।। ब्रह्मज्ञानावलीमाला ।।




मी कोण आहे ह्या वारंवार पडणार्‍या प्रश्नाचे उत्तर मी ते सर्वव्यापी अव्यय ब्रह्म आहे. असे सांगणारे तसेच आपल्या आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून देणारे हे स्तोत्र आहे.

सकृच्छ्रवणमात्रेण ब्रह्मज्ञानं यतो भवेत्
 ब्रह्मज्ञानावलीमाला सर्वेषां मोक्षसिद्धये ।। 1
(सकृत् - एकदा) 
ब्रह्मज्ञानावलीमाला । मनोभावेचि एकदा   
एकाग्रचित्त जो ऐके । आणे आचरणी सदा ।। 1.1

बोले चाले करे तैसा । आत्मसात करे तया
ब्रह्मज्ञानावलीमाला । मोक्षदायी असे तया ।।1.2

असङ्गोहमसङ्गोहमसङ्गोहं पुनःपुनः।
सच्चिदानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥2 

असे निःसंग निःसंग । असे निःसंग मी सदा
त्रिवार सांगतो मी हे । असे निःसंग मी सदा ।। 2.1

कुणाशीही नसे माझा । काही संबंध तत्त्वता
पद्मिनीपान पाण्यात । तैसा निर्लेप मी सदा ।। 2.2

नाश मृत्यू मला नाही । रोग व्याधी नसे मला
विश्व सारे भरूनी मी । सर्वत्र राहतो सदा।। 2.3

आनंद विश्वव्यापी मी । कधी ना संपतो असा
 सच्चिदानंदरूपी मी । अविनाशीच तत्त्वता ।। 2.4

नित्यशुद्धविमुक्तोऽहं निराकारोऽहमव्ययम्।
भूमानन्दस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययम् ।।3
 ( भूमन् -  मोठं परिमाण, प्राचुर्य, यथेष्टता, मोठी संख्या . भूमानन्द - प्रचंड आनंद, भूमानन्दस्वरूप - परमानंदस्वरूप )
असे निर्मळ मी शुद्ध । नित्य मुक्त असे सदा
अंतराळी जसा वायू । तसा राहेच मी सदा ।। 3.1

जलाशयास भेदूनी । किरणे पोचती तळा
ओलावतीच कैसी ती । तैसा मीची असे सदा ।। 3.2

निराकारास ह्या कैचा । आकार संभवे कधी
अविनाशी असे मीची । नाश ना पावतो कधी ।। 3.3

आनंद विश्वव्यापी मी । सौख्य आनंद कंद मी
ग्रासतो ना मला मृत्यू ।  अविनाशीच तत्त्व मी ।। 3.4

नित्योऽहं निरवद्योहं निराकारोऽहमच्युतः
परमानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥4
 ( निरवद्य – निष्कलंक, निर्दोष, अकलंकनीय)
                                                                        चिरस्थायी असे मीची । नित्य शाश्वत निश्चित        
निष्कलंक निराकारी । सर्वव्यापीच अच्युत ।। 4.1

परमानंद रूपाने । ओतःप्रोत भरे जगी
माझ्याच सारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 4.2

शुद्ध चैतन्यरूपोऽहमात्मारामोऽहमेव च
                अखण्डानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 5 
  
रंगलो अत्मरूपी हा । शुद्ध चैतन्यरुप मी
आत्माराम असे मीची । राहे सर्वत्र व्यापुनी ।। 5.1

मी तो अखंड आनंद । अबाधित असे जगी
व्यय ना होतसे माझा । अविनाशीच तत्त्व मी ।। 5.2


प्रत्यक्चैतन्यरूपोऽहं शान्तोऽहं प्रकृतेः परः।
शाश्वतानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 6

( प्रत्यक् - सर्वांन्तर्यामी, सर्वांमध्ये निवास करणारा )
सर्वांच्या हृदयी राहे । तेचि चैतन्य मी असे
प्रसन्न शांत निःस्तब्ध । स्थिर मी सर्वदा असे ।। 6.1

नित्यानंदस्वरूपी मी । मायातीत असेच मी
माझ्याचसारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 6.2

तत्त्वातीतः परात्माहं मध्यातीतःपरः शिवः।
मायातीतः परं ज्योतिरहमेवाहमव्ययः ।। 7

अस्तित्त्वाचेच विश्वाच्या । असे कारण तत्त्व जे
पलीकडे असे त्याच्या । तत्त्वातीतच मी असे ।। 7.1

उपाधी ना मला काही । नित्य चैतन्य मी असे
नसे आदि मध्यान्त । सर्वश्रेष्ठचि मी असे ।। 7.2

कल्याणरूप मी राहे । मायेच्याही पलीकडे
प्रकाशवी प्रकाशाला । प्रकाश श्रेष्ठ मी असे ।। 7.3

विराजमान सर्वत्र । व्यापितो सकलांस मी
झीज ना होतसे माझी । अविनाशीच तत्त्व मी ।। 7.4


नानारूपव्यतीतोऽहं चिदाकारोऽहमच्युतः ।
सुखरूपस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 8

व्यापुनी सर्व रूपांसी । नाना रूपी असून मी
सर्व रूपांचिया आहे । पलीकडे सदैव मी ।। 8.1

झाकती सागरा लाटा । लाटा सिंधू नसे परी
तरंगातूनही सार्‍या। असे सागर एकची ।। 8.2

शुद्ध चैतन्य रूपी मी । स्वस्वरूपी विराजित
स्वरूपापासुनी भ्रष्ट । होतो ना मीच अच्युत ।। 8.3

सुख आनंद रूपी मी । सदानंद स्वरूप मी
व्यापुनी सर्व राहे मी । अविनाशीच तत्त्व मी ।। 8.4


मायातत्कार्यदेहादि मम नास्त्येव सर्वदा ।
स्वप्रकाशैकरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 9

माया आणि तिची कार्ये । देह वा सर्व इंद्रिये
पुत्र मित्र कलत्रादि । माझे कोणी कधी नसे ।। 9.1

असे स्वयंप्रकाशी मी । सर्वकाळ सदैव मी
एकरूप असे नित्य । अविनाशीच तत्त्व मी ।। 9.2

गुणत्रयव्यतीतोऽहं ब्रह्मादीनांच साक्ष्यहम् ।
अनन्तानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 10

सत्त्व, रज, तमाच्याही । पलीकडे असेच मी
ब्रह्मा, विष्णु, महेशाचा । साक्षी एक असेच मी ।। 10.1

घडे उत्पत्ती त्यांचीही । माझ्यापासून ती खरी
माझ्याच प्रेरणेने ते । आपुले कार्य आचरी ।। 10.2

पलीकडेच त्यांच्या मी । अनंत मी अनादि मी
अपार मोद तो मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 10.3
  
अन्तर्यामिस्वरूपोऽहं कूटस्थः सर्वगोऽस्म्यहम् ।
परमात्मस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 11

देही सर्वांचिया  राहे । जीवरूपात मी सदा
निर्विकार असे मीची । कूटस्थ म्हणती मला ।। 11.1

विद्यमानचि सर्वत्र । सर्वत्र विलसे सदा
परमात्मा स्वरूपी मी । अविनाशीच तत्त्वता ।। 11.2

निष्कलोऽहं निष्क्रियोऽहं सर्वात्माऽऽद्यः सनातनः ।
अपरोक्षस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 12

आकारहीन सर्वस्वी । हात पाय मला नसे
मला अवयवांचा ना । पत्ता काहीच तो असे ।। 12.1

कला वा भाग वा अंश । माझे ना होत ते कधी
क्रिया ना करतो काही । असे निष्क्रीय  नित्य मी ।। 12.2

 आत्मा मी भूतमात्रांचा । सर्वांहूनी पुरातन
नटलो विश्वरूपाने । अविकारी सनातन ।। 12.3

मला ना आदि वा अंत । अपरोक्ष स्वरूप मी
सर्वकाही असे मीची। अविनाशीच तत्त्व मी ।। 12.4


द्वन्द्वादिसाक्षिरूपोऽहमचलोऽहं सनातनः ।
सर्वसाक्षिस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 13

शीतोष्ण लाभ हानी वा । जय वा तो पराजय
सुखदःखादि द्वन्द्वे ती । मान वा अपमान तो ।। 13.1

साक्षी मी सर्व द्वंद्वांचा । द्रष्टा अचल केवळ
निर्विकार असे मीची । अव्याहत सनातन ।।13.2

 सर्वसाक्षीच सर्वत्र । कालातीत असेच मी
नसे क्षय अबाधीत । अविनाशीच तत्त्व मी ।। 13.3

प्रज्ञानघन एवाहं विज्ञानघन एव च
अकर्ताहमभोक्ताहमहमेवाहमव्ययः ।। 14

ज्ञानरूप असे मीची । ज्ञानाकार असेचि मी
भोक्ता कर्ता नसूनीही । सर्वकर्ता असेच मी ।।14.1

सर्वजीवस्वरूपी मी । सर्व भोक्ता असेचि मी
कर्तृत्त्व विरहीता मी । नसे भोक्तृत्व अल्पही ।।14.2

सर्वकाही असे मीची । असे अव्यय नित्य मी
शुद्ध सत्य असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 14.3

निराधारस्वरूपोऽहं सर्वाधारोऽहमेव च ।
आप्तकामस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 15

आधार न लगे काही । निराधार असेच मी
परी आधार सर्वांचा । एकमेव असेचि मी ।। 15.1

माझ्यापासून उत्पत्ती । जगताचीच होतसे
लय माझ्यामधे होई । विश्वपालन  मी करे ।। 15.2

कामना पूर्ण होओनी । पूर्णकामा असेचि मी
कामना पुरवीतो मी । ज्या ज्या भक्तहृदी परी ।। 15.3

मीच भोक्ता, फलाशा मी । फळही ते असेच मी
सर्व काही असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 15.4

तापत्रयविनिर्मुक्तो देहत्रयविलक्षणः ।
अवस्थात्रयसाक्ष्यस्मि ह्यहमेवाहमव्ययः ।। 16

दुःख कष्ट नसे व्याधी । शारीरिक मला कदा
दुःखे निसर्ग कोपाची । छळिती ना मला कदा ।। 16.1

दुर्दैवाचेच वा फेरे । घेरती ना मला कधी
तापत्रय छळी देहा । माझा संबंध ना तयी ।। 16.2

देहत्रयचि जे जाणी । स्थूल, सूक्ष्म नि कारण
तयाहूनी असे मीची । निराळाच विलक्षण ।। 16.3

सुषुप्ती जागृती स्वप्न । बाल्य तारुण्य वा जरा
अवस्था ह्या नसे मीची । असे त्याहून वेगळा ।। 16.4

सर्वावस्थांस मी साक्षी । दीप तेवे जसा गृही
निरंतर असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 16.5

दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्परविलक्षणौ
दृग्ब्रह्म दृश्यं मायेति सर्ववेदान्तडिण्डिमः ।। 17

दृग् दृश्य दोनची राहे । विश्वामध्ये पदार्थची
विलक्षण परी राहे । दोन्हीत भिन्नता पुरी ।। 17.1

दृग् हे ब्रह्म असे सत्य । दृश्य माया प्रपंच हा
दवंडी देतसे ऐसी । नित्य वेदान्त श्रेष्ठ हा ।। 17.2
  
अहं साक्षीति यो विद्याद्विविच्यैवं पुनः पुनः ।
स एव मुक्तः सन् विद्वानितिवेदान्तडिण्डिमः ।। 18

जसा राहे दिवा साक्षी । घडणार्‍या क्रियांसची
घडणार्‍या क्रियांमध्ये । भाग घेई न तो परी ।।18.1

तैसा असेच मी साक्षी । क्रिया होतीच हातुनी
 घेतले जाणुनी वेदा । शंका ना उरली मनी ।। 18.2

जाण ज्याला अशी येई । तोच विद्वान ह्या जगी
तोच मुक्त असे ज्ञानी । दवंडी वेद दे अशी ।।18.3

घटकुण्ड्यादिकं सर्वं मृत्तिकामात्रमेव च ।
तद्वद् ब्रह्म जगत्सर्वमिति वेदान्तडिण्डिमः ।। 19

गाडगी मडकी कुंडया । नाम, आकार वेगळे
सर्वात एक ती माती । मातीवीण दुजे नसे ।।19.1

नाना रूपात तैसेची । विश्व ये प्रत्यया जसे
परी ब्रह्ममयी सारे । दवंडी वेद देतसे ।। 19

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ।
अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः ।। 20

ब्रह्म हेचि असे सत्य । भासमान जगत् असे
नसे विकल्प ब्रह्म्यात । स्थित्यंतर जगी दिसे ।। 20.1

जीव ब्रह्माहुनी नाही । काहिही वेगळा मुळी
जीव तोची असे ब्रह्म । श्रेष्ठ सिद्धांत दाखवी ।। 20.2

वेदान्त शास्र हे राहे । अत्युत्तम सदा जगी
दवंडी पिटतो ऐसी । जगी वेदांत ही अशी ।। 20.3

अन्तर्ज्योतिर्बहिर्ज्योति: प्रत्यग्ज्योतिः परात्परः।
ज्योतिर्ज्योतिः स्वयंज्योतिरात्मज्योतिः शिवोस्म्यहम् ।। 21

 ( प्रत्यक् – विरुद्ध दिशांना , आतल्याबाजूला; परात्पर – सर्वश्रेष्ठ परमात्मा)

हृदयातचि तेवे तो । ज्ञानाचाच प्रकाश  मी
आकळे विश्व ज्यायोगे । तोही बाह्यप्रकाश मी ।। 21.1

अंतर्बाह्यचि सर्वत्र । ज्ञानरूप प्रकाश मी
सर्वत्र दाटुनी राहे । दीप्ती तीच असेच मी ।। 21.2

तेजोनिधी असे मीची । प्रकाशासी प्रकाशवी
चैतन्य मंगलाकारी । ज्ञानाकार प्रकाश मी ।। 21.3

सर्वश्रेष्ठ असे मीची । परमात्मा असेच मी
कल्याण मोद रूपी मी । शिवरूप असेच मी ।। 21.4

ब्रह्मज्ञानवलीमाला । आत्मज्ञानचि देतसे
ज्ञान अध्यात्मविद्येचे । दावे उकलुनी कसे
जीव ब्रह्म असे याची । ग्वाही देतेच निश्चिती
भावार्थ सांगते त्याचा । मराठीत अरुन्धती

----------------------------------------------------------------------------------
आषाढ शुद्ध एकादशी (आषाढी एकादशी) 1 जुलै 2020


1 comment: