पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम् विश्लेषण

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

 

शिवमहिम्न स्तोत्र हे अतिशय प्राचीन स्तोत्र समजले जाते. त्याचा काल ठरवितांना मात्र अनेकांची अनेक मते आहेत. हे स्तोत्र लिहीणारा पुष्पदंत कोण? ह्याविषयीही अनेक कथा, उपकथा प्रचलित आहेत. ह्या सर्व कथांपैकी जी सर्वात ज्यास्त प्रसिद्ध आहे ती अशी -

                           पुष्पदंत नावाचा एक शिवभक्त गंधर्व राजा होता. रोज शिवपूजेसाठी बाहु नावच्या राजाच्या रमणीय उद्यानातील सुंदर सुंदर फुले तो अदृष्यरूपात येऊन चोरून  आकाशमार्गाने निघून जात असे. रोज रोज आपल्या उद्यानातील फुले तोडली गेलेली पाहून राजा नेहमी क्रुद्ध होत असे. ह्या मायावी गंधर्वाला अडविण्यासाठी त्याने एक उपाय योजला. त्याने बागभर सर्वत्र श्री शिवाचे निर्माल्य पसरून ठेवले. अदृष्य रूपात ह्या शिवाच्या निर्माल्यावरून चालत गेल्याने पुष्पदंताचे पुण्य संपले. पुष्पदंताची मायावी ताकद संपुष्टात आली. तो पकडला गेला. राजाच्या बंदिगृहात असतांना ह्या शिवउपासकाने आपले दुःख दूर व्हावे या हेतूने शिवाची स्तुती रचण्यास आरंभ केला. तेच हे शिव महिम्न. ह्या स्तोत्रात आलेल्या महिम्न ह्या शब्दामुळे त्याला शिवमहिम्न स्तोत्र म्हटले जाते. पुष्पदंताने मात्र धूर्जटिस्तोत्र असा याचा उल्लेख केलेला आहे.

  ह्या स्तोत्रात असलेल्या 43 श्लोकांपैकी 32 श्लोक हे पुष्पदंताचे आहेत. बाकी श्लोक फलश्रुती अथवा नंतर त्यात आले आहेत.

पुष्पांच्या अपहाराचे प्रायःश्चित्त म्हणुन जणु काही या कवीने हा 32 श्लोकांचा श्लोकपुष्पहार देवास अर्पिला आहे. असं म्हणतात की गळ्यातील कंठा अथवा रुद्राक्षमाला ही 32 रुद्राक्ष अथवा 32 मणी, मोती, इत्यादि वापरून केलेली असते.

  आपल्या मुखातील दातांची संख्या ही 32च असते. हे स्तोत्र म्हणजे श्री पुष्पदन्त मुखपङ्जनिर्गत (पुष्पदंताच्या मुखरूपी कमळातून बाहेर पडलेले) किंवा कंण्ठस्थित (कंठात माळेप्रमाणे शोभणारे) आहे. दंत हा उल्लेख 32 ही संख्यादर्शक आहे. त्यावरून ह्या कवीचे नावच पुष्पदंत किंवा कुसुमदशन असे रूढ झाले आहे. ह्या स्तोत्रामुळे पुष्पदंताच्या मनातील

दुःख, कष्टांची जाणीव संपून गेली आणि त्यास शिवलोक प्राप्त झाला.

 ह्या सर्व गोष्टी आणि अनुमाना व्यतिरिक्त ह्या स्तोत्राकडे पाहिल्यास हे एक उच्च कोटीचे तत्वज्ञान आणि उच्च कोटीचा साहित्यिक दर्जा असलेले स्तोत्र आहे. अनेक सिद्ध स्तोत्रांमध्ये शिवमहिम्नाचीही गणना होते.

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

 



                         ।। ॐ नमः शिवाय ।।


            हे  हर! आपण सर्व भिती, दुःख, पाप यांचा निरास करता. हरण करता. आपण देवांचे देव महादेव आहात. आपली महानता, आपलं यश, आपली कीर्ती, शक्ती अजोड आहे. ना त्याचा ऐल तीर दिसतो ना पैलतीर. आपल्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान ज्याला झालं नाही अशा माझ्या सारख्या सामान्याने आपला महिमा वर्णन करणं सर्वार्थाने अनुचित असेलही---पण!

माझी स्तुती जर अनुचित असेल तर ब्रह्मा, विष्णू ह्या सार्‍या महान देवांना तरी आपल्या स्वरूपाचे खरे ज्ञान कोठे झाले? ते अजूनही आपल्या स्वरूपाविषयी बोलतांना चाचपडत आहेत. नाना तर्कच करत आहेत. आपले स्वरूप जाणण्यासाठी ब्रह्मदेव स्वर्ग पार करून वरती गेले पण ना त्यांना आपल्या मस्तकचे दर्शन झाले; ना विष्णू संपूर्ण पाताळ लोक ढुंढाळून आले त्यांना आपल्या पावलांचा ठाव लागला.

त्यांचे तर्कही शेवटी त्यांच्या कुवतीनुसार केलेल्या कल्पनाच असतील तर माझ्या बुद्धी आणि माझ्या कुवतीनुसार मी केलेली आपली स्तुती अनुचित, आक्षेपार्ह, चुकीची कशी असेल? मी आपला महिमा वर्णन करण्यास अधिकारी नाही असे कोणी कसे म्हणु शकतो? आणि म्हणूनच हे विश्वेश्वरा मी यथा मति यथा शक्ती आपले गुणगान करत आहे ते उचितच आहे. आपण ते गोड मानून घ्या.

पुष्पदन्त उवाच -

पुष्पदन्त म्हणाला -

(वृत्त  शिखरिणी , अक्षरे -17, गण - य म न स भ ल ग, यति -6,11)

 

महिम्न: पारं ते परमविदुषो यद्यसदृशी

स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिर:।

अथावाच्य: सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्

ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद: परिकर:।।1 *

अन्वयार्थ -  हे हर! हे दुःख हरण करणार्‍या ईश्वरा यदि ते महिम्नः परं पारं अविदुषः स्तुतिः असदृशी, - जर आपल्या अपार महिम्याचा पैल तीर न जाणणार्‍यांनी केलेली आपली स्तुती अनुचित असेल, तत् ब्रह्मादीनाम् अपि गिरः त्वयि अवसन्नाः । - तर ब्रह्मादिंची वाणीही आपली स्तुती करण्यास योग्य नाही.( कारण त्यांनाही आपल्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले नाही.) अथ स्वमतिपरिणामावधि गृणन् सर्वः अवाच्यः, - म्हणून आपल्या आपल्या मतिनुसार केलेल्या कोणाच्या स्तुतीला वाईट म्हणू नये. (अतः) मम अपि स्तोत्रे एष परिकरः निरपवादः । - म्हणून माझा ही हा स्तोत्र रचण्याचा उपक्रम निष्कलंक आहे.

( महिम्न- महिमा.गौरव,यश ; परिकर: - आरंभ, उपक्रम ; अपवाद - निंदा, कलंक )

 

नसे सीमा काही हर तव गुणाब्धीस अखिला

कसे जाणावे ते मग तव अमर्याद स्वरुपा

कळोनी ना येता शिव तव असामान्य महिमा

कुणी सामान्याने तव गुण प्रशंसाचि करिता ।।1.1

 

अनाठायी वाटे अनुचितच हास्यास्पद जरी

तरी ब्रह्मादिंची स्तुतिहि नच पूर्णत्व मिळवी

म्हणोनी केली मी स्तुति मतिस साजेलच अशी

प्रयत्नांसी त्याची विफळ म्हणणे ना उचितची।।1.2

-------------------------------------

  पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 2

हे सुरवरा,

आपण ह्या जगातील कुठली वस्तू नाही तर ज्ञानस्वरूप आहात. त्यामुळे इंद्रियांना गोचर नाही. इंद्रियांना कळण्यास शक्य नाही.  इंद्रिये आपल्याला जाणू शकत नाही. ते सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. मनाची धाव तरी किती? त्याच्याजवळ आपल्याला जाणून घेता येईल इतकी कल्पनाशक्ती नाही. त्यामुळे आपल्याला सर्वार्थाने जाणू शकेन असं माझ्याकडे काही साधन नाही.

 हे वेद सुद्धा ह्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला नाकारून ही गोष्ट म्हणजे शिवतत्त्व नाही, -----ही गोष्ट म्हणजे शिवतत्त्व नाही.----- हे नाही ते नाही—  विश्वात असलेली कुठलीही वस्तू म्हणजे शिवतत्त्व नाही.--- असं म्हणत म्हणत सर्व नाकारून जे उरलं ते आपलं विश्वव्यापी असे स्वरूप पाहून एक क्षणभर भयचकित होतात. थांबतात आणि म्हणतात -- नेति नेति!!! --- ह्या विश्वात सर्वत्र शिवतत्त्वच भरलेले असूनसुद्धा ह्या विश्वातली कुठली गोष्ट शिवतत्व नाही. विश्वाच्याही पलिकडे जे काही उरते ते अचिन्त्य असं चैतन्य आपण आहात. अर्थात आपली स्तुती करण्यास, आपल्या गुणांचं वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. आपले हे गुणही किती अनंत अनंत आहेत. आपल्या ह्या निर्गुण निराकार रूपाबद्दल  सर्वांना  एक गूढ आकर्षण असले तरी जे अनंत आहे त्याची कल्पना करता येत नाही. अपार विस्तार असलेल्या समुद्रातील पाण्यापेक्षा त्यातूनच ढगाने आणलेले पाणी उपयोगी पडते. हवेसे वाटते. त्याप्रमाणे आपले सगुण साकार रूप सर्वांनाच मोहित करते. हे आपले परम रमणीय रूप पाहिल्यावर कोणाला आपली स्तुती करणयाचा मोह पडणार नाही बर?

( सुहृदहो, जर 10-15 प्रकारची फुलं एकत्र असली  आणि त्यातील बकुळीचं फूल कुठलं असं एखाद्या  लहान मुलाने विचारलं तर तो प्रत्येक फूल उचलून दाखवतो.  ``हे बकुळ का?’’ आई म्हणते``नाही हा चाफा आहे.’’ मग दुसरे फूल उचलतो आणि विचारतो``हे बकुळ का?’’ आई सांगते``नाही हा गुलाब आहे.’’ असे प्रत्येक फूल नाकारता नाकारता एक फुल उरते. आणि मूल म्हणते``हं कळलं! हे बकुळ आहे.’’ ह्याला ``अतद् व्यावृत्ति’’ नावाचा न्याय म्हणतात. जगातल्या सर्व गोष्टी नाकारून काहीही उरत नाही तरी जे उरलेले आहे त्याने सर्व व्यापले आहे असे ज्ञान जेव्हा शिल्लक राहते तेव्हा ज्ञानी ते ब्रह्म आहे, शिव तत्त्व आहे असे म्हणतात.  )

 

अतीत: पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयो-

रतद्व्यावृत्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि।

 कस्य स्तोतव्य: कतिविधगुण: कस्य विषय:

पदे त्वर्वाचीने पतति न मन: कस्य न वच:।।2 *

 अन्वयार्थ -   तव महिमा वाङ्मनसयोः पन्थानं अतीतः च। - आपला महिमा वाणी आणि मन या दोघांच्या मार्गापलिकडे आहे. अगम्य आहे. यं श्रुतिः अपि ज्याचे वेद देखील अतद्व्यावृत्या चकितं ` हे नव्हे’ या पद्धतीने भीत भीत अभिधत्ते - वर्णन करतात कतिविधगुणः? -  त्याचे गुण किती व कसे आहेत?  सः - तो महिमा कस्य स्तोव्यः? - कोणाला स्तुती करता येण्यासारखा आहे? कस्य विषयः? कोणाचा विषय होणार आहे? तु - परंतु अर्वाचिने पदे तुझ्या नव्या अवताराकडे (सगुणरूपाकडे) कस्य मनः कोणाचे मन कस्य वचः - कोणाची वाणी न पतति - वळणार नाही बरे?  

अतीत -  मन आणि वाणीला समजण्याच्या पलिकडे  अतद्व्यावृत्ति - ‘ हे नव्हे ’ या पद्धतीनेअर्वाचीन - नवीनअधुनिकविरोधाभास दाखविणारे )

मनाच्या वाणीच्या अति पलिकडे सद्गुण तुझे

तयांसी वर्णाया सकल पडती शब्दहि फिके

स्वरूपा पाहोनी भयचकित हे वेद म्हणती

कळेना आम्हा तू शरण तुज आलो सुरपती।।2.1


जगी आहे जे जे, नच असशि ते तूच कधिही

अशी वेदांनीही महति कथिली नेति’ म्हणुनी

कसे अव्यक्ताशी जुळति मम धागे हृदयिचे

मनाला व्यक्ताची भुरळ अति स्वाभाविक पडे।।2.2


कळे सर्वांना हे तव सगुण साकार रुपडे

जटाधारी त्याची नित शिवपदी हे मन जडे

मनाला वाचेला विषयचि दुजा ना उरतसे

गुणांसी वर्णाया मनहृदयवाणी न थकते।।2.3


नदी वाहे मोठी झुळझुळ जरी ती जवळुनी

तृषार्ताची तृष्णा जल शमविते ओंजळभरी

न येई कामासी अमित कुठली वस्तु कधिही

कराया कामासी परिमितचि सामग्रि बरवी।।2.4

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 3

हे अविनाशी ब्रह्मस्वरूप परब्रह्मा महेशा, हे ब्रह्मन!

आपल्या वाणीचा गोडवा काय वर्णु? आपण आपल्या अमृताने संपृक्त झालेल्या शब्दांनी जे वेद निर्माण केले. त्याची गोडी पाहता त्याच्यापुढे देवांचा गुरू बृहस्पती याचाही टिकाव लागणे अशक्य आहे. जेथे त्याचीही वाणी आपल्यापुढे अति निरस वाटावी, जेथे त्याच्याही दिव्य वाणीचं आपल्याला जराही आश्चर्य वाटत नाही; तेथे मी आपली स्तुती करण्याचं काय हे भलतच धाडस करत आहे असं सर्वसामान्य कोणीही म्हणेल; पण हे विश्वात्मका, लोकांनी  माझा त्यामागचा हेतू नक्की समजून घ्यावा. आपली ही ओघवती, गुणमयी चरित्र सरिता पाहून माझं मन आनंदाने काठोकाठ भरलं आहे. मी अत्यंत मनापासून आपलं जर गुणगान केलं, गुणसंकीर्तन केलं, देहभान हरपून आपला महिमा गाता गाता त्यात रंगून गेलो तरी माझ्या कुवतीप्रमाणे केलेली स्तुती कितीही हलक्या दर्जाचं  का असेना पण आपल्या परिसासम गुणांचा स्पर्श होताच माझी गंजक्या लोखंडा प्रमाणे असलेली वाणी सुवर्णमय होईल. माझ्या वाणीचे सर्व दोष दूर होतील, माझी वाणी अत्यंत निर्मळ होईल, पावन होईल; ह्या एकमेव इच्छेने मी आपली स्तुती करण्याचं धाडस करत आहे. तेथे माझा अजून कुठलाही सुप्त स्वार्थी हेतू नाही हे आपण लक्षात घ्यावे.

 

मधुस्फीता वाच: परमममृतं निर्मितवत-

स्तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम्।

मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवत:

पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता।।3 *

अन्वयार्थ -   हे ब्रह्मन्! - हे ब्रह्म देवा, परमं अमृतं निर्मितवतः - श्रेष्ठ असे अमृत निर्माण करणार्‍या (यस्य) वाचः मधुस्फीताः - ज्याची वाणी माधुर्ययुक्त आहे तव - तुझ्या बाबतीत सुरगुरोः अपि वाक् - ब्रह्मदेवाची वाणी देखील किं विसमयपदं ? आश्चर्यकाराक आहे काय? हे पुरमथन! -  हे तीन पुरे नष्ट करणार्‍या ईश्वरा भवतः गुण-कथन-पुण्येन – तुझ्या गुणांचे वर्णन केल्याने लाभणार्‍या पुण्याने मम तु एतां वाणीं पुनामि - माझी ही वाणी पवित्र व्हावी. इति अर्थे - या साठी अस्मिन् बुद्धिः व्यवसिता ।  माझी ही बुद्धी योजली आहे.

        ( स्फीत -  प्रचुर, पर्याप्त, विस्तृत ; मधुस्फीता -अमृताने ,माधुर्याने भरलेली, संपृक्त)

परब्रहमा कैसी मधुर तव वाणी अनुपमा

तुझ्या शब्दा शब्दातुन निथळते अमृत अहा

 अहो निर्मियेले सुमधुर तुम्ही वेद सकला

कशी ह्या वाणीची सुरगुरुसवे होय तुलना? ।। 3.1

 

विधात्याची वाणी कितिहि असली गोड तरिही

तिच्या माधुर्याचा तुजसिच अचंबा नच मनी

तुझ्या वाणीची का सर कधि कुणा येइल कशी

तुझ्यासंगे त्यांची नचचि तुलना शक्य कधिही।।3.2

 

गुणांच्या ऐश्वर्या पुढति न टिके जेथ कुणिही

करावी तेथे मी स्तुति तवचि हे धाडस अती

कळे हेची सारे त्रिपुरहर बा चित्ति मजसी

परी या बुद्धीला शिव-महतिची आवड अती ।। 3.3

 

शिवा होवो वाणी अमल विमला निर्मल अती

तुझे गाता गाता गुण सकल ही आस मनिची

असे हा बुद्धीचा मम निखळ हेतू समज तू

चरित्रासी गावे सुखद तव जाणी मम मनू ।। 3.4

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 4

हे वरदायका (वरद!)

आपल्या महान ऐश्वर्याविषयी बोलतांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तीनही वेद असा निष्कर्ष काढतात की आपल्याजवळ विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याची प्रचंड शक्ती आहे. हे करण्यासाठी लागणारे सत्त्व, रज तम  ह्या गुणांनी आपण युक्त आहात. आपल्या ह्या तिनही गुणांचे पृथ्थकरण होऊन त्यातून सत्त्व, रज तम असे गुण प्राप्त झालेल्या ब्रह्मा, विष्णू,  आणि महेशा ची रूपे प्रकट झाली. त्यांच्याकडूनच आपण जगाची उत्पत्ती, पालन आणि संहाराचे काम करवून घेता.

  ह्या जगामधे सर्वच प्रकारची माणसे आहेत. काही समजदार असतात. त्यांना आपले तर्काच्या पलिकडचे, इंद्रियांना न कळणारे पण हृदयात अनुभवता येणारे रूप अनुभवता आल्याने ते शांत वृत्तीचे, आपले अस्तित्त्व मान्य करणारे आस्तिक लोक असतात. तर काही वितंडवाद करण्यासाठीच तयार असतात. ते आपलं हे त्रिगुणात्मक स्वरूप मान्य करत नाहीत. त्यांना आपलं हे विश्वात्मक रूप  आनंददायक, मनोहर वाटतच नाही. ते आपली निंदा करण्यातच स्वतःला धन्य मानतात. तार स्वरात, कंठाळी भाषेत सतत आपल्या अस्तित्त्वाचे खंडन करत राहतात. त्यांच्या ह्या कुतर्काने नास्तिक लोकांना उत्साहित करत राहतात. त्यांच्या दुष्प्रवृत्तींना खतपाणी घालत राहतात. नास्तिकता पसरवण्यास मदत करतात.

 हे परमेश्वरा पण जो आपल्याला खरोखरच जाणून घेऊ इच्छितो, जो आपला अहंकार सोडून अनन्यभावे आपल्याला शरण येतो, त्याला आपल्या स्वरूपाचे खरे ज्ञान होते. तो सर्व सांसारिक बंधनांमधून मुक्त होतो. त्याला फलस्वरूप आपण मोक्षाचे वरदान देता.

 

तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्

त्रयी वस्तुव्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु।

अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं

विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः ।।4 *

अन्वयार्थ -   हे वरद, - हे वरदायका यत् तव – जे तुझे जगदुदय-रक्षा- प्रलयकृत् – जगाची निर्मिती, रक्षण व नाश करणारे त्रयी वस्तु -  तीनही वेदांचा विषय असलेले तिसृषु गुणभिन्नासु – तीन वेगवेगळ्या गुणांमध्ये तनषु व्यस्तम् – शरीरामधे विभागलेले ऐश्वर्यं -  वैभव आहे (तद् ऐश्वर्यं ) विहन्तुं – त्या वैभवाचा नाश करण्यासाठी  इह एके जडधियः – काही मंद बुद्धीचे लोक अस्मिन् (विषये) अभव्यानां रमणीयां, ( वस्तुतश्च) अरमणीं , व्याक्रोशीं विदधत । -अभद्र अशोभनीय पण काही क्षुद्र लोकांना आवडणारी कर्कश्श आरडाओरड करत असतात.

प्रभो विश्वेशा हो!  त्रिगुण तव सत्वादि तम हे

भरोनी मूर्तीतें  हर, हरि,विधाता प्रकटले

जगाची उत्पत्ती, स्थिति, विलय हेची घडविणे

तयांच्या हातांनी सहज; तव सामर्थ्य इतुके।।4.1

 

तुझ्या ह्या ऐश्वर्या करिसिच विभाजीत सहजी

विभागूनी ठेवी हर हरि विधीच्याच शरिरी

तिन्ही वेदांनीही सतत कथिले हे मत जरी

तरी खंडाया ते गहजब अडाणी बहु करी।।4.2


विधाने मांडोनी जळजळित प्रक्षोभक महा
करोनी कांगावा मुदित करती नास्तिक जना

तयामध्ये नाही लवभरही औचित्य कुठले

सुखावे ती दुष्टा ; सुजन-हृदया ती दुखविते।।4.3

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक - 5

हे विश्वेशा,

जगामधे असलेले अनेक नास्तिक लोक आपल्या अस्तित्त्वाविषयी शंका घेतात. तसेच शक्य तेवढे कुतर्क लढवत अनेक प्रश्न उपस्थित करत राहतात.

``तो प्रसिद्ध सृष्टीकर्ता, धाता सृष्टी निर्माण करतो असे म्हणता तर त्याला सृष्टी तयार करण्याची गरजच काय पडली?  त्याला जर शरीरच नाही तर तो कशी काय निर्मिती करणार? ज्याला देहच नाही त्याच्या मनात आपण सृष्टी बनवावी हा विचार तरी कसा येणार? ही सृष्टी बनवायला लागणारं साधन काय? आणि ते कुठे आहे?  कुठे बसून, कुठे ठेऊन कुठल्या आधारावर तो सृष्टीची निर्मिती करतो? एक ना दोन – असंख्य शंकांनी त्याचं मन अस्वस्थ झालेलं असतं. तर्काच्या पलिकडे असलेल्या आपल्या ऐश्वर्याबद्दल हे भ्रष्टबुद्धीवाले लोक अनेक प्रश्न उपस्थित करून थांबत नाहीत तर अनेकांच्या मनात आपल्याबद्दल सम्भ्रम उत्पन्न करतात.

खरे तर हे विश्व चालू राहण्यासाठी आपल्या स्वरूपाचे संपूर्ण ज्ञान सर्वांना होऊ नये हीच विधात्याची योजना आहे. आणि म्हणूनच तो लोकांच्या मनात संभ्रम उत्पन्न होईल अशी बुद्धी देऊन अशा मूर्ख वाचाळांची निर्मिती करतो.

(सुहृदहो, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगतांना अनेक वेळा त्याला वाटलं की अर्जुन आता कृष्णमयच होऊन जाईल. तो तसा होऊ नये, अर्जुन लढला पाहिजे, त्यासाठी द्वैत राहिलच पाहिजे म्हणूनही त्याने प्रयत्नपूर्वक त्याला आपल्यापासून वेगळं ठेवलं. एकरूपता येऊ दिली नाही. त्याप्रमाणे परमात्म्याचं खरं स्वरूप सर्वांनीच जाणलं तर सगळेच ब्रह्ममय होऊन कसे चालेल?)   

 

किमीहः  किं कायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं

किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च

अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरदुःस्थो हतधियः

कुतर्कोऽयं कांश्चिन्मुखरयति मोहाय जगतः।।5

अन्वयार्थ -   स धाता – तो परमेश्वर खलु किमीहः – खरोखर कुठल्या इच्छेने किंकायः, -  कुठल्या शरीराने किमुपायः, - कुठल्या साधनांनी, किमाधारः, - कुठ्या आधारावर किमुपादानः, - कुठल्या सामग्रीने त्रिभुवनं सृजति – त्रिभुवनाची निर्मिती करतो इति अयं- अशा प्रकारे अतर्क्यैश्वर्ये त्वयि-  ज्याच्या एश्वर्याचा तर्क करणेही अशक्य आहे अशा तुझ्याविषयी अनवसरदुःस्थः – निराधार हणकस  कुतर्कः – तर्कदुष्ट विचार जगतः मोहाय – जगाला मिहित करण्यासाठी कांश्चित् हतधियः मुखरति । -  ब्रह्मदेव काही मूर्खांना बोलायला लावतो

( उपादान  कारण, प्रयोजन, आधार , एखादि वस्तू बनविण्याची सामग्री । )

जरी ईशाने या जग घडविले हेचि सगळे

कशापासूनी हो? जग घडविण्या साधन कुठे?

नसे ज्यासी काया जगत बनवे तोचि कसले

कशासाठी सारे करुन सगळे व्यर्थ शिणणे।।5.1


कृती ईशाचीही जरि मन विचारांपलिकडे

तरी मूढांची ही बडबड वृथा मोहित करे

न घेता जाणोनी तव गुणमहत्त्वास लवही

कुतर्का ना सोडी सकलचि निराधार असुनी।।5.2


करी ब्रह्मा जेंव्हा जगत नव निर्माण सगळे

जना -समान्यांच्या हृदि उमटण्या सम्भ्रम नवे

कधी मूढांनाही हिणकस कुतर्कांसचि असे

वदाया लावे तो भ्रमित करण्यासी जगत हे  ।।5.3



-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 6 - 

 ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानराय म्हणतात, साळी केळी पिकवायला काळजीपूर्वक त्या पेरायला लागतात. मशागत करून, योग्य काळजी घेतल्यावरच त्या येतात. बरड माळरानं तयार होण्यासाठी कोठल्या कष्टांची गरज नसते. ते आपोआप तयार होते. त्याप्रमाणे

हे अमरवर! हे सुरश्रेष्ठा,

        गुंतागुंतची रचना असूनही, ही सर्वांगानी परिपूर्ण असलेली, नियमाच्या चाकोरीत काटेकोरपणे चालणारी निर्दोष त्रिभुवने वा तिनही लोक, त्यांच्यांमधे परस्परातील असलेला समन्वय; वा अवयव असलेले हे जीव कोणीही निर्माण न करता आपोआप कसे तयार होतील? ते जन्मरहित थोडेच आहेत? त्यांच्या अस्तित्त्वासाठी लागणारी अवयव रचना, त्यांच्यातील एकमेकांना पूरक वागणूक हे सारं उत्कृष्ट नियोजन काय असच तयार होईल काय? ह्या जगातील प्रत्येक गोष्ट तयार केली गेली आहे. जन्माला आली आहे. जगाच्या कर्त्याशिवाय दुसरा कोणी कसे काय त्यांची निर्मिती करू शकेल? ह्या सृष्टी क्रियांचं संचलन करणारा कोणी अधिकारी नसेल, कोणी अधिष्ठाता नसेल, ह्या सृष्टीला नियमांमधे बांधणारा नेता नसेल तर हे सर्व शक्य होईल का? आणि समजा मानलं की ह्या ईश्वराशिवाय जर कोणी दुसरा सृष्टी कर्ता आहे तर त्याच्याकडे हे परिपूर्ण विश्व तयार करण्याची कुठली सामग्री आहे?, त्याचं स्वरूप कसं आहे?  हे सर्व सांगितलं पाहिजे. परंतु हे सुरवरा, हे नास्तिक लोक आपल्या स्वरूपाचे खंडन करत राहतात, कार्याविषयी नुसतेच नाना संशय घेत रातात. प्रक्षोभक विधानं करतात; पण त्यांच्या नकारात्मक विधानांना पुष्टी देणारे काहीही पुरावे देत नाहीत. आपल्यावर वेळ आली, त्यांना पुरावे मागितले, की मात्र आम्हाला वितंडवाद घालायचाच नाही, आम्हाला वादावादी करण्यात स्वारस्य नाही म्हणून कानावर हात ठेवतात. अशा अज्ञानी मूढमती अभागी लोकांची कीव करावी तवढी थोडीच आहे.

 

अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगता-

मधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति।

अनीशो वा कुर्याद् भुवनजनने कः परिकरो

यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे।।6

अन्वयार्थ -   अमरवर! हे देवश्रेष्ठा अवयवन्तोऽपि लोकाः किं अजन्मानः? – अवयव असलेला जीव लोक अथवा परिपूर्ण असलेले त्रैलोक्य हे जन्मरहित असेल काय?( नक्कीच इतकी परिपूर्ण कृती कुणी कौशल्याने करण्यावाचून आपोआप तयार होणार नाहीत. भले तो कर्ता आपल्याला दिसत जरी नसला तरी ) किं भवविधिः जगतां अधिष्ठातारं अनादृत्य भवति? – काय ह्या सर्व सृष्टी क्रिया जगताच्या अधिष्ठाता /कर्त्याच्या विना संभव आहेत का?  अनीशः कः भुवनजनने परिकरः कुर्याद् वा? – कोणी ईश्वराचे अस्तित्त्व न मानता (कुणाच्याही शिवाय) सृष्टीची निर्मिती होते काय? यतः इमे मन्दाः त्वां प्रति संशरेत। - म्हणून हे काही मूर्ख लोक तुझ्याविषयी संशय घेतात.

असे सर्वांगाने त्रिभुवन परीपूर्ण सगळे

घडे सृष्टीमध्ये नियम अनुसारी सकल हे

जगाची उत्पत्ती स्थिति लय घडे नित्यनियमे

विना कर्ता कैसे सुरळितचि चालेल जग हे ।। 6.1

 

असे ज्यांना काया अवयवयुता तेचि सगळे

कसे येती जन्मा जर कुणिच कर्ता नच असे

नसे त्रैलोक्याला जरि कुणि नियंता सुरवरा

कसे चालावे हे जगत नियमाने प्रतिदिना ।। 6.2

 

परी अज्ञानी हे विपरितमती मान्य न करी

कुतर्काने झाले कलुषित यांचे मन अती

दुजा कोणी ईशाविण जरि करे सृष्टि सगळी

तयाची सामग्री विशदचि करावे स्वरुप ही ।। 6.3

 

पुरावा ना देता बडबड वृथा तेच करती

नसे शंकांना त्या उचित लव आधार वचनी

तुझ्या ह्या अस्तित्वा कळुन म्हणती ना उचितची

असे हे अज्ञानी जन बहु  अभागीच जगती ।। 6.4

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक-7

हे विश्वेशा,

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तीन वेद, कपिल प्रणित सांख्य मत, पतंजलीचे योगशास्त्र, पाशुपत मत, वैष्णव मत ---- असे लोकांच्या भिन्न रुची प्रमाणे  निरनिराळे मतप्रवाह आहेत. काही सरळ आहेत काही कठीण आहेत. काही आड वळणाचे आहेत. प्रत्येकाला माझाच मार्ग योग्य असे वाटते. माझाच पंथ सर्वश्रेष्ठ आहे असे ते छातठोकपणे सांगतात. परंतु हे महादेवा, पृथ्वीवर असंख्य नदी, नाले, ओहोळ वाहात असतात. अनेक दिशांना जात असतात. पण सरतेशेवटी ते सारे समुद्रालाच मिळतात; त्याप्रमाणे ह्या सर्व पंथांचे अंतिम उद्दिष्ट हे विश्वनाथा, आपणच आहात. कुठल्याही मार्गाचा अवलंब केला, कुठलाही रस्ता अनुसरला तरी सर्व रस्ते शेवटी आपल्यापाशीच येऊन थांबतात. ( म्हणून आपण आपल्या आवडीप्रमाणे, क्षमतेनुसार, योग्यतेप्रमाणे जो मार्ग निवडला असेल तो श्रद्धेने चालत रहावा. तो आपल्याला देवापर्यंत घेऊन जातो.)

 

त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति

प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च।

रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषां

नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव।।7

अन्वयार्थ -   त्रयी, - (ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद असे) तीन वेद, सांख्यं – कपिलप्रणित सांख्यशास्त्र, योगः – ( पतंजलीचे) योगशास्त्र, पशुपतिमतं – पाशुपत मत, वैष्णवं – वैष्णव मत इति प्रभिन्ने प्रस्थाने – असे निरनिराळे धर्माचे पंथ`` परं इदं’’ ``अदः पथ्यं’’ इति च रूचीनां वैचित्र्यात्- `` हे मत श्रेष्ठ आहे, हे मत हितकर आहे’’ असे निरनिराळ्या आवडीप्रमाणे ऋजु-कुटिल नाना-पथ-जुषां – सरळ व कठीण अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार्‍या पुरुषांच्या बाबतीत नृणां एकः गम्यः त्वम् असि – तूच एकमेव अंतिम उद्दिष्ट आहेस , पयसां अर्णवः इव, । -पाण्याचे गम्यस्थान जसे समुद्र असते.

जसे मेघातूनी जल बरसलेले चहुकडे

धरे नाना वाटा परि जलधिला जाउन मिळे

तसे शास्त्रांचेही विविध असती पंथचि भले

असो वेदांचे ते गहन मत वा सांख्य मत ते।।7.1

 

कुणी या योगाची महति बहु सांगे लगबगे

कुणी पूजी विष्णू , कुणि अनुसरे शैवमत हे

गमे सर्वांनाही मम मतचि सर्वोत्तम असे

असे सर्वांहूनी हितकरचि सोपे सरळ हे।।7.2

 

असो सोपा वा तो अति जटिलही मार्ग कुठला

असो काटेरी वा सुगम लघु आह्लादकचि वा

रुची ज्याला जैसी अनुसरति तैसे जनचि हे

परी अंती सारे तव निकट येतीच पथ  हे।।7.3

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 8 -

हे वरद! वर देणार्‍या शंकरा,

 आपल्याकडची साधन संपत्ती पाहू जाता कोणीही म्हणेल, ही कसली सम्पत्ती? हा भला मोठा / म्हातारा नंदीबैल, अस्त्र-शस्त्रविशेष म्हणून काय तर खट्वांग! कोणी खट्वांगचा अर्थ खाटेचा पाय करतात. कोणी मनुष्याच्या फासळीला खट्वांग म्हणतात तर कोणी त्रिशूळाला खट्वांग म्हणतात. असो! त्याशिवाय परशु! तोही खंडित झालेला, तुटका परशु! (असे म्हणतात की परशुरामाबरोबरच्या युद्धात शिवाचा परशु तुटला. आपल्या भक्ताच्या प्रेमाची, शौर्याची आठवण म्हणून आजही शिव तोच परशु बाळगतो.)  कमरेभोवती गुंडाळलेलं जाडंभरडं हत्तीचं कातडं, अंगभर फासलेलं चिताभस्म, अंगावर फिरणारे विषारी साप, नाग, भिक्षापात्र म्हणून नरोटी ( माणसाची कवटी) ही काय ती आपली सारी संसार उपयोगी पूंजी! आपली साधनसामग्री!

परंतु!  आपला अधिकार केवढा! आपल्या नुसत्या भुवई वर उचलण्याने इंद्रादि देवांना अतुलनीय ऐश्वर्याचा लाभ होतो वा एखाद्या रावाचा रंक होतो.

हे महाराजा, हे त्रिभुवन सम्राटा!

आत्मरूपात रमणार्‍याला बाकी सर्व साधन संपत्ती मृगजळाप्रमाणे वाटते. तो ह्या विषयरूपी मृगजळाने जराही भ्रमित होत नाही.  तो कायम अविचल उभा असतो. म्हणून हे परेशा आपल्याला स्थाणुही म्हणतात.

           सुहृद हो! श्लोक कितीही सोपा वाटला तरी ह्या स्तोत्रातील, जवळ  जवळ प्रत्येक श्लोकातील चवथी ओळ / चरण एखादं अत्यंत महत्त्वाचं विधान करणारा आहे. निसर्गाचा वा मनुष्य स्वभावाचा एखादा नियम सांगणारा आहे. त्याने साध्याशा श्लोकालासुद्धा फार मोठी उंची प्राप्त होते.

महोक्षः खट्वाङ्गं  परशुरजिनं भस्म फणिनः

कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम्।

सुरास्तां तामृद्धिं दधति च भवद्भ्रूप्रणिहितां

 हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णां भ्रमयति।।8

अन्वयार्थ  -   हे वरद! हे वरदायक शंकरा, महोक्षः – भलामोठा नंदिबैल अथवा वृद्ध नंदी, खट्वाड्गं – त्रिशूळ किंवा खाटेचा पाय, परशुः - परशु, अजिनं- मृगचर्म , भस्मः – भस्म, विभूती, फणिनः – नाग-साप, कपालं च -  आणि कवटी , इति इयत् तव तन्त्रोपकरणम् – अशी एवढी तुझी (संसारपयोगी) साधने आहेत, (परं) सुराः तु – पण इंद्रादि देव सुद्धा भवद्भ्रूप्रणिहितां – आपल्या नुसत्या भुवईच्या उंचावण्याने/ हालचालीने तां तां ऋद्धिं दधति। - ती ती सिद्धि, समृद्धी प्राप्त करून घेतात. स्वात्मारामं विषयमृगतृष्णा न हि भ्रमयति । - आत्मानंदात मग्न असणार्‍यास विषयांचे मृगजळ मोहाने भुलवत नाही.

 

(प्रणिहित  समर्पित,सुपूर्द,उपलब्ध रुंड -  माणसाचे धडाविना मस्तक)

 

न शोभे नंदी हा तुजसिच शिवा वृद्ध किति हा

तुझ्या या काठीला जडवि नर-रुंडास प्रभु का

कटी-वस्त्रासाठी जवळ गजचर्माविण दुजे

नसे काही शंभो तुज जवळ भस्माविण दुजे।।8.1


तुझ्या हाती शोभे नर-कवटि ही खंडपरशु

विषारी नागांनी तव सकल वेढीयलि तनु

तुझ्या संसाराचा रथ निरत चालो म्हणुन बा

असे का सामग्री अनुपमचि ही दिव्य सकला।। 8.2


शिवा शंभो तुम्ही लव उचलिता एक भुवई

इशार्‍याने त्याची  सुरवरचि होती बहु धनी

परी पाहू जाता तव विभव संपत्ति सगळी

कळे  आत्मज्ञानी नच विषयतृष्णेस भुलती।।8.3


-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 9 -

हे पुरमथन, हे त्रिपुरारी,

       अनेक जनांच्या अनेक मतानुसार सांख्य, पातंजल असे काही जण हे सारं ब्रह्मांड नित्य आहे असं मानतात. काही बौद्धादिक संसार असार आहे, सर्व अनित्य आहे, हे जग नाशवंत आहे. असे सांगतात. ह्या दोन्हीहून भिन्न असे काही तार्किक ह्या समस्त विश्वात नित्यत्त्व आणि अनित्यत्त्व हे दोन्ही भरून

राहिले आहे असे सांगतात. म्हणजे, पृथ्वी, आप, वायु, जल, तेज, आकाश, काल, दिशा, परमाणु अशा गोष्टी नित्य आहेत तर कार्य, द्रव्य इत्यादि गोष्टी अनित्य आहेत असे म्हणतात.

             हे शिवा मनापासून तुझी स्तुती गात असतांना, ह्या सर्व दार्शनिकांनी अहमहमिकेने जे सिद्धांत मांडले आहेत ते पाहता, माझ्या अज्ञानाच्या जाणीवेने मी अत्यंत लज्जित होतो. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषा, सिद्धांत मांडण्याचे कौशल्य, विद्वत्ता प्रचूर वाणी पाहिल्यावर आश्चर्यचकित होतो. असं असूनही त्यांच्या सिद्धांतांपुढे माझी ही अभिव्यक्ती, माझी स्तुती म्हणजे विद्वानांसमोर केलेले वाचाळ पणाचे धाडस आहे (धृष्टा मुखरता) असे मला वाटते.

पण!  हे शिवा,

हा उथळ पाण्याचा खळखळाट नसून अत्यंत नम्रपणे मी सांगू इच्छितो की हे माझ्या अतःकरणापासून निघालेले गंगोत्रीसमान पावन शब्द आहेत. त्यांच्या पवित्रपणाविषयी कोणी शंका घेऊ नये.

( इतर विद्वानांपुढे शिवाची स्तुती करणे ही माझी ``धृष्टा मुखरता’’/ ``धाडसाने केलेले वाचाळपण आहे’’ असे पुष्पदंत म्हणत असूनही त्या शब्दांमागचा त्याच्या अर्थ वेगळा होतो. ह्या शिवभक्ताच्या मनात शिवाविषयी असलेली प्रचंड ओढ, शिवाच्या विषयी असलेली अनन्य भक्ती ह्याच्यापुढे शिवाविषयची इतरांची बाकी मते पार पार गौण होऊन जातात. कोण काय म्हणत आहे ह्याच्याविषयी त्याला काहीही कर्तव्य उरत नाही. थोडक्यात आईविषयी उत्तमोत्तम 10 लेख बाळाला वाचून दाखवले, त्याच्यापुढे आईला हार घालून तिचा सत्कार केला तरी, बाळाला फरक पडत नाही. ते पाहून ते थोडेसे लाजेल, ओशाळे होईल. हा काय वेडेपणा चाललाय असे मनात म्हणत अजूनच आईला चिकटेल. आपले हात आईच्या गळ्यात घालून बाळ ज्या अनन्यपणे आईला मिठी मारेल, रडेल, तिच्याकडे हट्ट करून त्याला पाहिजे तो खाऊ, खेळणे तिला द्यायलाच लावेल; ह्यासाठी त्याला आईचे वय, नाव, कर्तृत्त्व माहित असायचीही काही जरूर नसते. त्याने आईच्या गळ्यात घातलेले हात तिला जास्त सुखावणारे असतात. ही अनन्यता त्या दहा लेखातील आईच्या गुणगानापेक्षा मोठी असते. ह्या अनन्यतेच्या भावनेतूनच हे स्तोत्र जन्म घेते. त्याची कुठल्या सिद्धांताबरोबर तुलनाच होत नाही.  )

ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं

परो ध्रौव्याध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये।

समस्तेऽप्येतस्मिन्पुरमथन तैर्विस्मित इव

स्तुवञ्जिह्वेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता।।9

अन्वयार्थ -   हे पुरमथन! – त्रिपुरांचा नाश करणार्‍या शंकरा, कश्चित् सर्वं (जगत्) ध्रुवं गदति – कोणी हे सर्व जग नित्य, शाश्वत, चिरकाळ टिकणारे आहे असे म्हणतो , अपरः तु इदं सकलं अध्रुवं इति गदति – तर दुसरा कोणी हे जग नश्वर आहे असे म्हणतो, परः समस्ते अपि एतस्मिन् जगति ध्रौव्य-अध्रौव्ये व्यस्तविषये (इति) गदति। - तर (आणखी) दुसरा या सपूर्ण जगतामधे शाश्वत आणि नश्वर अशा भिन्न धर्मिय वस्तु आहेत असे म्हणतो तैः विस्मितः इव (अहं) – या भिन्न मतांनी गोंधळून गेलेल्या मला त्वां स्तुवन् न खलु जिह्वेमि – तुझी स्तुती करतांना लाज वाटत नाही. ननु खलु मुखरता धृष्टा । - खरोखर माझी वाचाळता/ बडबड  हे धाडसच आहे.

जगी शास्त्रज्ञांची बहु मत चढाओढचि दिसे

कुणी सांगे हेची जगत सगळे नित्यचि असे

कुणी सांगे आहे क्षणिक जग हे जे दिसतसे

अनित्या-नित्याची सरमिसळ झाली कुणि म्हणे।।9.1

 

मतांचा ऐसा हा बहु गलबला होय तरिही

यशोगाथा गाता समरसचि होऊन तव ही

मनासी वाटेना  अविनयचि हा रे मम असे

शिवा औद्धत्याचे नच निडर वाचाळपण हे।।9.2

-------------------------------------

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक 10 -

हे गिरीशा,

     आपले स्वरूप अत्यंत तेजस्वी, अग्नीप्रमणे लखलखणारे आहे. (नलस्कन्धवपुषः) ज्याप्रमाणे अग्नीमधे सर्व हिण जळून जाते.  आणि शुद्ध सुवर्ण बाकी राहते त्याप्रमाणे आपल्या स्वरूपात हिणकस असे काहीही नाही. आपले स्वरूप अत्यंत निर्मळ, अमल, विमल असे आहे. आपण ह्या विश्वाला व्यापून दशांगुळे वर उरला आहात. आपल्या व्याप्तीची कल्पना कशी यावी? साक्षात ब्रह्मदेव आणि विष्णू ह्यांना आपलं व्यापकपण लक्षात येईना तेव्हा ब्रह्मदेवाने हंसाचे रूप घेतले. तो वरवर उडू लागला.  स्वर्गही पार करून वर जाऊनही त्याला आपल्या मस्तकापर्यंत उंच जाता येईना. तो दमला. तर विष्णू खोल पाताळात जाऊन आपल्या चरणकमलांचा शोध घेऊ लागला पण त्यालाही आपल्या चरणकमलांपर्यंत पोचता आले नाही. दमून भागून दोघेही परत आले. पण जेव्हा ते दोघे अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानी आपल्याला शरण आले तेव्हा त्यांच्या अनन्य भक्तीमुळेच आपण त्यांच्या हृदयात प्रकट झाला. हे शिवा जेथे ब्रह्मादिकांना सहजपणे आपले ज्ञान झाले नाही तेथे मी तर अत्यंत सामान्य! पण तेच ब्रह्मदेव आणि विष्णू अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्याला शरण आल्यावर त्यांना आपल्या रूपाचे ज्ञान होत असेल तर तो एकमेव आशेचा तंतु मला  आपले स्वरूप जाणून घेण्यासाठी उद्युक्त करत आहे. आपली मनोभावे केलेली सेवा काय फळ देणार नाही?  अर्थातच सर्व इच्छित फळे आपल्याला सेवकाला मिळतीलच.

(10 ते 13 हे श्लोक शिवाला अनन्य शरण गेले तर सर्व मनोगत पूर्ण होते. त्याला इच्छित वराची प्राप्ती होते हे सांगणारे आहेत. मग तो शरण येणारा भले कोणीही असो. पण शरण येणार्‍याचा उद्देश मात्र महत्त्वाचा. त्याचा उद्देश जर निर्मळ असेल, जगाच्या हिताचा असेल, कोणाला त्रास देणे हा नसेल तर त्याला शिवसानिध्याचे खरे सौख्य लाभते. पण तोच जर त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा असेल तर त्याला तो इच्छित वर मिळूनही त्याचे कल्याण होत नाही. ब्रह्मदेवाला शिवाच्या मस्तकाचे दर्शन न होताही तो विष्णूपेक्षा मी श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी, ``मला शिवाच्या मस्तकाचे दर्शन झाले.’’ असे खोटे बोलला त्यामुळे शिवाने त्याच्या चार मस्तकांपैकी एक मस्तक नुसते नखानेच नखलून टाकले आणि कोणीही त्याची पूजा करणार नाही असा शाप त्याला दिला. तर भस्मासूर आणि रावणाला त्यांच्या इच्छित वर तर मिळाले पण त्यांच्या तपश्चर्येत खोट होती. मखलाशी होती. त्यामुळे त्याचेही दुःखद फळ त्यांना मिळालेच.

          सुहृदहो,  सर्वेत्र सुखिनः सन्तु हे वरदान मागितलं तरच सुखाचा खरा वर मिळतो. सर्वांनाच आरोग्य प्राप्त झालं तरच आपण वैयक्तिक निरोगीपण, अरोगता प्राप्त करू शकू. सर्वांच्या कल्याणातच आपलंही वैय्यक्तिक कल्याण आहे. कोणी सुखाच्या एकाकी बेटावर आनंदाने राहू शकत नाही. सर्व सी होणे हाच त्याला उपाय असतो. )

 

 

तवैश्वर्यं यत्नाद्यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः

परिच्छेत्तुं यातावनलमनलस्कन्धवपुषः।

ततो भक्तिश्रद्धाभरगुरुगृणद्भ्यां गिरिश यत्

स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति।।10

अन्वयार्थ -   हे गिरीश! – हे कैलासपती,  यत् अनलस्कंधवपुषः तव ऐश्वर्यं –अग्नीप्रमाणे तेजस्वी शरीर हे जे तुझे ऐश्वर्य आहे, (तत्) परिच्छेत्तुं – त्याचे अनुमान करण्यासाठी उपरि विरिञ्चिः अधः हरिः (च गतौ) – ब्रह्मदेव वर तर विष्णू खाली गेला । यत्नात् यातौ अनलम् । - पण त्यांचे प्रयत्न कमी पडले. ततः ताभ्यां भक्ति-श्रद्धा-भर-गुरू-गृणद्भ्याम् स्वयं तस्थे। - नंतर अतिशय भक्ती आणि श्रद्धा यांच्या योगे (त्यांनी) स्तुती केल्याने ते (ऐश्वर्य) स्वतःच प्रकट झाले. किं तव अनुवृत्तिः न फलति? – तुझी सेवा काय फळ देणार नाही ? ( सर्व काही देईल.)

(परिच्छेत्तुम् -– परिमाण ठरविण्यास,तोलण्यास, अनुमान बांधण्यास,यथार्थ रूपाने जाणून घेण्यास)

 

तुझे हे तेजस्वी स्वरुप जणु अग्नी सम असे

असे पावित्र्याने अति विमलतेनेचि भरले

असे त्याची व्याप्ती सकल अनुमाना पलिकडे

कुणाचे चालेना तुजपुढति काही तिळभरे।।10.1


तुझ्या या व्याप्तीच्या सकल अनुमानास करण्या

विधाता गेला तो वर वर अती उंच बहु हा

हरी पाताळी या तुजसि किति शोधून थकला

तुझ्या रूपाचा ना क्षणभर किनारा गवसला।।10.2


परी श्रद्धा भक्ती धरुन हृदयी  ते तव पदी

शिवा आले जेव्हा शरण तुजसी नम्र वचनी

धरोनी ते विश्वात्मक स्वरुप तेव्हा प्रकटसी

शिवा कैसी होई तव चरणसेवा विफळ ती।।10.3

-------------------------------------

खाली दिलेल्या लिंक्सवर ते ते श्लोक विश्लेषणासहित उपलब्ध आहेत.


श्लोक 1-10


 श्लोक 11 ते 20 


श्लोक 21 ते 30 


श्लोक 31 ते 43 


संपूर्ण महिम्न  ( विश्लेषणाशिवाय)


No comments:

Post a Comment