**।। सौन्दर्यलहरी ।।**

 

**।। सौन्दर्यरी ।।** श्लोकार्थ 

( 26 - 50 )

३ ४ ५ ६ ७  ८ ९ ०

३ ४ ५ ६ ७  ८ ९ ०

श्लोक 26 –

 

विरिञ्चि पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिं

विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् ।

वितन्द्री माहेन्द्री विततिरपि सम्मीलितदृशा

महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ ।। 

 

महा कल्पांताच्या भयद समयी नाश  घडता

विरिंची जाई हा वितळुनचि भूतात सकला ।

विरामे पूर्णत्त्वे हरिसि नच अस्तित्त्व उरते

यमालाही धाडे यमसदनि कल्पांतचि बळे ।। ६. 

 

कुबेरालाही त्या नचचि चुकतो नाश  समयी

धनेशाचे होई निधन प्रलयाच्याच समयी ।

असोनी चौदाही सुखद भुवनांचे अधिपती

महेंद्रांच्या निद्रेमधुन उठती ते न फिरुनी ।। ६.२  

 

महा संहाराच्या भयद समयी तू पतिसवे

विहारी स्वच्छन्दे तुज कुठुन मृत्यूभय असे

शिवालाही लाभे जननि अविनाशीपणचि जे

तुझ्या सौभाग्याचा जननि महिमा अद्भुत असे ।। ६.३ 

----------------------------------------------------


श्लोक 27

 

जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना

गतिः प्रादक्षिण्य-क्रमणमशनाद्याहुति-विधिः।

प्रणामः संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृशा

सपर्या-पर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् ।। ७ ।।

( संवेश – झोपणे. सपर्या – पूजा, अर्चना सेवा. पर्याय - प्रणाली, प्रक्रिया, प्रकार आत्मार्पणदृशा – आत्मार्पणदृष्टीने )

मुखातूनी माझ्या नित उमटती शब्द सहजी

असावे तेची गे, जपस्वरुप वा निर्मल स्तुती

करे जेंव्हा संभाषण हलवुनी हात मम जे

असाव्या मुद्रा त्या सुखविति तुला ज्या बहु उमे ।।  २.

 

कराया कार्यांसी चरण मज नेती चहु दिशा

घडो ह्या चालीची अविरत तुला गे परिक्रमा

मुखाने जे खाई नित हवनकर्मासम असो

सुखाने झोपे मी तव चरणि ते वंदन असो ।।७.

 

अगे आस्वादीतो सुखमयचि हे जीवन जसे

असो पूजा ती गे मजकडुन आत्मार्पण पुरे

तुझी पूजा माते मम सकल हा जीवनविधी

घडो साफल्याची मजकडुन प्रत्येकचि कृती ।। ७.

----------------------------------------------------


श्लोक 28 –

सुधामप्यास्वाद्य प्रतिभय-जरा-मृत्युहरिणीं

विपद्यन्ते विश्वे विधि-शतमखाद्या दिविषदः ।

करालं यत्क्ष्वेलं कवलितवतः कालकलना

न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्कमहिमा ।। 28 ।।

( विधि – ब्रह्मदेव. शतमख – इंद्र. विपद्यन्ते – मरतात. कलनम् - ग्रासणे, पकडणे. कराल – जहाल. ताटङ्क – कानाचे आभूषण )

जरी आले देवा अमरपण ते अमृतबळे

विधी विष्णू इंद्रादिक अजर झाले प्रबळ ते ।

लया जाती कैसे परि प्रलयकाळीच सगळे

उरे ना कोणीही; सकल शिवतत्त्वातचि विरे ।। 28.1

 

परी शंभूने त्या गिळुनचि हालाहल कसे

कळीकाळासीही अति सहज रोखून धरले ।

स्वतःचे शंभुचे अपरिमित सामर्थ्य नच हे

असे तूची त्याचे सकल बल सामर्थ्य अवघे ।। 28.2

 

तयासंगे राहे अमृतमय तू नित्यचि शिवे

म्हणोनी जाई तो तरुन नित आपत्तितुन गे

अगे पाहू जाता शिव-जय स्वयंसिद्ध नच हा

तुझ्या कानीच्या ह्या सुभग झुमक्यांचा विजय हा ।। 28.3

----------------------------------------------------

श्लोक 29 –

किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः

कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारि-मुकुटम् ।

प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनं

भवस्याभ्युत्थाने तव परिजनोक्तिर्विजयते ।। 29 ।।

( किरीट / कोटीर – मुकुट. विरिञ्चि – ब्रहमदेव. कैटभभिदः – कैटभ राक्षसाचा नाश करणारा विष्णू. जम्भारि – जम्भ राक्षसाचा नाश करणारा इंद्र. जहि – दूर सारा. परिजन – सेवक. प्रसभ – बलपूर्वक, जबरदस्ती.  उत्थानम्- उठणे, अभि + उत्थानम्अभ्युत्थानम् स्वागतासाठी उद्युक्त होणे.  भवस्य अभ्युत्थाने- शिवाच्या स्वागतासाठी तुझे उठून जाणे.)

तुझ्या सेवेसी गे जननि झटती देवगण हे

तुला भेटायासी करति किति गर्दी सकल गे

करीती भक्तीने तुज चरणि साष्टांग नमना

अशावेळी जेंव्हा तव सदनि येई शिवसखा ।। 29.1

 

शिवाच्या येण्याची सदनि तुज वर्दीच मिळता

उठोनी जासी तू जननि करण्या स्वागत तदा

पहारा देणारे हटवितिच देवांसि सकला

तयांच्या आरोळ्या दुमदुमति प्रासादि तुझिया ।। 29.2

 

किती हो देवांची गडबड महा धांदल उडे

उठू जाता त्यांचे मुकुट पडती स्वर्णमयि ते

पहारा देणारे सतत वदती निष्ठुरपणे

``सरा बाजू सारे! नियम नच का ठाऊक इथे’’ ।। 29.3

 

``असे हा ब्रह्म्याचा मुकुट’’ दरडावे ``कर दुरी’’

``असे टोकेरी हा मुकुट बहु टोचेलचि पदी

दिसे हा विष्णूचा जन म्हणति ज्या कैटभअरी’’

असा हा भृत्यांचा बहु गलबला हो तिथवरी ।। 29.4

 

``कसा देवेंद्राचा मुकुटचि मधे हा तडमडे

कडेला द्यावा तो भिरकवुनची दूर तिकडे ’’

अशा ह्या आरोळ्या सुचविती तुझे प्रस्थचि बडे

तुझ्या श्रेष्ठत्त्वाचा जणु विजय डंका गमतसे ।। 29.5 ।।

----------------------------------------------------


श्लोक – 30


स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरमितो

निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः ।

किमाश्चर्यं तस्य त्रिनयन-समृद्धिं तृणयतो

महासंवर्ताग्निर्विरचयति नीराजनविधिम् ।। 30 ।।

 

( स्वदेहोद्भूता – स्वतःच्या देहातून उत्पन्न झालेल्या. घृणिकिरण.  निषेवकभक्त, सेवक, नषेव्य- उपास्य, भक्तीकरण्यास योग्य. त्रिनयनशिव. किंवा नयन म्हणजे मार्ग, प्राप्तीचे साधनसूर्य, चंद्र, अग्नी ही शंकराच्या प्राप्तीची तीन साधने आहेत. किंवा योगी लोक इडा पिंगला, सुषुम्ना ह्या तीन मार्गांनी सदाशिवतत्त्वाचा साक्षत्कार करून घेतात. महासंवर्ताग्नि – कल्पांन्त काळचा प्रलयाग्नि. त्रिनयन समृद्धिं तृणयतो – शिवाच्या महान ऐश्वर्याालही कस्पटासमान लेखतो. )

असे तूची नित्या तुजसि नच प्रारंभ कधिही

तुला नाही सीमा जननि तुज ना शेवट कधी

करायासी भक्ती तुजविण न आदर्श दुसरा

असे भक्तांसाठी तव चरणसेवाचि फलदा ।। 30.1

 

प्रभा देहातूनी किरणमय दैवी पसरता

गमे देहातुनी तव प्रकटले देवगण का

तुझी सेवा तेची करिति अति तादात्म्य हृदये

प्रभारूपी देवांसह बनतसे देह तव गे ।। 30. 2

 

प्रभारूपी देवांसह जननि सत् चित् स्वरूपची

अगे श्रीचक्राच्या तव तनुत शोभून दिसशी

कुणी सोऽहं भावे तुजसिच तदाकार  भजुनी

करे भक्ती तोची अनुपमचि ऐश्वर्य मिळवी ।। 30. 3

 

शिवाच्या ऐश्वर्या तृणसमचि तो तुच्छ समजे

तया कल्पान्ताचा अनल नित ओवाळित असे

शिवाहूनी तोची कितिकपट श्रीमंत जगती

तुझ्या मध्ये तोची मिसळुन बने तूच जननी ।। 30. 4

----------------------------------------------------


श्लोक 31 –

चतुःषष्ट्या तन्त्रैः सकलमतिसन्धाय भुवनं

स्थितस्तत्तत्सिद्धि-प्रसव परतन्त्रैः पशुपतिः ।

पुनःस्त्वन्निर्बन्धादखिल-पुरुषार्थैक- घटना-

स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षिति-तलमवातीतरदिदम् ।। 31

( अतिसन्धानम् – छळ, कपट, फसवणुक, चलाखी. निर्बन्ध -आग्रह, हट्ट, मागणी. क्षितितलम् - पृथ्वीतळावर  अवातीतरत् – अव + तृ अवतार/ अवतरणे/ पृथ्वीवर अवतरणे )

(अन्वय – पशुपतिः चतुषष्ट्या तन्त्रैः सकलं भुवनं अतिसन्धाय पुनः त्वन्निर्बन्धात् इदं ते तन्त्रं क्षितितलम् अवातीतरत् ।)

 

मिळाया सिद्धी वा त्वरित मिळण्या ऐहिक फळे

शिवाने तंत्रे ही जरि रचलि चौसष्टचि शिवे ।

परी त्याने गुंते मन फिरुन मोहातचि पुन्हा

फळाच्या सिद्धीच्या; विसरुन विवेकास मनिच्या ।। 31.1

 

अशा वेळी माते जन बघुन मोहात फसले

बघोनी शांतीने शिवहि मननी शांत बसले

तुला भक्तांचा ह्या मनि कळवळा येउन उमे

अगे! शंभूपाशी जननि किति तू आग्रह धरे ।। 31.2

 

कराया लावी तू जननि नवतंत्रासचि असे

जयाने चारीही मिळति पुरुषार्थांचिच फळे

अशा श्रीविद्या ह्या तव नविन तंत्रास रचिता

कृपा होई भक्तांवर घडुनि त्या लाभ सगळा ।। 31.3

----------------------------------------------------


श्लोक 32

सुहृदहो,

 मागच्या श्लोकात आपण पाहिले की, माता महात्रिपुरसुंदरीला 64 तंत्रांच्या मोहात फसत जाणार्‍या लोकांचा कळवळा येऊन तिने भगवान शिवाला तिचे श्रीविद्यातंत्र नावाचे नवीन तंत्र निर्माण करण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे शिवानेही साधकांना सर्व पुरुषार्थांचा लाभ होईल अशा योग्यतेचे श्रीविद्यातंत्र नावाचे एक स्वतंत्र (‘स्व’ जाणण्याचे) तंत्र / नवीन साधन ह्या भूवर प्रकट केले.

तंत्रशास्त्राप्रमाणे देवता ही मंत्रमय असते. त्यामुळे पूजाविधीतही मंत्राला जास्त प्राधान्य असते. हा मंत्र गोपनीय असतो. ह्या तंत्रातील मुख्य समजला जाणारा मंत्र ह्या श्लोकात प्रत्यक्ष न सांगता परोक्ष पद्धतीने सांगितला आहे. म्हणजेच ह्या श्लोकातील प्रत्येक शब्द हे अनुक्रमे मंत्रातील एक एक अक्षर निर्दिष्ट करते. ही अक्षरे क्रमाने लिहील्यास/महटल्यास तो मंत्र तयार होतो. ‘परोक्षप्रिया इव हि वै देवाः’ असे श्रुतिवचन आहे.  जसे आपण आई, वडील अथवा मोठ्या वडिलधारी माणसांना त्यांच्या सुनीता, माधुरी, गंगाधर, सुरेश, पुरुषोत्तम  अशा नावाने हाक न मारता आई बाबा, काका, दादा, पंत अशी संबोधने वापरतो तसेच देवांनाही त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्याशी परोक्ष पद्धतीने केलेला व्यवहारच आवडतो.

संप्रदायांप्रमाणे श्रीविद्यामंत्राचे पंचदशीविद्या, षोडशीविद्या, कादिविद्या हादिविद्या असे अनेक भेद आहेत येथे श्री आचार्य आपल्याला हा मंत्र मोठ्या खुबीने सांगत आहेत. ह्या श्लोकात क्रमाने शिव, शक्ती ---- असे 15 शब्द वापरले आहेत. प्रत्येक शब्द मंत्रातील एक बीज अक्षर निर्दिष्ट करतो, सुचवतो. मंत्राचे सोळावे अक्षर गरुमुखातून ऐकावे असे म्हणतात. असा एकंरीत 16 अक्षरी हा मंत्र आहे. आपण आचार्यांनाच आपले गुरू मानून हा मंत्र जाणून घेऊ या.

चंद्राला प्रतिपदा ते पौर्णिमा अशा 15 कला असतात. आमावास्येला चंद्र दिसत नसला तरी असतो म्हणून ती 16 वी कला माानतात. ह्या बीजमंत्रातही अशी 15 अक्षरे श्लोकात व 1 अक्षर गुरूमुखातून अशी 16 अक्षरे असल्याने हया श्रीविद्यातंत्राला चंद्रकलाविद्यातंत्र असेही म्हणतात.  ( श्लोकातील क्रमाने एक एक शब्द आणि त्यातून मंत्राचे कुठले बीज निर्दिष्ट होते हे खाली सांगितले आहे.) 

( 1 ) शिव हा पहिला शब्द.  कला 1ली – दर्शा. तिची अधिष्ठात्री देवता त्रिपुरसुंदरी. ही कला शिवतत्त्वात्मक आहे. त्यामुळे शिव शब्दाचा अर्थ दर्शा. ह्या कलेले प्रकृतिभूत अक्षर क आाहे म्हणून श्लोकातील पहिला शब्द शिव हा क हे अक्षर सुचवितो. जो मंत्राचे पहिले अक्षर आहे.

( 2 ) शक्ति हा दुसरा शब्द दृष्टा ह्या दुसर्‍या कलेचे वाचक असून ते शक्तितत्त्वात्मक आहे. शक्ति तत्त्वाचे बीजभूत अक्षर ए आहे. ए हे मंत्राचे दुसरे अक्षर आहे.

( 3 ) काम हा शब्द दर्शता ह्या तिसर्‍या कलेचा वाचक आहे. तिसर्‍या कलेची देवता ही कामच आहे. दर्शता कलेचे बीजभूत अक्षर ई आहे.  तेच  मंत्रातील तिसरे अक्षर आहे.

( 4 ) क्षिति म्हणजे पृथ्वी. पृथ्वीतत्त्वाचे  ल हे बीजाक्षर आहे. हे मंत्रातील 4 थे अक्षर आहे.

( 5 ) त्यानंरचा शब्द अथ आहे. अथ म्हणजे मागील 4 बीजाक्षरांचा एक खंड पूर्ण झाला हे सुचविणारे हृीं हे बीजाक्षर ( ह्या चार अक्षरांच्या खंडाला अग्निखंड म्हणतात; तर हृीं हया बीजाक्षरासह पाच अक्षरांच्या समूहाला वाग्भवकूट म्हणतात.)

( 6 ) आता दुसरा खंड सुरू होतो. दुसर्‍या खंडातील पहिले अक्षर रवि – सूर्यतत्त्ववाचक. सूर्यत्त्वााचे अक्षर – ह ( हे मंत्रातील 6 वे अक्षर)

( 7 ) सातवा शब्द शीतकिरण – म्हणजे चंद्र – स हे बीजाक्षर ( मंत्रातील 7वे अक्षर )

( 8 ) श्लोकातील 8 वा शब्द स्मर. स्मर म्हणजे कामदेव. त्याचे प्रकृतिभूत अक्षर क (मंत्रातील 8वे अक्षर)

( 9 ) हंस म्हणजे सूर्य. सूर्य ह अक्षराचा अधिपति आहे. त्यामुळे  ह (मंत्रातील 9 वे अक्षर)

( 10 ) शक्र – म्हणजे इंद्र त्याचे ल हे बीज आहे ( मंत्रातील 10 वे अक्षर )

( 11 ) येथे दुसरा खंड  ( कामराजकूट ) संपला त्याला हृीं  हे बीजाक्षर जोडले.  दुसर्‍या खंडात 6 अक्षरे आहेत.

शक्र नंतर तदनु हा शब्द येतो. तदनु म्हणजे त्या नंतर. दुसरा खंड संपून त्याच्या नंतर काय सुरू होणार ते सांगतो. परा, मार, हरयः  असे तीन शब्द येतात.

( 12 ) परा याचा अर्थ चंद्रकला असा आहे. चंद्राचे बीजाक्षर स आहे (मंत्रातील 12 वे अक्षर )

( 13 ) मार म्हणजे कामदेव. तो सर्वांना मारतो किंवा त्याच्यापायी सर्व मरतात म्हणून त्याला मार म्हणतात.  मारचे बीजअक्षर क आहे. ( मंत्रातील 13 वे अक्षर )

( 14 ) हरि चा अर्थ येथे  इंद्र होतो. इंद्राचे बीजाक्षर ल आहे. ( मंत्रातील 14 वे अक्षर)

येथे सोमखंड वा चंद्रखंड पूर्ण होतो. खंड पूर्ण झाला की आपण हृीं हे अक्षर जोडतो. ते ह्या ( मंत्रातील 15 वे अक्षर) हृीं सह ह्या खंडाला शक्तिकूट म्हणतात.

 ही 15 बीजाक्षरे म्हणजे मंत्रात्मक अशा त्रिपुरसुंदरी मातेचे अवयव मानले जातात.

चंद्र जसा 16 कलांनी पूर्ण असतो त्याप्रमाणे श्री ललितामहात्रिपुरसुंदरी 16 कलांनी युक्त आहे. चंद्राच्या पहिल्या कलेला प्रतिपदा तर पंधराव्या कलेला पौर्णिमा तर सोळाव्या कलेला आमावास्या म्हणतात. चंद्र कलेकलेने वाढतो म्हणजे आधीच्या कला पुढच्या कलेत समाविष्टच असतात. पौर्णिमेला सर्व 16 ही कला चंद्रात दिसतातच असा 16 कलांचा पूर्ण चंद्र आपल्याला पौर्णिमेला दिसतो. त्यानंतर एकएक कला उणावत जाते. पण सोळाव्या कलेला र्‍हास नाही. चंद्र दिसत नसला तरी असतोच. म्हणून ‘षोडशी तु कला ज्ञेया सच्चिदानन्दरूपिणी । ’ असे म्हणतात.

चंद्राचा कधीच र्‍हास वा क्षय होत नाही. तो सदासर्वकाळ पूर्णरूपातच असतो.  त्याचप्रमाणे महात्रिपुरसुंदरी हिचे अधिष्ठान असलेल्या मूर्धस्थानातील सहस्रदल कमलातील चंद्रमंडलाचे स्थानही तसेच आहे. सूर्यमंडलाच्या आड चंद्रमंडल जाण्याने कला निर्माण होतात. `अमा’ म्हणजे एकत्र आणि `वास्या’ म्हणजे राहणे. सूर्य, चंद्र एकत्र राहतात, एकासमोर एक य़ेतात त्याला आमावास्या म्हणतात तर जेव्हा सूर्यमंडल आणि चंद्रमंडल याच्यामध्ये पूर्ण व्यवधान /वियोग असते तेव्हा पूर्णचंद्र/पौर्णिमा असते. त्यामुळे सोळावी कला ही सर्व कलांमध्ये अनुस्यूतच आहे. तिच्यावर वृद्धि वा र्‍हासाचा परिणाम होत नाही म्हणून ती नित्य मानली जाते. तीच ही तुर्या स्थिती. मानली जाते. जेथे त्रिपुरसुंदरीचा कायमचा निवास असतो.

ह्या 15 अक्षरांच्या बीजमंत्रामुळे (जे तिचे अवयव आहेत)म्हणून हिला पंचदशाक्षरी वा षोडशीविद्या ; क ह्या अक्षराने सुरवात (आदि) म्हणून कादिविद्या ---- इ. असे म्हटले जाते.

यस्य वा पश्चिमं जन्म यदि वा शंकरः स्वयम् ।

तेनैव लभ्यते विद्या श्रीमत्पञ्चदशाक्षरी ।।

ज्याची जन्ममरण परंपरा शेवटाला येऊन पोचली असेल अथवा जो स्वतःच भगवान शंकर असेल त्यालाच ही पंचदशाक्षरी विद्या प्राप्त होऊ शकते असे आगमतंत्रात सांगितले आहे.  येथे थोडीशी चुणुक इतपतच माहिती दिली आहे.

 

*शिवः शक्तिः कामः क्षितिरथ रविः शीतकिरणः

स्मरो हंसः शक्रस्तदनु च परामारहरयः ।

अमी हृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता

भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् ।। ३२*

(अवसानेषु तिसृभिः हृलेखाभिः घटिताः ते अमी वर्णाः हे जननि तव नामावयवतां भजन्ते)

*अहो त्या देवाचे स्वरुप/शरिर असते मंत्रमय ते

असे तंत्रामध्ये वदति नित तंत्रज्ञ सगळे

असे श्रीविद्या हे अनुपमचि तंत्रात सकला

जयासी शंभूने अवनिवर केले प्रकट ह्या ।। ३२.

 

परी अप्रत्यक्षे कथति नित तो मंत्र सगळा

तसा येथे देती गुरुवर आचार्य सकला

असे एका शब्दातुन सुचवि बीजाक्षर इथे

क्रमाने शब्दांच्यामधुन पुरता मंत्र प्रकटे ।। ३२.

अहो हाची सोळाक्षर सकल तो मंत्र असुनी

इथे श्लोकी पंध्राक्षर बहु खुबीने सुचविली

मिळावे सोळावे नित गुरुमुखातून म्हणती

मिळे शिष्या सोळाक्षर सकल तो मंत्र श्रमुनी ।। ३२.

 

शिवा सांगे मंत्री प्रथम असे अक्षर असे

असे शक्तीचे अनुसरित बीजाक्षर दुजे

असे कामाचे नित तृतिय बीजाक्षर उमे

असे चौथे पृथ्वी क्षिति सुचवि बीजाक्षर हे ।।३२.४

 

असे र्‍हीं हे पंचाक्षर सुचवितो शब्द अथ हा

पुरा होई येथे जननि पहिला खंडचि असा

(पहिला खंड – 4 अक्षरे अग्निखंड हृीं सस 5 अक्षरांचा  वाग्भवकूट)

दुजा खंडामध्ये प्रथम रवि हा शब्दचि असे

दुजा खंडाचे गे प्रथम असे अक्षर असे ।। ३२.५

 

रवी तत्त्वाचे अक्षर नित सहावेचि असे

असे मंत्री सप्ताक्षर सुचवी शीतकिरणे

समानार्थी चंद्रासचि असतसे शब्द वरचा

सकारे चंद्राचे नित कथियले बीज असे ।। ३२.

 

स्मराचे आहे अक्षर प्रकृतीभूत सहजी

असे तेची अष्टाक्षर जननि मंत्रातिल मुळी

 अहो सूर्याला ह्या म्हणति नभिचा हंस चि असे

रवीबीजाचे ते नवमचि बीजाक्षर असे ।। ३२.७


असे शक्राचे ते नित दशम बीजाक्षर हे

अहो इंद्राला ह्या म्हणति जन हे शक्र चि असे

दुजा खंडा अंती तयि परत र्‍हीं अक्षर जुळे

पुरा होतो ऐसा सकलचि दुजा खंडचि इथे ।। ३२.८

 

(दुसरा खंड - कामराजकूट)

दुज्या खंडा अंती ``तदनु च’’ असे सांगत असे

दुज्या खंडा लागूनचि असति शब्दत्रय इथे

दुज्या खंडा अंती असतिच परा मार हरयः

परा हे चंद्राचे म्हणतिच दुजे नाम सकला ।। ३२.९

 

परा शब्दे येथे नित सुचविले अक्षर हे

अगे ते बारावे शशिशकल बीजाक्षर असे

जयापायी सारे मरति अथवा जो मृत करे

अगे संबोधीती म्हणुन मदना `मार’ चि असे ।। ३२.१०

 

अहो त्या माराचे नित कथति बीजाक्षर हे

असे ते तेरावे सलग जुळते अक्षर पुढे

हरी वा इंद्राचे नित कथति बीजाक्षर हे

असे जे चौदावे तयि पुढति र्‍हीं अक्षर असे ।। ३२.११

(तिसरा खंड – सोम अथवा चंद्रखंड)

असे हा मंत्राचा चरम तिसरा खंड जननी

पुरा होई पंध्राक्षर जननि हा मंत्र तवची

तिन्ही खंडाअंती जननि तव र्‍हीं बीजचि असे

 असे ते मंत्राचे जननि जणु चैतन्य अवघे ।। ३२.१२

 

अगे ह्या वर्णांनी अवयवचि मंत्रात्मक तुझे

इथे वर्णीयेले स्वरुप तव मंत्रात्मक असे

तिन्ही खंडाच्या ह्या नित पलिकडे खंड चवथे

कला ही सोळावी म्हणतिच तुरीया तिजसि गे ।। ३२.१३

(चवथा खंड – चंद्रकलाखंड, तुरीय खंड वा चंद्रकला म्हणजेच महात्रिपुरसुंदरी)

अशा ह्या रूपाचे स्मरण करती भक्त जन हे

तुझ्या ह्या रूपाचे करिति नित आराधन शिवे

तुझे हेची मंत्रात्मक स्वरुप गे वंद्य मजसी

तुला माते भावे नमन करतो मी तव पदी ।। ३२.१४*

----------------------------------------------------


श्लोक – 33

*स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः

निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।

भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः

शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ।। 33*

(त्रितय – तिन भाग असलेला. निधाय – नीटपणे ठेऊन. निरवधि – निःसीम, ज्याला अंत नाही, अनंत काळ. महाभोग – निरतिशय आनंद. सुरभि – कामधेनु. घृत – तूप. आहुति – यज्ञात अर्पण केले जाणारे तूप वा समिधा वा इतर द्रव्य.)

( अन्वय – हे नित्ये! निरवधिमहाभोगरसिकाः  एके तव मनोः आदौ स्मरं योनिं, लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणि-गुण—निबद्धा-अक्षवलयाः शिवाग्नौ सुरभि-घृत-धारा-आाहुति शतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति।)

*अजन्मा माते तू नच तुजसि मृत्यूच कधिही

असे तूची नित्या तुजसि दुखवी काळ न कधी

तुझ्या भक्तांना जे अनुपम मिळे सौख्यचि महा

शतांशासी त्याच्या मिळवु शकतो ना विधिच हा ।। 33.1

 

अगे ब्रह्मज्ञानी जननि अनुयायी तव पहा

तुझ्या त्या मंत्राचा करिति जप पंध्राक्षरि (15 अक्षरांचा) सदा

(‘तुझ्या पंचदश अक्षरी मंत्राचा जप’ हे वृत्तात बसवता आले नाही तरी क्षमस्व!)

तुझे माते विश्वात्मक प्रतिक ते मंत्रस्वरुपी

अशा मंत्रारंभी वदति नित ते अक्षर त्रयी ।। 33.2

 

असे ती क्लीं, हृीं, श्रीं सुचविलिच शब्दातुन तिन्ही

जसे क्लीं बीजासी सुचवित असे शब्द स्मरची

तसे योनी शब्दे सुचवित असे र्‍हीं पद पुन्हा

तसे लक्ष्मी शब्दातुन सुचवि श्रीं बीज जननी ।। 33.3

 

अगे हे क्लीं, हृीं, श्रीं म्हणति पहिल्यांदा स्तुतिचिया

णू बिल्वाचे ते त्रिदल चरणी अर्पिति तुझ्या

धरी माला चिंतामणिमयचि रत्नाचिच करी

कराया मंत्राचा सतत जप गे विश्वजननी ।। 33.4

 

असे स्थापीला जो हृदयकमलवेदीवर सदा

असे यज्ञाग्नी जो जननि शिवशक्तीस्वरुप गा ।

अशा यज्ञी मंत्रस्वरुप-सुरभीच्या घृतयुता-

हजारो धारांची जननि नित दे आहुति तुला ।। 33.5

(मूळ स्तोत्रात शतैः म्हणजे शतधारा म्हटलं आहे. वृत्तात बसण्यासाठी हजारो धारांची असा बदल केला आहे.)

तुझ्या सेवेसी गे नित असति जे तत्पर सदा

हृदी सातत्याने जप करिति जे भक्तचि तुझा

हृदी आनंदाच्या नित उठति उर्मीच अतुला

तयांच्या सौख्याची विधिसह न होईच तुलना।। 33.6*

----------------------------------------------------

 

श्लोक – 34


*शरीरं त्वं शम्भोः शशि-मिहिर-वक्षोरुह-युगं

तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् ।

अतः शेषः शेषीत्ययमुभय-साधारणतया

स्थितः सम्बन्धो वां समरस-परानन्द-परयोः ।।34*

( परानंद – भगवान् शंकर. परा – त्रिपुरसुंदरी. अघ- पाप. अनघ-  निर्दोष, शुद्ध. नवात्मा – सतत नवीन, नव चैतन्याने युक्त, सतत तरुण. मिहिर – सूर्य )

( अन्वय – हे भगवति त्वं शम्भोः शशि-मिहिर वक्षोरुहयुगं शरीरं असि, अहं तव आत्मानं अनघं नवात्मानं मन्ये; अतः  समरसपरानन्दपरयोः वा शेषः शेषी इति अयं सम्बन्धः उभयसारणतया स्थितः असि।)  

शिवाची काया तू समरस शिवाच्या तनुत गे

भरे पावित्र्याने अमल तनु निर्दोष अनघे ।

जगाला पोषी जे स्तन तवचि ते गे रवि-शशी

महा ऐश्वर्याने विलसतिच वक्षी उभयही ।। 34.1

 

सदा तारुण्याने मुसमुसत गे ही तव तनू

बघावी केंव्हाही परि गमतसे नूतन जणू ।

अशा तादात्म्याने फरक शिव शक्तीत न उरे

न मोठा छोटा हा फरक शिव-शक्तीतचि दिसे ।। 34.2

 

नवात्मा दोघेही भरुन उरले विश्व सगळे

असे दोघांचेही शरिर म्हणजे विश्व सगळे ।

तुम्हा दोघांमध्ये प्रमुख अथवा गौण न कुणी

म्हणोनी माझे हे नित उभयतांसी नमनची ।। 34.3

 

तुझ्यापाशी आहे सकल यश ऐश्वर्य अवघे

समग्र श्री पूर्णा सकलचि तुला धर्महि कळे

असे वैराग्याच्या सह सकल ते ज्ञान अवघे

सहाही गोष्टीच्या म्हणति समुदाया भग असे ।। 34.4

 

जिच्यापाशी आहे सकल भग ती गे भगवती

म्हणोनी संबोधी तुजसि जन हे गे भगवति

शिवालाही सारे म्हणति भगवान् शंकर जगी

रे भक्तीने मी नित उभयतांसी नमनची ।। 34.5*

----------------------------------------------------


श्लोक 35 –

*नस्त्वं व्योम त्वं मरुदसि मरुत्सारथिरसि

त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् ।

त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा

चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृषे ।। 35*

( व्योम – आकाश, मरुत् – वायु, आप - पाणी. मरुत्सारथि – सारथि म्हणजे सहाय्यक. वारा ज्याचा सहाय्यक आहे तो म्हणजे अग्नी. परिणाम – हा पारिभाषिक शब्द असून त्याचा अर्थ परिवर्तन. वपु- देह. विश्ववपु – हे विश्व ज्याचा/जिचा देह आहे. बिभृषे – धारण करतेस.)

*अगे आज्ञाचक्री जननिच मनस्तत्त्व स्वरुपी

वसे भ्रू-मध्याते मन बनुनि तू नित्य जननी

अगे कंठस्थानी वसशि नित आकाश बनुनी

विशुद्धी चक्राते जननि नित आकाशस्वरुपी ।। 35.1

 

अगे संवित् चक्री मरुत स्वरुपी तूच वससी

अगे जेची आहे जवळ हृदयाच्याच जननी

वसे स्वाधिष्ठानी जननिच मरुत्सारथि रुपे

करे ज्यासी वायू मदत नित त्या अग्निस्वरुपे ।। 35.2

 

वसे नाभिस्थानी जननि मणिपूरी जलरुपी

वसे मूलाधारी जननि धरणीतत्त्व बनुनी

अगे पृथ्वी, वायू, जल, अनल, आकाश सगळे

अशी पाची भूते जननि असशी तूच मन हे ।। 35.3

 

धरायासी विश्वस्वरुप तनु हे विश्ववपुषे

चिदानंदाकारा जननि करिसी धारण मुदे

असे तूची शक्ती जननिच जिला चिद् म्हणति गे

महा आनंदाचे स्वरुप शिव हे तू असशि गे ।।35.4

 

असे तूची शक्ती शिवहि असशी तूच जननी

असे तूची सारे शिवयुवति तू सर्व जगती

अगे कार्ये तूची सकलचि अधिष्ठान तयिचे

अगे कार्यांचेही जननि असशी कारण उमे ।। 35.5

 

परी ये ना बाधा तुजसि कधिही हे जननि गे

तुझ्या पायी आलो शरण तुजला विश्ववपुषे ।। 35.6*

----------------------------------------------------


श्लोक 36


 

*तवाज्ञाचक्रस्थं तपन-शशि-कोटि-द्युति-धरं

रं शम्भुं वन्दे परिमिलित-पार्श्वं परचिता ।

यमाराध्यन्भक्त्या रवि-शशि-शुचीनामविषये

निरालोकेऽलोके निवसति हि भालोकभुवने ।। 36*

*सहा चक्रे जी जी मम तनुत वास्तव्य करती

अगे श्रीचक्राते सकलचि अनुस्यूत असती

असे भ्रूमध्याते द्विदल तव जे चक्र बरवे

तया आज्ञाचक्री तुजसह विराजे शिव तिथे ।। 36.1

 

अशा आज्ञाचक्री तुज परचिदंबा म्हणति गे

महाशंभूनाथा म्हणतिच शिवासी नित तिथे

जणू कोटी कोटी नभि उगवले सूर्य शशि हे

असा तेजस्वी तो शिव दिसत आह्लादक तिथे ।। 36.2

 

इथे वांमांगाने शिव विलिन होई तुजमधे

अगे चित् शक्ती ह्या तवचि स्वरुपाशी मिळतसे

करे ह्या रूपाचे जननि नित आराधन हृदी

निरालोकासी तो जननि करतो प्राप्त सहजी ।। 36.3

 

जिथे पोचायासी जमत न रवी वा शशिस ही

जिथे चित् तत्त्वाच्या उजळत प्रकाशे सकल ही

प्रकाशाच्या ऐशा सुखमयचि `भालोकभुवनी’ 

दा राहे तोची अढळ शिव शक्तीस भजुनी ।। 36.4*

----------------------------------------------------

श्लोक 37 –

*विशुद्धौ ते शुद्ध-स्फटिक-विशदं व्योमजनकं

शिवं सेवे देवीमपि शिव-समान-व्यवसिताम् ।

ययोः कान्त्या यान्त्याः शशिकिरण-सारूप्यसरणे-

र्विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगती ।। 37*

( विशद – स्वच्छ, पवित्र, निर्मल, विमल, चमकदार, शुभ्र. सरण – जाणारा, गतिशील,वाहणारा, वहनशी, प्रगतिशील. ध्वान्त- अंधार. व्यवसायात्मिका – निश्चयात्मिका.  शिव-समान -व्यवसिता – शिवाच्या समान, शिवाप्रमाणेच दृढ संकल्प असलेली, सर्व जबाबदारी पार पाडणारी. समान संकल्प, निर्धार असलेली. प्रयत्नशील, निश्चयी, उर्जस्वी, उद्योगी, परिश्रमी, धैर्यवान, दायित्व पार पाडणारी.)

*असे कंठस्थानी कमलस्वरुपी चक्र स्थित जे

विशुद्धी नावाचे असति दल सोळाच तयि गे

तयामध्ये राहे स्फटिकसम विश्वेश्वर शिव

असे आकाशाचा जनक शिव तो आत्मस्वरुप ।।37.1

 

म्हणोनी संबोधी जगत तयि व्योमेश्वर असे

हृदी त्या व्योमेशा अविरतचि मी गे भजतसे

असे शंभूअंगी अतुल बल सामर्थ्य नित जे

तुझ्या अंगी तेची जननि वसते निश्चितपणे ।। 37.2

 

अगे ‘सांभाळावे जगत सगळे’ निश्चय असे

तुम्हा दोघांचाही; उभय झटता त्यास्तव भले

जरी माते कार्ये असति तुमची भिन्न स्वरुपी

री सामर्थ्याते लव फरक ना निश्चितपणे ।। 37.3

 

पहाता दोघांची जननि  क्षमता तुल्यबळ ही

तुझ्या पायी आलो नमन तुजला वंद्य जननी

विशुद्धी चक्राते वसशिच शिवासन्निध सदा

मनाला भक्तांच्या उभय करिता मोदित सदा ।। 37.4

 

असे दोघांचीही अति विमल कांती शशिसमा

सदा आह्लादाचे किरण निघती त्यातुन सदा

प्रभा विस्तारे ही सहज पसरे भक्तहृदयी

हरे अज्ञानाचा घन तमचि ती सर्व सहजी ।।37.5

 

प्रभेने ज्ञानाच्या उजळुन निघे चित्त सहजी

तयाने होई गे अति विमल भक्तांचिच मती

सुखावे चंद्रासी बघुनच चकोरी  हृदयि गे

विशुद्धीचक्राते  बघुन शिवशक्तीसचि तसे ।। 37.6----

 

हृदी होती आनंदित सकल हे भक्तगणची

तुम्हा दोघांनाही स्मरत हृदयी मी निशिदिनी।। 37.7*

----------------------------------------------------

 

श्लोक 38


*समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं

भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम्

यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-

र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ।। 38*

( समुन्मीलत् - म्हणजे ज्याचा पूर्ण विकास झाला आहे, जे पूर्ण उमलले आहे असे (कमळ). गुणित – गुणाकार केलेल्या, संगृहीत, मोजलेल्या एकाच जागी ढीग करून ठेलेल्या. परिणति – परिवर्तन, रूपांतर, कायापालट, विकास. किमपि – अनिर्वचनीय. अष्टादश – अठरा. चौदा विद्या + चार वेद =18 विद्या   )

*असे माते संवित् कमल हृदयाच्या निकट जे

तयाची बाराही उमलुन दले पूर्ण विकसे ।

विराजे त्यामध्ये प्रतिदलचि आदित्य सगळे

सदा ज्ञानाचा तो सुमधुर मधू त्यातुन गळे ।। 38.1

 

अशा ह्या पद्माच्या मधुर मधु प्राप्तीस्तव तिथे

सुखे दो हंसाची अनुपमचि जोडी विहरते ।

असे ती जोडी गे शिव अन शिवेची अनुपमा

वसे भक्ता-चित्ती मनसरसि संचार करण्या ।। 38.2

 

अनाहाती हंसेश्वर वदति हंसेश्वरि तया

तयांमध्ये चाले बहु सुखद संवादचि भला ।

तयांच्या संवादातुन विकसती वेद सकला

कला चौसष्ठाही अन सकल विद्याहि चवदा।। 38.3

 

करावे हंसानी जल अन दुधासी अलग ते

तसे भक्तांच्याही करिति गुणदोषा विलग ते ।

गुणग्राहि दोघे करितिच पृथक् दोष-गुणही

करीती भक्ताचे गुणग्रहण मोदे उभयही ।। 38.4

 

करे त्राही त्राही विष सकल लोकांस बहु जे

धरे कंठी तेची अभय सकला देउन त्वरे ।

जनांच्या चित्तासी परि निवविण्या, मोद मिळण्या

धरे चंद्रा माथी अति सुखद त्या शीतल पहा ।। 38.5

 

महापीडा कंठी दडवि इतरांचीच जळती

सुखासी सार्‍यांच्या नित धरि सुधांशूसचि शिरी

असे कल्याणाच्या सुखमयच मूर्ती उभय जे

अगे माते ऐशा शिव अन तुला हे नमन गे ।। 38.6*

----------------------------------------------------


श्लोक 39

 

*तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं

तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् ।

यदालोके  लोकान् दहति महति क्रोधकलिते

दयार्द्रां या दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति ।। 39*

(आलोक – प्रकाश, ज्वाला, अत्यंत क्रोध कलित – धरलेला. क्रोधकलित – हृदयात राग धरलेला, भरलेला )

*जिथे स्वाधिष्ठानी शिव वसतसे अग्निस्वरुपी

तिथे त्या संवर्तेश्वर प्रलयकारीच म्हणती

महा क्रोधे त्याच्या उसळतिच ज्वाला वरवरी

कराया संहारा शिव हृदयि प्रक्षोभच किती ।। 39.1


तयाच्या वामांगी जननि समयाम्बा म्हणुनची

बसे तूची माते  धरुनिच दया गे तव हृदी ।

जना संवर्ताग्नी शिवस्वरुप जाळे सकलची

करे त्राही त्राही जन सकल ते मृत्यु बघुनी ।। 39.2


तयावेळी माते सुखकर कृपादृष्टि तव ही

जनांसी सार्‍या ह्या सहज निववी शीतल अशी

कृपा होता भक्तांवर जननि गे शीतल अशी

गमे शेकोटीच्या जवळ बसलो शेकत  अम्ही ।। 39.3


अगे झेलूनीही अनल प्रलयीचा भयकरे

मिळे त्यांना त्याची उब सुखद ती गे तुजमुळे

तुझे स्वाधिष्ठानी स्मरण शिवतत्त्वासह करे

अभिन्ना रूपाने  तुजसि स्तवितो हे जननि गे ।। 39.4*

----------------------------------------------------


श्लोक 40

 

*तटित्वन्तं भक्त्या तिमिर-परपन्थि-स्फुरणया

स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।

तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं

निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ।। 40*

( परिपन्थिन् – विरोध करणारा, रस्ता अडवणारा  रत्नाभरण- रत्न आभरण. आभरण- दागिना. परिणतनिषेवणम् – सेवा, पूजा, आराधना, अभ्यास, अनुष्ठान. हर – प्रलयकाळीचा अग्नी. मिहिर - सूर्य )

 

*जिथे मूलाधारी शिव वसत मेघेश्वररुपी

तयाच्या वामांगी बिजलीसम शोभे तव छबी

असे दोघांचेही मणिपुर अधिष्ठान बरवे

तुझ्या शंभूचे गे अति प्रमुख हे मंदिर असे ।। 40.1

 

स्फुरे विद्युल्लेखा क्षणभर परी ती तम हरे

प्रकाशाने तू गे सततचि झळाळे जननि गे

प्रकाशामध्ये ह्या तम विरुन जाई मणिपुरी

तुझ्या भक्तीने गे कर विलय अज्ञान-तमही ।। 40.2

 

अलंकारांनी गे जननि नटली ही तनु तुझी

प्रभा त्या रत्नाची जणु उमटवी इंद्रधनुसी

शिवा अंगी शोभे अबलख असे इंद्रधनु हे

कृपेने ओथंबे शिवस्वरुप मेघेश्वर गमे ।। 40.3

 

म्हणे त्राही त्राही त्रिभुवन महा घोर प्रलयी

रवी अग्नी तापे सकल जन हे होरपळती

सुधा धारा तेव्हा बरसविच मेघेश्वर तदा

 तुझ्या सामर्थ्ये जो जननि नित सम्पन्नचि सदा ।। 40.4

 

असो भक्तीभावे तव उभयतांसी नमनची

करावा सेवेचा मुदित-मन स्वीकार जननी ।। 40.5*

----------------------------------------------------


श्लोक 41

तवाधारे मूले सह समयया लास्य परया

नवात्मानं मन्ये नव-रस-महा-ताण्डवनटम् ।

उभाभ्यामेताभ्यामुदयविधिमुद्दिश्य दयया

सनाथाभ्यां जज्ञे जनक-जननीमज्जगदिदम् ।। 41

(लास्य – पार्वतीच्या नृत्याला लास्य तर शिवाच्या नृत्याला तांडव म्हणतात. महा लास्य करणारी ती महालास्या म्हणजेच म्हाळसा. )

असे मूलाधारी जननिच अधिष्ठान तव गे

नवात्मा शंभूही तुजसह महाभैरव रुपे

पहावे आश्चर्ये अभिनव असे ताण्डव करे

रसांची निष्पत्ती घडवि नटराजा सहज गे ।। 41.1

 

शिवाच्या ह्या नृत्यातुन प्रकटवी तो तरलसे

प्रकर्षाने सारे नवरसचि ते अद्भुतपणे

महानाट्याच्या ह्या बहुविध अशा नृत्यसमयी

तुझ्या लास्याचेही अनुपम अविष्कार दिसती ।। 41.2

 

जगाच्या कल्याणा जननि तुमचे नर्तन असे

पिता माता तुम्ही सकल जगताचे सदय हे

जनांची पाहोनी प्रलयसमयी दीनचि स्थिती

तुम्हासी येई हो बहु कळवळा नित्य हृदयी ।। 41.3

 

तुम्ही  झाला त्यांचे सदयहृदयी पालक जगी

जगाचे प्रेमाने अविरतचि संगोपन करी ।

शिवाभिन्ना शक्ती  नमन चरणी नित्य तुमच्या

करावा सेवेचा मुदित-मन स्वीकारचि सदा ।। 41.4

----------------------------------------------------


श्लोक 42

 ह्या दीर्घ स्तोत्राचे दोन भाग होतात. 1- 41 श्लोकांना आनंदलहरी तर 42- 100 ह्या श्लोकांना सौन्दर्यलहरी म्हणतात. संपूर्ण स्तोत्राला सौन्दर्यलहरी म्हणतात. 

गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिः सान्द्रघटितं

किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः ।

स नीडे यच्छायाच्छुरणशबलं चन्द्रशकलं

धनुः शौनासीरं किमिति न निबध्नाति धिषणाम् ।। 42

( गगनमणिचंद्र, सूर्य ग्रह, तारे, नक्षत्र. सान्द्रदाटीवाटीने, खच्चून, भरगच्च. शबलरंगिबेरंगी, विविध रंगी. नीडेय- मुकुटाच्या वर्तुळाकारात बसवलेली रत्ने. असिरः किरण, बाण. चंद्रशकल - चंद्रकोर  धिषणा – स्तुती, भाषण, बुद्धि. शौनासीर – इंद्र. धनुः शौनासीरं - इंद्रधनुष्य )

सुवर्णाचा शोभे मुकुट तव बावन्नच कशी

तया वर्णु जाता मजजवळ शब्दासच कमी

शशी सूर्याचे हे गगनमणि रत्ने बनवुनी

किरीटी दाटीने जडवुन बने नक्षि समुची ।। 42.1

 

कशा गोलाकारी चमकतिच रत्नावलि अहा!

किती नाना रत्ने अनुपम असे रंग तयिचा

प्रभा रत्नांची ही बहु रुचिर रंगीत पडता

सुलेखा चंद्राची तव शिरि दिसे इंद्रधनु का ।। 42.2

 

बघे जो जो त्यासी अनुपम दिसे ही शशिकला

असे हे इंद्राचे धनुष मति सांगेच तयिला ।। 42.3

--------------------------

श्लोक 43

धुनोतु ध्वान्तं नस्तुलित-दलितेन्दीवरवनं

घन-स्निग्धं श्लक्ष्णं चिकुर-निकुरुम्बं तव शिवे ।

यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो

वसन्त्यस्मिन्मन्ये वल-मथन-वाटी-विटपिनाम् ।। 43

 ( धुनोतु – धुवून टाको. ध्वान्त – अंधार. नः – आमचा. तुलित- उपमा दिलेला, तुलना केलेला. दलित- पूर्ण उमललेला, पूर्ण पसरलेला. इन्दिवर – नीलकमल. श्लक्ष्णम्मृदु, कोमल, स्निग्ध, सौम्य, चमकदार. चिकुरकेस.  निकुरुम्बकेस, केशकलाप. वलमथनइंद्र. वाटी – उद्यान, उपवन.  विटप/ विटपिन् – झाडे, फांद्या, झाडांचा विस्तार )

लडी ह्या केसांच्या सघनचि मऊ दाट कुरळ्या

बघोनी वाटे गे फुललि कमळे नील बहुला

फिरे दृष्टी मोदे गहन जणु इंदीवर वनी

कळ्या पुष्पे जेथे फुलति किति दाटीतच निळी ।। 43.1

 

जणू गुंफीली का सघन तव वेणी सुबकशी

तुर्‍यांनी गुच्छांनी सकल सुमनांनी मिळुन ही

जलौघाने जाई भरुन सरिता घेत वळणे

तशी ही वेणी गे परिमल फुलांनीच बहरे ।। 43.2

 

भरे अज्ञानाचा घन तिमिर चित्तीच अमुच्या

तुझ्या हया केसांनी त्वरित विरु दे तो तम महा

तुझ्या ह्या केसांचा परिमल सुगंधी दरवळे

सुगंधाची त्या गे नचचि तुलना हो कधि शिवे ।। 43.3

 

 म्हणोनी इंद्राच्या सुखद बगिचातील कुसुमे

तयांमध्येही ती सुविमलचि कल्पद्रुम-फुले

तुझ्या ह्या केसांचा लव मिळविण्या सौरभ शिवे

फुलांच्या घोसांनी सजवितिच वेणी तव उमे ।। 43.4

--------------------------

श्लोक 44 –

*तनोतु क्षेमं नस्तव वदन-सौदर्यलहरी-

परीवाहः स्त्रोतःसरणिरिव सीमन्तसरणिः ।

वहन्ती सिन्दूरं प्रबल-कबरी-भार-तिमिर-

द्विषां वृन्दैर्बन्दीकृतमिव नवीनार्ककिरणम् ।। 44 ।।*

 ( नः क्षेमं तनतु - आमचे कल्याण करो. सरणि -मार्ग. सीमन्तसरणि – भांग. परीवाहः – वाहणारा. स्त्रोत – पाट, निर्झर. द्विषांवृदैः – द्वेष करणार्‍यांनी अथवा शत्रू समुहाने. बन्दिकृत – बंधक, बंदी बनवलेले. नवीनार्क – नवीन अर्क – नुकता उदयाला येणारा सूर्य.  )

*तुझ्या भांगाने हे मृदुल कुरळे केस तव हे

                 विभागूनी केला जणु सरळ सौभाग्यपथ गे

तुझ्या लावण्याचा खळखळत तो निर्झर सुखे

जणू जातो वाटे पुढति पुढती रम्य गतिने ।। 44.1

 

पहाटे सूर्याच्या किरण-निकरांनी सजवुनी

जणू सिंदूराची उमटलिच लेखा सरळ ही

नभी भानू येता सकल तम जाईच विलया

म्हणोनी का भ्याले घनतमसमा केश विपुला ।। 44.2

 

अहो ह्या भांगाचे किरणमय आरक्तपण हे

बघोनी केसांच्या मनि उपजले का भय असे

करी दो बाजूंनी अरुणपथ बंदिस्त पुरते

तुझे काळे काळे घनतम-समा केश कुरळे ।। 44.3

 

अगे सूर्याच्या ह्या किरण-निकराच्या सम असा

सुदीर्घा आरक्ता सरळ तव हा भांग सुखदा

मनोहारी वाटे जननि तव भक्तांस सकला

करो कल्याणासी जन-जननि गे नित्य अमुच्या ।। 44.4*

--------------------------------------

श्लोक 45

*अरालैः स्वाभाव्यादलि-कलभ-सश्रीभिरलकैः

परीतं ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिम्।

दरस्मेरे यस्मिन्दशनरुचिकिञ्जल्करुचिरे

सुगन्धौ माद्यन्ति स्मर-दहन-चक्षुर्मधुलिहः ।। 45 ।।*

 ( अराल – कुरळे. कलभ -  पिलु. अलि- भुंगा. अलिकलभ- भुंग्यांची छोटी पिल्ले. अलक – केसांच्या बटा. परीत –वेढलेलं. वक्त्र – मुख. परिहसति – चेष्टा करतात. उपहास करतात. पङ्केरुह – कमळ. स्मेर – मंद हास्य. दशन- दात. किञ्जल – कमळाचे फूल. स्मरदहन – मदनाला जाळणारा म्हणजे शंकर. मधुलिह - लोलुप)

*तुझ्या काळ्या काळ्या जननि कुरळ्या केश लडि ह्या

पुढे येती कैशा फिरुन मुखपद्मावर तुझ्या

मला वाटे जैसे भ्रमर-शिशु हे गुंजन करी

सरोजाहूनी ह्या सुखद मुखपद्मावर किती ।। 45.1

 

जरासे होता गे विलग तव हे ओठ जननी

करीता थोडेसे स्मित; चमकती दात तवही

जणू पद्माचे ते विमल दिसती केसर किती

मुखाची शोभा ही अनुपम दिसे माय जननी ।। 45.2

 

शिवाच्या नेत्रांचे भ्रमर फिरती ह्या तव मुखी

सुगंधासाठी वा अधर-मधुपानास्तव किती

शिवाच्या नेत्रांसी सुखवित असे जे मुख तुझे

करो कल्याणासी जननि अमुच्या गे सतत हे ।। 45.3*

-------------------------------------

 श्लोक 46

*ललाटं लावण्य-द्युति-विमलमाभाति तव यद्-

द्वितीयं तन्मन्ये मुकुटघटितं चन्द्रशकलम् ।

विपर्यासन्यासादुभयमपि सम्भूयच मिथः

सुधालेप-स्यूतिः परिणमति राका-हिमकरः ।। 46 ।।*

(द्युति  - तेज . सुधालेप – चुना. स्यूतिः –टाका घालून शिवणे, जोडणे. विपर्यास – उलटे. न्यास – ठेवणे, एखाद्या अवयवाचं आरोपण करणे. उभय – दोघे.  परिणमति – रुपांतरीत होणे. मिथस् – एकत्र येणे, सहकारी बनणे, एकरूप होणे. राका- पौर्णिमा. हिमकर – चंद्र. राका-हिमकरः – पौर्णिमेचा शीतल चंदणं देणारा चंद्र )

*तुझ्या लावण्याची पसरलि प्रभा शुभ्र विमला

कपाळासी मोत्यासम चमक आह्लादक अहा

शिरी चंद्राची ही धवल चमके कोर बघुनी

मला वाटे माते शशि-शकल हे दोन दिसती ।। 46.1

 

किरीटी चंद्राचे शकलचि असे एक, तुझिया

तयाखाली शोभे शकलचि ललाटस्वरुप गा

शिरीच्या चंद्राची दिसती वर टोके सुबकशी

करी खाली टोके हिमकर ललाटस्वरुपची ।। 46.2

 

मुखे त्या दोघांची करुनिच समोरी निगुतिने

चुन्याने सांधूनी सुबकरितिने दोन शकले

घडे गोलाकारी सुखकरचि हा पूर्ण शशि गे

दिसे जो आकाशी तळपत असे अमृतकरे ।। 46.3

 

ललाटाचे ऐसे सुखद तव लावण्य सुखवी

तुझ्या भक्तांसी गे; नमन करती ते तव पदी ।। 46.4*


-----------------------------------

श्लोक 47

भ्रुवौ भुग्ने किञ्चिद्भुवनभयभङ्गव्यसनिनि

त्वदीये नेत्राभ्यां मधुकररुचिभ्यां धृतगुणम् ।

धनुर्मन्ये सव्येतरकरगृहीतं रतिपतेः

प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमुमे ।। 47

( भुग्नबाकदार, कमानदार. भुवनभयभङ्गव्यसनिन् – त्रिभुवनाचे भय दूर करण्याच्या कामाचं जणु काही सवयच जडलेली. प्रकोष्ठ कोपर.)

( मदनाची नावे  - अनंग, कंदर्प, काम, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर. )

करावे त्रैलोक्या भयरहित हा छंद जडला

तुला माते ऐसा जगत-उपकारास्तव भला

मुठीमध्ये ठेऊ जगत मम धाकात सगळे

अशा ह्या दैत्यांचे भिववितिच संकल्प मनिचे ।। 47.1

 

भिती ज्यांची वाटे सुरवर मुनींसी नित हृदी

जिरे त्यांची मस्ती लव उचलिता तू भुवइसी

धनुष्याकारी ह्या तव असति रेखीव भुवया

अनंगाचे जाई सुमनधनु जे व्यर्थ न कदा ।। 47.2

 

असा आहे माते तवचि भुवयांचाच महिमा

खलांना ठेवाया वठणिवर त्या अंकुशसमा

तयांच्या सौंदर्या नचचि उपमा सुंदर दुजी

शिवाला जिंकाया भृकुटि धनु योजी मदन ही ।। 47.3

 

न ये कामी त्याचे कुसुमधनु ते शंभु पुढती

न चाले पुष्पांचा मृदुल शर या शंभुवरती

धनुष्याची दोरी भ्रमरमय ती काम न करी

तुझ्या नेत्रांचा का मदन म्हणुनी आश्रय धरी ।। 47.4

 

अगे काळे काळे नयन भ्रमरांच्यासम तुझे

 करे त्याची दोरी जय मिळविण्या तो मदन गे

धरे डाव्या हाती भृकुटि धनु ताणून सुभगे

दुजी युक्ती नाही जय मिळविण्या शंभुवर गे ।। 47.5

 

धनुष्याच्या मध्या मदन कर आच्छादित करे

मुठीने झाके जो नयनधनुचा भागचि उमे

 तुझ्या भ्रू मध्यासी बघु न शकती हे जन कधी

कळेना लोकांसी जननि तव अंतर्मन कधी ।। 47.6

 

मनोजाच्या योगे हृदि उपजता कामचि असा

दिसावे कैसे ते जननि तव अंतर्मन जना ।। 47.7

-------------------------------------

 

श्लोक 48 –

अहः सूते सव्यं तव नयनमर्कात्मकतया

त्रियामां वामं ते सृजति रजनी-नायकतया ।

तृतीया ते दृष्टिर्दर-दलित-हेमाम्बुज-रुचिः

समाधत्ते सन्ध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम् ।। 48

( अहःदिवस, सकाळ. सूतेजन्म देते. सव्यंउजवा. अर्क – सूर्य यामः – तीन तासांची वेळ. त्रियामा – तीन संधिकाळ. रजनि नायक- चंद्र. दरम् - थोडेसे, जरासे, किंचित. दर-दलित – किंचित विकास पावलेले. हेमाम्बुज – सोन्याचे कमळ. समाधत्ते – रचना करणे. )

1) सकाळ आणि दुपार ह्यांचा मिलनकाळ ,  (मध्याह्न)

2) दुपार आणि रात्र वा ह्यांचा मिलनकाळ (संध्याकाळ)

3) रात्र आणि सकाळ ह्यांचा मिलन काळ. (पहाट/उषःकाल)

ह्या तिन्ही संधिकाळाला मिळून मराठीत तिन्हीसांजा म्हणण्याची पद्धत आहे.

रवी चंदा अग्नी तव नयन माते सुखविती

घडे त्यांच्या योगे दिवस, रजनी, संधि तिनही

रवीरूपी जेंव्हा जननि उजवा नेत्र उघडे

उषःकालाने हा सुखद दिन आरंभचि घडे ।। 48.1

 

शशीरूपी डावा नयन तव निर्मीच रजनी

तिन्ही सांजा होती अनल-नयनासी उघडुनी

करे अग्नीरूपी नयनचि उषःकाल जननी

तसेची मध्याह्ना अनल करि संध्यासमयही ।। 48.2

 

तुझ्या ह्या नेत्रांची किति महति गावी जननी गे

रवीरूपी हाची नयन उजळे विश्व सगळे

कराया कर्तव्या जगत व्यवहारास करण्या

करे भानूरूपी नयन तव उद्युक्त सकला ।। 48.3

 

जगा देई शांती अपरिमित आह्लाद बहु गे

शशीरूपी माते तव नयन हा सौम्य अति गे

अगे अग्नीरूपी कनक-कमलाच्या कळि समा

पवित्रा नेत्राने घडति किति यज्ञादिक क्रिया ।। 48.4

 

वसे देही वैश्वानर स्वरुप तो अग्नि जठरी

वसे प्राण्यांच्या तो तनुत नित वैश्वानर रुपी

त्रिनेत्री तुम्ही हे उभय कळिकाळापलिकडे

उमा शंभु यांचे नच विलग अस्तित्त्व उरते ।। 48. 5

 

अहो विश्वाच्या ह्या जननि-जनकांच्या सुचरणी

झुको भक्तीभावे नमन करण्या मस्तक झणी


-------------------------------------


श्लोक 49

* विशाला कल्याणी स्फुटरुचिरयोध्या कुवलयैः

कृपाधाराधारा किमपि मधुराभोगवतिका ।

अवन्ती दृष्टिस्ते बहु-नगर-विस्तार-विजया

धृवं तत्तन्नाम-व्यवहरण-योग्या विजयते ।। 49*

 

*तुझ्या दृष्टीमध्ये तरळति किती भाव विविधा

अगे माते कैसे विविध समयासी उचित गा

विशाला दृष्टी ही जननि तव अंतर्विकसिता

तियेसी ज्ञानी हे म्हणति जननी गे विकसिता ।। 49.1 

 

असे कल्याणी ही; विरहित असूया, करि कृपा

हिताचे भक्तांच्या नजर करते विस्मितदृषा

अयोध्या नामे ही नजरचि अजेया नित असे

अयोध्येसी कोणी जगतिच पराभूत न करे ।। 49.2

 

जया संबोधीती कुवलयचि नीलोत्पल असे

मनोहारी दृष्टी सकल हृदयां ती निवविते

असे कारुण्याचा अमित जलधी जी निरुपमा

कृपाधारांचा जी करित नित वर्षाव निरता ।। 49.3 --

 

कृपाधारा दृष्टी म्हणति अलसा ही तिज कुणी

असे माधुर्याची किमपि मधुरा  दृष्टि तव ही

असे माधुर्याची अनुपमचि निस्यंदिनि महा

तिला संबोधीती कुणि विलसिता वा चि वलिता ।। 49.4

 

सुखाची प्रत्यक्षा सकल अनुभूतीच हृदया

अगे जी देते ती, वदति तिजला भोगवतिका

अवंती भक्तांचे करितचि असे रक्षण सदा

तिला मुग्धा ऐसे म्हणति अजुनी  प्राज्ञ जन वा ।। 49.5

 

महासाम्राज्ये ही नित भरभराटी अनुभवे

महा सामर्थ्याने नित नगरविस्तारचि घडे

तयांच्या ऐश्वर्यावर करितसे मात तव गा

तुझी दृष्टी माते म्हणति तिज विस्तारविजया ।। 49.6

 

अगे ह्या अर्धोन्मीलित तव कटाक्षास विजयी

जगी संबोधीती  जन सकल आकेकर इति

असे नावा ऐसी उचित व्यवहारा अनुरुपा

तुझी दृष्टी ऐसी जननि अति सर्वोत्तम धृवा ।। 49.7

 

असे ह्या नावांनी परिचित अशा आठ नगरी

तयांच्या नावाच्या सम असति त्याही गुणमयी

कृपादृष्टी ऐसी जननि मम कल्याणचि करो

कृपेचा माते हे नजर तव वर्षावचि करो ।। 49.8*

-------------------------------------

 

कवीनां संदर्भ-स्तबक-मकरन्दैक-रसिकं

कटाक्ष-व्याक्षेप-भ्रमर-कलभौ कर्णयुगलम् ।

अमुञ्चन्तौ दृष्ट्वा तव नवरसास्वादतरला-

वसूयासंसर्गादलिक-नयनं किञ्चिदरुणम् ।। 50 

(कविकवी, त्रिकालज्ञ, तत्त्ववेत्ता । सन्दर्भ -संगति, संलग्नता, निरंतर संबंध.  स्तबक - फुलांचा गुच्छ, ताटवा, घोस । कटाक्ष - व्याक्षेप – नेत्रांचे चंचल होणे, इकडे तिकडे नखरेलपणाने नाचणे. अमुञ्चन्तौ – सहवास न सोडणारे दोन्ही (नेत्र). तरल – चपळ. नवरसास्वादतरलौ -  नवरसांचा स्वाद घेण्यास उत्सुक. असूयासंससर्गात – मत्सरग्रस्त होऊन  कलभ  शिशु, छावाभ्रमरकलभौ - जणु भ्रमरांचे छोटे दोन छावे. अलिकम् – मस्तक.  अलिकनयनम् – कपाळावरील नेत्र)

 

तुझ्या कानांनी गे श्रवण करिसी काव्य रचना

कवी वाल्मीकी वा अनुपम अशी व्यास प्रतिभा

महा तत्त्वज्ञानी हरिहर त्रिकालज्ञ अवघे

कृतींचा त्यांच्याही श्रवण करिसी काव्य-रस गे ।। 50.1

 

फुलाच्या घोसांच्या सम बघुनिया काव्यरचना

किती त्या संपृक्ता नवरस-मधानेचि भरल्या

रुची सत्काव्याची अनुपम मिळो नित्य म्हणुनी

सुदीर्घा आकर्णा नयन तव कर्णांस मिळती ।। 50.2

 

रसांच्या ओढीने नयन तव घे  धाव तिकडे

करी कानांची हे सतत सलगी दीर्घ नयने

कटाक्षा पाहोनी मजसि गमते हे जननि गे

मिलिंदांचे छावे चपळ पळती का उभय हे ।।50.3

 

मिळे दो नेत्रांना नवरसरुपी काव्य मधु जो

तुझ्या भाळीच्या ह्या तृतिय नयना ना मिळत तो

म्हणोनी क्रोधाने मज अरुण वर्णी दिसतसे

मुखासी ऐशा गा तव जननि मी गे स्मरतसे ।। 50.4

---------------------------------------

 श्लोक   1 - 25

श्लोक  51 -  75

श्लोक  76 - 100

No comments:

Post a Comment