अपराधक्षमापन-दत्त-स्तोत्रम्

 

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अपराधक्षमापनदत्तस्तोत्रम् 


(वृत्त - भुजंगप्रयात)

रसज्ञावशा तारकं स्वादु लभ्यं गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 1

रसांचीच लोभी असे जीभ माझी तिला ब्रह्मरूपी रसाची गोडी

भरे ज्यात माधुर्य संसार सांडी अशा गोड नामा घे ती कधीही ।। 1.1

करीता पुरे चोचले ह्या जिभेचे । न मी घेतले रे तुझे नाम दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । दयेचा कृपामेघ ओथंबला तू  ।। 1.2

                   हे श्री दत्ता, माझ्या रसनेला रसज्ञान असल्याने ती  गोड, कडू, आंबट, खारट, तिखट, तुरट अशा रसांना इतकी लालचावलेली आहे की ह्या पदार्थांच्याच आहारी गेली आहे. अशा जिभेला संसार सागरातून जो तारून नेतो(तारकं) त्या ब्रह्मरसाची गोडी कशी लागावी?  आजपर्यंत तिने आपल्या दत्त दत्त अशा गोड नामाकडे पाठ फिरवली आहे. तिच्या मनमानी स्वभावामुळे अमृत सोडून कांजी प्यावी, चिंतामणी ठोकरून चिंताच घ्यावी, कल्पवृक्ष तोडून कुंपण करावं अशीच माझी वागणूक होती. किती किती पापे माझ्याकडून झाली आहेत. तुझ्या नावाचा आठवच न होणं ह्यासारखं महत्पाप नाही. हे परम दयाळा श्री दत्ता, तू माझे हे अपराध पोटात घाल. मला क्षमा कर असे त्रिवार मी तुला सांगतो. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे अजूनच मिटावेत तसे तुझ्या भक्तीचा प्रकाश मला योग्य मार्ग दाखवेल हे माहित असूनही  तो भक्ती प्रकाश जणु माझ्या मनाला न झेपल्याने, माझे डोळे दीपल्यामुळे  जणु उघडत नाहिएत.

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त

-----------------------------------

वियोन्यन्तरे दैवदार्ढ्याविभो प्राग्गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 2

( वियोनिःनाना जन्म. प्राक् पूर्वी, पहिल्यांदा. दार्ढ्यम- कठीण, कठोर )

 

किती जन्म हे भोगवी क्रूर दैव । पशुजन्मि घेऊ कसे नाम दत्त

प्रभो मी असे पापराशी, क्षमा तू । दयेचीच निस्यंदिनी नित्य दत्त ।। 2

            अत्यंत क्रूर अशा दुर्दैवामुळे मी जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकलो. ह्या नरजन्मापूर्वी किती पशू जन्मांमधून ह्या दैवाने मला फिरवलं असेल ह्याची गणती नाही. अशा पशुजन्मात मला तुझं कसं स्मरण होणार आणि मी तुझं नामस्मरण तरी कसं करणार? ती पात्रताच माझ्यात नव्हती. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत; हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

 

-----------------------------------

मया मातृगर्भस्थितिप्राप्तकष्टाद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 3

किती यातना सोसल्या मातृगर्भी । कसे आठवे ते तुझे नाम दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । कृपामेघ ओथंबला तूचि दत्त।।  ।। 3

             ह्या जन्मातही मातेच्या उदरात कोंडून राहिल्याने मला असंख्य यातना भोगाव्या लागत होत्या. हे कष्टप्रद जिणे सोसतांना तुमच्या नामाचा आठव तरी कसा व्हावा? माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

 -----------------------------------

 

मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 4

जसा जन्मलो गुंतलो मोहमायी । न मी घेतले रे तुझे नाम दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । दयेचा असे सागरू तू अफाट ।। 4

          मी जन्मलो; आईच्या उदरातून तर माझी सुटका झाली पण बाहेर येताच ह्या संसाराच्या मोह, मायेत अडकलो. नको त्याच गोष्टींचं अप्रूप वाटू लागलं आणि त्यात तुझं गोड नाव मुखी घ्यायचं मात्र पार पार विसरून गेलो. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

 -----------------------------------

 

मया क्रीडनासक्तचित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 5

रुची खेळण्याची मला बाल्यकाळी । मुखी ये कसे नाम ते गोड दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । दयेनेच ओथंबला मेघदत्त ।। 5

            लहानपणी खेळण्याची इतकी ओढ होती की मी खेळातच रममाण झालो. बाकी गोष्टींचेही भान मला राहिले नाही. तहान, भूक हरपून खेळता खेळता  तुझ्या नामस्मरणाचे  भान कसे रहावे? माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

 

-----------------------------------

 

मया यौवनेऽज्ञानतो भोगतोषाद्गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 6

रमे मूढ मी यौवनी देहसौख्ये । न आले मुखी हे तुझे नाम दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । क्षमासिंधु झाला मला तूचि प्राप्त  ।।6

हे प्रभो, ``कामातुराणां न भयं न लज्जा ।’’ तारुण्याच्या मदात अज्ञानाने घेरलेल्या मला भोग, देहसुख ह्या पलिकडे काही दिसलच नाही तर बाकी गोष्टींचा मी विचार तरी कसा करणार? ह्या भोगांहून तुझं नाम जास्त आनंददायी आहे हे मला लक्षातच आलं नाही. तुझ्या नामाचा विसर मला पडला; हाच माझा केवढा मोठा अपराध आहे. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

-----------------------------------

 

मया स्थाविरेऽनिघ्नसर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 7

(स्थाविरेवृद्धाकाळात. निघ्न आज्ञाकारी. अनिघ्नआज्ञा पाळणारी , ताबा राहिलेली )

नसे शक्ति ह्या इंद्रिया वृद्ध होता । कसे रे मुखी नाम यावेचि दत्त

प्रभो मी असे पापराशी क्षमा तू । दयेचा झरा रे तुझे आर्द्र-चित्त   ।। 7

             बालपणात खेळण्यात रमलो तर तारुण्यात मदाने उन्मत्त होतो. म्हातारपणी ही सारी इंद्रिये आता माझ्याच ताब्यात नाहीत. मी म्हटलं तरी ही शक्तिहीन इंद्रिय आता कुचकामी झाली आहेत. त्यांच्याकडून काय काम करवून घेणार? लटलटणारी मान आणि दंतहीन तोंड तुझं नाम कसं बर घेणार? माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत, हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा. माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

-----------------------------------

 

हृषीकेश मे वाङ्मनःकायजातं हरे ज्ञानतोऽ ज्ञानतो विश्वसाक्षिन्

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 8

कळोनीच वा ना कळोनीच झाले । शरीरा मना बोलण्यातून पाप

हृषीकेश तूची असे विश्वसाक्षी । क्षमा तू करी रे सदा आर्द्रचित्त  ।। 8

हे हृषीकेशा, जाणते अजाणतेपणी माझ्या वाणीने जे काय बरे वाईट बोलले असेल; तुझे नाम न घेण्याचा अपराध केला असेल; माझ्या मनात नको नको त्या विचारांनी थैमान घालून माझे मन गढूळले असेल, दुसर्यांचे अहित चिंतले असेल; माझ्या ह्या शरीरानी कळत न कळत अनेक नको ती कृत्ये केली असतील. आपण विश्वात जे जे काय घडत आहे त्याचे साक्षी आहात. विश्वसाक्षी आहात. त्यामुळे माझे अपराध तुमच्यापासून कसे लपून राहतील? माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा.

-----------------------------------

 

स्मृतो ध्यात आवाहितोऽस्यर्चितो वा गीतः स्तुतो वंदितो वा जप्तः

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 9

तुला आठवीले न मी ध्यान केले । दिली आहुती ना तुला पूजियेले

स्तुती स्तोत्र गाऊन ना वंदिले मी । तुझे नाम ना घेतले मी कधिही

प्रभो पापराशी असे मी; क्षमा तू । क्षमा तू करी मीच उद्विग्नचित्त

क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं   क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त 9

प्रभो, ना मला तुझे स्मरण झाले, ना मी एकाग्र चित्ताने ध्यान लावून तुझी रमणीय मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणली. ना तुझे आवाहन केले (बोलावले) ना तुझे अभंग वा स्तोत्रे गायली ना तुझ्या नामाचा जप केला. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा.

              माझं मन अत्यंत उद्विग्न झालं आहे.  तीव्र प्रकाशाची तिरीप डोळ्यावर येताच डोळे मिटावेत तसे प्रकाश असूनही माझे डोळे उघडत नाहिएत.

-----------------------------------

दयाब्धिर्भवाङ्न सागाश्च मादृग्भवत्याप्तमंतोर्भवान्मे शरण्यः

यथालम्बनं भूर्हि भूनिःसृतांघ्रेरिति प्रार्थितं दत्तशिष्येण सारम् 10

पडे त्यास आधार ती एक भूमी । अभक्तास आधार तैसा तुझाची

असे पर्वताकार पापेच माझी । तुझ्यावीण आधार ना पातक्यासी ।। 10.1

दयेचा असे सागरू तूच दत्त तुझ्या पायि आलो असे तूचि आप्त

हृदीचे असे गूज माझ्याचि सत्य  । तुला प्रार्थना रक्षिणे तूचि दत्त ।। 10.2

             हे परमदयाळा, आपण कृपेचा न रिता होणारा सागर आहात तर मी पापांचा पर्वत. घसरून पडणार्या माणसाला जसा आधार तो काय एका भूमीचाच असतो त्याप्रमाणे मला तुझ्याविना दुसरा आधार नाही. अरे ह्या पातक्याला कोण जवळ करणार? आपणच माझ्यावर कृपेची बरसात करा. माझं जे काय मनोगत होतं ते थोडसुद्धा न लपवा-छपवी करता मी आपल्याला सांगितलं आहे. माझ्या सर्व पापांची आपल्यासमोर कबुलीही दिली आहे. माझ्याकडून जे जे अपराध झाले आहेत हे दत्तात्रेया ते आपण पोटात घाला. मला क्षमा करा. त्रिवार विनवितो हे दत्ता मला क्षमा करा.  

अरुंधती प्रीय प्रवीणजाया । करे मराठी अनुवाद सोपा ।

कळेल जोची सहजीच सर्वां । म्हणा सुखे ह्या समवृत्त स्तोत्रा ।।

-----------------------------------



इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम् ।।

असे श्री प. प. श्री. वासुदेवानन्द सरस्वती विरचित अपराधक्षमापनस्तोत्र पूर्ण झाले ।।


No comments:

Post a Comment