कनकधारास्तोत्रम् (विश्लेषण)

 

  श्री

कनकधारास्तोत्रम् 


आपल्या धर्मात सांगितलेल्याा चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम ह्या तीन आश्रमांचे अस्तित्त्व एकमेव अशा दुसर्‍या म्हणजे गृहस्थाश्रमावर अवलंबून आहे. धन्यो गृहस्थाश्रमः। म्हणतात ते काही उगीच नाही. सर्व आश्रमांच्या सुचारू व्यवस्थेसाठी लागणारं धन हे गृहस्थाश्रमातूनच मिळतं.  जसं पावसाचं पाणी ठिकठिकाणी मुरून; पर्वतावर साठलेल्या जलाशयातून, सरोवरातून उगम पावणार्‍या अनेक नद्यांचे प्रवाह विविध दिशांना वाहून जनजीवन समृद्ध करतात त्याप्रमाणे अनेक उपक्रमातून उपलब्ध झालेलं धन ह्या नद्यांप्रमाणेच संपूर्ण समाज जीवनाला समृद्ध करतं. (आज GST मधून संकलित झालेला पैसा विविध लोकोपयोगी प्रकल्पांसाठी वापरला जातो.)  धनाबद्दल हाव ठेऊ नये हे जरी खरे असले तरी आपल्या धर्माने मोठा पुरुषार्थ दाखवून धनसम्पत्ती मिळविण्यासाठी कायम आपल्याला उद्युक्त केले आहे. कार्यकुशल आणि मेहनती पुरुषाकडेच धनसम्पत्ती आपणहून चालत येते. लक्ष्मी त्यालाच वरते.

‘माझं नशिबच फुटकं, माझं दैवच अनुकूल नाही’ असल्या भाकड गोष्टींवर आपला धर्म कधी विश्वास ठेवत नाही. दैव अनुकूल नसेल, तर कर्म कुशलता प्राप्त करून प्रचंड परिश्रम करून नशीब ही बदलता येतं; असेच आपले पूर्वज सांगतात. परिश्रमानेही जर एखादी गोष्ट साध्य झाली नाही तर हतबल न होता; परत आत्मपरीक्षण करा. आपल्या प्रयत्नांमधे कोठे कमी आहे वा दोष आहे ते शोधून परत एकदा सर्व शक्ती पणाला लावून आपले साध्य जिंका. दैवावरही विजय मिळवा असे प्रोत्साहन वारंवार अनेक श्लोकांमधून आपल्याला दिले आहे.

उद्योगिनं परुषसिंहम् उपैति लक्ष्मीः

दैवेन देयं इति कापुरुषाः वदन्ति ।

दैवं निहत्य कुरु पौरुषम् आत्मशक्त्या

यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः ।।

ह्या उलट ‘दारिद्र्यदोषो गुणराशि नाशी’ म्हणजेच दारिद्र्यापुढे सर्व गुण कसे निस्तेज ठरतात हे काही सांगायला नको. दान, धर्म, दया ह्या सर्व गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी तुमच्याकडे विपुल धन असेल तरच सम्भव असतात. प्रचुर धन मिळवून आलेलं वैराग्य, त्याग हा शोभनीय आहे पण दारिद्र्यातून वैराग्य, त्याग संभवत नाहीत. किंबहुना जेथे सर्व ऐश्वर्य आणि त्या ऐश्वर्यातून उत्पन्न झालेलं वैराग्य निवास करतं अशा ठिकाणीच चंचल असलेली लक्ष्मी स्थिरपणे राहते. कायमचा निवास करते. अर्थात असं एकमेव स्थान आहे ते म्हणजे सर्वगुणसम्पन्न श्रीहरी विष्णू! जेथे सर्व गुण एकवटले आहेत तथेच लक्ष्मी स्थिर असते. गुणांच्या पायाचे दास्यत्व आनंदानी पत्करते. सर्व ऐश्वर्याची देवी सागरसम्भवा रमा आणि श्रीहरीच्या नितांत प्रेमाचं वर्णन करणारे कनकधारास्तोत्र आणि त्याचा भावार्थ आपण पाहू.

-------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 1

माणसाचं कल्याण, कुशल, मंगल ह्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येत नाहीत पण त्यांना जर दृश्य, सगुणरूपात पहायचं म्हटलं, त्यांची जर एक दृश्य मूर्ती बनवली तर ती सुबक, सुंदर मंगलमय कल्याणमूर्ती म्हणजेच लक्ष्मी! (कुठच्याही त्याज्य मार्गाने मिळवलेले धन म्हणजे लक्ष्मी नाही.) ह्या लक्ष्मीच्या नजरेतच अपार कृपा, कारुण्य भरलेलं आहे. त्यालाच ‘अपांगलीला’ म्हटलं आहे. अशा ह्या कल्याणकारी देवतेचा एक कृपाकटाक्ष माझ्यावर पडला तर माझं नक्कीच कल्याण होईल. हे माय माझ्याकडे एकदाच बघ. तुझ्या एका नजरेनी माझ्या जीवनाचं सार्थक होइल. माझ्या आनंदाला पारावार राहणार नाही.

माय तुझ्या कृपाकटाक्षाने मिळणार्‍या आनंदाचं मी काय वर्णन करू? तुझी आनंददायी नजर जेव्हा तमालवृक्षाप्रमाणे दिसणार्‍या विष्णूच्या देहावर स्थिरावली तेव्हा वसंतऋतुचा स्पर्श होताच तमालवृक्ष असंख्य निळ्या रंगाच्या कळ्यांनी मोहरून यावा त्याप्रमाणे, तुझ्या प्रेमळ नजरेने श्रीहरीचा श्यामल देह पुलकित झाला. अत्यंत आनंदाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. झाडावर उमललेली फुलं जशी झाडाला अलंकार, वा दागिन्यांनी सुंदर सजविल्याप्रमाणे सुंदर करतात त्याप्रमाणे, विष्णूच्या सर्वांगावरचे हे रोमांच जणु काही त्याचा संपूर्ण देह अलंकारांनी सजविल्याप्रमाणे सुंदर करतात.

मित्रांनो, येथे उल्लेख असलेला तमालवृक्ष कदाचित आपण पाहिला असेल, नसेल पण; पदार्थांचा खुमासदारपणा वाढवणारे तमालपत्र आपण पुलाव इत्यादि पदार्थांमधे नक्की पाहिले असेल. सरळसोट वाढणारा हा वृक्ष आणि त्याची गडद रंगाची काळसर वर्णावर असलेली पान पाहून केरळमधे जन्मलेल्या शंकराचार्यांना त्यामधे दिसलेली विष्णुमूर्ती फारच स्पृहणीय आहे.

झाडांची कितीही काळजी घेतली, त्यांना नियमित खतपाणी दिलं तरी त्यांना योग्य ऋतुमधेच फुलं लागतात. येथेही वसंतऋतु येता येता निळ्या कळ्यांनी फुलणारा हा तमाल आणि लक्ष्मीची अत्यंत आनंददायी, कल्याणकारी नजर पडताच प्रेमाने रोमांचित झालेला विष्णू ह्यांचं साधर्म्य बघा आपल्या मनालाही आनंदच आनंद देईल.

तरूला कळ्या लागल्या फुलं उमलू लागली की असंख्य कीटक, भ्रमर त्यावर ये जा करत राहतात. ह्या भ्रमरांमुळे फुलं आनंदित होतात. हे दृश्य मोठं विलोभनीय असतं. लक्ष्मीच्या काळ्याभोर डोळ्यांमुळे जणु काही तिची भुंग्यांप्रमाणे काळी नजर हरीच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचाना स्पर्शून अजून सुखवित आहे.   

(वृत्त वसन्ततिलका, अक्षरे 14, गण - त भ ज ज ग ग )


अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती

भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम्।

अङ्गीकृताखिल-विभूतिरपाङ्ग-लीला

माङ्गल्यदाऽस्तु मम मङ्गल-देवतायाः।।1

( पुलक – रोमांच. मुकुल – कळी. विभूति – महिमा, दौलत, प्राचुर्य )

 

जेथे कृपा-नजर थोर पडे रमेची

कल्याण भाग्य सुख चालत तेथ येई

प्रेमार्द्र दृष्टी अति मोहक ती रमेची

घेईच आश्रय हरी-तनुचा सदाही ।।1.1

 

जैसा ‘तमाल’ बहरे मधुमास स्पर्शे

 सर्वांग नील कलिकामय होय त्याचे

तैसी मुकुंदतनु श्यामल कोमला ही

लक्ष्मी-कटाक्ष पडता पुलकीत होई।।1.2

 

व्हावी अलंकृत जशी तनु दागिन्यांनी

रोमांच भूषवि तसे हरिच्या तनूसी

देई अपार सुख श्रीहरिसीच ऐसे

मांगल्य एकवटले नजरेत माते ।। 1.3

 

ये जा करे भ्रमर, वृक्ष फुलोनी येता

दृष्टी तशीच सुखवी हरीच्या तनूला

तू देवता सुखकरी बहु मंगला गे

ऐश्वर्य एकवटले तव दृष्टिमध्ये ।। 1.4

 

दृष्टी अशी सुखमयी तव मंगला ही

कल्याण ती मम करो कमले सदा ही ।। 1.5

------------------------------------------

 कनकधारास्तोत्रम्

श्लोक 2 -

सद्गुणांचे तेज काही विलक्षण असते. चेहर्‍यावील आत्मविश्वास, निर्भीडतेसमवेत येणारी सौम्य, शांत, प्रसन्न मुद्रा ही त्या माणसात असलेल्या गुणांचे परिपूर्णत्व दाखवणारी लक्षणे आहेत. ना चिंता ना भय अशावेळी झोपही कशी शांत लागते. श्रीहरीला तर शेषनागाच्या गादीवरही अशी शांत झोप लागलेली पाहून त्याच्या सद्गुणांवर लुब्ध होणारी कमला श्रीहरीच्या पायापाशी बसून त्याचे चरण चुरायला लागली नाही तरच नवल! झोपलेल्या श्रीहरीच्या प्रसन्न, शांत मुद्रेवर लक्ष्मीची नजर एकाग्र होऊन त्याच्या लावण्यासोबत त्याला लाभलेले गुणसामर्थ्य आणि गुणसौदर्य एकटक निरखू लागली. छे छे---!! पण---- मुकुंदाने अचानक डोळे उघडले तर! ----आपल्याला ह्या मनमोहनाकडे असं एकटक पाहतांना कोणी पाहिलं तर! ह्या लज्जायुक्त भीतीने रमेची नजर खाली झुकली खरी पण हरीप्रेमाच्या ओढीनी तिच्या नजरेला चैन कशी पडावी? शांतपणा कसा लाभावा? श्रीहरीचे अलौकिक सुंदर मुख पाहण्याच्या उत्कट इच्छेने तिची नजर परत परत श्रीहरीच्या मुखाकडे धाव घेत आहे.

एखादं सहस्रदल कमल उमलावं आणि त्याचा भ्रमरांना धुंद करणारा, मधुपानाचं निमंत्रण देणारा आमोद चहुदिशांना पसरावा; भुंग्यांच्या थव्यांनी  त्या कमलाकडे धाव घ्यावी असच काहीसं कमलेच्या नजरेचं होत आहे. भुंग्यांनी कमलाचं आकंठ मधुपान करून जरा कमळापासून दूर व्हावं तर मधु प्राशनाच्या तीव्र इच्छेने परत त्यांना कमळाकडे आकर्षित व्हायला व्हावं तशी लक्ष्मीची नजर हरीमुखावरून जरा दूर होता, परत परत श्रीहरीच्या मुखाकडे आकर्षित होत आहे.  तिच्या ह्या नजरेच्या हरीच्या मुखकमलावरून जाण्या येण्याने जणु काही भुंग्यांच्या माळेप्रमाणे तिच्या काळ्याभोर नजरेची माळच तयार झाली आहे. अशी ही श्रीहरीवर लुब्ध होणारी , कमळावर ये जा करणार्‍या भुंग्यांप्रमाणे असलेली कल्याणकारी नजर क्षणभर माझ्यावरही पडो. ती नजर माझेही कल्याण केल्याशिवाय कशी राहील? कमलेची ही हरीप्रेमाने चिंब झालेली नजर मला ऐश्वर्याचा, परम भाग्याचा मार्ग दाखवो.

मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः

प्रेम-त्रपा-प्रणिहितानि गतागतानि।

मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या

सा मे श्रियं दिशतु सागर-सम्भवायाः।।2

( मुग्धा – सरळ स्वभावाची, भोळी, सुंदर, प्रिय, मनोहर. सागरसम्भवा – समुद्रातून निर्माण झालेली अर्थात लक्ष्मी.  मुहुः – वारंवार. प्रणिहित – एकाग्रचित्त येथे दृष्टी एकाजागेवर म्हणजे हरीच्या मुखावर स्थिर होणे. प्रेमत्रपा – प्रेमाने वाटलेली लाज. दिशतु – दाखवो, अर्पण करो, देवो, संकेत करो, श्रेय – समृद्धि, ऐश्वर्य)


जैसी सहस्रदल-पद्म-सुधाचि घ्याया

 ये जा करी लगबगे भ्रमरावली गा

मुग्धा तशीच तव रम्य कटाक्षमाला

 चंद्रासमान हरिसी निरखे झुके वा।।2.1

 

प्रेमे सलज्ज झुकती तव लोचने ही

 जाती पुन्हा परतुनी हरि आश्रयासी

लज्जा न दे निरखु विष्णुमुखा तरीही

 औत्सुक्य हे हृदयिचे प्रकटेच नेत्री ।।2.2

 

दृष्टीस ना मिळतसे स्थिरता जराही

 धावे निरंतर हरी मुख पाहण्यासी

ऐसीच दृष्टि तव मंगलकारि माते

समृद्धि देइ मजसी नित सिंधुकन्ये।।2.3

--------------------------------------------

कनकधारास्तोत्रम्

 श्लोक 3

आपल्या कर्तृत्वाने विपुल धनसम्पत्ती मिळविणारे अनेक असतात पण, इंद्राला स्वर्गाचं राज्य मिळवून देण्याचं कर्तृत्व अथवा सार्‍या विश्वालाच इंद्राच्या राज्याचं म्हणजे अमरपुरीचं सौन्दर्य, ऐश्वर्य बहाल करण्याचं कर्तृत्व एका लक्ष्मीच्या कृपादृष्टीतच आहे. आपल्या भक्तगणांना ऐश्वर्य प्रदान करण्यात ती अत्यंत सक्षम, कुशल आणि निष्णात आहे.

इन्दिरा म्हणजे जी स्वतः ऐश्वर्यसम्पन्न आहे आणि जी भक्तांनाही अमित ऐश्वर्य प्रदान करते. ‘इन्दीवर’ म्हणजे नीळं कमळ. ‘सहोदर’ म्हणजे भाऊ. येथे कमलेच्या डोळ्यांना ‘इन्दीवरसहोदर’ म्हटले आहे. म्हणजे कमलेचे डोळे कमळाच्या कळीप्रमाणे अर्धोन्मीलित आणि अत्यंत सुंदर आहेत.

हे माय! तुझ्या नजरेत इतका प्रेमळपणा भरला आहे की, तुझ्या स्निग्ध दृष्टीनेच हे विश्व अत्यंत आनंदी, प्रफुल्लित आह्लाददायक दिसू लागतं. तुझ्या नुसत्या कृपा-कटाक्षाने  इंद्राला ज्या महान ऐश्वर्याचा स्वर्गसुखाचा लाभ झाला जणु काही ते ऐश्वर्य, ते सौंदर्य, ती शोभा ह्या सर्व विश्वाला तू अनंत हस्ते वाटली असावीस असा भास मला होत आहे.

हे जननि! तुझा हा लोभस, प्रेमळ, स्निग्ध दृष्टीक्षेप सर्व जगाला आनंद देतो. मग तुझी  नजर जेथे कायमची स्थिर झाली आहे त्या श्रीहरीला तर ती अजूनच सौख्यकारी वाटत असेल, विशेष सुखवित असेल ह्यात आश्चर्य नाही. तुझ्या दृष्टीसातत्याने त्याच्या प्रेमाला, आनंदाला जणु उधाणच आले आहे.

माय ! हे कमले! तुझ्या ह्या प्रेमळ, स्निग्ध, अर्धस्फुट नेत्रांनी तू माझ्याकडे क्षणभर पहा. माझं दारिद्र्य सूर्य उगवताच अंधार नाहिसा व्हावा त्याप्रमाणे झरझर नाहिसे होईल.

 

विश्वामरेन्द्र-पद-विभ्रम-दान-दक्ष-

मानन्द-हेतुरधिकं मुरविद्विषोऽपि

ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम्

इन्दीवरोदर-सहोदरमिन्दिरायाः ।। 3 ।।

 

जैसीच अस्फुट कळी अति कोमलाही

 इंदीवराचि  उमले मृदु नीलवर्णी

राजीवलोचन तसे कमले तुझेची

 अर्धोन्मिलीत करुणारसपूर्ण स्नेही  ।। 3.1

 

इंद्रासि इंद्रपद  जी मिळवून देई

 ऐश्वर्य सर्व जगतातिल जेथ राही ।

दृष्टी दयार्द्र अति कोमल इंदिरा ही

 देण्यास तत्पर असे सुख तेच लोकी।।3.2

 

विश्वा प्रफुल्लित करी तव स्निग्ध दृष्टी

 आनंद कंद हरिसी सुखवी विशेषी

ओथंबली नजर प्रेमभरे तुझी ही

 माझ्यावरीच पडु दे क्षण एक लक्ष्मी।।3.3

---------------------------------------------

कनकधारास्तोत्रम्

 श्लोक 4

सुहृत् हो! 

कनकधारास्तोत्रम् हे स्तोत्र म्हणजे तुमच्या आमच्या प्रेमासारखी श्रीहरी आणि कमलेची प्रेमकथा नाही. निसर्गचक्रातील विलय आणि पुनर्निमितीचे प्रतीक उमामहेश हे कायम एकरूप असतात. अविभाज्य असतात. विष्णु लक्ष्मीचे तसे नाही. सर्व सद्गुण एकवटून विष्णुची निर्मिती होते. त्यासाठीचे दिव्य सोपे नाही. अत्यंत विषारी अशा शेषनागाच्या विळख्यांवर आनंदाने निवांत झोपायचे आणि त्याच्या विषारी फुत्कार सोडणार्‍या फण्याचे छत्र ऐटित मिरवायचे एवढी हिम्मत लागते. भृगु ऋषींसारख्या तेजस्वी भक्ताने संतापून छाताडावर कायमचा व्रण उमटेल अशी जोरदार लाथ जरी मारली तरी मातेच्या वत्सलतेने ‘‘बाळ तुला दुखले तर नाही’’ अशी हदयातून वाटणारी वत्सलता लागते. सर्वांगसुंदर ऐश्वर्य पायाशी आल्यावर त्याच्यात गुंतून न पडता तटस्थ राहणारा विरागी, लक्ष्मी पाय चुरत असतानाही मनाची चलबिचल न होणारा श्रीहरि पाहूनच ऐश्वर्य धनसम्पत्तीरूपी लक्ष्मी त्याच्या कायमची प्रेमात पडते. लक्ष्मी चंचल असते असं आपण म्हणतो पण ती गुणांची दासी आहे. गुण सोडून गेले की लक्ष्मीही गेलीच म्हणून समजा. लायकी नसतांना मिळालेले वैभव नष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच ह्या सद्गुणी श्रीहरीच्या गुणांनी मोहित झालेल्या ह्या कमलेची स्थिती कशी झाली आहे हे आद्य शंकराचार्य मोठ्या सुरसपणे सांगत आहेत.

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द-

मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् ।

आकेकर-स्थित-कनीनिक-पक्ष्म-नेत्रं

भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः।। 4 ।।

 (आकेकराकनीनिक डोळ्यांच्या बाहुल्या, पुतळ्या। पक्ष्म )

 

निद्रिस्त शेष वलयांवरि ‘शेषशायी’

 जाणून तू निरखिसी अनिमेष नेत्री

लावण्यमूर्ति हरि पाहुनि लुब्ध झाली

 दृष्टी सखी मदनबाधित धुंद झाली॥4.1

 

 

प्रेमास ये भरति पाहुनि ‘पूर्णरूपा’

आधीन हे हृदय गे मदनास होता

अर्धोन्मिलीत तव  नेत्रदले हलेना

 होतीच स्थीर पुतळ्या नयनी तुझ्या या  ॥4.2

 

प्रेमार्द्र दृष्टि कमले तव कोमला ही

देवोचि गे सफलता मजसी सदाही  4.3

 ---------------------------------------------

 कनकधारास्तोत्रम्

श्लोक 5

श्रीहरी थोर पराक्रमी आहे. अनेक दैत्यांचा त्याने लीलया नाश केला आहे. त्या अनेक दैत्यांमधले मधु आणि कैटभ हे अत्यंत क्रूर व लोकांना फार छळणारे महत्त्वाचे दैत्य श्रीहरीने ठार मारले. मधु दैत्याला जिंकणारा म्हणून त्याला मधुजित् असे म्हणतात. सहाजिकच अशा असामान्य पराक्रमी वीराच्या उत्तुंग पराक्रमावर कमला मोहित नाही झाली तरच नवल!

 शेषावर निद्रिस्त मधुजित श्रीहरीचे वर्णन करताना श्री आद्य शंकराचार्य म्हणतात, निद्रिस्त अशा हरीच्या गळ्यातील कौस्तुभमण्याची प्रभा छातीवर पसरली आहे. त्याच्या छातीच्या दोन्हीबाजूला असलेल्या त्याच्या पिळदार दंडांनी, आजानु बाहुंमुळे छातीपर्यंतच मर्यादित राहिली आहे. त्याच्या छातीवर रुळत असलेल्या निसर्गतःच शुभ्र असलेल्या मौक्तिकमाला मात्र काळसर का बरं दिसत आहेत? त्याचं उत्तरही आाचार्य देतात.

लक्ष्मीच्या काळ्याभोर टपोर्‍या डोळ्यांना हरीरूपाकडे पाहण्याचा मोह आवरता येत नाहीए.  तिची नजर वारंवार श्रीहरीच्या कमनीय देहाकडे जात आहे. आकृष्ट होत आहे. तिच्या नजरेच्या अशा सतत जाण्यायेण्याने  जणु काही हरीच्या वक्षस्थळी  तिच्या भुंग्यांप्रमाणे काळ्याभोर नजरेची एक सुंदर मालाच तयार  झाली आहे. ह्या तिच्या  दृष्टीमालेची निळसर काळसर प्रभा जणु काही श्रीहरीच्या मौक्तिक माळेवर पडल्याने त्याची मौक्तिक माळाही काळसर दिसत आहे. ( आजही काळ्या मोत्यांची माळ ही पांढर्‍या मोत्यांपेक्षा जास्त मूल्यवान असते हे माझ्या मैत्रिणींना नक्की माहित आहे.)

येथे कमलेचं वर्णन करताना कमलेला कमलालया हे विशेषण वापरले आहे. आलय म्हणजे घर, मंदिर. कमला कमळामध्ये राहणे पसंत करते. कमलामधे जिचे आलय म्हणजे घर आहे, जी कमळात राहते ती कमलालया आहे. अशा ह्या कमलालयाची दृष्टी मोठी स्निग्ध, मदत करण्यासाठी उत्सुक आहे. तिची ही कल्याणप्रद एक नजर, एक कटाक्ष जर माझ्यावर पडला तर माझं जीवन कृतार्थ होऊन जाईल. सर्व सौख्य माझ्या पायी येईल.

बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या

हारावलीव हरि-नील-मयी विभाति।

कामप्रदा भगवतोपिकटाक्षमाला

कल्याणमावहतु मे कमलालयायाः।।5

(बाह्वन्तरे दोन्ही बाहूंच्या मधील जागा/छातीवर. द्युति - प्रकाश)

दोन्ही भुजा करिति सीमित ज्या प्रभेसी

 त्या कौस्तुभाचि पसरे द्युति वक्षभागी

माला सुरेख नजरेचिच गुंफिली जी

 शोभे मुकुंदहृदयी कमले तुझी ही॥ 5.1

 

दृष्टि तुझी मधुकरासम नीलवर्णी

 झाली स्थिराचि मधुसूदन वक्षभागी

दृष्टिप्रभा भिजवि मौक्तिकमाळ वक्षी

 नीलार्द्र नील कमलासम नील झाली॥ 5.2

 

‘दृष्टी-सुधा-सुमन-माळ’ चि पद्मजा गे

 साफल्य देउनि कृतार्थ  करी सदा  गे।।5.3

--------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 6

मधु आणि कैटभ हे दोन भीषण दैत्य! महा पराक्रमी! पण त्यांचा पराक्रम सामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांच्या रक्षणासाठी कधी वापरला गेला नाही. उलट सर्व जनतेला त्राही त्राही करून सोडलं ह्या दैत्याच्या त्यंतिक छळानी. अशा वेळेस श्रीहरी निरपराध लोकांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. त्याने मधु आणि कैटभाचा बिमोड केला. दोघांनाही यमसदनाला धाडलं. म्हणून त्याला मधुहा अथवा कैटभारि  ह्या नावाने सारी जनता संबोधू लागली.

जनतेची अत्यंतिक कणव आणि दुष्टांचा विनाश करणारा महा पराक्रम ह्या गुणांवर  भाळलेली रमा ह्या वीरवर हरीसोबत किती सुंदर दिसत आहे हे सांगताना आचार्य म्हणतात, काळ्याशार ढगांची मालिका ( कालाम्बुदाली) जशी सुंदर दिसावी तसा श्री हरी दिसत आहे. अम्बु म्हणजे पाणी.अम्बु देणारा तो अम्बुद म्हणजे ढग. काळ्या नवमेघांची मालिका ज्याप्रमाणे सर्व तृषार्तांना जीवन देते तसा हा श्रीहरी रंजल्या गांजलेल्याना आपलं म्हणणारा, त्यांना आधार देणारा आहे. आपलं सर्व जीवन त्याने अशा लोकांच्या मदतीला धावून जाण्यात सार्थकी लावलं आहे. अशा ह्या हव्याहव्याशा वाटणार्‍या हरीच्या वक्षस्थलावर  काळ्या ढगात चमकणार्‍या विद्युल्लते प्रमाणे लक्ष्मीची नित्य यशस्विनी मूर्ती अत्यंत उदात्त दिसत आहे.

 लक्ष्मी आणि श्रीहरी हे ह्या जगाचे मातापिता आहेत. भृगुऋषींची कन्या आणि समस्त जगताची माता असलेल्या ह्या रमेची परम रमणीय मूर्ती माझे कल्याण करो. मला योग्य मार्ग दखवो. 


कालाम्बुदालि-ललितोरसि कैटभारे-

र्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव

मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति-

र्भद्राणि मे दिशतु भार्गव-नन्दनायाः।।6

 

ओथंबली जलद पंक्ति जशी जलाने

सौदामिनी झगमगे तयि शुभ्र तेजे

तैसीच शोभत असे हरि-वक्षस्थानी

मूर्ती तुझी शुभमयी नित भार्गवी ही ।।6.1

 

आहे विशुद्ध तव कीर्ति च उज्ज्वला ही

 विष्णुप्रिये जननि भार्गवनंदिनी  ही

देई विवेक मजला; पथ योग्य दावी

 माते सदा मजसि गे जगदंब तूची।।6.2

----------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 7 -

लक्ष्मी सागरमंथनातून प्राप्त झालेली असल्याने ती सागरकन्याच आहे. हाच समुद्र मगरी, सुसरी अशा अनेक जलचरांचे घर आहे. म्हणून त्याला मकरालयही म्हणतात. लक्ष्मी ह्या मकरालयाची कन्या. तिची दृष्टी मोठी मृदु, कोमल (अलस) आहे. श्रीहरीला पाहून लक्ष्मीची अत्यंत चंचल झालेली दृष्टी असो; किंचित तिरप्या कटाक्षाने श्रीहरीला निरखणारी नजर असो; उत्कट प्रेमाने नजरेत विभ्रम निर्माण झाला असो; वा कमल कलिकेप्रमाणे अर्धस्फुट असो ती सतत मंगलाचे मंगल अशा श्रीहरीच्या ठिकाणीच राहते. श्रीहरी हेच तिचे अधिष्ठान आहे. जेथे जेथे विलोभनीय सौंदर्य,  ऐश्वर्य असते तेथे तेथे लक्ष्मीची कृपापूर्ण नजर पडलेलीच असते आणि जेथे सर्वांना आकृष्ट करून घेण्याची ताकद आहे तेथे तेथे कामदेवाचा वास असतोच.

 लक्ष्मीच्या कृपादृष्टीच्या प्रभावाने श्रीहरीच्या ठिकाणी कामदेवाने प्रथमस्थान प्राप्त करून घेतले. श्रीहरी आणि रुक्मिणी यांचा पहिला पुत्र प्रद्युम्नाच्या रूपाने कामदेवाने जन्म घेतला.

अशी ही अत्यंत कृपेने ओथंबलेली रमेची नजर माझ्यावरही क्षणभर पडो. त्याने माझ्या जीवनाचे सार्थक होईल.

प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावा-

न्माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन।

मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं

मन्दालसं च मकरालय- कन्यकायाः।।7

(मकरालय – सुसरी, मगरी अशा जलचरांचे घर म्हणजेच सागर. मन्मथ – मदन.  मंथर विशाल, झुकलेली, गहन. अलस – मृदु कोमल.  प्रथमत- पहिला, प्रमुख, मुख्य. पदं - स्थान)

हा कामदेव तुझिया करुणा कटाक्षे

  प्रद्युम्न रूप धरुनी हरिरूपि राहे

संतान ज्येष्ठ बनुनी हरिचाच होई

 दृष्टिप्रभाव इतुका तव देवि लक्ष्मी।।7.1

 

मांगल्यदायि मधुसूदन माधवाची

  प्राप्तीच दे करुनिया तव दृष्टि लोकी

वाटेचि जे जलचरा गृह रम्य त्यांचे

 कन्याच त्या जलधिची कमलेच तू गे।।7.2

 

माझ्या वरी बरसु दे तव भाग्यदायी

 अर्धस्फुटा, गहन, सौम्य, सुशांत  दृष्टी ।।7.3

--------------------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 8

आचार्य गुरूगृही असताना एकदा भिक्षेस निघाले. ज्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी ‘‘ॐ भवति भिक्षां देहि’’ चा पुकारा केला, त्या घरात अत्यंत गरीब बाई रहात होती. आपल्याकडे अत्यंत तेजस्वी भिक्षु बालक भिक्षा मागत आहे आणि आपल्याकडे द्यायला अन्नाचा कणही नाही ह्याचे तिला फार दुःख झाले. भिक्षुला विन्मुख कसे पाठवायचे? तिच्या अंगणात असलेल्या झाडावर एक आवळा तिला दिसला. तो तिने मोठ्या भक्तिभावाने शंकराच्या झोळीत घातला. लहानग्या शंकराचे हृदय तिची दयनीय स्थिती पाहून द्रवले/ त्याने साक्षात लक्ष्मीमातेची स्तुती गाण्यास आरंभ केला आणि काय आश्चर्य! लक्ष्मी बाल शंकरा पुढे प्रकट झाली. ‘‘हे जगज्जननी! तू सर्वांची आई आहेस. ही माय मला भिक्षाही देऊ शकत नाही इतक्या दारिद्र्याने पीडली आहे. तिचं दुःख दूर कर.’’ त्यावर कमला म्हणाली, ‘‘हे त्यांचे प्रारब्ध आहे. त्यांच्याकडे पूर्व सुकृत नाही.’’ बाल शंकरानेही हट्ट सोडला नाही. माय तू माझ्यावर प्रसन्न आहेस ना? मग माझ्यावर दया म्हणून तू ह्या मातेचे दारिद्र्य दूर कर.’’ बाल शंकराच्या उत्तराने प्रसन्न झालेल्या कमलने तिच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी करून तिचं दारिद्र्य दूर केलं. तोच हा श्लोक ज्याच्यात बाल शंकर लक्ष्मीच्या कृपादृष्टीची याचना करत आहे. स्वतःसाठी नव्हे तर एका अत्यंत गरीब स्त्रीसाठी!

हे माय तू त्या सर्वगुणांनी परिपूर्ण असलेल्या नारायणावर अनन्य प्रेम करतेस. तू त्याची अत्यंत प्रिय पत्नी आहेस. नारायण-प्रणयिनी आहेस.

जलाने ओथंबलेला मेघ जसा आनंददायी असतो, सर्वांनाच हवाहवासा वाटतो, सर्वजण त्याची वाट पहात असतात तसेच तुझे काळेभोर डोळे म्हणजे जणु भक्तांवर कृपा वर्षाव करणारे, भक्तांच्या हृदयांना आनंदित करणारे नील मेघच आहेत. रंजल्या गांजलेल्यांच दुःख दूर करण्यासाठी धाव घेणारं तुझं मन  हे जणु काही दयेचा अनुकूल वाराच आहे (दयानुपवनः) तो तुझ्या कृपादृष्टीरूप मेघांना दरिद्री, दुःखितांकडे वळवतोच. त्यांच्यावर कृपावर्षाव करून त्यांना सुखसमाधानाच्या वर्षावाने तृप्त करतो.

 हे माय हे जगज्जननी! माझ्या दुष्कर्म रूपी रखरखीत उन्हाळ्यानी मी पोळत आहे. चातकाचं पिलु जरी असेल तरी ते फक्त मेघातून बरसणार्‍या जलधाराच पितं. मला सुद्धा तू पक्ष्याचं/चातकाचं असहाय, दुःखी, कष्टी (विषण्ण) पिलु समज आणि द्रविण म्हणजे धनदौलतीची, ऐश्वर्याची माझ्यावर बरसात कर. वृष्टी कर.    

दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधारा-

मस्मिन्नकिञ्चनविहंगशिशौ विषण्णे।

दुष्कर्म-धर्ममपनीय चिराय दूरं

नारायण-प्रणयिनी-नयनाम्बुवाहः।।8

( द्रविणम् – धनदौलत. अम्बु – पाणी. अम्बुवाह- मेघ. अकिंचन- दरिद्री. )

व्याकूळ मी बहु असे पिलु चातकाचे

 ‘दुष्कर्म -ग्रीष्म’-चटके बसती मला गे

दुःखी असे बहु मनी अति मी दरिद्री

 सम्पृक्त ‘नीलघन’ हा तुझियाच नेत्री ।।8.1

 

माते दयार्द्र तव चित्त स्वरूप वारा

देई सुयोग्यचि दिशा तव दृष्टिमेघा

दारिद्र्य पोळत असेचि जिथे जनांना

नेई तिथे तव कृपा-जलदांस सार्‍या ।।8.2

 

दृष्टीत ज्या तव असे ममता कृपा गा

 वर्षाव ती मजवरी करु दे धनाचा

दुष्कर्म ताप अवघा हरुनीच माझा

 विष्णुप्रिये मजवरी करुणा करी गा ।।8.3

------------------------------------------------------

 


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 9

कमलेची नजर मोठी कोमल, कल्याणकारी आहे. नुकत्या नुकत्या उमलणार्‍या कमलातील कोशाला जशी नाविन्याची, ताजेपणाची एक झळाळी असते तशी लक्ष्मीच्या नजरेतील चैतन्याची चमक, अत्यंत आश्वासक असा ताजेपणा भक्ताला कधीही निराश करत नाही. अगदी सामान्य बुद्धीचा भक्तही तिची कृपादृष्टी पडताच अनुपम असं स्वर्गाचं सुख अनुभवतो.

जणु दयेचा असीम पारावार (समुद्र) तिच्या दृष्टीत सामावला  आहे. म्हणून आचार्य कमलेला मागणे मागतात, हे माय!  तुझी ही कृपापूर्ण, दयाळु नजर माझं पोषण करो. मला जे प्रिय आहे, मला जे अनुकूल आहे, इष्ट आहे त्याची वृद्धी तुझ्या दृष्टिच्या कृपेने होवो.

निरनिराळ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात निरनिराळे गुण असतात.  कोणी उत्तम खेळाडू असेल तर कोणी उत्तम शिक्षक! कोणाकडे  श्रेष्ठ शास्त्रज्ञ होण्याची क्षमता असेल तर कोणाकडे उत्तम व्यवस्थापनाचे कौशल्य दडलेले असेल. म्हणून आचार्य कमलेकडे मागतांना जे मला श्रेयस्कर आहे, ज्याची माझ्या मनाला आवड आहे अशा माझ्या गुणांना पुष्टी दे अशी विनंती करतात.

 

इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-

दृष्ट्या त्रिविष्टप-पदं सुलभं लभन्ते।

दृष्टिः प्रहृष्ट-कमलोदर-दीप्तिरिष्टां

पुष्टिं कृषीष्ट मम पुष्कर-विष्टरायाः ।।9

( पुष्कर – कमळ. विष्टर – आसन. पुष्करविष्टरा – कमलासना, कमळात बसलेली लक्ष्मी. प्रहृष्टकमलोदरदीप्ती- प्रहृष्ट-कमल-उदर-दीप्ती – प्रहृष्ट म्हणजे पूर्ण विकसित झालेल्या कमलातील कोषाप्रमाणे सुंदर, चमकदार. त्रिविष्टप – स्वर्ग. अविष्टमति – सामान्य बुद्धीचे नर.  )

 

उत्फुल्ल पद्मदल कोमल कोश ऐसी

 तेजस्विनी नजर गे तव पद्मजा ही

येता तुला शरण भक्तचि तुच्छ कोणी

 सामान्य बुद्धि असु दे नर तोच कोणी।।9.1

 

 स्वर्गात स्थान सहजी मिळवून देई

 पद्मासना तवचि ही कनवाळु दृष्टी

माझे अभीष्ट पुरवी दृढ ते करी ही

माते कृपा नजर थोरचि भाग्यदायी।।9.2

--------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 10-

माउली! तुझे असीम कर्तृत्त्व बघता जणु काही अनेकविध काम करणारी तुझी अनेक रूपे आहेत असे वाटु लागते. समस्त वाक्प्रपंचाची तू अधिष्ठात्री असल्याने तुला गीर्देवता किंवा वाग्देवता असे म्हणतात. शास्त्रीय व्यवहाराला कारणीभूत असलेला शब्दप्रपंच परा-वाक् किंवा महावाणी म्हणून ओळखला जातो; तर भारती म्हणजे सर्वसामान्य व्यवहारासाठी वापरला जाणारा शब्दप्रपंच. वाक् म्हणजे अक्षरप्रपंच. सरस्वती ह्या सर्वांची अधिष्ठात्री देवता आहे. (गीदेर्वता) सरस्वती हे लक्ष्मीचेच रूप आहे.

सावज हेरून, सावजावर क्षणार्धात झडप घालून शिकार करणारा, चपळ पराक्रमी अशी ख्याती असलेला गरूड ज्याच्या ध्वजावर चिह्न आहे अशा गरुडध्वज महापराक्रमी, सर्व सद्गुणाची खाण असलेल्या, जो ह्या विश्वाचा गुरू आहे  त्या विश्वगुरू विष्णूची सुंदरी म्हणजेच लावण्यवती पत्नी ही साक्षात लक्ष्मीच आहे. (गरुडध्वज-सुन्दरी )

 

जेव्हा पृथ्वीवर अनेक वर्षे दुष्काळ पडला तेव्हा सर्व ऋषी एकत्र आले. त्यांनी देवीची स्तुती करण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस त्यांच्यावर प्रसन्न होऊन  आपल्या शेकडो हजारो नेत्रातून जणु  तू कृपादृष्टीची वृष्टी करत धरणी परत सुजला सुफला केली. ऋषी, मुनी, सामान्यजन त्यामुळे तृप्त झाले. त्यांनी अनेक भाज्यांचा नैवेद्य तुला अर्पण केला सर्वजण तुला शाकंभरी म्हणू लागले. लक्ष्मीची कृपा झाली तर दुर्भिक्ष, दारिद्र्य टळते.

शक्ती ही एकच असते पण जशी  मेघात वीज स्वरूपात, सूर्यात प्रकाश रूपात अग्नित उष्णता रूपाने शक्ती राहते;;  त्याचप्रमाणे लक्ष्मी पार्वतीच्या रूपानेही नटली आहे, हर आणि हरीत जसे अंतर नाही तसेच पार्वती आणि  लक्ष्मीतही भेद नाही. जटांमधे चंद्र/शशी धारण केल्यामुळे शंकराला चंद्रमौली अथवा शशिशेखर म्हणतात. ह्या शशिशेखर शिवाची ही प्राणवल्लभा आहे.

लहान मुलगी भातुकली मांडते आणि कंटाळा आला की मोडुन टाकते त्याच सहज पणे हा विश्वाचा पसारा मांडणे असो खेळणे असो वा आवरून घेणे असो. रमेचा जणु तो सहज खेळला जाणारा खेळ आहे.

माय! तुझ्या ह्या अनेकविध रूपांना माझा नमस्कार असो!


गीदेर्वतेति गरुडध्वज-सुन्दरीति

शाकम्भरीति शशिशेखर-वल्लभेति।

सृष्टि-स्थिति-प्रलय-केलिषु संस्थितायै

तस्यै नमस्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै।।10


रूपे तुझीच कमले असती अनेक

 वाग्देवता अखिल ‘अक्षर-ब्रह्म’ सत्य

अर्धांगिनीच गरुडध्वज विष्णुची ही

 शाकंभरी विपुल धान्य -समृद्धिदात्री।।10.1

 

चंद्रानना प्रियतमा शशिशेखराची

 सृष्टि-स्थिति-प्रलय हे सहजीच खेळी

त्रैलोक्यस्वामि गुरुराज असे जगाचा

 त्या विष्णुचीच ललना; नमितो तुला गा।।10.2

---------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 11

हे माते!  श्रुती हेच तुझे रूप आहे. अथवा वेद/श्रुती म्हणजेच साक्षात तू आहेस. हे श्रुतिस्वरूप माते तुला वंदन असो. माते, जे कर्म हातून घडून जाते त्याला अस्तित्व रहात नाही. ज्याला अस्तित्व नाही त्याच्यातून कुठल्या फळाची वा परतफेडीची अपेक्षा कशी करावी? पण तसे नाही. तू भक्ताच्या प्रत्येक शुभकार्याचा हिशोब ठेवतेस आणि त्याला त्याच्या सत्कार्याचं उत्तम फळही देतेस. सत्कर्माचे रुचिर फळ देणार्‍या (शुभकर्म-फल-प्रसूत्यै) तुला वारंवार नमन!

माय तू साक्षात आनंदाची अनुभूती आहेस. स्नेहाचा अपार सागर आहेस. जणु स्नेहशीलता, भक्ति, आनंद ह्यापासूनच तुझी मूर्ती तयार झाली आहे. तू भक्तांवरच काय पण सर्वच विश्वावर तुझ्या ममतेची पाखर घालतेस. मग तू आमचे अहित कसे करशील? तुझ्या ह्या आनंदस्वरूप प्रेमळ मूर्तीला ( रत्यै ) शतशः नमन!

जे जे सुंदर, जे जे उत्तम, जे जे कल्याणकारी त्या सर्व गुणांना एकत्रित करून झालेलली शिव कल्याणमूर्ती तूच आहेस. अर्णव म्हणजे सागर. तू गुणांचा परम रमणीय सागर आहेस. जसा सागराचा दुसरा किनारा दिसत नाही त्याप्रमाणे तुझ्या गुणांचा पार लागणे संभवत नाही. तुझ्या ह्या अथांग गुणसुंदर रूपापुढे (रमणीय-गुणार्णवायै।) मी नतमस्तक आहे.

माय हे विश्व चालवणारी, विश्विनियंता अशी शक्ती तूच आहेस. हे जग तुझ्या आज्ञेने चालते. हे संपूर्ण जग शक्तिने व्यापले आहे. तेज, सार वा बल ही शक्तीची रूपे आहेत. तू ‘‘सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता’’ सर्व भूतमात्रांमधे शक्ति स्वरूपात राहतेस. जेव्हा भूतमात्रात शक्ति असते तेव्हाच त्यांना पुष्टी मिळते, ते महान पराक्रम करू शकतात. भूतमात्रांची ही पुष्टी, कर्तव्य करण्याची महान क्षमता, धैर्यशीलता, सामर्थ्य तूच आहेस. त्यानेच त्यांना ऐश्वर्य, सुखसम्पत्ती प्राप्त होते. तुझ्या ह्या शक्तिरूपाला, पुष्टिरूपाला माझा प्रणाम माते!

शत म्हणजे शंभर पाकळ्यांनी भरगच्च असलेल्या अत्यंत सुंदर, मनोहारी कमळालाच तू आपले निकेतन म्हणजे घर बनविले आहेस. कमळामधे अंगभूत असणारी अनुपम शोभा तूच आहेस. कमळात कमळाचे सौन्दर्य होऊन राहणार्‍या हे कमले तुला वारंवार वंदन!

जेथे गुण तेथे लक्ष्मीचा निवास असतो. विष्णुमधे सर्व गुण एकवटले आहेत आणि म्हणूनच तो पुरुषत्तम आहे. अर्थात हे माय! अशाच पुरुषोत्तमाचे दास्यत्व तू आनंदाने पत्करले आहेस. आणि तुझी ही ऐश्वर्यसम्पन्न नम्र मूर्ती ह्या पुरुषोत्तमाला अत्यंत प्रिय (वल्लभा) आहे. पुरुषोत्तम श्रीहरीने तुला कायम हृदयाशी धरले आहे अशा तुझ्या ऐश्‌वर्यसम्पन्न नम्रमूर्तीला माझे शतशः प्रणाम! 


श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्म-फल-प्रसूत्यै

रत्यै नमोऽस्तु रमणीय-गुणार्णवायै।

शक्त्यै नमोऽस्तु शतपत्र-निकेतनायै

पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तम-वल्लभायै।।11

 

वेदस्वरूप ‘श्रुति’ तू तुज वंदितो गे

 देसीच पुण्यफल तू जगि सुकृताचे

आनंदसिंधु ‘रति’ तू ; नमितो तुला गे

 आहे मनोरम चि सद्गुण सागरू गे।।11.1

 

‘शक्ती’ च तू अखिल या जगतातली गे

 आहे निवास कमले कमलामधे गे

सम्पन्नता, प्रगति, या जगताचि ‘पुष्टी’

 आहेस तूच पुरुषोत्तम प्राण तू गे।।11.2

 ------------------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक  12 –

कमळाचा दांडा नळीप्रमाणे पोकळ असतो म्हणून त्याला नालीक म्हणतात. ज्या प्रमाणे पाण्यातून वर आलेल्या कमलनालेवर कमळाचं  सुरेख फूल तोलून धरलेलं असतं त्याप्रमाणे; लक्ष्मीचं अत्यंत प्रसन्न, कमळ सदृश (निभ) प्रफुल्लित, अत्यंत टवटवीत, असं आरक्त वर्णी मुखकमल (आनन) तिच्या सुबक सुंदर मानेवर शोभून दिसतं. अशा लावण्यवती रमेला माझा नमस्कार असो!

जिथे दुधा तुपाची काही कमी नाही, म्हणजे जेथे गोधन समृद्ध आहे; जणु काही जिथे दुधा दह्याचे पाट वाहत आहेत वा दुधा दह्याने काठोकाठ भरलेला सागर आहे; अशी समृद्ध भूमी हीच जिची जन्मभूमी आहे त्या लक्ष्मीला माझा प्रणाम.

समुद्र मंथनाच्यावेळी चंद्र, अमृत आणि लक्ष्मी हे तिघेही समुद्राच्या पोटातून बाहेर आले. म्हणून हे तिघेही सहोदर म्हणजे सख्खी भावंडे आहेत. तिघेही अत्यंत गुणी आहेत. आपल्या सौम्य, शांत, आह्लाददायक स्वभावामुळे तिन्ही लोकात ही भावंडे प्रिय आहेत. आनंद, जरा-रोगमुक्ती, ऐश्वर्य देणारी ही भावंडे मोठी शोभून दिसतात. चंद्रामृताच्या ह्या भगिनीस माझा पुन्हा पुन्हा नमस्कार!

सर्व गुणांचा सागर, सर्व नरांच्या समुदायाचा मुख्य अशा नारायणाची अत्यंत प्रिय पत्नी असलेल्या कमलेला माझा नमस्कार!

(वृत्त उपेंद्रवज्रा, अक्षरे-11, गण - ज त ज ग ग  )                


नमोऽस्तु नालीक-निभाननायै

नमोऽस्तु दुग्धोदधि-जन्मभूम्यै।

नमोऽस्तु सोमामृत-सोदरायै

नमोऽस्तु नारायण-वल्लभायै।।12

( नालीक - कमळ. निभ - सदृश, समान, अनुरूप (फक्त समासाच्या शेवटी))

देठावरी नाजुक पद्म डोले

आरक्त उत्फुल्ल प्रसन्न जैसे

तैसेच शोभे मुख हे रमेचे

मानेवरी नाजुक पद्म जैसे ।। 12.1

 

देई जला पद्म अपूर्व शोभा

तैसी रमा ही खुलवी जगाला

ऐश्वर्यसम्पन्न अशा रमेला

असो नमस्कार पुन्हा पुन्हा हा ।। 12.2

 

दही दुधाची बहु रेलचेल

जिथे असे क्षीरसमुद्र थोर

ऐश्वर्यसम्पन्न धरा अशी ही

असे रमेची निज जन्मभूमी ।। 12.3

 

नारायणासी सुखवी विशेषी

हरिप्रिया आवडते हरीसी

समृद्ध ऐशा कमलेस माझा

असो नमस्कार पुन्हा पुन्हा हा ।। 12.4

 

आह्लाददायी सुखवी जगाला

देईच वा जे अमरत्व लोका

ते चंद्रमा अमृत हेचि दोघे

उत्पन्न सिंधूमधुनी जहाले ।। 12.5

 

लक्ष्मी असे सागर कन्यका ही

म्हणून त्यांची भगिनी असेची

जगी तिघांचे उपकार भारी

लक्ष्मीस ऐशा नमितो पुन्हा मी ।। 12.6

 

प्रणाम माझा कमलानना गे

प्रणाम हा सागरकन्यके गे

सुधांशु भाऊ भगिनी सुधा गे

 प्रणाम नारायण प्राण तू गे।। 12.7

--------------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक  13 –

लहानशा शिशुला स्वतःची काहीही काळजी घेता येत नाही. पण त्याचा त्याच्या मातेप्रति अनन्यभाव असतो; आणि म्हणुनच तान्हे बाळ रडू लागले तर आई हातातली सर्व कामे दूर ठेऊन धावत येऊन आपल्या तान्हुल्याला उचलून कुशीत घेते. लक्ष्मी मातेविषयी ही अनन्य भावना ठेऊन आचार्य म्हणतात, माय, माझ्या मनात तुला निरंतर वंदन करण्याची प्रवृत्ती दृढ कर. मला अजून काही नको. तुझी वंदना जगतील सर्व सुखे सहज मिळवून देते. मला तुझी अनन्य भक्ती दे.

 तुकाराम महाराजही देवाला हेच मागणं मागतात,

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा

गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी

नामदेव विठ्ठलाला म्हणतात. ‘‘देवा, तू मोठा चतुर आहेस. तुझ्या भक्तांना जे जे हवं असेल ते तू लगेच त्यांना देऊन तुझ्यापासून त्यांना दूर करतोस. तू मला असं फसवू शकणार नाहीस. मला तुझ्या चरणांवाचून अन्य काही नको.    

 

संपत्कराणि सकलेन्द्रिय-नन्दनानि

साम्राज्य-दान-विभवानि सरोरुहाक्षि

त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि

मामेव मातरनिशं कलयन्तु माऽन्ये।।13

 

माते तुझ्याच चरणी झुकु देत माथा

लागोच छंद मजला तव भक्तिचा गा

लक्ष्मी करी नमन जो तव पादपद्मी

अप्राप्य त्यासचि नसे जगतीच काही ।। 13.1

 

आराधना; कमल-सुंदर-लोचना गे

 भावे अनन्य करिता तव शुद्ध भावे

साम्राज्य वैभव मिळे न उणेच काही

 ऐश्वर्य पूर्ण नित जे सुखवीच गात्री।।13.2

 

ज्याच्या हृदी उगवतो नित ज्ञानसूर्य

घेईल आश्रय कसा तम तो तिथेच

माते तुला नमन जो करितोच नित्य

त्याला विवेक पथ स्पष्ट दिसे पुढ्यात।। 13.3

 

जी वंदना वितळवी मम पापराशी

 अज्ञान दूर करिते तव अर्चना जी।

लाभो मलाच जननी नच अन्य काही

 लाभो मला दृढतमाच  अनन्य भक्ती।।13.4

-----------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 14 –

जे जे भव्य, जे जे दिव्य, जे जे अनुपम, जे जे सर्वांच्या हितार्थ तेथे तेथे हृदय न सांगताच भरून येते. नेत्र पाणावतात. हात आपोआप जुळले जातात. मस्तक नम्र होऊन झुकतेच. ‘‘हे असे कर’’ असं कोणी सांगावं लागत नाही. मनापासून घडणारी ही कृती आहे. लक्ष्मीची सर्व भूतमात्रांवर असलेली दया, अनुकम्पा, आपत्याप्रमाणे त्यांच्या पालन पोषणाची घेतलेली काळजी, उदार हस्ते त्यांना अर्पण केलेले ऐश्वर्य हे सर्व पाहता आचार्यांचे भावनाशील मन भरून आले. अत्यंत कृतज्ञपणे ते तिला वारंवार नमस्कार करत आहेत.

अम्बुज म्हणजे कमळ हेम म्हणजे सोने. लक्ष्मी सोन्याच्या कमळात बसलेली आहे. हे सुवर्णकमलाचं सिंहासन तिच्या ऐश्वर्याचं, सामर्थ्याचं, महान क्षमतेचं प्रतिक आहे. अशा ह्या कमलालय कमलेला माझा नमस्कार असो! (नमोऽस्तु हेमांबुजपीठिकायै । )

ह्या धरित्रीची जी स्वामिनी आहे, ह्या भूमंडलावर जिची अनिर्बंध सत्ता चालते, जी ह्या सर्व वसुंधरेचं नियंत्रण करते, मार्गदर्शन करते अशा रमेला माझा नमस्कार असो! ( नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै। )

जे देव कायम धर्माच्या पथावर चालतात, नियमांचं काटेकोर पालन करतात. यम, नियम हेच ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे अशा देवांना ‘‘यतो धर्मः ततो जयः।’’ म्हणत जी सागरकन्यका कमला आपल्या दयाळु स्वभावाला अनुसरून मदत करण्यात तत्पर आहे अशा ह्या सागरकन्यकेला माझा नमस्कार असो!

शार्ङग धनुष्य धारण करणार्‍या, अत्यंत पराक्रमी श्रीहरीची जी प्राणप्रिया आहे त्या लक्ष्मीमातेला माझा नमस्कार असो!

 

 (वृत्त – उपेंद्रवज्रा- अक्षरे 11, गण- ज त ज ग ग)

नमोऽस्तु हेमांबुजपीठिकायै

नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै।

नमोऽस्तु देवादिदयापरायै

 नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै।।14

  ( अम्बुज – कमळ; हेमाम्बुज – सोन्याचं कमळ. पीठ – आसन, देवासन. दयापर – दयाकरण्यात तत्पर. नायिका - स्वामनी, पत्नी, मार्गदर्शक, गण्यमान्य वा प्रधान स्त्री, सेनानायक स्त्री )

सुवर्ण पद्मी स्थित पद्मजा जी

 प्रणाम माझा कमले तुलाची

 असेच भूमंडल नायिका जी

 प्रणाम माझा गिरिजे तुलाची।।14.1

 

दयार्द्र जी देवगणांवरी ही

 प्रणाम देवी नतमस्तका मी

धनुष्यधारी हरिचीच पत्नी

 प्रणाम माझा हरिवल्लभेसी ।।14.2

--------------------------------


 
 

कनकधारास्तोत्रम्

श्लोक15

अर्जुनानी श्रीकृष्णाकडे विश्वरूप पाहण्याचा हट्ट धरला. श्रीकृष्णाने तो पुराही केला. पण प्रत्यक्ष ते विराट विश्वरूप पुढे उभे राहिल्यावर भारल्यासारखा अर्जुन सर्व काही विसरून फक्त ‘‘नमो नमः नमो नमः’’ म्हणत राहिला. श्री लक्ष्मीचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर लहानग्या आचार्यांचेही आई बद्दल असलेलं प्रगाढ प्रेम, आपली इच्छा पूर्ण केल्याबद्दलची कृतज्ञता, आदर ह्या असख्य भावनांनी हृदय भरून आले असावे. मातेचे वात्सल्य, असीम दातृत्व अनुभवल्याने मनात उठलेला भावनांचा कल्लोळ आवरणे कठीण झाले असावे. नेत्रांमधून वाहणार्‍या प्रेमाश्रुंसमवेत ते फक्त मातेला वारंवार वंदन करत त्यांच्या भावना त्यातून व्यक्त करत हात जोडून उभे असावेत.

हे माय माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?  तू भृगुऋषींची कन्या वेदवल्लीच आहेस. तुला माझा नमस्कार असो. सर्व सद्गुणांची मूर्ती अशा विष्णूची तू अर्धांगिनी आहेस. त्याने त्याच्या छातीवर मोठ्या प्रेमाने तुला स्थान दिले आहे. सद्गुणांच्या बळावर प्राप्त झालेलं, सद्गुणांसवे झळाळणारं ऐश्वर्य ते तूच आहेस. (दाक्षिणात्यांमध्ये अशी एक आख्यायिका आहे की, काही गैरसमजामुळे कायम श्रीविष्णुच्या छातीवर विसावलेली लक्ष्मी तिचा क्षीरसागरातील निवास सोडून वृंदारण्यात छोटी बालिका बनून आली. तिथे भृगुऋषींनी तिचा सांभाळ केला. मानधा किंवा वेदवल्ली ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे.  तेथे विष्णू श्रीरंगनाथाच्या रूपात आले आणि परत त्यांचा विवाह झाला. )

.

मित्रांनो ही कमला कायम कमळात वास्तव्यास असते. कमलम् चा अर्थ पाहू जाता ‘कम् अलम् करोति’ म्हणजे पाण्याला (कम्) जे पूर्ण सुशोभित करत. एखाद्या सुंदरीनी साजशृंगार करता करता एखादा अलंकार घालून म्हणावं, ‘‘पुरे आता बास!  आता मी सुंदर दिसत आहे.’’  त्या पुरे बास! साठी संस्कृत शब्द आहे अलम्! जो घातल्यावर त्या सुंदरीला आता बास! अस वाटतं तो अलंकार! त्या प्रमाणे जे सरोवरातील पाण्याला पूर्णतः सजवून ‘‘आता बास आता मी कमालीचा सुंदर झालो’’ असं वाटायला लावते ते कमळ! ह्या अशा कमळाचं जे सौदर्य आहे, ऐश्वर्य आहे, नेत्रांना लुब्ध करणारं कोमल टवटवीत तेज आहे ते म्हणजेच लक्ष्मी! कमळाचं हे ऐश्वर्य सदोदित कमळासवे राहतं. अशी ही कमळालाच आपलं घर (आलय) करून राहणारी ही जी तेजस्वी, सुंदर कमलालया ( कमल आलया) आहे. अशा कमलालयेस  आचार्य वारंवार वंदन करत आहेत.

यशोदेने गायी,गुरांना बांधायचे दावे (दाम) ज्याच्या पोटाला (उदर) बांधून उखळाला बांधून ठेवले; तो भक्तजनांच्या प्रेमरज्जूने सहज बांधला जाणारा दामोदर ज्या कमलेला कायम आपल्या हृदयाशी धरून आहे अशा अशा दामोदर-प्रिय कमलेला माझा वारंवार नमस्कार असो!   

नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै

 नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै

नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै

नमोऽस्तु दामोदरवल्लभायै।।15

 

प्रणाम माझा भृगुकन्यके हे

 मुकुंद चित्ती नित तूच आहे

निवास पद्मात करीसि तू गे।

प्रणाम दामोदर कामिनी गे।।15

-------------------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 16

हे माय! हे कमले! तू विलक्षण लावण्यवती आहेस. त्या कमलनयन विष्णुची प्रियतमा आहेस. जिला जरा नाही, जी कायम नवयौवनाने मुसमुसत आहे अशी वसुंधराही तूच आहेस (कान्ता) तुला नमस्कार असो.

 कमळाच्या कळीप्रमाणे दोन्ही बाजूंना निमुळते होत जाणारे तुझे टपोरे डोळे कमळाप्रमाणेच सुंदर आहेत. (कमलेक्षणा) तुला नमस्कार असो.

माय! तू साक्षात ह्या सर्व विश्वातील आणि विश्वाचे सर्व  ऐश्वर्य, वैभव आहेस. तू कल्याण, आनंद, सौभाग्य, सफलता आहेस. (भूतिः) ह्या संपूर्ण त्रिभुवनाची तू माय आहेस. ह्या विश्वाची उत्पत्ती तूच केली आहेस. उत्पत्तिची देवताही तूच आहेस.  (भुवनप्रसूति) तुला नमस्कार असो!

ह्या विश्वातले देव, दानव सर्वजण अत्यंत आदराने सन्मानपूर्वक तुझीच अर्चना, पूजा, स्तुती करत असतात. तुझीच आराधना करत असतात. तुला नमस्कार असो!

नंद यशोदेचा लाडका कान्हा, कृष्ण, श्रीहरी, मुकुंद------किती नावे घ्यावीत! सर्वांच्या जीवाचा जीव, प्राणप्रिय अशा आत्मजाची म्हणजेच मुलाची तू अत्यंत प्रिय अशी पत्नी आहेस. सद्गुणांचं ऐश्वर्य तूच आहेस माते! तुला नमन!

नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै

नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै

नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै

नमोऽस्तु  नन्दात्मजवल्लभायै।।16

मनोहरा तू कमनीय लक्ष्मी

 सुवर्णकांती नित सौख्यमूर्ती

 सुलोचना गे  कमलासमा ची

सुनेत्र आकर्ण तुझेच लक्ष्मी।।16.1

 

तू भाग्यदात्री प्रसवी जगाला

 प्रणाम माझा चरणी तुझीया

यशोमती आणिक नंद यांच्या

 प्रियात्मजाची प्रिय कामिनी गा।।16.2

 

तुझी प्रशंसा सुरवृंद गाई।

 प्रणाम माझा तुजला ‘हरिश्री’।।16.3

----------------------------------------

कनकधारास्तोत्रम्

श्लोक 17

जो आपलं दारिद्र्य, दुःख, भय दूर करू शकेल  अशा थोर व्यक्तीलाच  आपलं दुःख, गार्‍हाणं सांगण्याचा काही उपयोग होतो. हे माय! ऐश्वर्य आणि औदार्य हे दोन्ही गुण हातात हात घालून अत्यंत नम्र भावाने जणु तुझ्यापाशी कायमचे राहतात. माहेर सासर दोन्हीकडून तू सम्पन्न आहेस. अमृताच्या सागराची तू पुत्री आहेस. ( अमृताब्धिपुत्रीम्) तर तिन्ही लोकांचे, चौदा भुवनांचे जे नायक श्रीविष्णू त्यांची तू धर्मपत्नी आहेस. (अशेष-लोकाधिनाथ-गृहिणी) ह्या सर्व विश्वाची, जगाची तू माय आहेस.( जगतां जननीम्) तुझ्या ऐश्वर्याला काही कमीच नाही. माते तुला मी वारंवार नमस्कार करतो. (येथे मातर्नमामि आणि प्रातर्नमामि असे दोन पाठभेद आहेत.) रोज प्रातःकाळी मी तुझेच स्मरण करतो.

माते, चारी दिशात चार अत्यंत उत्तम, तरूण हत्ती त्यांच्या सोंडेत सोन्याचे कलश(कनक-कुम्भ) घेऊन उभे आहेत. त्यांनी आपल्या सोंडेमध्ये  पवित्र गंगेचे / स्वर्वाहिनीचे  अत्यंत शुद्ध, विमल जल भरून आणून ते कुम्भ भरले आहेत. वारंवार ते तुझ्यावर त्या विमल जलाचा वर्षाव करत आहेत.. (अवसृष्ट – खाली सोडणे, अभिषेक करणे) तुला अभिषेक करत आहेत. त्या स्फटिकासमान पारदर्शक जलाने तू अगदी चिंब चिंब झाली आहेस. माय ह्या जलाने कदाचित तू बाह्यांगाने ओली झाली असशीलही; परंतु तुझ्या हृदयात दयेचा पाझर आहेच.  तुझं मन अत्यंत दयार्द्र आहे. तुला ‘‘दारिद्‌यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता’’ म्हणतात ते उगीच का?(हे दुर्गेचेचे विशेषण असले तरी लक्ष्मीलाही तेवढेच लागू होतेअसे मला वाटते.)      तुझ्यासारखी अत्यंत कनवाळु, सर्वांवर उपकार करण्यासाठी सदैव कटिबद्ध अशी दुसरी कोणी व्यक्ती मिळू शकेल का? तू एकमेवाद्वितीयच आहेस.

श्रीसूक्तामधेही लक्ष्मीचे आर्द्रा हे विशेषण आले आहे. पाऊसपाण्याने छान भिजलेल्या जमिनीलाही लक्ष्मी म्हटले जाते. अशी जमिन धान्याच्या रूपात जणू लक्ष्मीच देत असते.

हे माय म्हणूनच ऐश्वर्यसम्पन्न आणि औदार्यपूर्ण असलेल्या तुला मी शरण आलो आहे . माझं मनोरथ तूच पूर्ण करू शकशील. माय तुला पुन्हा पुन्हा वंदन!

 (वृत्त  - वसंततिलका, अक्षरे-14, गण - त भ ज ज ग ग )

दिग्घस्तिभिः कनककुम्भ-मुखावसृष्ट-

स्वर्वाहिनी-विमल-चारु-जल-प्लुताङ्गीम्।

मातर्नमामि जगतां जननीमशेष-

लोकाधिनाथ-गृहिणीममृताब्धि-पुत्रीम्।।17

 

चारी दिशात सजले गज स्वागतासी

 गंगा सलीलयुत हेमघटा धरोनी

वर्षाव ते तुजवरी करिती जलाचा

 आहे अती विमल जे सुखवी तनूला॥17.1

 

तू चिंब गे सुखद त्या जल-वृष्टीने ची

 पुत्रीच त्या जलधिची सुखसागराची

आहेत थोर उपकार तुझेच आई

विश्वावरी सकल या गणती न त्यासी।।17.2


सत्ता अबाधित जयाचिच तीन लोकी

त्या लोकनाथ हरिची असशीच पत्नी

प्राणप्रियाच हरिची जननी जगाची 

माते करी नमन मी तव पादपद्मी ।।17.3


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 18

हे माते कमले ! मी तुझी रम्य मूर्ती वारंवार माझ्या नयनांसमोर आणत आहे. रम्य उत्फुल्ल कमळात बसेलेली तुझी तेजस्वी मूर्ती, तुझ्या दोन्ही हातात मांगल्याचं प्रतिक असलेली दोन टवटवीत लाल कमळं, तुझी विद्युल्लतेप्रमाणे अत्यंत शुभ्र चमकदार रेशमी वस्त्रं, कपाळावर रेखलेलं गंध, गळ्यात सुवासिक फुलांची माळ, आहाहा! तुझ्या ह्या रूपाने माझं मन अत्यंत प्रसन्न झालं आहे.

समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, संपूर्ण ज्ञान आणि पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला भग असे म्हणतात. ज्याच्यापाशी ह्या सहांचा लखलखणारा सकल पुंज विराजमान असतो त्याला भगवान अथवा भगवती म्हणतात.

अथवा उत्पत्ति, स्थिति, प्राणीमात्रांचे गमनागमन, विद्या, अविद्या ह्या सहा गोष्टींचे ज्ञान ज्याला आहे त्याला भगवान वा भगवती म्हणतात.

 भगवान श्रीहरी आणि भगवती लक्ष्मीजवळ ह्या सहाचा संग्रह कायम निवास करतो. उत्पत्ति, स्थिति आदि सर्व ज्ञानही दोघांना आहे. म्हणूनही दोघे भगवान आणि भगवती आहेत. भगवान वा भगवती हे श्रेष्ठ, अधिकारवाचक, पूर्ण सामर्थ्य, पूर्ण सत्ताबोधक, वैभव व सिद्धिसूचक असे नाम आहे. (सौंदर्यलहरींच्या 34 व्या श्लोकातही आचार्यांनी त्रिपुरसुंदरीचा उल्लेख भगवती म्हणून केला आहे.)

हे भगवती म्हणूनच श्रीहरीच्या मनालाही मोहून घेणारे तुझे हे मोहक रूप हया त्रिभुवनाची उत्पत्ती करणारं, पालन करणारं  तर आहेच शिवाय त्रिभुवनाला ऐश्वर्य निरतिशय आनंद देणारं, कल्याण करणारंही आहे. माय! माझ्यावर प्रसन्न हो! तुझी कृपा झाल्यावर कमी कशाची? तुला वारंवार नमन माते!




(विषम वृत्त )

सरसिज-निलये सरोज-हस्ते

धवलतमांशुंक-गन्ध-माल्य-शोभे

भगवति हरिवल्लभे मनोज्ञे

त्रिभुवन-भूति-करि प्रसीद मह्यम्।।18

( सरसिज – सरोवरात येणारं कमळ. निलय – घर. धवलतम – अत्यंत शुभ्र. अंशुक – चमकदार रेशमी वस्त्र. भूतिः -कल्याण, क्षेम,कुशल, आनंद, समृद्धि, ऐश्वर्य, धन दौलत.  )

कमल सदन हे, तुझे प्रसन्न

 करि कमल धरी, सदा प्रफुल्ल

तलम धवल हे, तुझेचि वस्त्र

 धवल सुमन हार, भाळि गंध।।18.1

 

अमल हरि हृदी, निवास नित्य

 भगवति कमले, तुझाचि रम्य

मुदित करि जगा, करी सुरम्य

जननि मजवरी, करी कृपेस  ।।18.2

------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 19

माय! तुझ्या एका दृष्टिक्षेपात इतक सामर्थ्य आहे की तो एखाद्या दरिद्री माणसालाही महान ऐश्वर्य देतो. जणु ह्या पृथ्वीवर इन्द्रलोकीचं ऐश्वर्य उतरलं आहे की काय असा भास निर्माण होईल इतकी समृद्धी प्रदान करतो.

आणि म्हणुनच तुझे भक्त तुझा एक कृपाकटाक्ष आपल्यावर पडावा ह्यासाठी उत्तमप्रकारे, विधिपूर्वक, अत्यंत मनोभावे तुझी उपासना करतात. ही उपासना, ही तुझी श्रेष्ठ भक्तीच त्या भक्तवराचे सर्व मनोरथ पूर्ण करते त्याला अभीष्ट असलेल्या सम्पत्तीचा, वैभवाचा लाभ करून देते. इतकेच नाही तर हीच श्रेष्ठ भक्ती भक्ताच्या सम्पत्तीत भरघोस वाढ होईल, त्याचे वैभव विस्तार पावेल (संतनोति) हयाचीही काळजी घेते. तू तुझ्या भक्ताला कधिही विन्मुख पाठवत नाहीस. त्याला निराश करत नाहीस.

हे  माते, मायावी युद्ध खेळण्यात निष्णात असलेल्या मुर राक्षसाला मारणारा अत्यंत प्रबळ असा श्रीहरी त्याच्या महापराक्रमाने मुरारी म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या महापराक्रमी मुरारीची अत्यंत प्रिय, त्याच्या हृदयातच निवास करणारी, तू त्याची प्राणवल्लभा आहेस. मी काया, वाचा, मनाने (वचनाङ्ग-मानसैः – वचन + अंग + मानसैः) तुला शरण आलो आहे तू माझ्यावर कृपा कर. माय तुला वारंवार नमन!

(वृत्त - रथोद्धता, अक्षरे-11 , गण- र न र ल ग , रान्नराविहरथोद्धता लगौ)

यत्कटाक्ष-समुपासना-विधिः

सेवकस्य सकलार्थ-सम्पदः।

संतनोति वचनाङ्ग-मानसैः

त्वां मुरारि-हृदयेश्वरीं भजे।।19

 

लाभण्या तव कृपाकटाक्ष ची

 अर्चना तव अनन्य जो करी

भाग्य थोर मिळते तया जगी

 काय ना करि उपासना तुझी।।19.1


माय गे स्तुति तुझीच मी करे

 सर्वथा मन शरीर बुद्धिने

तू मुकुंद हृदयी विराजते

 मी तुला शरण गे हरिप्रिये ।।19.2

--------------------------------------


 कनकधारास्तोत्रम्

श्लोक 20

दान देताना सत्पात्री दान द्यावं असं म्हणतात. ज्यांच्याजवळ एखादि गोष्ट मुबलक आहे तीच त्याना दान देऊन काय उपयोग? भरल्या ब्राह्मणा दही करकरीत असे व्हायचे. धनी, सम्पन्न लोकांना अजून धन दिल्याने त्याना त्याचा काय उपयोग?

हे जननि!

माझ्या सारखा अकिंचन, दीन दरिद्री तुझ्या कृपा वर्षावासाठी सर्वात जास्त पात्र आहे. मायऽ! तू दीनबंधु आहेस. आपल्या सर्वात दुबळ्या आपत्याला आई सर्वात आधी उचलून घेते. त्याच्याकडे जास्त लक्ष देते. तिला त्याचा इतका कळवळा असतो की, त्याच्या काळजीमुळे त्या आपत्यात तिचा जीव सर्वात जास्त गुंतलेला राहतो. मला पाहून तुझ्या हृदयात करुणेचा असाच पूर येऊ दे. आणि त्या पूरामुळे उठणारे तरंग मला तुझ्या डोळ्यात दिसू देत. माझी दरिद्रि अवस्था/ अकिंचनत्व पाहून तुझं मन हेलावून जाऊ देत. मी सर्व दीनांमधे दीन आहे आणि तू अथांग कृपासागर आहेस. मी तुझ्या दयेसाठी अकृत्रिम पात्र आहे. तुझ्या दयेचा वर्षाव माझ्यावर होऊ दे. माय, तुला वारंवार तुला नमन!

कमले कमलाक्ष-वल्लभे त्वं

करुणा-पूर-तरङ्गितैरपाङ्गैः।

अवलोकय मामकिञ्चनानां

प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः।।20

 

प्राणप्रिया च कमले कमलेक्षणाची

 माझ्यावरी बरसु दे तव स्निग्ध दृष्टी ।

येवोच चित्ति तुझिया करुणेस पूर

 त्याचे तरंग नयनी तुझिया दिसोत ।।20.1

 

पाहूनि गे मजसमा अति दीन वत्स

 हेलावुनी नजर ही तव जाऊ देत

आहे अकिंचन अती बहु मी अभागी

 निर्व्याज या तव कृपेसचि पात्र लक्ष्मी।।20.2

-----------------------------------------------


कनकधारास्तोत्रम्

श्लोक 21

विष्णुसहस्रनामात ‘‘सन्धानः’’ असे एक विष्णुचे नाव आहे. म्हणजे जो तुमचे कार्य आणि कार्यफळाचे संधान बांधतो, योग्य जोडणी करतो. जेवढे पुण्यकर्म असेल त्याचे योग्य व योग्य प्रमाणात फळ देतो. प्रत्येकाच्या सत्कर्माची नोंद घेऊन त्याला त्याच्या बदल्यात भरपूर सुखे देतो. त्याला चांगल्या फळापासून वंचित ठेवत नाही.

   ह्या स्तोत्राच्या शेवटी त्याची फलश्रुती सांगतांना आचार्य म्हणतात जो कोणी दररोज (अन्वहं) हे स्तोत्र म्हणेल आणि ह्या वेदस्वरूप (त्रयिमयी) व त्रिभुवनांची माता असलेल्या हया रमेचे गुणगान करेल, स्तुती करेल त्याची स्तुती कधी विफळ जाणार नाही. कारण माता कधी आपल्या पुत्राकडे दुर्लक्ष करत नाही. ती कायम त्याचे हितच करते. आचार्य आपल्या देव्यापराधक्षमापण स्तोत्रातही हेच सांगतात- कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4  

लक्ष्मीमाता भक्ताच्या कार्याचे, स्तुतीचे फळ नक्की देतेच. (कारण ती विष्णुपत्नी पतिप्रमाणे सन्धाना अशीच आहे.) ती तिच्या भक्ताला सर्वगुणांनी श्रेष्ठ, सर्वगुणसम्पन्न करते. (गुणाधिका) माय त्याला गुरुतर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत विपुल असे भाग्य, ऐश्वर्य प्रदान करते. (गुरुतर-भाग्य-भाजिनः) तिचे भक्त मोठे भाग्यशाली असतात. तिची उपासना करून त धन्यता अनुभवतात. 

( वृत्त- अतिरुचिरा- चतुर्ग्रहैरतिरुचिराजभस्जगाः, अक्षरे 13, गण - ज भ स ज ग )

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं

त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।

गुणाधिका गुरुतर-भाग्य-भाजिनो

भवन्ति ते भुवि बुध-भाविताशयाः।।21

 

रमा च जी त्रिभुवन माय मूर्त गे

 असेचि वेद सकल रूप हे जिचे

सश्रद्ध पूजन कुणि जो करी तिचे

 स्तुती करी प्रतिदिन गात स्तोत्र हे ॥21.1

 

 मनात आस प्रखर चि सद्गुणांचि गे

 तयासि इच्छित फल हे मिळे सुखे

तया पुढे गुण नतमस्तकी उभे

 तयासि भाग्य परमश्रेष्ठ लाभते ।।21.2


-----------------

29 जानेवारी 2011 पौष षट्तिला एकादशी

No comments:

Post a Comment