पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम् विश्लेषण

 पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 11-

हे त्रिपुरहर!

आपल्या सेवेने काय शक्य होत नाही? जसे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आपल्याला शरण आल्यावर आपण त्यांचे मनोरथ पूर्ण केले, त्यांच्या मनीची आपले स्वरूप जाणण्याची इच्छा पूर्ण केली; त्याप्रमाणे जराही भेदभाव न करता आपण रावणावरही प्रसन्न झाला. सुष्ट असो वा दुष्ट, जो आपल्याला अनन्यभावे शरण येतो त्या प्रत्येकाला आपण तेवढ्याच प्रेमाने जवळ करता आणि त्याची कामना पूर्ण करता.

रावणाने आपल्याला प्रसन्न करण्यासाठी त्याची नऊ शिरे कापली आणि आपल्या चरणी ही शिरकमळे अर्पण केली. दहावे शिर आपल्या पायी नमवून आपल्या हाताने दहावेही शिर कापून तो आपल्या चरणी अर्पण करणार इतक्यात त्याचा तो परमोच्च त्याग पाहून आपले मन द्रवले. आपण प्रकट झाला. त्याला त्याचे दहावे मस्तक कापण्यापासून परावृत्त केले. आणि त्याला इच्छित वरही दिला.

हे त्रिपुरारी, युद्ध करायची खुमखुमी न जिरताच त्याला विनासायास लंकेचे साम्राज्य प्राप्त झाले. सर्वांना युद्धात परास्त करण्यासाठी त्याच्या भुजा फुरफुरत राहिल्या त्या उगीच का?  त्याच्यामागे आपल्या वरदानाचे प्रचंड सामर्थ्य होते म्हणूनच त्या दैत्याचा अहंकार असा शिगेला पोचला. ( जेव्हा एखादा सामान्य कस्पटासारखा कोणी  मोठ्या मोठ्या बढाया मारू लागतो वा उंच उड्या मारतो तेव्हा त्याच्यामागे मोठी शक्ती त्याला सहाय्य करत आहे हे समजावे.)

सुष्ट, दुष्ट ह्या सर्वांवर आपण कृपा करता. कोणामधेही भेदभाव करत नाही. तरी हे शिवा माझी भक्ती एक दिवस मला नक्की आपले दर्शन घडवील ही मला आशाच नाही तर खात्री आहे.  

 

 

अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं

दशास्यो यद् बाहूनभृत रणकण्डूपरवशान्।

शिरःपद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहबलेः

स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम्।।11

अन्वयार्थ -   हे त्रिपुरहर! – हे तिनही पुरांचा नाश करणार्‍या शंकरा, यद् दशास्यः - रावणाने जे  अवैर व्यतिकरं त्रिभुवनम् अयत्नात् आपाद्य – वैरी नसलेले त्रिभुवनाचे राज्य प्रयत्न न करता प्राप्त करून रणकण्डू परवशान् बाहून् अभृत् – युद्धाची खुमखुमी न जिरलेले बाहू धारण केले (तत्) शिरः पद्म- श्रेणी –रचित चरणाम्भोरुह बलेः – (ते तुझ्या) चरणरूपी कमलावर आपल्या मस्तकरूपी कमलांची माळ अर्पण केल्याचे  स्थिरयाः त्वद्भक्तेः विस्फूर्जितम् । - तुझ्या विषयीच्या स्थिर अशा भक्तीचे फळ आहे.

जराही युद्धाची नच शमविता कंड मनिची

प्रयत्नावाचोनी अलगद अनायास सहजी

घडे राज्यप्राप्ती त्रिभुवन-धनाची दशमुखा

कशा होत्या त्याच्या फुरफुरत युद्धासचि भुजा।।11.1

 

शिवा त्याची भक्ती दृढ,अढळ होती तव पदी

तुझ्या भक्तीपायी विसरुनचि तो जाय तनुसी

स्वहस्ते कापूनी शिरकमल एकेक  करुनी

शिरोमाला केली चरणकमळी अर्पण तुसी।।11.2

नऊ ती कापूनी शिरचि उरलेले नमवुनी

शिरे दाही वाही दशमुखचि गंगाधरपदी

प्रभावे भक्तीच्या वर मिळवि लंकेश मनिचे

न साधे भक्तीने जगति उरते कायचि असे ।।11.3

------------------------------------------

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 12 –

हे कैलासपती,

आपल्याकडून अपरिमित असे बळ ह्या रावणाने प्राप्त करून घेतले. पण उपकारोऽपि निचानाम् अपकारोही जायते।पयःपानं भुजञ्गानां केवलं विषवर्धनम् ।।

दुष्टांवर केलेले उपकार शेवटी अपकारच ठरतात. ज्याप्रमाणे सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याचं विषच तयार होतं; त्याप्रमाणे दुष्टांना केलेली मदत त्यांचा दुष्टपणाच वाढवतात. किंबहुना अशी मदत मिळविण्यामागचा त्यांचा अंतस्थ हेतू काही वेगळाच असतो. ज्याप्रमाणे भस्मासुराने शिवाकडून `ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होवो’ असा वर मिळवला आणि वर मिळताच तो शिवाच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी धावून आला त्याच प्रमाणे ह्या असुर वृत्तीच्या रावणाने शिवाची मोठी सेवा करून प्रचंड ताकद मिळवली. विषारी खोडांचे वन माजावे त्याप्रमाणे त्याच्या वीसही बलवान भुजा दुष्कर्मासाठी वळवळत होत्या. त्याने हे बळ आपल्याविरुद्धच वापरले. वीसही हातांनी त्याने आपला कैलास पर्वतच उचलून गदगदा हलवायला सुरवात केली. पण आपली शांती जराही भंग पावली नाही. आपण पायाचा नुसता एक अंगठा थोडासा दाबला त्यामुळे पुन्हा कैलास खाली दाबला जाऊन त्याच्या भाराखाली हा दशानन इतका खोल दबला गेला की  त्याला पाताळात सुद्धा जागा मिळाली नाही. तो मोहाच्या चिखलात गाडला गेला. दुष्टांना कितीही मोठं ऐश्वर्य मिळालं तरी त्यांच्या मखलाशी करण्याच्या स्वभावामुळे ते मोहरूपी चिखलात रुततात.

( सुहृदहो,  परीक्षा देतांना उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचं नाव नसतं. तो काळा आहे, गोरा आहे, चांगला आहे, वाईट आहे, हे काहीही पाहिलं जात नाही. त्याने उत्तरं बरोबर लिहीली का नाही एवढं पाहून त्याला  पास, नापास, डिस्टिंक्शन दिलं जातं. तसं देवाच्या परीक्षेत पास कोणी व्हावं याला काही बंधन नाही. पण नंतर त्या प्राप्त झालेल्या डिग्रीचा/ वरदानाचा तुम्ही कसा उपयोग करता त्याप्रमाणे तुम्हाला लोक शासन तरी करतात किंवा पुरस्कृत तरी करतात. )

अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं

बलात् कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः।

अलभ्या पातालेऽप्यलसचलिताङ्गुष्ठशिरसि

प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः।।12

अन्वय – त्वदधिवसतौ कैलासे अपि – तुझ्या वसतिस्थानावर कैलासावर देखील त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं – तुझ्या सेवेमुळे प्राप्त झालेले (वीस) बाहूंचे जंगल बलात् विक्रमयतः अमुष्य – बळजबरीने वापरू इच्छिणारया या (रावणाला)  अलसचलितांगुष्ठशिरसि (सति) त्वयि  - तू सहज हलवलेल्या पायाच्या अंगठ्याच्या टोकाने  पाताले अपि प्रतिष्ठा अलभ्या आसीत् ।- पाताळातसुद्धा जागा मिळाली नाही.  ध्रुवं उपचितः अपि खलः मुह्यति । - खरोखर , (ऐश्वर्य) प्राप्त  झालेला दुष्ट देखील मोहात पडतो.

अमुष्य – (अदस् )-अशाचा,

अशा या लंकेशा कुठुनि मनि दुर्बुद्धि सुचली

कृपेची ठेवी ना तिळभरहि जाणीव हृदयी

विषारी खोडांचे वन जणुचि माजे चहुकडे

मदोन्मत्ताचे त्या शिवशिवत होते कर तसे ।।12.1

 

कृतघ्नाने त्याच्या पसरुन पुर्‍या वीसहि भुजा

तुझे कैलासीचे घर हलविले रे गदगदा

परी गौरीशा तू हसुन सहजी दाबुन जरा

पदाच्या बोटाने तयि सुलभ पाताळ दिधला।।12.2

 

स्मरे ना जो केल्या अमित उपकारांस कधिही

तया पाताळीही नच मिळतसे शांति हृदयी

पडे पापाच्या तो गहन चिखलाते असुर हा

रुते मोहामध्ये धन,बल मिळोनी खल पुन्हा।।12.3

---------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 13 –

हे वरदशंकरा, वरदायी शिवा,

 आपली कृपा झाली तर काय आश्चर्यकारक गोष्टी घडून येतात! बाणासुराने त्रिभुवनाला आपलं सेवक केलं. इतकं करून तो थांबला नाही तर इंद्राचं राज्य, सकल ऐश्वर्य त्याने स्वर्गातून खेचून खाली पृथ्वीवर आणलं; आणि पृथ्वीवर स्वर्ग उभारला.

अहो महादेवा, आपल्या चरणावर जो झुकतो तो उन्नतीच्या शिखरावर चढतो.

 

यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सती-

मधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः।

 तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयो-

र्न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनति:।।13

अन्वयार्थ – हे वरद! – हे वरदायक शंकरा! परिजनविधेय त्रिभुवनः बाणः – त्रिभुवनाला सेवक बनवणार्‍या बाणासुराने  सुत्राम्णः - इंद्राचे परमोच्यैः अपि सतीम् ऋद्धिम् – फार मोठे असलेले वैभव देखील यद् अधः चक्रे । - जे खाली (म्हणजे पृथ्वीवर) खेचले त्वत् चरणयोः वरिवसितरि तत् चित्रं न । - (ते) तुझ्या चरणांवर विनम्र होणार्‍याच्या बाबतीत आश्चर्यकारक नाही.  ते अपि त्वयि अपि शिरसः अवनतिः - तुझ्या ठिकाणी केलेली मस्तकाची नम्रता

कस्य उन्नत्यै न भवति?- कोणाच्या उन्नतीला कारणीभूत होणार नाही? ( सर्वांच्याच उन्नतीला कारणीभूत  होईल.)

( परिजन विधेय त्रिभुवनः बाणः – त्रिभुवनाला सेवक बनवणार्‍या बाणाने. सुत्राम्णः – इंद्राचे. परमोच्यैः ऋद्धिम् – फार मोठे वैभव.  अधः चक्रे – खाली (पृथ्वीवर) खेचले. त्वत् चरणयोः वरिवसितरि तत् चित्रं न- तुझ्या चरणी विनम्र होणार्‍यांच्या बाबतीत आश्चर्यकारक नाही. त्वयि शिरसः अवनतिः – तुझ्या ठिकाणी झुकवलेलं मस्तक, कस्य उन्नत्यैः  न भवति? – कोणाच्या उन्नतीला कारणीभूत होणार नाही? )

शिवा! बाणाने त्या त्रिभुवनचि जिंकून सगळे

बळाने सर्वांसी बघ बनविले दास पदिचे

तयाने इंद्राचे बहु विभव ऐश्वर्य अवघे

बळाने खेचूनी अवनिवर नेलेच पुरते ।।13.1

 

जगासंगे वागे अति अधमतेने असुर हा

उभारीले त्याने अवनिवर स्वर्गासचि दुज्या

बघोनी बाणाचे धन विभव ऐश्वर्य जगती

अती लज्जेने तो नजर उचलेना सुरपती ।।13.2

 

कृपापारावारा! सकल जगताधार शिव हे

मला आश्चर्याचे तयि न दिसते  कारण कुठे

तुझ्या पायी येता शरण, मिळते काय न जगी

विराजे ना कैसा नर कुणिहि तो उच्च शिखरी।।13.3
---------------------------------
 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक – 14

युद्धात झालेल्या जखमांचे व्रण हे नंतर त्या योद्धयाला भेटल्यावर लोक कौतुकाने वाखाणत राहतात. तर हे व्रण त्या योद्ध्याला अभिमानास्पद ठरतात. त्याच्या पराक्रमाचे जणु पावती देत राहतात.

सर्व समाजाला, त्रिभुवनाला त्रास होऊ नये, त्यांचे महा विषापासून रक्षण व्हावे म्हणून शिवाने हालाहल प्राशन केले. इतकेच नाही तर पोटात असलेल्या ब्रह्मांडाला त्याने त्रास होऊ नये म्हणून त्याने ते गिळले नाही आणि बाहेर उलटून टाकावे तर देवलोकाचा नाश झाला असता हे जाणून त्यांनी ते विष आपल्या गळ्यामधेच साठवून ठेवले. परिणामस्वरूप शिवाचा कंठ जळून काळा झाला.

पण महा उपकार करतांना केलेल्या कार्यात त्या पुरुषाच्या ठायी काही दोष जरी निर्माण झाला तर लोक त्यालाही गौरवास्पद मानतात. तो दोषच जणु अलंकाराप्रमाणे त्याला शोभाच देतो. 

अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा-

विधेयस्याऽऽसीद्यस्त्रिनयनविषं संहृतवतः।

 कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो

विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः।।14

 अन्वय – हे त्रिनयन! – हे त्रिनयन शंकरा! अकाण्ड ब्रह्माण्ड क्षयचकित देवासुर कृपा विधेयस्य- आकस्मिकपणे सार्‍या विश्वाचा विनाश होईल म्हणून घाबरलेल्या देव आणि राक्षस यांच्यावर कृपा करणार्‍या विषं संहृतवतः – आणि विष प्राशन करणार्‍या तव कण्ठे यः कल्माषः आसीद् – तुझ्या गळ्यावर काळानिळा डाग आहे सः तव कण्ठे  श्रियं कुरुते न किम्? – तो तुझ्या गळ्याचे भूषण  बनला नाही काय? अहो! भुवन-भय-भङ्ग- व्यसनिनः विकारः अपि श्लाघ्यः । - अहो, विश्वाची भीती नष्ट करण्याचे व्यसन असणार्‍यांचा कलंक / दोष देखील प्रशंसनीय असतो.

 

अकाण्ड - आकस्मिक 

शिवा जेव्हा आले जलधि-मथनातून वरती

महा ज्वाळांसंगे उसळतचि हालाहल भुवी

बघोनी तेव्हा ते जहर मरणाहून कडवे

जिवाच्या आकांते भयचकित झालेचि सगळे।। 14.1

 

अवेळी ब्रह्मांडा विष करिल का भस्म सहजी

विचाराने ऐशा गडबडुन गेलेचि हृदयी

अशावेळी चित्ती तव बहु दया ही उपजली

दिला देवा-दैत्या सदयहृदया धीर समयी।।14.2

 

विषासी प्राशी तू जरि जळजळे कंठ तव हा

तुझ्या या कंठासी जहर बनवी नीलचि शिवा

परी त्या डागाने खुलुन दिसतो कंठ तव हा

कलंकाची शोभा जणु तुज अलंकारचि समा।।14.3

भयापासूनी जो सकल जगता मुक्तचि करी

तयांच्या दोषांसी गुण समजती लोक जगती।।14.4

-------------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 15

मदनाच्या कामरूपी बाणाने सुर, असुर, मानव सर्वच घायाळ झाले तेव्हा आपण विश्वविजयी आहोत अशा गर्वाने सर्वांनाच ``सब घोडे बाराटके’’ अशा भावनेने तो पाहू लागला. असा विवेक सुटलेला मदन जेव्हा शिवाच्या वाट्याला गेला तेव्हा त्याच्या एका दृष्टिक्षेपात त्याला त्याने होत्याचा नव्हता करून टाकला. शिवशंभू जितेंद्रिय आहे. सहजगत्या एखाद्याा हरणाच्या पिल्लाला हातात धरून फिरावं त्याप्रमाणे त्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे. अशा मनावर पूर्णपणे ताबा असलेल्या महाभागाला कोणी त्रास देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखं आहे. स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखं आहे.

 

असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवा सुरनरे

निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः।

 पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्

स्मरः स्मर्तव्यात्मा नहि वशिषु पथ्यः परिभवः।।15

अन्वयार्थ – हे ईश, हे ईश्वरा यस्य विशाखाः सदेवा सुर नरे जगति – ज्याचे बाण या जगातील देव, असुर वा मानव यांच्यावर पडले असता असिद्धार्थाः न निवर्तन्ते - निष्फळ होऊन परतत नाहीत नित्य जयिनः – नेहमी जय पावतात. सः स्मरः त्वाम् इतर साधारणं सुरं पश्यन् - तुझ्याकडे इतर साधारण देवांप्रमाणे पाहणारा तो मदन स्मर्तव्यात्मा अभूत – नामशेष झाला. हि – कारण, वशिषु परिभवः – इंद्रिय निग्रही लोकांचा तिरस्कार पथ्यः न भवति – हितकारक असत नाही.

सुरांना दैत्यांना मदन करितो  विद्ध सहजी

शरांच्या वर्षावे अखिल नर घायाळ जगती

तयाच्या बाणांसी अपयश न माहीत कधिही

तया वाटे माझ्यासम नच दुजा विश्वविजयी।।15.1


मदाने ताठूनी तुजसि सुरसामान्य धरुनी

शरासी सोडीता तुजवर शिवा लक्ष्य करुनी

तया जाळीले तू नयन तिसरा तो उघडुनी

तयाच्या अस्तित्त्वा सहज मिटवी भस्म करुनी।।15.2


जयाच्या चित्ताचा दृढतम मनोनिग्रह असे

छळे त्यासी जोची निज मरण आमंत्रित करे।।15.3

------------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक-16 

हे परमेश्वरा,

आपली प्रत्येक कृती ही जगाच्या कल्याणासाठीच असते हे जरं खरं असलं तरी माझ्यासारख्या पामराला आपल्या अनेक कृतींचा अर्थच कळत नाही. आपल्याला आपण करता त्या संहाराच्या अनेक कृती उचित वाटत असतीलही पण त्या पाहिल्यावर मलाच का त्रैलोक्याला दरदरून घाम सुटतो. सगळ्यांची पाचावर धारण बसते. आपले भीषण तांडव अनुभवता सगळ्यांचा होणारा थरकाप पाहिल्यावर, हे परम ईशा शिवा मला क्षणभर का होईना असं मनात येत की, सर्वश्रेष्ठत्त्व इतकं कठोर बनवतं का?  हे परेशा तुझे तांडव कल्याणकारी आहे, उचितही आहे. पण अत्यंत दुःख, क्लेश देणारे, भयावह आहे. 

 

महीपादाघाताद्व्रजति सहसा संशयपदं

पदं विष्णोर्भ्राम्यद्भुजपरिघरुग्णग्रहगणम्।

मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा

जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता।।16

अन्वयार्थ – हे ईश, - हे परमेश्वरा, त्वं जगद्रक्षायै नटसि- जगाच्या रक्षणासाठी आपण नृत्य करता. (परंतु) पादाघातात् मही – पृथ्वी तुझ्या चरणांच्या आघातानी सहसा संशयपदं व्रजति – (आपण राहतो की नाही) अशा संकटात सापडते. भ्राम्यद् भुज परिघ रुग्ण ग्रहगणम् विष्णोः पदम् संशयपदं व्रजति; - (तर) सतत फिरणारया आपल्या बलिष्ठ बाहूंच्या प्रहाराने नक्षत्र, ग्रह, तारे आणि हे आकाशही पीडीत होते. द्यौः  अनिभृतजटाताडिततटा मुहुः दौस्थ्यं य़ाति (च)– आणि आपल्या अस्ताव्यस्त विखुरलेल्या जटांच्या तडाख्याने स्वर्गाचीही वारंवार दुर्दशा होते. ननु विभुता वामा एव – खरोखर मोठेपण/ प्रभुत्त्व मोठे त्रसदायकच असते.

जगाच्या कल्याणा कृति तवचि प्रत्येक असते

जगासी सा र्‍या या परि भिववि हे तांडव कसे?

महेशा जेंव्हा तू भयद करिसी तांडव भुवी

तुझ्या मुद्रांनी या थरथरचि कापे जगतही।।16.1


पदाघाताने त्या डळमळित होईच अवनी

जणू वाटे मोठा प्रलय गिळतो का धरणिसी

तुझ्या ह्या बाहूंची धडक बसुनी नृत्यसमयी

नभीची नक्षत्रे तुटुन पडती ही विखरुनी।।16.2


शिवा जेंव्हा घेसी कितिक गिरक्या नृत्यसमयी

जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची

उडे केसांचा हा विपुल तव संभार भवती

तडाख्याने त्यांच्या भयचकित होई सुरपुरी।।16.3


महासत्ता ऐसी शिव शिवचि हाती गवसता

मला सांगा का हो हृदय बनते निर्दय शिवा

कृती कल्याणाची, परि न कळते ही तव मुळी

प्रभो सामर्थ्याची उचित असुनी  दुःखद कृती।।16.4

------------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 17

हे परमेश्वरा,

        आपली व्याप्ती केवढी आहे ह्याचा मी जेव्हा अंदाज करू लागतो तेव्हा, मला असे दिसते की,

           लाखो लाखो तार्‍यांच्यामुळे आकाशामधील ही फेसाळ आकाश गंगा जशी दिसावी त्याप्रमाणे विस्तारलेली ही मंदाकिनी अथवा गंगानदी येथे समुद्ररूपाने सार्‍या जगाला वेढून टाकते. आणि  ह्या जगाला सात द्वीपांमधे सीमित करून टाकते.  (असे म्हणतात की महर्षी अगस्तींने जेव्हा सारे समुद्र पिऊन टाकले तेव्हा सारे समुद्र परत फक्त गंगेच्या पाण्याने भरले गेले.) इतकी मोठी व्याप्ती असलेली ही गंगा नदी आपल्या डोक्यावरच्या जटांमधे आपण बांधून टाकता तेव्हा एखाद्या लहानशा थेंबाप्रमाणे भासते. ह्या एकाच गोष्टीने हे शिवा आपल्या व्याप्तीचे मी थोडसे अनुमान मी लावू शकतो.  

           अथवा ही संपूर्ण आकाशाला व्यापणारी आकाशगंगा गंगे समान आपल्या डोक्यावर थेंब टिकली प्रमाणे इवलीशी वाटत असेल तर आपला प्रसार, आपल्या शरीराचा व्याप किती आहे त्याचं थोडसं अनुमान मी माझ्या मनात बांधू शकतो. ( सुहृदहो, श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या शिवानंदलहरीमधे 53 व्या श्लोकात ते म्हणतात, हे शिवा आपला अनंत, अमर्याद विस्तार पाहतांना, मला असं वाटत आहे की, हे आकाश जणु आपल्या मस्तकावर तुर्‍यासमान शोभून दिसत आहे. ( ``आकाशेन शिखी’’)  ``हे आकाश तुर्‍यासमान दिसते शंभो तुझ्या मस्तकी’’ )

विश्वाला व्यापून दशांगुळे उरणारा हा आपला विस्तार नुसता मनानेही अनुभवतांना मी स्तिमित होऊन गेलो आहे.

अन्वयार्थ – वियद्व्यापी यः वाराप्रवाहः आकाशला व्यापून टाकणारा, हा आकाशगंगेचा (मंदाकिनीचा) प्रवाह तारागण-गुणित- फेनोद्गमरुचिः – तार्‍यांच्या समुदायाने जो फेसाळला आहे वाटून त्याची शोभा वाढली आहे ते शिरसि पृषद्-लघु-दृष्टः – तुझ्या मस्तकावर बिंदुपेक्षाही लहान दिसतो. तेन जगत् जलधिवलयं द्वीपसारं कृतं (इति) दृश्यते । पण त्याच प्रवाहाने हे जग समुद्राने घेरलेले छोटेसे सप्तद्वीपा इतके उरले आहे असे वाटते ( अगस्तीऋषींनी सप्त समुद्र पिऊन टाकल्यावर भागिरथीच्या जलामुळेच सारे समुद्र भरले असे म्हणतात) अनेन तव दिव्यं धृतमहिम वपुः उन्नेयम् । - ह्यावरून तुझ्या दिव्य शरीराच्या प्रचंड व्यापत्तीचे जरा अनुमान करता येऊन तुझा महिमा केवढा आहे ह्याची जाणीव होते.

वियद्व्यापी तारागणगुणितफेनोद्गमरुचिः

प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते।

जगद् द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमि-

त्यनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः।।17

( पृषत् –- पाणी किंवा द्रव पदार्थाचा थेंब अलघु - विस्तीर्ण ; - -विर्स्तीण अशी गंगा थेंबा एवढी छोटी दिसते)

नभी नक्षत्रे ही ग्रह विपुल तारे चमकता

गमे ही आकाशी अति धवल फेसाळ सरिता

तशी गंगा पृथ्वीवर जणुचि आकाशसरिता

जगाला वेढूनी जग बनविते द्वीप-सदृशा।।17.1


जलौघाची व्याप्ती मजसि गमते विस्मयकरी

परी ती गंगाही तव शिरि दिसे थेंब टिकली

तुझ्या या व्याप्तीच्या  सहज  अनुमानासि करण्या

असे हा छोटासा परि गहन दृष्टांतचि शिवा।।17.2


कसा विश्वामध्ये भरुन उरलासीच पुरता

कळे हे सर्वांना बघुनि तव या दिव्य तनुला

करोनी तर्कासी लव कळतसे व्याप तव हा

तुझ्या व्याप्तीचा हा अनुभव असे दिव्यचि शिवा।।17.3


------------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 18

              `विश्वाला व्यापून दशांगुळे उरणारा’ ही शिवाची व्याप्ती, त्याचा अगाध महिमा पाहिल्यावर काही काही गोष्टींची मनाला उकलच होत नाही.

हे विश्वरूपा,

त्या कस्पटासमान त्रिपुरासुराला मारायला आपण काय काय नाटक रचलं! काय तर म्हणे पृथ्वीचा रथ केला, ब्रह्मदेवाला सारथी बनवलं, त्या महान मेरू पर्वताचं धनुष्य बनवलं, जो स्वतः हातात सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे या विष्णूला आपण धनुष्याला बाण म्हणून जोडलं. केवढा हा खटाटोप! खरे तर आपण सर्व समर्थ असतांना कुठल्याही साधनांशिवाय ह्या त्रिपुरासुराला नुसत्या इच्छा शक्तीने मारू शकला असता. पण ब्रह्मा, विष्णू, पृथ्वी, सूर्य, चंद्र, मेरू ह्या प्रचंड सामर्थ्यवान दिग्गजांना आपण आपल्या खेळातल्या साधनांप्रमाणे वापरून घेतलं. हे सारे आपल्या हातातील खेळणी आहेत, आपल्यालाच वश आहेत हे दाखविण्यासाठी आपण जणु आपल्या मायेचा हा खेळ रचला. नाहीतर अतुलनीय सामर्थ्य असलेला कोणी कुठल्या साधनांवर अवलंबून असेल काय?

 

रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो

रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिः शर इति।

दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधि-

र्विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः।।18

अन्वयार्थ – रथः क्षोणी पृथ्वी हा रथ, शतधृतिः यन्ता – ब्रह्मदेव हा सारथी अगेन्द्रः धनुः – श्रेष्ठ मेरू पर्वत हे धनुष्य, रथाङ्गे चन्द्रार्कौ - सूर्य आणि चंद्र ही दोन रथाची चाके रथचरणपाणिः शरः – रथाचे चाक म्हणजे सुदर्शन चक्र हाती असलेला विष्णू हा बाण. इति त्रिपुर-तृण दिधक्षोः ते – त्रिपुररूपी गवताच्यापात्याला जाळण्या साठी तुझा कः अयम् आडम्बरविधिः- केवढा हा साधन सामग्रीचा खटाटोप? वधेयैः क्रीडन्त्यः- साधनाबरोबर क्रीडा करणार्‍या प्रभुधियः – सत्ताधारी लोकांची बुद्धी न खलु परतन्त्रा – परतंत्र नसते हे खरे आहे.

 

जसे का अग्नीने सहज गवता राख करणे

तसे होते सोपे तुजसि त्रिपुरा नष्ट करणे

परी तुम्ही शंभो रथ करविला या अवनिचा

विधात्यासी योजी सुलभ तव सारथ्य करण्या।।18.1


रथाच्या चाकांसी अति सहज जोडी शशि रवी

सुमेरू शैलाचे धनु कणखरी पेलुन धरी

तयासी लावीला शर म्हणुन लक्ष्मीपति हरी

समारंभाचा ह्या मजसि न कळे हेतु लवही।।18.2


तुझ्या या बुद्धीचा मज नच कळे ठाव कुठला

तुझ्या तंत्राने तू जगत सगळे खेळवि शिवा

मनी इच्छा येता मरत नव्हता का त्रिपुर बा

परी माया सारी रचुन खल का खेळवि असा।।18.3


------------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 19

              हे त्रिपुरहरा!

भक्त कसा असावा, भक्ती किती दृढ, अनन्य असावी असावी ह्याचा श्री विष्णूने भक्तांसमोर एक अत्युच्च मानक प्रस्थापित केला. त्यांच्या विक्रमी भक्तीचा आदर्श सार्‍या जगाला घालून दिला. हे शिवा आपणही त्यांची अत्यंत कठीण परिक्षा घेतली. पण ते जराही डगमगले नाहीत. महान त्याग करण्यासाठी मागेपुढे न पाहता आपल्या सेवेत त्याने जराही कसूर केली नाही. ह्याचा परिपाक म्हणजेच आपण प्रसन्न झाला. श्रीविष्णूंना अत्यंत प्रभावी असे सुदर्शनचक्र आपला कृपाप्रसाद म्हणून लाभले. ह्या कृपाप्रसादाने जराही उन्मत्त न होता अत्यंत नम्रपणे ह्या लाभलेल्या आशीर्वादाच्या बळावर श्री विष्णू सदैव त्रिभुवनाचे रक्षण करण्यात तत्पर राहतात.

हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयो-

र्यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।

गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा

त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्।।19

अन्वयार्थ – हे त्रिपुरहर! – हे त्रिपुरांचा नाश करणार्‍या शंकरा, हरिः ते पदयोः साहस्रं कमलबलिम् आधाय – विष्णू तुझ्या चरणांवर एक हजार कमळे घेऊन वहात असता, तस्मिन् एकोने (सति) यत्– त्यामधे एक कमी पडलेले दिसताच, (त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी जे आपणच लपवून ठेवले होते) निजं नेत्रकमलं उदहरत् – त्याने आपला कमलसदृश डोळा काढून वाहिला. (संख्या पूर्ण करण्यासाठी)) असौ भक्त्युद्रेकः चक्रवपुषा परिणतिम् गतः – ही उत्कट भक्ती सुदर्शन चक्राच्या रूपाने फळाला येऊन त्रयाणां जगताम् रक्षायै (सः) जागर्ति - तो/विष्णू त्रिभुवनाच्या रक्षणासाठी सदैव जागृत असतो.)

सहस्रा पद्मांनी करिन तव पूजाहरि म्हणे

परी त्यासी तेंव्हा कमल पडले एकचि उणे

त्वरेने त्यावेळी स्वनयन सरोजास हरि हा

शराच्या पात्याने उखडुन करी अर्पण तुला ।।19.1


हरीच्या भक्तीची अति चरम सीमाच जणु ही

जगाच्या उद्धारा विलसत करी चक्र बनुनी।।19.2

------------------------------------------

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 20

              हे त्रिपुरहरा!

सारे लोक एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला विचारू लागले की, आमच्या आयुष्याचे प्रयोजन काय? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की. आपल्याला सर्वांना जे जे काम नेमून दिलेले आहे, जे आपले विहीत कर्म आहे तेच आपल्या जगण्याचे प्रयोजन आहे. काम करायला मिळणे हेच जर आपल्या आयुष्याचे फळ असेल तर अजुन `माझ्या केलेल्या कामाचे काय फळ’ हा प्रश्नच निरर्थक नाही का?  फळाला कधी फळ येते का?  भाजलेल्या बीजामधून कधी झाडं उगवते काय? ज्या गावाला जायचे ते गंतव्य स्थान आल्यानंतर अजून पायाचे काही काम शिल्लक राहते का? त्या प्रमाणे सारे कर्म करून संपल्यानंतर कामाला अस्तित्त्व रहा नाही. आता, ज्याला आता काही अस्तित्त्व उरले नाही अशा कामाचं फळं कस मिळणार?

 परंतु हे शिवा, आपण अत्यंत चोखपणे प्रत्येकाच्या कर्माचा आढावा घेत असता आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देण्याबाबत अत्यंत जागृत असता. जणु आपण आपल्या भक्तांना कर्माचे फळ देण्यासाठी जामिन राहता. त्यामुळेच वेदांवर विश्वास ठेऊन लोक नेटाने काम करत राहतात.

 

क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां

क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते।

अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदानप्रतिभुवं

श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः।।20

अन्वयार्थ – क्रतौ सुप्ते – यज्ञ पूर्ण झाला तरी फलयोगे त्वं जाग्रत् असि। - त्याचे फळ देण्याविषयी तू जागृत असतोस. प्रध्वस्तं कर्म – नष्ट झालेल्या कर्माचे फळ पुरुषाराधनमृते क्व फलति? – ईश्वराच्या आराधनेवाचून प्राप्त होते काय? अतः क्रतुषु फलदानं प्रतिभुवम् – म्हणून यज्ञाचे फळ देण्याबाबत (तू) जामीन आहेस.  त्वां संप्रेक्ष्य -  असे जाणून श्रुतौ श्रद्धां बद्धा – वेदांवर दृढ विश्वास ठेवून जनः  कर्मसु कृतपरिकरः – लोक नेटाने काम करायचा प्रयत्न करतात.  

 

जिथे पोचायाचे तिथवरचि जाता पथिक रे

उरेना पायांसी क्षणभर जसे काम कुठले

तसे पूर्णत्वासी जंव जंवचि ये यज्ञ सगळे

उरेना कर्मासी तसुभरहि अस्तित्व कुठले।।20.1


नसे ज्या कर्माला जगति लव अस्तित्व कुठले

अशा त्या कर्माचे कुठुनिच मिळावे फळ कसे

तुझे भक्तीभावे परि विनित आराधन फळे

फळे देसी शंभो नित सकल तू जागृतपणे।।20.2


म्हणोनी श्रद्धा ही  अढळ धरुनी वेदवचनी

करी कर्मे सारी तुजवर विसंबूनचि गुणी।।20.3


------------------------------------------

खाली दिलेल्या लिंक्सवर ते ते श्लोक विश्लेषणासहित उपलब्ध आहेत.


श्लोक 1-10


 श्लोक 11 ते 20 


श्लोक 21 ते 30 


श्लोक 31 ते 43 


संपूर्ण महिम्न  ( विश्लेषणाशिवाय)


No comments:

Post a Comment