एकश्लोकी



         एकदा एक शिष्य श्री आद्य शंकराचार्यांकडे आला. त्याला आत्मज्ञानाचा काही उपदेश आचार्यांनी करावा अशी त्याची मनीषा होती. त्या दोघांमधील हा संवाद एका श्लोकात आचार्यांनी शब्दबद्ध केला  आहे. आचार्यांच्या उत्तराने संतुष्ट झालेला तो शिष्य आचार्यांना गुरू मानून त्यांच्या चरणी शरण आला. 

         
(वृत्त शार्दूल विक्रीडित, अक्षरे- 19, गण- म स ज स त त ग, यति- 12,7 )

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो।।

आचार्यांस करून वंदन पुसे जिज्ञासु अत्यादरे
आत्मज्ञान कळेल का मज कधी आहे अती सूक्ष्म जे
तेंव्हा जो घडला अलौकिक असा संवाद त्यांच्यामधे
अज्ञाना हरुनीच ज्ञान  दिधले श्लोकात एका असे - -

‘वत्सा सांग मला प्रकाश  कुठला दावी तुला विश्व हे’
जिज्ञासू म्हणतो ‘रवीच मजला दावी पुरे विश्व हे
अंधारातची दीप ये मदतिसी वा शुभ्र हे चांदणे
विश्वाला सगळ्याच पाहु शकतो त्यांच्या प्रकाशामधे’।।1

त्यावेळी म्हणती ‘बरेचि असुदे’ आचार्य प्रेमे तया
‘आता सांग मला, दिवाकर कळे कैसा तुला चंद्रमा ’
‘माझे चक्षुच दाविती मज शशी वा सूर्य वा विश्वही’
तेंव्हा प्रश्न विचारती पुनरपी आचार्य त्या एकची।।2

‘डोळे तू मिटले तरी तुजसि का हे ज्ञान ना होतसे’
तेंव्हा शिष्य वदे ‘मला घडतसे हे ज्ञान बुद्धीमुळे’
‘लागे साधन कोणतेचि कळण्या बुद्धी तुला सांग रे’
बोले शिष्य ‘मलाचि बुद्धि कळते आचार्य माझ्यामुळे’।।3

तेंव्हा मंद हसून ‘छान’! वदती आचार्य त्यासी असे
‘प्रश्नाचे तव तूचि उत्तर दिले शिष्योत्तमा योग्य ते
होण्या ज्ञान यथार्थ तूच असशी ज्योतीच ती निश्चिती
विश्वाचे घडण्यास आकलन ते दावी प्रकाशास जी’।।4

‘आले हो मजसी कळून मजला ते ज्ञान ते सत्यही
तो चिद्रूप प्रकाश मीच कळले बोलेच तो शिष्यही
साक्षी मीच प्रकाशरूप उरलो आत्माच मी निश्चिती
आलो पूर्णपणेच मी शरण हो आचार्य या पाउली’।।5

-------------------------------------------

23 मार्च, 2014


No comments:

Post a Comment