आदित्यहृदयस्तोत्रम् विश्लेषण-

 


                आदित्यहृदयस्तोत्रम् विश्लेषण-

युद्धात शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या पक्षाचा विजय होईल हे सांगता येत नाही. कुठल्याही पक्षाचा विजय संदिग्धच असतो. निश्चित नसतो. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्या क्षणी पारडे कसे फिरेल, कुठे झुकेल हे सांगता येत नाही.

लंका अभेद्य आहे हा रावणाचा विश्वास होता. लंकेची रचनाही तशीच भरभक्कम होती. लंकानगरी अनेक यंत्रांनी, अस्त्र शस्त्रांनी सुसज्ज होती. शिवाय रावणाकडे एकसे एक खंदे अजेय वीर होते. मिळालेल्या अनेक वरांमुळे हे वीर जणु काही अमरच होते. रावणही अनेक वरांमुळे जणु काही अवध्य झाला होता. त्याला देवांकडून वा दैत्यांकडून मरण येणार नाही असा वर त्याने मिळवला होता. कितीही पराक्रमी माणसं त्याच्या पराक्रमापुढे त्याला कस्पटासमान वाटत होती.

ज्याप्रमाणे जमिनीवर असणार्‍या मगरीपेक्षा पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीची ताकद दसपटीने वाढते त्याप्रमाणे स्वतःच्या बालेकिल्ल्यात ज्याचा त्याचा जोर प्रचंड असतो. तो आपल्या जागेशी परिचित असतो. त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी कुमक मिळत राहते. ह्या सर्व विचाराने लंकापती रावण निश्चिंत होता. ‘‘अयोध्येहून परागंदा झालेला, वनवासी अननुभवी तरूण राम माझ्याएवढा तुल्यबळ कसा असेल? तो माझ्यापुढे टिकू शकणार नाही.’’ हा त्याचा विचार अगदीच खोटा नव्हता. कुठे आयोध्या कुठे लंका! अयोध्येच्या मदतीशिवाय एकट्याच श्रीरामाने लंकेवर चढाई केली. त्यांच्याकडे ना स्वतःची सेना होती ना आयुधे. ना लढण्यासाठी शस्त्रसज्ज रथ ना चतुरंगदळे.

पण!  राघवाचे संघटन कौशल्य विलक्षण होते. सर्व वानरसेनेचे मन त्यांच्या सत्यनिष्ठेनी इतके मोहून गेले होते की सारी वानरसेना प्रभुरामचंद्रांसाठी कोठलेही दिव्य करायला तयार होती. सुग्रीवाची सारी सेना त्याचप्रमाणे वालीपुत्र अंगदाची सेना प्रभु रामांच्या नेतृत्वाखाली लढायला सज्ज होती. सर्वांचा आपल्या नेत्यावर दृढ विश्वास होता. सर्वांचे मनोबल अत्युच्च होते. अत्यंत आत्मविश्वासाने ते रणांगणावर उतरले होते. रोज रणांगणावर नव्या दमाने उतरणार्‍या रावणाच्या सैन्याच्या तुकड्यांशी लढत होते. रामाचे सैन्य पर्याप्त होते. सीमीत होते. पण रामाचे युद्ध कौशल्य, व्यूहरचना कौशल्य अद्वितीय असेच होते. मेघनादाची शक्ती लागून मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला हनुमंताने महत्प्रयासाने मिळवलेल्या संजीवनीने जीवनदान लाभले होते.

त्याउलट रावणाचे भाऊ, मुले सर्वांचा खातमा झाला होता. असे असले तरी रावण अजून जिवंत होता. आपल्या भावांच्या, मुलांच्या, नातेवाईकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सूडाच्या भावनेने पेटून उठला होता. एखाद्या प्रलयाग्नी सारखा धुमसत होता. त्याची ताकद जणू दसपटीने वाढली होती. श्रीरामांना ललकारत होता. रणांगणावर मोठ्या ताकदीने, स्फूर्तीने उतरलेल्या रावणाला प्रथमच पाहून धीरोदात्त श्रीरामही क्षणभर विचलित झाले. चिंतित झाले. प्रभुरामचंद्राची चिंता ही कुठल्याही प्रकारे भयातून वा रावणाच्या रणांगणावरच्या प्रभावी प्रवेशातून निर्माण झालेली नव्हती तर अत्यंत जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून, सर्व सैन्याच्या, प्रजाजनांच्या काळजीतून निर्माण झालेली होती. रावणाच्या बेजबाबदार अहंकाराने तो तर मरणार होताच पण त्याच्यासोबत असंख्य आप्तजनांच्या पुरवासीयांच्या, वानरसैन्याच्या होणार्‍या कायमच्या नुकसानाची त्याला यत्किंचितही खंत वाटत नव्हती ‘माझ्यासाठी सर्व काही’ ह्या उद्दामपणातून त्याची वाढलेली बेफिकिरी त्याच्या आक्रस्ताळ्या ललकारण्यातून दिसत होती. ह्या युद्धात तो धर्म – अधर्म, नीती - अनीती ह्या सर्व सीमा ओलांडून लढणार होता.

श्रीराम अनेक दिवसांच्या युद्धाने थकलेले होते.  रामाची सेना अथक लढत होती. असे असतांना, महापराक्रमी, नव्या दमाचा रावण मोठ्या त्वेशाने लढण्यासाठी आज रणांगणावर उतरला होता. समोर उभा होता.  आपलं असं हे दमलेलं सैन्य! ना आपल्या सैन्यात रथ आहेत ना घोडे. ना हत्ती आहेत ना अद्ययावत शस्त्रास्त्रे! चिंतेचं मळभ रामचंद्रांच्या मनाला व्यापून गेलं. `काय होईल?’ ही धाकधुक अस्वस्थ करत होती.

त्याच वेळी युद्ध पाहण्यासाठी अनेक ऋषीमुनींना घेऊन अगस्ति ऋषी तेथे आले. आज ज्या प्रमाणे मोठे देश सार्या मानवकल्याणाच्या हेतूने विश्वाला असलेला धोका ओळखून दोन देशांच्या युद्धात हस्तक्षेप करतात; त्याप्रमाणे व त्याच हेतूने ऋषी अगस्ती आपल्यासोबत देवदेवताज्ञानीविद्वान ऋषी मुनींना घेऊन युद्धभूमीवर आले होतेरामाच्या मनात चाललेला सर्व विचारांचा, शंकांचा , चिंतेचा त्यांना पुरेपूर अंदाज आला. सर्व परिस्थिती त्यांच्या ध्यानात आली. ते पुढे आले. रामाच्या पाठीवर आपला वत्सल हात ठेवत ते म्हणाले, ``वत्साश्रीरामाहे महाबाहोअरेतू शूर वीर गुणी आहेस. लोकांच्या मनात तुझ्याबद्दल अपार प्रेम आहे. तुझ्या मनातील ही चिंता क्षणैक आहे. सूर्यावर एखादा छोटासा ढग यावा तशी विरून जाणारी आहे. असा चिंताक्रांत होऊ नकोस.’’

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांची बाजू सत्याची होती. सत्याचा प्रहार मोठा प्रखर असतो. सत्याची धार मोठी विलक्षण असते. सत्याच्या मागे उभी असलेली अदृश्य लोकशक्ती, जनसामान्यांचा मूक पाठिंबा, ज्ञानी, विद्वान आणि नीतीमान अशा ऋषी मुनींची संघटित शक्ती, रावणाने जाणली नाही. त्याचा त्याच्या बाहुबलावर विश्वास असल्याने त्याने त्यांची उपेक्षाच केली. राम रावणाचं युद्ध म्हणजे सत्य विरुद्ध असत्याचं असं धर्मयुद्ध असल्याने धर्माचा विजय व्हावा ही मनीषा बाळगून अनेक ऋषीमुनी हे युद्ध पाहण्यासाठी प्रत्यक्ष तेथे जमले होते. ह्या मुनीवरांची ज्ञानशक्ती, आत्मशक्ती, अनुभवाचे ज्ञान श्रीरामाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे ह्याचा रावणाला अंदाज आला नाही.

रामाच्या पाठीवर आश्वासक हात ठेवत अगस्ती म्हणाले, ‘‘ मी तुला ह्या दैदिप्यमान सूर्याचे स्तोत्र सांगतो. एकाग्र चित्ताने तू  ते तीनदा म्हण. त्याने तुझी चिंता दूर होईल.’’

----------------------------

कोणाला वाटेल, नुसत्या पाठीवर हात फिरवण्याने काय होणार? नुसत्या स्तोत्र पठणाने काय फरक पडणार? दिव्यात तेल असते वात असते पण त्या जोडीला तथे अग्नी चेतवणे अपेक्षित असते. त्यामुळेच दिवा उजळून निघतो. ते काम साधे वाटले तरी साधे नसते. अगस्ती ऋषींच्या शब्दांमुळे रामातल्या धगधगीत चैतन्यावर जमलेली दमलेपणाची राख क्षणार्धात दूर झाली. काम आपण सर्वजणच करतो. पण ते विशेष चांगल्या रीतीने केले की ते विकर्म (विशेष कर्म होते.) कर्माच्या जोडीला आंतरिक मेळ असला म्हणजे ते कर्म निराळेच होते. हे म्हणजेच विकर्म. तेल वात ह्यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडतो. कर्माच्या जोडीला विकर्मता आली की प्रकाश पडतो. एखादा लाकडाचा ओंडका पेटवला की तो धगधगीत निखारा होतो. लाकूड आणि अग्नी ह्यात केवढा फरक. लाकडात अग्नि गुप्त असतो त्याप्रमाणे स्वधर्माचरणातील असीम सामर्थ्य असेच गुप्त असते. कर्मात विकर्म ओतले की कर्म दिव्य दिसू लागते. आई मुलाच्या पाठीवरून हात फिरवते. एक पाठ आणि त्यावरून वेडावाकडा एक हात फिरला. एक साधी क्रिया. परंतु त्या साध्या कर्माने त्या मायलेकरांच्या मनात ज्या भावना उचंबळल्या त्याचे कोण वर्णन करु शकेलइतक्या लांबीरुंदीच्या पाठीवरून अशा इतक्या वजनाचा एक गुळगुळीत हात फिरवताच आनंद निर्माण होतो असे समीकरण कोणी करु लागला तर ती थट्टा होईल. हात फिरवण्याची क्रिया जरी क्षुद्र असली तरी त्यात आईचे हृदय ओतलेले असते. ते विकर्म ओतलेले असते म्हणून तो अपूर्व आनंदउत्साह निर्माण होतो. अगस्तिंच्या प्रेमपूर्वक पाठीवर ठेवलेल्या हाताने तेच साध्य झाले. विनोबा म्हणतात कर्मात विकर्म ओतले की अकर्म तयार होते. म्हणजे निर्माण होणार्‍या प्रचंड उत्साहामुळे आपण काही काम करत आहोत ही जाणीवही नाहिशी होते. माणूस दमत नाही. कंटाळत नाही. श्रीरामाचे तसेच झाले. मनात एक अपूर्व उमेद तयार झाली. त्यांचा सर्व शीण नाहिसा झाला. रामाच्या पाठीवर ठेवलेल्या हातामुळे रामामधे अशी काही प्रेरक शक्ती तयार झाली की रामाकडे पाहताच दमलेली वानरसेनाही अपूर्व उत्साहाने परत एकदा लढायला तयार झाली.

 

सूर्य रात्रंदिवस काम करतच असतो. आपल्याला वाटते तो रात्री नसतो तरी पृथ्वीच्या दुसर्‍या गोलार्धाला प्रकाश देतच राहतो. पण त्याला विचारले तर तो म्हणेल की मी काहीच करत नाही. तो जरी काही कर्म करत नसला तरी त्याच्यात एक प्रचंड प्रेरक शक्ती भरून राहिलेली असते. तो दुनियेला सारी कामे करायला लावतो. त्याला पहाताच कोंबडा आरवतो. पाखरे किलबिल करायला लागतात. उडतात. माणसे आपापली कामे करतात. ज्याला असे अकर्म साधले तो लोकांना प्रचंड प्रेरणा देतो. अगस्तींच्या दमदार तपामधे स्वतःच्या कर्माला अकर्म करायची आणि सत्याला प्रेरणा द्यायची महान ताकद होती.

 

            ऋषी अगस्तींनी सांगितलेले हे प्रेरणादायी सूर्य स्तोत्र आजही तेवढेच प्रेरक आहेह्या सूर्यस्तोत्रात सूर्याची नावे म्हणजेच त्याचे अनेक गुण सांगणारी गुण विशेषणे आहेत. ते गुण आपल्यात बाणावेत असे प्रत्येकालाच वाटेल. रामाने श्रध्दायुक्त अंतःकरणाने ते स्तोत्र तिनदा म्हटले. जणु दीप पेटला होता. लाकूड अग्निरूप झाले होते. रामाने प्रचंड आत्मविश्वासाने रावणाच्या डोळ्यात बघत रावणाला ललकारले.

आत्मविश्वास प्रथम डोळ्यातून व्यक्त होतो. जिंकण्याची जिद्द नजरेतून प्रत्ययाला येते. सत्याच्या नजरेसमोर असत्याची नजर टिकू शकत नाही. तेथेच जय पराजयाचं पहिलं भाकित नक्की होतं. आणि घडतंही तसच!

 आणि मग प्रत्यक्ष सूर्यनारायणानीच सांगितलं, ``रामा, रावणाचा काळ जवळ आला आहे. आता त्वरा कर. ‘’ पुढच्याच क्षणी रामाचा बाण रावणाच्या शिराचा वेध घेऊन  गेला.

---------------------------------------------

श्लोक 1, 2 -


Image result for picture of lord Shri Ram and Agasti


ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्।

रावणं चाग्रतो दृष्ट्वा। युद्धाय समुपस्थितम्।।1

दैवतैश्च समागम्य । द्रष्टुमभ्यागतो रणम्

उपगम्यब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा।।2

 

सज्ज होऊन युद्धासी । लंकाधीश महाबळी

ललकारत युद्धाला । पातला तो रणांगणी ।।

नव्या ताज्या दमाच्या त्या । रावणा पाहुनी रणी

चिंताक्रांत बहू झाला । राम दाशरथी मनी ।।

अविश्रांत लढूनी तो । थकलेला उभा रणी

सैन्यही थकले आहे । पाहुनी काळजी करी ।।

त्याचवेळी तिथे आले । भगवान् अगस्ती ऋषी

घेऊनी आपुल्या संगे । देव आणि ऋषी मुनी ।।

पाहण्या राघवाचा त्या । पराक्रम रणांगणी

शस्त्रकौशल्यचि रामाचे । अस्त्रावरी प्रभुत्वही ।।

हाय काय परंतू तो । चिंतेने घेरला अती

थकलेला दिसे त्यांना । संग्रामी जानकीपती।।

पाहुनी दृश्य ते सारे। राघवा धीर देण्यासी

आले जवळ रामाच्या । मुनिश्रेष्ठ अगस्ती ही।।।1,2

सुहृत् हो,

रामाची चिंता युद्धाच्या भय़ातून नाही तर परिस्थितीच्या पूर्ण आकलनातून, त्याच्यावर असलेल्या सर्वांगीण खोल जबाबदारीतून निर्माण झाली होती. रामला परिणामांची पूर्ण जाण व जाणीव होती. त्याचं सैन्य अथक लढत असल्याने दमलेलं होतं. त्यांना विश्रांतीची गरज होती. अशात नव्या दमाचा रावण पहिल्यांदाच रणांगणात युद्धाच्या हेतूने उतरला होता. आपल्या सैन्याचा कमितकमी संहार होईल पण रावणावर मात्र मोठा आघात होईल असे त्याच्याशी कशाप्रकारे लढता येईल?  त्यासाठी काय करावे लागेल? ---अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी रामचंद्रांना घेरले असावे.

 ह्या उलट रावणाची बेफिकीरी, बेपर्वा, बेधडक वागणूक त्याच्या असीम अहंकार, प्रचंड अहंगंड आणि आत्मकेंद्रितपणातून उदयाला आली होती. आपल्या शक्तिबद्दल असलेला अवाजवी विश्वास ह्याच्यामुळे त्याला अनेकांनी दिलेला योग्य सल्ला मानायला तो तयार नव्हता. त्याचे पणाला लावलेले एकसे एक सरस मोहरे युद्धात कामी आले होते. सर्वच आप्तेष्टांना गमावल्यानेही त्याचा राग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडत होता. पराभवाची धास्ती, मरणाची जााणवणारी निश्चिती त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भय उत्पन्न करत होते. त्यामुळे विवेक हरवून गेलेला हा योद्धा मनातून कुठेतरी सैरभैर झाला होता. वादळी वार्‍याप्रमाणे दिशाहीन पण जास्तच आक्रमक आणि नुकसानकारक झाला होता.

राम ह्याच चिंतेत असताना भगवान अगस्तिमुनी त्या स्थळी पोचले. एवढ्या मोठ्या युद्धाप्रसंगी तेथे जाणकार, दोन्ही पक्षांना काबूत ठेऊ शकतील अशा प्रभावशाली नीतीमान जनांची उपस्थिती अनेक कारणांसाठी आवश्यक होती. म्हणून त्यांच्यासमवेत ते अनेक देव देवता, ऋषी, मुनींना घेऊन आले होते. रावणाची नियत ठीक नाही. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा युद्धांमधे संपूर्ण मानव जाातीला, विश्वाला असलेले धोके लक्षात घेऊन प्रसंगी दोन्ही पक्षांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. हे जाणूनच ही सर्व मंडळी तेथे पोचली होती. प्रभुरामासाठी प्रत्येकाच्याच मनात प्रेम, आदर, जिह्वाळा आणि ममता होती. त्याच्यावर झालेल्या अन्यायाचे योग्य प्रकारे निवारण होणे हे धर्माला अनुसरूनच होते.

 आत्तापर्यंत रामाची कीर्ती सुदूर पसरली होती. त्याला भेटण्याची ही संधी होती. विश्वामित्रांना त्यांच्या यज्ञामधे राम-लक्ष्मणाने केलेली मदत, रामाचा पराक्रम,  विश्वामित्रांकडून मिळवलेली शस्त्रास्त्रविद्या, जनकाच्या सभेतील शिवधनुष्याचा भंग, सीतेसोबत विवाह, राज्यत्याग,  वनवासात असताना शूर्पणखेचा उतरवलेला नक्षा; असा  रामाचा  सर्वच पराक्रम सर्वांना श्रुत होता. रामाचा पराक्रम प्रत्यक्ष पाहण्याची सर्वांना उत्सुकताही होती. तेथे पोचल्यावर मात्र वेगळीच परिस्थिती पाहिल्यावर प्रसंगाचे महत्त्व ओळखून अगस्ति ऋषी पुढे सरसावले. वडिलांप्रमाणे अत्यंत ममतेने, जिह्वाळ्याने, त्यांनी तरूण रामाच्या पाठीवर हात ठेवला.  चिंतेत बुडालेल्या श्रीरामाला धैर्य देण्यासाठी ते म्हणाले,------- 

-------------------------------

श्लोक 3, 4, 5

महर्षी अगस्ती म्हणाले, ‘‘हे रामा, तुझ्या नावातच राम आहे. सर्व लोकांची मने तू जिंकून घेतली आहेस. सर्वजण तुझ्या गुणांवर भाळून तुझ्या पराक्रमाच्या, त्यागाच्या, सीताप्रेमाच्या अशा सर्व गोष्टींमधे रममाण झाले आहेत. (राम ह्या शब्दाचा अर्थच ज्याच्याठिकाणी सर्वजण रममाण होतात.) हे महाबाहो, तुझा पराक्रम माहित नाही असा कोणी नसेल. आयोध्येपासून थेट लंकेपर्यंतचा तुझा पराक्रम सर्वश्रुत आहे.

आज मी तुला पूर्वीपासून चालत आलेले एक निरंतर सत्य सांगतो. सत्यात कधी बदल होत नाही. ते दृढ, स्थिर, नश्चित असतं. ते ऐकल्यावर तुझ्यात प्रचंड उर्जा निर्माण होऊन तू सर्व शत्रूंचा (अरीन् ) सहज निःपात करशील. ह्या रणांगणावर निश्चितच तू विजय मिळवशील. उठ असा हतोत्साह होऊ नकोस.

 मी सांगणार आहे ते ‘‘आदित्यहृदय’’ नावाचे एक विलक्षण स्तोत्र आहे. जय मिळवू देणारं आहे. परम कल्याणकारी आहे. तुझ्या सर्व शत्रूंचा विनाश करणारं आहे. जे जे मंगलमय आहे त्यातील हे सर्वश्रेष्ठ मंगलकारी आहे. तुझ्यामधील सर्व अनिष्टकर, कचखाऊ वृत्तीचा नाश करणारं आहे. हे म्हटल्यानी तुझ्या मनातील भय, चिंता, दुःख, शोक सर्व वितळून जाईल. तू निर्भयपणे सर्व संकटांचा सामना अत्यंत धैर्याने, कौशल्याने करू शकशील. हे स्तोत्र आरोग्य, आयुष्य वाढवणारे आहे.

मित्रांनो, चिता ही मेलेल्यांना जाळते तर चिंता सजीवांना जाळते. ‘‘चिंता दहति सजीवम् ।’’ ते काही खोटं नाही. गोष्ट छोटीशीच असते पण त्यावर तुमचा विश्वास असतो का नाही हे फार महत्त्वाचे असते. आपल्या पाठीशी उभी असलेली नीतीमान ज्ञानी, विद्वान, विचक्षण प्रज्ञावंतांची मोठी फळी व त्यांचे आशीर्वाद फार मोठं काम करून जातात. मनातील चिंता दूर झाली की आपोआप सारे तेजस्वी गुण चमकायला लागतात.  

राम राम महाबाहो श्रुणु गुह्यं सनातनम्।

येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे।।3

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्।

जयावहं जपेन्नित्यमक्षयं परमं शिवम्।।4

सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम्

चिन्ताशोकप्रशमनमायुर्वधनमुत्तमम्।।5

“शूर वीर गुणी रामा”। अगस्ती बोलले तया

“ तुझ्यासाठीच लोकांच्या। हृदि स्नेह अपार हा।।

बाळा मी सांगतो आता । स्तोत्र एकचि हे तुला

‘आदित्यहृदयम्’ नामे । गोपनीय असे पहा।।

स्तोत्र कल्याणकारी हे । सत्य शाश्वत नित्य हे

जपशील जरी त्यासी । विजयश्री तुझी असे।।

सर्व शत्रूगणांसी तू । चारशील रणी खडे

अभद्र शोक चिंता ना । अपमृत्यू कधी घडे।।

मांगल्य मंगलाचे  हे । पापराशी सदा मिटे

आयुष्य वाढवी वत्सा। स्तोत्र उत्तम हे असे” ।। 3,4,5

-------------------------------

श्लोक 6

अगस्ति ऋषींनी जे सूर्यस्तोत्र रामाला सांगितले त्यात सूर्याची असंख्य नावे आहेत. ती त्याची गुणविशेषणे आहेत.  रश्मि म्हणजे किरण. अनंत किरणांनी युक्त तो रश्मिमंत.  जो स्वयंप्रकाशी आहे त्याचीच किरणे दाही दिशांना पसरतात. गुणी माणसाचे तसेच असते. स्वभावतःच त्याच्याकडे असलेल्या सद्गुणांमुळे तो लोकांचे लक्ष आकृष्ट करून घेतो. सूर्य रोज उगवतो. उदयाला येतो. म्हणून त्याला समुद्यन्तः म्हणतात. त्याच्यामुळे ह्या पृथ्वीचं भाग्यही उदयास येतं. रोजचा त्याचा अंधारावर चढाई करून वरती येण्याचा उपक्रम; रोज न चुकता नियमाने त्याच्या आगमनाचा होणारा हा पूर्व क्षितीजावरचा सोहळा; रोज पृथ्वीवर पक्षीगणांसाठी, भूतमात्रांसाठी घडणारा हा सूर्योदयाचा उत्सव अलौकिक असतो. सूर्याच्या ह्या नियमितपणात जसा खंड पडत नाही तसाच त्याच्या तळपणार्‍या गुणांमधेही कधी कमी होत नाही. वीरपुरूष कोठेही गेला तरी त्याच्या गुणांमुळे त्याचे आगमन तेथील सर्व भूतमात्रांमधे अविस्मरणीय, उत्साह देणारे ठरते. देव असोत वा दानव, सुर असोत वा असुर, मानव असो वा तरुवेली, प्राणीमात्र असोत वा किडामुंगी; सर्वच जण सूर्यापुढे, त्याच्या तेजापुढे नतमस्तक असतात.(देवासुरनमस्कृत) सर्वांचीच रोजची नित्य व नैमित्तिक कामे सूर्याशिवाय घडू शकत नाहीत. अत्यंत प्रभावशाली, प्रतिभावंत अशा धैर्यशाली, उदार पुरुषावर सर्वांचीच भिस्त असते. शत्रू, मित्र सर्वांनाच त्याची, त्याच्या असण्याची, त्याच्या मदतीची गरज असते. जणु काही सोनेरी वस्त्राने कलश आच्छादावा त्याप्रमाणे सूर्य किरणांचे प्रकाशमान जाळे सर्व पृथ्वीला आच्छादून टाकते.

हे रामा, आपल्या प्रकाशाने सार्‍या पृथ्वीला आच्छादणारा हा विवस्वान तुलाही प्रकाशाने, ज्ञानाचा बोध करून आच्छादून टाकत आहे. तुझ्यामधे असलेले दोष त्यामुळे निघून जात आहेत. तरी हे रामा! ह्या विवस्वानाची मनोभावे मानसपूजा कर. तुझ्या मनात आलेलं निराशेचं पटल वा चिंतेचं कारण सर्व सर्व तो दूर करेल असे ऋषी अगस्ति म्हणाले. अशा ह्या प्रकाशमान, कान्तिमान तळपणार्‍या (भास्कर) सूर्यबिंबाला डोळ्यासमोर ठेवल्यास एका वेगळ्याच स्फूर्तीने तू लढण्यासाठी सज्ज होशील. असीम चैतन्याचा अनुभव तुला येईल. सूर्य आहे तरच आपलं अस्तित्व आहे. तोच हया त्रिभुवनाचा खरा स्वामी आहे. (भुवनेश्वर) तोच तुला तुझ्या शक्तीचा परिचय करून देईल. तोच तुला तुझ्या ज्ञानाचा बोध करून देईल.  असे अगस्ति बोलले.

 Image result for free download photographs of sunrise

रश्मिमन्तं1 समुद्यन्तं2 देवासुरनमस्कृतम्3

पूजयस्व विवस्वन्तं4 भास्करंभुवनेश्वरम्6।।6

विवस्वत्  (विशेषेण वस्ते आच्छादयति।)  आपल्या प्रभेने आच्छादणारा

“सोनेरी किरणांची ज्या। प्रभा लाभे मनोहरी1

घेऊन भाग्य पृथ्वीचे । रोज ये उदयाचली2।।

पूजनीय असे जोची । देव दैत्यांस सर्वही3

तेजोमय प्रभेने हा । आच्छादे जग सर्वही4 ।।

तेजःपुंज असे5 स्वामी । सत्ता त्रिभुवनी करी6

अस्तित्त्व जगताचे ह्या । टिके ह्या सवित्यावरी ।।

“रश्मिमान1 समुद्यन्2 जो । देवासुर-नमस्कृता3

पूजी त्या भास्करा4 रामा। विवस्वान्5 भुवनेश्वरा6  ।।6



 Image result for free download photographs of sunrise


-------------------------------

श्लोक 7 -

अगस्ति ऋषी रामाला स्तोत्र सांगतांना पुढे म्हणाले, रामा, अरे सर्व देव, देवता ह्या सूर्याचेच स्वरूप आहेत. कारण सर्व जगाला चालना, चेतना, प्रेरणा, शक्ति देणारा सूर्य हा एकमेव आहे. त्याच्यामुळेच ह्या जगाला अस्तित्त्व आहे. ह्या पृथ्वीवर जे जे काय घडतं त्याचा करता करविता तोच आहे. तो जी जी कामे घडवून आणतो. ती एक एक कामे घडवून आणणारा तो एक एक तेजस्वी गुण हा देवतास्वरूप आहे. म्हणूनच सारे देव, देवता ह्या तेजस्वी भास्कराचे अंश आहेत. हा सहस्ररश्मी त्याच्या शरीरातून रोज हजारो लाखो किरणं उधळत ह्या नभात येतो. किरणांची प्रभा असलेला हा तेजःपुंज तेजोगोल ह्या सृष्टीच्या उत्पत्तीचं निमित्तकारण आहे. (रश्मिभावन -भावन म्हणजे उत्पन्न करणारा किरणांची उत्पत्ती करणाराही आणि जगाची उत्पत्ती करणाराही.) ह्या पृथ्वीवर जे जे भूतमात्र आहेत त्यात तो जराही आपपर भाव न ठेवता सर्वांचं सारख्याच आत्मीयतेने लालन पालन करतो. हा माणूस, हा कावळा, हा किडा वा साप असा भेद करत नाही. एका श्रीमंताच्या सज्जात जो प्रकाश देतो तोच एका गरीबाच्या झोपडीतही देतो. किंवा एकाच साक्षीभावाने त्यांच्याकडे लक्ष देतो. ज्या प्रेमभावाने वा स्थितप्रज्ञपणे तो सर्व देवांना त्याच्या किरणांनी वाढवतो त्याच ममतेने वा साक्षीभावाने तो असुरांनाही जगवतो. 

सर्वदेवात्मको7 ह्येष तेजस्वी8 रश्मिभावनः9

एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभि10।।7

गभस्ति  तेजाचा किरण, गभस्तिभिः – किरणांनी

“सर्व देव असे ह्याची। भास्कराचे स्वरूपची7

तेजस्वी किरणांनी8 हा । चालना देतसे जगी9।।7.1

प्रकाश किरणांनी हा । देव दैत्यांस तोषवी

प्रतिपाळ करी त्यांचा। सूर्यदेव सदा भुवी10।।7.2

-------------------------------

श्लोक 8 -

सूर्य एक दिवस उगवला नाही तर काय उलथापालथी होतील हे सांगताच येत नाही मग जर सूर्य नसताच तर ह्या पृथ्वीवर जीवन शक्यच झालं नसतं.  आणि म्हणूनच ज्या ब्रह्मदेवाला आपण जगाची निर्मिती करणारा म्हणतो, तो ब्रह्मदेव म्हणजे साक्षात सूर्यच आहे. अथवा त्याच्या अंशातूनच प्रकट झालेली अशी ताकद आहे जी निर्मितिचं काम करते. त्याच प्रमाणे सर्व भूतमात्रांचे लालनपालन करणारी ताकद ह्या सूर्यापासूनच तयार झाली आहे त्याला देवरूप देतांना आपण त्याला विष्णू म्हणतो. त्याचप्रमाणे सर्वांचा नाश करणारा शिवही ह्या सूर्याची सर्वनाशक शक्ती आहे.  मित्राांनो, अवकाशात (space)  गेल्यावर दिवस, रात्र, वर्ष ही कालगणनाच संपते. ही कालगणना पृथ्वीवरची आहे. हा समय सूर्यामुळेच निर्धारित होतो. सूर्य आहे म्हणून काळ आहे. काळ वा समय हा सूर्याच्याच वैशिष्ट्यातून निर्माण झाले आहे. सूर्याचे असणे, त्याच्यामुळे होणारे बदल हे सर्व त्याचे एकत्रित गुण-समुच्चय धरले तर त्यातून एक एक गुण घेऊन तो कशाला प्राधान्य देतो हे पाहून आपण त्यासाठी एक एक स्वतंत्र देवता मानली आहे. ब्रह्मा, विष्णू महेश ही त्याची रूपे आहेत वा त्याचा एक एक गुण घेऊन निर्माण झालेल्या देवता आहेत. चौदा भुवनांचे अधिपति चौदा इंद्र त्यांना लोकपाल अथवा महेन्द्र असे म्हणतात. या चौदा महेन्द्रांच्या समुदायाला माहेन्द्री म्हणतात. हा महेन्द्रांचा समुदाय असो वा अग्नीतून निर्माण झालेला स्कंद असो ही ह्या सूर्याचीच अनेक रूपे आहेत. सूर्यामुळेच पृथ्वीवर निर्माण झालेलं ऐश्वर्य सांभाळणारा देवांचा कोषाध्यक्ष धनद म्हणजे कबेर असो, वा सर्व जलसाठ्यांवर नियंत्रण असणारा वरूण (अपांपति) असो सर्वांची निर्मिती ह्या सूर्यदेवामुळेच झाली आहे. यम म्हणजे नियम. अत्यंत नियमानी चालतो म्हणून सूर्य स्वतःच यम आहे वा ज्याला आपण मृत्यू वा यमधर्म म्हणतो, जो प्रत्येक जीवाचे नियमाने वागणे (पुण्य) व अयोग्य वा अनियमितपणा (पाप) ह्यांचा हिशोब ठेवत त्याला मृत्यूही देतो. सोम म्हणजे चंद्र जरी पृथ्वीभोवती फिरत असला तरी तो स्वयंप्रकाशी नाही. त्याला सूर्याकडूनच उर्जा व प्रकाश मिळतो जो पृथ्वीवरील वनस्पतींच्या वाढीला कारणीभूत होतो. चंद्र, पृथ्वी सूर्याच्या गतीमुळे पृथ्वीवर होणारे बदल हेही सूर्याच्याच अस्तित्वामुळे शक्य आहेत. थोडक्यात म्हणजे पृथ्वीचे अस्तित्त्वच ज्या सूर्यावर अवलंबून आहे त्या सूर्याचं चिंतन तू कर असे ऋषी अगस्ती श्रीरामांना म्हणाले.

एष ब्रह्मा11 च विष्णुश्च12 शिवः13 स्कंदः14 प्रजापतिः15

महेन्द्रो16 धनदः17 कालो18 यमः19 सोमो20 ह्यपांपतिः21।।8

हाची ब्रह्मा11 असे विष्णू12 । शिव13 स्कंद14 प्रजापती15

इंद्रांच्या समुदायाचा । मुख्य हाची महेन्द्र16 ही ।।

कोषाध्यक्षचि देवांचा । हाची कुबेर17 तो धनी  

अव्याहत पुढे जाई । असे तो काळ हा रवी ।।

साक्षात नियमांचे हा । रूप प्रत्यक्ष मूर्तसे

जीवांस घेउनी जाई । यमधर्मचि हा असे ।।

चंद्रमा नित जो पोशी । सार्‍या वनस्पतींस जो

तोही रूप असे ह्याचे । सोम सौम्य नभीच जो ।।

जीवांस जीववी जेची। जल जीवनदायिनी

जलाचा त्या असे स्वामी । हाची वरुणराज21 ही।।8

-------------------------------

श्लोक 9

अगस्ती मुनी श्रीरामांना म्हणाले, रामा, सर्व जीवन ह्या सूर्यनारायणावर अवलंबून असल्याने; आपले पूर्व पुरूषही (पितर) हया सूर्याचेच रूप होते. 

वसु चा एक अर्थ धनदौलत ,जडजवाहिर असा आहे.  आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेली ही सर्व दौलत सूर्यामुळे आहे.तर अष्टवसू हा देवांचा समुदाय हाही त्या सूर्याचेच रूप आहे. सूर्याच्या प्रकाश किरणांनाही वसु  म्हटलं आहे. कारण सूर्याचे हे किरण हे त्याचे ऐश्वर्यच आहे. 

आपण अज्ञानातून ज्ञानाकडे ; अंधारातून उजेडाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपल्याला विश्वाचं ज्ञान प्राप्त करून देते ते ज्ञान हे प्रकाशमयच असते. म्हणूनच जीवनात मिळवायची, कमवायची कुठीही गोष्ट म्हणजेच जीवनाच कुठलंही साध्य हे सूर्याहून दुसरं असूच शकत नाही.

सूर्य प्रकाशाने अनेक रोगजंतूंचा नायनाट होतो. अनेक व्याधी बर्‍या होतात. सर्व वनस्पतींच्या तसेच सर्वांच्या आरोग्याचे मूळ सूर्यच आहे. म्हणूनच देवांचे वैद्य, जे जुळे भाऊ अश्विनीकुमार आहेत ते ह्या तेजस्वी सूर्याचेच रूप आहेत.

जो सार्‍या मानवसमाजाला त्याच्या हिताचा मार्ग दाखवतो तो मनु ! असे चौदा मनू हऊन गेले. अभ्यास, मनन, चिंतनातून हे मनू द्रष्टे झाले; पुढे येणारा काळ, संकटे जाणणारे झाले. मानव जातीला मार्गदर्शन करून त्यांनी संकटातून वारंवार त्यांना तारून नेले. जगावर उपकार करणारे हे मनूही ह्या सूर्याचेच रूप आहेत.

सार्‍या पृथ्वीला लपेटून घेतलेले जे वायूचे कवच आहे ते सूर्याच्या अस्तित्वामुळेच शक्य आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीभर फिरणारा पवनही सूर्यामुळेच तयार होणारा आहे. तर हृदयाजवळ असलेल्या अनाहत चक्रात जे वायूचे अधिष्ठान आहे त्याला मरुत् असे संबोधिले जाते.

अग्नीत असलेलं जे स्फुल्लिंग आहे, तेज आहे, उष्णता आहे त्या सर्वाचं कारण हा सूर्यच आहे.

ह्या भूतमात्रांची उत्पत्ती करणारा, त्यांचे प्रजनन होण्यास कारण असणारा(प्रजस्) सूर्यच आहे. आणि ही भूतमात्रे हे विश्व ह्या सूर्याचीच प्रजा असून तो ह्या विश्वाचा स्वामी आहे. पृथ्वी, व नवग्रहांच्या सर्व हालचाली ह्या सूर्यामुळेच नियंत्रित होतात.

सर्व भूतमात्रांचे प्राण हा सूर्यच आहे. त्यांना चैतन्य देणारा सूर्यच आहे आणि त्यांचे चैतन्य वा प्राण हरण करणाराही तोच आहे.

ह्या पृथ्वीवर क्रमशः दिसून येणारे सहा ऋतु वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर व त्यांचे फिरणारे चक्र हे सूर्यामुळेच संभवते. म्हणून ऋतुकर्ता ही सूर्यच आहे.

अशा ह्या अत्यंत शक्तिशाली, गुणसम्पन्न सूर्यनारायणाची (प्रभाकर)ची किरणे  कित्येक योजने लांब पसरलेली असतात. त्याची दीप्ती आकाशाला व्यापते. त्याचा चमचमाटाने विश्व आच्छादून टाकते.

पितरो22 वसवः23 साध्या24ह्यश्विनौ25 मरुतो26 मनुः27

वायुः28 वह्निः29 प्रजाः प्राण31 ऋतुकर्ता32 प्रभाकरः33।।9

असे पूर्वज सार्‍यांचा22 । वसू आठहि हा असे23

जीवनी प्राप्त व्हावे जे । साध्य24 आदित्य एक हे ।। 9.1

देवांचे वैद्य जे सार्‍या । ते अश्विनी-कुमार25 हा

लपेटे वायु पृथ्वीला । वाय28 तोची रवीच हा ।। 9.2

उष्णतेनेच जन्मे जो । तोची पवन28 हा असे

मरुत् नामेच राहे हा । हृदी अनाहतामधे ।। 9.3

दिशा सांगे हिताची जे। उपकार करे जनी

तेची द्रष्टे मनू27 चौदा । तेजस्वी सवितारुपी ।। 9.4

स्फुलिंग हाचि अग्नीचे । अग्निदेव29 पवित्र हा

अग्नितत्त्वस्वरूपाने। जीववे जीवसृष्टिला ।। 9.5

भूतमात्रे प्रजा सारी । स्वामी त्यांचा रवी असे31

प्राण हा सर्व भूतांचे । आहे जीवन सृष्टिचे31 ।। 9.6

ऋतुचक्र मनोहारी । जे फिरे वसुधेवरी

कर्ता त्याचा असे  हाची । ऋतुकर्ता32 असे रवी ।। 9.7

कित्येक योजने दूरी । प्रभा ही पसरे नभी

तेजःपुंज33 असे हाची। प्रभाकर34 महारथी ।। 9.8

----------------------------------


 

 

श्लोक 10

महर्षी अगस्ती सांगू लागले,

रामा, पराक्रमी पुरूषाचा पराक्रम ऐकून आपल्याही स्फुरण चढते. त्यांच्या चैतन्याच्या गाथेने आपली हतबलता, उदासी, किंकर्तव्यमूढता दूर होते. ह्या चैतन्यरूपी महा पराक्रमी सूर्याचा पराक्रम म्हणूनच मी तुला सांगत आहे. हा देवांची माता अदितीचा पुत्र आदित्य आहे. ह्या विशाल विश्वाची निर्मिती करणारा, सूर्यमालेची उत्पत्ती करणारा सविता आहे. किरणरूपाने सर्वस्पर्शी, सर्वव्यापी सूर्य  आहे. ज्या गोष्टी भूतमात्रांना करण्यास अशक्य आहेत, त्या गोष्टी हा सूर्य सहज लीलया करून जातो.  ग म्हणजे गमन करणारा. ख म्हणजे आकाश. हा सूर्य पूर्व ते पश्चिम असे विशाल आकाश रोज आक्रमून जातो,पार करतो म्हणून त्याला खग म्हणतात. 

                    ह्या विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीचे पालन पोषण सोपे का आहे? पण हा पूषा कर्तव्यात तसूभर चूक न करता सर्व भूतमात्रांचे युगानुयुगे  पोषण करत आहे. पालन पोषण करणारा म्हणूनच त्याला पूषा म्हणतात. अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान म्हणून सूर्याला गभस्तिमान म्हणतात. हिरण्य म्हणजे सोने किंवा बहुमूल्य सम्पत्ती. बहुमूल्य सम्पत्ती धारण करणारे विश्व हे ही हिरण्यच आहे. हिरण्यरेता म्हणजे ह्या सर्व विश्वाच्या उत्पत्तीचे बीज. किंवा अग्निस्वरूप. हे रामा, पृथ्वीला अंधार सदैव व्यापून राहत नाही. ह्या अंधाराचे जाळे फेडणारा, आपल्या प्रकाशाने पृथ्वीवर दिवस तयार करणारा हा सूर्य आहे. म्हणून तो दिवाकर आहे.

                         ही सर्व कामे अशक्यकोटीतील आहेत. पण हा सूर्य हसत हसत सहजपणे आणि कुठलीही कसर न ठेवता, कर्तव्यबुद्धीने, नेमाने पार पाडतो. त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्याची कर्तव्य पार पाडण्याची पूर्ण हमी आपण आपल्यामधे अंगभूत व्हावी ह्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले पाहिजेत.  

आदित्यः35 सविता35 सूर्यः36 खगः37 पूषा38 गभस्तिमान्39

सुवर्णसदृशो भानुः40 स्वर्णरेता41 दिवाकरः42।।10

अदिती-पुत्र आदित्य35 विश्वकर्ता सवितृ35 हा

सर्वव्यापी असे सूर्य36 । ओलांडे खग37 हा नभा।।10.1

जगता अन्न देवोनी। पूषा38 पोषीतसे जगा

उजळून जगा टाकी । प्रकाशाने गभस्तिमान39।।10.2

सोनेरी अंगकांतीचा। सोन्यासम झळाळता

भानू40स्वयंप्रकाशी हा। प्रकाशवी जगास ह्या।।10.3

निर्मिते बीज ब्रह्मांडा। बीज तेची असेचि हा।

स्वर्णरेता41 म्हणोनी हा । साकारी जगतास ह्या।।10.4

काळोख दूर सारोनी। प्रकाशवी दिशा दिशा

दिवाकर42 नभी येता । उजाडे दिन हा नवा।।10.5


----------------------------------

श्लोक 11

                ऋषी अगस्ती रामाला पुढे सांगू लागले, ‘‘हे रामा, ह्या प्रकाशमान सूर्याबद्दल तुला अजून माहिती देतो. हा ‘हरिदश्व’ वा ‘हर्यश्व’ आहे.

मित्रांनो,

 घोडा ह्या अर्थी अनेक शब्द आपल्याला माहित आहेत. जसे अश्व, तुरग, तुरंगम, वारु हय. ही घोड्यांचची नावे त्यांच्या विशिष्ट गुणांमुळे व कामांमुळे त्यांना मिळालेली आहेत. ह्या प्रत्येक प्रकारच्या घोड्यांची वेगवेगळी कामे आहेत. युद्धात लढताना वा साधारपणे काही जड ओझ्याच्या कामासाठी वापरण्यासाठी जो तगडा, ताकदवान घोडा वापरतात तो अश्व. (एखादे काम करण्यासाठी लागणारी ताकद अश्वशक्तीत मोजतात.) सूर्याच्या अश्वांनाही मोठे जोखमीचे काम आहे. ते हरिदश्व आहेत. हरि/हरित् चे अनेक अर्थ आहेत. हरित् वा हरि ह्या रंगाचा अर्थ पिवळा, लाखीलाल, तपकिरी असाही होतो. पण प्रत्यक्षात सूर्याचे अश्व हे शुभ्र पाढरे आणि सात आहेत. ते सात रंगात विभागला गेलेला सूर्यप्रकाश एकत्रित केला असता पांढरा प्रकाश तयार होतो. ह्या शास्त्रीय गोष्टीचे आपल्याला गोष्टीरूपातून दिलेले हे ज्ञान आहे. 

हरित् ह्याचा अर्थ हिरवा. अश्व हिरवे असणे शक्य नाही. परंतु सूर्याचा प्रकाश जेथे जेथे भूमीवर पडतो तेथे तेथे पृथ्वीवर हिरव्या वनस्पती किमान गवत तर नक्की उगवते. सूर्याचे किरणरूपी अश्व जेथ जातील तेथे हिरवाई निर्माण करतात. ते पृथ्वीच्या समृद्धीचे प्रतिक आहेत. म्हणून त्यांना हरिदश्व म्हटले आहे. ‘फोटोसिंथेसिस’ ह्या वनस्पतींच्या अन्न बनविण्याच्या प्रक्रियेत सूर्यप्रकाशातील लाल, पिवळे रंग शोषून घेतले जातात. व निळे, हिरवे रंग परावर्तित होतात म्हणूनच झाडे हिरवी दिसतात. ह्यातून पण लालपिवळे घोडे ह्या उक्तीचा अर्थ लावता येईल.

 अर्चिस् म्हणजे किरण, त्याची चमक किंवा अग्नी. सूर्याचे हजारो हजारो किरण दूरवर फैलावलेले असतात. कित्येकवेळा ढगामागून येतांना, किंवा झाडच्या पानांमधून येतांना अशा प्रकाश झोतांचा आपल्याला अंदाज करता येतो. म्हणून त्याला सहस्रार्चि म्हणतात.

सप्त म्हणजे सात. तर सप्तिः म्हणजे घोडे. ज्याच्या रथाला सात घोडे जोडलेले आहेत तो सप्तसप्ति म्हणजे सूर्य होय. मित्रांनो, सर्व रथांना कायम सम घोडे जोडलेले असतात. सूर्याच्या रथाला मात्र सात म्हणजे विषम घोडे जोडलेले आहेत.

मरीचिः किंवा अंशुः म्हणजे प्रकाशकिरण त्यामुळे प्रकाश किरणांनी जो शोभून दितआहे तो मरीचिमान् किंवा किरण वाहून नेणारा म्हणून  अंशुमान्!

अगस्ती म्हणाले, रामा, तिमिर म्हणजे अंधार. सूर्य अंधार दूर करतो, तिमिराचा समूळ नाश करतो म्हणून सूर्याला तिमिरोन्मथन म्हणतात. प्रकाशाचा अभाव म्हणजेच फक्त अंधार असे नव्हे तर अज्ञानामुळे योग्य ज्ञान न होणे हाही बुद्धीचा अंधार आहे. सूर्य अज्ञानही दूर करतो. अज्ञान विलयाला जातं तेथे ज्ञान उदयाला येत. ज्ञानाचा उदय हा कल्याणाप्रत नेणारा आहे.  म्हणून सूर्य कल्याणाची उत्पत्ती करणारा शंभू आहे. (शं म्हणजे कल्याण. भू म्हणजे उत्पन्न करणारा) सूर्याला त्वष्टाही म्हणतात. त्वष्टा भक्तांना मुक्ती देतो.  जगाचा संहार करणाराही हा त्वष्टाच आहे.  हे रामा, मार्तंड हा जगाला जीवनदान देणारा हा महाप्रचंड सूर्यच आहे. जणु काही आपल्या स्वतःच्या जीवनाचे दान देऊन तो ह्या सृष्टीला जोपासत असतो.

 मोर जसा त्याच्या सुंदर पिसार्‍याला स्वतःच्या शरीरासोबत अत्यं ऐटीत वागवत असतो तसा हा अंशुमान आपल्या किरणप्रभेला आपल्यासोबत दिमाखात वागवत असतो.

हरिदश्वः43 सहस्रार्चिः44सप्तसप्ति45 र्मरीचिमान्46

तिमिरोन्मथनः47 शम्भु48स्त्वष्टा49 मार्तण्डकों50ऽशुमान्51।।11

समृद्धी अन्न-धान्याची । देई हर्यश्व43 पृथ्विला

हजारो किरणांचा हा । सहस्रार्चि44 च आगळा ।। 11.1

जातसे सात अश्वांच्या । सप्तसप्ती45 रथातुनी

तेजस्वी किरणांनी हा । मरीची46 शोभतो नभी ।। 11.2

तिमिरोन्मथना47ने ह्या । भेदावे तमजाल हे

तेजःपुंज प्रभेने ह्या । रोजचे कार्य त्या असे ।। 11.3

करे कल्याण शंभू48 हा । विश्वाचे ह्या निरंतरी

मोक्ष देईच भक्तांसी । त्वष्टा49 संहारि विश्वही ।। 11.4

स्वजीवनास शिंपुनी । देई जीवनदान हा

जीववी जीवसृष्टीला । मार्तंडक50 चि हा महा ।। 11. 5

पसारा किरणांचा हा । पिसार्‍यासम वागवी

येता जाता दिमाखाने । आकाशी अंशुमान51 ची ।। 11.6


----------------------------------

श्लोक 12

महर्षी अगस्ती रामाला सांगू लागले,

 रामा, हा सूर्य अनेक खनिजांचं भांडार आहे त्याच्या गर्भात सोन्याचे साठे आहेत. म्हणून त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. किंवा ब्रह्मा हा मोठ्या सोन्याच्या अंड्यातून उत्पन्न झाला असे म्हणतात. ब्रह्मा ह्या विश्वाची निर्मिती करतो त्यासाठी सूर्य हा हिरण्यगर्भ ब्रह्माच आहे.

 शिशिर आणि तपन हे दोन्ही सूर्याचे गुण आहेत. सूर्य पृथ्वीपासून दूर जाताच पृथ्वीवर थंडीचा काळ सुरू होतो. शीतलहर येते. हिमपात होतो.  पण उन्हाळ्यात तो तापलेला सूर्य पृथ्वीला अक्षरशः भाजून काढतो. ज्या पृथ्वीच्या भागांमधे नेहमी अत्यंत थंडी असते ते भाग ह्या तपनाच्या आगमनाने उबदार होतात.  त्यामळे शैत्य आणि तप्तता ह्या दोन्ही परस्पर विरोधी वातावरणाची निर्मिती सूर्यामुळेच होते. मकर संक्रमणापासून दिवस वाढायला लागला की हाच तपन थंडीचा नाश करतो. शिशिर संपून वसंत आणि ग्रीष्म ऋतूंना जन्म देऊन शिशिरनाशन ही होतो. काहीजण शिशिर चा अर्थ आनंददायी असाही घेतात. सूर्य रोज त्याच्या आगमनाने सृष्टीला आनंदित करत असतो हेही रोज आपण अनुभवत असतो. हे रामा दोन्ही परस्पर विरोधी भासणारे गुण माणसाला, विशेषकरून राजाला अंगात बाणवायला लागतात. प्रजापालनाच्यासमयी  मृदुता  ही  प्रशंसनीय व आनंददायी आहे. पण दुष्टांसाठी मृदुता नको. तेथे तपनाचे भाजून काढणेच आवश्यक असते. ज्या प्रमाणे तप्त उन्हाने कीड, तण मरून जातात त्या प्रमाणे शत्रूबाबत घेतलेल्या राजाच्या कडक भूमिकेमुळेच प्रजा सुरक्षित राहते. ह्या रावणाचा विनाश करतांना मनात दयाबुद्धी वा होणार्‍या विनाशाची काळजी नको.

  हा तेजोनिधि तेजोगोल भास्कर  अत्यंत प्रखर  अशा अग्नीला आपल्या अन्तर्भागात बाळगून आहे. आपल्याला माहित आहे की सूर्याचे तपमान काही लाख अंश सेल्सियस आहे. रवीच्या विविध गुणांमुळे तो प्रशंसनीय आहे. हा स्वतः देवमाता अदितिचा पुत्र  आहे. काहींनी शंखचा अर्थ वैभव आणि सुखाचे द्योतक वा आनंद देणारा असा केला आहे. शंख हा रणांगणात योद्ध्याच्या आगमनाचे द्योतक म्हणूनही ही फुंकला जातो.  सूर्यरूपी योद्धा अंधारावर मात करण्यासाठी येत आहे हे वेगळे शंख फुंकून सांगायची गरजच नाही. सूर्य स्वतःच असा शंख आहे की तो नभात येण्याची वर्दी आधीपासूनच सर्व भूतगणांना मिळते.

 

हिरण्यगर्भः52 शिशिर53स्तपनो54 भास्करो55 रविः56

अग्निगर्भो57ऽदितेः पुत्रः58 शङ्खः59 शिशिरनाशनः60।।12

हिरण्यगर्भ52 हा ब्रह्मा । खजिना कांचनी महा

सुखवी जगता सार्‍या । हाची शिशिर53 मानसा।।12.1

देई ऊब जगा सार्‍या। उन्हे देतीच उष्णता

ग्रीष्मात पोळतो सार्‍या । जीवा तपन54 हा महा।।12.2

सर्वांहूनहि तेजस्वी  । आहे भास्कर55  थोर हा

स्तुतिपात्र रवी56 आहे । सर्वांना एकमेव हा।।12.3

मूर्तिमंत असे अग्नी । अग्निगर्भ57 प्रचंड हा

आनंदयात्रि हा शंख59 । आनंद देतसे जगा।।12.4

थंडीसी दूर सारोनी। देतसे ऊब उष्णता

अदिती-पुत्र58 हा मोठा। नित्य शिशिरनाशना60।।12.5

----------------------------------

श्लोक 13

महर्षी अगस्ती श्रीरामांना सांगू लागले,

रामा, हे आकाश पाहिलस--- किती विशाल आहे! ह्या संपूर्ण आकाशाचा स्वामी हा सूर्य आहे. व्योम म्हणजे आकाश आणि नाथ म्हणजे स्वामी, सम्राट! सूर्य हा व्योमनाथ आहे. इतर वेळी आपल्या प्रकाशाने चमचमणार्‍या चांदण्या असोत वा निशानाथ असा चंद्र असो; सर्वांनाच आपल्या पराक्रमाने हा सूर्य तेजोहीन करून टाकतो. त्याच्यासमोर कोणी उभंही राहू शकत नाही. मग अंधाराची काय कथा! हा सूर्य कितीही घनदाट अंधार असेल तरी त्याचा मागमूस ठेवत नाही. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा तमाचा लवलेशही राहू देत नाही. जो ह्या तमाला आरपार भेदतो तो तमोभेदी सूर्य आठव. तुझ्या समोर उभ्या असलेल्या दशाननाच्या मनात, डोक्यात तमोगुणांचं थैमान चालू आहे. मी! मी! आणि मी! ह्या अहंकार रूपी काळोखानी त्याचं मन व्यापून गेलेलं आहे. तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस. तुझी समोर असलेली उपस्थितीच त्याच्या नाशाला पुरेशी आहे.

ऋग्वेद असो, यजुर्वेद असो वा सामवेद असो सूर्याची महति ह्या वेदांच्या/निगमांच्या पलिकडे आहे. ह्या वेदांनाही सूर्याची महती नीटपणे कळलेली नाही. म्हणून सूर्याला ऋग्यजुःसामपारग म्हणतात.

पृथ्वीवरील जलसाठे हे कायम भरलेले ठेवणे, त्यापासून मेघांची निर्मिती होणे, सर्वत्र नियमित पाऊस पडणे,(घन,वृष्टी) ह्या सर्व क्रियांचा जो मुख्य अपांमित्र/ जलमित्र म्हणजे वरूण देवता आहे ती दुसरी तिसरी कोणीही नसून सूर्याचा जलमित्र हा गुण आहे. त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील जलचक्र कित्येक युगानुयुगे अत्यंत नियमतपणे चालू आहे.

साधारणपणे उड्यामारत जाणार्‍या , झेप घेणार्‍या प्राण्याला (हरीण, माकड, इ.) प्लवंगम  म्हणतात. येथे सूर्याला प्लवंगम म्हटले आहे. कारण सूर्याची झेप फार मोठी आहे. पूर्व क्षितिज ते थेट पश्चिम क्षितीज एवढे मठे अंतर तो सहज पार करतो. त्याचा रस्ताही अगस्तिंनी फार सुंदर रीतीने सांगितला आहे.  भारताचा मध्य म्हणजे साधारण मकर वृत्त जेथून पूर्व पश्चिम जाते तेथेच पूर्व पश्चिम विंध्य पर्वताची रांग आहे. त्या विंध्यपर्वताच्या रांगांचाच जणु रस्ता (वीथी) बनवून त्यावरून सूर्याची स्वारी रोज पूर्व-पश्चिम अंतर पार करते. असा तो विन्ध्यावीथीप्लवंगम  आहे.

 ( मित्रांनो, असं म्हणतात, पूर्वी हा विंध्य पर्वत अचानक उंच उंच म्हणजे अगदी हिमालया एवढा उंच व्हायला लागला. (may be due to the movement of tectonic plates in the lithosphere causing continental drift )  त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर नीट पोचेना. म्हणजेच सूर्यसुद्धा आकाशातून नीट भ्रमण करू शकेना. सर्व देवांना, माणसांना काळजी निर्माण झाली. ते महर्षी अगस्तींना शरण गेले. अगस्ती विंध्याकडे गेले. अत्यंत नम्रपणे त्याने ऋषींना साष्टांग दंडवत घातला. आणि ‘‘आपली काय आज्ञा आहे?’’ असे विचारले. अगस्ती म्हणाले, ‘‘मी दक्षिणेकडे चाललो आहे. मी परत येईपर्यंत तू उठू नकोस.’’ अगस्ती दक्षिणेतून परत उत्तरेला कधी आले नाहीत आणि दंडवत घातलेला विंध्य कधी उठला नाही. अशाप्रकारे अगस्तींनी सूर्याचा मार्ग प्रशस्त केला. (ह्या मागील शास्त्र आपल्याला शोधावे लागेल. कारण अगस्ती हा दक्षिणेच्या आकाशातील सर्वात तेजस्वी तारा अगस्ती/Canopus तारकासमूहातील सर्वात मोठा तारा आहे.) प्लवंगमचा अर्थ उड्या मारणारा असा घेतला तर, असा ही अर्थ होतो की, मकरवृत्त आणि विन्ध्यपर्वत भारताचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करतात. उत्तरायण सुरू होताच सूर्य मकरवृत्त किंवा विंध्य पर्वत ओलांडून उत्तरेकडे उडी मारतो तर दक्षिणायन सुरू होता तोच सूर्य विंध्याच्या/ मकरवृत्ताच्या दक्षिणेला उडी मारून जातो.

व्योमनाथ61स्तमोभेदी62 ऋग्यजुःसामपारगः63

घनावृष्टि 64रपां मित्रो65 विन्ध्यवीथीप्लवङ्गमः66।।13

हाचि सम्राट ह्या सार्‍या । गगनाचा असे पहा

व्योमनाथ61 तमोभेदी62 अंधारा नाशितो पुरा।।13.1

ऋग् यजु साम वेदांना। पार ह्याचा कळेचिना63

थोरवी ये न वर्णाया । जयाची निगमांस या।।13.2

निर्मितो मेघ आकाशी। वृष्टीही करितोचि हा64

जलचक्रचि निर्मूनी । करी जलनियोजना65।।13.3

विंध्यपर्वतरांगांचा । प्रशस्त पथ साजिरा

पूर्व-पश्चिम सांधूनी । तयार होतसेचि हा ।। 13.4

मार्गावरून त्या जाई । पूर्व-पश्चिम भास्कर

म्हणून म्हणती त्यासी । विन्ध्यावीथीप्लवंगम ।। 13.5


मित्रांनो, थोडे विषयांतर करून सांगते. आपल्या भारतीय संस्कृतीत ज्ञान  सहजपणे जीवनाचा भाग होऊन रहावे ह्यासाठी गोष्टीरूप केले आहे. शिवाय त्याला इतिहास व वर्तमानाचीही जोड दिली आहे. आपल्याकडे अगस्तीने समुद्र प्राशिल्याची गोष्ट सांगतात.  दक्षिण आकाशात स्थित अगस्ती तारा हा जवळजवळ मे महिन्याच्या शेवटापर्यंत आकाशात राहतो. त्यामुळे तो असेपर्यंत जास्तीजास्त बाष्पीभवन होते. भारताच्या दक्षिण समुद्राचं जास्तीत जास्त बाष्पीभन हे सूर्य आणि अगस्तीच्या प्रकाशाने होते. असे म्हटले जाते. मे महिन्याच्या शेवटी अगस्तीचा लोप होतो. अगस्तीचा लोप झाला म्हणजे अगस्ती दक्षिण आकाशातून दिसेनासा झाला की आठवडाभरात केरळमधे पावसाला सुरवात होते. हे आकाशज्ञान, पर्जन्यज्ञान आपल्याला गोष्टीरूपाने सहजपणे सांगितले जाते पण त्यामागचे शास्त्र जो चिकित्सक असेल त्यालाच कळेल.

---------------------------------------

श्लोक 14

शिवमहिम्नात सोळाव्या श्लोकात पुष्पदंत म्हणतो '' देवा, तुझी प्रत्येक कृती ही भूतमात्रांच्या, ह्या विश्वाच्या कल्याणासाठीच असते. अत्यंत उचित असते पण आम्हाला तिचं आकलन होत नाही. तुझं संहार करणारं तांडव कल्याणकारी असलं तरी आम्हाला अत्यंत भीतीदायक वाटते.''

कृती कल्याणाची, परि न कळते ती तव मुळी

प्रभो सामर्थ्याची उचित असुनी दुःखद कृती ।।

सूर्याचंही तसच आहे. सकाळी सूर्योदयासोबतच प्रसन्नता घेऊन येणारा, अत्यंत आनंद देणारा सूर्य ग्रीष्मात मात्र अत्यंत तप्त असा आगीचा गोळा भासायला लागतो. तो आग ओकायला सुरवात करतो, तेव्हा सर्व प्राणीमात्रांना त्राही त्राही करायला लावतो. अंगातील त्राण जाऊन, घाम घाम होऊन सर्वजण त्रस्त होतात. गलितगात्र होतात; ते ह्या सूर्य नारायणामुळेच! हा तप्त आतपी, हे तप्त वायुमंडल रूपी सूर्य तेव्हा असहय वाटायला लागतो. साक्षात मृत्यूरूपानी पृथ्वीवर तो थैमान घालतो. अनेक झाडं, गवत सुकून जातं. पाणी आटून जातं. पाणी पाणी करत अनेक प्राणीमात्र विव्हल होतात, मरतात. असह्य तापाने हा  रक्त पिंगल म्हणजे रक्तवर्णी सर्वांना त्रासदायक सर्वतापन वाटत राहतो.

सूर्याचं तेज काही साधसुधं नाही. पाच लाख अंश सेल्सियस पर्यंत तापमान असणारा हा महातेजस्वी महातेजा थोडा जरी बघडला तरी सर्व विश्व होत्याचं नव्हतं करू शकतो. ही त्याची कृती कितीही दुःखदायक वाटली तरी जगाच्या सातत्याने  टिकून राहण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. जुने जाऊ द्या मरणा लागून म्हणत नवी पिढी साकारते. पाऊस पडून पुन्हा आनंदाची निर्मिती होते. वसुंधरा कायम नयौवना राहते.

 तो आहे म्हणून हे विश्व आहे. तोच ह्या विश्वाचा जनक आहे. कारण आहे. युगानुयुग तो आकाशात स्थित असून त्याचं काम अत्यंत चोखपणे करत आहे. त्यामुळे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणणारा त्रिकालदर्शी असा सूर्यच आहे. म्हणून त्याला कवि म्हटलं आहे.

जे काय आहे नाही त्या सर्व  दृश्य अदृश्य अशा विश्वाचा , सूर्यमालेचा कर्ता करविता सर्वभवोद्भव तोच आहे.

आतपी67 मण्डली68 मृत्युः69 पिङ्गलः70 सर्वतापनः71

कवि72र्विश्वो73 महातेजा74 रक्तः75सर्वभवोद्भवः76।।14

प्रचंड आतपी67ने ह्या । हाय हाय करे धरा

व्याकूळ जीवसृष्टी ही । उष्णतेने असहय ह्या ।।14.1

प्रकाश किरणांचा हा। तेजोगोल चि मंडली68

साक्षात मृत्यु69 रूपाने । नित्य वावरतो भुवी।।14.2

सोनेरी पिंगला70 हाची । तापवीत असे क्षिति71

कवी72 त्रिकालदर्शी हा । विस्तारे विश्वरूपची73।।14.3

प्रकाशे दिव्य तेजाने । महातेजा74 नभात हा

माणिकासम हा लाल । रक्तवर्णी75 दिसे प्रभा  ।।14.4

निर्मिण्या सर्व विश्वाला । सूर्य कारण एक हा

म्हणुनी वदती त्यासी । लोक सर्वभवोद्भवा76 ।।14.5

---------------------------------------

श्लोक 15

ह्या विश्वातील सर्व ग्रह तारे भ्रमण करत आहेत. आपण सूर्यमालेत पृथ्वीवर राहत असल्याने सर्व बदलांचे गणित हे पृथ्वी ही अचल व केंद्रस्थानी धरून तरी केले जाते वा सूर्य अचल व केंद्रस्थानी धरून तरी केले जाते. वा चंद्र अचल मानून.  गणितात जर अ, ब, क, ड ह्या सर्वांच्याच किमती बदलत राहिल्या तर गणित सोडवता येत नाही. काहीतरी गृहीत धरावे लागते. त्यापटीत सर्वांच्या किमती काढता येतात. सूर्यमालिकेत आपण सूर्य हा एका जागी स्थिर आहे असे समजून पृथ्वी व चंद्र व इतर ग्रह, नक्षत्रांच्या भ्रमणास समजून घेतो. अशावेळी सू्र्य हा सर्व ग्रह, नक्षत्र, तारे यांचा प्रमुख/ स्वामी/अधिप मानूनच बाकी आकाशस्थांचा अभ्यास करता येतो. पंचांगही पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणानुसार बनविले जाते.

पृथ्वीवर किंवा सौरमालेत सूर्य हा तर मुख्य वा शासक आहेच. त्याच्या नियमातच त्याने सर्व ग्रहमालेला बांधून ठेवले आहे. आपल्यासाठी सूर्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच त्याला नक्षत्रग्रहताराणामधिप-- ग्रह, नक्षत्र, तार्‍यांचा मुख्य, त्यांना नियमाने वागायला लावणारा शाासक  म्हणतात.

भावन म्हणजे उत्पन्न करणे, प्रकट करणे, निर्माण करणे.  जो  विश्व उत्पन्न करतो तो विश्वभावन.  भावन चा दुसरा अर्थ कोणाच्या हिताला अनुप्राणित करणे हाही आहे. सूर्य विश्वातल्या सर्व कार्यांना चेतना, चैतन्य देणारा असतो. म्हणून तो विश्वभावन आहे. आपल्या सर्वात जवळचा ग्रह असल्याने सर्वात तेजस्वी आहे. बाकी इतर सर्व तेजस्वी तार्‍यांहून अत्यंत तेजस्वी आहे. त्याचे सर्व गुण पाहता त्याच्या इतका कोणी गणाढ्य मिळणं अशक्य आहे. म्हणून तो तेजसामपि तेजस्वी असा प्रखर तेजाने झळाळत आहे.

त्याच्या वैशिष्टपूर्ण गुणांमुळे त्याला मित्र, रवी, सूर्य, भानू,  खग, पूषण्, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवितृ, अर्क,  भास्कर  अशी12 नावे दिली आहेत ही बारा नावे घेऊन बारा सूर्य नमस्कार घातल्यावर

मित्र, रवी, सूर्य, भानू, । खग, पूषण्, हिरण्यगर्भ, ।

मरीच, आदित्य, सवितृ, अर्क, भास्करेभ्यो नमो नमः ।।

असा पूर्ण श्लोक म्हणून आपण सूर्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो.  

 

नक्षत्रग्रहताराणामधिपो77 विश्वभावनः78

तेजसामपि तेजस्वी79 द्वादशात्मन्80 नमोऽस्तुते ।।15

नक्षत्र ग्रह तार्‍यांचा । स्वामी श्रेष्ठचि एक हा77

रक्षिण्या जग हे सारे। कटिबद्ध असे पहा78।।15.1 

तेजस्वी तेजसांमध्ये। एक सूर्य असे महा79

जयासी देऊनी बारा । नावे गौरविले तया80।।15.2

विशेषणेच त्याची ही। वर्णिती गुण वैभवा

अशा ह्या सूर्य देवासी । नमस्कार असो सदा।।15.3

---------------------------------------

श्लोक 16

पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव ।

 प्रभातीस येशी सारा जागवीत गाव ।

 विधाता जगाचा तूची उधळीत आशा

उजळिशी येतायेता सभोवती जग दिशा ।।

हीच सूर्याची स्तुती अनादि काळापासून आजपर्यंत आपण गात आहोत. भाषा वेगळी पण भावना त्याच! कुठल्याही अपेक्षेविना रोज जीवनदान देणार्‍या, चैतन्याचा वर्षाव करणार्‍या तेजोनिधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या! शब्दही तेच! तेथे कुठली सक्ती नाही. सर्व भावना सहज पोटातून ओठात आल्या की मधला काळाचा लांबचलांब कालखंड शून्य लांबीचा होऊन जातो. मानवी भावना तेव्हाही त्याच कृतज्ञतेच्या होत्या व आजही तीच कृतज्ञता व्यक्त करतात.

पूर्वगिरीवर उदय पावणार्‍या हे पूर्वेच्या देवा आणि पश्चिमाचलावर अस्त होणार्‍या हे पश्चिमेच्या देवा तू आम्हाला वन्द्य आहेस. तुला नमस्कार असो. येथे गिरी आणि अद्रि हे दोन्ही शब्द पर्वत, डोंगर ह्या अर्थी असले तरी ते पूर्व पश्चिम दिशांसंदर्भात वापरले आहेत.

ह्या विश्वात अत्यंत नियमितपणा आहे. सर्व ग्रह तार्‍यांच्या भ्रमणामधे सुसूत्रता आहे. सर्वांच्या हालचाली, मार्ग एकमेकांशी पूरक, एकमेकांच्या अस्तित्वाला बाध न आणणारे आहेत. सूर्य अत्यंत नियमाने वागणारा आहे त्याच्यानुसार सर्व ग्रह, नक्षत्र, तारे (ज्योतिस् - प्रकाशमान) फिरत असतात. त्यालाच सर्व नक्षत्रांचा अधिपती ज्योतिर्गणानां पति मानून खगोल शास्त्र व खगोल गणित पंचांग बनविले जाते.

दिवसाचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आकाशात आला की तेजस्वी तारांगण लोप पावते. सूर्याच्या प्रकाशाच्या आच्छादनाने सारे झाकले जातात. अशा ह्या दिनाधिपती, दिनमणी, अंबरमणी सूर्यदेवाला पुन्हा पुन्हा नमस्कार!

नमः पूर्वाय गिरये81 । पश्चिमायाद्रये नमः82

ज्योतिर्गणानां पतये83। दिनाधिपतये84 नमः।।16

नमस्कार असो माझा । पूर्वेच्या देवते तुला81

पश्चिमेच्याच देवा रे। वंदितो तुज मी सदा82।।16.1

स्वामी जो ग्रह तार्‍यांचा83। देवा त्या वंदितो तुला

दिवसाचा असे स्वामी । वंदितो त्या दिवाकरा84।।16.2


---------------------------------------

श्लोक 17

ज्याला पराभव काय हे माहितच नाही; ज्याच्या विजयाचा डंका तिन्ही लोकी वाजत असतो; रोज ज्याच्या आगमनासोबत त्याच्या लक्षावधी किरणांनी विजयोत्सव चालू होतो; जो साक्षात विजयाचं प्रतिक आहे; सतत साफल्य मिळविण्यामुळे सर्वांनी ज्याचं नावच जय ठेवलं आहे अशा ह्या अदिती पुत्राला आदित्याला नमस्कार असो.

सज्जनांचा दुर्जनांवर विजय; सत्याचा असत्यावर विजय; प्रकाशाचा अंधारावर विजय; ज्ञानचा अज्ञानावर विजय समाजाच्या कल्याणासाठी  अत्यंत आश्वासक, प्रेरणादायी, सज्जनांना धाडस देणारी म्हणून एक विशेष औचित्यपूर्ण महत्त्वाची घटना असते.  धर्म आणि अधर्म ह्या दोन पक्षांपैकी कोणाचाही विजय संभवतो. कित्येकवेळा तर हिंस्रवृत्तीमुळे दुर्जनांचेच पारडे जड ठरते. अशा वेळी सज्जनांची होणारी ससेहोलपट आपण हजारो वर्ष अनुभवत आलो आहोत. पण सज्जनाचा विजय समाजासाठी हा भद्र म्हणजे कल्याणकारी असतो. अंधाराचा नाश करणारा सूर्याचा विजय पृथ्वीसाठी कल्याण करणारा ठरतो. ज्याच्या विजयातून सर्व भूतमात्रांचं कल्याणच होतं अशा जयभद्राला नमस्कार असो.

सूर्याच्या किरणांनाच अश्व मानलं जातं. हे शुभ्र अश्व सू्र्याच्या शुभ्र प्रकाशाचे प्रतिक आहेत. आणि सात अश्व हे सूर्य प्रकाश परावर्तित झाल्यावर दिसणार्‍या सातरंगाच्या प्रकाशाच्या पट्याचे द्योतक आहेत. ही सूर्य किरणे जेथे जेथे पृथ्वीवर पडतात तेथे जणु हरित क्रांतीच घडून येते. पृथ्वीला हिरवंगार करणारे, पृथ्वीला धनधान्याने समृद्ध करणारे, हरित, सुफला करणारे हे अश्व हर्यश्व आहेत.  श्लोक क्रं 11 मधेही हरिदश्व  हे सूर्याचे नाव आले आहे.

अंशु म्हणजे किरण हजारो हजारो प्रकाश किरणांची प्रभा लाभलेल्या ह्या सहस्रांशु अशा अदिती पुत्राला आदित्याला माझा वारंवार नमस्कार असो.

जयाय85 जयभद्राय86 हर्यश्वाय87 नमो नमः

नमो नमः सहस्रांशो88 आदित्याय89 नमो नमः।।17

जयाच्या विजयाचा हो । डंका वाजे सदा भुवी

कल्याणास्तव सर्वांच्या । ज्याचा विजय निश्चिती ।। 17.1

जयाला जयभद्राला । त्याची ह्या नमितोच मी

ऐश्वर्य वसुधेसी दे । हर्यश्वा नमितोच मी ।। 17.2

प्रभामंडल तेजस्वी । उधळी किरणप्रभा

सहस्रांशुस88 त्या आहे। प्रभाती नित वंदना।।17.3

अदिती जी असे माता । देवांचीच पवित्र त्या

अदिती पुत्र आदित्या89 । असो नमन हे तुला।।17.4

---------------------------------------

श्लोक 18

 प्रसंगी अत्यंत कोमल वाटणारा हा सूर्यदेव अत्यंत उग्र रूप धारण करून सर्वांना 'त्राही भगवान' करून सोडतो.  कमळाच्या कळ्यांना आपल्या नाजुक, उबदार, सोनेरी किरणांनी अल्लाद स्पर्श करुन जागवणारा, उमलवणारा प्रभातीचा हा मोहक पद्मप्रबोध दुपारच्या वेळी वा ग्रीष्मऋतुत जणु सर्वांच चैतन्य ओरपून घेतो. असह्य उन्हानी त्रस्त झालेले प्राणीमात्र सावली शोधत, पाण्याच्या घोटाच्या शोधात वणवण फिरायला लागतात.  सर्व जलसाठेही आटून जातात. सूर्याचं हे उग्र रूप असह्य असतं. नेहमी काळजी घेणारी आई रागवली तरी ते जसं हिताचं असतं त्याप्रमाणे, वा मातीच्या भांड्याला छानसा आकार देण्यासाठी आत आधाराचा हात ठेऊन वरून थापी चालवणार्‍या कुंभाराप्रमाणे सूर्याचं उग्र रूपही वसुंधरेच्या हिताचं असतं. म्हणून ह्या उग्र रूपालाही वारंवार नमस्कार असो.

हा वीर एकटाच पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी युगानुयुगे चालू ठेवतो. सारङ्ग म्हणजे सुंदर, चित्तवेधी रंगाचा. सुंदर प्रकाशाचा.  विविध वेळी सूर्याचे रंग विविध आणि चित्ताकर्षक असतात. काहीजण सारङ्गचा अर्थ नभ ओलाडून जाणारा, वा वेगाने जाणारा असाही करतात. अशावेळी सारङ्गला जोडून वीर घेतल्यास, हा वीर सारङ्ग विशाल आकाश रोज एका क्षितीजापासून दुसर्‍या क्षितिजापर्यंत सहज पार करतो. वेगाने आक्रमितो. सूर्यमालेत असणार्‍या सर्व ग्रहांना त्याच्या आज्ञेत, त्याच्या भोवती फिरत ठेवतो. 

ग्रीष्माचे वर्णन करतााना कालिदास म्हणतो, ‘‘प्रचंड सूर्यः स्पृहणीय चन्द्रमा!’’ ग्रीष्मातील हा अत्यंत तीव्र, उग्र, शक्तिशाली, भीषण  जणु काही कोपलेला प्रचंड सूर्य त्याच्या प्रखर उन्हाने पृथ्वीला भाजून काढतो. सूर्याची रूप कुठलीही असोत, वंदनीयच आहेत. ह्या कोमलपणे कमळांना जागं करणार्‍या वा प्रचंड,  उग्र, वीर, सारङ्गाला पुन्हा पुन्हा नमस्कार असो.

नम उग्राय90 वीराय91 सारङ्गाय92 नमो नमः

 नमः पद्मप्रबोधाय93 प्रचण्डाय94 नमोऽस्तु ते।।18

( सारङ्ग -रंगबिरंगी, वेगानी जाणारा )

अत्यंत उग्र90 तेजस्वी। प्रभा प्रखर फाकली

प्रचंड94 शक्तिशाली91 जो। वंदितो देव तोच मी।।18.1 

प्रभावळ जया शोभे । सप्तरंगी सुरम्य ही

क्रमितो पथ जो  वेगे । सारंगा92 नमितो तुसी।।18.2

स्पर्शुनी किरणांनी जो। जागवी कमलां प्रति

पद्मप्रबोध93 देवासी । आदरे वंदितोच मी ।।18.3

---------------------------------------

श्लोक 19

ब्रह्मेशान् अच्युतेशाय नमः  म्हणताना ईश आणि ईशभाव हे दोन्ही शब्द जाणून घ्यायला पाहिजेत. ईश म्हणजे स्वामी, मालक. ज्याच्याकडे ईशभाव हा गुण असतो तोच ईश म्हणण्यास योग्य असतो. ईशभाव म्हणजे दुसर्‍यावर हुकुमत गाजवून त्याच्याकडून आपल्या आज्ञेचे पालन करवून घेणे. राजासाठी हा सर्वात महत्त्वाचा गुण मानला जातो. कारण प्रजेला वेळप्रसंगी चुचकारून वा धाकात ठेऊन तिच्याकडून सुयोग्य गोष्टींचे पालन करून घेणे हा राजाचा अत्यंत आवश्यक गुण आहे. राजाचा प्रजेवर आदरयुक्त दरारा, वचक नसेल तर बाकी सर्वगुण असूनही राजा राज्य करण्यास नालायक ठरतो. येथे तर एकाहून एक श्रेष्ठ, सरस अशा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या एकेका महान विभूतींनाही आपल्या अंकित ठेऊन त्यांना आपल्या मनाप्रमाणे, नियमाप्रमाणे वागायला लावायचं काम सूर्यनारायण करतो, म्हणून तो ह्या तिघांवर सत्ता गाजविणारा ईश आहे.

श्रीमद्भगवत्गीतेच्या 18 व्या अध्यायात श्लोक 43 मध्ये  ‘’दानम् ईश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं’’  म्हटले आहे. हा ईश्वरभाव दुसर्‍यांवर सत्ता गाजवणे, शासन करणे हाच होय. स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या जाणीवेतून, दुसर्‍यांच्या मागर्दर्शनासाठी उपजतच असलेला शासक भाव तोच ईशभाव

सुर असा शब्द घेतल्यास देव, देवता, सूर्य, ऋषि, विद्वान पुरुष तर सूर असा शब्द घेतल्यास सूर्य, नायक, राजा, बुद्धिमान, विद्वान पुरुष वा चंद्र असे अर्थ होतात. सूर्याला आपण देवता मानतोच. सर्वसामान्य माणूस मनन, चिंतन व यम नियम पाळून; मुनी वा ऋषी होऊ शकतो. सूर्यनारायण त्याच्या नियम पाळण्यात अर्धक्षणाचीही चूक करत नाही; म्हणूनच तो ऋषितुल्य आहे. सर्वांवर सत्ता गाजविणारा महानायकही आहेच आहे. सर्व भूतमात्रांना, सूर्यमालेतील सर्व ग्रहांना आपल्या काटेकोर नियमात बांधून आहे. सुराय नमः किंवा सूराय नमः दोन्ही योग्यच आहे.

 कश्यप ऋषींचा पुत्र म्हणून सूर्य जसा काश्यपेय म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे अदितिचा पुत्र आदित्य म्हणूनही सर्वतोमुखी आहे.

वर्चस् म्हणजे वीर्य, बल, शक्ती त्याचप्रमाणे प्रकाश, कान्ति, आभा वा रूप, आकृति. ही सर्व विशेषणे सूर्याला लागू होतात. तो बलवान आहे. शक्तिमान आहे. प्रकाश हा त्याचा अंगभूत गुण आहे. सोनेरी प्रभा त्याच्या भोवताली पसरलेली आहे. प्रत्यक्ष डोळ्यांना तेजोगोलाकृती ह्या दृश्य स्वरूपात दिसणारा देव हेच त्याचे स्वरूप आहे. बाकी देव  देवता सामान्य लोकांना गोचर नाहीत पण सूर्य मात्र आपण रोज पाहू शकतो, अनुभवू शकतो.

तेजोमय, तेजोनिधि , स्वयं प्रकाशने झळाळणारा असे भास्वत असे त्याचे रूप आहे. ह्या पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा नाश ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे. हा काळरूपी सूर्यच सर्व गोष्टींचा नाशही करतो. काळरूपाने तो सर्वभक्षी आहे. किंवा एकदा कृद्ध झाला की सर्व विनाशक, सर्वभक्षी अग्नीप्रमाणे तो आहे. अत्यंत रागीट, क्रोधी, भीषण, भयानक असे त्याचे रुप आहे. ‘‘दुरून डोंगर साजरे’’ ह्या म्हणीप्रमाणे पृथ्वीवरूनच सूर्य आह्लाददायक भासतो; पण पृथ्वीपेक्षा शंभरपट मोठा असलेला हा सूर्य अति प्रचंड उष्णतेने फक्त दाहकच आहे. काही हजार ते काही लाख अंश सेल्सियस तापमान असलेल्या सूर्याजवळ  जाणार्‍या प्रत्येक गोष्टीची त्याच्या प्रचंड तापमानामुळे क्षणार्धात राखच होते. अशा ह्या अत्यंत रौद्र शरीर धारण करणार्‍या भीमकाय, रौद्रवपु सू्र्यदेवाला माझा वारंवार नमस्कार असो.

ब्रह्मेशानाच्युतेशाय95 सूरा96आदित्य97वर्चसे98

भास्वते99 सर्वभक्षाय100 रौद्राय वपुषे101 नमः।।19

( वर्चस् प्रकाश,कांति,आभा । सूर - सूर्य, बुद्धिमान, विद्वान )

ब्रह्मा, विष्णू, शिवाचा जो । स्वामी एकचि ह्या जगी95

सत्ता चालेच सूर्याची । ब्रह्मांडावर सर्वही ।। 19.1

ब्रह्माण्ड नायका सूरा96सुर96 जो देवतासमा

 नमस्कार असो त्याची । सूरासीच पुन्हा पुन्हा ।। 19.2

तेजःपुंज असे वर्चस् । शक्तिशाली प्रतापवान्

भास्वता हाचि तेजस्वी । प्रकाशवी दहा दिशा ।। 19.3

अत्यंत रौद्र रूपाने । सर्वभक्षीच काळ हा

अदितीच्याच पुत्रा त्या  । नमस्कार असो सदा ।। 19.4

---------------------------------------

श्लोक 20

`घ्न’ म्हणजे नष्ट करणारा, विनाश करणारा, क्षति पोचविणारा. हे विशेषण हन् म्हणजे नष्ट करणे, वध करणे, क्षतिग्रस्त करणे ह्या क्रियापदापासून झाले आहे. सूर्य हा नाश करणारा (घ्न) आहे. तो तमस् म्हणजे अंधाराचा, हिमाचा, बर्फाचा, शत्रूंचा आणि कृतघ्नांचा नाश करणारा आहे; म्हणून तो तमोघ्न, हिमघ्न, शत्रुघ्न आणि कृतघ्नघ्न आहे.

सूर्य अंधार शोधत एखाद्या भुयारत जरी गेला तरी त्याला अंधार सापडणार नाही. कारण सूर्यापुढे अंधाराला अस्तित्त्व नाही. अंधाराचा नाश हा सूर्याचा गुणच आहे. सूर्य उगवल्यावर आपल्याला न दिसणारं भोवतालचं जग दिसू लागतं. जगाचं ज्ञान होऊ लागतं. सूर्य हा आपल्या नेत्रांना ज्योती देणारा, अज्ञानाला ज्ञानात बदलणारा आहे. अज्ञानाचा नाश हा त्याचा स्थायी भाव आहे. तमसो मा ज्योतिर्गमय-- मला अंधाराकडून उजेडाकडे नेणार्‍या, अज्ञानाकडून ज्ञानाची दिशा दाखविणार्‍या तमोघ्नाला माझा नमस्कार असो. तमोघ्नाय नमोनमः

सूर्य शीत नाशक आहे. सूर्य आकाशात तळपू लागताच हिम वितळून जाऊ लागतं. वा हिम साचून झालेले कितीही मोठे बर्फाचे थर वितळून जातात. बर्फ वा हिमाचा नाश करणारा हा हिमघ्न शीतकालानंतर येणार्‍या वसंतऋतुत फुलणार्‍या तरु-वेलींना पाण्याच्या रूपात नवजीवन उपलब्ध करून देत असतो. अशा ह्या हिमघ्नाला नमस्कार असो. हिमघ्नाय नमो नमः ।

सूर्य हा शत्रुघ्न आहे. शत्रूंचा नायनाट करणारा आहे. एकमेकांचे असे अनेक शत्रू संभवतात. मग येथे अभिप्रेत असलेला शत्रू कोणता? मित्रांनो, सत्य हे नित्य आणि शाश्वत आहे. त्यात बदल होत नाही. युगानुयुगे पाण्याचे, हवेचे गुणधर्म असो, मानवी स्वभाव असो वा मानवी/प्राणीमात्रांच्या शरीरात होणार्‍या क्रिया असोत, मानवी वा भूतमात्रांच्या कल्याणाचे मार्ग वा रीती असोत त्या तशाच चालू आहेत. मग हे सर्व सुरळीत चालू ठेवायचे असेल तर त्यासाठी नियम आले. त्यांना आपण धर्म म्हणू लागलो. कल्याणाकडे नेणारा मार्ग, पद्धत तोच धर्म! आचारधर्म, विचारधर्म, विवाहधर्म, आपद्धर्म, शेजारधर्म---! स्वार्थी हेतूने हे नियम मोडून निसर्गाला, मानववजातीला इतर भूतमात्रांना त्रास होईल अशा नियमांविरुद्ध उद्दंड वागणार्‍या धर्मविरोधीला रामदासांनी फार सुयोग्य शब्द वापरला आहे धर्मलंड! असा धर्माचा विरोधी तो सर्वांचा शत्रू होय! सूर्य अशा शत्रूंचा नाश करणारा आहे.

छोटी छोटी उदाहरणं घेऊ. पोहण्याचे नियम असतात. गिर्यारोहणाचे नियम असतात. नाही पाळले तर काय? हे वेगळं सांगायला नको. आजारी माणसाने पाळायचे नियम व औषधांच्या पथ्याचे नियम न पाळणं हे सारं त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगायला नको. गाडी चालवायचे नियम न पाळल्याने  आज कितीजण मृत्युमुखी  पडतात हे आपण रोज पहात आहोत.

आम्ही आमचे नियम बनवले आहेत असं राक्षस म्हणतात. ‘‘राक्षसानाम् परोधर्मः परदाराविघर्षणम् ।’’ दुसर्‍यांच्या स्त्रिया पळवणे हाच आमचा धर्म आहे; असे राक्षसांचे शास्त्र सांगते. हे सत्यधर्माविरुद्ध शास्त्र आहे. अशा अधर्मींचा निप्पात एक ना एक दिवस होतोच! नियमांचा महामेरू असलेल्या काळरूपी सूर्यदेवाकडून ह्या अधर्माने वागणार्‍यांचा नाश होतो. अशा ह्या शत्रुघ्न सूर्याला माझा नमस्कार असो. शत्रुघ्नाय नमोनमः।

कृत म्हणजे केलेले. जो केलेले उपकार स्मरत नाही अशा कृतघ्नाचा नाश करणारा सूर्यदेवच आहे. अनेक प्रकारच्या ऐश्वर्याने नटलेली ही वसुंधरा आपल्यासाठी, सर्व जीवमात्रांसाठी अन्न तयार करत असते. आपल्याला सर्व ऐश्वर्य प्रदान करत असते. ह्या वसुंधरेनी आणि ह्या सूर्यदेवानी आपल्यावर केलेल्या उपकारांबद्दल, केलेल्या सत्कृत्यांबद्दल त्यांचे ऋणी राहण्याचे सोडून आपण जर पर्यावरणाचा र्‍हासच होऊ दिला तर आपल्या इतके कृतघ्न आपणच! अशा कृतघ्नांचा नाश काळरूपी सूर्यदेव करतो. अशा कृतघ्नघ्न सूर्यदेवाला वंदन असो. (मी आत्ताच्या काळाला पर्यावरणपूरक योग्य असा अर्थ लावला आहे.)

अमित म्हणजे असीम, अपार ज्याचा थांग लागणार नाही असे! सूर्यदेवाचे रूप अगाध आहे. अशा अमितआत्मन् सूर्याला वारंवार नमस्कार!

वेदांची जी सहा अंग आहेत त्यापैकी ज्योतिष गणित एक आहे. आकाशस्थ ग्रह,तारे, त्यांच्यामधील अंतर वा गमनाचे गणित, वेळोवेळी होणारी ग्रहणं, ग्रह तार्‍यांचा मानवी जीवनावर, मनावर, स्वभावावर होणारा परिणाम, फलज्योतिष अशी त्याची विविध अंगे आहेत. ह्या गणिताचा अभ्यास हा सूर्याला मुख्य आधार मानून केला जातो. ज्योतिषपारंगत असलेल्यांचा स्वामी सूर्यच आहे. ज्योतिषानां पतये नमः।

ज्याच्याकडे दैवी गुण असतात त्यांना देव म्हणतात. ज्या गुणांमधे आपण फेरफार करू शकत नाही, ढवळाढवळ करू शकत नाही, त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही ते दैवी गुण! आपण ना सूर्योदयाची वेळ बदलू शकत ना सूर्याचा मार्ग! ना त्याचा प्रकाश काढून घेऊ शकत ना त्याची उष्णता!  ह्या अत्यंत वंद्यसूर्यदेवाला वंदन मात्र नक्कीच करू शकतो. सूर्यदेवाय नमोनमः।

तमोघ्नाय102 हिमघ्नाय103 शत्रुघ्नाया104मितात्मने105

कृतघ्नघ्नाय106 देवाय108 ज्योतिषां पतये107 नम।।20

अंधारा दूर सारी जो । नष्ट अज्ञान जो करी102

शैत्य हारी उष्णतेने । हिमाचे राज्य जो हरी103।।20.1

निर्दाळी दुष्ट शत्रुंना104। विस्तारा याचि ना मिति105

अप्रमेय कळेना हा । गुणधर्म च व्याप्ति ही105।।20.2

निप्पात करितो जोची । कृतघ्नांचाच ह्या जगी106

नक्षत्र ग्रह तार्‍यांचा । स्वामी हाचि असे नभी107।।20.3

ज्योतिर्विज्ञान सिद्धांता । हाच आधार मानिती107

अशा ह्या सूर्यदेवासी108 । भावे वंदन मी करी।।20.4

---------------------------------------

श्लोक 21

चामीकर म्हणजे सोने. सोन्याला शुद्ध करण्यासाठी अत्यंत प्रखर अग्नी असलेल्या मुशीत घालून ते अग्निप्रमाणे प्रकाशमान होईपर्यंत तापवले जाते. हीण जळून गेलेले सोने जसे चमकत असते त्या प्रमाणे हा हिरण्यगर्भ सूर्य जणु काही सोन्याच्या तळपणार्‍या गोळ्यासारखा दिसतो. त्याची आभा/प्रभा खर्‍या खर्‍या शुद्ध सोन्यासारखी तळपत असते. तप्त चामीकराप्रमाणे आभा असणार्‍या त्या सूर्यदेवतेला माझा नमस्कार असो.

 जो हरण करतो तो हरी. जो प्राणिमात्रांच्या दुःखांच आणि सुखाचंही हरण करतो तो हरी. जो प्राणिमात्रांचं स्वतंत्र अस्तित्त्व हरण करतो आणि स्वस्वरूप बनवितो तो हरी! अशा ह्या हरीरूप सूर्याला नमस्कार असो.

सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. जैवविविधता आहे. हवा, पाणी, नद्या नाले, डोंगर, वृक्षवेली आकाश, ही सुंदर रंगसृष्टी पाहता पहता मनाला थक्क व्हायला होतं. ह्या विश्वाचं इतकं सुंदर शिल्प तयार करणार्‍या ह्या विश्वकर्मा सूर्याला वारंवार नमस्कार.

तमाचा म्हणजेच अंधाराचा जो शत्रू आहे. ज्याच्या असण्यानेच अंधार उरत नाही, आजूबााजूलाही फिरकत नाही. जो बाहेरच्या अंधाराचा नाश करतो; प्रकाश पसरवतो त्याचप्रमाणे अंतःकरणातील अंधाराचा, अज्ञानाचा ही नाश करतो ज्याच्यामुळे चित्तात ज्ञानाचा उदय होतो, त्या अंधाारनाशक सूर्याला, तमोऽभिनिघ्न दिवाकराला नमस्कार असो. रुचि म्हणजे कांति, तेज. अत्यंत तेजस्वी, देदिप्यमान,  सोन्याप्रमाणे चमकणार्‍या सूर्य देवाला नमस्कार.

सूर्यामुळे सर्व क्रिया घडतात. प्राणिमात्र उठण्या,झोपण्यापासून ते अन्न तयार होण्यापर्यंत इतकच नव्हे तर चल अचल सृष्टीतील सारे बदल सूर्यामुळे होत असतात.  पण तो स्वतः कुठलं कार्य कधी करत नाही. तो फक्त साक्षीभावाने आकाशात स्थित असतो. तिन्ही लोकात होणार्‍या सर्व घडामोडींचे तो तटस्थपणे अवलोकन करत असतो.

घरात असलेला दिवा वा घराच्या  भिंती अनेक भल्या बुर्‍या गोष्टींच्या साक्षिदार असतात पण त्या घरातील कुठल्याच घडामडीत भाग घेत नाहीत. सूर्य तर किती युगे अत्यंत नियमानी हे काम करत आहे. तो भूतकाळ, वर्तमान आणि सर्व भविष्यकाळाचाही साक्षी आहे. अशा त्रैलोक्याचा साक्षिदार असलेला सूर्य पाहून वारंवार नमन!

तप्तचामीकराभाय109 हरये110 विश्वकर्मणे111

नमस्तमोऽभिनिघ्नाय112 रुचये113 लोकसाक्षिणे114।।21

मुशीत घालिता सोने । तेजस्वी दिसते जसे

तप्त सोन्याप्रमाणे हा । तेजोगोल नभी दिसे109।।21.1

हरी अज्ञान जीवांचे । हरि110 हा ज्ञान देतसे

देई ना ठाव अंधारा । अज्ञाना ठाव ना उरे ।।21.2

विशाल विश्व हा सारे । विश्वकर्मा111रचीतसे

प्रकाश रूप जो राही113 । उजळी जगता पुरे112।।21.3

क्रिया ज्या घडती लोकी। साक्षी त्यासचि जो असे114

सूर्या त्रैलोक्यसाक्षी ह्या । वंदितो अति आदरे ।।21.4

---------------------------------------

श्लोक 22 

ह्या पृथ्वीवर मृत्यू आणि सृजनाचा, जनन-मरणाचा अखंड खेळ सुरू आहे. जो प्राणिमात्र जन्माला येतो, त्याचा एक ना एक दिवस नाश होतो. सूर्यदेवच काळरूपाने त्यांचा नाश करतो. (भूतं नाशयति एषः ) आणि त्याचवेळी नवीन प्राणिमात्र सातत्याने जन्माला येतही असतात. नवीन जीवमात्र जन्माला येण्याला कारण सू्र्यदेवच असतो. (प्रभुः सृजति) हे जन्ममृत्यूचं चक्र निर्माण करणारा सूर्यनारायणच आहे. सूर्याला येथे प्रभु म्हटलं आहे. प्रभु हा अत्यंत शक्तिशाली, बलवान, सर्वांना त्याच्या नियमाने वागायला लावणारा शासक वा सर्वांचा स्वामी असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांना प्रभु म्हणतात. हा तर ह्यांचाही स्वामी आहे. ह्या तीनही अत्यंत बलशाली अशा देवांकडून जनन, प्रतिपालन आणि मरण हे काम सूर्यदेव करवून घेतो.

 ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रात सारेच जीव अडकलेले राहतात. हे चक्र निर्माण करणारा सूर्यदेव मात्र साक्षीभावाने त्याच्या कर्तृत्त्वाच्या गुंत्यातून पार नामानिराळा असतो.

पृथ्वीवर जन्ममृत्यूचं चक्र घडवून आणण्याचं काम जसं सूर्यनारायण करत असतो, त्याप्रमाणे पृथ्वीवर जलचक्राची निर्मितीही सूर्यदेवच करत असतो. आपल्या जाळणार्‍या, दुःखद अशा उष्णतेने पृथ्वीला तापवून (तपति) पृथ्वीवरील सर्व पाणी पिउन टाकतो, (पायति एषः) म्हणजेच सारे जलसाठे बाष्पीभवनाने सुकवू टाकतो. आणि हाच वर्षाकाळी पृथ्वीवर जलवर्षाव करून (वर्षति एषः) पृथ्वीला भिजवून टाकतो. नवसंजीवन देतो. त्याच्या सोनेरी किरणांचा पिसारा लाख लाख योजने पसरवून हा (गभस्ति) आकाशमार्गे प्रवास करतो. अशा ह्या सूर्यनारायणाला नमस्कार असो.

नाशयत्येष वै भूतं115 । तदेव सृजति प्रभुः116

पायत्येष117 तपत्येष118 वर्षत्येष119 गभस्तिभिः।।22

( पायति – शोषून घेणे, सुकवणे, कोरडे करणे मूळ क्रियापद/धातू पै (भ्वादि परस्मैपदी) )

जन्म घेती जगी प्राणी । नाश त्यांचा करी115 रवी

करे निर्माण सृष्टीसी । सूर्यदेव निरंतरी116।। 22.1

सांभाळी जीवसृष्टीला । प्रभु हा सर्वतोपरी

स्वामीच सर्व सृष्टीचा । चालवे जग सर्वही ।। 22.2

करुनी तप्त ही पृथ्वी । उष्णतेने स्वतःचिया

आटवी जलसाठ्यांसी । करे शुष्क धरेस ह्या ।। 22.3

फिरुनी नवमेघांसी । करे निर्माण सूर्य हा

भिजवी जलवर्षावे । वसुधेसचि हा पुन्हा ।। 22.4

किरणे फाकती त्याची। पिसार्‍यासम ही पहा

प्रभावानेच त्याच्या ह्या । घटना घडतीच ह्या ।। 22.5

शक्तिशाली गभस्तीला । नमस्कार असो सदा ।। 22.6

---------------------------------------

श्लोक 23

मित्रांनो, रोज रात्री आपण झोपतो. झोपल्यावर सुद्धा आपल्या शरीरातील श्वासोच्छ्वास, हृदयाचं स्पंदन, रक्ताभिसरण, असे अनेक व्यवहार चालूच राहतात. इतकच काय काही वेळा मेंदुसुद्धा सतर्कपणे जागाच असतो व काही बर्‍या वाईट घटनांची नोंद घेत असतो. अनेक न उकलेल्या गुंतागुंतीच्या गोष्टींची उकल करून बघत असतो. हे जे झोपलेल्या शरीरातील जागेपण आहे (एष सुप्तेषु जागर्ति) तो प्रत्यक्ष सूर्यनारायणच आहे.  इतकेच का झोपलेल्या शरीराला पहाटे जाग आणण्याचं कामही सूर्ययनारायणच करतो. सर्व भूतमात्रांच्या अंतर्स्थित होऊन म्हणजे शरीरात राहून जो जागृत असतो तो सूर्यनारायणच आहे.

भूतमात्रांमध्ये असलेलं कौशल्य, स्वतःविषयी असलेलं ज्ञान, किंवा  चरम सीमेपर्यंत होणारी ज्ञानाची होणारी निष्पत्ती व कोऽहं हया अंतःकरणात उठणार्‍या प्रश्नाला मिळणारं सोऽहं ! हे उत्तर, ते परा ज्ञान, ती ज्ञानाची अनुभूति ही सूर्यदेवांमुळेच शक्य आहे. ही अनुभूति म्हणजेच प्रत्यक्ष सूर्यदेवांचं स्वरूप आहे.

सूर्यदेव हे प्रत्यक्ष अग्निरूपाने आपल्या शरीरात राहत असतात. आपण जेवणापूर्वी  श्लोक म्हणताना म्हणतो, ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’’ आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी लागणारी उष्णता आपल्याला सूर्याकडून मिळालेली असते. जणुकाही आपल्या पोटात दररोज होणारा हा यज्ञ आहे. तो यज्ञ हा सूर्यच आहे. आपल्या शरीरातील अग्नितत्त्वाच्या रूपात असलेली चेतना ही सूर्यचेच तेज आहे. आपल्या शरीरातील हे अग्निहोत्र हे सूर्याचेच स्वरूप आहे त्याच प्रमाणे निसर्गामधेही गुप्तपणाने अग्निरूपात सूर्यनारायण वास्तव्य करत असतो. भले तो लाकडात गुप्तरूपाने रहात असेल वा गारगोटीच्या दगडात. पृथ्वीवरील अग्नी हा सूर्याच्याच  अस्तित्त्वामुळे स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करतो व टिकवूनही ठेवतो.  ह्या अग्नितत्त्वामुळे निर्माण झालेली ही सृष्टी  म्हणजेच अग्निहोत्राचे फळ तेही सूर्यनारायणच आहे.


एष सुप्तेषु जागर्ति120 भूतेषु परिनिष्ठितः121

एष चैवाग्निहोत्रं122 च फलं चैवाग्निहोत्रिणाम्123।।23

(परिनिष्ठा – पूर्ण ज्ञान, पूर्ण परिचय, पूर्ण निष्पत्ति, चरम सीमा. परिनिष्ठित - पूर्ण कुशल, सुनिश्चित )

अग्नितत्त्वाचियारूपे । सर्व भूतात हा दिसे

झोपलेल्या शरीरीही । जागा नित्य दिसे दिसे120।।23.1

दक्ष राही कमालीचा । चालवी व्यवहार हे

प्रत्येक भूतमात्रांचे । काटेकोरपणे असे121 ।।23.2

टिकवी अग्नितत्त्वासी । अग्निहोत्रचि हा असे122

 फळही अग्निहोत्राचे123 । सूर्यनारायण असे।।23.3

---------------------------------------

श्लोक 24

ज्यांच्यात दिव्य, स्वर्गीय, दैवी गुण आहेत ते देव. थोडक्यात जे गुण मानवात नाहीत वा ज्या गुणांचं नियमन मानव करू शकत नाहीत ते दैवी गुण. जन्म, मृत्यू वा निसर्गात होणारे बदल, उन, पाऊस, ग्रह, नक्षत्र तार्‍यांची गती ह्या सारख्या असंख्य गोष्टी मानवी कर्तृत्त्वाच्या बाहेरच्या आहेत. हे घडवून आणणारा देव हा सूर्यनारायणच आहे.

क्रतुः म्हणजे यज्ञ. एखाद्या मानव-कल्याण वा सर्व भूतमात्रांच्या हिताच्या इच्छेनी केलेलं पवित्र कृत्य म्हणजे यज्ञ. त्यात भक्ति आहे, पावित्र्य आहे, त्याग आहे. क्रतुचा अर्थ प्रज्ञा, बुद्धि, शक्ति, योग्यता हाही आहे. सर्व विश्वाच्या कल्याणासाठी, त्याच्या अस्तित्त्वासाठी सूर्यदेव जणु स्वतःचीच आहुति देत असतो. स्वतः जळून सर्वांना उष्णता, प्रकाश देत असतो. तो स्वतःच यज्ञदेवताही आहे. ज्ञही आहे आणि यज्ञातून प्राप्त होणारं उत्तम फळही आहे.

 जी जी कृत्य त्रैलोक्यात घडत असतात ती ती घडवून आणणारा, त्या सर्वांचं फळ देणारा अत्यंत शक्तिमान, बलशाली अत्यंत कर्तृत्त्ववान असा देव आहे. बाकी सर्व देव त्याच्या अंकित आहेत.

थोडक्यात, हे राघवा! हा सूर्यनारायण एकटाच असला तरी सर्वांना त्यांच्या बर्‍यावाईट कृत्याचं फल देण्यासाठी तो एकटाच समर्थ आहे. ह्या विश्वाचा अति प्रचंड गाडा तो सहज स्वतःच्या सामर्थ्यावर चालवत आहे. ना त्यासाठी त्याला कोणती मदत आवश्यक आहे वा ना कोणी त्याला मदतीसाठी आवश्यक आहे. हे राघवा! हे तू लक्षात घे.  सामर्थ्यवान पुरुष एकटाच सर्व विश्वाला नमवू शकतो. तू तो सामर्थ्यवान पुरुष आहेस. हतोत्साह होऊ नकोस. एखादा छोटासा ढग क्षणकाळासाठी सूर्याला झाकू शकतो. तशीच तुझी चिंता ही क्षणिक आहे. ती ही दूर होईल आणि तू विजयश्री प्राप्त करशील.

देवाश्च124 क्रतवश्चैव125 क्रतूनां फलमेव च126

यानि कृत्यानि लोकेषु127 सर्वेषु परमप्रभुः128।।24

यज्ञांची देवता सार्‍या124। सविता एकची असे

यज्ञ सारे125, फळे त्यांची126 । सर्वकाही च   सूर्य हे।।24.1

क्रिया ज्या घडती लोकी। थांबती ना कधी कधी127

तयांचे फळ देण्यासी । समर्थ एकटा रवी128।।24.2

---------------------------------------

श्लोक 25

अगस्ति ऋषींनी श्रीरामाना अत्यंत प्रेमाने हाक मारली, ‘‘हे राघवा!’’ त्यांनी उच्चारलेल्या त्या राघवा ह्या एका नावात काय साठलं नव्हत! जणू महर्षी अगस्ती सांगत होते, रामा, अरे तू रघु कुलात उत्पन्न झाला आहेस. तुझ्या पूर्वजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ज्या रघु राजाच्या नावावरून तुमचा वंश आज ओळखला जातो त्या रघुराजाने वेळप्रसंगी इंद्रालाही युद्धात मदत केली होती. तोच रघुराजा आपल्यावर चालून येत आहे हे नुसतं ऐकता क्षणीच इंद्राने कुबेराला त्याच्या राज्यात धनाची वृष्टी करण्याचा आदेश दिला. ज्या रघुचा पराक्रम असा, त्याच्या वंशजाचा पराक्रम तर त्याच्याहून ही मोठाच असणार. राघव ह्या एका हाकेतच ऋषीवरांनी रामाला प्रोत्साहित केलं. राम सूर्यवंशी होता. त्याचे पूर्वज सूर्यासारखे पराक्रमी होते ह्याची आठवण देत महर्षी म्हणाले,

‘‘श्रीरामा! जेव्हा माणूस घोर संकटात सापडलेला असतो, घनदाट भयानक रानात अडकलेला असतो, भीतीने ग्रासलेला असतो अशावेळी सूर्यदेवांचं स्मरणं केलं तर खिन्नता, उदासी, आपण असफल होऊ अशी मनात दाटलेली भीती कधीच दूर पळून जाते.’’

मित्रांनो, आपण कायम अत्यंत सत्शील, गुणी नेत्यांच्या अलौकिक शौर्याच्या, धैर्याच्या गोष्टी मुलांना सांगतो. त्यातून मुलांच्या व आपल्या मनालाही कायम उभारी येते. आपण त्या शूरवीराच्या जागी आपल्याला कल्पून, आपणही त्याच्याप्रमाणे मोठा पराक्रम करणार आहोत असे मनाला सांगतो. एकदा का मनात उत्साहाचा संचार झाला की माणूस अशक्य ती कामे शक्य करू दाखवतो.

कृच्छ्र म्हणजे अत्यंत कष्ट, पीडा देणारं, घोर संकट. तसेच अत्यंत कष्टसाध्य, कठोर शारिरिक तप, तपस्या, प्रायश्चित्त ह्यालाही कृच्छ्र म्हणतात. एखादी असाध्य वाटणारी कृती साध्य करून दाखवणं हे एक प्रकारचं खडतर तपच आहे. रावणाशी युद्ध ही सोपी गोष्ट नव्हतीच. श्रीरामांच्या संघटन कौशल्याची परीक्षा होती. जेथे कोणीही आपले आप्तजन नाहीत अशा प्रदेशात तेथील वनवासी, गिरीजन, स्थानिक ह्यांच्या मनात पराकोटीचा विश्वास उत्पन्न करून त्यांची सेना उभारून त्या सेनेचे कुशल नेतृत्व करून सुयोग्य संचलन, नियोजन करून अत्यंत हिमतीने रावणाशी लढणे हे फक्त श्रीरामच करू शकत होते. संकटे कितीही असोत , मधे विशाल समुद्र असो वा लंकेचा कडेकोट बंदोबस्त! ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ असताना विजय निश्चितच श्रीरामांच्या बाजूने होता.

तरीही वडिलांच्या नात्याने त्यांना हे सांगून त्याच्या पाठीवर धीराचा हात ठेवणारा कोणीतरी अनुभवी, ज्ञानी, जाणकार असणंही आवश्यक होतं. ते काम ऋषी अगस्तींनी केलं. अगस्तीऋषींचा स्वतःचा जीवनपट अत्यंत घोर कष्टातून यशाकडे जाणारा होता. फक्त स्वतःचा नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारताचा विकास, समृद्धी ही अगस्तींमुळेच झाली होती. त्यामुळे श्रीरामाला धीर देण्यासाठी ऋषी अगस्ति हेच एकमेव योग्य व्यक्ती होते. ते श्रीरामांना सांगत आहेत,

एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च

कीर्तयन्पुरुषः कश्चिन्नावसीदति राघव।।25

राघवा येतसे जेव्हा । विपत्ती, कष्ट,संकटे

कष्टसाध्य असो रामा। मार्ग दुर्गम तो पुढे।।25.1

भयाने ग्रासिले जेंव्हा । करावे काय ना कळे

अशावेळीच सूर्याची । स्तुति गाता फळ मिळे।।25.2

दुःख त्याचे पळे दूरी । उदासी ना उरे हृदि

उत्साहाचा घडे मोठा । लाभ त्यासी हितकरी”।।25.3

---------------------------------------

श्लोक 26

ऋषी अगस्ती म्हणाले, बाळा, मी तुला जे आदित्यहृदय स्तोत्र सांगितले आहे, तो सूर्याच्या गुणांचा, पराक्रमाचा जणु गाभा आहे. त्या गुणांचं त्याच्या पराक्रमाचं अत्यंत एकाग्र चित्तानी मनात स्मरण कर. संपूर्ण सूर्यमालेचा स्वामी, जगत्पती, देवांचाही देव असलेल्या ह्या सूर्याच्या पराक्रमाचे तीन तीन वेळा तुझ्या मनात स्मरण कर. तिनदा हे स्तोत्र म्हण. तुझ्या मनातील भय, अनिश्चितता, किंतु, परंतु, चिंता सर्व दूर होईल. एका दिव्य तेजाने, निश्चयाने तुझं मन उजळून निघेल. युद्धात तू विजय मिळवशील!

मित्रांनो, एक अद्वितीय पराक्रम करणारा वीरच दुसर्‍या वीराला असं धाडस देऊ शकतो. अशी स्फूर्ती, स्फुरण, चैतन्य देऊ शकतो. उजळून निघालेल्या दिव्यावरच दुसरा दिवा स्वतःला उजळून घेउ शकतो. त्राटिकेनी ज्यांची सर्व मुलं खाऊन टाकली होती असे ऋषीवर अगस्ती उत्तर भारतातून दंडकारण्यातून दक्षिण भारतात कायमच्या वास्तव्यास आले होते. असं म्हणतात की कावेरी नदीचा स्त्रोत वळवून त्यांनी तिला जीवनोपयोगी केलं. तर तामिळ भाषेचे व्याकरण लिहिणारे अगस्ती हे पहिले ऋषी मानले जातात. अशा अत्यंत तेजस्वी ऋषीवरांनी राघवातील चैतन्य जागृत केलं.

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम्

एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयष्यति।।26

“एकाग्र करुनी चित्ता । रामा तू आठवी रवी

नियंता जगताचा हा । शक्तिमान जगत्पति।।

तीनवेळा जपूनीया । आदित्यहृदया हृदी

जरी पूजन सूर्याचे । श्रद्धा भक्तीच ठेउनी ।।

करशील जरी रामा । जसे सांगीतले  तुसी

वरेल विजयश्री ही । निश्चयाने तुला युधी।।

 

---------------------------------------

श्लोक 27

महर्षी अगस्ती राघवाला संबोधतांना म्हणाले, ‘‘हे महाबाहो!’’ शब्दशः महाबाहू म्हणजे, ज्याचे हात लांब आहेत, अगदी गुडघ्यापर्यंत लांब आहेत (आजानबाहू) त्याला महाबाहू म्हटलं जातं. चक्रवर्ती राजाचं ते लक्षण मानतात. परंतु त्यात अजून एक गभितार्थ आहे. ‘‘हे रामा तुझा पराक्रम अगाध आहे; अद्वितीय आहे. तुझ्या कर्तृत्त्वाला सीमा नाही. तुझे हात दुष्ट दुर्जनांना शासन करण्यास कितीही लांब पोचू शकतात. भूमी वा समुद्रातील अंतर पार करूनही तू धर्मद्वेष्ट्यांना शासन करू शकतोस असा अर्थ ध्वनित होतो. रामाची अशी स्तुती करत ऋषीवर रामातील सद्गुणांची रामाला जणु पुन्हा पुन्हा जणु ओळख करुन देत होते. त्याच्यामधील आत्मविश्वास जागवत होते.  राम परत एकदा खंबीर मनाने, उत्साहाने सळसळत युद्धाला तयार आहे हे पाहिल्यावर अगस्ती म्हणाले, ‘‘रामा, आता वाट कसली बघतोस! हे महाबाहो, हाच तो योग्य क्षण आहे. ह्या क्षणी रावणाला तू ठार मार. असं म्हणून ऋषी अगस्ती तेथून निघून गेले.

मित्रांनो, हा श्लोक वाचकांना विचार करायला लावणारा आहे. कारण आपल्याकडे सिद्ध स्तोत्र वा मंत्रांमधे काही खास माहिती गुप्तपणे ठेवलेली असते. जमिनीवर घडलेल्या गोष्टींची बेमालूम सांगड आकाशस्थ घडामोडींशी घातलेली असते.

ऋषी अगस्ति जर देवदेवतांना घेऊन युद्ध पाहण्यासाठी आले होते. (दुसर्‍या श्लोकात तसा उल्लेख आहे. दैवतैश्च समागम्य । द्रष्टुमभ्यागतो रणम् । उपगम्यब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा।।2.) तर मग रामाला उपदेश करून निघून का गेले? असा प्रश्न निर्माण होतो.

अशावेळी पृथ्वीचा व दक्षिणेकडच्या आकाशाचा विचार केला तर दक्षिण आकाशात मे महिन्याच्या शेवटी जेव्हा अगस्ति ह्या तार्‍याचा अस्त/लोप होतो त्यानंतर आठवडाभरात केरळ, लंका व दक्षिण भारतात पावसाला सुरवात होते. असा उल्लेख मी वाचला आहे. तसेच तेव्हा विषुववृत्ताच्या वर व खाली 100 अक्षांशापर्यंत वादळे निर्माण होऊ लागतात. हा बदल उत्तर गोलार्धात वादळे, पाऊस आणणारा आहे.

म्हणजे अगस्तिचा अस्त झाल्यावर अंदमान, निकोबार, लक्षद्वीप केरळ आणि श्रीलंकेत धुँवाधार पावसाळा सुरू होण्याच्या आठवडाभर आधी श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून त्याला ठार मारलं असेल का? ऋषी अगस्तीही रामाला सांगत आहेत. हीच वेळ आहे जेव्हा तू रावणाला ठार मारू शकशील. खगोलशास्त्राच्या व भविष्य शास्त्राच्या अभ्यासकांनी ह्यावरील माहिती जरूर द्यावी.

अस्मिन्क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि

एवमुक्त्वा तदाऽगस्त्यो जगाम स यथागतम्।।27

 ह्याक्षणी हे महाबाहो । शक्य आहे तुलाचि हे

रावणा वधण्याचे हे । स्वप्न सत्यात आणणे”।।27.1

रामास बोलुनी ऐसे। अगस्ति ऋषि थोर ते

जसे आले तसे गेले । क्षण एक न थांबले।।27.2

---------------------------------------

श्लोक 28, 29, 30, 31

मागच्या श्लोकात अगस्तीऋषी रामाला ‘‘ह्याक्षणीच रावणाला ठार मार!’’ असे सांगत होते. आता ह्या श्लोकांमधे तर स्वतः सूर्यदेवच रामाला सांगत आहेत, ‘‘रामा, रावणाचा काळ जवळ आला आहे. आता तू त्वरा कर.’’

भारताच्या किनारपट्टीवर होणारा पाऊस किती जोरदार स्वरूपाचा असतो ह्याचा उत्तरेकडून आलेल्या लोकांना अंदाज येत नाही. त्यासाठी सूर्य, अगस्ती ह्या तार्‍यांच्या आकाशातील स्थानावरून पाऊस व हवामानाचा अचूक अंदाज काढला जात असावा. ज्ञानेश्वरीच्या 18 व्या अध्यायात 33 व्या श्लोकाच्या निरूपणात 35 व्या ओवीत ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, ‘‘का ‘‘का अगस्त्याचेनि दर्शने । सिंधु घेऊनी ठाती मौनें ।’’ म्हणजे ‘‘अगस्तीचा होता उदय। समुद्र जेवी शांत होत’’  अगस्ती असतांना शांत असलेला समुद्र अगस्तीचा अस्त होताच खवळतो. वादळवारे वाहू लागतात असे उल्लेख सापडतात. असो! खगोलशास्त्राच्या व भविष्य शास्त्राच्या अभ्यासकांनी ह्यावर माहिती जरूर द्यावी.

गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘‘पार्थ अरे हे कौरव सैन्य मी आधीच नष्ट केलेलंच आहे. तू फक्त त्यांना ठार मारायचे निमित्त हो. ‘‘मयैवैते निहताः पूर्वमेव । निमित्तमात्रं भव सव्यसाची।’’ (अध्याय 11 श्लोक 33) जणुकाही त्याप्रमाणेच सर्व देवगणांमधे बसलेले सूर्यदेव रामाला सांगत आहेत, रावणाचा काळ तर आलेलाच आहे, तू फक्त आता बाण मार. रामा आता त्वरा कर.

इतकावेळ हतोत्साह झालेल्या रामाला अगस्तींच्या धीर देण्यामुळे उभारी निर्माण झाली. रामाच्या अंगातून जणु चैतन्य सळसळू लागलं. मनातील सर्व निरुत्साही विचार दूर झाले होते. शोक, चिंता नावालाही शिल्लक नव्हती. समोर असलेल्या साक्षात सूर्यनारायणांना पाहून त्याने आदित्यहृदय एकाग्रपणे तीनदा पठण केलं. तीनदा आचमन केलं. आणि मग त्याचं विजयी धनुष्य हाती घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने, अत्यंत हर्षाने त्याने रावणाकडे दृष्टिक्षेप टाकला.

सुहृत् हो! परत एक छोटीशी वाटणारी मोठी गोष्ट आहे. रामानी रावणाकडे पाहिलं. आता राम आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्याने त्याच्या नजरेतूनच तो आत्मविश्वास व्यक्त होत होता. तो आत्मविश्वास रावणाला नक्कीच बिथरवून गेला असणार. रामाची सत्याची बाजू बलवान अशा अधर्मापुढे अनेक पटींनी जास्त झळाळणारी आहे हे रावणाला कळून चुकलं असणार!

असं म्हणतात वाघाला झाडावर चढता येत नाही पण त्याच्या पोटात अनेकवेळा माकडाचे केस सापडतात. माकडे झाडावर राहणारी असूनही वाघाची भक्ष्य कशी होतात ह्याचा अभ्यास केल्यानंतर मारुती चित्तमपल्लींनी सांगितलं की वाघ झाडावरच्या माकडांकडे नुसतं भेदकणे पाहतो. त्याच्या त्या नजरेनेच माकडं जणु गर्भगळित होऊन नुसत्या भयानेच झाडावरून खाली पडतात व वाघाचे भक्ष्य होतात. नजरेत मोठी ताकद असते. ती जर आत्मविश्वासपूर्ण व सत्याची असेल तर त्यापुढे असत्य टिकू शकत नाही. रामानी रावणाकडे नुसतं पाहताक्षणीच  मोठमोठ्याने आरडाओरडा करणार्‍या रावणाला आपला मृत्यू कळून चुकला असावा. मनातून तो घाबरून गेला असावा. त्याचवेळी सर्व देवदेवतांमधे बसलेले सूर्यनारायण रामाला म्हणाले, रामा! रावणाचा काळ जवळ आला आहे. रामा आता त्वरा कर.  आणि रामाचा बाण रावणाला वधून गेला.

 

एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत् तदा।

धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्।।28

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्

त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्।।29

रावणं प्रेक्ष हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्।

सर्वयत्नेन महता वधे तस्य धृतोऽभवत्।।30

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः।

निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति।।31

 

ऐकुनी स्तोत्र हे सारे। अगस्तींच्या मुखातुनी

निमाला शोक रामाचा । चिंता ही ना उरे मनी।।

केले ग्रहण स्तोत्रासी। प्रसन्न होऊनी मनी

देदिप्यमान सूर्यासी। भावे जोडुन अंजुली।।

तीन आचमने घेई। तीन वेळा जपे स्तुती

पाहुनी सूर्यदेवासी । राम संतोषला मनी।।

पेलुनी आत्मविश्वासे । धनु कोदंड ते भले

रावणाच्याच डोळ्यांसी । डोळे भिडविले असे ।।

उत्साह संचरे अंगी । दृढसंकल्प तो दिसे

विजयाच्याच ईर्षेने। श्रीराम सरसावले ।।

संकल्प दृढ तो केला। रावणासी वधीन मी

आवेश थोर तो होता । राघवाच्याच अंतरी।।

पाहुनी निश्चयासी त्या। प्रसन्न जाहले तयी

उभे होते समुही जे । देवतांच्या मधे रवी।।

 

निशाचरास त्यावेळी। लंकाधीशास त्या बळी

महापापीच दैत्यासी। उन्मत्तासीच त्याक्षणी

काळ आला गिळायासी। रावणासीच पाहुनी

बोलले रामचंद्रासी । सूर्यदेवचि त्याक्षणी।।

जाऊनी जवळी त्याच्या,। “रघुनंदन श्रीपती,

धर्नुधरा महावीरा । रामा आता त्वरा करी”।। 28,29,30,31

---------------------

रथसप्तमी। 6 फेब्रुवारी 2014

No comments:

Post a Comment