**।। सौन्दर्यलहरी ।।** श्लोकार्थ


      **।। सौन्दर्यरी ।।** श्लोकार्थ


* शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं

नचेदेवं देवो खलु कुशलः स्पन्दितुमपि

अतस्त्वामाराध्यां हरि हर विरिञ्चादिभिरपि

प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ।। 1 ।। *

{ अन्वय - देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं नचेत् सः स्पन्दितुं अपि खलु कुशलः न। अतः हरि-हर-विरिञ्चिदिभिः अपि आराध्यां त्वा प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ।।}

 

* शिवाला शक्तीची जरि मिळते जोड लवही

तरी येई त्याला बहु विकलता पांगुळवि जी

विना शक्ती विश्वंभर शिव शवाच्या सम उरे

विना शक्ती होती सुरहि सगळे आगतिक गे ।।1.1।।

 

 न शक्तीवाचूनी घडत जगती कार्य कुठले

असो ते मोठे वा अति अतिच वा क्षुद्र कुठले

कराया कृत्ये वा सहज घडण्या स्पन्दन-गती

न शक्तीवाचूनी सुरसमिप पर्याय जगती ।।1.2।।

 

म्हणोनी आराध्या म्हणति तुज ब्रह्मा हर हरी

तुझी प्राप्ती माते कठिण; जरि ना पुण्य पदरी

असे गाठी ज्याच्या अति विमल ते पुण्य विपुला

तया होते बुद्धी, नमन स्तवनासीच तुझिया ।। 1.3 ।।*

--------------------------

 

तनीयांसं पांसुं तव चरणपङ्केरूहभवं 

विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम्

वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसां

हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ।। 2 ।।

{अन्वय - हे भगवती! विरिञ्चिः तव चरणपङ्केरूहभवं तनीयांसं पांसुं सचिन्वन् लोकान् अविकलं विरचयति शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति। हरः एनं संक्षुद्य भसितोद्धूलनविधिं भजति }

( तनीयांसं – तनु – अगदी छोटासाा कण, तनीयांसं-त्या कणापेक्षाही छोटा म्हणजे सर्वात लहान कणिका म्हणुया हवतर ; पांसुं- धूलीकण, तनीयांसं पांसुं- धुळीची कणिका ; पङ्केरुह - पंक म्हणजे चिखलातून उत्पन्न झालेले कमळ. चरणपङ्केरुहभवं - चरणकमळ ; विरिञ्चि - ब्रह्मदेव ; अविकल – अक्षत, सतत, निरंतर; शौरी - विष्णू ; कथमपि - कसेबसे, कसेतरी; संक्षुद्य – सम्  क्षुद् – तुडवणे, ठेचणे, विनाश करणे, तांडवाने छिन्नभिन्न नष्ट करणे.  ; भसित - जळून भस्म झालेले.)

* जरी कार्ये मोठी हर हरि विधी पूर्ण करिती

परी सामग्रीची गरज करण्या पूर्ण सगळी

विधी घेई माते चरणकमळातून तुझिया

परागासी एका सकल जग साकार करण्या ।। 2.1

 

पुर्‍या त्रैलोक्याच्या सहज प्रतिपाळास हरिला

पुरे होई धूलीकण चरणिचा एक तुझिया

कणार्धासी त्या गे शिरि उचलिता तो लटपटे

सहस्राशीर्षांचा  सबळ हरिही तो डगमगे ।। 2.2

 

जगाच्या संहारा चरणरज माते उचलुनी

निजांगी भस्माचा शिव करितसे लेपनविधी

तिघांचा चाले हा जगि अजुनही खेळ बरवा

अहो उत्पत्ती वा स्थिति विलय अव्याहत असा ।।2.3 ।।

 

मिळे ह्या तीघांना तुजकडुन स्फूर्ती सतत ही

असे तू चिच्छक्ती भरुन उरली ह्या त्रिभुवनी

कळावा कैसा तो जननि तव हा व्यापकपणा

कसा जाणावा तो जननि महिमा थोर तव हा ।। 2.4 ।।*

--------------------------


*अविद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी

जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी

दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका, जन्मजलधौ

निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ।। 3 ।।*

(अन्वय – हे मातः तवचरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रा मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति?)

 (स्तबक - पुष्पगुच्छ, फुलांचा तुरा, फुलोरा; गुणनिकाराशी, माळ. झरी -निर्झर, झरा, नदी. स्रुति- वाहणे, टपकणे, अर्क निघणे / धारा, रसप्रवहण, स्राव. मुररिपुवराहस्य दंष्ट्रा – विष्णुरूपी वराहाची दाढ. )

*सहस्रार्चि प्राचीवर उगविता तो प्रतिदिनी

हजारो तेजस्वी किरण पसरोनीच भवती

घडे जैसी प्राचीवर जणु प्रकाशीत नगरी

तसे माते पद्मासम चरण हे दिव्य तवची ।। 3.1

 

घडे ज्याच्या चित्ती तवचरण सूर्योदय असा

मनोबोधे त्यांचे मनक्षितिज हो उज्ज्वल अहा

तयाने अज्ञांचे सहज विरते अज्ञपण ते

तुझ्या तेजांशाने कुमति-नर चाणाक्षचि घडे ।। 3.2

 

सुगंधी पुष्पांचे फुलतिच फुलोरे तरुवरी

किड्यांना भुंग्यांना मधुर मध तो तृप्तचि करी

तसा मंदांसाठी पद - सुमन - संभार तव गे

जयी चैतन्याचा जणु मधुमयी निर्झर झरे ।। 3.3

 

दरिद्र्यांचे सार्‍या हरण करण्या दैन्य अवघे

तुझी माते चिंतामणिमयचि माले सम पदे

समुद्री जे सारे जनन मरणाच्याच बुडती

तयांच्या उद्धारा त्वरित नित ये धावुन हरी ।। 3.4

 

वराहा रूपासी हरि करितसे धारण स्वये

सुळ्याने ज्या एका हरि धरणिसी तोलुन धरे

सुळा विष्णूचा तो असशी जननी तू कणखर

जनांसी काढाया भव - जलधि - पंकातुन वर ।। 3.5 ।।

 

अगे माते ऐसी महति तव गे ज्ञात मजला

म्हणोनी उत्साहे तव स्तुतिस प्रारंभ करिता

``असे हा अज्ञानी नच लव असे पात्र’’ म्हणणे

नसे तर्कासीही कधिच पटणारे जननि गे ।। 3.6

 

कृपाळू माता तू; जननि तव मी बाळचि असे

दया ना येई गे तुजसि मम ऐसे कधि घडे

कृपा अज्ञासीही सदयहृदये तज्ज्ञ करते

अनन्या बाळा ह्या करशिल कशी दूर सदये ।। 3.7*

--------------------------


*त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः

त्वमेका नैवासि प्रकटितवराऽभीत्यभिनया

भयात्त्रातुं दातुं फलमपि वाञ्छासमधिकं

शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ ।। 4 ।।*

(अन्वय – ``हे मातः जगज्जननि! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवराऽभीत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये! हि भयात् त्रातुं अपि च वाञ्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः । 2 ’’)

*करा उंचावोनी अभयवर मुद्राचि बघता

गमे देवांचा हा अभिनयचि आकर्षक मला

तुझ्या वाचोनी का सुरसमिप सामर्थ्य असले

विना शक्ती कैसे अभय दिधणे संभव असे ।। 4.1।।

 

असे स्फूर्ती शक्ती सकल बल चैतन्य अवघे

 अगे तू देवांचे; चलनवलना प्रेरित करे

करया विश्वाचे नियमनचि देवांकडुन हे

तुझ्या संकेताचे लवभरचि उत्तेजन पुरे ।। 4.2 ।।

 

तुला बाकी देवांसम अभिनयाची गरज ना

तोलामोलाचे तुजसमचि जाण्या शरण वा

निवाराया भीती तव चरण हे सक्षम भले

मनीषेहूनीही किति अधिक देती पद तुझे ।। 4.3 ।।*

--------------------------

*हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं

पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत्

स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा

मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्  ।। 5 ।।*

(अन्वय – ‘‘ हे मातः! हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि।’’ )

( रति-नयन-लेह्येन वपुषा – नेत्रांनी रति चाटून घेत आहे अशा शरीराने. प्रणत-जन-सौभाग्यजननी- नम्र झालेल्या लोकांना सौभाग्य देणारी जननि. स्मर - मदन )

* अगे माते येती शरण चरणी भक्त तुझिया

तयांना देसी तू सुख सुधन सौभाग्य सकला ।

करे विष्णू सेवा चरणकमलांचीच म्हणुनी

प्रसन्ना देसी तू अतुलनिय सामर्थ्य हरिसी ।। 5.1

 

कृपेने शक्तीच्या हरि मिळवि सामर्थ्य इतुके

महेशालाही तो भुलवि अपुल्या मोहिनिरुपे

शिवक्रोधाने जो मदन जळुनी जाय जननी

तुला येता तोची शरण; मिळवी दिव्य तनुसी ।। 5.2

 

तयाच्या डौलाने भुललि रति लावण्यखणि गे

अनंगाची काया जणु पिऊन टाकेचि नयने

तुझ्या आशीषाने मदन बनला विश्वविजयी

मुनींच्या निर्मोही हृदि उपजवी मोह सहजी ।। 5.3 ।।*

--------------------------


*धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः

वसन्तः सामन्तो मलय-मरुदायोधन-रथः

तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपाम्

अपाङ्गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते ।। 6 ।।*

( अन्वय – ``हे हिमगिरिसुते! अनङ्गः ते अपाङ्गात् कां अपि कृपां लब्ध्वा इदं सर्वं जगत् एकः विजयते’’ )

(मौर्वी – धनुष्याची दोरी. विशिख – बाण. अनङ्ग – ज्याला अंग म्हणजे शरीर नाही असा, म्हणजे मदन. हिमगिरी – हिमालय, हिमगिरिसुता - हिमालयाची मुलगी पार्वती. अपाङ्ग – तिरकी नजर)

*अनंगा हातीच्या कुसुम धनुला त्राण कितिसा

तयाला बांधाया भ्रमरमय  तो दोर लटिका

जगाला विंधाया असति अवघे पाच शर ते

वसंताची राहे मदत अवघी तीन महिने ।। 6.1

 

पत्ता आकारा, मलय-पवना त्या रथ म्हणे

करे सार्‍या विश्वावर नित चढाई हिमतिने

अनंगा ना काया परि ठरतसे विश्वविजयी

कृपादृष्टी माते क्षणभर तुझी काय करी? ।। 6.2 ।।*

--------------------------


*क्वणत्काञ्चीदामा करिकलभ-कुम्भस्तननता

परिक्षीणा मध्ये परिणत-शरच्चन्द्र-वदना

धनुर्बाणान्पाशं सृणिमपि दधाना करतलैः

पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहोपुरुषिका ।। 7 ।।*

(काञ्चीदाम - कमरपट्टा ; परिक्षीणा - कृश ; परिणता – झुकलेली वा नम्र  सृणि - अंकुश ;  पुरस्तात् - पुढे, येथे हृदयमंदिरात करि- हत्ती, कलभ – हत्तीचं पिलु. करिकलभ-कुम्भस्तननता – हत्तीच्या पिल्लाच्या गंडस्थळाप्रमाणे असलेल्या स्तनांमुळे किंचित खाली झुकलेली )

               

                *सुवर्णाचा शोभे कटि कमरपट्टा सुबकसा

तयाच्या छोट्याशा किणकिणति घंटा मधुरशा

स्वस्तन्याने पोशी सकल जगता प्रेममय जी

असे वात्सल्याची जणु सगुण मूर्तीच जननी ।। 7.1

 

स्तनांच्या भाराने  अति विनयशीला गमतसे

कराया विश्वाचे भरण नित तू तत्पर असे

सदा ध्यानासाठी स्मरण करता सिंहकटि ही

कटीभागी होई कृश मुनिजने ध्यान करुनी ।। 7.2

 

मुखा वर्णू कैसे शरद पुनवेच्या शशिसमा

सुखाचा ठेवा हा अनुपम सुधेनेचि भरला

धरी शस्त्रे सारी कुसुम शर लावून धनुला

खळांना दंडाया दृढमतिच पाशांकुशयुता ।। 7.3

 

जिच्या सामर्थ्याने शिव करितसे विश्वचि सुखी

जगी ख्याती होई शिव नित असे मंगलमयी

असे कल्याणाची सगुण जणु मूर्तीच शिव हा

असे तू त्याचा हा सकलचि अहंकार बरवा ।। 7.4

 

शिवाचे ओजस्वीपण सकल उत्साह तयिचा

अगे माते तू त्या परम पुरुषाची पुरुषिका

तुझी मूर्ती राहो सतत नयनांच्याच पुढती   

सदा राही माझ्या हृदयकमली तूच जननी ।। 7.5 ।।*

--------------------------


( श्री चक्राचे वर्णन पाहिले तर तेथे एकात एक असलेली नऊ चक्रे वा आवरणे आहेत. बाहेरून श्रीयंत्रात प्रवेश करतांना तिसरे आवरण पार करून आत आल्यावर सर्व बाजूंनी मोकळा वर्तुळाकार भव्य प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर म्हणतात. ह्या सुधासागरात पुढे मोठे द्वीप दृष्टीला पडेल याच द्वीपाला मणिद्वीप म्हणतात. पुढे श्लोक 9, 10, 11 मधे त्याचे वर्णन आहे.)

 

*सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपि-वाटी-परिवृते

मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे

शिवाकारे मञ्चे परमशिव-पर्यङ्क-निलयां

भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ।। 8 ।।*

( नीप कदंबवृक्ष, विटपिन् – वृक्ष. सुरविटपि- कल्पवृक्ष, देवांना आवाडणारे वृक्ष. वाटी – ज्या भूखंडावर भवन बांधले आहे अशी जागा वा उद्यान, उपवन, फलोद्यान. निलय – एखाद्या स्थानावर उतरणे, राहणे वा घर. कतिचन – कित्येक, कितीतरी )

*सुधा सिंधु मध्ये सुखद सजल्या रम्यचि स्थळी

चहूबाजूंनी त्या खळखळत पीयूष लहरी

तिथे ऐश्वर्याने नटुन बसले द्वीपचि भले

अमूल्या रत्नांनी  कितिक तयिचे वैभव खुले ।। 8.1

अशा रत्नद्वीपावर बहरल्या नंदनवनी

कदंबाच्या रम्या परिमलयुता त्या उपवनी

जिथे चिंता सारी मिटुन सुख होईच हृदयी

अशा सौंदर्याच्या विभवयुत चिंतामणिगृही ।। 8.2

 

पलंगी सौख्याच्या शिवमय शिवाकार बनुनी

 शिवे! तेजोमूर्ती !  परमशिवसंगे पहुडसी

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करती जेचि विरळे

जगी तेची माते सुजन बहु ते धन्य सगळे ।। 8.3*

--------------------------


( शरीरात सहा चक्रे असतात. खालपासून वरपर्यंत त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे असतो

सर्वात खाली गुदद्वाराशी मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्त्वाचे आहे.  चार दलांच्या कमलाप्रमाणे आहे.

त्याच्यावर उपस्थेन्द्रियाच्या(जननेंद्रियाच्या) जवळ स्वाधिष्ठानचक्र अग्नितत्त्वाचे आहे. सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे 

 मणिपूरजलतत्त्वाचे आहे. हे नाभीच्या मागच्या बाजूस पाठीच्या कण्याच्या आत परंतु मज्जारज्जूच्या बाहेर असते. दहा दलांच्या कमळाप्रमाणे आहे.

हृदयाजवळ अनाहत चक्र- वायु तत्त्व बारा दलांच्या कमळाप्रमाणे आहे.

कंठस्थानी विशुद्धिचक्र -आकाशतत्त्व , या चक्राला  सोळा पाकळ्या आहेत.

भ्रूमध्यप्रदेशी आज्ञाचक्र- मनस्तत्त्व) या चक्राला  दोन पाकळ्या आहेत.

षट्चक्रोपरि संस्थिता म्हणजे ह्या साही चक्रांच्या वर सर्वश्रेष्ठ जागी सहस्र दल कमलात चित् शक्ती रूपी कुंडलिनी स्वरूप श्री त्रिपुराम्बिका राहते.

 

*महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं

स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि

मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं

सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ।। 9 ।।*

( हे मातः त्वं मूलधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थितं हुतवहं अपि, हृदि मरुतं, उपरि आकाशं भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्यासह विहरसे )

( कं - पाणी , कुलपथ- सुषुम्ना मार्ग वा देहातील सहा चक्रे. वा कुल म्हणजे प्रकृतीच्या निर्मितीचा पसारा. शिव हा निर्माता नाही म्हणून तो अकुल आहे. साधकाने अनेकांकडून एकत्वाकडे जायचे आहे. म्हणून त्याला कुलाच्या पलीकडे जावे लागते. तो जाण्याचा मार्ग अर्थात कुलपथ.  भित्त्वा – भेदन करून, फोडून. भ्रूमध्य – दोन भुवयांचा मध्यभाग. रहसि – गुप्तपणे, एकान्तात)

 

*अगे मूलाधारी सहज धरणी भेदन करी

जलासी भेदी तू जननि मणिपूरी सहजची

अगे स्वाधिष्ठानी करुन अनला भेदन पुढे

हृदी वायू भेदी अनहतचि चक्रामधिल गे ।। 9.1

 

वरी कंठी भेदी गगनचि विशुद्धी मधिल ते

करी आज्ञाचक्रामधिल मन-भेदा जननि गे 

सहा चक्रे देही अति सहज भेदून जननी

सुषुम्ना मार्गाचा अति सहज तू भेद करिसी ।। 9.2

 

असे मूर्ध्नी जेची कमळचि सहस्रादलमयी

तिथे मूर्धस्थानी पतिसह एकान्ति  रमसी

तुझ्या ह्या रूपाचे करति मुनि जे ध्यान हृदयी

चिदानंदामध्ये रमति जन ते धन्य जगती ।। 9.3*



श्रीयंत्र



----------------------------

श्लोक 10

मागच्या 9व्या श्लोकात मूलाधार चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठान चक्रावर एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोपलेली कुंडलिनी जागृत झाल्यावर ती शरीरातील सहा चक्रांचे भेदन करून मस्तकात असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमळातील चंद्रमंडलात विहार करते असे सांगितले होते.

मूर्धस्थानी असलेले सहस्रदलकमल हे जणु काही श्रीचक्ररूप आहे. श्रीचक्र हे शिवशक्तीरूप पूर्ण तत्त्वाचे अधिष्ठान आहे. श्रीचक्रात ज्याप्रमाणे चक्रे आाहेत त्या्रमाणे आापल्या शरीरातही 6 चक्रे आहेत.

श्रीचक्राच्या सर्वात बाहेर तीन रेघांचा चौरस/ चतुष्कोण असतो ह्याला भूपुर असे म्हणतात. ह्याला चार बाजूला असलेली चार दारे ह्या भूपुरालााच संलग्न/ त्याचाच भाग असतात त्यातून आत प्रवेश केला की थोडी मोकळी जागा सोडून एकाच्या आत एक अशी 3 वर्तुळे ही बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत. ह्या वर्तुळांच्या आत 16 पाकळ्यांचे कमळ आहे. त्याच्या आत आठ पाकळ्यांचे कमळ आहे. ह्या अष्टदश कमलाच्या आत प्रथम सर्वबाजूंनी मोकळा असलेला वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या वर्तुळाकार प्रदेशात अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पाच चक्रे दिसतील. त्यांच्या मधे असलेले त्रिकोण आणि चक्रांची नावे खालील प्रमाणे

 पहिले चक्र -  चौदा त्रिकोण – चतुर्दशाकार

दुसरे चक्र – 10 त्रिकोण – बहिर्दशार

तिसरे चक्र – 10 त्रिकोण - अन्तर्दशार

 चौथे चक्र – 8 त्रिकोण – अष्टकोण / वसुकोण

पाचवे चक्र – 1 त्रिकोण – शुद्ध त्रिकोण

 श्रीचक्राप्रमाणे सहस्रदलकमलातील श्री चक्रात सर्व कलांनी परिपूर्ण वृद्धी-क्षय विरहित आणि निष्कलंक असे चंद्रमंडल आहे. श्रीचक्राच्या सर्वात आतल्या शुद्ध त्रिकोणात जसा मध्यवर्ती बिंदू आहे त्याप्रमाणे सहस्रदल कमलातील श्री चक्रात हा पूर्णचंद्र विराजमान झालेला आहे. तेथेच श्री ललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवतत्त्वासी समरस होऊन सामरस्याने/ समरस होऊन विहरत असते.

याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शाने स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्राव होत असतो. व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर शरीराचेही परिपोषण होत असते. असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धांत आहे.

रसाम्नायमहस् ह्या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. येथे रसांची परिपूर्ण अभिवृद्धी असते. महस् म्हणजे तेजोमय, कांतिरूप असलेला चंद्र. त्या चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीने साधकाच्या नाड्यांचे व देहाचे पोषण होते.

हे सर्व कार्य कुंडलनीच्या रूपाने चालत असते. त्यानंतर  ही कुंडलिनी खाली उतरते. व पुन्हा आपल्या प्रदेशात म्हणजे मूलाधारचक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठान चक्रामधे सापाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालुन झोप घेत असते. ती तिची निद्रा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यात तोंड घालून होत असते. त्या ठिकाणी असलेल्या सुषुम्ना नाडीचा मार्गही तिने आपल्या मुखाने अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी आणि लं हे अक्षर पृथ्वीचे बीज मानले जाते म्हणून आधार चक्राला कुल म्हटले जाते. आधारचक्र मध्यभागी खोलगट असल्याने त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडातही सूक्ष्म छिद्र आहे त्यालाच आचार्यांनी `कुहर’ असे म्हटले आहे. इडा आणि पिंगला ह्यांच्यामधे असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचे मुख झाकलेले असल्याने तेथे प्राणवायूचा प्रवेश होत नाही. व जो पर्यंत तेथे प्राणवायू पोचत नाही तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाही.  जोपर्यंत अंतर्मुखता नाही तोपर्यंत मनाला स्वस्थता लाभत नाही. समाधान मिळत नाही. अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणे आवश्यक आहे. ते कुंडलिनी जागृत झाली की मगच होते.

*सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः

प्रपञ्चं सिञ्चन्ती पुनरपि रसाम्नाय-महसः

अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं

स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ।। 10 ।।*

*अगे माते कैसी चरण युगुले वर्णु तव गे

सुधेची सौख्याची जणु सुखद निस्यंदिनि असे

तयातूनी धारा अविरत स्रवे अमृतमयी

तयाच्या वर्षावे सकल शरिरा तृप्त करिसी ।। 10.1

 

शरीरी नाड्यांच्या सकल समुहा शिंपण करी

शरीरा नाड्यांना तयि मिळतसे पुष्टि बरवी

पुन्हा येसी खाली उतरुन तुझ्या पूर्व स्थितिसी

करोनी वेटोळे पुनरपि स्वस्थानि बससी ।। 10.2

 

तुझी साडेतीनी वलयचि भुजंगासम दिसे

पुन्हा मूलाधारी अनुभवित झोपेसचि सुखे

शिरे चक्राधारी पुनरपिच रंध्रात सहजी

तुझ्या ह्या खेळाने जननि उपकारास करिसी ।।10.3*

----------------------------

*चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि

प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः

चतुश्चत्वारिंशद्वसुदल-कलाश्र-त्रिवलय-

त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ।। 11 ।।*

( ``हे मातः त्रिपुरसुन्दरी ! चतुर्भिः श्रीकण्ठैः शम्भोः सकाशात् प्रभिन्नाभिः पञ्चभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरण कोणाः वसुदल-कलाश्र-त्रिवलय-त्रिरेखाभिः सार्धं परिणतः सन्तः चतुश्चत्वारिंशत् भवन्ति ।)

*असे जे सांबाचे प्रतिक जणु श्री यंत्र बरवे

शिवाचे शक्तीचे सुखद वसतिस्थान नित जे

त्रिकोणांचे चारी नित असतसे उर्ध्वमुख ज्या

असे शंभूरूपी प्रतिक तयि श्रीकंठ समजा ।। 11.1

 

असे केंद्रामध्ये शिवप्रतिक जो बिंदु शिव हा

असे तो शक्तिचे नितचि वसतिस्थान बरवा

तिथे तादात्म्याने वसत शिवअंकी नित शिवा

असे बिंदुस्थानी शिवसहचि शक्ती वसतिला ।। 11.2

 

शिवाशक्तीरूपी प्रतिकमय जो बिंदु इवला

तयाखाली शक्तिस्वरुपचि त्रिकोणांस बरव्या

अधोमूखी पाचांस शिवयुवती नाव दिधले

प्रपंचा विश्वाच्या असति नउ हे कारण भले ।। 11.3

 

नऊ त्रीकोणांसी विलगचि करे बिंदु मधला

पुर्‍या त्रेचाळीसा धरुनचि त्रिकोणांस सगळ्या

तयामध्ये बिंदू मिळवुनिच तो एक मधला

पुरे चव्वेचाळीस मिळुनचि श्रीयंत्र घडता ।।11.4

 

त्रिकोणांसी वेढी कमल-दल ते आठ मिळुनी

तयांच्या बाहेरी कमलदल सोळा उमलती

असे त्री रेघांचे वलय कमलांच्या पुढती ते

असे श्रीयंत्राच्या भवति जणु ती मेखलचि गे ।। 11.5

 

त्रिरेघांनी युक्ता भवतिच चतुःष्कोण सजती

असे ये पूर्णत्वा जननि तव श्रीयंत्रस्वरुपी

मना मोही तेची सुखद तव राऊळ जननी

तयाची वर्णाया महति नच मी पात्र जननी  ।। 11.6*

----------------------------


  श्रीयंत्राची माहिती-



श्री चक्राची अधोमुख त्रिकोण असलेली आपल्याकडची बाजू पश्चिम समजून बाकी दिशा ठरवल्या जातात.  आपल्याकडील बाजू ही पश्चिम प्रमाण मानून वरची बाजू पूर्व; आपल्या उजव्या हाताची बाजू दक्षिण डाव्या हाताची बाजू उत्तर येते. डाव्या हातचा वरचा कोपरा इशान्य, डावीकडचा खालचा कोपरा वायव्य; उजवीकडचा वरचा कोपरा अग्नेय तर उजवीकडचा खालचा कोपरा नैऋत्य दिशा येते.

 श्रीचक्राला 9 आवरणे असतात. प्रत्येकाला चक्र म्हणतात. सर्वात बाहेरून आत येतांना सर्वात बाहेरचे

1 चतुष्कोणाकार भूपुर - ह्यालाच त्रैलोक्य मोहनचक्र -असे म्हणतात. ह्याच्या चारी दिशांना चार दारे आहेत. तीन रेघा म्हणजे जणु मंदिराचे तीन प्राकार आहेत पहिली रेषा शुक्ल, दुसरी अरुण तिसरी पिवळ्या रंगाची आहे.

पहिल्या रेषेने तयार झालेल्या चौकोनाच्या चारी दरवाजात, चारी कोपर्‍यात व पश्चिम रेघेच्या (सर्वात आपल्याकडील) उजवीकडील अर्धभागात तर सर्वात वर म्हणजे पूर्व रेषेवरील डावीकडील अर्धभागात दहा प्रकारच्या सिद्धी व त्या सिद्धींच्या अधिष्ठात्री देवता विराजमान असतात.

अणिमा - देह अणुसमान सूक्ष्म करणे. ज्यामुळे कोणी त्याला पाहू शकत नाही.), महिमा - देह असीम विशाल करणे),

लघिमा - शरीराचा भार/वजन अत्यंत हलके करू न वार्‍याच्या वेगाने उडता येणे),  गरिमा - शरीराचा आकार न बदलता त्याला इतके जड करणे की कोणि त्याला हलवू शकणार नाही.),

 प्राप्ति – ह्यात साधकाला कोणीही अडवू शकत नाही. कोणीही न आडवता तो जेथे जाये असेल तेथे सर्वांसमक्ष अदृश्य होऊन जाऊ शकतो. कोणी त्याला पाहू शकत नाही वा अडवू शकत नाही.

प्राकाम्य – समोरच्याने मनोगत व्यक्त न करताही साधक कोणाच्याहि मनातील विचार सज समजू शकतो.

ईशित्व – साधक स्वतः ईश्वरस्वरूप होऊन सर्व विश्वावर त्याचे अधिपत्य स्थापित करू शकतो.

वशित्व – साधक कुठल्याही व्यक्तीच्या मनावर ताबा मिळवून त्याला दास बनवून ठेऊ शकतो. ज्यामळे त्याचा निश्चित पराजय होतो.

 एखाद्या मंदिरात प्रवेश केल्याप्रमाणे आपण आत जात आहोत. जो साधना व तपाने भूपराची ही पहिली रेष ओलाडतो त्याला ह्या अष्टसिद्धी प्राप्त होतात.

भूपुराच्या दुसर्‍या रेषेत भूपुराच्या चारी दरवाजांमधे आपल्या डावीकडे चार आणि चारी कोपर्‍यात चार अशा आठ मातृका/लोकमाता विराजमान असतात.

ब्राह्मी / ब्रह्माणी ही परम पिता ब्रह्माची शक्ती प्रकटित करते. ही पीतवर्ण, चतुर्भुज असून कमल वा हंसावर विराजमान आहे.

 माहेश्वरी / रुद्राणी -   ही महादेवाची शक्ती प्रकटित करते. त्रिनेत्रधारी अशा ह्या चतुर्भुज देवीच्या हातात त्रिशूळ, डमरू, रुद्राक्षमाल आणि कपाल आहे. शक्ति हाच तिचा परिचय आहे. नंदी हे तिचे वाहन आहे.

 कौमारी, ही शिवपुत्र कार्तिकेयाची शक्तिस्वरूप देवी कुमारी, कार्तिकी वा अम्बिका ह्या नावानेही ओळखली जाते. ही चतुर्भुज असून तिच्या हातात परशु, भाला, धनुष्य आणि चांदीची मुद्रा आहे. कधी कधी स्कंदाप्रमाणे तिलाही सहा हात दाखवतात.

 वैष्णवी - ही भगवान विष्णूची शक्ती प्रकट करते. ही चतुर्भज असून हिच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. अनेक आभूषणांनी नटली आहे. ऐश्वर्यसम्पन्न आहे. गरुडावर विराजित आहे.

इंद्राणी / ऐंद्री / महेंद्री - ही देवराज इंद्राची शक्ती प्रकटित करते. हजार भुजा, हजार नेत्र असे चे स्वरूप असून ती ऐरावतावर आरूढ आहे.

वाराही ही भगवान विष्णुच्या वराह अवतारातील यमदेवाची शक्ती प्रकटित करते. तिच्या हातात दंड, हल/नांगर, खड्ग, आणि पानपात्र आहे. रेड्यावर स्वार असून अर्धनारी वराहरूपात दाखवली जाते.

चामुण्डा -  हे चंडीच्या शक्तीचे दुसरे रूप आहे. हिचं रंगरूप महाकालीप्रमाणेच आहे. ह्या कृष्णवर्णी देवीने नरमुंडमाला घातल्या आहेत. हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग, पानपात्र आहे. त्रिनेत्रधारी देवी स्वार होऊन शवे तुडवीत जात आहे. असे तिचे अत्यंत भयानक रूप आहे.

नारसिंहि विष्णूच्या नृसिंह अवताराप्रमाणे ही देवी आहे. काहीजण महालक्ष्मी ही आठवी मातृका आहे असे मानतात.

भूपुराच्या तिसर्‍या रेषेत आल्यावर सर्वसंक्षोभिणीमुद्राशक्ति, सर्वविद्राविणी मुद्राशक्ति इत्यादि दहा शक्ति देवता चारी द्वारात, चारी त्रिकोणात त्याप्रमाणे पश्चिमकडील म्हणजे आपल्याकडील उजव्या अर्ध्या बाजूवर तर वरील म्हणजे पूर्वेकडील डाव्या अर्ध्या बाजूवर प्रत्येक ठिकाणी एक याप्रमाणे सुप्रतिष्ठित असतात. यांना प्रकट योगिनी असेही म्हणतात.

 वरील भूपुर ओलांडून आात आाल्यावर सर्वबाजूंनी वशाल पटांगण दृष्टीस पडते. ह्या पटांगणातून पुढे आल्यावर मेखला वा तीन वलये दृष्टीस पडतात. ही वलये

सत्त्व, रज तम ह्या तीन गुणांची अथवा

 सोम, सूर्य, अग्नी ह्या तीन तत्त्वांची अथवा

  इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती ह्या तीन शक्तींची द्योतक आहेत.

ह्या तीन मेखला ओलांडून आपण आत आल्यावर सोळा पाकळ्यांचे कमळ दिसेल. ह्या सोळा पाकळ्या म्हणजे जणु चंद्राच्या सोळा कला मानल्या जातात. त्यामुळे हे चक्र चंद्रस्वरूप मानले जाते. आपल्या बाजूकडील खालच्या पाकळीला आारंभ करून उजवीकडून डावीकडे प्रत्येक पाकळीत कामाकर्षिणी, नित्याकलादेवी, बुद्ध्याकर्षिणी, याप्रमाणे सोळा देवींची मंदिरे आहेत. त्या सोळा देवींना गुप्त योगिनी असे म्हणतात.

ह्या सर्व देवतांचे दर्शन घेऊन आपण आात गेल्यावर आपल्याला आठ दलांचे कमल दिसेल. त्याची आठ दले म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराच्या आाठ मूर्तीच आहेत. पृथ्वी, जल तेज, वायु आणि आकाश त्याच प्रमाणे सूर्य, चंद्र आणि आत्मा ह्याच त्या शंकराच्या आठ मूर्ती आहेत. ह्याशिवाय ह्या कमलाची चारी दिशांची चार दले आणि चारी कोणातील चार दले ह्यात अनंगकुसुमादेवी, अनंगमेखलादेवी, अनंगमदनादेवी इत्यादि आाठ देवतांची मंदिरे आहेत. ह्या आठ देवता ह्या श्री राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरी देवीच्या गुप्तचर योगिनी आाहेत. ह्या आठ देवता चौदाही भुवनांचे निरीक्षण करत असतात.

हे तिसरे आवरण पार करून आत आल्यावर सर्व बाजूंनी मोकळा वर्तुळाकार भव्य प्रदेश दृष्टीस पडेल. ह्या प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर म्हणतात. ह्या सुधासागरात पुढे मोठे द्वीप दृष्टीला पडेल याच द्वीपाला मणिद्वीप म्हणतात.

यात आपण प्रवेश केला की, आपल्याला चौदा त्रिकोण असलेले श्रीचक्रातील चौथे आवरण दृष्टीस पडेल. याला सर्वसौभाग्यदायकचक्र असे म्हणतात. ह्या चक्रातीलअधोमुख असलेल्या खालच्या त्रिकोणापासूनउलट्या क्रमाने उजवीकडून डावीकडे असलेल्या प्रत्येक त्रिकोणात सर्वसंक्षोभिणीशक्ति, सर्वविद्राविणीशक्ति इत्यादि नावे असलेल्या चौदा देवता विराजमान झाल्या आहेत. ह्यांना सर्वसंप्रदाय-योगिनी असे म्हणतात.

त्याच्यापुढे दोन दशारचक्रे आहेत. बहिर्दशार व अंतर्दशार ह्यातील बाहरेच्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रात खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने सर्वसिद्धिप्रदादेवी, सर्वसंपत्प्रदादेवी इत्यादि नावे असलेल्या दहा देवता सर्व त्रिकोणात पहायला मिळतात. हे चक्र दशावतारात्मक विष्णुस्वरूप आहे. यातील देवतांना कुलोत्तीर्णयोगिनी असे म्हणतात.  अंतर्दशारक्रामधेही याचप्रमाणे प्रत्येक त्रिकोणात सर्वज्ञादेवी, सर्वैश्वर्यप्रदादेवी इत्यादि दहा देवता आहेत.यांना निर्गभयोगिनी असे म्हणतात

पाचवे आणि सहावे आवरण ओलांडून आपण आत गेल्यावर आपल्याला आठ त्रिकोण असलेले सातवे आवरण लागेल या सातव्या आवरणातील खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने वशिनी वाग्देवता , कामेश्वरी वाग्देवता  इत्यादि नावे असलेल्या आाठ वाग्देवताप्रत्येक त्रिकोणात एक ह्याप्रमाणे प्रतिष्ठित झालेल्या दिसतील ह्यांना रहस्ययोगिनी असे म्हणतात. सर्वरोगहर नाव असलेल्या सातव्या आावरणातून आपण आात गेल्यावर आपल्याला मुख्य त्रिकोणाचे दर्शन होईल.

ह्या मुख्य त्रिकोणाला सर्वसिद्धिप्रद असे नाव आहे. या त्रिकोणाच्या सभोवार श्रीकामेश्वर भगवान सदाशिव आणि कामेश्वरी महात्रिपुरसुंदरी यांची धनुष्यबाण, पाश आणि अंकुश, अशी आयुधे आहेत. या त्रिकोणाच्या तिन भुजा म्हणजेसत्त्वगुण, रजोगुण व तमगुणप्रधान अशा तीन मूर्तिमंत शक्ति-देवताच आहेत. हा त्रिकोण नादशक्तीचे आधिष्ठान आहे. ह्या त्रिकोणाचा रंग दुपारीच्या फुलासारखा आरक्त आहे. ह्या त्रिकोणाच्या भुजांजवळ कामगिरीपीठ, जालंधरपीठ आणि पूर्णगिरिपीठ अशी तीन पीठे म्हणजे सिंहासने आहेत. या सिंहासनांवर ब्रह्मा, विष्णु, महेश आपापल्या शक्तिदेवांसह विराजमान आहेत. या देवता जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री आहेत. त्याप्रमाणे सृष्टी, स्थिती, लय ह्यांच्याही अधिष्ठात्री आहेत. ह्या त्रिकोणांच्या तीन भुजा म्हणजे अग्निचक्र,सूर्यचक्र व सोमचक्र होत इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती यांच्याही त्या अधिष्ठान आहेत.

याच त्रिकोणात महात्रिपुरसुंदरीचेच रूप बालत्रिपुरसुंदरीच्या रूपाने विराजमान आहे. देवा ही मंत्रमय असल्यानेश्री ालत्रिपुरसुंदरीचा मंत्रच हया त्रिकोणात दिला असल्याचे आढळते. तर काही चक्रातून महात्रिपुरसुंदरीचा पंचदशाक्षरी महामंत्र (15 अक्षरे असलेला) अथवा महामंत्रराज  ह्या त्रिकोणात देतात.

वर सांगितलेल्या शुद्ध त्रिकोणाच्या आत असलेला मध्यवर्ती बिंदू; तो ह्या चक्रातील नववे आावरण असून त्याला बैंदवस्थान म्हणतात. ह्या बिंदूला सर्वानंदमयचक्र म्हणतात. हे या चक्रातील सर्वोच्च स्थान होय.

 जसे एखाद्या भव्य मंदिरात अनेक प्राकार ओलांडून अनेक मंदिरांचे दर्शन घेत तेथील मुख्य मंदिरातील सभागृहातून गर्भगृहात जावे व आपल्या इष् देवाचे दर्शन घेऊन धन्य व्हावे त्याप्रमाणे जो साधक श्रीचक्राचा सांगोपांग विचार करीत आतल्या बिंदूपर्यंत पोचतो आणि तेथे अनन्य भावाने महात्रिपुरसुंदरीचे दर्शन घेतो तो धन्य होतो. त्याची कर्माधीन जन्ममरण परंपरा संपते व तो साक्षात शिवरूप होतो.

देहातील ब्रह्मरंध्रातील सहस्रदलकमल हेही एक स्वतंत्र श्रीयंत्रच आहे..

----------------------------

*त्वदीयं सौन्दर्यं तुहिन-गिरि-कन्ये तुलयितुं

कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः

यदालोकौत्सुक्यादमर-ललना यान्ति मनसा

तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम् ।। 12*

( तुहिन – हिम; तुहिनगिरिकन्या – हिमगिरिकन्या, पार्वती.)

*तुझ्या लावण्याची हिम-गिरि-सुते काय तुलना

जरी इंद्र ब्रह्मा हरिसमचि विद्वान सकला

प्रयासाने मोठ्या करुन स्तुति का साधत तया?

असे तेथे कैची अजुनच निराळी मम कथा ।। 12.1

 

लपे ना उत्कंठा तव अमित लावण्य बघण्या

म्हणोनी स्वर्गीच्या सकल ललना येति शरणा

पदी त्या शंभूच्या; मिळवितिच सायुज्य-पद ते

तुझ्या लावण्याचे अनुपम तदा दर्शन घडे ।। 12.2

 

तुझ्या सौंदर्याचा अनुभवचि घेण्यास विरळा

तुझ्या लावण्याची सकल अनुभूतीच मिळण्या

असे युक्ती हीची शिवमयचि व्हावेचि पुरते

शिवा-वाचोनी का स्वरुप तव कोणा उलगडे ।। 12.3 ।।*

---------------------------- 

*नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं

तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः

गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्त्रस्त-सिचया

हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ।।13 ।।*

( वर्षियस् – अत्यंत वृद्ध . नयनविरसं – डोळ्यानी बघवत नाही असा विद्रूप. नर्मन् – क्रिडा, विनोद, विलास. नर्मसु जडम् – मनोरंजन, विनोदबुद्धी नसलेला अपांग- दृष्टीक्षेप/ तिरका कटाक्ष. सिचय – खांद्यावील वस्त्र, पदर. दुकूल - रेशमी वस्त्र, शेला )

*तुझ्या लावण्याच्यासम रुचिर दृष्टी तव असे

कटाक्षाने एका जननि तव ते काय  घडे

तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे तो जरठही

दिसे मोठा आकर्षकचि उमदा सुंदर अती ।। 13.1

 

असो काणा, भेंगा, कुरुपचि अडाणी उमज ना

प्रभावी भाषेने नच पडतसे छापहि जरा

कटाक्षाने एका परि तवचि गे मंगलमयी

किती त्याच्या पाठी फिरति युवती भान हरुनी ।। 13.2

 

सुटे वेणी, वक्षी पदर ढळता भानहि नसे

बहूमोलाचा तो कधि कमरपट्टा पडतसे

गळे शेला खाली धुळित बहु लोळे भरजरी

असे खासा रेश्मी बहु किमति आकर्षक जरी ।।13.3

 

दशा ऐशी होई कितिक युवतींची जर अशी

नको सांगाया त्यावर जनहि आकृष्ट सहजी

कृपादृष्टी भक्ता बनवित असे लोभस तुझी

कटाक्षाचा एका जननि महिमा वर्णु किति मी?  ।। 13.4 ।।*

----------------------------

*क्षितौ षट्पञ्चाशद् द्वि-समधिक-पञ्चाशदुदके

हुताशे द्वाष्टिश्चतुरधिक- पञ्चाशदनिले

दिवि द्विष्षट्-त्रिंशन् मनसि चतुःषष्टिरिति ये

मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुज-युगम् ।। 14 *

( मयूख – किरणे )

*महा भूतांसंगे मन धरुन तत्त्वे नित सहा

धरा, अग्नी, पाणी, पवन, अन आकाश, मन वा

शरीरामध्येही असति नित चक्रे स्थित सहा

सहा चक्रांठायी स्थित असति भूते मन तथा ।। 14.1

 

सहा तत्त्वातूनी नित प्रकटिती शब्द सगळे

तया शब्दातूनी उमटति किती अर्थ तयिचे

पसारा शब्दांचा अन सकल वाच्यार्थ तयिचा

पदार्थांची सृष्टी समजवुन सांगी नित पहा ।। 14.2

 

असे जी श्रीविद्या-स्वरुप जननी कुंडलिनि ही

तिचा कैसा वर्णू चरणमहिमा तो उचितची

जसे सूर्याचे हे किरण चहुबाजू पसरती

प्रभा तैशी फाके नित जननिच्या ह्या तनुतुनी ।।14.3

 

जशी सूर्याची ही अमित किरणे त्या समचि ही

किती नाना तत्त्वे किरणस्वरुपी देवगणही

जरी लाखो लाखो असति किरणे ही कितितरी

परी काही संख्या ठरविलिच सांकेतिक अशी ।।14.4

 

महा तेजस्वी ते किरणस्वरुपी देवगण ते

असे अर्था-शब्दातचि नित अधिष्ठान तयिचे

अधिष्ठात्री देवी वसति नित अर्थातुन जशा

रहाती प्रत्येकी क च ट त प वर्गाक्षरि तशा ।।14.5

 

वसे मूलाधारी नितचि धरणी तत्त्व उमदे

तयातूनी येती लखलखित छप्पन्न किरणे

जलाच्या तत्त्वाचे मणिपुरि अधिष्ठानचि असे

तयातूनी येती उजळवित बावन्न किरणे ।। 14.6*

 

(16 स्वर, 34 व्यंजने, 50 अक्षरे ही पंचनहाभूते, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेद्रिये, अंतःकरण चतुष्टय, दशविध प्राण, प्रकृति तत्त्व, पुरुष तत्त्वांची सूचक आहेत. ही पन्नास अक्षरे अधिक ऐं ह्रीं श्रीं क्लीं सौः ही सहा मंत्रबीजाक्षरे मिळून पृथ्वीची/ पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्रातील आाहेत. ही शिवशक्तिस्वरूप असल्याने त्यांची जोडीजोडीने 28 नावे शास्त्रात सापडतात. उदा. त्रिपुरसुंदरी, त्रिपुरसुंदर; महावज्रेश्वरी, महावज्रेश्वर. याच प्रमाणे जलतत्त्वात्मक मणिपूर चक्रात 52 किरणे आहेत.)

वसे स्वाधिष्ठानस्वरुप कमलाते अनल गे

तयातुनी येती उजळवित बासष्ठ किरणे

हृदी वायूतत्त्वातुन निघति चोपन्न किरणे

असे कंठस्थानी `दिव’ म्हणुन आकाशयुत जे ।। 14.7

 

विशुद्धी चक्रा त्या असतिच बहात्तोरि (72) किरणे

वरी त्याच्या राहे मनस्वरुप जे तत्त्व पुढचे

तया आज्ञाचक्रातुन निघति चौसष्ठ किरणे

मिळूनी सारी ही सकल तिनशेसाठ किरणे ।। 14.8

 

जशी देही तत्त्वे सकल तिनशेसाठ असती

तसे एका वर्षी दिवस तिनशेसाठ बसती

जशी देही चक्रे तशिच अयने ही नित सहा

सुसामजस्याची प्रचिति जगती देहिच पहा ।। 14.9

 

तुझे कालातीत स्वरुप जननि तत्त्वमय ते

असे ब्रह्मांडाच्या बहु पलिकडे स्थान तव गे

तिथे काळाचे हे गणित लव ना चालत असे

असे ब्रह्मांडी जे तव स्वरुप ते पिंडि दिसते ।।14.10

 

असे ब्रह्मांडाच्या सकल रचनेच्या पलिकडे

तुझे शक्तीरूपी जननि नित वास्तव्यचि भले

करी कौशल्याने नियमन जगाचे सकळ जी

अगे माते तू ती वससि मम श्रीचक्र-कमली ।। 14.11

 

असे सार्‍या चक्रांवरति नित श्रीचक्र जननी

तया बिंदुस्थानी नित वसशि तू मोदमयची

असे मूर्ध्नी माते कमलचि सहस्रादल युता

तिथे व्यापी तू गे सकलचि शशीमंडल महा ।। 14.12

 

तुझ्या ह्या रूपाचा चरणकमलांचाच महिमा

कसा गावा मी गे; करु सकलची गौरव कसा ? ।। 14.13*

----------------------------


*शरज्ज्योत्स्ना-शुद्धां शशियुत-जटाजूट-मुकुटां

वर-त्रास-त्राण-स्फटिक-घटिका-पुस्तक-कराम्

सकृन्न त्वां नत्वा कथमिव सतां सन्निदधते

मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः ।। 15*  

( फणित – अनासायास घडणे)

*निरभ्रा आकाशी शरद-पुनवेच्या सुसमयी

प्रभा चंद्राची भूवर झरत आह्लादक अति

तुझी कांती तैसी अमल विमला कोमल तशी

तुझ्या भक्तांच्या गे जननि हृदयासीच सुखवी ।। 15.1

 

तुझ्या केसांच्या गे मउ मउ लडी सुंदर अशा

तयांची शोभे ही मुकुटसम गे केशरचना

अलंकारी त्यासी हिमकरचि नक्षत्रपति हा

तुझ्या केसांमध्ये खुलुन दिसतो भूषणसमा ।। 15.2

 

कराने एका तू सहज वरमुद्रा धरियली

दुज्या हाताने तू नित अभयमुद्राच धरिसी

धरी माला हाती धवल स्फटिकांचीच जननी /

(धरे हाती तूची स्फटिक कलशासी सुखमयी)

असे विद्येचे जे शुभ प्रतिक ते पुस्तक करी ।। 15.3

 

तुझ्या ह्या रूपाचे जननि करिता ध्यान हृदयी

तुला भक्तीभावे नमन करता एक समयी

तया देसी ऐसी मधु मधुर वाणी सहजची

फिके त्याच्या शब्दांपुढति मध द्राक्षे दुध दही ।। 15.4

 

गमे संताच्या वा सुरगुरु मुखातून झरले

अशा शब्दांनी ते सुखविति जनांसी बहु भले

कृपा भक्तांसी ही करिसि जननी वत्सलपणे

अशक्यासी तूची सहज करसी शक्य नित गे ।। 15.5*

----------------------------


*कविन्द्राणां चेतः कमलवन-बालातप-रुचिं

भजन्ते ये सन्तःकतिचिदरुणामेव भवतीम् ?

विरिञ्चि-प्रेयस्यास्तरुण-तर-शृङ्गार लहरी-

गभीराभिर्वाग्भिर्विदधति सतां रञ्जनममी ।। 16 ।।*

 ( बालातप - बाल आतप – उगवतीचा सूर्य )

*जसा येता प्राचीवर अरुणवर्णी दिनपती

डुलू लागे मोदे उमलुनि कळ्या पद्मवनही

प्रभातीच्या सूर्यासम अरुणवर्णी मुख तसे

तुझे पाहोनीया सुरगुरु कवीन्द्रा सुख मिळे ।। 16.1

 

सुकान्ति तेजस्वी बघुन अरुणा नाम तव हे

गमे साजेसे हे उचित तुजसी सार्थ बहु गे

तुझ्या ह्या रूपाचे करिति जन जे ध्यान कुणिही

विधात्याच्या पत्नीकडुन वरदानास मिळवी ।। 16.2

 

अहो वाग्देवीच्या मधुरतम वाणीतुन जशा

जणू शृंगाराच्या लहरि उमटाव्या तरलशा

तयांच्या वाणीचे बहु नवनवोन्मेषचि तसे

महा विद्वानांना बहु सुखविती नित्यचि उमे।।16.3

 

महा संतोषाने खुलति डुलती सज्जन मनी

फुलावी जैसी का रुचिर कमळे पद्मवनिची

कृपेने मातेच्या सकल गमते शक्य जगती

अगे आलो माते तव सुत तला गे शरण मी।। 16.4 ।। *

 ----------------------------


* सवित्रीभिर्वाचां शशि-मणि-शिला-भङ्ग-रुचिभिः

वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः

कर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः

वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः ।। 17 ।।*

( अन्वय - हे जननि! वाचां सवित्रीभिः शशि-मणि-शिला भङ्ग-रुचिभिः वशिन्याद्याभि; सह त्वां यः सञ्चिन्तयति, सः महतां भङ्गिरुचिभिः वाग्देवी-कमला मोदमधुरैः वचोभिः काव्यानां कर्ता भवति । )

( सवित्री – माता. वाचां सवित्री – वाणीला निर्माण करणारी, मूळाक्षरांची अधिष्ठात्री तिला मातृका म्हणतात.  शशि-मणि - चंद्रकांत मणी. भङ्गि रुचिभिः  – वाग्विलासाने,  मधुर शब्दजालाने

*अहो वाग्शक्तीसी नित करिति साकार जगति

ते क्षा पर्यंता जे  वर्ण गट ची

अधिष्ठात्री त्यांच्या असति वशिनी मोदिनी अशा

महादेवी रत्नासम नितळ शुद्धा धवल त्या ।।17.1

 

करे भक्तीने जो नमन तुज त्यांच्यासह सदा

तयाच्या काव्याची मधुमधुर गोडी अनुपमा

जणू वाग्देवीचे मुखकमल उत्फुल्ल हसरे

सुगंधाने त्याच्या परिमलयुता काव्य तयिचे ।। 17.2 ।।*

----------------------------


*तनुच्छाया भिस्ते तरुण-तरणि-श्रीसरणिभिः

दिवं सर्वामुर्वीमरुणिमनि मग्नां स्मरति यः

भवन्त्यस्य त्रस्यद्वन-हरिण-शालीन-नयनाः

सहोर्वश्या वश्याः कति कति गीर्वाणगणिकाः ।। १८ *

( तरणि – सूर्य, सूर्यकिरण, नाव. तरुणतर- बालस्वरूपातील. तनुच्छाया – अंगकांती. सरणिः / सरणी – प्रकार, पथ, मार्ग, क्रम , विधी. श्रीसरणी – शोभेचा प्रकार सर्वामुर्वीम्सर्वाम् उर्वीम्- सर्व पृथ्वी वा भूलोक. मग्न- बुडून जाणे, लीन होणे, लिप्त होणे. त्रस्त – भयभीत, चंचल. गीर्वाण-गणिका – देवस्त्रिया, अप्सरा कति कति – किती किती - कित्येक )

*गुलाबी तेजस्वी दिनकर दिसे पूर्व क्षितिजी

अपूर्वाई लोकां बहु असतसे बाल रविची

जसा येई प्राचीवर रवि तसा रंग तव हा

महा ऐश्वर्याने झळकत तुझा देह अरुणा ।। १८.१

 

प्रभा कैसी माते तव अरुणवर्णा पसरली

सदा आच्छादे ती सकल वसुधा स्वर्गपुरिसी

तुझ्या ह्या रूपाचे नर करिल जो चिंतन कुणी

पडे त्या भक्ताचा सकलचि जना मोह हृदयी ।। १८.२

 

जशा रानी कोणी फिरति हरिणी बावरुनिया

टपोर्‍या नेत्रीही भरुनचि असे चंचलपणा

हरीणाक्षी तैशा इतर ललना स्वर्गपुरीच्या

तया पाठी जाती; जरि असति शालीन सकला ।। १८.३ *

  ३ ४ ५ ६ ७  

९.१ ४ ५ ६ ७  ९ ०

 

----------------------------

मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो

हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम्।

सद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु

त्रिलोकींमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तन-युगाम् ।। १९ ।।

( आशु – सत्वर. )

  ( अन्वय - हे हरमहिषि! मुखं बिन्दुं कृत्वा, तस्य अधः कुचयुगं कृत्वा, तदधः हरार्धं कृत्वा, यः ते मन्मथकलां ध्यायेत् सः विनिताः सद्यः संक्षोभं नयति इति अतिलघुः सः रवीन्दुस्तनयुगां त्रिलोकीं अपि आशु भ्रमयति ।)

अगे मंत्रज्ञानी तुज बघति `ईं’  अक्षररुपी

असे तेची माते तव स्वरुप ते मंत्रमय ची

असे तेची माते स्वरुप तव गे आकृतिरुपी

अशा ह्या रूपाचे मुनि करिति ते ध्यानचि मनी ।। १९.१

 

ईं ह्या बीजाच्या वर रविरुपी बिंदुचि असे

जयासी सारेचि स्तविति परमात्मा म्हणुन ते

 असे ते देवीचे मुखकमल आह्लादक असे

 असे खाली त्याच्या पुनरपि च दो बिंदुच सखे ।। १९.२

 

जगाला पोषी जे स्तनयुगल माते तवचि हे

अगे दो बिंदुंनी रविशशिरुपी दर्शविति ते

अहो अग्नि-सोमाचिच असति तत्त्वे जगति जी

गळा ते नाभी हे तव शरिर ते दर्शविति ती ।। १९.३

 

तयाखाली अर्धे दिसतचि ‘ह’ हे अक्षर भले

तुझी नाभीपासूनचि चरणपर्यंत तनु गे

त्रिकोणी आकारे दिसत तनुचा भाग तव हा

असे ईं बीजाने शरिर नटलेले तव उमा।। १९.४

 

करी सातत्याने सृजन नवनिर्माणचि सदा  

तुझ्या ह्या वैशिष्ठ्या जननि म्हणती  मन्मथकला

शिवाचे त्यासाठी जननि असणे केवळ पुरे

शिवाच्या अस्तित्वे प्रकृति प्रसवे विश्व सगळे  ।।१९.५

 

असे भक्तांसाठी शिव सुभग आत्मोन्नतिप्रदा

हृदी ध्यानाने त्या भजति मुनि त्या कांक्षति शिवा

अगे शंभूसी ‘हार्द’ म्हणति अथवा ‘काम’ चि असे

तयाच्या शक्तीसी म्हणतिच `कला’ हे जननि गे ।। १९.६

 

करे ईं बीजाचे जननि हृदि जो ध्यानचि सदा

स्त्रियांना सार्‍या तो नर करितसे मोहित मना

नसे हे काहीही; अखिल जग जी पोसत असे,

स्वस्तन्ये त्रैलोक्या रवि-शशिच ह्याची स्तनयुगे- ।। १९.७

 

जगाची शक्ती जी नियमन करे विश्व अखिला

त्रिलोकीरूपी तू त्वरित वश हो त्यास ललना ।

मिळे ऐसी सिद्धी जननि तव भक्तासच अशी

कृपा होई भक्तांवर त्वरित ऐसीच तव ही ।। १९. 

----------------------------


*किरन्तीमङ्गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं

हृदित्वामाधत्ते हिमकर-शिलामूर्तिमिव यः

सर्पाणां दर्पँ शमयति शकुन्ताधिप इव

ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया ।। 20 ।।*

( ‘‘ हे जननि! किरणानि-कुरुम्बामृतरसं किरन्तीं हिमकर-शिलामूर्तिं इव यः त्वां हृदि आधत्ते सः शकुन्तधिपः इव सर्पाणां दर्पं शमयति, सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति च । ’’ )

( निकुरुम्बझुंड, संग्रह, पुंज. हिमकर – चंद्र, हिमकरशिलामूर्ति – चंद्रकातमण्याचीच जणु मूर्ति. सिराशरीरातील धमनी, नाडी, नलिकाकार वाहिका, वाहिका, पाट. प्लुष्टजाळला जाणारा. शकुन्त – पक्षी, शकुन्ताधिप – पक्ष्यांचा राजा गरूड )

 

तुझ्या अंगातूनी शत शत धुमारे फुटति हे

प्रकाशाच्या लक्षावधि किरण-पुंजासमचि गे

तया ज्योत्स्नेच्या त्या निरुपम शलाकांमधुन गे

प्रकाशासंगे हे बरसत असे अमृत निके ।। 20.1

 

सुधांशू ज्योत्स्नेच्या घवल किरणातून जणु ही

छबी ये आकारा जननि तव ही उज्ज्वल अशी

तुझी चंद्राकांता-मणिमयचि मूर्ती सुबकशी

धरे चित्ती जोची दृढ अढळ त्यासी न भयही ।। 20.2

 

विषाचे सर्पांच्या भय गरुडराजास कसले

तसे सर्पांचे ना भयचि तव भक्तांस लव ते

सुधा-धारा खेळे धमनि-धमनीतून नित जी

तयाने दृष्टी हो जणुचि सरिता अमृतमयी ।। 20.3

 

महा तापानेही जरि फणफणे देह सगळा

ज्वराच्या पीडेने सकल शरिरा ये अवकळा

तुझ्या भक्ताने गे नजर नुसती ती फिरवता

तया दृष्टिक्षेपे त्वरित शमती ते ज्वर महा ।। 20.4 ।।

-----------------------------


 तटिल्लेखा-तन्वी तपन-शशि-वैश्वानर मयीं

निषष्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलाम्

महापद्माटव्यां मृदित-मल मायेन मनसा

महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लाद-लहरीम् ।। 21

  ( तटित्वीज, लेखा – रेघ. तन्वी- बारीक, कृश, चवळीच्या शेंगेसारखी अंगकाठी असलेली. तटिल्लेखा-तन्वी  बारीक रेघेप्रमाणे दिसणारी वीज  तपन – सूर्य. शशि – चंद्र. वैश्वानर – अग्नी. निषण्णा – विराजमान.  अटवी- अरण्य महापद्माटवी – सहस्रदलकमल हेच जणु काही अरण्य आहे. मृदित - दूर केलेले, निरास झालेले, चूर्ण झालेले. महान्तः - मोठे मोठ अनन्य भक्त असलेले योगीश्वर)

सहा चक्रेरूपी असति कमले जी तनुमधे

सहा पद्मांच्या त्या वरति तव गे मूर्ति विलसे ।

जशी विद्युल्लेखा सळसळत जाते उजळुनी

प्रकाशाची धावे क्षणभर जणू निर्झरिणि ती ।। 21.1

 

तशी आज्ञाचक्री चमकुन क्षणार्धातचि विरे

प्रकाशाची दीर्घा लवलवति रेषा क्षणभरे ।

अशी येई भक्तां जननि अनुभूती तवचि गे

रवी इंदू अग्नीमय स्वरुप माते तव दिसे ।। 21.2

 

 अगे मूर्धस्थानी कमलचि सहस्रादल असे

दलांचे शोभे हे वन गहन मोठे जटिल गे ।

बसे तेथे तू गे कमलदलरूपी घनवनी

अशा ह्या रूपासी विमलमति हे भक्त बघती ।। 21.3

 

अविद्या माया वा सकलचि अहंकार मद गे

रिपु क्रोधा जैसे मल सकल कामादि मनिचे

 धुवोनी केले हे मन विमल ज्यांनी सकलची

 तुझ्या ह्या रूपासी अनुभवति ते निर्मलमती ।। 21. 4

 

तुझी प्राप्ती होता निरतिशय आनंदलहरी

हृदी त्यांच्या माते उठति नित त्या येचि भरती

उणावे ना त्यांचा अपरिमित आनंद कधिही

कृपा ऐसी माझ्यावर जननि तू नित्यचि करी ।। 21.5

(  मूलाधारचक्राला चतुर्दल कमल म्हणतात. 4 पाकळ्यांचे कमळ

तर स्वाधिष्ठान चक्राला षड्दल कमल म्हणतात. 6 पाकळ्यांचे कमळ

मणिपूर चक्रदशदलकमल 10 पाकळ्यांचे कमळ

अनाहतचक्रद्वादशदल कमल 12 पाकळ्यांचे कमळ

आज्ञाचक्रद्विदल कमल 2 पाकळ्यांचे कमळ )

----------------------

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-

मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः

तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं

मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मुकुट-नीराजित-पदाम् ।। 22

 

म्हणाया जाती जे ``तुजसम भवानी मजवरी 

भवाब्धि ताराया समजुनि कृपा कोणचि करी’’

तयांचे ऐकोनी `` तुजसम भवानी मज’’ असे

करे त्यासी तू गे तुजसम भवानी त्वरित गे ।। 22.1

 

तयांना देसी तू त्वरित तव सायुज्य पद ते

मिळे ना जे कोणा चरणकमला पूजुन  कसे

तुझ्या पायी होती सकल सुरही लीन विनये

विधी विष्णू शंभू सुरवरचि देवेंद्रहि नमे ।। 22.2

 

तयांचे रत्नांचे मुकुट तव पायीच झुकता

सुवर्णा रत्नांची तव पदि प्रभा दिव्य बघता

प्रकाशाचे ऐसे बघुन नवरंगी कवडसे

अती हर्षोल्लासे मम मन विचारतचि डुबे ।। 22.3

 

सुरम्या रत्नांच्या कनकमय नीरांजनिमधे

दिसे रत्नज्योत्स्ना अनुपमचि ज्योतीसम तिथे

गमे ओवाळीती मृदुल पदपद्मांस तुझिया

जथे हे देवांचे मणिमय दिव्यांनी समुचिता ।। 22.4

 

मिळे जे भक्तीने जननि तुजला गे विनविता

नसे सायुज्याचे पद सुलभ तेची सुरवरा

दिवे रत्नांचेही जननि तुज ओवाळुन असे

कृपा ना लाभे ती जर हृदि नसे भाव लव गे ।। 22.5

----------------------

त्वया हृत्वा वामं वपुरपरितृप्तेन मनसा

शरीरार्धं शम्भोरपरमपि शङ्के हृतमभूत्

यदेतत्त्वद्रूपं सकलमरुणाभं त्रिनयनं

कुचाभ्यामानम्रं कुटिल-शशि-चूडाल-मुकुटम् ।। 23

अगे मांगल्याचे प्रतिक शिवकाया सुखमयी

बघोनी व्यापे तू जननि शिवकायार्ध; तरिही ।

शमे ना चित्ताची अति प्रखर ती आस तुझिया

 मिळे कैसी तृप्ती हृदय भरले ना  तव जरा ।। 23.1 ।।

 

अगे आक्रामीसी शिवतनुस त्या उर्वरित गे

मिळे सौख्यासी गे सुख सकल तैसे मिलन हे ।

सुखाच्या बिंबाने सुखद प्रतिबिंबास बघता

कळे ना दोघांसी `पर’चि कुठला `मी’ च कुठला ।। 23.2 ।।

 

प्रकाशाने जावे मिसळुन प्रकाशी सहज गे

जलामध्ये जावे जल मिसळुनी त्यासम शिवे ।

शिवामध्ये राही शिव बनुन तू गे शिवसमा

अभेदाने राही शिवमयचि सायुज्य स्वरुपा ।। 23.3 ।।

 

दिसे दोघांचीही नित अरुण वर्णी तनुलता

रवी अग्नी इंदू नयन तुमचे तीन अरुणा

झुके नम्रामूर्ती अधिक स्तनभारे तनुलता

शिरी चंद्राची ही अनुपम दिसे कोर धवला ।। 23.4 ।।

 

----------------------


जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते

तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति ।

सदापूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णाति च शिव-

स्तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः ।। 24 ।।

( हरिरवति – हरिः अवति। - अव् (अवति) – रक्षण करणे, कृपा करणे, प्रसन्न करणे, सुख देणे, संतुष्ट करणे. क्षप् – फेकणे, नाश करणे. तिरस् कृर्वन् – अंतर्धान पावणे, लय पावणे, तिरयति – लपवणे, झाकणे गुप्त ठेवणे, दृष्टीस न पडु देणे.)

जराशी होता गे जननि भुवई ही वर तुझी

विधाता निर्मी हे जगत तव आज्ञा समजुनी ।

 तुझ्या भ्रूसंकेतावर करित तो पालन हरी

तुझ्या भ्रूलीलेने प्रलय घडवी रुद्र सहजी ।। 24.1।।

 

जगाच्या नाशाने जग घडतसे विस्कळित जे

स्वतःमध्ये  सामावुन जगत घे ईश सगळे ।

स्वदेहासीही तो सहज शिवतत्त्वी लय करी

पुरे त्यासाठी गे लव उचलणे तू भुवइसी ।। 24.2 ।।

 

धरे अव्यक्तासी जग प्रलयकाळी जननि गे

परी सृष्टी काली फिरुनि जग हो व्यक्त सगळे ।

विधी विष्णू रुद्रा सहचि चवथा ईश मिळुनी

करीती ब्रह्मांडा पुनरपिच निर्माण जननी ।। 24.3 ।।

 

स्वकार्याच्या ज्ञाना उपजवुन त्यांच्या मतिमधे

तयांची उत्पत्ती घडत शिवतत्त्वाकडुन गे ।

तुझ्या भ्रूसंकेतावर घडतसे कार्य सकला

शिवालाही लागे अनुमति तुझी कार्य करण्या ।। 24.4।।

 

 शिवाच्या तत्त्वासी जननि सहजी अंकित करे

तुझ्या भ्रूलीलेच्या बघुनिच प्रतापा नच सुचे ।

तुझ्या सामर्थ्याच्या जननि अनुमाना करु कसे

तुला आलो मी गे शरण जननी हे शरणदे ।। 24.5 ।।

----------------------

त्रयाणां देवानां त्रिगुणजनितानां तव शिवे

भवेत्पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता

तथा हि त्वत्पादोद्वहन-मणि पीठस्य निकटे

स्थिता ह्येते शश्वन्मुकुलित-करोत्तंस- मुकुटाः ।। 25 ।।


तुझी मूर्ती माते त्रिगुणमय ही दिव्य अतुला

तुझ्यातूनी घेती विधि, हर, हरी एकचि गुणा ।

रजासी सत्वासी धरुन अथवा तामस गुणा

अगे जन्मा येती विधि हरि महादेवचि पहा ।। 25.1

 

तुझ्या अंशातूनी प्रकटति तिघेही सुरमणी

म्हणोनी तीघेही तनय तव गे माय असती ।

तुझ्या पूजेने गे म्हणुन घडते पूजन जसे

तिन्हीही देवांचे अति सहज माते तुजसवे ।। 25.2

 

तुला ठेवायासी चरणकमळे पावन तुझी

सुवर्णा-रत्नांचे तव पद-तळी आसन रूपी ।

असे त्या चौरंगा निकटचि उभे देवगणही

स्तुती गाती माते अति मधुर शब्दातुन तुझी ।। 25.3 ।।

 

तुझ्या पायी हेची सुरवर अती नम्र बनुनी

नमस्कारासाठी कर जुळवुनी कोमल अती

शिरी लावी जेंव्हा कमल-कलिकांच्या-सम करा

किरीटी भासे तो कमल कलिकांचा मृदु तुरा ।। 25.4 ।।

----------------------

श्लोक  26 - 50

श्लोक  51 -  75

श्लोक  76 - 100



No comments:

Post a Comment