नर्मदाष्टकम्
नर्मदाष्टकम्
आपल्या भौगोलिक सीमांमुळे सीमित झालेला भूभाग एका
सुंदरशा देवतेच्या मूर्तीत अनुभवाला यावा, प्रतीत व्हावा असा भारताशिवाय कुठला इतर
देश असेल असे वाटत नाही. भारताच्या सीमांमधून तयार झालेली देवतास्वरूप भारतमातेची
मूर्ती इतकी विलोभनीय आहे की ह्या भारतमातेचं गुणवर्णन करताना, आणि तिला सजवताना
निसर्गही थकत नाही.
जगभर सर्व पर्वत उत्तर-दक्षिण उभे पसरलेले असताना निसर्गाने
ह्या भूदेवतेच्या माथ्यावर किरीट, हातात बाजुबंद, कमरेला मेखला आणि कमरपट्याने
सजविण्यासाठी पर्वतरांगांची दिशा बदलून त्यांना आडवं म्हणजे पूर्वपश्चिम झुकवलं,
वळवलं आहे. भारतमातेला लखलखत्या हिमाचा---हिमालयाचा मुकुट तयार केला आहे तर
भारतभूच्या कटिभागावर सातपदरी सातपुडा आणि विंध्य पर्वताने सुंदर कंबरपट्टा वा मेखला
तयार केली आहे.
गंगा, यमुना, सरयु/घाग्रा, गंडकी, हया जललतांनी कंठी, तन्मणी, रत्नहार असे एकाहून एक सरस
अलंकार भारतमातेच्या गळ्यात घातले आहेत तर
मुकुटातील तुर्याप्रमाणे वा लोंबत्या मोत्याच्या घोसांसमान झेलम, चिनाब
रावी हिमपर्वाच्या मुकुटावरून खाली
ओघळल्या आहेत. तर सिंधु आणि ब्रह्मपुत्रा मातेच्या करकंकणासारख्या शोभत
आहेत.
तापी आणि नर्मदा हया दोनच नद्या पश्चिम वाहिनी! विंध्य
आणि सातपुडा एकमेकांना मिळतात त्या मेकल पर्वतरांगांवर अमरकंटक येथे नर्मदा आणि
सोन किंवा सोनभद्र/शोण उगम पावतात सोन पूर्व वाहिनी तर नर्मदा पश्चिमवाहिनी.
भारताच्या कमरपट्याला, मेखलेला जलतुषारांच्या मौक्तिक घोसांनी जलप्रवाहाच्या कमनीय
रत्नजडित वेलांट्यांनी सजवायचं काम नर्मदा
करते. मेकलकन्या नर्मदेचं सौंदर्य, पावित्र्य पाहून शिवशंभूही पार्वतीला म्हणाले,
‘‘नर्मदासदृशी लोके न गङ्गापि वरानने ।
कलौ तु नर्मदा देवी कल्पवृक्षो जनार्तिहा ।।’’
‘‘प्रिय उमे!’’ वदे शंभू । कल्पवल्ली असे जणु
नर्मदा ह्या तिन्हीलोकी । सौख्याचा जलधी जणु
सर ना नर्मदेची ये । पवित्र जाह्नवीसही
पीडा दूर करे सारी । नर्मदा ह्या कलियुगी
ह्या नर्मदेसारखी, नर्मदे इतकी गुणवान, समृद्ध,
ज्ञानवैराग्यदायिनी गंगाही नाही मग इतर नद्यांची काय कथा! ‘नर्म’ ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ
सुख. तर ‘दा’ म्हणजे देते
ती. ‘‘जी सुख देते ती नर्मदा.’’ ह्या कलियुगात जनांची/लोकांची ‘आर्ति’ म्हणजे दुःख दूर करून त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे सर्व शाश्वत सुखाचा लाभ
करून देणारी, एकमेव कोणी असेल तर ती ही भाग्यदा, सौख्यदा अशी नर्मदाच आहे. ही
मेकलकन्या अमरकंटकला उगम पावते म्हणून तिला अमरजा म्हणतात. संस्कृत रेव् ह्या
क्रियापदाचा अर्थ उधळणे, उड्या मारत धावणे. नर्मदा खडकाळ प्रदेशातून डोंगर कापत
उड्या मारत तुषार उधळत जाते म्हणून ती रेवा! रेवा कपिलधारा, दूधधारा, सहस्रधारा, भेडाघाट,
धुआँधार, हरणफाल अशा अनेक प्रपातांनी सजली आहे.
कमरपट्टा शरीराच्या कटिभागावर, मध्यावर विराजमान असतो
त्याप्रमाणे भारताच्या मध्यावर असणारी नर्मदा भारताची उत्तर भारत आणि दक्षिण भारत
अशी प्रमाणित करणारी नदी आहे. विंध्य आणि नर्मदेच्या समवेत जाणारं मकरवृत्तही
सूर्याचा दक्षिणायन आणि उत्तरायणाचा मार्ग अधोरेखित करणारं आहे.
पाण्याला जीवन म्हणतात. ह्या जीवनदायिनी नद्यांच्या
तीरावर अनेक संस्कृती रुजल्या, बहरल्या, फुलल्या, फळल्या, हया जननीसमान जलवाहिनी त्यांच्या
तीरावर राहणार्या, त्यांच्या जलात राहणार्या सर्व भूतमात्रांची काळजी घेत
राहिल्या. त्यांच्या यशाचा, समृद्धीचा, सुसंस्कृतपणाचा, ज्ञानाचा परिमल चहुदिशी
पसरला. आणि ज्ञानार्जनासाठी, व्यापारासाठी, वा यात्रेसाठी अनेक बाहेरील लोक
उत्सुकतेने तेथे येऊ लागले. नर्मदेकाठी
असलेली संस्कृती अत्यंत पुरातन अशी आहे. काहींच्या मते तर ती पाच लाख वर्ष इतकी
पुरातन आहे. नर्मदेच्या तिरी असलेली मंडला, नर्मदापुरम्(होशंगाबाद), महेश्वर,
कर्नाली, गरुडेश्वर, कपिल धारातीर्थ, शूलपाणी, विमलेश्वर ही अनेक अनेक रम्य तीर्थस्थळे मनाला मोहवून टाकतात.
श्री आद्य
शंकराचार्य यांचे गुरू आचार्य गोविंदपाद नर्मदेकाठी ओंकारनाथ येथे गुहेत रहात
होते. केरळच्या कालडीहून गुरूंच्या शोधात निघालेला आठ वर्षाचा शंकर आचार्य गौडपादांना
भेटला आणि मला आपला शिष्य करून घ्या म्हणू लागला. त्यावेळी गौडपाद वृद्ध झाले
होते. त्यांनी त्यांचे शिष्योत्तम आचार्य गोविंदपाद ह्यांच्याकडे जाण्यास
सांगितले. शंकर आचार्य गोविंदपादांच्या शोधात नर्मदेच्या तीरी थेट ओंकारनाथाला
येऊन पोचला. ओंकारनाथाला एका गुहेत आचार्य गोविंदपाद रहात होते. आाठ वर्षाचा शंकर
तेथे पोचला तेव्हा नर्मदेला पूर आला होता. नर्मदेची पातळी वाढून ती गोविंदपाद रहात
असलेल्या गुहेतही शिरेल असे वाटत होते. तेव्हा नर्मदेची आळवणी करत छोट्या शंकराने
आपला कमंडलू खाली ठेवला, त्याच वेळी त्यांना स्फुरलेले नर्मदाष्टकम् तो अत्यंत
भक्तिभावाने म्हणू लागला. असे म्हणतात की नर्मदेचा ओघ शंकराच्या कमंडलूत सामावला
गेला आणि नर्मदेचा पूर ओसरला. ही आश्चर्यजनक गोष्ट आचार्य गोविंदपादांना कळली.
त्यांनी ह्या छोट्या बटूची चोकशी केली व त्याला आपला शिष्य करून घेण्यास तयारी
दर्शवली. तेथेच आचार्य गोवंदपादांकडून बाल शंकराने सन्यास ग्रहण केला. नर्मदेच्या
परिसरात शंकराचार्य सर्वत्र फिरल्याचा अनुभव त्यांच्या स्तोत्रातून येतो. त्यांनी
केलेले नर्मदाष्टकम् मोठे रसाळ स्तोत्र आहे. आजपासून आपण ते पाहू.
-----------------------------------
श्लोक 1
नर्मदेचा प्रवाह मोठा ओढाळ आहे. समुद्राकडे जाण्याची
तिला लागलेली ओढ अचंबित करणारी आहे. तिचा जलप्रवाह प्रवाहित होतांना त्यातून पुढे
पुढे जाणार्या लाटांच्या, तरंगांच्या मालिकांच्या मालिका सिंधुकडे धाव घेत आहेत. (सिन्धु-सुस्खलत्) अनेक ठिकाणी
खडकाळ उंच पर्वतांवरून उड्या मारत जाणारी ही निम्नगा जलबिंदुंची(सबिंदु) कारंजी उडवत, नीर-फवारे
उधळत चालली आहे. (काही
पुस्तकात सबिन्दु-सिन्धुर-स्खलत् असा पाठ आहे. सिन्धुर म्हणणे हत्ती, सबिन्दु – म्हणजे
ज्या हत्तींच्या गंडस्थलातून दानोदकाचे थेंब पझरत आहे असा किंवा ज्यांच्या सोंडेवर
अनेक रंगांची वेलबुट्टी काढली आहे. हत्ती माजावर आला की त्याच्या गंडस्थलातून
मधासारखा चिकट पदार्थ वाहू लागतो. त्याला दान किंवा दानोदक म्हणतात. असे वयात
आलेले हत्ती सहाजिकच गद्धेपंचविशीत आलेल्या तरुणांसारखे बेधडक, बेफाम वागतात.
हत्तीला पाण्यात खळायला आवडतच. असे तरूण मदमस्त हत्ती असतील तर मग काही विचारायला
नको. असे हत्ती नदीच्या प्रवाहात प्रवेश
करून खेळात इतके रममाण होतात की नदीच्या पाण्यालाही अवरोध करतात. नदीचा प्रवाह जणु
कुंठित होतो.)
असा सर्व प्राणीमात्रांना प्रिय असलेला नर्मदेचा
चैतन्यमय जलप्रवाह मोठा मनोरम दिसतो (रञ्जित)
हे सर्वांना सुख वाटत जाणार्या देवी नर्मदे तुझ्या
कमळासारख्या सुंदर कोमल पायांवर माझा मनोभावे नमस्कार! त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।1
सबिन्दु-सिन्धु-सुस्खलत्तरङ्ग-भङ्ग-रञ्जितं
द्विषत्सु
पापजात-जातकारि-वारि-संयुतम्।
कृतान्तदूत-कालभूत-भीतिहारि-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि
नर्मदे।।1
सबिन्दु –- तुषारांचे फवारे उडवित जाणारे।
सिन्धु-सुस्खलत् –वेगाने समुद्राकडे जाणारा प्रवाह । तरङ्गभङ्ग - तरंगांची मालिका
। रञ्जित - सुशोभित ।
पुढे पुढेचि धावतो जलौघ
नर्मदे तुझा
मिळावयासि सिंधुलाचि ओढ
लागली तुला
सहस्र खेळती तुषार सप्तरंगि
सुंदरा
उफाळती सवेग तेचि पांगती
इतस्तत।।1.1
तरंगमालिका असंख्य रम्य
सौम्य सुंदरा
तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या
अनंत ह्या
प्रवेशता गजेंद्र झुंडिने
प्रवाहि गे तुझ्या
तरंग भंग पावती प्रवाह
थांबतो जरा ।।1.2
छळीति पाप ताप दुःख वैरि जे सदा कदा
पिशाच भूत प्रेत जे शहारवीच मन्मना
असो भयाण प्राणघाति दुःख जे यमासमा
तयास वारितेचि वारि नर्मदे तुझेचि
गा।।1.3
समर्थ हे सलील जे भयास थोपवी महा
तुझ्याचि कोमला पदास भूषवी पुन्हा
पुन्हा
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम
गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।1.4
नर्मदाष्टकम्
श्लोक 2
अत्यंत हर्षोत्फुल्ल आनंदाने नाचत खेळत जाणारी अशी ही
नर्मदा आहे स्वतः अत्यंत आनंदी असलेली ही नदी इतरेजनांना आनंद देईल त्यात काय नवल.
ही जलमय जलकन्या तिच्या आधाराने राहणार्या असंख्य असंख्य जीवजंतूंचे जीवन आहे.
त्यांचे प्राण आहे. त्यांचं चैतन्य आहे. ही जीवनदायिनी नर्मदा आनंद, सुख, सर्वांना
वाटताना हा लहान हा मोठा असा भेद करत नाही. तिच्या पाण्यात जन्माला आलेल्या,
तिच्या पाण्यावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे, अशा छोट्या मोठ्या जलचरांना अत्यंत प्रेमाने आपल्यात सामावून घेते. अम्बु म्हणजे पाणी. ह्या अम्बुमध्ये लीन असलेले म्हणजे तिचा आश्रय
घेतलेले, नर्मदेवर अवलंबून असलेले मासे, मगरी, कासवं ह्या सर्व प्रजातींच्या
समूहाला (चक्र) तसंच तिच्या तीरावर राहणार्या चक्रवाकासारख्या अनेक पक्षीगणांच्या
समूहाला ती ‘शर्म’ म्हणजे आनंद; ‘दा’ म्हणजे देणारी आहे. ‘दिव्य संप्रदायकं’ म्हणजे स्वर्गीय
सुख मिळवून देणारी आहे. कलियुगातील(कलौ) अनेक प्रकारच्या पापांच्या राशी, अचानक कोसळणारी दुःखे, समग्र दुर्दशा,
सातत्यानी धावून येणारी संकटे (ओघ) आणि ह्यांचं न पेलवणारं ओझं, प्राणीमात्रांना आगतिक करणारा श्रमांचा,
सायासाचा अतिरेक, भार, श्रमांच्या ओझ्याखाली
होणारी घुसमट, अचानक येणार्या आपत्तींनी बसलेला धक्का, अनेक बाधा, विघ्न ह्या
मुळे डळमळित हतोत्साह (भार) झालेल्या सर्व प्राणीमात्रांना अत्यंत आश्वासक आहे. उमेद देणारी आहे.
चैतन्य देणारी आहे. आनंद देणारी आहे.
त्यांची सर्व दुःख, अपयश विसरायला लावणारी आहे. य़शाचा मार्ग दाखवणारी आहे. म्हणूनच
सर्व तीर्थंमध्ये प्रमुख आहे. सर्व नद्यांमधे अत्यंत श्रेष्ठ, पवित्र आहे. (सर्वतीर्थनायकम्). अशा हया
चैतन्यमय, आनंदनिधान नर्मदे तुझ्या कमलकोमल पाऊलांवर माझं विनम्र अभिवादन!
त्वदम्बुलीन-दीन-मीन-दिव्य-सप्रदायकं
कलौ मलौघ-भारहारि सर्वतीर्थनायकम्।
सुमत्स्य-कच्छ-नक्र-चक्र-चक्रवाक-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।2
तुझ्या जळीच जीव जंतु घेति आश्रया
सदा
असोत कासवे भलीच मत्स्य नक्र प्राणि वा
मयूर चक्रवाक आदि पक्षि राहती तिरा
मिळे अपूर्व स्वर्गिचेचि सौख्य त्यांसि दुर्लभा।।2.1
कलीयुगातलाचि पापभार सर्व नाशिण्या
तुझे सलील श्रेष्ठ गे जलात सर्व सर्व या
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा
पुन्हा।।2.2
नर्मदाष्टकम्
श्लोक 3
नर्मदामैयाचं पात्र महा-गभीर म्हणजे खूप खोल आहे. नीर-पूर म्हणजे पाण्याने
पूर्ण भरलेलं आहे. दुथडी भरून शांत, संथ वाहणारी ही नर्मदामैया भूतळाला इतकी
समृद्धी, सुबत्ता, वैभव, सौख्य, भरभराट, चैतन्य, आनंद, आशा बहाल करते की इथलं दैन्य, दुःख, दारिद्र्य, भूक
विवंचना, चिंता, काळजी, शोक,
निराशा हतबलता, लाचारी, असहायता, अनाथपण आपोआपच दूर होतं. ज्या प्रमाणे प्रकाश अंधाराला
दूर करतच प्रवेश करतो त्यप्रमाणे नर्मदेचा जलप्रवाह भूतलावर असलेल्या सर्व नकारात्मक
शक्तींचा नाश करत करतच पुढे जातो. जी स्वतः निर्मल अशा जीवनाने, खळाळत्या चैतन्याने, उधळत जाणार्या
जलतुषारांच्या दातृत्वाने परीपूर्ण आहे, सौख्यजलाने काठोकाठ भरून वाहते आहे अशी नर्मदा कोणाला निराश कशी करेल?
नर्मदेचा खेळकर, चैतन्यमय (नर्म) प्रवास अत्यंत मनोहर आहे. मोठमोठ्या कड्यांवरून खाली कोसळणारे नर्मदेचे प्रपात
डोळ्यांचं पारणं फेडणारे आहेत. त्या जलप्रपातांचा घनगंभीर ध्वनी, अखंड वाहणार्या तिच्या
पाण्याचा खळखळाट (ध्वनत् म्हणजे गर्जना
करणारा) महान अशा पापांच्या
पर्वतांना (आपदाचलम्) विदारून(दारित) , फोडून चूर्ण चूर्ण करण्यास समर्थ आहे. हे माते
नर्मदे तुझा वेगाने गर्जना करत जाणारा प्रवाह समस्त पातकांचे निर्दालन करणारा पातकांचा
अरी म्हणजे शत्रू आहे. काही पाठांमधे ध्वनत् ऐवजी
नमत् असा पाठभेद आहे. नमत् असा पाठभेद घेतल्यास,
हे नर्मदे जे तुझ्या चरणी नत झाले आहेत म्हणजेच आश्रयाला आले आहेत त्या सर्वांच्या
पातकांचा तू नाश करतेस. असा होतो.
जेव्हा जगावर महाभयंकर असं प्रलयाचं
संकट आलं; जगाचा लय होणार असं दिसू लागलं (जगल्लये), तेव्हा
मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय तुझ्या आश्रयाला आला. त्याचा तू सांभाळ केलास. जणु काही
तुझ्या तीरावर मार्कंडेय ऋषींना तू आरामदायी , विशाल, भव्य, सुखसुविधांनी परिपूर्ण
असे विशाल भवन, महाल वा प्रासाद (हर्म्य ) देऊ केलास.
हे माते तुला
वारंवार नमन! तुझ्या कमळासारख्या कोमल चरण कमलांवर माझा साष्टांग प्रणिपात! त्वदीयपादपङ्कजं
नमामि देवि नर्मदे।।3
महा-गभीर-नीर-पूर-पात-धूत-भूतलं
ध्वनत्समस्तपातकारि दारितापदाचलम्।
जगल्लये महाभये मृकण्डु-सूनु-हर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।3
(दारित – फाडलेला, विभक्त केलेला, चूर्ण चूर्ण केलेला. आपदा- विपत्ती, संकटे. अचल- पर्वत)
अलोट हा प्रवाह गे कधी गभीर खोल हा
खळाळतो पथी कधी करीत जाई गर्जना
कड्यांवरून घे उड्या ध्वनी घुमे गभीर हा
सहस्र धार कोसळे निनादतो ध्वनी पुन्हा।।3.1
पवित्र हा जलप्रपात देवि नर्मदे तुझा
करीच चूर्ण चूर्ण पातकांचियाच
पर्वता
करीसि भक्तवृंद गे अपाप तूचि सर्वथा
हरीसि दुःख दैन्य ताप भूतलावरील या।।3.2
तुझ्या रुपे प्रसन्नता मिळे सदैव भूतला
सुखेच देत चालली पुढेपुढेहि नर्मदा
महान संकटी मृकंडपुत्र तूचि तारिला
तिरी तुझ्याचि भव्य या दिलास आसरा तया ।।3.3
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे
पुन्हा पुन्हा।।3.4
नर्मदाष्टकम्
श्लोक 4
बाळाला कितीही भीती वाटली, कशाचीही भीती वाटली तरी,
आईला पाहिल्यावर बाळ आश्वस्त होतं. तिच्या कुशीत बसल्यावर त्याला सर्व भय
संपल्यासारखं वाटतं. आई आहे. ती माझ्यावर कुठलीही आच येऊ देणार नाही. एवढी एकच
गोष्ट बाळाला नक्की माहित असते.
नर्मदा मय्याला पाहिल्यावरही आचार्य हीच भावना बोलून
दाखवतात. माय, तुझं हे जीवनदायिनी, आश्वस्त करणारं रूप पाहिलं, तुझं हे खळाळत
जाणारं सलील पाहिलं की सर्व भीती कुठच्याकुठे पळून जाते. ह्या दुःखमय संसारात तूच
माझा आधार आहेस. तू अनाथांची नाथ आहेस. सर्वाांची माय आहेस.
माय तुझं हे काठोकाठ भरलेलं पाणी पाहिलं की माझ्या हृदयातील
चैतन्यसिंधूला भरती येते. मन उचंबळून येतं. संवादिनीचा आणि सतारीचा सूर बरोब्बर लागला की सतार झंकारून उठते. सतारीची
जव्हार बरोबर निघाली की सतार अशी काही घुमते की नेमका स्वर लागल्याची ग्वाही
मिळते. माय तुझं अम्बु म्हणजे पाणी पाहिलं की माझं मन असच झंकारून उठत असेल,
माझ्या मनात चैतन्य लहरी उसळत असतील, माझं भय कुठल्याकुठे पळून जात असेल, माझं मन
झंकारून उठत असेल तर—तर—माझ्या हहृदयाचा तो सूर तूच माझी माय आहे. हे मला वारंवार सांगून
आश्वस्त करत असतो.
हा संसाराचा सागर (भवाब्धि) अव्याहत आहेच. त्याचा पार दिसत नाही. पुनर्भव म्हणजे संसार. ह्या संसाररूपी सागरात परत परत जन्माला येऊन परत परत
मृत्यूच्या खाईत जायलाच लागतं. अपरंपार दुःखे सोसावी लागतात. त्यामुळे प्रत्येक
प्राणीमात्राला येथे जन्म घेण्याचे भय वाटत असते. पण माते, तुझा हा जलौघ पाहिला की
हे भय ओसरून जातं.
हे माय , मार्कंडेय, शौनक आणि इतरही अनेक थोर ऋषी, मुनी तुझ्या तीरावर राहिले.
असुरांचे शत्रू (असुरारि) म्हणजेच इंद्र,
चंद्र, वरूण, कुबेर असे अनेक जण तुझ्या तीरावर राहिले. त्यांनी तुझी पूजा केली.
तुझ्या चरण कमलांची सेवा केली.तुझं अमृतासारखं पाणी पिऊन ते जरा, दुःख यातून मुक्त
झाले. भवसागरात पदोपदी येणार्या, छळणार्या दुःखांपासून तू संरक्षण देतेस. (भवाब्धि-दुःख-वर्मदे) तू अत्यंत कृपाळू आहेस. हे माते तुला वारंवार नमन! तुझ्या कमळासारख्या कोमल
चरण कमलांवर माझा साष्टांग प्रणिपात! त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।।4
गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा
मृकण्डु-सुनू-शौनकासुरारिसेवितं सदा।
पुनर्भवाब्धि-जन्मजं भवाब्धि-दुःख-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।4
तुलाचि पाहता क्षणी पळून जाय भीति गे
अपार दुःखदायि त्या भवाब्धिची समूळ गे
मृकंडु पुत्र, शौनका सवेचि देव थोर ते
सुधासलील सेवुनी तुझ्या तिरीच राहिले।।4.1
भवाचिया अथांग सागरासि नाशि तूच गे
भयास जन्म मृत्युच्या उपाय एक तूचि गे
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।4.2
नर्मदाष्टकम्
श्लोक 5
अनुप्रासाचा सुंदर गोफ गुंफत गुंफत हा कमनीय श्लोक
नर्मदेच्या प्रवाहासारखा अत्यंत आकर्षकपणे डौलात अनेक वळणं घेत प्रवाहित होतो.
लक्ष, अलक्ष, सुलक्ष हे लक्षवेधी शब्द मनाला लक्ष्य करतात. (लक्ष म्हणजे लाख. अलक्ष म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष
जात नाही वा ज्यांना आपण पाहू शकत नाही. सुलक्ष म्हणजे सहज ज्याच्याकडे नजर जाईल, लक्षात राहील असं सुंदर.) तर, नीर, तीर, धीर असे शब्द
हृदयाच्या आरपार जातात.(नीर म्हणजे पाणी, तीर म्हणजे किनारा. धीर म्हणजे धैर्यशाली) तर, शर्मदे नर्मदे असे अर्थवाही शब्द हात धरून आपल्याला
नर्मदेच्या प्रवाहासोबत नेतात. किन्नर, अमर, असुर चे यमक जीभेवर घोळत सरळ मेंदूतच जाऊन बसते.
हे
नर्मदामय्या, तुझा महिमाच असा आहे की, कोणीही तुझ्यापुढे नम्रच होईल. तुझ्या
चरणांवर माथा टेकेल. तू साक्षात जीवन दायिनी आहेस म्हणूनच लक्षावधीजण तुला शरण
येतात. तुझ्या आश्रयाला येतात. मानवाहून अत्यंत प्रबळ समजल्या जाणार्या अनेक योनी
आहेत. त्यात अमर असुर किन्नरांसारखे अनेकजण आहेत. मानवी नेत्रांना न दिसणारे,
मानवांहून अनेक प्रकारच्या दिव्य शक्ती लाभलेले, मानवांहून अत्यंत प्रबळ असलेले
लाखो लाखो किन्नर, अमर, असुर तुझ्या आश्रयाने राहतात. तू
त्यांच्या सर्व गरजा तर पूर्ण करतेसच पण अपेक्षेपेक्षा जास्त सौख्य देतेस म्हणून, अत्यंत
आदराने, प्रेमाने, तुझ्याप्रति अत्यंत कृतज्ञ राहून ते तुझी पूजा करत असतात.
हे माय, कधी झुळझुळ वाहणारा तर कधी धीरोदात्त, शांत,
गंभीरपणे वाहणारा तुझा प्रवाह मनोवेधी आहे. तू सुजला आहेस म्हणूनच तुझे दोन्ही
किनारे सुफला आहेत. तुझ्या दोन्ही किनार्यांवर (तीर) फोफावलेली ही वनराई असंख्य
असंख्य पक्ष्यांचे निवासस्थान आहे. लाखो पक्षी त्यात मधुर कूजन करत असतात. आपल्या
लक्षवेधी गोड सुरांनी सर्वांना मोहून टाकतात. तुझे दोन्ही तीर पक्ष्यांच्या
किलबलाटाने, मधुर कुजनाने गजबजून गेले आहेत.
तुझ्या ह्या विपुल जलप्रवाहाने आजूबाजूचा परिसर समृद्ध केला आहे. अशा ह्या
निसर्गरम्य परिसराने अनेक ऋषीमुनीही आकृष्ट होऊन तुझ्या तीरावर वस्तीला आले.
अनेकांनी तुझ्या तीरावर घोर तपस्याही केली. अशा ह्या महान ऋषींपैकी काही प्रमुख (शिष्ट) म्हणजे, महर्षी वसिष्ठ. वसिष्ठ चा
अर्थ सर्वोत्तम असा आहे. वसिष्ठ ऋषी त्यांनी केलेल्या महान तपस्येने ब्रह्मर्षी
अशा श्रेष्ठ पदाला पोचले. पिप्पलाद हे असेच अत्यंत थोर मुनी. हे महर्षी दधिचींचे पुत्र. महर्षी दधिचींनी
इंद्राला आपल्या अस्थी देऊ केल्या तेव्हा ह्या तरूण ऋषींची तरूण पत्नी आपल्या
छोट्याशा शिशुला पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेऊन सती गेली. हा अजाण बालक पिंपळाची
पान खाऊन जगत राहिला. भीती वाटली की तो त्या पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत लपून बसे.
एकदा नारदऋषींना ह्या बालकाला पाहिलं त्याला त्याची माहिती विचारली. पण छोट्या बाालकाने
भाषा कधी ऐकलीच नसल्याने तो बोलू शकत नव्हता. नारदांनी त्याची माहिती काढून त्याचा
सांभाळ केला. त्याला सर्व ज्ञान दिलं. पिंपळाची पानं खाऊन मोठा झाला म्हणून सारेजण
त्याला पिप्पलाद म्हणू लागले. ह्या पिप्पलाद ऋषींनी नर्मदातीरी तपश्चर्या केली. ऋषी कर्दम हे ब्रह्मदेवाचे
मानसपुत्र. अत्यंत विरक्त आणि ज्ञानी. ब्रह्मदेवाने त्यांना प्रजावृद्धीचा आदेश
दिला. त्यांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करून ब्रह्मदेवाने त्यांना दिलेला आदेश कथन
केला. ‘‘देवा मला संसारात रस नाही हे जाणून मला अशी पत्नी द्या जी गृहस्थाश्रमात
आणि नंतर सन्यासाश्रमात मला साथ देईल. माझी अडवणुक करणार नाही.’’ विष्णुंनी त्यांना
स्वयंभुव मनूची कन्या देवाहुतीशी विवाह होईल असे सांगितले. त्यांना 9 कन्या व एक
पुत्र झाला. हा पुत्र म्हणजे स्वतः विष्णुचाच अवतार असलेले कपिल मुनी. ह्या अशा
अनेक नम्र, पूज्य, बद्धिमान, सद्गुणी महर्षींना आश्रय देण्याचं काम, त्याना सौख्य,
आनंद, प्रसन्नता देण्याचं काम ह्या नर्मदामैयानी केलं. स्वतः जी चैतन्याची,
उत्साहाची, धैर्याची मूर्ती आहे अशा ह्या नर्मदामातेच्या चरणकमलांवर माझा साष्टांग
प्रणिपात. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि
नर्मदे।।5
अलक्षलक्ष-किन्नरामरासुरादि-पूजितं
सुलक्ष-नीर-तीर-धीर-पक्षि-लक्ष-कूजितम्।
वसिष्ठ-शिष्ट-पिप्पलादि-कर्दमादि-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।5
( शिष्ट - सद्गुणसम्पन्न, श्रेष्ठ, उत्तम, पूज्य, नम्र, प्रमुख, बुद्धिमान, उत्तमप्रकारे प्रशिक्षित )
दिसे न लोचनांसि या असो चि देव दैत्य ते
असोचि यक्ष किन्नरादि पूजिती
तुलाचि हे
तुझ्या तिरीच दाट वृक्षराजि हीच डोलते
सहस्र लक्ष पक्षि त्यात गोड गोड गाति गे।।5.1
वसिष्ठ पिप्पलासवेचि थोर कर्दमा ऋषी
सुधर्म आचरोनि जेचि राहिले तुझ्या तटी
तयांस नीर रम्य हे करी प्रदान सौख्य गा
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे पुन्हा पुन्हा।।5.2
श्लोक 6
हे नर्मदे किती म्हणून किती नावे घेऊ? अत्यंत थोर थोर
ऋषी मुनी, असोत, सूर्य चंद्र असोत,
नारदांसारखे देवर्षी असोत, रन्तिदेवासारखे राजे असोत वा स्वतः देवराज इंद्र असो!
सर्वांना तुझ्या कमनीय जलमय तनुचा इतका लळा लागला की सर्वजण आपलं सर्वस्व विसरून
तुझ्या मोदमय किनार्यांवर रहायला आले. तुझ्या किनार्यावरच त्यांनी तपश्चर्या
केली.
ज्यांना प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार मानतात, ते सनक,
सनंदन, सनातन आणि सनत्कुमार असे ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र! ह्या चौघांना मिळून
सनत्कुमार म्हणतात. हे अत्यंत विरक्त आणि महान तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. उद्दालक ऋषींचे पुत्र नाचिकेत किंवा
नचिकेता ह्यांनी तर त्यांच्या वाक्चातुर्याने प्रत्यक्ष यमालाही संतुष्ट करून त्याच्याकडून अध्यात्मविद्या
प्राप्त केली. ज्यांच्या नावाने आज काश्मिर प्रसिद्ध आहे असे महर्षी कश्यप (काश्यप
मिरा म्हणजे कश्यप ऋषींचे सरोवर म्हणजेच दाल सरोवर असलेले आजचे काश्मिर किंवा
‘‘कश्यप मुनेः’’ – कश्यप मुनींचे ते काश्मिर ); ब्रह्मा, विष्णू, महेश बालरूपात
ज्यांच्या घरी राहीले त्या सती अनसूयेचे पती महर्षी अत्री; देवर्षी नारद किती नावं
सांगू? ही काही नावं फक्त वानगीदाखल सांगत आहे. हे अत्यंत महान लोकोत्तर पुरुष
नर्मदे तीरी नुसतेच राहिले नाही तर नर्मदेबद्दल त्यांच्या मनात अतुलनीय प्रेम
निर्माण झाले. हे नर्मदामाते तुझे चरणांम्बुज जणु त्यांनी त्यांच्या हृदयात कायमचे
स्थापित केले.
ह्या
लोकोत्तर पुरुषांना आचार्य षट्पदाची म्हणजे भुंग्याची उपमा देतात. भुंगा अत्यंत
कठीण असलेलं सागाचं लाकूडही पोखरू शकतो;
पण कमळ आणि भुंगा ह्यांच प्रेम इतकं गाढ
आहे की, भुंगा कमळाच्या सौंदर्यावर, त्याच्या सुवासावर इतका लुब्ध असतो की
सूर्यास्तानंतर मिटणार्या कमळाचं भान त्याला रहात नाही. आणि बंद झालेल्या कमळातच
तो अडकून पडतो. कमळावरच्या अलोट प्रेमाने
हा भुंगा रात्रभर त्यात अडकून मरण पावेल पण कमळाची कळी पोखरून बाहेर येत
नाही. हे नर्मदा माते, असं अत्युच्च
कोटीचं प्रेम ह्या लोकात्तर पुरुषांना तुझ्याबद्दल वाटतं. तुझा सहवास त्यांना इतका
प्रिय होता की आपलं आयुष्य त्यांनी तुझ्या तीरी तपश्चर्येत घालवलं.
रवी आणि इंदु ह्या दोन शब्दांचा संधी रविन्दु असा होतो. रवी म्हणजे सूर्य तर इन्दु म्हणजे
चंद्र. हे नर्मदामाते, अत्यंत विरागी अशा ऋषीमुनींचाच तुझ्यावर लोभ आहे असे नाही
तर चंद्रसूर्यही तुझ्या समृद्ध, सुंदर जलतनुच्या मोहात पडून तुझ्या तीरावर अगणित
वर्ष तपश्चर्या करत आहेत.( भारतातून जाणारं मकर वृत्त आणि नर्मदा एकमेकांच्या जवळ
असल्याने दरवेळी उत्तरायण वा दक्षिणायानाच्या वेळी सूर्याला नर्मदेच्या उत्तरेला
वा दक्षिणेला नर्मदा ओलांडावी लागते.)
हे माते, जर देव, ऋषी, मुनींना तुझ्या रमणीय तनुचा
मोह पडत असेल तर महान राजांचीही कथा त्याहून वेगळी नाही. दयेचा सागर, प्रत्येक
भूतमात्राठायी परमात्म स्वरूपाला पाहणारा रन्तिदेव असो वा देवांचा राजा इंद्र असो.
ज्यांनी साम्राज्य, स्वर्ग, मोक्षही नाकारले आणि सर्व प्राणीमात्रांचं दुःख दूर
व्हावं अशी कामना मनात धरली तेही सारे तुझ्या तीरी वास्तव्यास येऊन सुखी झाले.
माय! तू सर्वांना अलोट प्रेम देतेस. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतेस. सर्वांना
तृप्त करतेस.
सर्वांना त्यांच्या तपश्चर्यारूपी कर्माचं फलस्वरूप
‘शर्म’ म्हणजे सुख देणारी तू शर्मदा आहेस. (कर्म-शर्मदे). हे माय तुझ्या ह्या परम पावन पादपद्मी माझे कोटी कोटी प्रणाम! त्वदीयपादपङ्कजं
नमामि देवि नर्मदे।।6
सनत्कुमार-नाचिकेत-कश्यपात्रि-षट्पदै-
र्धृतं स्वकीयमानसेषु नारदादि-षट्पदैः।
रविन्दु-रन्तिदेव-देवराज-कर्म-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।6
अनन्य भक्तिने जलास या पवित्र प्राशुनी
हृदी धरून ध्यास गे तुझाच राहिले ऋषी
जसा मिलिंद एकरूप हो फुलासवे तसे
सनत्कुमार,नाचिकेत, कश्यपादि राहिले।।6.1
तुझ्या तिरीच सूर्य चंद्र इंद्र आचरी तपा
नरेंद्र रन्तिदेव नारदासमा महर्षि वा
तयांवरी प्रसन्न तू दिले अमाप सौख्य त्यां
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे
पुन्हा पुन्हा।।6.2
नर्मदाष्टकम्
श्लोक 7
अलक्ष हा 5व्या श्लोकातील शब्द परत आपल्याला भेटायला 7व्या श्लोकात आला आहे. अलक्ष म्हणजे जे
लक्षात येत नाही, डोळ्याला दिसत नाही, अशी लक्ष-लक्ष वाईट कामे, दुश्चरिते किंवा दुष्कर्मे
आपल्या हातून सहज घडत असतात. ही छोटी छोटी असंख्य पापं आपल्या लक्षातही येत नाहीत.
( बस मधून उतरलं की आपण तिकिट सहज रस्त्यावर टाकून देतो. टॉफी खाऊन कागद तिथेच
टाकतो, रस्त्याला असलेल्या डिव्हायडरमुळे थोडसच लांबून जायला लागेल तर कशाला
म्हणून उलट्या दिशेने गाडी नेतो. काही दिवसांनी हे अयोग्य आहे हेही आपल्याला वाटेनासं
होतं. लक्षात येईनासं होतं.) अशी लाखो लाखो पापे (लक्ष-लक्ष-पाप) दूर
करण्यासाठी तू आपल्या हातात वज्र (लक्षसार-सायुधं) नावाचं आयुध घेऊन सज्ज आहेस.( सायुधं)
किंवा लक्षसार-सायुधं हे नर्मदेच्या चरणकमळांचं हे विशेषण घेतल्यास नर्मदामातेच्या तळपायावर वज्र चिह्न अंकित आहे. सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून वज्र,अंकुश वा ध्वज, कमल, कलश इ. ही पायावरील चिह्ने शुभसूचक व देवतांच्या पायावर विराजमान असतात.
म्हणून हे नर्मदा माते, तुझ्या तीरावर राहणार्या, तुझ्या जळात विचरणार्या जीवजंतुंच्या(जीवजन्तु-तन्तु) अनेक पिढ्यांना(तन्तु) किंवा अनेक परंपरांना तुझे हे सुंदर चरण अनेक प्रकारची सुखसाधने, सुखोपभोग देतात तसेच सुख भोगण्याचे सामर्थ्य देतात व मुक्तीही देतात. (भुक्ति-मुक्ति-दायकम्।) तुझ्या प्रवाहासोबत, जलौघाबरोबर जणु सौख्य वाहतच येतं आणि त्याच बरोबर ते दैन्य, दुःख ताप सर्व नकारात्मता वाहून नेतं. धुवून टाकतं. नकारत्मकता नावालाही उरत नाही.
धाम म्हणजे निवासस्थान. विष्णूच्या निवासाला वैकुंठधाम
म्हणतात तर शिवाच्या राहण्याच्या ठिकाणाला कैलासधाम म्हणतात. विरिञ्चि म्हणजे ब्रह्मा.
ब्रह्मदेवाच्या निवासाला सत्यलोक किंवा ब्रहमलोक
म्हणतात. तर ब्रह्मप्राप्ती झाली की सच्चिदानंदघन वा परिपूर्ण ब्रह्मलोकास म्हणजेच
निजधामास माणूस पोचतो. तोच स्वकीयधाम.
हे नर्मदा
माते असे हे अत्यंत पवित्र, पावन धाम माणसाला प्राप्त करून देणारी तू एकमेव आहेस.
तुला शरण आलेल्यांचे तू रक्षण करतेस. जणु काही त्यांना सर्व अपत्तीपासून वाचवणारं,
रक्षण करणारं त्यांचं अभेद्य कवच (वर्म) बनतेस.
तुझ्या आश्वासक, मोदमयी चरणकमलांवर
हे नर्मदा माते, कोटिकोटी प्रणाम! त्वदीयपादपङ्कजं
नमामि देवि नर्मदे।।7
अलक्ष-लक्ष-लक्ष-पाप-लक्षसार-सायुधं
ततस्तु जीवजन्तु-तन्तु-भुक्ति-मुक्ति-दायकम्।
विरिञ्चि-विष्णु-शङ्कर-स्वकीय-धाम-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।7
( लक्षसार- वज्र. ततस्तु- म्हणून.)
करून लक्ष लक्ष दुष्कृती न जाणितोचि मी
असेहि पाप नाशिण्यास वज्र हे तुझ्या करी
सुचिन्ह शंख चक्र वज्र पद्म जे
शुभंकरी
तुझ्याचि कोमला पदांस भूषवी निरंतरी।।7.1
तुझ्या कृपे समस्त जीव भोगती सुखे महा
लयास जाय दुःख सर्व मोक्ष तो मिळे पहा
करी प्रदान भाविकांसि सत्यलोक मंगला
तसाचि विष्णुलोक वा महेशलोक चांगला।।7.2
स्वकीयधाम ब्रह्म पूर्ण तेहि देसी उज्ज्वला
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे पुन्हा पुन्हा।।7.3
नर्मदाष्टकम्
श्लोक 8
परम दुर्धर (पेलण्यास, धरण्यास अवघड) अशी गंगा नदी
स्वर्गातून भूतलावर भगवन श्री शंकराच्या जटांवर उतरली; तर अमरकंटक किंवा मेकल
पर्वतावर भगवान शंकर तपश्चर्या करत असतांना त्यांच्या जटांमधून अत्यंत निर्मळ असा
जलप्रवाह प्रकट झाला. महेशाच्या केसांमधून, जटांमधून तो निघाला म्हणून त्याला ‘महेश-केशजा’ असे म्हटले
आहे. (जा म्हणजे जन्म
घेतलेली.) तो प्रवाह पर्वतावर चोहीकडे वाहू लागला. ह्या प्रवाहाची एक कन्या बनून
तिने खडतर तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले. तिने शंकराकडून असा वर मिळवला की
ती अमर होईल. तिच्या पाण्यात स्नान करणारे सारे निष्पाप होतील, त्यांना पृथ्वीवरील
सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळेल, तिच्या दर्शनानेच जीवांना मुक्तीचा
लाभ होईल. तिचा महिमा गंगेसारखा वाढत जाईल. इतकच नाही तर शिव पार्वतीने तिच्या जलात व तीरावर कायमचे वास्तव्य करावे.
ज्या ज्या दगडाला तिच्या जलाचा स्पर्श होईल तो शिवस्वरूप होईल व त्याची सर्वत्र पूजा
होईल. शिवशंकरानेही तिच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि सांगितले की, तू ह्या
भूतलावर सर्वांना `नर्म’ म्हणजे सुख आणि ‘दा’ म्हणजे दायिनी देणारी होशील.
सर्वांना सुखी करशील. त्यामुळे लोक तुला नर्मदा म्हणून संबोधतील. नर्मदेचा महिमा
वाढू लागला. ‘‘नर्मदाके कंकर कंकर सब बने शंकर शंकर’’ अशी नर्मदा जन्माची कहाणी
आहे.
जो निर्मळ बुद्धीने जगाच्या परम कल्याणाचा हेतू धरुन
त्यानुसार वर मागतो तोच निष्कलंक कीर्ती प्राप्त करतो. अमरत्व मिळवतो. जो आपला
स्वार्थ मनात धरून दुसर्यांना लुबाडण्याचा, दुसर्यांचा नाश करण्याचा स्वार्थी
हेतू सिद्ध होण्यासाठी वरवर चांगला पण दुसर्यांच्या नाशासाठी वर मागतो तो माणूस
स्वतःच नष्ट होतो. त्याने मिळवलेला अमरत्वाचा वर ही निरुपयोगी ठरतो. हे
त्रिकालाबाधित सत्य आहे. असो! आपण नर्मदाष्टकाच्या श्लोकार्थाकडे वळु या!.
अहो! म्हणजे काय
आश्चर्य आहे! नर्मदेच्या तीरावर (महेश-केशजा-तटे) एखाद्याला मरण जरी आलं (मृतं) तरी तिच्या लहरींचा खळखळाट ऐकत, तिचा मंजुळ ध्वनि ऐकत आलेलं मरणही सौख्यदायी,
भाग्यदायी होतं. जणु काही पूर्वपुण्याईनेच त्याला नर्मदातिरी मरण प्राप्त होतं.
दुरन्त म्हणजे
ज्याचा अंत अशक्य आहे किंवा अत्यंत दुःखद अंत आहे. असं मानवाला सोडण्यास नाकारणारं दुरन्त पाप आणि त्या पापाचा होणारा
असह्य त्रास (ताप) हरण करणारी
एकमेव नर्मदामैयाच आहे. ती तिच्या जळात, किनार्यावर असंख्य जीवजंतूना आश्रय देते.
त्यांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करते. (सर्वजन्तुशर्मदे)
ज्याप्रमाणे आई आपल्या पुत्रांशी वागतांना आजं दुजं करत नाही; सर्वांचा सारख्याच
प्रेमाने सांभाळ करते त्याप्रमाणे नर्मदा माता सर्वांचे दैन्य, दुःख, दारिद्र्य, भूक विवंचना, चिंता, काळजी, शोक, निराशा हतबलता, लाचारी, असहायता, दूर करते.
तिच्या किनारी राहणारा भिल्ल (किरात) असो वा कोणी आपापसातील विजातीय संबंधातून जन्मलेला(सूत) असो वा उच्च वर्णीय
ब्राह्मण (वाडव) असो, वा महान विचक्षण, प्राज्ञ, विद्वान (पण्डित) असो; वा एखादा धूर्त लबाड(शठ) असो; वा कोणी बहुरूपी
सोंगाड्या(नट) असो! नर्मदामाता कुठलाही भेदभाव न करता, सर्वांचा सांभाळ सारख्याच
आनंदाने करते. तिच्या आश्रयाला आलेल्यांना सर्व प्रकारची समृद्धी प्रदान करते.सर्व
जीवजंतुंना तिच्या जलात उदारपणे आश्रय देते. अशा ह्या अत्यंत उदार, प्रेमळ, ज्ञान,
समृद्धी अशी सर्व सकारात्मक दाने देणार्या नर्मदामातेच्या चरणकमळांवर कोटिकोटी प्रणाम! त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।8
अहो मृतं स्वनं श्रुतं महेश-केशजा-तटे
किरात-सूत-वाडवेषु पण्डिते शठे नटे।
दुरन्त-पाप-ताप-हारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।8
तरंगसंगितास साठवीत कर्णसंपुटी
पडे तुझ्या तटीच देह; भग्यदायि मृत्युही
सखेच जन्मलीस तूचि शंभुच्या जटांतुनी
नसेचि अंत तेहि पाप लीलया करी दुरी।।8.1
असो चि भिल्ल, जातिहीन, सद्गुणीच वा कुणी
लबाड धूर्त नाटकीच पापमुक्त त्या करी
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।8.2
नर्मदाष्टकम्
श्लोक 9
आठव्या श्लोकानंतर नर्मदाष्टक पूर्ण होते. 9 वा श्लोक
हा फलश्रुतीचा आहे. नर्मदाष्टक म्हटल्याने होणारा लाभ सांगितला आहे. जे जे अत्यंत
भक्तिभावाने, दिवसातून तिनदा हे नर्मदाष्टक निरंतर म्हणतील त्यांना दैना, दुर्दशा,
हालअपेष्टा ह्यांचा सामना करावा लागत नाही ते कधी अधोगतीला जात नाहीत. रोग,
अपकीर्ती, भूत, प्रेत, पिशाचबाधा त्यांच्यापासून दूर राहतात. नर्कात जाण्याची भीती
त्यांना रहात नाही. देवांनाही दुर्लभ (देवदुर्लभं) असलेले कैलासलोकीचे गौरवाचे स्थान (महेशधाम-गौरवं) त्यांना सहज (सुलभ्य) प्राप्त होते. जन्ममृत्यूच्या चक्रात
ते कधी अडकत नाहीत. त्यामुळे अत्यंत भीतीदायक अशा रौरव नावाच्या नरकाचे भयद
दर्शनही त्यांना कधी होत नाही.
म्हणजेच जो हे स्तोत्र म्हणतो त्याला सर्व सुखे, आनंद
समाधान प्रसन्नता, कृतार्थता लाभते. असे फळ मिळविण्यासाठी दोन शब्दांना अधोरेखित
करणे मला आवश्यक वाटते. भक्तीभाव आणि निरंतर. नर्मदाष्टक वा कोठलेही स्तोत्र आपण रोज म्हणायला लागलो की रोजचा उपचार
होऊन जाते. त्यात भक्तीभाव रहात नाही. आपण नर्मदा मातेच्या चरणी पूर्ण रममाण होऊन,
आपलं मन तिच्या चरणांवर अर्पून हे स्तोत्र म्हटलं पाहिजे. धरसोड वृत्ती असता कामा नये. आज म्हटलं, उद्या नाही म्हटलं
असं नाही तर आजीवन / निरन्तर म्हणजे रोज तीन वेळा हे स्तोत्र म्हणणे
अपेक्षित आहे. जो अशा प्रकारे हे स्तोत्र म्हणेल त्याला वर वर्णिलेल्या मोक्षसुखाचा लाभ होतो.
यथामति केलेला हा भावानुवाद नर्मदा-पादपद्मी समर्पण!
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा।
सुलभ्य देवदुर्लभं महेशधाम-गौरवं
पुर्नभवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ।।9
तिन्ही त्रिकाळ भक्तियुक्त चित्तवृत्तिनेचि जो
म्हणेचि नर्मदाष्टका न जाय दुर्गतीस तो
न जन्ममृत्युशृंखलेत जाय तोचि
बांधला
मिळे न त्यास नर्क घोर रौरवासमा पुन्हा।।9.1
मिळे न जे सुरांसही तपेचि आचरूनही
महेश धाम प्राप्त त्यांसि सत्वरी
सुखासुखी
मिळेचि मान गौरवादि त्यांस शंभुच्या घरी
सुखेचि राहती तिथे अनंतकाळ तोषुनी।।9.2
---------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment