#।। श्रीराममानसपूजा ।।


#ShriRamBhajan
(वृत्त - शादूर्लविक्रीडित , अक्षरे-19, गण - म स ज स त त ग, यति - 12, पाद. )

श्रीमन्नुज्ज्वल-कोटिभानु-सदृशं मन्दस्मितं श्यामलं
श्रीसीतासहितं वराभयकरं वामे सुमित्रासुतम्
श्रीवत्साङ्क-धनुःशरादिलसितं वातात्मजाभिष्टुतं
श्रीरामेति-पदद्वयान्वितमहं ध्यायामि हृन्मन्दिरे ।। 1 ।।

तेजःपुंजचि भास्करासम दिसे श्रीमान सीतापती
शोभे लोभस मंद ते स्मित कसे त्या सावळ्याच्या मुखी
सीता सन्निध साउलीसम उभी तो सौमित्रही तत्पर
भक्तांसी वर देतसे अभयही तो जानकी वल्लभ ।। 1.1

हाती सज्ज धनुष्य ते लखलखे भाता शरे पूर्णची
भक्ताने दिधलीच लाथ मिरवी श्रीवत्स-चिन्हाकृती
जोडोनी कर वायुनंदन उभा राहे समोरी सदा
गाता रामस्तुतीच तल्लिनमने अश्रुंस ये पूर हा ।। 1.2

श्रीरामा तव नाम मी स्मरतसे माझ्याच जिह्वेवरी
श्रीरामा तव रूप हे स्मरतसे नेत्रास जे तोषवी
श्रीरामा तव पाऊले मम हृदी मी आठवे सारखी
श्रीरामा तव ध्यान मी करितसे एकाग्रतेने हृदी ।। 1.3

रामेत्येकरस-स्वरूपममलं लीलावताराव्ययं
राजेन्द्रं रघुनन्दनं रविकुलोद्भूतं समावाहये ।
राजेष्टं रमणीयमर्पितमिदं माणिक्य सिंहासनं
पाद्यं साचमनीयमर्घ्यममृतं रामं स्वयं स्वीकुरु ।। 2 ।।

सर्वांचे रमतेच चित्त सहजी तो राम जाणा हृदी
ज्याने चित्त उचंबळे प्रमुदिता त्या राम बोले मुनी
ऐसे नाम, स्वरूप निर्मळ तुझे हे रामचंद्रा प्रभो
सारेची अवतार धारण करी लीला तुझी ही प्रभो ।। 2.1

कालातीत धनुर्धरा अमर तू कीर्ती तुझी अव्यया
राजेंद्रा रघुनंदना रविकुला केले तुम्ही उज्ज्वला
यावे हो सखयाचि सत्वर तुम्ही माझ्या मनोमंदिरी
हे सिंहासन रत्न-माणिक युता मी अर्पितो रामजी ।। 2.2

श्रीरामा जल गंधपुष्प सहिता प्रेमेच मी आणिले
स्वीकारा जल हे तुम्हास दिधले प्रक्षाळण्या पाउले
घ्यावे आचमना तुम्ही रघुवरा स्वीकार पूजा करी
झालो मी अति धन्य धन्य प्रभु हे येता मनोमंदिरी ।। 2.3

मध्वक्तं मधुपर्कमन्त्रपठितं पञ्चामृतं कल्पितं
मन्दाकिन्यमिदं सुरत्नकलशैः स्नानार्थमप्याहृतम् ।
मन्दारामर-पारिजात-तलगे सौवर्णपीठे स्थितं
मन्त्रैस्त्वामिषेचयामि विविधैः सूक्तः सुतीर्थोदकैः ।। 3

कल्पूनी हृदि दूध साखर दही तूपा मधाने युता
हे पंचामृत मीच हो बनविले प्रेमे स्वहस्ते बघा
श्रीरामा मधुपर्क पाठ म्हणुनी हे अर्पितो आपणा
घेई कांचन रत्नमंडित घटी स्नानास गंगाजला ।। 3.1

ह्याची कल्पतरू तळी सुखदशा मंदार छायेतच
जेथे वर्षति पारिजातक फुले अल्लाद आल्हादक
सोन्याचा बघ मांडला सुबकसा चौरंग स्नानास्तव
तेथे सूक्त म्हणोन मी विविधशी स्नाने तुला पूजिन ।। 3.2



(वृत्त - मालिनी , अक्षरे- 15 , गण- न न म य य, यति- 8,7 )

जलधर-निभगात्रे स्वर्णयज्ञोपवीतं
नवगुण-गुणितं तत् पावनं पावनानाम् ।
तडिदिव खलु पीतं वस्त्रमच्छोत्तरीयं
जय रघुवर दास्ये त्वं गृहाण स्वमेव ।। 4

( निभ- सदृश, समान, अनुरूप )

जल भरुन  निघाला मेघ जो श्यामवर्णी
तरुण तव तनूही भासते रे तशी ही
/
सजल जलद येई श्यामवर्णी जसाची
तनु तव दिसते रे मेघमाला सुखाची
बिजलिसम तुला हे देतसे उत्तरीय
रघुवर तनु शोभे ज्यामुळे ही सुनील ।। 4.1

चमचम बिजलीच्या स्वर्णरेखे प्रमाणे
तुज कनकमयी हे अर्पि यज्ञोपविते
सुबक तयि नऊ ते काचंनाचेच धागे
रघुकुळ-टिळका रे त्यास स्वीकार प्रेमे ।। 4.2


(वृत्त- वंशस्थ, अक्षरे- 12, गण- ज त ज र, यति- पाद.)

किरीट हाराङ्गद-चारु-मेखला-
मुद्राद्यनेकाकृति-भूषणानि ।
मही-सुगन्धं प्रगृहाण चाक्षतान्
पुष्पेषु खं राम मया समर्पितम् ।। 5

सुवर्णरत्नांकित दिव्य भूषणे
ह्या अंगठ्या ही मुकुटादि कंकणे
नुपूर माला कटि स्वर्ण मेखला
रघुत्तमा घालचि भूषणांना ।।

सुगंधिता ही वसुधाच अर्पितो
तुझ्या कपाळी तिलकासमा असो
तुझ्या शिरी अर्पुन अक्षता सुखे
तुलाचि आकाशफुले समर्पितो ।। 5


(वृत्त - शादूर्लविक्रीडित , अक्षरे-19, गण - म स ज स त त ग, यति - 12, पाद. )

राष्ट्रोपप्लवनाशकं सुललितं वायुं सुधूपं तथा
रामेमं परमं दिवाकरमहो तेजोमयी दीपिकाम् ।
राजीवारुणलोचनामृतमयं षट्स्वादुलोलै रसैः
सम्पन्नं विनिवेदितं सुमनसा नैवेद्यमङ्गीकुरू ।। 6

मध्ये पानमिदं सुशीतलजलं वानीरगन्धाभृतं
राम स्वीकुरु मत्समर्पितमिदं हस्तोदकं निर्मलम् ।
ताम्बूलं सफलं त्रयोदशगुणं स्वात्मैकरागान्वितं
श्रद्धारत्न-सुवर्णपुष्पसहितां गृह्णातु तां दक्षिणाम् ।। 7

राष्ट्रासी बहु हानिकारक असे जी रोगराई सदा
ती यं बीजरूपी हरे पवन जो तो धूप मी लाविला
रं बीजात्मक दीप सूर्यस्वरुपी सप्रेम मी लाविला
वं बीजात्मक अमृतोपम असा नैवेद्य अर्पी तुला ।। 6

आहे षड्रसयुक्त स्वादु मधुरा स्वीकार  त्याचा करा
वाळायुक्त रुचीर शीतल जला प्यावे रघूनंदना /नायका
घ्यावे हात धुण्यास हे जल सुखे राजीवनेत्रा तुम्ही
घ्यावा तांबुल हा त्रयोदशगुणी स्वानंदरूपी  तुम्ही ।। 7.1

श्रद्धा रत्न अमूल्य हेचि दिधले चालेल ना दक्षिणा
ठेवी त्यावर स्वर्णपुष्प मनिचे स्वीकार त्याचा करा ।। 7.2


(वृत्त - मालिनी , अक्षरे- 15 , गण- न न म य य, यति- 8,7 )

जयति जयति विष्णू रामनामाभिधेयो
जयति जयति पूर्णः कोटिकन्दर्पपभासः ।
जयति जयति वाद्यैर्नाटकैर्गीतनृत्यैः
जय जय तिमिरारे गृह्ण नीराजनं त्वम् ।। 8

जय जय जय विष्णो रामरूपी समोरी
कितिकचि मदनांचे तेज फाके सभोती
सुखमय मदनाची मूर्ति लावण्यखाणी
बघुन तुजसि लाजे तोचि कंदर्प चित्ती ।। 8.1

विविध मधुर वाद्ये गीत आख्यान नाट्ये
रिझविन तुज रामा प्रेमभावे सुखाने
तिमिर हरसी रामा तूचि अज्ञानरूपी
चरणि शरण ओवाळीन नीरांजनानी ।। 8.2


( वृत्त - इंद्रवज्रा , अक्षरे 11, गण - त त ज ग ग )

साम्राज्यभौज्यादि-सुपारमेष्ट्यान्
तमत्र यच्चाखिलवस्तुजातम् ।
एकाक्षरं ब्रह्ममयं प्रसिद्ध-
मेवार्पयामीति सुमन्त्रपुष्पम् ।।9

( भौज्य - ज्याचा उपभोग घेता येईल अशी सर्व सुखे;  पारमेष्ठ्यम् - सर्वोपरिता , उच्चतम पद, राजचिह्न )
साम्राज्य मोठे उपभोग सारे
सर्वोच्च ते स्थानचि राजचिह्ने
सारे समाविष्ट असेचि एका
ओंकार रूपात सदैव रामा ।। 9.1
मी मंत्रपुष्पांजलि ती म्हणोनी
हे अर्पितो वैभव हो तुम्हासी ।। 9.2


(वृत्त - मालिनी , अक्षरे- 15 , गण- न न म य य, यति- 8,7 )

जय जय करुणाब्धेऽनन्तभानुप्रकाश
जय जय जगदीशाव्यक्त मायाधिदेव
जय जय धरणीजावल्लभानन्तवीर्य
जय जय रघुनाथानाथनाथ प्रसीद ।। 10

जय जय करुणेच्या सागरा वाटते रे
जणुच तव झळाळी कोटि सूर्याप्रमाणे
जय जय जगदीशा ना कुणा आकळे तू
म्हणुन म्हणति सारे तूचि अव्यक्त एकू ।। 10.1

हुकुमत तव चाले सर्व मायेवरीच
असशि वसुमतीच्या पुत्रिचे पंचप्राण
अतुल तवचि धैर्या साहसा पार नाही
तव अनुपम शौर्या वर्णना शब्द नाही ।। 10.2

असति जगति जेची दीनवाणे अभागी
दशरथ-तनया तू दीनबंधू तयांसी
नसति कुणि जयांचे नाथ त्याची अनाथा
जय जय रघुवीरा व्हा कृपावंत दाता ।। 10.3

( वृत्त - इंद्रवज्रा , अक्षरे 11, गण - त त ज ग ग )

यज्ञेश यज्ञाधिप यज्ञपाल
यशःप्रदाधोक्षज रामचन्द्र ।
प्रदक्षिणां ते प्रकरोमि नित्यं
पदे पदेऽनन्तमखादिदात्रीम् ।। 11

तू देवता मुख्यचि यज्ञईश
यज्ञाधिपा यज्ञ प्रमूख तूच
तू यज्ञपाला करि रक्षणास
अधोक्षजा तू यश देसि नित्य/ खास ।। 11.1

जो घालितो नित्य प्रदक्षिणेसी
त्यासीच प्रत्येकचि पावलासी
लाभे महापुण्य तया नरासी
अनंत यज्ञातुन जे मिळेची ।। 11.2


( वृत्त - इंद्रवज्रा , अक्षरे 11, गण - त त ज ग ग )

राजाधिराजाय रमावराय
रात्रिंचराणामभि (धि) संहराय
राज्याभिषिक्ताय रघूत्तमाय
श्यामाय रामाय नमो नमस्ते ।। 12

राजाधिराजा कमलापती हे
हे दैत्यहारी तुजला नमस्ते
राज्याभिषिक्ताच रघूत्तमा हे
श्रीराम हे श्यामल हे नमस्ते ।। 12

 (वृत्त - भुजञ्गप्रयात, अक्षरे-12, गण- य य य य, यति- )

प्रभोचामरादर्श छत्रादिकान्वै
महाराज राजोपचारान्गृहाण ।
सुहृत्पद्मपीठं मुरारे प्रविश्य
ममेशापराधान् हि सर्वान् क्षमस्व ।। 13 

प्रभो मी शिरी छत्र नेमे धरोनी
तुम्हा घालि वारा स्वये चामरानी
जरा डोकवी दर्पणी तू प्रसन्न
तुझे रूप न्याहाळ ह्या आरशात ।। 13.1

प्रभो तूचि स्वीकार राजोपचारा
अहो रामचंद्रा चढोनी वरी या
सहस्रादलांचेच हृत्पद्म माझे
बसावेचि सिंहासनी रामचंद्रा ।। 13.2

प्रभो पापसंकल्प नेईच दूर
प्रभो पुण्यसंकल्प चित्ती ठसोत
प्रभू बैसता आसनी स्वस्थ चित्त
कसे सांग राहील ते खिन्नचित्त ।। 13.3

 ( वृत्त - इंद्रवज्रा , अक्षरे 11, गण - त त ज ग ग )

इत्येव साङगामुपचार-युक्तां
श्रीरामपूजां हृदये बहिर्वा ।
कुर्वन्ति ये धर्ममथार्थकामान्
मोक्षादिकां सम्पदमाप्नुवन्ति ।। 14

पूजा अशी ही करतीच जे जे
बाह्योपचारे अथवा मनाने
ते धर्म अर्थासह काम मोक्ष
सम्पत्ति ही प्राप्त करोनि घेत ।। 14

श्रीवर्णपूर्वं सकलार्थदं वै
रामेतिवर्णद्वयमेव पूर्वम् ।
जयेति रामेति जयद्वयेति
रामेति जप्त्वा तु पुनर्न जन्म ।। 15

श्री अक्षरानंतर राम ऐशा । जोडूननिया दोनचि अक्षरांना
त्याच्यापुढेची `जय' आणि `राम' । त्यानंतरी हे `जय' दोन वेळ
योजून हे शब्दचि होय मंत्र । तेरा तया अक्षर हे प्रमाण
श्रीराममंत्रा जपता कुणीही । मुक्ती मिळे त्या न पुन्हाचि जन्म ।। 15

श्रीराम जयराम जयजजय राम । श्रीराम जयराम जयजजय राम ।।
-----------------------------------------------------------------------

विकारीनाम संवत्सर, फाल्गुन कृष्ण पंचमी, रंगपंचमी, 14 मार्च 2020


                                 ही राममानसपूजा कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांच्या श्री शंकराचार्यकृत सुबोध स्तोत्र संग्रह भाग 2 मधे पान क्रमांक 247 ते249 वर आहे. पुढे त्याचा अर्थ देऊन पान क्रमांक 253 वर पुढील मजकूर आहे.


"असो. वरील श्रीराममानसपूजा श्रीजनार्दन बाळकृष्ण तारे नागपूर यांच्याकडून उपलब्ध झाली. ती त्यांच्या आजोबांना अयोध्या नगरीत एका महात्म्याकडून मिळाल्याचे समजले. मुखपरंपरेने चालत आलेले हे श्लोक आम्ही वाचकांना सादर केले आहेत. या श्लोकांच्या शेवटी इति श्री रुद्रयामले ईश्वरपार्वती संवादे श्री राममानसपूजा समाप्ता अशी अक्षरे त्यांच्या मुखातून ऐकावयास सापडली. आनंदरामायणातील व नारदपुराणांतील वचने  तपोनिधि पं धरणीधरशास्त्री गुर्जर पुणे यांच्याकडून मिळाली. उभयतांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद."

#लेखणीअरुंधतीची-

No comments:

Post a Comment