर्णिमेचा चंद्र तुझ्या नखांवर उगवला आहे. त्याच्या धवल चांदण्याप्रमाणे तुझ्या नखांमधूनही शुभ्र किरणं सार्‍या दिशांमधे पसरत आहेत.

सकाळी उमलणारी लाल कमळं चंद्रप्रकाश पडताच पाकळ्या मिटवून परत कळीचं रूप घेतात. जणु काही त्याला नमस्कारच करत असतात. तुझ्या ह्या धवलप्रकाश देणार्‍या नखांना पाहून तुझ्यापायी नम्र झालेल्या ह्या स्वर्गातील देवस्त्रियांनीही त्यांचे हात जोडण्यामुळे त्यांची सुंदर करकमळे तुला पाहून परत करकलिकांमधे, कमळाच्या कळ्यांमधे परिवर्तित झाली आहेत असं मला दिसतय.  

तुझी ही अंबरमणि म्हणजे चंद्राप्रमाणे स्वर्गीय सुंदर असलेली नखं ह्या स्वर्गातल्या कल्पतरुंनाही उपहासाने हसत आहेत. कल्पतरु हे मनातील सार्‍या इच्छा जरूर पुरवतात पण फक्त जे स्वर्गात राहतात त्यांच्याच! तुझी नखं मात्र इतकी उदार आहेत की भूतलावर राहणार्‍या दीन, दुबळ्या गरीब जनतेचि ते रात्रंदिन काळजी घेतात. चंड, मुंड अशा भयानक राक्षसांचा निप्पात करून सर्वसामान्यांच रक्षण करतात. तू दुष्टांचा नायनाट करणारी चंडी आहेस, सर्वांचीच माय असल्याने सर्वांनाच तू पोटाशी धरतेस. कोणाही बाबत असं कल्पवृक्षाप्रमाणे आजंदुजं करत नाहीस. म्हणून हे माय! तुझ्या ह्या पावलांवर मी शरण आलो आहे. तू मला पोटाशी घे.  

 

नखैर्नाकस्त्रीणां करकमलसंकोचशशिभि-

स्तरूणां दिव्यानां हसत इव ते चण्डिचरणौ

फलानि स्वस्थेभ्यः किसलय-कराग्रेण ददतां

दरिद्रेभ्यो भद्रां श्रियमनिशमह्नाय ददतौ ।। 89

कसे वर्णू सारे तव चरणसौंदर्य जननी

घडे लावण्याचे अनुपमचि हे दर्शन पदी

असे वाटे माते जणु उगवला अंबरमणी

नखांच्या रूपाने जननि बहु आह्लादक अती ।। 89.1

 

प्रभा का चंद्राची जणु पसरलीसे दशदिशी

नखातूनी ऐसी धवल किरणे ही सुखविती

जसे चंद्रस्पर्शे कमलदल जाती मिटुन ते

कळी होऊनी ते नमन करि चंद्रासचि जसे ।। 89.2

 

घडे माते तैसे नखकिरण-स्पर्शेच तुझिया

मिटोनी घेती गे करकमल ह्या गे सुरस्त्रिया

अगे ह्या देवांच्या सकल ललना गे तव पदी

करांसी जोडूनी नमन अति भावेच करती ।। 89.3

 

तुझे माते कैसे चरण उपहासेच हसति

अगे स्वर्गीच्या ह्या सुखकर अशा कल्पतरुसी

तरू देती सौख्या सुरवरपुरीच्या सुरगणा

परी भूलोकीची करितिच उपेक्षा म्हणुनिया ।। 89.4

 

दरिद्री दीनांना सुख वितरती मंगलमयी

तयांच्या सेवेसी चरणकमले तत्पर अती

नखांची कांती ही सकल जन इच्छाच पुरवी

पदांसी ऐशा गे शरण नित आलोच जननी ।। 89.5

 

गज असो वा हंस! त्यांच्या चालीतला डौलच काही आगळावेगळा. हत्तीच्या डौलदार चालीचं मर्म शोधून काढल्यावर असं लक्षात आलं की हा एवढा अवाढव्य वाटणारा प्राणी, चालतांना फक्त त्याच्या पायाच्या बोटांवर चालतो. सतत बॅले सादर करणारा हत्ती सहाजिकच डौलदार चालणार.

हंसाच्या चालण्याची ऐटही अशीच! अहो ही ऐट, हा डौल त्याला काही सहज प्राप्त झाला नाही, आचार्य म्हणतात ह्या हंसांनी त्रिपुरसुंदरीची अशी काही सौंदर्यपूर्ण चाल पाहिली की त्या चालीवर लट्टू झालेले हंस ह्या मातेच्या चालीचं अनुकरण करण्यातच गढून गेले. पण सहज थोडीच ती चाल आत्मसात करू शकणार? पण त्यांची ती दांडगी चिकाटी पाहिल्यावर पार्वतीही आपले पायीचे वाळे वाजवत जणुकाही त्या चालीचे बोल नुपूरांच्या आवाजातून व्यक्त करत त्यांना आपल्या कृतीतूनच शिकवू लागली.

 आपल्या बर्‍याचशा स्तोत्रांमधे त्या देवतेच्या पावलांचे वर्णन मोठ्या बहारदारपणे केलेले आढळते. त्या पावलांवर एकाग्र झालेले मन मग कुठे भरकटत नाही. कमलात बंदी झालेल्या भृंगाप्रमाणे त्या चरणकमलांमधेच रममाण होते. 

असं म्हणतात, की जेव्हा सीताहरणानंतर, विमानातून रावणानी सीतेला पळवून नेलं आहे हे कळण्यासाठी सीतामाईने तिचे दागिन जागोजागी खाली टाकले. लक्ष्मणाला जेव्हा हे दागिने ओळख पटण्यासाठी म्हणून दाखवले, तेव्हा त्याने फक्त माता सीतेच्या पावलांवर असलेले तिचे पैंजणच फक्त ओळखले. अत्यंत नम्रपणे सेवा करणार्‍या लक्ष्मणानी दररोज नमस्कार करतांना सीतेच्या पावलांकडेच फक्त पाहिले होते. चरणसेवा काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी आयुष्यच वाहून घ्यायला लागतं.

पदन्यासक्रीडापरिचयमिवारब्धुमनसः

स्खलन्तस्ते खेलं भवन-कलहंसा न जहति ।

अतस्तेषां शिक्षां सुभगमणिमञ्जीररणित-

च्छलादाचक्षाणं चरणकमलं चारुचरिते ।। 91

करिसी डौलाने सहजिच पदन्यास जगती

पदांची जादू ही बघुन सहजी नेत्र खिळती

तुझ्या हया चालीसी अनुसरति हे हंस जननी

तुझ्या ह्या ऐटीचा अविरतचि अभ्यास करती ।। 91.1

 

अरेरे ! त्यांचेही बघुनही चुके पाउल कधी

तरी ना सोडी ते तुजस पदाभ्यास तरिही

चिकाटी त्यांची ती तव चरणखेळास करण्या

अगे माते त्यांचा बघुन मनिचा निश्चय खरा ।। 91.2

 

पदन्यासासी या सहज शिकवावे कृतितुनी

म्हणोनी वाळ्यांची किणकिण करीसी मधुरशी

छुनुन् छुन् छुन् वाजे; हरत हृदये पैजण तुझे

तुझ्या ह्या पायांशी विनित मम गे मस्तक असे ।। 91.3

 

चंद्राला पाहून कवी जनांच्या मनात नाना कल्पना स्फुरण पावतात. ह्या नभोदीपाचं सौंदर्य पाहून कुणाला एखाद्या रमणीचा मुखचंद्रमा आठवतो. कुणाला त्याच्यावरील डागसुद्धा ``मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति।’’ ह्या न्यायानी त्याला खुलून दिसतो असं वाटतं. (लक्ष्म म्हणजे डाग लक्ष्मीं तनोति म्हणजे ऐश्वर्य वाढवतो.) असो!

श्री. शंकराचार्यांना चंद्र म्हणजे पार्वतीचा सौंदर्यप्रसाधनं ठेवलेला मरकत मण्याचा म्हणजे पाचूचा करंडा वाटतो. चंद्रावर पाणी आहे की नाही हा शास्त्रज्ञांसाठी अजूनही शोधमोहिमेत अडकलेला प्रश्न असू शकतो. पण शंकराचार्यांचं कविमन सांगतं की तिथे जे पाणी आहे ते जणु काही गुलाबजलच आहे. अनेक प्रकारची कर्पूरासारखी अनेक सुगंधी द्रव्ये त्यात भरून ठेवली आहेत. तो काळा डाग म्हणजे सुगंधी कस्तूरी आहे.

जगाच्या नाथाच्या पट्टराणीचा थाट हा असा अलौकीकच पाहिजे ना! तीही जगज्जननी ही सर्व सुगंधी द्रव्ये रोज मुक्तपणे वापरत असते. ती रोज थोडी संपत असल्याने तो चंद्र ही रोज थोडा लहान लहान होत जातो. ही सर्व सौंदर्य प्रसाधनं संपली की ब्रह्मदेव परत एकदा करंडा भरून ठेवतो. तेव्हा चंद्रही पौर्णिमेच्या पूर्ण आकारात तळपत असतो.

कलङ्कः कस्तूरी रजनिकर-बिम्बं जलमयं

कलाभिः कर्पूरैर्मरकत-करण्डं निबिडितम् ।

अतस्त्वद्भोगेन प्रतिदिनमिदं रिक्तकुहरं

विधिर्भूयो भूयो निबिडयति नूनं तव कृते ।। 94

 

तुझ्या सौंदर्यासी नित खुलविण्या वस्तु सगळ्या

भरोनी ठेवाया अनुपम करंडा शशिच हा

अगे माते साक्षात् हिमकरचि नक्षत्रपति तो

करंडा पाचूचा अनुपम तुझा गे विलसतो ।। 94.1

 

गुलाबाचे पाणी, परिमलचि नानाविध अहा

सुगंधी कस्तूरी अमुप भरलेली तयि पहा

शशीबिंबामध्ये जल दिसतसे जे दुरुनिया

गुलाबाचे पाणी जननि विधि ठेवी भरुनिया ।। 94.2

 

सुधांशूच्या बिंबावर दिसतसे डाग नयना

असे कस्तूरीचा अनुपमचि ठेवाच सगळा

सुगंधी वस्तूंचा प्रतिदिन करी वापर सखे

तयाने चंद्राचा क्षय घडतसे रोज सखये ।। 94.3

 

परी ब्रह्मा ठेवी परत भरुनी वस्तु सगळ्या

तयाने पूर्णत्वा पुनरपि ये सोम सुखदा

कला चंद्राच्या ह्या प्रतिदिनिच येती अनुभवा

तयाचे हे वाटे मजसिच खरे कारण मना ।। 94.4

 

मित्रांनो,

अत्यंत गहन असा वेदांत उलगडून दाखवणारी, अद्वैताचं तत्त्व समजाऊन सांगतांना काळोखाला भेदणार्‍या सूर्यकिरणाप्रमाणे भेदक असलेली श्री आद्य शंकराचार्यांची अत्यंत गहन वाणी एखाद्या देवाचं वर्णन, स्तुती करतांना कधीकधी अत्यंत चतुर, मिश्किल, मुलायम होते. अंधाराला भेदणारा सूर्यकिरण मऊ ढगातून, ओल्या दवातून जातांना सप्तरंग पसरवतो अगदी तशी.

माता पार्वतीचं वर्णन करतांना तर त्यांच्या वाणीला असे काही धुमारे फुटतात की जणु रत्नमाणकांनांच  कोवळे तेजस्वी कोंब यावेत. आता एखाद्याची स्तुती करायची म्हणजे ती व्यक्ती इतरांहून किती श्रेष्ठ आहे हेही दाखवलेच पाहिजे. हे दाखवतांना मोठे चातुर्य अंगी लागते.

लोक धनाच्या मिषाने तर कधी विद्वत्ता लाभावी म्हणून  लक्ष्मीची वा सरस्वतीची उपासना करतात.  त्या उपासनेप्रमाणे देवी सरस्वती प्रसन्न झालीच तर सतत अशा भक्ताच्या मुखात वास करते. सतत त्याच्या जिह्वेवर राहते. लक्ष्मी प्रसन्न झाली तर हा भक्तवर जिथे जाईल तिथे ती त्याच्यामागे त्याच्या सेवेसी हजर असते. लक्ष्मी आणि सरस्वती जणु काही दासी होऊन अशा भक्तवरासोबत कायम असतात त्याला कधीही वार्‍यावर सोडत नाहीत. आणि म्हणून अशा पंडिताला बृहस्पती, वाचस्पती म्हणतात तर धनाढ्याला लक्ष्मीपती म्हणतात.

खरे तर ह्या पदव्यांमुळे  सरस्वती म्हणजे ब्रह्माणीचा पती  ब्रह्मा आणि लक्ष्मीचा पती विष्णू हे ह्या दोघींवर कायम नाराज असणे स्वाभाविकच आहे. असं म्हणतात की कुरबक, अशोक अशासारखे (पुल्लिंगी)  वृक्ष एखाद्या तरुण स्त्रीच्या स्पर्शाने फुलतात. त्याप्रमाणे सरस्वती आणि लक्ष्मी ह्याच्या सहवासाने अनेक वाचस्पती आणि लक्ष्मीपतींचे भाग्य फळफळते.

पण माता पार्वती म्हणजे देवी भवानी! ह्या भवसागरात जे जे आहे त्या सर्वांची माय. ही माय इतकी स्वामिनिष्ठ आहे की, तिचा सहवास ऐका शंभूशिवाय अन्य कोणाला मिळत नाही. ती काही आपल्या भक्तांच्या मागे मागे फिरतही नाही किंवा त्यांच्या जिभेच्या टोकावर वगैरे रहात नाही. तिने कोणाला जवळ केलं तर ती लहान बाळाप्रमाणे त्याला मांडीवर घेईल  आणि त्यामुळे तिच्या भक्ताला पार्वतीपती, भवानीपती अशी पदवी द्यायचं धाडस कधी कुणी करत नाही. एक सुंदर श्लोक संस्कृत नाही कळला तरी मराठीत आपल्यापुढे सादर आाहे.

    

कलत्रं वैधात्रं कति कति भजन्ते न कवयः

श्रियो देव्याः को वा न भवति पतिः कैरपि धनैः ।

महादेवं हित्वा तव सति सतीनामचरमे

कुचाभ्यामासङ्गः कुरवकतरोरप्यसुलभः ।। 96

तपश्चर्या मोठी करुन नर संपादिति कृपा

अहो वाग्देवीची तपुन कमलेचीच अथवा

सुविद्या लक्ष्मीही सततचि तया सोबत असे

म्हणोनी त्यां ``वाचस्पति’’ म्हणति ``लक्ष्मीपति’’ असे ।। 96.1

 

असो वाग्देवी वा कमलनयना श्रेष्ठ कमला

तुझा त्यांच्याहूनी कितिक पटिने श्रेष्ठ महिमा

पहाता निष्ठा ही तव प्रखर शंभुप्रति दृढा

धजे ना बोलाया कधि कुणिच गौरीपति कुणा ।। 96.2

 

अशोकासी वा त्या कुरबक तरूसीच फुलण्या

सुनारी देती त्या सुखकरचि आलिंगन पहा

असे वृक्षांसाठी समुचितचि हा  `दोहद’ विधी

तया वक्षस्पर्शे तरुवर सुखाने बहरती ।। 96.3

 

मिळे एका शंभू-सुरवर-शिवा भाग्य असले

तुझ्या स्पर्शाचा तो अनुभव शिवासी मिळतसे

रमा वाग्देवीच्या सहचि तुलना ना तव उमे

असे विश्वाची तू जननि तुजला वंदन असे ।। 96.4

 

ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली असावी ह्या संबंधी अनेक तर्कवितर्क केले जातात. कोणी बिगबँग थेअरी सांगतो. कोणी अजून काही. देव हा प्रकार (दाखवता येऊ शकल्याने) शास्त्राला अमान्य असल्याने वेगवेगळे नियम लावून पाश्चिमात्य त्याला शास्त्रीय आधार देत समजाऊ पहातात. पण शेवटी अनुमानापलिकडे, तर्कापलिकडे कोणी जाऊ शकत नाही. आपण त्याला नेति नेति म्हणतो.  

आपल्याकडे भारतीय तत्त्वज्ञानही पायर्‍या पायर्‍यांनी ह्या ब्रह्मांडाच्या उत्पत्ती पर्यंत जायचा प्रयत्न करतं. एक मोठी शक्ती हे ब्रह्मांड बनवायला आणि परत त्याचा लय करायला कारणीभूत आहे. ह्या महाशक्तीलाच तीन पुरांची माता म्हणून त्रिपुरसुंदरी, महाशक्ती, महामाया म्हटलं आहे शक्ती हा शब्द जरी स्त्रीलिंगी असला तरी शक्ती ना स्त्रीलिंगी आहे ना पुल्लिंगी. पण ती कल्याणकारी आहे म्हणून तिला शिवा म्हणा वा शिव म्हणा दोन्ही एकच! ज्या शक्तीने हे ब्रह्मांड जन्माला आलं तीच शक्ती त्याचं नियमन करते.

कोणी म्हणेल की छे छे पदार्थविज्ञानाचे , रसायन शास्त्राचे वा इतर शास्त्रांचे नियम असतात त्यानुसार जग चालतं. पण ते नियम कोणी तयार केले? हा प्रश्न राहतोच. आणि नियम असले तरी ते वापरून कार्य करणारा कर्ता ही लागतोच. एखाद्या बरड माळरानावर गुलाबाची बाग फुललेली पाहून नक्कीच ती कोणीतरी लावली आहे. कोणी तरी तिची काळजी घेतो आहे हे सांगायला लागत नाही. भले तो माळी त्यावेळेला त्याच्या घरी बसला असेल.

 हया ब्रह्मांडाची रचना असो वा आपल्या शरीराची! किती गुंतागुंतीची, किती गहन, किती जटिल, किती क्लिष्ट आहे. इतकी जटिल रचना काय आपोआप तयार होईल? कोणी तरी शक्ती, कोणी तरी ताकद ही रचना करत असणारच; भले मला ती ताकद दिसत नसली तरी मी अनुमान तर लावू शकतो ना! ( पुष्पदंत- महिम्न) विद्युत शक्ती कुठे दिसते? पण परिणाम तर दिसतो ना. कुठलीच ताकद/शक्ती दिसत नाही परिणाम दिसतोही प्रचंड ताकद अंश रूपात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकात दिसून येते. त्यामुळे कामे होत राहतात. ती अंशरूप ताकद माझ्यात आहे, मी त्या भगवंतरूप, महाप्रचंड शक्तीसागराचा तरंग आहे म्हणून त्या शक्तीला तारंग तर कोणी म्हणू शकत नाहीत. असं सुंदर उदाहरण श्री आद्य शंकराचार्य त्यांच्या षट्पदी स्तोत्रात देतात.

 शिवानंदलहरीत ह्या नियमन करणार्‍या शक्तीला शिवरूपात पाहून त्याला उद्दशून शंकराचार्य म्हणतात हे देवा मी तुझा क्रीडामृग (पाळीव प्राणी) आहे. मी जसं वागावं असं तुला वाटतं तसं तू माझ्याडून वागवून घेतोस हे ठीकच आहे. त्यानी तुला आनंद मिळत असेल तर मला तेही मान्य आहे.

हे जगज्जननी, महाशक्तिमाते,

 कोणी तुला मतिदात्री सरस्वती म्हणजेच विधात्याची पत्नी ब्रह्माणी समजतात. कुणी धन देणारी लक्ष्मी म्हणून तुझी पूजा करतात कोणी पर्वतपुत्री पार्वती, त्या रुद्राची अर्धागिनीही मानतात. त्याही शक्तिरूपात अस्तित्त्वात आहेत.  कोणी विवेकरूपानी विद्या देण्याचं काम करते. कोणी धन मिळविण्याची कला देते. तुझी अंशरूप ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे त्या ही कामं करत असतात. पण त्यांनाही ताकद देण्याचं काम तुझचं!---- अथवा तुझ्यारूपातच त्या लीन आहेत.

ब्रह्मांडी ते पिंडी हेही खरं आहे. त्यामुळे ही ताकद प्रत्येकात विवेकरूपाने रहातेच. हा विवेकदीप मला माझ्या जीवनाच्या पथावर योग्य वाट दाखवत राहतो. हे जगज्जननी तो विवेकदीप तू आहेस. मी तुला वंदन करतो.  

गिरामाहुर्देवीं द्रुहिण-गृहिणीमागमविदो

हरेः पत्नीं पद्मां हरसहचरीमद्रितनयाम्।

तुरीया कापि त्वं दुरधिगम-निःसीम-महिमा

महामाया विश्वं भ्रमयसि परब्रहममहिषि ।। 97

तुला माते वाणी म्हणति मतिदात्री कुणिच हे

महाकाली कोणी कुणि म्हणति लक्ष्मीच कमले

कधी रुद्राची त्या म्हणति तुज अर्धांगिनि सखे

कधी अद्रीकन्या म्हणति तुजला पार्वति सुखे ।। 97.1

 

खरे पाहू जाता सकल असती ही तव रुपे

महामाया तूची असशिच महाशक्ति स्वरुपे

असे ह्या रूपांच्या अति पलिकडे स्थान तव गे

चिदानंदामध्ये अविरतचि तू मग्न सुभगे ।। 97.2

 

अहो विश्वाचे जी सहजचि संचालन करे

महाशक्ती ती गे अजुन कळली ना कधिच गे!

तुझ्या सामर्थ्याने अति सुगम ब्रह्मांड फिरते

परी माते तूची दुरधिगम ना आकळतसे ।। 97.3

 

तुरीया तू माते जनन-मरणाच्या पलिकडे

तुझ्या विस्ताराचा मज दिसतो अंतचि शिवे

तुझ्या ह्या तत्त्वाचे स्मरण मजला नित्य घडु दे

तुझ्या पायी माझे नमन  मम हे शक्तिस्वरुपे ।। 97.4

 

मूल वडिलांच्या पानातील घास घेऊन वडिलांनाच भरवते. आई कडूनच भातुकलीसाठी घेतलेल्या गुळदाण्यामधल्या एका दाण्यात गूळ भरून छकुली आईला लाडू म्हणून खायला लावते. माय, मी केलेली ही तुझी स्तुती अगदी तशीच आहे.

तूच हे विस्तृत शब्द भांडार आहेस त्याचा अर्थही तूच आहेस आणि ह्या विशाल पदार्थसृष्टीचे शब्द आणि अर्थाच्या सहाय्याने माझ्या देहात त्यांच्या आकलनाच्या रूपाने स्फुरण पावणारे ज्ञानही तूच आहेस.

हे माय तुझ्याच शब्द भांडारातील दोन शब्द घेऊन मी तुझी स्तुती करत आहे. सूर्याला काडवातीने ओवाळावे, गंगेला तिच्याच पाण्याचे अर्घ्य द्यावे, चंद्राच्या चांदण्याने विरघळलेल्या चंद्रकांत मण्याच्या रसाने चंद्राची पूजा करावी तशी माझी ही वाङ्मयीन पूजा आहे.

कुठे तो इंद्राचा ऐरावत आणि कुठे ती श्यामभटाची तट्टाणी! त्याप्रमाणेच माय कुठे तुझे सम्राटांच्या सम्राटाचेही डोळे दिपतील असे असीम ऐश्वर्य आणि कठे माझे दोन शब्द! कुठे तुझे अतुलनीय ज्ञान भांडार आणि कुठे माझे चिमुटभर स्तुतिशब्द! कुठे काही तुलना तरी होऊ शकेल का? तुलना होण्यासाठी दोन गोष्टी तुल्यबल लागतात.

पण हे माय गे!  आपल्या मुलानी आपल्याच पानातून सांडत सांडत भरवलेल्या घासातील दोन शिते जरी पित्याच्या मुखात गेली तरी त्याला धन्य वाटतं. मातीत खेळून आलेला बाळ धावत येऊन आईच्या गळ्यात पडला तर कपडे खराब झाल्याचे जराही दुःख न वाटता जननी धन्य होते त्याप्रमाणे स्तुती म्हणून रचलेले हे माझे दोन वेडेवाकडे शब्द गोड मानून घे माय!

 

प्रदीपज्वालाभिर्दिवसकर-नीराजनविधिः

सुधासूतेश्चन्द्रोपल-जल-लवैरर्घ्यरचना ।

स्वकीयैरम्भोभिः सलिल-निधि-सौहत्य-करणं

त्वदीयाभिर्वाग्भिस्तव ननि वाचां स्तुतिरियम् ।। 100 ।।

जसे ओवाळावे उजळुनि दिवा त्या दिनकरा

करावे गंगेसी जल लव तिचे अर्पण पुन्हा

नभीच्या चंद्राने विरघळत जो चंद्रमणि त्या

रसाने त्याच्या त्या रजनिकर पूजाविधि करा ।।100.1

 

तशी दो शब्दांनी स्तुति तवचि शब्दांकित अशी

असे मी केलेली लव उचलुनी शब्द-धन ची

जिच्या विस्तारासी नच जगति सीमाच कुठली

अशा वाणीची तू जननि असशी अमृतमयी ।।100.2

 

कुठे ऐश्वर्याचा अमित तव विस्तार बरवा

स्तुती कोठे माझी फुटकळ असे क्षुद्र सकला

नसे दोन्हीची गे जननि तुलना ती लवभरी

परी घे मानुनी मधुर तव पुत्राचिच कृती ।।100.3

---------------------------------------------------------------

 

 

 

 

 

1 comment:

  1. Marathit arth vachoon n marathit laybadhtet shlok aikoon tar khup khup manala chan vatat aahey,koti,koti pranam taila

    ReplyDelete