।। कनकधारास्तोत्रम् ।।

   श्री
Image result for images of lakshmi devi
                
                 हे स्तोत्र खूपच सुंदर आहे. साहित्याचा एक अनमोल खजिना आहे. विष्णु आणि लक्ष्मी यांचे शाब्दिक वर्णन डोळ्यासमोर खरोखरच एक चलत् चित्र साकार करते. लक्ष्मी आणि विष्णुची नजरा नजर होताच विष्णूची तमालपत्राच्या रंगासारखी  काया रोमांचित होते. तमालचा अर्थच घननीळ, सावळा. तमालपत्र आपण पाहिलं असेल पण तमालपत्राचं झाड म्हणजेच दालचिनीचं झाड किमान नेटवर तरी पहायला विसरू नका.  दालचिनीचं छोट्या छोट्या निळ्या कळ्यांनी बहरून आलेलं झाड आणि रोमांचित झालेला विष्णू यांचं साम्य दाखविणार्‍या श्री आद्य शंकराचायार्यांना लाख लाख प्रणाम! 
              इंदीवर म्हणजे नीलकमल. नीलकमलाचं उमलणं जो पर्यंत आपण बघत नाही तो पर्यंत रमेचे अर्धोन्मिलीत नेत्र समजणं  अवघड 
              बकुळीचा फुलांनी फुललेला घनदाट वृक्ष आणि त्याच्यावर सतत ये जा करणारे भुंगे पाहून आचार्यांना कमलेच्या नजरेची आठवण होते. कमलेची नजर विष्णूवर जाते. लज्जेमुळे ती खाली वळते. पण विष्णुमुख बघण्याच्या आंतरीक ओढीने परत परत ती विष्णुमुखावर स्थिरावत आहे. बकुळीच्या फुलांवर परत परत फिरणार्‍या भुंग्यांसारखी. स्तोत्रांच्या माध्यमातून आपल्याला निसर्गाकडे नेणार्‍या ह्या महान विभूतींना प्रणाम. निसर्गाच्या दर्शनाने माणसाच्या मनाला जेवढी श्रीमंती येईल तेवढी क्वचितच कशाने येईल.
Image result for free download images of adi shankaracharya

  श्री

कनकधारास्तोत्रम् 

(वृत्त वसन्ततिलका, अक्षरे 14, गण - त भ ज ज ग ग )

अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती

भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।

अङ्गीकृताखिल-विभूतिरपाङ्ग-लीला

माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गल-देवतायाः।।1

( पुलक – रोमांच. मुकुल – कळी. विभूति – महिमा, दौलत, प्राचुर्य )

 

जेथे कृपा-नजर थोर पडे रमेची

कल्याण भाग्य सुख चालत तेथ येई

प्रेमार्द्र दृष्टी अति मोहक ती रमेची

घेईच आश्रय हरी-तनुचा सदाही ।।

 

जैसा ‘तमाल’ बहरे मधुमास स्पर्शे

 सर्वांग नील कलिकामय होय त्याचे

तैसी मुकुंदतनु श्यामल कोमला ही

लक्ष्मी-कटाक्ष पडता पुलकीत होई।।

 

व्हावी अलंकृत जशी तनु दागिन्यांनी

रोमांच भूषवि तसे हरिच्या तनूसी

देई अपार सुख श्रीहरिसीच ऐसे

मांगल्य एकवटले नजरेत माते

 

ये जा करे भ्रमर, वृक्ष फुलोनी येता

दृष्टी तशीच सुखवी हरीच्या तनूला

तू देवता सुखकरी बहु मंगला गे

ऐश्वर्य एकवटले तव दृष्टिमध्ये

 

दृष्टी अशी सुखमयी तव मंगला ही

कल्याण ती मम करो कमले सदा ही

 

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः

प्रेम-त्रपा-प्रणिहितानि गतागतानि।

मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या

सा मे श्रियं दिशतु सागर-सम्भवायाः।।2

( सागरसम्भवा – समुद्रातून निर्माण झालेली अर्थात लक्ष्मी.  मुहुः – वारंवार. प्रणिहित – एकाग्रचित्त येथे दृष्टी एकाजागेवर म्हणजे हरीच्या मुखावर स्थिर होणे

  

जैसी सहस्रदल-पद्म-सुधाचि घ्याया

 ये जा करी लगबगे भ्रमरावली गा

मुग्धा तशीच तव रम्य कटाक्षमाला

 चंद्रासमान हरिसी निरखे झुके वा।।2.1

 

प्रेमे सलज्ज झुकती तव लोचने ही

 जाती पुन्हा परतुनी हरि आश्रयासी

लज्जा न दे निरखु विष्णुमुखा तरीही

 औत्सुक्य हे हृदयिचे प्रकटेच नेत्री ।।2.2

 

दृष्टीस ना मिळतसे स्थिरता जराही

 धावे निरंतर हरी मुख पाहण्यासी

ऐसीच दृष्टि तव मंगलकारि माते

समृद्धि देइ मजसी नित सिंधुकन्ये।।2.3

 

विश्वामरेन्द्र-पद-विभ्रम-दान-दक्ष-

मानन्द-हेतुरधिकं मुरविद्विषोऽपि

ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-

मिन्दीवरोदर-सहोदरमिन्दिरायाः ।। 3 ।।

 

जैसीच अस्फुट कळी अति कोमलाही

 इंदीवराचि  उमले मृदु नीलवर्णी

राजीवलोचन तसे कमले तुझेची

 अर्धोन्मिलीत करुणारसपूर्ण स्नेही  ।। 3.1

 

इंद्रासि इंद्रपद  जी मिळवून देई

 ऐश्वर्य सर्व जगतातिल जेथ राही ।

दृष्टी दयार्द्र अति कोमल इंदिरा ही

 देण्यास तत्पर असे सुख तेच लोकी।।3.2

 

विश्वा प्रफुल्लित करी तव स्निग्ध दृष्टी

 आनंद कंद हरिसी सुखवी विशेषी

ओथंबली नजर प्रेमभरे तुझी ही

 माझ्यावरीच पडु दे क्षण एक लक्ष्मी।।3.3

 

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द-

मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् ।

आकेकर-स्थित-कनीनिक-पक्ष्म-नेत्रं

भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः।। 4

(आकेकरा – अर्धोन्मीलित दृष्टी.  कनीनिक डोळ्यांच्या बाहुल्या, पुतळ्या. पक्ष्म – पापण्या. भुजंगशय – श्रीविष्णु.

अंगना – पत्नी. अनङ्गतंत्र – श्रीहरीविषयी मनात उत्पन्न झालेल्या कामदेवाच्या  आधीन झाली)


निद्रिस्त शेष वलयांवरि ‘शेषशायी’

 जाणून तू निरखिसी अनिमेष नेत्री

लावण्यमूर्ति हरि पाहुनि लुब्ध झाली

 दृष्टी सखी मदनबाधित धुंद झाली॥

 

प्रेमास ये भरति पाहुनि ‘पूर्णरूपा’

आधीन हे हृदय गे मदनास होता

अर्धोन्मिलीत तव  नेत्रदले हलेना

 होतीच स्थीर पुतळ्या नयनी तुझ्या या॥

 

प्रेमार्द्र दृष्टि कमले तव कोमला ही

देवोचि गे सफलता मजसी सदाही।।4

 

बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या

हारावलीव हरि-नील-मयी विभाति।

कामप्रदा भगवतोपिकटाक्षमाला

कल्याणमावहतु मे कमलालयायाः।।5

(बाह्वन्तरे दोन्ही बाहूंच्या मधील जागा/छातीवर. द्युति - प्रकाश)

दोन्ही भुजा करिति सीमित ज्या प्रभेसी

 त्या कौस्तुभाचि पसरे द्युति वक्षभागी

माला सुरेख नजरेचिच गुंफिली जी

 शोभे मुकुंदहृदयी कमले तुझी ही॥

 

दृष्टि तुझी मधुकरासम नीलवर्णी

 झाली स्थिराचि मधुसूदन वक्षभागी

दृष्टिप्रभा भिजवि मौक्तिकमाळ वक्षी

 नीलार्द्र नील कमलासम नील झाली॥

 

‘दृष्टी-सुधा-सुमन-माळ’ चि पद्मजा गे

 साफल्य देउनि कृतार्थ  करी सदा  गे।।5

 

कालाम्बुदालि-ललितोरसि कैटभारे-

र्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव

मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति-

र्भद्राणि मे दिशतु भार्गव-नन्दनायाः।।6

 

ओथंबली जलद पंक्ति जशी जलाने

सौदामिनी झगमगे तयि शुभ्र तेजे

तैसीच शोभत असे हरि-वक्षस्थानी

मूर्ती तुझी शुभमयी नित भार्गवी ही ।।6.1

 

आहे विशुद्ध तव कीर्ति च उज्ज्वला ही

 विष्णुप्रिये जननि भार्गवनंदिनी  ही

देई विवेक मजला; पथ योग्य दावी

 माते सदा मजसि गे जगदंब तूची।।6.2

 

प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावा-

न्माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन।

मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं

मन्दालसं च मकरालय- कन्यकायाः।।7

( मन्मथ – मदन.  मंथर गहन, शिथिल, मंद.  प्रथमत- पहिला, प्रमुख, मुख्य. पदं - स्थान)

हा कामदेव तुझिया करुणा कटाक्षे

  प्रद्युम्न रूप धरुनी हरिरूपि राहे

संतान ज्येष्ठ बनुनी हरिचाच होई

 दृष्टिप्रभाव इतुका तव देवि लक्ष्मी।।7.1

 

मांगल्यदायि मधुसूदन माधवाची

  प्राप्तीच दे करुनिया तव दृष्टि लोकी

वाटेचि जे जलचरा गृह रम्य त्यांचे

 कन्याच त्या जलधिची कमलेच तू गे।।7.2

 

माझ्या वरी बरसु दे तव भाग्यदायी

 अर्धस्फुटा, गहन, सौम्य, सुशांत  दृष्टी ।।7.3

 

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधारा-

मस्मिन्नकिञ्चनविहंगशिशौ विषण्णे।

दुष्कर्म-धर्ममपनीय चिराय दूरं

नारायण-प्रणयिनी-नयनाम्बुवाहः।।8

( द्रविणम् – धनदौलत. अम्बु – पाणी. अम्बुवाह- मेघ. अकिंचन- दरिद्री. )

व्याकूळ मी बहु असे पिलु चातकाचे

 ‘दुष्कर्म -ग्रीष्म’-चटके बसती मला गे

दुःखी असे बहु मनी अति मी दरिद्री

 सम्पृक्त ‘नीलघन’ हा तुझियाच नेत्री ।।8.1

 

माते दयार्द्र तव चित्त स्वरूप वारा

देई सुयोग्यचि दिशा तव दृष्टिमेघा

दारिद्र्य पोळत असेचि जिथे जनांना

नेई तिथे तव कृपा-जलदांस सार्‍या ।।8.2

 

दृष्टीत ज्या तव असे ममता कृपा गा

 वर्षाव ती मजवरी करु दे धनाचा

दुष्कर्म ताप अवघा हरुनीच माझा

 विष्णुप्रिये मजवरी करुणा करी गा ।।8.3

 

इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-

दृष्ट्या त्रिविष्टप-पदं सुलभं लभन्ते।

दृष्टि: प्रहृष्ट-कमलोदर-दीप्तिरिष्टां

पुष्टिं कृषीष्ट मम पुष्कर-विष्टरायाः ।।9

 

उत्फुल्ल पद्मदल कोमल कोश ऐसी

 तेजस्विनी नजर गे तव पद्मजा ही

येता तुला शरण भक्तचि तुच्छ कोणी

 सामान्य बुद्धि असु दे नर तोच कोणी।।9.1

 

 स्वर्गात स्थान सहजी मिळवून देई

 पद्मासना तवचि ही कनवाळु दृष्टी

माझे अभीष्ट पुरवी दृढ ते करी ही

माते कृपा नजर थोरचि भाग्यदायी।।9.2

 

गीदेर्वतेति गरुडध्वज-सुन्दरीति

शाकम्भरीति शशिशेखर-वल्लभेति।

सृष्टि-िस्थति-प्रलय-केलिषु संस्थितायै

तस्यै नमस्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै।।10

 

रूपे तुझीच कमले असती अनेक

 वाग्देवता अखिल ‘अक्षर-ब्रह्म’ सत्य

अर्धांगिनीच गरुडध्वज विष्णुची ही

 शाकंभरी विपुल धान्य -समृद्धिदात्री।।10.1

 

चंद्रानना प्रियतमा शशिशेखराची

 सृष्टि-स्थिति-प्रलय हे सहजीच खेळी

त्रैलोक्यस्वामि गुरुराज असे जगाचा

 त्या विष्णुचीच ललना; नमितो तुला गा।।10.2

 

श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्म-फल-प्रसूत्यै

रत्यै नमोऽस्तु रमणीय-गुणार्णवायै।

शक्त्यै नमोऽस्तु शतपत्र-निकेतनायै

पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तम-वल्लभायै।।11

 

वेदस्वरूप ‘श्रुति’ तू तुज वंदितो गे

 देसीच पुण्यफल तू जगि सुकृताचे

आनंदसिंधु ‘रति’ तू ; नमितो तुला गे

 आहे मनोरम चि सद्गुण सागरू गे।।11.1

 

‘शक्ती’ च तू अखिल या जगतातली गे

 आहे निवास कमले कमलामधे गे

सम्पन्नता, प्रगति, या जगताचि ‘पुष्टी’

 आहेस तूच पुरुषोत्तम प्राण तू गे।।11.2

 

 (वृत्त उपेंद्रवज्रा, अक्षरे-11, गण - ज त ज ग ग  )               


नमोऽस्तु नालीक-निभाननायै

नमोऽस्तु दुग्धोदधि-जन्मभूम्यै।

नमोऽस्तु सोमामृत-सोदरायै

नमोऽस्तु नारायण-वल्लभायै।।12

               

( नालीक - कमळ. निभ - सदृश, समान, अनुरूप (फक्त समासाच्या शेवटी))

देठावरी नाजुक पद्म डोले

आरक्त उत्फुल्ल प्रसन्न जैसे

तैसेच शोभे मुख हे रमेचे

मानेवरी नाजुक पद्म जैसे ।। 12.1

 

देई जला पद्म अपूर्व शोभा

तैसी रमा ही खुलवी जगाला

ऐश्वर्यसम्पन्न अशा रमेला

असो नमस्कार पुन्हा पुन्हा हा ।। 12.2

 

दही दुधाची बहु रेलचेल

जिथे असे क्षीरसमुद्र थोर

ऐश्वर्यसम्पन्न धरा अशी ही

असे रमेची निज जन्मभूमी ।। 12.3

 

नारायणासी सुखवी विशेषी

हरिप्रिया आवडते हरीसी

समृद्ध ऐशा कमलेस माझा

असो नमस्कार पुन्हा पुन्हा हा ।। 12.4

 

आह्लाददायी सुखवी जगाला

देईच वा जे अमरत्व लोका

ते चंद्रमा अमृत हेचि दोघे

उत्पन्न सिंधूमधुनी जहाले ।। 12.5

 

लक्ष्मी असे सागर कन्यका ही

म्हणून त्यांची भगिनी असेची

जगी तिघांचे उपकार भारी

लक्ष्मीस ऐशा नमितो पुन्हा मी ।। 12.6

 

प्रणाम माझा कमलानना गे

प्रणाम हा सागरकन्यके गे

सुधांशु भाऊ भगिनी सुधा गे

 प्रणाम नारायण प्राण तू गे।। 12.7

 

संपत्कराणि सकलेन्द्रिय-नन्दनानि

साम्राज्य-दान-विभवानि सरोरुहाक्षि

त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि

मामेव मातरनिशं कलयन्तु माऽन्ये।।13

 

माते तुझ्याच चरणी झुकु देत माथा

लागोच छंद मजला तव भक्तिचा गा

लक्ष्मी करी नमन जो तव पादपद्मी

अप्राप्य त्यासचि नसे जगतीच काही ।। 13.1

 

आराधना; कमल-सुंदर-लोचना गे

 भावे अनन्य करिता तव शुद्ध भावे

साम्राज्य वैभव मिळे न उणेच काही

 ऐश्वर्य पूर्ण नित जे सुखवीच गात्री।।13.2

 

ज्याच्या हृदी उगवतो नित ज्ञानसूर्य

घेईल आश्रय कसा तम तो तिथेच

माते तुला नमन जो करितोच नित्य

त्याला विवेक पथ स्पष्ट दिसे पुढ्यात।। 13.3

 

जी वंदना वितळवी मम पापराशी

 अज्ञान दूर करिते तव अर्चना जी।

लाभो मलाच जननी नच अन्य काही

 लाभो मला दृढतमाच  अनन्य भक्ती।।13.4

 

 (वृत्त – उपेंद्रवज्रा- अक्षरे 11, गण- ज त ज ग ग)

नमोऽस्तु हेमांबुजपीठिकायै

नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै।

नमोऽस्तु देवादिदयापरायै

 नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै।।14

 

सुवर्ण पद्मी स्थित पद्मजा जी

 प्रणाम माझा कमले तुलाची

 असेच भूमंडल नायिका जी

 प्रणाम माझा गिरिजे तुलाची।।14.1

 

दयार्द्र जी देवगणांवरी ही

 प्रणाम देवी नतमस्तका मी

धनुष्यधारी हरिचीच पत्नी

 प्रणाम माझा हरिवल्लभेसी ।।14.2

 

नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै

 नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै

नमोऽस्तु लष्म्यै कमलालयायै

नमोऽस्तु दामोदरवल्लभायै।।15

 

प्रणाम माझा भृगुकन्यके हे

 मुकुंद चित्ती नित तूच आहे

निवास पद्मात करीसि तू गे।

प्रणाम दामोदर कामिनी गे।।15

 

नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै

नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै

नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै

नमोऽस्तु  नन्दात्मजवल्लभायै।।16

मनोहरा तू कमनीय लक्ष्मी

 सुवर्णकांती नित सौख्यमूर्ती

 सुलोचना गे  कमलासमा ची

सुनेत्र आकर्ण तुझेच लक्ष्मी।।16.1

 

तू भाग्यदात्री प्रसवी जगाला

 प्रणाम माझा चरणी तुझीया

यशोमती आणिक नंद यांच्या

 प्रियात्मजाची प्रिय कामिनी गा।।16.2

 

तुझी प्रशंसा सुरवृंद गाई।

 प्रणाम माझा तुजला ‘हरिश्री’।।16.3

 

 (वृत्त  - वसंततिलका, अक्षरे-14, गण - त भ ज ज ग ग )

दिग्घस्तिभिः कनककुम्भ-मुखावसृष्ट-

स्वर्वाहिनी-विमल-चारु-जल-प्लुताङ्गीम्।

मातर्नमामि जगतां जननीमशेष-

लोकाधिनाथ-गृहिणीममृताब्धि-पुत्रीम्।।17

 

चारी दिशात सजले गज स्वागतासी

 गंगा सलीलयुत हेमघटा धरोनी

वर्षाव ते तुजवरी करिती जलाचा

 आहे अती विमल जे सुखवी तनूला॥17.1

 

तू चिंब गे सुखद त्या जल-वृष्टीने ची

 पुत्रीच त्या जलधिची सुखसागराची

आहेत थोर उपकार तुझेच आई

विश्वावरी सकल या गणती न त्यासी।।17.2

 

सत्ता अबाधित जयाचिच तीन लोकी

त्या लोकनाथ हरिची असशीच पत्नी

प्राणप्रियाच हरिची जननी जगाची 

माते करी नमन मी तव पादपद्मी ।।17.3

 

(विषम वृत्त )

सरसिज-निलये सरोज-हस्ते

धवलतमांशुंक-गन्ध-माल्य-शोभे

भगवति हरिवल्लभे मनोज्ञे

त्रिभुवन-भूति-करि प्रसीद मह्यम्।।18

 

कमल सदन हे, तुझे प्रसन्न

 करि कमल धरी, सदा प्रफुल्ल

तलम धवल हे, तुझेचि वस्त्र

 धवल सुमन हार,  भाळि गंध।।18.1

 

अमल हरि हृदी, निवास नित्य

 भगवति कमले, तुझाचि रम्य

त्रिभुवन फुलवी, करी सुरम्य

 मजवरि करुणा असोचि लक्ष।।18.2

(वृत्त - रथोद्धता, अक्षरे-11 , गण- र न र ल ग , रान्नराविहरथोद्धता लगौ)

यत्कटाक्ष-समुपासना-विधिः

सेवकस्य सकलार्थ-सम्पदः।

संतनोति वचनाङ्ग-मानसैः

त्वां मुरारि-हृदयेश्वरीं भजे।।19

 

लाभण्या तव कृपाकटाक्ष ची

 अर्चना तव अनन्य जो करी

भाग्य थोर मिळते तया जगी

 काय ना करि उपासना तुझी।।19.1


माय गे स्तुति तुझीच मी करे

 सर्वथा मन शरीर बुद्धिने

तू मुकुंद हृदयी विराजते

 मी तुला शरण गे हरिप्रिये ।।19.2

 

कमले कमलाक्ष-वल्लभे त्वं

करुणा-पूर-तरङ्गितैरपाङ्गैः।

अवलोकय मामकिञ्चनानां

प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः।।20

 

प्राणप्रिया च कमले कमलेक्षणाची

 माझ्यावरी बरसु दे तव स्निग्ध दृष्टी ।

येवोच चित्ति तुझिया करुणेस पूर

 त्याचे तरंग नयनी तुझिया दिसोत ।।20.1

 

पाहूनि गे मजसमा अति दीन वत्स

 हेलावुनी नजर ही तव जाऊ देत

आहे अकिंचन अती बहु मी अभागी

 निर्व्याज या तव कृपेसचि पात्र लक्ष्मी।।20.2

 

( वृत्त- अतिरुचिरा- चतुर्ग्रहैरतिरुचिराजभस्जगाः, अक्षरे 13, गण - ज भ स ज ग )

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं

त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।

गुणाधिका गुरुतर-भाग्य-भाजिनो

भवन्ति ते भुवि बुध-भाविताशयाः।।21

 

रमा च जी त्रिभुवन माय मूर्त गे

 असेचि वेद सकल रूप हे जिचे

सश्रद्ध पूजन कुणि जो करी तिचे

 स्तुती करी प्रतिदिन गात स्तोत्र हे ॥21.1

 

 मनात आस प्रखर चि सद्गुणांचि गे

 तयासि इच्छित फल हे मिळे सुखे

तया पुढे गुण नतमस्तकी उभे

 तयासि भाग्य परमश्रेष्ठ लाभते ।।21.2

-----------------

29 जानेवारी 2011 पौष षट्तिला एकादशी


1 comment:

  1. खूप सुंदर काव्यानुवाद.....!

    ReplyDelete