।। अच्युताष्टकम् ।।
( वृत्त – स्रग्विणी, अक्षरे- 12, गण – र र र र, यति – पाद.)
अच्युतं केशवं राम नारायणं
कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं
जानकीनायकं रामचंद्रा भजे ।। 1 ।।
अच्युता केशवा राम नारायणा
कृष्ण दामोदरा वासुदेवा हरी
श्रीधरा माधवा गोपिका वल्लभा
जानकी-नायका रामचंद्रा नमो ।। 1.1 /
किंवा
/(खालील श्लोकात सर्व नावांचे अर्थ दिले आहेत.)
(अच्युता सच्चिदानंदरूपात्मका
ना ढळे स्वस्वरूपातुनी तू
कदा
केशिदैत्यास तू मारिले केशवा
रेशमी केस हे मोहवी सावळ्या
।। 1.1
वंद्य तू विष्णु ब्रह्मा
महेशासही
तेचि आधीन ते तत्त्व तू
एकची
सज्जनांच्या मना रम्य जेथे
गमे
राम लावण्यरूपीच तो तू असे
।। 1.2
सर्व ह्या मानवा प्राणिमांत्रांसही
आश्रयस्थान नारायणा एकची
चित्त आकर्षुनी कृष्ण घेई सदा
संत चित्ती वसे कृष्णमूर्ती
सदा ।। 1.3
ज्यात ना कृष्ण तो शब्दही
ना रुचे
गोपिकावल्लभा गोपिकांसीच
रे
बांधि पोटस दावे यशोदा तुझ्या
सांगता गोपि तक्रार दामोदरा ।। 1.4
जेथ जाते लया सौख्य दुःखासवे
ती स्थिती तू हरी शांतता
ना ढळे
श्रीधरा माधवा गोपिका वल्लभा
जानकी-नायका रामचंद्रा नमो ।। 1.5)
(वासुदेव हे नाव ह्या श्लोकात
आले नाही. ते श्लोक
क्रमांक 4 मधे आहे. )

अच्युतं केशवं सत्यभामाधवं
माधवं श्रीधरं राधिकाराधितम् ।
इन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं
देवकीनन्दनं नन्दजं सन्दधे ।। 2 ।।
अच्युता केशवा सत्यभामापती
सर्व ऐश्वर्यवंताच लक्ष्मीपती
पद्मजावल्लभा सर्व नावे तुझी
राधिकेसीच आराध्य तू रे हरी ।। 2.1
इंदिरा राहते तेच राऊळ तू
इंदिरेच्या हृदी कृष्णमंदीर तू
पारदर्शी तुझे चित्त हे निर्मला
देवकीच्या सुता नंदपुत्रा नमो ।। 2.2
विष्णवे जिष्णवे शङखिने चक्रिणे
रुक्मिणीरागिणे जानकीजानये
बल्लवीवल्लभायार्चितायात्मने
कंसविध्वंसिने वंशिने ते नमः ।। 3
सर्वव्यापी यशस्वी असे सर्वदा
विष्णु तू जिष्णु तू वंदितो मी तुला
शंख चक्रा धरी दक्ष तू रे सदा
रुक्मिणि-प्राण तू रुक्मिणि-वल्लभा ।। 3.1
जानकीनाथ तू गोपिकावल्लभा
पूजिती संत तो तूच आत्मा खरा
कंसनिर्दालका बासुरीवादका
नित्य मी वंदितो कृष्ण गोपालका ।। 3.2
कृष्ण गोविन्द हे राम नारायण
श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे
अच्युतानन्त हे माधवाधोक्षज
द्वारकानायक द्रौपदीरक्षक ।। 4
कृष्ण गोविंद हे राम नारायणा
गोकुळीच्याच गायी तुवा रक्षिल्या
उद्धरी ही धरा तूचि गोविंद
रे
साधिले इंद्रिया निग्रहा पूर्ण रे ।। 4.1
पद्मजेचाच राणा असे श्रीपती
वासुदेवा अजेया असे श्रीनिधी
तूचि आनंद ऐश्वर्य लावण्य
ह्या
सद्गुणांचा असे सिंधु ज्या
थांग ना ।।4.2
तू जयी नित्य युद्धात कामातही
अंत ना हे अनंता तुला जन्मही
इंद्रियांनी तुला शक्य ना
जाणणे
इंद्रियांनी घडे ज्ञान ते
तोकडे ।। 4.3
मारि दैत्या मधू हेचि दैत्यांतका
माधवा धावसी रक्षिण्या सेवका
द्वारकाधीश तू द्रौपदीचा
सखा
रक्षिले तूच वस्त्रावतारे
तिला ।। 4.4
राक्षसक्षोभितः सीतया शोभितो
दण्डकारण्यभूपुण्यताकारणः
।
लक्ष्मणेनान्वितो वानरैः
सेवितोऽ–
गस्त्यसम्पूजितो राघवः
पातु माम् ।। 5
चाड ना राहिली दुष्ट दैत्यांस त्या
सांडिला न्याय, नीतीच गेली लया
क्रोध ना आवरे तेधवा आपणा
दैत्य निर्दाळिले राम नारायणा ।। 5.1
जानकीच्यासवे रामराजाच हा
शोभतो मेघनीळा सदा सुंदरा
लागता पाउले दंडकारण्य हे
जाहले तीर्थही पुण्यदायी भले ।। 5.2
सज्ज सौमित्र हा साथ देई सदा
नित्य सेवेस ही वानरे तत्परा
वंद्य आगस्ति हे पूजिती राघवा
राखि रामा मला संकटी तू सदा ।। 5.3
धेनुकारिष्टकोऽनिष्टकृद् द्वेषिणां
केशिहा कंसहृद्वंशिकावादकः
।
पूतनाकोपकः सूरजाखेलनो
बालगोपालकः पातु मां
सर्वदा ।। 6
धेनुका दैत्य तो दुष्ट आरिष्ट ही
दंडिला सत्वरी नर्क त्या दाखवी
शोषि स्तन्यासवे पूतना-प्राणही
रौरवा धाडिले केशि दैत्यासही ।। 6.1
घेइ चित्ता जसा झेप गंडस्थळी
प्राण घेई गजाचे जसे सत्वरी
मारि कंसा तसा लोळवी भूवरी
ना दया दाखवी दुष्ट दैत्यांवरी ।। 6.2
वाजवी वेणु कालिंदि तीरावरी
खेळ गोपाळ बाळांसवे खेळशी
गोधना रक्षिसी चारिसी त्या वनी
बाळ गोपालका नित्य राखी हरी ।। 6.3
विद्युदुद्योतवत्प्रस्फुरद्वाससं
प्रावृडम्भोदवत्प्रोल्लसद्विग्रहम्
।
वन्यया मालया शोभितोरस्थलं
लोहिताङ्घ्रिद्वयं वारिजाक्षं
भजे ।।7
मेघमालेवरी लख्ख सौदामिनी
जात जैसी प्रकाशून त्या अंबरी
श्यामलाच्या तनूसीच तैसे खुले
रेशमी दिव्य पीतांबरू नेसले ।। 7.1
मेघ ओथंबुनी येत जैसे नभी
सावळ्याची तनू मोहवी हो तशी
मेघमाला जशी वर्षुनी तोषवी
श्यामला तू कृपापूर्ण तैसा जनी ।। 7.2
रानपुष्पेच ताजी सुगंधी अती
सोबत्यांनी खुडोनीच जी गुंफिली
कृष्णकंठी रुळे पुष्पमालाच ती
गोजिरी बाळमूर्ती दिसे साजिरी ।। 7.3
पाउले ही गुलाबी फुलासारखी
बोलके नेत्र उत्फुल्ल पद्मापरी
वेड जीवास लावी सुरम्याकृती
पुण्डरीकाक्ष हा चिंतितो मन्मनी ।। 7.4
कुञ्चितैः कुन्तलैःर्भ्राजमानाननं
रत्नमौलिं लसत्कुण्डलं
गण्डयोः ।
हारकेयूरकं कङ्कणप्रोज्ज्वलं
किङ्किणी मञ्जुलं श्यामलं
तं भजे ।। 8
रेशमाच्या लडी ह्या बटा वाटती
कृष्णचन्द्रानना शोभती त्या किती
रत्नमोतीयुता स्वर्ण आभूषणे
बाजुबंदासवे शोभती कंकणे ।। 8.1
रत्नकंठा हरीला किती भूषवी
माणिके रत्न मोती किरीटावरी
कृष्णतालावरी कुंडले डोलता
कृष्णगाली फिरे दिव्य रत्नप्रभा ।। 8.2
रत्नज्योत्स्नेतुनी दिव्य
रंगावली
रेखीली जाय ती कृष्णगालावरी
कृष्ण धावे तसे पैंजणे मेखला
हालुनी वाजती घुंगुरे घंटिका
।। 8.3
गोड नादेच त्या मोद होई मना
वंदितो मी मुकुंदास त्या
सर्वदा ।। 8.4
अच्युतस्याष्टकं यः पठेदिष्टदं
प्रेमतः प्रत्यहं पूरुषः
सस्पृहम्
वृत्ततः सुन्दरं कर्तृविश्वंभरं
तस्य वश्यो हरिर्जायते
सत्वरम् ।। 9
भारुनी कृष्णप्रेमेच सश्रद्ध
जो
अच्युताच्याच श्लोकाष्टकी
रंगतो
वृत्त हे स्त्रग्विणी रम्य
चालीतले
जो वदे अष्टका इष्ट त्यासी
फळे ।।9.1
जाणता येतसे मानवा सत्वर
विश्वकर्ता हरी तोचि विश्वंभर
भक्त-प्रेमात जाई हरी बांधला
पाळतो सर्व आज्ञाच भक्ताचिया
।।9.2
-----------------------------------------------------
शार्वरी नाम संवत्सर चैत्र शुद्ध तृतीया,
27 मार्च 2020
खूप सुंदर....! केवळ विशेषणे नाहीत, तर ती विशेषणे का दिली आहेत, त्यामागचा हेतू काय, प्रत्येक विशेषनामाचा अर्थ काय..हे सुद्धा तू तुझ्या काव्यानुवादातून सांगितलेस आणि तेही त्याच वृत्तात...त्यामुळे त्याच चालीत म्हणता येते...मनापासून धन्यवाद अरुंधती...तुझ्यामुळे स्तोत्राचा अर्थ किती छान समजला...
ReplyDeleteमनापासून धन्यवाद शैलजा!
Delete
ReplyDeleteBlogger Contact Form
Sun, Apr 25, 9:33 PM (17 hours ago)
to me
श्रीराममानसपूजा, पांडुरंगाष्टक अतिशय मनोहर
🙏🏻🙏🏻
Regards,
Anant Jaywant Bapat | anantajb@yahoo.com
Note: This email was sent via the Contact Form gadget on
https://anuvadparijat.blogspot.com
Anuvad Parijat
Sun, Apr 25, 9:35 PM (17 hours ago)
to Anant
मनापासून धन्यवाद🙏🙏🙏