पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम् विश्लेषण (श्लोक 21 ते 30 )

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम् श्लोक 21 ते 30

श्लोक- 21

हे शिवा! आपण सर्वांचे एकमेव आश्रय स्थान आहात. `शरणद’ आहात. जो कोणी अनन्य भावे आपल्या चरणांपाशी शरण येईल, त्याला आपण जवळ करता. त्याला आपण शरण देता. फक्त आपल्यावर निस्सीम श्रद्धा मात्र हवी.

 पण श्रद्धाच नसेल तर यम नियम तंतोतंत साभाळत केलेले  कर्मकांडही काही केल्या फलद्रूप होत नाही. दक्षाने केलेल्या यज्ञात काही कमतरता का होती? सर्व काही अगदी काटेकोरपणे सांभाळले जात होते. इतका मोठा यज्ञ आत्तापर्यंत कोणी केला नाही असा दक्षाला अभिमान वाटत होता. पण सुंदर सजवलेल्या देहात प्राणच नसेल तर त्याचा काय उपयोग? नुसते कर्माचे अवडंबर पुरत नाही. श्रद्धा हा सर्वाचा आत्मा आहे. सर्व कार्माचा प्राण आहे. दक्षाला ते कळलं नाही. त्याने शिवाचा अपमान केला. त्याचाच भयानक परिणाम त्याला भोगावा लागला. पतीच्या अपमानाने अत्यंत दुःखी झालेल्या सतीने यज्ञकुंडातच उडी मारून जीवन संपवून टाकले.  शिवाने महा क्रोधाने ताण्डव करून त्याचा सर्व यज्ञ उधळून दिला. दक्षाचा संपूर्ण विनाश झाला. श्रद्धेवाचून कोणतेच कार्य फलद्रूप होत नाही.  

 

 

क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृता-

मृषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुरगणाः।

क्रतुभ्रेषस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो

ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचाराय हि मखाः।।21

अन्वयार्थ – हे शरणद- हे आश्रय देणार्‍या शंकरा, क्रियादक्षः तनुभृताम् अधीशः दक्षः क्रतुपतिः – यज्ञ कर्मामधे प्रवीण असणारा व सर्व शरीरधारी प्राण्यांचा स्वामी असणारा दक्ष हा यज्ञकर्ता होता. ऋषीणाम् आर्त्त्विज्यं – ऋषी हे त्या यज्ञातील ऋत्विज / उपाध्याय होते. सुरगणाः सदस्याः – सारे देव  सभासद होते. (तथापि) – (असे असतांनाही) ऋतुफलविधान- व्यसनिनः  त्वत्तः क्रतुभ्रेषः – यज्ञाचे फळ देण्याची आवड असणार्‍या तुझ्याकडूनच (दक्षाच्या) यज्ञाचा नाश झाला. हि श्रद्धा विधुरं मखाः – कारण श्रद्धा न ठेवता केलेले यज्ञभाग क्रतुः अभिचाराय (भवन्ति) । - यज्ञ करणार्‍यांच्या नाशास कारणीभूत होतात.

 

प्रजा जो सांभाळी अति कुशलतेनेच सहजी

स्वये झाला यज्ञी क्रतुपतिच तो दक्ष तरिही

त्रिकाळा जाणे जो मुनिवर  भृगू ऋत्विज जरी

जरी यज्ञी होते सुरवर उपस्थीत अतिथी।।21.1

शिवा आहे तूची सकल जगता आश्रय जरी

जनां देण्यासी तू क्रतुफल असे तत्पर अती

परी यज्ञा तूची कुपित हृदये ध्वस्त करिसी

विना श्रद्धा कैसे सुफळ घडवी कार्य कधिही।।21.2



पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 22

सुहृदहो,

आपल्याकडे आकाशातील नक्षत्र, ग्रह तारे कळावेत, म्हणून त्यांच्या संबंधी, त्यांच्या भोवती अनेक गोष्टी रचल्या गेल्या आहेत. धृव तार्‍याचा अढळपणा, स्थिरता सांगणारी गोष्ट जशी आहे त्याचप्रमाणे आकाशातील मृग नक्षत्र, मृगाच्या पोटात शिरलेला बाण म्हणजेच आर्द्रा नक्षत्र आणि मागेच असलेला अत्यंत प्रखर असा चमकदार व्याधाचा तारा ह्यांची ओळख एका गोष्टीतून अत्यंत रुचिरपणे खालील श्लोकात गुंफली आहे.

 एकदा ब्रह्मदेव आपलींच खूप सुंदर मुलगी शततारका / संध्या ( दोन्ही संदर्भ आहेत) पाहून तिच्या प्रेमात पडले. तिच्या कामनेनी तिच्यामागे धावू लागले. घाबरून शततारकेने/ संध्येने मृगीचं रूप धारण केले. ती मृगी झाली आहे हे पाहून ब्रह्मदेवाने तिला मिळवण्यासाठी एका नरमृगाचं रूप घेतलं आणि ते तिच्यामागे धावू लागले. अशावेळेस व्याधाच्या रूपाने शंकर तेथे प्रकट झाले. आणि त्यांनी ब्रह्मदेवाला मारलेला बाण आजही नरमृगाच्या पोटात घुसलेला

 तसाच आहे. मृग नक्षत्राच्या मागे आजही आर्द्रा नक्षत्र दिसत हे त्यातून सहज सांगितलं आहे. आणि हा बाण सोडणारा व्याधरूपी शिवाचा तारा त्यांच्याच मागे आजही दिसतो.

ह्या सर्व माहितीला भक्तिसूत्रात ओवून आकर्षक गोष्टीरूपात वाचकांपर्यंत पोचवलं आहे.

 

 

 

प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं

गतं रोहिद्भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा।

धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं

त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः।।22

अन्वयार्थ – हे नाथ – हे जगन्नायका अमूम्  अभिकम् प्रजानाथं रोहिद्भूतां स्वां दुहितरं  हा कामातुर ब्रह्मदेव लज्जेने हरिणीचे रूप घेतलेल्या आपल्या कन्येमागे ऋषस्य वपुषा रिरमयिषुम् – प्रसभं गतः । (स्वतः) हरणाचे रूप धारण करून तिला बळजबरीने भोगण्याच्या इच्छेने गेला (असताना) सपन्नाकृतं त्रसन्तं दिवं गतम् अपि – शरीरात बाण शिरल्याने त्रस्त होऊन स्वर्ग लोकात गेल्यावर देखील धनुष्य धारण करणार्‍या तुझा (व्याघ्ररूपाने) मृगाच्या मागे लागणारा उत्साह त्याला अद्याप सोडत नाही.

 

कधी एके काळी अघटित अशी गोष्ट घडली

सुकन्या संध्येचे अति रुचिर लावण्य बघुनी

स्वकन्या आहे ही मनि विसरुनी कामुक अती

विधाता धावे हा धरुनि अभिलाषा मनि तिची।।22.1

भयाने लज्जेने  पळत सुटली ती मृगरुपी

तिच्यापाठी ब्रह्मा मृग बनुन धावे निरतची

विधात्याचे ऐसे बघुन अति निर्लज्जपण ते

शिवा आलासी तू मदत करण्या धावुन तिथे।।22.2

किराता! विश्वेशा!! करुन धनुसी सज्ज समयी

पिनाका जोडीता शिव-शरचि घे वेध सहजी

विधात्याच्या अंगी तव शर बसे खोल रुतुनी

पळे ब्रह्मा स्वर्गी धरुन रुतलेला शर उरी।।22.3

 

नभी पाहू जाता अजुन दिसते दृष्य नयनी

मृगामागे जाई शर बनुनि आर्द्राहि गगनी।।22.4

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 23

  पुष्पदंत म्हणतो, अहो शंकरा!

 केवढा हा आपला मनोनिग्रह! केवढा हा आपला इंद्रियनिग्रह!  आपल्या प्रखर वैराग्याचेच फलस्वरूप हा कठोर निग्रह आपल्याला भूषण बनून राहिला आहे. असा कडक निग्रह असणार्‍याला कोण भुलवू शकेल? विश्वविजयी मदनाने आपली थोडीशी कुरापत काढायचा प्रयत्न करताच आपल्या कपाळावरील अग्नी ज्वांळांनी त्याला लपेटून घेतलं आणि होरपळून तो मरण पावला. ओठावरील एखादा थेंब चाटून घ्यावा त्याप्रमाणे अग्नीज्वाळांनी मदनाला क्षणार्धात चाटून चट्ट केलं.

हे धडधडीत दिसत असतांनाही उमेचा काहीतरी गैरसमज झाला असावा. आपण उमेला आपल्या शरीरार्धात कामचे स्थान देण्याने तिला वाटु लागले की, हा त्रिपुरासुराचा विनाश करणारा, सर्वांना वर देणारा महेश्वर, देवांचाही देव माझ्या रूपाला पाहून भाळला. हा तर माझ्या लावण्याचा विजय आहे. माझ्यावर भाळणारा शंभु हा माझ्यामागे स्त्रीलंपट झाला आहे. हा माझ्या कठोर तपश्चर्येचा परिणाम आहे. उमेचे हे विचार तर मला ते हास्यास्पद वाटतात. मी इतकच म्हणेन की ह्या अबोध युवती थोड्या भोळ्या असतात. 

 

स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्

पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि।

यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटना 

दवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः।।23

अन्वय – हे वरद,- हे वरदायी शंकरा, स्वलावण्याशंसा - स्वतःच्या लावण्याच्या गर्वाने धृत-धनुषम् पुष्पायुधं – हाती धनुष्य घेतलेल्या मदनाला  पुरः तृणवत् अह्नाय प्लुष्टं दृष्ट्वा अपि – आपल्या समक्ष त्वरित गवताप्रमाणे जाळून टाकलेले पाहून देखील  यदि देवी- जर देवी पार्वती हे यमनिरत – हे यम नियमादि अष्टांग योग प्रवीण महादेवा देहार्ध घटनात् – तिला आपल्या शरीराच्या अर्ध्या भागात नित्य स्थान देण्यामुळे  त्वां स्रैणं  अवैति – जर आपल्याला स्त्री लंपट समजत असेल तर  बत अद्धा युवतयः मुग्धाः सन्ति ।- अहो खरोखर तरुण स्त्रिया भोळसर असतात,

 

 असे सौंदर्याचा परम पुतळा मीच जगती

शिवालाही माझ्या चुणुक दिसु दे पुष्पधनुची

अशा ह्या वृत्तीने धनु उचलताची मदन हा

तया जाळीले तू  गवत जळते त्यासम शिवा।।23.1

प्रसंगासी ह्याची लव न स्मरता चित्ति  गिरिजा

शिवाची अर्धांगी म्हणुन जवळी स्थान मिळता

म्हणे झाला शंभू शिव मजवरी लुब्ध पुरता

तपश्चर्येचा हा विजय मम आहेच सगळा।।23.2

परी गौरीचा हा समज मनिचा पोकळ अती

युवा नारी सार्‍या जगति बहु भोळ्याच असती

जया अंगी सारे यम-नियम हे पूर्ण भिनले

कसे व्हावे त्याचे विचलित जराही हृदय हे।।23.3

करे सृष्टीचेही नियमनचि जो योग्य रितिने

तयाला जिंकाया कधि कुणि धजावेलचि कसे।।23.4

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 24

अर्थांतरन्यास आणि विचित्रालंकार हे दोन अलंकार ह्या श्लोकात मिसळलेले आहेत. एका बाजूला शंकराचं भयद वर्णन, त्याची भयंकर राहणी तर दुसरीकडे भक्तांचे कल्याण करणारी त्याची सुखद, आश्वासक प्रतिमा. शिवशंभूचं स्मशानात राहणं असो वा नरमुंडमाला धारण करणं असो वा चिताभस्माचा लेप अंगभर लावणं असो; सगळच अपवित्र पण अशी अपवित्र मूर्ती मात्र परम पवित्र! काय हा विरोधाभास! पण जो वैराग्याचं प्रतिक आहे, ज्याला कसलाही लेप लागत नाही, जो निर्गुण निराकार आहे त्याच्या पवित्र अपवित्रतेबद्दल लोकांनी काहीही भाष्य केलं तरी त्याने त्याला कुठलेही गुण वा दुर्गुण चिकटत नाही. तो परम चैतन्यमय तसाच राहतो. ज्या प्रमाणे सूर्य शिळा होत नाही, अग्नी ओवळा होत नाही, नित्य वाहणार्‍या गंगेच्या पाण्याला पारोसेपण स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे शिव तत्त्वाला अपवित्रता स्पर्श करू शकत नाही.

कधी कधी थोरांच्या वागण्याचा सामान्यांना उलगडा होत नाही.  त्यांच्या कृतींचा आवाका सामान्यांच्या बुद्धीच्या पलिकडे असल्याने त्यांची वागणूक विपरीत वाटते पण त्या कृतीचा परिणाम मात्र विपरीत नसतो तर मंगलमय असतो. आनंददायी असतो.   

 

 

श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचरा-

श्चिताभस्मालेप: स्रगपि नृकरोटीपरिकर:।

अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं

तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि।।24

 

अन्वयार्थ – हे स्मरहर! हे मदनाचे प्राण हरण करणार्‍या शिवा, तव स्मशानेषु आक्रीडा – तुझा स्मशानातील संचार, लीला, (पार्वतीसमवेत) खेळ पिशाचाः सहचराः – भूत पिशाच्चासारखे सोबती, साथीदार चिता भस्मालेप स्रक् नृ जळत्या चितेच्या  भस्माचा शरीराला लावलेला लेप स्रग् नृ करोटि परिकरः – माणसांच्या मुंडक्यांची गळ्यात घातलेली माळ एवं अखिलं तव शीलं अमङ्गलं नाम भवतु – असे तुझे चारित्र्य  अमंगल, ओंगळवाणे असले तरी असू देत भले तथा अपि वरद, स्मर्तॄणां परमम् मङ्गलम् असि -  तरी देखिल हे वरदायका तुझे नित्य स्मरण करणार्‍यांना (भक्तांना) तू सदैव मङ्गलच वाटतोस. ( कारण तू सदैव त्यांचे कल्याणच करतोस.)

 

शिवा गौरीसंगे बसुनिच स्मशानात सहजी

जुगारासी खेळी जनन मरणाच्या सततची

पिशाच्चांची दाटी तुज भवति झाली कितिक ही

तयांसंगे शंभो अविरत कसा तूचि वससी?।।24.1

अति क्रोधाने तू मदन अवघा भस्म करुनी

चिताभस्माने त्या तनुवर तुझ्या लेप चढवी

नरांच्या रुंडांची अति भयद माला रुळत ही

तुझ्या कंठी शंभो अशुभ अति दुर्भाग्यप्रद ही।।24.2

नसे मांगल्यासी तिळभर ही जागा तुजकडे

परी मांगल्याचे प्रतिक तव मूर्ती दिसतसे

महादेवा जे जे स्मरण करती हे हृदि तुझे

तयांना देसी तू नित सकल सौभाग्य सगळे।।24.3

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 25

आत्मतत्त्वाची प्रचीती घेणे हेच शिवाला प्राप्त करणे आहे. ही स्थिती अवर्णनीय परम आनंद देणारी आहे. एकदा का ही स्थिती अनुभवली की परत माघारी कोणी येत नाही तो आनंदाच्या डोहात आनंदलहरी होऊन राहतो. 

 

 

मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुत:

प्रहृष्यद्रोमाण: प्रमदसलिलोत्सङ्गितदृश:।

यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्ज्यामृतमये

दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान्।।25

अन्वयार्थ – मनः प्रत्यक् चित्ते सविधं अवधाय – ( बाह्य विषयांकडे धाव घेणार्‍या) मनाला यम नियमादींनी विधिपूर्वक अंतर्मुख करून आत्त मरुतः - प्राणायामद्वारा श्वास नियंत्रित करून प्रहृषत् रोमाणः – अत्यानंदाने शरीरावर रोमांच उठल्यामुळे प्रमदसलिलोत्संगितदृशः यमिनः -  आनंदाश्रुंनी डोळे भरून आलेले योगी यद् आलोक्य – ज्याचे अवलोकन करून, पाहून अमृतमये हृदे इव निमज्य – जणु अमृताच्या डोहात डुंबतात. तद् किमपि अन्तस्थत्त्वम् दधति -  जी काही अवर्णनीय स्थिती प्राप्त करून घेतात तत् भवान किल – ते तत्त्व म्हणजे खरोखर तूच आहेस.

 

करी प्राणायामे नियमनचि त्या वायु गतिचे

मुनी पाळूनी हे यम-नियम शास्त्रोक्त रितिने

मनाला ठेवीती  हृदयकमळी आणुन सुखे

जिवाचे आत्म्याचे मिलन समयी त्या घडतसे।।25.1

परब्रह्मासी त्या अनुभवुन आनंदमयची

समुद्री सौख्याच्या नित विहरती अमृतमयी

सुखाच्या अश्रूंनी नयनकमले गाल भिजती

घडे रोमांचांनी पुलकितचि काया पुनरपि।।25.2

घडे सौख्याचा जो परिचय तयांना सुखमयी

परब्रह्माची जी प्रचिति हृदयासी उमगली

तुझ्या रूपाची ही अमल अनुभूती मज गमे

असे तेजस्वी तू अमलचि परब्रह्म शिव हे।।25.3

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 26

शिवतत्त्व हे सारे ब्रहमांड व्यापूनही उरलेच आहे. मग ते नाही अशी जागा शोधूनही कशी सापडावी? ``भरला घनदाट हरी दिसे’’ ही ज्ञानदेवांचीच बोली पुष्पदंतही बोलत आहे.  

 

 

त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवह-

स्त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च।

परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं

 विद्मस्तत्तत्त्वं  वयमिह तु यत्त्वं न भवसि।।26

अन्वयार्थ  – त्वम् अर्कः- तू सूर्य आहेस. त्वं सोमः – तू चंद्र आहेस. त्वं पवनः – तू वारा आहेस. त्वं हुतावहः – तू अग्नी आहेस. त्वम् आपः तू पाणी आहेस. त्वं व्योम - तू आकाश आहेस. त्वं धरणिः - तू पृथ्वी आहेस. त्वम् आत्मा च असि – तू आत्मा आहेस. इति च एवं परिच्छिन्नां गिरं त्वयि परिणताः विभ्रतु – असे ज्ञानी लोक भले तुझ्याविषयी मर्यादित भाषा योजू देत. इह तु वयं – परंतु आम्ही मात्र यत् त्वं न भवसि – तू ज्यात नाहीस तत् तत्त्वं न विद्मः । - ते तत्त्व जाणत नाही.

 

शशी, भानू , अग्नी, पवन, असशी तू गगन ही

असे तूची आत्मा, सलिल, असशी तूच अवनी

अशी  विद्वानांनी कितिक अनुमाने कथियली

तुझ्या व्याप्तीची ही अति उथळ मर्यादित जरी ।।26.1

वदो कोणी काही वरवरच भाषा उथळ ही

अमर्यादासी का नियम कधि मर्यादित करी

न तू ज्याच्यामध्ये भरुन उरला पूर्णपणि रे

न ठावे आम्हासी जगति असले तत्त्व कुठले।।26.2

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 27

 हे आर्त, दीनांना शरण देणार्‍या शिवा,

अ, उ म ह्या तीन अक्षरांच्या समासाने, संयुक्तपणे, एकत्रीकरणाने ॐ कार बनलेला आहे. तोच तीन अवस्था , तीन भुवनं, तीन देव  ह्यांचं वर्णन करतो. त्यांचे स्वरूप स्पष्ट करतो. हाच ओंकार त्यांचा आसरा, आश्रयस्थान आहे. ह्या तीघांनाही  (तीन अवस्था, भुवनं, देव) बोध करणारा, तिघांचेही वर्णन करणारा तीन अक्षरांचा बनलेला ॐ कार तिनही अवस्थांच्या पलिकडे असलेल्या शिवाच्या अखंड चैतन्यस्वरूप वा सूक्ष्म ध्वनीस्वरूप अशा चवथ्या तुरीय अवस्थेचंही वर्णन करतो. अ उ म हे वेगवेगळे किंवा एकत्र ॐ ह्या स्वरूपात शिवाच्या सगुण विश्वरूपाचे आणि अनंत अशा निर्गुण निराकार रुपाचा बोध त्याच्या भक्तांना करून देते. ह्या चवथ्या अवस्थेत कुठलेही विकार म्हणजे बदल संभवत नाहीत.

काशी खंडाच्या 73-74 अध्यायांमधे ओंकारेश्वराच्या वर्णनात म्हटलं आहे की सृष्टीच्या सुरवातीला जे चैतन्य (परं ज्योती) प्रकट झाली त्यातून जो महा ध्वनी येत होता त्याचेच नाव ओंकार आहे. अ उ म ही अक्षरं एकत्र/समासयुक्त शिवाच्या सर्वव्यापी स्वरूपाचे ज्ञान देते तर स्वतंत्र अ उ म अक्षरे शिवाच्या सर्व विश्वापासून वेगळ्याच असलेल्या चैतन्यमय अथवा सूक्ष्माहून सूक्ष्म असलेल्या ध्वनीरूपाचे ज्ञान देतात.

 

त्रयीं तिस्रोवृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा-

नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृतिः।

तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभि:

समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमितिपदम्।।27

अन्वयार्थ – हे शरणद! -  हे शरणदाता, त्रयीम् (ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद) हे तीन वेद, तिस्रः वृत्तीः – ( जागृती, स्वप्नदर्शन आणि गाढ निद्रा ) या तीन अवस्था, त्रिभुवनम् – (स्वर्ग, मृत्यू पाताळ ) हे तीन लोक, त्रीन् अपि सुरान् – (ब्रह्मा, विष्णू, महेश) हे तीनही देव, अकाराद्यैः  त्रिभिः वर्णैः अभिदधत् – ( अकार, उकार मकार / अ उ म ) या तीन वर्णांनी दर्शविणारे, तीर्ण

 विकृति- विकार रहित, अणुभिः ध्वनभिः अवरुन्धानम् – अत्यंत सूक्ष्म ध्वनींनी बनलेले ते तुरीय धाम ॐ इति पदम् – तुझे तुरीय ( म्हणजे तीन वर्णांपलिकडचे ) निवासस्थान जे ॐ हे पद आहे  ते त्वां - तुझ्या (शिवाच्या)  समस्तं व्यस्तं गृणाति – तुझे स्वरूप समुदाय रूपाने व व्यक्तिरूपाने कथन करते.

 

यजुः, ऋग्, सामादि निगमचि उभे ज्या धरुन हे

घडे, राही, जाई जगतचि जयांच्या कृतिमुळे

हरि, ब्रह्मा, शंभू सुरवर तिन्ही सक्षम भले

तयांचे आहे जे सबळचि अधिष्ठान पद जे।।27.1 -

दशा स्वप्नांची वा शयन अथवा जागृति असे

अवस्था या तीन्ही कथन करिते एक पद जे

असो भूलोकासी, नरकपुरि वा स्वर्ग पुरि हे

तिन्हीही लोकांना पद नितचि जे दर्शवितसे।।27.2 -

जयासी  केव्हाही बदल अथवा विकृति नसे

तिन्ही वर्णांनी या , , चि अशा जे बनतसे

घडे सूक्ष्माहूनी अति अतिच जे सूक्ष्म ध्वनिने

तिन्ही वर्णांच्याही अति पलिकडे स्थान जयिचे।।27.3

असे ओंकाराचे अढळ पद तुर्याचि चवथे

जिथे दीनाधारा नित वससि ओंकार पद ते

तुझे सर्वव्यापी अपरिमित दावी स्वरुप हे

तुझे मांडी व्यक्तस्वरुप दुसरे स्पष्टपणि ते।।27.4

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 28

पुष्पदंत म्हणतो, हे देवा, आपली म्हणजेच, शिवाची आठ नावे नित्य कल्याणकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या प्रत्येक नावात वेदांचा संचार आहे. अशा ह्या परमात्मास्वरूप शिवाला आठ नावांच्या मंत्राने मी नमस्कार करतो.

ही आठ नावे खाली देऊन त्यांचा अर्थ सांगितला आहे.

1.  भवः – स्त्रोत, मूळ, सर्वांचे जीवन

2.  र्वः – प्रलयाच्यावेळी जो सर्वांचा संहार करतो.

3.  रुद्रः  - प्रलयकाळी सर्व जगताचा संहार करतेवेळी सर्वांना रडवतो. किंवा `रु’ म्हणजे वाणी. जो वाणी देतो, बोलवितो, किंवा जो `रु’ म्हणजे दुःख  वितळवितो. किंवा स्वतःच रणांगणावर मोठ्याने गर्जना करतो.

4.  पशुपतिः  सर्व पशुंचा स्वामी, त्यांचे पालन, रक्षण करणारा, पाशुपत नामक दार्शनिक सिद्धांत प्रतिपादन करणारा.

5.  उग्रः – भयप्रद, सूर्यचंद्रादिही याचे भय बाळगून नियमितपणे आपली कार्ये करतात.

6.  महादेवः – महान ऐश्वर्याने युक्त  असा सर्वश्रेष्ठ देव

7.  भीमः – भव्य, भयप्रद

8.  ईशानः – जो सर्व विश्वाचे, भूतांचे प्राणिमात्रांचे नियमन करतो. जो सर्वांचा नियंता, शास्ता, मार्गदर्शक आहे. 

 

 

भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहां-

स्तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम्।

अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि

प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते।।28

अन्वयार्थ – हे देव! -  हे ईश्वरा, भवः शर्वः पशुपति अथ उग्रः (तथा) महान् सहित देवः (महादेवः) भीम ईशानौ इति यद् इदं अभिधानाष्टकम् – हे ईश्वरा, भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र महेव, भीम आणि ईशान हे जे तुझ्या आठ नावांचे अष्टक आहे, अमुष्मिन् – या मधील प्रत्येकं श्रुतिः अपि विचरति – यातील प्रत्येक पदात वेदाचा संचार आहे अस्मै प्रियाय धाम्ने – त्या परंधाम स्वरूपम्हणजेच परमात्मस्वरूप असलेल्या भवते – तुला  (अहं) प्रवहित नमस्यः अस्मि – मी प्रवाहाप्रमाणे मंत्रस्वरूप (आठही नावांच्या सामुहिक उच्चाराने)  नमस्कार करत आहे.

 

तुझी शर्वा, रुद्रा, पशुपति, महादेव  धरुनी

अती उग्रा, भीमा असति भव, ईशानच अशी

प्रभो नावे आठी जगति नित कल्याणकर जी

तयांमध्ये सारे निगम नित संचार करिती ।।28.1

अशा हे विश्वेशा परमपदरूपा तुज नमो

तुझ्या पायी राहो अति चपळ माझे मन प्रभो।।28.2

(निगम- वेद)

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 29

हे त्रिलोचन, हे मदनांतक, हे विश्वविनाशक, हे काननप्रिय हे सर्वव्यापी शंकरा, तू अत्यंत निकट आहेस का अति अति दूर आहेस; सूक्ष्म आहेस का महान आहेस --- माहित नाही पण तू जसा असशील त्या रूपाला माझा नमस्कार असो.

 

 

नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमो

नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः।

नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमो

नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः।।29

अन्वयार्थ – हे प्रिय दव - हे निर्जन वनात विहार करण्याची आवड असलेल्या शिवा, नेदिष्ठाय दविष्ठाय च ते नमः – अत्यंत निकटवर्ती आणि अत्यंत दूरवर्ती असलेल्या आपल्याला नमस्कार! क्षोदिष्ठाय महिष्ठाय  च ते नमः – अत्यंत सूक्ष्म रूप आसलेल्या आणि अत्यंत महत्तर रूप असलेल्या त्या रुपांस नमस्कार! हे त्रिनयन – हे त्रिनेत्रधारी, हे स्मरहरहे त्रिनेत्रधारी, मदनाला जाळून टाकणार्‍या शंकरा, वर्षिष्ठाय यविष्ठाय च ते नमः - वृद्ध, अतीशय पुरातन आणि अतीव युवा, नवयुवक रूपाला नमस्कार!! सर्वस्मै ते नमः – सर्वरूप आपल्याला नमस्कार !! तद् इदम् इति सर्वाय/ शर्वाय च नमः - हे सर्वही तोच (परमात्मा) आहे हे सर्व जाणून आपल्याला नमस्कार (काही ठिकाणी पाठभेद असून सर्व एवजी शर्व असे आहे. म्हणून सर्व जगताचा नाश करणार्‍या शंकरास नमस्कार!!)

 

 

वनी एकांताची हृदि अतुल ज्या आवड असे

सदा राहे माझ्या निकट परि जो दूरचि गमे

महा क्रोधाने जो सहज मदना राखचि करी

मनापासूनी मी नमन करितो त्या शिवपदी।।29.1

असे सूक्ष्माहूनी अतिशयचि जो सूक्ष्म मतिसी

तरी व्यापूनिया जगभर उरे अंगुळभरी

कपाळी अग्नीचा नयन तिसरा ज्या भयकरी

मनापासूनी मी नमन करितो त्या शिवपदी।।29.2

जुना सर्वांहूनी अतिशय वयोवृद्ध असुनी

जया तारुण्याचा बहर सरतो नाचि कधिही

कळेना गात्रांसी परि मतिस जोची कळतसे

दिसे सर्वांमध्ये नित भरुन अस्तित्त्व जयिचे।।29.3

रवी एकावेळी जळि निरनिराळ्या दिसतसे

तसा तूची शंभो मज दिसतसे ह्या जगति रे

तरंगांमध्येही जलधि भरुनी जो उरतसे

पटामध्ये जैसा भरुन उरला कापुस असे।।29.4

तसे ह्या विश्वाच्या जडणघडणीतून दिसते

अहो विश्वेशा हो स्वरुप तुमचे सर्व विणले

तुझ्या ह्या रूपासी मम नमन विश्वात्मक प्रभो

तुम्ही या विश्वाचे सकलचि अधिष्ठान शिव हो ।।29.5

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 30

सत्त्व, रज, तम हे सर्व गुण धारण करून विश्वव्यापार सुरळीत चालवणार्‍या ह्या ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्याही पलीकडे असलेल्या तथार्थ ज्ञानस्वरूप, तेजोमय शिवशंकराला माझा नमस्कार असो.

हरिणी नावाचं सुंदर वृत्त आहे. 17 अक्षरांचं आहे. 6, 4, 7 म्हणजेच 6, 10 आणि 17 व्या अक्षरावर थांबला की  छान म्हणता येणार आहे.

 

(वृत्त  हरिणी, अक्षरे  17, गण - न स म र स ल ग, यति -6,4,7)

 

बहुलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः

प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः

जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः

प्रमहसि दे निस्रैगुण्ये शिवाय नमो नमः ।।30

प्रमा -  प्रत्यक्ष ज्ञान, यथार्थ ज्ञान

(ज्या अक्षरावर यति आहे म्हणजे थांबावे लागते ते अक्षर अधोरेखित आहे)

अन्वयार्थ – विश्व उत्पत्तौ – विश्वाची निर्मिती करतांना बहलरजसे / बहुलरजसे – रजो गुणाचे अधिक्य असलेल्या  भवाय नमोनमः – ब्रह्मदेवस्वरूप शिवाला नमस्कार असो. तत्संहारे – त्याच्या / सृष्टीच्या संहारासाठी प्रबल तमसे तमोगुणाचे प्राबल्य असलेल्या हराय- (रुद्रस्वरूप)शिवाला नमोनमः नमस्कार असो. जनसुखकृते – प्रजाजनांच्या सुखासाठी सत्त्वोद्रिक्तौ सत्त्वगुणाचे प्राबल्य धारण करणार्‍या  मृडाय (विष्णुस्वरूप) महादेवाला नमोनमः नमस्कार असो. प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये - अत्यंत तेजस्वी व तीनही गुणांच्या पलिकडील पद धारण करणार्‍या शिवाय नमोनमः – शिवशंकराला नमस्कार असो.

 

 

अमुप धरुनी अंगी तोची रजोगुण तो महा

अखिल जग हे साकाराया प्रजापति जाहला

रजगुणयुता हेची आहे स्वरूप तुझे शिवा

नमन करितो त्याची रूपा भवा तुज मी पुन्हा।।30.1

सकल जग हे संहाराया तमोगुण तो हवा

हर हर धरी अंगी त्यासी विनाश चि साधण्या

तमगुणयुता हेची आहे स्वरूप तुझे शिवा

नमन करितो  त्याची रूपा हरा तुज मी पुन्हा।।30.2

जगत सगळे सांभाळाया जगा सुख द्यावया

सुखद गुण हा अंगीकारी हरी हृदयी सदा

शिव तव असे सत्वाचे हे स्वरूपचि निर्मला

नमन करितो त्याची रूपा मृडा तुज मी पुन्हा।।30.3

असुनि इतुके तूची राही धरूनचि निर्गुणा

करिसि परि तू कल्याणासी शिवा जगताचिया

मजसि मिळण्या मोक्षाचा तो प्रकाशचि ज्ञानदा

नमन करितो त्या कल्याणी शिवा तव पावला।।30.4

------------------------------------------

खाली दिलेल्या लिंक्सवर ते ते श्लोक विश्लेषणासहित उपलब्ध आहेत.


श्लोक 1-10


 श्लोक 11 ते 20 


श्लोक 21 ते 30 


श्लोक 31 ते 43 


संपूर्ण महिम्न  ( विश्लेषणाशिवाय)

No comments:

Post a Comment