तस्मात् जाग्रत जाग्रत ।

तस्मात् जाग्रत जाग्रत ।

 

कुणी एक रक्षक नगराच्या गल्लीबोळातून रात्रीच्यावेळी राखण करण्यासाठी हिंडत असताना “सावधान जागे रहा ! ” असं ओरडत व मार्गातील भूमीवर आपल्या हातातील दंड आपटत चालत असे.

एका रात्री काही कामानिमित्त त्याला परगावी जायचं होतं म्हणून त्याच्या मुलानं ते काम हाती घेतलं. त्या मुलाला देववशात् आपल्या पूर्वजन्मातील काही स्मृतिज्ञान असल्याने तो मार्गाने जाताना खालील श्लोक मोठ्या आवाजात म्हणत जाऊ लागला. त्यात वारंवार ‘‘जागे रहा---सावध व्हा! ’’ असे शब्द येत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळीच तेथील राजा राखणदाराची वाट पहात असलेला पाहून राखणदार अस्वस्थ झाला. आपल्या मुलाने काहीतरी कुचराई केलेली असणार आणि त्याचं फळ पुर्‍या परिवाराला भोगायला लागणार, राजाच्या महा क्रोधाला सामोरं जावं लागणार ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला. थरथर कापू लागला.

पण तसं तर घडलं नाहीच उलट त्या राजाने बहुमू्ल्य भेटवस्तू देऊन त्याच्या परिवाराला सन्मानित तर केलचं अजून वर राजाने त्याच्या मुलाची प्रशंसा करून त्याची मोठ्या वेतनावर राजप्रासादाच्या रक्षणार्थ नेमणूकही केली.

त्या मुलाने म्हटलेले ते श्लोक खाली देत आहे.  हे श्लोक अतिशय अर्थपूर्ण व जीवनविषयक बहुमोल मार्गदर्शन करणारे आहेत. हे स्तोत्र श्री आद्य शंकराचार्यांचे आहे असेही काहींचे सांगणे आहे

तस्मात् जाग्रत जाग्रत ।


माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धुः सहोदरः ।

अर्थो नास्ति गृहं नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 1 ।।

नसे आई नसे बाबा । भाऊ सख्खा न गोत्रज

नसे पैसा नसे धाम । होई सावध सावध ।। 1 ।।

 

जन्मदुःखं जरादुःखं जायादुःखं पुनःपुनः ।

संसारसागरे दुःखं तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 2 ।।

दुःखदायी असे जन्म । रोग व्याधीच दुःसह

पत्नी, संसारदुःखे ही । राही जागृत जागृत ।। 2 ।।

 

कामः क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठति तस्कराः ।

ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 3 ।।

षड्रिपू कामक्रोधादि । देहात लपले ठग ।

ज्ञान रत्नचि चोराया । होई सावध सावध ।। 3 ।।

 

आशया बद्ध्यते जन्तुः कर्मणा बहु चिन्तया ।

आयुः क्षीणं न जानाति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 4 ।।

आशा कर्तव्य चिंतेच्या । पाशात गुंतती जन

सरे आयुष्य वेगाने । होई सावध सावध ।। 4 ।।

 

सम्पदः स्वप्नसंकाशा यौवनं कुसुमोपमम् ।

विद्युच्चञ्चलमायुष्यं तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 5 ।।

सम्पत्ती स्वप्नवत् सारी । कुसुमासम यौवन

दामिनीसम आयुष्य । राही जागृत जागृत ।। 5 ।।

 

क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं जीवितमावयोः

यमस्य करुणा नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत ।। 6 ।।

निमिषार्ध टिके ना हे । वित्त चित्त नि जीवित

यमा ठावे न कारुण्य । होई जागृत सावध ।। 6 ।।

 

यावत् कालं भवेत् कर्म तावत् तिष्ठन्ति जन्तवः ।

तस्मिन् क्षीणे विनश्यन्ति तत्र का परिदेवना? ।। 7 ।।

काळ अपेक्षितो कर्म । जीव राहेच तोवर

संपता वेळ ये मृत्यू । तरी खेद कशास्तव? ।। 7 ।।

------------------------------------------

क्रौधी नाम संवत्सरे अश्विन शु. पञ्चमी,  8 ऑक्टोबर 2024

 



घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्

 

घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्


(वृत्त – शालिनी. अक्षरे 11; यति 4,7; गण- म त त ग ग)


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |
श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||

श्रीपाद श्रीवल्लभा दत्तराया

आम्हासी तू रक्षिणे नित्य दत्ता

भक्तांचे तू हारिसी दुःख क्लेश

ऐसी कीर्ती भूषवी रे तुलाच || १.१ ||

 

देवा पाही भाव हा शुद्ध माझा

आलो आलो आश्रया देवराया

ठेवी माथा पादपद्मी तुझ्या मी

कष्टातूनी घोर ह्या तूच तारी || १.२  ||

 

त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वं |
त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् |
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||

आहे माझी माय तू तात दत्ता

आहे तूची आप्त विश्वस्त माझा

सारे सारे तूचि सर्वस्व आता

कल्याणाची वाहसी नित्य चिंता || २.१ ||

 

तूची स्वामी विश्व हे सर्व तूची

माथा ठेवी मी तुझ्या पादपद्मी

संसाराचा सिंधु हा खोल भारी

कष्टातूनी घोर ह्या तूच तारी || २.२ ||

 

 

पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं |
भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् |
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||

 

( जूर्तिः – ताप, बुखार. हे ईश अस्तजूर्ते – हे आधि,व्याधि, ताप, शारिरीक व्याधी दूर करणार्‍या देवा  आशु – वेगाने, त्वरित,  )

 

आधी व्याधी पाप तापादि दुःखे

भीती शंका कष्ट दारिद्र्य सारे

सार्‍यातूनी मुक्तता दे त्वरेने

क्लेशातूनी उद्धरी दत्तमूर्ते || ३.१  ||

 

 

आलो दत्ता आश्रयाला तुझ्या मी

माथा ठेवीतो तुझ्या पादपद्मी

संसाराचा सिंधु हा खोल भारी

कष्टांसी ह्या घोर तूची निवारी || ३.२ ||

 

 

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |
त्वत्तो देवं त्वं शरण्योऽकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||

 

नाही त्राता रे तुझ्यावीण कोणी

नाही दाता रे तुझ्या तोडिचाची

नाही भर्ता पोषि जो प्रेमभावे

येता पायी रक्षि जो भक्त प्रेमे || ४.१ ||

 

दत्ता तूची एकमेवाद्वितीया

भक्तांची तू ना करीसी उपेक्षा

लाभो दत्ता सत्कृपा; वंदितो मी

कष्टातूनी घोर ह्या तूच तारी || ४.२ ||

 

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं ।
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥

 

प्रीती राहो रे अनन्या स्वधर्मी

राहो चित्ती सन्मती देवभक्ती

भुक्ती, मुक्ती सज्जनांचीच मैत्री

राहो प्रीती दत्त-पादाम्बुजाची ॥ ५.१॥

 

झालो मी रे नम्र, आनंदमूर्ती!

देई दत्ता हात ह्या पामरासी

संसाराच्या काढ खाईतुनीही

कष्टातूनी घोर ह्या तूच तारी ॥ ५.२॥

 

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥

 

स्तोत्र कल्याणकारी हे । पाच श्लोकात मांडले

म्हणे जो नित्य भक्तीने । दत्तासी तोचि आवडे ।।

 

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्रं संपूर्णम् ।

असे श्री वासुदेवानंदसरस्वतीस्वामी यांनी रचलेले श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्र पूर्ण झाले.
।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।

--------------------------------------

@अरुंधतीप्रवीणदीक्षित-

भाद्रपद शुद्ध द्वितीया , 5 सप्टेंबर  2024