पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम् विश्लेषण (श्लोक 31 - 43)

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 31

हे परेशा, तुझा हा असीम विस्तार, अनादि, अनंत ऐश्वर्य हे सर्व एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला अत्यंत क्षुद्र अशा लोभ, मोह क्रोधादिंनी ग्रस्त मी! तुझ्या ह्या शाश्वत भव्य रूपाने मी गर्भगळीत झालो आहे. तुझ्या विषयी असलेल्या हया भयातूनच ही स्तुतीरूप पूजा माझ्याकडून घडत आहे.  हे सर्व स्तोत्र म्हणजे तुला अर्पण केलेला वाक्य पुष्पोपहार आहे; जो तू माझ्याकडून करवून घेतला आहेस. आणि तुझ्या चरणांवर अर्पण करायला मला भाग पाडलं आहेस. तुला नमस्कार असो.

 

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य ,यति – 8,7)

 

कृशपरिणति चेतः क्लेशवश्यं क्व चेदं

क्व च तव गुणसीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः।

इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद्

वरद चरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम्।।31

अन्वयार्थ – हे वरद!हे वरदायी शंकरा, कृश परिणति क्लेशवश्यं च इदं चेतः क्व? – माझे अतिशय तोकडे (अल्पमति )  व रागद्वेशादि क्लेशांना बळी पडलेले मन कुणीकडे  ? तव च गुणसीमा उल्लंघिनी शश्वद् ऋद्धिः क्व! आणि तुझे सर्व सीमा ओलांडून जाणारे शाश्वत असे ऐश्वर्य कोठे? इति चकितं माम् – या विचारामुळे भयभीत झालेल्या मला अमन्दिकृत्य -बळजबरीने (स्तुती करण्यास) प्रवृत्त करून भक्तिः – तुझ्या भक्तीने ते चरणयोः – तुझ्या चरणावर  वाक्य-पुष्पोपहारं वाक्यरूपी पुष्पहाराची पूजा आधात् – अर्पण करायला लावली.

(ज्या अक्षरावर यति आहे म्हणजे थांबावे लागते ते अक्षर अधोरेखित आहे)

 

कमकुवत कुठे हे चित्त माझेच कोते

बुडुन मद अहंकारात घेईच गोते

विषय बघुन नाना काम त्याचा बळावे

भुलुनचि अडके ते मोहरूपी गळाते।।31.1

परि तवचि गुणांना पार नाही शिवा हे

अपरिमित गुणांचा सागरू तूचि कोठे

दिसत नच किनारा माझिया क्षीण नेत्रा

भयचकित मनाने पाहि ऐश्वर्य शर्वा।।31.2

शिव शिव शिव माझे चित्त व्याकूळ हेची

चरण-कमल पूजा कंठनीला तुझी ही

करवुन नित घे वाक्यरूपी फुलांनी

मजकडुन शिवा हे  भक्तिने स्फूर्तिनेही ।।31.3

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 32

``गुणी गुणं वेत्ती’’ म्हणजे गुणी माणूसच दुसर्‍याचे गुण जाणू शकतो. प्रत्यक्ष शिवाची स्तुती करायची तर हा अगाध गुणसागर शब्दात तरी कसा गवसावा आणि त्याची स्तुती लिहायला एवढी समर्थ व्यक्ती तरी कोठून आणावी? जी ज्ञानमयी अशी सरस्वतीदेवी वाणीची, बुद्धीची देवता आहे तीच एकवेळ ह्या शिवाचा महिमा थोडातरी विशद करू शकेल.

ज्याची व्याप्ती, खोली ही अथांग, अनंत आहे असा शिव हिमा लिहायला सामान्य लेखन सामग्री कशी पुरी पडावी? त्याला मेरू पर्वताएवढा काजळाचा डोंगर समुद्राएवढ्या शाईपात्रात कालवून शाई बनवायला लागेल. आणि कल्पतरूचीच लेखणी करून पृथ्वीच्या भूर्जपत्रावर लिहायला लागेल.

एवढ करूनही प्रत्यक्ष शारदाम्बा जरी शिवमहिमा लिहायला बसली तरी किती अनंत काळ लिहूनही तो पूर्ण होणार नाही.

ह्या श्लोकापाशी पुष्पदंताने केलेली स्तुती संपते. पुढचे श्लोक त्यात समाविष्ट केलेले आहेत असे समजतात. त्यामुळे त्यांचे विश्लेशण दिलेले नाही.

 

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे

सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी।

लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं

तदपि तव गुणानामीश पारं न याति।।32

अन्वयार्थ – हे ईश!हे ईश्वरा, असितगिरिसमं कज्जलं – काळ्या पर्वता एवढे काजळ जर सिन्धुपात्रे स्यात् - समुद्राएवढ्या भांड्यात कालवून शाई बनवली. सुरतरुवर-शाखा लेखनी स्यात्- कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी तयार केली, पत्रम् उर्वी स्यात् – आणि पृथ्वीएवढ्या कागदावर गृहीत्वा – (हे सारे साहित्य) घेऊन यदि शारदा सार्वकालं लिखति – (साक्षात) देवी सरस्वती सतत (जरी) लिहित राहिली – तदपि तव गुणानां पारं न याति । - तरी देखील तुझ्या गुणांच्या पलिकडच्या किनार्‍याला तिला पोचता येणार नाही. (तिलाही तुझ्या समग्र गुणांचे वर्णन करता येणार नाही.)

मिसळुनि जळि मेरू-पर्वताकार काळी

बनवुन कुणि शाई सागराच्याच पात्री

अखिलचि वसुधा ही भूर्जपत्रेच केली

कलम म्हणुनि हाती घेतली कल्पवल्ली।।32.1

सतत लिहित राहे शारदांबा जरी ही

शिव महति कधीही पूर्ण होणार नाही।।32.2

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक - 33

 

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

असुरसुरमुनीन्द्रैरर्चितस्येन्दुमौले-

र्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।

सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो

रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार।।33

अन्वयार्थ – सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः – सर्व (शिव भक्तात) श्रेष्ठ असलेल्या पुष्पदन्त नामक गंधर्वाने  असुर सुर मुनिन्द्रैः – राक्षस, इंद्रादि देव व ऋषीमुनिंनी अर्चितस्य आराधना केलेल्या, निर्गुणस्य इन्दुमौलेः ईश्वरस्य- निर्गुण निराकार ईश्वराचा/शिवाचा, ग्रथित गुण महिम्नः –  सांगितलेला / ग्रंथबद्ध केलेला गुणांचा महिमा एतत् रुचिरं स्तोत्रं अलघुवृत्तैः चकार। - ह्या अत्यंत रसाळ स्तोत्रात (शिखरिणी ह्या 17 अक्षरांच्या) मोठ्या वृत्तात श्लोकबद्ध केला.

( गण- अनुयायीग्रथ  लिहून ठेवणे,संकलित करणे। ) 

 

 

धवल शशिकला ज्या भूषवी मस्तकासी

सकल गुण जयाच्या आश्रये राहताती

गुणमय असुनी जो निर्गुणाचीच मूर्ती

असुर, सुर, मुनी हे नित्य ज्या वंदिताती ।।33.1

अमल विमल ऐशा विश्वरूपी शिवाची

सकल शिव स्तुती जी सांगती वेद चारी

अखिल शिव स्वरूपा ग्रंथबद्धा करोनी

सकल स्वरुप तेची धूर्जटीचे स्मरोनी ।।33.2

 

सकल शिवगणांच्या अग्रणी किन्नरानी

कुसुमदशननामे छंदबद्धा करोनी

मधु मधुर स्तुती ती मुक्तकंठे शिवाची

रुचिर शिखरिणी ह्या दीर्घ वृत्तात केली ।।33.2

 

 

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 34

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्

पठति परम भक्त्या शुद्धचित्तः पुमान्यः।

 भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र

प्रचुरतरधनायुः पुत्रवान्कीर्तिमांश्च।।34

अन्वय – यः शुद्धचित्तः पुमान् अहरहरः धूर्जटेः एतत् अनवद्यं स्तोत्रं परमभक्त्या पठति सः शिवलोके रुद्रतुल्यः भवति,  तथा अत्र प्रचुरतरधनायुः पुत्रवान् कीर्तिमान् च (भवति)  ,

 जो माणूस अत्यंत शुद्ध मनाने अत्यंत भक्तिभावाने हे पवित्र शिवस्तोत्र / धूर्जटी स्तोत्र रोज वाचेल तो शिवलोकात शिवतुल्य होईल आणि इथे ह्या इहलोकात त्याला सर्व प्रकारची साधनसंपत्ती, आयु, सन्तान आणि किर्ती प्राप्त होईल.

 

अति पुनित स्तुती ही जो म्हणे शंकराची

विमल मन करोनी भक्तिभावे सदाही

शिवसम शिवलोकी मान त्या सर्व देती

विपुल विभव लाभे दीर्घ आयुष्य त्यासी ।।34.1

यश अनुपम लाभे भूतळी श्रेष्ठ त्यासी

सुखविति इहलोकी पुत्र पुत्री तयासी ।। 34.2

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 35            

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः।

अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्।।35

अन्वय – महेशात् न अपरः देवः, महिम्नः न अपरा स्तुतिः, अघोरात् न अपरः मन्त्रः, गुरोः परं तत्त्व न अस्ति ।

महेशाहून दुसरा (श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून दुसरी (श्रेष्ठ) स्तुती/ स्तोत्र नाही. (ॐ नमः शिवाय । )  ह्या अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरूहून ( शिवाहून) श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.

(अघोरमंत्र – ॐ नमः शिवाय । )

 

महेशा सारखा कोणी  । देव नाही दुजा कुणी

महिम्नावाचुनी नाही । स्तोत्र उत्कृष्ट एकही

मंत्र नाही दुजा काही । अघोराहून श्रेष्ठची

नाही नाही गुरूहूनी । श्रेष्ठ तत्वचि या जगी।।35

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 36

 

दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।

महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम्।।36

अन्वयार्थ – दीक्षा, दानं, तपः, तीर्थं, ज्ञानं, यागादिकाः क्रियाः (एते सर्वे) महिम्नस्तवपाठस्य षोडशीं कलां न अर्हन्ति।

घेतलेला उपदेश, दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, ग्रंथांमधून मिळालेले ज्ञान, यज्ञ होमादि कर्मे ह्या सार्‍या गोष्टी महिम्न स्तोत्राच्या पाठाच्या सोळाव्या अंशाइतक्याही योग्यतेच्या नाहीत.

( कला म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा ह्या 15 कला आणि सोळावी आमावास्या. सोळाव्या कलेएवढी ही योग्यता नसणे म्हणजे, आमावस्येबरोबर सुद्धा तुलना होऊ शकणार नाही म्हणजे, थोडीही योग्यता नसणे.  )

 

जैशा दावी कला सोळा आकाशी तो कलानिधी

नाही त्याच्या कलेची ही शोभा तार्‍यास एकही

तैसी दीक्षाच मंत्रांची वा ती दाने यथाविधी

तीर्थक्षेत्रे, तपश्चर्या, ज्ञानप्राप्तीच पूर्ण ती - -

केले वा यज्ञ मोठे ते, धर्मकार्येच सर्वही

नाही त्यांसी महिम्नाच्या अंशाची थोरवी परी।।36

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 37

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः

शिशुशशिधरमौलेर्देवदेवस्य दासः।

 खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्

स्तवनमिदमकार्षीद्दिव्यदिव्यं महिम्नः।।37

अन्वय – कुसुमदशन नामा सर्व गन्धर्वराजः – कुसुमदशन म्हणजेच पुष्पदंत नावाचा सर्व गंधर्वांचा राजा शिशु-शशीधर-मौलेः – लहानशी चंद्रकोर डोक्यावर धारण करणार्‍या देवदेवस्य दासः (आसीत्) – देवांचा देव म्हणजे महादेवाचा दास होता. सः किल अस्य रोषात् – तो खरोखर त्याच्या (शंकराच्या) रोषाने, रागाने निज महिम्नः भ्रष्टः – स्वतःच्या कीर्तीपासून भ्रष्ट/ च्युत झाला. सः इदं महिम्नः दिव्य दिव्यं स्तवनं आकर्षीत् – तेव्हा त्याने ह्या दिव्य स्तोत्राची (धूर्जटीस्तोत्र किंवा शिवमहिम्नची) रचना केली.

 

बहुत समय पूर्वी एक गंधर्वराजा

कुसुमदशननामे जो प्रसिद्धीस आला

असुनि शिवपदांचा दास तो पुष्पदंत

बहुत तयि शिवाचा ओढवीलाचि रोष।।37.1

धुळित मिळुन गेले सर्व ऐश्वर्य त्याचे

म्हणुन शिवमहिम्नातो रचे भक्तिभावे

फिरुन शिव तयाला जाहला हो प्रसन्न

सकल विभव त्याचे लाभले त्या फिरून।।37.2

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 38

 

 

(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण - न न म य य)

 

सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं

पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः।

व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः

स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम्।।38

अन्वयार्थ   यदि मनुष्यः प्रांजलिः अनन्यचेताः (भूत्वा) – जर अनन्य भावाने विनम्र होऊन/ कपाळाला अंजली लावून सुरवर-मुनि-पूज्यं – देव आणि मुनी ह्यांनी पूजन केलेल्या, स्वर्ग मोक्षैकहेतुं– स्वर्ग आणि मोक्षाचं एकमेव साधन. (इदं स्तोत्रं) पठति, अशा ह्या स्तोत्रचे पठण करतात, (तर्हि) किन्नरैः स्तूयमानः (सः ) – किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवसमीपं व्रजति – शिवाच्या जवळ पोचतो. शिवलोकास प्राप्त होतो. पुष्पदन्तप्रणीतम् इदं स्तवनं अमोघम् (अस्ति) । - पुष्पदन्ताद्वारे केलेले हे स्तोत्र कधीही निष्फळ ठरत नाही. ।। 38

 

स्तुति अनुपम केली पुष्पदंतेच जी ही

सकल मुनिजनांना देवतांना रुचे ती

मिळवुन सहजी दे ती नरा  मोक्षमुक्ती

सहज उघडिते ही स्वर्ग द्वारा त्वरेनी।।38.1

स्तुति मधुर म्हणे जो जोडुनी हात कोणी

धरुन हृदि शिवासी नित्य एकाग्र चित्ती

अनुभवत स्तुति-पुष्पे थोर या किन्नरांची

शिव समिप सदाही जातसे पुण्यदेही ।।38.2

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 39

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम्।

अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम्।।39

अन्वयार्थ – इदम् पुण्यं,अनौपम्यं मनोहारि शिवम् , -  हे पवित्र, अनुपम, मनाला आनंदित करणारे, कल्याणकारक गन्धर्वभाषितं ईश्वरवर्णनम् स्तोत्रम् आसमाप्तम् – गंधर्वांने गायलेले शिवाचे स्तोत्र समाप्त झाले. ।। 39

 

आरंभापासून त्याच्या । अंतापर्यंत सर्व हे

गंधर्व पुष्पदंताचे । स्तोत्र पावन हे असे

अद्वितीय मनोहारी । हृद्य सुंदर स्तोत्र हे

विश्ववंद्य शिवाचे त्या । ज्यात वर्णन गुंफिले।।39

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 40

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः।

अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः।।40

अन्वयार्थ – इति एषा वाङ्मयी पूजा – अशी ही वाङ्मयरूपी पूजा श्रीमत् शंकर-पादयोः अर्पिता – भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. तेन देवेशः सदाशिवः मे प्रियताम् – त्या योगे देवाधिदेव शंकर माझ्यावर संतुष्ट होवोत. ।।40

 

सर्वश्रेष्ठ शिवा पायी । शब्दपुष्पांजली अशी

अर्पिली पुष्पदंताने। पूजा ही वाङ्मयी जशी

तीच आळविता मीही । देवा संतुष्ट व्हा तुम्ही

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 41

 

हे कैलासपती,

 

 

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर।

यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः।।41

अन्वयार्थ – हे महादेव! तव तत्त्वं न जानामि । -  हे महादेवा मला तुझे खरे स्वरूप ज्ञात नाही. (त्वं) कीदृशः असि -  तू कसा आहेस?  हे महादेव! यादृशः असि – देवा तू जसा आहेस  तादृशः नमो नमः । तशा तुझ्या स्वरूपाला माझा वारंवार नमस्कार असो. ।। 41

 

जाणितो ना महेशा मी । विश्वरूपास या तुझ्या

जसा आहेस त्या तैशा । रूपासी वंदितो शिवा।।41

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 42

(अनुष्टुभ् छंद -  अक्षरे -8)

 

एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।

सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते।।42

अन्वयार्थ – यः नरः एककालं, द्विकालं, त्रिकालं वा (इदं स्तोत्रं) पठेत् – जो पुरूष (दिवसातून) एकवेळा, दोनवेळा वा तीन वेळा या स्तोत्राचे पठण करील (सः) सर्व पाप विनिर्मुक्तः – तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोके महीयते – शिवलोकी ख्यातनाम होईल. ।। 42

 

एकदा दोनदा किंवा । तीनदा दिवसातुनी

स्तुति ही म्हणता कोणी । पाप जाई लया झणी

शिवलोकी सदा राही ।  पुण्यात्मा तो सदासुखी।।42

 

पुष्पदन्तकृत श्री शिवमहिम्नस्तोत्रम्

श्लोक- 43

 

 

(वृत्त  वसंततिलका, अक्षरे-14, गण  त भ ज ज ग ग, यति  पाद)

 

श्रीपुष्पदन्तमुखपङ्कजनिर्गतेन 

स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण।

कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन

सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः।।43

अन्वयार्थ – श्री पुष्पदन्त – मुखपंकज निर्गतेन – श्री पुषपदंताच्या मुखकमलातून निघालेल्या किल्मिश हरेण हरप्रियेण स्तोत्रेण कण्ठस्थेन -  पापांचा नाश करणार्‍या व शिवाला प्रिय असणार्‍या स्तोत्राला जो मुखोद्गत करील समाहितेन पठितेन- व एकाग्र चित्ताने पठण करील भूतपतिः महेशः सुप्रीणितः भवति – त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल ।।43  

 

(समाहित  लीन, एकनिष्ठ)

 

श्री पुष्पदंत करिता स्तुति शंकराची

त्याच्या प्रफुल्ल कमलासम या मुखानी

जे स्तोत्र दिव्य प्रकटे बहु पुण्यदायी

देईच ते परिमलासम मोद लोकी।।43.1

कंठस्थ त्यास करुनी म्हणताच कोणी

एकाग्र चित्त करुनी बहु नम्रतेनी

ते पाप दूर करिते , रुचते शिवासी

त्याच्यावरी पशुपती करितो कृपेसी।।43.2

------------------------------------------------------------

वृत्त पृथ्वी –

अहो शिवमहिम्न हे सकल शंभु भक्तां रुचे

 म्हणून अनुवादिले अति सुबो भाषेमधे ।

 सुविद्य रसिका, अरुंधतिप्रवी-जाया म्हणे

तुम्हा कर धरूनिया शिवपदी नेईल हे ।।


।। ॐ नमः शिवाय ।।
ॐ तत् सत्

(विजय नाम संवत्सर, मार्गशीर्ष अमावस्या 1 जानेवारी 2014 )


खाली दिलेल्या लिंक्सवर ते ते श्लोक विश्लेषणासहित उपलब्ध आहेत.


श्लोक 1-10


 श्लोक 11 ते 20 


श्लोक 21 ते 30 


श्लोक 31 ते 43 


संपूर्ण महिम्न  ( विश्लेषणाशिवाय)


संदर्भ ग्रंथ -

1.  महिम्न-स्तोत्रम् – नारायणपति शर्मा त्रिपाठी ( चौखंभा प्रकाशन)

2.  शिवस्तोत्र रत्नाकर – (गीताप्रेस, गोरखपूर)

3.  श्री महिम्न-स्तोत्र – सुरेश महाजन ( अलंकार प्रकाशन सांगली)

4.  पुष्पदन्तप्रणीतम् शिव- महिम्न-स्तोत्रम् – लक्ष्मीनारायण जोषी ( चौखंम्भा ओरियन्टालिया प्रकाशन दिल्ली)

5.  वामन शिवराम आप्टे- संस्कृत -हिंदी शब्दकोश

 

No comments:

Post a Comment